Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

... अन् भांबावली यंत्रणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाविकांचीसंभाव्य गर्दी लक्षात घेता ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला गोदाकाठ ताब्यात घेत पोलिस प्रशासनाने जागोजागी बॅरिकेट्स उभारले आणि रामकुंडास चौफेर सुरक्षाकडे केले. ध्वजस्तंभाच्या भोवताली कुणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, ध्वजारोहण होताच विविध संप्रदायांच्या भाविकांच्या गर्दीचा ओघ रामकुंडाकडे सरकू लागला अन् काही क्षण सुरक्षा यंत्रणाही भांबावली.

ध्वजरोहण सोहळ्यास आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, नाणीज पीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे भक्तीचरणदास महाराज आदी उपस्थित होते. या साधू महंतांसोबत त्यांचा शिष्यसमुदायही मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. ध्वजस्तंभानजीकच्या हाय सिक्युरिटी झोनमधून मुख्य साधू महंतांना प्रवेश दिल्यानंतर उर्वरित भाविकांना जागीच रोखण्यात आले. यामुळे कपालेश्वर मंदिराच्या दिशेने आलेला मोठा शिष्यसमुदाय रामकुंडाच्या चारही बाजूंना जमा झाला.

ध्वजारोहणाचा मुहूर्त साधून हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होताच उपस्थित हजारोंचा शिष्य समुदाय भगवान श्रीरांमांचा जयघोष करीत रामकुंडाच्या दिशेने पुढे सरकला. हा समुदाय रोखणे अशक्य होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस यंत्रणेनेही संप्रदायांच्या मुख्य साधू महंतांशी संवाद साधत रामकुंडाकडील प्रवेश भाविकांना खुले करून दिले.

बसस्थानकांमध्ये गर्दी

ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती लावण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून भाविक आले. यामुळे शहराच्या चारही बाजूकडील हाय वेवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ झाली. खासगी वाहतुकीसोबतच ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांनी बससेवेवर भर दिला. परिणामी महामार्ग बसस्थानकासह जुने सीबीएस, ठक्कर बाझार, मेळा स्थानक आणि निमाणी स्थानकातही भाविकांची गर्दी दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धर्मध्वजा अंबरी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाला आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम वाजू लागले. सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त स्नानाचा कार्यक्रम नसून त्यातून मानव कल्याण पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मानवता स्थापित करून दानवांचा संहार करण्याचे हे पर्व असल्याचे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी यावेळी मांडले.

रामकुंड येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजरोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाजी बाजाराच्या पटांगणांत सभेचा कार्यक्रम पार पडला. या सभे दरम्यान मार्गदर्शन करताना ग्यानदास महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाही मिरवणुकीत किंवा स्नानात साधू महंताचे स्थान दुय्यम असते. शाहीस्नान हे साधू महंतांच्या इष्ट देवातांचे असते. त्यांचे स्नान आटोपल्यानंतर आम्ही साधू महंत स्नान रूपी प्रसादाचा लाभ घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. त्यांचा योग्य सन्मान राखण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वाची सुरुवात मंगळवारी झाली. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सरकार, प्रशासन साधू-महंतासमवेत सर्वसामन्यांचा पुढाकार आवश्यक असून त्यातूनच या सोहळ्याचे यथार्थ चित्रण जगभरात पोहचणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विश्वकल्याणाची संकल्पना या कुंभमेळ्यात रुजण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. हरितकुंभ ही संकल्पना अत्यंत यशस्वी होत असल्याचा दावा करीत त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनात कोणतीही कमी राहणार नसल्याचे पालकमंत्र्यानी केले. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुध्दा आयोजनाचे कौतुक करीत यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. समाजाच्या सकारात्मक शक्तीचा योग्य वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी झालेल्या विविध संस्था तसेच व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जगदगुरू हंसदेवाचार्यजी महाराज, जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, महंत ग्यानदासजी महाराज, जगदगुरू हंसदेवाचार्य महाराज, जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज, दिगंबर आखाडा प्रमुख रामकृष्णजी महाराज व रामकिशोर दास महाराज, निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धरमदासजी महाराज, निर्मोही आखाड्याचे प्रमुख राजेंद्रदास महाराज, वल्लभपीठाचे आचार्य वल्लभाचार्य महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, महंत भक्ती चरणदास महाराज आदी उपस्थित होते.

महाजन, महाराज कसे झाले?

पालकमंत्री गिरीश महाजन अनेक महिन्यांपासून कुंभमेळा आयोजनात आहेत. नियोजनात व्यग्र असलेले मंत्री मंडळातील सहकारी महाजन हे महाराज कधी झाले हे कोणालाच समजले नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगताच उपस्थित सर्वांना हसू फुटले.

भक्तगणांची उपस्थिती

नाणिज पीठाचे जगदगुरू नरेंद्र महाराज यांनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने हजर होते. 'नरेंद्र महाराज की जय' अशा घोषणा त्यांच्या भक्तांनी दिल्या.

स्टेजवर गर्दी

गौरी पटांगणावर व्हीआयपी येणार असल्याने निमंत्रितांना सोडावे असे आदेश होते. मात्र, पोलिसांनी ओळखपत्र असलेल्यांना सोडले. त्यामुळे नगरसेवक पोलिसात शाब्दिक चकमकी झडल्या.

शैव-वैष्णवांमध्ये दुरावा कायम

महाराष्ट्र हे महान राष्ट्र असून येथील जनता प्रेमळ आहे. मुख्यमंत्र्यांना एकच काम नसते. त्यामुळे, एखाद्या महंतांनी ते भेटत नाही म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणे योग्य नसल्याची भूमिका महंत ग्यानदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडली. त्र्यंबकेश्वरमधील शैव आखाड्यांचा तसेच तेथील महंताचा नामोल्लेख त्यांनी टाळाला असला तरी शैव वैष्णव आखाड्यांमध्ये अजूनही मतभेद कायम असल्याचे यातून स्पष्ट झाले. हा वाद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार असून मंत्री व ​अधिकारी वादाचा किल्ला कसा लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्त चोख तरीही...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वजारोहणासाठी गर्दी लक्षात घेता नाशिक पोलिसांनी बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन केले होते. मंगळवारी झालेल्या ध्वजारोहणाचा बंदोबस्त म्हणजे पहिल्या पर्वणीची रंगीत तालिम असल्याचे म्हटले जात होते.

बंदोबस्तासाठी सहा पोलिस निरीक्षक, १९ पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, १५० पोलिस कर्मचारी, २० महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली. रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले. मात्र, पायी चालणाऱ्या भाविकांना कोणत्या रस्त्याने जायचे याचे मार्गदर्शन फलक नसल्याने नागरिकांना फेरा पडला. तसेच काही ठिकाणी अनुपस्थितीत उभ्या असलेल्या बॅरिकेड्सवरून नागरिकांनी उड्या मारत रामकुंडावरकडे धाव घेतली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहणासाठी ठराविक लोकांनाच प्रवेश देण्यात येणार होता; मात्र मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच प्रमाणापेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना परतवून लावले. हाच बंदोबस्त कपालेश्वर मंदिराजवळ व वस्त्रांतर गृहा खाली असता तर रामकुंडावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवता आले असते.

भाजी पटांगणावर केंद्रीयमंत्री व मुख्यमंत्री असल्याने तेथे स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. तेथेही अपुरा बंदोबस्त होता. यावेळी स्टेजवर जाण्यावरून पोलिस व नगरसेवक यांच्या शाब्दिक चकमकी झाल्या. काही ठिकाणी पोलिसांच्या मदतीला होमगार्ड होते. मात्र, काही होमगार्ड बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले. मागील सिंहस्थात ध्वजारोहण होण्याआधी बॉम्ब डिस्पोझल स्कॉड तसेच शीघ्र कृतिदल यांची मदत घेण्यात आली होती; मात्र यावेळी बंदोबस्तातील त्रुटी नागरिकांच्या देखील लक्षात येत होत्या.

वस्त्रांतरगृह बनले पर्यटनकेंद्र

सिंहस्थात वस्त्रांतर गृहाचे प्रशासकीय केंद्र केले जाते येथेही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला जातो. मात्र आज याठिकाणी अत्यल्प बंदोबस्त लावण्यात आला होता.

आजच्या बंदोबस्ताबाबत आम्ही समाधानी आहोत. प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार बंदोबस्त लावण्यात आला होता. पुढील काळातही सूक्ष्म नियोजन केले जाईल परिस्थितीनुसार बदल करावे लागतात ते केले जातील.

- एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अन्यथा पाक‌िस्तानला जशास तसे उत्तर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट ही आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असून, पाकिस्तान सोबत मैत्रीसाठी हात पसरलेला नाही तर, हात पुढे केल्याचा खुलासा केंद्र‌िय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लघंन झाल्यास त्याला भारताकडून जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. 'देशाच्या आत्मसन्मान आणि सुरक्षेसाठी आम्हाला जे करता येणे शक्य आहे ते करू' असा दावा त्यांनी केला आहे. सोबतच मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्याप्रकरणी सिंह यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची पाठराखण केली असून, या घोटाळ्याची चौकशी योग्य दिशने सुरू असल्याचा दावा केला आहे.

पत्रकारांशी बोलताना राजनाथ सिंह यांनी रशियामधील मोदी शरीफ भेटीचे समर्थन केले आहे. मोदींनी पाकिस्तान समोर हात पसरवले नाहीत, तर मैत्रीचा हात पुढे केला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही पाकिस्तानसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. हा आंतरराष्टीय राजकारणाचाच एक भाग असतो, असे समर्थन त्यांनी केले. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लघंनाबद्दल बोलताना, राजनाथ सिंह म्हणाले की, सीमेवर शस्रसंधीचे उल्लंघन झाले तर, त्यास जशास तसे उत्तर भारतातर्फे दिले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् फडकला धर्मध्वज !

$
0
0

म.टा. खास प्र‌तिनिधी, ना‌शिक

पहाटेची प्रभा जसजशी फाकू लागली तसतसा वातावरणातील आनंद, जल्लोष वाढू लागला. रामकुंडावरील वातावरण मंत्रघोषांनी भारावून गेलेले होते. धीरगंभीर आवाजातील मंत्रांच्या ऋचा...मंजूळपणे येणारा सनईचा स्वर...वेदमंत्रांचा उच्चार होत असतानाच गुरूजींनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळत यजमान पूजा यथासांग पार पाडत होते. पहाटे चार वाजेदरम्यानच पुजेची झालेली सुरूवात मंगलमय वातावरणात धुप-दीपाच्या दरवळाने आणखी भर घालत होती. गंगा-गोदावरी मंदिर, त्याचा गाभारा, मोठे वस्त्रांतरगृह व शंकराच्या मंदिरासमोरील वस्त्रांतरगृह अशा सर्व इमारतींवर रोषणाई केली होती. ध्वजारोहणानंतर भाविकांनी रामकुंडात स्नान केले.

पावणेसहा वाजता ग्यानदास महाराज व नरेंद्राचार्य महाराज, भक्तचरणदास महाराज यांचे रामकुंडावर आगमन झाले. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा होता. आल्यानंतर त्यांनी ध्वजाला प्रणाम करीत पूजा सुरू असलेल्या ठिकाणी जात गंगेची पूजा केली. तेथून त्यांनी आपला मोर्चा ध्वजारोहणाच्या ठिकाणी वळवत तेथे जाऊन मुहूर्ताची वाट पहाणे पसंत केले.

सहा वाजून दहा मिनिटे झाल्यानंतर पूजा आटोपली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरिश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नानिज धर्मपीठाचे नरेन्द्राचार्य महाराज, ग्यानदास महाराज, गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, श्री गंगा गोदावरी पंचकोठी संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सहा वाजून सोळा मि‌निटांनी गुरूचा ‌सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला व ध्वजारोहण झाल्याची घोषणा झाली.

पुजेसाठी गिरिश महाजन सपत्नीक बसले होते. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या हस्तेही शुध्दीकरणाची एक पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून ध्वजाकडे जात मुहूर्त साधत ध्वजारोहण केले. पुरोहित संघाच्या छोट्या ध्वजाचेही रोहण यावेळी करण्यात आले.

पंडित भालचंद्रशास्त्री शौचे, दिनेश गायधनी, शेखरी शुक्ल, नितीन पाराशरे, अमीत गायधनी, चंद्रशेखर पंचाक्षरी, अतुल गायधनी यांनी मुख्य पुजेचे पौराहित्य केले. गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेले गंगा गोदावरी मातेचे मंदिर ध्वजारोहणानंतर खुले झाले. आज खुले झालेले गंगा गोदावरी मंदिर १५ ऑगस्ट २०१६ पर्यंत खुले राहणार आहे.

...अशी आहे धर्मध्वजा

१५ फूट लांब व साडे चार फूट उंच भगव्या वस्त्रावर एका बाजूने सिंह साकारण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूने अमृतकुंभ साकारलेला असून या देन्ही गोष्टी एम्ब्रॉयडरी केलेल्या आहे. सिंहाची मऊ आयाळ हातांना सुखावेल अशी व कुंभ रंगबेरंगी धाग्यांनी तयार करण्यात आलेली एक अजोड कलाकृती आहे. या ध्वजावर एका बाजूला सिंहाचे चित्र असेल सिंह हे देवांचे गुरू बृहस्पती यांचे वाहन आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात हा ध्वज पुढे १३ महिने डौलाने फडकत राहणार आहे. हा ध्वज टिकाऊ करण्यासाठी त्यावर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.

भाविकांनी गजबजला गोदाघाट

यंदा ध्वजारोहण सकाळी सहा वाजता असूनही भल्या पहाटेपासूनच भाविकांनी रामकुंडावर प्रचंड गर्दी केली होती. 'सियावर रामचंद्र की जय', 'गंगा गोदावरी माता की जय' च्या घोषणांनी पूर्ण गोदाघाट परिसर दणाणून गेला होता. भाविक भल्या पहाटेपासूनच ध्वजारोहणासाठी गर्दी केली होती.

ध्वजारोहणाजवळ धक्काबुक्की

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ध्वजारोहणाजवळ जाण्यासाठी व्हीआयपी भाविकांची प्रचंड गर्दी उडाल्याने काही काळ वातावरण पोलिसांच्या हाताबाहेर गेले होते. अनेकजण ध्वजारोहणाकडे चालून येत असल्याने त्यांना महादेवाच्या मंदिराशेजारीच रोखून धरण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. ध्वजारोहण आपल्याला पहायला मिळावे या भावनेपोटी अनेक व्हीआयपींनी येथे घुसखोरी केल्याने धक्काबुक्कीचा मोठा बाका प्रसंग येथे ओढावला. काही नगरसेवकांनाही पोलिसांनी ध्वजारोहणाजवळ जाण्यास मज्जाव केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजा झाली जड अन् फडकविण्यास अवघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ पर्वकाळात कुशावर्तात देशभरातील सर्व तीर्थ, नद्या, देवदेवता स्नानासाठी येत असल्याची आख्यायिका आहे. त्यांच्या स्वागतासाठी यापूर्वी कापडी ध्वजा उभारण्यात येत असायची. मात्र, यावेळी ताम्रपटाची ध्वजा तयार करण्यात आली आहे. सुमारे ४५ किलो वजनाच्या या ध्वजासाठी लोखंडी ध्वजस्तंभ तयार करण्यात आला आहे. मात्र, या ध्वजस्तंभावर ही ध्वजा फड‌कविण्यास चांगलीच कसरत करावी लागली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे ध्वजा फडकविण्यास लागले.

सन १९८०, १९९२ आणि २००३ या सिंहस्थात कापडी ध्वजा तयार केल्या होत्या. मात्र, यावेळी प्रथमच ताम्रपटाची ध्वजा तयार करण्यास आली. पुरोहित संघाने ध्वजा फडविण्यासाठी सर्व तयारी केली होती. मात्र, ध्वजा जड असल्या कारणाने साठ फुटी लोखंडी पाइपवर ध्वजा फडविण्यास उपस्थितांचा चांगलाम घाम निघाला. सुमारे वीस मिनिटे क्रेनवरील दोघा तिघांची कसरत सुरू होती. ध्वज फडकवून जुना आखाड्याचे श्री श्री १०८ अवधेशानंदगिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभास्थळी पोहोचले मात्र, ध्वजा ध्वजस्तंभावर फडकलेली नव्हती. यामुळे कधी एकदा ध्वजा फडकते असे पुरोहित संघाला वाटत होते. अखेर पुरोहित व भाविकांची प्रतीक्षा वीस मिनिटांनी पूर्ण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापडी ध्वजा झाली ताम्रपटाची

$
0
0

प्रवीण बिडवे, त्र्यंबकेश्वर

'चंद्र, सूर्य कर्केला

आला बृहस्पती सिंहेला

कुशावर्ताच्या काठी

धर्माचा ध्वज उभा राहिला'

या सुरांनी वातावरण मंत्रमुग्ध केले असताना कुशावर्ताच्या काठी प्रत्यक्ष ध्वजारोहणास सुरुवात झाली. पेशवेकाळापासून सागाच्या लाकडावर भगवा कापडी ध्वज फडकविला जायचा. परंतु, यंदाच्या कुंभमेळ्याची गोष्टच न्यारी. ध्वजारोहणाच्या या श्रीमंत सोहळ्यात यंदा प्रथमच २०० किलोच्या स्तंभावर भारदस्त ताम्रध्वज फडकावण्यात आला. पेशवेकालीन परंपरेलाच साजेसे पुढचे पाऊल टाकीत मानकरी मोरे परिवाराने धर्मध्वज फडकविण्याचे आव्हान लिलया पेलले.

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त कुशावर्ताचा परिसर भल्या पहाटेच प्रकाशात न्हाऊन निघाला. मंत्रघोषाने भारलेल्या वातावरणात ध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आल्याने भाविकांच्या नेत्राचे पारणे फिटले. ध्वजारोहणाची घटीका समीप आली. परंपरेनुसार मोरे परिवाराने हा ध्वज उभारावा, असे आवाहन पुरोहितांकडून करण्यात आले. ६५ किलो वजनाचा हा ध्वज दोराच्या सहाय्याने ओढण्यास सुरुवात झाली. गणेश मोरे, अमित मोरे, सोमनाथ मोरे, अभय मोरे, अमोल मोरे अशा तरुण मंडळींनी मानकरी म्हणून या कार्यात मोलाची भूमिका पार पाडली. कुशावर्तापासून तब्बल ४० फुटांवर केवळ लाकडी पट्ट्या आणि निसरड्या पत्र्यावर उभे राहण्याची कसरत करीत ओलसर दोर ओढण्यात आला. हे सर्व पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोकेही त्यावेळी अधिक गतीने न पडतील तरच नवल. शर्थीच्या प्रयत्नांनंतर हा धर्मध्वजा स्तंभावर दिमाखात उभारण्यात आला.

कापडाची जागा घेतली ताम्रपटाने

सागवान लाकूड अन् कापडाच्या मिलाफाने बनविण्यात येणारा पेशवेकालीन धर्मध्वज आज कालौघात नजरेआड झाला आहे. त्याची जागा दोन अडीचशे किलोंच्या ताम्रध्वजाने घेतल्याने सोहळ्याच्या बदलेल्या स्वरुपाची प्रचिती दिली. कालौघात ध्वजपरंपरेत हा बदल झाला असला तरीही धर्मध्वजेच्या अनोख्या डौलात भारदस्त अन् रूबाबदार ताम्रध्वजाने भरच घातली. वर्षभर ही ध्वजा फडकत राहणार आहे.

आमचे पणजोबा, आजोबा, वडीलधारे यांनी यापूर्वी ध्वज फडकावण्याची जबाबदारी पार पाडली. यंदा मच्यासारख्या तरुणांना संधी मिळाली. गत सिंहस्थापर्यंत कुशावर्ताच्या पायऱ्यांवर थांबूनच ध्वज फडकावला जात असे. परंतु कापडी ध्वज वर्षभरात खराब होत असल्याने यंदा ताम्रपटाचा ध्वज बनविण्यात आला. हा ध्वज भारदस्त असल्याने अधिक उंचीवर जाऊन तो आम्हाला वर ओढावा लागणार होता. जबाबदारी व्यवस्थित पार पडावी या काळजीने आमचा रात्री डोळाही लागला नाही. हा मान मिळाल्यामुळे भाग्यशाली समजतो.

- गणेश मोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री विद्येची आराधना फक्त त्र्यंबकलाच

$
0
0

अनिल पवार, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथे सिंहथ्स काळात अनुष्ठाण, कुंभाच्या सर्व पूजा, अभिषेक, त्रिकाल संध्या होणार असली तरी श्री विद्येच्या उपासनेला सर्वाधिक महत्त्व आहे. फक्त त्र्यंबकेश्वर येथेच ही पूजा होत असते. पिंपळद येथील जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर नगर येथे पूर्ण सिंहस्थ काळात श्री विद्येचीच आराधना केली जाणार आहे, असे श्रीपंच दशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर, आचार्य महामंडलेश्वर १०८ श्री श्री अवधेशनंदगिरीजी महाराज यांनी सांगितले.

श्री विद्येचा जन्म हा त्र्यंबक येथे झाला. त्यामुळे सिंहस्थ संपेपर्यंत श्री विद्येचीच आराधना करणार आहोत. नीलपर्वतावरील निलांबिका माता पार्वती माताच आहे. श्री विद्येची आराधना म्हणजे पार्वती मातेची आराधना आहे. पार्वती मातेची गूढ, गोपनीय पूजा म्हणजेच श्री विद्या, असे आचार्य महामंडलेश्वर १०८ श्री श्री अवधेशनंदगिरीजी महाराज यांनी नमूद केले. श्री विद्येची साधना ही प्रत्येकाला येत नाही. लाखो लोकांमध्ये दोन चार लोकांना श्री विद्येची साधना येत असते. त्यासाठी बारा बारा वर्षे साधना करावी लागते. तेव्हा कुठे श्री विद्येची साधना करता येते. यामुळे आचार्य हे फक्त साधनाच करीत असतात, अवधेशनंदगिरीजी महाराज यांनी स्पष्ट केले. पिंपळद येथे अवधेशनंदगिरीजी महाराज यांच्यासाठी खास महामंडलेश्वर नगर तयार करण्यात आले आहे. येथे जुना आखाड्याचे साधू, महंत, आचार्य, महामंडलेश्वर हे अभिषेक व पूजा करणार आहेत. यासाठी महामंडलेश्वर नगरची खास रचना करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोमेश्वरानंद सरस्वतींना नो एन्ट्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील तपोनिधी आनंद आखाड्याचे महंत श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांना नाशिक येथील ध्वजारोहणासाठी प्रवेश नाकारल्याने षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्यासह साधू-महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. नाशिकचे पुरोहित सतीश शुक्ल यांनी महंत ग्यानदास यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचे श्री सोमेश्वरानंद महाराज यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.

त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या बेझे येथे श्रीराम शक्तीपीठाचे संस्थापक धर्माचार्य महंत श्री सोमेश्वरानंद सरस्वती हे त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती यांचे शिष्य आहेत. मध्यंतरी त्यांनी नाशिक रामघाटावर गंगास्वच्छता सारखे अभियान राबविले. तेव्हा त्यांच्या पाच हजार भक्तांनी यात सहभाग घेतला होता. त्यांना नाशिक येथील सतीश शुक्ल यांनी ध्वजारोहणाचे निमंत्रण दिले होते. तसेच महंत सोमेश्वरानंद महाराज हे परवा सायंकाळी नाशिक येथे झालेल्या शोभायात्रेत पाच हजार भक्त घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. नाशिक येथे पास मागितला असता त्यांनी निमंत्रक सतीश शुक्ल यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी तुम्ही निघून जा तुम्हाला नाशिक येथील ध्वजारोहणाच्या समारंभात सहभागी होता येणार नाही, असे सांगितले. याबाबत कारण विचारले असता सतीश शुक्ल यांनी असे ग्यानदास महाराजांचे म्हणने आहे, कारण तुम्ही शैव साधू आहात तसेच स्वामी सागरानंद महाराज यांचे शिष्य आहाता तुम्ही येथे यायला नको अन्यथा शैव वैष्णव वाद पुन्हा निर्माण होईल असे स्पष्ट केले. सोमेश्वरानंद महाराज या प्रकरणाने संतप्त झाले आहेत. दरम्यान, ध्वजपर्व हा पुरोहितांचा विषय आहे, असे म्हणणो ग्यानदास महाराज आता ध्वजपर्वाबाबत का लुडबुड करीत आहेत, असा सवाल सोमेश्वरानंद महाराज यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठी फडणवीस, ठाकरेंचे साकडे

$
0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ ध्वजारोहणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन पाऊस पडावा, असे साकडे घातले.
त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे कुंभमेळा आणि पंढरपूरची वारी असा हा अध्यात्मिक यात्रेचा योग जुळून आला आहे. या तीन ठिकाणी देवदेवतांच्या साक्षीने राज्यावरचे संकट दूर व्हावे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर ये‌थे सांगितले. त्यांच्या समवेत खासदार हेंमत गोडसे, आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. कुशावर्तावर त्यांनी गंगापूजन केले. पौरोहित्य लक्ष्मीकांत थेटे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत महंत हरीगिरी महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. येथे मंदिर विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. पाऊस पडावा, दुष्काळ दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकराजाला साकडे घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहण सोहळ्याचे हृदयात कोंदण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूपाळीचे मधूर स्वर... ब्रह्मगिरीच्या कुशीतील कुशावर्तावर धुक्याने धरलेला मांडव... सुवासिक फुलांचा दरवळ... आकर्षक रोषणाईने कुशावर्ताच्या शांत डोहावर उमटलेली रंगछटा...अन् मंत्रोच्चारांनी वातावरणात पुरून उरलेले चैतन्य यामुळे त्र्यंबकनगरीमध्ये दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत असल्याचाच जणू हा आभास. बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दिमाखदार ध्वजारोहण सोहळ्याने केवळ नेत्रांचे पारणेच फेडले नाही तर, सर्वांच्याच हृदयात कोंदणही केले.

एरवी रात्रीच्या निरव शांततेत ध्यानस्थ योग्यासारख्या भासणाऱ्या कुशावर्तावर आज भल्या पहाटेच भाविकांची मांदीयाळी जमू लागली. ध्वजारोहणाची तयारी करणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सबंध रात्र कुशावर्ताच्या सानिध्यात घालवली. त्यांना सोबत होती सुरक्षेची काळजी वाहणाऱ्या पोलिसांची. सकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी ध्वजारोहण होणार असले तरी पहाटे चारपासूनच भाविक तेथे आसनस्थ होऊ लागले होते. भूपाळी, त्र्यंबेकश्वर महिला मंडळाने सादर केलेले स्वागतगीत, ध्वजारोहण गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले. नवीन, कडक इस्त्रीचे कपडे परिधान करून घरच्या कार्यासारखे वावरणारे त्र्यंबकवासी ध्वजारोहण सोहळयात कमतरता राहणार नाही याची काळजी घेत होते. त्यामुळेच हा सोहळा नीटनेटका पार पडण्यास मदत झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राज्याच्‍या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनघा फडके आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. मंत्रघोषात ध्वजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. धार्मिक विधी पार पडल्यानंतर कुशावर्तावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हा क्षण अनेकांनी कॅमेऱ्यात टिपलाच परंतु, त्याचबरोबर हृदयातच्या कुपीतही साठविला. गंगेची आरती झाल्यानंतर पुरोहितांसह सर्वांनीच हर हर महादेवचा जयघोष केला. बॅन्ड पथकाकडून सादर होणाऱ्या सुमधूर भक्तिगीतांनी वातावरणात चैतन्य संचारले. मोरे परिवाराने स्तंभावर ध्वज उभारल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, लोकशास्त्री अकोलकर आदींनी परिश्रम घेतले.

पासाअभावी सामान्यांची निराशा

कुशावर्तावर होणारा ध्वजारोहणाचा सोहळा पाहण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. मात्र केवळ पासधारकांनाच कुशावर्तावर सोडण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांची निराशा झाली. स्क्रीनवरच हा सोहळा पाहून त्यांना स्वत:चे समाधान करून घ्यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वाला जोडणारी संस्कृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेवर

भारतीय संस्कृती ही साऱ्या विश्वाला जोडणारी आहे. भारताने सर्व धर्मांचा सन्मान केला आहे. देशात भिन्न संस्कृती, धर्म असले तरी 'सारे विश्वची माझे घर' चा संदेश येथील साधू-संतांनीच दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा फक्त अध्यात्मिक सोहळा नाही तर एक मोठे सांस्कृतिक केंद्र आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथे काढले.

त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघातर्फे आयोजित ध्वजारोहण सोहळा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी श्रीपंच दशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर, आचार्य महामंडलेश्वर १०८ श्री श्री स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्षा अनघा फडके, षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री श्री महंत हरीगिरी महाराज, उपाध्यक्ष श्री महंत राजेंद्रसिंह महाराज, प्रवक्ता श्री महंत डॉ. बिंदू महाराज, पुरोहित संघाचे जयंत शिखरे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा नगरपालिका पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

सिंह पुढे म्हणाले की, धर्मगुरू मंचवर असतात तेव्हा आपण प्रवक्ता नाही तर श्रोत्याची भूमिका वठवायची असते. विश्वकल्याणाचा संदेश याच भूमीतून दिला गेला. यामुळे भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत साधू-महंतांना अभिवादन करण्याबरोबरच त्यांनी सिंहस्थ सोहळ्याच्या शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री अवधेशानंदगिरी महाराज म्हणाले की, भारत हा अतिथी देव भव मानणारा देश आहे. भारतीय संस्कृती ही 'नर का नारायण' करणारी आहे. प्रेरणा, उर्जा देणारी ही संस्कृती आहे. पाश्चिमात्य संस्कृती संसाराला बाजार मानतात तर, भारतीय संस्कृती ही परिवार मानणारी आहे. दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारी संस्कृती भारतातच पहायला मिळते. कोणाच्याही स्वाभिमानाला ठेच न पोहोचवणारी ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुकही केले. तसेच भाविकांनी या सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही केले.

ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मानवतेचा सन्मान करणारा का कुंभ आहे. मानवतेच्या सेवेसाठी कुंभपर्वातून उर्जा प्राप्त होईल. कर्म आणि धर्म दोन्ही मानवासाठी गरजेचे आहेत. प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपेद्रसिंह कुशवाह यांनी केले. सिंहस्थात पन्नास हजारापेक्षा जास्त मनुष्यबळ, वीस हजार पोलिस, सीसीटीव्ही, साधुग्राम, वाहनतळ अशा विविध सुविधांची उभारणी केली असल्याचेही नमूद केले. आखाड्यांचे साधू-महंत, नगरसेवक, प्रशासन अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देगा पावसाचे दान देवा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जुलै महिना सरत चालला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून, सुजलम सुफलम महाराष्ट्रासाठी पावसाचे दान दे' अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामरायासहीत तमाम साधुमहंतांकडे केली. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण सकाळी ६ वाजून सहा मिन‌िटांनी पार पडले. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपादामंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज यांच्यासमवेत अनेक लोकप्रतिनिधी तसेच साधुमहंत हजर होते. राज्याच्या दृष्टीकोनातून कुंभमेळ्याच्या आयोजनाला महत्त्व आहे. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी झटत आहेत. शक्य त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न सरकारने केला असून, त्यात काही त्रुटी राहिल्यास साधुमहंतांनी क्षमा करण्याचे आवाहन त्यांनी केले. गोदावरी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांवरच आहे. हा सरकारी कार्यक्रम नसून हरीत कुंभ हीच नवी ओळख जगभरात प्रस्थापीत करण्यासाठी सर्वांनी झटण्याचे आवाहन त्यांनी केले.

राजशक्ती नतमस्तक

धर्मशक्तीसमोर राजशक्ती ही छोटीच असते. पुरातन काळापासून हेच वास्तव आहे. धर्मशक्तीसमोर राजशक्ती नतमस्तक असल्याची कबुली मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांनी दिली. भाजपाचा हिंदुत्ववादी चेहरा यानिमित्ताने समोर आला असून, धर्मनिरपेक्षता या तत्वाची तसेच राज्य घटनेची पायमल्ली होत असल्याची टिका स्थानिक काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

साधुग्रामसाठी जागा आरक्ष‌ित होणार

इतर ठिकाणांच्या तुलनेत नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करणे नेहमीच आवाहन असते. नदीचा घाट, साधुग्रामची जागा या त्यातील प्रमुख अडचणी आहेत. यंदा प्रशासनाने मोठ्या घाटाची निर्मिती केली आहे. तर साधुग्रासाठी ३५० एकर जागेचा वापर होणार आहे. मात्र, दर सिंहस्था दरम्यान जागा भाड्याने घेतान अनंत अडचणी येतात. शेवटपर्यंत जागेचे वाद सुरू असतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच साधुग्रामची जागा कायमस्वरूपी आरक्ष‌ित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेब, रात्री झोपलेच नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

पुरोहित संघाच्या ध्वजारोहणासाठी यावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री येणार असल्याने पोलिस अधिकाऱ्यापासून ते नगरपरिषदचे कर्मचारी, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल तसेच अन्य विभागांचे अधिकारी डोळ्यात तेल घालून तयारीसाठी जुंपले होते. यामुळे रात्रीचा दिवस केव्हा झाला हे ही कळालेच नाही, असे अधिकारी एकमेकांना सांगत होते. यामुळे कर्मचारीही म्हणत होते साहेब, रात्री झोपलेच नाही...!

त्र्यंबकमध्ये यावेळी पुरोहित संघ, नगरपरिषद व आखाडा परिषदेने संयुक्तपणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केल्याने यावेळचे ध्वजारोहण आगळेवगळे ठरले. यामुळे सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना नियोजनासाठी तारेवरची कसरत करावी लागली. आधीच टीकेचे ध्वनी झालेल्या अधिकाऱ्यांनी ध्वजारोहण समारंभात तरी शान राखली. यासाठी रात्रभर अधिकाऱ्यांचे नियोजन सुरू होते. त्र्यंबकेश्वर ग्रामीण पोलिसांच्या कक्षेत येत असल्याने जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातून कर्मचाऱ्यांना त्र्यंबकेश्वर येथे तैनात करण्यात आले होते. यामुळे ज्यांची राहण्याची सोय नाही त्यांना रात्री तसेच मिळेल त्या वाहनाने त्र्यंबक गाठावे लागले. यामुळे रात्रभर त्यांच्यावर जागे राहण्याची वेळ आली. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री त्र्यंबक मुक्कामी असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आला होता. पहाटे पाच वाजताच मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यामुळे रात्रीच बॅरिकेटींग करण्यात आली. यामुळे पोलिसांना रात्र नियोजनात खर्ची घालावी लागली. कोण कोण येणार आहेत, याची साधी कल्पनाही काही पोलिस कर्मचाऱ्यांना नव्हती. साहेब कोण कोण येणार आहेत हो, असा सवालही उपस्थित करण्यात येत होता.

फिल्ट्रेशनमुळे पाणी शुध्द

फिल्ट्रेशन प्लांटमुळे कुशावर्ताचे पाणी शुध्द दिसत होते. यासाठी चोवीस तास फिल्ट्रेशन प्लांट सुरू होता. तासाला एक लाख लिटर याप्रमाणे कुशावर्तातील पाणी शुध्द करण्यात आले. कुशावर्तात नऊ लाचा लिटर पाणी शुध्दीकरणाचे काम रात्रभर सुरू होते. दिवसाला पन्नास हजार लिटर बॅकवॉश वॉटर यासाठी खर्ची होते. या पाणी शुध्दकरणासाठी दिवसाला इलेक्ट्रीक बिलासह पाचशे रुपये खर्च येतो. कुशावर्तातील पाणी शुध्द दिसावे म्हणून फिल्ट्रेशन प्लांटचे कर्मचारी रात्रभर जागेच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ आरंभ

$
0
0

टीम मटा

नाशिककरांसह संपूर्ण राज्य व देशाला प्रतीक्षा व उत्कंठा असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वाला मंगळवारी (दि.१४) गोदातीरी ध्वजारोहण सोहळ्यानंतर औपचारिक सुरुवात झाली. भल्या पहाटे धूप-दीपाच्या दरवळीत धीरगंभीर आवाजातील मंत्रांच्या ऋचा, मंजूळपणे येणारा सनईचा स्वर, वेदमंत्रांचा उच्चार अशा भारलेल्या वातावरणात रामकुंड तसेच कुशावर्तावर पूजाविधी आटोपल्यानंतर लागलीच `सियावर रामचंद्र की जय` अशा घोषणाबाजीत धर्मध्वजा फडकविण्यात आली.

नाशिकला सकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी, तर त्र्यंबकेश्वरला सहा वाजून ४० मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडला. या वेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त हेही विशेष. नाशिकला प्रमुख साधू-महंताबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तर त्र्यंबकनगरीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण सोहळ्यानंतर नाशकात भाजी बाजाराच्या पटांगणांत सत्कार सोहळा झाला. जुलै महिना सरत असतानाही चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून, सुजलम सुफलाम महाराष्ट्रासाठी पावसाचे दान दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तर कुंभमेळ्यातून मानव कल्याण पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मानवता स्थापित करून दानवांचा संहार करण्याचे हे पर्व असल्याचे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्त केले. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी तसेच साधूमहंत या वेळी उपस्थित होते.

भारतीय संस्कृती विश्वाला जोडणारी

भारतीय संस्कृती ही साऱ्या विश्वाला जोडणारी आहे. भारताने सर्व धर्मांचा यथोचित सन्मान केला आहे. देशात भिन्न संस्कृती, धर्म असले तरी 'सारे विश्वची माझे घर'चा संदेश येथील साधू-संतांनीच दिला आहे. कुंभमेळा हा फक्त अध्यात्मिक सोहळा नाही तर एक मोठे सांस्कृतिक केंद्र आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघातर्फे आयोजित ध्वजारोहण सोहळा राजनाथ यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी श्रीपंच दशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर, आचार्य महामंडलेश्वर १००८ श्री श्री स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज होते.

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

ध्वजारोहण झाल्यानंतर अचानक घर्रर्रर्रर्र आवाज करीत आभाळात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. पहिल्या फेरीत आकाशात ध्वजाच्या बरोबर वर येत त्यातून पुष्पवृष्टी करण्यात आली. मात्र, हवेचा जोर अधिक असल्याने पुष्प इतर ठिकाणी उडून गेले. परंतु, हेलिकॉप्टरने हार न मानता पुन्हा दुसरा चक्कर टाकत हवेत पुष्पवृष्टी केली. यावेळी मात्र पुष्प योग्य जागी पडल्याने बराच वेळ गांधीज्योतीवर घर्रर्रर्रर्र करीत हेलिकॉप्टर पायलटने आनंद व्यक्त केला. ही पुष्पवृष्टी पाहून अनेक ज्येष्ठांनी गेल्यावेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जागा केल्या. मागील सिंहस्थात गगनबावडाचे गगनगिरी महाराज यांनी कुंभमेळ्यावर पुष्पवृष्टी केली होती. हेलिकॉप्टरच्या आगमनानंतर भाविकांमध्येही प्रचंड उत्साह संचारल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात साध्वींना वेगळी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशिल असलेल्या साध्वी आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोरच सभामंडपात खडाजंगी झाली. साध्वींच्या हातातील माईक बंद असल्याने संन्याशीमधील वाद भक्तापर्यंत पोहचला नाही.

स्वाधींना आंघोळीसाठी तसेच राहण्यासाठी वेगळी जागा देण्याची मागणी सर्वेश्वरी महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाडा (परी)च्या प‌‌ीठाधीश्वर त्रिकाल भवंता अनेक महिन्यांपासून करीत आहेत. मात्र, त्यांना साधुग्राममध्ये वेगळी जागा देणे शक्य नसल्याचे ग्यानदास महाराजांनी निक्षुण सांगितले आहे. साध्वींना साधुग्राममध्ये जागा दिल्यास अनी आखाड्यातील साधुमहंत सहन करणार नाही, अशी भूमिका महंत ग्यानदास यांनी घेतली आहे. त्रिकाल भवंता जागेसाठी आग्रही असून, आज सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पार पडलेल्या सभेच्या व्यासपीठावर महंत ग्यानदास आणि त्रिकाल भवंता एकत्र आले. कार्यक्रमाच्या शेवटी भवंता यांनी माईक घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, माईक बंद होता. महंत ग्यानदास आणि त्रिकाल भवंता यांच्यात खटके उडाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच होते. मात्र, धर्मशक्तीपुढे नतमस्तक होण्याचा त्यांचा 'पण' त्यांनी कायम ठेवला. तिथे उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच महाराजांनी हस्तक्षेप करीत वादावर पाघंरूण घालण्याचा प्रयत्न केला. भवंता यांच्या हातातील माईक बंद असल्याने भाविकांना दोघा सन्यांशामधील जागेच्या वादाची माहिती पोहचू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर १२ वर्षांनी उघडणारे मंदिर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकमधील रामकुंड येथे असलेल्या श्री गंगा गोदावरी मंदिराचे दरवाजे तब्बल १२ वर्षांनी उघडण्यात आले. भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे ११ ऑगस्ट २०१६ पर्यंतच उघडे असतील नंतर पुन्हा एकदा १२ वर्षांसाठी मंदिराचे दरवाजे बंद होणार आहेत.

ही एक धार्मिक पंरपरा आहे. श्री गंगा गोदावरी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर कुंभमेळ्याची सुरुवात होते. यंदा सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठी सुरु झाला आहे. पुजारी एस. डब्ल्यू. जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी मंदिराचे दरवाजे उघडले आणि देवी गोदावरी हिची विधीवत पूजा केली. या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजा झाल्यानंतर आतापर्यंत हजारो भाविकांनी देवी गोदावरी हिचे दर्शन घेतले आहे.

मंदिराचे दरवाजे १२ वर्षांसाठी बंद होतील त्यावेळी मंदिराबाहेरुनच भाविक प्रतिकात्मक पद्धतीने देवीची पूजा करतील. मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडेपर्यंत म्हणजे तब्बल १२ वर्षे ही प्रतिकात्मक पूजा सुरु राहणार आहे.

श्री गंगा गोदावरी मंदिराजवळच देवी-देवतांची १०८ मंदिरे आहेत आणि रामकुंडही आहे. भाविकांसाठी हा परिसर अतिशय पवित्र आहे. रामकुंड येथे कपालेश्वर मंदिर आहे. शंकराच्या या मंदिरात प्रवेशद्वारावर नंदी ऐवजी एक बैल आहे. यासाठी एक कथा सांगितली जाते. शंकराला ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी रामकुंडात स्नान करण्याचा सल्ला नंदीने दिला होता. हा सल्ला देणा-या नंदीला शंकराने गुरुस्थान दिले होते, त्यामुळे या मंदिरात नंदी ऐवजी प्रवेशद्वारावर बैल आहे.

रामकुंड येथे वनवासाच्या काळात राम, सीता आणि लक्ष्मण यांनी मुक्काम केला होता आणि याच ठिकाणापासून ८ किमी. अंतरावर अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाला होता, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५५ जणांना अतिसाराची लागण

$
0
0

सटाणा : तालुक्यातील नवेगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील दूषित पाण्यामुळे ५५ ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली. या रुग्णांवर निरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

नवेगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्याने गावातील विहिरीत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन दिवसापासून टँकटरने पाणीपुरवठा न झाल्याने शिल्लक असलेले दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने यामध्ये सुमारे ५५ जणांना अतिसाराची लागण झाली. त्यांना तातडीने जवळच्या निरपूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले. तीन रुग्णांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नवेगाव येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. व्ही. सोनवणे यांनी तातडीने भेट देऊन रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधाापचार केले. नवेगाव येथे आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात आली आहे असून, टँकर तसेच विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी सांगितले. विहिरीतील गाळ, परिसर व स्त्रोत संपूर्णपणे स्वच्छ करण्यात असल्याची माहिती उपसरपंच दादाजी वाघ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहरीपणाचा ‘फेर’ अन् संकटात ‘पेर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या तब्बल २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यातील ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा पेरण्या झालेली पिकं धोक्यात सापडली आहेत. गेली दोन वर्षे पुरेशा पावसाअभावी दुष्काळसदृश टंचाई परिस्थितीशी सामना करता करता नाकीनऊ आलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भोवती यंदाही निसर्गाच्या लहरीपणाने मोठा 'फेर' धरल्याने झालेली 'पेर' संकटात सापडली आहे.

कशीबशी तगवलेली खरिपाची पिकं बाळसं धरण्याअगोदरच पाण्याअभावी आता माना टाकू लागल्याने कष्टकरी बळीराजाचा कणा मोडण्याची वेळ आली आहे. दुबार पेरणीच्या संकटाने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन वर्षे पावसाळ्यात पावसाने मोठा दगा दिल्याने खरिपाची वाताहात झालेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गळयातील अस्मानी संकटामुळे येणारं दुखाचं लोढण यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी होण्याच्या मार्गावर दिसत नाही.

शेतकऱ्यांनी जून महिन्यातील प्रारंभीच्या मृगाच्या काहीश्या बऱ्या पावसावर पेरण्या केल्या होत्या. मात्र, आता गेल्या तब्बल २० दिवसांपासून पावसाच्या एका थेंबाचा देखील पत्ताच नसल्याने मोठा खर्च करीत केलेल्या खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी थकबाकीदारांना ३१ जुलैपर्यंत ‘अभय’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या कित्येक दिवसांपासून मालेगाव मनपाच्या कर व एलबीटी वसुलीत कमालीची घट झाली आहे. यामुळे मनपा आर्थिक संकटात सापडली असून, मासिक आठ कोटी खर्च भागवणे देखील अशक्य झाले आहे. यामुळे व्यापाऱ्यांची बैठक घेऊन ३१ जुलैपर्यंत थकीत एलबीटी भरण्याचे आवाहन करण्याबरोबरच एलबीटी न भरल्यास कारवाईचाही इशाराही मनपा आयुक्तांनी दिला आहे. थकीत एलबीटी व्यापाऱ्यांनी भरावी म्हणून मनपा आयुक्त डॉ. लतीश देशमुख यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात एलबीटी संदर्भातील अभय योजनेची माहिती देण्यात आली असून, ३१ जुलैअखेर थकीत एलबीटी भरण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मात्र व्यापाऱ्यांची एलबीटी थकीत राहिल्यास सक्तीने वसुलीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

राज्य सरकारने व्यापाऱ्यांनी एलबीटी भरावा यासाठी अभय नावाने योजना आणली असून, त्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी या बैठकीत दिली. अभय योजनेनुसार व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील थकीत एलबीटी भरण्यासाठी ३१ जुलैअखेर मुदत दिली आहे. या मुदतीत भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. मालेगाव मनपाकडे एलबीटी अंतर्गत एकूण ४ हजार ३०० व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, जवळपास सर्वच व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरण्यात अनियमितता आढळून आली आहे. तीनशे मोठ्या थकबाकीदारांना मनपाने नोटिसा बजावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images