Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कसमादेतून डाळिंब होतेय हद्दपार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कसमादे परिसरातील अर्थव्यवस्थेला सुवर्णयुग आणणाऱ्या डाळिंब पिकाने शेतकऱ्यांचा पुरता कणा मोडला आहे. डाळिंबाच्या पिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या शेतकऱ्यांना याच डाळिंबाने मातीमोल करण्याचाही जणूकाही विडाच उचल्याचे दिसत असून, कसमादेतून डाळिंब पीक हद्दपार होऊ लागले आहे.

बागलाण, कळवण, देवळा, मालेगाव, सटाणा या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एकेकाळी डाळिंब पिकाने मोठा हात दिला. एकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता मजबूत केली. डाळिंब पिकामुळे ग्रामीण भागाला आर्थिक झळाळी मिळाल्याने सोनेरी किनार लाभली. ग्रामीण जीवनाचे नंदनवन झाले. बहुतांश शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्ता वाढवून दुचाकीवरून चारचाकी, घराऐवजी फार्महाऊस संकल्पना रूजू लागली. दोन पैसे हातात खेळावयास मिळू लागल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन दिसू लागले होते. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने देखील डाळिंब उत्पादकांना वेळोवेळी हात दिल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरविला होता. यामुळेच की काय बागलाण, कळवण, देवळा, मालेगाव परिसरातील डाळिंब पिकाचे वाढते कार्यक्षेत्र बघून तत्कालीन शासनाने लखमापूर (ता. बागलाण) येथे डाळिंब संशोधन केंद्र मंजूर करून घेतले.

या परिसरात मोठ्या प्रमाणात राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधक व शास्त्रज्ञांना आणून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा, समस्यांवर उपाय शोधून मार्ग काढले. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेजची व्यवस्था करून जुन्या बागा काढून नवीन बागांची लागवड केली होती. डाळिंब उत्पादकांसाठी माती व पाणी परीक्षणांची प्रक्रिया पूर्ण करून गुणवत्तापूर्ण डाळिंब निर्मितीसाठी विशेष योगदान दिले.

अनेक गावांत मिटले नामोनिशाण

कालांतराने याच डाळिंब पिकांने तेल्या व मर रोगा सारखे विचित्र आजार पुढे आल्याने डाळिंब बागा नेस्तनाबूत होण्याचा मार्ग खुला झाला. पूर्वी साथींच्या आजारामुळे गावेच्या गावे नेस्तनाबूत होण्याची माहिती जेष्ठ मंडळी सांगत असत. अगदी त्याच धर्तीवर आता डाळिंबावरील तेल्या व मर रोगामुळे गावेच्या गावेच्या या फळपिकाला हद्दपार करू लागले आहेत. तेल्या रोग तर संपूर्ण फळ तयार झाल्यावर रात्रीतून त्याचे परिणाम दिसू लागल्याने तोंडाशी आलेला घास यामुळे ‌हिरावू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फाटक्या नोटा मिळणार बदलून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

दि नाशिक मर्चन्टस् को आँप. बँक लिमिटेड (नामको) कडून फाटक्या, मळकट नोटा बदलून देणार आहे. याबाबत नामको बँकेचे प्रशासक भोरियांना यांनी माहिती दिली. मंगळवारपासून बँकेच्या सहा शाखेंमध्ये नोटा बदलून मिळण्यास सुरुवात झाली.

सर्वसामान्य नागरिकांकडे आलेल्या फाटक्या व मळकट नोटा व्यवहारात शक्यतो कोणी घेत नाही. प्रत्येकजण फाटकी किंवा खराब नोट दुसऱ्याकडे कशी जाईल, यावर उपाय शोधत असतो. यासाठी नामको बँकेने पुढाकार घेत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवानी घेत फाटलेल्या व मळकट खराब नोटा बदलून देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात ६० टक्क्यांहून अधिक फाटलेल्या नोटेला पूर्ण पैसै मिळणार असून रंगात पूर्ण माखलेल्या किंवा तेलाने भरलेल्या नोटांना टाळण्यात आले आहे. कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसह नाशिकरांसाठी चार महिने नामको बँक खराब नोटा बदलून देणार आहे. बँकेच्या नेहरू गार्डन येथील धनवर्धनी या मुख्य शाखेसह, नाशिकरोड, पंचवटी, रविवार पेठ, त्र्यंबकेश्वर शाखेत खराब नोटा बदलून मिळत आहेत.

४०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नामको बँकेने खराब नोटा बदलून देण्यासाठी ४० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुंबईचे के. वाय. जोशी यांच्याकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नोटांची पहाणी कशी करावी? खऱ्या व खोट्या नोटा यातील फरक कसा ओळखावा? यासंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे भोरियांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेगेटला गाडीची धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पकडून भगूर शहरात येण्यासाठी असलेल्या एकमेवर मार्गावरील रेल्वे गेटला मंगळवारी (दि. १४) सकाळी लष्कराच्या गाडीने धडक दिली. तुटलेले गेट दुरुस्त करण्यासाठी तब्बल तीन तास दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना जाण्यायेण्यासाठी मार्गच ‌राहिला नाही.

गेट दुरुस्तीचे काम सुरू असतांना दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. शाळेतील विद्यार्थी, कामगार वर्ग यांची गर्दी जमा झाली. गेट बंद असल्याने सर्वांची धावपळ उडाली. भगूरला मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांचीही गर्दी झाली. त्यांना बराच काळ खोळंबून रहावे लागले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन दुपारपर्यंत गेट दुरुस्त केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी सुरक्षेसाठी रेल्वे पोलिस व देवळाली कॅम्प पोलिसांनी वाहनधारकांची गर्दी आटोक्यात आणत वाहतूक सुरळीत करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुगारवाडी धबधबा बनला मृत्यूचा सापळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिकतील अनेक पर्यटनवेडे तरुण दुगारवाडीचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जातात. मात्र, पुरेशी सुरक्षा घेतली जात नसल्याने दुगारवाडीचा भव्य धबधबा मृत्यूचा सापळा बनला आहे. शिवाय या धबधब्याच्या परिसरात अनेक गोष्टींना पायबंद घालण्यासाठी प्रशासन वा पोलिसांकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे.

त्र्यंबकेश्वरपासून सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या दुगारवाडी धबधब्याच्या पायथ्याशी पोचण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. धबधब्यापर्यंत पोचण्यासाठी दुगारवाडीच्या नदीतूनच प्रवेश करून जावे लागते. यात पाऊस नसल्यावर अनेकजण कुठलाही विचार न करता धबधब्याजवळ पोहचत पाण्यात उतरतात आणि पाण्याचा आनंद लुटतात. मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत ते वाहून जाण्याच्या घटना घडत असल्याचे आढळून आले आहे.

तसेच धबधब्यावरून अचानक खाली पडणारे दगड पर्यटकांना लागत आहेत. अशा पद्धतीनेही पर्यटकांवर संकट कोसळत आहे. दोन दिवसांपूर्वी सावतानगर येथील माहेश्वरी या तरुणाचा देखील पोहत असतांना धबधब्यावरून पडलेला दगड थेट डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कार्यरत असलेले तीन कर्मचारी दुगारवाडीत वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. दुगारवाडीच्या धबधब्यात दरवर्षी अनेकांना प्राण गमवावे लागत असल्याने पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष घालण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.

मद्य दुकाने बंद करण्याची मागणी

दुगारवाडीच्या धबधब्यावर जातांना अनेक ठिकाणी छोटे मोठे हॉटेल्स आहेत. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसतांना या ठिकाणी देशी, विदेशी मद्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. मद्यपान करून काही तरुण दुगारवाडीच्या पाण्यात उतरतात. स्वत:वर नियंत्रण ठेवण्यात कमी पडलेल्या या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याचेही आढळून आले आहे. तरी जिल्हा पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रितपणे मोहीम राबवत बेकायदा मद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू घटेगा नही, बढेगा!

$
0
0

म. टे. प्रतिनिधी, नाशिकरोड

हिंदूंच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी त्यांच्याच हाती सत्ता राहिली पाहिजे. हिंदू घटेगा नही, बढेगा असे सांगताना विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी हिंदू लोकसंख्या वाढविण्यासाठी अक्शन प्लॅनही सांगितला. जेलरोड येथील पाटीदार भवनमध्ये कच्छ कडवा पाटीदार समाजातर्फे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर 'विहिंप'चे राष्ट्रीय सचिव प्रा. व्यंकटेश अपदेव, क्षेत्रीय संघटनमंत्री विजय माताडे, पश्चिम महाराष्ट्रमंत्री बाबूजी नाटेकर, नगरसेवक संभाजी मोरुस्कर हे होते. खेतसीभाई रयानी यांनी प्रास्तविक केले.

डॉ. तोगडिया म्हणाले, की हिंदूंची संख्या वाढण्यासाठी धर्मांतरला नाही म्हणा, घर वापसीला हो म्हणा, लव जिहादला नाही म्हणा आणि समान नागरी कायद्याला हो म्हणा. हिंदूंना संघटित करा, जागृत करा आणि सक्रिय करा. मुलांना शिक्षण आणि युवकांना रोजगार द्या. व्यापार वाढवा, शेती समृद्ध करा. आपल्या स्थापनेची पन्नास वर्षे पूर्ण करणारी 'विहिंप' हेच काम करत आहे. हिंदू किमान पाचशे वर्षे तरी सहीसलामत रहावा म्हणून विमा कंपनीप्रमाणे आम्ही केलेली ही गुंतवणूक आहे. हिंदूंच्या सलामती आणि समृद्धीसाठी देशातील सत्तेवर कब्जा करा. जे हिंदूंचे रक्षण करतात, त्यांचीच समृद्धी होते असे धर्म सांगतो. सृष्टीत नकारात्मक ऊर्जा वाढली आहे. धर्मविरोधी शक्ती प्रबळ झाल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी एकजूट व्हा. डॉ. तोगडीया म्हणाले, की धर्म हे कर्म बदलण्याचे शास्त्र असून भारतीयांची ओळख आहे. धर्माचा अपमान सहन करू नका. गरीब आणि श्रीमंतांनी धर्माचे आचरण करावे. अयोध्येत राममंदिर बांधणे, हिंदूंचे रक्षण करणे, धर्मांतर रोखणे हे धर्माचरणच आहे. धर्माचे रक्षण केले तर धर्म तुमच्या कुटुंब, पैसा, यश, समृद्धी आणि अस्तित्वाचे रक्षण करेल.

राममंदिर अजेंड्यावर

पत्रकारांशी बोलताना डॉ. तोगडिया म्हणाले, की देशात समान नागरी कायदा हवाच. राममंदिर आमच्या अंजेड्यावर आहे. तो मुद्दा आम्ही सोडलेला नाही. काश्मिरमधून घालवलेल्या हिंदूंनी कोठे राहायचे हे त्या हिंदूंनाच ठरवू द्या. पाक नेते ते ठरवू शकत नाही. राज्य आणि केंद्र सरकारने सन्मानाने त्यांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करावे. दरम्यान, तोगडिया यांनी गंधर्वनगरीतील बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. संस्थापक कैलास मुदलीयार यांनी त्यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर येथे व्यापाऱ्याला लुटले

$
0
0

नाशिकरोड : रात्री दुकान बंद करून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्याला दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून उपनगरजवळ लुटले. त्याच्याकडील साडेतीन लाखाची रोकड पळवली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महेश भानुदास दर्यानी यांचे सिन्नर येथे वाईन शॉप आहे.

परप्रांतिय कैदी फरार

नाशिकरोड : जन्मठेपेच्या शिक्षेचा कैदी पॅरोलवर सुटल्यापासून परत न आल्याने नाशिकरोड कारागृहातर्फे नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. अरविंदकुमार उर्फ मनोज भैय्यालाल साहू (इलाहाबाद, उत्तर प्रदेश) हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खूनबद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो ११ एप्रिल रोजी संचित रजेवर सुटला होता.

मुलीची आत्महत्या

नाशिकरोड : कावेरी उर्फ सोनू बंडू नांदगुरे (१५, सौभाग्यनगर, रेणुका गार्डनमागे, जुना जकात नाका, लॅमरोड) हिने मंगळवारी सकाळी ओढणीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकावर टिचून चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात बंदोबस्त असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, महिलांचे दागिने सुरक्षित राहतील, चेनस्नॅचिंग होणार नाही अशी ग्वाही देणाऱ्या पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिचून ध्वजारोहणाच्या दिवशी मंगळवारी चोरट्यांनी 'कर्तबगारी' दाखवली. एकाच दिवशी दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या.

ध्वजारोहणाच्या दिवशी शहरात पोलिस बंदोबस्त चोख ठेवणार असून शहरात सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे त्यामुळे चेन स्नॅचिंग करणाऱ्यांवर आमचा वॉच असेल असे पोलिस प्रशासनाने सांगितले होते; मात्र मंगळवारी रामकुंड परिसरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. पहिली घटना रामकुंडावर ध्वजारोहणासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून ४० हजार रुपये किंमतीचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. दुसरी घटना याच परिसरात घडली. मुंबईहून आलेल्या भाविकाच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची चेन अज्ञात व्यक्तीने चोरली आहे. याच ठिकाणी ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज असलेली पर्स चोरीला गेली. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त व्यवस्थित असल्याचा दावा फोल ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा... का रे दुरावा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. वाढते तापमान व ढगाळ वातावरणामुळे विषम हवामान देखील वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे हवेत निर्माण झालेला गारवा पाऊस थांबल्यानंतर एकाएकी नाहीसा झाला. दोन दिवसापासून बुधवारी नाशिक शहर आण‌ि उपनगरवासीयांना उकाड्याला सामोरे जावे लागले. तापमानातही दोन अंशांची वाढ झाल्याने गारवा कमी झाला. या विचित्र हवामानाचा फटका लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. लहान मुलांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास वाढू लागल्याने दवाखान्यातील गर्दी वाढली आहे. पाऊस झाल्यास वातावरणातील दूषितपणा निघून जातो. त्यामुळे रोगराई जास्त फैलावत नाही. जोपर्यत भरपूर पाऊस होत नाही तोपर्यंत व्हायरलचे प्रमाण जास्त राहील असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नाशिक शहरातील पावसाची नोंद बघता जूनच्या सुरुवातीला पाऊस जास्त होतो. त्यानंतर हेच पावसाचे प्रमाण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगले असते. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढल्यास वातावरणातील उकाडा कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पावसाने पाठ फिरवली असून, ढगाळ वातावरणामुळे घुसमटल्यासारखी अवस्था होत आहे. दुसरीकडे सतत हवामान बदलत असल्याने साथीच्या आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शहरात मॉन्सूनचे वेळेवर आगमन झाले. पहिला आठवडा पाऊस दणक्यात कोसळला. त्यामुळे हवेतही गारवा पसरला. पण हा गारवा क्षणिक ठरला. गेले काही दिवस तर. मध्येच हलकी सर येते आणि पुन्हा पाऊस गायब होतो. राज्यातील काही भागात धो-धो पाऊस कासळत असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे.

पाणीसंकट गडद

नाशिक वगळता धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार येथेही अशीच परिस्थिती आहे. येत्या काही दिवसात पावसाने हजेरी न लावल्याल पिण्याच्या पाण्याचे संकट वाढणार आहे. त्यातच सिंहस्थाला सुरुवात झाल्यानंतर भाविकांचा ओघ शहरात येणार असून संपूर्ण नाशिककर पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थासाठी ऑफलाइन मोबाइल अॅप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या देश विदेशातील भाविकांसाठी महाकुंभ नाशिक २०१५ हे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत माहिती देणारे ऑफलाइन मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्यासोबत हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संकेतस्थळ आणि 'कुंभमेळा महापर्व' हे फेसबुक पेज आकाराला आले आहे.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये केवळ नाशिकच नाही तर प्रयाग, उज्जैन आणि हरिद्वार येथील सिंहस्थाची माहिती देण्यात आली आहे. नाशिक येथील सिंहस्थाचा इतिहास यात दिला असून त्यासोबत पर्वणी, तिथी, हॉटेल, प्रवास व्यवस्था, मध्यवर्ती ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळे, मदत केंद्र, मार्ग कसा शोधाल, आदी माहिती या अॅपवर आहे.

पर्वणी तिथीमध्ये ध्वजारोहण आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील शाहीस्नानाच्या तारखांची माहिती देण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या भाविकांसाठी सोयीच्या असणाऱ्या हॉटेल्सची माहिती असून, परिवहन व्यवस्थेमध्ये शहर बससेवा, रेल्वे, खासगी बस आणि सिंहस्थात नाशिकला विमानसेवा सुरू झालीच तर त्याच्या वेळाही दिल्या आहेत. सिंहस्थ काळात शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाहनतळे असणार आहे. तेथून भाविकांना चालत शहरात यावे लागणार आहे. ते भाविक शहरात आल्यानंतर आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत याची माहिती कळण्यासाठी नाशिकमधील प्रमुख ठिकाणांचे वर्णन येथे असून निमाणी, पंचवटी, शालिमार, द्वारका, नाशिकरोड, मुंबई नाका, सातपूर या ठिकाणांचे परस्परांमधील अंतरही देण्यात आले आहे. मदत केंद्रांतर्गत आपत्कालीन सेवेची माहिती दिली असून यामध्ये पोलिस मदत केंद्र, इतर पोलिस स्टेशन, पोलिस कंट्रोल रूम, शासकीय रुग्णालय, रुग्णवाहिका, अग्निशामक केंद्र, रक्तपेढी, आणि आपत्कालीन मदतीची माहिती देण्यात आली आहे.

शहराची सखोल माहिती

नाशिक शहराच्या माहितीमध्ये शहराचा इतिहास, खरेदी, आकाशवाणी केंद्र, विमानतळ, मनोरंजन केंद्र, चित्रपट गृहे, प्रसिद्ध व्यक्ती यांचा उल्लेख करण्यात आला आहे. www.indiasculture.com हा संकेत स्थळाचा व https://www.facebook.com/sinhasthakumbhmela हा फेसबुकचा अॅड्रेस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नानाच्या नियोजनात आखाडे मग्न

$
0
0

अनिल पवार, नाशिक

पुरोहित संघाची ध्वजा फडकल्यानंतर सिंहस्थ पर्वाला सुरुवात झाली. नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन्ही ‌ठिकाणी या चैतन्याच्या, मानवतेच्या सोहळ्याला हजारो साधूमहंत, भाविकांच्या साक्षीने सुरुवात झाली. आता शाही पर्वण्यांची उत्सुकता लागली आहे. प्रथम शाहीस्नान २९ ऑगस्ट, दुसरे शाहीस्नान १२ सप्टेंबर तर तिसरे शाहीस्नान २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठी त्र्यंबकमधील आखाड्यांचे नियोजन सुरू आहे.

आखाड्यांशिवाय कुंभमेळयाचे महत्त्व अधोरेखीत होत नाही. प्रत्येक आखाड्यांचे शाहीस्नान हे ठरलेले असते. त्र्यंबकमध्ये कुशावर्त आकुंचित असल्यामुळे सर्वांना एकाचवेळी स्नान करणे शक्य नाही. गेल्या कुंभमेळ्यापर्यंत श्री तपोनिधी आनंद आखाडा, श्री पंचअग्नी आखाडा, श्री तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा, श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा एकाचवेळी स्नान करीत होते. अरुंद रस्ते, आखाड्याचे साधुमहंत, सुमारे वीस हजार साधू एकत्र जायचे. यामुळे शाहीस्नानाला वेळ होत असे. यामुळे दहा आखाड्यांचे सचिव, त्यावेळची आखाडा परिषद, सरकार, प्रशासकीय अधिकारी यांनी विचारविमर्श करून भावी म्हणजे २०१५-१६ चा कुंभमेळा अधिक चांगला व्हावा म्हणून आखाड्यांचे दोन भाग करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथिय दहा आखाडे शाहीस्नानात सहभागी होतात. या आखाड्यांचा कुशावर्तापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, वेळा वेगवेगळ्या असतात. गेल्या सिंहस्थात पर्वणी दिवस १२ ऑगस्ट, २७ ऑगस्ट व ७ असे सप्टेंबर असे होते. पर्वणीच्या नियोजनाकरिता मुंबई पोलिस अधिनियम ११५७ चे कलम ३६ (अ) व (ब) नुसार पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्याकडून जाहीरनामा काढण्यात आला होता.

प्रथम शाहीस्नानासाठी सज्ज

गेल्या सिंहस्थात जुना आखाडा, आवाहन आखाडा व पंचअग्नी आखाडा यांनी १२ ऑगस्ट रोजी पहिले शाहीस्नान केले होते. यावेळीही त्यात फारसा फरक पडणार नसल्याचे षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी सांगितले. पहिल्या शाहीस्नानात श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा, श्री पंचअग्नी आखाडा, श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा, त्‍यांचे इष्टदेवता, साधुमहंत प्रथम स्नान करतील. यानंतर श्री तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री तपोनिधी आनंद आखाडा, यांचे इष्टदेव, साधूमंहतांचे शाहीस्नान होईल. श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी यांचा शाहीस्नानासाठी तृतीय क्रमांक असेल. यानंतर वैष्णव आखाड्यांसाठी दोन तासांचा वेळा राखून ठेवलेला असेल. त्यांच्या या वेळेत कुणीही स्नान करीत नाही. यानंतर उर्वरित आखाडे व भाविकांना शाही पर्वणी साधता येईल. शाहीमार्ग व वेळ ठरलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडात नको बोअरवेलचा घाट

$
0
0

नाशिक : रामकुंडाला प्राचीन परंपरा आहे. त्यामागे मोठा इतिहास दडलाय. त्यामुळे रामकुंडात बोअरवेल करण्याचा घाट मोडून काढावा, अशी मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समिती व स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदनही देण्यात आले. यावर सकारात्मकता दर्शवत बेकायदेशीर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन ना. महाजन यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

रामकुंड परिसरात प्राचीन १६ कुंड आहेत. त्यावरील काँक्रिटीकरणाविषयी व अरुणा नदी, वरुणा नदी पुनजीर्वित करणे या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल आहे. रामकुंडात बोअरवेल करण्याचे ठरवल्यास १२५ ते १५० फूट खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे मूळ रामकुंडाच्या काँक्रीट थराला इजा होइल व रामकुंडच खंडित होइल. या बोअरिंग प्रक्रियेसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी घेण्याचीही

गरज आहे. तसेच, नियमानुसार जनहीत सुनावणीसुध्दा घेण्याची गरज आहे. रामकुंडाला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध आहे. यावर ना. महाजन म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने कोणताही बेकायदेशीर निर्णय घेतला जाणार नाही. गोदाप्रेमी नागरी सेवा समिती समन्वयक देवांग जानी, उद्योजक प्रफुल्ल संचेती, जगदीश रामैय्या, स्वप्नील नन्नावरे, गौरव नहाटा, दीपक कुलकर्णी, चिराग गुप्ता उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कावनईला आज ध्वजारोहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

श्रीक्षेत्र कावनई येथे आज (दि. १६) दुपारी ११ वाजता सिंहस्थ पर्वाचा ध्वजारोहण सोहळा भक्तीमय वातावरणात, साधुसंताच्या उपस्थितीत व भक्तगणाच्या सहवासात होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे नुकतेच ध्वजारोहण झाले. इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथील तीर्थस्थळालाही विशेष महत्त्व आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील शाहीस्नानाबरोबरच कावनई येथे पर्वणीस्नानाचे आयोजन करण्यात येते. श्री कपिल मुनी विश्वस्त समितीच्या वतीने या ध्वजारोहण सोहळ्यासाठी साधुसंताना, लोकप्रतिनिधीना व भाविकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या तीर्थस्थळी स्वच्छता अभियान, कुंड शुद्धीकरण, वीजपुरवठ्याबाबत तयारी पूर्ण झाली आहे.

श्रीक्षेत्र कावनई हे प्राचीन व पुरातन तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राला सिंहस्थाचे मूळस्थान ही संबोधले जाते. महंत रामनारायनदास फलाहारी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या तीर्थक्षेत्राचा कायापालट झाला आहे. या ध्वजारोहण सोहळ्यास विविध धर्मपिठांचे जगदगुरु, रामानंदाचार्य, आखाडा परिषदेचे तिन्ही अनी आखाड्यांचे प्रमुख, आखाड्यांचे महंत तसेच स्थानिक पदाधिकारी व भाविक सहभागी होणार आहेत.

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. जलपूजन, जगदगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते होईल. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले, पांडूरंग गांगड आदी उपस्थित राहणार आहेत. नाशिक विभाग तसेच इगतपुरी आगाराच्या वतीने घोटी येथून जादा बसेसची सोय केली आहे. घोटी येथून कावनई, त्र्यंबकेश्वर व टाकेद येथे जाण्याकरिता जादा बसेसची मागणी पूर्ण केली आहे.

पोलिस यंत्रणा सज्ज

ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते व उप अधीक्षक सी. आर. देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० पोलिस कर्मचारी व २० राखीव कर्मचारी अशी पोलिस यंत्रणा तैनात केली आहे. तीर्थस्थळावर नियोजित ठिकाणी तसेच, कावनई गावाजवळ वाहनतळ उभारण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नाशिकच्या प्रथम नागरिकासह पदाधिकारी आणि नगरसेवकांना मिळालेल्या सापत्न वागणुकीविरोधात नगरसेवक आक्रमक झाले आहेत. यामुळे येत्या महासभेत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. महापालिकेने सिंहस्थासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुंभमेळ्यात मान सन्मान मिळत नसल्याची सल नगरसेवकांमध्ये आहे. प्रशासनाच्या दुजाभावावर नगरसेवक संतप्त झाले असून, थेट सरकारलाच सवाल करणार आहेत.

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांना सुरक्षा यंत्रणांनी धक्काबुक्की केली. त्यांना मुख्य सोहळयापासून दूर ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापासूनही त्यांना लांब ठेवण्यात आले होते. यावरून कार्यक्रमस्थळीच वाद निर्माण झाला होता. महापौर अशोक मुर्तडक यांनाही सापत्न वागणूक देण्यात आली. महापालिकेने या सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सोहळा आमचाच असताना आम्हालाच दूर ठेवण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या अपमानाचे पडसाद शुक्रवारी होणाऱ्या महासभेत उमटण्याची शक्यता आहे.

अगोदरच सिंहस्थामुळे विकासकामे होत नसल्याने नाराज असलेल्या नगरसेवकांना आता आखणीन एक मुद्दा मिळाल्याने प्रशासनाविरोधात ते आक्रमक होणार आहेत. शुक्रवारच्या महासभेत या अपमानावरच चर्चा घडवून आणण्याचा विचार नगरसेवकांनी सुरू केला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय एकजूट तयार केली जात आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्य का?

ध्वजारोहण सोहळ्यात पोलिसांनी भाजपच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांना झुकते माप दिले. यावरून इतर पक्षीय नगरसेवक भडकले आहेत. हा केवळ भाजपचाच सोहळा आहे काय?, असा सवाल नगरसेवकांनी केला असून, सुरक्षायंत्रणा भाजपला फेव्हर करीत असल्याचा आरोप केला जात आहे. भाजपच्या किरकोळ पदाधिकाऱ्यांनाही ध्वजारोहणाच्या मुख्य मंचावर स्थान देण्यात आले. तर, महापौरांना मुख्यमंत्र्यांपासून लांब ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी महापौरांना पुरोहित संघाकडे विनवणी करावी लागली. प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतानाही त्यांना डावलून अपमान करण्यात आला. त्यामुळे हा सर्व नगरसेवकांचा अपमान असल्याची सल नगरसेवकांमध्ये असून, थेट पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यानाच जाब विचारला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडताळणीत ‘१६’ चे झाले ‘६१’ मार्क्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निकालानंतर एका विषयात अवघे १६ मार्क्स पडलेले बघून हबकलेल्या विद्यार्थिनीने एमएसबीटीईकडे पुन्हा गुणपडताळणीसाठी अर्ज केल्यानंतर तिच्या मार्कशीटमध्ये मोठा बदल झाला. या पुर्नपडताळणीत तिला ६१ मार्क्स असल्याचे बोर्डाच्या लक्षात आल्याने आता तिचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशन (एमएसबीटीई) ही अन्य विद्यापीठ अन् बोर्डांच्या तुलनेत तसूभरही मागे नसल्याचे समोर आले आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील एशियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ फार्मसी या संस्थेत मोनिका घुले ही विद्यार्थिनी डी.फार्मसी या अभ्यासक्रमात शिक्षण घेते. यंदा एप्रिल महिन्यात या अभ्यासक्रमाची वार्षिक परीक्षा पार पडली. या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. या निकालात त‌िला फार्मास्युटीक्स फर्स्ट या विषयात १६ मार्क्स बोर्डाने दर्शविले होते. मात्र आपण लिहीलेल्या उत्तरपत्रिकेनुसार हे मार्क्स अत्यल्प असल्याचे तिला वाटल्याने पुन्हा मार्क्सच्या पडताळणीसाठी तिने अर्ज केला. या पडताळणीत तिचे मार्क्स बदलून '१६' चे '६१' झाले आहेत. यामुळे अगोदरच्या निकालात नापास ठरलेली मोनिका आता बदललेल्या निकालानंतर एशियन इन्स्टिट्यूटची टॉपर ठरली आहे.

निकालातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने याबाबत कठोर नियमावलीची गरज व्यक्त होत आहे. शिक्षण संस्था याबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज पालकांकडून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन अंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. दरवर्षी या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना या प्रकाराचा अनुभव घ्यावा लागतो. नाशिक शहरात या प्रकाराचा सामना करावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० ते ४० च्या घरात असल्याचे फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

मार्क्समधील बदलांसाठी जे विद्यार्थी आशावादाने पुन्हा पडताळणी करतात त्यांना कदाचित फायदा होत असेल. मात्र अनेक विद्यार्थी निराश होऊन पुन्हा गुणपडताळणी करीत नाहीत. मात्र बोर्डाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्याचे आयुष्यभराचे नुकसान करणारे ठरू शकते. या चुका टाळायलाच हव्यात.

- मोनिका घुले, विद्यार्थिनी

दरवर्षी काही विद्यार्थ्यांना निकालातील गोंधळाबाबत शंका असते. या ‍विद्यार्थ्यांच्या एकत्रित केसेस एमएसबीटीईकडे संस्थेतर्फे रीतसर पाठविल्या जातात. बहुतांशी प्रकरणात बदल होत असल्याचा अनुभव आहे.

प्रा. गिरीश पाटील, अधीक्षक, एशियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ फार्मसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसची मिस कॉलद्वारे नोंदणी

$
0
0

नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात मोबाइलवर मिस कॉल देऊन सभासद नोंदणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली आहे. सोबतच सभासद नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले. नाशिकमध्येही मोठ्या संख्येने राष्ट्रवादीची सभासद संख्या वाढवा, असे आवाहन त्यांनी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनमध्ये दिवसभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुकावार बैठक झाली. जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीतर्फे १८००३०७०६०९५ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होता येणार असून, राज्यातील युवकांना पक्षासोबत जोडण्यासाठी ही नवीन मोबाइलच्या माध्यमातून सभासद नोंदणी सुरु करण्यात आल्याचे युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. मोबाइलसोबतच www.mhncpyouth.com या वेबसाइटवर सुद्धा सभासद नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामकुंडावरुन दुचाकीची चोरी

$
0
0

पंचवटी : रामकुंडाच्या ठिकाणावरुन हिरो होंडा पॅशन (एमएच १५ सीटी ४३७७) ही गाडी बुधवारी दुपारच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. रामकुंड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केल्यानंतरही तेथील चोरीच्या घटनांना आळा बसला नसल्याचे दिसून येत आहे. गाडी चोरीला गेल्याप्रकरणी पंकज चांडोले यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक क्लस्टरमध्ये एनक्युबेशन केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरमध्ये एनक्युबेशन केंद्र कार्यन्वयीत करण्यात आल्याची माहिती क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे होतकरू उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी क्लस्टरकडून प्रशिक्षण मिळणार आहे. यात केंद्र शासनाकडून उद्योजकांचे प्रशिक्षण घेणाऱ्याला स्टायपेंड देखील मिळणार असून, उद्योग उभारणीसाठी कर्ज देखील उपलब्ध करुन देणार असल्याचे क्लस्टरचे अध्यक्ष गोलिया यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात अनेकविध उद्योजकांसाठी उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक क्लस्टर येथे घेतले जातात. यामुळे तरुण उद्योजकांसाठी क्लस्टरने भव्य व्यासपीठ उभे केले आहे. यात नुकतेच उगवत्या तरुण उद्योजकांसाठी नाशिक क्लस्टरने एनक्युबेशन केंद्र कार्यन्वयीत केले आहे. यात उद्योगांबाबत कल्पना असलेल्या तरुण उद्योजकांना केंद्र शासन स्टायपेंड देऊन उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत देखील करणार असल्याचे क्लस्टरचे अध्यक्ष गोलिया यांनी सांगितले. एनक्युबेशन केंद्राबाबत सर्वच शाळा व महाविद्यालयांना क्लस्टरची माहिती देणार आहे. यानंतर शाळा व महाविद्यालयात जाऊन नाशिक क्लस्टरची मार्गदर्शन समिती याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. यासाठी क्लस्टरने प्रशिक्षित अशा तरुण उद्योजकाच्या निवडीसाठी समिती तयार केली आहे. यात ईप्कॉसचे मुख्य कार्यकारी संचालक एच. एस. बँनर्जी, क्राम्प्टन ग्रिव्हिजचे माजी उपाध्यक्ष जे. जी. कुलकर्णी, बॉश (मायको)चे व्यवस्थापन प्रमुख ए. आर. चिंनतावार, रिलायबल ऑटोटेकचे संस्थापक राजेंद्र बागवे व अशोक बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी संचालक सतिश पारख यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी उत्तर महाराष्ट्रातील होतकरू तरुण, तरुणी असलेल्या उदयोजकांनी एनक्युबेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन क्लस्टरचे अध्यक्ष गोलिया यांनी केले आहे. विशेष म्हणजे उद्योजक होण्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणात कुठल्याच प्रकारची वयाची अट नसल्याचे गोलियांनी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीचा मार्ग खडतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने स्मार्टसिटीसंदर्भातील बहुतांश निकष पूर्ण केले असले तरी, केंद्रात आणि राज्यात नाशिकचे राजकीय वजन कमी झाल्याने नाशिकचे स्मार्ट सिटीचा मार्ग खडतर बनला आहे. पहिल्या टप्प्यात देशातून २० शहरांचीच निवड होण्याची शक्यता असल्याने राज्यातून नाशिकचा समावेश होण्याची शक्यता धूसर झाली आहे. गुरूवारी स्मार्टसिटीचा प्रस्ताव पुराव्यानिशी केंद्रसरकारकडे दाखल केला जाणार असून, त्यानंतरच केंद्रीय पातळीवर स्पर्धेला सुरूवात होईल. दरम्यान, नाशिकचा स्मार्टसिटीत प्रवेश व्हावा, यासाठी येत्या शुक्रवारच्या महासभेत प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

देशात शंभर स्मार्टसिटी उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केली असून, राज्यात १० महापालिकांचा यात समावेश होईल, असा दावा केला जात आहे. त्यासाठी नाशिकने प्रयत्न सुरू केले असून, केंद्राने दिलेल्या निकषात नाशिकचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्राच्या निकषाप्रमाणे नाशिकने ८२.५० टक्के गुणाकंन पूर्ण केले आहेत. त्यासंदर्भातील ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाला आहे. आता शुक्रवारी कागदोपत्री पुराव्यासह केंद्राकडे तो सादर केला जाणार आहे. तर शुक्रवारच्या महासभेत स्मार्टसिटीत समावेश होण्यासाठी प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. महासभेची मान्यतेची अट प्रस्ताव असल्याने हा प्रस्ताव मंजूर होणार आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांशी स्पर्धा आहे. हा स्मार्ट प्रस्ताव केंद्राकडे दाखल केल्यानंतर त्याला मंजुरी मिळणार आहे.

स्मार्ट सिटीसंदर्भातले निकष नाशिक पूर्ण करत असले तरी, आता नाशिकचाच त्यात समावेश होण्याची शक्यता कमी आहे. केंद्र सरकार पहिल्या टप्प्यात केवळ देशभरातून २० शहरांचीच निवड करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशातील टॉपटेन शहरांनतर उर्वरीत दहा शहरामध्ये नाशिकची स्पर्धा राहणार आहे. तर राज्यातून दोन ते तीन शहरांचाच समावेश होण्याची शक्यता असून, मुंबईनंतर पुणे आणि नागपूरशी नाशिकला तुलना होणार आहे. इतर राज्यातील राजधान्याही यात सहभागी होणार असल्याने नाशिकच्या समावेशाची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात स्मार्टसिटीत नाशिकचा समावेश होण्याचे नाशिककरांचे स्वप्न भंगणार आहे.

स्वतंत्र मंडळ स्थापन होणार

स्मार्टसिटीअंतर्गत स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याची तरतूद आहे. स्वतंत्र प्राधिकरणाच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापावे लागणार असून, त्यात विविध क्षेत्रातील संचालक नियुक्त केले जाणार आहे. केंद्र, राज्याचे प्रतिनिधीसह महापालिकेतील पदाधिकारी यात सहभागी करता येतील. या मंडळाचा कारभार स्वतंत्र सीईओकडे असणार असून, त्याची बदली करता येणार नाही.

राजकीय वजन कमी पडणार

नाशिकच्या समावेशासाठी केंद्र आणि राज्याच्या पातळीवर राजकीय वजनाची गरज असणार आहे. सद्यस्थितीत नाशिकमध्ये मनसे राष्ट्रवादीची सत्ता आहे. केंद्रात वजन पाडण्यासाठी दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये सध्या तरी क्षमता नाही. विशेषता राज्यातून भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेखालील महापालिकांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वजनाअभावी नाशिक स्मार्टसिटीपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूलमध्ये ६७ पोलिस जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावात दंगलीनंतर दुसऱ्या दिवशीही तणाव कायम होता. जमावाने बुधवारी चढविलेल्या हल्ल्यात ३३ पोलिस जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी तातडीने हरसुलला भेट देत शांततेचे आवाहन केले आहे.

या दंगलीत दोन दिवसांत एकूण ६७ पोलिस जखमी झाले आहेत. दंगलीची जिल्हा दंडाधिका-यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी दिले आहेत. त्याशिवाय, हरसूल पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांचीही जिल्हा पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. नाशिकपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या हरसूलमध्ये बुधवारी पुन्हा पोलिस व स्थानिक आदिवासींमध्ये धुमश्चक्री उडाली. सकाळी हरसूलच्या काही भागातून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवत असताना दुसऱ्या बाजूनेही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या ३२ नळकांड्या फोडल्या. मात्र, दंगलखोरांनी त्या पुन्हा पोलिसांवर फेकल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूलमध्ये तणाव कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दंगलग्रस्त हरसूलमध्ये दुस-या दिवशीही तणावपूर्ण परिस्थिती कायम होती. बुधवारी पोलिसांवरच थेट हल्ला झाल्याने सिंहस्थाच्या बंदोबस्तासाठी मागविलेली पोलिसांची अतिरिक्त कुमक हरसूल परिसरात तातडीने पाठविण्यात आली. आतापर्यंत जखमी झालेल्या पोलिसांची संख्या ३३ झाली आहे.

हरसूल आणि परिसरात शांतता प्रस्थापित करण्यास आम्ही तूर्तास प्राधान्य दिले आहे. त्यांनतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जाईल. येथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असून, तणाव निवळत आहे. परिस्थिती पाहून बंदोबस्तात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

पोलिसांची बदली

हरसूलच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत स्थानिक पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. दंगलीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशीला सुरवात झाली आहे. दरम्यान, रामदास बुधर याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

कल्याण रामकिसन शिरसाठ (२४)

मंगेश श्रीमंत कणसे (२४)

चंद्रकांत महारू वंजारी (५२)

सचिन विठ्ठल खेडकुळे (१२)

ज्ञानेश्वर रामदास तबाले (२२)

गणेश सुखदेव जाधव (२४)

दंगलग्रस्तांना आश्रय

जुने नाशिक : हरसूलमधील दगंलग्रस्तांना नगरसेवक गुलजार कोकणी यांनी तात्पुरती निवाऱ्याची सोय करुन दिली आहे. तसेच त्यांना मदत देऊ केली आहे. लहान मुले व महिलांना पोलिस सरंक्षणाची हमी मिळाल्याशिवाय ते हरसूलला परतणार नाही, अशी त्यांची मानसिकता असल्याने त्यांना आश्रय देऊन त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे कोकणी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images