Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुष्काळमुक्तीसाठी गोदामातेला साकडे

0
0

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केले गंगापूजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह रामकुंडावर गंगापूज केले. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते गंगापूजन करत, त्यांनी महाराष्ट्र संकटातून बाहेर पडो असे साकडे त्यांनी गोदावरीला घातले. गंगापूजनानंतर पुरी पिठाचे शंकराचार्य अधोक्षाजानंद महाराज यांची भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले. दरम्यान, चव्हाण यांच्या दौऱ्याकडे छाजेड गटाने पाठ फिरवल्याचे दिसून आले.

चव्हाण यांनी सकाळी साडेनऊ वाजता रामकुंडावर जावून गोदावरीचे दर्शन घेतले. गोदावरीच्या तीर्थाचे आचमन करत गंगापूजन केले. यावेळी त्यांच्या सोबत नाशिकचे प्रभारी भाई जगताप, उल्हास पवार, हरीश रोग्ये, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील उपस्थित होते. गंगापूजन केल्यानंतर चव्हाण यांनी पुरी पिठाचे शंकराचार्य अधोक्षाजानंद महाराज यांची भेट घेतली.

विविध जिल्ह्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांसह त्यांनी अधोक्षाजानंद यांच्याशी चर्चा करत त्यांचे आशीर्वाद घेतले. राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी यावेळी अधोक्षाजानंद यांना करून दिली. केंद्र आणि राज्यातील सरकार योग्य काम करत नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी बोलतांना अधोक्षानंदजी महाराज यांनी केंद्र व राज्य सरकारवर कठोर शब्दात टीका केली.

काँग्रेसची गटबाजी कायम

नाशिक दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनाही गटबाजीचा अनुभव आला. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी परिस्थिती साभाळून घेत, आजी माजी पदाधिकाऱ्यांना उपस्थित करण्यात यश मिळवले. मात्र, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या गट या दौऱ्यापासून दूर राहिला. विशेष म्हणजे महापालिकेतील काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सुद्धा या दौऱ्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीची पंरपरा कायम राहिल्याचीच चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनामुळे गोदा झाली ‘मैली’

0
0

नाशिकरोड : आगरटाकळी येथील महापालिकेच्या ७० एलएलडी क्षमतेच्या मलनिःसारण प्रकल्पाच्या ठेकेदाराने नऊ कमचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडीत करून ११ किलोवाटच्या विद्युत पोलवर चढून सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान आंदोलन केले. त्यामुळे प्रकल्पातील प्रदूषित पाणी गोदावरीत मिसळले. आंदोलनाची दखल घेऊन ठेकेदाराने वेतनाचे धनादेश दिले. मात्र, धनादेश वटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका संदीप पाळदे, विकास खैरनार, विशाल साळवे, शरद मराठे, सुरेश हरदाळे, अंकुश आडके, दिल‌ीप बडगुजार, विशाल आवारे यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी व्हीआयपींची बडदास्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसरी शाही पर्वणी काही तासांवर येऊन ठेपली आहे. या पर्वणीसाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असून छत्तीसगड राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल यांचा देखील त्यात समावेश असणार आहे. पर्वणी काळात व्हीआयपी व्यक्तींनी स्नानासाठी येऊ नये, असे आजवर करण्यात आलेल्या आवाहनाचे काय झाले? असा प्रश्न यातून समोर आला आहे.

पहिल्या शाही पर्वणीसाठी ८ ते १० लाख भाविक आणि साधू महंतांनी हजेरी लावली. भाविकांची गर्दी का हटली याची कारणमिमांसा करताना दोन गट तयार झालेत. यातील एका गटाने प्रशासनाची पाठराखण केली तर दुसऱ्या गटाने नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवत फेरनियोजनाची मागणी लावून धरली. पहिल्या पर्वणी दरम्यान किती भाविक येतील याचा नेमका अंदाज कोणालाच नव्हता. त्यामुळे पर्वणीच्या दिवशी व्हीआयपींचा दर्जा असलेल्या व्यक्तींनी स्नानासाठी येऊ नये, असे आवाहनच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. या आवाहानाला पहिल्या पर्वणी दरम्यान सर्वांनीच प्रतिसाद दिला. यावेळेस मात्र, छत्तीसगड राज्याचे विधानसभा अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल यांनी या आवाहनाला छेद दिला. अग्रवाल आपल्या आठ ते दहा साथिदारांसमवेत शाहीस्नानासाठी येणार आहेत. अग्रवाल रविवारी (दि. १३) सकाळी सात वाजता रायपूर येथून निघतील. झेड सिक्युरीटी असलेले अग्रवाल साडे आठ वाजण्याच्या सुमारास ओझर विमानतळावर येतील. तेथून मोटारीने ते शासकीय विश्रामगृह येथे पोहचून साडेदहा वाजण्याच्या सुमारास रामकुंडावर येतील. विशेष म्हणजे अग्रवाल रविवारी नाशिकमध्ये मुक्काम करून सोमवारी सकाळी परत छत्तीसगडला जातील.

पोलिसांवर वाढणार ताण

सध्या तरी एकाच व्हीआयपीचा दौरा समोर आला असून शनिवारी (दि. १२) दिवसभरात त्यात किती वाढ होईल, हे सांगणे कठीण आहे. व्हीआयपींच्या दौऱ्यामुळे बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण पडू शकतो. तसेच याचा फटका सर्वसामन्य भाविकांना सुध्दा बसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीमार्गाला पावसाचा अडथळा?

0
0

नाशिक : राज्यात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडलेला असताना परतीचा पाऊस थोड्या फार प्रमाणात का होईना दिलासा देण्याचे काम करतो आहे. दोन दिवसांपासून शहरात अधूनमधून सरी कोसळत असून गत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पडणाऱ्या पावसाचे स्वागत केले जात असताना याच पावसामुळे शाही मार्गावर त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता आहे. विशेषतः गाडगे महाराज पुलाखाली हा गोंधळ वाढू शकतो.

पहिल्या शाहीस्नाना दरम्यान पावसाने ओढ दिली. प्रचंड उष्णतेचा सामना सर्वांना करावा लागला. दुसऱ्या पर्वणीसाठी वरुण राजा हजेरी लावण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस शाही मिरवणुकी दरम्यान झाल्यास प्रशासनाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. गाडगे महाराज पुलाजवळ वाघाडी नाला येतो. या नाल्याचा प्राकृतिक मार्ग कधीतरी बदलण्यात आला. या नाल्याद्वारे दररोजचे सांडपाणी वाहते.

मात्र, मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस आल्यास नाल्यातील पाणी बाहेर पडून थेट पेशवे कुंडाकडे धाव घेते. अनेकदा याठिकाणी गुडघ्याभरापेक्षा जास्त पाणी जोरात वाहते. याशिवाय गाडगे महाराज पुलाखाली शाही मिरवणुकीसाठी मोठा खड्डा तयार करण्यात आला असून तिथेही पाणी साचते. हे पाणी वीज मोटार लावून उपसण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे. मात्र, त्यासाठी लागणारा सुरक्षित वीज पुरवठा, विद्युत मोटार याची उपलब्धता अजूनपर्यंत झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांस विक्रीबंदीला काँग्रेसचाही विरोध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्युषण पर्वानिमित्त ठिकठिकाणी मांसविक्री बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनेही विरोध केला आहे. लोकांच्या धार्मिकतेत काँग्रेसने कधी हस्तक्षेप केला नाही असे सांगत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारने कोणावरही आपली धोरणे लादू नये असा राज्य सरकारला सल्ला दिला.

राज्य सरकारकडून अशी बंदी लादणे अपेक्षित नसल्याचे सांगत, कोणी काय खावे हे सरकारने ठरवू नये असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. तर कॉलेजात रामायण, महाभारताचे धडे देण्याचा प्रकार म्हणजे जनतेचे मूळ समस्येवरून लक्ष विचल‌ित करण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना चव्हाण यांनी दुष्काळासह मांसबंदी, रामायण महाभारताचे धडे देण्याच्या प्रयत्नावर टीका केली. मांसबंदीच्या राजकारणावर चव्हाण म्हणाले, की काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात धार्मिक प्रश्नात हस्तक्षेप केला नाही. कोणी काय खावे असे निर्बंध लादणे हे चुकीचे आहे. त्याला काँग्रेसचाही विरोध आहे. सरकारकडून अशी परिस्थिती अपेक्षित नाही. सरकारने आपली धोरणे थेट लोकांवर लादू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आपण कोणत्या गोष्टींना अग्रकम द्यावे हे सरकारने ठरवायला हवे. रामायण, महाराभारताचे धडे देण्यास विरोध नाही. मात्र, सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच रामायण महाभारताचा आधार घेतला जात असल्याची टीका त्यांनी केली. रामायण व महाभारताचे धडे देण्याची आताच आवश्यकता का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रदूषण निर्मूलनावर अधिक भर देण्याची गरज आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

सरकार संवेदनाहीन

दुष्काळाबाबत युती सरकार सकारात्मक नाही अशी टीका करत चव्हाण यांनी दुष्काळप्रश्नी सकारात्मक पावले उचललीत तर, आम्ही सरकारसोबत राहू असे मत व्यक्त केले आहे. दुष्काळ व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युद्धपातळीवर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकारकडून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपर्यंत महास्नानपर्व

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात श्रावण अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व असते. सूर्य, चंद्र, गुरू हे ग्रह सिंह राशीत आणि त्याच काळात अमावास्या असा दुर्मिळ योग शनिवारपासून (दि. १२) सुरू होत आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी आलेल्या भाविकांना विशेषत: नाशिक क्षेत्री निवास करणाऱ्या भाविकांनी सकाळी ९.४३ वाजेपासून महापर्व स्नानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्रातील ज्योतिषाचार्य, धर्मशास्त्राचे अभ्यासक, वैदिक विद्वान आणि श्री गंगा गोदावरी मंदिर पंचकोटी पुरोहित संघातर्फे करण्यात आले आहे.

गोदावरी दक्षिणवाहिनी वहाते तो रामकुंड ते मोदकेश्वर मंदिरापर्यंतचा भाग रामतीर्थ घाट म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण परिसरात भाविकांनी स्नान करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. साधू-महंत रविवारी (दि. १३) सकाळी शाहीस्नान करतील. सोमवारपर्यंतच्या स्नान महापर्वकाळाच्या निर्णयाला दाते पंचागकर्ते मोहन दाते, ज्योतिष्याचार्य अरविंद पंचाक्षरी, सूर्य सिध्दांत पंचागाचे अभ्यासक गौरव देशपांडे, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, धर्मशास्त्राचे अभ्यासक शांतारामशास्त्री भानोसे आदींनी संमती दिली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या भाविकांनी संपूर्ण अमावास्येचा पर्वकाळ स्नान करावे, असे आवाहन पुरोहित संघाने केले आहे. तीर्थस्नान, पर्वणीस्नान ही सामूहिक उपासना मानली जाते. मात्र, पहिल्या पर्वणीला अतिबंदोबस्तामुळे भाविकांना स्नान करता आले नव्हते. तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

अशी असेल चंद्राची अवस्था

सिंहस्थातील कुंभस्नानाचे महत्त्व पद्मपुराणात 'चंद्रश्र्चंद्र:क्षयस्तथा' अशा उल्लेखाने विशद करण्यात आले आहे. म्हणजे सूर्य, चंद्र, गुरू हे ग्रह सिंह राशीत असताना व चंद्र क्षीण असेपर्यंतचा कालावधी पर्वकाळ सांगितलेला आहे. अमावस्या संपल्यानंतर पुढे २४ तास चंद्राची ही क्षीण अवस्था असते. सिंहस्थकाळात १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४३ वाजता अमावास्या सुरू होते. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.११ वाजता अमावास्या समाप्ती आहे आणि पुढे १२ अंश म्हणजे १४ सप्टेंबरला दुपारी १२.३० पर्यंत चंद्राची क्षीण अवस्था आहे. म्हणजेच १२ ते १४ सप्टेंबर हा काळ अखंड महापर्वस्नासाठी उपयुक्त असा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना दुचाकीची मुभा

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नान पर्वणीकाळात स्थानिक नागरिकांसाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडुन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिककर पर्वणीकाळात मोटरसायकलचा वापर करू शकणार आहेत. त्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत.

धुळेरोड, औरंगाबादरोड व आडगाव परिसरातील नागरिकांसाठी अमृतधाम चौक ते मिर्ची ढाबारोड अशा दोन्ही बाजूस नाशिकरोड, उपनगर, जयभवानी रोडवरील, आंबेडकर नगर येथे तर देवळाली परिसरातील नागरिकांसाठी श्री श्री रविशंकर रोड व अशोका शाळा समोरील मोकळ्या जागेत पार्किंग असेल. इंदिरानगर, सिडको, अंबड व सातपूर परिसरातील नागरिकांसाठी शाहजहाँनी ईदगाह मैदानात सिव्हिल हॉस्पिटलसमोर तर गंगापूर, पंचवटी पोलिस ठाणे परिसरातील नागरिकांसाठी डोंगरे वस्तीगृह मैदान गंगापूररोड येथे पार्किंग व्यवस्था आहे. पेठरोडवरील नागरिकांसाठी शरदचंद्र पवार मार्केट पेठरोड, दिंडोरीरोड परिसरातील नागरिकांसाठी मेरी ग्राऊंडवर दुचाकी वाहने पार्क करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तांचीही ‘शाही पर्वणी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या शाही पर्वणीसाठी नाशिकनगरी सज्ज झाली असून लाखो भाविक शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात या स्नानास मोठे महत्त्व असते. याचाच धागा पकडीत काही 'संधी-साधूं'कडून स्नानासाठी आलेल्या भक्तांना विशेष ऑफर दिली जाते आहे. रात्रीच्या वेळी मुक्काम आणि महंतासोबत स्नान यासाठी १५ ते २० रुपये भाविकांकडून 'संधी-साधू' उकळत आहेत.

पहिल्या शाही स्नानाला अवघे ४० ते ५० हजार साधू महंत शाही स्नानाला रामकुंडापर्यंत पोहचले. यात जवळपास ४ ते ५ हजार भाविकांचा समावेश होता. यातील बहुतांश भाविक उत्तर भारतातील होते. या भागात कुंभमेळ्याला आणि साधू महंतासोबतच्या स्नानाला अनन्य साधारण महत्त्व असते. याचाच फायदा घेत काही 'संधी-साधू' अशा भाविकांना स्नानासाठी सोबत घेऊन जातात. अर्थात, यासाठी भाविकांना रोख पैसे मोजावे लागतात. साधुग्राममध्ये काही ठिकाणी तर अशा परराज्यातील भाविकांसाठी राहण्याची खास व्यवस्थाच करून ठेवण्यात आली आहे. याठिकाणी राहणाऱ्या भाविकांकडून १० हजारापासून ५० हजार रुपयांपर्यंत पैसे आकरले जातात.

याबाबत एका साधुग्राममधील एका साधूने सांगितले, की आजवर भाविकांनी सिंहस्थ कुंभमेळ्याकडे पाठ फिरवली. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर खर्च करून बसलेल्या साधू महंताना झाला. भाविकांना स्नानाला सोबत घेऊन गेल्यास अथवा त्यांना मुक्कामी ठेवल्यास झालेला खर्च काही प्रमाणात भरून निघेल, असा दावा संबंधित साधूने केला.

स्वयंसेवकांना रोखणार कसे?

पोलिसांच्या मदतीसाठी सरसावलेल्या शेकडो स्वयंसेवकांना रोखणे पोलिसांनाही शक्य नसल्याचे पहिल्या पर्वणी दरम्यान समोर आले. रामकुंड वगळता इतर ठिकाणी स्वयंसेवकांची मदत उपयोगी ठरली. तर रामकुंडावर अनेक स्वंयसेवकांनी आपल्या नातेवाईकांची तसेच ओळखीच्या मित्रपरिवारांच्या स्नानाची सोय केली. बहुतांश स्वंयसेवकांची ऊर्जा यातच खर्ची पडल्याचे चित्र दिसून आले. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून रामकुंडावरील स्वंयसेवकांची संख्या मर्यादित करण्याचे सूतोवच पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले असून त्याचा कितपत फायदा होतो, हे रविवारीच (दि. १३) स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खत प्रकल्पाचे आरक्षण वगळा

0
0

नाशिक : पाथर्डी खत प्रकल्पासाठी नवीन विकास आराखड्यात पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले असून, ते तातडीने वगळण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. तसेच, पिंपळगाव बहुला व मखमलाबाद येथील आरक्षित जागेचा कचरा डेपोसाठी विचार करावा, अशी मागणी केली.

पाथर्डी येथील खत प्रकल्पासाठी या अगोदरच आरक्षित असलेल्या ९७ एकरपैकी २० एक जागेवरच खत प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागा पडून असतानाही नव्या विकास आराखड्यात या ठिकाणी आणखी शेतकऱ्यांच्‍या जमिनीवर अतिरिक्त आरक्षण टाकण्यात आले आहे. शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, सीमा हिरे यांच्यासह शेतकऱ्यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन हे आरक्षण हटवण्याची मागणी केली. हे आरक्षण त्वरित वगळण्यात यावे, अशी मागणी केली. इकडचे आरक्षण रद्द करून पिंपळगाव बहुला व मखमलाबाद येथील आरक्षित जागेचा कचरा डेपोसाठी विचार करावा, अशी मागणी केली. आयुक्तांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचित्र अपघातात सातजण जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार लहान मुलींसह सातजण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अमृतधाम चौफुलीवर हा अपघात झाला. जखमींपैकी निकिता खंदारे या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिव्हिल तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईकडून मालेगावकडे चाललेल्या ट्रकचे (एम.पी.०६ - एच.सी.०९६३) ब्रेक फेल झाले. या ट्रकने पुढे जाणाऱ्या मारुतीला (एम.एच.१५- सी.डी.२९०३) धडक दिली. हा अपघात पाहिल्यानंतर तारवालानगरकडून येणारी खासगी बस (क्र. एम.एच.१५-ए.के.१२४९) अचानक रस्त्यालगतच्या संरक्षक जाळीवर चढली. बसथांब्यावर थांबलेल्या खंदारे कुटुंबीयांसह सात जणांना या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात रंजना प्रकाश खंदारे (आई) आणि तिच्या चार मुली मायावती, निकिता, आरुषी आणि प्रजावती या चौघी जखमी झाल्या. निकिता गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. रंजना यांना डोक्याला आणि पायाला मार लागला. याच अपघातात मारुती टरफले आणि पंढरीनाथ डांगे हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या महामार्गावर नेहमी अपघातात निष्पापांचे बळी जातात. संतप्त नागरिकांनी रास्तारोको केल्याने वाहतूक कोंडी झाली. या परिसरात उड्डाणपूल झालाच पाहिजे, निष्पापांचे बळी जाणे थांबलेच पाहिजे अशा घोषणा देत जमाव रस्त्यावर उतरला. जमाव आक्रमक झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अधिक कुमक मागवली. पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकत नसल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करून संतप्त जमावाला बाजूला केले.

वाहतूक खोळंबली

या सर्व प्रकारामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक एक ते दीड तास खोळंबली. विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत. हा रस्ता ओलांडताना जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत असल्याने ते ही या आंदोलनात सहभागी झाले.

अन् त्यांच्यासाठी नाशिक ठरले र्दुदैवी

आम्ही परभणी जिल्ह्यातील आसेगावचे. पाच मुली आणि एक मुलगा असे माझे कुटुंब आहे. काम मिळाल्याने आम्ही कालच नाशिकमध्ये आलो. शुक्रवारी मोठ्या उत्साहाने कामावर निघालो. बसची वाट पाहत थांबलो होतो. मात्र, वाहन अंगावर आल्याने माझ्या कुटुंबातील सगळेच जखमी झाले आहेत. परमेश्वर कृपेने सर्वजण वाचले आहेत. मात्र, आमचे हातावर पोट असल्याने हॉस्पिटलचे बिल कसे भरावे याची चिंता लागली आहे. नाशिकमध्ये काम मिळाल्याचा आनंद मावळला आहे, असे सांगतानाच या कुटंबाचे प्रमुख प्रकाश खंदारे बेशुद्ध पडले.

सहायक पोलिस आयुक्तावर गुन्हा?

नागरिकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक उध्दव निमसे यांनी फिर्याद दिली. चव्हाण यांनी लाठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून तुम्हाला पाहून घेईन असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, उशिरा त्यांनी फिर्याद मागे घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी, लिपिक परीक्षा पुढे ढकलल्या

0
0

नाशिक : महसूल विभागातर्फे ऐन पर्वणीच्या दिवशी १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या तलाठी आणि लिपिकपदाच्या परीक्षा सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता ४ ऑक्टोबरला होणार असल्याने परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.

दुसरी शाही पर्वणी १३ सप्टेंबरला आहे. याच दिवशी महसूल खात्यातील तलाठी पदासाठी शासनाने परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले होते. कुंभमेळयाच्या नियोजनात महसूल यंत्रणा गुंतलेली असताना परीक्षा कशी घेणार आणि पर्वणीकाळातील वाहतूक नियोजनामुळे परीक्षार्थी परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचणार याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. तलाठी पदासाठी १३ सप्टेंबर तर लिपिकपदासाठी २० सप्टेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती. तलाठी पदाच्या ५६ जागांसाठी १४ हजार तर लिपिकपदाच्या २९ जागांसाठी सुमारे सहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, यंदा पहिल्या पर्वणीपेक्षा सुमारे पाचपट भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविल्याने वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. या दिवशी शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत परीक्षार्थींसमोर केंद्रावर पोहोचायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदातीरी श्रद्धेचा पूर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरवली असली तरी रविवारी (ता.१३) होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीसाठी नाशिक शहर व त्र्यंबकनगरीत भाविकांच्या श्रद्धेचा पूर येण्याची चिन्हे आहेत. सूर्य, चंद्र व गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग, पोलिसांनी धडा मिळाल्यानंतर शिथिल झालेला बंदोबस्त तसेच सिंहस्थाला येण्याचे प्रशासनाचे आवाहन या प्रमुख बाबींमुळे गर्दी वाढत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत रेल्वे मार्गाने एक लाखाहून अधिक भाविक शहरात दाखल झाले आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणारे रस्तेही वाहनांच्या गर्दीने गजबजले आहेत. पवित्र रामकुंड आणि तीर्थराज कुशावर्त या दोन्ही ठिकाणी मिळून दिवसभरात दीड लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने दुसऱ्या पर्वणी काळात किमान दहा लाख भाविक शाहीस्नान करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, शनिवारी दुपारनंतर गर्दी वाढल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो.

सूर्य, चंद्र आणि गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग उद्या, शनिवार, दि. १२ सप्टेंबरपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे परराज्यातील भाविकांसह नाशिककरांना सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपासूनच सिंहस्थ कुंभमेळ्यातील महापर्वस्नानाचा आनंद घेता येणार आहे. यापार्श्वभूमीवर रामकुंडावर सुमारे दीड ते दोन लाख भाविक शाहीपर्वणी अगोदर स्नान करतील, अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाला आहे. याचा प्रत्यय गुरुवारी व शुक्रवारी आला आहे. पर्वणी स्नानासाठी आलेल्या भाविकांमुळे साधूग्रामसह रामकुंड परिसर भाविकांनी फुलून गेला. गंगागोदावरी मंदिरासमोर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच परिसरातील कपालेश्‍वर मंदिर, महादेव व लक्ष्मीनारायण मंदिरातही दर्शनासाठी गर्दी होती.

पोलिसांची कसोटी

पहिल्या शाही स्नानानंतर भाविकांना अडचणीच्या ठरलेल्या पोलिस नियोजनात मोठे फेरबदल करण्यात आले. या बदलानुसार भाविकांना शहराच्या आतील भागात सहज पोहचणे शक्य आहे. यामुळे एकीकडे भाविकांचा ओघ वाढत असतानाच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांचे स्नान सुकर करण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.

दर्शनासाठी दोन किमीची रांग

त्र्यंबकेश्वर येथे कुंभस्नानाकरिता हजारो भाविक शहरात दाखल होत आहेत. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत उभे रहावे लागत आहे. काही भाविकांना दर्शनासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागत आहे. भाविकांची गर्दी वाढल्याने रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दर्शन रांगेत उभे रहावे लागत आहे. शुक्रवारी बडा उदासीन आखाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत रांग लागली होती. पेडदर्शनासाठी दोनशे रुपये देऊनही पाच तास वेळ लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्यातील दोन शनिवारी बॅँका बंद

0
0

नाशिक : आरबीआयने केलेल्या नवीन नियमानुसार बॅँकांचे व्यवहार आता दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहणार आहे. याबाबत ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी ग्राहकांना सूचना देण्याचे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या कालावधीत बॅँका सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्थिक व्यवहार करीत होत्या. शनिवारी दुपारी तीनपर्यंत व रविवारी पूर्ण दिवस सुट्टी अशी कामकाजाची पध्दत होती. मात्र, सरकारी कार्यालयांप्रमाणे बॅँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केल्याने दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद रहाणार आहेत. याबाबत ग्राहकांना माहीती देण्यासाठी काही बॅँकांनी ग्राहकांना इमेल व एसएमएसद्वारे माहिती दिली आहे. मात्र, काही बँकांनी अद्यापही खातेदारांना माहिती दिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौरव संधानशिव अखेर सापडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुवेतमध्ये नोकरीचे आमिष दाखवित नाशिकमधील गौरव संधानशिव या तरुणाचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला होता. मात्र हा तरूण स्वत:हून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. शुक्रवारी (दि.११) शहरात फिरत असताना त्याच्या शेजाऱ्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्राथमिक चौकशीत गौरवचे अपहरण किंवा धर्मांतर झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ सप्टेंबरपासून तो बेपत्ता होता. त्याच्या ठाणे येथील राहत्या खोलीची झडती घेतली असता त्यात परकीय चलन, वैद्यकीय शस्त्रक्रिया केल्याची कागदपत्रे आढळली होती. त्यांनी सरकारवाडा पोलिसात अपहरण आणि धर्मांतराची फिर्याद दिली होती. या प्रकारामुळे पोलिसांचे धाबे दणाणले होते. सिराज शेख या संशयिताला ताब्यात घेतले. गौरवने त्याच्याजवळील दोन्ही मोबाइल विकले असून त्या पैशातून तो मुंबईत फिरत असल्याची माहिती सिराजने दिली होती. तसेच तो आजारी असल्याने त्याने कुवेतमधील मित्राकडून ४१ हजार रुपये घेतले होते. वैद्यकीय कारणास्तव गौरवने शस्त्रक्रिया केल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी सकाळी तो रामकुंड परिसरात आढळून आला. त्याचे शेजारी संतोष जगताप यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हात झटकून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळताच सीसीटीव्हींच्या मदतीने त्यांनी गौरवचा शोध घेतला.

दुपारी तीनच्या सुमारास गौरवचे परिचित श्रीवास्तव यांनी त्यास अशोकस्तंभ परिसरात पकडले. संतापाच्या भरात आपण घरातून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने मुंबईतून मनमाड, नांदेड पुन्हा मुंबई असा प्रवास केला. तसेच गुरुवारी (दि.१०) शहरात आला. रामकुंड परिसरात थांबला. रात्री रामकुंडावरच मुक्काम केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवर्षी हवीत २० हजार घरे

0
0

Vinod.patil@timesgroup.com

नाशिक : नाशिकचे नागरिकरण झपाट्याने वाढत असताना वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक घरांची निर्मिती होत नसल्याचे चित्र आहे. सन २०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या ५१ लाखांपर्यंत जाणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी दरवर्षी किमान २० हजार घरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या विपरीत परिस्थिती असून, घरे महागल्याने नागरिकांनी हात आखाडता घेतला आहे. बिल्डरांनीही आस्ते कदम भूमिका घेतली आहे. शहरात मोठ्या घरकुल योजनांची गरज असताना स्मार्ट सिटी अनुषंगाने महापालिकेने स्वस्त घरांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबई, पुणे या दोन शहरांच्या विकासाच्या मर्यादा संपल्याने आता गुंतवणूकदारांसह उद्योगांचा ओढा नाशिकककडे वाढला आहे. सातपूर, अंबड या दोन औद्योगिक वसाहतींसह सिन्नर या पंचताराकिंत वसाहतीमुळे नाशिकमध्ये रोजगारासाठी नागरिकांचा मोठा लोंढा येत आहे. नाशिकचे भौगोलिक हवामान हे निवासासाठी चांगले असल्याने मुंबईचे नागरिक आपल्या दुसऱ्या घरासाठी नाशिकला पसंती देत आहे. सद्यस्थितीत शहरात ३ लाख ९० हजार घरे असून, यात सामूहिक घरांची संख्या कमी आहे. क्षेत्रफळाचा विचार करता नव्याने मोठ्या घरकुल योजना तयार करण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही. मध्यवर्ती भागाच्या विकासाला आता मर्यादा असल्या तरी आजबाजूच्या २२ खेड्यांमध्येही आता काँक्रिटीकरण झाले आहे. सद्यस्थितीत शहरात इमारती उभ्या राहत असल्या तरी वाढीव लोकसंख्येसाठी त्या पुरेशा नाहीत.

सद्यस्थितीत शहरातील ६० हजार कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचे घर नाही. त्यामुळे तीन लाख नागरिक आजही निवाराविनाच आहेत. दुसरीकडे शहरात अजूनही १० हजाराच्या वर सदनिका बांधून पडल्या आहेत. विविध कर, बिल्डरांना येणाऱ्या अडचणी आणि वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दुसरीकडे नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे नागिकांचा कल हा भाड्याची घरे आणि झोपडपट्ट्यांकडे वाढत आहे. स्मार्ट सिटीसाठी घरांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रेडाई, म्हाडा, हुडको, सिडको, बिल्डर्स असोसिएशन, आर्किटेक्ट असोशिएशन या संस्थाच्या मदतीने महापालिकेला मोठ्या घरकुल योजनांची निर्मिती करावी लागणार आहे. विविध वित्तीय संस्थांची मदत त्यासाठी घेण्याची आवश्यकता आहे.

स्वस्तातील घरकुल योजना

स्मार्ट सिटी योजनेत झोपडपट्टी निर्मूलनाचा निकष आहे. त्यासाठी पालिकेतर्फे अगोदरच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नियोजनाअभावी या प्रयत्नांना काहीशी खीळ बसली आहे. महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत २००९ मध्ये १६ हजार घरकुले बांधण्याची योजना आखली होती. या योजनेसाठी ३३५ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले होते. यात केंद्र शासनाचा वाटा ३० टक्के, राज्य शासनाचा २० टक्के तर नाशिक महापालिकेचा वाटा ३० टक्के इतका आहे. त्यात लाभार्थ्यांकडून १० टक्के रक्कम घेतली जात असल्याने महापालिकेच्या हिश्यात केवळ २० टक्के रक्कम येत आहे. शासकीय जागांवरील ५२ झोपडपट्ट्यांचे स्थलांतर या घरकुलांमध्ये करण्यात येणार होते. यासाठी शहरातील चुंचाळे, निलगिरी बाग, पंचवटी, भीमवाडी, नाशिकरोड (चेहडी), गांधीधाम, आनंदवली, शिवाजी नगर, संजय नगर, वडाळा, गंजमाळ अशा तब्बल ३१ ठिकाणांची निवड करण्यात आली. कोट्यवधीचा व्यवहार असल्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी मोठ्या हिरारीने यात सहभाग घेतला. मात्र, घरकुलांसाठी निवडलेल्या चुकीच्या जागा, निविदा प्रक्रियेतील घोळ, जागा संपादनास लागलेला वेळ आणि ठेकेदारांच्या बेफिकीरीमुळे आता दिवसेंदिवस ही योजनेचे उद्दिष्ट कमी होत आहे. लाभार्थी मिळत नसल्याचे सांगून गेल्या वर्षी या योजनेचे उद्दिष्ट १६ हजार घरांवरून सात हजार ४६० घरांचे घरांवर आणण्यात आले आहे. घरबांधणी साहित्याच्या किमती वाढणे.

करांपासून व्हावी सुटका

सद्यस्थितीत बिल्डरांसह खरेदारांवर विविध करांचा मोठा बोझा आहे. मुंद्राक शुल्क पाच टक्के, व्हॅट, रजिष्ट्रेशन एक टक्का, सर्व्हिस टॅक्स तीन टक्के असा एकूण ११ टक्के कर भरावा लागतो. एका सदनिकेमागे कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच लाखाचा कर भरावा लागतो. आता एलबीटी कमी करून मुंद्राक शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २० हजाराची वाढ होणार आहे. बिल्डरावरही असेच विविध प्रकारचे टॅक्स व परवानग्यांची झंझट आहे.

एक खिडकी योजना

शहरात सध्या मोठ्या घरकुल योजनांची गरज असताना या योजनांच्या मंजुरीसाठी बिल्डरांना दोन ते तीन वर्ष चकरा माराव्या लागतात. त्यात मोठ्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचीही परवानगी आवश्यक आहे. बिल्डरांना शासन आणि स्थानिक संस्थाच्या क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. घरबांधकामाची नियमावली सुटसुटीत झाल्यास व बांधकाम व्यवसायाला उद्योजकाचा दर्जा मिळाल्यास स्वस्तातील घरे उभारणीस चांगली मदत होणार आहे.

शहरात सर्वांना हक्काचे घर मिळावे आणि वाढत्या घरांची गरज पूर्ण करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन विकास आराखड्यात बिल्डरांना लहान घरकुलांच्या उभारणीसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वाढीव एफएसआय देणे, आरक्षणांची संख्या कमी करणे आदी उपाययोजना केल्या आहेत. साडेपाचशे फुटापर्यंतची घरे बिल्डरांनी बांधली तर त्यासाठी या सवलती मिळणार आहेत.

बांधकाम व्यावसायिकांवर असलेले विविध कर, खरेदीदारांवर असलेले कर कमी करण्यात यावेत. सोबतच पर्यावरण विभागाच्या क्लिष्ट परवानग्या सुलभ करून एक निश्चित अशी परवानगीची सुलभ प्रक्रिया गृहप्रकल्पांसाठी शासनाने तयार करायला हवी. सोबतच उद्योग व रोजगार वाढविल्यास खरेदीदारही पुढे येतील, असे प्रयत्न व्हायला हवेत. डिमांड वाढली तरच सप्लाय होईल.

- जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई

वाढीव घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची गरज आहे. अधिकाधिक सुविधा असलेली छोटी घरे उपलब्ध झाल्यास नागरिक त्यांना प्राधान्य देतील. आर्किटेक्ट असोशिएशन व बिल्डर्स असोशिएशनच्या मदतीने गरिबांना जास्तीत जास्त चांगली व छोटी घरे कमी किमतीत कशी उपलब्ध होतील यासाठी पालिकेने प्रयत्न करायला हवेत.

- नीलेश चव्हाण, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुलेट ट्रेन व्हाया नाशिक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जपान दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून ट्विट करीत नाशिककरांना गुडन्यूज दिली आहे. भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद ही व्हाया नाशिक जावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यानंतर जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रवास व्हाया नाशिक होण्याची चिन्हे आहेत.

जागतिक पातळीवर वेगाने विकसित होणाऱ्या नाशिक शहराच्या विकासाला आता बुलेट ट्रेनचे पंख लाभणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. मेक इन महाराष्ट्र या मोहिमेद्वारे जपान दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना शुक्रवारी अनपेक्षित पण मोठा सुखद धक्का दिला आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद अशी साकारण्याची घोषणा यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीशी (जेआयसीए) शुक्रवारी औद्योगिक आणि पायाभूत सोयी-सुविधांशी संबंधित प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला आहे. जेआयसीए ही विविध प्रकल्पांना आर्थिक सहकार्य पुरवणार आहे. याच करारावेळी मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनबाबतही चर्चा केली. मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन नाशिक मार्गे करण्यात यावी, असा मनोदय मुख्यमंत्र्यांनी चर्चेत व्यक्त केला. त्यास जेआयसीएनेही मान्यता दिल्याने बुलेट ट्रेनच्या मार्गावर नाशिक येणार असल्याची गुडन्यूज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्ये हाणामारी

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

तरुणींमध्ये घडलेली फ्री स्टाइल असो वा ज्युनिअरच्या कॉलेजियन्सचा चॉपर बाळगण्याचा स्टंट असो गेल्या काही दिवसात कॉलेजरोड परिसरात मारामारीच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा याचप्रकारे तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

गंगापूर रोडवरील डिकेनगर परिसरात असलेल्या अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये 'केड्या' नावाने ओळखला जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली. या तरुणाची इतर तरुणांसोबत शाब्दिक चकमक या कॉलेजच्या परिसरात झाली होती. त्याला गंभीर स्वरुप प्राप्त होत दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे दोन्ही गट कॉलेजरोडवरील महाराष्ट्र बँकेजवळ समोरासमोर आले. वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. यातच एका तरुणाने 'केड्या' नामक तरुणाच्या डोक्यात दगडाचा घाव घालत त्याला जखमी केले. याचवेळी एकमेकांत भिडलेल्या दोन गटांनी एकमेकांवर तलवारीसारखे धारदार शास्त्र उगारण्याचा प्रयन्त केला. पण, वेळीच सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

जखमी तरुणाला लगेचच सुमन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. संशयितांपैकी कोणीही मिळू न शकल्याने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

''सध्या सिंहस्थ कामात पोलिस व्यस्त असल्याने तरूण याप्रकारचे धाडस करीत आहेत. आपल्या परिसरातील वैयक्तिक भांडणाची खुसपट कॉलेज परिसरात काढली जात आहे. कॉलेजने आता सुरक्षेत वाढ केली आहे.''

- व्ही. एन. सूर्यवंशी,

प्राचार्य, आरवायके कॉलेज

''कॉलेज रोडवर सध्या होणाऱ्या सर्व गुन्ह्यांमध्ये बाहेरील विद्यार्थी आहेत. कॉलेजच्या परिसरात फिरायला येणारे विद्यार्थीच इथे भांडणे करीत आहेत.''

- धनेश कलाल, बीवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्वेलरी दुकानात चोरी; कामगारांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी येथील बाफना ज्वेलर्स या दुकानातून पावनेदोन लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरी केल्याप्रकरणी तीन कामगारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश विजयचंद्र जैन (वय २४, रा. हिंगोली, जळगाव ), राजेंद्र भिकाजी पाटील (वय ३०, उपेंद्रनगर, नवीन नाशिक) व विलास सुभाष नाहिदे (वय ३४, रा. रायगडचौक, नवीन नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. संदीप वाघ यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बाफणा ज्वेलर्स दुकानात सोमवारी (दि.७) सकाळी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान सोन्याची अंगठी, वेढणी अशा ७० ग्रॅम दागिण्यांची चोरी झाली. दागिन्यांची किमत १ लाख ७७ हजार १८९ रुपये होती. ही चोरी कामगारांनी केल्याचे समोर आल्याने गुरुवारी सायंकाळी सात वाजता गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिला जखमी

अशोकस्तंभ जवळील शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारी महिला इमारतीवरून उडी मारल्याने जखमी झाली. उज्वला भोर (वय २५) असे तिचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पळून जाण्याच्या उद्देशाने तीने इमारतीवरून संरक्षक भिंतीच्या पलीकडे उडी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये खडखडाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक शहरात दाखल होत असताना शहरातील एटीएममध्ये शुक्रवारी व शनिवारी खडखडाट झाला. भाविकांना पैसे मिळत नसल्याने एटीएम शोधण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागली.

रविवारी शाहीस्नान असल्याने भाविकांच्या गर्दीचा ओघ बुधवार पासून सुरू झाला. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून रोज जत्थेच्या जत्थे नाशिककडे येत असल्याचे दृष्य पहायला मिळत आहे. नाशिकरोड ते नाशिक या मार्गावर एटीएमची संख्या कमी असल्याने भाविकांचे हाल होत असून, रविवारी अशीच परिस्थिती राहिली तर अर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. हीच परिस्थिती शुक्रवारी नाशिक शहरात देखील होती. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे भाविकांना दुसरे एटीएम शोधण्यासाठी पायपीट करावी लागली. अनेक भाविकांच्या खिशातील पैसे संपल्याने सर्वच एटीएममध्ये गर्दी होती. सध्या प्रत्येक एटीएममध्ये दिवसातून एकदा भरणा करण्यात येतो. भाविकांची संख्या लक्षात घेता प्रत्येक एटीएममध्ये दिवसातून दोनदा भरणा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यातच बाहेरून आलेल्या नागरिकांना भाषेची अडचण येत असल्याने एटीएम ऑपरेट करण्यासाठी वेळ लागत होता. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, तपोवन, अशोकस्तंभ येथे गर्दी होती. याच ठिकाणी रोज व्यवहार करणाऱ्या नागरिकांना देखील पैसे न मिळाल्याने त्यांचे हाल झाले. राष्ट्रीयकृत बॅँका आणि कॉर्पोरेट बँका सर्वच ठिकाणचे एटीएम फुल्ल झाले होते. साधुग्राममध्येही अचानक गर्दी उसळल्याने तेथील एटीएममध्येही गर्दी होती. ज्या ठिकाणी कार्डद्वारे पेमेंट करणे शक्य आहे त्या ठिकाणी करता येत होते मात्र रिक्षा, किंवा बस या ठिकाणी कॅशच द्यावी लागत होती.

आम्ही रायपूरहून आलो आहोत. सर्व ठिकाणी व्यवस्था अत्यंत चोख आहे. कुठेही अडचण भासली नाही. मात्र, काही ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्याने शोधाशोध करावी लागली.

- अभिनंदन त्रिपाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किकवी पेयजल प्रकल्प गुंडाळल्यास जनआंदोलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि आगामी प्रगती व भवितव्यासाठी किकवी पेयजल प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे. पंरतु शासनाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाकडून हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे.

शहराच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता गंगापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. गंगापूर धरणात गाळ साठल्यामुळे कमी झालेला १५४५ द.ल.घ. फूट पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरणाच्या उर्ध्व बाजुला किकवी धरण आवश्यक आहे. २००९ मध्ये समीर भुजबळ यांनी जलसंपदा विभागामार्फत किकवी पेयजल प्रकल्पाच्या रु.२८३.५४ कोटी प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवली. या योजनेचा एकूण पाणीसाठा २४८५ द.ल.घ.फूट असून, २१२० द.ल.घ. फूट उपयुक्त साठा असणार आहे. या योजनेद्वारे १.५० मे.वॅ. विद्युत निर्मिती होणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात १७२.४६८ हेक्टर वनजमीन आणि १० गावांतील ७४०.०३२ हेक्टर खाजगी जमीन येते. शासनाने या वर्षापासून २०१८ पर्यंत १२५ ते १५० कोटी रुपये टप्प्या टप्प्याने दिले तर हा प्रकल्प निश्चितच पूर्ण होऊ शकतो. मात्र कालच जलसंपदा मंत्र्यांनी निधी कुठून आणणार असे म्हटल्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिककरांच्या आगामी भविष्यासाठी आणि नाशिक शहराच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याने शासनाने जर या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा भुजबळांनी इशारा दिला आहे. समीर भुजबळ यांनी पुढे असेही म्हटले आहे की, राज्याचे जलसंपदा मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांचा सकारात्मक विचार करून नाशिकचे पालकत्व निभवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images