Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शंभर फुटी रस्ता ओलांडणे झाले कठीण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

विकास सामान्य नागरिकांसाठी असतो. मात्र, यामुळे सामान्यांचे जगणे सुसह्य होत असेल तर त्या विकासाला अर्थ असतो. अन्यथा विकास करण्याला महत्त्व रहात नाही. दिंडोरी रोडवरील तारवालानगरजवळ शंभर फुट रुंदीचा भव्य रस्ता झाला. मात्र, तो ओलांडणे नागरिकांना कठीण झाले आहे. जीव मुठीत धरुन या रस्त्यावरून पायी चालावे लागते.

तारवाला नगर ते अमृतधाम या १०० फुटी रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या भव्य रस्त्यामुळे दिंडोरी व पेठकडून येणाऱ्या तसेच धुळे व पुण्यासह औरंगाबादकडे आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्यत: सोय झाली. शिवाय अमृतधामवरून दिंडोरी आणि पेठसह गुजरातकडे जाणाऱ्यांनाही हा रस्ता सोयीचा झाला आहे. याच रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याच रस्त्यालगत सेतू कार्यालय आहे. तेथे विद्यार्थी व पालकांनी नेहमी वर्दळ असते. तसेच तारवालानगरजवळच सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली सीडीओ-मेरी शाळा, प्राथमिक व बालवाडी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची गर्दी असते. पालकांचीही वर्दळ असते. सर्वांनाच रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून ओलांडावा लागत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

रस्ता छान मोठा झाला आहे. मात्र, सकाळी-सायंकाळी रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर दुभाजक टाकण्याची गरज आहे. यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वेग कमी होऊ शकेल. - माधवराव भणगे, ज्येष्ठ नागरिक

शाळेत दररोज गाडीवरून जातांना भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागतो. रस्ता ओलांडणे कठीर जाते. - सुनिता वाईकर, शिक्षिका

वाहनांच्या गर्दीमुळे भीती वाटते. शाळेत येतांना पालकांना सोबत आणावे लागते. या रस्त्यावर वाहतूक पोलिस असणे गरजेचे वाटते. - आसावरी पगारे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरू हा संतकुळाचा...

$
0
0

भक्तीगितांमधून कृतज्ञता व्यक्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करले गुरूजी से प्यार अमृत बरसेगा, मेरे सतगुरू की महिमा अपार, गुरू हा संतकुळाचा राजा गुरू हा प्राण विसावा माझा, यांसारख्या भक्तीगीतांमधून सदगुरूबदद्लची कृतज्ञता व्यक्त झाली. निमित्त होते श्री हंस कल्याण धाममध्ये गुरू पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी आयोजित गुरूपुजा उत्सवाचे. अध्यात्मावर आधारित सत्संग आणि सुश्राव्य भक्तीगीतांनी या सोहळ्याची रंगत वाढली.

सदगुरूदेव श्री सतपालजी महाराज प्रणित मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने नाशिकरोड, शिवाजीनगर येथील हंस कल्याण धाममध्ये गुरूपौर्णिमेचा उत्सव उत्साहात झाला. यात जिल्हाभरातील शेकडो मानवधर्म प्रेमी सहभागी झाले. व्यासपीठावर संस्थेच्या नाशिक शाखेच्या प्रबंधक साध्वी आराधनाजी, साध्वी नितीजी, साध्वी दयाजी, साध्वी प्रियंवदाजी, महात्मा चुर्तुवेदानंदजी आदी उपस्थित होते. गुरू-शिष्याचे नातेच विलक्षण आहे. या नात्यामधून गुरूबद्दलचा अतीव आदरभाव प्रतीत होत असल्याचे मत साध्वी नितीजी यांनी व्यक्त केले. साध्वी दयाजी यांच्या सुश्राव्य भक्तीगीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

पंचवटीमध्ये धार्मिक कार्यक्रम

पंचवटी : पंचवटीतील विविध मंदिरात गुरुपौर्णिमा आनंदी व उत्साही वातावरणात शुक्रवारी साजरा करण्यात आली. या‌शिवाय शाळा आणि अन्य संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूंना वंदन केले. अमृतधाम येथील विडी कामगार वसाहतीतील शिव गोरक्ष विद्यापीठाचे वतीने महायोग शक्तीपाल, शोभायात्रा आणि विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. परिसरातून पालखी मिरवणूक आणि रथातून भगवान महाराज ठाकरे यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संगमनेर येथू नाचणारे घोडे बोलाविण्यात आले होते. मिरवणुकीत सर्वांचे ते आकर्षण ठरले. त्यानंतर महाराजांचे प्रवचन झाले. हजारो भाविकांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला.

सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या वतीने धात्रक फाटा येथे राम गडिया भवन येथेही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. डॉ. तुळशीराम गुट्टे यांचे प्रवचन आणि संत पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी गुरूंची महती सांगितली. कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक रुची कुंभारकर आदींसह हजारो भाविकांची उपस्थिती होती.

देवळालीत वृक्षारोपण

देवळाली कॅम्प : वडनेर रोड येथे साई बाबा मंदिरात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते महामस्ताभिषेक करण्यात आला. अण्णा गुरुजी, देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या हस्ते महाआरती झाली.

विश्वस्थ कमल देवाडिगा, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, चंद्रकांत ठाकरे, आशा गोडसे, अंजली ठाकरे प्रभावती धिवरे, सतीश मेवानी आदींनी महाप्रसादाचे वाटप केले. सिंधी पंचायत हॉलमध्ये पतंजली योगपीठाच्या वतीने दर्शनालाल चड्डा, नरेंद्रकुमार शास्त्री यांच्या उपस्थितीत शांतीपाठ हवन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष हरिश कटारिया यांनी सपत्नीक सहभाग घेतला. योगगुरू सुरेश आमेसर, हसानंद निहलानी, नारायण दास चावला, राजू फल्ले आदी उपस्थित होते. नूतन बस स्थानकात भगवान कटारिया, नागेश देवाडिगा, संजय गोडसे, मोहन गायकवाड यांच्यासह अण्णाज ग्रुपतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

उर्दू शाळांमध्ये गुरूवंदन

जुने नाशिक : जुने नाशिक परिसरातील उर्दू शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाब पुष्प देत गुरूंना वंदन केले. महात्मा फुले मार्केट येथील रहेनुमा उर्दू शाळेत मुख्याध्यापिका सय्यद शिरीन नियाजअली यांनी गुरूंचे महत्त्व विषद केले. या प्रसंगी दिवंगत माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली. कलाम यांचे देशभक्तीचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांनाच आपले गुरू मानावे, असे सांगितले. यावेळी खान तमजीन, खान रुमैशा फरहीन, तजीन, आमेरा, अरबिया, यास्मिन तबस्सुम, समरीन अफरोज आदी सहभागी झाले. नॅशनल उर्दू हायस्कूलमध्येही मुख्याध्यापक हाजी सादीक शेख यांनी गुरूजनांचा आदर सन्मान जोपासण्याचे विद्यार्थ्यांना धडे दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनावर महंतांची ‘गुरूकृपा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन शाही मार्गावरील अडथळ्यांची पाहणी करण्यापूर्वी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. सर्व सेवा पुरवण्याचे आश्वासन ग्यानदास यांना देण्यात आले. तसेच, प्रशासनाविरोधात मीडियाकडे काहीही न बोलण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी धरला. प्री-मिटींग यशस्वी झाल्यानंतरच महंत आणि अधिकाऱ्यांनी शाही मार्गाची वाट धरली.

महंत ग्यानदास यांच्यासमवेत तिन्ही आखाड्यांचे प्रमुख व इतर महंतांनी गुरुवारी सायंकाळी शाहीमार्गाची एकत्रित पाहणी केली. पाहणी दौऱ्यासाठी साधू महंतासमवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, सिटी इंजिनीअर सुनील खुणे, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. गणेशवाडी येथील यशवंत तालीम संघाची जुनी इमारत पाडणे, काही झाडांच्या फांद्या छाटणे अशा मागण्या ग्यानदास यांनी केल्या. कायद्यानुसार सर्व उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. गाडगे महाराज पुलाखालून रामरथ जातो. रामरथाप्रमाणे रस्त्याला खोली देण्याची ग्यानदास यांची सूचना महापालिकेने लागलीच मान्य केली.

मांस-मच्छी हटाव

म्हसोबा पटांगणात बुधवारच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर मांस मच्छीची विक्री केली जाते. काही महिन्यापासून देशविदेशातील साधू महंत रामकुंडावर स्नानासाठी येत असून यामुळे चांगला संदेश जात नसल्याची तक्रार महंत ग्यानदास यांनी अधिकाऱ्यासमोर केली. त्यावर, ३ ऑगस्टनंतर बाजार भरणार नसल्याबाबत नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती महापालिकांनी दिली. बाजारच भरणार नसल्याने तक्रारीचे समाधान झाल्याचे मत ग्यानदास यांनी व्यक्त केले.

शाहीमार्गावरील ९९ टक्के कामे मार्गी लागली असून, प्रशासनाच्या या कामाबाबत आपण संतुष्ठ आहोत. आम्ही दिलेल्या सुचनांनुसार प्रशासन काम करीत आहे. दिलेल्या सूचनांचे पालन प्रशासन करेल. - महंत ग्यानदास महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रेशर ठरतेय डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने साधुग्राम तसेच भाविकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठ्याची व्यवस्था उभी केली आहे. मात्र, साधुग्राममध्ये अजूनही पूर्ण क्षमतेने पाण्याचा वापर केला जात नाही. यामुळे आहे एखाद दुसरा नळ सुरू केल्यास प्रचंड प्रेशरने पाणी बाहेर पडते. हा प्रेशर इतका जास्त असतो की नळही गळून पडतात. यामुळे पाण्याचा अपव्यप होत असून साधुग्राममध्ये पाण्याचा वापर वाढल्याशिवाय त्यास पर्याय नसल्याचा दावा केला जातो आहे.

१०० लिटर प्रती व्यक्ती प्रमाणे ३० दशलक्ष लिटर्स रोज इतका पाण्याचा पुरवठा साधुग्राम तसेच परिसरातील आश्रमांसाठी होतो आहे. भाविकांसाठी २३ लिटर्स प्रती व्यक्ती असे १७२ दशलक्ष लिटर्स इतके प्रमाण प्रशासनाने निश्चित केले आहे. सध्या साधुग्राममध्ये बोटावर मोजता येईल इतके साधू-महंत वास्तव्यास आहे. गुरूपौर्णिमेनंतर साधू-महंताच्य संख्येत लक्षणीय वाढ होईल. मात्र, आहे त्या साधू-महंतांना पाणी पुरवठा होणे आवश्यक असल्याने महापालिकेने या महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी पुरवठा सुरू केला. १०० टक्के पाणी पुरवठा असताना मागणी फक्त १० ते २० टक्के इतकीच आहे. परिणामी, एखादा नळ सुरू केल्यास त्यातून प्रचंड प्रेशरने पाणी येते. चोरीच्या घटनांमुळे प्रशासने सर्व ठिकाणी प्लॅस्टिकचे नळ वापरले असून ते जास्त प्रेशर असताना टिकाव धरत नाही. नळ पडून गेल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यप होतो. ज्या ठिकाणी साधू-महंतांचे वास्तव्य आहे, त्याठिकाणी लागलीच उपाययोजना राबवल्या जातात. मात्र, जिथे कोणीही नाही तिथे शेकडो लिटर्स पाणी वाया जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैलानीबाबा चौकातून प्रशासनाचा ‘यू-टर्न’

$
0
0

अंतर्गत पार्किंग पुन्हा सिन्नर फाट्यावर

अरविंद जाधव, नाशिक

जेलरोडवरील सैलानी बाबा चौकापर्यंत नेण्यात आलेली अंतर्गत पार्किंग योग्य नसून येथे एसटी बसला वळण घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. त्यानुसार प्रशासनाने नियोजनात फेरबदल करीत अतंर्गत बस पार्किंग पुन्हा सिन्नर फाटा येथे करण्याचे ठरवले आहे. डोंगरे वस्तीगृह मैदानावरील पार्किंगबाबत ​संदिग्धता असून प्रशासनाच्या 'सूक्ष्म' नियोजनात आणखी किती बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाविकांची पायपीट कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नाशिकरोड, पेठरोड औरंगाबादरोड तसेच सातपूर येथील अतंर्गत पार्किंगचे ठिकाणे बदलण्याचा निर्णय २५ जुलै रोजी जाहीर केला. पोलिस प्रशासनाने हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात पाच तासापेक्षा अधिक वेळ प्रदीर्घ चर्चेची बैठक झाली.

नाशिक-पुणे महामार्गावर चिंचोली फाटा येथे बाह्य पार्किंग तर नाशिकरोड येथील सिन्नर फाटा येथे अंतर्गत पार्किंग असे प्रशासनाचे सुरुवातीचे नियोजन होते. मात्र, नवीन प्लॅननुसार अंतर्गत पार्किंग जेलरोडवरील सैलानी बाबा चौकापर्यंत नेण्यात आले. यामुळे भाविकांना कमी चालावे लागेल, असा प्रशासनाचा होरा होता. मात्र, एसटी महामंडळाने त्यास हरकत घेतली. सैलानी बाबा चौकातून वळून येण्यासाठी वाहनांना पुरेशी जागा मिळणार नाही. तसेच यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही उद्भवू शकतो, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. एसटी महामंडळाच्या या भूमिकेमुळे प्रशासनाने सैलानी बाबा चौकातील पार्किंगचा नाद सोडून सिन्नर फाटा येथेच अंतर्गंत वाहनतळाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सातपूर, औरंगाबादारोडसह पेठरोडवरील अंतर्गत पार्किंग नवीन तरतुदीनुसार कायम असणार असल्याचा दावा, काही अधिकाऱ्यांनी केला.

वाहनांना वळण्यासाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने सिन्नर फाटा येथेच अंतर्गत पार्किंग होईल. अन्य ठिकाणे कायम आहे. सुरक्षा आणि भाविक यांना केंद्रबिंदू मानत आमचे नियोजन सुरू आहे. - एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ

पेठरोडवरील बाजार समिती येथील पार्किंग जुना गंगापूर नाका येथील डोंगरे वस्तीगृहापर्यंत आणण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे भाविकांची दोन किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट वाचल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. प्रत्यक्षात या मैदानावर हक्क सांगणाऱ्या प्रशासनाने जागेच्या उपलब्धतेकडे डोळेझाक केल्याचे सूत्रांकडून समजते. डोंगरे वस्तीगृह पुढील काही महिन्यांसाठी बूक असून गणपती गाळ्यांनाही ही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तात्पुरती का होईना जागा उपलब्ध झाली नाही तर भाविकांना बाजार समिती येथूनच रामकुंडाची वाट धरावी लागणार आहे. यामुळे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सूक्ष्म नियोजनात आणखी किती बदल होणार याचीच अधिक उत्सुकता आता लागलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेस हजर; मार्कशीटमध्ये गैरहजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एम. कॉम. सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची इंटरनल परीक्षा देऊन हाती पडलेल्या मार्कशीटमध्ये परीक्षेस अनुपस्थित दर्शविण्याचा प्रकार काही विद्यार्थ्यांबाबतीत घडला आहे. या परीक्षेची पूर्ण जबाबदारी कॉलेजकडे असताना कॉलेजच्याच चुकांना यासाठी विद्यार्थी जबाबदार धरले जात आहे. मात्र, या केसेसमध्ये विद्यापीठाकडे बोट दाखवून कॉलेजेस जबाबदारी झटकत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.

या संदर्भात एक्सटर्नल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास असतानाही केवळ इंटरनल मार्कांची चुकीने दर्शविलेली अनुपस्थिती मनस्ताप ठरत असल्याचा अनुभव बीवायके कॉलेजच्या विद्यार्थ्याने मांडला. तुषार गणेश पगारे या विद्यार्थ्याने यंदा एम. कॉम. ची परीक्षा एप्रिल महिन्यात दिली होती. या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निकालात बाह्य परीक्षेत सर्वच विषयांमध्ये तो उत्तीर्ण आहे. मात्र २० गुणांची कॉलेजच्या माध्यमातून नियंत्रित केली जाणरी इंटरनल परीक्षा देऊनही त्याला 'बिझनेस फायनान्स' आणि 'रिसर्च मेथडॉलॉजी फॉर बिझनेस' या दोन विषयांमध्ये थेट अनुपस्थित दर्शविण्यात आले. यामुळे दिलेल्या परीक्षेनंतरही केवळ अनुपस्थितीपोटी त्याच्या मार्कशीटवर 'फेल' शिक्का बसला. या संदर्भात त्याने कॉलेजकडे विचारणा केल्यानंतर विद्यापीठाकडे बोट दाखविले जाते. कॉलेज या परीक्षेचा तपशील विद्यापीठाला पाठवित असताना केवळ विद्यापीठ एकटेच जबाबदार कसे असा सवालही या विद्यार्थ्याने उपस्थित केला. तुषार सोबतच आणखी सहा ते सात विद्यार्थ्यांच्या बाबतीतही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. केवळ व्यवस्थेच्या चुकीमुळे परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांचे वर्षच धोक्यात आले आहे.

लिंकही अनअॅक्टिव्ह

मार्क्स अपडेट करण्यासाठी ऑक्टोबर परीक्षेच्या अगोदर लिंक अॅक्टिव्ह नसल्याने वर्ष गमविण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्रही कॉलेजच्या माध्यमातून मांडण्यात येत असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितला. या सारख्या तक्रारींच्या निवारणासाठी कॉलेजने विद्यापीठाकडे गांभीर्याने पाठपुरावा करणे गरजेचे असताना परस्पर विद्यापीठाकडे जबाबदारी ढकलून विद्यार्थ्यांना कोंडीत पकडू नये, अशीही मागणी संभ्रमात सापडलेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव जिल्हा निर्मितीला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने याबाबत अहवाल मागवला असून, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक झाली.

राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अहवालही सादर केला होता. आता सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनेही मालेगाव जिल्हा निर्मितीसंदर्भातील अहवाल मागवला आहे. मालेगावात महापालिका आहे. अपर पोलिस अधीक्षकांचे स्वतंत्र कार्यालय आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य वीज वितरण कंपनी, जिल्हास्तरीय दर्जाची सामान्य रुग्णालये या सारखी महत्त्वाची कार्यालये आहेत. जिल्हा निर्मितीसाठी पोषक वातावरण असल्याने पुन्हा एकदा अहवाल मागविण्यात आला. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा निर्मितीसाठी किती कार्यालये स्थापन करावी लागतील, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था, अधिकारी, वेतनावरील खर्च आदी विषयांवर माहिती घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करदात्यांचा महापालिकेकडून ‘अपघात’

$
0
0

पैसे नसल्याने दोन महिन्यांपासून विमा संरक्षण योजना बंद

विनोद पाटील, नाशिक

सिंहस्थासाठी कोट्यवधी रुपये उधळले जात असताना, ज्या नाशिककरांच्या पैशांवर ही उधळपट्टी केली जात आहे, त्यांनाच वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे. निधी नसल्याने नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या मिळकतधारकांना देण्यात येणारी अपघात विमा योजना दोन महिन्यांपासून बंद आहे. ५८ लाख रुपयांची रक्कम महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने योजना मंजुरीची फाईल पुढे सरकत नसल्याचे समजते.

महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर नियमित भरणाऱ्या मिळकतधारकांना अपघात विमा योजनेचे कवच दिले जाते. २००६ पासून शहरात ही योजना सुरू आहे. मिळकतधारकाच्या कुटुबांतील कोणाचा अपघाती मुत्यू झाल्यास ५० हजारांची मदत केली जाते. नागरिकांना नियमित कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे उद्देश आहे. दरवर्षी पावणे चार लाख मिळकतधारकांपैकी तब्बल सव्वा दोन ते अडीच लाख मिळकतधारक नियमित कर भरून या योजनेचा लाभ घेतात.

गेल्या वर्षी महापालिकेने ५४ लाख रुपये भरून न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीकडून सव्वा दोन लाख मिळकतधारकांचा विमा उतरवला होता. यापैकी तीस मिळकतधारकांना योजनेचा लाभ मिळाला होता.

महापालिकेत सध्या केवळ सिंहस्थाच्याच कामांना प्राधान्य दिले जात आहे. निधी नसल्याने विकासकामांच्या सर्वच योजना गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका या योजनेला बसला आहे. मे महिन्यापासून या योजनेचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिक या विमा संरक्षणापासून वंचित आहेत. यासंदर्भातील फाईल्स ही विविध कर संकलन विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावर दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे. योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी तब्बल ५८ लाखांची गरज आहे. मात्र, पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ही फाइल्स पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.

करदात्यांकडे दुर्लक्ष का?

नागरिकांच्या जीवापेक्षा सिंहस्थ महत्वाचा आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी कर्ज काढता, मग आमच्या संरक्षणासाठी ५८ लाख रुपये नाहीत काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. तीन महिने योजना राबवून ३५ कोटींच्या वर निधी पालिकेने जमा करून घेतला. त्यातून पैसे का भरले नाहीत, असा सवाल नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच वर्षांसाठी एक हजार कोटी

$
0
0

ना‌शिक शहराचा होणार कायापालट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्यास पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी एक हजार कोटींचे आर्थिक सहाय्य केंद्राकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे प्रमाण सरासरी प्रतिवर्ष प्रतिशहर दोनशे कोटी इतके आहे. तितकाच निधी संबंधित राज्य शासन व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी एकत्रित उभा करणे आवश्यक आहे. यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांची जबाबदारी वाढणार असून, अटीशर्तींच्या कठोर अंमलबजावणींना सामोरे जावे लागणार आहे.

स्मार्ट सिटी योजनच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश असला तरी, पुढील टप्पे अधिक खडतर असणार आहेत. निवडलेल्या शहरांमध्ये या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विशेष हेतू यंत्रणा (Special Purpose Vehicle) स्थापन करण्यात येईल. तसेच स्मार्ट सिटी सल्लागार फोरमचीही स्थापना करण्यात येऊन त्या माध्यमातून विविध घटकांचा सह्योग घेतला जाणार आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील निवड झालेली शहरे केंद्र स्तरावरील स्मार्ट चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होतील. या अभियानाच्या संनियंत्रणासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्चाधिकार समिती गठीत केली आहे. तसेच, नगरविकास विभागाचे सचिव राज्य अभियान संचालक म्हणून काम पाहतील आणि योजनेवर लक्ष ठेवतील.

वाढते नागरीकरण लक्षात घेऊन शहरांमधील भौतिक, संस्थात्मक, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पायाभूत सुविधा शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून स्मार्ट शहरांच्या सर्वंकष नागरी विकासासाठी काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यात स्थानिक क्षेत्र आधारित विकास व उपयुक्त स्मार्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहराची आर्थिक प्रगती करणे, वाढती लोकसंख्या विचारात घेऊन विद्यमान शहरांभोवती नवीन शहरे विकसित करणे, मिश्र जमीन वापर, सर्व रहिवाशांना घरांची संधी उपलब्ध करून देणे, नैसर्गिक स्त्रोतांचा ऱ्हास थांबविण्यासह शहरातील गर्दी-वायू प्रदूषण कमी करणे आदी उद्दिष्टे गाठण्याचा सुनियोजित प्रयत्न केला जाणार आहे.

अभियानांतर्गत शहरांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा व्यवस्था, आश्वासक विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छताविषयक व्यवस्था, प्रभावी नागरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नागरी गरिबांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता, सक्षम माहिती तंत्रज्ञान व डिजिटलायझेशन यंत्रणा, सुप्रशासन-ई गव्हर्नन्‍स व नागरी सहभाग, शाश्वत पर्यावरण व्यवस्था, महिला व बालकांची सुरक्षितता, आरोग्य व शिक्षण आदी पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा पार

$
0
0

राज्याच्या यादीत नाशिकचा समावेश; आता केंद्रात कसोटी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील दहा शहरांची निवड जाहीर करण्यात आली असून, या यादीत नाशिकचाही समावेश आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी निवडीच्या पहिल्या परीक्षेत नाशिक पास झाले आहे. आता खरी कसोटी केंद्र सरकारकडे लागणार आहे. पुढील सात महिन्यांत नाशिकच्या विकासाचा स्मार्ट सिटी प्लॅन तयार करून तो केंद्र सरकारपुढे सादर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. केंद्राच्या पहिल्या यादीत नाशिकचा समावेश झाल्यास महापालिकेला तब्बल पाच वर्षात एक हजार कोटी रुपये मिळणार असल्याने शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत केंद्र शासन पुरस्कृत स्मार्टसिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली होती. या अभियानासाठी स्थापन केलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धात्मक पद्धतीने दहा शहरांची निवड करण्यात आली. त्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध निकष लावण्यात येऊन गुणात्मक पद्धतीने ही निवड झाली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषात नाशिकने ८२.५० टक्के गुणांकन मिळवले. त्यामुळे नाशिकचा समावेश निश्चित मानला जात होता.

नाशिकचा विकास हा हवामान, पर्यटन, शेती आणि उद्योगाभोवती केंद्रित आहे. त्यामुळे या उद्योगांना चालना देण्यासह पुढील पाच वर्षात रोजगार निर्मिती आणि आयटी इंडस्ट्र‌ीज प्रोजेक्टना या उपक्रमातून चालना मिळणार आहे. पॅनसिटी प्रोजेक्ट अंतर्गत पूर्ण शहराला फायदा पोहचेल असे प्रकल्प राबविले जाणार असून त्यात पाणीपुरवठा, मलजलशुध्दीकरण प्रकल्प, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे नेटवर्क या विषयांवर शहरात काम होणार आहे. तसेच विभागनिहाय प्रकल्पांमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज अशा छोट्या शहराची निर्मिती नव्याने नाशिकमध्ये होणे शक्य होणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे उत्पन्न वाढीचे नवे स्रोत तयार करण्यासह मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची दरवाढही नाशिककरांना सहन करावी लागणार आहे. मालमत्ता करातील त्रुटी दूर करणे, वॉटर टॅक्सचे ऑडिट, इमारतींना परवानग्या देतानाचा महसूल गृहीत धरण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीसह धार्मिक, वाईन, नैसर्गिक हवामान, साहसी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने नाशिकची निवड केंद्रातही निश्चित होण्याची शक्यता असून, नाशिकच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून आता स्मार्ट सिटी प्लॅन तयार करण्यासाठी दोन कोटी निधी मिळणार आहे. या निधीतून स्मार्ट सिटी प्लॅन तयार केला जाणार आहे. तो जानेवारीत केंद्राकडे सादर होणार आहे. त्यानंतर ३१ मार्चला स्मार्ट सिटी शहरांची घोषणा केंद्रातर्फे होणार आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित निधी जमा करून तो शहर विकासावर खर्च होणार आहे. शहातील उत्पन्नाचे स्रोत शंभर टक्के पूर्ण कसे राहतील, याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार असून, नागरिकांना या स्मार्टसिटीच्या अटीशर्तींचे पालन करावे लागणार आहे.

आयुक्तांचे परिश्रम आले कामी

राज्यातील दहा शहरामंध्ये नाशिकचा समावेश होण्याचे संपूर्ण श्रेय महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धावपळीतही आयुक्त डॉ. गेडाम यांनी अधिकचा वेळ काढून अथक परिश्रम घेत अधिकाऱ्यांच्या मदतीने कमी कालावधीत प्रस्ताव तयार करून घेतला. त्याचे राज्याच्या उच्चाधिकार समितीपुढे उत्कृष्टपणे सादरीकरण केले. दिवसा सिंहस्थाचे काम तर, रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागून आयुक्तांनी उत्तमपणे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करून घेतला. त्यासाठी सिंहस्थाच्या कामांचा आधार त्यांना मिळाला. इतर शहरांच्या मानाने नाशिकची भौगोलिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि धार्मिक स्थिती चांगली असल्याने या सर्व परिस्थितीचा वापर त्यांना प्रस्तावात केल्याने उच्चाधिकार समितीही प्रभावीत झाली होती.

स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा पार झाला असून, नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. आता जानेवारीपर्यंत स्मार्ट सिटी प्लॅन तयार केला जाईल. या प्लॅनची देशातील शहरांशी स्पर्धा होणार असून, हा प्लॅन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आव्हान खडतर असले तरी, अशक्य नाही. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत होणे ही नाशिककरांसाठी आनंदाची बाब आहे. यामुळे नाशिकच्या वैभवात भर पडणार आहे. आता नागरिकांचेही सहकार्य प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना हवे आहे. अटीशर्तींचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. - अशोक मुर्तडक, महापौर

गेले अनेक वर्षांच्या कामाचे फलीत नाशिकला मिळाले आहे. भूमिगत गटार योजना, दळ‍णवळण, घंटागाडी, स्वच्छता या सारख्या उपाययोजनांमुळे गुणांनुक्रमात नाशिक चौथे ठरले आहे. आयुक्त, लोकप्रतिनिधी, नागरिकांचेही श्रेय असून अतिंम फेरीत नाशिकचा समावेश निश्चित होईल. - गुरुमीत बग्गा, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकिळा व्रताने वधारला आंब्याचा भाव

$
0
0

५० ते ५०० रुपयांपर्यंत रोपांची विक्री

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एरवी नर्सरीकडे पाठ फिरवणारा महिलावर्ग गेल्या काही दिवसात फक्त आंब्याचे झाड घेण्यासाठी गर्दी करताना दिसत होता. या झाडाला वाढलेल्या मागणीमुळे आंब्याच्या झाडाची शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे चित्र शहरात होते.

तब्बल अठरा वर्षांनंतर येणारा कोकिळा व्रत, अधिक मास, आणि कुंभपर्व या तीनही पर्वांनी यंदा मेळ साधल्याने आंब्याच्या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. शुक्रवारपासून (३१ जुलै) या कोकिळाव्रताला सुरुवात झाली. २९ ऑगस्टपर्यंत हे व्रत चालणार आहे. खूप वर्षांनंतर हा दुर्मीळ योग आल्याने स्त्रियांसाठी हे व्रत महत्त्वपूर्ण आहे.

आंब्याचे झाड या पूजेसाठी आवश्यक असल्याने एरवी असलेल्या किमतीपेक्षा या कालावधीत या झाडाची किमत वधारली होती. दोन दिवसापासून व्रतासाठी आवश्यक पूजेचे साहित्य घेण्यासाठी बाजारात महिलांनी एकच गर्दी केली होती. आंब्याचे झाड, टोपली, पाट, लाख, चांदी किंवा धातूपासून बनविलेली कोकिळा, काळे वस्त्र, साज या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिला वर्गात उत्साह दिसून येत होता. कुंभमेळा असल्याने कुंभ म्हणजे धातूचा तांब्या दान या काळात करण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी हे व्रत धरले आहे. घरात सुख शांती रहावी यासाठी हे व्रत करतात.

असे करतात व्रत?

आंब्याच्या झाडावर बसलेली कोकिळा आणि इतर पूजेचे साहित्य अशी ही पूजा मांडली जाते. निज आषाढ पौर्णिमेला व्रत सुरू होऊन श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती होते.

एका वेळेला भोजन करून, जमिनीवर झोपून, कोकिळेचे शब्द ऐकून, महिनाभर उपवास करणे, यापैकी कोणत्याही पर्यायाने हे व्रत केले जाते; परंतु तसे जमल्यास शेवटचे सात, तीन, एक दिवस हे व्रत केल्यास चालते. यामुळे अनेक महिलांनी हे व्रत धरले.

कोकिळेचा रेकॉर्ड आवाज

शहरीकरण आणि सध्याची परिस्थिती पाहता कोकिळा पक्षी दिसणे कठीणच आहे. पण, हे व्रत कोकिळेचा आवाज ऐकल्यानंतर सोडण्याला महत्त्व असल्याने अनेकांनी कोकिळेचा आवाज रेकॉर्ड असलेली फाइल आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवली आहे. व्रत सुरू होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर या ऑडिओ फाइल सर्वत्र फिरत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्सिजनअभावी सायकलपटूचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्तरावरील आव्हानात्मक सायकल मोहिमा जिद्दीने तडीस नेणारे नाशिकचे सायकलपटू हर्षद श्रीकांत पूर्णपात्रे (३८) यांचा मनाली ते लेह-लडाख मार्गावरील सायकल प्रवासात शुक्रवारी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला.

हर्षद हे मित्रांसोबत २५ जुलैला सायकलप्रवासाला निघाले. शुक्रवारी गुरूपौर्णिमेच्या दिवशी लेह-लडाख मार्गावरील प्रवासात पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यात त्यांचा मृत्यू ओढवला. ज्येष्ठ समाजसेवक व आधाराश्रमाचे आधारस्तंभ डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे हर्षद हे ज्येष्ठ चिरंजीव होते. नाशिक ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, मुंबई ते कन्याकुमारी अशा आव्हानात्मक सायकलिंग मोहिमाही हर्षद यांनी पूर्ण केल्या होत्या. 'मैत्री २०१२ मुंबई ते गोवा' या सायकल प्रवासात त्यांची काही मित्रांशी ओळख झाल्यानंतर मनाली ते लेह-लडाख या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. २५ जुलैला सायकल प्रवासाला निघाले. शुक्रवारी गुरूपौर्णिमेच्या दिवशी हर्षद यांना या प्रवासात पुरेसा ऑक्सिजन मिळाल्याने अत्यवस्थ वाटू लागले. यात त्यांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचे पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात येणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

बरं वाटत नसेल तर मागे फिर !

'गेल्या वर्षीही हर्षद याच मार्गावर ट्रेकींगसाठी गेला होता. त्यावेळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. पण हर्षद जिद्दी होता. यंदा साहसी सायकल मोहिती यशस्वी करण्याचा चंगच त्याने बांधला होता. या दरम्यान आमचा फोनवर संपर्कही झाला. थोडे प्रकृती अस्वस्थ्याबाबत त्याने सांगितल्यानंतर मागे फिरण्याचाही सल्ला त्याला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते,' असं एमपीएचे अधीक्षक हरीष बैजल यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूचा प्रभाव वाढला

$
0
0

नाशिक : शहरात साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात वैद्यकीय विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात साथीच्या रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमूर्ती स्टॉल्सवर बंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिहंस्थात भाविक मार्गांवर मोठी गर्दी राहणार असल्याने महापालिकेतर्फे शहरात रस्त्यावरील गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉल्सला परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे गोल्फ क्लबसह, द्वारका, बिटकोचौक, पंचवटी, मखमलाबाद रोड या ठिकाणच्या गणेशमूर्ती विक्री स्टॉल्सवर यंदा बंदी घातली जाणार आहे. महापालिकेने विभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे गणपती विक्रेता आणि महापालिका आमने सामने येण्याची शक्यता आहे. सिंहस्थात पर्वणीकाळात गणेश उत्सव असल्याने यावर्षी गणेश भक्तांच्या आनंदावर काही अंशी अंकूश लागणार आहे.

‍गणेशोत्सवापूर्वी नाशिक शहरात मुर्तीच्या विक्रीसाठी लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सवर बंदी येणार आहे. भाविक मार्गात अडथळा येणार म्हणून गोल्फ क्लब त्र्यंबकेश्वर रस्ता, द्वारका पोर्णिमा स्टॉप, पंचवटी, मखमलाबाद रोड, दिंडोरी रोड, डोंगरे वसतीगृह, सातपूर, नाशिकरोड-जेलरोड, बिटको चौक या ठिकाणी स्टॉल्स लावण्याला महापालिकेतर्फे परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे या रस्त्यांवर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स लावता येणार नाही. विक्रेत्यांना पर्यायी जागा दिल्या जाणार असून त्यासाठीचा शोध पालिकेने सुरू केला आहे.

पर्यायी जागेवरून होणार वाद

गणपती विक्रेते आपल्या पहिल्याच जागेवर ठाम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्वणीचे कारण प्रशासनकडून दिले जात असले तरी, विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे महापालिकेत आणि विक्रेत्यांमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळेस पोल‌िस सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरूपौर्णिमेच्या मध्यरात्री चोरट्यांनी साधुग्राममध्ये धुमाकूळ घालत दोन लाख पंच्चाहत्तर हजार रूपयांसह एक लॅपटॉप आणि दोन मोबाइल लंपास केले. शनिवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे साधूमहंत संतप्त झाले असून, त्यांनी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी केली आहे.

साधुग्रामच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. तपोवनात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत पोलिस चौकी असून, याठिकाणी सतत पोलिसांचा वावर असतो. याच पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिंगबर आखाडा अन्नक्षेत्र या ठिकाणी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. अन्नक्षेत्राचे प्रमुख आणि कुंभमेळा व्यवस्थापक विश्वंभरदास महाराज म्हणाले,'रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अन्नक्षेत्रचे कोठार प्रमुख परशुरामदास महाराज आणि काही व्यक्ती येथे काम करीत होते. त्यावेळी एका चोरट्याने अन्नक्षेत्रात प्रवेश करून थेट परशुरामदास यांच्या गळ्याला चाकू लावून पैशांची मागणी केली. पैसे नाही, असे सांगितल्यानंतर चोरट्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. अन्नक्षेत्रात उपस्थित व्यक्तिपैंकी एकाने चोरट्याला काठीने मारले. पण, चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. चोरीची दुसरी घटना सेक्टर २ बी शांतीगीरी गोशाळेजवळील झाडी हनुमंत खालसामध्ये घडली. याठिकाणी वास्तव्यास असलेल्या गंगादासजी महाराज यांच्याकडील दोन लाख पंच्चाहत्तर हजार रूपये, एक लॅपटॉप आणि दोन मोबाइल चोरट्यांनी हातोहात लंपास केला.

चोरीच्या या घटनांमुळे साधुग्राममधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यासह रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली जाते आहे. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चोरीच्या घटनेस पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दुजोरा दिला.

साधुग्राममध्ये दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याचे समजले. बहुतेक गुरू-महंतांनी थोडे फार पैसे शिष्यांकडे दिले असून, त्या पैशांच्या मदतीने सोयी सुविधा उभ्या करण्याचे काम साधुग्राममध्ये सुरू आहे. मात्र, त्याच पैशांवर डल्ला मारण्याचे काम चोरट्यांनी केले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे.

- रामकिशोरदास महाराज, श्री महंत, दिगंबर अनी आखाडा

चोरीच्या घटनांकडे गांर्भियाने पाहावे लागेल. साधूमहंतांना आपल्या सुरक्षेची जबाबदारी पेलावी लागली तर सर्वांच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरू शकते. पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार टाळावा.

- विश्वंभरदास महाराज, कुंभमेळा व्यवस्थापक

चोरीच्या घटनांची माहिती घेतली असून सध्या चौकशी सुरू आहे.चौकशीत समोर येणाऱ्या तथ्यानुसार काय निर्णय घ्यायचा ते ठरवू.

- एस. जगन्नाथ, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवनातील फुलविक्रेत्यांचा वधारला ‘भाव’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या कुटियापासून आश्रमापर्यंत सर्वांनाच विविध प्रकारच्या फुलांनी सजवायला लागत असल्याने तपोवनाच्या नजिक असलेल्या फुलविक्रेत्यांचा भाव वधारला आहे. त्यामुळे तपोवनात रोजच विविध फुलांची आवक चांगलीच वाढली असून त्यातही साधू चोखंदळपणा करीत असल्याने महाग फुलांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

सध्या तपोवनात फुलांना खूप मागणी असते. त्यात जरबेरांची फुले सजावटीत मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत असल्याने या फुलांचे भाव गगनाला भिडले आहे. दहा फुलांचा एक बंडल दोनशे रुपयांना विकला जात आहे. मंदिरातील व आश्रमातील धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत.

साधुग्राममधील अनेक आश्रमांना कार्पोरेट लूक असला तरी काही आश्रम मात्र पारंपरिक देखाव्यांनी बहरेलेले आहेत. त्यामुळे त्यांना फुलांनी सजविण्यात येते. या फुलांना योग्य देखभालीची गरज असते. मात्र, ढगाळ हवामानामुळे फुले खराब होत असल्यामुळे फुलांची आवक आधीच कमी असते. त्यात सिंहस्थामुळे फुलांना मागणी अधिक आहे. आश्रमांमध्ये कृत्रिम फुलांऐवजी खऱ्या फुलांची सजावट केली जात असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. परिणामी फुलांच्या किमती वाढल्या आहेत.

६० रुपयांना मिळणारा फुलांचा बंडल आता २०० रुपयांपर्यंत मिळत आहे. नाशिकच्या आजूबाजूच्या गावांत जरबेरासारख्या फुलांचे उत्पादन शेतकरी घ्यायला लागल्याने ते २०० रुपये या भावात उपलब्ध आहेत. मोगरा, जरबेरा, निशिगंध, गुलाब, गिल्हारी, नारंगा, गोल्ड स्ट्राइक, बोर्डा फ्रस्टेड या गुलाबांची मागणी आहेत. फुलांसोबत आकर्षक पानांचीसुद्धा मागणी आहे. इतर फुलांच्या तुलनेत पांढऱ्या फुलांना पुजेत अधिक मान असल्याने त्याला मागणी सर्वाधिक आहे. पांढऱ्या फुलांमध्ये शोभेची फुले असल्यास त्यांची आवक वाढवावी लागत असल्याचे फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे. जरबेराच्या फुलांचीही मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.

पूर्वीपेक्षा अधिक फुले घ्यावी लागत आहेत. रोजच वाढणारी फुलांची आवक पाहता आता पहाटेच फुले बूक करून ठेवावी लागतात. निशिगंधा, गेलडा व झेंडुच्या फुलांना अधिक मागणी आहे. सुगंधाच्या फुलांपेक्षाही शोभेची फुले आता अधिक भाव खात आहेत. गुलाबाच्या फुलांनाही मागणी वाढली आहे.

- रामदास मंडलिक, फुलविक्रेता

फुलांच्या किंमती

मोगरा - ६०० रुपये किलो

निशिगंध : १०० रुपये किलो

लिली गुच्छ १५ रूपये

गुलाब - १२० रूपये डझन रुपये (२० नगांचा डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉस ओव्हर पॉईंटचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्वणी काळात शहरातील प्रमुख मार्गांवर २८ ठिकाणी क्रॉस ओव्हर पॉईंट ठेवण्यात आले असून, यामुळे एका भागातील नागरिकांना दुसऱ्या भागात पोहचणे शक्य होणार आहे. ही ठिकाणे वगळता इतरत्र बॅरिकेडिंग करून रस्ते बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात ६० ते ८० लाख भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने शहरातील रस्ते गर्दीने व्यापणार आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचता येणार काय? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला होता. गत कुंभमेळ्यात पोलिसांनी बॅरिकेडिंगद्वारे सर्वच रस्ते बंद केले होते. त्यामुळे वाहने घरातच ठेऊन नागरिकांना पायपीट करून अपेक्षित ठिकाणी पोहचावे लागले. गेल्या वेळी स्थानिक नागरिकांची झालेली अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी सहा प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या रिंगरोडवर क्रॉस ओव्हर पॉईंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ऐन पर्वणीच्या दिवशीसुध्दा गंगापूररोडवरील नागरिकांना थेट नाशिकरोडपर्यंत पोहचता येणार आहे. तातडीचे काम रोखू नये, यासाठी ही तजवीज करण्यात आली असून, नागरिकांनी शक्यतो सर्व खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावे, असा सल्लाही पोलिस प्रशासनाकडून देण्यात येतो आहे.

क्रॉस ओव्हर पॉईंट वगळता पोलिसांनी नो इंट्री आणि नो व्हेईकल झोन घोषीत केले आहेत. नो इंट्री झोन पर्वणीच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजता लागू होईल. रामकुडांपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर नो इंट्री झोनची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच रामकुडांपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरात नो व्हेइकल झोन असणार आहे. पर्वणीच्या आदल्या दिवशी या परिसरात रस्त्यावर एकही वाहन पार्क होणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासन घेणार आहे. याशिवाय, प्रशासनासाठी सात ठिकाणी प्रशासकीय मार्ग तयार करण्यात आले असून, याठिकाणी आपत्तकालीन परिस्थितीसाठी मदत करणाऱ्या यंत्रणा मदतीला उभ्या ठेवण्यात येणार आहे.

प्रमुख रस्ते आणि त्यावरील क्रॉस पॉईंट

धुळारोड, आडगाव चौफुली, मेडीकल चौफुली, हॉटेल जत्रा चौफुली, नाशिक-पुणे हायवे, मोह चिंचोली चौफुली, शिंदेगाव चौफुली, बंगालीबाबा, सिंधी कॉलनी चौफुली, के. एन. केला स्कुल चौक, जेलरोड पाण्याची टाकी, नाशिक-मुंबई, विल्होळीगाव चौफुली, गवळाणे चौफुली, गरवारे टी पॉईंट, पाथर्डी फाट, राणेनगर, लेखानगर, वडाळागाव, त्र्यंबकेश्वररोड, समृध्दी टी पॉईंट, अंबड लिंकरोड, सातपूर गाव, सातपूर पोलिस स्टेशन सर्कल, आयटीआय सिग्नल, अेबीबी सर्कल, पेठरोड, राऊ हॉटेल चौफुली, मेहरधाम (गजकर्ण गणेश मंदिर), आरटीओ चौक, कुमावतनगर (पाटाजवळ), दिंडोरीरोड, म्हसरूळ भाजी मार्केट चौक, रिलायन्स पेट्रोलपंप चौक, प्रशासकीय मार्ग, इंदिराचौक नारायण बापुनगर, दिवे बंगला, टाकळीगाव, समर्थनगर टी पॉईंट, ड्रिमसिटी चौक, जनता विद्यालय, फेम सिग्नल, उपनगर नाका.

नागरिकांच्या सुविधांसाठी क्रॉस ओव्हर पॉईंट तयार करण्यात आले असून, याठिकाणी पोलिसांच्या मदतीने वाहनांना दुसऱ्या बाजुला जाता येईल. मात्र, याशिवाय दुसरे कोणतेही पर्याय वाहनचालकांनी वापरू नये.

- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात विमा योजना गुंडाळणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ता कर भरणाऱ्या मिळकतधारकांना देण्यात येणारी अपघात विमा योजना बंद करण्याचा प्रशासन विचार करीत आहे. विमा कंपन्यांना ५८ ते ६० लाख रुपये देण्याऐवजी थेट करदात्यांनाच तेवढी रक्कम सूट म्हणून देण्याचा प्रशासन विचार करीत आहे. यामुळे निधीसाठी नव्हे, तर योजनेत बदल करण्यासाठी योजना नूतनीकरण करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिले.

महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर नियमित भरणाऱ्या मिळकतधारकांना अपघात विमा योजनेचे कवच दिले जाते. सन २००६ पासून शहरात ही योजना सुरू असून, मिळकतधारकाच्या कुटुंबातील कोणाचा अपघाती मुत्यू झाल्यास ५० हजारांची मदत महापालिकेतर्फे केली जाते. नागरिकांना नियमित कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे उद्देश आहे. दरवर्षी पावणे चार लाख मिळकतधारकांपैकी तब्बल सव्वादोन ते अडीच लाख मिळकतधारक नियमित कर भरून या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेची मुदत गेल्या २५ मे रोजी संपली असली तरी, त्या योजनेचे नूतनीकरण प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे कर भरून गेल्या दोन महिन्यापासून नाशिककरांवरील विमा योजनेच छत्र हरपले आहे. नगरसेवकांनी मात्र निधी नसल्याने योजना बंद केल्याचा आरोप केला होता.

महापालिकेने मात्र निधी नसल्याचा दावा फेटाळून लावला आहे. निधीसाठी नव्हे तर योजनेत बदल करण्यासाठी योजनेचे नूतनीकरण झाले नसल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी केला आहे. दरवर्षी केवळ ३० ते ५० नागरिकांनाच या योजनेचा लाभ होतो. त्यातून केवळ आठ ते दहा लाख रुपयेच रिफंड म्हणून मिळत आहेत. तर, निधी जास्त जात आहे. त्यामुळे विमा संरक्षण देण्याऐवजी करधारकांना रिबीट म्हणून अधिकचा एक टक्का देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांची बचत होईल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. आता ही योजनाच गुंडाळण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

हा तर चुकीचा निर्णय

मालमत्ताधारकांना एक टक्का सूट दिली तरी ही रक्कम ५० ते ७५ रुपयांवर जाणार नाही. मात्र, त्याच नागरिकांना एवढ्या रकमेवर पूर्ण कुटुंबाला ५० हजाराचे विमा संरक्षण मिळत होते. या योजनेमुळे कुटुबांत ज्याचा विमा नाही अशा नागरिक आणि महिलांचा समावेश होत होता. मात्र, या सरसकट बंदीमुळे विमा नसलेल्यांचे विमा छत्र जाणार आहे. त्यामुळे असा निर्णय चुकीचा असून, तो घेऊ नये, अशी नगरसेवकांची इच्छा आहे. प्रशासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी स्थायी समिती आणि महासभेपुढे मांडावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल, डिझेलवरील जकात वसुली थांबवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने ५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या व्यापारी व उद्योजकांना वगळून बाकी सर्व व्यापाऱ्यांचा एलबीटी रद्द केला आहे. सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपाची उलाढाल ही ५० कोटींपेक्षा कमी असल्याने पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी वसुली त्वरित थांबवण्याची मागणी निर्भय फाऊंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली. जे पेट्रोलपंप कंपनीच्या वतीने चालविण्यात येतात, त्यांच्याचकडून एलबीटी वसुली करावी व अन्य पेट्रोलपंकडून मात्र ती वसूल करण्यात येवू नये, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास पेट्रोल आणखी दोन रुपयांनी स्वस्त होईल. त्याचा नाशिककरांना फायदाच होईल, असा दावा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विनी जुंद्रेची भरारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या अश्विनी बाळासाहेब जुंद्रे या विद्यार्थिनीने अगदी कमी वयात जिद्दीच्या बळावर पहिल्याच परीक्षेत एअर इंडियाची एअर होस्टेस बनण्याचा मान मिळविला. या पोस्टसाठी तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्‍यामधून तिची निवड झाली.

अश्विनी जुंद्रे ही नाशिकमधील एकमेव विद्यार्थिनी असून, ९ तारखेपासून ती हैदराबाद येथे सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. अश्विनी ही पोलिस कमिशनर ऑफिसमधील कर्मचारी आणि त्या काळातील कुस्तीपटू बाळासाहेब जुंद्रे यांची कन्या आहे. त्यांनी सामान्य परिस्थिती असताना मुलीला इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण देऊन एअर होस्टेसपर्यंत पदापर्यंत नेऊन ठेवले. आठ हजार विद्यार्थ्यांमधून १८१ विद्यार्थी निवडले गेले. त्यात तिची निवड झाली. तीन राऊंडमध्ये तिचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. ग्रुमिंग, रीडिंग, आणि व्यक्तिगत गुणवत्ता या आधारावर तिची निवड झाली. अश्विनीला एअर इंडियाचे सिनियर कॅबिन हेमंत सुटे, सिद्धार्थ गवारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोदे यांच्या हस्ते देखील तिचा सत्कार करण्यात आला असून, ती नाशिकमधील या वर्षातील एकमेव कमी वयाची विद्यार्थिनी असून, आनंद अकाउंटन्सी क्लासेसचे संचालक प्रा. आनंद बोरा यांच्या हस्तेही तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. कुणाल कुरे, प्रा. जयराज झवेरी, हेमवती सूर्यवंशी, बाळासाहेब जुंद्रे, सलोनी वाघमारे आदी उपस्थित होते. अश्विनी जुंद्रे हिने यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. मळलेल्या वाटांवरून चालण्यापेक्षा नेहमी नवीन वाटा चोखाळण्याचा सल्ला तिने यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images