Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोल्हापूर निवडणुकीतून मनसेची माघार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून मनसेने माघार घेतली आहे. निवडणूक लढवणं दिवसेंदिवस महाग होत असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ही घोषणा केली.

नाशिक येथील 'राजगड' या मनसेच्या कार्यालयामध्ये राज ठाकरे यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शेतीतज्ज्ञांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एका मतासाठी दहा हजार रुपये खर्च करण्याची माझ्या पक्षाची क्षमता नाही. त्यामुळे यंदाही मनसे कोल्हापूरमध्ये महापालिकेची निवडणूक लढणार नाही,' असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी निर्णायक आंदोलन करणार!

दुष्काळच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरण्याचे संकेत राज यांनी यावेळी दिले. 'माझी आंदोलनाची स्टाईल वेगळी आहे. टोलनाक्‍यांच्या आंदोलनावेळी जनतेने हे पाहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी माझ्या पक्षाचे आंदोलन निकाल लावणारेच ठरेल,' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किकवी पेयजल प्रकल्प गुंडाळल्यास जनआंदोलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि आगामी प्रगती व भवितव्यासाठी किकवी पेयजल प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे. पंरतु शासनाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाकडून हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे.

शहराच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता गंगापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. गंगापूर धरणात गाळ साठल्यामुळे कमी झालेला १५४५ द.ल.घ. फूट पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरणाच्या उर्ध्व बाजुला किकवी धरण आवश्यक आहे. २००९ मध्ये समीर भुजबळ यांनी जलसंपदा विभागामार्फत किकवी पेयजल प्रकल्पाच्या रु.२८३.५४ कोटी प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवली. या योजनेचा एकूण पाणीसाठा २४८५ द.ल.घ.फूट असून, २१२० द.ल.घ. फूट उपयुक्त साठा असणार आहे. या योजनेद्वारे १.५० मे.वॅ. विद्युत निर्मिती होणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात १७२.४६८ हेक्टर वनजमीन आणि १० गावांतील ७४०.०३२ हेक्टर खाजगी जमीन येते. शासनाने या वर्षापासून २०१८ पर्यंत १२५ ते १५० कोटी रुपये टप्प्या टप्प्याने दिले तर हा प्रकल्प निश्चितच पूर्ण होऊ शकतो. मात्र कालच जलसंपदा मंत्र्यांनी निधी कुठून आणणार असे म्हटल्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिककरांच्या आगामी भविष्यासाठी आणि नाशिक शहराच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याने शासनाने जर या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा भुजबळांनी इशारा दिला आहे. समीर भुजबळ यांनी पुढे असेही म्हटले आहे की, राज्याचे जलसंपदा मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांचा सकारात्मक विचार करून नाशिकचे पालकत्व निभवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकी खापरी धरणाला गेट टाकण्यास विरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

वाकी खापरी धरणाला गेट टाकण्याबाबत हालचाली सुरू होत असल्याने धरणग्रस्तांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार निर्मला गावित यांची भेट घेतली. धरणग्रस्तांचे पुनर्वसन व भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळाल्याशिवाय धरणाला गेट टाकण्यास धरणग्रस्तांनी विरोध दर्शवला. आमदार निर्मला गावित यांनीही धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण केल्याखेरीज गेट टाकून दिले जाणार नाही, अशा भूमिका घेतली. यामुळे धरणाला गेट टाकण्याचा प्रयत्न बारगळला असून, येत्या आठवडाभरात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक होणार असल्याची चर्चा आहे.

धरणाखालील काही लोकांनी धरणाला गेट टाकण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. यामुळे प्रकल्पग्रस्तांनी अॅड. रतनकुमार ईचम यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे धाव घेऊन संबंधितांची भेट घेतली. दरम्यान जलसंपदामंत्री, जिल्हाधिकारी व धरणग्रस्त यांची संयुक्त बैठक होऊन धरणग्रस्तांच्या मागण्या व पुनर्वसनाबाबत ठोस व सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत धरणाला गेट टाकण्याबाबत अधिकाऱ्यांनी कोणताही प्रयत्न करू नये, अशी भूमिका धरणग्रस्तांनी यावेळी घेतल्याने अधिकाऱ्यांची कुचंबना झाली.

वाकी खापरी धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी प्रयत्नशील आहे. धरणग्रस्तांना न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे. पालकमंत्र्यांसमवेत धरणग्रस्तांची बैठक व्हावी यासाठी आपण प्रशासनाला पत्र दिले आहे. लवकरच पालकमंत्र्यांसमवेत बैठक होईल. धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणाला गेट टाकू दिले जाणार नाही.

- निर्मला गावित, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादळी पावसाने भाजीपाला जमीनदोस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

महिनाभर पाऊस नसल्याने टँकरने पाणी आणत जगवलेल्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी शिवारातील टोमॅटो, दोडके, भोपळे, कारल्याच्या बागा पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादळी पावसाने भुईसपाट झाल्या. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोळ्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी जोरदार वादळ व विजांच्या कडकडाटसह तळेगाव दिंडोरी शिवारात पावसाने हजेरी लावत शेतमालाचे मोठे नुकसान केले. तळेगाव दिंडोरी येथील सुभाष राजाराम चौधरी यांचे दोन एकर भोपळे, दोन एकर कारले भुईसपाट झाले. चंद्रभान नामदेव चौधरी यांचे तीन एकर दोडके, जगन्नाथ त्र्यंबक चौधरी यांचे एक एकर भोपळे, ज्ञानेश्वर चौधरी, कांतीलाल चौधरी, अंबादास चौधरी यांचे भोपळे व भिका सदाशिव चौधरी यांचे सहा एकर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले.

पावसाने ओढ दिल्याने काही शेतकऱ्यांनी टँकरने पाणी विकत आणून बागा जगविल्या. मात्र परतीच्या पावसाने पूर्ण मातीमोल करून टाकले. या नुकसान झालेल्या पिकांचे कृषी पर्यवेक्षक ढवळे, तलाठी बैरागी यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच उमा चारोस्कर, कारभारी चौधरी व शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ ठिकाणी सटाण्यात घरफोड्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील नामपूर रोड वरील क्रांती नगर व श्रीकृष्ण नगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल नऊ ठिकाणी घरफोड्या केल्या. सुमारे एक लाख ८८ हजार ५०० रुपयांच्‍या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह पोबारा केला. तब्बल नऊ ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सटाणा शहरातील नववसाहत परिसरातील श्रीकृष्ण नगर व क्रांतीनगर परिसरातील कुंदन काकाजी खैरनार, योगेश बाळासाहेब भदाणे, भगवान लक्ष्मण बर्डे, नरेंद्र आनंदसिंग ठोके, भिका बाबुराव वाघ, काकाजी दत्ताजी खैरनार यांच्या घरांचे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील लोखंडी टामीने कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. योगेश बाळासाहेब भदाणे यांच्या घरातून सुमारे २७ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम तर भगवान लक्ष्मण बर्डे याच्या घरातून १६ हजार ५०० रुपये घेऊन पोबारा केला.

सटाणा शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना घर सोडणेही मुश्किल झाले आहे. आतापर्यंत झालेल्या चो-यांचा अद्याप तपास लागलेला नाही. यामुळे पोलिसांपुढेही आव्हान निर्माण झाले आहे. दुष्काळामुळे बागलाणवासीय हवालदिल झाले असताना भुरट्या चो-याही वाढल्या आहेत. यामुळे गस्त घालण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

0
0

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी; पैसेवारी समितीकडून पिकांची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

मुबलक पाण्याच्या जोरावर कृषी प्रधान तालुका अशी ओळख असणाऱ्या निफाड तालुक्याला यंदा कधी नव्हे तेवढ्या दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. पावसाअभावी निफाड तालुक्यातील शेती व्यवसाय संकटात सापडल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. परतीच्या पावसाने आशा जागवल्या असल्या तरी नद्या, नाले, विहिरी अजूनही कोरड्या आहेत. यामुळे रब्बी हंगामही अधांतरीतच दिसत आहे.

कुटुंबकबिल्यासह अहोरात्र मोठे काबाडकष्ट करून शेतात केलेल्या खरिपाच्या पीक-पेरण्या पाण्याअभावी धोक्यात आल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. ऐन पावसाळ्यात आभाळ रुसून बसल्याने परिसरातील विहिरींनी तळ गाठला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने लहरी निसर्गाच्या दृष्टचक्रात

अडकून मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला यंदाचं वर्षही मोठे कठीण जात असून, या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीत शेती व्यवसाय सांभाळण्यासाठी करावे तरी काय असा यक्ष प्रश्न जगाच्या पोशिंद्यासमोर उभा ठाकला आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव, टाकळी, पिंपळगाव नजीक, कोटमगाव, विंचूर, नैताळे, पाचोरे आदींसह अनेक गावांमध्ये अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतीसाठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कांदा, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमगू आदी खरीप पिकांसह टोमॅटोचे पीकही पाण्याअभावी जळू लागल्याने बळीराजावर मोठे आर्थिक संकट घोंगावत आहे. एकीकडे सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतांनाच दुसरीकडे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्याही उभी राहिल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.

लासलगावच्या पिंपळगाव नजीक येथे विहिरींना पाणीच नसल्याने उभी पिके जळून गेली आहेत. त्यात चारा पिकेही नष्ट झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण होत आहे.

पर्जन्यमानात घट

निफाड तालुक्यात सरासरी पर्जन्यमान ४८२ मिमी राहिले आहे. गेल्यावर्षी ६० मिमी पावसाची घट होऊन ती ४२२ मिमी नोंदविली

गेली. चालू वर्षात जून, जुलै,

ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ती अवघी ३२ टक्के म्हणजेच १५२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

विशेष कमिटीची स्थापना

पाणीटंचाई परिस्थितीसंदर्भात निफाड पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पंचायत समिती सभापती सुभाष कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक होऊन संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामसेवक यांना पाणीटंचाई निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील १३५ गावांमध्ये पैसेवारी १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी एक विशेष कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, प्रगतशील शेतकरी आदींचा समावेश असून, ही कमिटी पिकांची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल तयार करून प्रशासनाला सादर करणार आहे.

पाणीपुरवठा योजना

निफाड तालुक्यात २००६-०७ ते आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत एकूण ८३ योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. मात्र, आजघडीला त्यातील ३९ योजना सुरळीत असून ३९ योजनांचे कामे सुरू आहेत. पाच योजना बंद पडल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवरे यांनी दिली. निफाड तालुक्यात लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे टँकर सुरू करण्यात आला असून, आठ वाड्यांना टँकरने पाणी सुरू आहे. टाकळी विंचूरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोटमगाव, रानवड, मुखेड, सावरगाव, नांदूरखुर्द, महाजनपूर, भेंडाळी, चितेगाव, रेडगाव या गावांनाही टँकर सुरू करावे लागतील, असे पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांना कळविण्यात आले आहे.

वळण बंधारे भरून द्या

उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, आदी गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, यावर उपाय म्हणून पालखेड कालव्याचे पाणी विनिता नदीपात्रात सोडून वळण बंधारे भरून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पैसेवारी पंचवीस पैसे?

लासलगाव येथील चालू वर्षांतील पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामात पिकाचे उत्पादन धोक्यात आले आहे. शुक्रवारी लासलगावचे महसूल मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर, ग्रामविकास अधिकारी सी. के. मुंढे व तलाठी एस. पी. गांगुर्डे यांच्यासह पैसेवारी समितीने लासलगावी विविध शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. लासलगाव येथील प्राप्त पीक पैसेवारीनुसार खरीप हंगामात पिकाचे नुकसान झाल्याने वीस ते पंचवीस पैशांच्या आत पीक आणेवारी घोषित होण्याच्यी शक्यता आहे.

परतीच्या पावसावर आशा

परतीच्या पावसाने दोन दिवस हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेला असला तरी रब्बी हंगामाला या पावसाचा फायदा होऊ शकतो. दोन दिवस तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे कांदा पिकाला थोडा फायदा होऊन लागवडही वाढू शकते. पावसाने सातत्य ठेवल्यास रब्बी हंगाम घेणे शक्य होईल. यामुळे बळीराजाच्या नजरा या परतीच्या पावसावरच लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांकडून भाविकांची लूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिहंस्थ महाकुंभाच्या दुसऱ्या शाही पर्वणीत तपोवनातून बाहेर जाण्यासाठी काही रिक्षाचालकांना पोलिसांनी पासेस दिले होते. परंतु, पासेस देण्यात आलेल्या बहुतांश रिक्षाचालकांनी भाविकांना तपोवनातून बस स्थानकापर्यंत एक ते दोन किलोमीटर सोडण्यासाठी तब्बल ५०० ते १००० रुपये भाडे आकारणी करत लूटच केली.

पर्वणीनिमित्त आलेल्या भाविकांची रिक्षाचालकांकडून शाही स्नानाच्या दुसऱ्या दिवशीही लूट सुरूच असल्याने आरटीओ व पोलिस कारवाई का करत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे नाशिकरोडला भाविकांना घेऊन जाणारे रिक्षाचालक नेहमीच्या भाड्या पेक्षा वीस ते तीस रुपये अधिक प्रवासी भाडे घेत सोमवारी देखील भाविकांची लूट करत होते. पोलिसांच्या समोरच जादा भाडे आकारणी करत रिक्षाचालकांचा मुजोरपणा सोमवारीही सुरूच असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. मात्र, पोलिसांनी देखील बघ्याच भूमिका घेतल्याने संशय व्यक्त होत आहे. आरटीओने केवळ औपचारिक रिक्षाचालकांसाठी राबविलेल्या सौजन्य अभियानाची खिल्लीच रिक्षाचालकांनी उडविली आहे. मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी भाविकांकडून केली जात आहे.

रिक्षाचालकांमध्ये पोलिसांसमोरच वाद

पहिल्या शाही स्नानाच्या पर्वणीत सर्वच रस्ते पोलिस प्रशासनाने बंद केल्याने घरापासून बस थांबापर्यंत सोडण्यासाठी भाविकांकडून चारपट भाडे आकारणी रिक्षाचालकांनी केली. दुसऱ्या पर्वणीला रिक्षाचालकांना दिलेल्या सुटची भाविकांची आर्थिक लूट करणारी ठरली. मायको सर्कल व पार्थडी फाटा येथे पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा सिट पळविण्यावरून वाद देखील झाला. याप्रसंगी पोलिसांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेत उभे राहणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायपीट पाचवीला पुजलेली

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

पर्वणी आटोपून नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून घरी परतणाऱ्या भाविकांची सोमवारी मोठ्या प्रमाणात वणवण झाली. रेल्वे स्टेशनसमोर पोचल्यानंतर आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तब्बल २ किलोमीटरचा फेरा भाविकांना पार करावा लागला. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेली काळजी मात्र मानवीय दृष्ट्या अबालवृद्धांना प्रचंड पीडा देणारी ठरली.

रेल्वे प्रशासनाने भाविकांना प्रमुख प्रवेशद्वाराच्या बाहेर रेल्वे सुरक्षा बलाचे बॅरिकेडींग उभारून मालधक्याच्या बाजूने प्रवेश दिला. त्यामुळे येणारा भाविकांना पायपीट करावी लागली. अनेकांनी तर रेल्वे प्रशासनाने नावाने बोट मोडत आणि सोबत असलेल्या बॅगा खांद्यावर डोक्यावर उचलून नेत मार्ग शोधत रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला. वृद्ध व्यक्तींना रोटरी क्लबच्या माध्यमातून २० व्हिलचेअरची मदत देण्यात आली. अनेक वृध्द महिला, अंध अपंगांना त्याचा सर्वाधिक उपयोग झाला. त्र्यंबकेश्वर, रामकुंड, पंचवटी व स्नानाची पर्वणी साधून देशाच्या कानाकोपऱ्यातील आपल्या घराकडे परतण्यासाठी सोमवारी उशिरापर्यंत सुमारे २ लाख भाविकांनी १५ हून अधिक विशेष रेल्वे गाड्यांसह नियमित ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला.

बॉम्ब शोधक पथक तैनात

दुसऱ्या पर्वणीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने येणारा जनसमुदाय पाहता काही घातपात घडू नये म्हणून भुसावळ मंडलाच्या वतीने रेल्वे स्थानकाबाहेर सकाळपासूनचं बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले होते त्याच बरोबर १० श्वानपथकही तैनात नियमित तपासासाठी फिरत होते.

अप डाऊन प्रवाशांचे हाल

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून मुंबई, मनमाड, जळगाव, चाळीसगावकडे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बस स्थानकाच्या बाहेरच अडविण्यात आले. त्यामुळे त्यांचा संभ्रम झाला. त्यांचा पोलिसांशी किरकोळ वाद होत असल्याचेही दिसून आले.

बसस्थानक निर्मनुष्य

प्रवाशांची नेहमी ने-आण करण्यासाठी सिद्ध असणाऱ्या बस स्थानकाने कधी नव्हे तो मोकळा श्वास घेतला. रेल्वे प्रशासनाने बस स्थानकाच्या आवारात केलेल्या बेरिकेडींगमुळे नाशिकरोड बस स्थानक प्रथमच निर्मनुष्य झालेले पहावयास मिळाले.

खाकी वर्दीत माणुसकीचे दर्शन

बाहेरगावाहून आलेले पोलिस वृद्ध व्यक्तींना आसरा देत रांगेने प्लेटफॉर्मपर्यंत पोचवित मानवतेचे कार्य करीत असल्याने पोलिसाच्या आतील माणुसपणाचे दर्शन झाले. याउलट रेल्वे सुरक्षा बलाचे जवान केवळ बघ्याची भूमिका पार पडत होते. भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारलेल्या एका शेडमध्ये साधू अन् मद्यपींमध्ये हाणामारी झाली. तेव्हाही रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तसेच उभे होते. तर पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.

व्यावसायिकांची मालधक्का रोडला गर्दी

इतर वेळी नाशिकरोड बस स्थानकाच्या आवारात व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी पर्वणी पुरता व्यवसाय बंद ठेवला होता. त्यांनी बसस्थानकाच्या आवारातून बाहेर पडत मालधक्का रोडच्या दुतर्फा आपली दुकाने थाटत आणि व्यवसायाची पर्वणी साधली.

थकलेल्यांना आंबेडकर विहाराचा आसरा

पायपीट करून हैराण झालेल्या भाविकांनी मालधक्का रोडवर असणाऱ्या आंबेडकर विहाराचा आसरा घेत थोड्या वेळ विश्रांती घेतली. दोन दिवस पायी चालून आलेला थकवा घालविण्यासाठी पुढील मार्गाने जाण्यासाठी त्यांना हा काही काळचा विसावा नवी ऊर्जा देणारा ठरला.

प्रशासनाने पंचवटीकडे जाण्यासाठी पायपीट कमी केली. मात्र, रेल्वे प्लेटफॉर्म गाठण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावाच लागला.

- डॉ. राधेश्याम पांडे, प्रवासी

रेल्वेने निदान वृध्द व्यक्तींचा तरी विचार करावयास हवा होता. पुढच्या पर्वणीत तरी सुधारणा होण्याच्या आम्हाला अपेक्षा आहे.

- निवृत्ती घाडगे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिरवणुकीवर लाखो रुपयांची उधळण

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

पेशवाई असो वा शाही मिरवणूक आखाड्यांनी प्रतिष्ठेची केली होती. यामुळे प्रत्येक आखाड्याने शाही मिरवणुकीवर लाखो रुपये उधळले. मिरवणूक रथ अधिक आकर्षित करण्यासाठी फुले, फुलांच्या माळा, केळीची पाने, झेंडे, ओम नावाचे बॅनर बनिवण्यात आले होते. आखाड्यांची शाही मिरवणूक डोळ्यांची पारणे फेडणारी असली तरी त्यावर अमाप खर्च करण्यात आला.

त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी शाही मिरवणुकीसाठी किमान प्रत्येकी पंधरा रथ तयार केले होते. एका रथासाठी म्हणजे ट्रॅक्‍टरला एका दिवसाचे भाडे म्हणून दोन हजार रुपये देण्यात आले. रथ सजविण्यासाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आले. जवळपास प्रत्येक रथ फुलांनी सजविण्यात आला होता. एका रथावर सरासरी फुलांसाठी तीन हजार रुपये खर्च झाला. झेंडे तसेच बॅनरवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. काही आखाड्यांनी केळीच्या पानांचाही रथ सजविण्यासाठी वापर केल्याचे दिसून आले. आचार्य महामंडलेश्वर यांचा रथ सजविण्यासाठी सर्वाधिक खर्च करण्यात आला. नित्यांनद महाराज यांची मिरवणूकही लक्षवेधी ठरली. बँड, ढोल ताशे, तसेच पालखी यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले.

ट्रॅक्टरमालकांची चांदी

मिरवणुकीसाठी हत्ती, घोडे, उंट यांच्या वापरावर बंदी घातल्याने ट्रॅक्टरचा मिरवणुकीसाठी वापर केला जात आहे. पेशवाई तसेच शाही मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. पेशवाई, पहिली शाही मिरवणूक व दुसरी शाही मिरवणूक आणि शेवटच्या शाही मिरवणुकीसाठी त्र्यंबक परिसरातील आखाड्यांनी ट्रॅक्टर बुक केले आहेत. एका दिवसाच्या मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरमालकाला दोन हजार रुपये मोजले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरुपी ठेवणार

0
0

पोलिस आयुक्तांची माहिती; राज्य सरकारला प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थासारख्या महासोहळ्यात सीसीटीव्ही यंत्रणेची पोलिस प्रशासनाला मोलाची मदत झाली. यापुढेही गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही गरजेचे असून, ते कायमस्वरुपी असावेत असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली. नागरिक, प्रसारमाध्यमे आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना अवलंबल्याने पर्वणी निर्विघ्न पार पडल्याचे सांगत त्यांनी या सर्वांचे आभार मानले.

‍दुसरी पर्वणी निर्विघ्न पार पडल्यामुळे पोलिसांनी सुस्कारा सोडला आहे. या पर्वणीत आलेल्या अनुभवांची माहिती देण्यासाठी जगन्नाथन यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामध्ये ते म्हणाले, पहिल्या पर्वणीत आम्ही मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. हे बॅ‌रिकेडिंग दुसऱ्या पर्वणीत कमी करण्यात आले. त्यामुळे अंतर्गत वाहतूक सुरळीत सुरू राहण्यास मदत झाली. सीसीटीव्ही यंत्रणा पर्वणीकाळात महत्त्वाची ठरली. त्यामुळे बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य झाले. आमच्या नियोजनावर आमचा विश्वास होता. तसेच, पहिल्या पर्वणीचा अनुभव गाठीशी होता. म्हणूनच लाखो लोक शहरात दाखल होत असतानाही आम्हाला गर्दीचे दडपण जाणवले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्रेय प्रत्येक पोलिसाचे

गेल्या काही महिन्यांपासून सिंहस्थ नियोजनाच्या दडपणाखाली वावरणारे पोलिस आयुक्त सोमवारी बरेच खुलले. पर्वणी निर्विघ्न पार पडल्याचे श्रेय त्यांनी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला दिले. आपल्या क्षमतेच्या पुढे जाऊन प्रत्येकाने काम केल्याचे सांगत त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली.

माध्यमांचेही श्रेय

पहिल्या पर्वणीत पोलिसांनी अतिरेकी बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग केल्याने भाविकांनी कुंभमेळ्याकडे पाठ फिरविल्याची टीका प्रसारमाध्यमांनी केली होती. शहरातील नागरिकांची त्यामुळे पायपीट झाल्याने नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेडिंग हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही शहरातील बऱ्याच ठिकाणचे बॅरिकेडिंग हटवून नागरिकांसाठी रस्ते मोकळे केल्याचे श्रेय प्रसारमाध्यमांचेच असल्याचे जगन्नाथन यांनी सांगितले. मात्र त्यामुळे भाविकांचा ओघ वाढला हे मान्य करण्यास त्यांनी इन्कार केला.

६५ लाख भाविकांचे स्नान

सिंहस्थ पर्वणीकाळात नाशिकमध्ये किती भाविक आले असतील याचा नेमका अंदाच जगन्नाथन यांनी व्यक्त केला आहे. शनिवार आणि रविवार अशा ४८ तासांमध्ये ६५ लाख भाविकांनी नाशिकमध्ये स्नान केल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या खाताहेत भाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावरही झाला आहे. मेथी, कोथिंबीर, शेवगा यांचे भाव हळूहळू आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात कोथिंबीरची जुडी ६० रुपयांना झाली होती. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने कोथिंबीरचे नुकसान झाले. यामुळे भाव कडाडले होते. सध्या तीस रुपये जुडी या दराने कोथिंबीर मिळत आहे.

सध्या किरकोळ बाजारात हिरवी मिरची, भेंडी, दोंडके, मेथी शेवगा, गिलके, वांगे, कारले या सर्व हिरव्या भाजीपाल्याची चांगली आवक होत आहे. गिलके, दोडके, कारले प्रत्येकी तीस ते चाळीस रुपये किलोने विकले जात आहेत. थोड्या पाण्यावर शेतकऱ्यांनी ही पिके जगवली आहेत. मात्र, आता विहिरीही कोरड्याठाक पडल्याने भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू शकतात. सध्या शेवग्याला उत्पादकांच्या दृष्टीने सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या या आठवड्याप्रमाणे भाजीपाल्यांचे भाव टिकून आहेत. मेथी जुडी, टोमॅटो, भेंडी, मिरची, शेपू, गिलके, कारले यांचे दर जैसे थे आहेत. भोपळ्याची जोडी आकारानुसार दहा ‌किंवा पंधरा रुपयाला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादनाका बॅरिकेडिंगमुळे हैराण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्ड हा रामकुंडाकडे जाणारा मुख्य रस्ता प्रशासनाने प्रशासकीय रस्ता म्हणून घोषित केल्यामुळे सकाळपासूनच या मार्गावर बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला. सायंकाळी नागरिकांना पंचवटीकडे जाणे कठीण झाले.

प्रशासकीय मार्गावर वाहनांसहीत भाविकांना जाण्यास बंदी होती. सायंकाळच्या सुमारास स्थानिक नागरिक घराबाहेर पडले. त्यांना रामकुंडावर जाण्यासाठी हाच सर्वांत चांगला पर्याय होता. मात्र, त्यावर बॅरिकेडिंग होती. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काट्या मारुती मंदिराजवळून जाण्याचा पर्याय पोलिसांनी त्यांना सुचवला. मात्र, नागरिक पोलिसांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुमारे दोन तासापेक्षा काळ अनेक नागरिकांनी पोलिसांना बॅरिकेडिंग काढून घेण्याची विनंती केली. याशिवाय काही नागरिकांनी बॅरिकेडिंग तोडून थेट प्रशासकीय रस्त्यावर प्रवेश केला. नागरिकांना आवरताना पोलिसांना नाकीनऊ आले. सकाळपासून हीच परिस्थिती असून कर्मचाऱ्यांना जेवणासाठी वेळही मिळाला नसल्याची प्रतिक्रिया कर्तव्यावरील पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदातटी फुटला पुनर्भेटीने अश्रूंचा बांध

0
0

Jitendra.tarte @timesgroup.com

नाशिक : लाखोंच्या लोंढ्यात आप्तेष्टाचा हात हातून सुटल्यानंतर कावरी-बावरी झालेली नजर, दाटलेला कंठ अन् भाषिक अडसराअभावी कंठातच दाटलेल्या भावना अशा प्रसंगाने सुन्न झालेल्या सुमारे आठशे कुटुंबीयांना प्रियजनांच्या पुनर्भेटीचा आनंद यंत्रणा अन् सामाजिक संस्थांच्या योगदानाने अनुभवता आला. अन् पाणावलेल्या पापण्यांनी आप्तांच्या सावल्या शोधणाऱ्या अश्रूंचा बांध अखेरीला पर्वणीच्या दिवशी गोदातटी फुटला.

शाही पर्वणीच्या ओढीने मिळेल त्या वाहनाने देशाच्या काना कोपऱ्यातून अबालवृध्दांनी शनिवारी व रविवारी नाशिक गाठले. या दोन दिवसांच्या कालावधीत शहरात दाखल झालेल्या लाखो लोकांमधून हजारो जण गर्दीच्या लोंढ्यात भरकटले गेले. पैकी शनिवारी शहरात सुमारे ३७६ जणांची हरविल्याची नोंद करण्यात आली होती. तर रविवारी सुमारे ४०२ जणांची हरविल्याची नोंद करण्यात आली. यामधील ७७५ जणांचा शोध घेण्यात पोलिस यंत्रणेला यश आले. तर हरवलेल्यांपैकी अवघ्या तीन जणांचा शोध अद्याप बाकी आहे.

ज्यांच्या आनंदासाठी अनोळखी शहरात पाऊल ठेवले त्यांचाच हात हातून सुटावा या जाणिवेने पायाखालची जमीनच सरकलेल्या अनेकांचे चेहरे भेदरल्याचे हरविले सापडले केंद्राच्या भोवताली दिसत होते. मात्र, या विषयासंदर्भातील संभाव्य शक्यता पडताळत पोलिस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या योगदानाने हरविलेले लोक त्यांच्या आप्तांना भेटत होते. त्या प्रसंगाला भोवतालही भावनिक होत होता. हरवलेल्या माणसांमध्या तीन वर्षांच्या लहानग्या बाळापासून तर सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश होता.

गोदातटाला लाखोंचा वेढा

हजारो लोकांच्या हरविण्याची खबर घेणाऱ्या यंत्रणेने गोदाकाठी जमणाऱ्या भाविकांच्या नोंदीही अपडेट ठेवल्या होत्या. यात शनिवारी रात्रभरातून सुमारे सहा लाख भाविक आल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यंत्रनेकडील नोंदींनुसार रविवारी सकाळपासून प्रत्येक तासाला गर्दी वाढत गेली. सकाळी सहा वाजेच्या सुमाराला गोदातटी प्रतितास लाखाच्या गर्दीने येणारा ओघ सकाळी ९ वाजेनंतर प्रतितास तीन लाखांच्या गर्दीने येऊ लागला.

दुपारी १ ते २ या वेळेत दिवसातील सर्वाधिक म्हणजे सुमारे १० लाख संख्याही नोंदविली गेल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यानंत ओघ पूर्ववत झाला. या लाखोंच्या गर्दीत तुटलेल्या आप्तेष्ठांच्या प्रतिमांचा शोध घेताना भिरभिरणाऱ्या चिंब नजरांना मात्र गोदामाईने पुनर्भेटीचा आशीर्वाद देऊन पावन केल्याची भावनाही या मदत केंद्रात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ भाविकसंख्येसाठी तंत्रज्ञानाचा आधार

0
0

Gopal.paliwal@timesgroup.com

सिंहस्थात दुसऱ्या पर्वणीला किती भाविकांनी पर्वणी साधली यावर वेगवेगळे आकडे सांगितले गेले. पण या भाविक संख्येसाठी काही विशेष तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आल्याचे अधोरेखित करावे लागेल. कुंभमेळ्यात एमआयटी आणि कुंभथॉन टीमने अशिओटो फुटमॅट तंत्रज्ञानाचा सहाय्याने भाविकसंख्या मोजली तर आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजीव चौबे यांनी भाविकसंख्या गर्दीची घनता मोजण्याच्या पद्धतीने मोजली.

एमआयटी कुंभथॉनकडून पाच तरुणांनी अशिओटो नावाचे अॅप तयार केले. तसेच अशिओटो फुटमॅटचा वापर करून या गर्दीचे मापन केले. याच्यावर संपूर्ण ताबा तसेच रिअल टाइम भाविकसंख्या दिसण्यासाठी अशिओटो डॉट इन नावाची वेबसाईट केली. यावर फुटमॅट बसविलेल्या ठिकाणांची आकडेवारी वेळोवेळी अपडेट होत होती. या सर्व प्रोजेक्टसाठी कार्यरत टीम ला रमेश रासकर, सुनील खांडबहाले, संदीप शिंदे, महेश गुजराथी, सचिन पाचोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

काय आहे अशिओटो फुटमॅट?

अशिओटो हा मूळचा जपानी शब्द आहे. याला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रीक सेन्सरची जोड देवून ही टेक्नॉलॉजी विकसित केली. यावर पाय ठेवल्यानंतर त्याची गणना होवून त्यावरून गेलेल्यांची आकडेवारी दिली जाते.

अॅपद्वारे मॉनिटरिंग

फुटमॅटला सेन्सर तसेच तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. नाशिकच्या निलय कुलकर्णी, प्रणय निरगुडे, हिरेन पंजवानी, परिक्षित जाधव, विराज रानडे यांनी यासाठी मेहनत घेतली. पहिल्या पर्वणीला केवळ एका तर दुसऱ्या पर्वणीला भाविकांच्या पाचही एक्झिट पॉईंटला ही फुटमॅट बसविण्यात आल्याची माहिती कुंभथॉनकडून देण्यात आली.

गर्दीची घनता मोजण्याची पद्धत वापरली

सिंहस्थात आलेल्या भाविक संख्येसाठी पर्वणीच्या चार पाच दिवसाअगोदरच लोकांच्या येणाऱ्या साधनांवर नजर ठेवून होतो, असे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजीव चौबे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. आम्ही एका चौरस मीटरात तीन ते चार माणसे याप्रमाणे भाविकसंख्या मोजली आहे. त्यासाठी संपूर्ण घाटाची जागा आणि त्यानुसार आलेल्या भाविकांची संख्या यावरून हा ढोबळ अंदाज काढण्यात आला. भाविकांनी शहरात रेल्वे, बस, खासगी वाहन याद्वारे प्रवेश केला. तेथील आकडेवारीचाही यासाठी आम्ही आधार घेतल्याचे चौबे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदारास महापालिकेची नोटीस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या शाही पर्वणीत साधुग्राम व रामकुंडावरील कचरा उचलण्यास हलगर्जी केल्याप्रकरणी आरोग्य विभागाने आसिफ अली सय्यद या ठेकेदाराला नोटीस बजावली. सोबतच टाळकुटेश्वर घाटावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यालाही नोटीस बजावली आहे. दरम्यान, दोन दिवसात शहरातून साडेसातशे टन कचरा उचलण्यात आला असून, रामकुंडासह साधुग्रामच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

महापालिकेने पर्वणीत साधुग्रामसह रामकुंडावर स्वच्छतेला प्राधान्य दिले होते. त्यासाठी ठेकेदारांना सक्त आदेश दिले होते. तरीही दुसऱ्या पर्वणीत साफसफाईचा ठेका घेणाऱ्या आसिफ अली सय्यद या ठेकेदाराने स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा केला. त्यामुळे संबंधित ठेकेदाकडून खुलासा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने सोमवारी या ठेकेदाराला नोटीस काढून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारावर संक्रात कोसळली आहे. टाळकुटेश्वर घाटावर ड्युटी पूर्ण न करणाऱ्या येलूरकर या कर्मचाऱ्यालाही नोटीस बजावण्यात आली आहे.

सोबतच दोन दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढला आहे. मात्र, घंटागाड्या पूर्ण नसल्याने दुसऱ्या दिवशीही साधुग्राम स्वच्छ होऊ शकले नाही. दोन दिवसात शहरातून तब्बल साडेसातशे टन कचरा उचलण्यात आला आहे. त्यात १३ तारखेला ३१५ टन तर १४ तारखेला ४४१ टन कचरा उचलण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांची ‘पर्वणी’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी परराज्यातून आलेल्या भाविकांनी अंघोळीसाठी रामकुंडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्वणीच्या दिवशी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ज्यांची अंघोळ राहून गेली त्यांनी रविवारी नाशिकमध्ये मुक्कामी राहणे पसंत करून सोमवारी अंघोळीला प्राधान्य दिले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही दिवसभरात अंघोळ करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली.

या सर्व गर्दीमध्ये रामकुंडावरील जनजीवन मात्र पूर्वपदावर आल्याने गर्दी जाणवली.

रामकुंड परिसरात ‌विक्रेत्यांना काही काळासाठी वस्तू विक्री करण्यासाठी बंदी करण्यात आली. मात्र, दुसरे शाहीस्नान झाल्यानंतर ही बंदी काहीशी शिथिल करण्यात आल्याने रामकुंड परिसरात अनेक विक्रेते दुतर्फा जीवनोपयोगी वस्तू विकण्यासाठी बसले होते.

विशेष म्हणजे पोलिसही त्यांना हटकत नव्हते तर काही महिला पोलिसांनी या गर्दीत आपली खरेदीची हौस भागवून घेतली. रामकुंडावर जागोजागी घाऊक विक्रेत्यांनी वस्तू विकण्यासाठी बैठक घातली होती. यात तवे, कड्या, विळे, चाकू, सुऱ्या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तूंचा समावेश होता.

भिकाऱ्यांचा सूळसूळाट

पर्वणीनंतर या ठिकाणी भिकाऱ्यांचा प्रचंड सूळसूळाट झालेला पहावयास मिळाला. गोदाघशटावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भिकाऱ्यांनी ठाण मांडले होते. परराज्यातून आलेल्या भाविकांनाही या भिकाऱ्यांनी गंडवले. येथील फळविक्रेत्यांकडून फळे विकत घेऊन भाविक या भिकाऱ्यांना देत होते; मात्र त्याबरोबरच भिकारी पैशांचीही मागणी करीत होते. नारोशंकराच्या मंदिराबाहेर तर भिकाऱ्यांनी रांगच लावल्याचे दृष्टीस पडले.

फोटाग्राफर्सची चांदी

परराज्यातील भाविकांनी फोटो काढून घेतल्याने व्यावसायिक फोटोग्राफर्सची चंगळ झाली. वीस रुपयांना कॉफी याप्रमाणे फोटो देण्यात येत होते. अंघोळ करताना, गंगेच्या धारेच्या बाजूला, दुतोंड्या मारुतीजवळ फोटो काढून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडावर स्वच्छतेला खो

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या पर्वणीनंतर रामकुंडावर कमालीचे स्वच्छतेचे वातावरण होते; मात्र दुसऱ्या पर्वणीनंतर वेगळे चित्र पहावयास मिळाले. रामकुंडावर जागोजागी अस्वच्छतेचा कळस होता. नारळ, फुलांच्या माळा, द्रोण, कणकेचे दिवे यांचा खच पडलेला होता. महापालिकेने कचरा जमा करण्यासाठी ठेवलेले ड्रम कचऱ्याने ओसंडून वहात होते. ते रिकामे करण्यासाठी घंटागाडी फिरकलीच आल्याचे चित्र होते.

सौभाग्यासाठी जे दिवे सोडण्यात येतात त्यांची भरमार पर्वणीच्या निमित्ताने परराज्यातून आलेल्या भाविकांनी केली असल्याने गोदा अस्वच्छ होण्यात भर पडली. स्वच्छता कर्मचारी पूर्णवेळ कार्यरत असूनही प्रचंड अस्वच्छता परिसरात होती. शौचालयांच्या बाजूला तर चपला व कपडे यांचा खच पडलेला दिसून आला. दारिद्रता घालविण्यासाठी कपडे अंघोळ केलेल्या जागीच सोडण्याचा उपाय पूर्वजांनी सांगितल्याने हे कपडे भाविकांनी तसेच सोडून दिल्याची प्रतिक्रिया एका भाविकाने दिली.

रस्त्यावर दूधाचे लोट

सोमवार असल्याने सोळा सोमवारचे व्रत करणाऱ्या अनेक महिला येथे पूजा करीत होत्या. रामकुंडावर जागोजागी असलेल्या पिंडीवर पूजा करीत असल्याने गोदाघाटावर दूधाचे लोट वाहताना दिसून आले. पिंडीवर केलेला अभिषेक संपूर्णपणे रस्त्यावर येत असल्याने तो इतर भाविकांच्या पायंदळी येत असल्याचेही पूजा करणाऱ्या महिलांच्या लक्षात येत नव्हते.

महिला-पुरुषांचे उघड्यावरच वस्त्रबदल

वस्त्रांतरगृहाचा वाद विकोपाला गेल्यानंतर ते प्रचंड प्रसिध्द झाले; मात्र त्याचा थेट वस्त्र बदलण्यासाठी उपयोग कुणीही केलेला नाही अशी परिस्थिती दोन्ही दिवस पहायला मिळाली. या वस्त्रांतरगृहाच्या बाहेरच जागा मिळेल तेथे महिला-पुरूष कपडे बदलत होते. आडोसा शोधण्याचीही तसदी त्यांनी न शोधल्याने इतरांना मात्र रामकुंडावर फिरावे की नाही असा प्रश्न पडल्याचे महिलांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इटलीच्या दाम्पत्याला मिळाली आयुष्यभराची ‘सखी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण झालेली अपत्याची इच्छा.. नवं नातं जोडण्याची उत्सुकता अन् मातृत्त्व-पितृत्त्वाचे सुख मिळणार म्हणून तरळलेले आनंदाश्रू.. सोमवारी घारपुरे घाटावरील आधाराश्रमात हे चित्र पहायला मिळाले.

अँड्रिनो सोफेन्टिनी आणि बिआन्का मारिया सिल्वानी अपत्याच्या ओढीने इटलीतील मिलान या शहरातून नाशिकला आले आहेत. येथील 'सखी' या दीड-पावने दोन वर्षाच्या मुलीला त्यांनी दत्तक घेतले. जन्मतः ओठ व टाळू चिकटलेल्या सखीला संपन्न पालक मिळाले, याचा आनंद आधाराश्रमातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सखी जेव्हा आधाराश्रमात दाखल झाली, तेव्हा ती केवळ १० दिवसांची होती. तिचे ओठ व टाळू एकमेकांना चिकटलेले होते. ते विलग करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ती सहा-सात महिन्याची झाल्यावर तिचं नाव व फोटो सेंट्रल अॅडोप्शन रिसोर्स ऑथिरिटी (सीएआरए, कारा) या केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. यामार्फत अँड्रिनो आणि बिआन्का यांनी सखीची निवड केली, अशी माहिती आधाराश्रमाचे सचिव प्रभाकर केळकर यांनी यावेळी दिली.

सन २०१४ सालापासून परदेशात गेलेलं सखी ही पाचवे मुलं आहे. यापूर्वी दोन मुले स्पेनला, एक इटलीला व एक रोम येथे गेले आहे. अजून ६० बालके दत्तक जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी दोन बालकेही लवकरच परदेशात प्रस्थान करणार आहेत. मंगळवारी सकाळी १०:३० वाजता या इटालियन दाम्‍पत्याला सखीचे पालकत्त्व जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. रमेश मंत्री व सेक्रेटरी दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहे.

सखीचे नाव बदलणार का?, असा प्रश्न बिआन्का यांना विचारल्यावर 'सखी हेच नाव कायम ठेवून त्यालाच आमच्या संस्कृतीप्रमाणे एखादे नाव जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सखीला भेटून खूप आनंद झाला. इंटरनेटवरून तिला पाहिले होते. प्रत्यक्षात तिला पाहून भेटण्याचा आनंद आमच्यासाठी अवर्णनीय आहे.

- बिआन्का मारिया सिल्वानी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मालधक्क्यावर उन्हात उभे राहिल्यामुळे व श्वसनाचा त्रास झाल्याने परराज्यातील सुमारे साठ वर्षांचा भाविक कोसळला. गर्दीतून त्याला आणणेही पोलिसांना कठीण गेले. रेल्वे मेडिकेल व्हॅनमध्ये प्राथमिक उपचारानंतर त्याला बिटकोमध्ये व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्याचे निधन झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे आज जेलभरो

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (दि. १५) जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरासह तालुकावार जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार जयवंत जाधव व जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिली.

राज्यात भयावह दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीन असून, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दि. १४ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. मात्र, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी १४ सप्टेंबर ऐवजी दि.१५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या जेलभरो आंदोलनात सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत. शेतकरी तसेच शेतमजूर यांनी देखील उपस्थित रहावे, असे आवाहन जाधव व अॅड. पगार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images