Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तीन भावंडांना कारावास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन सख्ख्या भावांना प्रत्येकी एक वर्षे कारावास आणि दंड ठोठावला आहे. देवीदास सुंदरलाल परदेशी, संतोष सुंदरलाल परदेशी आणि सुरज सुंदरलाल परदेशी (तिघेही रा. भालेराव मळा, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत. उपनगर परिसरात राहणारा रोहित अशोक जोहर हा युवक २३ मे २०१२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मित्रांसोबत घराजवळ गप्पा मारत होता. त्यावेळी आरोपी देवीदास तेथे आला. त्याने तू मला शिवी का दिली अशी कुरापत काढून रोहितला शिवीगाळ व मारहाण केली. देवीदासने लोखंडी सुऱ्याने रोहितच्या डाव्या बरगडीवर वार करून गंभीर जखमी केले होते.

तसेच सुंदरलालचे भाऊ संतोष व सूरज यांनीही रोहितच्या मित्रांना व आईला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या मारहाणीत रोहितच्या मित्राच्या मानेवरही वार झाल्याने तो जखमी झाला होता. याप्रकरणी रोहितच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. चौहान यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. सुनील सरोदे यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात तिघांविरोधात पुरावे आढळल्याने न्यायालयाने त्यांना एक वर्षे कारावास आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामविकासाची इयत्ता पहिलीच!

0
0

टीम मटा

पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून 'आदर्श ग्राम योजनें'तर्गत अनेक खासदारांनी विकासाला चालना मिळावी, या सद्‍हेतूने गावे दत्तक घेतली. त्याचा मोठा गवगवाही झाला. मात्र, या 'दत्तकविधाना'स सुमारे एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही या गावांतील विकास अद्याप पहिल्याच इयत्तेत रेंगाळत असल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पाहणीत समोर आले आहे.

हेमंत गोडसे (नाशिक), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) आणि डॉ. सुभाष भामरे (धुळे) या खासदारांनी दत्तक घेतलेल्या अनुक्रमे अंजनेरी, अवनखेड अन् गोंदूर गावांतील वर्तमानाचा आढावा 'महाराष्ट्र टाइम्स'ने घेतला. वर्षभरात हे 'पालक खासदार' गावात किती वेळा आले?, वर्षभरात गावाच्या एकूण स्थितीत काही फरक पडला का, गावाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी काही हालचाली झाल्या का अशा मुद्द्यांच्या अनुषंगाने, थेट स्थानिक मंडळींशी संवाद साधण्यात आला. खासदारांचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता, ते या गावांना फारशा भेटी देऊ शकले नाहीत. पाणी, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्नांशी ग्रामस्थांना सातत्याने झुंज द्यावी लागते. वर्षानुवर्षे चाललेली ही झुंज या दत्तकविधानामुळे खूप सुसह्य झाली आहे, अशी भावना निदान आज तरी या गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधताना जाणवली नाही. वर्षभरात सारेच जैसे थे राहिले, असे नाही; मात्र, ज्या रीतीने व ज्या वेगाने विकासाची गाडी धावेल, अशी अपेक्षा होती, ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही, असा सर्वसाधारण सूर ऐकू आला. असे असले तरी या दत्तकगावांच्या समस्या निदान मांडण्याच्या पातळीवर पोहोचल्या, अशी भावनाही व्यक्त झाली.

मूलभूत प्रश्नही सुटेनात!

खासदार आदर्श दत्तक ग्राम योजनेत समाविष्ट झाल्यानंतर वर्षभरात ग्रामस्थांच्या प्राथमिक समस्या तरी दूर व्हायला हव्या होत्या. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, सार्वजनिक शौचालय, शाळांच्या इमारती, रस्ते, रोजगार हे मूलभूत प्रश्न वर्षभरात पूर्ण करण्यात खासदारांना अपयश आले आहे. विशेष म्हणजे ज्या शेतीवर ग्राम अर्थव्यवस्था अवलंबून असते, त्याकडेही खासदारांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे कागदावर रंगरंगोटी झालेल्या या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीकडे ग्रामस्थांचे डोळे लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडाच्या तोडफोडीला विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेतर्फे रामकुंड आणि सीताकुंड एकत्रिकरणाचा घाट घातला जात असून, त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. हे काम थांबवावे अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्याचा इशारा शहरातील संस्थांनी दिला आहे.

रामकुंड आणि सीताकुंड यांची विभागणी करणारा सांडवा आहे. पर्वणीच्या काळात या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार असल्याने महापालिकेने हा सांडवा तोंडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री हा सांडवा तोडण्याचे काम सुरू झाले. एवढ्यावरच न थांबता तोडलेल्या सांडव्याचा मलबा अरुणा व गोदावरी संगमात टाकण्यात येत असून, यामुळे संगमाचा मूळ स्त्रोत बंद करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. या कामाला नागरिकांचा विरोध होईल म्हणून हे काम रात्रीतून पूर्ण करण्याचा प्रशासनाचा डाव होता; मात्र पुरोहीत संघ आणि स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने सकाळी सात वाजता नागरिकांनी या कामाला विरोध केला. मात्र तरीही हे काम प्रशासनाने सुरुच ठेवले.

याबाबत महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या लक्षात आणून देण्यात आली. याबाबत त्यांनी आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगत बोलणे टाळले. या ठिकाणी भाविकाची गर्दी होणार आहे. प्रत्येक भाविकाची रामकुंडातच स्नान करण्याची इच्छा असते. सध्याचे रामकुंड आकाराने छोटे असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही कुंड एकत्र करणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे आयुक्त प्रविण गेडाम यांचे म्हणणे आहे.

गेल्या सिंहस्थात देखील हे कुंड तोडले होते असेही ते म्हणाले. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गोदावरीचा गळा घोटण्याचे काम प्रशासनाकडून होत असून, पेशवेकालीन घाट नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोदावरीच्या पात्रात एकूण सोळा कुंड होती; त्यातील मोजकीच कुंड शिल्लक असताना विकासाच्या नावाखाली महापालिका नाशिक शहराचे धार्मिक महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या ठिकाणी एकावेळी तीस हजार नागरिक आंघोळ करणार आहेत. सध्या गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. मात्र पर्वणीच्या काळात जास्त पाऊस होऊन गोदावरीला पुर आल्यास येथे भाविकांना धोका पोहचू शकतो म्हणून दुतोंड्या मारुतीपर्यंत रामकुंड वाढवण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाचे इंजिनीअर पी. बी. चव्हाण यांचे म्हणणे आहे. हे काम थांबवावे नाही तर आंदोलन उभे करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी प्रशासनाला दिला आहे.

पुरेशा पाण्याअभावी भाविकांची निराशा

सिंहस्थ सुरू झाल्याने गोदाघाटावर स्नानासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच शुक्रवारी दीप अमावस्या असल्याने गुरूवारीच भाविक शहरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी सकाळी शेकडो भाविकांनी गोदाघाटावर स्नानासाठी गर्दी केली होती. मात्र गोदापात्रात पुरेशे पाणी नसल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ सुरू झाला असूनही गोदाघाट परिसरातील कामे मात्र अजूनही संपलेली नाहीत. याचा फटका भाविकांना बसत आहे. दीप अमावस्या असूनही प्रशासनाने गोदापात्रातील कामे सुरू केल्याने गोदापात्रात पाणी कमी करण्यात आले होते. यामुळे शुक्रवारी भाविकांना स्नान करताना अडचणींचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा विहिरीत टाकले विषारी द्रव्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईने ग्रस्त असलेल्या नागापूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरीत विषारी द्रव्य टाकून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जागरूक पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे शेकडो ग्रामस्थांचे प्राण वाचल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथे घडली.

नागेश्वर मंदिर परिसरात असलेल्या दोन विहिरींद्वारे पाणीटंचाईने हैराण असलेल्या नागापूर गावाला पाणीपुरवठा होतो. मंदिरात येणाऱ्या भक्तांनाही याच विहिरीतील पाणी पिण्यासाठी दिले जाते. मात्र, या दोन्ही विहिरीत रविवारी अज्ञात व्यक्तीने विषसदृश्य द्रव्य टाकल्याचे उघड झाले. पाणीपुरवठा कर्मचारी हौशिराम पवार आणि बाळू आहेर हे विहिरीवर वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता पाण्याला वेगळाच वास येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायत सदस्यांना माहिती दिली. ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र संताप व्यक्त केला. परिसरात शोध घेतला असता पिकांवर फवारण्यात येणाऱ्या विषारी कीटकनाशकांचे पाकीट आढळून आले. त्यानंतर विहिरीचे पाणी उपसण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध मनमाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घननिळा बरसेना!

0
0

जिल्ह्यातील धरणं तहानलेलीच; केवळ ३४ टक्के पाणीसाठा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ गेला... आषाढ सरला आता श्रावणालाही सुरुवात झाली; मात्र घननिळा अजूनही धो-धो न बरसल्याने बहुतांश धरणांची पाणी पातळी खालावली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत असून, त्याचा सामना कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीचे पडघम वाजू लागले आहेत, तर दुसरीकडे पर्जन्यराजा कोपल्याचे पहावयास मिळत आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकनगरीत दाखल होणार असून, त्यांच्यासाठी पुरेसा पाणीसाठा राखून ठेवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी जिल्ह्यातील शेतांची तहान कशी भागविणार, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. गंगापूर धरण समूह, पालखेड धरण समूह आणि गिरणा खोऱ्यात मिळून २३ धरणे आहेत. त्यापैकी केवळ भावली धरणानेच शंभरी गाठली आहे. उर्वरीत धरणांमध्ये केवळ ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समुहातील धरणं गेल्यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत ७२ टक्के भरली होती, मात्र यंदा या धरणांमध्ये केवळ ५७ टक्के पाणी आहे. पालखेड धरण समुहात सर्वाधिक १४ धरणे असून, त्यामध्येही गेल्यावर्षी ७४ टक्के पाणीसाठा होता. हा साठा आता ५५ टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे. तर, गिरणा खोऱ्याची परिस्थिती अजूनच वाईट आहे. तेथे गतवर्षी स्वातंत्र्य दिनापर्यंत धरणांमध्ये ३२ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. मात्र यंदा या खोऱ्यातील चणकापूर, हरणबारी, केळझर आणि गिरणा धरणाने तळ गाठला आहे. गिरणा धरणात तर सर्वात कमी म्हणजे केवळ चार टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही आजमितीस केवळ ६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार ३९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यातही निफाड, येवला, सिन्नर, नांदगाव आणि बागलाण तालुक्यामध्ये खूपच कमी पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालाराम’ ‌देखोगे तो ‘पीके’ भूल जाओगे!

0
0

प्रशांत देसले, नाशिक

कुंभमेळा म्हणजे संपूर्ण देशासह अवघ्या जगासाठी एक आकर्षण आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक यंदा नाशिककडे येत आहेत. त्यातलेच एक म्हणजे दिल्लीचे कपूर आणि मेहरा कुटूंब. या दोन्ही परिवाराला सुखरूप देवदर्शन करून आणण्याची जबाबदारी गौरव कपूर या तरुणानं लिलया पेलली. गौरव दिल्लीतील खासगी कंपनीत नोकरीला. आई-वडील, मामा-मामी, बहिण, सासू, काका-काकू यांना घेवून गौरवने कुंभमेळ्याचे नियोजन आखलं होतं. मात्र, पाच ऑगस्टला मध्य प्रदेशातील रेल्वे अपघातामुळे त्यांचं सगळं नियोजन कोलमडलं आणि त्यानंतर मिळेल त्या रेल्वेनं त्यांनी कशीबशी मुंबई गाठली. तेथून थेट नाशिक व त्र्यंब‌केश्वरसाठी खासगी कार केली. तेथूनच सुरू झाला दिल्लीकरांचा कुंभमेळ्याचा प्रवास. इगतपुरी-घोटीच्या रम्य वातावरणात हे पाहुणे असे काही रमले की त्यांनी तेथे तब्बल पाच सहा तास घालवले. तिथला निसर्ग त्यांनी डोळ्यात साठवून घेतला. नाशिकमध्ये दहिपुलाजवळ आल्यावर या भाविकांचे हाल झाले. पोलिसांनी त्यांना चारचाकी वाहन येथे पार्क करता येणार नाही असा दम भरताच त्यांची भंबेरी उडाली. मुंबई-पुण्यातील ड्रायव्हर असल्याने त्यालाही नाशिक नवखे होते. शेवटी त्यांना काजी गढीकडे गाडी पार्क करावी लागली. तेथून रामकुंडापर्यंत पायपीट करीत ज्येष्ठांना यावे लागले. 'अगर पार्किंग नजदीक होती तो बहुत अच्छा होता' असं गौरवचे वडील थोडं संतापातच बोलून गेले.

प्रवासातील गमती जमती सांगितल्यानंतर गौरवने सहज एक प्रश्न विचारला, 'हमने सुना था की नासिक कुंभमेला के लिए ढाई हजार करोड रुपये मिले है, हमे पुल के पास पुल‌सि ने रोका, पर जहा हमने गाडी पार्क की वहाँ तो कोई भी सिक्युरिटी नही दिखा, कोई भी आता है और कार पार्क करके चला जाता है, ना उसे कोई टोकता है ना ही उसकी गाडी चेक होती है' त्याच्या या एका शंकेने कुंभमेळ्याच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. इतक्यात गौरवचे मामा अनिल मेहरा म्हणाले, 'पर एक बात तो माननी पडेगी, यहा की ट्रॅफिक बहुतही नियमों के आधार पर है, हर सिग्नल पर पुलिसवाला था, और कोई भी सवारीवाला जल्दबाजी नही कर रहा था।' या एका ओळीत त्यांनी इथल्या वाहतुकीचं कौतुक केलं.

गोदाघाटावर स्नान केल्यानंतर त्यांनी एकाच गोष्टीचा शोध सुरू केला होता. त्यांना 'पीके'चे शुटींग ज्या मंदिरात झालं होतं ते पहायचं होतं. गौरवचे वडील विनोद कपूर यांनी त्याबाबतचा किस्सा सांगितला. रामकुंडावरील एका पोलिसाला त्यांनी विचारलं, 'पीके की शुटींगवाला मंदिर कहाँ है? त्यावर पोलिसानं त्यांना सांगितलं, 'अरे वो तो खाली एक सीन था भाई, जब आप हमारे यहा का कालाराम मंदिर देखोगे तो पुरा 'पीके' भूल जाओगे,' असं सांगून त्या पोलिसाने सगळ्यांना काळाराम मंदिराकडचा रस्ता दाखविला. त्याच्या उत्तराने त्या सगळ्यांचीच उत्कंठा वाढली होती. प्रत्यक्षात काळाराम मंदिराची भव्यता पाहून दिल्लीकर पाहुणे जाम खूश झाले. मंदिरातील राममूर्तीने त्यांच्या मनात घर केलं. तेव्हा गौरव सहज बोलून गेला, मंदिर के बारे मे वो पुलिसवाला सही कह रहा था..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणासाठी मांदियाळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आता भाविकांना तपोवनातील ध्वजारोहणाची उत्सुकता लागली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर राहणार असून 'सिक्युरीटीचे ऑडीट' करण्याचे काम पोलिस अधिकारी युध्दपातळीवर करीत आहे.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम बुधवारी (दि. १९) सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी होईल. आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतरच धार्मिक कार्यक्रम, अन्नछत्र, खालशांमध्ये कार्यक्रम व्यापक स्वरूपात सुरू होतील. आखाड्यांच्या दृष्टीने ध्वजारोहण कार्यक्रमास वेगळेच महत्त्व असून तो भव्य स्वरूपात करण्यासाठी प्रशासनासह साधू महंतांनी कंबर कसली आहे. पुरोहित संघाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान स्थानिक नगरसेवकांसह काही लोकप्रतिनिधींना सभामंडपापर्यंत पोहचू दिले गेले नव्हते. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ध्वजारोहण कार्यक्रमास सर्वप्रथम १२० नगरसेवक, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींना निमंत्रण धाडण्यात आले आहे. प्रमुख मान्यवरांना सभामंडपात जागा मिळावी, यादृष्टीने तो उभारला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाहतूक मार्गात बदल?

साधुग्राम ध्वजारोहण तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमाजवळील रस्त्यावर होणार असून त्या दिवशी औरंगाबाद हायवेवरील वाहतूक वळवण्यात येऊ शकते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बंदोबस्तासाठी मोठ्या स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

असा साधुग्रामचा ध्वज

साधूग्राम ध्वजारोहणाची सिद्धता अंतिम टप्प्यात आली असून तिन्ही अनीचा ध्वज तयार झाला आहे. त्यावरील सुवर्णकांती हनुमान १२ कारागिरांनी विशेष सूतापासून अ‍ॅब्रॉयडरी केला आहे. २५ फूट लांब, १० फूट रुंद आणि ५१ फूट उंच लाकडी ध्वजावर तो उभारण्यात येईल. निर्मोहीचा ध्वज पांढरा आणि त्याला लाल किनार, दिगंबरचा पंचरंगी, तर निर्वाणीचा ध्वज लाल रंगाचा असेल. त्याच्या दोन्ही बाजूंवर सुवर्ण हनुमान विराजमान असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भरकटलेल्या हिंदूंना आपल्यात आणले पाहिजे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिदूंच्या जनजागृतीचे उत्तम काम करीत आहे. आजच्या वर्तमान परिस्थितीचा विचार करता ‍हिंदूंची फसवणूक आणि वाढते धर्मांतर घातक होत आहे. भरकटलेल्यांना पुन्हा आपल्यामध्ये आणले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी केले.

हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यातर्फे सिंहस्थ पर्वणी निमित्त 'राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण' या माहिती युक्त चित्र प्रदर्शनाचे भेटीप्रसंगी महंत ग्यानदास महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय निर्मोही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, महंत संजयदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास महाराज उपस्थित होते.

सध्याचे धर्माचार्य यांनी हिंदू संरक्षणाचे काम केले पाहिजे. पण तसे होत नाही. धर्माचार्यांकडून स्वत:च्या लाभासाठी हिंदुत्वाचा वापर करून जनतेचे शोषण होत असल्याचे दिसत आहे. काही जण तर हिंदुत्व आणि बंधुत्व संपवू पाहत आहेत. हिंदुत्वाला वाचवण्यासाठी आपण वेळीच संघटीत होणे गरजेचे आहे, असेही महंत ग्यानदास महाराज यांनी केले.

सध्याचे शंकराचार्य ,जगद्गुरू आणि धर्माचार्य यांनी हिंदुत्वासाठी कार्य केले पाहिजे. परंतु, सध्याचे शंकराचार्य, जगद्गुरू आणि धर्माचार्य हे सोन्या चांदीच्या सिंहासनावर बसून स्वत:ची आरती करून घेण्यात धन्यता मानत आहेत, असेही शेवटी महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले. याप्रसंगी महंत जनार्दनदास महाराज, महंत महेंद्रदास महाराज, सनातनच्या पदाधिकारी स्वाती खाड्ये, नंदकुमार जाधव, 'निमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, पंकज जोशी, सुनील घनवट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायगरा ते कॅनडा नाशिककराची सायकलस्वारी

0
0

>> फणिंद्र मंडलिक

नाशिकचे सायकलपटू राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला सातत्याने ठसा उमटवत आहेत. शहरातील कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. शिरिष घन यांनी अत्यंत खडतर अशी नायगरा फॉल्स ते कॅनडा ही रॅली पूर्ण केली आहे. या रॅलीत सहभागी होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. विशेष म्हणजे ही रॅली त्यांनी यशस्वी केली.

अमेरिकेतील स्मॉल स्टेप्स चॅर‌िटी या संस्थेतर्फे न्यू यॉर्क ते अमेरिका ही ७५० किलोमीटरची रॅली ३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही रॅली २००२ पासून सुरु झाली असून आतापर्यंत लंडन ते पॅरीस, पॅरीस ते जिनीव्हा, नायगरा ते कॅनडा असे आयोजन करण्यात येते. यंदाची रॅली शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी या संस्थेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोह‌िमेतून उभा राहणारा निधी संस्था शाळाबाह्य मुलांसाठी वापरण्यात येतो. विविध देशातील एकूण ३२ सायकलिस्ट या रॅलीत सहभागी झाले होते. यात २ अमेरिकन, २९ इंग्लंड तर पहिल्यांदाच एका भारतीय सायकलिस्टचा समावेश होता. रॅलीची सुरुवात नायगरा फॉल्सपासून होऊन कॅनडा येथे समारोप झाला. रॅलीचा प्रवास बहुतांश अमेरिकेच्या ग्रामीण भागातून असल्याने तेथील जीवनमान अनुभवण्याची संधी मिळाल्याचेही डॉ. घन यांनी सांगितले.

खडतर रॅली

७५० किलोमीटरच्या रॅलीत सायकलिस्टला अनेक ठिकाणी चढ-उतार, खडतर रस्ते, डोंगरदऱ्या, वाळवंट अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. तर अमेरिकेतील काही महामार्गांवर सायकल चालवण्यास बंदी असल्याने 'ए' मार्ग 'बी' मार्ग व 'सी' मार्गाचा अवलंब केला. रोजचा अंदाजे १२० ते १५० किलोमीटर प्रवास सायकलिस्ट करत होते. साध्या रस्त्यावरुन १५० किलोमिटर प्रवास करण्यास अंदाजे दोन ते तीन तास लागतात; मात्र हेच अंतर रॅलीत पूर्ण करताना १५ तासापेक्षाही जास्त कालावधी लागत होता, असे डॉ. शिरिष घन यांनी सांगितले. या रॅलीसाठी डॉ. घन यांनी तीन महिन्यांपासून सातत्याने सराव केला होता. तसेच व्यावसायिक सायकलिस्टचे देखील मार्गदर्शन घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरभक्षक बिबट्या मोकाट

0
0

किशोर वडनेरे, लासलगाव

निफाडच्या गोदाकाठातील गावांमध्ये नरभक्षक बिबट्याने थैमान घातले असून, गेल्या आठवड्यात दोन लहान मुलांना ठार केले. पिंजरे लावूनही हा बिबट्या जेरबंद होत नसल्याने गोदाकाठातील नागरिकांचे व विशेषतः लहान मुलांचे रोजचे जगणेच कठीण झाले आहे. आणखी ‌किती बळी घेतल्यानंतर वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोदाकाठातील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच लहानग्यांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. एप्रिल २०१२ मध्ये दुर्गेश गोसावी व पल्लवी सानप, तर एप्रिल २०१५ मध्ये गणेश पोटे आणि आता गेल्या शनिवारी विकी पीठे आणि मंगळवारी सायंकाळी दीपाली कोठे या पाच कोवळ्या जीवांना बिबट्याने ठार केले. या काळात या नरभक्षक बिबट्याने अनेक नागरिकांवर व लहान मुलांवर सातत्याने हल्ले केल्याच्या घटना गोदाकाठातील गावांमध्ये घडल्या आहेत अन् घडत आहेत.

मुबलक शिकार उपलब्ध असतानाही हा बिबट्या लहान मुलांनाच का लक्ष करतोय असा प्रश्न या निमित्ताने वनखात्यापुढे उभा ठाकला आहे. गेल्या तीन वर्षांत घडलेल्या घटना पाहता वनखात्याने हा प्रश्न गंभीरतेने हाताळणे गरजेचे होते. मात्र, वनखाते घटना घडल्यानंतर फक्त पिंजरे लावण्यातच धन्यता मानत आहे. त्यापलीकडे जाऊन या विषयातील एक्स्पर्ट असलेल्या व्यक्तींना येथे पाचारण करून परिस्थिती कशी नियंत्रणात आणली जाईल, यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.

काही विशिष्ठ ठिकाणांवर इन्फ्रारेड कॅमेरा लाऊन बिबट्याचा माघ काढला जाऊ शकतो का?, गोदाकाठात पाच लहानग्यांचा कर्दनकाळ ठरलेला बिबट्या एकच आहे का हे शोधण्यासाठी प्रशिक्षित आणि एक्स्पर्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करायला हवी. गोदाकाठाचा नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाट आहे. त्याचं मार्गक्रमण, त्याचा ठावठिकाणा शोधायलाच हवा नाहीतर पुन्हा तो एखाद्या लहानग्याचा जीव घेतल्यावाचून राहणार नाही.

विशेष माेहिमेची गरज

पंधरा वर्षांपूर्वी असाच प्रकार जुन्नर परिसरात घडला होता. २००० ते २००५ या पाच वर्षांच्या काळात जुन्नर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या शेकडो घटना घडल्या होत्या. या दरम्यान बिबट्यांनी लहान मुले व मोठे स्त्री-पुरुष अशा एकूण १७ जणांना बळी घेतला होता. प्रयत्न करूनही बिबट्यांचा उपद्रव कमी होत नसल्याने जुन्नरमध्ये तेव्हाच्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी इको बायोलोजिस्ट विद्या आत्रेय, डॉ. बेलसरे यांच्यासारख्या जाणकारांची मदत घेऊन विशेष मोहीम राबविली होती. या दरम्यान जुन्नर परिसरात शंभर बिबटे जेरबंद झाल्याने बिबट्यांचे मनुष्यावर होणारे हल्ले इथे थांबले होते. निफाडच्या गोदाकाठातील रहिवाशीही जुन्नर सारख्याच भयावह परिस्थितीतून जात आहेत. इथे गरज आहे ती इथल्या रहिवाशांना बिबट्या प्रवण क्षेत्रात स्वतःची दिनचर्या कशी असावी याच्या मार्गदर्शनाची. वन्यजीव व वनविभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांशी थेट संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कुत्रे झाली कमी

बिबट्यांचा वावर वाढल्याने ऊस लागवड क्षेत्रातील कोल्हे गायब झाली असून, परिसरातील कुत्र्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या नेमकी किती असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खेळण्यासाठी जाळीचे कुंपण

निर्ढावलेला बिबट्या कुठलीही भीती न बाळगता थेट घराच्या अंगणातून लहानग्यांना उचलून नेत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या भीतीपोटी करंजगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी घरापुढे जाळीचे कुंपण तयार केले आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी या बंधिस्त जाळीत सोडले जात आहे. त्यावरूनच या प्रश्नाने इथे किती भयंकर स्वरूप धारण केले आहे हे स्पष्ट होत आहे.

माणसांवरच हल्ले का?

वन्य जीवांसह येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे गायी, म्हशी, घोडे, कुत्री, बकऱ्या, कोंबड्या, मेंढ्या आदी जनावरे मुबलक संख्येत आहेत. बिबट्यासारख्या हिंस्त्र जीवाला इतक्या मोठ्या प्रमाणात शिकार उपलब्ध असतानाही लहान मुलांवर व माणसांवर हल्ले का होत आहेत. असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचं उत्तर वनखात्याला शोधनेही क्रमप्राप्त ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस अपार्टमेंटचा ट्रेंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिअल इस्टेट क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पनांची चलती असल्यामुळेच नाशकात सर्व्हिस अपार्टमेंटचा ट्रेंड रुढ होत आहे. खास करून विकेण्ड घालविण्यासाठी नाशकात येणाऱ्यांसाठी ही संकल्पना अधिक मोलाची ठरत आहे.

मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक हे वेगाने विकसित होत असले तरी नाशिक शहराचे वेगळेपण कायम आहे. आल्हाददायक हवामान, नैसर्गिक ठिकाणांचा ठेवा अशा कितीतरी बाबी आहेत. त्यामुळेच निवृत्तीनंतर नाशिकमध्ये वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याशिवाय सेकंड होम म्हणूनही नाशिक परिचित झाले आहे. परिणामी, नाशिकला रिअल इस्टेट क्षेत्र अतिशय जोमात आले आहे. वैविध्यपूर्ण संकल्पनांनी युक्त अशा बांधकाम प्रकल्पांची त्यामुळेच सध्या चलती आहे.

पर्यटन आणि तीर्थाटनासाठी नाशिककडे असलेला ओढा लक्षात घेऊन आता नाशकात सर्व्हिस अपार्टमेंट नावाची संकल्पना रुढ होत आहे. यामुळे नाशकात बाहेरून येणाऱ्यांची राहण्याची व खाण्याची योग्य अशी सोय होत आहे. शहरात अनेक हॉटेल्स असल्या तरी सर्व्हिस अपार्टमेंटला चांगली पसंती लाभत असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने नाशकात रिअल इस्टेटचा नवा ट्रेंड विकसित झाला आहे. शहरात ४ ते ५ प्रकल्प सर्व्हिस अपार्टमेंटचे प्रकल्प कार्यरत असून त्याद्वारे तब्बल १०० घरे उपलब्ध झाली आहेत.

नाशकात आम्ही सर्व्हिस अपार्टमेंटची संकल्पना सुरू केली आणि त्याला मोठा प्रतिसाद लाभतो आहे. अशा प्रकारच्या संकल्पनेमुळे विकेण्डसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेची चांगली संधी उपलब्ध होते. - किशोर अहिरे, हाऊस खास

काय आहे सर्व्हिस अपार्टमेंट?

उत्त्पन्नाचे पर्यायी साधन म्हणूनही सर्व्हिस अपार्टमेंटकडे पाहिले जाते. पारंपरिक पद्धतीने भाडेकरू ठेवण्यापेक्षा फ्लॅटचे रुपांतर सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये केले जाते. सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये योग्य त्या अॅमेनिटीज उपलब्ध करून दिल्यास त्यांची गणना तीन तारांकित हॉटेल म्हणूनच करण्यात येते. त्यामध्ये वॉर्डरोब, किचन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, टीव्ही (केबल कनेक्शन), कॉट (गाद्यांसह), मायक्रोवेव्ह ओव्हन, वायफाय कनेक्शन आदींचा अंतर्भाव होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी-कर्मचाऱ्यांची मक्तेदारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

नाशिक महापालिकेत असलेल्या सहा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची जणू मक्तेदारीच झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामध्ये सिडको, सातपूरमधील वर्षांनुवर्ष एकाच विभागात काम कर्मचारी ठिय्या मांडून बसले आहेत. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एकाच ठिकाणी कायम चिकटून असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे.

नाशिक महापालिकेत नाशिकरोड, सिडको, पंचवटी, मध्य नाशिक, पूर्व विभाग, नवीन नाशिक सिडको व सातपूर असे सहा विभागातून कामकाज चालते. यामध्ये बांधकाम, ड्रेनेज, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, विविध कर, झोपडपट्टी, नगररचना, मलनिसाःरण व घरपट्टी, पाणीपट्टीचा समावेश असतो. परंतु, यात अनेक विभागांमध्ये अनेक वर्षांपासून बदली न झाल्याने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेमध्ये मुजोरपणा वाढत आहे. सरकारच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचा नियम आहे. मात्र, नगरसेवक आणि बड्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने महापालिकेचे आम्हीच सर्वकाही असा आव काही कर्मचारी व अधिकारी आणत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी कायम असलेले काही कर्मचारी सामान्य नागरिकांशीच नव्हे तर त्यांच्या वरिष्ठांशीही आरेरावीची भाषा करीत असल्याचे दिसून येते.

आरोग्य विभागात 'सह्या'जीराव अधिक

महापालिकेच्या आरोग्य विभागात एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. यातील काही कर्मचारी शेडवर जाऊन निव्वळ हजेरी लावण्यासाठी सह्या करून निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरसेवक आणि बड्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असलेल्याकडून दादागिरीचीच भाषा सर्वांना वापरली जाते. त्यामुळे या प्रश्नी महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष घालत आरोग्य विभागात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रभाग सभेमध्येही रंगतात वाद

सिडको, सातपूरच्या होणाऱ्या प्रभाग बैठकीत अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवरून वाद झाले आहेत. मात्र, संबंधित बडे अधिकारी लक्ष घालत नसल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढत आहे. महापालिका प्रशासनाने ठिय्या मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभापती उषा शेळके, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, विलास शिंदे, सचिन भोर यांनी वेळोवेळी प्रभाग बैठकीत केली.

प्रभाग सभापती झाल्यापासून महापालिकेच्या सातपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितलेले एकही कामे वेळेवर होत नाहीत. कारण एकाच ठिकाणी कायम ‌असलेल्या कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढत आहे. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज आहे. - उषा शेळके, सभापती, सातपूर प्रभाग

सातपूर विभागात एकाच विभागात अनेक वर्षांहून अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शासन नियमानुसार तीन वर्षांत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेत अर्थ कारणातून बदल्या केल्या जात नाहीत. याप्रश्नी आयुक्तांनी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. - विलास शिंदे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणानिमित्त वाहतूक मार्गात बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील महत्त्वपूर्ण असा आखाड्यांचा पारंपरिक ध्वजारोहण सोहळा उद्या होत आहे. या सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी (दि. १८) रोजी रात्री आठपासून ते अंमलात आणले जातील. ही माहिती पोलिस उपायुक्त एन. अं‌बिका यांनी सोमवारी दिली.

वैष्णव पंथीय आखाड्यांचा महत्त्वपूर्ण ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पाडला जाणार आहे. निवार्णी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांकडून या जय्यत तयारी सुरू आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडूनही दक्षता घेतली जात आहे. या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहनांची गर्दी होणार नाही याची काळजी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून घेण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १८) रात्री आठपासून तपोवनाकडे जाणारे बहुतांश मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ध्वजारोहण सोहळा संपल्यानंतर ही वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाणार आहे.

बंद असणारे रस्ते

औरंगाबाद महामार्ग : औरंगाबाद नाका ते मिर्ची हॉटेल

मारुती वेफर्स ते तपोवन

तपोवन क्रॉसिंग ते तपोवन

पंचवटी कॉलेज ते तपोवन

वाहनतळाची ठिकाणे

औरंगाबादकडून येणाऱ्या वाहनांसाठी निलगिरी बाग

धुळ्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी बिडी कामगार चौफुली

मुंबई, नाशिककडील वाहनांसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळील सर्व्हिसरोड

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

मुंबई तसेच नाशिकहून औरंगाबादकडे जाणारी वाहने जत्रा हॉटेलमार्गे नांदुरनाक्यापर्यंत जाऊन औरंगाबादकडे जाऊ शकतील.

औरंगाबादकडून येणारी वाहने निलगिरी बाग येथून उजवीकडे वळून रासबिहारी चौक, बीडी कामगार नगर मार्गे मुंबई, धुळे, नाशिककडे जाऊ शकतील. याखेरीज अशी वाहने नांदुरनाक्याहून जेलरोडमार्गे पुणे किंवा नाशि‌ककडे जाऊ शकतील.

टाकळीगाव परिसरातून धुळे, मुंबईकडे जाणारी वाहने तपोवनातून न जाता आग्रा रोड, टाकळीफाटा मार्गे रवाना होतील.

जुना आखाड्याचे ध्वजारोहण लांबणीवर

त्र्यंबकेश्वर येथी जुना पंचदशनाम आखाड्याने नियोजित १९ आगॅस्ट रोजी होणारे ध्वजारोहण पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत महंत हरिगिरी महाराज यांनी ही माहिती दिली. ध्वजारोहणाची निमंत्रणे दिली आहेत म्हणून निलपर्वत येथे निलकंठेश्वर महादेव मंदिरासमोर १०८ फूट उंचीचा त्रिशुल त्या दिवशी उभारला जाईल असे सांगितले.

एफडीएकडून तपासणी

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पंचवटीत तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत हॉटेल, हातगाडीचालक यावरील अन्न व पाण्याची तपासणी करून स्वच्छतेबाबतच्या सूचना करण्यात आल्या. महाकुंभात कुठल्याच प्रकारची अन्नात भेसळ होऊ नये, याबाबत दक्षता घेण्यासाठी तपासणी दौरा केला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश बेंडकुळे यांनी सांगितले.

सुट्यांमुळे गर्दी

सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रविवारी रामकुंडासह साधुग्रामचा परिसर भाविकांनी न्हाऊन निघाला. सायंकाळीच्या सुमारास गर्दीने उच्चांक गाठला. मात्र, वाढत्या गर्दीमुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न समोर आला. रामकुंड परिसरातसुध्दा हेच चित्र पाहण्यास मिळाले. सकाळपासूनच भाविकांनी रामकुंडात स्नान करण्यासाठी गर्दी केली. तसेच कपालेश्वर, तपोवन, भक्तीधाम, मुक्तिधाम, सोमेश्वर, बालजी मंदिर इत्यादी मंदिरात भाविकांचा ओघ सुरू होता. तपोवनात तर जत्राच भरली. देशविदेशातील भाविक तपोवनात जमा झाले.

हॉटेल्स गजबजली

आखाड्यांच्या ध्वजारोहणाला सुरुवात झाल्याने देश विदेशातील भाविक तसेच पर्यटकांची नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी वाढू लागली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून, दरही वाढवले आहेत. बाजारपेठांमधील उलाढालही वाढली असून व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य पर्वण्यांना गर्दी घटणार!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रामकुंडापासून भाविकांना दूर ठेवणे, दहशतवादाचे सावट, गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना आणि रोगराईच्या भीतीने आता भाविकच मुख्य पर्वण्यांपासून दूर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुख्य पर्वण्यांना ऐंशी लाख ते कोटी भाविक येण्याचा प्रशासनाने वर्तवलेला गर्दीचा फुगा फुटण्याची शक्यता आहे. उपपर्वण्यांना भाविकांना येण्याचे साकडे घातल्याचा परिणाम म्हणून भविकांच्या संख्येत घट झाल्याचे सांगून प्रशासने स्वतःचीच पाठ थोपवताना दिसणार आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थाच्या मुख्य पर्वण्यांमध्ये एक कोटी भाविक येणार असल्याचे भाकीत वर्तविणारे प्रशासनच आता बॅकफूटवर येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एक कोटी गर्दीच्या आकड्याचा फुगा फुटण्याची शक्यता पोलिसासह जिल्हा प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे या ही स्थिती सावरण्यासाठी आणि संभावित स्थितीवर मात करण्यासाठी पोलिस प्रशासनानेच आता मुख्य पर्वण्यासोडून उर्वरित स्नानाच्या ३६ मुहूर्तांवर भर देण्याचे आवाहन भाविकांना करण्यास सुरुवात केली आहे.

सिंहस्थात कोट्यवधी भाविक येणार असा अंदाज वर्तवत प्रशासनाने अडीच हजार कोटी खर्च करीत सोयीसुविधाही उपलब्ध केल्या आहेत. आता या सर्व तयारी ज्या भाविकांच्या बळावर केली जात आहे, त्यांच्याच प्रतिसादावर जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आता सांशक होतांना दिसत आहे. गर्दी नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या काही उपाययोजनाच अंगलट येत आहेत. कुंभमेळ्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याचे हाय अलर्ट सुरक्षा यंत्रणांनी दिले असून, त्यासाठी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. नुकत्याच जम्मू व काश्मीर, पंजाबमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि याकूब मेमनच्या फाशीच्या घटनेनंतर तयार झालेल्या परिस्थितीमुळे भाविकच आता संभ्रमीत झाले आहेत. दुसरीकडे अलिकडे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कशाला गर्दीत मरायला जायचे असा सूर ऐकायला मिळत आहे. तसेच कुंभमेळ्यावर रोगराईचेही संकट आहे. डेंग्यू, स्वाइन फ्लू सारख्या व्हायरल रोगांचीही भीती आहे. त्यामुळे गर्दीत नकोरे बाबा मरण, अशा माणसिक स्थितीत भाविक आले आहेत. त्यातच साधूंमध्ये रंगलेल्या वादाचाही परिणाम होणार आहे. आखाड्यांचे आपसातील राजकारण, साध्वी त्रिकाल भवंता आणि शिवानी दुर्गा यांच्यातील वादामुळे कुंभमेळ्याची चांगली प्रसिद्धी होण्याऐवजी कुप्रसिद्धीच अधिक होत आहे. त्याचाही भाविकांवर विपरीत परिणाम होतांना दिसत आहे. मुख्य पर्वण्यांमध्ये भाविकांना रामकुंडापासून लांब ठेवण्याची रणनिती प्रशासनाने तयार केली असून, भक्तांना याची खबर लागली आहे. त्यामुळे भाविक आता अन्य पर्याय शोधत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी तर अन्य पर्वण्यांमध्येच कुंभमेळ्यात या असा अधिकृत प्रचार सुरू केला आहे. उभ्या केलेल्या गर्दीच्या आकडयातून सुटका करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे.

कुंभपर्व वर्षभर चालणार आहे. त्यामुळे मुख्य पर्वणीसोबतच वर्षभरात जवळपास स्नानाचे ३६ मुहूर्त आहेत. त्यामुळे मुख्य पर्वण्यांऐवजी उर्वरीत मुहूर्तांचाही भाविकांनी लाभ घ्यावा यासाठी आम्ही परराज्यातील भाविकांना आवाहन करीत आहोत. प्रत्येक राज्यात जाऊन तशी जनजागृती करण्यात येत आहे. - पंकड डहाणे, पोलिस उपायुक्त,नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल, पांढरा, पंचरंगी ध्वज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आखाड्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी तयार केलेले तिन्ही ध्वज सोमवारी आखाड्यांच्या प्रमुखांकडे सोपविण्यात आले. १९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे.

जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात तेव्हा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. १४ जुलै रोजी गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाला. आता १९ ऑगस्ट रोजी सूर्याचा एका महिन्यासाठी सिंह राशीत प्रवेश होणार असून, त्याच दिवशी आखाड्यांचे ध्वजारोहण पार पडणार आहे. ध्वजारोहणासाठी तयार करण्यात आलेला ​विशेष ध्वज आखाड्यांकडे सोपविण्यात आला आहे. १९ तारखेला ध्वजा फडकल्यानंतर खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात होईल, असे दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी स्पष्ट केले. अनादी काळापासून ध्वजारोहणास महत्त्व असल्याचे शास्त्रींनी स्पष्ट केले. आताच्या ध्वजावर सुवर्णकांती हनुमान १२ तयार करण्यात आला आहे. २५ फूट लांब, १० फूट रूंद आणि ५१ फूट उंच असा ध्वज १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी फडकवण्यात येईल. निर्मोहीचा ध्वज पांढरा आणि त्याला लाल किनार, दिगंबरचा पंचरंगी, तर निर्वाणीचा ध्वज लाल रंगाचा असेल. त्याच्या दोन्ही बाजूंवर सुवर्ण हनुमान विराजमान असेल. याबाबत बोलताना रामकिशोरदास शास्त्री यांनी सांगितले की, महाभारताचे युध्द सुरू झाल्यानंतर हनुमानांची अशीच ध्वजा अर्जुनाच्या रथावर लावण्यात आली होती. तसेच प्रत्येक झेंड्यांवरील रंगाला विशेष मत्हत्व असते. दिगंबर आखाड्याचा ध्वज पंचरंगी असून, आपले जीवन पंच महाभुतांनी बनले असल्याचा संदेश यातून मिळतो, असे शास्त्री यांनी सांगितले. ध्वजारोहणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ब्राह्मणवृंद पूजेस प्रारंभ करतील. एकाच वेळी तिन्ही आखाड्यात ही प्रक्रिया सुरू होईल. यानंतर सर्व प्रथम दिगंबर आखाड्यात ध्वजारोहण होईल. पाच मिनिटांच्या अंतराने निर्वाणी आणि निर्मोही आखाड्यात ध्वजारोहण पार पडेल, असे श्री महंत रामकिशोरदास महाराजांनी सांगितले.

बंदोबस्त

ध्वजारोहणाच्या दिवशी स्थानिक कलाकर तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे आदी कलांचे प्रदर्शन करणार आहेत. व्हीआयपी, लोकप्रतिनिधींचीही मोठी गर्दी तपोवनात होणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस अधिकारी सातत्याने तपोवनातील बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक गजबजले

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी भाविकांची मांदियाळी अनुभवास आली. कुंभमेळा सुरू झाल्याने भाविकांची गर्दीही वाढली आहे. प्रशासनाने खंबाळे पार्किंग सुरू केल्याने वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली. दिवसभर पोलिस आणि वाहनचालक यांच्यात हुज्जतीचे प्रसंग घडले.

श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री आरतीची वेळ होईपर्यंत पूर्व दरवाजा दर्शनरांगेत भाविक उभे होते. मंदिर प्रांगणातील रांगेत दोनशे रुपये शुल्काचे भाविकांचीही रांग लागली होती. वाढत्या गर्दीने दर्शनाचे नियोजन कसे करावे असा प्रश्न व्यवस्थापनास भेडसावत आहे. श्रावण सोमवार व कुंभमेळा यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक व पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांना रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कमी झाली नव्हती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आज पेशवाई मिरवणूक

निरंजनी आखाड्याचा शाहीप्रवेश सोहळा दिमाखदार झाल्यानंतर आज (१८ ऑगस्ट) तपोनिधी आनंद आखाड्याचा शाही प्रवेश सोहळा होत आहे. स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आनंद आखाड्याच्या पेशवाईस साधूंची संख्या लक्षणीय असेलच त्याचबरोबर त्यांचा भक्तपरिवार लक्षात घेता भाविकांची मांदियाळी उसळणार आहे. आखाड्याचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती यांनी सर्व नियाजन पूर्ण केले आहे. आनंद आखाड्याचे मूळस्थान गंगासागर तलावानजीक असलेल्या सूर्यनारायण मंदिरातून सकाळी ११ च्या दरम्यान मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवर सांगणार पार्किंग, स्नानाचे ठिकाण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मोबाइल कंपन्यांच्या मदतीने आता त्यांचे पार्किंगस्थळ आणि स्नानाचे ठिकाणही सांगितले जाणार आहे. कुंभथॉन उपक्रमांतर्गत शहरातील मोबाइल टॉवर्सवर पिंग नेटवर्क बसविले जाणार आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणाऱ्यांच्या मोबाइलची नोंदणी होणार असून, त्यांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी व्यवस्था या नेटवर्ककडूनच केले जाणार आहे. त्यामुळे गर्दीच नियोजन होईल असा दावा केला जात आहे.

कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कुंभमेळ्यात किती भाविक येतील, याची नोंदही मोबाइल टॉवरद्वारेच केली जाणार आहे. आता भाविकांची संख्या नोंदण्यासह त्यांना आपल्या इच्छितस्थळी पोहचण्यासाठीसुद्धा मोबाइल कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी पिंग या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. साधूमंहत असो वा सामान्य भाविक, प्रत्येकाजवळ संपर्कासाठी मोबाइल असल्याने शहरात दाखल होणाऱ्यांचा मोबाइल क्रमांक पिंगच्या नेटवर्मध्ये आल्यावर आपोआप नोंदविला जाणार आहे. नोंदणी होताच, संबंधित भाविक ज्या मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये असेल त्याला कोणत्या ठिकाणी वाहन पार्किंग करायचे आणि कोणत्या घाटावर स्नानासाठी जायचे याचाही मॅसेज पाठविला जाणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजनही सोपे जाणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवलेंच्या अध्यक्षतेखाली सर्व मोबाईल कंपन्याची एक बैठक झाली असून, त्यात भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी पिंगचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

भाविकांची संख्या समजणार

कुंभथॉनच्या माध्यमातून स्वतंत्र पिंग नेटवर्क तयार करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या काळात पिंग शहरातील सर्व टॉवर्सवर बसविले जाणार आहे. शहराबाहेरुन येणाऱ्या भाविकाजवळ मोबाइल असेल, त्याची नोंदणी नेटवर्कवर होईल. नोंदणी होताच तो जर पुण्याकडून येणारा भाविक असेल तर त्याला दसकपंचकच्या घाटाकडे जाण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल असल्याने शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची आपोआपच नोंदणी होणार आहे. दररोज किती भाविक नाशिकमध्ये येतात व शहरातून जातात याची माहितीही नियमितपणे हाती येणार असल्याने नियोजनाच्या कामालाही मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकाशवाणीवर स्वागतगीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे खास कुंभमेळ्यानिमित्त बनविण्यात आलेल्या कुंभमेळा स्वागत गीताचे बोल आता आकाशवाणीद्वारे संपूर्ण देशभरात गुंजणार आहेत. 'प्रभु राम की जनस्थान मे कुंभ मेला आया रे... साधु संतो के दर्शन का अवसर आया रे... सुस्वागतम' असे या गीताचे बोल आहेत. या गीतातून नाशिककरांचा आवाज संपूर्ण देशभरात जात आहे.

गीतकार मिलिंद गांधी असून, गायक ज्ञानेश्वर कासार, मीना परूळेकर-निकम आहेत. या गीताला प्रसिध्द संगीतकार प्रशांत महाबळ यांनी संगीत दिले आहे. व्हिडिओ चित्रीकरण मधुरा कुंभेजकर यांनी केले आहे. अतिथी देवो भव: या उक्तीनुसार सर्व अतिथींचे आदरातिथ्य करणे हे कर्तव्य समजून या कर्तव्याचा एक भाग म्हणून नाशिककरांना सोबत घेऊन स्वागत ग‌ीताची रचना करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे स्वागत या गीताद्वारे करण्यात येणार असून, धार्मिकतेची ही भावना संपूर्ण देशभरात पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जेएसजी प्लॅटिनम ग्रुपच्या अध्यक्षा कल्पना पाटणी यांनी दिली. या गीतामध्ये लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट नाशिक, जैन गोल्डन ग्रुप, अग्रवाल महिला मंडळ यासह अनेक संस्थांचा समावेश आहे.

कुंभ स्वयंसेवकांची देवळालीत बैठक

कुंभमेळ्यात पोलिस प्रशासनाप्रमाणेच स्वयंसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी भाविकांशी सौजन्य राखत आपुलकीची वागणूक द्यावी, असे प्रतिपादन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी केले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभमेळा स्वयंसेवकांची बैठक नुकतीच झाली. यात यावेळी वरिष्ठ निरीक्षक राजेश आखाडे, लिलाधर पाटील आदी उपस्थित होते. शाहीस्नासाठी सात घाट उभारले गेले असून यातील औरंगाबाद मार्गाजवळ देवळाली कॅम्प स्वयंसेवकांसाठी नेमण्यात आले आहे. सहा नंबर नाका प्रेशर पाईंट असल्याने स्वयंसेवकांनी भाविकांना संयमाने उत्तरे द्यावीत. घाटावर एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्सचा वापर करावा. संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याच्या सूचना आखाडे यांनी दिल्या. बैठकीस वैभव पाळदे आर. डी. जाधव आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२८ अतिरिक्त रेल्वेगाड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकच्या कुंभमेळ्यानिमित्त मध्य रेल्वेने १२८ अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबईतील प्रसिद्धी विभागाने दिली. या गाड्या १८ डब्यांच्या, फक्त द्वितीय श्रेणीच्या आणि आरक्षण नसलेल्या असतील.

रेल्वेने कुंभमेळ्यासाठी आधीच वीस विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तथापि, भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त १३८ गाड्या सुरू करण्यात येणार आहे. नाशिकरोड-औरंगाबाद, नाशिकरोड-अमरावती, नाशिकरोड-दौंड, नाशिकरोड-इटारसी, देवळाली या दरम्यान या गाड्या धावतील.

देवळाली-वर्धा ०१२५१-१२५२

१२५१ ही गाडी देवळालीहून ३१ व ३१ ऑगस्ट, १४, १५, १९, २०, २६ सप्टेंबरला (१८ फेऱ्या) सकाळी ६.१० वाजता सुटेल.

नाशिकरोड -औरंगाबाद (१६) ०१२५३-१२५४

१२५३ ही गाडी नाशिकरोडहून ३०, ३१ ऑगस्ट तसेच १४,१५,१९,२०,२६, २७ सप्टेंबरला (८ फेऱ्या) सकाळी ७.२० वाजता सुटेल.

नाशिकरोड-औरंगाबाद (२४) ०१२५५-१२५६- ही गाडी नाशिकरोडहून २९, ३०, ३१ ऑगस्ट तसेच १३, १४, १५, १८, १९, २०, २५, २६, २७ सप्टेंबरला (१२ फे-या) सायंकाळी ५.४० वाजता सुटेल.

नाशिकरोड-दौंड ०१२५७,१२५८

नाशिकरोडहून १२५७ ही गाडी २९, ३०, ३१ ऑगस्ट तसेच १३, १४, १५, १८, १९, २०, २५, २६, २७ सप्टेंबरला (१२ फेऱ्या) दुपारी १.५५ वाजता सुटेल.

नाशिकरोड-इटारसी (२४) ०१२६१-१२६२

१२६१ ही गाडी नाशिकरोडहून २९, ३०, ३१ ऑगस्ट तसेच १३, १४, १५, १८, १९, २०, २५, २६, २७ सप्टेंबरला दुपारी ४.१० वाजता सुटेल.

नाशिकरोड-इटारसी (१६) ०१२६५-१२६६

१२६५ ही गाडी नाशिकरोडहून सकाळी ११.३५ ला २९, ३० ऑगस्ट तसेच १३, १४, १८, १९, २५ सप्टेंबर(८ फेऱ्या) सुटेल. इटारसीला रात्री ९.४५ ला पोहोचेल.

नाशिकरोड-अमरावती (८) ०१२६९-१२७०

१२६९ ही गाडी नाशिकरोडहून सकाळी ११.३५ वाजता ३१ ऑगस्ट तसेच १५,२०,२७ सप्टेंबरला सुटेल. तिच्या चार फेऱ्या होतील.

मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी

कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावावेत, माहिती अधिकारी नियुक्त करावा, मालधक्का येथे शौचालयांची संख्या वाढवावी, अशा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी केल्या आहेत. गोडसे यांनी रेल्वे स्टेशनवरील विकासकामे व सुविधांची पाहणी केली. रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक एम. बी. सक्सेना, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, शिवसेनेचे नाशिकरोड विभाग प्रमुख नितीन चिडे, नितीन खुर्जुल, गोरख खर्जुल, रमेश गायकर, राजेंद्र तुपे, राजेंद्र पाटील, लकी ढोकणे आदी उपस्थित होते. गोडसे यांनी मुख्य स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मालधक्का येथे पाहणी केली. तेथून ते नव्या चौथ्या प्लॅटफार्मवर गेले. सिन्नरफाटा तिकीट बुकींग कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी सिन्नरफाटा येथे रेल्वेने प्रवेशद्वाराची कमान उभारण्याची सूचना केली. सुभाष रोड मार्ग, पार्किंगचीही त्यांनी माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकपदी भुतांगे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकपदी ज. द. भुतांगे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी विभागाशी कोणताही संबंध नसलेले तंत्रशिक्षण विभागातील प्रमोद नाईक यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे विभागात नाराजीचा सूर उमटला होता.

व्यवसाय शिक्षण विभागाचे संचालकपद आर. आर. आसावा काही दिवसांपूर्वीच निवृत्ती झाले. त्यांच्यापूर्वी या पदावर भुतांगे कार्यरत होते. मात्र, अन्यत्र बदल करून त्यांची जबाबदारी आसावा यांच्याकडे देण्यात आली होती. आसावा यांच्याच कारकिर्दीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील आस्थापना विषयक अधिकार या विभागाशी दूर दूरपर्यंत संबंध नसलेल्या रा. गो. जाधव यांच्याकडे देण्यात आले होते. सहसंचालकपदाचा कारभार स्वत:च्याच सहीने स्वत:कडे घेण्याचा अजब कारभार जाधव यांनी केला होता. जाधव यांचा स्वत:हून स्वत:कडे जबाबदारी घेण्यासह नाईक यांची नियुक्ती या विषयांवर 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राज्य सरकारला आपल्या हातून घेतलेल्या नियमबाह्य कृतीची जाणीव झाली. त्यानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील संचालकपदाचा सुमारे १५ वर्षांचा अनुभव असलेल्या भुतांगे यांची पुन्हा संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे पाऊल राज्य सरकारने घेतले आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव शु. सु. आगाशे यांनी लेखी आदेश जारी केले आहेत.

विषय कधी लागणार मार्गी?

दीड वर्षात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात अनेक विषय प्रलंबित आहेत. राज्यभरातील 'आयटीआय'मधील निदेशकांच्या विभागांतर्गत बदल्यांचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश दिला जात असला तरी या प्रक्रियेमध्ये अद्याप अनेक त्रुटी आहेत. याचा सर्वाधिक त्रास राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होत आहे. या मुद्यांवर भुतांगे यांच्याकडून ठोस निर्णय घेतले जाणार का? असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images