Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिंहस्थ हेल्पलाइन

0
0

नाशिक - सिंहस्थ काळात लाखोंच्या संख्येने साधू, महंत, भाविक आणि पर्यटक नाशकात येणार आहेत. प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन केले असून विविध प्रसंगी आवश्यक ती मदत पोहचविण्यासाठीचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. शाही पर्वणी काळामध्ये अथवा सिंहस्थ काळामध्ये शहारात चुकामूक झाली अथवा मौल्यवान साहित्याची चोरी झाल्यास या हेल्पलाइनवर भाविक आणि पर्यटकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिका हेल्पलाइन

८३९०३००३००

०२५३-६६४२३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांचा उपद्रव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्य राज्यांतून आलेल्या चोरट्यांकडून साधुग्राम प‌रिसरात उपद्रव सुरूच असून पर्यटकाची बॅग चोरणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून बॅगसह १५ हजारांची रोकड, मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या परराज्यांतून चोरटे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. वाराणसी येथून नाशिकमध्ये आलेले एक कुटुंब साधुग्राम परिसरात फिरत होते. त्यावेळी त्यांची बॅग चोरीस गेली. साधुग्राममध्ये गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने बारा वर्षीय मुलाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडे ही बॅग आढळली. सहायक पोलिस निरीक्षक भाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी मुलाची आई देखील अशा गुन्ह्यांत सहभागी असावी, अशी शक्यता सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी व्यक्त केली आहे.

साधुंच्या वेषात पोलिस

साधुग्राममध्ये गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे शाखेचे काही पोलिस साधुंच्या वेषामध्ये गस्त घालत आहेत. त्यासाठी अनेकांनी साधुंप्रमाणेच दाढी देखील वाढविली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या त्यांच्याकडून केले जात आहे. सिंहस्थावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने साधुग्रामची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा बनला आहे. म्हणूनच ही काळजी घेती जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सिंहस्थ काळात साधुग्राम परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिसांनी सायकलवरून गस्त घालण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ५० सायकली मागविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणी लांबली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या वादग्रस्त स्वच्छतेच्या कंत्राटासंदर्भात महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने या प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. आता या प्रकरणाची सोमवारी (दि. २४) सुनावणी होणार असून आठ दिवस मिळूनही प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केला नाही.

साधुग्राम स्वच्छतेच्या वादग्रस्त साडेपाच कोटीच्या कंत्राटासंदर्भात सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. वॉटरग्रेस ऐवजी क्रिस्टल'ला कंत्राट दिल्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती देत, प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, सोमवारीही प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. वकिलाकडून प्रतिज्ञापत्राचा ड्राफ्ट सोमवारी आल्याने ते आजही सादर होवू शकले नाही. त्यामुळे महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागण्यासाठी अर्ज देण्यात आला. त्यावर न्यायालयाने महापालिकेची मागणी मान्य करत, येत्या २४ तारखेला सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

या कंत्राटावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष पेटला होता. सोमवारी प्रतिज्ञापत्रासाठी आठ दिवसांची मुदत असतांनाही, प्रशासनाने ते सादर केले नाही. त्यामुळे आता हा कंत्राटच दिले जाणार नसल्याची चर्चा आहे. पर्वणी जवळ आल्याने आता प्रक्रिया राबविणे शक्य नाही. त्यामुळे आहे, त्याच स्वच्छता ठेकेदारांकडून कामे पूर्ण केली जात असून यामुळे बाधा येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेकडून सादर केले जाणार आहे. त्यामुळे या कंत्राटाचा विषय आता बंद झाला असून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याची चर्चा आहे.

ध्वजारोहणाची तयारी पूर्ण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्राममधील येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आखाड्यांचे ध्वजारोहणासाठी आखाडा परिषद आणि महापालिका सज्ज झाली आहे. आखाड्यांच्या ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी दिली आहे. या ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. जगतगुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ ते ९ वाजेच्या दरम्यान निर्वाणी, निर्मोही, दिगंबर या तीनही आखाड्यांचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर अशोक मुर्तडक असतील. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित रहाणार आहेत. ध्वजारोहणासाठी ५१ फुटाचा ध्वजस्तंभ तयार करण्यात आला आहे.

अन्नदान, ज्ञानयज्ञ

नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर श्री कैलासमठातर्फे श्रावण महिनाभर अन्नदान आणि ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मठाचे अध्यक्ष श्री महंत स्वामी संविदानंद सरस्वती महाराज यांनी सोमवारी दिली. श्रावणात रुद्राभिषेक व शिवार्चन होणार आहे. श्रीराम कथेला गुरुवारपासून (दि. २०) सुरुवात होणार आहे. २८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या सोहळ्यात उज्जैन येथील संत मौनीबाबांचे परमशिष्य सुमनभाई सायंकाळी ४ ते ७.३० दरम्यान 'श्रीराम कथा' सांगणार आहेत. तसेच शुक्रवारपासून (दि. २१) श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. लातूरचे स्वामी श्री श्याम चैतन्य महाराज ज्ञानेश्वरी पारायण दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत करतील. दरम्यान कैलास मठास निरंजनी आखाड्याचे सचिव स्वामी रामानंद पुरी, महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी स्वामी यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बम बम भोले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बम बम भोले, शिव हर शंकर नमामि शंकर, ओम नम शिवाय अशा गजरासह पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी आनंदी व भावपूर्ण वातावरणात कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होते. पहाटे पाचपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या. याशिवाय शहरातील शंकराच्या विविध मंदिरातही महिला भाविकांनी अभिषेकासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांना सहज दर्शन घेता यावे म्हणून मंदिराच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिला भजनी मंडळाच्या वतीने भजने सादर करण्यात आली. तसेच महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक गीते सादर करण्यात आली.

'ओम नम: शिवाय', 'कपालेश्वर महाराज की जय' असा जयघोष सुरू होतो. महिला, पुरुष, मुलांची दर्शनासाठी चाललेली धावपळ असे उत्साही वातावरण कपालेश्वर मंदिरात सकाळी पाहायला मिळाले. ढगाळ वातावरण, पावसाचा लपंडाव, शिवनामाचा जयघोष असे आनंदी व उत्साही वातावरण दिवसभर होते. दर्शनासाठी शहरातील मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, रुद्राभिषेक, शिवलीलामृताचे पठण करण्यात आले. याप्रसंगी अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. काही ठिकाणी दानाचे महत्त्व लक्षात घेत खिचडी वाटप करण्यात आले. तरुणाईनेही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावणात महादेवाला बेल, फूल वाहण्याची प्रथा असल्याने सर्वच मंदिराच्या बाहेर नारळ, बेलपान, फूल इत्यादी साहित्यांचे स्टॉल लागले होते.

कॉलेजरोड येथील शंकराच्या मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त लघुरुद्राभिषेक, नित्याभिषेक करण्यात आला. यावेळी गुरूजींनी शिवपूजेचे महत्त्व विशद केले. श्रावणी सोमवारी पिंड‌ीवर बेलाचे त्रिदळे वाहतात. शिवलीलामृताचे पठण केल्याने मागच्या जन्मातील पाप नष्ट होते, शिवलीलामृतातील सीमंतिनीचे आख्यान अध्ययन केल्याने कुमारिकेस चांगला पती प्राप्त होतो, अशी श्रद्धा असल्याचे गुरूजींनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान खोटारडे

0
0

पंतप्रधान खोटारडे; शांतता करार जुनाच - शंकराचार्य अधोक्षाजानंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत सरकार आणि नागालँडच्या नॅशनल सोशलिस्ट कौंन्सिल म्हणजे एनएससीएनमध्ये शांतता करार झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, हा करार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटेपणा करून त्याचे श्रेय लाटत असल्याचा गंभीर आरोप गोवर्धन पीठाचे पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी केला.

केंद्र सरकार आणि एनएससीएनच्या इसाक-मुईवा गटाच्या नेत्यांनी ३ ऑगस्ट २०१५ रोजी या करारावर स्वाक्षरी केली. मात्र, अधोक्षाजानंद महाराजांनी हा खोटेपणा असल्याचा आरोप केला. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ढासळली असून, देशाचे चौकीदार म्हणजेच पीएम मोदी अपयशी ठरले आहेत. मोदींनी स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी शपथग्रहण सोहळ्याचे निमंत्रण पाकिस्थानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठवले. मात्र, यानंतर पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करीत असून, मोदी हातावर हात धरून बसले आहेत. काश्मिर समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी हुरियत कॉन्फरन्सला चर्चेत सहभागी करावे लागेल, असे विवादास्पद मत महाराजांनी व्यक्त केले. पंतप्रधान होण्यापूर्वी हेच मोदी पाकिस्तानला, दहशतवादी संघटनांना मोडून काढण्याची भाषा करीत होते. मात्र, सत्ता मिळताच मोदींनी पलटी मारली. एवढेच नव्हे तर आरएसएसचे नेते डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या मारेकऱ्यांसोबत भाजपाने सरकार स्थापन केले. ११ मे १९५३ रोजी जम्मू-कश्मीर राज्यात प्रवेश केला म्हणून डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. देशातील बंडखोर आणि परकीय आक्रमण यामुळे सर्वसामन्य नागरिक तसेच लष्करी जवान त्रस्त आहेत. या समस्या दूर करण्यात सरकार विफल होत असल्याचा दावा अधोक्षाजानंद यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नक्षलवाद्यांना आवतण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचा कुंभमेळ्या खऱ्या अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत. देशभरातील साधू-महंत आणि भाविकांबरोबरच नक्षलवादी तसेच बंडखोर संस्था, त्यांचे प्रतिनिधी कुंभमेळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी या सर्व संघटनांना निमंत्रण दिले आहे.

नक्षलवादी, बोडो, उल्फा किंवा देशांतर्गत सरकार विरूध्द बंडखोरी करणारे भारतीयच आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी व्यासपीठच नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही बंडाळीग्रस्त राज्याच्या राज्यकर्त्यांना तसेच समाजसेवकांना निमंत्रण पाठवले असून, ते नाशिकमध्ये येतील, अशी माहिती अधोक्षाजानंद यांनी दिली आहे. धर्माच्या मदतीनेच बंडखोरांना मूळ प्रवाहात सामील करणे शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

देशातील सर्व जातीधर्माचे आणि वंशाचे व्यक्ती पुण्यप्राप्तीसाठी नदीकिनारी जमा होतात. स्नान करतात आणि माघारी फिरतात. मात्र, यापासून नक्षलवादी, बोडो, उल्फा यासारख्या संस्था, बंडखोर मानला जाणारा व्यक्ती समुदाय दूर आहे. त्यांच्या स्वतःच्या काही मागण्या आहेत. बंदुकीला बंदुकीनेच उत्तर देण्याची पध्दत चुकीची असून, त्यातून बंडखोरीला चालना मिळते आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या कुंभमेळ्यात बंडखोरीवर चर्चा करण्यासाठी विशेष संमेलन भरवले जाणार असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.

ज्या राज्यात बंडखोरांचे सर्वांत जास्त प्रमाण आहे, त्या राज्यातील राज्यकर्त्यांना, समाज सेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्यात बंडखोरांचे अनेक प्रतिनिधी आले होते. बंडखोरांची लढाई सरकारशी आहे, धर्माशी नाही. त्यामुळे बंडखोरांशी नेहमीच चर्चा होते. त्यांच्या काही मागण्या असून, सरकारने त्यांचा विचार करणे इष्ट ठरू शकते, असा दावा अधोक्षाजानंद महाराजांनी केला.

सरकारकडूनच खतपाणी

एखाद्या राज्यात बंडखोर संघटना तयार करून त्यांना खतपाणी घालण्याचे काम सरकारकडून होत असते. नक्षलवाद हा त्यातलाच भाग असल्याचा दावा शंकराचार्यांनी केला. देशातील अनेक संघटनांना सरकारच्या इंटेलिजन्स संस्थांकडून आर्थिक मदत होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केला होता. या आरोपात तथ्य असून, काश्मिरचे दुखणे, नक्षलवाद, पूर्वोत्तर राज्यातील बंडखोरीत स्वातंत्र्यानंतर वाढ होत असून, त्यामागे हेच कारण असल्याचे अधोक्षाजानंद महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा कडाडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आणि सामान्यांच्याही जिव्हाळाचा विषय असलेल्या कांदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी कांदा दरात तब्बल सातशे रुपयांची वाढ झाली. जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटलला पाच हजार रुपये दर मिळाला असून, सरासरी भाव ४४०० रुपये इतका राहिला. आवक मंदावल्याने तसेच पावसाने ओढ दिल्याने कांद्याचे बाजारभाव नजीकच्या काळात आणखी कडाडणार आहेत. सध्या किरकोळ बाजारात ४५ ते ५० रुपयांपर्यंत असलेल्या कांद्यासाठी नाशिककरांनाही येत्या दोन-तीन दिवसांत ६० ते ६५ रुपये मोजावे लागण्याची चिन्हे आहेत.

कमी आवकेच्या जोरावर यंदा पुन्हा एकदा उन्हाळ कांदा तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. देशांतर्गत बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यानेही तेजी आली आहे. जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सटाणा, येवला, उमराणा, मनमाड या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सोमवारी प्रति क्विंटल सरासरी ४४०० रुपये भाव मिळाला. सटाणा व येवला बाजार समिती तसेच अंदरसूल उपबाजारात सर्वोच्च पाच हजार रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली.

यंदा पावसाने ओढ दिल्याने लाल कांद्याची अद्याप लागवड होऊ शकलेली नाही. यामुळे दिवाळीत येणारा लाल कांदा फारसा उपलब्ध होणार नाही. परिणामी दिवाळी व दिवाळीनंतरही कांद्याची दरवाढ टिकून राहण्याची शक्यता आहे. सध्या मोठे शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवलेला कांदा बाजारात येत आहे. साठेबाजीचाही परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत साडेआठ हजार, पिंपळगावमध्ये नऊ हजार, येवल्यात तीन हजार, अंदरसूलमध्ये पंधराशे क्विंटल आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत या बाजार समित्यांमध्ये कांदा आवक घटली आहे.

आयात लांबणार

कांद्याचे वाढते दर पाहून केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठीसात ऑगस्टपर्यंत टेंडर मागविण्यात आले होते. मात्र, कोणीही टेंडर दाखल न केल्याने आयातीचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. दि. २७ ऑगस्टपर्यंत टेंडरसाठी मुदत दिली आहे. त्यानंतरच कांदा आयातीचा निर्णय होऊ शकणार असल्याने किमान तोपर्यंत तरी कांद्याचे दर चढेच राहणार आहेत.

दिल्लीत ८० रुपये

कांद्याने दिल्लीकरांना पुरते रडवले असून, देशाच्या राजधानीत कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या कांदा उत्पादक राज्यांमधून चढ्या दराने आवक होत असल्याचा हा फटका असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नाफेडने खरेदी केलेला कांदा फक्त दिल्लीसाठीच रवाना करण्यात आला होता. सुमारे अडीचशे टन कांदा दोन आठवड्यापूर्वी दिल्लीसाठी पाठविण्यात आला होता. यामुळे इतर ठिकाणी कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत

पाऊस नसल्याने नागपंचमीला होणारी कांदा लागवड यंदा लांबणीवर पडणार आहे. दिवाळीपर्यंत व नंतरही कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. आयातीचा निर्णयही २७ ऑगस्टनंतरच समजू शकणार आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

सध्या कांदा निर्यात बंदच आहे. पाकिस्तान, चीनमध्ये कांद्याचे दर कमी असले तरी तेथेच तो विकला जात असून, भारतातील कांद्यापेक्षा तेथील कांदा स्वस्त आहे. कांदा आयातीच्या परवानगीसाठी साधारण पंचवीस दिवस लागतात. - अतुल शहा, व्यापारी प्रतिनिधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षप्रक्रिया मंडळ गुंडाळले

0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

शेतीपूरक उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या मंडळांपैकी एक असलेले द्राक्ष प्रक्रिया मंडळ आता नामशेष झाले आहे. देशाची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये हे मंडळ नसण्याचा अधिक प्रभाव जाणवणार आहे. याचाच वेध घेणारी ही मालिका....

भाजपप्रणित मोदी सरकारला द्राक्ष आंबट असल्याची बाब पुढे आली आहे. यूपीए सरकारच्या काळात कार्यरत असलेल्या द्राक्षप्रक्रिया मंडळाचा गाशा मोदी सरकारने गुंडाळला आहे. मंडळाचे पुणे येथील कार्यालयही बंद करण्यात आले आहे.

देशांतर्गत द्राक्ष उद्योगाला वाव देण्यासाठी यूपीए सरकारने तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार भारतीय द्राक्षप्रक्रिया मंडळ (आयजीपीबी) स्थापन करण्यात आले. द्राक्ष हे नाशवंत पिक असल्याने द्राक्षावर प्रक्रिया केल्यास त्याचा विशेष फायदा शेतकऱ्यांना होईल, या हेतूने मंडळ कार्यान्वित राहिल, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार वाइनसाठीच्या द्राक्षांची निर्मिती, वायनरी उद्योग, बेदाणा उद्योग या सर्वांच्या विकासासाठी देशभरात हे मंडळ सक्रिय झाले. याच मंडळाच्या माध्यमातून मंडळाने भारतीय द्राक्ष महोत्सव नाशिकमध्ये भरविला. वायनरींमध्ये सुरू होणाऱ्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या महोत्सवाला चांगला प्रतिसादही लाभला. मात्र, हे मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच त्याचा गाशा गुंडाळण्यात आला आहे.

मंडळ कार्यान्वित ठेवून देशांतर्गत द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात शेतकऱ्यांसह देशाचेही हित आहे. - जगदीश होळकर

द्राक्षप्रक्रिया आणि वायनरी उद्योगात मोठी क्षमता आहे. येत्या काही वर्षांत या उद्योगाचा मोठा प्रमाणात विकास होऊ शकतो. त्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यापार आणि संकल्पनांची जोड मिळणे आवश्यक आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा 'मेक इन इंडिया' या उपक्रमात वाइन उद्योग मोलाचा ठरू शकतो. त्यामु‍ळे या मंडळाचे अस्तित्व अत्यावश्यक असल्याचे मत ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या घरांच्या पुनर्विकासाचे काय?

0
0

विवेक जायखेडकर (लेखक आर्किटेक्ट असून, नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्षही आहेत.)

नाशिकचा विकास होत असताना नाशिकमधील सर्वात जास्त दाट वस्ती असलेले दोन क्षेत्र म्हणजे गावठाण व सिडको (कामठवाडा). त्यामुळे नाशिकच्या विकासाचा विचार करताना या दोन झोनचा आवश्यक तो विचार व्हायला हवा. नाशिकच्या वाढत्या लोकसंखेचा विचार करता सामान्य माणसाला राहण्यासाठी घरांची आवश्यकता आहे. जास्तकरून गावठाणातील मोडकळीस आलेल्या वाडे आणि सिडकोमधील जुने व मोडकळीस आलेल्या घरांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. या भागात नवीन विकास होताना महापालिकेने व सिडकोने तेथील लोकांची आर्थिक परिस्थिती बघता त्या रहिवाशांच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे.

गावठाणातील बरेचशे वाडे पूररेषेच्या निळ्या रेषेअंतर्गत येतात. आज या वाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. बरेचशे प्रौढ नागरिक आहेत, नवीन वास्तू विकत घेण्याची काहींची परिस्थिती नाही. शासनाच्या हलगर्जीपणामुळे आलेल्या पुराची शिक्षा या मुळच्या नाशिकाराला भोगावी लागत आहे. एकाबाजूला शासन म्हणते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी नवीन घरकूल योजना आणणार आणि इथे जे आहेत जे घर पुनर्विकासित करू इच्छिता त्यांची नाहक अडवणूक करत आहे. पूररेषेमुळे बाधीत असलेले बरेचसे वाडे आज अनेक पुढाऱ्यांनी काबीज करायला सुरुवात केली आहे. या वाड्यांमध्ये बरेच भाडेकरू अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे घरमालक हे त्या भागातील दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला अत्यल्प

किमतीत वाडे विकत असल्याच्याही घटना घडतात. पण जर शासनाने पुढाकार घेऊन ह्या नागरिकांचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिले तर शासनाला नवीन घरकुल योजना आणायची आवश्यकताच पडणार नाही. आज जरी नवीन येऊ घातलेल्या विकास आराखड्यात जास्त एफएसआय देणार असे घोषित केले आहे तरी, त्या जास्त एफएसआयचा खरोखर आर्थिक दुर्बल लोकांच्या पुनर्विकासासाठी उपयोग होईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. जास्त एफएसआय म्हणजे उंच इमारती. उंच इमारत बांधायची म्हणजे लिफ्ट येणार, अग्निशमन करण्यासाठी लागणारी सगळी महागडी सामग्री बसवावी लागणार. मोठमोठ्या पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधाव्या लागणार. पार्किंगसाठी जागा सोडावी लागणार, हे सगळं करायचे म्हणजे अमाप पैसे लागणार, यामुळे या घरांच्या किमती सुद्धा अमाप होणार, मग ह्या लोकांचा विकास होणार का? का इतर कोणाचा?

नवीन विकास आराखड्यात सिडकोने विकसित केलेले क्षेत्र येत नाही. पण आज नाशिक मधील सर्वात दाट वस्ती असलेले हे नवीन नाशिक विकसित कसे होणार? सिडकोने भाडेकरारावर दिलेल्या घरांची हालत आपण सगळे रोज जाता-येता बघत आहोत. त्यांची हालत गावातल्या वाड्यांपेक्षा खराब आहे. गावातल्या वाड्यांवर तरी लाकडाची नक्षीकामे वैगरे केलेली दिसतात. पण या सिडकोतल्या घरांकडे तर बघवत पण नाही. सिडकोने दिलेल्या घरांवर लोकांनी अनधिकृत बांधकामे करून ठेवली आहेत. या सर्व सिडकोवासियांना शासनाने सर्व सामान्यांना परवडेल अशी पुनर्विकास योजना आणणे गरजेचे आहे. शासनाने कोणतीही विकास योजना आणताना त्या शहराच्या गरजा व त्या शहराची ओळख लक्षात घेऊनच योजना तयार करावी. एकाच साचा सर्व शहरांवर लादू नये. त्यावरच सर्वंकष विकास शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंदूचा खुराक

0
0

डॉ. सुनील गोडबोले

(संशोधन साह्य : डॉ. अश्विनी गोडबोले)

मेंदूविकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. वेगवेगळ्या संशोधकांनी, डॉक्टरांनी विशिष्ट आहारपद्धतींचा उपयोग केला आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

मेंदूचा रस्ता पोटातून जातो. अर्थातच आपल्या मुलांच्या मेंदूचे कार्य, त्यांचा अभ्यास, समज आणि वर्तन यावर आपण काय खातो याचा थेट परिणाम होत असतो. जगभरात यावर अनेक संशोधक वेगवेगळे शोध घेत आहेत. मातेचे दूध वर्ष-दोन वर्ष व्यवस्थित पिणाऱ्या मुलांमध्ये मेंदूची वाढ जास्त होते. इतकेच नाही, तर त्यांच्यामध्ये अस्थिरतेचे, चंचलतेचे प्रमाणही कमी आढळते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे डीएचए नावाने ओळखला जाणारा ओमेगा-३-फॅटी अॅसिड! स्निग्धतेचा हा विशेष घटक मातेच्या दूधात भरपूर असतो. याच ओमेगा ३ फॅटी अॅसिडमधून आपल्या मेंदूचा चक्क ६० टक्के भाग विकसित होतो. त्याच फॅटमधून आपल्या डोळ्याचा पडदाही तयार होत असतो. मात्र, ही फॅट आपल्या पोटावरच्या चरबीपेक्षा संपूर्ण वेगळी असते. मातेच्या दूधाव्यतिरिक्त तेल निर्माण करणारे मासे, (उदा. सालमन, सार्डीन, ट्यूने इ.) जवस, कॉलीफ्लॉवर, मोहरीचे तेल, लवंग, आंबा, आक्रोड यातूनही ओमेगा ३ फॅटी अॅसिडस मिळतात जे मेंदूचा विकास, स्मरणशक्ती एकाग्रता या सगळ्यांसाठी आवश्यक असतात.

त्याउलट अतिरिक्त फॅट्स विशेषकरून तळणीचे पदार्थ, (फरसाण, चिवडा, वेफर्स इ.) चीज, पनीर, वनस्पती तूप या मेंदूचा वेग कमी करतात. बरोबरीने लठ्ठपणाची भेट मिळते ती वेगळीच. मेंदूचे काम चोवीस तास अव्याहतपणे चालू असते. त्यासाठी 'ग्लुकोज'चा पुरवठाही नियमित लागतो; पण म्हणून जाता येता साखर खाणे मात्र उलटाच परिणाम करते. साखर लगेच पचते. त्यामुळे मेंदूतले साखरेचे प्रमाण अचानक वाढते. त्यातून नको तितक्या उत्तेजना मिळतात. अनेक रासायनिक पदार्थ तयार होतात. परिणामत: चंचलपणा, अस्थिरता आणि नंतर साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर पाठोपाठ चिडकेपणा, अस्वस्थपणा, एकाग्रतेचा अभाव असला गोंधळ सुरू होतो. म्हणूनच अतिरिक्त साखर देणारे पदार्थ (शीतपेये, बेकरीतले पदार्थ, चॉकलेट, गोळ्या) टाळलेलेच बरे!

मेंदूची साखरेची गरज भागवण्यासाठी तृणधान्यांचा, फळांचा वापर मात्र उपयुक्त असतो.विशेषकरून मैद्याचा वापर न करता कोंड्यासह गहू, ज्वारी, बाजरी, हातसडीचा तांदूळ, ओट्स या सगळ्याचा आहारात समावेश मेंदूचे स्थैर्य वाढवणारा, एकाग्रता वाढवणारा ठरू शकतो. हे पदार्थ हळूहळू पचतात व त्यातून साखरही हळूहळू व बराच काळ मिळते.

लोह आणि एकाग्रतेचा संबंधही थेट असतो. रक्तातील लोहाची मात्रा कमी झाली, की चंचलपणा, एकाग्रतेचा अभाव हे तर जाणवतेच; पण त्याबरोबरीने हट्टीपणा, चिडकेपणा, विसराळूपणा आदी समस्याही लक्षात येतात. हिरव्या पालेभाज्या, गूळ, खजूर, बीट, मनुका आदी पदार्थांमधून लोहाची गरज भागवता येऊ शकेल. लोहाबरोबरच इतरही क्षार (उदा. सेलेनियम, कॉपर इ.) आपल्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात. हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे व मर्यादित स्वरूपातील मांसाहारातून हे क्षार सहज मिळवता येतात.

'अँटिऑक्सिडंट्स' आणि मेंदूविकासाचाही असाच महत्त्वाचा संबंध आहे. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या मेंदूला घातक असे 'फ्री रॅडिकल्स' नष्ट करतात. त्यामुळे मेंदू ताजा तवाना राहतो. भरपूर व नियमित फळे, सुकामेवा, कंदमुळे, रंगीत भाज्या, बिया यांचा आहारात समावेश असेल तर मुलांच्या बरोबरीने मोठ्यांच्या मेंदूचेही कार्य उत्तम राहील. मेंदूविकासातील वेगवेगळ्या अडथळ्यांसाठी, आजारांसाठी (उदा. मतिमंदत्व, स्वमग्नता, चंचलता, अध्ययन अक्षमता इ.) वेगवेगळ्या संशोधकांनी, डॉक्टरांनी विशिष्ट आहारपद्धतींचा उपयोग केला आहे. मात्र, त्यावर इंटरनेट किंवा पुस्तके, जाहिराती वाचून प्रयोग करणे घातकच. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक. आपल्या मुलांना स्मार्ट बनविण्यासाठी निसर्गाच्या जवळ जाणारा व विविधता असणारा आहार उपयुक्त, हाच 'स्मार्ट' मंत्र!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झपाटा ऑर्केस्ट्रा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव्या जुन्या गाण्यांचा समावेश असलेल्या 'झपाटा' या नाविन्यपूर्ण ऑर्केस्ट्रा पाहण्याची व ऐकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी सवलतीच्या दरात चालून आली आहे. शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा अनोखा कार्यक्रम होणार आहे.

सिंफनी ही संस्था गेले ३८ वर्षे मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संगीत वेडाने वसंत खेर, कृष्णकुमार गावंड, श्रीकांत कुलकर्णी, किरण शेंबेकर यांनी एकत्र येऊन 'याद-ए-शंकर जयकिशन हा पहिला कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे अनेक दौरेही झालेत. स्वत: संगीतकार शंकर यांनी या कार्यक्रमाची स्तुती केली. यानंतर प्रेक्षकांची नाडी ओळखून १९८६ मध्ये झपाटा या ऑर्केस्ट्राची निर्मिती झाली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात झपाटाने अक्षरश: क्रांती घडवली. त्यांचे पाच हजाराहून अधिक प्रयोग झालेत. दर्जेदार संगीत, जुनी नवी गाणी, कॉमेडी स्किटस वैविध्यपूर्ण मनोरंजक गोष्टींनी परिपूर्ण असा तो कार्यक्रम होता. नामवंत दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.

बदलत्या काळाची जाणीव ठेवून वसंत खेर यांचे चिरंजीव आदित्य खेर यांनी झपाटाची नव्या व तरूण स्वरूपात निर्मिती केली. नवीन झपाटाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरला झाला. नवीन झपाटालाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. झपाटा हा केवळ ऑर्केस्ट्रा नसून पारिवारिक मनोरंजन देणारा कार्यक्रम आहे. नवीन झपाटाची संगीत संकल्पना कमलेश भडकमकर यांची आहे दर्जेदार नवी जुनी गाणी, दीपाली विचारेची नेत्रदीपक कोरिओग्राफी, कॉमेडी स्किटस, आणखीही मनोरंजनात्मक गोष्टींनी या कार्यक्रमाची बांधणी केली आहे. प्रथमेश सावंत यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. अशा या झपाटाचा शुभारंभाचा प्रयोग २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता कालिदास नाट्यगृहात होणार आहे.

या कार्यक्रमासाठी इतरांना २०० तिकिट असून, कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी मात्र १०० रुपये दरात हे तिकीट दिले जाणार आहे. त्यासाठी कल्चर क्लबचे कार्ड दाखवणे आवश्यक आहे. तिकीट विक्री कालिदास कलामंदिर येथे सकाळी नऊ ते बारा सायंकाळी पाच ते साडे आठ या वेळेत सुरू आहे. कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७२ हजार रोपांची लागवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सामाजिक वनीकरण आणि वनविभागातर्फे नाशिक विभागातील ११ हजार ७५५ शाळांमध्ये तर नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ६२० शाळांमध्ये ७२ हजार ४०० रोपांची लागवड करण्यात आली.

शहरातील शासकीय कन्या विद्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद सातपुते, प्रादशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, वनसंरक्षक पी. एन. पाटील, उपस्थिती होते.

प्रत्येक शाळेत वीस रोपांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, अशोक, निलगिरी, कडुनिंब, चिंच, आवळा, कैलासपती आदी झाडांचा समावेश होता. या उपक्रमात वनीकरण विभागाचे संचालक आर. बी. सोनवणे, आर. एम. सानप, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वाय. पी. सातपुते, लागवड अधिकारी शर्मा आदी सहभागी झाले. स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येकी वीस रोपे लावण्यात आली.

अहमदनगर........३,६९०

नाशिक.............३,६२०

जळगाव............१,९५६

नंदुरबार.........१,३९०

धुळे..............१,१०९

एकूण...........११,७५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढली वाहतूककोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील निमाणी बसस्थानक ते पंचवटी कारंजा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंगची जागा नसतांना अनेक जण आपली वाहने रस्त्यालगत उभी करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दिंडोरी रोडवरून पंचवटी कारंजाकडे येणाऱ्या वाहनांची कायमच गर्दी असते. निमाणी तसेच मेरीमार्गे येणाऱ्या आणि तेथील वाहतूक बेटाला वळसा घालून पेठ रोड व मखमलाबादकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी वाहतूक बेट आणि छोटे जुने उद्यान आहे. या उद्यानाच्या अर्ध्या भागात काही दिवसांपूर्वीच सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात फारसे कुणी जात नाही. याउलट भिकारी आणि मद्यपींचा तेथे नेहमी गराडा दिसून येतो.

शौचालय बांधल्यामुळे उद्यानाचा वापर कोणी करीत नसेल तर उद्यानाची रुंदी कमी करून वाहनांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा. या उद्यानाभोवतालचा रस्ता मोठा झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल अशे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने सुरू असलेल्या अनेक कामांमध्ये उद्यान कमी करण्याचेही काम मार्गा लावावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालक यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर दुरुस्त झाले ड्रेनेज

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सातपूर येथील शिवाजीनगर भागात सांडपाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने हजारो लिटर सांडपाणी नैसर्गिक नाल्याद्वारे गोदावरीत मिसळत होते. याबाबत मटाने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेची यंत्रणा जागी होत सांडपाण्याच्या ड्रेनेजची दुरुस्ती करत सांडपाणी बंद केले आहे.

गोदावरी नदीमध्ये मिसळल्या जाणाऱ्या या सांडपाण्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता ड्रेनेजचे काम करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, आठ दिवसांपासून हजारो लिटर वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे ध्रुवनगर भागातील रहिवाश्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. नाल्यात असलेल्या ड्रेनेजला वाहत्या पाण्यामुळे तडे गेले. दगड व माती ड्रेनेजमध्ये गेल्याने चोकअप झाल्याने सांडपाणी नाल्यात वाहत असल्याने भूयारी गटारी विभागाचे अधिकारी अशोक मेश्राम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कधी होणार डीपी रस्ता?

0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर भागातील २० वर्षांहून अधिक काळ उलटूनही आरक्षित असलेले अशोकनगर डीपी रस्तांचे काम प्रलंबित आहे. यासाठी आमदार सीमा हिरे यांनी महापालीका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नुकतीच भेट घेतली. आयुक्तांनी डीपी रस्त्याचे काम मार्गी लागवणार असल्याचे सांगितले. अशोकनगरला पर्यायी असलेला डीपी रस्ता झाल्यास अनेक रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

सातपूरमधील अशोकनगर रोडबाबत वाहनचालक व रहिवाशांनी रहदारीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे अनेकदा केल्या आहेत. परंतु, २० वर्षांपासून आरक्षित असलेल्या अशोकनगरचा डीपी रस्त्याकडे महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न घातल्याने रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यात पवार संकुल, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, गंगासागरनगर व श्रमिकनगर भागातील रहिवाशांनी अनेकदा महापालिकेकडे डीपी रोड करण्याची मागणी केली. तत्कालीन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी रहिवाशांची मागणी विचारात घेता डीपी रस्त्याची पहाणी केली होती. तसेच सिंहस्थ कामात डीपी रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचेही माजी आयुक्त खंदारे यांनी सांगितले होते. परंतु, अद्याप हा रोडचा विषय मार्ग लागू शकलेला नाही.

यासाठी परिसरातील रहिवाशांनी आमदार हिरे यांच्याकडे मंजूर असलेल्या डीपी रोडची मागणी केली. त्यांनीही महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांची भेट घेत डीपी रस्ता होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यावर महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी डीपी रोडची पहाणी करत लवकरच रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन आमदार हिरे यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहरले सांस्कृतिक ऐक्य

0
0

प्रवीण बिडवे, त्र्यंबकेश्वर

कुठे गुजरातचा गरबा... तर कुठे महाराष्ट्राच्या ‌झिम्मा फुगड्या.. कोठे बॅण्डच्या दणदणाटाद्वारे देशभक्तीपर गीतांमधून डोकावणारा आवेश तर कोठे तपस्वी साधुंच्या मुखकमलावरून ओसंडणाऱ्या तेजापुढे नतमस्तक भाविक अशा श्रीमंत थाटात निघालेल्या पेशवाईने (मिरवणुकीने) मंगळवारी असंख्य नेत्रांचे पारणे फेडले. हा सोहळा भक्तीचा असला तरी त्यातून सामाजिक संवेदनाच अधिक ओथंबल्या.

शेतकरी आत्महत्यांपासून गोदा स्वच्छतेपर्यंत अन् महिला अत्याचारापासून गोमातेच्या रक्षणापर्यंतचा नारा त्यातून देण्यात आला. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा जागर करणारी त्र्यंबकेश्वरमधील ही पेशवाई अविस्मरणीय सुखसोहळा न ठरेल तरच नवल.

सिंहस्थ महाकुंभानिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेल्या देवतांच्या स्वागतासाठी शैव पंथातील एक असलेल्या अखिल भारतीय आनंद आखाडा पंचायतीच्या वतीने मंगळवारी पेशवाई काढण्यात आली. तब्बल बारा वर्षांनी होणाऱ्या या सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरनगरी नववधुप्रमाणे नटली होती. पेशवाई मार्गावर रेखाटलेल्या सुरेख रांगोळ्या, दुतर्फा फडकणारे भगवे झेंडे, ठिकठिकाणी केलेल्या सडा शिंपणांमुळे वातावरण प्रसन्नदायी बनले होते. सूर्यनारायण मंदिरातून पेशवाईला सुरुवात झाली. पुढे चालणारा सूर्यरथ पाठोपाठ घोड्यावर चसेच पायी चालणारे नागा साधू, ढोलताशांचा गजर, त्यावरून आळवले जाणारे भक्तीगीतांचे, देशभक्तीपर गीतांचे सूर, शिस्तबध्द चालणारे महामंडालेश्वर आणि महतांचे रथ अन् पुढे मागे आनंदोत्सव साजरा करणारी भक्तांची मांदियाळी अशा थाटात ही पेशवाई काढण्यात आली.

पेशवेकालीन पोशाखात आबदाण्या, झेंडे हाती घेऊन नृत्यावर ठेका धरणारे तरुण, आदिवासी, टिपरी तसेच गरबा नृत्यातून शिगेला पोहोचलेला उत्साह, तूतारी, शंख तसेच डमरू वादनातून महिलांनी दाखविलेली कलेची चुणूक यांमुळे हा सोहळा अधिकच देखणा झाला.

बळीराजाला दिले धैर्य

सोमेश्वरांनद सरस्वती महाराज यांच्या रथयात्रेपुढे चालणाऱ्या भाविकांनी अनेक सामाजिक प्रश्नांना साद घालून सामाजिक बांधिलकी जपली. 'परमेश्वा तू जरी कोपला पण मी हरणार नाही, संकटांचा धैर्याने सामना करेल फास घेऊन मरणार नाही' असा संदेश देत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. 'दुध का कर्ज चुकाना है, गोमाता को राष्ट्रीय पशु बनाना है', 'महिला अत्याचार बंद करे', लेक वाचवा अभियानाचे नारे यावेळी देण्यात आले.

शाहीमार्गात त्रुटी

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही मिरवणूक मार्ग व भाविक मार्गात त्रुटी असल्याचा दावा नागरी सेवा समितीच्या वतीने केला आहे. समिती आणि शहरातील वास्तुविशारदांच्या सयुंक्त पाहणीतून या त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटींमुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असा दावा समितीचे प्रमुख देवांग जानी यांनी केला आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून पूनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाहीमार्ग हा वरुणा नदी ओलांडून आहे. चांगला पाऊस आला तरी नदीचे पाणी वाढले तर भाविकांच्या जीवाला धोका होवू शकते. सोबतच दोन्ही मार्ग हे उतारावर आहेत, तर मार्गात अनेक खड्डे आहेत. गटारीचे पाणीही या मार्गावर येवू शकते. त्यामुळे भाविक पायी चालू देखील शकणार नाहीत. भाविकांच्या जिवीताला धोका आहे. या मार्गावरील रस्ते विकसित करणे आवश्यक होते. यामुळे भाविकांसह साधू महंताच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो. नदी, नाले तात्काळ स्वच्छ करून शाहीमार्ग व भाविकांच्या मार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी जानी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शनासाठी धावली सूर्यकिरणेही

0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

श्री तपोनिधी आनंद आखाड्याच्या पेशवाईचा (मिरवणूकीचा) ग्रामस्थांसह भाविकांनी आनंद घेतला. या पेशवाईत भाविकांना परंपरांचे दर्शन घडले. पावसाने उघडीप दिल्याने सूर्यकिरणांनी जणू आखाड्याची इष्ट देवता सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. तर वरुणराजाने त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर अल्पवृष्टी करीत देवतांच्या चरणी सेवा नोंदवली.

गंगासागर तलावाजवळील सूर्यमंदिरापासून सकाळी अकर वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी देवतांची विधीवत पूजा करण्यात आली. साधू-महंतांना परंपरेप्रमाणे दहीभात देण्यात आला. यावेळी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज तसेच स्वामी सागरानंद सरस्वती, स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, स्वामी गणेशानंद महाराज, ठाणापती धनराजगिरी महाराज तसेच निरंजनी आखाड्याचे महंत रवींद्रपुरी, आशिशगिरी, रमेशगिरी, पुरोहित पदमाकर जोशी आदी उपस्थित होते. पुरोहित लक्ष्मीकांत थेटे व चेतन थेटे यांनी विधीवत पूजन केले.

मिरवणुकीत अग्रभागी ध्वजा, पाठोपाठ अश्वारुढ नागा साधू होते. हाती तलवार असलेल्या आणि नगारा वाजविणाऱ्या साधुंनी लक्ष वेधले. शस्त्रधारी नागा साधुंपाठोपाठ आचार्य महामंडलेश्वरांचा रथ, बॅण्डपथक, भजनात तल्लीन वारकरी लक्ष वेधत होते. यात २५ हून अधिक रथ सहभागी झाले. यामध्ये महामंडलेश्वर स्वामी महानंदगिरी महाराज, महंत नरेंद्रगिरी महाराज, १००८ सुरेंद्रगिरी महाराज, धर्माचार्य सोमेश्वरानंद महाराज, महामंडलेश्वर अनिकेतशास्त्री महामंडलेश्वर प्रकटेश्वर महाराज, आळंदीचे गणेशानंद महाराज, नाशिकच्या दिव्यानंदताई, काशीनंद महाराज, भारतीगिरी महाराज, महंत सत्येंद्रिगिरी महाराज,धर्माचार्या साध्वी शिवाणी दुर्गा, श्री १००८ जगदिशानंदजी, महंत बालकगिरीजी महाराज आदींच्या रथांनी मिरवणूकीची शोभा वाढविली.

ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत झाले. जिल्हा बँकेचे संचालक परवेज कोकणी यांनी पुष्पमाला देऊन महंतांचे स्वागत केले. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर विश्वस्त कैलास घुले, यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर आदींनी सर्वांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून दिले. भाजपचे शामराव गंगापुत्र यांनी फटाक्याची आतषबाजी केली. कुशावर्तावर नगराध्यक्षा अनघा फडके, उपनगराध्यक्ष संतोष कदम गटनेते योगेश तुंगार, धनंजय तुंगार, यशोदा अडसरे, विजया लढ्ढा आदी नगरसेविकांनी मिरवणुकीचे स्वागत केले.

मिरवणुकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिह कुशवाह, मेळाधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेंद्र बहिरम, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदींनी स्वागत केले. दोनच दिवसांपूर्वी निरंजनी आखाड्याची पेशवाई झाली. पाठोपाठ आता आनंद आखाड्यानेही तितक्याच जल्लोषात पेशवाई काढली. त्यामुळे अन्य आखाड्यांच्या पेशवाईंची उत्कंठा निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दररोज मोफत जेवण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वणवण करून विविध देशांतून शहरात दाखल झालेल्या असंख्य भुकेलेल्या साधूसंत व गरिबांना दोन वेळचे शाकाहारी भोजन देऊन भाविकांची क्षुधाशांती करण्यासाठी लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सोमवारपासून तपोवनात अन्नदान छत्राचा प्रारंभ करण्यात आला.

तपोवनातील लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येणारे सर्व भाविक व गरिबांना दोन वेळचे मोफत अन्न देण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ महंत ग्यानदास यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. ट्रस्टच्या माध्यमातून साधुग्राम येथे ४० हजार फूट बांधकाम केले आहे. केवळ भुकेलेल्यांच्या निर्वाहासाठी १७ ऑगस्ट ते २० सप्टेंबर असा महिनाभर हा भंडारा चालणार आहे. साधूमहंत व गरिबांना ट्रस्ट दोन वेळचे मोफत अन्नदान करणार आहे. याआधी लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दर गुरूवारी अन्नछत्र चालविले जात होते. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकासाठी नागरिकांना रोज अन्नदान केले जाणार आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून अन्नदानाची ही परंपरा आजतागायत अखंडीतपणे सुरू आहे. या अन्नदानात दररोज भाजीपुरी, बुंदी, फरसाण, मसाला भात व रात्रीच्या जेवणात खिचडी, भाजीपोळी व कढी असे शुध्द शाकाहारी भोजन पुरविण्यासाठी गुजरात राज्याच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला येथून २० खास स्वयंपाकी बोलाविण्यात आलेले आहेत. या माध्यमातून रोज चार ते पाच हजार नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तपोवन लिंकरोडवरील लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन वास्तूत भाविकांसाठी नव्याने ६० रूम्स, तसेच

चार हॉल्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्वच मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवाभावी कार्यासाठी गुर्जर क्षत्रिय कढिया समाज, सौराष्ट्र गरबा मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. अन्नदान छत्र राजेंद्र शाह, विलास शाह, हरिष मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी देवेंद्र गोहेल, दीपिका जेठवा, सल्लागार अनिल देशपांडे यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.

साधुग्राम हक्काचा निवारा

साधुग्राममध्ये साधूंपेक्षा भिकाऱ्यांचा भरणा जास्त झाल्याने आता यांना बाहेर काढायचे कसे असा मोठा पेचप्रसंग पोलिसांसमोर उभा राहिला आहे. सध्या साधुग्राम अनेक भुरटे चोर व भिकारी यांचे हक्काचे निवाऱ्याचे ठिकाण बनले आहे.

सिंहस्थाचे वारे वाहू लागल्यापासून नाशिकमध्ये भिकाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रामकुंडांवर मोठ्या प्रमाणात भिकारी दिसू लागले असून त्यांना रोखावे कसे याबाबत पोलिस व प्रशासन यांच्यात चांगलेच वाद सुरू आहेत. दोघांच्याही म्हणण्याप्रमाणे ही त्यांची जबाबदारी नसल्याचे समोर आल्याने भिकाऱ्यांना धरबंध बसणार कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र एकिकडे रामकुंडावरील भिकाऱ्यांची गर्दी वाढत असताना दुसरीकडे साधुग्राममध्ये साधुंच्या वेशातील भिकाऱ्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. साधुग्राम हे त्यांच्यासाठी हक्काचे निवारा स्थान बनले आहे.

साधुग्रामच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग बनविण्यात आलेले आहेत. या दोन्ही बाजुला अनेक साधूंच्या वेशातील भिकारी झाडांचा, पत्र्यांच्या शेडचा आसरा घेऊन पथारी मांडून बसलेले दिसतात. दिवसभर भिक मागायची व मिळेल त्या अन्नछत्रात किंवा आखाड्यात खायचे असा दिनक्रम येथील भिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे सध्या साधुग्रामला अवकळा आली असून, हा प्रश्न कसा मिटवायचा असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

भिकारी करतात नक्कल

तपोवनात एका भिकाऱ्याने चक्क साधूमहाराजांसारखी दाढी वाढवून अंगाला राख फासत आपले आसन मांडले आहे. येथे तो एका पायावर उभा राहिलेला असून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैशांची मागणी करीत आहे. काही भिकारी साधूंची नक्कल करीत असून, त्यांच्यासारखेच वेश परिधान करून भोळ्या भाबड्या जनतेला फसवत आहेत. लोकही त्यांना पैसे देऊन एका साधूला आपण मदत केल्याच्या आनंदात साधुग्राम फिरत आहे.

प्रत‌ीक्षा जागेची

सिंहस्थ कुंभमेळा सुरु झाल्यानंतरही काही आखाड्यांच्या खालशांना जागा मिळाली नसल्याने ते प्रशाकिय कार्यालयाच्या खेटा मारत आहे. पैसे देऊन जागा वाटप झाल्याचा आरोप अखिल भारतीय फलहारी खालसाचे महंत बलरामदास यांनी केला आहे. १४ जुलै रोजी पुरोहीत संघाचे ध्वजारोहण झाल्यानंतर खालशांच्या जागा वाटप करण्यात आल्या. या जागावाटपात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अखिल भारतीय फलहारी खालसाचे महंत बलरामदास यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ज्या आखड्यांनी पैसे दिले अशा आखाड्यांना मोक्याच्या जागा दिल्या असून, ज्यांनी पैसे दिले नाही अशा आखाड्यांना सुविधा नसलेल्या जागा दिल्या आहेत. अखिल भारतीय फलहारी खालच्या साधूंना सेक्टर २ मध्ये जागा दिली आहे. या ठिकाणी कोणतीही सुविधा नसल्याचे साधूंचे म्हणणे आहे. या ठिकाणी प्रशासानाने जागेची लेव्हल देखील केलेली नाही. बाहेरुन आलेले साधू आपल्या आपल्या परीने साफ सफाई करुन राहण्याची व्यवस्था करीत आहे. साधूंना पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच टॉयलेटची सुविधा देखील करण्यात आलेली नाही. पावसामुळे परिसरात चिखल झाला आहे. काही आखाड्यांच्या आवारात खडी टाकली आहे; मात्र अनेक खालशांमध्ये अद्यापही सुविधा नाहीत. मोठा खर्च करुन येथे आलो; मात्र प्रशासनाने घोर निराशा केली. काही ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत. मात्र आम्हाला दिलेल्या जागी कोणतीही सुविधा दिलेली नाही, असे अखिल भारतीय फलहारी खालसा चित्रकुट रामघाटचे महंत बलरामदास यांनी सांगितले.

तपोनुष्ठान

श्री ष. ब. प्र. १०८ श्री गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज यांच्या आर्शीवादाने व वीर शैव लिंगायत समाजाच्यावतीने त्र्यंबकेश्वर येथे विश्वकल्याणार्थ श्रावणमास तपानुष्ठानाला सुरुवात झाली. १३ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या अनुष्ठानमध्ये श्री.ष.ब.प्र.१०८ तपोरत्न डॉ. योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मानव कल्याण व धर्म गोरक्षणासाठी गेल्या २५ वर्षापासून प्रत्येक ज्योर्तिलिंगाच्या सानिध्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या वर्षी हा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरच्या पुण्याभूमीत व सिंहस्थ कुंभ पर्वात सुरु होत आहे. या प्रसंगी श्री.ष.ब.प्र.१०८ श्री पंडीताराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराजांचे शनिवार रोजी पहाटे ३ वाजता २६ वे तपोनुष्ठान सुरु झाले आहे. अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा आनंद आखाड्याचे महंत श्री सागरानंद महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजा फडकावून कार्यक्रमानाचा शुभारंभ करण्यात आला. अनुष्ठान नित्य दैनंद‌िन कार्यक्रमात पहाटे ३ वाजता ध्यान धारणा व जप, सकाळी ६ ते ९ इष्टलींग पूजा व आरती, दुपारी ११ वाजता प्रसाद, दुपारी ४ ते ६ इष्टलींग पूजा व आरती, सायंकाळी ७ ते ८ आशीर्वचन रात्री ८.३० वाजता प्रसाद इत्यादी कार्यक्रम १३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. या मास अनुष्ठानात सर्व वडांगळीकर शिष्य शिवभक्त व वीर शैव समाज बांधवनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वजारोहण

मानवधर्म प्रणेते सद्‌गुरूदेव श्री सतपालजी महाराज प्रणीत मानव उत्थान सेवा समितीद्वारे सिंहस्थानिमित्त आयोजित सद्‌भावना शिब‌िराचा ध्वजारोहण सोहळा गुरूवारी (दि. २०) रोजी सकाळी साडेआठला तिगरानिया रोडवरील मारुती वेफर्स समोरील पटांगणावर होणार आहे. समितीच्या नाशिक येथील हंस कल्याण धाम आश्रमाच्या वतीने ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत सद्‌भावना संमेलन होणार आहे. त्यामध्ये सतपालजी महाराजांसह दिव्य परिवार सहभागी होणार आहे. तत्पुर्वी येथेच सद्‌भावना शिब‌िरांतर्गत भाविकांना आत्मानुभवी महात्मांच्या सत्संग प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे ध्वजारोहण आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती महात्मा हरिसंतोषानंद, महात्मा कमलेशानंद यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये सर्रास गुटखाविक्री

0
0

नाशिक : साधुग्राम मधील मोक्याच्या रस्त्यांवर हात गाडीचालकांकडून मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. पोलिसांसमोर व्यवहार होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे.

राज्य सरकारने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. यामुळे काही प्रमाणात गुटखा विक्रीला पायबंद बसला होता. मात्र, काही दिवसांपासून गुटखा विक्रीने पुन्हा डोके वर काढले आहे. तपोवनात सध्या परप्रांतिय भाविकांचा ओघ सुरू आहे. यातील बहुतेक राज्यात गुटखा बंदी नसल्याने तेथील यात्रेकरूंची गरज ओळखून काही विक्रेत्यांनी गुटखा विक्री सुरू केली आहे. परिसरातील काही छोट्या चहाच्या टपऱ्यांवर गुटखा मिळत आहे. रोकडोबा मैदानावर उभ्या राहणा ऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमध्ये जाऊन काही जण गुटखा विकतांना दिसत आहेत. गुटखा विक्री साधारणतः पुरुषांकडून केली जात असल्याचे दिसते; मात्र या व्यवसायात महिला देखील सहभागी आहे. गुटखा खाणाऱ्या ग्राहकाला हेरून त्याच्या जवळ जाऊन गुटखा हवा का? अशी विचारणा होताना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणाचा मुहूर्त टळला!

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

कामात सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या आखाड्यांच्या रुद्रावताराचा सामना करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्र्यंबकेश्वरमधील पंचदशमान आणि पंचअग्नी या दोन आखाड्यांनी बुधवारी (दि. १९) होणारे आपले ध्वजारोहण पुढे ढकलले आहे.

पंचदशनाम जुना आखाडा रमता पंच छावणी पिंपळद येथे सुमारे ७०० मीटर लांबीचा रस्ता तयार झालेला नाही. वेळावेळी मागणी करूनही याबाबत चालढकल झाली. काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देवून १५ ऑगस्टपूर्वी रस्ता करण्याचे अश्वासन दिले. मात्र, अद्यापही तेथे जाण्यास रस्ता नसल्याने या आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरी महाराज यांनी बुधवारी होणारे ध्वजारोहण पुढे ढकलले आहे. पंचअग्नी आखाड्याचे सभापती गोपालानंद ब्रह्मचारी यांनी देखील आपल्या आखाड्याचे ध्वजारोहण नियाजित तारखेप्रमाणे बुधवारी होणार नाही, असे जाहीर केले आहे. पंचअग्नी आखाडा हा जुना आखाड्यास गुरूस्थानी मानतो. त्यामुळे त्यांनी जुना आखाड्याचे ध्वजारोहण होणार नसेल तर अग्नी आखाड्याचे देखील होणार नाही असे स्पष्ट केले. श्री महंत गोपालानंद ब्रह्मचारी हे वयोवृध्द साधू आहेत. त्यांनी गुजरातमध्ये विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला आहे. शासनाने दिलेल्या सुविधांबद्दल ते प्रचंड नाराज आहेत. त्यांच्या या भूमिकेचा गंभीर परिणाम सिंहस्थात होवू शकतो.

आवाहन आखाड्याकडे लक्ष

जुना आखाडा, अग्नी आखाडा आणि आवाहन आखाडा हे तीन सोबत शाहीस्नान करतात. त्यांचे ध्वजारोहण एकाच दिवशी होत असते. जुना आखाडा आणि अग्नी आखाडा यांनी ध्वजारोहण पुढे ढकलले आहे. मात्र, आवाहन आखाड्याने काय निर्णय घेतला हे समजलेले नाही. दरम्यान जुना आणि अग्नी आखाडा यांनी निमंत्रण पत्रिका देखील रवाना केल्या आहेत.

इतिहासाची पुनरावृत्ती?

महंत हरिगिरी यांनी निलपर्वत येथील निलकंठेश्वर मंदिराचा त्रिशुल स्थापन करणयचे ठरविले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे बुधवारी त्र्यंबकमध्ये नाथ संप्रदाय मठात श्री नवनाथ महाराज मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या हजेरीत अशा प्रकारे आखाडे ध्वजारोहण करणार नसतील तर ही निश्चितच गंभीर बाब आहे. यापूर्वी १९९२ मध्ये दुसरे आणि मुख्य शाहीस्नान रद्द झाले होते याबाबत प्रशासनाने गांभिर्याने विचार करावा, अशी त्र्यंबकमध्ये चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images