Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गौरी पटांगणाला पसंती

0
0

gayatri.kalkar @timesgroup.com

नाशिक : एकीकडे रामकुंडावर शाही स्नानाचा बंदोबस्त कडक होत असतानाच गौरी पटांगणावर शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी झाली होती. साधूंचे स्नान सुरू होण्यापूर्वीच भाविकांचा शाही स्नान सोहळा गौरी पटांगणावर सुरू झाला होता. पहाटे ३ वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांनी पहिल्या पर्वणी स्नानाचा आनंद लुटला.

रामकुंडावर स्नान करण्याची इच्छा प्रत्येक भाविकाच्या मनात असली तरी साधूंच्या शाही स्नानाच्या व्यवस्थेमुळे अन्य भाविकांना मात्र रामकुंडाच्या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. रामकुंडावर अधिक बंदोबस्त असल्याने भाविकांनी गौरी पटांगणातच मुक्काम ठोकला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत बाहेरून आलेल्या पर्यटकांची गर्दी गौरी पटांगणावर मोठ्या प्रमाणावर होती. नाशिककर मात्र स्नानासाठी नव्हे तर उत्सुकतेपोटी सोहळा पाहण्यासाठी इथे गर्दी करीत होते. रामकुंडावर जवळपास १२ वाजेपर्यंत कोणालाच प्रवेश नव्हता. तसेच, शाही मिरवणुकीच्या मार्गावरही अडथळे होते. त्यामुळे गौरी पटांगणावरच अधिक गर्दी पाहायला मिळत होती. बाहेरचे भाविक पहाटेपासून इथे स्नान करीत असले तरी नाशिककरांनी मात्र ११ वाजल्यानंतर गौरी पटांगणावर स्नानासाठी हजेरी लावली. दुपारी १२ वाजल्यानंतर या भागातील गर्दी वाढल्यामुळे पोलिसांनीही बंदोबस्त अधिक कडक केला होत. एका वेळी गौरी पटांगणावर जवळपास १५ ते २० हजार भाविक उपस्थित होते.

बॅरिकेड्सवरून उड्या

गर्दीच्या नियोजनासाठी या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. परंतु, अनेक तरुण मात्र पोलिसांचे लक्ष नसताना बरिकेड्सवरून थेट पाण्यामध्ये उड्या मारत होते. स्वयंसेवक, पोलिस यांचा कडेकोट बंदोबस्त असूनही त्यांची नजर चुकवून तरुणांचा हा प्रकार सुरू होता.

पोलिसांची दुहेरी जबाबदारी

कठोर भूमिका घेत गर्दीला नियंत्रित करण्याचे काम करणारे पोलिस गोदा स्वच्छतेच्या बाबतीतही दक्ष होते. पाण्यामध्ये विसर्जित केले जाणारे निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या हे साहित्य आपल्या काठीने पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. याचबरोबर नदीमध्ये काहीही विसर्जन न करण्याच्या सूचनाही पोलिसांकडून भाविकांना केल्या जात होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधूंची संख्या ‘त्यांनाच’ ठाऊक!

0
0

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : तीन प्रमुख आखाडे, १८ उपआखाडे आणि सुमारे ७५० खालसे असे मिळून ३ लाख २० हजार साधू-महंत शाही स्नानाला येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सर्व मिळून ५० हजार साधू जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडील माहिती खोटी, की आखाडे स्वतःकडील आकडे फुगवून सांगतात, असा प्रश्न भाविकांसह सगळ्यांनाच पडला.

साधारणतः तीन वर्षांपासून प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू केली होती. प्रत्येक वेळी हाच आकडा सांगत प्रशासनाने २ हजार ४०० कोटींचा आराखडा तयार केला. दिवसागणिक त्यात वाढ करण्यात आली. त्यानुसार साधुग्राम तयार करताना लाखो साधूंची संख्या समोर ठेवण्यात आली. विशेष म्हणजे कालपर्यंत साधुग्राममध्ये खालशाच्या जागेवरूनच महंतांमध्ये रस्सीखेच सुरू होती. जागेवरुन सुरू झालेल्या `तू तू मैं मैं` वरुनच दिगंबर आखाडा आणि महंत ग्यानदास यांच्यातील वाद विकोपाला गेला. साधुग्राममधील जागेसाठी साधूमध्ये होणारी रस्सीखेच पाहून यंदाच्या कुंभ मेळ्याला शत-प्रतिशत साधू येतील, असा भाविकांचा अंदाज होता. मात्र, आजच्या शाही स्नानाला ५० हजारांपेक्षा कमी साधूंनी उपस्थिती लावली. तीन लाख साधूंमध्ये एक लाख साधू महंत धार्मिक संस्थाशी निगडीत असू शकतात. ते शाही स्नानासाठी येत नाहीत. उर्वरित २ लाखांपैकी एक लाख साधू महंत तरी रामकुंडावर येणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. जास्तीत जास्त जागा आणि सुविधा मिळवण्यासाठी आखाडा परिषद साधूंचा आकडा फुगवून सांगते की जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रशासनातील अधिकारी अशा पोकळ आकड्यांचा आधार घेते हे स्पष्ट झालेले नाही.

गुरू पौर्णिमेनंतर साधूंची संख्या

लक्षणीय वाढेल, असे अनेक महंताकडून सांगण्यात येत होते. आता हेच महंत दुसऱ्या पर्वणीची प्रतीक्षा करा, असा सबुरीचा सल्ला देताना दिसतात.

साधूंची संख्या रोडावली असे नाही. आखाडे हेच खालशांना सन्मानपूर्वक शाही स्नानासाठी घेऊन येतात. तीन टप्प्यात साधू आले. दुसरी म्हणजे अमावस्येची पर्वणी सर्वांत मोठी असते. तीला मोठी गर्दी होईल. - महंत सुधीरदास महाराज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकसाठी वेगवेगळे तिकीटदर

0
0

नामदेव पवार, सातपूर

नाशिकमधून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांना तिकीटासाठी वेगवेगळी किंमत मोजावी लागण्याचा अनुभव शनिवारी आला. त्र्यंबक रोडवरील खंबाळे पार्किंग येथून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी काही वाहकांनी २० तर काही वाहकांनी ३० रुपये आकारले. एसटी महामंडळाच्या या विसंगत काराभाराबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांनी थेट जाण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली होती. त्र्यंबकमध्ये खासगी वाहनांची गर्दी वाढू नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले होते. त्यामुळे खंबाळेपर्यंत आपल्यानंतर खासगी वाहने पार्किंगमध्ये उभी केल्यानंतर एसटी महामंडळाच्या बसने जाण्याचा एकमेव पर्याय भाविकांपुढे ठेवण्यात आला होता. त्यामुळे भाविकांनी एसटीने प्रवास केला. मात्र, काही बस वाहकांकडून खंबाळे येथून त्र्यंबकसाठी २० रुपये आकारण्यात आले तर काही वाहकांनी प्रति भाविक ३० रुपये घेतले. याबाबत विचारणा करण्याचा काही भाविकांनी प्रयत्नही केला. मात्र, त्यांचे समाधान होऊ शकेल, असे उत्तर वाहनांनी दिली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

रिक्षाभाडे पन्नास रुपये

नाशिकरोड/ सातपूर : दसक घाटावर दुचाकी जात नसताना रिक्षाचालकांनी एकलहरामार्गे भाविकांची ने-आण केली. त्यासाठी प्रत्येकाकडून ५० रुपये भाडे घेतले जात होते. असाच अनुभव सातपूर, सिडको आणि दिंडोरी रोडवरून येणाऱ्या भाविकांनाही आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाडा एक, मुख्य महंत दोन!

0
0

prashant.bharvirkar @timesgroup.com

नाशिक : धर्मशास्त्रानुसार आखाड्यांना शाहीस्नानाचा पहिला मान देण्यात आला आहे. या आखाड्यांचा मिळून एक मुख्य महंत असतो. हा महंत आखाड्याच्या प्रमुखाचे काम पार पाडत असतो. घरामध्ये वडील माणसाची जी भूमिका असते, तिच भूमिका महंत या नात्याने त्याला पार पाडावी लागते. मात्र, शाहीस्नानाच्या वेळी दोन महंतांचे संगनमत पहायला मिळाले. हा आखाडा आहे निर्वाणी अनि आखाडा. त्याला सध्या दोन मुख्य महंत लाभले आहेत.

प्रमुख आखाड्यांमध्ये अखिल भारतीय पंच रामानंद निर्वाणी अनि आखाड्याचा समावेश होतो. या आखाड्याच्या अंतर्गत अनेक खालसे आहेत. या आखाड्याला आतापर्यंत एकच मुख्य महंत होते परंतु महंत ग्यानदास महाराजांचा अध्यक्षपदाचा वाद सुरू झाला आणि आता आखाडा परिषदेचे अध्यक्षपद धोक्यात येतंय, आपल्याला स्नान करायलाही कदाचित मिळते की नाही अशी शंका महंत ग्यानदास यांना येऊ लागल्याने त्यांनी तत्काळ एक प्रेस घेत आपण अध्यक्ष म्हणून नाही तर निर्वाणी आखाड्याचे मुख्य महंत म्हणून शाहीस्नान करणार आहोत अशी भूमिका घेतली. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे आधीपासूनच मुख्य महंत पदावर विराजमान असलेल्या श्री महंत धरमदास महाराजांच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला. महंत ग्यानदास यांच्या वक्तव्यामुळे एका क्षणात त्यांचे महंतपद धोक्यात आले. कारण निर्वाणी अनि आखाड्याचे महंत म्हणून ग्यानदास महाराज स्नान करणार तर धरमदास महाराज कोणत्या अधिकाराने प्रथम स्नान करणार हा प्रश्न निर्माण झाला. मात्र हा जटील प्रश्न संगनमताने सोडवत शनिवारी शाहीस्नानाच्या दिवशी प्रथम रामकुंडावर आमगमन झालेले असतानाही

महंत ग्यानदास महाराज यांनी स्नान केले नाही. त्यांनी काही वेळ महंत धरमदास महाराज यांची वाट पाहिली. दहा मिनिटांनी धरमदास महाराज आल्यावर त्यांना जवळ बोलावून घेत, त्यांना बरोबर घेऊन ग्यानदास महाराजांनी शाहीस्नान करण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे या कोणत्याही गोष्टीवर अद्याप एकाही आखाड्याने आक्षेप घेतलेला नाही. एका आखाड्याचा एक महंत असतो व त्या नात्याने तो कारभार पहात असतो. ग्यानदास महाराज निर्वाणी आखाड्याचे श्री महंत आहे तर मग धरमदास महाराज आतापर्यंत कोणत्या अधिकाराने काम सांभाळत होते असाही प्रश्न पडतोच. त्यामुळे सद्या निर्वाणी आखाड्याला दोन मुख्य महंत लाभले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी तोडली बॅरिकेड्स

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पोलिसांच्या दंडेलशाहीचा सर्वाधिक फटका नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दाखल झालेल्या भाविकांना बसला. या भाविकांना स्नानासाठी पोलिसांनी सक्तीने दसक घाटावरच उतरवले. यातून काही भाविकांचे जथ्थे व पोलिसांदरम्यान शाब्दिक चकमकी उडाल्या. जेलरोडवर दसक गावाजवळ शेकडो भाविकांनी पोलिसांची बॅरिकेड्स तोडून रामकुंडाच्या दिशेने प्रयाण केले.

स्टेशनवरून जेलरोडने येणाऱ्या भाविकांनी दसक घाटावरच स्नान करावे, असे नियोजन पोलिसांनी आधीच केलेले होते. त्यानुसार भाविकांना तेथील घाटावर पाठविले जात होते. मात्र, हजारो भाविकांना रामकुंडावरच स्नान करायचे होते. तसा आग्रह ते पोलिसांकडे करीत होते. दुपारी बारानंतर भाविकांचे जथ्थे वाढल्यानंतर पोलिस व भाविकांच्या शाब्दिक चकमकी वाढू लागल्या. काही भाविकांनी जोरदार आरडाओरडा करीत जोर लावून पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स जमिनीवर आडवी केली. या झटापटीत काही लोक खाली पडले.

सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नाही. काही भाविकांच्या सामानाच्या पिशव्याही जमिनीवर पडल्या. या वेळी काही पोलिसांनी लाठ्या उगारत बळाचा वापर करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, भाविकांचा संताप व आक्रमकपणा पाहून त्यांना त्यांनी सरळ बॅरिकेड्स बाजूला केले व भाविकांचे लोंढे नाशिकच्या रामघाटांच्या दिशेने मार्गस्थ झाले. हे जथ्थे पुढे गेल्यानंतर पोलिसांनी पुन्हा बॅरिकेड्स लावून घेतली.

पहाटेपासूनच दसक घाटावर गर्दी

जेलरोडच्या दसक घाटावर भाविकांनी पहाटे पाचपासून गर्दी केली होती. सकाळी नऊपर्यंत सुमारे ३० हजार भाविकांनी स्नान केले. रेल्वे स्थानकात जशा जशा रेल्वेगाड्या भरून येत होत्या तस तशी गोदा घाटावर गर्दी वाढतच होती. सात-आठ किलोमीटरची पायपीट करुन आलेल्या भाविकांना रामकुंड आणि साधू कोठेच न दिसल्याने त्यांनी रामकुंडावर जाण्याचा हट्ट धरत होते. या भाविकांनी दसक घाटावरच स्नान करावे, असा पोलिसांचा अट्टाहास सुरू होता. त्यामुळे अनेकदा पोलिस-भाविक वादही झाले. अकरानंतर भाविकांची गर्दी कमी झाली. भाविकांना बिटको चौकातून कन्नमावर पुलावरील लक्ष्मीनारायण घाटावर जाण्यास परवानगी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन जिंकले; भाविक हरले!

0
0

सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांनी राखले अंतर

vinod.patil @timesgroup.com

नाशिक : एक तपाच्या प्रतीक्षेनंतर नजरेत येणारा साधू-महंतांच्या शाहीस्नानाचा अनोखा सोहळा नेत्रात साठवण्यासाठी गोदाकाठच्या चहूबाजूला जगभरातील भाविक नाशिकच्या कुंभमेळ्यात येतात. मात्र, गत कुंभमेळ्यात आलेल्या कटू अनुभवांमुळे ताकही फुंकून पिण्याच्या पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे या कुंभमेळ्यातील सुर्वण क्षण याचि देही याचि डोळा पाहता आला नाही.

सुरक्षेचा अतिरेक करीत, भाविकांना १० ते १५ किलोमीटर अंतरावरच रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला. नाशिकसह राज्यभरातील भाविकांनी या पर्वणीपासून अंतर राखले. एवढे अंतर पायी चालण्यापेक्षा कुंभमेळ्यात जायला नको, असा पवित्रा घेतल्याने एक दिवस आधीच संचारबंदी लागू करण्याची घोषणा केलेल्या प्रशासनाला रात्री बारा वाजेपर्यंत काय करायचे हेच सुचत नव्हते. शहराबाहेरील पार्किंगवर तुरळक वाहनेच रात्री दाखल झाली. त्यामुळे आपल्या अतिरेकाची जाणीव पोलिसांना रात्रीच झाली होती. मात्र, भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करीत, केवळ सुरक्षेलाच प्राधान्य पोलिसांनी दिल्याने पर्वणीचा पूर्ण फियास्कोच झाला. गर्दी होणार नसल्याचा अंदाज आला असतांनाही सकाळी भाविकांना रामकुंडापासून दूर ठेवले. त्यामुळे भाविकांनी आपला मोर्चा त्र्यंबकेश्वरकडे वळवला.

त्यामुळे घाटांवर भाविकांची प्रतीक्षा पहायला मिळाली. शाही स्नानानंतरही गर्दी उसळेल, असा प्रशासनाचा अंदाजही फोल ठरला. साधुग्राममध्ये रात्रीच डेरेदाखल असलेल्या उत्तर भारतीयांनी शाही स्नानानंतर रामकुंडावर पुन्हा गर्दी केल्याने पोलिस आणि प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुपारनंतर भाविकांनी रामकुंड काही प्रमाणात गर्दी केली असली तरी त्यात फारसा उत्साह नव्हता. दिवसभरात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांचा कसाबसा सात लाखापर्यंत पोहचल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने कुठे ८० लाख व कुठे सात लाख असा सवाल आता विचारला जात आहेत. इतर घाटांवर भाविकांना पिटाळल्याने त्याचा साधू- महंताच्या उपस्थितीवर परिणाम झाला. शाही स्नानाला चार ते पाच लाख साधू येतील हा अंदाजही खोटा ठरवत रामुकंडावर तीनही आखाड्यांचे मिळून साधू महंतांची संख्या दहा ते पंधरा हजाराच्या पुढे गेली नाही. विशेष म्हणजे रामकुंडावर केवळ साधू मंहतांनाच प्रवेश असतांना चक्क आखाडा आणि खालशांमध्ये महिलांचा समावेश धक्कादायक होता. एरवी महिलांपासून चार हात दूर राहणारे साधू महंत नाईलाजाने महिलांच्या उपस्थितीत स्नान करत होते.

तीन आखाड्यांचेही नियोजन कोलमडले

भाविकांना रामकुंडावर येण्यापासून रोखल्यानंतरही केवळ साधूंच्या स्नानांचेही नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आले. सर्वांत आधी निर्वाणी आखाड्याचा स्नानाचा मान असतांनाही त्यापूर्वीच काही साधूंनी रामकुंडात डुबकी मारत शाही स्नान केले. निर्वाणीचे साधू मंहत असल्याचे समजून प्रशासनानेही त्यांना मदत केली. मात्र, चूक लक्षात येताच पोलिसांनी या साधूंना पिटाळले. त्यामुळे निर्वाणीचा मानही हिरावला.पहिले स्नान पंधरा मिनीटे उशीरा सुरू झाले.त्यावरून इतर आखाड्यांमध्ये वादविवाद सुरू झाले.

सुरक्षेचा अतिरेक करीत पोलिसांनी हा कुंभमेळाच पॅनिक केला. जळस्थळी अडवणूक केल्याने भाविक लांबच राहिले. एवढी भिती वाटत होती तर या वर्षी कुंभमेळा नाही अशी घोषणा सरकारने करायला हवी होती. हा कुंभमेळा कर्फ्यूत पार पडला. - छगन भुजबळ, माजी मंत्री

पोलिसांचा अतिरेक झाल्याने भाविकांनी पाठ फिरवली. भाविकांची अडवणूक करण्यात आली. आमच्या चुकीमुळेच गर्दी होवू शकली नाही. त्यामुळे पुढील काळातील उर्वरित पर्वण्यांचे फेरनियोजन करण्यात येईल. - गिरीश महाजन, पालकमंत्री

शाहीस्नानाचा सोहळा पाण्यासाठी आम्ही काल रात्रीपासूनच नाशिकमध्ये दाखल झालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला रामकुंडापर्यंत येवूच दिले नाही. त्यामुळे शाहीस्नानाचा हा सुवर्णक्षण आम्हाला अनुभवता आला नाही. - सुशांत सिंह, भाविक, इंदूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् काळजाचा चुकला ठोका...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारा वर्षापूर्वी सिंहस्थात नाण्यांची उधळण झाल्याने ते गोळा करण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ३० जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती शनिवारी निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. निर्वाणी आखाड्याच्या महंतांकडून नोटांची उधळण करण्यात आल्याने ते गोळा करण्यासाठी लोकांनी एकच धावपळ केली. हे चित्र पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

प्रत्येक आखाड्यापुढे मैदानी खेळांचे प्रदर्शन करण्यात येते. त्यात भाले, दांडपट्टे, तलवारी, लाठ्याकाठ्यांचा समावेश होता. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्वाणी आखाड्याच्या साधू-महंतांकडून नोटांची उधळण करण्यात आली. नगणेशवाडी येथे आखाड्यांसोबत असलेल्या महंताने आपल्या बॅगमधून १० रुपयाचा बंडल काढून या नोटा हवेत भिरकावल्या. नोटा तघेण्यासाठी जमाव पळताच काही वेळाने याच साधूने पुन्हा दहा रुपयांचा एक बंडल हवेत भिरकावला. त्यामुळे पुन्हा लोकांनी गर्दी केली. गणेशवाडीत ज्या ठिकाणी नोटांची उधळण करण्यात आली, त्या ठिकाणी उतार आहे. याच उतारावर लनोटा गोळा करताना एखादी व्यक्ती पडली असती तर मागील लोक एकमेकांवर पडले असते. मात्र, नोटा उध‍ळतेवेळी लोक एका जागी उभे असल्याने थोडक्यात दुर्घटना टळली. मिरवणुकीतील महंतांकडून सातत्याने गळ्यातील हार भाविकांवर फेकण्यात येत होते. वाहनांवरून सातत्याने काहीना काही फेकण्याचे प्रकार सुरुच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळेचं गणित चुकलं...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी आखाड्यांना देण्यात आलेली वेळ, क्रम आणि शाही मिरवणुकीसाठीचा मार्ग पोलिस प्रशासनाने जाहीर केला होता. परंतु, निर्वाणीच्या पेशवाईला वेळ झाल्यामुळे पुढील वेळ वाढत गेला. त्यामुळे दिगंबर आखाड्याला गणेशवाडी परीसरात काही काळ थांबवून ठेवण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शाही मिरवणुकांना लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू झाली. प्रत्येक आखाड्याला शाहीस्नानासाठी तीस मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. सर्व आखाड्यांचे शाहीस्नान सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजनही प्रशासनाने केलेले होते. त्याबरहुकूम ९ वाजून ४५ मिनिटांनी सर्व आखाड्यांचे स्नान आटोपण्यात आले. निर्वाणी आखाड्याची वाट पहात असताना पंचवीस तीस साधुंचा एक जथ्था रामकुंडाच्या दिशेने धावत आला व त्याने सर्व आखाड्यांच्या आधी स्नान करण्याचे साधून घेतले. ते कोण होते हे कळायच्या आतच निर्वाणी आखाड्याचे साधू कुंडाच्या जवळ आल्याने दोघांचेही संमिश्र स्नाननाट्य काही काळ चांगलेच रंगले. निर्वाणी आखाड्याच्या श्री महंत ग्यानदास महाराजांनी रूद्रावतार दाखवताच त्या साधुंना कुंडातून बाहेर काढण्यात आले. शाहीस्नानाच्या वेळी किरकोळ वाद वगळता

सर्व आखाड्यांचे स्नान बिनधोक पार पडले. मात्र प्रशासनाचा गर्दीचा अंदाज साफ चुकला. ६० लाख ते १ कोटी भाविक येणार अशी अपेक्षा प्रशासनाला असल्याने त्यापध्दतीने सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु, तिचा फियास्को झाला. पोलिस प्रशासनाच्या अतिरेकी दक्षतेचा फटका बसल्याची चर्चा भाविकांमध्ये जोर धरताना दिसत होती. त्यातच रक्षाबंधन हा मोठा सण आल्याने त्याचाही परिणाम सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीवर झाला. गेल्या सिंहस्थामध्ये सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. राजमुंद्री, बिहार येथील चेंगराचेंगरीच्या घटना ताज्या असतानाच नाशिकमधील सिंहस्थ मात्र अतिशय सुरळीत पार पडला. कोठेही अप्रिय घटना घडली नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तणावाने गाजली मिरवणूक

0
0

शाही मार्गावर आखाड्यांची चढाओढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही मिरवणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या निर्मोही आखाड्याची मिरवणूक सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास सुरू झाली. मात्र, मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या शाही मिरवणुकीमध्ये मानपमान नाट्य रंगले. दिगंबर आखाडा आणि निर्मोही आखाडा यामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे निर्मोही आखाड्याची मिरवणूक ठरल्या वेळेपेक्षा उशिराने रामकुंडावर पोहोचली.

निर्मोही आखाड्याची सकाळी सात वाजता मिरवणूक निघण्याची वेळ ठरलेली होती. मात्र, दिगंबर आखाड्यातील जवळपास पंधरा आखाडे उशिराने मिरवणुकीत दाखल झाल्याने प्रथम कोण जाणार यावरून वादाची परिस्थती निर्माण झाली होती. पोलिसांना ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मिरवणूक थांबवावी लागली. दिगंबर आखाड्याची मिरवणूक हळूहळू पुढे सरकत असल्याने वेळोवेळी निर्मोही आखाड्याची मिरवणूकही नियोजित वेळेत रामकुंडावर पोहोचू शकली नाही.

निर्मोही आखाड्याच्या मिरवणुकीत सर्वप्रथम आखाड्याचे निशाण, खिलाडी, इष्टदेवता हनुमान यांचे पूजन करून वाजतगाजत मिरवणूक रामकुंडाच्या दिशेने निघाली. या भव्यदिव्य मिरवणुकीच्या अग्रस्थानी दोन उंट होते. यामध्ये एका उंटावर सांकेतिक ध्वज आणि एका उंटावर नगारे वाजविण्यात येत होते. या दोन्हीच्या मागे बँड लावण्यात आला होता. निर्मोही आखाड्याचे अकरा महामंडलेश्वर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ६४ खालशांचाही यामध्ये सहभाग होता. महामंडलेश्वर जगदीशदास, ब्रजेंद्रदास, रामपल्लीदास, भरतदास, रामेश्वरदास, रामजीदास आणि आखाड्याचे महासचिव रामजीदास हे यामध्ये सहभागी झाले होते. चतुःसंप्रदायचे श्यामलदास यांनीही यामध्ये नेतृत्व केले. या मिरवणुकीत आखाड्याचा सफेद ध्वज सोबत होता. मिरवणुकीमध्ये कृपण, तलवार, भाला, चक्र यांचे प्रात्यक्षिक यांचे सादरीकरण करण्यात आले.

आम्ही वेळ पाळली

दिगंबरदास आखाड्याचे काही खालसे मिरवणुकीत मागे पडल्याने निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांच्या खालशांपैकी कोण पुढे जाणार यावरून तणाव निर्माण झाला होता. यावेळी निर्मोही आखाड्याचे महासचिव श्यामसुंदरदासजी संतापले. ते म्हणाले, की दोन मिरवणुकींमधील अंतर साधारण दोशने मीटरइतके असायला हवे. मात्र, पोलिस प्रशासन आम्हाला यासाठी सहकार्य करत नाही. तसेच, मिरवणूक निघण्याची आमची वेळ आम्ही पाळली आहे. दिगंबर आखाड्याने मात्र नियोजित वेळ पाळली नाही. याचा तोटा आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

साधूंचा उद्रेक

थोडे अंतर पार केल्यावर मिरवणूक थांबवावी लागत होती. तसेच, दिंगबर आखाड्याचे मागे राहिलेले साधू पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने साधूंचा संयम ढासळत चालला होता. यासाठी गौरी पटांगणावर येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, साधूंनी पोलिसांची सूचना न पाळता बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. धावत आलेल्या सांधूमुळे रामघाटावरही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एक खालसा गेला स्नानाविना

निर्वाणी आखाड्याची वेळ संपून गेल्यानंतरही त्यांचे स्नान सुरू असल्याने दिगंबर आखाड्याला स्नानासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली मात्र प्रत्यक्षात सर्वात पुढील खालसा स्नानासाठी आला असता तेथे काही जणांची हातापायी झाल्याने हा खालसा स्नान न करताच माघारी फिरला. दिगंबर आखाड्यातील हा खालसा जेव्हा स्नानासाठी आला तेव्हा तेथे असलेल्या काही आडदांड साधूंनी वाटेत येणारांना मारायला सुरूवात केली व तो प्रकार पाहून खालशाचा प्रमुख काही न बोलता तेथून स्नान करताच माघारी फिरला. त्याच्यासोबत त्याचे शिष्यही परत माघारी फिरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाकडून सोहळा हायजॅक!

0
0

देशासह संपूर्ण जगाचे आकर्षणाचा केंद्र ठरलेला आणि उत्सुकता लागून असलेल्या नाशिक कुंभमेळ्याचा सुरक्षेच्या अतिरेकामुळे पहिल्याच पर्वणीत फियास्को झाला. ८० लाख भाविकांच्या आगमनाचा अंदाज वर्तविणारे प्रशासन रामकुंडावर साधू-महंतासह भाविकांची प्रतीक्षा करताना दिसले. दुपारनंतर उत्तर भारतीय भाविकांनी काही प्रमाणात प्रतिसाद दिल्याने नाशिक त्र्यंबकेश्वरला भाविकांची संख्या पाच लांखाच्यावर गेल्याचे चित्र होते. पोलिस व प्रशासनाच्या अतिरेकामुळे कुंभमेळ्याचे आर्थिक चक्रही विस्कटल्याने प्रशासन जिंकले आणि भाविक हरले असेच चित्र रंगले. फसलेल्या नियोजनामुळे आमची चूक झाल्याची कबुली पालकमंत्र्यांनी दिली. पुढील पर्वण्यांसाठी फेरनियोजन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

खापर पोलिस आयुक्तांवर?

गतवेळीच्या चेंगराचेंगरी प्रमाणेच या पर्वणीच्या अपयशाचे खापरही पोलिस आणि प्रशासन एकमेकांवर फोडतांना दिसले. गर्दी आली नसल्याने पोलिसांचा अतिरेक असल्याचे सांगून प्रशासन नामनिराळे झाले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी रामकुंडावरच पोलिस आयुक्त डॉ. जगन्नाथन यांची झाडाझडती घेतली. यावेळी पालकमंत्री महाजन आणि पोलीस आयुक्तांमध्ये बराच वेळ खडाजंगी झाली. त्यामुळे या अपयशाचा बळी पोल‌सि आयुक्तांनाच ठरवण्याची तयारी सरकारनेही सुरू केल्याचे समजते. सायंकाळी उशिरा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी रमणी आयोगाचा दाखल देत प्रशासनाने उत्तम नियोजन केल्याचा दावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणी निर्विघ्न

0
0

नाशिक, त्र्यंबकनगरीत गोदातीरी रंगला शाही सोहळा

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली तीर्थक्षेत्र नाशिक व त्र्यंबकनगरीत गोदातीरी कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी शनिवारी निर्विघ्नपणे पार पडली. अतिशय मंगलमय वातावरणात झालेला हा सोहळा डोळ्यांची पारणे फेडणार ठरला खरा; पण भाविकांच्या अपेक्षित गर्दीचं कोंदण लाभू न शकल्यानं पोलिस-प्रशासन तसेच नाशिककरांनाही तो तितका भावलाच नाही. पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या अतिकठोर नियोजनामुळे दोन्ही शहरांत मिळून जेमतेम सात-साडेसात लाख भाविकांनी गोदावरीत स्नान केले. शेकडो कोटी रुपये खर्चून गोदाकाठी आयोजिलेल्या लोकोत्सवात भाविकांचा पूर न आल्याने प्रशासकीय यंत्रणेचे पुरते हसू झाले.

नाशिकमधील तीनही आखाड्यांच्या मिरवणुका शाही सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या. श्रीमंतीचा नजराणा घेऊन आलेल्या या मिरवणुका पेशवाईचे प्रदर्शन करीत एकामागे एक रामकुंडावर येऊन थडकल्या. साधूंचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. वैष्णवांमधील शुचित्व व सत्वगुणांचा पुरेपूर महिमा मुखावर झळकवणारे साधू आधीच तेजाने तळपत होते. निर्वाणी आखाड्याने आधी रामकुंडात स्नान केले. त्यानंतर त्यांच्या मुखमंडलावरील तेज शतपटीने वाढले.

मोठ्या दिमाखात मिरवत आणलेले निशाण निर्वाणी, दिगंबर व निर्मोही या क्रमाने रामकुंडाच्या दिशेने करीत त्यावर रामकुंडाचे तीर्थ शिंपडण्यात आले. प्रथम ७ वाजून १५ मिनिटांनी निर्वाणी आखाड्याचे रामकुंडावर आगमन झाले. श्री महंत ग्यानदास महाराज यांचे आगमन झाल्यावर काही काळाने श्री महंत धरमदास महाराज यांचे आगमन झाले. पायऱ्यांवरून गंगा-गोदावरी माता मंदिराकडे आल्यावर दोन्ही महाराजांना त्यांच्या शिष्यांनी स्नान घातले. त्यानंतर ८ वाजून ३ मिनिटांनी दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास महाराज यांचे रामकुंडावर आगमन झाले. त्यांनाही शिष्यांनी स्नान घातल्यानंतर काही वेळातच ९ वाजून १५ मिनिटांनी निर्मोही आखाड्याचे रामकुंडावर आगमन झाले. चित्तथरारक कसरती दाखवत व तलवारी परजतच आखाड्यांच्या साधूंनी राजेंद्रदास महाराज यांना रामकुंडावर आणले. गुरूंच्या चरणांवर रामकुंडाचे पवित्र तीर्थ शिंपून या स्नानाची सुरूवात करण्यात आली. चारही महंतांना स्नान घालताना सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, कपालेश्वर भगवान की जय, सब संतन की जय, भारत माता की जय असे जयजयकार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिरसात न्हाली त्र्यंबकनगरी!

0
0

वरुणराजाच्या साक्षीने दहा आखाड्यांसह लाखो भाविकांचे कुशार्वतात स्नान

त्र्यंबकेश्वर : साधू-महंतांच्या स्वागतासाठी सडा रांगोळ्यांनी नटलेले कुशावर्ताचे प्रांगण, हर हर गंगे, हर हर महादेव, बमबम भोले असा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष करीत इष्टदेवतांसह आलेले साधू... अचूक वेळ साधत त्यांनी कुशावर्तात मारलेली डुबकी अन् या परमोच्च भक्तीसोहळ्यात त्यांची ब्रम्हानंदी लागलेली टाळी अशा मंतरलेल्या वातावरणात पहिल्या शाही पर्वणीचा सोहळा त्र्यंबकराजाच्या दरबारी निर्विघ्न पार पडला. अनुचित प्रकार टाळल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला खरा मात्र ढिसाळ नियोजनामुळे त्र्यंबकनगरीत आलेल्या उण्यापुऱ्या भाविकांनाही मनस्तापच अधिक सहन करावा लागला.

कुशावर्तामधील स्नानाची पर्वणी म्हणजे साधूंसाठी साक्षात अमृताचा अन् अमरत्वाचा साक्षात्कारच. तब्बल बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो सोनियाचा दिनु शनिवारी उगविला. त्याच्या पूर्वसंध्येलाच त्र्यंबकनगरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. कुशावर्ताचे प्रांगणही लख्ख करण्यात आले. देशविदेशातील तपस्वी महंत शाहीस्नानासाठी कुशावर्तावर येणार असल्याने हा सोहळा नेत्रांमध्ये साठविण्यासाठी अबालवृध्द रात्रभर न जागतील तरच नवल. कुशावर्तापर्यंत येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याने भाविकांना एक ते दीड किलोमीटरचा फेरा मारून मंदिर आणि कुशावर्तापर्यंत पोहोचावे लागत होते. पासधारकांशिवाय कुणीही कुशावर्ताच्या परिसरात येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश वरिष्ठांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दिले होते. त्याचे पालन पोलिसांकडून केले जात होते. पहाटे अडीचच्या सुमारास शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी कुशावर्तावर पोहचून स्नान केले. पालकमंत्री गिरीष महाजन पहाटेपासूनच कुशावर्तावर तळ ठोकून होते. पहाटे सव्वा चारच्या सुमारास पंचदशनाम जुना आखाडा कुशावर्तावर पोहोचला. आखाड्याची इष्टदेवता श्री दत्तात्रयांची पूजा होताच साधूंनी कुशावर्तामध्ये स्वत:ला झोकून दिले. पाठोपाठ आवाहन आखाडा आणि पंचायती अनी आखाड्यातील साधूंनीही हर हर महादेवचा जयघोष करीत कुशावर्तामध्ये स्नान केले. त्यांनीही आपल्या इष्टदेवतांचे पूजन केले. पहाटे पाचच्या सुमारास पंचायती निरंजनी आखाडा आणि पंचायती आनंद आखाड्याचे शाहीस्नान आटोपले. त्यांनी अनुक्रमे कार्तिक स्वामी आणि सूर्यदेवाच्या पूजन केले. डीजेच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे यंदाच्या शाही पर्वणीचे वैशिष्ट्य ठरले.



रात्री अडीच वाजता नागा साधूंची पूजा

शाहीस्नानाचा दुसरा मान आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज व षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आखाड्याला मिळाला. स्वामी समर्थ केंद्र मार्गावरील या दोन्ही आखाड्यांची शाही मिरवणूक एकाचवेळी काढली. आनंद आखाड्यातही रात्री अडीच वाजता नागा साधूंची पूजा झाली. महानिर्वाणी आखाड्याने कपिलमुनी तर अटल आखाड्याने गणपतीची पूजा करीत शाही मिरवणुकीला सुरुवात केली. या तिन्ही आखाड्यानंतर सकाळी साडेसातला बडा उदासीन व साडेनऊला नया उदासीन आखाड्याची मिरवणूक काढण्यात आली. आपापल्या इष्टदेवतांची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.

जुना आखाड्याला मान

सर्वप्रथम जुना आखाडा, आवाहन आखाडा व पंचअग्नी आखाडा यांच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. आचार्यांनी व पुरोहितांनी इष्टदेवतांची पूजा केल्यानंतर पिंपळद येथून जुना आखाड्याची शाही मिरवणूक निघाली. तत्पूर्वी आवाहन आखाड्याने आपली शाही मिरवणूक सुरू केली होती. जुना आखाडा आल्यानंतर आवाहन आखाडा व पुढे पंचअग्नी आखाड्याचे नागा साधू, आचार्य, महामंडलेश्वर, महंत, सचिव तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी कुशावर्ताकडे मार्गक्रमण केल्याने शाहीमार्ग साधूंच्या गर्दीने फुलून गेला होता.

पोलिसांचे कौशल्य

पंचायती आनंद आखाडा कुशावर्ताकडे निघाला असताना काही साधू आणि त्यांच्यासमवेत मोठ्या संख्येने भाविकांनी मिरवणुकीत घुसण्याचा प्रयत्न केला. या गर्दीला नियंत्रित करणे रॅपिड अॅक्शन फोर्स आणि इतर पोलिसांनाही शक्य होत नसल्याने तेथे चेंगराचेंगरीसारखा प्रकार घडण्याची शक्यता बळावली. सकाळी पावणे नऊ ते नऊच्या सुमारास पंचायती बडा उदासीन आखाडा विरुध्द दिशेने कुशावर्त परिसरात

आला. त्यावेळी तेथे उपस्थित साधू तसेच भाविकांना बाहेर पडण्यास जागा न मिळाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांनी ही प‌रिस्थिती कौशल्याने हाताळली.

राजकीय पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक

कुशावर्तावरील अपुरी जागा लक्षात घेता प्रशासनाने मर्यादीत लोकांनाच प्रवेश देण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, तरीही राजकीय पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांना न जुमानता कुशावर्तावर प्रवेश ‌मिळविला. अनेकजण तर आम्ही पालकमंत्र्यांसमवेत आहोत, असे सांगून पोलिसांना गप्प करीत होते. अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करणारे अनेक पदाधिकारी बराचवेळ कुशावर्तावर ठाण मांडून होते. त्यापैकी काहींनी कुशावर्तामध्ये पाय ओले करून घेतले.

पालकमंत्र्यांनी दिली कबुली

त्र्यंबकेश्वरमधील नागरिक शाही मिरवणूक पाहण्यासाठी त्यांच्या घराबाहेर बसून होते. मात्र पोलिसांनी त्यांना तसे करण्यास मज्जाव केला. नागरिकांनी आपल्या घरांमध्ये बसावे असे पोलिसांकडून सांगितले जात होते. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तक्रार केली. पोलिसांकडून अतिरेक होत असल्यास आपण त्यांना सूचना करू असे त्यांना सांगण्यात आले.



परदेशी फोटोग्राफरशी बाचाबाची

माध्यम प्रतिनिधींसाठी कुशावर्तावर उभारलेले स्टेज खुपच तोकडे होते. तेथे काही परदेशी फोटोग्राफरने जागा पटकावली होती. या फोटोग्राफरचा स्थानिक प्रतिनिधींशी वाद झाला. एका महिला फोटोग्राफरला या परदेशी फोटोग्राफरने धक्का दिला. त्यामुळे स्थानिक फोटोग्राफर आक्रमक झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

पोलिस अधिकाऱ्यांचे साधू-भाविकांशी वाद

कुशावर्त परिसरात गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलिस अधिकारी अधिक कठोरपणे वागत असल्याचा अनुभव भाविक तसेच साधू-महंतही घेत होते. साधूंच्या परतीच्या मार्गावरून एका भाविकाने कुशावर्ताकडे स्नानासाठी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांनी त्याला रोखले. तरीही त्याने जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला जबरदस्तीने बाजूला करण्यात आले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिर कभी नासिक नही आऊंगी!

0
0

बंदोबस्ताला कंटाळलेल्या यशोदाबेनचे उद्‍गार

bhavesh.brahmankar

@timesgroup.com

नाशिक ः 'सिंहस्थ स्नान के लिए मैं द्वारका से आयी हूं, लेकीन यहाँ की पुलिसका बर्ताव और व्यवस्था देखकर मुझे बहुत बुरा लगा, मैं अब कभी नासिक कुंभ को नही आऊंगी, यही नही नासिक को मत जाओ यही मैं सभीको बताऊंगी', हे उद्व‌िग्न उद्‍गार आहेत द्वारका येथून आलेल्या यशोदाबेन यांचे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दर्जेदार सुविधा, सर्वोत्तम प्रतिसाद असे वारंवार बजावणाऱ्या प्रशासनाचे पितळ शनिवारी उघडे पडले. शाही पर्वणीच्या काळात तीन दिवस नाशिक बंद असल्याचा मोठा प्रचार, प्रसार देशभर झाल्याने भाविकांनी कुंभमेळ्याकडे अक्षरशः पाठ फिरविली. शनिवारी जे काही भाविक आले, त्यांच्यातही समाधानाचे वातावरण नव्हते. रामकुंडासह नाशिक शहरात स्वच्छता राखली जात असली तरी रामकुंड तसेच गोदाघाटाच्या ठिकाणी येण्यासाठी भाविकांना प्रचंड हाल सहन करावे लागले. यशोदाबेन या शाही पर्वणीसाठी शक्रवारीच नाशकात आल्या होत्या. साधुग्राममध्ये रात्रभर थांबून त्या शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रामकुंडाकडे निघाल्या. पण, यावेळी त्यांना ठिकठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांची अरेरावी आणि पायपीट या दोन्ही बाबींमुळे त्यांचा चेहरा पडला होता. आपल्या वाट्याला आलेले हाल इतर कुणाला भोगावे लागू नये म्हणून त्यांनी 'नाशिकला जावू नका' असा प्रचार करण्याची खूणगाठच मनाशी बांधली आहे. प्रशासकीय अडचणी आणि अवाजबी बंदोबस्त यामुळे नाशिकचे नाव देशभरात बदनाम होणार असल्याचे दिसून येत आहे.

पत्त्यांचा डाव

महामार्ग बसस्थानकावर प्रवाशांअभावी एसटी बसेस उभ्याच होत्या. बराच वेळ प्रवाशी येत नसल्याने यातील अनेक बसचालकांनी कंटाळून अखेर पत्त्यांचा डाव मांडून वेळ घालविला.

भाविकांनाही अटकाव

रामकुंड परिसरात स्नानासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी नसताना पोलिसांकडून ठिकठिकाणी भाविकाची अडवणूक केली जात होती. सर्व आखाड्यांमधील साधू, महंतांचे स्नान झाल्यानंतरही रामकुंड तसेच

गोदाघाटावर जाणाऱ्या भाविकांना शाही मार्गासह ठिकठिकाणी अडविल्याचे पहायला मिळाले. रामकुंडासह ठिकठिकाणी तात्पुरत्या टॉयलेटसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, पाणी उपलब्ध असूनही भाविकांकडून त्याचा वापर केला जात नसल्याने टॉयलेटस‍् घाणेरडी बनले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

लष्करातील प्रशिक्षित जवानांसाठी युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना सरावासाठी लष्कराने भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव व गंभीरवाडी येथील जमीन संपादनासाठी ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी भूसंपादनास स्पष्टपणे नकार दिला असून, आमदार राजाभाऊ वाजे यांनी या गावात जाऊन जनतेची मने जाणून घेतली. ग्रामस्थांचा विरोध पाहता खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सरंक्षण मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असा दिलासा आमदार वाजे यांनी दिला.

तीन वर्षापूर्वी असा प्रस्ताव पुढे आला होता. तेव्हाही विरोध होऊन तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ प्रस्तावास स्थगिती आणली होती. मात्र, भूमी अधिग्रहण कायदा देशात चर्चेला जात असतानाच या प्रस्तावाने पुन्हा डोके वर काढले आहे. ही तिन्ही गावे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील असल्याने नवीन कायद्याने ग्रामसभेची मंजुरी अत्यावश्यक आहे. या प्रस्तावामुळे या तिन्ही गावांना ग्रामसभा घेण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आधीच या गावांच्या जमिनी शासनाने अनेकविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत. त्यात अनेक आदिवासी शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शेतीलायक उर्वरित जमिनीपैकी ३ गावांतील २२९ हेक्टर बागायती जमीन लष्कराच्या प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून संपादन करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रक्त सांडले तरी चालेल पण आमच्या तीन गावांतील एक इंच जमीन संपादन करू देणार नसल्याची भूमिका या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांनी घेतली आहे. बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, गंभीरवाडी या ग्रामस्थांनी शासनाचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. या तिन्ही गावचे ग्रामस्थ संघटित झाले असून, शासनाचा हा डाव हाणून पाडू, अशी भूमिका घेतली आहे.

देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरसाठी युद्धाभ्यास करण्यासाठी मैदानी गोळीबार आणि तोफखाना सरावासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात बेलगांव तऱ्हाळे, धामणगाव, गंभीरवाडी या तीन गावांतील २२९ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित

करण्याचे प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात काही लगतच्या

गावांमध्ये आवश्यकतेनुसार संपादन करण्यात येणार असल्याचे समजते. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. त्यानुसार संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सराव सुरू

बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, गंभीरवाडी या शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराकडून या भागातील जमीन संपादित न करता दरमहा कायमस्वरूपी युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना सराव केला जात आहे. या सरावाला या भागातून कोणताही विरोध नाही. मात्र, या सरावासाठी कायमस्वरूपी जमीन संपादित करण्यास मात्र या परिसरातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे.

शासनाने यापूर्वीही विविध प्रकल्पांसाठी या भागातील सोन्यासारख्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी करून संपादन केल्या. स्थानिक शेतकरी भूमिहीन झाला असून, ज्या शेतक-यांकडे तुरळक जमिनी आहेत त्यावरही शासनाचा डोळा आहे. यापुढे इंचभरही जमीन शासनाला संपादित करू देणार नाही. - पांडूरंग वारुंगसे, पंचायत समिती उपसभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत आणि कांदा’ वर चित्रपट

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

कांदा फक्त भारतीय मीडियालाच भुरळ घालतो असे नाही तर परदेशातील मीडिया कांद्याच्या प्रेमात पडला आहे. भारतीयांना कांदा का इतका आवडतो याचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीवरून खास एक महिला पत्रकार पिंपळगाव बसवंत येथे आली होती. भारत आणि कांदा या विषयावर जर्मनीत चित्रपट तयार केला जाणार असून, सप्टेंबर अखेर चित्रीकरणासाठी खास टीम नाशिक जिल्ह्यात येणार आहे.

भारतातील कांद्याचे अर्थशास्‍त्र, कांद्यावरून होणारे राजकारण, स्वंयपाकघरात मिळालेले अनन्यसाधारण महत्त्व याबाबत परदेशात विशेषतः युरोपमधील नागरिकांना प्रचंड कुतूहल आहे. भारतीय जनतेला कांदा इतका का आवडतो याचे कारण शोधण्यासाठी तसेच कांद्याची लागवड ते विक्रीपर्यंतचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीतील महिला पत्रकार दोरोशिया रिकर ही पिंपळगाव बसवंत येथे आली होती.

कांद्याचे उत्पादन, बाजारपेठ, लिलाव प्रक्रिया, पॅकिंग, ग्राहकाची मानसिकता, बाजारभाव आदी बाबींचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी दोरोशिया रिकर यांनी पिंपळगाव बसवंत येथे भेट दिली. शेतकरी संघटनेचे नेते माधवराव खंडेराव मोरे व विश्वास माधवराव मोरे यांचा दोरोशिया रिकर यांच्याकडे थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी कांद्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यात झालेल्या आंदोलनांची माहिती घेतली. तसेच वाइन व द्राक्षशेतीबाबत माहिती जाणून घेतली.

बाजारपेठेतील लिलाव प्रक्रिया समजून घेतल्यानंतर रिकर यांनी चांदवड तालुक्यातील खडकजाम येथे प्रत्यक्ष कांदा लागवडीची पाहणी केली. यावेळी मोरे परिवारातर्फे त्यांना खास महाराष्ट्रीय जेवण तसेच सत्कारही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळाची छाया गडद

0
0

पिके मोजताहेत शेवटची घटका; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

टीम मटा

पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेती व्यवसाय व त्यावर आधारीत व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही तर कृषी सेवा केंद्रांचा व्यवसाय थंडावला आहे. पावसाअभावी पिके शेवटची घटका मोजत आहेत. दुष्काळाची छाया गडद झाली असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

पिंपळगावही कोरडेच

पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांनी धाडस करून लाल कांद्याची लागवड केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने कांदा करपू लागला आहे. चांदवड तालुक्यात विहिरीच्या थोड्याशा पाण्यावर वीस गुंठे, एकरभर कांदा लागवड केली आहे, पण पाऊस नाही पडला तर पीक येणे अशक्य आहे. पाऊस नसल्यामुळे यंदा चांदवड तालुक्यात कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. कांदा लागवड मंदावल्याने रोपे वाया जाण्याची भीती आहे. तसेच इतर पिकेही करपू लागली आहेत.

खते दुकाने पडली ओस

मनमाड : पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गाबरोबरच खतांची विक्री करणाऱ्या व्यावसायिक देखील हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्याने शेतीची अवस्था बिकट असून, शेतकरी खतांच्या दुकानांकडे फिरकत नसल्याने लाखो रुपयांची खते पडून आहेत.

मनमाड व परिसरातील खत दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या खतांचा साठा करून ठेवला. पावसाळ्यात एरवी जी खते मिळत नाही, अशा खतांचे दुर्भिक्ष्य असलेल्या खतांची ही मोठी बेगमी करून ठेवली. मात्र, पावसाअभावी शेतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खते दुकाने ओस पडली असून, लाखो रुपयांचा माल दुकानात पडून आहे. खत व्यावसायिक देखील हवालदिल झाले असून, दररोज साधी बोहणी सुद्धा होत नसल्याची खंत व्यक्त करीत आहेत. बहुतेक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने त्यांच्याकडची उधारी वसूल करणे अवघड असल्याने खत दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शेततळे रिकामे, डाळिंबावर तेल्या आणि सिंचनासाठी स्प्रिंकलर वापरल्याने खर्चात झालेली वाढ अशा अनेक कारणांमुळे शेतकरीवर्ग निराशेच्या गर्तेत असून, खतांचा उपयोग नसल्याने खतांच्या दुकानांकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.

सात दिवसाआड सटाण्यात पाणीपुरवठा

सटाणा : सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरींसह धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहराला तब्बल सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याने शहरवासींयामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शहरवासीयांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने वक्रदृष्टी केली आहे. परिणामी सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारी आरम व गिरणा नदी कोरडीठाक झाली आहे. केळझर धरणात २२ टक्के तर चणकापूर धरणात ४७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सदरचा पाणीसाठा आवर्तनाने सोडला तरीही तो सटाणा शहरापर्यंत पोहचू शकत नाही. यामुळे धरणातील पाण्याचा उपयोग नाही. नदी, नाले व विहिरी आटल्या आहेत. सटाणा शहराला दररोज सुमारे २२ लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर सद्यस्थितीत अवघ्या ३ लक्ष लिटर पाण्याची उपलब्धता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पालिका प्रशासनाची गैरसोय होत आहे. सटाणा शहरातील चार विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. बागलाण तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक आज, सोमवारी दु. १. वाजता पंचायत समितीच्या सभागृहात बागलााणचे आमदार दीपिका संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी दिली.

मनमाडमध्ये पाणी बचतीचे आवाहन

मनमाड शहराला पाणीटंचाईने ग्रासले असताना तसेच आवर्तनाचे पाणी अजून आठ दिवस तरी थेट नागरिकांपर्यंत पोहचण्याची शक्यता नसल्याने आता मनमाड बचाव कृती समितीतर्फे पाणी जपून व काट कसरीने वापरण्याचे मनमाडकरांना जनजागृती फेरीद्वारे आवाहन केले जात आहे. समितीतर्फे शहरातील विविध चौकात रिक्षातील ध्वनीक्षेपकाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळा, पाण्याचे महत्त्व जाणून घ्या यासह पाणी गाळून, उकळून प्या, असे नागरिकांना सांगून जागृती केली जात आहे. समितीचे पदाधिकारी अशोक परदेशी, भीमराज लोखंडे, मुमताज बेग, लिला राऊत आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला.

पावसाळा तोंडावर आलेला असताना संभाव्य मागणीचा आणि पावसाचा विचार करून आम्ही साठा केलेला यूरिया तसेच मिश्र खते पडून आहेत. खतांची आगाऊ रक्कम आधीच कंपनीला अदा केली आहे. त्यात माल परत घेण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने आर्थिक संकट येऊन खत दुकानदारांवर शेतकरी ग्राहकाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. ग्राहक आणि पाऊस दोघांचीही आम्ही वाट पाहत आहोत. - विनोद शर्मा, खत व्यावसायिक, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी तलावामध्ये उतरल्यास कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही पर्वणीसाठी रामकुंडावर येणाऱ्या भाविकांनी गांधी तलावात डुबकी मारली. यापैकी एका भाविकाचा हाकनाक बळी गेला असता. गांधी तलाव खोल असून याठिकाणी दुघर्टना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या शाही पर्वणी दरम्यान याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवून हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकांवर थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा, पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी दिला.

पहिल्या शाही पर्वणीत रामघाट परिसरात स्नानादरम्यान काही विपरित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गांधी तलावत देखील भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली. गांधी तलावात दिवसभरात दोन तरुणाचा जीव धोक्यात आला. तेथे हजर असलेल्या स्वयंसेवकांनी पाण्यात बुडत असणाऱ्या तरुणांना वाचवले. गांधी तलावात आंघोळ करणाऱ्यांमध्ये तरुण मुलांची विशेष गर्दी होती. अशावेळ उत्साही असणाऱ्यांना आटोक्यात आणणे कठीण होते. तसेच नदीला पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंदाज घेता येत नाही आणि अपघाताना निमंत्रण दिले आते. अशा कारणांमुळे गांधी तलाव जीवघेणा ठरू शकतो. स्थानिक तरुणांनी गर्दी केल्यामुळे भाविकसुध्दा खोल पाण्यात उतरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची घरवापसी सुरू

0
0

रामकुंडावर स्नान न झाल्याने नाराजीचा सूर

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या निमित्ताने देशाभरातून नाशिकमध्ये दाखल झालेल्या सुमारे २ लाख भाविकांनी रविवारी सकाळपासून आपापल्या घराकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली. आलेल्या ६० टक्के भाविकांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि एसटीद्वारे परतीचा मार्ग धरला.

ऐन राखीपौर्णिमा सणाच्या दिवशी आलेल्या पहिल्या शाहीपर्वणीला नाशिककरांनी विशेष साधण्यासाठी देशभरातून सुमारे सव्वा दोन लाख भाविक नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यातच अनेकांचे रक्षाबंधन साजरे झाले नसल्याने किमान पोळ्यापर्यंत आपला घरी पोहचण्यासाठी पर्वणीत आलेल्या भाविकांनी आग्रह धरला आहे. ऐन रामकुंडापर्यंत केवळ जुन्या जाणत्या भाविकांना दाखल होता आले. मात्र, आता गर्दीतून वाट काढीत भाविकांची पावले रेल्वे स्टेशन आणि एसटी स्थानकाच्या दिशेने वाळू लागली आहेत. रविवारी पहाटेपासूनच ‌आपल्या गावाकडे जाण्यासाठी कोणती वाहने आहेत? त्यांच्या वेळा जाणून घेण्यासाठी भाविकांची रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकाच्या इनक्वायरी विंडोवर गर्दी दिसून आली.

वाहनांसाठी भाविकांना प्रदीर्घकाळ प्रतीक्षा

पंचवटी : कुंभमेळ्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांना प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसल्याने बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. पंचवटी परिसरातील विविध बसथांब्यांवर ताटकळत उभे रहावे लागले.

भंगारवाल्यांचीही पर्वणी

पर्वणी आटोपल्यानंतर भाविकांना सामाजिक आणि सेवाभावी संस्थांकडून ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्याचे वितरण करण्यात आले होते. या रिकाम्या झालेल्या बाटल्या गोळा करण्यासाठी रविवारी भंगार व्यवसाय करणाऱ्या मुलांनी गर्दी केली. त्यांनी गोळा केल्या या बाटल्यांमुळे परिसरात आपोआप स्वच्छताही झाली.

रामघाट नही, समशान घाट आ गये।

पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, या हेतूने प्रशासनाने शहराच्या विविध भागात प्रति रामघाट उभारले. देशभरातून आलेल्या भाविकांना रामघाटाची ओढ होती. मात्र, त्यांना गर्दीचे नियोजन म्हणून नाशिकरोडजवळील दसक तसेच टाकळी येथील घाटांवर स्नान करावे लागले. याबद्दल भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. टाळकुटेश्वर घाटावरून स्नान करून परतणाऱ्या काही भाविकांनी तर 'जाना था रामघाट, पोहचा दिया स्मशानघाट!' अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.

नासिकवालोने हमे फसायाँ

'कैसी रहा कुंभ की पर्वणी?' असा प्रश्न विचारल्यास अनेक भाविकांच्या तोंडातून तीव्र भावना व्यक्त करणारे शब्दात बाहेर पडले. 'नासिकवालोने हमें फसायाँ, रामघाट बताकर अलग-अलग जगह पर स्नान करवाया।' अशी उत्तरे देत त्यांनी मनातील खदखद बोलून दाखविली. काही भाविकांनी गोदावरीत स्नान करालया मिळाल्याने पदरी पुण्य पाडल्याने धन्य झाल्याचेही सांगितले. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार अशा परराज्यांसह महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेड, वाशीम, जालना, सोलापूर, बीड अशा जिल्ह्यांमधूनही भाविक आले होते. आता त्यांच्यापैकी बहुतांश जणांनी रेल्वेचा पर्याय निवडत घराची वाट धरली.

पार्किंग गजबजलेच नाही

पंचवटी : के. के. वाघ कॉलेजसमोर उभारण्यात आलेल्या पार्किंगकडे रविवारी कोणीही फिरकलेच नाही. वाहने उभी करण्यासाठी तीन भले मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. परंतु, कोणीही तेथे आले नाही. त्यामुळे या पार्किंगसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च प्रशासनाच्या माथी पडल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नानासाठी कावनई सज्ज

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ कावनई येथे शाहीस्नानाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे आलेले साधू-महंत श्रीक्षेत्र कावनई येथे कपिलधारा तीर्थावर गर्दी करू लागले आहेत. येथे ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाहीस्नानाच्या नियोजनाची व पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली. आज, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

महंत हेमंतदासजी यांच्या नेतृत्वखाली आलेल्या शिष्टमंडळाने श्री क्षेत्र कपिलधारा कावनई परिसराची पाहणी केली. येथील शाहीस्नानास जगतगुरू, महंत, श्रीमहंत, महामंडलेश्वर मोठ्या संख्येने येणार असल्याने तसेच लाखो भाविकांची गर्दी होणार असल्याने सूक्ष्म नियोजनासाठी कपिलधारा ट्रस्ट, महसूल यंत्रणा व पोलिस यंत्रणा व्यस्त आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वरचे पहिले शाहीस्नान पार पाडल्याने अनेक महंत, साधू व भाविकांनी श्री क्षेत्र कावनई कपिलधारा येथे स्नानासाठी गर्दी केली आहे. त्यात उद्या श्रावणी तिसरा सोमवार असल्याने या गर्दीत मोठी वाढ होणार आहे. कावनईतील शाहीस्नानाच्या नियोजनासाठी महंत ग्यानदास महाराज यांचे शिष्य महंत हेमंतदास, महंत जगदीशदास, श्रीमंत मिश्राजी आदींच्या पथकाने शाहीमार्ग, पार्किंग व्यवस्था, तीर्थकुंड व मंदिर परिसराची इत्यंभूत माहिती घेऊन पाहणी केली.

या पथकाने कावनई कपिलधारा तीर्थाचे महंत रामनारायणदास फलाहारी महाराज यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी फलाहारी महाराज यांनी आलेल्या नियोजन पथकाचा सत्कार केला. कपिलधारा ट्रस्टचे पदधिकारी कुलदीप चौधरी, दीपक मंगे, पंकज काळे, मनोज बांगर, भरतभाई पटेल, संजय गौड, उडिया महाराज, मगनभाई पटेल, सोमनाथ सूर्यवंशी, किसनलाल कुमट, ज्ञानेश्वर भागवत आदींनी नियोजन कामी पुढाकार घेतला. आज कपिलधारावर स्नानासाठी जिल्ह्यातील शेकडो साधू व भाविक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यात राजस्थान येथील ग्यानमुनी व त्यांच्या समर्थकासह गर्दी केली होती.

पार्किंग व भोजन व्यवस्था

गेल्या दोन दिवसापासून वाढती गर्दी लक्षात घेता पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, आगामी काळातही भोजन व्यवस्था महिनाभर कायम राहणार आहे, अशी माहिती कपिलधारा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, कुशावर्त पाण्याची होणार तपासणी

0
0

नामदेव पवार, सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी आटोपल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. राज्य प्र‍दूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुढील शाही स्नानासाठी आणि आता येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोदावरी नदीसह कुशावर्तातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याबाबतचा अहवाल येत्या पाच दिवसांत मिळणार आहे.

महाकुंभाच्या शाहीस्नानात सहभागी झालेल्या भाविकांच्या आरोग्याला पाण्यापासून आरोग्यास धोका पोहचवू नये या हेतूने 'एमपीसीबी'कडून वेळोवेळी पाण्याचे नमुने घेण्यात आले. दरम्यान शनिवारी झालेल्या पहिल्या शाही स्नानानंतर 'एमपीसीबी'ने पुन्हा त्र्यंबकेश्वरमधील तीन ठिकाणी तसेच नाशिकमधील रामकुंडासह सहा ठिकाणी जाऊन तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी घेतलेल्या तीन ठिकाणांमध्ये कुशावर्तसह आहिल्या-गोदा संगम व बडा उदासिन आखाडा या ठिकाणांचा समावेश आहे तर नाशिकमधील रामकुंड, व्हिक्टोरिया पूल, तपोवन, दसक-पंचक, संगमपूल व टाकळीघाट येथील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे 'एमपीसीबी'चे उप-प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. 'एमपीसीबी'ने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची १४ घटक तपासणी केली जाणार आहे. येत्या पाच दिवसांत या पाण्यांचे अहवाल प्रयोगशाळेकडून मिळणार आहेत, असेही आंधळे यांनी सांगितले.

'एमपीसीबी'चे सचिव डॉ. पी. अलबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक अधिकारी विनायक शिंदे, उप-प्रादेशिक अधिकारी संजय भोंसले, अशोक करे यांसह १० फिल्ड ऑफिसर यांनी गंगाघाट व कुशावर्तांवर पाण्याची तपासणी केली. तसेच 'प्लास्टिक मुक्त नाशिक' या अभियानात कापडी पिशव्यांचे देखील वाटप 'एमपीसीबी'कडून भाविकांना करण्यात आले असल्याचे आंधळे यांनी सांगितले.

पहिल्या शाहीस्नान झाल्यानंतर गोदावरी नदी व कुशावर्तातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी 'एमपीसीबी'ने घेतले आहेत. यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी लॅबमध्ये केली जाणार असून येत्या पाच दिवसांत त्यासंदर्भातील अहवाल मिळणार आहे. - रवी आंधळे, उप-प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images