Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाजार समित्यांसाठी ९८ टक्के मतदान

$
0
0

टीम मटा :

जिल्ह्यातील नाशिकसह सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान झाले. नाशिक वगळता चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर व कळवण या पाच बाजार समित्यांसाठी ९८ टक्के मतदान झाले. आज, सोमवारी दुपारपर्यंत सर्व बाजार समित्यांचे निकाल जाहीर होतील. येवल्यात माजीमंत्री छगन भुजबळ, सिन्नरमध्ये वाजे-कोकाटे, चांदवडमध्ये कोतवाल-डॉ. कुंभार्डे, नांदगावमध्ये भुजबळ-पवार, कांदे यांच्यात चुरस आहे.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या नांदगाव आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. दोन्ही बाजार समितीत सरासरी ९८ टक्के मतदान झाले. आता कोण बाजी मारते हा दोन्ही तालुक्यात औत्सुक्याचा विषय बनला आहे. निकालासाठी आज (दि.२७) दुपारी १२ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नांदगावात प्रतिष्ठा पणाला

नांदगाव बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल आणि शिवसेना पुरस्कृत पॅनल यांच्यात लढत झाल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. माजी आमदार अनिल आहेर हे समर्थपणे भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहिल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती पहायला मिळाली. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी शिवसेनेच्या माजी आमदार संजय पवार, सुहास कांदे यांच्या पॅनलची कास धरल्याने ही निवडणूक अधिक चर्चेचा विषय ठरली.

नांदगाव बाजार समितीत १८ जागा असून, ३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सभापती तेज कवडे यांच्यासह प्रफुल्ल पारख, भास्कर कासार, रामचंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा कौल मागितला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पुन्हा सत्ता जाणार की शिवसेना पुरस्कृत पॅनल परिवर्तन घडवणार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

चांदवडमध्ये गुरु-शिष्य लढत

चांदवड बाजार समितीत अनेक वर्षांपासून माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या गटाचे वर्चस्व आहे. तब्बल सात वर्षांनी बाजार समितीची निवडणूक होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकूण १८ जागांसाठी रविवारी मतदान झाले.

माजी आमदार उत्तमबाबा भालेराव आता कोतवाल यांचे व्याही झाल्याने ते कोतवाल यांच्यासोबत आहेत. डॉ. सयाजीराव गायकवाड देखील या शेतकरी पॅनल गटात कोतवाल यांच्याबरोबर आहेत. तर, शिरीष कोतवाल यांचे एकेकाळचे शिष्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी कोतवाल यांना आव्हान उभे करीत आमदार राहुल आहेर, नितीन आहेर, संपत वक्ते यांच्यासोबत परिवर्तन पॅनलद्वारे निवडणूक लढवली आहे. कोतवाल बाजी मारतात की परिवर्तन घडते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

येवल्याकडे लक्ष

येवला : लक्षवेधी ठरलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी १८ जागांसाठी ५० उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, मापारी-मापाडी या गटातील एकूण २४५७ मतदारांपैकी २४२४ मतदारांनी (९८.६६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. आज, सोमवारी येवल्यातील सिद्धार्थ लॉन्सवर मतमोजणी होणार आहे.

येवला शहरातील विंचूर रोडलगतच्या जनता विद्यालयाच्या इमारतीबाहेर सकाळपासूनच दोन्ही पॅनलचे नेते व उमेदवार प्रवेशद्वारावर मतदारांना हात जोडून साद घालताना दिसत होते. दुपारी १२ ते २ या काळात केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आमदार छगन भुजबळ यांनी 'प्रगती' पॅनल रिंगणात उतरवतांना त्यासमोर पवार-दराडे गटाने 'शेतकरी विकास' पॅनल उभा केला होता. जनता विद्यालयातील सहा मतदान केंद्रांवर अगदी चुरशीने मतदान झाले.

सिन्नरमध्ये रंगत

सिन्नर : सिन्नर बाजार समिती निवडणुकीत अभूतपूर्व मतदान होत आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सोसायटी व व्यापारी गटात जवळपास ९८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मार्केट कमिटीच्या अद्यापपर्यंत च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत कमालीची चुरस दिसून आली. एक-एक मतदार खेचण्यासाठी दोन्ही गटांनी ताकद पणाला लावली होती. या संस्थेवर गेल्या २० वर्षांपासून वर्चस्व राखणाऱ्या माजी आमदार कोकाटेंपुढे आमदार राजाभाऊ वाजे यांनी आव्हान उभे करीत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण केली. या संघर्षात कोकाटे यांनी पूर्ण ताकद पणाला लावत या निवडणुकीत उडी

घेतली. सिन्नर शहरासह तालुक्यात एकूण १३ मतदान केंद्रांवर मतदान झाले. वावी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाग्रहात आज, सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे.

कळवणमध्ये चुरस

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ९८ टक्के मतदान झाले. एकूण १७१९ मतदारांपैकी १६९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. शेतकरी विकास व किसान विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये सरळसरळ लढत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय कळवण येथे आज, मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सविता शेळके यांनी दिली.

कळवण, कनाशी, अभोणा या तीन ठिकाणी बूथ उभारण्यात आले होते. या तीन बूथमध्ये १० मतदान केंद्र करण्यात आले होते. शेतकरी विकास पॅनलचे नेते जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जि. प सदस्य नितीन पवार, विद्यमान सभापती धनंजय पवार, पंचायत समिती उपसभापती अॅड. संजय पवार, कौतिक पगार आदी उपस्थित राहून मतदारांना आवाहन करत होते. तर किसान विकास आघाडीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, आमदार जे. पी. गावित, माकपा सरचिटणीस कॉ. हेमंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी आहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळ धावपट्टीचा महिनाभरात विस्तार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी उर्वरित जमीन ताब्यात घेण्यास विलंब झालेला आहे. ही जमीन सरकार महिनाभरात ताब्यात घेईल, असा विश्वास जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केला.

जळगाव विमानतळाचे २०१२ मध्ये उदघाटन झाले असले तरी सध्या या विमानतळाची धावपट्टी केवळ १७५० मीटर आहे. या धावपट्टीवर केवळ लहान विमाने उतरू शकतात. मात्र, मोठी विमाने उतरण्यासाठी या विमानतळाला ३५०० मीटर लांबीच्या धावपट्टीची गरज आहे. सध्या विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार ३३०० मीटरपर्यंत वाढवता येऊ शकेल इतकी जमीन यापूर्वीच ताब्यात आलेली आहे. आता केवळ चार एकर जमीन ताब्यात घेणे बाकी आहे. ती ताब्यात आल्यास ही धावपट्टी ३५०० मीटरपर्यंत वाढू शकते. विमानतळ विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ३५०० मीटरपर्यंत धावपट्टी वाढवण्याची योजना आहे. विशेष म्हणजे विमानतळ विकासाचा ६७ कोटींचा दुसरा टप्पा केंद्र सरकारने मंजूर केलेला असल्याचे विमानतळ उदघाटनावेळीच जाहीर करण्यात आलेले होते.

सरकारी भावातच जमीन!

गेले तीन वर्षे ही उर्वरित चार एकर जमीन ताब्यात देण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते. नुकतीच यासंबंधी शेतकऱ्यांची एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले, की या भागात भाव नसतानादेखील केंद्राच्या नव्या कायद्यानुसार चार लाख रुपयांऐवजी १२ लाख रुपये दराने जमिनीचा भाव देण्यास सरकार तयार आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांनी वाढीव भावाची मागणी करीत जमिनी देण्यास नकार दिला. त्यामुळे आता नाइलाजाने ही जमीन सरकारी भाव देऊन ताब्यात घ्यावी लागेल व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चार एकर जमिनीचा प्रश्न सुटेल अशी प्रशासनाला आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडाच्या सुरक्षेत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या शाही पर्वणीसाठी काही दिवस शिल्लक असून आतापासूनच रामकुंड परिसरात भाविकांच‌ी गर्दी वाढली आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी रामकुंड भोवतालच्या सुरक्षेत वाढ केली असून रेकी सारखे प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडल्यापासून रामकुंडावर पर्यटकांचा तसेच भाविकांचा ओघ वाढला आहे. या गर्दीचा फायदा समाजकंटकांना होऊ नये, यादृष्टीने पोलिसांनी आपल्या बंदोबस्तात वाढ केली असून रामकुंड परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरकेडींग केले आहे. संशयिताच्या चौकशीसाठी पोलिस कर्मचारी सतत गस्त घालत असतात. यात साध्या वेषातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आषाढी एकादशी, गुरूपौर्णिमा, चतुर्थी तसेच त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शाही पर्वणीपूर्वीच भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अशा गर्दीच्या दिवशी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असून परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. माध्यमांचे प्रतिनिधी वगळता फोटोग्राफी करणाऱ्यांवर बंधने घालण्यात आली असून रेकीसारखे प्रकार यामुळे रोखता येणार असल्याचा दावा, संबंधित अधिकाऱ्याने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजरंगी भाईजानचा शो बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

याकूब मेमन याच्या फाशीची शिक्षेबाबत आक्षेपाचे ट्विट करणाऱ्या अभिनेता सलमान खान विरोधात शिवसेनेचे नाशिकमधील कार्यकर्ते रविवारी आक्रमक झाले. सलमान खान याचा पुतळा जाळतानाच सिनेमॅक्स येथील बजरंगी भाईजान या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यात आला. पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्र‌तिबंधात्मक कारवाई केली.

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेमन यास न्यायालयाने फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. मेमन यास फाशीचा शिक्षा देणे अयोग्य असल्याचे ट्विट सलमान खानने केले होते. त्याच्या या ट्विट विरोधात शिवसेनेची युवासेना आक्रमक झाली. त्यांनी सलमानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यासाठी कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरकडे दुपारी साडेचारच्या सुमारास मोर्चा वळविला. सलमान खानच्या प्रतिमेला काळे फासतानाच त्याचा पुतळा जाळण्यात आला. तसेच बजरंगी भाईजान या चित्रपटाचा चार वाजून चाळीस मिनिटांचा खेळही बंद पाडण्यात आला. चाळीसहून अधिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. त्यामध्ये युवासेनेचे महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते यांच्यासह संजय गायकर, आशिष साबळे, चंद्रकांत लासुरे, चेतन शेलार, गणेश बर्वे, संदीप गायकर आदींचा सहभाग होता. आंदोलकांपैकी आठ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंभळे, पिंगळे, पाटलांचा आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी रविवारी सुमारे ९८ टक्के मतदान झाले. विविध गटांसाठी झालेल्या या मतदानानंतर ६३ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. आज (दि. २६) दुपारपर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

नाशिकसह, त्र्यंबकेश्‍वर व पेठ तालुक्यांमध्येही बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. तेथे १५ ठिकाणी ३१ मतदान केंद्रांवर मतदान बूथ उभारले होते. नाशिकमध्ये तीन केंद्रांची रचना केली होती. सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. व्यापारी गटासाठी एकूण १५०७ मतदारांपैकी १२८६ मतदारांनी हक्क बजावला. हे प्रमाण ८५.३३ टक्के इतके होते. ग्रामपंचायत गटासाठी १७८० पैकी १७२२ मतदारांनी हक्क बजावला. ही टक्केवारी ९६.७४ टक्क्यांच्या घरात आहे तर, सोसायटीसाठी १२४८ पैकी १२३६ मतदारांनी हक्क बजावल्याने ९९.३ टक्के मतदान झाले.

जिल्हा बँकेचे संचालक शिवाजी चुंभळे यांचे शेतकरी पॅनल, माजी खासदार देवदास पिंगळेंचे आपलं पॅनल व भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात थेट लढत होत आहे. आज मतमोजणी होणार असल्याने सुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील गोदावरी हॉल येथे सकाळी ८ वाजेपासून आज मतमोजणीस सुरुवात होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीदिनी ‘नो व्हेइकल झोन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या म्हणजे २९ ऑगस्टच्या आदल्या दिवशीच बॅरकेडींग करून 'नो इंट्री' तसेच 'नो व्हेइकल झोन' तयार करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद होणार असले तरी पोलिसांनी 'क्रॉस ओव्हर पॉईंट' निर्माण केल्याने एका भागातील नागरिकांना शहराच्या दुसऱ्या ठिकाणी पोहचता येणार आहे.

पर्वणी काळात किमान ६० लाखांपेक्षा अधिक भाविक शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पर्वणीच्या आदल्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्ट रोजी रामकुंडाकडे येणारे तसेच भाविकांचा राबत असलेल्या मार्गावर 'नो इंट्री झोन' लागू होईल. रात्री आठ वाजता या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येईल. 'नो इंट्री'साठी गंगापूररोड परिसरातील सर्वाधिक रस्ते बंद ठेवण्यात येतील. यानंतर, रात्री १० वाजता रामकुंड परिसरातील साधारणतः २ ते ३ किलोमीटर अंतराच्या परिघात 'नो व्हेइकल झोन' जाहीर करण्यात येईल. म्हणजे पर्वणीच्या आदल्या दिवसापासूनच रस्त्यावर एकही वाहन राहणार नाही, याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार आहे. या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी आपली वाहने घराच्या आवारात लावली तर अडचण नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर वाहन लावू देणार नाही, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी स्पष्ट केले. 'नो व्हेईकल झोन'मध्ये सीबीएस, अशोकस्तंभ, रामवाडी, मखमलाबाद नाका, पेठनाका, दिंडोरी नाका, काट्या मारुती मंदिर, संतोष टी पॉईंट (आडगाव नाका), कन्नमवार पूल, द्वारका सर्कल, सारडा सर्कल, खडकाळी सिग्नल आणि पुन्हा सीबीएस अशा वर्तुळाकार पध्दतीने 'नो व्हेइकल झोन' असणार आहे.

असे आहेत नो इंट्री झोन

गंगापूरोडवरील बालगणेश मंदिर, पाटील लेन क्रमांक १ ते ५, टिळकवाडी रोड, रामायण बंगला, धन्वंतरी हॉस्पिटल, अरिहंत फ्रुटस, त्र्यंबकरोडवरील जलतरण सिग्नल, गोल्फ क्लब मैदानाची मागची तसेच पुढची बाजू, सुयश हॉस्पिटल, राज स्विटस, एसएसके सॉलिटर हॉटेल, भागानगरकडे जाणारा मार्ग, हॉटेल किनाराजवळील मार्ग, ​ साहिल लॉन्स, अशोक हायस्कूल, तुलशी आय हॉस्पिटल, समाज कल्याण भवन, समर्थनगर, औरंगाबादरोडवरील मिर्ची ढाबा, कॅनॉलरोड, मिनाताई ठाकरे स्टेडीयम, स्वामी नारायण चौकी, हिरावाडी पूल, दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी, पेठरोडवरील फुलेनगर झोपडपट्टी, मखमलाबाद रोडवरील मधूबन कॉलनी, सुदर्शन कॉलनी इत्यादी.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. नागरिकांची कमीतकमी गैरसोय व्हावी, या दृष्टीने नियोजन केले असून यात सर्वांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. लक्षावधी भाविकांच्या सुरक्षेला प्राधन्य देताना सर्वसामन्य नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाताना अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे रोखण्यासाठी युवकांची फौज

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंगसारखे भररस्त्यावर घडणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी युवकांची फौज बांधण्यास सुरुवात केली आहे. टेक्नोसॅव्ही होत पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची मोट बांधली आहे. हे युवक निःस्वार्थीपणे पोलिसांना सहकार्य करीत असून, आतापर्यंत जबरी चोऱ्यांमधील दोन आणि अन्य गुन्ह्यांतील एका संशयिताला पकडून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

हाणामाऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडण्यात पोलिसांना बहुतांशवेळा यश येते. परंतु, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग किंवा तत्सम गुन्ह्यांमध्ये संशयितांना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरते. मनुष्यबळाचा अभाव आणि मानवी मर्यादा यामुळे असे गुन्हे रोखण्यात अपयश येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मनुष्यबळाची उपलब्धता हा राज्य सरकारचा धोरणात्मक विषय आहे. त्यामुळे त्यावर परिमंडळ दोनच्या हद्दीत वेगळ्या रितीने उपाय शोधण्यात आला आहे.उपनगर, इंदिरानगर परिसरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे अधिक होत असल्याचे निरीक्षण नोंदवित सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी तेथील तरुणांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना सहकार्य करण्याच्या त्यांच्या आवाहनाला तरुणांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परिसरातातील तरुणांचे वेगवेगळे पाच ग्रुप पोलिसांच्या संपर्कात आले असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. चौकाचौकात घेतल्या जाणाऱ्या बैठकांमुळेही पोलिसांना मदत होत आहे.

एकमेकांशी परिचित नसलेल्या तरुणांची या निमित्ताने ओळख झाली असून, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून गट्टीही जमली आहे. दिवसेंदिवस या ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य जोडले जात असून, ते पोलिसांचे खबरे

बनले आहेत. अशा तरुणांच्या मदतीनेच गत पंधरवड्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतील दोन संशयितांना अटक करण्यात आली. इंदिरानगर परिसरातील गजानन महाराज मंदिराजवळ एक जण संशयास्पद अवस्थेत वावरत होता. पोलिसांना याबाबत मा‌हिती देण्यात आली. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली.

डिजीपीनगर, वडाळा मार्गावर लोकवस्ती विरळ असल्याने चोरटे उपनगर किंवा इंदिरानगर येथे गुन्हा करून या मार्गाने पसार होतात. तरुणांमधील उर्जा गुन्हेगारी रोखण्यासारख्या विधायक कामासाठी वापरता यावी या उद्देशाने त्यांना मदतीसाठी प्रयत्न करीत आहोत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, व्हॉटस् अॅप ग्रुपही बनविला आहे. तरुणांच्या सतर्कतेमुळे संशयितांना पकडण्यात आम्हाला मदत होत आहे.

- अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे आर्थिक संकट गडद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कर्जफेडीच्या हप्त्यांमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या महापालिकेवर एलबीटीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. महापालिकेला दरमहा एलबीटीपोटी मिळणारे ५ कोटी रुपयांचे उत्पन्न पुढील मह‌िन्यापासून थांबणार असल्याने कर्मचाऱ्यांचे पगारच काय, साध्या मुलभूत सुविधादेखील पुरविणे शक्य होणार नाही. एलबीटीची तूट भरून काढण्यासाठी सरकार कसे आणि किती अनुदान देणार हे अद्याप स्पष्ट न झाल्याने प्रशासन व पदाधिकारी चिंतेत आहेत.

सरकारने नुकतेच ३१ जुलै २०१५ पासून महापालिका हद्दीतील ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपये इतकी असेल, त्यांनाच एलबीटी भरावी लागणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना मात्र यातून सूट मिळणार असल्याचे आदेश काढले आहेत. जळगाव शहराचा विचार करता महापालिकेत सुमारे ७ हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीची नोंदणी केली आहे. यातील १५ ते २० व्यापाऱ्यांचीच उलाढाल ५० कोटींच्यावर आहे. त्यामुळे आता जळगाव जवळजवळ एलबीटी मुक्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत देखील बंद होणार असल्याने महापालिका आर्थिक संकटात येणार आहे.

महापालिकेवर हुडकोचे सुमारे ४९५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जफेडीवर दरमहा चार कोटींचा खर्च होत आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च देखील उत्पन्नाच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महापालिका प्रशासनाला वर्षाला सुमारे ६० कोटी रुपयांची रक्कम केवळ मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करावी लागते, तर १८ कोटी सेवानिवृत्ती वेतनावर खर्च होतात. मनपाचे दरमहा उत्पन्न ७ ते ८ कोटी रुपये, तर खर्च १२ कोटी इतका आहे. दरमहा येणाऱ्या ५ कोटी रुपयांच्या तफावतीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे विकासकामे बंद आहेत. एलबीटीबाबत झालेल्या या नव्या निर्णयामुळे दरमहा येणारे सुमारे ५ कोटी रुपयांचे उत्पन्न थांबणार आहे. उत्पन्न व खर्चातील ही तूट १० कोटींवर जाणार असल्याने महापालिकेची मुलभूत सुविधांची कामे देखील ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशी परिस्थिती असल्यामुळे महापालिकेला सध्या कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा करणे अवघड झाले आहे. एवढेच नव्हे तर वीजेचे बिल, डिझेल खर्च व वाहन दुरुस्तीसारख्या अत्यावश्यक कामांचा खर्च करण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. महापालिकेची गेल्या वर्षाची घरपट्टी वसुली निम्यापेक्षाही कमी झाल्याने निधीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती कायम आहे. घरपट्टीचे मासिक उत्पन्न देखील घटले आहे.

अनुदानाचे काय ?

महापालिकेला एलबीटीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. मात्र, ते कसे व केव्हा दिले जाईल याबाबत शासनाने धोरण स्पष्ट केले नसल्याने प्रशासन संभ्रमात आहे. जळगावातील ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेले व्यापारी एलबीटी मुक्त होणार असल्याने पेट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंसह इतर वस्तुंचे दरही कमी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये सापडला जिवंत बॉम्ब?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकच्या एम.जी. रोडवर एका कपाऊंडच्या जवळ असलेल्या बेवारस बॅगमध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याचे वृत्त आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी तपासकरून ती बेवारस बॅग ताब्यात घेतली आहे. मात्र त्या बॅगेत बॉम्ब होता की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

पंजाबच्या गुरदासपूरमधील दिनानगरमध्ये आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर या शहरात अलर्ट देण्यात आले. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास नाशिकच्या नाशिकच्या एम.जी. रोडवर एका कपाऊंडच्या जवळ एक बेवारस बॅग आढळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करून बॅग ताब्यात घेतली. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भातील माहिती देत फोटो ट्विट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकालपणा पाचवीला पुजलेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर शहरात विविध भागात विकासकामे सुरू आहेत. मात्र, शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणऱ्या द्वारका भागात परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे कोणतेही ठोस काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे द्वारका परिसराचा बकालपणा दूर होऊ शकलेला नाही. नवीन विकासकामे तर दूरच. उलट निष्कृट कामामुले उखडलेल्या रस्त्यावर डांबरचे पॅच, दुभाजकाला वरूनच रंग फासण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सिंहस्थाचे ध्वजारोहण झाल्यानंतर आता नाशिकमध्ये दे‌श-विदेशातून भाविक-पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमधील अतिशय महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या द्वारका परिसराकडे सर्वच पातळीवर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जुने नाशिकमधील द्वारका भागात सिंहस्थानिमित्त अद्याप ‌विकासकामांचा स्पर्श झालेला नाही. शहराच्या या प्रवेशद्वाराची अवस्था किमान आता तरी बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती सध्या सुरू असलेल्या किरकोळ कामांमुळे धुळीस मिसळला जाण्याची शक्यता बळावत चालली आहे. द्वारका परिसरात गॅरेज हब निर्माण झाल्याने व चोहोबाजुंनी होणारी वाहतूक व कोंडीमुळे जुने नाशिक परिसराचा श्वास कोंडला गेला आहे.

दुभाजकावरील जाळ्या गायब

द्वारकाकडून सारडा सर्कलकडे जाण्याच्या मार्गावर दुभाजकावर रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी जाळ्या टाकून आतमध्ये शाभेची झाडे लावण्यात आलेली होती. मात्र, देखभालीअभावी झाडे सुकून मरून गेली. तर गर्दुले आ‌णि चोरट्यांनी दुभाजकावरील लोखंडी जाळ्या चोरून नेल्या आहेत. यामुळे परिसरातील बकालपणामध्ये अधिकच भर पडली आहे.

भूयारी मार्ग वापराविना पडून

द्वारका परिसराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्ग बनविले गेले. मात्र, नागरिकांकडून त्याचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासानाने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. भुयारी मार्गात दिवसाही असलेले अंधाराचे साम्राज्य आणि मद्यपी चोरांचा वावर असल्याने नागरिक तिकडे फिरकण्याचे धाडस करीत नाहीत.

बसथांबा शेडची दुरवस्था

द्वारका येथे एसटीचा बसथांबा आहे. येथे रिक्षा चालकांचा बेशिस्तपणाचा व गराडासह दुरावस्था झालेले शेड आणखी नवीन समस्येची भर घालते. भर रसत्यावर वाहने उभी करून प्रवासी भरले जाते. त्यामुळे रोज वाहतुक कोंडी होऊन अपघातही घडतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थानिमित्त स्वच्छतेची ‘गुंज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाचीही स्वच्छता राखण्याची व येणाऱ्या भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून शहरातील 'गुंज फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेनी पुढाकार घेतला आहे. जेथ-जेथे पर्यटक अधिक प्रमाणात जातील, अशा सर्व ठिकाणी कचरापेट्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक शहरात दाखल होत आहेत. या वाढत्या संख्येमुळे साहजिकच अनेक आव्हाने प्रशासनावर आहेत. मात्र, हे आव्हान केवळ प्रशासनाचेच नसून ते पेलण्यासाठी शहरवासियांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. या काळात स्वच्छतेच्या समस्येला काहीसे हलके करण्यासाठी गुंज फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. शहरात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या कडून कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत रामकुंड, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी ६० कचरापेट्या शहरात लावण्यात आल्या असून येत्या काळात गंजमाळ ते शालिमार, त्र्यंबकेश्वर येथे आणखी १०० कचरापेट्या ते लावणार आहेत. रामकुंडावर ध्वजारोहणाच्या दिवशीही होणाऱ्या गर्दीचा विचार करीत या संस्थेने कचरापेट्यांचे नियोजन केले होते. त्याचा मोठा फायदा स्वच्छतेच्या दृष्टीने झाल्याचे या परिसरात दिसून आले. या कचरापेट्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बंका, सचिव संदीप गोयल, राजेश बोरा यांच्यासह विशेष टीम कार्यरत आहे.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने होत असताना या वाटचालीत शहराची प्रतिमा स्वच्छ व सुंदर झळकावी, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिकरित्या पुढाकार घेणे आवश्यक आहे, या दृष्टीकोनातून विचार करत 'गुंज फाऊंडेशन' याबाबत लोकांमध्ये जनजागृतीही करत आहेत. कुंभमेळ्यासारख्या प्रशस्त सोहळ्यात बाहेरील शहरांतील, देशातील नागरिक आपल्या शहरात येतील तेव्हा त्यांना स्वच्छ व सुंदरतेचे दर्शन घडले पाहिजे, यासाठी 'गुंज फाऊंडेशन' प्रयत्नशील आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमांनाही कॉर्पोरेट लूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्वणीसाठी आता थोड्याच दिवसांचा कालावधी शिल्लक राहीला असताना तपोवनात विविध आखाड्यांच्या आश्रम उभारणीच्या कामाला गती आली आहे. जागोजागी उभ्या असणाऱ्या बड्या आश्रमांना प्राचीन लूक देण्यासाठी मात्र आधुनिक डेकोरेशन मटेरियलचा वापर होतो आहे.

काही आश्रम सीसीटीव्ही, वाय फाय अन् अत्याधुनिक सुविधांसह साकारले जात आहेत. यामुळे तपोवनातील आश्रमांनाही कॉर्पोरेट लूक मिळतो आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तपोवनातील कामांमध्ये काही प्रमाणात व्यत्यय येत असला तरीही ही कामे आता अंतिम टप्प्यात आले आहेत. मिळालेल्या प्लॉट्सच्या जागी संबंधित आश्रमाचे होर्डींगही आता झळकू लागले आहेत. काही आश्रमांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी आश्रमाचे द्वारही खुले झाले आहे.

जनसंपर्कालाही प्राधान्य

साधुग्राममध्ये उभारण्यात येणाऱ्या आश्रमाला स्वतंत्र परंपरा आणि इतिहास आहे. याशिवाय कुंभ पर्वणीच्या निमित्ताने या आश्रमांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहे. जनसंपर्काच्या दुनियेत आश्रमांचाही भर नव्या भाविकांशी संवाद साधण्यावर असल्याचे दिसून येते. यामुळे दूरहून येणाऱ्या भाविकांसाठी आश्रम घटकाभर मुक्कामाचे ठिकाण ठरते आहे. या माध्यमातून आश्रमाशी संबंधित भाविकांना परिसराची माहिती देण्यासोबतच भविष्यातील सौहार्दासाठी त्यांचा तपशील नोंदविण्यालाही आतापासून सुरुवात झाली आहे.

पूजासाहित्याची विक्री

कुंभाच्या पार्श्वभूमीवर तपोवनात होणारी गर्दी घेता ज्याच्या त्याच्या परिने पूजा साहित्याच्या विक्रीवाल्यांनी आपापल्या जागा आरक्षित करण्यावर भर दिला आहे. अद्याप भाविकांची वर्दळ तुलनेने कमी असली तरीही पूजासाहित्याची विक्री सुरू आहे. राज्यासह परराज्यातून भाविकांचा ओघ येण्यासही सुरुवात झाली आहे. या भाविकांकडून पूजासाहित्यास असणाऱ्या मागणीमुळे पूजासाहित्याच्या विक्रीलाही या परिसरात गती मिळाली आहे.

सजावटीसाठी जुन्या-नव्याचा संगम

ऐन पावसाच्या कालावधीत येणाऱ्या पर्वणींदरम्यानच शहरात जास्त भाविकांच्या भेटी होणार आहेत. पावसाच्या वातावरणामुळे येथे उभारण्यात आलेल्या आश्रमांची व्यवस्था खराब होण्याची जास्त शक्यता आहे. यामुळे आश्रम उभारतानाच येथे सजावटीसाठीही डेकोरेशनचे मटेरियल वापरण्यास प्राधान्य दिले जाते आहे. आश्रमांमध्ये पार्टेशन उभारताना प्लायवूडसह ताडपत्रीचा उपयोग केला जातो आहे. मुख्य कुटीसाठी बाह्यांगाने वाळक्या गवताच्या गंजी, प्लॅस्टिक फुलांच्या रंगबेरंगी माळा या साहित्याचा उपयोग होतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी तालुक्यात संततधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे घोटी शहरासह पश्चिम व ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात १३० मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली असून दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात दीडहजारीकडे वाटचाल सुरू केली आहे. भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा पट्ट्यात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतीत जलमय स्थिती आजही कायम आहे. गेल्या चोवीस तासात विक्रमी अशी १३० मि. मी. पावसाची नोंद झाली. आजपर्यंत तालुक्यात १ हजार ३५७ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाने सरासरीच्या दीडहजारीकडे वाटचाल केल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत ४२.२७ टक्के पावसाची नोंद जुलैमध्येच घेण्यात आली आहे. तालुक्यातील भावली धरण परिसरात सर्वाधिक १२० मि.मी., इगतपुरी परिसरात १३० मि.मी., घोटी परिसरात ११६ तर दारणा धरण परिसरात ६९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्व धरणांनी उन्हाळयात शंभर टक्के तळ गाठला होता. मात्र मुसळधार पावसामुळे दारणा व भावली धरणात कमालीची वाढ झाली आहे. चोवीस तासात दारणा धरणात ५१३ दलघफू तर भावली धरणात ७९६ दलघफू पाणी जमा झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा वीज बिलांचा शॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड परिसरात ग्राहकांना दुप्पट वीज बील आल्याने जबर शॉक बसला आहे. पाच दिवसात हजारावर ग्राहकांनी जेलरोडच्या कार्यालयात धाव घेतली. वीज महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनीही सहकार्याची भूमिका घेत बिले कमी करून देण्यास सुरवात केली आहे.

अचूक रिडिंग घेणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर (आरएफ) नाशिकमध्ये बसविली जाणार आहेत. या मोहिमेची सुरुवात जेलरोड आणि नशिकरोड येथून झाली आहे. जेलरोडच्या शिवाजीनगर पूर्व आणि पश्चिम भागात मिळून १८ हजार ग्राहक आहेत. पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर, नारायणबापू नगर, एमएसईबी कॉलनी, चंपानगरी, जुना सायखेडारोड आदी भागात ग्राहकांच्या घरी रेडिओ मीटर बसवण्यात आले. त्यांना जादा वीज बिले आली आहेत. ज्यांनी मागील बील भरले त्यांनाही पुन्हा वाढ होऊन आले आहे. जेलरोडला पाच दिवसात हजारावर ग्राहकांनी बिले जमा केली आहेत. नाशिकरोडचा विचार केला तर ही संख्या दुप्पट होईल.

बल्क अपलोडेशनमुळे गेल्या बीलात दहा युनीटपर्यंतच बिल दिले गेले. म्हणजे प्रत्यक्ष रिडिंगपेक्षा कमी बील ग्राहकांना आले. त्यांचे युनीट या महिन्याच्या बिलात वाढवून देण्यात आले. मात्र, युनीट जास्त झाल्याने वीज दराचा स्लॅब बदलला आणि बीले जास्त आल्याची कबूली अधिकाऱ्यांनी दिली. ज्या ग्राहकांचा प्रत्यक्ष युनीट वापर आणि फोटो रिडिंगमधील वापर सारखाच असेल त्यांना वीजबील दुरूस्त करून मिळणार नाही.

बल्क अपलोडेशनमुळे वीजबिले जास्त आली आहेत. ग्राहकांनी जेलरोड अथवा नाशिकरोडच्या देवी चौकातील कार्यालयाशी संपर्क साधून बील कमी करून घेऊन सहकार्य करावे.

- डी. यू. चौधरी, अभियंता

आमच्या जेलरोडच्या राजलक्ष्मी सोसायटीचे बील दरमहा आठशेच्या आसपास येते. यंदा दोन हजार आले आहे. वैयक्तिक वीजबीलेही सहाशेच्या आसपास येतात. ती हजार-दीडहजार आल्याने मनस्ताप झाला आहे.

- कैलास ह्याळीज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीकडून कामगार वेठीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

अंबड एमआयडीसीमधील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत ७५ दिवसांपासून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यात कंपनी व्यवस्थापनच कामगारांना वेठीस धरत असल्याचा आरोप 'सिटू' कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आर. एस. पांडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे औद्योगिक न्यायालयाने नेमणूक केलेल्या कामगार पडताळणी अधिकाऱ्याला कंपनी व्यवस्थापनानेच कंपनीच्या प्रवेशद्वारावर पडताळणीसाठी मज्जाव केल्याने पडताळणीचे काम थांबले आहे.

क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापन आणि आयटक यांच्याकडून संगनमताने कामगारांवर अन्याय केलाज जात आहे. याशिवाय न्यायालयाचा अवमान करण्याची कृती कंपनी व्यवस्थापनाकडून केली जात आहे, असा आरोप पांडे यांनी केला आहे. कंपनीत कामगार पडताळणी मोहिमेत कामगारांचा उत्साह पहाता कंपनी व्यवस्थापनाने खो घातला आणि नेमणूक करण्यात आलेल्या पडताळणी अधिकारीकडून काम होत असल्याने बंद केले आहे. त्यातच पडताळणी अधिकारी नंदन यांनी न्यायालयात पडताळणीबाबतची सविस्तर माहिती दिल्याचेही पांडे यांचे म्हणणे आहे. कंपनी व्यवस्थापनाने नाशिक औद्योगिक न्यायालयातील कंपनीची केस मुंबई न्यायालयात घेण्यात यावी याबाबत अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे. तर मुंबई औद्योगिक न्यायालय यांनी १७ ऑगस्टपर्यंत नाशिक औद्योगिक न्यायालयाने कामकाज बंद ठेवण्याबाबत सांगितले आहे.

उच्च न्यायालयात जाणार

नाशिक औद्योगिक न्यायालयाने कामकाज बंद ठेवण्याच्या मुंबई औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालावर 'सिटू'ने आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारे कामकाज बंद ठेवण्याचे कारण कायय्‍ असा प्रश्न करीत याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा पांडे यांनी दिला आहे. कंपनी व्यवस्थापन केवळ कामगारांना न्याय मिळू नये म्हणून दिरंगाई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रसंगी सिटूचे कामगारनेते डॉ. डी. एल. कराड, सिताराम ठोंबरे, श्रीधर देशपांडे, अॅड. वसुधा कराड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाज्यांच्या दरात घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने सध्या शहरात जोर धरला असल्याने भाज्यांचे दर घसरले आहेत. पालेभाज्यांना मागणी कमी झाल्याने १० ते २० रुपयांना मेथी, शेपू या भाज्या सहज उपलब्ध होत आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक प्रचंड वाढल्याने दरात घसरण आली आहे. वातावरणाच्या बदलामुळे कांद्यावर मात्र परिणाम झाला असून, त्याच्या दरातही वाढ झाली आहे. प्रतिकिलोमागे कांद्याचा दर १२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलवर गेला आहे. तर डाळिंब १५०० ते २००० प्रति क्रेट, मेथी १२०० ते १५०० रुपये प्रतिशेकडा, कोथिंबीर ५०० ते २००० रुपये प्रतिशेकडा यांप्रमाणे मिळत असून यांचे दर कमी झाले आहेत.

येत्या पंधरा दिवसात भाव काही प्रमाणात पुन्हा वाढण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही वाढ होणार नाही. त्यामुळे आहे त्या दरात थोडेफार बदल होत राहतील, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव प्रकाश घोलप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनधारकांचा सुटतोय संयम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंनगर येथील अंडरपास सुरू करण्याऐवजी पोलिसांकडून कार्यवाहीचे कागदी घोडे नाचविले जाऊ लागल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. वाहतूक पोलिस नजरेआड होताच अंडरपासजवळील अडथळे दूर करून वाहनधारकांनी तेथूनच ये-जा करण्यास सुरूवात केली आहे.

स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेताच गोविंदनगर अंडरपास वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. विविध पध्दतीने त्यास विरोध दर्शविला जात आहे. काही नागरिकांनी पोलिसांनी उपलब्ध करून दिलेले अर्ज भरून दिले आहेत. तर इंदिरानगरमधील नागरिकांनी स्वाक्षऱ्यांची मोहीम हाती घेतली आहे. यात नागरिक सहभाग नोंदवत आहेत. या बदलाबाबत सात दिवसांच्या आत पोलिस आयुक्तालयात हरकती आणि सूचना नोंदवाव्यात असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तर नगरसेवक दिपाली कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्यालयातच सूचना हरकती स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे या सर्व पातळीवर बदल केले जात असले तरी त्यामुळे फेरा कमी होईल का? याची चिंता वाहनधारकांना सतावत आहे. त्यांचा संयम सूटत असून अंडरपास बंद करण्यासाठी वापरलेले दुभाजकाचे कठडे बाजूला करून नागरिक रात्रीच्या वेळी तेथूनच ये-जा करू लागले आहेत. दरम्यान, परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली जावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालकांकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक पोलिसांकडून सुरू असलेल्या तयारीची पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली. रामकुंड येथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, याची माहिती दयाळ यांनी देण्यात आली.

सिंहस्थानिमित्त पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दयाळ नाशिकमध्ये आले होते. पोलिस आयुक्तालयात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सीसीटीव्हींच्या नियंत्रण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे आणि अन्य अधिकाऱ्यांसह त्यांनी रामकुंड परिसराला भेट दिली. तेथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही, वस्त्रांतरगृहाची यावेळी त्यांनी पाहणी केली.

रामकुंड, गांधी तलावावरील गर्दीचे नियंत्रण शाही मिरवणूकीच्या नव्या आणि जुन्या मार्गांची त्यांना माहिती देण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले बॅरीके‌डिंग, परिसरातील नो व्हेईकल झोन आदींबाबतही दयाळ यांनी माहिती घेतली. जगन्नाथनपुरी येथे घडलेल्या दुर्देवी घटेनंनतर आमच्या अधिकारी एन. अंबिका यांनी तेथील पाहणी केली. त्यांनी काही सूचना केल्या असून, त्यानुसार काही बदल करण्यात येणार असल्याचे दयाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ आयोजनाला आगम खेडाची मात्रा

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

साधुग्राममधील जागांचा घोळ अजूनही सुरूच आहे. जागांचे, सुविधांचे वाद कुंभमेळ्याच्या आयोजनाला जुळलेले असतात. यापार्श्वभूमीवर वैदिक शास्त्रावर आधारित 'आगम खेडा प्रशासना'ची स्थापना झाल्यास प्रशासनाच्या टोलवाटोलवीला पायबंद बसण्याची शक्यता आहे.

वैदीक धर्मात प्राचीन काळात 'आगम खेडा प्रशासन' ही संकल्पना होती. यात सर्व व्यवहारांना धर्माकडून बंधने घालण्यात आलेली होती. समाजातील नागरिकांच्या कर्तव्यानुसाराच समाजाची रचना असल्याने अनाचार आणि व्याभिचाराला जागा नव्हती. भारतात सध्या लोकशाही नांदते. लोकशाहीची रचना तकलादू असल्याने अनाचाराने कळस गाठला आहे. यापार्श्वभूमीवर आगम खेडा प्रशासन ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते.

किमान हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन आणि नाशिक या कुंभमेळा आयोज‌ति होणाऱ्या चार शहरांमध्ये 'आगम खेडा प्रशासन' ही संकल्पाना व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या दबंगगुरू टायगर स्वामी यांनी स्पष्ट केले. जर्मनीतून वैदिक शास्त्रावर पीएच.डी केलेल्या आणि सध्या साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या टायगर स्वामी यांना साधुग्राम ही संकल्पनाच मान्य नाही. प्राचिन काळापासून होत गेलेल्या परकीय आक्रमणांमुळे वैदीक धर्माची ओळखच बदलली. ती प्राचीन नव्याने करून देण्याची सुरूवात आगम खेडा प्रशासनापासून होणार असल्याचा दावा, टायगर स्वामींनी केला. प्राचीन वेदांमध्ये आगम खेडा प्रशासनाचा उल्लेख असून आगम म्हणजे प्रथम तर खेडा म्हणजे शेत असा त्याचा अर्थ होतो, असे टायगर स्वामींनी स्पष्ट केले.

आजही साधु महंत साधुग्रामचा 'खेत' म्हणूनच उल्लेख करतात. धन, नदी, शस्त्र यासारख्या दैंनदिन बाबींचा वापर कसा करावा, याचेही सुत्र या प्रशासनात बांधले जाते. वैदीक धर्म पध्दतीत शिक्षणाच्या अनेक शाखा असून वैदीक गणित पध्दती त्यातील एक छोटासा भाग आहे. वैदीक धर्म पध्दतीचा प्रसार करण्यासाठी आगम खेडा प्रशासनाचा उपयोग होईल, असा दावा त्यांनी केला.

संवाद ददाती ईति नारदः

मोबाइलचा शोध अलीकडे लागला. मात्र, सनातन वैदीक पध्दतीमध्ये हा प्रकार फार जुना असल्याचा दावा टायगर स्वामींनी केला. 'सुदूर नर नारायाणाम संवाद ददाति ईति संवाद:' हा श्लोक मोबाइल या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. दूरवरून संवाद साधण्याची कला प्राचीन होती. मात्र, परकीय आक्रमणांमध्ये हे दस्ताऐवज लोप पावले. महाभारतात शेवटच्या पर्वांत मोसल हा शब्द येतो. ऋषी मोसल यांचा तो उल्लेख असून त्यांनीच मिसाईलचा शोध लावला होता. पाश्चात्यांच्या हातात ऋषी मोसल यांनी लावलेला अनमोल शोध सापडला आणि त्यांनी मिसाईलचा शोध लागल्याचा दावा केला. याबरोबर, लोहपथ गमाव्रत (रेल्वे), आमृश्या (कम्प्युटर), विमान हे शब्द आणि त्यांचे शोध वैदिक धर्मातील वैज्ञानिकांनी हजारो वर्षापूर्वी लावल्याचे टायगर स्वामी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यांऐवजी मंडळांचे ‘भाविक देव भव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या शेवटच्या पर्वणीपूर्वीच श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार असल्याने यंदा नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार गणेश मंडळांनी व्यक्त केला आहे. सिंहस्थात येणाऱ्या भाविकांसाठी मदत केंद्र किंवा तत्सम सामाजिक उपक्रम राबवित गणेशाची पूजा बांधण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे.

सिंहस्थ काळातील महत्त्वाच्या तीन शाही पर्वण्यांपैकी तिसरी पर्वणी १८ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी (१७ सप्टेंबरला) गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, श्री गणेशाची ठिकठिकाणी विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शहरात आठशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मात्र यंदा सिंहस्थ काळातच हा उत्सव होत असल्याने तो साजरा करण्यावर पोलिसांनी अनेक मर्यादा आणल्या आहेत. सिंहस्थातील एका पर्वणीला देशभरातून सुमारे एक कोटी भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या भाविकांची व्यवस्था करण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. बहुतांश रस्त्यांवर भाविकांचीच गर्दी राहणार असल्याने शहरातील अनेक रस्ते नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ज्या रस्त्यांवर वाहनही उतरू शकत नाही, तेथे गणेशोत्सवाचा मांडव उभारण्याची आशा गणेश मंडळाना धुसर वाटू लागली आहे. अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवातील देखाव्यांवर अधिक खर्च करण्याऐवजी भाविकांना सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नदान, पाणीवाटप, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था, चहा, नाष्टा, औषधे वाटप मदतकेंद्र यांसारख्या माध्यमातून सेवा देण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. तर काही मंडळांनी गणेशोत्सव दरवर्षीपेक्षा यंदा छोट्या स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे आम्ही यंदा अत्यंत साध्या पध्दतीने उत्सव साजरा करणार असल्याचे मुठे गल्ली मित्र मंडळाचे रोहन मुठे यांनी सांगितले.

पोलिसांचा मंडळांशी समन्वय

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. काही पोलिस स्टेशन्सने मंडळांच्या बैठका घेऊन यंदा मांडव टाकण्याबरोबरच डीजेच्या वापरावरही बऱ्याच मर्यादा असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पंचवटी, सरकारवाडा पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिश: संपर्क साधून गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे.

मंडपामुळे रस्ता अधिक व्यापला जाऊन सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना अडथळा होईल. म्हणून आम्ही मंडपाचा आकार खूपच मर्यादीत ठेवणार आहोत. उर्वरीत जागेत भाविकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे विचाराधीन आहे. मंडपाबाहेर भाविकांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक फलक लावणार आहोत.

- सत्यम खंडाळे, मानाचा राजा अशोकस्तंभ मंडळ

आमचे मंडळ रामकुंडाजवळ असल्याने यंदा मंडप उभारूच शकत नाही. आम्ही देखाव्याऐवजी मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच सायकल वाटप, चष्मे वाटप, अनाथालयांना आर्थिक मदतीचे वाटप करणार आहोत. भाविकांसाठी आमचे मदत आणि मार्गदर्शन केंद्र असेल. भाविकांना पिण्याचे शुध्द ‌पाणी उपलब्ध करून देणार आहोत.

- विकी भोरे, सरदार चौक मित्रमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images