Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बंद अंडरपासमुळे कसरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील अंडरपास बंद केल्यामुळे सध्या स्कूल बसचालक आणि रिक्षाचालकांकडून सर्वाधिक नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. नेहमीच्या मार्गातील अंतर वाढल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करतेवेळी ‍वेळेचे गणित पाळताना स्कूल बसचालकांना कसरत करावी लागत आहे. अंडरपासमधून वाहतूक बंदचा निर्णय पोलिसांनी अंमलात आणल्यापासून त्यास विरोध होऊ लागला आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या नव्हे तर कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

परंतु, हजारोंच्या संख्येने वाहनधारक येथून ये-जा करीत असले तरी पोलिसांनी केवळ २०० अर्ज उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांकडे हे अर्ज असतानाही त्याबाबत वाहनधारकांना माहीतच नव्हते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अंडरपासच्या परिसरात धाव घेऊन विचारणा केली तेव्हा पोलिसांनी हे अर्ज काढून दिले. परिसरातील रहिवाशांकडून अर्ज भरून आणण्याची तसेच अर्ज कमी पडल्यास त्याच्या झेरॉक्स काढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शविली. परंतु, येथेच अर्ज भरून द्या आणि अर्जांच्या झेरॉक्स काढू नका असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने वाहनधारकांना थांबवून अर्ज भरून घेण्यात आले.

आज पुन्हा अर्ज भरणार

शनिवारी पुन्हा अर्जांचे वाटप करण्यात आले. हे अर्ज भरून द्या, असे सूचनाफलक वाहनधारकांच्या माहितीसाठी रविवारी अंडरपासजवळ लावण्यात येणार आहेत. यामुळे अर्ज घेण्यासाठी वाहनधारकांनी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावीरच्या स्कॉलर विद्यार्थ्यांना ट्यूशन फी होणार माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून शिक्षण घेऊ इच्छ‌िणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात बाधा येऊ नये यासाठी महावीर पॉलिटेक्नीक कॉलेजतर्फे शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डेव्हलपमेंटल फीच्या रूपाने तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन फीच्या रूपाने हे शुल्क माफ करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. कॅप प्रवेशाच्या दुसऱ्या फेरींतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू असणार आहे.

२१ जूलै ते २४ जुलै दरम्यान दुसऱ्या फेरीचे अर्ज ऑनलाइन भरले जाणार आहेत. दुसऱ्या फेरीतून कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी डेव्हलपमेंट फी तर आर्थिक दुर्बल घटकांतील ८१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के ट्युशन फी माफ केली जाईल. हरीश संघवी गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत ही योजना राबविण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना ७१ ते ८० टक्क्यांदरम्यान गुण असतील अशा विद्यार्थ्यांना १५ टक्के ट्युशन फी शिष्यवृत्तींतर्गत माफ केली जाणार आहे, अशी माहिती महावीर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिष संघवी यांनी दिली. संस्थेला १६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतल्यानंतर द्यावे लागणारे प्रथम वर्षाचे अतिरिक्त यंदापासून द्यावे लागणार नाहीत. परिणामी आयटीआय, एमसीव्हीसी , १२ वी सायन्स पास विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनमध्ये द्वितीय वर्ष प्रवेश घेण्यासाठी अधिकाधिक संधी असल्याचे विद्यार्थी प्रवेश समितीचे प्रमुख प्रमोद कांकरिया यांनी सांगितले.

१५ विद्यार्थ्यांची 'ग्लॅक्सो'त निवड

महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलिटेक्निक व महावीर इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या दोन्ही कॉलेजमध्ये डिप्लोमा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर नुकतेच ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन फार्मास्युटीकल लिमिटेड यांनी विविध पदांसाठी इंटरव्ह्यु घेण्यात आल्या. ६० विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता त्यापैकी १५ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली.

कॅम्पस इंटरव्ह्युची सुरुवात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरणाने माहिती करुन देत केली. लेखी परीक्षा घेऊन त्यात पास झालेल्या विद्यार्थ्यांना चार गटात विभागून त्यांना व्यवस्थापक गटांशी चर्चा करण्याची संधी देण्यात आली. लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन आणि शेवटी एचआर इंटरव्ह्यु घेण्यात आले. ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन फार्मास्युटीकल लिमिटेडच्या सहाय्यक व्यवस्थापक एस. जी. दामले यांच्याकडून अंतिम यादी निवडण्यात आली. महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य मनोज बुरड, महावीर इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे प्राचार्य अजय देशपांडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या अनघा सर्वज्ञ इत्यादी उपस्थित होते.

फार्मसी कॉलेजच्या दीपक थोरात व वैभव पोटींदे या विद्यार्थ्यांची निवड झाली. तर पॉलिटेक्निकमधील पंकज घोलप, प्रतिक दळवी, राहुल कुलथे, या द्वितीय सत्र पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची, शुभम जाधव, प्रशांत खैरे या प्रथम सत्र पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मॅकेनिकल इंजिनीअरिंग विभागातून मोमीन खाटिक, भगवान वाघ, किरण शिरसाठ, कुंदन तायडे, सिताराम चौधरी, ऋषिकेश नाठे, गणेश गायकवाड, किरण बागुल या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची हेल्पलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासंदर्भात नागरिकांना विविध माहिती पुरवण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन किंवा कॉल सेंटर सुरू केले आहे. या हेल्पलाइनबाबत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी टि्वटर अकांउटवर माहिती दिली.

महापालिका सुरू करणार असलेली हेल्पलाइन २४ तास आणि सातही दिवस सुरू राहणार आहे. यासाठी महापालिकेने ८३९०३००३००, ०२५३-६६४२३०० किंवा २२२६१०० हे नंबर उपलब्ध करून दिले आहेत. हेल्पलाइनचे काम कॉल सेंटरच्या धर्तीवर चालणार असून, भाविकांना याठिकाणी कुंभमेळ्याशी संलग्न म्हणजेच भाविक मार्ग, बंद मार्ग, पर्वणीचे नियोजन, साधुग्राममधील रस्ते अशा विविध घटकांची माहिती मिळणार आहे. किंबहुना याठिकाणी नागरिकांनी काही तक्रारी केल्यास त्याचे निवारण देखील करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे.

कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी ही हेल्पलाइन उपयोगी पडणारी असून, याबाबत माहिती देणारे फ्लेक्स तसेच बोर्ड विविध ठिकाणी लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संध्याकाळच्या सुमारास हेल्पलाइन कार्या​न्वित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युनिअरच्या प्राध्यापकांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांना शासनाकडून डावलले जात असल्याच्या मुद्द्याहून प्राध्यापकांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. राज्यशासनाच्या भूमिकेविरोधात एकटाविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने राज्यभरात जिल्हा निहाय मोर्चांचे आयोजन केले आहे. नाशिकमध्येही २२ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध मागण्यांबाबत संघटनाही दोन वर्षांपासून आंदोलन करत आहे. फेब्रुवारी २०१३ आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. यानंतर शासनाने प्राधान्याच्या मागण्या डावलत उर्वरीत मागण्यांची पूर्तता काढून वेळकाढूपणा केला होता. यामुळे आंदोलनाची धार पुन्हा तीव्र करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन संघाच्या वतीने काही दिवसांपूर्वी राज्यभर धरणे आंदोलनही पार पडले होते. याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

२०१४-१५ ची संचमान्यता पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन करण्यात यावी, यापुढे ऑनलाइन संचमान्यतेतील त्रुटी मान्य करुन पूर्वीच्या निकषांनुसारच संचमान्यता करण्यात यावी, २००७ ते २०११ पर्यंतच्या वाढीव पदांना मंजूर पदांचे वेतन देण्यात यावे, २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना त्वरीत मान्यता मिळावी, माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या शिक्षक पदांना अनुदान देऊन त्वरीत मान्यता द्यावी, तुकडी टिकविण्याचे निकष शिथील करावे, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करण्यात यावे, कायम विनाअनुदानित तत्वावरील मुल्यांकनास पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना अनुदान द्यावे आदी मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी पुढील टप्प्यात आंदोलनाची भूमीका तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रा.संजय शिंदे आणि प्रा. अनिल महाजन यांच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉरेन स्कॉलरशीपची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छ‌िणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील टप्प्यात अल्पावधीच शिल्लक आहे. ३१ जुलैपर्यंत यासाठी विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडे अर्ज करता येणार असल्याची माहिती समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

२०१५-१६ शैक्षणिक वर्षाकरता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले गेले आहेत. सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे यांनी केले आहे. या संदर्भातील आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, ३, चर्च रोड, पुणे - ४१११००१ या पत्त्यावर ३१ जुलैपर्यंत पोहोचतील या पध्दतीने पाठवावेत.

पात्रता व निकष असे

विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांतील असावा, संबंधित विद्यार्थ्यांनी परदेशातील नामांकित विद्यापीठातील वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेला असावा, अर्जदार विद्यार्थ्यांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे, फक्त पी.एचडीच्या विद्यार्थ्यांसाठी वयाची मर्यादा ४० वर्षांपर्यत असणार आहे, अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक आणि कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० मध्ये असणाऱ्या विद्यापीठामध्ये तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा लागू राहणार नाही.

शैक्षणिक पात्रता

पीएचडी अभ्यासक्रमासाठी संबंधित विषयाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये प्रथम प्रयत्नात किमान ५५ टक्के गुण आवश्यक राहतील. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित विषयाच्या पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात किमान ६० गुण आवश्यक असतील, पद्व्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात सप्टेंबर २०१५ किंवा जानेवारी २०१६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज या शिष्यवृत्तीसाठी विचारात घेण्यात येतील.

विद्यापीठ रँकिंग

ज्या विद्यापीठाचे जागतिक रँकिंग ३०० च्या आत आहे असेल अशा विद्यापीठात प्रवेश घेतल्यास ते विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. वार्षिक नऊ हजार पौंड तर अमेरिका व इतर देशांमधील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी वार्षिक १४ हजार यूएस डॉलर्स शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घड्याळानेच सोडली ‘NCP’ची साथ !

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

'घर फिरले की, घराचे वासेही फिरतात' याचा प्रत्यय सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक येथील राज्यातील एकमेव हायटेक संपर्क कार्यालयाकडे पाहिला की येतो. मोठा गाजावाजा करून उभे केलेल्या या हायटेक संपर्क कार्यालयाचे राष्ट्रवादीची सत्ता जाताच वासेच फिरले आहेत. नेते व पदाधिकाऱ्यांची वर्दळ कमी होताच, आता पक्षाचे चिन्ह आणि प्रतीक असलेल्या घडाळयानेही पक्षाची साथ सोडल्याचे चित्र आहे. संपर्क कार्यालयाबाहेर लावलेले दोन्ही घड्याळे सध्या गायब झाले असून, या चिन्हाकडे लक्ष द्यायला पदाधिकाऱ्यांनाही वेळ मिळत नसल्याने दिसते.

कोणत्याही पक्षाची ओळख ही त्या पक्षाच्या चिन्हावर ठरते. पक्षाचे हे चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पर्यायाचा वापर केला जातो. पोस्टर्स, प्रतीक, ठिकठिकाणी बॅनर लावून ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवले जाते. पक्षाच्या कार्यालयावर तर, पक्षचिन्हाशिवाय कोणालाच स्थान दिले जात नाही. आपले चिन्ह नाशिककरांसह नाशिकवरून मुंबई, धुळेकडे जाणाऱ्यांना दिसावे यासाठी मुंबई नाक्यावर राष्ट्रवादीने सत्तेत असताना हायटेक अशा चार मजली कार्यालयाची उभारणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या हायटेक कार्यालयाचे कौतुक करत, त्याला आयएसओ प्रमाणपत्रही मिळवून दिले. सोबतच तत्काल‌ीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्याची पाठ थोपटली होती. मात्र लोकसभेपाठोपाठ विधानसभेत राष्ट्रवादीचे पानीपत होताच, या हायटेक कार्यालयाचीही दुरवस्था झाली आहे. कार्यालयाबाहेर लावलेल्या घड्याळाच्या तीन चिन्हांपैकी दोन चिन्ह गायब झाली आहेत. विशेष म्हणजे प्रवेशद्वारावर असलेले घड्याळाचे चिन्ह चक्क चोरीलाच गेले आहे. तर, इमारतीवरील एक चिन्ह निकृष्ट कामामुळे पडून गेले आहे. त्यामुळे आता घड्याळानेच राष्ट्रवादीची साथ सोडल्याची चर्चा सुरू आहे.

नेहमीच असतो शुकशुकाट

कधीकाळी दिवसभर गर्दी असलेल्या या कार्यालयामध्ये सध्या कायम शुकशुकाट पहायला मिळतो आहे. विधानसभेत दारून पराभव झाल्यानंतर नाशिकमधीलच हेवीवेट पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयापासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे कार्यकर्तेच फिरकत नसल्याचे चित्र आहे. राज्यस्तरावरील पदाधिकारी किंवा मोठा नेता आला तरच, राष्ट्रवादीचे कार्यालय गजबते. शहराचे पदाधिकारी तर कार्यालयाकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे 'सत्तेपुढे शहाणपण नसते' याचा प्रत्यय हे हायटेक कार्यालय घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत शिक्षकांचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील शाळांमध्ये ४४ शिक्षकांची रिक्तपदे असून, यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन केवळ एक महिना झाला आहे. ज्या काळात अभ्यासक्रमांची ओळख करुन घेणे, परीक्षांचे स्वरुप जाणून घेणे, या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असतात. त्याच काळात शिक्षकांच्या तुटवड्यापायी विद्यार्थ्यांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२३ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ९२१ शिक्षकांची पदे मंजूर असताना चार वर्षांपासून केवळ ८७७ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदांमध्ये २२ प्राथमिक १४ पदवीधर व ७ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. आंब्याची वाडी धारगाव, पिंप्री, परदेश वाडी, राहुलनगर, राजवाडा, पेहरेवाडी, शिरसाठे, कुरे गाव, गोंदे, वाडीवर्हे, मुंडेगाव आदी गावांमध्ये उपशिक्षकांची गरज आहे. वाळेविहीर, आहुर्ली, घोटी १/२ बाहुली, खुर्द, त्रिंगल वाडी, आधारवड नांदगाव, बेलगाव तराळे, भरवीर बुद्रुक, इगतपुरी बारशिगवे, सांजेगाव, कावनई या ठिकाणी परवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तर बोरटेंबे धामनगाव आदी गावांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, यासाठी शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांना निवेदन देण्यात आले आहे. येथीलच मुरंबी या शाळेसाठी डिसेंबर २०१४ मध्ये दोन शिक्षकांची मागणी करण्यात आली होती. परंतु शिक्षक मिळाला नाही. या मागणीचा लवकरात लवकर विचार केला गेला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीआरमधून व्हावी जीएसची निवड

$
0
0

कॉलेज प्रतिनिधी म्हणजेच जीएस निवडणूक पुन्हा मतदान तत्त्वावर घेणार असल्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव प्रलंबित आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन गेल्या वीस वर्षांपूर्वी बंद केलेल्या जीएस निवडणुकांचे पडघम कॉलेज कॅम्पसमध्ये गुंजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या विद्यार्थी सेनांची याला अनुमती असली, तरी या धोरणावर तरुणाईच नेमकं काय मत हे जाणून घेण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे एचपीटी आरवायके कॉलेजमध्ये 'मटा डिबेट'चे आयोजन करण्यात आले होते. यात कॉलेजियन्सच्या हक्काचा विद्यार्थी प्रतिनिधी जीएसची निवडणूक मतदान तत्त्वावर व्हावी का? त्याच्या अटीशर्ती काय असाव्यात? प्रचार, आचारसंहिता कशी असावी? एकूणच निवडणूक तरुणाईच्या दृष्टिकोनातून कशी असावी यावर कॉलेजियन्सचे मत जाणून घेण्यात आले.

निवडणूक व्हायलाच हवी

बऱ्याचदा जीएस कोण हेच माहीत नसतं. निवडणुकीनेच जीएसची निवड करावी. उमेदवार योग्य आहे की नाही यासाठी अगोदर एक कॅम्पेन घेण्यात यावे. त्यात त्याने कॉलेजियन्स समोर स्वत:चे व्यक्तिगत गुण सादर करावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर दिल्लीपर्यंत निवडणुका होत असतील तर भारताची शान अन् मान असणाऱ्या तरुणांच्या प्रतिनिधीसाठीही निवडणूक व्हायलाच हवी.

- भक्ती आठवले, एसवाय, राज्यशास्त्र

सीआरमधून निवडा जीएस

जीएस निवडणूक वीस वर्षांनंतर पुन्हा घ्यायची असा सरकारचा प्रस्ताव आहे. वीस वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. सध्याची तरुणाई ही सोशल युगाकडे वाटाचाल करणारी असली तरी कोणत्याही घटनेचा वास्तव्याशी संबंध जोडण्यात येऊ शकतो. सिनेमांचा प्रभाव हा कट्ट्यावर नेहमीच अनुभवायला मिळतो. सिनेस्टाइल हाणामाऱ्या नेहमीच कॉलेजात होत असतात. याचा प्रभाव निवडणुकांमध्ये दिसू शकतोच. सीआर मतदान पद्धतीने निवडल्यास कमी उमेदवार असल्याने मतांतर व मतभेद कमीच असतील.

- विवेक चित्ते, जर्मन भाषा विभाग

नियमांची गरज

जीएस निवडणुकीतही काही नियम असावेत. उमेदवार व व्होटर्स यांनी विद्यार्थी दशा जपत ही निवडणूक घेतल्यास उत्कृष्ट विद्यार्थी

नेता निवडून देण्यास मदत होईल. जीएस निवडणुकीत सर्वांना संधी दिली जावी. तरुणाईला मतदानाचा अधिकार असल्याने कॉलेजस्तरावर व्होट करायला मिळाल्यास आनंद द्विगुणीत असेलच. आपल्यातील गुण व लीडरशीप जोपासता येईल.

- गौरी जाधव, एसवाय, कॉम्प्युटर सायन्स.

राजकीय हस्तक्षेप नको

जीएस निवडणुकीत राजकीय विद्यार्थी संघटनांचा समावेश नसावा. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीची निवड त्यांनी करू द्यावी. अर्थातच यात छुपा पाठिंबा दिला जाईलच यात शंका नाही. परंतु, कॉलेज कॅम्पस यामुळे दूषित होऊ नये. यासाठी प्रत्येक इयरचा सीआर मतदान पध्दतीने विद्यार्थ्यांना निवडू द्यावा. यामुळे जास्त उमेदवारांचे मतभेद जाणवणार नाहीत व इलेक्शन सुरळीत पार पडेल.

- निखील पाटील, एसवाय, राज्यशास्त्र

स्कॉलर पध्दत बदलावी

कॉलेजमध्ये जीएसपदासाठी इलेक्शन व्हावे याची उत्कंठा अनेक वर्षांपासून आहे. दरवर्षी अनेक अफवांचे वारे कॉलेजमध्ये वाहत आहेत. स्कॉलर तत्त्वावर जीएस निवड केली जात असल्याने विद्यार्थ्यांनाच विद्यार्थी प्रतिनिधी कोण? समस्या मांडायच्या तरी कुठे असा संभ्रम असायचा. अनेकदा काहींना जीएस व्हायची इच्छा असून, ते होऊ शकत नव्हते. या इलेक्शनमुळे सर्वांना समान संधी मिळेल. जीएस निवडणुकीत होणारे वाद टाळण्यासाठी सीआरची निवड करून त्यातून जीएसची निवड करावी.

- निखील गुरव, बीए, इतिहास

हक्काचा नेता मिळेल

तरुणाई जर देशाचा पंतप्रधान निवडू शकते, तर कॉलेजचा प्रतिनिधी त्यांनीच निवडायला हवा. यासाठी जीएस इलेक्शन व्हायलाच हवे. फस्ट क्लास पास झालेल्या सर्व इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरू द्यावेत. इतर काही समस्यांचे पांघरूण घालत अटीशर्ती लावल्या तरी सरकारी इलेक्शमध्ये वोटर्स मॅनेज होणं, कुरघोडी करणं हे घडतचं ते इथेही घडेल एवढंच. इलेक्शनचे पडसाद कसेही उमटू देत पण, विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा नेता मिळेल.

- आशिष कुलकर्णी, एसवाय, राज्यशास्त्र

सर्वांना संधी मिळावी

जीएस हा विद्यार्थी प्रतिनिधी असतो. फक्त पुस्तकी ज्ञान असणाऱ्यांना यात संधी नसावी. सामाजिक दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्व, कम्युनिकेश स्किल्स याचाही विचार उमेदवार निवडतांना व्हावा. मतदान पध्दतीवर निवडणूक घेतल्यास सर्वांनाच आपला प्रतिनिधी निवडता येईल. जीएसची निवड ही विद्यार्थी संमतीनेच व्हायला हवी.

- पूर्वा गोडबोले, एसवाय, कॉम्प्युटर सायन्स

मतदानानेच निवड करावी

मेरिट पातळीवर जीएस इलेक्शन घेतले जाते. यामध्येही अनेकदा जीएस होण्यासाठी ही स्कॉलर मंडळी आमिष दाखवत सीआर्स मॅनेज करतात. मग, त्यांचा जीएसपदाचा फायदाच काय? ते तर राजकारण्यांहून बेहत्तर फक्त गुणगौरव आणि डेज् मध्येच कॉलेजियन्स समोर येतात. असे असेल तर आमचा नेता आम्हाला निवडू द्यावा. सध्याची तरुणाई प्रॅक्टीकल आहे. निवडणुकींना काही ठराविक बंधने घालत जीएस निवडणूक मतदान तत्त्वावरच घेणे योग्य असेल.

- चेतन लिंडाईत, टीवाय, बायोटेक

खबरदारी पाळावी

जीएस इलेक्शनमध्ये उमेदवार व कार्यकर्ते यांची मानसिकता जपणे महत्त्वाचे आहे. अर्थातच विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हक्कानेच निवडायला हवा. उमेदवारानेही आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्याकडून वा कार्यकर्त्यांकडून त्रास होणार नाही याची खबरदारी पाळावी. जीएस निवडणुकांचे पडघम वाजायलाच हवे. कॅम्पसमध्ये मानसिकतेच्या जोरावर आपला प्रतिनिधी निवडण्यासाठीची बौध्दिक क्षमता विद्यार्थी व्होटर्सची देखील वाढेल.

- क्लिंटन डी'सूझा, एसवाय, मानसशास्त्र

नेतृत्व विद्यार्थी हिताचे असावे

मेरिट पातळीवरच्या जीएसला प्रातिनिधीक स्तरावरचे ज्ञान नसतं. पुस्तकी चाकोरीबाहेरील ज्ञान हे अनेकांची जमेची बाजू असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना संधी मिळायलाच हवी. देश चालवणारी अनेक नेतेमंडळी खोट्या डिर्गींवर शिक्षण मंत्रीपद घेतात तर, एखादा अभ्यासात कमी पण नेतृत्व व विद्यार्थी हितात अग्रेसर असेल तर त्याला संधी द्यायलाच हवी. जीएस इलेक्शन पुन्हा मतदान पध्दतीवरच व्हायला हवे.

- सुनील भोसले, एसवाय,अर्थशास्त्र

चर्चेतील लक्षवेधी मुद्दे

जीएस निवडणूक ही सर्व विद्यार्थ्यांचे मतदान घेऊनच व्हायला हवी.जीएस निवडणुकीच्या उमेदवारांना अटीशर्ती असाव्यात, स्कॉलर तत्त्वावर निवडणूक नसली तरी उमेदवार शैक्षणिक मूल्यांसमवेत इतरही गोष्टींमध्ये अग्रेसर असावा.साठ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास उमेदवारी अर्ज देण्यात यावा.भारतीय संविधानात सर्वांनाच मतदानाचा हक्क बहाल केला गेला आहे. कॉलेज पातळीवर पुन्हा जीएस निवडणुका घेतल्यास मतदानाचा टक्काही वाढेल.जीएस निवडणुकीदरम्यान कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचार करण्याऐवजी लेक्चर्स संपतांना फक्त उमेदवारानेच म्हणणे मांडावे.राजकीय पक्षांचा या जीएस निवडणुकीत सहभाग नसावा.उमेदवार व कार्यकर्ते यांनी आपली मानसिकता सांभाळत विद्यार्थी दशेत असल्याचे भान राखत वीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळावी. याची जबाबदारी सर्वस्वी कॉलेजियन्सनेच घ्यावी. उगीच सरकार वा विद्यापीठास दोषी ठरवू नये.जीएस निवडणुकीतही आचारसंहिता असावी.जीएसची निवड करताना अनेक उमेदवार अर्ज करतील. यात मतभेद, राजकारण अनेक फाटे फुटून कदाचित भांडणे होऊ शकतात. त्याऐवजी त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मत घेत सीआरची निवड करावी. त्या सीआरमधून मग जीएसची निवड करणे योग्य ठरेल.शाळेचा मॉनिटर जसा ऑन दि स्पॉट निवडला जातो तसाच जर सीआरही निवडला गेला तर, प्रचार, आचारसंहिता वगैरे कसलीच गरज भासणार नाही.जीएस हा निवडणूक पध्दतीने असो वा स्कॉलर तत्त्वावर... कॉलेज इव्हेंट, कल्चरल मिटिंग्ज्, गुणगौरव समारंभ याखेरीज तो कुठेही कॉलेजियन्यसच्या समोर येत नसतो. मग, ही निवडणूक वगैरे घेणे व्यर्थ वाटते.जीएस निवडणूक व्हावी असे असले तरी कुठे ना कुठे कॉलेज स्तरावर राजकारणाचा शिरकाव होणारच. कॉलेजचा वेळ, प्रशासन इतर विद्यार्थी यासाठी हा सगळा कालावधी परिणामकारक ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवडाभरात रेल्वे सुरळीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भुसावळ

आठवडाभरात सर्व रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावतील, असे आश्वासन डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांना दिले. रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस एकत्रितपणे भुसावळ रेल्वे स्टेशनची सुरक्षाव्यवस्था हाताळणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण नाशिक येथे नुकतेच झाले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्याचे लोहमार्ग पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी शुक्रवारी डीआरएम, रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.

कुंभमेळ्यानिमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नाशिक रोड रेल्वे स्टेशननंतर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी भुसावळ रेल्वे स्टेशनवर होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने व व्यवस्थापनासाठी लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दल संयुक्तरीत्या सुरक्षेचे नियोजन करीत आहेत. त्या अनुषंगाने लोहमार्ग पोलिस अधीक्षक रोकडे यांचे सकाळी साडेनऊ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्यांनी भुसावळ रेल्वे स्टेशनची पाहणी केली. त्यांच्यासोबत लोहमार्ग पोलिस स्टेशनचे निरीक्षक आनंद महाजन यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक रोकडे यापूर्वी भुसावळला एसडीपीओ होते.

डीआरएम कार्यालयात डीआरएम गुप्ता यांच्यासोबत सकाळी अकरा वाजता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या वेळी डीआरएम कार्यालयातील अधिकारी, टेक्निकल विभागाचे अधिकारी व रेल्वे सुरक्षा बलाचे कमांडंट चंद्रमोहन मिश्र, पोलिस निरीक्षक विनोद लांजेवार उपस्थित होते. गर्दीचे व्यवस्थापन, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षेचे संयुक्त नियोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

इटारसी येथील सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली नसल्याने गाडयांचे वेळापत्रक कोलमडले आहे. आठ दिवसांमध्ये सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावतील, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची करा पाठराखण

$
0
0

येवल्यातील सभेत भुजबळांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्यातील शेतकरीविरोधी शासनाचा धिक्कार करण्यासाठी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचारांची पाठराखण करा. येवल्यातील निवडणुकीत प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, अशी साद राज्याचे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी घातली.

येवला कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी प्रणित प्रगती पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी झालेल्या जाहीर सभेत आमदार छगन भुजबळ बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले की, विधानसभेचे विद्यमान सभापती हरीभाऊ बागडे यांनी मांजरपाडा बोगद्याची पाहणी केली तरीही विरोधकांकडून कुठे आहे बोगदा? असे प्रश्न विचारले जात आहे. महाराष्ट्र पाणी आडवत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाणार असेल तर हरकत नाही. परंतु, त्याबाबत कोणताही लेखी करार करू नका व असा करार केला असेल तर तो फाडून टाका. महाराष्ट्राला उपाशी ठेऊन हे पाणी गुजरातला जाणार असेल तर विद्यमान शासनाच्या विरोधात न्यायालयाकडे दाद मागितली जाईल. शासनाच्‍या चुकीच्या धोरणामुळे या परिसराला भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भुजबळ यांनी व्यक्त केली.

दराडेंवर सडकून टीका

राजकारणात पैसा उपयोगी पडत नाही तर माणसे उपयोगी पडतात, त्यासाठी माणसे जोडावी लागतात.पण काही लोक पैशाच्या बळावर सर्व काही मिळते, अशा आविर्भावात वावरत आहेत. शब्दाला जागून ज्यांना लाल दिवा मिळवून दिला त्याच लाल दिव्याच्या गाडीचा वापर माझ्या विरोधात तिकीट मागण्यासाठी केला. तरीही या सगळ्या गोष्टी विसरून मुख्यमंत्री जिल्हा बँकेत भाजपाच चेअरमन करायचा या हट्टाला पेटलेले असतांना मी समीरला सांगून यांना जिल्हा बँकेचे चेअरमन केले. या गोष्टीला अजून महिनाही झाला नाही, तरीही हे विरोधी प्रचारात रमले आहेत, असे चिमटेही भुजबळांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फतव्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत

$
0
0

बिऱ्हाड आवरण्याची नोटीस; वसतिगृहासाठी ५० किलोमीटरची अट

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहात ५० किलोमीटरच्या आतील विद्यार्थांना प्रवेश बंद करण्याचा फतवा सहसंचालक व्यवसाय व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाने काढला आहे. यामुळे सद्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना वसतिगृहातून बिऱ्हाड आवरण्याची नोटीस बजावल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. यामुळे यंदा प्रवेश मिळालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना खासगी खोल्या पाहण्याची वेळ येणार आहे.

राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत. साधारणतः प्रत्येक तालुका मुख्यालयाचे अंतर हे पन्नास किमीच्या आत आहे. असे असताना आयटीआय प्रवेश प्रक्रियेबाबत सहसंचालक व्यवसाय व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्या आदेशान्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात ५० किलोमीटरच्या आतील विद्यार्थ्यांना प्रवेश बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. द्वितीय वर्षात जाणाऱ्या सर्व विद्यार्थांनी ३१ जुलैपर्यंत तत्काळ आपले सामान घेत वसतिगृह सोडण्याचे आदेश काढले आहेत. तर १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नवीन वसतिगृह प्रवेशात ५० किलोमीटरच्या बाहेरील फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची नोटीस लावली आहे. यामुळे स्थानिक तालुक्यातील विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने विद्यार्थ्यांनी आमदार नरहरी झिरवाळ यांची भेट घेत कैफियत मांडली. या निर्णयावर आमदार नरहरी झिरवाळ यांनीही आश्चर्य व्यक्त केले असून, सदर निर्णय मागे घेण्यास शासनाला भाग पाडू असे सांगितले. तसेच, कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही असे सांगितले. सदर आदेशाची अंमलबजावणी झाल्यास दिंडोरी तसेच पेठ, सुरगाणा, नाशिक, निफाड, चांदवड तालुक्यातील काही भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार नाही. तसेच दिंडोरी शहरास जोडणारी अनेक गावातून अद्याप बससेवा उपलब्ध नसल्याने अनेक आदिवासी विद्यार्थांना वसतिगृहाशिवाय शिक्षण घेणे शक्य नाही. यामुळे अनेक विद्यार्थांना प्रवेश मिळूनही शिक्षण घेता येणार नाही. मुळात प्रत्येक तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था असताना नेमका असा निर्णय कसा घेतला याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

तालुक्यातील विद्यार्थांना तालुक्यातच व्यवसाय शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात आयटीआय असून, साधारणत प्रत्येक तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हे पन्नास किलोमीटरपेक्षा कमी असल्याने या निर्णयाने तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. परिणामी आयटीआयला विद्यार्थीच मिळणार नाही व विद्यार्थ्यांना दुसऱ्या तालुक्यात प्रवेश घ्यावा लागेल. या निर्णयाचा फेरविचार करण्यास शासनाला भाग पाडू.

- नरहरी झिरवाळ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांवरील सही गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

खेळण्यातील बनावट नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची खरी सही छापली जात होती. मात्र, यासंदर्भातील बातमी 'मटा'ने प्रसिद्ध केल्यानंतर नोटवरील खरी सही काढून टाकण्यात आली आहे. या नोटांवर आता कुणाचीही सही छापून येत नाही.

खाऊच्या दुकानातून सोरटच्या खेळण्यामधून चिमुकले मटका जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याचे वृत्त मटाने प्रसिध्द केले होते. या खेळामध्ये वापरल्या जात असलेल्या बनावट नोटांवर तत्कालीन आरबीआय गर्व्हनर विमल जालान यांची खरी सही छापून येत होती. चलनात असलेल्या खऱ्या नोटांवरील सही वरून ती आहे तशी कॉपी करण्यात आली होती. तसेच बनावट नोटांवर केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत असा मजकूर आणि अशोकस्तंभाची मुद्रा उमटविण्यात आली होती. सोरट सारखे जुगारी खेळ शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम करणारे ठरत आहेत.

खाऊ खेळण्यातून चुकीचे संस्कार रुजविले जात आहेत. यातून लहान मुलांना लहानपणीच मटका जुगाराची ओळख करून दिली जात आहे. त्यामुळे सोरट खेळच बंद करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. तसेच या नोटांवर आरबीआय गर्व्हनरची मूळ सही, वचन व अशोकस्तंभाची मोहर छापल्याबद्दल संबंधित उत्पादकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची देखील केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुंबलेल्या शौचालयामुळे विद्यार्थी हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरच्या अशोकनगर भागात असलेल्या मॉर्डन शाळेतील विद्यार्थी तुंबलेल्या शौचालयाने त्रस्त झाले आहेत. या प्रश्नी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेकडे तक्रारी केल्या आहेत. याकडे संस्थेच्या संचालक मंडळाने लक्ष घालण्याची मागणी पालक व विद्यार्थी यांच्याकडून केली जात आहे.

अशोकनगरला राज्य कर्मचारी वसाहतीला लागून मॉर्डन एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. तसेच तेथे सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची देखील शाळा आहे. सकाळ सायंकाळ अशा दोन सत्रात भरणाऱ्या या शाळेत तब्बल चार हजार विद्यार्थी शिकतात. परंतु, त्या तुलनेत शाळेमध्ये पुरेशे शौचालय नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत अहे. गेल्या आठवडाभरापासून शालेतील शौचालये तुंबलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या मधल्या सुटीत उघड्यावर प्रात:विधी आणि लघुशंकेसाठी जातात. यामध्ये सर्वाधिक त्रास मुलींना सहन करावा लागत आहे.

शौचालयाच्या दुरवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी पालकांकडे कैफियत मांडली. यानंतर काही पालकांनी एकत्र येत शाळेतील शौचालय त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे. या प्रश्नी शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच शौचालयाची दुरस्ती केली जाणार असल्याचे सांगितेल. मात्र, उघड्यावर लघुशंका किंवा प्रात:विधी केले जात असल्याने शाळा परिसरातील आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षकांसाठीच्या शौचालयास कुलुप

विद्यार्थ्यांसाठी असलेले शौचालय तुंबलेले असतांना दुसरीकडे मात्र शिक्षकांसाठी असलेल्या शौचालयास कुलुप लावण्यात आले आहे. यात ज्या शिक्षकाला लघुशंका ‌किंवा प्रात:विधीस जायचे असेल त्याला शाळेच्या शिपायाकडून चावी घ्यावी लागते. परंतु, हजारो विद्यार्थ्यांनी नादुरुस्त शौचालय असल्यावर जावयाचे कुठे असा प्रश्न संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.

मधल्या सुट्टीत लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहच उपलब्ध नाही. माझे घर शाळेजवळ असल्याने मी मधल्या सुट्टी घरीच जातो.

- प्रवीण सोनार, विद्यार्थी

दोन दिवसांपूर्वी प्रात:विधीला जाण्यासाठी मला तुंबलेल्या शौचालयात जावे लागणार होते. मात्र, मी ते टाळले. अखेर शाळेजव राहणाऱ्या मित्राच्या घरी गेलो.

- राकेश आहिरे, विद्यार्थी

अशोकनगर येथील मॉर्डन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यात मुलांना शौचालाय कमी पडत असल्याची कल्पना तेथील शिक्षकांनी दिली आहे. याबाबत शौचालयाची तत्काळ सफाई केले जाणार आहे. तसेच भविष्यात शौचालयाची संख्या देखील वाढविली जाणार आहे.

- डॉ. झुंबर भंदुरे, चेअरमन, मार्डन इंग्रजी माध्यम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेलिब्रिटीज्’ला भेटायचंय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणाऱ्या अलका कुबल तसेच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकलेले अरुण नलावडे व नवोदित अभिनेता भूषण पाटील या तिघांना भेटण्याची, त्यांच्या सोबत गप्पा मारण्याची संधी 'मटा'च्या माध्यमातून लवकरच एका भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे. ही संधी मिळवण्यासाठी आमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन भाग्यवान विजेता बनण्याचा मार्ग मिळेल.

टीव्ही, चित्रपट किंवा सिरिअल्समध्ये ज्या अभिनेत्यांना आपण रोज बघतो त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे वास्तवातील आयुष्य, अनुभव हे जाणून घेणे स्मरणीय असते. हा अनुभव मिळेल, असे भाग्यवंतही थोडेच असतात. पण अशी संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे असते. या प्रयत्नांना मार्ग करून देण्यासाठी 'मटा'च्या 'मीट अँड ग्रीट विथ सेलेब'ची मदत घेता येणार असून त्यासाठी केवळ एका प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे आहे. यासाठी आमचा प्रश्न आहे, 'यापैकी अलका कुबल, अरुण नलावडे व भूषण पाटील या तिघांचा आगामी चित्रपट कोणता?' उत्तराचे पर्याय आहेत A. माहेरची साडी B. श्वास C. ओळख. उत्तर देण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या विंडोमध्ये टाइप करा MTNK स्पेस तुमचे नाव स्पेस उत्तराचा ऑप्शन आणि आजच पाठवा ५८८८८ वर. भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे या तिन्ही दिग्गज अभिनेत्यांना भेटायची संधी. कधी व कुठे भेटायचे हे विजेत्यांना फोन करून कळविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीडीएस’ परीक्षा नोव्हेंबरमध्ये

$
0
0

अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत; पूर्वतयारीसाठी योजना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूदल, हवाईदल आणि नौदल या सशस्त्र सैन्यदलांमध्ये करिअर करण्यासाठी घेण्यात येणारी सीडीएस (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हीस) ही परीक्षा यंदा १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत आहे. तर या परीक्षेसाठी इच्छुकांची तयारी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून करवून घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात केवळ महाराष्ट्रातील युवक आणि युवतींनाच प्रशिक्षित करण्यात येणार आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने (यूपीएससी) दरवर्षी संरक्षण दलामधील अधिकारी पदांसाठी 'कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस' म्हणजेच 'सीडीएस' ही परीक्षा घेण्यात येते. देशभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. या परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन महाराष्ट्रीयन उमेदवारांना मिळावे यासाठी नाशिकरोड येथे या मार्गदर्शन केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.

पूर्वपरीक्षेचे नियोजन

सीडीएस परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी नाशिकरोडच्या या केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. या केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा घेण्यात येईल आणि गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. या केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट घेऊन मूळ प्रमाणपत्रे, गुणपत्रिका यासह ३० जुलै रोजी नाशिकरोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. निवड झालेल्या उमेदवारांना ४ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर या कालावधीत परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाईल. अधिक माहितीसाठी केंद्राचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) दि. रा. गोडबोले यांच्याशी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड येथे समक्ष संपर्क करावा. परगावच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत (०२५३)-२४५१०३१ आणि २४५१०३२ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

परीक्षेचे अर्ज वेबसाइटवर

यंदाची सीडीएस परीक्षा १ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे. याबाबतची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर आणि एम्प्लॉयमेंट न्यूज, रोजगार समाचारमध्ये प्रकाशित झाली आहे. परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आयोगाला पोचण्याची मुदत १४ ऑगस्ट २०१५ ही आहे.

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये

केवळ महाराष्ट्रीय युवक युवतींनाच प्रवेश

प्रशिक्षण निवडीसाठी लेखी व तोंडी परीक्षा

लेखी व तोंडी परीक्षेची तारीख ३० जुलै

प्रशिक्षण कालावधी ४ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर

प्रशिक्षण पूर्णत: मोफत

प्रशिक्षणादरम्यान निवास, भोजनाची मोफत सोय

'सीडीएस' परीक्षेची तारीख १ नोव्हेंबर

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ ऑगस्ट

आयोगाची वेबसाइट www.upsconline.nic.in

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थामुळे व्यवसायवृद्धीची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

कुंभमेळा सुरू झाल्याने नाशिकमध्ये केवळ राज्यभरातूनच नव्हे तर परराज्य आणि परदेशातून भाविक गोदावरी घाटावर स्नान आणि दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. पर्यटकांच्या वाढलेल्या ओघामुळे गोदातिरी विविध छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये दाखल झालेल्या भाविकांची पहाटेपासून स्नान आणि इतर धार्मिक विधीसाठी गर्दी होत आहे. रामकुंडासह परिसरातील विविध मंदिरात देवदर्शनासाठी भाविक रांगा लावून दर्शन घेत आहेत आणि कुंभमेळा सोहळ्याचा आनंद घेत आहेत. भाविकांप्रमाणेच व्यावसायिकांसाठीही सिंहस्थ व्यवसायाची पर्वणी ठरत आहे. भाविकांची संख्या वाढल्यामुळे रामकुंड आणि गोदावरी काठावर व्यावसायिकांची गर्दी वाढू लागली आहे. अनेक लहान व मोठ्या दुकानदारांसाठी ही व्यवसाय वृद्धीची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच हातगाडी आणि आपल्या अंगाखांद्यावर विविध वस्तू विक्री करणारे विक्रेते दिसत आहेत. भाविकांकडूनही स्वस्तात मिळणाऱ्या या वस्तू खरेदी केल्या जात आहेत. फुगे, हार, कानातले, कंगन, चाट पाणीपुरी, खाद्यपदार्थ, मुखवटे, बासरी, खेळणी विक्री करणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे.

माझे वय ८२ वर्षे असून मी शेगांव वरून आलो. यापूर्वीही अनेकदा कुंभमेळ्यासाठी नाशिकला आलो पण यंदा झालेला बदल पाहून आनंद वाटला. भाविकांसाठी नाशिकमध्ये चांगली कामे झाली आहेत.

- दयाराम वाभ्रे, भाविक

अनेक वर्षापासून मी फोमच्या वस्तू विकतो. नाशिकला कुंभमेळा असल्यामुळे मी बिहारहून येथे आलो आहे. नागरिक चांगले सहकार्य करतात. मी वर्षभर राहून काम करणार आहे.

- मोहंमद रिजवान, विक्रेता

पोलिसांकडून भाविकांना मदत

रामकुंडावर भाविकांना मार्गदर्शन करतांना पोलिस दिसत आहेत. पोलिस आपला खरा विश्वासू दिशादर्शक असल्याचे अनेक भाविकांनी यावेळी सांगितले. विविध वस्तू विक्री करण्यासाठी लहान मुलेही आपल्या कुटुंबाला शाळा सुटल्यावर मदत करतांना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममधील पार्किंग ‘गायब’

$
0
0

पार्किंग प्लॅन तयार पण जागाच उपलब्ध नाही

अरविंद जाधव, नाशिक

सूक्ष्म नियोजनाचा ढिंढोरा पिटणाऱ्या प्रशासनाला चक्क साधुग्राममधील पार्किंगचा विसर पडला आहे. साधुग्रामसहीत साधुग्रामच्या आजुबाजुच्या परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच नसल्याने वाहतूक कोंडीसह इतर समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवणार आहेत.

साधुग्रामधील जागा वाटपावरून साधू-महंत आणि प्रशासनात ताणाताणी सुरूच आहे. एका-एका प्लॉटसाठी दररोज गरमागरम चर्चा झडत असून तब्बल ३२५ एकर जागाही साधुग्रामसाठी कमी पडत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. साधुग्राममध्ये ३ लाख २० हजार साधू-महंत दाखल होणार आहेत. यांच्यापैकी अवघ्या १० हजार साधू-महंतांनी चारचाकी वाहने आणली तर ती पार्क करायची कोठे? असा प्रश्न आता समोर आला आहे.

विशेष म्हणजे प्रशासनाने या वाहनांच्या पार्किंगचा कोणताही विचार केलाला नाही. याशिवाय भाविकांचा मोठा राबता साधुग्राममध्ये राहणार आहे. पर्वणीचा कालखंड वगळता साधुग्राममध्ये लाखो भाविक दररोज हजेरी लावणार आहेत. ही वाहने पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. किंबहुना तशी जागाही उपलब्ध असली तरी प्रशासनाने ती ताब्यात घेतलेली नाही. प्रशासनाने आपली सर्व ताकद पर्वणीच्या दिवसासाठी खर्च घातली आहे. पर्वणीच्या दिवशी अतंर्गत तसेच बाह्य वाहनतळांचा वापर केला जाणार आहे. मात्र, इतर दिवशी सर्व वाहने पंचवटी, साधुग्रामपर्यंत दाखल होतील.

या वाहनांना कोठे थांबवयाचे आणि त्यांना पार्किंगची जागा कोठे उपलब्ध करून द्यायची, अशी विवंचना प्रशासनाला पडली आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला असून भाविकांचा ओघ साधुग्राममध्ये सुरू झाला आहे. गुरूपौर्णिमेनंतर साधू महंतांची तसेच भाविकांची संख्या वाढेल, अशा वेळी पार्किंगची समस्या मोठी डोकेदुखी ठरू शकते, असा दावा प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला. पर्वणी व्यतिरिक्त साधुग्राममध्ये येणाऱ्या भाविकांचा प्रशासनाने अद्यापपर्यंत विचारच केला नसल्याची कबुली या अधिकाऱ्याने दिली.

साधुग्राम पार्किंगसंदर्भात पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीनुसार त्यात योग्य ते बदल करण्याचे काम सुरू आहे. जागेचा प्रश्नाबाबत चर्चा करू.

- एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर

पार्किंगसाठी सुविधायुक्त जागा नसेल तर पार्क केलेल्या वाहनांचा प्रश्न निर्माण होईल. कोठेही वाहने पार्क करण्याच्या पध्दतीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन चोरट्यांचीही पर्वणी साधली जाऊ शकते. साधुग्राममध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना शहरातील कोणत्या भागात रोखणार आणि तिथून पुढे जाण्याची काय व्यवस्था करणार असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छतेविरोधात नागरिक रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वारंवार मागणी करूनही अस्वच्छतेवर उपाययोजना केल्या जात नसल्याने महात्मा गांधी रोडवरील साठेबाग परिसरातील रहिवाशी आणि व्यावसायिकांनी रविवारी आंदोलन केले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मागण्यांची दखल न घेतल्यास ३० जुलैनंतर रास्तारोको करण्याचा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे.

भारतीय मानवाधिकार परिषदेच्यावतीने दुपारी बाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील परदेशी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशी असे सुमारे १०० ते १५० आंदोलक आंदोलनात सहभागी झाले. परिसरात एका इमारतीसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

येथील समस्या ३० जुलैपर्यंत सोडवाव्यात अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संकेत पवार, नितीन गोरे आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

दुगारवाडी धबधब्यात तरूण बुडाल्याची घटना ताजी असतानाच पहिने जवळील वाहत्या पाण्यात कॅम्प येथील दोन तरुणांना जीव गमवावा लागला. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पावसाळ्यात त्र्यंबकेश्वरसह इतर ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. निर्सगाचा आनंद घेण्यासाठी देवळाली कॅम्पमधील काही जण त्र्यंबकेश्वर ते घोटी रस्त्यावरील पहिने येथे रविवारी गेले होते. पावसाचा हलका शिडकावा आल्यानंतर पहिनेच्या पुढे असलेल्या वाहत्या नदीत देवळाळी कॅम्प येथील रहिवाशी त्रिलोक चव्हाण (वय २३) व आकाश प्रकाश जाधव (वय २३) हे दोघेही वाहत्या पाण्याच्या बाजूला उभे होते. यावेळी साचलेल्या पाण्यात एकाच तोल गेला. यात दोघेही पाण्यात बुडाले. त्या ‌ठिकाणी १५ ते २० फूट खोल

पाणी असल्याचे गावकऱ्यांनी

सांगितले. याप्रसंगी येथे उपस्थित असलेले महिरावणीचे कैलास खांडबहाले, सातपूरचे तुकाराम मोराडे, शिवाजी कसबे आदींनी पोलिसांना कळविले. यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती देऊनी तब्ब्ल दोन तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. परंतु, अज्ञात ठिकाणी सेल्फी काढण्याची गरजच काय‍? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बँक प्रतिनिधी पद’ होणार रद्द

$
0
0

नाशिक जिल्हा बँकेच्या निर्णयाने राजकारणात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सतत तापदायक ठरणारे, प्रसंगी बँकेला कर्जपुरवठा यावरही परिणाम करणारे व सहकारी संस्थावर नियुक्त केले जाणारे बँक प्रतिनिधी पद जिल्हा बँक रद्द करणार आहे. या निर्णयाने राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत बँकेने गत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव सहकारी संस्थाचे सहनिबंधक व सहकार आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे जाळे हे पूर्वीपासूनच विस्तारलेले आहे. जितक्या संस्था विविध काररास्तव बंद झाल्या आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तितक्याच प्रमाणात नवीन संस्था अस्तित्त्वात येत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात प्रत्येक गावात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्डच्या आदेशाने विविध कार्यकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थेची संख्या १३०० पर्यंत आहे. याहीपेक्षा चौपटीने राजकारणी मंडळींनी नागरी पतसंस्था, बिगर शेतकी कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था, भांडी उत्पादक, विटा, वाळू उत्पादक व शेळी मेंढी पालन संस्था स्थापन करून जिल्हा बँकेशी संलग्न करून ठेवल्या आहेत. या जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या सहकारी संस्थाच्या कारभारवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा बँक प्रत्येक वर्षी आपला प्रतिनिधी नियुक्त करते.

प्रत्येक सहकारी संस्थेच्या उपविधीतच हे पद निर्माण केलेले असल्यामुळे या पदावर संस्थेचा सभासद असलेल्या व्यक्तीस या पदावर नियुक्त केले जाते. या पदाला फार काही अधिकार नाही. मात्र संचालक मंडळ सभेत या पदावरील व्यक्तीस उपस्थित राहता येते. तसेच संस्थेचा कारभारावर अधिकार नसतानाही लक्ष ठेवता येते. संचालक मंडळ निवडणुकीत निवडून न येताही या पदावर बिगर पैशात नियुक्त होता येते. फुकटात मिळणारे हे पद मिळविण्यासाठी तथाकथित राजकारणी हे जिल्हा बँकेच्या संचालकाशी परिचित असल्यास या पदावर नियुक्ती होण्यास कुठलीही अडचण येत नाही. म्हणून हे तथाकथित राजकारणी स्थानिक सहकारी संस्थाचा विरोध डावलून बँक प्रतिनिधीपदावर वशिल्याने नियुक्त होतात. आणि तेथून गावपातळीवरील राजकारण तापण्यास सुरुवात होते.

या राजकारणावरून गावागावातील विकास संस्थामध्ये भांडणे होऊन गट-तट पडतात, प्रसंगी हाणामाऱ्या होतात. विरोधी गटाचा बँक प्रतिनिधी जिल्हा बँकेने नियुक्त केल्यास त्यास सत्ताधारी संचालक मंडळ संस्थेत रुजू करून घेत नाही. यावरून पुन्हा वाद विकोपास जाऊन बँकेचा आदेश संस्था मानत नाही. या कारणावरुन बँक कर्जपुरवठा करण्यास नकार देते. काही वेळा संस्थाही एकेरीवर येऊन जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्यास प्रवृत्त होते. त्यातून बँकेच्या व्यवस्थानावर परिणाम होतो. शत्रूत्वही वाढते. संचालक मंडळातही मतभेद होतात. त्याजागी अयोग्य व्यक्ती नियुक्त होतात. त्यामुळे अनेक समस्यांना बँक तसेच स्थानिक सहकारी संस्थांना तोंड द्यावे लागते. असे घडू नये, सहज आणि सोप्या पध्दतीने शेतकरी तसेच त्यांच्या संस्था व इतर सभासद सहकारी संस्थांना कर्ज वितरण करता यावे. कमीत कमी राजकारण घडावे बँकेची बदनामी होऊ नये. यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संस्थांवर नियुक्ती साठीचे बँक प्रतिनिधीपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तथा कथित राजकारणी मंडळीचे गावपातळीवरचे राजकारण आपोआपच संपुष्टात येणार आहे. बँकेच्या या निर्णयाचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images