Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साधता येणार दुसरी पर्वणी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणी काळात वाहतुकीवर निर्बंध आणल्याने नाशिककरांच्या झालेल्या हालअपेष्टा लक्षात घेता आगामी शाही पर्वणीच्या दिवशी सिटी बसची सेवा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना शहरांतर्गत दळणवळण तसेच वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

पहिल्या शाही स्नानाच्या दिवशी प्रशासनाने अतिरेकी नियोजन करत नाशिककरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. शहरात वैश्विक सोहळा सुरू असताना तो पाहण्यासाठी तसेच शाही स्नानालाही नाशिककरांना जाता आले नाही. म्हणूनच नाशिककरांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत आगामी पर्वणींसाठी फेरनियोजन करण्याचे पालकमंत्र्यांनी घोषित केले आहे. त्यानुसारच शहरांतर्गत एसटी महामंडळाच्या बससेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून गांभिर्याने विचार करण्यात येत आहे. तसे झाल्यास नाशिककरातील विविध उपनगरांमधून शहराच्या मुख्य भागात येण्यासाठी तसेच मुख्य भागातून उपनगरांमध्ये जाण्यासाठी वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे नाशिककर रामकुंड तसेच गोदाघाटाच्या ठिकाणी स्नानासाठी येवू शकणार आहेत. तसेच, ज्यांना शाही मिरवणूक आणि सिंहस्थ पर्वणी अनुभवायची आहे, त्यांना दिलासा मिळणार आहे. पहिल्या पर्वणीला नाशिककरांना भोगाव्या लागलेल्या त्रासामुळे आगामी दोन्ही पर्वणीत नाशिककरांना दिलासा देण्यासाठी आणि एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान रोखण्यासाठीही हा पर्याय प्रभावी ठरणार असल्याचे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगामी पर्वणींचे फेरनियोजन करण्याबाबत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. नाशिककरांसह बाहेरुन येणाऱ्या भाविक व पर्यटकांचा प्राधान्याने विचार करुनच नियोजन केले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

त्र्यंबक कनेक्शन

शहराच्या बाह्य भागात असलेल्या सर्व पार्किंगच्या ठिकाणांवरुन एसटी महामंडळाच्या बसेसने त्र्यंबकला जाण्याचा पर्याय पहिल्या पर्वणीला उपलब्ध नसल्याने अनेक भाविकांना माघारी परतावे लागले. त्यातच अनेकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. भाविक त्र्यंबकला जाण्यास इच्छुक होते तर पार्किंगच्या ठिकाणी एसटी बसेसही रिकाम्याच उभ्या होत्या. मात्र, रस्ते बंद करण्यात आल्याने बससेवाही बंद राहिली. मात्र, आगामी पर्वणींमध्ये बाह्य पार्किंग ठिकाणावरुन थेट त्र्यंबकसाठीही बससेवा मिळण्याची शक्यता आहे. थेट सेवा दिली गेली नाही तर किमान भाविक व पर्यटकांना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आणून तेथून त्र्यंबकला जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक नियोजन सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रह्मगिरी प्रदक्षिणेलाही ओहोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रावण महिन्यात नाशिक जिल्हा व परिसराचे आकर्षण व श्रद्धेचा विषय असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला यंदा सिंहस्थ काळ असूनही भाविकांची संख्या मंदावल्याचे दिसून आले. अवघ्या लाखभर लोकांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली.

तिसरा श्रावणी सोमवार ऐन सिंहस्थ काळात आल्याने त्र्यंबकेश्वरला यंदा गर्दी होईल असे वाटत होते. फेरी व दर्शनासाठी साधारण पाच लाख येतील असा अंदाज होता. मात्र, पहिल्या पर्वणीप्रमाणेच भाविकांनी त्र्यंबकेश्वरच्या फेरीकडेही पाठ फिरवली. सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गर्दी होती. मात्र, प्रदक्षिणेला भाविकांनी तुलनेने अल्प प्रतिसाद दिला. दरवर्षी पेक्षा यंदा एसटी बसेसची संख्या अधिक असूनही भाविकांनी फेरीला जाण्याचे टा‍ळले. अनावश्यक पायपीट नको म्हणून अनेकांनी शेवटचे शाहीस्नान होईपर्यंत त्र्यंबकला यायचे नाही, असा संकल्प केलेला दिसतो.

तरुणाचा मृत्यू

नाशिक येथील युवकाचा प्रदक्षिणा मार्गावर अकस्मात मृत्यू झाला. गोविंद साहेबराव जाधव (वय २६) असे त्याचे नाव आहे. तो पंचवटीतील संजयनगर येथील बुरूडवाडी येथे राहत होता. मोठ्या प्रदक्षिणेस जात असताना धाडोशीजवळ तो चक्कर येवून पडला. इतर भाविकांनी त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात आज पुढाऱ्यांची पर्वणी

$
0
0

ठाकरे, तटकरे, मुंडेंसह दिग्गजांची हजेरी

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, निरंजन डावखरेंसह अनेक दिग्गज नेते मंगळवारी नाशिकमध्ये येत आहेत. पहिल्या शाही पर्वणीत सहभागी होता आले नसले तरी नाशिककरांना पुढाऱ्यांच्या या पर्वणीत सहभागी होता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपळगाव बसवंतला मेळावा घेतला जाणार आहे. त्यात सरकारला धारेवर धरले जाणार आहे. राज ठाकरे यांच्याकडूनही सरकावर टीका होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कांद्याचे दर या प्रश्नांवर राज्य सरकार अपयशी ठरली असतांनाच, कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीतही सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही भाविक व नाशिक पर्वणापासून लांब राहिले. कोट्यवधींचा खर्च तर वाया गेला, नियोजनाच्या अभावाने पर्वणीच अपयशी ठरली. त्यामुळे सरकारला घेरण्याची आणखी एक संधी मिळाल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरुवात राष्ट्रवादीच्या वतीने नाशिकमधून होणार आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे सहभागी होणार आहेत. छगन भुजबळ यांनी अगोदरच पर्वणीच्या अपयशाबद्दल राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनावर टीकेची झोड उडवली आहे.

आरोप-प्रत्यारोपांची उडणार राळ

राज ठाकरेही मंगळवारी शहरात दाखल होत आहेत. कुंभमेळ्याच्या नियोजनापासूनच दूर राहिलेल्या ठाकरेंनी ध्वजारोहणाला अनुपस्थित राहणेच पसंत केले होते. ठाकरे चार दिवसांच्या दौऱ्यात साधू-महंतांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोट्यवधींचा खर्च करूनही फेल गेलेल्या पर्वणीवरून ठाकरेही सरकार व प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे. विकासकामांचे श्रेय घेतानाच आलेल्या अपयशाचे श्रेय भाजप सरकावर टाकून मोकळे होण्याची शक्यता असल्याने शाही पर्वणीनंतर आता आरोप-प्रत्यारोपांची राजकीय पर्वणी नाशिकमध्ये रंगणार आहे. नेते नेमके काय बोलतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचे संकट अटळ

$
0
0

गिरणाही आटले; मालेगावला प्रस्ताव सादर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणाचा पाणीसाठा अवघे तीनच टक्के शिल्लक असून, चणकापूर धरणातील आरक्षित चारही आवर्तन सोडण्यात आले आहेत. तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठा जेमतेम २० सप्टेंबरअखेर पुरेल इतकाच असल्याने मालेगावकरांवर पाणीकपतीचे संकट अटळ आहे. केवळ २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आता शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मालेगावकरांना वणवण करावी लागू शकते.

यंदा जून महिन्यापासूनच पावसाने पाठ फिरवल्याने मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रावर देखील चांगला पाऊस न झाल्याने जलसाठे आता कोरडे पडत चालले आहेत. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणाणे तर तळ गाठला असून, अवघे ६०८ दलघफू इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. चणकापूर धरणात १४०२ दलघफू म्हणजे अवघे ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यापूर्वी चणकापूर धरणातून मालेगावसाठीचे आरक्षित चार आवर्तन सोडण्यात आल्याने आगामी काळात या धरण प्रकल्पातून पाणी उपलब्ध होण्याचे संकेत नाहीत. शहरानजीक असलेल्या तळवाडे साठवण तलावात सध्या पाणी उपलब्ध असले तरी शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. हेच नियोजन कायम राहिल्यास हा पाणीसाठा देखील जेमतेम २० सप्टेंबर अखेर पुरेल इतकाच आहे. त्यामुळे मालेगावकरांवर येत्या काही दिवसात पाणी कपातीचे संकट अटळ मानले जात आहे.

आगामी काळात पाणीसंकट उभे राहू नये या दृष्टीने मालेगाव पाणीपुरवठा विभागाने महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्याकडे पाणीकपातीचा प्रस्ताव सादर केला आहे. गिरणा धरणातून मालेगाव शहरासाठी ५२५ दलघफू पाणी आरक्षित केले जाते. त्यातील ४२५ दलघफू पाणी याआधीच वापरण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा धरणात सध्या उपयुक्त असलेल्या ६०८ दलघफू इतक्या कमी पाणीसाठ्यातून आगामी काळात आणखी पाणी उपलब्ध होणे कठीण आहे. चणकापूरचे आरक्षित पाणी वाढवून घेण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर येऊ शकते.

माळमाथा योजनेतील गावांना एक सप्टेंबरपासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन उपविभाग मालेगावचे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.

पिके करपली

तालुक्यातील शेतकरी देखील आता दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. पावसाच्या पुनरागमनाची आशा मावळत चालली असल्याने यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नसल्याची चिन्हे दिसत आहे. पिके करपू लागली आहेत.



सध्याचा दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहिल्यास २० सप्टेंबर अखेर पाणीसाठा पुरेल अशी स्थिती आहे. आगामी काळात पाणीप्रश्न बिकट होऊ नये म्हणून मनपा पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचा प्रस्ताव महापौर व आयुक्तांना सादर केला आहे. याबाबत वरिष्ठांकडून निर्णय घेतला जाईल, त्यानुसार कार्यावही होईल. - जहीर अन्सारी, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याच्या दरात सातशे रुपयांची घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासगलाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाली असून, गेल्या आठवड्यात साडेपाच हजारांपर्यंत असणारे भाव साडेसातशे रुपयांनी घसरून ४ हजार ८८१ रुपयांपर्यंत घसरले आहेत. सरासरी दरातही चारशे रुपयांची घसरण होऊन ४ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

कमी आवकेच्या जोरावर देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे आवाक्याबाहेर गेलेले दर पाहता खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा देण्यासाठी कांदा आयातीचे अवलंबिलेले धोरण व लासलगावसह जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याचे झालेले आगमन यामुळे ही भाव घसरण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकीकडे या भाव घसरणीमुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव काहीशे कमी होण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे मात्र कांदा उत्पादकांना या भाव घसरणीची चिंता सतावू लागली आहे.

दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची २ हजार २३६ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान २ हजार ५०० रुपये कमाल ४ हजार ८८१ तर सरासरी भाव ४ हजार ४०० रुपये राहिले. सोमवारी नवीन लाल कांद्याची ८ क्विंटल आवक झाली होती. लाल कांद्याला ५ हजार ५ रुपयांचा भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तीन महिने उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने येवला तालुक्यातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक गावात विहिरींनी कातळ गाठल्याने अन् दिवसा सूर्य उन्हाळ्यागत आग ओकत असल्याने संकट कसं झेलावं याची चिंता गावोगावच्या प्रत्येकाला पडली आहे. येवला तालुक्यातील रायते येथेही अशाच पद्धतीने पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने ग्रामस्थ व महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

येवला पंचायत समितीने तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असला तरी गेल्या चार दिवसापासून या गावाकडे टँकरच फिरकला नसल्याने गावातील महिला पाण्यासाठी हंड्यांची रांग लावून टँकरच्या प्रतीक्षेत असतात. ग्रुप ग्रामपंचायतीने पाणीटंचाई लक्षात घेऊन पंचायत समितीकडे ठरावाद्वारे टँकरची मागणी केली होती. पंचायत समितीनेही सकारात्मक प्रतिसाद देत टँकरने पाणीपुरवठा सुरु केला. मात्र, हा पाणीपुरवठा तीन दिवसाआड सुरू करून फक्त हंडे भरून देण्याचे काम केले. हंड्यांमध्ये भरलेले पाणी पिण्यासाठी एक दिवसही पुरत नाही. मग ते तीन दिवस कसे पुरवावे? असा प्रश्न रायतेकरांसमोर उभा राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाईल टॉयलेट्स हटवा

$
0
0

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे आयुक्तांना साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात स्वच्छतेच्या दृष्टीने पाऊल उचलत ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची बांधणी केलेल्या प्रशासनाने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी व सारडा कन्या विद्यालय या शाळांबाहेरही ३० मोबाईल टॉयलेट्स उभी केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्याने हे टॉयलेट्स लवकरात लवकर येथून हलवावीत, अशी विनंती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला होता. यामुळे शहरात अस्वच्छता पसरण्याची शक्यता असल्याने शहरात हजारो मोबाईल टॉयलेट्स उभारण्यात आली. यातून स्वच्छता राखण्याचा हेतू जरी प्रशासनाचा असला तरी वास्तवात यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याचे चित्र समोर आले. नेहरू गार्डनजवळील नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंडळ व सारडा कन्या विद्यालय शाळांच्या परिसरातही हे टॉयलेट्स उभारले गेल्याने येथील विद्यार्थ्यांनाही त्याचा सामना करावा लागत आहे.

शाळेच्या वर्गखोल्यांपासून १० मीटर पेक्षाही कमी अंतरावर हे टॉयलेट्सची उभारणी करण्यात आली आहे. परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे आजार पसरण्याची भीती शाळा प्रशासनाने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा दृष्टीने विचार करत लवकरात लवकर ही मोबाईल टॉयलेट्स येथून हलवावीत, अशी मागणी संस्थेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योगा’चे वरातीमागून घोडे

$
0
0

दशकभरानंतर अग्निरोधक यंत्रणा बसविण्यास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विभागातील पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या त्र्यंबक रोडवरील उद्योग भवनाला अग्निरोधक यंत्र बसविण्याचे काम तब्बल दहा वर्षांनंतर सुरू करण्यात आले आहे. उद्योग भवनाला अग्निरोधकाचे कवच नसल्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झालेला नव्हता. अग्निरोधक यंत्र बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, अनेक वर्षांपासून विनापरवानाच उद्योग भवनाची इमारत शासकीय कार्यालयांकडून वापरण्यात येत होती, यावर दंडात्मक कारवाई कोण करणार, असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

एमआयडीसीमध्ये कारखाना सुरू करतांना उद्योजकांना २७ विविध परवानग्या एमआयडीसीच्या घ्यावा लागतात. यानंतरही महापालिका व एमआयडीसी या अग्निशमन केंद्रांच्या देखील मान्यता घ्यावी लागते. परंतु, अनेक वर्षांपासून उद्योग भवनाला अग्निरोधक उपकरणेच बसविली नसल्याने इमारतीचा अनधिकृतपणे वापर शासकीय कार्यालये थाटण्यात आली होती. या इमारतीमध्ये औद्योगिक विकास महामंडळ, कामगार उपायुक्त, औद्योगिक सुरक्षा संचानलानय, अन्न व औषध प्रशासन, यांसह विविध शासकीय व बँका आहेत. परंतु, इमारतीला अग्निरोधक उपकरणे बसविण्यात न आल्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच उद्योग भवनाला मिळाला नव्हता. दरम्यान वृत्तपत्रांनी देखील उद्योग भवनाच्या अनधिकृत वापराबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची एमआयडीसीच्या सचिवांनी दखल घेत एक कोटी रुपये खर्च करून उद्योग भवनाला अग्निरोधक यंत्र बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्योग भवन सन २००४ मध्ये सुरू करण्यात आले आहे.

कारवाई कोण करणार?

येत्या महिन्याभरात उद्योग भवनाला अग्निरोधक उपकरणे बसविली जातील असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बी. आर. बंडोपिया यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. परंतु, गेली अनेक वर्ष परवानगी विनावापर होत असलेल्या उद्योग भवनातील शासकीय कार्यालयांवर दंडात्मक कारवाई कोण करणार, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

उद्योग भवनाच्या परिसरात असलेल्या दुचाकी चालकांची पार्किंगमध्ये खड्डे पडल्याने पाण्यात गेली होती. याबाबत मटाने वृत्त देखील प्रसारित केले होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत पाण्यात गेलेल्या पार्किंगची डागडूजी सुरू केली आहे. यात खड्डे पडलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधुग्राममध्ये धर्मसभेबाबत मंथन

$
0
0

सिंहस्थाबात धर्मसभेत होणार चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभपर्व सुरू झाल्यापासून आखाड्यांमधील वाद, प्रशासनावरील टीका, अर्थकारण याचाच गाजावाजा होत आहे. यातून निर्माण झालेल्या नकारात्मक परिस्थितीला छेद देण्यासाठी तपोवनात लवकरच धर्मसभेचे आयोजन होणार असल्याची माहिती पुढे येते आहेत. अद्याप तिन्ही अनी आखाड्यांचे एकमत झाले नसून, ते झाल्यास धर्मसभा पार पडू शकते.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममध्ये दाखल होणाऱ्या साधू महंताच्या पडांलामध्ये भजन कीर्तन सुरू आहेत. विविध यज्ञांचे आयोजन होत असून, वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये धर्मसभेचे आयोजन झाल्यास कुंभमेळ्याचा रंगारंग बदलून जाईल, अशी अपेक्षा साधू-महंतांना आहे. धर्मसभेत अनेक विद्वान साधू-महंत सहभागी होतील. त्यांच्यात धर्म या विषयावर वेगवेगळी मतमतांतरे मांडली जातील. यासाठी तिन्ही आखाड्यांमध्ये एकमत होणे आवश्यक असल्याचा दावा संबंधित सूत्रांनी केला.

तिन्ही वैष्णव आखाड्यांमध्ये सध्या सुमारे ८० महंतपदे रिक्त आहेत. तिसऱ्या शाहीस्नानापर्यंत यापैकी ४0 पदे भरली जाण्याची शक्यता असून, उर्वरित रिक्त जागांचा येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या उज्जैन येथील कुंभमेळ्यात फैसला होऊ शकतो. त्या त्या आखाड्याच्या वा खालशाच्या संपूर्ण कारभाराचे नियंत्रण श्री महंतांकडेच असते. मंहताईची प्रक्रिया फक्त कुंभमेळ्यातच होते. कुंभमेळ्याचे प्रथम शाहीस्नान झाल्यानंतर रिक्त असलेल्या महंतपदांबाबत चर्चा बैठका सुरू होतात. आखाडा परिषदेचे अध्यक्ष, अनी आखाड्यांचे श्री महंत, चतु:संप्रदायाचे श्री महंत असे सारे मिळून अनुभव, सेवा व अन्य बाबींचे निकष लावून महंतपदासाठी नावे निश्‍चित करतात. या नावांचा अजेंडा कुंभमेळ्याला आलेल्या सर्व खालशांमध्ये फिरवला जातो. त्या नावांना प्रत्येक खालशाच्या श्री महंताकडून स्वाक्षरीद्वारे संमती घेतली जाते. ज्या नावांची निवड बिनविरोध होते, त्या साधूंच्या 'महंताई'ची तारीख निश्‍चित केली जाते. त्या खालशातच प्रमुख साधू-महंतांच्या उपस्थितीत दिमाखदार समारंभ आयोजित केला जातो. त्यात त्या साधूला महंताई प्रदान केली जाते. प्रमुख श्री महंत हे नूतन श्री महंतांना 'महंताई'ची चादर देतात, गंध लावतात, भंडारा केला जातो. या महंताईनंतरच संबंधित साधू हे आपल्या नावापुढे 'श्री महंत' असे संबोधन लावू शकतात. कुंभमेळ्याच्या शाही मिरवणुकीत डोक्यावर छत्र घेऊन सहभागी होऊ शकतात, त्यांना शाहीस्नानाचा मान मिळतो. ज्या नावांवर एकमत होत नाही, त्यांचा विचार पुढील कुंभमेळ्यात केला जातो. महंताईची ही प्रक्रिया प्रत्येक कुंभमेळ्याच्या प्रथम शाहीस्नानापासून ते तृतीय स्नानादरम्यान पूर्ण केली जाते. नाशिकमध्ये प्रथम शाहीस्नान आटोपल्याने आता या प्रक्रियेला वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकराचार्यांचीही अडवणूक

$
0
0

लाल दिवा काढल्याचा आरोप; चौकशी करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शारदा व जोतिषपीठाचे जगदगुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शाहीस्नान करू नये म्हणून प्रशासनाने त्यांना परवानगीसाठी झुलवत ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्या वाहनाचा लालदिवा देखील पोलिसांनी काढून घेतला. शंकराचार्यांना अशी वागणूक का मिळते याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच शंकराचार्यांनी स्नान केले. याबाबत त्यांच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या शाही पर्वणीस शाहीस्नान करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी तसेच, मार्ग निश्चित करून द्यावा म्हणून १४ ऑगस्टपासून पाठपुरावा केला. मात्र, त्यास उत्तर मिळाले नाही. २५ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने तोंडी सांगितले की स्नान करता येईल. शंकराचार्यांनी येथे उपस्थित असताना स्नान केले नाही तर त्याचा जनतेत चुकीचा संदेश जाईल म्हणून स्नान करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता आखाड्यांनी देखील चार वाजेपूर्वी स्नान झाले तर काही हरकत राहणार नाही असे संकेत दिले होते.

दि. २८ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री साधुग्राम येथे शंकराचार्य यांनी प्रवचन केले. दहा वाजता ते त्र्यंबककडे निघाले. त्यांना स्नान सोयीचे व्हावे म्हणून गौतम तलावाजवळ बालाजी या निवासस्थानी थांबावयाचे होते. परंतु, त्यांच्यासोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस पायलट गाडीतील कर्मचाऱ्यांना रस्ता माहीत नसल्याने ते मागे राहिले. शंकराचार्य यांची लाल दिवा असलेली गाडी पुढे निघाली. ही गाडी मध्य प्रदेशची आहे तसेच लाल दिवा वापरता येणार नाही म्हणून एका पोलिस अधिकाऱ्याने लाल दिवा काढून घेतला. त्यानंतर वाहनातील शंकराचार्य यांच्याशी बोलणे झाल्यावर वाहन जाऊ दिले. मात्र, पुन्हा गौतम तलावाजवळ बालाजी या इमारतीजवळ उभी मध्यप्रदेश पासिंग गाडी जप्त करावी लागेल म्हणून पोलिस मागे लागले. अर्थात शंकराचार्य हे ९२ वर्षांचे असून, त्यांना वाहनाशिवाय जाता येणार नाही म्हणून विनवण्या केल्या. तेव्हा पोलिस निघून गेले. त्यानंतर शंकराचार्य कुशावर्तावर पोहचले व पहाटे २ वाजून ५७ मिनिटांनी स्नान केले.

यामध्ये शंकराचार्यांना स्नानासाठी परवानगी देतांना वेळकाढू पणा करणे, वेळेची निश्चित माहिती न देणे, लाल दिवा काढून घेणे, वाहन जप्त करण्यासाठी पाठपुरावा करणे अशा अनेक बाबतीत शंकराचार्यांना स्नानापासून दूर ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा त्यांच्या भक्तांना दाट संशय आहे. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. शंकराचार्य यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आदींना पत्र पाठविले आहे.

दुस-या शाहीस्नानाचा निर्णय घेणार

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांना यापुढे शाहीस्नान करणार का? असे विचारले असता त्यांनी कोणास हरकत असेल तर करणार नाही. आपल्या स्नानाबाबत आखाड्यांचे काही म्हणणे नाही. मात्र, आपणास अशा प्रकारे वागणूक मिळणार असेल तर याबाबत निर्णय घ्यावाच लागेल, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणामुळे गोदावरीच लुप्त होईल

$
0
0

वाढत्या प्रदूषणामुळे महंतांना चिंता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील नद्यांच्या प्रदूषणाची पातळी धोकादायक पध्दतीने वाढती आहे. यात त्वरित सुधारणा झाली नाही तर प्रकृतीच बहुतांश नद्या लुप्त करून टाकेल. यात गोदावरीचाही समावेश असू शकतो. त्यामुळे प्रशासनासहीत सर्व समाज घटकांनी नदी प्रदूषणाच्या मुद्याकडे गंभीरतेने पाहावे, असे आवाहन जुना आखाड्याचे श्री महंत दर्शनगिरी महाराज आणि श्री महंत देवेंद्रगिरी महाराज यांनी केले.

एखाद्या गोष्टीचा अभाव असला की मनुष्य त्याचा काटकसरीने वापर करतो. सध्या नद्यांबाबत नेमकी उलटी परिस्थिती पाहायला मिळते. गोदावरीला आकाश गंगा असेही म्हटले जाते. मात्र, याच पवित्र नदीला सध्या गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दर्शनगिरी महाराजांनी स्पष्ट केले. योग दर्शन परमा​र्थिक ट्रस्ट आणि शहरातील पर्यावरण प्रेमी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना दर्शनगिरी महाराजांनी व्यवस्थेवर टीका केली. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी या प्रश्नावर प्रेम करणारे राज्यकर्ते आ​णि त्यास वेळ देणारे अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या याचाच अभाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दर्शनगिरी महाराजांनी यासाठी तामसी वृत्ती कारणीभूत असल्याचे सांगितले. नद्यावर बेलगाम अतिक्रमणे होत असून त्यातून नद्यां प्रदूषित होण्याचे पाप सर्वसामन्यांच्या हातून घडते आहे. जुना आखाड्याच्यावतीने हा मुद्दा हातात घेऊन त्याविरोधात जनजागृती केली जाईल, असे दर्शनगिरी महाराज म्हणाले.

नद्यांचे पवित्र कायम राहावे यासाठी काही बाबींचा स्वीकार सर्वांना करावा लागेल. यासाठी ट्रस्टतर्फे पुढाकार घेतला जाईल, असे योग दर्शन परमार्थिक ट्रस्टचे हर्षानंद यांनी स्पष्ट केले. जन्म दिवसाच्या वेळी झाड लावणे, पाण्याचा अपव्याप टाळणे यासारख्या छोट्या छोट्या बाबींचा अंगीकार सर्वांनी केल्यास पर्यावरण बचावाच्या चळवळीस हातभार लागेल, असे हर्षानंद महाराजांनी सांगितले. या कार्यक्रमास पर्यारवण प्रेमी राजेश पंडीत, निशिकांत पगारे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टी ललिता शिंदे आदी उपस्थित होते.

निलपर्वताची हानी नाही

निलपर्वतावरील झाडे तोडून याठिकाणी सपाट भाग तयार करण्यात आल्याचा आरोप जुना आखाड्यावर आहे. याबाबत दर्शनगिरी महाराजांना विचारणा केली असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावत, रस्त्यांसाठी झाडे काढावी लागल्याचे त्यांनी सांगितले. या मोबदल्यात पाच हजारापेक्षा जास्त झाडे लावल्याचे देवेंद्रगिरी महाराजांनी सांगितले.



नदी आयोगाची स्थापना व्हावी

नदी प्रदूषणाबाबत लढा देताना अनेक विभागांशी लढा द्यावा लागतो. यात सूसुत्रता नसल्याने रिझल्ट समोर येत नाही. वर्षानुवर्षे हेच चालले आहे. नदी प्रदूषणावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाप्रमाणे नदी आयोगाची स्थापना व्हावी, असे मत ललिता ​शिंदे यांनी व्यक्त केले. यात जनजागृती हा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा असल्याने आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे राजेश पंडित यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष साधुग्राम-रामकुंडावरच

$
0
0

महापालिकेकडून शाही मार्गासह अन्य ठिकाणीच्या सुविधा बंद

म. टा .खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा महापालिकेने रामकुंड व साधुग्राम वगळता काढून घेतल्या आहेत. साधुग्राम व रामकुंडावर ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सेवा सुविधा कायम ठेवण्यात येणार आहेत. तर बाह्य वाहनतळ, गोदाघाट, अंतर्गत वाहनतळ आणि शाहीमार्गावरील स्वच्छता कर्मचारी इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे.

सिंहस्थ पर्वणी दरम्यान तीन दिवस महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी भाविकांसाठी सेवा सुविधा तैनात केल्या होत्या. गरज पडल्यास त्या कायम ठेवल्या जाणार होत्या. पहिल्या दिवशी, पर्वणीचा दिवस व पर्वणीचा नंतरचा दिवस अशा तीन दिवस बाह्य वाहनतळ, अंतर्गत वाहनतळ ते गोदाघाट, शाही मार्ग, तसेच साधुग्राम व रामकुंड परिसर या दरम्यान सर्वच भाविक मार्गावर पाणी, स्वच्छतागृह, दवाखाने, होणारी स्वच्छता यासह महापालिकेकडून देण्यात सेवा सुविधा देण्यात आल्या होत्या. पर्वणीचाच फियास्को झाल्याने आता उर्वरित ठिकाणी सुविधांची गरज नसल्याने महापालिकेने काढून घेतल्या आहेत. सद्यस्थितीत साधुग्राम व रामकुंड परिसरात भाविकांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या सर्व सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आल्या आहे. आता साधुग्राम व रामकुंड वगळता इतर भाविक मार्ग व गोदाघाट या दरम्यान भाविक येत नाही. त्यामुळेच या भागातील सेवा सुविधा बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने आता केवळ साधुग्राम व रामकुंडावरच लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सुविधा कायम ठेवून अधिकाधिक मनुष्यबळ या दोन ठिकाणी केंद्रीत केले आहे. तर शाहीमार्ग व इतर ठिकाणचे मनुष्यबळ शहरात इतरत्र ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यात स्वच्छता कर्मचारी अधिक असून त्यांना शहरातील स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहे.

आरोग्यसेवा कायम

पर्वणी काळात साधुग्राममध्ये उभारलेल्या रुग्णालये व दवाखान्यात चांगली वैद्यकीय सेवा देण्यात आली. तत्पर सेवेमुळे साधू महंतासह भाविकांवर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले. व्हायरल इन्फेक्शनचे रुग्णांवर तातडीने उपचार केलेत. मात्र डेंग्यू अथवा स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळलेले नसल्याचेही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिककरांना विश्वासात घ्या!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत सिंहस्थात (२००३) मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे खापर अंतिमत: पोलिसांवर फोडण्यात आले होते, असा सूचक इशारा करीत पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताचे नियोजन योग्यच असल्याची पावती नाशिक पोलिसांना दिली आहे. थोड्याफार उणिवा असतील तर अन्य विभागांशी चर्चा करून तसेच नागरिकांच्या सूचना मागवून त्या निकाली काढा, असे आदेश पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन आणि पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांना दिल्याचे संजीव दयाल यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी निर्विघ्नपणे पार पडली. तरीही पोलिसांचे कौतुक होण्यापेक्षा त्यांनी बंदोबस्ताचा अतिरेकच केल्याची चर्चा सर्व स्तरांतून होऊ लागली आहे. पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे नाशिककर नागरिकांसह हजारो भाविक पर्वणीच्या सोहळ्याला मुकल्याचा आरोप होतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक दयाळ यांच्यासह कायदा आणि सुव्यवस्थाचे अपर पोलिस महासंचालक के. एल. बिष्णोई, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, रेल्वे पोलिसचे अपर पोलिस महासंचालक कनकरत्नम, अपर पोलिस महासंचालक जगन नाथ यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीत बंदोबस्तावेळी काय अनुभव आले, कोठे नियोजन योग्य झाले, कोठे सुधारणांना वाव आहे याचा आढावा घेण्यासाठी दयाळ नाशिकमध्ये आले होते. नाशिकमध्ये पहिल्या पर्वणीला भाविकांची गर्दी झाली नाही, त्यास पोलिसांचा बंदोबस्त हे कारण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. राखी पौर्णिमेसारखा भारतीय संस्कृतीमधील मोठा सण पर्वणीच्या दिवशी होता. याखेरीज गुजरातमध्ये पटेल आरक्षणावरून निर्माण झालेल्या परिस्थितीसारखी अनेक कारणे त्यास जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पौर्णिमेच्या पर्वणीला भाविकांची फार गर्दी होत नाही, असे साधू-महंतांचे म्हणणे आहे. दुसऱ्या पर्वणीला भाविक गर्दी करतात. गेल्यावेळीही दुसऱ्या पर्वणीलाच भाविकांनी अधिक गर्दी केली होती.

यंदाही १३ सप्टेंबरच्या पर्वणीलाच भाविक अधिक गर्दी करतील अशी शक्यता दयाल यांनी व्यक्त केली. नियोजनामध्ये बदल करण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी हाती आहे. या कालावधीत एसटी महामंडळ किंवा अन्य संबंधित विभागांशी चर्चा करून नियोजनात बदल करता येऊ शकतात, असे ते म्हणाले.

पायपिटीचे समर्थनच!

प्रयागमध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना ३० ते ४० किलोमीटर पायी चालविले जाते. प्रशासन बसेसची सुविधा अशाच भागापर्यंत पोहोचविते की तेथून पुढे भाविकांना चालत येण्याशिवाय गत्यंतरच राहत नाही. नाशिकमध्ये बाह्य वाहनतळापासून अंतर्गत वाहनतळापर्यंत भाविकांना बसेसने आणण्याची सोय करण्यात आली आहे. तेथून पुढे घाटांपर्यंत म्हणजेच पाच ते दहा किलोमीटर पायी चालावे लागते. भाविक तेवढे चालू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दी नियोजनावर ‘ट्रेनिंग फिल्म’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा सोहळा ही प्रशिक्षणाची मोठी संधी आहे. या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन केले जाणार आहे. पोलिस दलात भरती होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे व्यवस्थापन पहावयास मिळावे, यासाठी त्याच्या ट्रेनिंग फिल्म तयार करा, असे आदेश पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या (एमपीए) संचालकांना दिले आहेत.

पहिल्या पर्वणीला भाविकांनी फार गर्दी केली नसली तरी दुसऱ्या पर्वणीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. किंबहुना दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीलाच अधिक गर्दी असते, असा दावा आता पोलिस करू लागले आहेत. या गर्दीचे व्यवस्थापन हा पोलिसांपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तयारीही पूर्ण केली आहे. होल्ड अॅण्ड रिलीज पॉईंट, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग, पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. 'एमपीए'मध्ये उपनिरीक्षक आणि उपअधीक्षकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये क्राऊड मॅनेजमेंटचा समावेश असतो. सिंहस्थाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असून हे क्राऊड मॅनेजमेंट कसे होतेय याचे शुटींग करून ठेवल्यास त्याचा भविष्यात ट्रेनींगदरम्यान उपयोग करून घेता येईल, असा विश्वास दयाळ यांनी व्यक्त केला आहे.

'एमपीए'चे संचालक नवल बजाज म्हणाले, की आमच्याकडे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये क्राऊड मॅनेजमेंट हा स्वतंत्र विषय आहे. कुंभमेळ्यात लाखो भाविक येणार आहे. यावेळी होणाऱ्या व्यवस्थापनाची ट्रेनिंग फिल्म तयार केल्यास प्रशिक्षण घेणाऱ्या सर्वांनाच त्याचा फायदा होईल. म्हणूनच आमचे काही अधिकारी हे काम करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार हिंदूचेच सण-उत्सव संपवतेय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असतांना, हिंदूंचेच सण आणि उत्सव संपवले जात असल्याची बोचरी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अपयश हे सरकारचे अपयश असून कुंभमेळा अपयशी ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पर्वण्यांना गर्दी जमविण्याऐवजी अधिकारी कोणाच्या आदेशाने परराज्यात जावून भाविकांना येवू नका, असा प्रचार करत होते. याचा तपशील जनतेसमोर येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पर्वण्यांमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर जनताच रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना भुजबळ आणि तटकरे यांनी कुंभमेळ्यातील अपयशावर सरकारवर टीकास्र सोडले. पर्वण्यामंध्ये भाविकांना दूर ठेवणे हा गुन्हाच आहे. अधिकारी पर्वण्यांना येऊ नका असा प्रचार करत होते. असा अधिकार या अधिकाऱ्यांना कोणी दिला असे सांगत मध्य प्रदेश सरकारचे होर्डींग नाशिकमध्ये लागतात. तर राज्यसरकार भाविकांवर बंदी घालत असल्याची टीका भुजबळांनी केली. स्मशानभूमी सुद्धा बंद ठेवली जाते, नाशिकचा तुरुंग करण्यात आला. असे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. त्यांचीही ही जबाबदारी असून ते आपली जबाबदारी टाळत आहेत. अनुभव नसलेले अधिकारी आणि मंत्री हे सगळे हाताळत आहेत. अपरिपक्वतेमुळेच हा प्रकार झाला आहे. आता अपयशाचे खापर रमणी आयोगावर फेडले जात आहे. पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये हेवेदावे आहेत. त्यामुळे दुसरे अधिकारी पाठवा अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.



हे तर सरकारचे अपयश

आघाडी सरकारच्या काळात कुंभमेळा यशस्वीरित्या पार पाडले जात होते. मात्र, पोलिसांच्या अतिरेकामुळे कुंभमेळा फेल झाला असून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. कुंभमेळ्यावर आघाडी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, सरकारने नियोजन केले नसल्याने हे सर्वकाही वाया गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य सरकार संवेदनाहीन

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्यावर तटकरेंची टीका; प्रशासन‌ ढिम्म असल्याचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळाबाबत प्रशासनावर सरकार संवेदन‌हीन तर प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा दौरा म्हणजे 'बैल गेला आणि झोपा केला' अशा प्रकारचा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून दुष्काळावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगितले.

तटकरे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्यावर असून नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यातील दुष्काळ हा १९७२ पेक्षाही गंभीर आहे. मात्र, सरकार याबाबत गंभीर नाही. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देवून व वीज बील माफ करून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. राज्यातील पाण्याचे तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. सरकारी यंत्रणेमार्फत चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे. बँकाची कर्जवसूली थांबवली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री याबाबत गंभीर नसल्याची टीका तटकरे यांनी केली.

शरद पवारांनी दुष्काळाची पाहणी केल्यानंतर आता सरकार जागे झाले आहे. मुख्यमंत्री आता मराठवाड्याचा दौरा करत आहेत. मात्र, आता दौऱ्याऐवजी उपाययोजनांची गरज असल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे 'बैल गेला आणि झोपा केला', अशी अवस्था असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्य सरकारने तातडीने उर्वरित पाण्याचे नियोजन करून जनतेला वस्तुस्थिती लक्षात आणून दिली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

मराठवाड्यात १४ सप्टेंबरला जेलभरो

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असून या विरोधात 'राष्ट्रावादी'च्या वतीने येत्या १४ सप्टेंबरला मराठवड्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे सर्व नेते या जेलभरोमध्ये सहभागी होणार आहेत. मराठवाड्यानंतर राज्यातील अन्य भागातही जेलभरो नियोजन असून त्यांसदर्भात येत्या ३ सप्टेंबरला 'राष्ट्रवादी'ची बैठक शरद पवाराच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. या बैठकीनंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जेलभरो केले जाणार असून दुष्काळाच्या उपाययोजनेत अपयशी ठरलेलेल्या सरकार विरोधातील पहिला एल्गार मराठवाड्यातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'मुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण नाही'

मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौ‍ऱ्यावर असतांना विरोधी पक्षनेते मुंडे नाशिक दौऱ्यावर कसे काय? असा प्रश्न विचारल्यावर मुंडे यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे आमत्रंण नसल्याचा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिले असते तर आपण निश्चित सहभागी झालो असतो; मात्र मुख्यमंत्र्याना उशिरा शहाणपण सुचल्याचे सांगून आमचा नाशिकचा दौरा यापूर्वीच निश्चित होता असा दावा त्यांनी केला.

लक्ष विचलित करण्यासाठी नामांतराचा मुद्दा

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा हा दुष्काळावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काढल्याच आरोप तटकरे यांनी केला आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना सरकार गंभीर नाही. मात्र, जनतेचे लक्ष कुठेतरी विचलित करून आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे सांगून आमच्या दृष्टीकोनातून सध्या दुष्काळ महत्त्वाचा असून राज्यातील शेतकऱ्यांना व गोरगरिबांना दिलासा देणे महत्त्वाचे असल्याचे तटकरेंनी सांगून राष्ट्रवादी नामांतरापासून दूर असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल नोंदणी आता एफबीद्वारे

$
0
0

एलआयसीची सुविधा; विमा हफ्त्याची देणार आठवण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विम्याचा हप्ता भरण्याची आठवण देणारा मेसेज हवा असेल तर तातडीने एलआयसीच्या फेसबुक पेजवर मोबाइल नंबर रजिस्टर करा. बदलत्या काळानुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच एलआयसीने विमा ग्राहकांना फेसबुक पेजवर सेवा उपलब्ध करून दिली आहे.

एलआयसीच्या स्थापनादिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिक विभागाचे एसडीएम प्रदीप शैणे यांनी एलआयसीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सोशल मीडिया अत्यंत प्रभावी असून, त्याचा योग्य वापर करून ग्राहकांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत आमच्याकडे २२ टक्के ग्राहकांचे मोबाइल नंबर रजिस्टर आहेत. त्यामुळे या ग्राहकांना आम्ही मोबाइलवरच विविध प्रकारचे संदेश देत आहोत. ज्यात पॉलिसीचा हप्ता, पॉलिसीची मॅच्युरिटी यासारख्या संदेशांचा समावेश आहे. विमा ग्राहकांचे मोबाइल नंबर नोंदविण्यासाठी एलआयसीच्या सर्व शाखांमध्ये सुविधा आहे. मात्र, जे ग्राहक शाखेपर्यंत येऊ शकत नाहीत. त्यांना 'एलआयसी इंडिया फॉरेव्हर' या फेसबुक पेजव्दारे मोबाइलची नोंदणी करता येईल, असे शेणै यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने १५ जुलै रोजी आदेश काढला असून, त्याद्वारे विमा ग्राहकाला एलआयसीच्या शाखेत येऊन विम्याचा हप्ता भरावा लागणार नाही. एलआयसीने स्टेट बँकेसह एकूण चार राष्ट्रीयकृत बँकांशी करार केला असून, या बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांचा विमा हप्ता एसीएसद्वारे (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) देता येणार असल्याचे शेणै म्हणाले. सद्यस्थितीत केवळ ३५ टक्के विमा ग्राहकच एलआयसीच्या शाखांमध्ये पैसे भरण्यासाठी येत आहेत. इंटरनेटद्वारे पेमेंट, चेक, इसीएस, एनईएफटी, अॅप याद्वारे पैसे भरण्याची सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉलिसी पुनरुज्जीवन संधी

एलआयसीच्या वर्धापनदिनानिमित्त पाच वर्षांपर्यंत बंद पडलेल्या विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. व्याजात तीस टक्के सूट देण्यासह वैद्यकीय चाचणीची सक्ती काढण्यात आली आहे. त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

१०० विमा ग्रामचे उद्दिष्ट

ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या गावांना एलआयसीद्वारे विमा ग्राम घोषित केले जाणार आहे. या गावात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एलआयसीच्यावतीने एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. सोलर पंप, पथदिवे, स्वच्छतागृह अशा प्रकारच्या सुविधा त्या गावात दिल्या जातील. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात १०० विमा ग्राम करण्याचे ध्येय असल्याचे शेणै यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाळून मारल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीला नांदविण्यास नकार देऊन दिला जाळून मारणाऱ्या पतीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भाऊराव रामनाथ गुळवे (रा. सिन्नर) असे त्याचे नाव आहे.

माया दशरथ जेडघुले (१८, रा. सिन्नर) हिच्यासमवेत भाऊराव गुळेवे याचा १३ मे २०१३ रोजी विवाह झाला होता. त्यानंतर दोनच महिन्यात तो तिच्याकडे घटस्फोट मागू लागला. १३ जुलै २०१३ रोजी माया त्याच्याकडे पुन्हा नांदायला आली. त्यावेळी तू नांदायला का आलीस, मला घटस्फोट दे असे तो तिला सांगू लागला. तिने त्यास नकार दिला. त्यानंतर माया हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला मारण्यात आले. ती पेटलेल्या अवस्थेत बाजूलाच बहिणीकडे पळत गेली.

आग विझवून तिला नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रतिभा चव्हाण यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी भाऊराव याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माहिती’चे मूल्य पाच हजार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही आवश्यक ती माहिती न दिल्याप्रकरणी सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्री काळाराम मंदिर संस्थेच्या विश्वस्त नियुक्तीची माहिती देण्याचे त्यांनी टाळले होते.

अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शहराध्यक्ष हेमंत जगताप यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत श्री काळाराम मंदिर संस्थेच्या विश्वस्त नियुक्तीबाबतची माहिती अर्जाद्वारे सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षक सु. ना. गायकवाड यांच्याकडे अर्ज केला. माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज आल्यापासून ३० दिवसाच्या आत लेखी माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, गायकवाड यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे याप्रकरणी जगताप यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपिल दाखल केले. त्याची सुनावणी नुकतीच झाली.

विहित वेळेत माहिती न दिल्याप्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या सुनावणीवेळी गायकवाड यांनी सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे, की प्रकृती अस्वास्थ्य तसेच आस्था, रुग्णालय व नक्कल या तीन विभागांची जबाबदारी असल्याने विहित वेळेत माहिती सादर करता आली नाही. पण, जाणीवपूर्वक माहिती दिली गेली नसल्याची शंका जगताप यांनी उपस्थित केली.



शिस्तभंग कारवाई का करू नये?

याप्रकरणी आयोगाने गायकवाड यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावतानाच यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा आयोगापुढे १५ दिवसाच्या आत हजर राहून लेखी करण्यात यावा, असे आदेशही आयोगाने दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी जगताप यांनी समाधान व्यक्त केले असून माहितीच्या अधिकारान्वये सार्वजनिक माहिती देणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच फेरपरीक्षा उत्तीर्णांना प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत यश मिळविलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी मंगळवारी प्रवेशाची प्र्रकियाही सुरू झाली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात अकरावीच्या रिक्त असणाऱ्या जागांची संख्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे. परिणामी अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नसल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे.

जुलै ऑगस्ट महिन्यात दहावी अनुत्तीर्णांसाठी फेरपरीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती मार्कशीटही देण्यात आले. यानंतर मंगळवारपासून या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. फेरपरीक्षेमध्ये नाशिक शहर आणि जिल्हाभरातून सुमारे दीड हजारांवर विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

नाशिक विभागातून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात आहे. या स्थितीत एकट्या नाशिक शहर व जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजेसमध्ये सुमारे ४ हजार ३३३ जागा रिक्त आहे. आर्ट, कॉमर्स व सायन्स या तीनही शाखा मिळून ही संख्या आहे. यामुळे फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता कमी आहे.

बारावी परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

सन २०१६ मध्ये आयोजित इयत्ता बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत अद्यापही अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता आठ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना आता ८ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांसाठी ९ ते १६ ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजेसमध्ये आता आधार कार्डसक्तीचे केले आहे. त्या धर्तीवर बोर्डाने यंदा परीक्षा अर्जांमध्ये आधार कार्डच्या उल्लेखासाठीही रकाना उपलब्ध करून दिला आहे. बारावीचे अर्ज भरतेवेळी आधारकार्ड असणे सक्तीचे नसले तरीही हा आधार रकान्यामुळे विद्यार्थ्यांची पावले आधार केंद्राकडे वळत आहेत. या परीक्षा अर्जांविषयी अधिक माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images