Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आभाळच छप्पर अन् भुईचा आसरा!

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

खपाटी गेलेले पोट, दोन पैसे मिळतील अशी नरजेतील अपेक्षा आणि जिंकण्यासारखे काहीच नाही​ अशी वृत्ती असलेले, भगवे वस्त्र परिधान केलेले साधू साधूग्राममधील रस्त्यांवर पावलोपावली दिसतात. आभाळाचे छप्पर आणि भुईचाच आसरा मानणाऱ्या या समूहाच्या काही अपेक्षा आहेत. हजारोंच्या संख्येत असूनही प्रशासन, आखाडे आणि खालशांच्या नजरेत त्यांची किंमत शुन्यच ठरते.

साधूग्राममध्ये आखाडे, खालसे आणि धार्मिक संस्थाशी संबंधित बोटावर मोजण्याइतपत साधू महंत आलेले असताना या भटक्या साधूंची संख्या हजारात होती. मिळेल ती जागा काबीज करायची. कोणी हाकलले की पुढची जागा शोधायची. एखाद्या अन्नक्षेत्रात मिळेल ते पदरात पाडायचे असा या भटक्या साधूंचा शिरस्ता. एकीकडे ३२५ एकर जागा कमी पडत असल्याचा दावा करणारे आखाडे आणि दूसरीकडे पाच फुट जागेसाठी एकमेकांशी भांडत असलेले भटके साधू हे या कुंभमेळ्याचे परस्परविरोधी चित्र स्पष्ट करते. भटक्या साधूंची संख्या किती असू शकते, याची निश्चित माहिती प्रशासनाकडे नाही. तसेच त्यांना निवारा व इतर सुविधा पुरविण्यासाठी कायदेशीर तरतूद नसल्याचे महापालिकेच्या सिंहस्थ सेलचे एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर जी. एम. पगारे यांनी सांगितले. आखाडे, खालसे आणि धार्मिक संस्था वगळता इतरांना जागा देता येणार नाही, असे पगारे यांनी सांगितले. गरज म्हणून भगवे कपडे घातलेले, कुंभमेळ्याबरोबरच फिरणारे हे लोक दिवसभर तपोवनातील रस्त्यांच्या कडेला ठाण मांडून असतात. रात्रीच्या सुमारास औरंगाबादरोडवरील परमहंसदास महाराजांच्या तंबूत जातात. याशिवाय अन्य दुसरा पर्याय नसल्याचे उत्तर प्रदेशमधून आलेल्या चंद्रदास यांनी सांगितले.

भटकंती हीच आमची गरज. ज्या वेळेस अन्न मिळेल, त्या वेळेस आम्ही ते खातो. तसेच झोपण्याची वेळ होईल, तिथे जागा शोधून झोपतो. आम्ही बॅगा बनवतो आ​णि त्या विकतो. - मुन्शिदास, सदगुरू कबीर आश्रम, कानपूर

पटण्यामध्ये आम्ही हनुमान मंदिरात राहतो. तिथे आमच्या जेवणाची व झोपण्याची व्यवस्था होते. सध्या आम्ही पंचवटी व साधूग्राममध्ये भटकतो. एखादा निवारा मिळेल, याचा सातत्याने शोध घेतो. - गिरीजादेवी, पाटणा, बिहार

खूप दूरपर्यंत फिरायचे असते. त्यामुळे आमच्याकडे अन्न ठेवावेच लागते. आम्हाला फक्त निवाऱ्याची​ आवश्यकता आहे. पोलिसही सातत्याने त्रास देतात.- चमरूदास, बिहार

आम्ही वृध्द असून खूप दूरवरून आलो आहोत. आम्हाला निवाऱ्यांची गरज आहे. माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठिक नाही. आम्हाला त्याचीही काळजी घ्यावी लागते. - शांतीदेवी, बिहार

भटकंती हेच आमचे जीवन आहे. सतत भटकंती करूनच आमचे आयुष्य सरते. जिथे जातो, तिथे निवारा शोधतो. - नंदीदास, माधेपुरा, बिहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस झाले सजग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहशतवादी हल्ला, गुन्हेगारी, बंडखोरांचा वावर अशा पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सजग झाली आहे. परराज्यातील गुन्हेगार डोकेवर काढत असून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. सिंहस्थ कुंभमेळ्यात परराज्यातील गुन्हेगारांना रोखण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी परराज्यातील पोलिस (स्पॉटर) दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साधूग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधू महंताकडे चारचाकी वाहने आहेत. भाविकांची वर्दळ वाढली असून त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून आतील रक्कम पळवण्याच्या एक दोन घटना नुकत्याच घडल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी परराज्यातील टोळी जेरबंद केली. कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी १० हजारापेक्षा जास्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असून त्यांना त्यांच्या भागातील गुन्हेगारांची माहिती आहे. मात्र, परराज्यातील गुन्हेगारांबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ असून त्यांना रोखण्यासाठी त्याच राज्यातील पोलिसांची मदत पोलिसांना घ्यावी लागणार आहे. अशा पध्दतीने मदतीला येणाऱ्या परराज्यातील पोलिसांना स्पॉटर म्हणतात.

हे स्पॉटर २४ ऑगस्टपर्यंत येतील, अशी अपेक्षा स्थानिक पोलिसांना आहे. स्पॉटरच्या मदतीने परराज्यातील गुन्हेगारांना ओळखणे, त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होईल, असा दावा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला. सध्या, पर्यटक, साधू, साधूंचा भक्त म्हणून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणे शक्य नाही. संशयित नेमकी याचाच फायदा घेत असून स्पॉटरच्या मदतीने त्यांना रोखू, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक एकत्र जमले असून दहशतवादी हल्ला, समाजकंटकाचा वावर, बंडखोरांची उपस्थिती आदी मुद्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या असून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व इंटलेजिन्स संस्था काम करीत असल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सुरक्षेची तालीम

कुंभमेळ्यानिमित्त भाविकांसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उपलब्ध केलेल्या सुविधांची पाहणी भुसावळ रेल्वे मंडळाचे अप्पर प्रबंधक जनककुमार गर्गे यांनी बुधवारी केली. कुंभमेळ्यासाठी दाखल झालेल्या विशेष रेल्वे अम्ब्युलन्स व्हॅनमध्ये जखमी अथवा आजारी भाविकांवर उपचाराची रंगीत तालीम यावेळी सादर करण्यात आली. वरिष्ठ मंडल प्रबंधक (वाणिज्य विभाग) मनोजकुमार गांगेय, दूरसंचार वरिष्ठ मंडल प्रबंधक अनुपकुमार सोनी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंप्रीकर, विद्युत विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक एन. जे. निमजे, डी. के. गजभिये, मंडल सुरक्षा आयुक्त चंद्रमोहन मिश्र, स्टेशन प्रबंधक सक्सेना, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बी. डी. इप्पर, चंद्रशेखर भाबल आदी उपस्थित होते. गर्ग यांनी चौथा प्लॅटफार्म, नवीन पादचारी पूल, मालधक्का, तिकीट बुकींग कार्यालय, रेल्वे अम्ब्युलन्स व्हॅन आदींची पाहणी केली. सुरक्षा व अन्य गोष्टींबाबत त्यांनी विशेष सूचना केल्या.

कनकरत्नमांचा आज दौरा

लोहमार्ग पोलिसांचे अप्पर पोलिस महासंचालक कनकरत्नम हे बुधवारी (दि. १९) हे सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. पोलिस अधक्षक अनंतकुमार रोकडे (नागपूर), उपअधीक्षक नारायण खैरे, ए. झेड. खान, माधुरी कांगणे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

कुंभ भाविकांसाठी व्हील चेअर्स

नाशिकमधील सतरा रोटरी क्लबनी मिळून नाशिकरोड रेल्वे स्टेशनला ८ व्हील चेअर्स भेट दिल्या. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या वृद्ध, अपंगसारख्या भाविकांना त्यांचा मोठा आधार होणार आहे. नाशिक नॉर्थचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांच्या मदतीने या व्हील चेअर्स देण्यात आल्या. यावेळी रोटरीच्या पदाधिकारी रुपाली जायखेडकर, रेल्वे स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक गोसावी, डॉ. आवेश पलोड, विवेक जायखेडकर आदी उपस्थित होते.

नाशिक-नांदेड दरम्यान १२ विशेष जनरल रेल्वे

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त मध्य रेल्वेने नाशिकरोड-नांदेड दरम्यान १२ जनसाधारण विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना द्वितीय श्रेणीचे कोचेस असतील. मध्य रेल्वेने कुंभसाठी सोमवारी १२८ अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले होते. नाशिकरोड-नांदेड दरम्यान ०७९२६ ही गाडी नांदेडहून २५ व २८ ऑगस्ट तसेच १२, १७ व २४ सप्टेंबरला २२ वाजता सुटेल. या गाडीच्या सहा फेऱ्या होतील. नाशिकरोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल. ०७९२७ ही गाडी नाशिकरोडहून १९, २६ व २९ ऑगस्ट आणि १३, १८ व २५ सप्टेंबरला २२.५० वाजता सुटेल. या गाडीला ओढा, लासलगाव, मनमाड, नगरसूल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतुर, सेलू, मानवटरोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा मिळेल.

व्हायरल फिव्हरने साधू-महंत हैराण

वातावरणातील बदलाचा फटका साधू महंताना बसतो आहे. अनेक साधू- पर्यटक व्हायरल फिव्हरने हैराण असून दिवसभरात १ हजारापेक्षा जास्त साधूंना तसेच त्यांच्या अनुयायींना तपासले जाते आहे. महापालिकेने साधूग्राममध्ये एक हॉस्पिटल तसेच सेक्टरनुसार तपासणी केंद्र उभारले आहेत.

ध्वजारोहण संपन्न

साध्वी त्रिकाल भवंता यांच्या परी आखाड्याचे ध्वजारोहण मंगळवारी पार पडले. यावेळेस अवघ्या ४० साध्वी हजर होत्या. महंत ग्यानदास यांच्याशी वाद झाल्यानंतर भवंता यांनी ध्वजारोहण थाटामाटात करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात अत्यंत साध्या पध्दतीने हा सोहळा पार पडला. महिला साध्वींना कमी दाखवण्यासाठी सर्व प्रयत्न होत असून याविरोधात आपण आंदोलन करू, असे भवंता यांनी स्पष्ट केले.

परप्रांतीयांचा ओघ वाढला

ध्वजारोहणासाठी वेगवेगळ्या राज्यातील साधू महंत साधूग्राममध्ये दाखल झाले आहेत. या साधू महंतासोबत त्यांचे अनुयायी, भक्त सुध्दा येत असून यानिमित्ताने साधूग्राममध्ये परप्रांतीयांचा ओघ वाढल्याचे दिसते. आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर साधूग्राममधील निवासींच्या संख्येत वाढ होईल.

धार्मिक संस्थांमध्ये गर्दी

आखाडे, खालसे यांच्यासमवेत धार्मिक संस्थामधील महंतांची उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. धार्मिक संस्थांसाठी औरंगाबाद हायवेलगत जागा देण्यात आली असून जेजूरकर मळे परिसरात सुध्दा धार्मिक संस्थांचे तंबू उभे राहिले आहेत. मारुती वेफर्सच्या कॉर्नर लगत मोकळ्या जागेत सेक्टर चार असून तेथेही अनेक धार्मिक संस्था सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

कार्यक्रमांची रेलचेल

आखाड्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लागलीच प्रवचने, धार्मिक विधी, महंताई, यज्ञ असे कार्यक्रम सुरू होणार आहेत. या कार्यक्रमांना येणाऱ्या भाविकांसाठी अन्नक्षेत्र उघडले जातील.

शाही मार्गावर बॅरिकेडींग

शाही मार्गावरील रस्त्यावर बॅरकेडींग करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. सध्या काट्या मारुती चौकातील रस्ता बल्ली बॅरिकेडींगने बंद करण्यात आला आहे. जाण्याच्या आणि परतीचा मार्ग वेगवेगळा ठेवण्यासाठी उपाय करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा चोरणा-यास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शंभराच्या बनावट नोटांची बॅग चोरणाऱ्याला मंगळवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. नाशिकरोड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर भांबल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मांगुलाल पारधी तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बर्नाला (पंजाब) येथे शंभरांच्या बनावट नोटा पोलिसांना सापडल्या होत्या. शंभराच्या अडीच लाख रूपयांच्या नोटांची बॅग घेऊन पंजाब पोलिस नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये आले. तेथे बनावट नोटांची खातरजमा करुन ते नाशिकरोड रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलावर थांबले असता हरशिद रशीद खान (३३, हैदरपुरा, सरकारी हास्पीटलमागे, अमरावती) याने दोन साथीदारांसह ही बॅग पळवली. अमरावतीला गेल्यावर संशयितांमध्ये भांडण झाले. १२ ऑगस्टला खान नोटा घेऊन देशीदारुच्या दुकानात गेला. मद्यपानानंतर त्याने शंभराच्या नोटा दिल्यावर त्या बनावट असल्याने दुकानदाराने पोलिसांना कळवले. अमरावती कोतवाली पोलिसांनी खानला शंभराच्या २२ नोटांसह अटक केली. बॅग चोरीप्रकरणी नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांकडे त्याला वर्ग करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली. त्याचे दोन साथीदार आणि उर्वरित नोटांचा तपास सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ते' गुन्हे सरकार मागे घेणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हरसूलमधील आदिवासी समाजाचा उद्रेक हा कोणत्याही जातीय समूहाविरोधात नसून, प्रशासकीय यंत्रणे विरोधात आहे. त्यामुळे आदिवासींवर दाखल झालेले दंगलीचे गुन्हे चुकीचे आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आपण राज्यसरकार विनंती करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी दिली आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

मंगळवारी सावरा यांनी हरसूलला भेट देऊन दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आदिवासींसोबत चर्चा करत, झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आदिवासींच्या मेळाव्यात बोलताना सावरा यांनी आदिवासींनी केलेला उद्रेक हा कोणत्याही समाजाविरोधात नव्हता.

हा उद्रेक शासकीय यंत्रणेवरचा आहे. यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार असून, त्यांना हे गुन्हे मागे घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या दंगलीत अटकेत असलेल्या ६४ आदिवासी बांधवाची मुक्तता करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीप्रकरणी एकास अटक

$
0
0

नाशिक : सातपूर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास पकडून डॉक्टरने पोलिसांच्या ताब्यात दिले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. विलास जाधव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तर इतर साथीदार अक्षय भारती, दत्तु दंडगव्हाणे, शरद पाटील हे तिघे पसार झाले आहेत. डॉ. सुदाम चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. ते श्रावणी सोमवारनिमित्त पत्नीसह मंद‌िरात गेले होते. ते तेथून परतले तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा संशयित जाधव घरातून बाहेर पडताना दिसला. चौधरी यांनी त्याला पकडले. चौधरी यांच्या पत्नीनेही एका चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या हातावर कोयत्याने वार करून पलायन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा होणारच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वाद सुरू आहे. मात्र यावर प्रदेश भाजप राज्य सरकारच्या पाठीशी उभी आहे. राज्य सरकारने सर्व बाबींचा विचार करूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असून, उद्याचा पुरस्कार वितरण सोहळा कोणत्याही परिस्थितीत होणारच.' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीत कोणतेही साटेलोट नसून, ठाकरे घराणे राजकारणात कोट्या करण्यात पटाईत असल्याचा टोला दानवेंनी लगावला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी रावसाहेब दानवे नाशिकमध्ये दाखल झाले असून, पत्रकारांशी बोलताना त्यांनी, राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे. मात्र त्यांनी वादविवाद करण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रात चांगले काम करावे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. सरकारचा पुरस्कार देण्याचा निर्णय योग्यच असून, कोणत्याही परिस्थितीत त्या पुरस्काराचे उद्या वितरण होणार असा दावा त्यांनी केला आहे. राज ठाकरेंनी भाजपवर केलेल्या आरोपांवर बोलतांना, दानवेंनी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कोणतेही साटेलोट नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आमची राष्ट्रवादीशी कोणतीही छुपी युती नाही, मात्र राजकारणात अशा कोट्या करण्यात ठाकरे घराणे पटाईत असल्याचा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

विविध संघटनांचे आंदोलन

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, या मागणीसाठी जिल्ह्यातील काही संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला. महाराष्ट्र भूषण हा सर्वाच्च पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पुरंदरे यांना हा पुरस्कार दिला जाऊ नये यासाठी जिल्ह्यातील काही संघटना एकवटल्या असून, त्या आक्रमक झाल्या आहेत. संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड, अखिल भारतीय छावा युवा संघटना, जितेंद्र आव्हाड फाऊंडेशन, पीपल्स रिपब्लीकन पार्टी अशा संघटनांचे कार्यकर्ते सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित आले. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. तरीही राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पुरंदरे तसेच फडणवीस यांच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. अजिज पठाण, शशी उनवणे, बाळा दराडे, आशिष हिरे, राहुल तुपलोंढे, किरण लोंढे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

योग्य व्यक्तीला पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हा सरकारचा अधिकार आहे. ते योग्य व्यक्तीला पुरस्कार देत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी वाणी व लेखणीने शिवाजी महाराज जनसामान्यांपर्यंत व घराघरामध्ये पोहोचविले. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळणे योग्यच आहे. - विनायकदादा पाटील, माजी मंत्री, वनाधिपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहू वाहनांना मज्जाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाहीपर्वणीच्या कालावधीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून, वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्याचे विशेष पोल‌िस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) (क) तसेच मोटार वाहन कायदा कलम १९८८ च्या कलम ११५ अन्वये मालवाहतूक वाहनासंबंध‌िची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात पर्वणीच्या दोन दिवस आधीपासून ते पर्वणीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी ठेवण्यात आली आहे. अशा वाहनांना पर्यायी मार्गही ठरविण्यात आले आहेत. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेड‌िकल ऑक्स‌िजन, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मात्र हे नियम शिथील ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर-पालघर महामार्ग मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाला जोडण्यासाठी केंद्र सरकारने सिन्नर-पालघर असा नवा राष्ट्रीय महामार्गाला मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. या महामार्गामुळे आदिवासी भागाचा विकासाला चालना मिळणार आहे. सद्यस्थितीत अस्त‌ित्वात असलेल्या पाच राज्यमार्गांचे महामार्गात रुपातंर केले जाणार असून, नवा १७८ किलोमीटरचा चौपदरी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असून, यासाठी ११५२ कोटींचा खर्च येणार आहे. या महामार्गामुळे गुजरातचे अंतर कमी होणार आहे.

हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारकडे शिर्डी ते वापी असा नवा राष्ट्रीय महामार्ग करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत, भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 'रिइनफोर्सिंग द लाईफलाईन ऑफ इकॉनॉनिक ग्रोथ' या आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये या नवा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित केला आहे. त्यात बदल करण्यात आला असून, सिन्नर-घोटी-त्र्यंबकेश्वर-जव्हा-मोखाडा-विक्रमगड- पालघर असा नवा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. १७८ किलोमीटरच्या या अंतरात पाच राज्यमार्गांचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात येणार आहे. ३, ७३,७६,२९,१६० या पाच सध्याच्या राज्यमार्गांना चौपदरी करण्यात येणार असून, त्यासाठी ११५२ कोटीचा खर्च येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, लवकरच त्याच्या कामालाही सुरूवात होणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे. या नव्या महामार्गामुळे आदिवासी भागाचा विकासाला चालना मिळणार आहे.

नव्या केंद्रीय महामार्गामुळे गुजरातला जाण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत असलेल्या पेठचा रस्ता खराब आहे. त्यामुळे हा नवा रस्ता पूर्ण झाल्यास जव्हार मोखाडा मार्गे तातडीने मुंबई-अहमदाबाद रस्त्यावर पोहचता येणार आहे. त्यामुळे वापी, सुरत, अहमदाबाद जाण्याऱ्यांसाठी तातडीचा रस्ता म्हणून हा मार्ग समोर येणार आहे.

सिन्नर-पालघर या नव्या रस्त्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेरीस त्याला आता मंजुरी मिळाली असून, आदिवासी भागातील विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. आदिवासी भागात रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. या राष्ट्रीय महामार्गाचा यासाठी उपयोग होईल. - हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्राक्षप्रक्रिया उद्योगावरच घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय द्राक्षप्रक्रिया मंडळाचे (आयजीपीबी) अस्तित्व संपुष्टात येण्याने बेदाणा, वाइन आणि एकंदरीतच द्राक्षप्रक्रिया उद्योगावरच विपरित परिणाम होणार आहे. शेतीपूरक धंद्यांची जोड जोवर दिली जात नाही, तोवर कृषी समस्या आणि खासकरून शेतकऱ्यांपुढील अडचणी दूर होणार नसल्याचे मत या क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

केंद्रात यूपीएची सत्ता जाऊन भाजपप्रणित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या कार्यान्वित आहे. मंडळ कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक त्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता होती. त्यानुसार मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष जगदीश होळकर यांनी कृषी प्रक्रिया उद्योग मंत्री हरमितसिंग कौर-बादल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मंडळ सुरू ठेवण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमडळासमोर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, यावर कुठलाही निर्णय न झाल्याने अखेर मंडळाला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. सरकारने पुणे येथील कार्यालयही गेल्या मार्च अखेरीस बंद केल्याचे होळकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

वाइन म्हणजे काय, भारतीय वाइनचे वेगळेपण काय असेल, तिची गुणवत्ता कशी असावी, त्या-त्या भागात उत्पादित होणाऱ्या वाइनचे वैशिष्ट्य जपताना तिला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करणे, वाइनच्या द्राक्षाच्या नवनवीन जातींची लागवडीला प्राधान्य देणे, अशा कितीतरी बाबी मंडळाच्या माध्यमातून केल्या जात होत्या.

भारतात १०० ते १५० रुपये किलो दराने बेदाणा विक्री होतो. मात्र, आफ्रिका, टर्की, अमेरिका येथील काही बेदाण्याला हजार ते दीड हजार रुपयांचा भाव मिळतो. या बेदाण्याची भारतात लागवड करता येईल का, देशांतर्गत द्राक्षप्रक्रिया उद्योगाला बळ देवून कृषी विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होता. मात्र, आता हे सारेच कागदावर राहिल्याचे मत वाइन उद्योजक राजेश जाधव यांनी व्यक्त केले आहे.

परदेशी तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचा लाभ द्राक्षप्रक्रिया उद्योगाला होणे आवश्यक आहे. मंडळ नसण्यामुळे देशांतर्गत वायनरींच्या विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे परदेशी वाइन मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत येईल. यातून भारतीय गंगाजळी परदेशात जाईल. - जगदीश होळकर, माजी अध्यक्ष, आयजीपीबी

कर्नाटकच्या धरतीवर महाराष्ट्राने आता द्राक्ष प्रक्रिया मंडळ स्थापन करायला हवे. द्राक्षप्रक्रिया उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा होतानाच मंडळाने या उद्योगाच्या विकासासाठी कार्य करायला हवे. - प्रदीप पाचपाटील, वाइन उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज फडकणार धर्मध्वजा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगात सर्वाधिक भाविकांचा सहभाग असणाऱ्या धार्मिक महोत्सवांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे आज, बुधवारी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी साधुग्राम येथे ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार असून, साडेदहा वाजेच्या सुमारास भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

देश-विदेशातील साधू, महंत आणि भाविकांचे लक्ष वेधलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पहिले ध्वजारोहण १४ जुलै रोजी झाले. आजचे ध्वजारोहण तीन प्रमुख आखाड्यांचे असून यानंतरच सिंहस्थ कुंभमेळ्यास खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. नाशिकमध्ये दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा आणि निर्वाणी अनी आखाडा असे प्रमुख तीन आखाडे असून, ७०० च्या जवळपास खालसे आहेत. साधुग्राममध्ये किमान ३ लाख २० हजारांपेक्षा अधिक साधूमहंत हजर राहतील. साडेदहा वाजेच्या सुमारास अमित शहा, पालकमंत्री गिरीश महाजन आखाडा प्रमुखांची भेट घेतील.

असे आहेत धर्मध्वज

ध्वजारोहणाचा कार्यक्रम तीन आखाड्यांमध्ये होणार असून प्रत्येक आखाड्यामध्ये ५४ फुटाचे खांब रोवण्यात आले आहेत. २५ फूट लांब, १० फूट रूंद असा हा ध्वज असून त्याच्या दोन्ही बाजुला खास रेशमी धाग्यांनी विणलेले हनुमान देवता विराजमान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभुतीसाठी अमेरिकेतून आला!

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

अमेरिकेतील लॉस एंजिल्स शहरातील एक तरूण अद्वैत तत्वज्ञानाच्या संकल्पनेने भारावतो. अद्वैताच्या अनुभूतीसाठी संपत्ती अन् आप्तेष्ठांचाही क्षणार्धात त्याग करून भारतात तीर्थक्षेत्र ह्रषिकेशच्या कुशीत त्याची ज्ञानसाधना सुरू होते. दोन वर्षे अद्वैताच्या पायाभूत संकल्पना समजावून घेताना केवळ एका अनुभूतीसाठी ऐन तारूण्यातील ख्रिस बेकर सध्या नाशिकमधील कुंभासाठी बांधण्यात आलेले घाट पालथे घालतो आहे.

जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलविणारी अन् 'फिल्मी दुनियेत' शोभावी अशी ही कहाणी आहे अमेरिकेतील ख्रिस बेकर या तरूणाची. युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजिल्सचा इतिहास विषयाचा पदवीधर असणारा हा तरूण योगायोगाने मेडिटेशनच्या प्रेमात पडला. भारतीय योगगुरूंच्या माध्यमातून ध्यानाचे धडे गिरविताना भारतीय अध्यात्माच्या संकल्पनांविषयी त्याच्या मनात उत्सुकता जागरूक झाली. ह्रषिकेश येथील योगाचार्य शांती धर्मानंद यांच्या मांडणीकडे आकृष्ट होत ख्रिस १९ महिन्यांपासून त्यांच्या आश्रमाचा साधक बनला आहे. आद्य शंकराचार्यांनी मांडलेल्या 'अद्वैत तत्वज्ञान' या विषयाच्या अभ्यासासाठी ख्रिसने भौतिकतेचे पाश साधन ूसाधनेच्या दीड वर्षाच्या टप्प्यात त्याने आद्य शंकराचार्यांची अद्वैतविषयक प्रकरणे अभ्यासली. यात 'आत्मबोध', 'तत्वबोध', 'वाक्यवृत्ति', 'अपरोक्षानुभूती' ही पायाभूत प्रकरणे तर अद्वैत तत्वज्ञानाचा सार मांडणारा 'विवेक चूडामणी' यासारख्या ग्रंथांच्या अभ्यासाने अज्ञात ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी अध्यात्मातला 'अ' देखील ठाऊक नसताना अत्यल्प कालावधीत अनुभवलेलं परिवर्तनही त्याच्या पक्व मनाची उदार कवाडे दर्शवून जाते.् अध‌कि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ख्र‌सि लवकरच 'संस्कृत' आणि 'हिंदी' शिकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधूंमध्ये उत्साह; भाविकांनी फिरवली पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सूर्यदेवाचा सिंह राशित प्रवेश होताच आज खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुंभमेळ्याचे पर्व सुरू झाले. १२ वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिंहस्थ पर्वाची सुरुवात साधू-महंतांना आनंद देणारी ठरली. त्याचा थोडा बहुत प्रत्यय आखाड्यांमध्ये दिसून आला. मात्र, मुख्य रस्त्यावर भाविकांचा वानवा होता. दूर अंतरावर झालले बॅरिकेडिंग, पायपीट यामुळे भाविकांनी ध्वजारोहण सोहळ्यापासून लांब राहणे पसंत केले.

बुधवारी पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पोलिसांनी चारीबाजूंनी नाकाबंदी केली. तसेच मोठा बंदोबस्त तैनात केला. याची चुणचूण लागलेल्या नाशिककरांनी पायपीट व पार्किंगचा त्रास होण्याची शक्यता यामुळे घरातच बसणे पसंत केले. याचा परिणाम तपोवनात जाणवला. आखाड्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमास साधू वगळता सर्वसामन्य व्यक्ती पोहचल्याच नाही. एका ढोल पथकाचा आणि पहाटेच्या संगीत कार्यक्रमचा अपवाद वगळता सर्वत्र शांतता होती. हे मुख्य रस्त्यावरील ​चित्र साधुग्राममध्ये आणखी गडद होत गेले. सेक्टर दोन, तीन आणि चारमध्ये निरव शांतता पसरली होती. पोलिस प्रशासनाने मात्र आपल्या नियोजनाचे समर्थन केले.

सभामंडपही रिकामा

अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेसाठी पाच हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन हजारांच्या आसपास श्रोते उपस्थित राहिले.

जगदगुरूंची अनुपस्थिती

आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास चार जगदगुरूपैंकी एकानेही हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे चारपैकी दोन ते तीन जगदगुरू साधुग्राममध्ये वास्तव्यास आहेत. जगदगुरू ध्वजारोहण सोहळ्यास हजर का राहिले नाहीत, याचे उत्तर आता देणे शक्य नसल्याचे आखाड्यात उपस्थित साधू महंतांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्म व्यवस्थेवर आजही हस्तक्षेप

$
0
0

नाशिक : धर्म व्यवस्थेवर राजकारण्यांचा हस्तक्षेप आहे हे नाकारून चालणार नाही. अनादी काळापासून तो आहे. राजकारण आणि धर्मकारण यात सत्यता असणे गरजेचे आहे. धर्मात सत्त्यता आहे. मात्र राजकारणात येणे गरजेचे असल्याचे मत वल्लभरायजी महाराज यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळा हा वैश्विक सोहळा आहे. यात संत, महात्मे, पंडित एकत्र येत असतात. देशातीलच नव्हे तर विदेशातील नागरिकांचे देखील याकडे लक्ष लागलेले असते. राजकारण हे धर्माला धरून असले पाहिजे. त्यात अर्धमाचा शिरकाव व्हायला नको. तो झाला तर त्याचा परिणामा मानवी जीवनावर होऊन ऱ्हास होण्यास सुरुवात होते. राजराकारण धर्माला अनुसरून असले तर त्या देशाचा विकास झाल्याचे उदाहरणे आपल्या समोर आहेत. मात्र धर्माला अनुसरून राजकारण न झाल्यास त्याचे दुष्परिणाम देखील आपण भोगले आहेत. भारतात होणारा कुंभमेळा विश्वाला मार्गदर्शक ठरावा असा सोहळा आहे. युगानु युगे हा सोहळा होत आहे. चांगल्या कामाला राजकारणाची मदत मिळाल्यास त्याचे काय होऊ शकते हे नाशिक सुभ मेळा ज्वलंत उदाहरण असल्याचे वल्लभरायजी महाराज म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभ सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

कुंभमेळा हा ईश्वराचा मेळा आहे. कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कुंभमेळ्यात साधू-संतांच्या पावनस्पर्शाने सकारात्मक ऊर्जा तयार होईल. देशावर तसेच राज्यावर संकट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी लागणारी शक्ती साधू-संतांच्या आशीर्वादाने निर्माण होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये काही कमतरता राहिल्यास साधूंनी माफ करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथे नाथपंथीय आश्रमात श्री नवनाथ महाराज व ८४ सिध्द मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच गोरक्षनाथ धुनी मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार महंत चंदनदास, खासदार योगी आदित्यनाथ, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, स्वामी सागरानंद सरस्वती, महामंत्री हरिगिरी महाराज, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महंत सुरेशराम, नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी तसेच विविध आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा नियोजनाचे तसचे पालकमंत्र्यांचे विशेष कौतुक केले. तसेच घाटांची निर्मिती सुंदर झाली असल्याचे नमूद करीत रिंगरोड घाटास नवनाथ घाट असे नामकरण केले. त्याचप्रमाणे तेथील चौकास गोरक्षनाथ चौक असे घोषित केले.

अमित शहा म्हणाले की, शाश्वत हा शब्द कुंभमेळ्यासाठीच निर्माण झाला असावा. कारण या विश्वात अनादी काळापासून कुंभमेळा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती उपसनेनेच इश्वर भक्तीचा मार्ग शोधत असते. नाथसंप्रदाय हा आदी संप्रदाय आहे. हिंदू धर्मावर आक्रमण झाली तसे जगात इतरांबाबत देखील झाले आहे. अर्थात हिंदू धर्म आपल्या वैभवासह टिकून राहिला हे त्याचे विशेषत्त्व आहे. कुंभमेळ्यात जगातील ८० देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक भाविक सहभागी होतात असे सांगतानांच शहा यांनी येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कामाचे श्रेय दिले पाहिजे, असे सांगितले. भाजपने प्रचाराचा प्रारंभ उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या आश्रमात केला. यूपीमध्ये ७३ जागा मिळाल्या म्हणून भाजपास सत्ता मिळाली असेही, त्यांनी नमूद केले.

खासदार योगी आदित्यनाथ यांनी प्रास्ताविक केले. नागपंचमीस होणाऱ्या झुंडी कार्यक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे सकाळी अकरा वाजता आगमन झाले. नवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ध्वजापूजन करून शिलावरण केले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस विभागीय आयुक्त जे. जे. सिंग, जिल्हा अधीक्षक संजय मोहिते तसेच मेळाधिकारी रघुनाथ गावडे, महेश पाटील, उदय किसवे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदी उपस्थित होते.

नवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारी साधू तसेच स्थानिक भाजप पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित होते. यामध्ये प्रांतसदस्य तथा विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, शहराध्यक्ष उदय दीक्षित, उपाध्यक्ष शामराव गंगापुत्र, शिवसेनेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार, अभिजीत काण्णव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आवाहन’चा फडकला ध्वज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील आवाहन आखाड्याचे ध्वजारोहण उत्साहात झाले. धार्मिक परंपरेप्रमाणे आखाड्याचे पंडित त्रिविक्रम जोशी यांनी पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने साधू-महंत उपस्थित होते. ध्वज फडकल्यानंतर एका साधूने हवेत गोळीबार केल्याने आकर्षणाबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

जुना आखाडा व पंचअग्नी आखाडा यांनी ध्वजारोहण कार्यक्रम पुढे ढकलला असला तरी आवाहन आखाड्याने नियोजनानुसार ध्वजारोहण केले. मंगलमय वातावरणात पूजाअर्चा करून ध्वज फडकविण्यात आले. यावेळी आखाड्याचे प्रमुख पदाधिकारी साधू-महंत उपस्थित होते. यामध्ये श्रीमहंत मधुसुदानगिरी महाराज, श्रीमंहत सिध्देश्वरगिरी महाराज, श्रीमहंत सत्येंद्रगिरी महाराज, ठाणापती सेवकपुरी महाराज, समुद्रगिरी महाराज, ब्रह्मगिरी महाराज, निरंजनगिरी महाराज आदींसह सर्व अष्टकौशल महंत, सचिव, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

फायरिंग वादात

आवाहन आखाड्यात ध्वजारोहण झाले असताना सुरक्षारक्षकाने बंदुकीतून हवेत गोळीबार केला. ध्वजाला सलामी दिली. जवळपास पाच ते सहा वेळा गोळीबार केला. येथे तो आकर्षणाचा विषय ठरला. यासाठी परवानगी घेतली होती का?, याची माहिती घेण्यासाठी धावपळ उडाली. दरम्यान, या सुरक्षारक्षकाने आपणास येथील साधूने सांगितले म्हणून गोळीबार केला, असे स्पष्ट केले. या पूर्वीच्या सिंहस्थात साधू स्वतःजवळील रायफलमधून उत्सवाप्रसंगी गोळीबार करीत त्यामुळे याचे आश्चर्य वाटले नाही. दरम्यान, याबाबत त्र्यंबक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता याबाबत नोंद घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुलिस को हमारा सॅल्यूट...

$
0
0

प्रशांत देसले, नाशिक

सामूहिक उत्सव, सोहळा, मिरवणूक काहीही असो त्यात पोलिसांची भूमिका मोलाची असते. अनेकदा त्यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनावर मोठमोठे सोहळे विनाविघ्न पार पडतात. नाशिक कुंभमेळा या वैश्विक सोहळ्याची उत्सुकता आणि होणारी गर्दी पाहता हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्याचीही जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. तसे पाहता देश-विदेशातून येणारे पयर्टक, भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस दीड महिन्यापासून चोखपणे पार पाडत आहेत. त्यातीलच जागरुक आणि परोपकारी वृत्तीच्या दोघा पोलिसांनी इंदूरहून आलेल्या भाविकांना मोलाची मदत करून 'अतिथी देवो भवः'ची महती अधोरेखित केली.

भारती जोशी या मूळच्या इंदूरच्या. कुंभमेळा दर्शनासाठी आपल्या १५ वर्षांचा मुलगा द्विजसोबत स्वतःच्या कारने नाशिक येत होत्या. भारती यांचे पती अशोक जोशी हे सिन्नर येथील एमआयडीसीमध्ये नोकरीला आहेत. ते एकटे नाशिकरोड, उपनगर येथे राहतात. तर त्याचा मुलगा, मुलगी आणि पत्नी इंदूर येथे राहतात.

भेटणेही होईल आणि कुंभमेळ्यातही जाणं होईल या अनुषंगाने भारती जोशी या मुलांना घेवून कारने नाशिककडे यायला निघाल्या. नाशिक पोहोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. भारती या पहिल्यांदाच नाशिक येत असल्याने शहरात कुठून एन्ट्री करायची, उड्डाणपुलावरून कुठे खाली उतरायचे याची त्यांना अशोक यांनी इंत्यंभूत माहिती दिली होती. मात्र, अंधारामुळे भारती जोशींचा गोंधळ झाला आणि त्या आडगावकडून द्वारकेकडे न जाता औरंगाबादकडे वळाल्या. दरम्यान द्वारका येथे त्यांची वाट पाहत थांबलेले अशोक यांच्याशी फोनवरही संपर्क सुरू होता. मात्र, त्या वाट चुकल्यामुळे गोंधळ वाढला. त्यांना अशोक यांना सांगताही येईना की आपण कुठे आहोत? शेवटी साधूग्रामजवळ त्यांनी गाडी थांबविली आणि जवळच बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. दिवसभर ड्युटी करून शिणलेल्या पोलिसांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांतील दोघांनी त्यांना सांगितले, 'हम उपनगरही जा रहे है, आप हमारी बाईक के पिछे आओ' पोलिसांचे हे बोल ऐकून त्यांच्या जीवात जीव आला. आपण तपोवनाकडून उपनगरात येत आहोत, असं त्यांनी अशोक यांना सांगितल्यावर त्यांनाही कळेना हा काय घोळ आहे. शेवटी पोलिसांच्या मदतीने त्या उपगरात सुखरूप पोहोचल्या. दोन महिन्यांपासून बाबांना भेटण्यासाठी आतूर झालेल्या द्विजने तर अशोक यांना मिठीच मारली. भारती जोशी यांना यावर एकच म्हटलं, 'पुलिसवालों का तो खाली नाम बदनाम है, अपनी फॅमिली को अकेले छोडके वो हजारो फॅमिली की सुरक्षा करते है, नासिक जैसे अनजान शहरमे मै पहली बार आयी, रास्ता खो गयी, लेकीन यहाँ की पुलीस ने खुब सहयोग किया। सच कहूँ तो, इसी घटना के कारण मुझे कुंभमेला बहुद याद रहेगा, एैसे जंटलमन पुलिस के ल‌िए जरुर एक सॅल्यूट बनता है।' दुसऱ्या दिवशी रामकुंड, साधूग्राम येथे हे कुटुंब फेरफटका मारण्यासाठी आले तेव्हा त्यांना तिथल्या प्रत्येक पोलिसाविषयी आदर वाटत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधू-महंतांचा कार्यक्रमावर बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही व्यासपीठावर बसावयास जागा न मिळाल्याने निर्मोही आणि दिगंबर आखाड्याशी संबंधित २२ साधूंनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. प्रशासनाकडून अपमानित केल्याची भावना व्यक्त करीत ते कार्यक्रमस्थळाहून निघून गेले. प्रमुख साधूंनाच व्यासपीठावर बसण्यासाठी जागा नसेल तर कशासाठी थांबायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आखाड्यांमधील ध्वजारोहणाचा सोहळा आटोपल्यावर सर्वांची पाऊले कार्यक्रमस्थळाकडे वळली. मान्यवरांचे कार्यक्रमाच्या सभा मंडपात आगमन होताच मंडपासमोर मोठी गर्दी झाली. साधू-महंत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बसता यावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. श्री टीलाद्वार गाद्याचार्य मंगलपीठाधीश्वर श्री श्री १००८ श्री माधवाचार्यजी महाराज यांच्यासह निर्मोही आणि दिगंबर आखाड्याशी संबंधीत चंद्रदेवदास, माधवदास, रासबिहारी, वल्लभाचार्यजी, शामसुंदरजी, महेशभाई असे अनेकजण कार्यक्रमस्थळी पोहोचले. व्यासपीठाकडे जात असताना त्यांना अडविण्यात आले. व्यासपीठावर जागा नसल्याचे त्या सर्वांना सांगण्यात आले. त्यांच्यासाठी व्यासपीठावर जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याने ते नाराज झाले. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला न थांबता निघून तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासह २२ साधू-महंत सभामंडपातून बाहेर पडले. पत्रिकेत नावे असतानाही प्रमुख साधू-महंतांनाच व्यासपीठावर बसावयास जागा उपलब्ध होत नसेल तर तेथे कशासाठी थांबायचे असा सवाल या साधू-महंतांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये आलिशान वाहनांची रीघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील व्हीव्हीआयपींचा लवाजमा... साधू-महंतांच्याही दिमतीला आखाड्यांच्या आवारात थांबलेली आलिशान वाहने... साधू-महंतांवरील पुष्पाभिषेकात सौख्य मानणारे सेवेकऱ्यांचे हात अन मंत्रोच्चारांमुळे भारलेले वातावरण अशा थाटात साधुग्राममध्ये सिंहस्थ ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. गत सिंहस्थात साधेपणाने पार पडलेल्या या सोहळ्याला ग्लॅमरस लुक प्राप्त झाल्याने हा सोहळा डोळे दिपविणारा ठरला.

१२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ महापर्वाची पहिली पर्वणी १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी आखाड्यांमध्ये बुधवारी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सकाळी साडेसहापासूनच साधुग्राममध्ये लगबग होती. पहाटेपासूनच पोलिस कर्मचारी कर्तव्यपूर्तीसाठी सज्ज झाले होते. औरंगाबाद नाका, तिगरानिया कॉर्नरवरील मारुती वेफर्स, पंचवटी कॉलेज आणि निलगिरीबागेपासून लोक साधुग्राममध्ये पायी दाखल झाले. साधुग्राममध्येही ठिकठिकाणी बॅरिकेडींग आणि पोलिसांचा पहारा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे लवाजम्यासह सकाळी आठच्या सुमारास साधुग्राममध्ये दाखल झाले. आखाड्यांमध्ये ध्वजारोहण सोहळ्यात ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाचा शुभारंभ दहा दिवसांनी पहिली शाही पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू धर्मियांचा वैश्विक सोहळा म्हणून गणल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. गुरू पाठोपाठ सूर्याचा सिंह राशीत प्रवेश झाला असून पुढील महिनाभर ग्रहांची ही दशा कायम राहील. साधू-महंताच्या दृष्टीने आजच खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात झाली. आखाड्यांच्या ध्वजपर्वानंतर अवघ्या १० दिवसांवर पहिली शाही पर्वणी येऊन ठेपली असून समस्त नाशिककरांना याची उत्सुकता लागली आहे.

हायटेक सुविधा तितकचा तगडा पोलिस बंदोबस्त असे या कुंभमेळ्याचे वर्णन केले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी वॉल्सचा वापर, अतंर्गत आणि बाह्य पार्किंगचे झालेले वर्गीकरण, आधुनिक बॅरिकेडींग अशी नानाविध तयारी प्रशासनाने केली असून या सर्वांची कसोटी आजपासून अवघ्या दहा दिवसांनी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. कुंभमेळ्याची ही पहिलीच शाही पर्वणी ठरेल. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लागलीच तीन प्रमुख आखाड्यांसहीत त्यांच्या ७०० खालशांमध्ये अन्नदान, प्रवचन, गीता पठण, विविध यज्ञ असे धार्मिक कार्यक्रम सुरू होतील. पुढील महिनाभरात तीन शाही पर्वण्या आणि विविध कार्यक्रमाची मेजवाणी भाविकांना या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. प्रशासन देखील पहिल्या शाही स्नानाच्या तयारीत गुंतले आहे.

इतर ठिकाणी दर दोन ​वर्षांनी कुंभमेळा लागतो. मात्र, नाशिक त्याला अपवाद असून नाशिकनंतर अवघ्या सात ते आठ महिन्यांनी उज्जैन येथे कुंभमेळा भरणार आहे. यामुळे नाशिकमध्ये वर्षभर कार्यक्रम चालत नाहीत. येथे महिन्याभराच्या कालावधीनंतर साधू महंतांना लागलीच उज्जैनचे वेध लागतात, असे दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या सुविधा अत्युच्च

प्रशासनाचे काम हत्ती सारखे असते. त्यामुळे त्यास सातत्याने आरी मारावी लागते. आजवर तेच काम झाले. मात्र, सुविधा पुरविण्याबाबत नाशिकच्या प्रशासनाने एक नवा मापदंड लावला असून अशा सुविधा आजवर कधीच निर्माण करण्यात आल्या नव्हत्या, असे मत रामकिशोरदास शास्त्री यांनी व्यक्त केले. नाशिक प्रशासनाने केलेल्या कामगिरीमुळे उज्जैन येथील प्रशासनावर नक्कीच दबाव वाढला असून येथील प्रशासनाचे कौतुक करावे वाटते, असे रामकिशोरदास शास्त्रींनी स्पष्ट केले.

शाहीस्नानाचे मुहूर्त

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला असून, हा मेळा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्यादरम्यान चारवेळा शाहीस्नानाचा लाभ मिळणार आहे. २९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच दिवशी शाही स्नानाचा सोहळा पार पडेल. यानंतर, १८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे तर २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नानाचा सोहळा होईल...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यासपीठावर व्हीव्हीआयपींची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील तीनही प्रमुख वैष्णव आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडताच सभास्थळी उपस्थितांचा उत्साह दाटला. सभास्थळी सुरक्षा यंत्रणेला अलर्ट करण्यात आले. यावेळी कुंभनगरी साधुग्रामच्या जगदगुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे उद्घाटनही भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांसह विविध प्रमुख संत महंतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने कुंभाची वातावरण निर्मिती केली.

कुंभनगरीचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून जगदगुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले आहे. येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी काही दिवसांपासून सुरक्षा यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच सभेच्या चौफेर बाजूंना पोलिस यंत्रणेची करडी नजर होती. सभास्थानाची रचनाही बंदिस्त असल्याने केवळ प्रवेशद्वार ठेवण्यात आले होते. पावसाची शक्यता लक्षात घेता भाविकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच्या तपासण्या, सभास्थानापासून दूरवर करण्यात आलेली वाहन व्यवस्था, जागोजागी असणारी बॅरेकेटींग यामुळे उपस्थितांच्या संख्येवरही परिणाम झालेला दिसून आला.

ढोल पथकाचा उत्साह

सकाळी ध्वजारोहणाला सुरुवात झाल्यापासूनच ढोल पथकांचा उत्साह दिसून आला. सकाळी ७.३० वाजेच्या सुमाराला ढोल पथकांची पावले तपोवनाच्या दिशेने वळू लागली. उगवत्या सूर्यासोबतच कानावर पडणारा मंत्रोच्चारांचा धीरगंभीर आवाज आणि जागोजागी श्रीराम अन् हनुमंतांचा होणारा जयघोष यामुळे या परिसराला रौनक आली होती.

अनुभवातून आले शहाणपण

सिंहस्थाला सुरुवात झाल्याचा बिगुल वाजल्यानंतर रामकुंडावर ध्वजारोहण झाले होते. त्यावेळी साधू-महंतांसहित राजकारण्यांमध्ये रंगलेले मानपमान नाट्य चर्चेचा विषय ठरले होते. बुधवारी आखाड्यांचे ध्वजारोहण होताना या प्रकारांची पुनरावृत्ती नाकारता येणार नव्हती; मात्र मागच्या अनुभवातून धडा घेत यंदाच्या वेळी सर्वच घटकांकडे अनुभवातून आलेले शहाणपण दिसून आले. रामकुंडावर

झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात साधू-महंतांच्या गैरव्यवस्थेमुळे प्रशासनावर टीका झाली. आखाड्यांच्या ध्वजारोहणात मात्र या चुका टाळण्याचा प्रयत्न महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सभेच्या ठिकाणी नागरिक, निमंत्रित आदी वर्गांसाठी योग्य आसनव्यवस्था होती.

उपस्थितांचा हिरमोड

त्र्यंबकेश्वरमधील पेशवाईची चर्चा नाशिककर ऐकून होते. यामुळे ध्वजारोहणानंतर नाशिकच्या आखाड्यांमधील मिरवणूका आणि साधूंकडून सादर केल्या जाणाऱ्या कसरतींची अपेक्षा नाशिककरांना होती. मात्र, दोन्हीकडील परंपरांमधील भेद आणि सुरक्षेमुळे सादरीकरणास पडणाऱ्या मर्यादा यामुळे या उत्साहाला आळा घालावा लागल्याने या अपेक्षेने आलेल्या भाविकांचा हिरमोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images