Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टवाळखोरांकडून तोडफोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बिटको हॉस्पिटलमध्ये खोकला आणि उलटीच्या त्रासामुळे दाखल झालेल्या गर्भवतीचा डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही शुक्रवारी मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात हैदोस घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण करून डाॅक्टरांना कोंडले. सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे आदींनी नातेवाईकांची समजूत घालत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

बिटकोचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंती फुलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मंगेश मोरे यांच्यासह सुमारे १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस व बिटकोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणी संदीप लाखे ही २२ वर्षाची महिला तीन महिन्यांपूर्वी मनेगाव (जि. जालना) येथून जेलरोडच्या कॅनलरोडवरील इंदिरा गांधी झोपडपट्टीत माहेरी आली होती. प्रकृती खालावल्यामुळे आई लताबाई खोबरडे हिने तिला गुरुवारी (दि. ३) रात्री बिटकोमध्ये दाखल केले. मध्यरात्री तिची प्रकृती खालवली. शुक्रवारी सकाळी साडेआठला राणीचे निधन झाले. नातेवाईकांच्या मते लाखेकडे डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. स्ट्रेचरवरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

कर्मचाऱ्यांना मारहाण

नातेवाईकांनी अतिदक्षता विभाग, लॅब व अपघात कक्षात प्रचंड तोडफोड केली. हल्लेखोरांना रोखणाऱ्या नजमा पठाण या सुरक्षारक्षकाच्या पाठ, हात आणि पायावर लोखंडी सळईने वार केले. रुक्साना कुरेशी, शिवाजी रघुनाथ ठुबे, सागर भोळे हे कर्मचारी हल्ल्यात जखमी झाले. अपघात विभागातील ट्रेनी डॉक्टर शिल्पा सिंग आणि डॉ. अफशा खान यांना शिवीगाळ करून शेजारील कक्षात कोंडले. कर्मचारी सविता यशवंते यांचे पाचशे रुपये लुटण्यात आले.

प्रशासन पाठीशी

आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम महापालिकेतील विभागप्रमुखांसह बिटकोत दाखल झाले. जखमी कमचाऱ्यांची विचारपूस करत डॉक्टरांना धीर दिला. हल्लेखोरांकडून तोडफोडीने झालेला खर्च वसूल केला जाईल, असे सांगितले. प्रशासन बिटकोतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. घडलेल्या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. येथे सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून सीसीटीव्ही बसविण्यात येतील. प्रसंगी बॉक्सरही नेमले जातील. येथील ओपीडीमध्ये दररोज ८०० रुग्ण येतात. २२ कर्मचारी जादा काम करून त्यांना सेवा देतात. तरीही त्यांच्यावर हल्ले होतात ही खेदजनक बाब आहे, असेही ते म्हणाले.

हृदयविकाराच्या त्रासामुळे मृत्यू

बिटकोचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी लाखे ही बाळंतपणासाठी नाही तर खोकला व उलट्याचा त्रास होत असल्याने दाखल झाली होती. हृदयविकाराचा आजार असल्याने तिने गरोदरपणाचा धोका पत्करू नये, असा सल्ला डाक्टरांनी अगोदरच दिला होता. जूनमध्येही हृदयविकाराचा त्रास झाल्याने तिला दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिला शालीमारच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. गुरुवारी रात्री साडेबाराला राणी लाखेला दाखल करण्यात आले. डॉ. रिना काळदाते यांनी तिच्यावर उपचार केले. पहाटे पाचला लाखेला श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यावर डॉ. काळदाते आणि डॉ. सीताराम गावित यांनी तिला इंजेक्शन दिले. त‌िच्या थुंकीतून रक्त आल्यावर आईला कळवून अतिदक्षता विभागात हलविले. शुक्रवारी सकाळी आठला तिची प्रकृती खालावल्यानंतर तातडीने उपचार करण्यात आले. पावणे नऊला राणी लाखेचे निधन झाले.

मातेसह बाळांचे वाचविले प्राण

पोलिओ ट्रिपल डोस देण्याचा वार असल्याने शुक्रवारी बिटकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून जुन्या ओपीडीचेचे प्रवेशद्वार उघडे ठेवण्यात आले होते. हल्लेखोरांमुळे दहशतवादी आले, बॉम्बस्फोट झाला अशी अफवा पसरली. बाळाला पोलिओ ट्रिपल डोस देण्यासाठी आलेल्या माता व रुग्णांमध्ये दहशत पसरली. शंभर दीडशे लोकांनी एकाच गेटमध्ये गर्दी केली. तेथे चेंगराचेंगरी झाली. एका महिलेचे तीन महिन्याचे बाळ पडून जखमी झाली. काही गर्भवतीही खाली पडल्या. एका हल्लेखोराने काच घेऊन कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मनीषा रमेश धुने या कर्मचाऱ्याने ओपीडीमध्ये आणि रिटा गायकवाड या कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून गरोदर महिलांना स्त्रीरोग विभागात घेऊन त्यांचे जीव वाचवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकला बनविणार रोलमॉडेल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदापार्क प्रमाणेच बॉटनिकल गार्डनचा विकास होणार असून अन्य कंपन्याही नाशिकच्या विकासाला मदत करणार आहेत. त्यामुळे नाशिक शहर आपण राज्यात रोलमॉडेल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. स्मार्ट सिटी कशी असेल हेच आपण लोकांना दाखवणार आहेत. तसेच समाजाचे देणं लागत असल्यानेच टाटा फाऊंडेशनने या प्रकल्पासाठी मदत केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

पांडवलेणी शेजारील नेहरू वन उद्यानात नाशिक महापालिका व टाटा फाऊंडेशनच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या कामाचे भूमीपूजन राज ठाकरेंच्या उपस्थित शुक्रवारी झाले. यावेळी टाटा फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त आर. रामानूज, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी सांगितले, की बॉटनिकल गार्डन विकसित करण्याची आपली आठ ते नऊ वर्षांपूर्वीची इच्छा होती. मात्र, आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेतल्यानंतर, असे कुठे झाले नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष नकार दर्शवला होता. मात्र, विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला मदत केल्याने ते साकारू शकले. टाटांना कल्पना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत, काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या प्रकल्पाची देखभाल महापालिका करणार आहे. टाटा फाऊंडेशन व महापालिकेच्या वतीने हे गार्डन अतिशय सुंदर व पर्यटकांसाठी आकर्षित करणारे ठरेल.

अन्य गार्डनही पूर्ण करणार

शहरातील अन्य प्रकल्प व गार्डनसुद्धा खाजगी कंपन्यांच्या वतीने पूर्ण केले जाणार आहेत. भविष्यात नाशिक हे रोलमॉडेल राहणार असून स्मार्ट सिटी कशी असते ते मी लोकांना दाखवणार अहे, असे ठाकरे यांनी सांगितले. शहरातील उद्यानांच्या देखभालीत काही त्रुटी राहिल्या असून त्या दूर केल्या जातील, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांसाठी शिवसेना आक्रमक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वडाळागाव व शिवाजी येथील घरकुल योजनेच्या अपूर्ण कामांवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात शुक्रवारी या भागातील झोपडपट्टीधारकांनी महापालिकेवर दस्तक दिली. घरकुल योजनेत २८४ घरांची सोडत होऊनही घरांचे वाटप झाले नसून, १३०० घरांच्या प्रतीक्षेत झोपडपट्टीधारक आहेत. त्यामुळे या झोपडपट्टीधारकांना तत्काळ घरे देण्यासाठी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

महापालिकेने शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी घरकुल योजना राबवली असून, १६ हजार घरांची योजना आठ हजारांवर आली आहे. परंतु, घरांची संख्या कमी होऊनही योजना पूर्ण करण्यात पालिकेला यश आलेले नाही. वडाळागाव व शिवाजीवाडी येथील दोन हजार घरांची योजना १३०० घरांवर आणली आहे. परंतु, ती घरेही पूर्ण झालेली नाहीत. गेल्या पाच सहा वर्षांपासून झोपडपट्टीधारक घरांची वाट बघत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही लोकांना घरे दिली नाहीत. त्यामुळे या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले. त्यांनी शुक्रवारी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली या झोपडपट्टीधारकांनी महापालिकेवर धडक देत घरकुल मिळण्याची मागणी केली. तयार केलेल्या इमारतींची तत्काळ डागडूजी करून ती हस्तांतरीत करण्यात यावी, अशी मागणी केली. अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. घरकुल लवकर ताब्यात दिले नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा झोपडपट्टीधारकांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जम्मू-काश्मीरच्या राजकारणावर साधुग्राममध्ये खल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम्मू व काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेस नेते ताराचंद यांनी गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांची भेट घेऊन तेथील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. स्वामी अधोक्षाजानंद हे काँग्रेस पक्षाचे निकटवर्तीय मानले जातात. जम्मू व काश्मिरमध्ये सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष व भारतीय जनता पक्षात कुरबुरी सुरू आहेत. हे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अधोक्षाजानंद व ताराचंद यांच्यादरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते.

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा फटका बसून हे सरकार कोसळेल. लागलीच काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता चर्चिली जात आहे. त्यादृष्टीने काँग्रेस नेते तयारीत गुंतले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री ताराचंद यांनी अधोक्षाजानंद महाराजांशी बंद खोलीत दोन तास चर्चा केली. ताराचंद गुरुवारी साधुग्राममध्ये मुक्कामी होते. पीडीपी आणि भाजपाचे बिघडलेले संबंध, काँग्रेसचे भवितव्य, हुरियत कॉन्फरन्सशी केंद्र सरकारशी झालेले वाद आदी विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. झेड प्लस सुरक्षा असलेल्या ताराचंद यांच्या दौऱ्याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. ते अचानक साधुग्राममध्ये दाखल झाले. यानंतर आज, शुक्रवारी सकाळी त्यांनी कपिला संगम येथे स्नान केले. यानंतर विश्वशांती यज्ञात सहभाग नोंदवला. स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा यांना दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते नाशिकमधून रवाना झाले. अधोक्षाजानंद महाराज देशभरातील वेगवेगळ्या बंडखोर संस्था आणि सरकारमध्ये दुव्याचे काम करतात.

धर्माच्या मार्गदर्शनाखाली अनेक समस्यांवर मार्ग निघतात. नक्षलवाद, बंडखोरी यावर सुध्दा धर्म हाच एकमेव पर्याय दिसतो. राजकीय नेता त्यातील एक माध्यम असून, त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा सातत्याने होत असते.

अधोक्षाजानंद, शंकराचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील ३० वर्षांहून अधिक कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी काढले आहेत. शहरातील सर्व संस्था, मालक व भोगवटादार यांना त्यांच्या इमारतीचे सुस्थितीचे प्रमाणपत्र विभागीय कार्यालयात सादर करणे बंधनकारक केले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या भोगवटादार व मालकांना २५ हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तीन सल्लागार संस्थांची नियुक्ती केली आहे.

शहरातील जुन्या इमारतींचा धोका लक्षात घेत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संस्था, मालक व भोगवटादार यांच्यासाठी सदर नोटीस जारी केली आहे. नोटीसनुसार इमारतीला महापालिकेने कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्याच्या दिनांकापासून किंवा इमारतीचा भोगवटा करण्यास परवानगी दिल्याच्या दिनांकापासून ३० वर्षांचा कालावधी संपला असेल, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे सक्तीचे केले आहे.

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व त्याबाबतचे तपासणी प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी तीन सल्लागार संस्थांची नियुक्ती केली आहे. भोगवटदार किंवा इमारतीचे मालक यांनी संबंधित संस्था किंवा महापालिकेकडे नोंदणी असलेल्या बांधकाम अभियंत्यांकडून आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन बांधकाम तपासणीचे सर्टिफिकेट महापालिकेकडे जमा करणे बंधनकारक केले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर संबंधित अभियंत्याने शिफारस केलेली दुरुस्तीची कामे इमारत मालकांनी तातडीने करून घेऊन त्याबाबतचे काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक आहे.

यासाठी येणारा खर्च हा संबंधित इमारत मालक व भोगवटादार यांनी संबंधित नियुक्त सल्लागार संस्थांनी स्वखर्चाने करावे, असे म्हटले आहेत. त्यासाठी परीक्षण शुल्क प्रति चौ. मी. २३ रुपये किंवा किमान पाच हजार रुपये अधिक सेवा कर याप्रमाणे आकारले जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालकांना किंवा भोगवटादार यांना २५ हजार रुपये किंवा संबंधित इमारतीच्या मालमत्ता कराएवढी रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटसाठी संस्था

सिव्हिल टेक, कान्हेरेवाडी

मविप्रचे कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग.

संदीप पॉलिटेक्निक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौरे नको, थेट मदत करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील युती सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले आहे. सरकारचे कामकाज असमाधानकारक असून ते अजूनही मांड ठोकून काम करत नसल्याची टीका ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दुष्काळाचे दौरे करण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, 'राष्ट्रवादी'चे दुष्काळी दौरे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. राज्यातील दुष्काळाला 'राष्ट्रवादी'च जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळावर बोलण्याचाही अधिकार नसल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

पाडंवलेण्याजवळील बॉटनिकल गार्डनच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ठाकरे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारसह 'राष्ट्रवादी'वर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री व मंत्र्यांचे दुष्काळाचे दौरे कशाला हवेत? दौरे करण्याऐवजी प्रत्यक्षात लोकांना हवे ते पुरवा, दौरे करून काहीच होणार नाही, त्यापेक्षा चारा,पानी दिले तर तेवढाच दिलासा मिळेल. दुष्काळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील युती सरकारची कामगिरी समाधानकारक नाही. सरकार अजूनही मांड ठोकून काम करत नसल्याने परिस्थिती सुधारत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार आहे. पंधरा वर्षात राज्यातील एकही जलसिंचन प्रकल्प पूर्ण होवू शकला नाही. प्रकल्प पूर्ण झाले असते तर आजची ही परिस्थिती उदभवली नसती. त्यामुळे आजचा दुष्काळ हा 'राष्ट्रवादी'मुळेच ‌निर्माण झाला आहे. 'राष्ट्रवादी'चे दुष्काळावर दौरे म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सुरक्षेवरून पोलिसांची पाठराखण

पहिल्या पर्वणीत शहराला युद्धभुमीचे स्वरूप देणाऱ्या पोलिसांच्या कृतीचे राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. पोलिसांनी अशी परिस्थिती काही जाणून बूजून उभी केली नाही. सुरक्षेच्या काळजीपोटी हा अतिरेक झाला आहे. मुंबईहून यायला मलाही भिती वाटत होती. त्यामुळे आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, असे सांगून त्यांनी पोलिसांची उघड पाठराखण केली आहे. कुंभमेळ्याचे कामाचे श्रेय कोणा एकाला नसून त्यात महापालिका आणि राज्य सरकाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

हा तर शुद्ध मूर्खपणा

राज्यातील लोकप्रतिनिधींवर टीका केल्यास देशद्रोह ठरेल असे परिपत्रक काढणाऱ्या राज्याच्या गृह विभागावरही ठाकरेंनी टीका केली. लोकप्रतिनिधींविरूद्ध का नाही बोलायचे असा सवाल करत, आधी लोकप्रतिनिधींना जबाबदारीने वागायला शिकवा असा सल्ला त्यांनी दिला आहे. सरकारने असा आदेश काढला असेल तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. हा अभिव्यक्ती स्वांतत्र्यावरही घाला असल्याची टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे अधिकारीही ‘मोहजाला’त

0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : कुंभमेळ्यात जाहिरातीची पर्वणी साधण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पोलिसांपाठोपाठ महापालिकेच्या आरोग्य विभागालाही मोहजालात ओढल्याचे समोर आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनीही कर विभागांना अंधारात ठेवून आपल्याच अधिकारात टचवूड कंपनीला होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली. वाच्यता झाल्यानंतर स्वतःहून परवानगीचे पत्र रद्द करण्यात आल्याने या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपन्यांना आम्ही पालिकेची परवानगी घेण्यास सांगितले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

कुंभमेळ्यात जाहिरातीची सुवर्ण पर्वणी साधून घेण्यासाठी देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गैरमार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात `बड्या कंपन्यांसाठी नाशिक पोलिसांचा कायदेभंग` हे वृत्त `मटा`ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात सारवासारव करीत, ते आम्ही नव्हेच अशी भूमिका घेतली आहे. आता या कंपन्याच्या बनवाबनवीचे अनेक कांगोरे समोर येत आहेत. टचवूड मरकॉन इनिशिएटिव्ह प्रा.लि.या कंपनीने पोलिसांची परवानगी घेतल्यानंतर विविध कर संकलन विभागाला टाळून पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडून जाहिरात लावण्याची परवानगी एक जुलै रोजी मिळवली. एका पत्राच्या आधारावर संबंधित एजन्सीने जाहिरातींसाठी शहर मोकळे करून दिले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे डेकाटे यांनी तत्काळ परवानगीचे पत्र रद्द ठरविले.

कंपन्यांना जाहिरात लावण्याच्या परवानग्या दिल्यानंतर त्यांना आम्ही पालिकेचीही परवानगी घेण्यास सांगितले होते. तसे पत्रही आम्ही पालिकेला दिले आहे. कराचा भाग पालिकेचा आहे. त्यामुळे पुढील जबाबदारी पालिकेची आहे.

विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाओ शिलाजीत, हो जाओगे मर्द!

0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : कोळसा किंवा डांबरासारखे दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या वस्तूची मोठी उलाढाल साधुग्राममध्ये होत आहे. ही वस्तू आहे शिलाजीत. औषधी गुणधर्मामुळे शिलाजीतच्या सेवनातून मर्दानगी येत असल्याचा प्रचार विक्रेत्यांकडून केला जात आहे. मात्र, हे खरे शिलाजीत आहे का, असा प्रश्न कायम आहे.

सिंहस्थानिमित्ताने बहुविध वस्तू आणि साधनांच्या विक्रीची मोठी बाजारपेठही नाशिक आणि त्र्यंबकमध्ये साकारली आहे. त्यात केवळ आध्यात्मिकच नाही तर औषधी वनस्पतींपासून चक्क बंदी असलेल्या वस्तूंच्याही खरेदी-विक्रीने वेग घेतला आहे. बनावट रुद्राक्ष, वाघनखांबरोबर साधुग्राममध्ये शिलाजीतचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. काळ्या रंगाच्या दगडासारखे असणाऱ्या या वस्तूला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अगदी पावलापावलांवर रस्त्याच्या दुतर्फा शिलाजीत विकणारे आहेत.

साधुग्रामला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते करीत आहेत. हिमालयातून आणि नेपाळमधून शिलाजीत आणण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहेत. काळ्या रंगाचे, चकाकणारे आणि चिकट स्वरुपाची ही वस्तू शिलाजीतच आहे का, याबाबत मात्र संभ्रम आहे. कारण, विक्रेते ठामपणे शिलाजीतच असल्याचे सांगत असले तरी त्याचे मूल्य अवघे प्रति ग्रॅम 50 ते 100 रुपये एवढेच आहे.

शिलाजीतमध्ये औषधी गुणधर्म असून, त्याच्या सेवनाने मोठे फायदे होत असल्याचे विक्रेते सांगतात. 'खाओ शिलाजीत हो जाओगे मर्द', 'हड्डीया मांस पेशीयों की मजबुती के लिए असरदार है शिलाजीत' अशा प्रकारचा प्रचार करून शिलाजीतचा व्यापार दररोज वाढत आहे. काही विक्रेते तर शिलाजीतचा काही भाग जाळून त्याची सत्यता पटवून देत आहेत.

काय करते एफडीए?

औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाणाऱ्या शिलाजीतची मोठी विक्री होत असली तरी नाशिकचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) काय करीत आहे. बनावटी शिलाजीतच्या सेवनाने एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी कुणावर असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिलाजीतच्या नावाने डांबरी दगड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई करावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंकराचार्यांकडून चौकशीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

शंकराचार्यांना कुशावर्तावर स्नानासाठी जात असताना त्यांच्या वाहनाचा लाल दिवा काढून अडवणूक करणे हे षडयंत्र असल्याचे स्वतः शारदा व ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थानिमित्त ते मुक्कामी असून, कैलासराज नगर येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या शाहीस्नानादरम्यान शासन यंत्रणांचा अनुभव अनाकलनीय ठरला असून, यामागे हिंदुचे सर्वोच्च पीठ असलेल्या शंकराचार्यांना महाराष्ट्रात अशी वागणूक मिळणे खेदजनक असल्याचे नमूद केले. केरळ, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये गेलो असता तेथे राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. राजशिष्टाचारासह लाल दिव्याची गाडी व सुरक्षा व्यवस्था असते. येथे मात्र मला अत्यंत चुकीची वागणूक मिळत आहे. शाही पर्वणीच्या पूर्वसंधेला आपल्या वाहनाचा लाल दिवा काढून घेतला जातो व वाहन जप्त करण्यासाठी पोलिस येतात हे शासनाला शोभनीय नाही. आपल्याला मिळालेल्या पोलिसी वागणुकीचा छडा लागलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या जप्त केलेल्या लाल दिव्याबाबत शासनाने काय निर्णय घेतला अद्याप समजलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये कचऱ्याचे ढीग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये मोठ्या संख्येने सफाई कामगार नियुक्त केल्याने कमालीची स्वच्छता असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. साधुुग्राममध्ये ठिकठिकाणी कचरा दिसून येत असल्याने तेथे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.

सिंहस्थानिमित्त साकारलेल्या साधुग्राममध्ये साधू, महंतांसह भाविकांचा निवास आहे. येथे दररोज भाविक व पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्याशिवाय अन्नदानाचे मोठे कार्यही तेथे सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये स्वच्छता असणे आवश्यक आहे. पण, सफाई कामगार नियुक्त असतानाही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पहायला मिळत आहेत. या सर्व प्रकरणाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने त्वरित सफाई तसेच कचरा गोळा करण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी साधू, महंतांनी केली आहे.

प्लास्टिक कचरा अधिक

साधुग्राममध्ये प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळी, प्लास्टिक बाटल्या यांचे प्रमाण मोठे असून, यामुळे कचऱ्याच्या विघटनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने योग्य ते नियोजन करून प्लास्टिकच्या वापरावर अंकुश आणावा, असे मत भाविकांकडून व्यक्त होत आहे.

अनेक कामगार बसून

साधुग्राममध्ये नियुक्त अनेक सफाई कामगार ठिकठिकाणी निवांत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच साधुग्राममध्ये स्वच्छता पूर्णपणे होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममधील साधूचा अतिसारामुळे मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये स्वाईन फ्लूपाठोपाठ अतिसाराचेही रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (दि.४) एका साधूचा अतिसारामुळे मृत्यू झाला. गुलचंद सरजून मुखिया (वय ७०, रा. नेपाळ, सध्या रा. तपोवन) असे त्या साधूचे नाव आहे. साधुग्राममधील इतरही १५ साधू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तपोवनातील जानकी बाग आखाड्यात राहणाऱ्या मुखिया यांना गुरुवारी (दि.३) जुलाब, उलट्या होऊ लागल्या. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांची गर्दी

नाशिक : रामकुंड, साधुग्राम, पोलिस आयुक्तालय, डोंगरे वसतिगृह आदी प्रमुख ठिकाणांवर पोलिसांची सातत्याने गर्दी झालेली दिसते. शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास वरील ठिकाणी हजारो पोलिसांना नवीन बदलांबाबत माहिती देण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेडिंगमध्ये होणार बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या पर्वणीत कुशावर्त चौकाजवळ निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती टाळता यावी, यासाठी प्रशासनाने नियोजनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वरमधील तेली गल्लीच्या कॉर्नरवरच मिरवणुकीतील वाहने अडवून तेथून साधू-महंतांना वेगळ्या मार्गाने तर त्यांच्या समवेत येणाऱ्या भाविकांना स्वतंत्र मार्गाने सोडण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील पहिल्या पर्वणीत पहाटे साडेचारच्या सुमारास जुना आखाड्याची मिरवणूक तेली गल्लीपर्यंत आल्यानंतर तेथे साधू आणि भाविकांची एकच गर्दी झाली. या गर्दीला पांगवितांना एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, पुढील दोन पर्वण्यांमध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी तेली गल्लीच्या कॉर्नरवरच मिरवणुकीतील वाहने थांबवून त्यांना दुसऱ्या मार्गाने बाजूला करण्यात येणार आहे. तसेच साधू-महंतांनी तेथे उतरून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुशावर्ताकडे पायी जावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यासाठी लवकरच साधू-महंतांची आम्ही भेट घेणार आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. साधू-महंतांसमवेत होणारी भाविकांची गर्दी रोखण्यासाठी या उपाययोजनेची मदत होईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

दुसऱ्या पर्वणीसाठी केलेल्या नियेाजनाची माहिती विभागप्रमुखांनी यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना द्यावी आणि त्यानुसार व्यवस्थेत आवश्यक बदल करावेत, असे आदेश डवले यांनी यावेळी दिले. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी उपस्थित होते.

डवले म्हणाले, लक्ष्मीनारायण घाट परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता तेथील जीवरक्षकांची संख्या वाढविण्यात यावी. त्या भागात आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. नियोजनातील बदलानुसार स्वच्छता सुविधा, पाणीपुरवठा, रुग्णवाहिका आदींबाबतही आवश्यक नियोजन त्वरित करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

ईदगाह मैदानाचा वापर मोटरसायकली, तसेच एसटी बसेसच्या पार्किंगसाठी करण्याचा तसेच, नव्या बदलानुसार विविध मार्गांवर आवश्यक सूचनाफलक लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीत मार्गातील बदल, अंतर्गत वाहतूक सुविधा, भाविकांसाठी बसेसची सुविधा आदींबाबत चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रदेव महाराज मुक्काम हलविणार!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैव आणि वैष्णव असा वाद निर्माण झाल्याने इंद्रदेव महाराजांना 'श्री श्री १००८ यज्ञपीठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती' ही पदवी घेण्यासाठी थेट त्र्यंबकेश्वर गाठावे लागले. नाशिकमधील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर साधुग्राममधील मुक्कामच हलवण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.

इंद्रदेव महाराज यांना श्रीपंचायती आनंद आखाड्याचे महंत सागरानंद सरस्वती यांच्याकडून दोन-तीन दिवसांपूर्वी गुरुमंत्र घेतला. त्यानंतर लगेचच त्यांना धर्मसम्राट विद्यावाचस्पती पदवी बहाल केली जाणार होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता साधुग्राममध्ये जगद्‌गुरू जनमेजय शरण यांच्या कॅम्पमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सागरानंद सरस्वती यांच्यासह शैव पंथीय आखाड्यांचे इतरही साधू-महंत हजर राहणार होते. दरम्यान, या कार्यक्रमाची माहिती वैष्णव आखाड्यांना समजल्यानंतर आखाडा परिषदेसह साधू-महंत आक्रमक झाले. हीच पदवी आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही सागरानंद सरस्वतींचा नाद सोडा, असा दमच वैष्णव आखाड्यातील महंतांनी इंद्रदेव महाराजांना दिला. संध्याकाळी रात्री उशिरा झालेल्या राड्यानंतर इंद्रदेव महाराजांनी हा कार्यक्रम रद्द करणार असल्याचे सांगितले. रात्री उशिरा झालेल्या घडामोडींची माहिती इंद्रदेव महाराजांच्या अनुयांनांना नव्हती. त्यामुळे त्यांची गर्दी झाली. वादापेक्षा लोभ बरा, असे सांगत इंद्रदेव महाराजांनी त्र्यंबकेश्वर गाठले. तिथे सागरानंद सरस्वतींच्या हस्ते पदवी स्वीकारली. दरम्यान, आखाडा परिषदेसह प्रमुख अनी आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा वाद पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे इंद्रदेव महाराज आपला मुक्काम हलवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीवरुन शैव-वैष्णव वाद

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे श्री इंद्रदेवजी महाराज यांना आनंद आखाड्याच्या वतीने श्री श्री १००८, श्री विद्यावाचस्पती धर्मसम्राट पदवीदान आणि आखाड्याच्या परंपरेत सामावून घेत त्यांना श्री १००८ मंहत स्वामी इंद्रदेवेश्वरानंद महाराज असे नामाभिदान करण्यात आले. ना‌शिक येथे हा सोहळा पार न पडल्यामुळे त्र्यंबकनगरीत झाला. या पदवीदान सोहळ्यालाही शैव-वैष्णव वादाची किनार लागली.

मथुरा येथील इंद्रदेव महाराज हे प्रसिध्द असे भागवत कथाकार आहेत. पदवीदान समारंभात शैव-वैष्णव वाद निर्माण होण्याची शक्यता झाल्याने सर्व तयारी करून देखील नाशिक येथील कार्यक्रम रद्द झाला. सर्वांच्या इच्छेखातर त्र्यंबक येथे दुपारी हा कार्यक्रम झाला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष, निरंजनी आखाड्याचे श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज आणि आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान सोहळा झाला.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील आनंद आणि निरंजनी अशा दोन्ही आखाड्यांचे रमता पंच उपस्थित होते. तसेच, सर्व शैव आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वामी शंकरानंद सरस्वती, गणेशानंद महाराज, साध्वी शिवानी दुर्गा, रवींद्रपुरी महाराज, डॉ. बिंदू महाराज आदींसह साधू-महंत उपस्थित होते. ह. भ. प. माधव महाराज राठी यांनी सूत्रसंचालन केले. समीर पाटणकर आणि सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. येथील स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भजन भक्तीगीतांनी सर्वांना मोहून टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पाण्यासाठी महिलांचा ठिय्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील मंगलनगरसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पालिकेच्या वतीने होणारा नळपाणीपुरवठा होऊ न शकल्याने पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी सटाणा नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. पालिकेने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

गत पंधरवड्यापासून शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. सात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासित करूनही तब्बल पंधर दिवस उलटून देखील नळांना पाणी न आल्याने शुक्रवारी मंगलनगर परिसरातील संतप्त महिलांनी रौंद्ररूप धारण करीत ११ वाजेच्या सुमारास सटाणा नगर परिषदेच्‍या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना यामुळे पालिकेत प्रवेश करणे गैरसोयीचे होत होते. पिण्याच्या पाण्यासोबतच या भागात दोन महिन्यापासून आरोग्य विभागाने जंतूनाशक फवारणी व गटारीची साफसफाई न केल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंदोलकांचे रौद्ररूप बघता नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांना तत्काळ पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांनी गिरणा व आरम नदी कोरड्याठाक झाल्याने विहिरीमधून चोवीस तासात केवळ दोन लक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे केळझर येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून जलशुध्दीकरण केंद्रात टाकून शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलगतीने काम सुरू असल्याचे सांगितले. यानंतर संतप्त महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक अनिल कुवर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख नंदू सोनवणे, गोंविद पवार, सुरेश खलाले, नाना बोरसे, चंदू सोनवणे, आशाबाई खलाले, जिजाबाई शेवाळे, लताबाई सोनवणे, रूखलाना मन्सुरी, अंजनाबाई खैरनार, सुरेखा बोरसे, आनंदाबाई अहिरे, तसलिमा मन्सुरी, शाहिन शेख, शमा मन्सुरी, राधा गायकवाड, गंगुबाई गांगुर्डे आदींसह महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या साधुग्राममध्ये हाणामारी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

जंगलीदास महाराजांची मिरवणूक साधुग्राम परिसरातून जात असताना झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारी आणि तोडफोडीत झाले. साधुंनी हातात तलवार घेतली आणि पोलिसांची पंचाईत झाली. एरवी हाती शस्त्र घेऊन राडा करणा-याला पोलिसी इंगा दाखवून वठणीवर आणणा-या पोलिसांना कठोर कारवाई करणे अवघड झाले. अखेर कशीबशी सगळ्यांची समजूत काढून पोलिसांनी हिंसाचार थांबवला. साधुग्राममधील बंदोबस्तात वाढ करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.

साधुंच्या तीन आखाड्यांकडून होत असलेला तीव्र विरोध डावलून जंगलीदास महाराजांची मिरवणूक साधुग्राम मधून पुढे जात होती. मिरवणुकीत सुमारे दोन हजार भाविक आणि काही बस होत्या. मिरवणूक पुढे सरकत असताना विरोध करणा-या साधूंशी जंगलीदास महाराजांच्या समर्थकांचा वाद झाला. विरोधकांनी मिरवणुकीवर तलवारी घेऊन हल्ला केला. हल्लेखोरांनी मिरवणुकीतल्या वाहनांची तोडफो़ड करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वरिष्ठ पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करुन सगळ्यांची समजूत काढली. कायदा हाती घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात मिरवणूक औरंगाबाद रोडवरुन पुढे जाऊ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळांच्या नावाने मागितले पैसे

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पाथर्डी

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने समीर भुजबळ असल्याचे सांगून पैसे मागितले. या प्रकरणी महंतांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पैशांशी संबंधित या प्रकरणात एका सरकारी अधिका-याचे नाव आल्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना पाथर्डीच्या प्रांताधिका-यांनी एक मोबाइल नंबर पाठवला आणि या नंबरवर समीर भुजबळांशी तातडीने संपर्क साधा असा निरोप दिला. प्रांताधिका-यांचा निरोप असल्यामुळे महंत शास्त्री यांनी तातडीने संपर्क केला असताना पलिकडून बोलणा-याने समीर भुजबळ अशी ओळख सांगून नगरजवळ अपघातामुळे अडचणीत सापडल्याचे सांगितले. तसेच महंतांकडे पैसे मागितले. महंतांना संशय आला, त्यांनी गडावरील कार्यकर्त्यांना बोलावले आणि एका मोबाइल अॅपद्वारे नंबरची पडताळणी केली. नंबर दुस-याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे पाहून महंतांनी समीर भुजबळ यांचा नंबर मिळवून थेट त्यांच्याशी संपर्क साधला. समीर भूजबळांनी आपण पैसे मागितले नसून पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची सूचना केली. अखेर महंतांनी कार्यकर्त्यांमार्फत पोलिस स्टेशनवर तक्रार नोंदवली आहे.

प्रांताधिका-यांकडे चौकशी केली असता वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या तोंडी आदेशानुसार आपण कारवाई केली असे मोघम उत्तर देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी पूर्ण केल्यानंतर सत्य उलगडेल असे सांगितले. दरम्यान भगवान गडावरील कार्यकर्त्यांनी गडाला तसेच महंत नामदेव शास्त्री यांना पुरेसे पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघांची निर्दोष सुटका

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

पिंपळगाव बसवंत येथील युवतीवर गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी निफाड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. ज. मंत्री यांनी गुरुवारी निकाल देऊन चौघांना दहा वर्ष सश्रम कारावास व दंडची शिक्षा तर सबळ पुराव्याअभावी चौघांची निर्दोष मुक्तता केली.

सबळ पुराव्याअभावी सागर आवारे, महेंद्र पानकर, विशाल सोनवणे व सचिन वराडे या चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अॅड. व्ही. एन. हाडपे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस वर्गणीदारांना दणका

0
0

मंडळाची नोंदणी बंधनकारक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रकारच्या धार्मिक उत्सव तसेच कार्यक्रमासाठी बेकायदा वर्गणी गोळा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी मंडळांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, अनधिकृतपणे वर्गणी गोळा करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.

विविध उत्सव व कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करण्याबाबत मंडळ किंवा सदस्यांनी धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा अर्ज कार्यालयाने उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे नागरिकांकडून सर्रास वर्गणी गोळा करणाऱ्यांना मोठा चाप बसणार आहे. वर्गणी करणाऱ्या मंडळांना नोंदणीसाठी आवश्यक त्या सर्व बाबी कार्यालयाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव, किमान एका पदाधिकाऱ्यांच्या किंवा सदस्यांच्या ओळखपत्राची साक्षांकीत प्रत, जागेबाबत जागा मालकाचे ना हरकत पत्र किंवा परवानगी पत्र, नगरसेवक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे मंडळ सदस्यांचे ओळखीबाबत पत्र, गेल्या वर्षीच्या उत्सवाचे हिशोब, गेल्यावर्षी घेतलेल्या परवानगी पत्राची प्रमाणित प्रत आवश्यक आहे. कार्यालयाच्यावतीने संबंधित मंडळाची चौकशी करूनच विविध प्रकारच्या अटी-शर्थीद्वारे देणगी किंवा वर्गणी गोळा करण्यास परवानगी दिली जाणार आहे. वर्गणी किंवा देणगी गोळा करीत असताना तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशारा धर्मादाय उपआयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांना भत्ता, पगार अन् लाभांश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

राज्यातील दुष्काळ लक्षात घेऊन नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेने सभासदांचा दोन टक्के लाभांश, सत्ताधारी गटाच्या १६ संचालकांचा एक वर्षाचा मिटींग भत्ता आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॅँकेची ५४ वी वार्षिक सभा अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे यांच्या अध्यक्षतेखाली जेलरोडच्या शाखेतील सभागृहात झाली. संचालक दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, शाम चाफळकर, मनोहर कोरडे, डॉ. प्रशांत भुतडा, हेमंत गायकवाड, रामदास सदाफुले, अशोक चोरडीया, रंजना बोराडे, श्रीराम गायकवाड, वामनराव हगवणे, बाबासाहेब पाळदे, जग्गनाथ आगळे, कमल आढाव, एकनाथ कदम आदी व्यासपीठावर होते.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने बँकेने सरकारला मदत करावी, अशी सूचना सभासदांनी केल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. कार्यकारी अधिकारी पद भरावे, खर्चावर नियंत्रण ठेवावे आदी सूचना सभासदांनी केल्या. डॉ. पेखळे म्हणाले की, बँकेचे भाग भांडवल ११ कोटी ७७ लाख तर सभासद संख्या ६२ हजार झाली आहे. बँकेकडे ३६५ रुपयांच्या ठेवी असून २९५ कोटींची कर्जे वाटली आहेत. निव्वळ नफा चार कोटी २३ लाख झाला आहे. दिवाळीपर्यंत १०.९५ या अल्पदराने गृहकर्ज देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आणखी नऊ शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. विक्रम खरोटे, सचिन हांडगे, प्रकाश गोहाड, अंबादास आडके, त्र्यंबकराव गायकवाड, पा. भा. करंजकर आदी सभासदांनी सूचना मांडल्या. सुधाकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images