Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कृत्रिम पावसावरही अनिश्चिततेचे ढग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढगाळ हवामानाचा अंदाज येत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत प्रशासन दुविधा मनस्थितीत आहे. नांदगाव किंवा येवला तालुक्यात रविवारी हा प्रयोग करण्यात येणार असला तरी त्यासाठी दोन्ही तालुक्यांमधील चार ते पाच गावांची शनिवारी पहाणी करण्यात आली.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सुरुवातीला येवला तालुक्यातील सायगावची निवड करण्यात आली होती. दोन्ही तालुक्यांच्या मधोमध हे गाव असल्याने त्यास प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर नांदगाव तालुक्यात हा प्रयोग करण्याचे निश्चित करण्यात आले. दररोजच्या बदलणाऱ्या हवामानामुळे हा प्रयोग नेमका कोठे केला जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) रॉकेट फायरिंगद्वारे सिल्व्हर आयोडाईडच्या मदतीने पाऊस पाडण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन अशी वेळ त्यासाठी ठरविण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा एकदा येवला तालुक्यातील सायगावची पाहणी करण्यात आली. याखेरीज नांदगाव तालुक्यातील मोहदरी, दहेगाव, सोयगाव भागाचीही पाहणी करण्यात आली. यापैकी एक गाव निश्चित केले जाईल असे प्रांताधिकारी वासंती माळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवाई नकाशावर ओझर नाही!

0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

नाशिकला हवाई वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली होत असल्या तरी प्रत्यक्षात जगाच्या हवाई नकाशावर ओझर उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानतळाला हवाई नकाशावर थेट अहमदाबादचाच पर्याय उपलब्ध असल्यानेच ओझरची हवाई सेवा अद्यापही 'हवेत'च असल्याचे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांना ठराविक ठिकाणच्या विमानतळाला पर्यायी विमानतळ हे हवाई नकाशावरच दिसून येते. शिवाय काही अडचण असल्यास ही विमाने पर्यायी विमानतळाकडे जातात. आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या मुंबईला पर्यायी विमानतळ म्हणून ओझरचे नाव घेतले जात असले तरी प्रत्यक्षात हवाई नकाशावर ओझर उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)च्या परवानगीअभावी ही परिस्थिती असल्याचे हवाई क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ मंदार भारदे म्हणाले की, मुंबईनंतर जवळपास एकूण चार विमानतळ आहेत. त्यात गोवा, पुणे, ओझर आणि सुरत यांचा समावेश आहे. मात्र, हे चारही विमानतळ संरक्षण दलाच्या अधिपत्याखाली असल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना हवाई नकाशावर मुंबईला थेट अहमदाबाद विमानतळाचा पर्याय दिसतो.

ओझर विमानतळ हे हवाई नकाशावर नसल्याची बाब निदर्शनास आली असून, यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांतच संबंधित विभागांशी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. तर, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेत असून येत्या काही दिवसांतच ओझर हे हवाई नकाशावर दिसावे, यासंबंधीच्या उपाययोजना करणार असल्याचे राज्याचे प्रधान मुख्य सचिव पी एस मीणा यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. दरम्यान, ओझरच्या पायाभूत सोयी-सुविधा अतिशय उत्तम आहेत. मुंबईसाठी ओझरचा पर्याय निर्माण झाल्यास आम्ही निश्चितच ओझरचा विचार करू, असे मत इंडिगो एअरवेजचे सिनीअर मॅनेजर सुरिंदर पाल नारली यांनी 'मटा'कडे व्यक्त केले आहे. ओझर हवाई नकाशावर आल्यानंतरच प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून सेवा सुरू होणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐरावत ऐश्वर्य पर्वणीत दुर्लभ!

0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

बॅण्ड वाजवती सैंयापिया धून,

गजाचे आसन महंतासी॥

भाले खड्ग हाती नाचती गोसावी,

वाट या पुसावी अध्यात्माची॥

यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची,

चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी॥

कविवर्य कुसुमाग्रजांनी शाहीस्नानाला निघालेल्या साधू-महंतांच्या वैभवाचं असे यथार्थ वर्णन केले असले, तरी यंदा असा झगमगाट ना साधूंच्या वाट्याला येणार आहे ना, नेत्रसुख घेऊ पहाणाऱ्या भाविकांच्या! शाहीमार्गांवरील अतिक्रमणांमुळे अरुंद बनलेला रस्ता आणि वन्य प्राण्यांच्या सहभागावर कायद्याने आणलेल्या मर्यादा यामुळे यंदा त्र्यंबकेश्वरमधील पेशवाई शोभायात्रेत हत्ती, अंबारी सारख्या बडेजावाला सुटी दिली जाणार आहे. नाशिकमध्येही शोभायात्रेत प्राण्यांना न आणण्याचे आवाहन प्रशासनाने आखाड्यांना केले आहे.

साधूंचे 'शाही' स्नानाला जाणे म्हणजे त्यांच्या आखाड्यांच्या वैभवाचं प्रदर्शन करणारी मिरवणूकच असते. प्रचंड संपत्ती, शिष्यगण, अलंकारांनी सजविलेले हत्ती-घोडे, महागडी भरजरी भगवी वस्त्रं, सोने चांदी तसेच हिरे-माणकांच्या देवदेवतांच्या मूर्ती असा हा सगळा थाटमाट असतो. मात्र यंदा मिरवणुकीतील अशा बडेजावावर अनेक मर्यादा आल्या आहेत. त्र्यंबकेश्वरमधील शाही मिरवणुकीचा रस्ता अतिक्रमणांमुळे अरुंद बनला आहे. ही अतिक्रमणे पहिल्या पर्वणीपूर्वीच हटवावीत यासाठी अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयात या‌चिका दाखल केली आहे.

अरुंद रस्त्यामुळे मिरवणुकीमध्ये हत्ती कसा चालणार अशी चिंता उदयगिरी यांनी व्यक्त केली. यंदाच्या मिरवणुकीत बॅन्ड, ढोलताशे असाच लवाजमा प्राधान्याने भाविकांना पहावयास मिळण्याची शक्यता आहे. सोबत छोटा हत्ती अर्थात अॅपे रिक्षावर साधूमहंतांना समाधान मानावे लागणार आहे. सुरुवातीला मिरवणुका काढणारे आखाडे मिरवणुकीत हत्ती व तत्सम प्राण्यांना सहभागी करतात का यावर आमचा निर्णय ठरेल, असे नया उदासीन आखाड्याचे महंत विचारदास महाराज यांनी सांगितले.

हत्ती झाले गायब

हत्ती ऐश्वर्याचा प्रतीक असल्याने पूर्वी बहुतांश आखाड्यांकडे स्वत:चा हत्ती असायचा. त्याची बडदास्त ठेवली जायची. परंतु, आता हत्तीला सांभाळणेही शक्य होत नाही. १९९२ मध्ये हत्तीने त्र्यंबकेश्वरच्या शाही मिरवणुकीत धुमाकूळ घालत सोंडेने जीप उचलून फेकली होती. त्यानंतरही हत्ती बिथरल्याच्या घटना कुंभमेळ्यांत घडल्या आहेत. त्यामुळे आखाड्यांमधून हत्ती गायब होऊ लागले आहेत. तरीही काही आखाड्यांनी हत्ती आणण्याची तयारी सुरू केली असून, त्याला मिरवणुकीत सहभागी करायचे की आखाड्यातच ठेवायचे याचा निर्णय ऐनवेळी घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई सेवेला मिळणार बूस्ट!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये हवाई सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठीच राज्य सरकार येत्या दोन महिन्यात हवाई धोरण (एव्हिएशन पॉलिसी) जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी दिली. यामुळे नाशिकसह जळगाव, औरंगाबाद, नांदेड, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, यासारख्या शहरांमध्ये हवाई सेवा मिळू शकणार आहे.

हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आयोजित विमानसेवा ऑपरेटर्सच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील रिजनल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर आमचा भर आहे. कंपन्यांनी सेवा सुरू करावी. आम्ही त्यांना निश्चित सहकार्य करू, असेही ते म्हणाले. छोट्या विमान कंपन्यांना तिकिटांचे काही पैसे देण्याचेही विचाराधीन आहे. आगामी धोरणात पार्किंग चार्जेस माफ करणे, एनए तसेच लँडिंग चार्जेस कमी करण्यासारखे निर्णय राहणार असल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होईल.

विमानांचे इंधन अर्थात एअर ट्रॅफिक फ्युएल (एटीसी) मुंबईत भरल्यास त्यावर २५ टक्के सेल्स टॅक्स आहे तर नाशकात केवळ ४ टक्केच. तसेच, नाईट चार्जेस मुंबईत महाग आहेत. त्यातुलनेत ओझरला ते कमी असतील. याचा विचार करुनही विमान कंपन्यांनी करायला हवा. यातूनच नाशिकला सेवा मिळेल व एअर कार्गोलाही बूस्ट मिळेल, असे मीना म्हणाले.

नाशिकला सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून आम्ही चार्जेस कमीत कमी घेऊ. सेवा सुरु झाली तर चार्जेसही कमी होतील. कुठल्याही ऑपरेटर्सला आम्ही प्रोत्साहन देवू, सहकार्य करू. त्यामुळे सेवा देणाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन एचएएलचे सीएमडी टी सुवर्ण राजू यांनी केले. ओझरला नाईट चार्जेस अत्यल्प ठेवण्याचे आमच्या विचाराधीन असल्याचेही ते म्हणाले. काही विमान कंपन्यांची एचएएलशी बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

एचएएलशी करार

एचएएलच्या जागेवर राज्य सरकारने ८४ कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या टर्मिनलच्या हस्तांतरणाचा सामंजस्य करार राजू आणि मीना यांच्या स्वाक्षरीने झाला. ३० वर्षांसाठी १ रुपये वार्षिक दराने टर्मिनलची मालकी एचएएलकडे आली आहे.

विमानांचे मेंटेनन्स

भारतात प्रवासी विमानांचे रिपेअरींग आणि मेंटेनन्स करण्याचा प्रकल्प नाही. त्यामुळे विमाने थेट सिंगापूरला जातात. ही सुविधा नाशकात उपलब्ध करुन देण्याबाबत एचएएल सकारात्मक आहे. मात्र, भारतात असा प्रकल्पासाठी ३५ टक्के अधिक खर्च आहे. त्याबाबत सरकारने निर्णय घेतल्यास नक्कीच नाशिकच्या प्रकल्पात प्रवासी विमान सेवांचे रिपेअरिंग होऊ शकेल, असा विश्वास राजू यांनी व्यक्त केला.

नाशकात पाचव्या पिढीची विमाने

ओझरच्या एएचएएलमध्ये मिग आणि सुखोई विमानांची निर्मिती केली जात आहे. मात्र, भारत आणि रशिया सरकार यांच्यात पाचव्या पिढीच्या (फिफ्थ जनरेशन) लढाऊ विमानांबाबत बोलणी सुरू आहे. ती यशस्वी झाली तर नाशकात पाचव्या पिढीची लढाऊ विमाने तयार करण्यात येतील, असे राजू यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर कॅफेंवर राहणार वॉच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने पोलिस यंत्रणा अधिक सतर्कता बाळगत आहे. दहशतवादी कृत्यासाठी जुन्या वाहनांची तसेच सायबर कॅफेंची मदत घेतली जाण्याची शक्यता गृहीत धरून अशा व्यावसा‌यिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांना अनेक सूचना करण्यात आल्या. पंजाब येथील अतिरेकी हल्ला, जगन्नाथपुरी, राजमुंड्री येथे झालेली चेंगराचेंगरी या सर्व पार्श्वभू‌मीवर पोलिस आणि जिल्हा प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. अलीकडेच सायबर कॅफे व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. इंटरनेटचा वापर करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने नाव, पत्ता, संपर्क क्रमांक सायबर कॅफेमधील रजिस्टरमध्ये स्वहस्ताक्षरात नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकाला फोटो ओळखपत्र सादर करणेही अनिवार्य असणार आहे. पार्टीशनची उंची अडीच फुटापेक्षा अधिक नसावी, अश्लील वेबसाईट्स सर्फिंग केल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशयास्पद हालचाली असणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचीही पोलिसांनी बैठक घेतली. विक्रेत्यांकडे चोरीचे वाहन विक्रीसाठी येण्याची शक्यता असते. याखेरीज बॉम्बस्फोट किंवा तत्सम कारणांसाठी दहशवाद्यांकडून अशा जुन्या वाहनांची मदत घेतली जाऊ शकते. म्हणूनच अशा वाहनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेतली जावी. ग्राहकांकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊनच व्यवहार करावा अशी सूचना करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी या बैठकीद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांना रोखणारी यंत्रणा कुचकामी

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

शैक्षणिक वर्ष सुरू होताच, शाळा कॉलेजेसच्या आवारात टवाळखोरांचा उपद्रव सुरू होतो. सुरक्षेसाठी कॉलेजेसने स्वतःची यंत्रणा उभी केली असून, त्यास पोलिस प्रशासनाची मदत मिळते, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात टवाळखोरांना रोखणाऱ्या सर्व यंत्रणा कुचकामी ठरत असून, याचा मनस्ताप सामान्य विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

अनेकदा कॉलेज प्रशासनाने नेमलेले सुरक्षारक्षकच बघ्यांची भूमिका घेतात. कॉलेजच्या आवारात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र असल्यास प्रवेश मिळणार नाही, असे कॉलेज कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी लिहिले असले तरी या सुरक्षारक्षकांकडून कॉलेजमध्ये येणाऱ्यांना ओळखपत्र विचारले जात नाही. याउलट ज्याच्या गळ्यात ओळखपत्र आहे त्याचेच ओळखपत्र निरखून पाहिले जाते. हे सुरक्षारक्षक बहुतांशवेळा गप्पा मारत किंवा तिथल्याच काही विद्यार्थ्यांसमवेत थट्टा मस्करी करण्यात वेळ घालवत असल्याचे चित्र दिसून येते.

गेल्या दोन दिवसात एचपीटी बीवायकेच्या कॅम्पसमध्ये किरकोळ करणांवरून हाणामाऱ्या झाल्याचे समजते. या मारामारीच्या घटनांत आलेल्या टोळक्यांचा या कॉलेजसोबत कसलाही संबंध नसून, हाणामारी झाली त्या दिवशी टोळक्यांतील मुलांनी कॉलेजमध्ये सहज प्रवेश केल्याचे विद्यार्थी सांगतात. कॉलेजची पार्किंग किंवा इतर ठिकाणाहून असे टोळके आत येतात. त्यामुळे त्यांच्यावर सिक्युरिटी गार्डचा कोणताही वचक राहत नाही.

तसेच, प्रसंगावधान राखत हाणामारी रोखण्याचे धारिष्ठ सुरक्षा रक्षक दाखवत नाही. याची प्रचिती एचपीटी बीवायकेसह सर्वच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कायमच येते. कॉलेज प्रशासनाच्या या भूमिकेमुळे टवाळखोरांचे फावत असून, हाणामारीचे प्रकार घडल्यानंतर सामान्य विद्यार्थ्यांची दैना उडते.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रशासन, पोलिस आणि विद्यार्थ्यांची एक कमिटी बनवली आहे. याच कमिटीमार्फत विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार होत्या. मात्र, हळूहळू या कमिटीकडे तसेच तिच्या बैठकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. कॉलेजेसच्या बाहेर थांबून टवाळखोरी करणाऱ्या मुलांचाही प्रश्नही गंभीर असून, किमान विद्यार्थ्यांची वर्दळ असताना पोलिसांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. कॉलेल प्रशासनाने या गोष्टीची दखल घेण्याची गरज आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थाही कडक करायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच मार्गावर तब्बल ४० गतिरोधक

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण ते नाशिक मुख्य मार्गावर गतिरोधक वाढल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. गतिरोधकांमुळे पाठीच्या मणक्याचे त्रास वाढले आहेत. त्यातच आपात्कालीन स्थितीत वाहतूक करणारे वाहनचालकही गतिरोधकांमुळे हैराण झाले आहेत. कळवण ते नाशिक मुख्यमार्गावर ३५ ते ४० गतिरोधक बसविले आहेत.

सद्यस्थितीत दररोज या मार्गावर हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. पूर्वी शाळा-महाविद्यालये, रुग्णालये व अपघातप्रवण स्थळे अशा ठिकाणी गतिरोधक बसविण्याची पध्दत होती. मात्र, आता नागरिकांच्या मागणीप्रमाणे पाहिजे तिथे गतिरोधके बसविण्याचे काम केले जात आहे. मुख्य मार्गासोबत आतील मार्गावरही गतिरोधकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे असा कोणताही मार्ग गतिरोधकांशिवाय नाही, असे चित्र आहे. यामुळे प्रशासनाने गतिरोधक कमी करायला हवेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

कळवण ते नाशिक महामार्गावरच अनेक गतिरोधक टाकण्यात आल्याने वाहन चालविताना अडथळा निर्माण होत आहे. या गतिरोधकांमुळे पाठीचा त्रास होत असून, कोणत्याही ठिकाणी वेळेवर पोहचू शकत नाहीत.

- जितेंद्र पगार, रायुकाँ, उपजिल्हाध्यक्ष

गतिरोधकांमुळे ब्रेकशूचा खर्च वाढला आहे. सरळ रस्त्यावर प्रत्येक गावात जवळ दोन ते तीन गतिरोधक समोर येतात. त्यामुळे ब्रेक दाबावाचा लागतो. या गतिरोधकांमुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र आहे.

- नितीन सोनवणे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित शेतकऱ्यांना भरपाई द्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपीटमुळे नुकसान झालेले अनेक शेतकरी भरपाईपासून अजूनही वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना न्याय देवून त्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे.

या प्रकरणी तहसील कार्यालयात जमलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार मनोज खैरनार यांच्याकडे तक्रार केली. यावेळी तालुक्यातील महाजनपूर, उजनी, दहिवाडी येथील शेतकरी उपस्थित होते. गटातील एका शेतकऱ्याला अनुदान, तर दुसऱ्याला का नाही, असा प्रश्न उपस्थित करून हेतुपूरस्सर नावे वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रसंगी कृषी अधिकारी अशोक डमाळे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब सापनर, योगेश सापनर, सुनील सापनर, किसन सापनर, दत्ता पवार, बबन भडांगे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार खैरनार यांना दिले.

महसूल, कृषी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी करून ज्यांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्याच्या शेजारील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रत्यक्ष माहिती घेऊन त्यांची यादी तयार करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या. बांधाशेजारील शेतकऱ्याचे नुकसान ९० टक्के, तर त्याच पिकाचे दुसऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा कमी कसे होऊ शकते. ज्यांचे नुकसान नाही, अशांना मात्र भरपाई मिळाल्याची बाब उपस्थित करण्यात आली.

गटातील एका शेतकऱ्याला अनुदान, तर दुसऱ्याला का नाही. हेतुपूरस्सर नावे वगळण्यात आली असतील तर ते गंभीर आहे. कोणत्याही स्थितीत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे.

- राजाभाऊ वाजे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांची टोळी जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

धावत्या हावडा मुंबई मेलमध्ये मारहाण व दमदाटी करून जनरल डब्यातील प्रवाशाची रोख रक्कम व मोबाइल असा अंदाजे ३८ हजार रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. या चोरट्यांच्या टोळीस चोवीस तासांच्या आत जेरबंद करण्याची कामगिरी मनमाड रेल्वे पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रत्नाकर थोटे (वय २२, रा. गुंथारा, जि. भंडारा) हे ३१ जुलै रोजी हावडा मुंबई मेलने जनरल डब्यातून प्रवास करीत असताना मनमाड-नाशिक प्रवासादरम्यांन अचानक दहा ते बारा जणांनी धावत्या रेल्वेत त्यांना मारहाण करून रोख रक्कम मोबाइल असा ३८ हजारांचा ऐवज लुटला आणि रेल्वेची साखळी ओढून चोरट्यांनी पलायन केले. या घटनेची फिर्याद रत्नाकर थोटे यांनी मनमाड रेल्वे पोलिसांकडे केली त्यानंतर पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत चोरट्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनामी’च्या सातबाऱ्यावरील नावामुळे शेतकरी बेजार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

इनामी व वतनी जमिनींचा खरेदी-विक्री व्यवहार करताना शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचा आरोप ठेवून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पुन्हा शासनाचे नाव लावले. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे संबंधित शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली.

बागलाण तालुक्यातील तळवाडे, किकवारी, ढोलबारे, विंचुरे, जोरण या गावातील सयाजी सुभाष कुऱ्हाळ, सयाबाई सुकदेव पवार, निर्मला राजेंद्र जाधव, लताबाई शांताराम बिरारी, निर्मला दयाराम अहिरे, बंडू त्र्यंबक बिचकुले यासह असंख्य शेतकऱ्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन न करता रितसर स्टॅम्प ड्यूटी भरून जमिनी खरेदी व विक्रीचे व्यवहार केले. इतकेच नव्हे तर इनामी व खालसा झालेल्या जमिनी महाराष्ट्र अधिनियम क्र. २१ /२००२ राजपत्र ६/५/२००२ नुसार तत्कालीन तहसीलदारांची रितसर परवानगी घेऊन शेतजमिनीची खरेदी विक्री केली. या शेतजमिनी शेती करण्याबरोबरच खरेदी-विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असा ना हारकत दाखला तहसीलदारांनी दिला आहे. मात्र, पूर्वसूचना न देता परस्पर या उताऱ्यांवर नाव लावल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांना शर्तभंगापोटी कमीत कमी सहा लाख रुपयांवर नजराणा रक्कम लावली असून, या रक्कमेचा भरणा केल्यानंतरच सरकारचे सातबाऱ्यावरील नाव कमी होण्याची माहिती मिळाल्याने शेतकरी बेजार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीच्या विकासाला नवे पंख

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

महाराष्ट्र शासनाने दोन दिवसापूर्वीच घोटी-नागपूर हा महामार्ग आता मुंबई-नागपूर असा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करून, या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ, मराठवाडा या भागाच्या दळणवळणाचा विकास तर होईलच परंतु, इगतपुरी-घोटी-सिन्नर या परिसराला या सहापदरीकरणामुळे परीसस्पर्श लाभून तालुक्याच्या विकासाला नवे पंख मिळणार आहेत. शासनाच्या या निर्णयाकडे तालुक्याचे विशेष लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी घोटी-सिन्नर-औरंगाबाद हा महामार्ग निर्माण करून दळणवळणाला एक वेगळी दिशा दिली. मात्र, देशात व राज्यात भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर-घोटी महामार्ग हा मुंबई-घोटी-नागपूर असा नमूद करून या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचा एक महात्वाकांशी निर्णय घेतला. हा मेगा प्रकल्प असला तरी मुंबई आणि नागपूर यांना कनेक्ट करणारा प्रकल्प आहे.

या मुंबई-घोटी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरण व सहापदरीकरणामुळे बुटीबोरी, सिन्नर, अमरावती, चिखलठाणा या औद्योगिक वसाहतीचा झपाट्याने विकास होईल. तसेच विदर्भ व मराठवाड्याच्या उद्योग व विकासाच्या माध्यमातून रोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. हा महामार्ग इगतपुरी, घोटी, धामणगाव, साकूर, सिन्नर या भागातून जात असल्याने सहापदरीकरण झाल्यास पुन्हा एकदा या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जमिनी शासनाला संपादित करावी लागेल. त्यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांना पुन्हा भूमिहीन व्हावे लागेल. मात्र, सहपादारीकारणामुळे घोटी-सिन्नर हा परिसर विकासाच्या टप्प्यात येईल.

अंतर होणार कमी

या महामार्गाचे सहापदरीकरण होणार असले तरी २०१९ पर्यंत पहिल्या टप्प्यात या महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. यासाठी शासनाने ३०,००० कोटी रुपये खर्च गृहीत धरला आहे. या चौपदरीकरणामुळे मुंबई-घोटी-औरंगाबाद या मार्गावरील प्रवास जवळपास ६५ कि.मी. ने कमी होऊन दीड तासाचा प्रवास कमी होणार आहे. या महामार्गामुळे विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बछड्यांच्या शोधात मादीही जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील करंजवन येथे दिलीप शार्दुल यांच्या शेताजवळील नाल्यालगत बिबट्याचे दोन बछडे सापडले होते. यानंतर बछड्यांच्या शोधात आलेली मादीही वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली.

करंजवन येथे महिन्याभरापूर्वी एका महिलेवर बिबट्याने हल्ला करीत जखमी केले होते. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हे सावधच होते. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजय पवार हे शेताकडे नाला ओलांडून जात असताना त्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना आवाज दिला. त्यांच्या आवाजाने बिबट्या पसार झाला. मात्र, त्याचे दोन बछडे तेथे दिसले. ते पाच ते सात दिवसाचे असावेत, असा अंदाज आहे.

वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी साबळे यांनी बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वणी येथील विश्रामगृहात बछड्यांचे संगोपन करीत मादीही त्यांना शोधत येईल हा अंदाज घेत शनिवारी त्याठिकाणी पिंजरा लावला. अखेर शनिवारी रात्री बछड्यांच्या शोधात मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. वनविभागाने मादीसह बछड्यांना वणी येथे नेले. लवरकच त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणवण करूनही ‘आधार’ मिळेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शिक्षण विभागाने बनावट शाळा व विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आधारकार्ड नोंदणी सक्तीची केली आहे. मात्र, आधार नोंदणीसाठी विद्यार्थी व पालक यांची वणवण काही अद्याप कमी होऊ शकलेली नाही. सेतू कार्यालय आणि आधार नोंदणी केंद्रात विद्यार्थ्यांना दररोज खेटा माराव्या लागत आहेत.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी शाळांमध्येच आधार नोंदणी करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, अद्याप तशी व्यवस्था सर्व शाळांमध्ये झालेली नसल्याने विद्यार्थ्यांना आधार नोंदणीसाठी बाहेरच जावे लागत आहे. अनेक पालकांना आपली कामे सोडून विद्यार्थ्यांसोबत उपस्थित रहावे लागत आहे. त्यांच्या हजेरीवर परिणाम झाला आहे. शिक्षकांना आधारसाठी लागणारे बोनाफाईड तयार करण्यात दिवसभर काम करावे लागत आहे.

अनेक ठिकाणी शाळा प्रशासनाने आधारकार्डशिवाय शाळेत उपस्थित राहता येणार नाही, अशी तंबी दिल्याने विद्यार्थी-पालक गोंधळले आहेत. शहरातील सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांच्या लांबलचक रांगा दिसून येत आहेत. ‍तासनतास थांबूनही काम होत नसल्याने पालक व विद्यार्थी वैतागले आहेत. शाळांमध्ये आधारची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्निचरसाठी रखडली एन्ट्री

0
0

नामदेव पवार, सिडको

नाशिक शहर आयुक्तालयाने नव्याने स्वतःच्या जागेवर उभारलेले इंदिरानगर पोलिस ठाण्याला फर्निचरच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून अद्यायावत बांधून असलेली इमारत धुळखात पडून आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करता पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्याला फर्निचर उपलब्ध करून दिल्यास पोलिसांना अद्यायावत पोलिस ठाण्याचा वापर करता येणार आहे. सद्यास्थितीत राणेनगरच्या एका इमारतीत असलेले इंदिरानगर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक बाबींचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरातील अनेक नागरिकांना पोलिस स्टेशनमधील वादाचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

नवीन नाशिक सिडकोतील अंबड पोलिस ठाण्याचा वाढता व्याप पहाता ३१ मार्च २०१० रोजी इंदिरानगर पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, जागेअभावी राणेनगर भागात एका इमारतीत पहिल्या मजल्यावर इंदिरानगर पोलिस ठाणे उभारण्यात आले. एखाद्या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवितांना रहिवाशी इमारतीत राहत असल्याने अनेक अडचणी पोलिसांसमोर नेहमीच येत असत. यासाठी पोलिस आयुक्तालयाने राजीवनगर भागात स्वतःच्या जागेवर इंदिरानगर पोलिस ठाण्याची उभारणी केली आहे. परंतु, अनेक महिन्यांपासून अद्यायावत तयार असलेले पोलिस ठाणे केवळ फर्निचर अभावी पडून आहे. याबाबत पोलिस ठाण्याने पोलिस आयुक्तांकडे फर्निचरची मागणी देखील केली आहे. तर पोलिस आयुक्तालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यावर पुढील कारवाईच्या प्रतिक्षेत आहे.

प्रवेशाचा मुहूर्त कधी?

अंबड पोलिस स्टेशनपासून इंदिरानगर पोलिस स्टेशन एप्रिल २०१० मध्ये वेगळे करण्यात आले. या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई नाक्यापासून थेट पाथर्डी फाटापर्यंतचा भाग येतो. शिवाजीवाडी, राजीवनगर, वडाळागाव परिसरातील झोपडपट्ट्याही या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतात. सुमारे ७० कर्मचारी या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या नागरी वसाहतीमधील या पोलिस स्टेशनवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मात्र, नवीन वास्तुमध्ये जाण्यासाठी कधी मुहूर्त लागणार याची इंदिरानगरवासीयांसह पोलिसांनाही उत्सुकता लागलेली आहे.

कुणी लक्ष घालेल का?

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व स्थानिक आमदारांनी लक्ष घालत अद्यायावत इंदिरानगर पोलिस ठाणे नवीन इमारतीत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नाशिकात होत असलेल्या महाकुंभाच्या पार्श्वभूमिवर भाजपाच्या सरकारने जातीने लक्ष घालत इंदिरानगर पोलिस ठाण्यात फर्निचर उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी टीव्ही चोरट्यांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या पारख इलेक्ट्रिक्समधील १३ एलईडी टीव्ही चोरी प्रकरणी उपनगर पोलिसांनी सात संशयितांना अटक केली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून दीड लाखांचे तीन एलईडी जप्त केले. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

विजय सूर्याशेट्टी (मानखुर्द,मुंबई), दिपक मन्ना डे (खारगर, नवी मुंबई), फातिमा फिरोज खान (मानखुर्द, मुंबई), रमजान समसूद शेख (मस्जिद बंदर स्टेशनजवळ, मुंबई), किशोर चंद्रकांत साळवे (भिवंडी), विजय उर्फ मन्ना विठ्ठल झगडे (टाटानगर झोपडपट्टी, भिवंडी), मोहम्मद आरिफ अब्दुल हकीम खान (टाटानगर झोपडपट्टी), अशी आरोपींची नावे आहेत. सूरत येथे पहाटे हे संशयित फिरत असताना तेथील पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी कोल्हापूर येथे तंबाखूच्या दुकानातून अडीच लाखाची रोकड चोरल्याची कबूली दिली. सूरत पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांकडे संशयितांना सोपवले. तेथील चौकशीत त्यांंनी नाशिक येथे १० जून रोजी एलईडी टीव्ही चोरीची कबुली दिली.

चोरीच्या सोळा मोटरसायकली जप्त

नाशिकरोड/जुने नाशिक : गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनने दोघा संशयितांकडून पाच लाखाच्या चोरीच्या सोळा मोटारसायकली जप्त केल्या. पोलिस निरीक्षक संजय सानप आणि सहाय्यक निरीक्षक जी. डी. देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एस. एस. गोंधे, उपनिरीक्षक सुभाष गुंजाळ, जाकीर शेख, संजय मुळक, गंगाधर केदार, विलास गांगुर्डे, संतोष कोरडे, मोहन देशमुख, इरफान शेख, राजेंद्र जाधव, दीपक जटार, आत्माराम रेवगडे, शंकर गडदे आदींनी रामकुंडावर सापळा रचून दोघा संशयितांना अटक केले.

संशयितांनी बनावट चावी वापरून पंचवटी, आडगाव, सरकारवाडा, गंगापूर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबूली दिली. सात हिरो होंडा स्प्लेंडर, पाच होंडा पॅशन, टीव्हीएस अपाची, होंडी डिलक्स, सीडी डान, सुझुकी अक्सेस या प्रत्येकी एक गाड्यांचा त्यात समावेश आहे. खोटी नंबर प्लेट लाऊन या गाड्या विकल्या जात असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभ है समर्पित लोगोंका मेला !

0
0

गायत्री काळकर, नाशिक

'मेरे कुटुंब में केवल चार लोग हो, ये मुझे पसंद नही था। संपूर्ण समर्पित जीवनके प्रती हमेशाही मुझे लगाव रहा है। इसलिए आज २१ बरससे मैं यही समर्पित जीवन जी रही हूँ। मेरे जैसे अन्य समर्पित लोगोंसे मिलनेका अवसर इस कुंभमेला में मिलता है। ये मेरा छटा कुंभमेळा है', चेहऱ्यावर कमालीचे शांत भाव असणाऱ्या ब्रह्मचारिणी देवीजी २२ वर्षांपूर्वी निवडलेल्या या अध्यात्मिक मार्गापाठीमागे असलेली प्रेरणा सांगत होत्या.

'प्रणव कन्या संघा'च्या पोर्ट ब्लेअर शाखेमध्ये कार्यरत असलेल्या देवीजी सध्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये वास्तव्यास आहेत. ६ जुलैपासून त्या नाशिकमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर देवीजी तेवी‌साव्या वर्षी 'भारत सेवाश्रमा'च्या 'प्रणव कन्या संघा'मध्ये दाखल झाल्या. महिला आणि मुलींसाठी काम करणासाठी इकडे वळल्याचे त्या सांगतात. कुठे ना कुठे महिला आजही समाजात दुर्लक्षित राहतात. त्यामुळे मुली तसेच महिलांना आधार देण्यासाठीचे काम करण्याच्या इच्छेने हा मार्ग निवडल्याचे त्या सांगतात.

आमचे अंतिम ध्येय अध्यात्म आहे; पण मानवतेसाठी काम करण्यातून हा रस्ता अध्यात्माकडे जातो, ही आपले गुरू आचार्य स्वामी प्रणवानंदजी महाराजांची शिकवण असल्याचे त्या सांगतात. त्यामुळे अध्यात्मासोबतच मुलींना विविध प्रकारचे ट्रेनिंग देण्याचे कामही करतात. त्या सध्या पोर्ट ब्लेअरमध्ये जवळपास ३५ मुलींना कॉमर्सचे तसेच कम्प्युटरचे शिक्षण देत आहेत. केवळ अध्यात्मच नव्हे; तर समाजसाठीही काहीतरी करणे आपले कर्तव्य मानत असल्याचा भावना देवीजींनी व्यक्त केली.

भूतकाल याद करना मना है !

ब्रह्मचारिणी देवीजींना आपण कुठून आलात हे विचारल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या संस्थेची माहिती दिली. त्यापूर्वीच्या आयुष्याबद्दल कोणाशी बोलणे आपल्या तत्वांमध्ये बसत नसल्याचे त्या म्हणाल्या. हे कार्यच आमचे जीवन असल्यामुळे त्यापूर्वी काय घडले या आठवणीत रमणे मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मला आईवडिल आहेत इतकेच मी सांगू शकते, असे त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरचे बसस्थानक महाकुंभात दुर्लक्षित

0
0

सातपूर : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक परिसरात अनेक ठिकाणी कामे सुरू असली तर यात सातपूरच्या बस स्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून बसस्थानकाच्या परिसराचा वापर शौचालयासाठी होत असल्याने प्रवाशांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तत्कालीन आमदार नितीन भोसले यांनी अद्यायावत बसस्थानक उभारण्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, त्या कामाचे पुढे काय झाले, असा प्रश्न सातपूरकरांना पडला आहे. गेल्या कुंभमेळ्यात सातपूरचे छोटेसे असलेले बसस्थानक मोठे करून सरंक्षक भिंत उभारली होती. परंतु, स्लम भागातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे काही वर्षांपासून बसस्थानकाच्या परिसराचा वापर शौचालयासाठी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा-टॅक्सीचालकांचे प्रवासी देवोभवः

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रिक्षा, टॅक्सी व बसचालकांसाठी प्रवासी देवोभवः हे उद्दिष्ट ठेवून सौजन्य अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे पथनाट्य सादर करण्यात आले.

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये देश-देशातील लाखो भाविक येणार आहेत. त्यांच्या मनात नाशिकची चांगली प्रतिमा तयार व्हावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या रिक्षा, टॅक्सीचालकांकडून भाविकांशी गैरवर्तणूक व लुबाडणूक होऊ नये, सौजन्याची वागणूक मिळावी या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. शहरातील बसस्टाप, रिक्षास्टँड येथे प्रबोधन केले जात आहे. आरटीओचे अधिकारी जीवन बनसोड, भरत कळसकर, सहाय्यक अधिकारी सतीश मंडोरा, मोटरवाहन निरीक्षक दीपक शिंदे, विनोद जाधव, महेश देशमुख, हर्षल सासे, डॉ. गिरीश मोहिते आदींच्या उपस्थितीत नाशिकरोड स्टेशन येथे झालेल्या मार्गदर्शन शिबिरात अडीचशे रिक्षा, टॅक्सीचालक सहभागी झाले.

लालसेपोटी रिक्षाचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेऊ नये. जवळचे भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे दर आकारावेत. प्रवाशांना सौजन्याची वागणूक देऊन सुसंस्कृत नाशिक प्रतिमा कायम ठेवावी.

- जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

व्यवसाय हीच आमची रोजीरोटी आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहत सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांना चांगली व प्रामाणिक सेवा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. नाशिकची प्रतिमा कलंकित होऊ देणार नाही.

- अहमद शेख अजीज, टॅक्सीचालक

चालकांनी केलेला संकल्प

प्रवाशांशी सौजन्याने वागणार

व्यसनांपासून दूर राहणार

वाहनाची सर्व कागदपत्रे ठेवणार

रिक्षा-टॅक्सी व्यवसाय सेवा म्हणून करणार

मीटरचाच वापर करणार

गणवेश व वाहन स्वच्छ ठेवणार

प्रवासी मार्गदर्शिका व पर्यटन स्थळांचा नकाशा बाळगणार

शिस्तीचे पालन करणार

दुर्घटनेची माहिती पोलिसांना कळवणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासिक के लोग बहुतही हेल्पफुल!

0
0

प्रशांत देसले, नाशिक

वीरेंद्रकुमार शर्मा. साधारण चाळीशीतील व्यक्ती. मूळचे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातले. आपल्या संपूर्ण परिवारासह महाराष्ट्र दर्शनाला आले. तसं त्यांना केवळ कुंभमेळ्यात यायचं होतं पण काही कारणास्तव पर्वणीच्या आधी येण्याचं त्यांनी ठरवलं. शिर्डी, अजिंठा, औरंगाबाद, वेरूळ या स्थळांना भेट देत शर्मा कुटुंब गेल्या आठवड्यात नाशिकला आलं. तसं त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवीन नाही. वडील काही वर्षे नोकरीनिमित्त नागपुरात असल्याने त्यांना इथल्या वातावरणाशी तोंडओळख होती. तसेच तोडकी-मोडकी मराठीही येते. चांगला पंधरा-वीस दिवसांचा दौरा आखून शर्मा कुटुंब थेट बिहारहून कारनं महाराष्ट्राच्या भटकंतीवर निघालं होतं.

वीरेंद्रकुमार खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची पत्नी, मुलं, भाऊ, त्याची पत्नी, वडील राजेंद्रप्रसाद शर्मा हे सगळे पूजाविधी आटपून सायंकाळी गोदेचा संथ प्रवाह न्याहाळत होते. कुतूहल म्हणून त्यांच्याशी गप्पा करायला सुरुवात केली. बिहार ते इथपर्यंतचा प्रवास, प्रवासादरम्यानचे अनुभव, महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांबाबत चांगल्याच गप्पा रंगल्या. महाराष्ट्रातील रस्त्यांबाबत तर त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. यावरून बिहार आणि महाराष्ट्रातील प्रगतीचा नमेका फरक कळला. नाशिक परिसराबाबत वीरेंद्रकुमारचे वडील राजेंद्रप्रसाद जाम खूश होते. त्यांना इथला निसर्ग इतका आवडला की ते अगदी सहज बोलून गेले, 'मै सात-आठ साल नागपूर में रहा, लेकीन कभी नासिक नही आया, आज बहुत बुरा लग रहा है, अगर उस समय मुझे पता होता की नासिक इतना शांत और सुंदर शहर है, तो मै वापस अपने गाँव ही नही जाता, यही बस जाता...' हे सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावर एक अतृप्त इच्छा झळकली.

गप्पांमध्ये त्यांनी नाशिक-त्र्यंबक प्रवासा दरम्यानचा एक प्रसंग सांगितला. पंचवटीतून रविवार कारंजामार्गे ते सीबीएसकडे जायला निघाले होते. आता त्र्यंबककडे जाण्यासाठी नेमका टर्न कुठून घ्यायचा हे त्यांना कळेना. शेवटी बरोबर त्र्यंबक नाक्यावर सिग्नल पडला, त्यांची गाडी थांबली. बाहेर थोडा रिमझ‌िम पाऊस सुरू होता. डाव्याबाजूला बसलेल्या वीरेंद्रकुमार यांनी सहज बाजूच्या प्रवाशी रिक्षावाल्याला विचारले, 'भाईसाब, त्र्यंबक जाना है', त्यांचा प्रश्न पूर्ण होत नाही तोच त्या रिक्षावाल्याने त्यांना सांगितलं, 'आप मेरे पिछे आओ.' तो सुजाण नाशिककर कोण होता हे त्यांना माहित नव्हतं, पण त्याने त्र्यंबकरोडवरील महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत त्यांना सोबत दिली. तेथे थांबून त्यांना सांगितलं, 'बाबूजी अब स‌िधा जानेका, डायरेक्ट त्र्यंबक पोहोचोगे.' रहदारीमुळे शर्मा कुटुंब त्याचं नाव विचारायला विसरले; मात्र ते मोठ्या कौतुकाने सांगत होते, 'ब‌िना जान पहचानके ओ भले आदमीने हमें रास्ता दिखाया, आपके नासिक के लोग बहुतही हेल्पफुल नेचर के हैं...' एका रिक्षावाल्याच्या छोट्याशा मदतीने शेकडो किलोमीटरवर राहणाऱ्या बिहारी कुटुंबाने नाशिककरांना धन्यवाद दिले... ते ही अगदी मोकळ्या मनानं...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे डेंग्यूचा शहरात वाढला प्रभाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पावसाचे पुनरागमन होताच, साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात वैद्यकीय विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात साथीच्या रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. जुलैत शहरात डेंग्यूचे ७६ संशयीत रुग्ण आढळून आले असून, अकरा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. शासकीय आकडेवारी तोकडी असली तरी, दुसरीकडे खाजगी दवाखाने मात्र फुल्ल झाले आहेत.

जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात साथीच्या आजारांचा फैलाव काहीसा थांबला होता. मात्र पावसाचे पुनरागमन होताच, साथीच्या आजारांनीही पुन्हा दस्तक दिली आहे. जुलै महिन्यात वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार अतिसाराचे २७८ रुग्ण, काविळ ४, विषमज्वर १२, ताप ११०५, डेग्यू १५, सर्दी खोकलाचे ६६ रूग्ण आढळून आले आहेत. जुलैत डेंग्यूचे संशय‌ीत म्हणून ७६ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. त्यापैकी ३९ रुग्णांचे अहवाल वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले आहेत. तर अद्यापही ३७ अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images