Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कमिशनखोरीचा महापालिकेत कळस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याची धामधूम सुरू असतांना साधुग्राममधील बहुचर्चित स्वच्छतेच्या ठेक्यातील टक्केवारीचा नगरसेवक व प्रशासनादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. स्थायीच्या अर्थपूर्ण अधिकारांना आव्हान देवू पाहणाऱ्या आयुक्तांनाच स्थायीने कोंडीत पकडल्याने टक्केवारीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. कोट्यवधींचे अर्थपूर्ण विषय काही मिनिटांत मंजूर करणाऱ्या स्थायी समितीने साडेपाच कोटींच्या वादग्रस्त ठेक्यासाठी तीन सभा वाया घालवत, तपासणीचा फार्स अवलंबिल्याने संशयाचा धूर अधिक गडद झाला आहे. दुसरीकडे अंहकाराला पेटलेल्या आयुक्तांनी सर्वोच्च समितीलाच अव्हेरल्याने निर्माण झालेल्या वादामुळे नाशिककरांचीच कोंडी झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित काम केले तरच त्या संस्थेचा विकास होतो. मात्र, दोघेही अहंकाराला पेटले तर संबंधित संस्थेचा -हास सुरू होतो. अशीच काहीशी गत सध्या महापालिकेची सुरू आहे. साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्यावरून आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि स्थायी समितीमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. हा वाद एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापर्यंत पोहोचला आहे. साधुग्रामच्या ठेक्यावरून प्रशासन वॉटर ग्रेस तर स्थायी समिती क्रिस्टलच्या बाजूने झुकल्याचे चित्र पहायला मिळत असल्याने ठेकेदारधार्जिण्या वादाने नाशिककर पुरते हैराण झाले आहेत.

महापालिकेच्या वाट्याला आलेल्या ११२९ कोटींच्या सिंहस्थ कामांपैकी केवळ साडेपाच कोटींच्या एकाच ठेक्यावरून माजलेले रणकंदन संशयास्पद बनले आहे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले अशी या ठेक्याची अवस्था झाली आहे. कमिशनच्या राजकारणापोटी साधू-महंतांच्या साधुग्रामलाच वेठीस धरण्यात आले आहे. गेल्या एक महिन्यापासून प्रशासन आणि स्थायीत चाललेल्या बनवाबनवीने न्यायालयानेही तोंडात बोट घातले. स्थायी समिती आणि प्रशासनाने एकमेकांची उणीदुणी काढायला सुरूवात करीत अधिकारांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महापौर, उपमहापौरांची चुप्पी

महापौर-उपमहापौर-आयुक्त विरूद्ध स्थायी समिती अशा दोन भागात महापालिका विभागली गेली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर सत्ताधारी मनसे आणि महापौरांनी आतापर्यंत चुप्पी साधल्याने संशय अधिकच वाढला आहे. वरिष्ठ पदाधिकारी वॉटर ग्रेसच्या पाठीशी उभे राहिले तर, स्थायी समिती क्रिस्टलच्या बाजूने उभी राहिली आहे. त्यामुळे पालिकेतील हा तमाशा पाहून नाशिककर आश्चर्यचकीत होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊर्जा बचतीची हवा‘हवाई’!

$
0
0

तब्बल १११ तासांसाठी १ युनिट वीजेचा वापर करणारे फॅन बाजारात

>>भावेश ब्राह्मणकर, नाशिक

वीजेच्या कमतरतेमुळे कमीत कमी वीजेवर चालणा-या उपकरणांच्या संशोधनाने वेग घेतला असून याच्याच माध्यमातून बाजारमध्ये सध्या रिमोट फॅन दाखल झाले आहेत. या फॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १११ तासानंतर या फॅनला १ युनिट एवढी वीज लागत आहे. त्यामुळे हे फॅन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

भारतात वीजेची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असे समीकरण मोठे आहे. वीज निर्मितीमुळे होणारा पर्यावरणाचा -हास, वीज वहनातील गळती या सा-या बाबी लक्षात घेता वीजेचा कमीत कमी वापर आणि काटकसरीला प्राधान्य दिले जात आहे. याचबरोबर कमीत कमी वीजेवर चालू शकणा-या उपकरणांच्या निर्मितीलाही प्राधान्य दिले जात आहे. यासाठीच काही कंपन्यांनी अत्याधुनिक फॅन बाजारात आणले आहेत. अत्यल्प वीजेमध्ये काम करणा-या या फॅनला चांगली पसंती लाभत असल्याचे चित्र आहे.

वीजेची बचत करणा-या आणि कमीत कमी वीजेवर चालणा-या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना रेटिंग दिले जातात. या फॅन्सला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. तसेच, हा फॅन सुरु किंवा बंद करण्यासाठी इलेक्ट्रिक बोर्डवरील बटणाचे सहाय्य घेण्याची गरज नाही. त्यासाठी या फॅनला रिमोट देण्यात आला आहे. त्यामुळे बसल्या ठिकाणावरून आपण या फॅनवर नियंत्रण मिळवू शकतो. शिवाय गतीसाठी १ ते ५ पर्यायही देण्यात आले आहेत. विविध रंगात आणि आकारात हा फॅन उपलब्ध आहे.

अशी होते वीज बचत

सर्वसाधारणपणे आपल्या घरातील फॅन हा ७० ते ७५ व्हॅटचा असतो. त्यामुळे हा फॅन १३ तास सुरु राहिला की एक युनिट वीज त्याला लागते. घरगुती वीजेचा प्रति युनिट दर हा जवळपास ६ रुपये एवढा आहे. त्यामुळे दर १३ तासाला ६ रुपये एवढा खर्च येतो. मात्र, रिमोटचा हा फॅन केवळ ३५ वॅट क्षमतेचा आहे. तसेच, आपण जितक्या गतीवर तो चालवू तितकी त्याला वीज लागते. म्हणजे, १ वर ४ वॅट, २ वर ९वॅट, ३ वर १४वॅट, ४ वर २५वॅट, ५ वर ३५ वॅट. त्यामुळे जेव्हा २ च्या गतीवर हा फॅन १११ तास चालतो त्यावेळी त्याला १ युनिट वीज लागत असल्याचे उर्जा अभ्यासक सांगत आहेत.

ऑनलाईनही उपलब्ध

ऊर्जा बचत करणारे हे फॅन देशभरातील बाजारपेठेसह ऑनलाईन शॉपिंग स्टोअर्सवरही उपलब्ध आहेत. त्यामुळे घर बसल्याही ग्राहक हा फॅन खरेदी करु शकत आहे. विविध प्रकारच्या आकार, प्रकार आणि रंगातील हे फॅन सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारीत स्नान हे प्रशासनाचे ‘पाप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन शाही स्नान म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा असे नव्हे. उर्वरीत वर्षभर भाविक गोदावरीत स्नान करणार असून, सद्यस्थितीत भाविकांना अत्यंत प्रदूष‌ित पाण्यात स्नान करावे लागते आहे. या परिस्थितीसाठी प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार असून, मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन सादर करणार असल्याचे गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी स्पष्ट केले.

अनेक वेळा प्रशासनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधाबाबत स्तुती सुमने उधळली जात आहेत. मात्र, आम्ही येथे स्ट्रीट लाईट मोजण्यासाठी किंवा रस्ते किती चकाचक झालेत, हे पाहण्यासाठी आलेलो नाही. कुंभमेळा आणि गोदास्नानाचा थेट संबंध असून, वर्षभर नदीपात्रात स्वच्छ पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. याचसाठी लाखो साधूमहंत आणि कोट्यवधी भाविक येथे येतात. मात्र, सध्या गोदावरी नदीपात्र अस्वच्छ झालेले दिसते. गटारीचे पाणी थेट पात्रात सोडण्यात येत असून, भाविकांना त्यातच डुबकी मारावी लागते आहे. सिंहस्थ कुंभमेळा वर्षभर चालतो. तीन शाही पर्वण्यांसाठी पाणी सोडले म्हणजे सर्व काही झाले अशा भ्रमात प्रशासन वागते आहे. यात भाविकांचा कोणताही विचार प्रशासनाने केलेला दिसत नाही.

सध्या समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे धरणात पाण्याचा तुटवडा आहे. यापार्श्वभूमीवर नदीपात्रात पाणी सोडले जात नाही, असे प्रशासनाचे स्पष्टीकरण तयार आहे. मात्र, कुंभमेळा केव्हा लागणार याची माहिती १० वर्ष आगोदर प्रशासनाला होती.

मागील दोन वर्षांत पुरेसा पाणी साठा धरणात ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. त्यात ते अपयशी झाले असून, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मंत्र्यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे आवाहन अधोक्षाजानंद महाराजांनी केले. नदी ही हिंदू संस्कृतीची जननी आहे.

आजवर सनातन धर्माचे संगोपन करण्याचे काम नदी किनारी झाले. या ठिकाणाचे महत्त्व असल्यानेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. मग, गोदावरीच्या प्रदुषणाबाबत राज्य सरकार इतके उदासीन कसे राह‌िले, असा सवाल शंकाराचार्यांनी उपस्थित केला.

....

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय सत्ता हस्तगत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोदावरी प्रदुषणाबाबत निवेदन पाठवणार आहे. त्यांना भाविकांच्या आस्थेबद्दल जराही प्रेम असेल तर ते प्रदुषणाबाबत काही तरी करतील. परमेश्वर त्यांना यासाठी सदबुध्दी देवो, असे शंकाराचार्य अधोक्षाजानंद महाराजांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मग काश्म‌िरी का नाहीत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'काश्मीर तुमचे तर मग काश्मीरी बंडखोरांना नाकारण्याचा तुम्हाला अधिकार काय? हुर्रियत कॉन्फरन्सच्या बंडखोर नेत्यांना पाकि​स्थानशी चर्चा करूनच द्यावी, एवढेच नव्हे तर केंद्र सरकारनेही त्यांच्याशी चर्चा करावी. केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण थोकडे पडत असल्याचे काही दिवसांतील गोंधळामुळे स्पष्ट झाले असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.' अशी टीका गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी केली.

मागील दीड वर्षांत भारत आणि पाकिस्थानमध्ये १५ वेळा चर्चेचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आणि तो फेटाळण्यात आला. या राजकीय घडामोडींचा परिणाम सीमेवर होत असून, दररोज निष्पाप नागरिकांसहीत जवानांना बळी जात आहेत. काश्मीरमधील बंडखोर मानल्या जाणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने पुढे आणला असून, त्यास भारताचा विरोध आहे. हुर्रियत कॉन्फरन्स ही संघटना निर्माण होऊन त्यांना भारतापेक्षा पाकि​स्तानशी चर्चा का करावी वाटते, याचे उत्तर केंद्र सरकारने शोधणे अपेक्ष‌ित होते. मात्र, याउलट पाकिस्तानचा प्रस्ताव पुढे आल्यापासून केंद्र सरकारने हुर्रियतच्या नेत्यांना नजरबंद करणे, अटक करणे, पुन्हा मोकळे सोडणे असे उद्योग सुरू केले. यातून केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण किती कमकुवत आहे, याची सर्वांना प्रचिती आल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. हुर्रियत कॉन्फरन्स निवडणूक लढवत नाही, म्हणून तिचे अस्तित्व मान्य नसल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारकडून करण्यात येतो. प्रत्यक्षात, आरएसएस किंवा विश्व हिंदू परिषद निवडणूक न लढवता सरकार चालवतेच ना, असा प्रश्नही महाराजांनी उपस्थित केला.

मूळ समस्या दहशतवाद

सीमेवर दहशतवादी घुसखोरी करतात. बंदूकाच्या जोरावर काश्मीरमधील एखाद्या छोट्या गावात दहशत निर्माण करून हवे ते मिळवतात. याची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा लष्काराला लागली की, कारवाई होते. यात, कोणताही संबंध नसलेले कश्मीरी बळी पडतात. यातून काश्मीरी आणि लष्कराचे बिनसत असून, दहशतवाद्यांना सीमेच्या आत येऊच न देणे, एवढाच एक पर्याय समोर असल्याचे शंकाराचार्य अधोक्षाजानंद महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्प्युटर बाबा डेरेदाखल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेश राज्यात बोलबाला असलेले महामंडलेश्वर नामदेवदास त्यागी ऊर्फ कम्प्युटर बाबा साधुग्राममध्ये डेरेदाखल झाले आहेत. यज्ञ कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करणारे कम्प्युटर बाबा साधुग्राममधील सोयी-सुविधांबाबत मात्र नाराज आहेत. ५ सप्टेंबरपर्यंत यात सुधारणा झाल्या नाहीतर वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच कम्प्युटर बाबांनी दिला आहे.

दिगंबर आखाड्याशी निगडीत असलेल्या कम्प्युटर बाबांचा अहिल्या नगर इंदौर खालसामध्ये मुक्काम आहे. साधू-महंतांकडे पाहण्याचा प्रशासनाचा दृष्टीकोन मागास असून, त्यामुळेच कीड लागलेले गहू आणि बाजारभावापेक्षा फक्त एक रूपया स्वस्त असलेली साखर पुरविली जात असल्याचा आरोप कम्प्युटर बाबांनी केला. मागील तीन वर्षांत बाबांनी मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन मोठ्या यज्ञ कार्यक्रमांचे आयोजन केले. प्रत्येक यज्ञ कार्यक्रमासाठी तीन ते चार कोटी रूपयांपर्यंत खर्च आला. यातील ५० लाख रूपये फक्त हेलिकॉप्टरवर खर्च केले आहेत. या यज्ञ कार्यक्रमांचे परिसरातील गावांमध्ये निमंत्रण देण्यासाठी बाबा हेलिकॉप्टरचा वापर करीत असत. याशिवाय, बाबांनी देशभरात १६ धर्मशाळा, मंदिरे स्थापन केली आहेत. प्रत्येक इमारतीसाठी १ कोटी रूपयांपर्यंत खर्च केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कामाचे भूमिपूजन ते उद् घाटन यासाठी अवघ्या सहा महिन्याचा कालावधी घेतला. एका पाठोपाठ एक होणाऱ्या कामांमुळे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी १८ ते १९ वर्षांपूर्वी 'कम्प्युटर बाबा' ही उपाधी दिल्याचे बाबांनी सांगितले.

हिंदुत्ववादींपेक्षा समाजवादी बरे!

अलाहाबाद येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यादरम्यान साखरेचे भाव ३१ रुपयांपर्यंत वाढले होते. तरीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अख‌िलेश यादव यांनी १३ रुपये किलो दराप्रमाणे साखर उपलब्ध करून दिली. या ठिकाणी २२ रुपये दराची साखर २१ रुपये दराने देण्यात येत असून, हिंदुत्वावादी म्हणवणाऱ्या भाजपा सरकारपेक्षा समाजवादी पक्षाचे सरकार काय वाईट, असा टोला कम्प्युटर बाबांनी लगावला. तर कुंभमेळ्याआड लुटालुटीचे सत्रच सुरू असून, त्यास प्रशासनाचा छुपा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन माकडांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राणीमित्र गौरव क्षत्रिय, ​अभिजीत महाले आणि व्हेटरनरी डॉक्टर पंकज राजपूत यांच्यासह इतरांनी मिळून साधूग्राममधील दोन माकडांची सुटका करून त्यांची रवानगी वनविभागाकडे केली. याबाबत साधू मोहनदास देवी कची याच्याविरोधात वनविभागाने वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल केला.

दोन माकडांना प्रशिक्ष‌ित करून त्यांच्याकडून विविध खेळ करून घेतले जात असल्याची माहिती प्राणीमित्रांना मिळाली होती. प्राणीमित्रांनी या ठिकाणी धाव घेऊन साधूकडे विचारपूस केली.

याबाबत माहिती देताना गौरव क्षत्रियाने सांगितले की, 'टिप मिळाली त्यानुसार आम्ही साधूग्राममध्ये पोहचलो.

मात्र, त्यावेळी ते तिथे नव्हते. आम्ही त्यांचा शोध सुरूच ठेवला असता काही व्यक्ती रामकुंडावर माकडांचा खेळ करीत असल्याचे कळाले. त्यानुसार तिथे पोहचलो. या माकडवाल्यांकडे एक नर आणि एक मादी असून, त्यांचा खेळ करून पैसे कमवले जात असल्याचे मालकाने सांगितले.'

याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असता त्यांनी तत्काळ माकडवाल्याला अटक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार वनविभागाला असून, सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत खैरनार म्हणाले, 'संबंधित व्यक्तिविरोधात वन्य​जीव संरक्षक कायदा १९७२ च्या कलम ९, ३९, ५० आणि ५१ नुसार गुन्हा दाखल केला. या कायद्यानुसार वन्यजीवांची मालकी शासनाची असल्याने वन्य जीवांचे जतन करण्याचा अधिकार इतराना मिळत नाही. वन्य जीवांच्या संख्येनुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली असून, त्यानुसारच शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.'

संशयित आरोपी मध्य प्रदेश राज्यातील असून, तो कोणत्याही आखाड्याशी संबंध‌ित नाही, तसेच त्याला या कायद्याबाबत माहिती नसल्याचे खैरनार यांनी सांगितले. कुंभमेळा सुरू झाल्यापासून ही पहिलीच कारवाई ठरली. यापुढे वन्य जीवांचा कोठेही गैरवापर होऊ देणार नसल्याचे प्राणीमित्र गौरव क्षत्रिय याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायटेक बाबांचे मंडळ

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

साधू-महंतासमोरील समस्या वेगाने बदलत आहेत. हिंदू धर्माचा प्रसार, प्रचार, सनातन धर्माचे सबलीकरण इत्यादींसाठी साधूंची मॅनेजमेंट काळानुरूप बदलत आहे. मध्य प्रदेश राज्यातील षडदर्शन साधू मंडळ हे देखील हायटेक पध्दतीचा अवलंब करीत असून एमबीए, पदवीधर, टेक्नोसॅव्ही साधू यामध्ये कार्यरत आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे मुख्यालय असलेल्या षडदर्शन साधू मंडळ या संस्थेचे १९७८ मध्ये नोंदणी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात संस्थेसमोर ठराविकच ध्येय होते. कालातंराने त्यात आमुलाग्र बदल झाले. या बदलांना समोरे जाताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊ शकतो हे लक्षात आले. त्यानुसार टेक्नोसॅव्ही, पदवीधर, मॅनेजमेंटशी निगडीत साधूंना एकत्रित केल्याची माहिती संस्थेचे सचिव नृसिंहदास यांनी दिली. आहिल्यानगर, इंदूर खालसा येथे वास्तव्य असलेल्या नृसिंहदास यांनी सांगितले की, मी स्वतः बीए आणि त्यानंतर एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लॅपटॉपसह मोबाइल हाताळणे यात नवल नसून, आमच्या संघटनेशी निगडीत बहुतांश साधू-महंत टेक्नोसॅव्ही असल्याचा दावा नृसिंह दास यांनी केला. या संघटनेमार्फत नर्मदा नदी स्वच्छता अभियान राबवले जाते. नर्मदा स्वच्छतेबाबत संघटनेने दिलेल्या १५ सूत्री कार्यक्रमाचा मध्य प्रदेश सरकारने तत्काळ स्वीकार केला. याशिवाय राज्य सरकारकडून विविध मंदिरावर कब्जा करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. हा हाणून पाडण्यासाठी संघटनेमार्फत संघर्ष सुरू असून, यासाठी यासाठी संस्थेमार्फत एक कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. यातील सदस्य साधू असले तरी ते टेक्नोसॅव्ही असल्याचे नृसिंहदास महाराजांनी स्पष्ट केले. या संघटनेचे अध्यक्ष महामंडलेश्वर नामदेवदास त्यागी उर्फ कम्प्युटर बाबा हे असून, त्यांच्यामार्फत दरवर्षी मोठे कार्यक्रम आयोजित होतात.

साधू महंताबाबत समाजाने एक प्रकारची विचारधारणा पक्की केली आहे. मात्र, या धारणेला छेद देण्याचे काम काही वर्षांपासून सुरू असून, त्याचा समाजाने स्वीकार करणे अभिप्रेत आहे. आमच्या संघटनेच्या बैठका कार्पोरेटपेक्षाही सुनियोजित होतात. त्यात तंत्रज्ञानाचा वापर होतोच. भक्ती आणि शक्ती या दोन वेगळ्या बाबी असून, ज्याचा त्याचा योग्य जागी वापर केला जातो.

- नृसिंह दास, सचिव, षडदर्शन साधू मंडळ, इंदूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा साठेबाजांची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कांद्याचे गगनाला भिडणारे भाव लक्षात घेत अखेर प्रशासनाने विविध पथकांच्या माध्यमातून जिल्हाभरातील जवळपास ३३१ कांदा व्यापाऱ्यांची शनिवार झडती घेतली. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल पावणे दोन लाख क्विंटल कांदा व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. कांद्याला सरासरी आजवरचा सर्वाधिक ६३२६ रुपये दर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे.

कांद्याच्या वाढत्या दरांची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कांद्याची साठेबाजी आणि विक्री याबाबत पाहणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळ, सहकार आणि महसूल अशा तीन विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विविध पथकांनी जिल्हाभरात तपासणी केली.

लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, झोडगे, नांदूरशिंगोटे, सायखेडा, उमराणे, चांदवड, निफाड येथे कांदा व्यापाऱ्यांची झडती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू कायद्यात कांद्याचा समावेश असला तरी कांद्याचा किती साठा करता येतो याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पथकाने अद्याप एकाही व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही किंवा कांदा जप्तही केलेला नाही. सरासरी २०० ते ३०० क्विंटल कांदा प्रत्येक व्यापाऱ्याकडे आहे.

निर्यात

कांद्याच्या वाढत्या क‌िमतींना आळा घालण्याच्या उद्देशाने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने कांद्याच्या किमान निर्यात किमतीत प्रतिटन २७५ अमेरिकन डॉलर्सनी वाढ केली आहे. त्यामुळे ही किंमत ४२५ डॉलर्स प्रतिटनवरून ७०० डॉलर्स प्रतिटनवर गेली आहे.

नजर

राज्यात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये छापे टाकून तेथे उपलब्ध कांद्याच्या सद्यस्थितीची मा‌हिती घेण्यात आली. कांद्याच्या साठमारीद्वारे स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचा उद्देश हाणून पाडण्यासाठी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने व्यापाऱ्यांच्या खळ्यावर आणि गुदामांवर जाऊन पाहणी केली.

राज्यात कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने होलसेल बाजाराबरोबरच किरकोळ बाजारातही कांद्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. लासलगाव बाजार समितीत शनिवारी प्रतीक्विंटल कांद्याने ६३२६ रुपयांचा टप्पा गाठला. म्हणूनच सरकारने आता बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या कांद्याच्या खळ्यांवर वॉच सुरू केला आहे. येवल्यात तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासणी केली. खुल्या बाजारात कांदा खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहकांना मोठे 'दाम' मोजावे लागत असल्याने गेल्या काही दिवसात सर्वसामान्यांसह शासनाला देखील चांगलाच 'घाम' फुटला आहे. व्यापाऱ्यांनी आपण खरेदी केलेल्या कांद्याला पुढील काळात अधिकाधिक दाम मिळावा यासाठी साठेबाजी तर केली नाही ना याची तपासणी आज करण्यात आली. येवला बाजार समितीत सध्या किती कांदा शिल्लक आहे, याची माहिती पथकाने घेतली. येवल्याचे तहसिलदार शरद मंडलीक यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने शनिवारी भल्या सकाळीच आपला मोर्चा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर वळविला.

या पथकामध्ये येवल्याचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, बाजार समितीचे व्यवस्थापक डी. सी. खैरनार तसेच येवला तहसीलमधील अन्न व नागरी पुरवठा शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसात उन्हाळ कांद्याचा बाजारभाव वर सरकताना शनिवारी तो कमाल सहा हजारांच्या वर गेला. बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात शनिवारी उन्हाळ कांदा ३ हजार तर कमाल ६ हजार २५१ (सरासरी ५४००) या बाजारभावाने स्थानिक व्यापारी वर्गाने खरेदी केला. या ठिकाणी शनिवारी एकूण ३ हजार क्विंटल इतकी कांदा आवक झाली. बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार आवारात सुमारे १ हजार क्विंटल उन्हाळ कांदा आवक होतांना येथे किमान ३ हजार तर कमाल ६ हजार ३०२ (सरासरी ५५००) असा बाजारभाव होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हजारो लिटर पाण्याची चोरी

$
0
0

येवला : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांना पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य ग्रॅव्हिटी जलवाहिनीचा चक्क एअर वाल्व्ह खोलून एका शेतकऱ्याने हजारो लिटर पाण्याची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. तालुक्यातील धुळगाव येथे केला गेलेला हा प्रकार शनिवारी उघड होताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाणीचोरी करणाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली. नव्हे तर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

बाभूळगाव येथील साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्रातून तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३८ गावांना जलवाहिनीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जलवाहिनीचा एअर वाल्व्ह धुळगाव येथील प्रवीण बाळासाहेब सोनवणे याने खोलून हजारो लिटर पाणी चोरी केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच तहसीलदार शरद मंडलीक, येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी प्रभारी सभापती जयश्री बावचे, योजना समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, सचिव डी. जी. सपकाळे, एस. ए. बागुल आदींसह घटनास्थळ गाठले. यावेळी पाणीचोरी केल्याचे निदर्शनास येताच फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ३८ गांवे योजनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहरी निसर्गामुळे संपली जगण्याची उमेद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

चौदा-पंधरा लाखांच्या कर्जाला कंटाळून निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील तरूण शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. सलग तीन वर्षांपासून गारपीटमुळे उद्ध्वस्त झालेली द्राक्षबाग यामुळे मानसिक खचलेल्या बबनरावाने फाटक्या संसारापेक्षा मृत्युला जवळ केले. सधन आणि समृध्द समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील ही दुर्दैवी घटना शेतकरी वर्गाला चटका लावून गेली.

बबनराव पडोळ हे सोनेवाडीचे माजी सरपंच. अनेकांना आधार देणारे बबनरावांचे हात मात्र हतबल झाल्यानंतर संपूर्ण परिवाराला निराधार करून गेले. वृध्द आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले उघड्यावर पडले आहेत. डोक्यावर पंधरा लाखांचे कर्ज, राहायला स्वतःचे घर नाही, गारपिटीने सलग तीन वर्षे कांदा व द्राक्षपीक डोळ्यासमोर नष्ट होते. बँक, औषध, खत विक्रेते तसेच सावकार यांचा ससेमिरा या सर्वांना कंटाळून गावाचे नेतृत्व करणारे बबनराव पडोळ हे मृत्यूला जवळ करतात ही बळीराजासाठी मोठी शोकांतिका आहे.

आभाळसारखा फाटलेला संसार कसा सांधावा हा पडोळ यांच्या पत्नी ताराबाईंचा सवाल उपस्थितांना अंतर्मुख करतो. स्टेट बँक ऑफ लासलगावचे बारा लाखांचे कर्ज, निफाड येथील संगीता कृषी सेवा केंद्राचे साठ हजार रुपये, शारजा अॅग्रोचे नव्वद हजार रुपये तर सोने गहाण ठेवून सावकाराकडून उचललेले दीड लाख रुपये आणि उसनवार घेतलेले दोन लाख रुपयांची मागणी होऊ लागल्याने बबनराव हतबल झाले होते. हे सर्व कर्ज फेडण्याची हिंमत होती पण निसर्ग साथ देत नव्हता. सलग तीन वर्षे झालेल्या गारपीटमुळे बबनरावाची हिंमत खचली होती. थोडी जमीन विकून कर्ज फेडले होते. मात्र, त्यानेही काही झाले नाही. बनबराव पडोळ यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी जाणाऱ्यांना ही घटना मनाला चटका लावून जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निफाड तालुकाध्यक्ष सोमनाथ बोराडे, उपाध्यक्ष साहेबराव मोरे यांनी पडोळ परिवाराला धीर देत पाच हजार रुपयांची मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा फी परत द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी नियम धाब्यावर ठेवून कॉलेजेसनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या घेतलेली फी परत करावी, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या काळात त्याची अंमलबजावणी झाली गेली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

प्रवेशप्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांकडून कॉलेजेस अभ्यासेतर उपक्रमांच्या नावावर जादा पैसे उकळत असल्याचे वारंवार समोर आले आहे. व्यायामशाळा, माहितीपत्रके, जादा तासिका, शिक्षक-पालक संघ, लॅब डिपॉजीट, कॅम्पस सर्व्हिस व कॉलेज डेव्हलपमेंट, आयटी, लॅब ब्रेकेजेस, सेंटर फी, स्टुडंट वेल्फेअर, माहितीपुस्तिका, स्पोर्ट्स फंड, प्रशासकीय सेवा शुल्क, इमारत दुरुस्ती व देखभाल खर्च, कम्प्युटर फी, शाखानिहाय स्टेशनरी फी अशा आदी प्रकारच्या फीज् कॉलेजेस विद्यार्थ्यांकडून घेत आहेत. यातील अनेक बाबींचा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष कोणताही संबंध नसल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेली ही फी परत करावी, अशी मागणी छात्रभारतीने केली. संघटनेने शिक्षण उपसंचालकांना घेराव घालत फी पुन्हा मिळविण्याबाबत मागणी केली होती. याचा प्रभाव म्हणून नाशिक शहरातील १६ कॉलेजांनी अभ्यासेतर घेतलेली फी परत करावी, असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केला. परंतु, त्यांची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. येत्या काळातही या संदर्भातील अंमलबजावणी केली गेली नाही, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या बस थांब्यामुळे वाढला जीवाला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

श्रीमती विमलाबेन तेजुकाया कॉलेजच्या वतीने मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या नव्या बस थांब्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांना थांब्यावर उभे राहण्यासाठी जागाही नाही. अशा प्रसंगी अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

महिन्याभरापूर्वी कॉलेजने मुलींसाठी शेटे निवासस्थानासमोर नूतन बस थांबा उभारला. मात्र येथे विद्यार्थ्यांना उभी राहण्यास पुरेशी जागा नाही. दुपारी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत या बस थांब्यावर विद्यार्थी बसची वाट पाहत उभे राहतात. मात्र, भरधाव वेगाने येणारी वाहने कधीकधी विद्यार्थ्यांच्या अंगाला स्पर्श करून जातात. त्यामुळे कोणी जखमी होण्याची शक्यता वाढली आहे. भविष्यात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किमान निवारा शेड उभारण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळेल, तसेच अपघाताचाही धोका ममी होईल, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना ६ नंबर नाका बस थांबा सोयीचा वाटत असल्याने नव्या थांब्यावर विद्यार्थी जाण्यास तयार नाही अशी परिस्थिती आहे.

नव्या थांब्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड अथवा काही दानशुरांच्या माध्यमातून येथे निवारा शेड उभारण्यात यावा.

- गणेश हारक, विद्यार्थी पदाधिकारी, युवासेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर नाशिकचंच नाव खराब होईल !

$
0
0

प्रशांत देसले, नाशिक

तसं पाहिलं तर नाशिक नेहमीच पर्यटकांच आकर्षण ठरत आले आहे. येथील वाईन कल्चर, पांडव लेणी, मुक्तीधाम, भक्तीधाम, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वरचा मन मोहून टाकणारा निसर्ग हे सगळं पर्यटकांना खुणावत असतं. त्यातच यंदा होत असलेला 'मेगाइव्हेंट कुंभमेळा' तर पर्यटकांसह भाविकांना चांगलाच आकर्षित करीत आहे. अबालवृद्ध दररोज नाशिक आणि त्र्यंबकनगरीला भेट देत आहेत. त्यातच सुरतहून आलेला एक 'यंग सिनीयर्सचा' चमू काळाराम मंदिराची भव्यता डोळ्यात साठवून गोदाघाटावर निवांत बसला होता.

साधारणपणे हे सगळेच पासष्‍्ठी ओलांडलेले 'तरूण' भाविक होते. कुणाला पायी चालताना दम लागत होता तर कुणाला डायबेटीस, तर कुणाला बीपीचा त्रास होता. मात्र तरीही त्यांनी नाशिकला येण्याचा चंग बांधला आणि दोन गटात हे आठ-दहा गुतराती भाविक गोदावरीच्या सानिध्यात येवून धडकले. त्यातील प्रत्येकाच्या बोलण्यात एक विश्वास जाणवत होता, प्रत्येकाला काहीना काही सांगायचं होतं. त्यातील रवींद्र दावल तोडक्यामोडक्या मराठीत बोलून गेले, 'नाशिकला पहले गुलशनाबाद म्हणत होते, आज अनुभव लिया. यहाँ सही में गुलशन है, गोदातटपर टहलतें समय एैसा लगता है मानो साबरमती घाटपर है. तर किशन पटेलभाईला नाशिकच्या वातावरणात एक सुगंध जाणवत होता. एक विलक्षण धार्मिक सोहळ्यासाठी सुरू असलेली लगबग त्या सर्वांनाच आनंदी करीत होती. येत्या आठवडाभरात येथे जगभरातला सर्वांत मोठा उत्सव होणार होता, त्याअनुषंगाने केलेली तयारी त्यांना खूपच भावली होती.

मात्र तरीही त्यांच्यातील सुरेंद्र पाल संताप व्यक्त केला. त्यांना गोदावरी घाटावर जागोजागी भिकारींचा जथ्था दिसला. कोणतेही मंदिर असो त्याच्या बाहेर भिकारींची रांग लागलेली पाहून त्यांना थोडं विचित्र वाटलं. ते म्हटले, 'जहाँ सरकारने तीन लाख साधूसंतोंका रहने-खाने का इंतजाम किया, वही इन सात-आठसों भिकारीओं का भी कर देते, जहाँ भी रुको पिछे ही पड जातें है, जब तक कुछ मिलता नही, पिछा ही नही छोडते.' त्यांचा संताप रास्त होता. गोदाघाटावर भिकाऱ्यांची एक प्रकारची युन‌ियनच या उत्सवात बघायला मिळत आहे. मंदिराबाहेरील टोळीतील एक जण भक्तांच्या मागेच लागतो, जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत तो माघारी फिरत नाही आणि इकडे तो परत येईपर्यंत त्याचे दुसरे दोन-चार साथीदार मंदिराकडचा मोर्चा सांभाळतात. सुरेंद्र भाई तर इतकंही बोलले, अगर समज लो, गलतीसे हमारा कोई किमती सामान इनके हात लग गया तो हम इन्हे का ढुंढे, तो फिर तुम्हारेही नाशिक का नाम खराब होगा ना.

कुंभमेळ्यात येणारा प्रत्येक जण नाशिकबाबत एक संकल्पना, एक विचार, एक मत तयार करून येतो. येथे आल्यावर जर त्याची निराशा झाली, त्याचे हाल झाले तर कोणा एका व्यक्तीचे नाव न घेता संपूर्ण शहराची एक प्रतिमा त्याच्या मनात कायमची तयार होते. सुरतहून आलेल्या या भाविकांना जे वाटलं, जे दिसलं ते त्यांनी मोकळ्या मनानं सांगितलं. मात्र त्यांच्यासारख्या अशा असंख्य पाहुण्यांना रोज या समस्येला सामोरं जावं लागत आहे आणि यापुढेही जावं लागणार आहे, त्यांचे काय? असा प्रश्न या गुजराती चमूने उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठी आता देवाचा धावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थासाठी त्र्यंबक नगरी सजली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येचा विस्तार लक्षात घेता स्नानासाठी आकर्षक घाट बांधले आहेत. अर्थात आता प्रतीक्षा लागली आहे ती पावसाची. वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून साधू-महंत तसेच प्रशासन देखील देवाचा धावा करीत आहे.

अवघ्या पाच दिवसावर शाहीपर्वणी आली आहे. स्नानासाठी कुशावर्त तीर्थ सज्ज झाले आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, सुरक्षेची रंगीत तालीम आता होत आहे. भगवान त्र्यंबकराजाचा दर्शनासाठी बारा महिने गर्दी असतेच. मात्र, सध्या गर्दीचा उच्चांक होत आहे. देवभक्तीला पैशाची गरज नसते, मात्र येथे दोनशे रुपये देवून रांगेत उभे राहून दर्शनाची प्रतीक्षा करणारे भाविक पाहून सबसे बडा रुपया हेच खरे असे म्हणावे लागत आहे. वाहनांचा घोळ नको म्हणून वाहनतळावर गर्दी पाहून वाहन थांबा सुरू झाला आहे. प्रवेशद्वारी अनंत कटकटी अशी स्थिती अनुभवास येत आहे.

त्र्यंबकचे हवामान साधूंना सुसहाय्य होत नसल्याने आजरांमध्ये वाढ झाली आहे. साधू-महात्मा आजारी त्याचबरोबर पोलिस कर्मचारीही आजारी पडत आहेत. भगवे वस्त्र, भगवे ध्वज, सारे काही भगवे इतकेच नव्हे तर भगवी छत्री पाऊस नसल्याने या छत्रीचा वापर उन्हा पासून बचाव करण्यासाठी होत आहे. दिवसा ऊन तळपत आहे आणि रात्र रंगीबेरंगी दिव्यांनी उजळत आहे. रस्त्यांची स्वच्छता पाहून नागरीक खूश आहेत.

वरूणराजाची प्रतीक्षा

कुशावर्तात पाण्याचा तुटवडा पडणार नाही तशात बॅकअप स्टॉक म्हणून गांगसागर तलाव काठोकाठ भरले आहे. अर्थात दरवर्षी ओव्हरफ्लो होणारा हा तलाव यावर्षी काठापर्यंत पोहचला नाही. कुशावर्तात शाहीस्नान घडविताना सारखे पाणी उपसावे लागणार आहे. हे पाणी थेट नदीला सोडले जाते. त्यामुळे घाटांना पाणी राहणार आहे. अर्थात केवळ यावर भागणार नाही.

शासनाने सुमारे दीड किलोमीट लांबीचे घाट बांधले आहेत. अहिल्या धरणालगतच्या घाटात सांडव्याचे पाणी असल्याने काहीसा भरलेला राहील. मात्र, त्यात स्नान नव्हे केवळ हातपाय धुता येतील इतकेच पाणी राहील. अर्थात घाटांना वाहते पाणी असेल तरच त्यात स्नान शक्य होणार आहे. यावर प्रशासनाने तोडगा शोधला आहे. अहिल्या धरणाचे पाणी मोटरपंप लावून उपसायचे आणि थेट घाटात सोडायचे. त्याचप्रमाणे गौतमी बेझे प्रकल्पातील पाणीयोजना आहे. त्याचे पाणी थेट नदीपात्रात सोडण्याची तजवीज करता येणार आहे. अर्थात ही उलटी गंगा वाहणार आहे. अहिल्या घाटाबरोबर नवनाथ घाट आणि श्री चंद्रभगवान घाट येथे पावसाच्या व्यतिरिक्त कितीही पाणी वाहते ठेवले तरी अस्वछता दूर होणार नाही. येथे केवळ पाऊस आणि त्यातही दुथडी भरून नदी वाहिली तरच स्वच्छता राहून निर्मळ पाणी वाहणे शक्य आहे. आजची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक, पहिनेत पर्यटकांना ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांच्या पावलांवर पाऊल ठेऊन ग्रामीण पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ऐन रविवारी त्र्यंबकेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. त्र्यंबकेश्वरपासून १३ किलोमीटर अलीकडेच वाहने अडविण्यात आल्याने तेथून पुढचा प्रवास बसद्वारेच करणे भाग पडल्याने पर्यटकांचा चांगलाच रसभंग झाला.

संडे सेलिब्रेशनचा मूड जपणारे नाशिककर रविवारी त्र्यंबकेश्वर, पहिने बाजूला एन्जॉय करण्यासाठी जात असतात. प्रत्येक रविवारी पहिने रस्त्याला पर्यटकांचा पूर येतो. श्रावणाला सुरुवात झाली असली तरी श्रावण पाळे आणि धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पहिने रस्त्यावर पर्यटकांची मांदियाळी जमते. नेहमीप्रमाणे नाशिककर आपल्या खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वर तसेच पहिनेकडे निघाले. निसर्ग अविष्काराचा आनंद लुटण्याच्या मूडमध्ये असलेल्या पर्यटकांना सकाळी नऊच्या सुमारास तळेगाव फाट्याजवळच पोलिसांचे दर्शन घडले. एक रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला होता.

कार अथवा तत्सम वाहने घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना या फाट्यावरच पोलिसांकडून अडविले जात होते. तेथे वाहने लावून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने त्र्यंबकेश्वरला जा अशी सूचना त्यांना केली जात होती. मात्र, आम्हाला पहिनेला जायचे आहे, त्यामुळे आमची वाहने जाऊ द्या, अशी विनंती करूनही पोलिसांनी वाहनधारकांना न सोडल्याने त्यांचे आपापसात वादही झाले. काही भाविकांसमवेत त्यांच्या खासगी वाहनांमध्ये वयस्कर नागरिक होते. बसप्रवास करून जाणे शक्य नसल्याचे त्यांच्याकडूनही पोलिसांना सांगितले जात होते. मात्र, तुमच्या सर्वांच्या सोयीसाठीच बसेसची व्यवस्था केल्याचे सांगत पोलिस अधिकाऱ्यांकडून कानावर हात ठेवले जात होते. परिणामी अनेकांना वाहने उभी करून नाईलाजास्तव बसनेच जावे लागले.

पर्यटक परतले माघारी

खासगी वाहनांना मज्जाव केला जात असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. तुम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता रस्ता का बंद केला, अशी विचारणा पोलिसांना केली जात होती. मात्र, पर्वणी अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने आणि रविवारीच या मार्गावर पर्यटक, भाविकांची अधिक गर्दी राहात असल्या कारणाने आज रंगीत तालिम सुरू केल्याचे पोलिसांकडून वाहनधारकांना सांगितले जात होते. शहर पोलिसांप्रमाणेच ग्रामीण पोलिसही विश्वासात घेत नसल्याने अनेक वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. वाहने उभी करून बसेसने जाण्याऐवजी त्यांनी मागे फिरणेच पसंत केले.

पुलिस के रवय्येसे हम दु:खी

पुलिस के रवय्येसे हम दु:खी है हे उद्गार आहेत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराजांचे. पोलिसांकडून साधूंची वाहनेही मोठ्या प्रमाणावर अडविली जात असल्याने हा कुंभमेळा कशासाठी आणि कोणासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रविवारी खंबाळे पार्किंगजवळ वाहने अडविण्यात आली. साधूंची वाहने तसेच त्यांच्यासाठी सामग्री घेऊन येणारी वाहनेही अडविण्यात आली.

सिंहस्थासाठी सुमारे पाच हजार पोलिस त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. पर्वणीच्या दिवशी त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी आहे, त्यांना कोणत्या पॉईंटला थांबायचे आहे हे माहीत व्हावे यासाठी आम्ही रंगीत तालीम सुरू केली आहे. रविवारी या भागात अधिक गर्दी होत असल्याने आजचा दिवस निवडण्यात आला. अन्य जिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांना त्र्यंबकेश्वरची भौगोलिक माहिती व्हावी, या परिसराशी त्यांची ओळख व्हावी यासाठी यापुढेही अशा प्रकारची रंगीत तालीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.

- डॉ. प्रवीण मुंडे, पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामघाटावर पोलिसांना सुरक्षेच्या टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या पोलिस व होमगार्डसच्या ४०० जवानांना तसेच १३ पोलिस अधिकाऱ्यांना पार्किंग, दसकचा गोदावरी घाट आदींची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे आणि सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

नाशिकरोडला बंदोबस्तासाठी अकोला, खंडाळा, वाशीम, यवतमाळ, अकोला, अमरावती, होमर्गाड नंदुरबार, जळगाव, बीड, परभणी आदी ठिकाणाहून पोलिस, होमगार्ड यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पवार तसेच पोलिस निरीक्षक आले आहेत. या सर्वांना १२ गाड्यांमधून कुंभमेळा मार्गाची माहिती करून देण्यात आली. प्रथम सर्वांना चिंचोलीच्या आऊटर पार्किंग येथे नेण्यात आले. तेथे धिवरे यांनी मार्गदर्शन केले. तेथून सिन्नरफाटा बाजार समितीच्या इनर पार्किंगला नेण्यात आले. तेथे झेंडे यांनी माहिती दिली. नंतर जेलरोडमार्गे दसक घाटावर हा फौजफाटा गेला. तेथे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पंढरीनाथ गायकवाड आदींनी मागदर्शन केले. बंदोबस्त कोठे व कसा, भाविकांचे मार्ग आदींची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉग स्कॉडतर्फे तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीला म्हणजे येत्या २९ ऑगस्ट रोजी देशभरातून सुमारे १.२० कोटी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असतांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देवळाली रेल्वे स्टेशनची सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बीडीडीएस (बॉम्ब शोधक पथक) आणि श्वान पथकाने तपासणी केली.

नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांच्या वतीने बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यात आली तर भुसावळ मंडळाच्या श्वान पथकाने सर्व रेल्वे स्टेशनची कसून तपासणी केली. यावेळी एपीआय व्ही. बी. भोये यांच्या सह पीएसआय नितीन अवधूत, के. डी. चव्हाण, 'अमर' नावाचा डॉग व त्याचे हेंडलर डी. सी. कोळी आदींसह सुमारे १० पोलिस कर्मचाऱ्यांनी देवळाली स्टेशनची तपासणी केली. देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन हे लष्करासाठी सर्वाधिक वेळा वापरले जाते. या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्यांना रात्रीचा थांबा देण्यात आला असल्याने सर्वच बाबींची तपासणी करणे अनिवार्य असल्याचे बंदोबस्त प्रमुख भोये यांनी सांगितले. सुमारे १ तास त्यांनी रेल्वे स्टेशनचा परिसर तपासला. यानंतर त्यांनी नाशिकरोड, ओढा रेल्वे स्टेशनचीही तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांसाठी अन्नदान करायचंय, कॉल करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'जनसेवा हीच, ईश्वर सेवा' असं म्हणत लोकांची सेवा करण्याची बरीच माध्यमे आपल्या समोर असताना 'अंश फाउंडेशन' आणि 'एम. आय. टी कुंभथॉन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'अन्नदान' या नावाने एक अनोखा उपक्रम पर्वणीच्या दिवशी चालवण्यात येणार आहे. 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे...' या उक्तीचा प्रत्यय नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थातील अन्नदानाच्या निमित्ताने पहायला मिळत आहे हे निश्चित. अशा मोठ्या सोहळ्याप्रसंगी दानधर्म केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, अशी आख्यायिका असल्याने दानधर्म करण्यासाठी चढाओढच लागते. त्यातच एक आहे

कुंभमेळ्यादरम्यान होणारे अन्नदान. सिंहस्था निमित्ताने नाशिकमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक येतात, मुक्काम करतात. या सर्वांची एकत्रितपणे जेवणाची सोय करणे प्रचंड अवघड असते. बरेच लोक उपाशी राहण्याची देखील शक्यता असते. याच उद्देशाने ही 'अन्नदान' नावाने एक सेवा पर्वणीच्या दिवसात नाशिकमध्ये चालवण्यात येणार आहे.

निराधारांसाठी नंतरही अन्नदान

सिंहस्थातील पर्वणीच्या दिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट, १३ आणि १८ सप्टेंबर या दिवसात सकाळी १० ते १२ या वेळात शहरातील पार्किंग आणि थांब्याची ठिकाणे येथे या अन्नदानाची सोय करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही अन्नदानाची सेवा कुंभमेळ्यानंतरही निराधार मुले आणि अनाथ आश्रमांसाठी अशीच अविरतपणे सुरू ठेवण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या लोकांपैकी कोणीही उपाशी राहता कामा नये, असा याचा मुख्य उद्देश आहे. अन्न विकत घेऊन खाऊ न शकणाऱ्या भुकेल्यांसाठी चांगल्या दर्जाचं आणि ताजं अन्न या संस्थांमार्फत पुरवण्यात येईल. या कुंभमेळ्याच्या काळात अनेकांना अन्नदान करण्याची इच्छा असते; परंतु ते नेमकं केव्हा, कसं आणि कुठे करावं आणि ते गरजू व्यक्तींपर्यंत जाईल का याची काळजी असते म्हणूनच हे अन्न तयार करण्यासाठी नाशिकमधील महिला बचत गटांमार्फत मदत घेतली जाणार आहे की जेणेकरून त्यातील महिलांना सुद्धा रोजगार मिळू शकेल. तसेच पर्वणी काळात ज्या लोकांना अन्नदान करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम म्हणजे नक्कीच एक चांगलं व्यासपीठ ठरणार आहे.

अन्नदान कसे कराल?

अन्नदान करण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी ९५५२१३७९४८ किंवा ९९६००१४५४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. अन्नदान उपक्रमाशी निगडीत असलेले प्रतिनिधी त्वरित आपल्याला अॅप्रोच होतील किंवा www.annadan.co.in या वेबसाइटवर देखील इच्छूकांना संपर्क साधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपिलाची माहिती प्रतिसादवरही उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

अपिल प्रकरणातील आवश्यक माहिती, सुनावणीची तारीख सध्यस्थितीसह देण्यासाठी प्रतिसाद ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. नाशिक विभागातील पक्षकार, नागरिक, वकिल आदींनी त्याचा लाभ होणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्तांकडील अपिल प्रकरणातील आवश्यक माहिती, सुनावणीची तारीख यांची माहिती देण्यासाठी प्रतिसाद प्रणाली विकसित करण्यात आली आहे. पालकमंत्री महाजन व विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याहस्ते तिचे उदघाटन करण्यात आले. अमेरिकेतील जान हापकिन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलेल्या श्रीकांत निबांळकर आणि केदार निंबाळकर यांनी ही प्रणाली तयार केली आहे. अपर विभागीय आयुक्त आर. जी. कुलकर्णी, उपायुक्त सतीश देशमुख, विवेक गायकवाड, प्रकास वाघमोडे, एस. डी. बनसोडे आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्कालीन परिस्थितीत ‘अॅनॉनिमस अॅप’ची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घात अपघात गुन्ह्यांपासून तर आग अन् भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींसारख्या प्रसंगात मित्रासारखे मदतीस धावून येणारे अॅनॉनिमस अॅप मूळ नाशिककर असलेल्या अन् सध्या अमेरिकेत स्थित असलेल्या नितीन देशमुख या तरुणाने विकसित केले आहे. नितीन यांचे हे संशोधन ऐनवेळी उद्भवलेल्या आपत्तीशी दोन हात करणाऱ्या जगातील असंख्य नागरिकांसाठी उपकारक ठरणार आहे.

अटीतटीच्या प्रसंगात क्षणार्धात नागरिकांची मदतवाहिनी बनणारे हे अॅप गुगल प्ले वरही विनामूल्य उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आपल्या भोवताली चालणाऱ्या बऱ्या घडामोडी किंवा आपत्कालीन प्रसंगांची माहिती संबंधित यंत्रणा किंवा व्यक्तीला अॅपद्वारे देताना माहिती देणाऱ्याचा तपशील मात्र गुप्तच राहतो. हे अॅप वापरताना युजर्सचा ग्रुप किंवा फ्रेण्ड सर्कल असण्याचे बंधन नाही. वापरकर्त्याच्या परिघातील इतर युजर्सनाही याव्दारे तातडीची माहिती पोहचवली जाऊ शकते. आव्हानाच्या प्रसंगांला तोंड देताना आपण उपस्थित असलेल्या जागेचा अन् समस्येचा तपशील फोटोग्राफी अन् व्हीडियोद्वारेही इतर युजर्सना पोहचविता येतो.

कुंभमेळ्यात ठरणार लाभदायी

नितीन देशमुख यांनी बनविलेले हे अॅप नाशिकच्या कुंभमेळ्यात अधिकाधिक उपकारक ठरू शकेल. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला विविध अटीतटीच्या प्रसंगात मदत यंत्रणेशी जोडून ठेवू शकेल. या अॅप वापराच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेच्या मुद्यावर भरीव काम करता येणे शक्य आहे. यामुळे हे तंत्रज्ञान पोलिस, अग्निशामन दल आणि रुग्णालयांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणांसोबत जोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे देशमुख यांच्या भगिनी मनीषा शेळके यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. नाशिकमध्ये कुंभात या अॅपचा विशेष उपयोग होण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आपत्कालीन प्रसंगांपासून तर सामाजिक हितासाठीचे अनेक मुद्दे नागरिकांच्या दृष्टीपथात असतात. मात्र, माहिती पुरविताना आपले नाव सामोरे न येण्याची अनेकांची इच्छा असते. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांची ही इच्छा साधणे शक्य होईल. कुंभातही नागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप उपकारकच ठरेल.

- नितीन देशमुख, जॅक्सनविल, अमेरिका (मूळ नाशिककर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images