Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिक्षण समिती पुन्हा आव्हानाच्या फेऱ्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीचा ठराव निलंब‌ित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिक्षण समिती सदस्य संजय चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमवारी त्यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. अभय ओक यांच्या पिठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली असून, मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे. शिक्षण समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच, नगरविकास विभागाने अध्यादेश काढत महापौरांचा शिक्षण समिती तयार करण्याचा ठराव निलंबित केला. त्यामुळे निवडणूक प्रक्र‌िया स्थग‌ित झाल्याने चव्हाण यांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता म्हणे रामकुंड फोडा...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन सिंहस्थाच्या तोंडावर रामकुंडातील काँक्रीट फोडून पाण्याचे झरे जिवंत करा, अशी अद्भूत मागणी करून महंत ग्यानदास महाराज यांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. महंतांपुढे नतमस्तक होणारे अधिकारी आतापासूनच जेरीस आले असून, कुंभमेळ्यापूर्वीच आखाडा रंगत असल्याचे पहावयास मिळत आहे. वस्त्रांतरगृहाची इमारत पाडा, अशी अशक्यप्राय मागणी करीत महंत ग्यानदास महाराजांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला वेठीस धरले होते. अलीकडेच साधुग्राममधील कामांबाबत नाक मुरडत कुंभमेळा होऊ देणार नाही, असा थयथयाटही करून झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रथमच दाखल होताना महंत ग्यानदास महाराज यांनी वाढलेल्या अतिक्रमणांबाबत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली नाहीत तर सिंहस्थ कुंभमेळा होऊ देणार नाही, असा इशारा देऊन त्यांनी प्रशासनाची झोप उडविली होती. त्यानंतरही ग्यानदास महाराज यांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानत सिंहस्थाची तयारी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो आहे. शाही मिरवणुकीतील ध्वजांना वस्त्रांतरगृह इमारतीचा अडथळा होईल तसेच सूर्यकिरणेही रामकुंडात पडणार नाहीत या कारणास्तव वस्त्रांतरगृहाची इमारत पाडावी अशी मागणी ग्यानदास महाराज यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी आपली नव्हे तर स्थानिक आमदारांची होती असे म्हणून त्यांनी घुमजाव केले. अशा एक ना अनेक मागण्या प्रशासनाकडून पूर्ण करवून घेणाऱ्या साधू महंतांनी आता काँक्रीटने बांधलेले रामकुंड फोडण्याची मागणी केली आहे.

रामकुंड स्विमींग टँक बनला असून, काँक्रीट फोडून आतील पाण्याचे झरे मोकळे करा अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्याने अधिकारी आवाक झाले. हे काम प्रशासनासाठी अवघड नसून ते लवकरात लवकर मार्गी लावावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

साधू एक, मागण्या अनेक !

किमान तीन महिने साधू महंतांचा नाशिकमध्ये मुक्काम राहणार असल्याने त्यांचे बरेचसे सामान वाहनांद्वारे नाशिकमध्ये आणले जाणार आहे. अशा वाहनांकडून रोड टॅक्स आकारला जाऊ नये अशीही मागणी साधुमहंतांनी केली आहे. साधूंना २४ तास कोठेही फिरता यावे, पोलिसांनी हटकू नये असे पास दिले जावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आखाड्यांसमोर आरसीसी प्रवेशद्वार उभारा, नवीन मोबाइल स‌िम द्या, अशा अनेक मागण्या आजच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरी कंपनीही रनवेवर

0
0

१३ जुलैपासून मिळणार सेवा; तिक‌ीट दर ४९९९

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतिक्ष‌ित असलेली मेहेर कंपनीच्या नाशिक ते पुणे विमानसेवेने सोमवारी टेक ऑफ घेताच नाशिककरांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. मेहेर पाठोपाठ आता येत्या १३ जुलैपासून श्रीनिवास एअरलाईनची पुणे विमानसेवाही नाशिककरांना मिळणार असून, त्याची घोषणा सोमवारीच करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांचा पुणे प्रवासाला आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

नाशिककरांची विमानसेवेची उत्कंठा अखेर सोमवारी दूर झाली आहे. मेरिटाईम एनर्जी हेलि एअर सर्व्हिस लि. (मेहेर) या कंपनीची ही सोमवारी सकाळपासून सुरु झाली. यामुळे हवाई कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर नाशिक आले आहे. मेहेर कंपनीचे ९ आसनी सी प्लेन सोमवारी सकाळी हवेत झेपावल्यानंतर नाशिकच्याच श्रीनिवास एअरलाईनने येत्या १३ जुलैपासून पुणे सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. ६ आसनी विमानाद्वारे सोमवार ते शनिवार दररोज सकाळी आणि संध्याका‍ळी सेवा देण्याची घोषणा कंपनीचे संचालक गणेश बिने यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक-पुणे सेवेसाठी ४९९९ रुपये आकारण्याचे श्रीनिवास एअरलाईनने जाहीर केल्याने मेहेर कंपनीकडून सध्या आकारण्यात येणाऱ्या ६९९९ रुपयांच्या भाड्यातही मोठी कपात येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. पुणे सेवेसाठीच्या या स्पर्धेतून नाशिककरांना त्याचा अधिक लाभ होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळी मेहेर कंपनीच्या विमानसेवा शुभारंभप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, एचएएलचे सीओओ दलजितसिंग, मेहेरचे संचालक सिद्धार्थ वर्मा, एस. के. मन, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव उपस्थित होते. शुभारंभीच्या सेवेत प्रथम प्रवासी रुचा जायखेडकर, खासदार गोडसे, शेहनाज पटेल, आमदार हिरे, त्यांची कन्या रुचा हिरे यांनी प्रवास केला. तर, या सेवेचे सारथ्य कॅप्टन एन. गौतम यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थातील दुर्घटनांची जबाबदारी साधुंचीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकारात साधूंकडून हस्तक्षेप केला जातो आहे. त्यामुळे सिंहस्थ काळात दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर ढकलण्याऐवजी साधुंवरच निश्चित करायला हवी, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून सिंहस्थाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या तयारीमध्ये वारंवार साधुमहंतांकडून हस्तक्षेप केला जात असून, प्रशासनावर निर्णय लादण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासनाला नाईलाजास्तव या सूचनांचा अंगीकार करून त्यानुसार बदल करावे लागत आहेत. पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी कौटुंबिक जबाबदाऱ्या विसरून स्वत:ला कुंभमेळ्याच्या तयारी झोकून देत आहेत. परंतु आखाडे आणि साधु यांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. केवळ स्वत:च्या सोयी सुविधांसाठी सबंध यंत्रणा राबवून घेतली जात आहे. साधुंकडून सुचविले जाणारे बदल प्रशासन अंमलात आणत आहे. त्यामुळे सिंहस्थ काळात काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारीही साधुंवरच निश्चित करायला हवी असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाडा परिषद रजिस्टर्ड संस्था नाही

0
0

आखाडा परिषदेची स्थापना, त्याची रचना, अध्यक्षाची निवड कशा प्रकारे केली जाते याबाबत अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ते व सल्लागार बिंदू महाराज यांनी ऊहापोह केला. कुशावर्तावरील गर्दीच्या नियोजनाबाबतही त्यांनी माहिती दिली.

आखाडा परिषदेची रचना कशी असते?

पूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषद ही तत्कालिक संस्था होती. तेरा पंचायती आखाड्यांची बैठक व्हायची. मतभेद मिटविणे, शासनाकडे मागण्या करणे, शासनाशी चर्चा करणे आदी कामे करण्यासाठी आखाडा परिषदेची रचना करण्यात येऊन अध्यक्ष निवडले जातात. एक मंत्री, अध्यक्ष, संयुक्त मंत्री, कोतवाल, खजिनदार अशी या परिषदेची रचना आहे. कुंभमेळ्यापुरतीच ही समिती होती. नंतर आपोआप ही समिती बरखास्त व्हायची. मात्र, यात कालांतराने बदल करण्यात आले.

अध्यक्षपदाचा कार्यकाल किती असतो?

अखिल भारतीय आखाडा परिषदेची समिती ही तात्कालिक होती. यामुळे सिंहस्थापुरताच अध्यक्षांचा कार्यकाल असायचा. मात्र, सन २००४ मध्ये उज्जैन येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाचा कार्यकाल पाच वर्षे करण्यात आला. सन २००४ मध्ये महंत ग्यानदास यांना अध्यक्ष केले. यामुळे त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपलेला आहे. अलाहाबाद येथेही या मुद्यावरून वाद उपस्थित झाला होता. नाशिकमध्येही हा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे.

अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेची स्थापना कशासाठी करण्यात आली?

सन १९७९-८० पासून त्र्यंबकेश्वरला एक वर्ष सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. मग, शासनाशी कोण बोलणी करणार म्हणून येथे अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेची स्थापना करण्यात आली. श्री पंचायती अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज, श्री तपोनिधी आंनद आखाड्याचे महंत स्वामी सागरानंद सरस्वती यांनी अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. या संस्थेला त्यांनी रजिस्टरही केले आहे. सिंहस्थात ही संस्था महाराष्ट्रातील कामे पहाते. अलाहाबाद, उज्जैन आदी ठिकाणी अखिल भारतीय आखाडा परिषद कामे पहात होती.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नेमके कोण?

दहा शैव व तीन वैष्णव आखाड्यांनी महंत नरेंद्रगिरी महाराज यांची निवड केली आहे. यामुळे तेच अध्यक्ष आहेत. महंत ग्यानदास यांचा कार्यकाल संपला आहे. त्र्यंबकेश्वर व नाशिक या दोन ठिकाणी सिंहस्थ होत असल्याने हा वाद उभा राहिला आहे. उज्जैन येथे एकाच ठिकाणी कुंभमेळा भरतो. तेथे हा वाद उपस्थित होणार नाही. आखाडा परिषद ही रजिस्टर संस्था नाही. या संस्थंचे ऑडिट होत नाही.

कुशावर्तावर शाहीस्नानाचे नियोजन कसे असेल?

भौगोलिकदृष्ट्या कुशावर्ताचा आकार छोटा आहे. यावेळी सोशल मीडियामुळे सिंहस्थाचा प्रचार व प्रसार खूप झाला आहे. यामुळे गर्दी वाढणार आहे. एकाचवेळी साधू-महंत व भाविक कुशावर्तावर स्नान करू शकणार नाही. सरकारने भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधले आहेत. मात्र, महाराष्ट्रीयन नागरिक, स्थानिक भाविक हे घाटात स्नान करणार नाही. त्यांची ओढ कुशावर्ताकडेच राहील. घाट बांधून प्रशासन भाविकांची दिशाभूल करीत आहे.

कुशावर्तावरील भार कमी करण्यासाठी काय करायला हवे?

भाविकांचे श्रध्दास्थान हे कुशावर्त आहे. यामुळे कुशावर्त तीर्थावरून पाइपलाइन करून घाटांवर पाणी आणले असते तर गर्दीचे नियोजन करता आले असते. यामुळे कुशावर्त तीर्थावर साधू-महंतानाच स्नान करता आले असते व गर्दीही झाली नसती. यामुळे भाविकांची भावनाही दुखावली जाणार नाही. प्रशासनाने घाट बांधले मात्र त्यांचा प्रचार, त्यांची उपयोगिता, गैरसमज दूर केलेले नाहीत.

त्र्यंबकेश्वरला दुय्यम वागणूक मिळत आहे का?

माझा साधा प्रश्न आहे, आपण आधी तालुका मग जिल्ह्याचे नाव लावतो. उदा. तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. मात्र, सिंहस्थाचा नाशिक-त्र्यंबक असा उल्लेख केला जात आहे. याबाबत वारंवार सांगून झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही आणि मीडियालाही. मात्र, त्यात सुधारणा होत नाही. नाशिकपेक्षा येथे खर्चही कमी होत आहे. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी जमीन संपादीत करण्यात आली. त्यामानाने त्र्यंबकला फार खर्च करण्यात आला नाही.

(शब्दांकन - अनिल पवार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरतूद ८९ लाखांची; काम मात्र शून्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेने अंदाजपत्रकात रोप लागवडीसाठी ८९ लाख रुपयांची तरतूद केली असली तरी जून महिना उलटूनही या कामाला सुरुवात झालेली नाही. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही निधी नसल्याचा कांगावा करत रोप लागवडीला खो देण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

पर्यावरण संतुलनासाठी अनेक योजना राज्यभर राबविल्या जात आहे. पर्यावरणातील तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांनी सर्वच चिंताक्रांत झाले आहेत. पर्जन्यमानात अनियमितता असल्याने पाण्याचे संकट निर्माण होत आहे. त्यावर उपाय म्हणून हरितपट्टे तयार करण्याचे अभियान सरकारच्या विविध विभागांमार्फत हाती घेण्यात आले आहे पण त्याला जळगाव महापालिका अपवाद ठरली आहे. त्यांनी गेल्या वर्षी एकही झाड लावले नाही आणि यंदा जून महिना संपला तरी रोपांची लागवड करण्याचे कोणतेही नियोजन असल्याचे दिसत नाही.

तरतूद वाढवूनही फायदा नाही

महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करताना रोपांच्या लागवडीसाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली होती. स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांनी त्यात वाढ करत ही तरतूद ८९ लाख रुपये केली. रोपे खरेदी करणे, खड्डे खोदणे, देखभाल व दुरुस्ती आदी कामांसाठी हा निधी खर्च करायचा आहे.

पर्यावरण विभागाकडून पत्रव्यवहार

पर्यावरण विभागाने या प्रकरणी उपायुक्त व लेखापरीक्षकांना पत्र पाठवून रोपे खरेदीच्या खर्चास मंजुरी द्यावी, असे पत्र दिले आहे. त्यावर लेखापरीक्षकांनी सविस्तर अहवाल मागविला आहे. अद्याप हा अहवाल दिला गेला नसल्याने ही प्रक्रिया येथेच थांबली आहे. दुसरीकडे पर्यावरण विभागाचे लागवड अधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण, उपवनसंरक्षक व जिल्हा लागवड अधिकाऱ्यांना पत्र पाठवून उपलब्ध रोपांची माहिती मागविली आहे. मात्र, त्यापुढील प्रकीया सुरू करण्यात येत नसल्याने या वर्षीही रोप लागवडीच्या कामाला खो देण्याचा डाव प्रशासनाने आखला असल्याचे म्हटले जात आहे.

रोपांची खरेदी - ३० लाख रुपये

खड्डे खोदणे - ३० लाख रुपये

ट्री गार्ड - २७ लाख रुपये

मेंटनन्स - २ लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

अवकाळी पाऊस, गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. तालुक्यातील अनेक गावांना अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने तीव्र नाराजी आहे. सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार धनराज महाले यांनी दिला आहे.

दिंडोरी तालुक्यात नुकसानभरपाई मिळत असताना अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण बागांचे नुकसान झाले असताना अत्यल्प भरपाई आली आहे. त्यातच दिंडोरी तालुक्यातील सुमारे चाळीस गावांना नुकसानभरपाई न आल्याने याबाबत माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांची भेट घेत त्यांचेकडे विविध मागण्या केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी सदोष पंचनामे केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे सांगत सदर बेफिकिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी माजी आमदार धनराज महाले यांनी सदोष पंचनामे झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

तहसीलदार मंदार कुलकर्णी, कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करीत लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना गटनेते प्रवीण जाधव, सुरेश डोखळे, जयराम डोखळे, भाऊलाल तांबडे, पंचायत समिती गटनेते विलास निरगुडे, पांडूरंग गणोरे, आदींसह शिवसैनिक, शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबार पेरणीचे संकट

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याने बळीराजा धास्तावला आहे. पिके उन्हाने कोमजली असून, येत्या दोन चार दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

खरीप हंगामाच्या सुरवातीला ७ जून रोजीच पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी, आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, पावसाने अचानक पाठ फिरवल्याने आता शेतकरी धास्तावला आहे. ऐनवेळी बाजारात बियाणांची वाढती मागणी होऊ शकते आणि भावही वधारला जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम महागात पडणार आहे.

मृग नक्षत्राने जिल्ह्यासह राज्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामे उरकून शेतात मशागत करून बी पेरणी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर सलग आठवडाभर भीज पाउस पडला. यामुळे बी शेतात वर डोकवू लागले असतानाच नेमकी पावसाने दडी मारली. उगवणाऱ्या पिकाचे नुकसान होत आहे. जिल्ह्याभरात सुमारे २२ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. जिल्ह्यासोबतच राज्यातही पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सुमारे ८० ते ९० लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

मजुरांनाही मिळेना काम

पावसाने दडी मारल्याने शेतमजुरांना काम मिळेनासे झाले आहे. निंदणी, खुरपणी बंद झाली आहे. यामुळे मजुरांचेही डोळे आकाशाकडे लागले आहेत. लवकरच पाऊस झाला तर मजुरांच्या हातांनाही काम मिळणार आहे.

आम्ही यावेळी २३०० रुपये किलोप्रमाणे मक्याच्या पिकाची लागवड केली आहे. पावसाने जर येत्या दोन तीन दिवसात हजेरी लावली नाही तर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे.

- योगेश आडके, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनुष्यबळाअभावी रखडली पोलिस ठाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलिस स्टेशनला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी ती केव्हा कार्यान्वित होणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो लोक नाशिकमध्ये येणार असून, त्यामध्ये गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे अडचणी येत असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

विस्तारणारे शहर आणि वाढती लोकसंख्या यामुळे गुन्हेगारीमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या ११ पोलिस स्टेशन्सच्या माध्यमातून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु, मर्यादित मनुष्यबळ आणि पोलिस स्टेशन्सची हद्द वाढल्याने गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यास पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. म्हणूनच पंचवटी पोलिस स्टेशनचे ‌विभाजन करून म्हसरूळ पोलिस स्टेशनची निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर सरकारवाडा, इंदिरानगर, भद्रकाली तसेच अंबड पोलिस स्टेशनचे विभाजन करून मुंबई नाका पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे. मुंबई नाका येथील वाहतूक पोलिसांचे कार्यालय शरणपूर रोडवरील जुन्या पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे येथे लवकरच मुंबई नाका पोलिस स्टेशन सुरू होईल असे बोलले जात होते. मात्र त्यास सहा महिने उलटूनही अद्याप नवीन पोलिस स्टेशन कार्यान्वित होऊ शकलेले नाही. सिंहस्थापूर्वीही पोलिस स्टेशन्स सुरू होतील, असे पोलिस सूत्रांकडून सांगितले जात आहे. एका पोलिस स्टेशनसाठी ६५ याप्रमाणे दोन पोलिस स्टेशन्ससाठी किमान १३० कर्मचारी अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. शहरातील अन्य पोलिस स्टेशन्समधील काही कर्मचाऱ्यांनाच सध्या या नवीन पोलिस स्टेशन्समध्ये नियुक्ती देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई नाका येथे पोलिस स्टेशनसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मेरीकडून म्हसरूळ पोलिस स्टेशनसाठी जागा मिळणार आहे. मात्र, मनुष्यबळाचा प्रश्न आहे. - विजय पाटील पोलिस उपायुक्त, प्रशासन

मुंबई नाका परिसरात स्वतंत्र पोलिस स्टेशन्स कार्यान्वित होतेय म्हटल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अजूनही पोलिस स्टेशन्स कार्यान्वित होऊ शकलेले नाही. कुंभमेळ्यात गुन्हेगारी प्रवृत्तींचाही शिरकाव होऊ शकतो. म्हणूनच पोलिस स्टेशन लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. - अॅड. संजय वझरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्युनिअर’ प्राध्यापकांचे शुक्रवारी धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंजूर केलेल्या पायाभूत पदांचे वेतन त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसह विविध प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी शुक्रवारी (दि. १०) ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील प्राध्यापकही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. केटीएचएम कॉलेजमध्ये या विषयासंदर्भात नुकतीच बैठक झाली. नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यकारीणीचे सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते. संघटनेचे प्रा. संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सरचिटणीस प्रा. अनिल महाजन, खजिनदार आर. एन. शिंदे, उपाध्यक्ष ए. टी. पवार, टी. एस. ढोली, डी. एम. कदम, सहसचिव व्ही. एम. चव्हाण, आदी उपस्थित होते.

मंजूर असलेल्या सुमारे ९३५ पायाभूत पदांचे वेतन अद्याप सुरू झालेले नाही. हे वेतन त्वरित सुरू करण्यात यावे, सन् २०१३-१४ व २०१४ -१५ ची संचमान्यता जुन्या पद्धतीने करण्यात यावी, आयटी विषयासाठी त्वरित अनुदान सुरू करावे, सन २०११-१२ पासून पायाभूत पदे मंजूर करण्यात यावीत, इयत्ता बारावी विज्ञान विषयाचे दोन स्वतंत्र पेपर घ्यावेत, तुकडी टिकविण्याकरिता विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा खात्यावर पूर्ववत कराव्यात, १ नोव्हेंबर २०१५ पूर्वी अंशतः व अर्धवेळ काळातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात याव्यात, शिक्षकांचे स्वतंत्र प्रशासन करण्यात यावे, कायम विनानुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील मूल्यांकन प्राप्त शिक्षकांना त्वरित मान्यता व अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक विकासही हवा

0
0

>> अविनाश ‌सिसोदे

कोणत्याही देशात, प्रांतात गेलो, की सातत्याने तुलनात्मक विचारांचं मोहोळ माझ्या डोक्यात सुरू होत असतं. त्याला हाँगकाँग आणि व्हिएतनाममधली सामुद्रगंगाही विचलित करू शकत नाही! कालपासून डोक्यात शिक्षण व्यवस्थेचे विचार घोळताहेत. म्हणजे मी इथल्या व्यवस्थापकांना, दुकानदारांना, चालकांना, वेटर्सना सगळ्यांना तिथल्या शिक्षण पद्धतीबाबत विचारत सुटलोय! हो, म्हणजे नेटवर याची सगळी माहिती मला मिळेलच पण लोकांशी बोलताना त्या संवादातून माझंही एक प्रकारचं शिक्षणच होत असतं ना! माहिती विचारून उत्तर घेणं हे शिक्षणच. म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून प्रथम जे काही कानी पडत जातं ते शिक्षणच असतं. म्हणजे शिक्षण हा किती महत्त्वाचा घटक आहे, यावरून कळतं. पण मग शैक्षणिक विकासाची सद्यस्थिती काय आहे, याचा विचार करताना प्राथमिक आणि माध्यमिक असा एक टप्पा व उच्च माध्यमिक आणि कॉलेज हा दुसरा टप्पा. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा याबाबतची परिस्थिती अशी आहे, की सर्वात लोकप्रिय आणि चकचकीत, इमारती, लक्झरियस सुविधा असलेल्या संस्थांकडे नव्या पिढीची ओढ प्रचंड वाढली आहे. सकाळचा नाश्ता देणारी, दुपारी जेवायला देणारी, खूप अॅक्टीव्हिटी करीत असलेली शिक्षण संस्था पालकांच्या दृष्टीने आकर्षण ठरत आहे. जिथं शुल्क भरमसाठ, तिथलं शिक्षण महान असा काही तरी गैरसमज निर्माण झाला आहे. उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाबाबत विचार करता तिथं 'शिक्षण' नावाचा प्रकार कितपत उरलाय, याचा शोध घेण्याची गरज आहे. पारंपरिक व्यवस्था सोडण्याची तयारी नाही. मार्गदर्शनासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांपेक्षा विद्यार्थ्यांचा आज फक्त खासगी कोचिंग क्लासेसवर विश्र्वास आहे. याचा अर्थ खासगी क्लासेसमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा हा आपल्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा उच्च आहे, असे म्हणायला वाव आहे. तुम्हाला हवं तसं करिअर घडवायचं असेल, तर महाविद्यायलयात केवळ प्रवेश घ्या आणि शहरातील लाखो रूपये शुल्क घेणाऱ्या खासगी क्लासेसमध्ये बिनदिक्कत जा, अशीच नवी व्यवस्था आहे. तसं बघायला गेलं, तर अफाट बुद्धिमत्ता असलेला तरूण वर्ग आपल्या देशात आहे. अनंत अडचणींना

तोंड देऊनही तो जागतिक पातळीवर चमकत आहे. केवढं पोटेन्शिअल आहे आपल्या मुलांमध्ये. पण त्याला योग्य विकसित होणारी यंत्रणा मात्र अत्यंत कुचकामी आहे. हेही तितकंच खरं. आपल्याकडील शिक्षणाला प्रात्यक्षिकांची, व्यवसायाभिमुखतेची, वस्तुस्थितीजन्य जोड दिली गेली पाहिजे. पुस्तकी ज्ञानाच्यापलिकडे जाऊन व्यावहारिक जीवनातील ज्ञानही दिलं गेलं पाहिजे. प्रात्यक्षिकाशिवाय हे शक्य नाही. तेही प्राथमिक शिक्षणापासून. गुरूकुल आणि पब्लिकस्कूल यांचा नीट समन्वय साधून एक नवी शिक्षण यंत्रणा उभी केल्यास फार मोठी शैक्षणिक क्रांती घडू शकते. माझ्या कंपनीत जेव्हा नवीन मुलं मुलाखतीला येतात, तेव्हा त्यांच्या आकलन क्षमतेची कीव करावीशी वाटते. पुस्तकी ज्ञानापलिकडे काहीच माहित नाही. नकोय खूप अॅकॅडमिक. कट्टयावरचं ज्ञान हवंय आपल्याला. संगणक माहिती देतो फक्त. जीवन जगणं शिकवत नाही. ते अनुभवातूनच घेता येतात. त्यासाठी डोळे उघडे ठेवूनच वावरावं लागतं. ही दृष्टी विकसित करणारं शिक्षणच आपल्याकडे नाही. सगळं फक्त झापडबंद ! जीवनशिक्षण कोणीच देत नाही. माझ्या कंपनीतील एम्प्लॉईंना कामाच्या ढिगाखाली दबून जावे लागत नाही. तो स्वत:चे काम म्हणून ते करतो. तोच डेडलाईन ठरवतो. त्याला आम्ही आनंददायी जीवन कसं जगावं, हेच शिकवत राहतो. माझं म्हणणं प्रत्येक संस्थेनं हे केलं पाहिजे. आम्ही सुरू केलेली ई अॅण्ड जी इनोव्हेटीव एज्युकेशन या संस्थेद्वारे पुस्तकाबाहेरचंच शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगळी शिक्षण पद्धती प्रत्यक्षात अंमलात आणून विकासाच्या प्रक्रियेला सहाय्यभूत करणारं शिक्षण देणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांशी नुसतं बोललं तरी त्यांचा प्रचंड आवाका आणि धडपड लक्षात येते. प्रारंभ होतोय. पण तो व्यापक हवा, हीच अपेक्षा.

(लेखक इ अॅण्ड जी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांमधील हिंसेची भावना

0
0

प्रशांतची मुलगी शाळेतून आलं की 'मला शाळेत मैत्रिण मारते', अशी तक्रार नेहमी करायची. एक दिवस प्रशांत तिला न सांगता शाळेत गेला असता, त्याची मुलगीच इतर मुलींना मारताना त्याला दिसली. नेहाचा अनुभवही असाच काहीसा होता. मित्र मारतो म्हणून घरी तक्रार करणारा तिचा मुलगा शाळेत स्वत:च मारामारी करत असल्याचं तिला शिक्षकांकडून समजलं. ही समस्या आज अनेक मुलांमध्ये आढळून येते. आजूबाजूला होणाऱ्या प्रकारांचा या मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. टीव्हीमुळे हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

प्रत्येक व्यक्तीच्या मनात कमी जास्त प्रमाणात सर्वच भावना असतात. पण एखाद्या भावनेला खतपाणी मिळालं तर ती वाढीला लागते. आजकाल लहान मुलांमधील हिंसाचाराची भावना वाढीला लागल्याचं प्रकर्षाने दिसून येतं. मित्र-मैत्रिणींपासून शिक्षकांपर्यंत हल्ले चढविणारी चिमुरडी मुले आज निदर्शनास येतात. वेळीच या गोष्टींना लगाम घातला नाही तर पुढे मुलांच्या मानसिकतेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांबाबत काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

- टीव्हीवर अनेकदा मरामारीची दृश्य दाखविली जातात. ती सहसा मुलांच्या नजरेला पडणार नाहीत याची तुम्ही दक्षता घ्या.

- 'डब्लूडब्लूएफ'सारखे कार्यक्रम पाहण्याची अनेकांना सवय असते. असे कार्यक्रम पाहताना आजूबाजूला मुले नाहीत याची खात्री करूनच ते कार्यक्रम पाहा.

- मुलांसमोर भांडणं, वादविवाद टाळा. वाद झालाच तर त्यांच्यासमोर भांड्यांची, घरातील वस्तूंची आदळआपट होणार नाही याची काळजी घ्या.

- अनेक नवरा-बायको एकमेकांसोबत भांडताना एकमेकांवर हात उगारतात. याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो.

- मुलांना समज देण्यासाठी ‌किंवा मुलांवर चिडल्यामुळे अनेकदा पालक त्यांना मारतात. यामुळेही मुलांना मारण्याची सवय लागते.

- खेळताना मित्रांमध्ये सतत मारामारी होत असेल तर मुलांसह त्यांच्या मित्रांनाही असे न करण्याची सूचना द्या.

- हातातील वस्तू फेकून किंवा फोडून अनेक मुले राग व्यक्त करतात. परंतु यामुळेच हिंसक भावना वाढीला लागते. त्यामुळे हे अयोग्य असल्याचे मुलांना वेळीच पटवून द्या.

- मुलांमध्ये राग निर्माण होणार नाही याची लहान वयापासूनच काळजी घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीएससी’मध्ये अक्षयची गरुडझेप

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

स्वप्नांच्या पूर्तीसाठी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवली तर एकदाच नव्हे तर वारंवार तुम्हाला यश मिळते, असा अनुभव मनमाडच्या अक्षय हाकेकडे आहे. मात्र, मिळणाऱ्या यशावर समाधान न मानता निश्चित धेय्यापर्यंत पोचण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे हा जणू त्याचा स्वभावच बनला आहे. 'यूपीएससी'च्या माध्यमातून 'आयएएस' होण्यासाठी तो पुन्हा परीक्षा मैदानात उतरणार आहे.

नांदगांवमधील बाबुराव हाके यांचा नातू आणि मनमाडमधील डॉ. मछिन्द्र हाके आणि डॉ. संगीता हाके या दांपत्याचा अक्षय हा मुलगा तीन वेळा 'यूपीएससी' मध्ये यशस्वी झाला आहे. आताही वयाच्या २५ व्या वर्षी त्याने देशभरातून ५०८ वा क्रमांक मिळविला आहे. कॉम्प्युटर इंजिनीअर असलेल्या अक्षयने 'यूपीएससी'च्या माध्यमातून जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे. त्यासाठीच तो आता पुन्हा परीक्षेची नव्याने तयारीला लागला आहे.

कॉम्प्युटर इंजिनीअर झालेल्या अक्षयला त्याच्या जागरुक पालकांची साथ मिळाली आणि त्याने नोकरीच्या मागे न धावता प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने 'यूपीएससी'च्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात त्याची डिफेंस अकाउंटमध्ये निवड झाली. दुस ऱ्यांदा दिलेल्या परीक्षेत रँकिंगमध्ये वाढ झाल्याने त्याची फॉरेन ट्रेडमध्ये निवड झाला. दिल्लीमधील परराष्ट्र मंत्रालयात परराष्ट्र सचिवपद त्याला मिळाले. परंतु, 'आयएएस'चे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अक्षयने पुन्हा परिश्रम घेत यंदा तिसऱ्यांदा 'यूपीएससी'ची परीक्षा दिली. यात त्याने देशात ५०८ वा आला. यातून त्याची 'आयपीएस'साठी निवड झाली. परंतु, या यशावर समाधान न बाळगता त्याने पुन्हा चवथ्यांदा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली आहे. मनमाडच्या तरुणाची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आदर्शवत ठरावी अशीच आहे.

सेल्फ स्टडी आणि हार्डवर्क हेच अक्षयच्या यशाचे गमक आहे. स्वप्न साकार करण्याची धडपड पाहून तो आयएएस होणारच असा विश्वास आहे.

- डॉ. संगीता हाके, आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाच्या प्रचारासाठी वेबपेज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू जनजागृती समितीने कुंभमेळ्याचा प्रचार करण्यासाठी विशेष वेबपेज बनवले आहे. कुंभमेळ्याचा प्रसार-प्रचार होण्यासाठी हे वेबपेज उपयुक्त ठरणार असून, हिंदू समाजापर्यंत संस्कृती, धर्म यासंदर्भातील शास्त्रीय माहिती समजण्यास लाभ होईल, असे प्रतिपादन आनंद आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत सागरानंद सरस्वती महाराज यांनी केले.

कुंभमेळ्याची माहिती जगभरातील जिज्ञासूंना सहजतेने एकाच ठिकाणी मिळावी यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर सिंहस्थ कुंभमेळा २०१५ या नावाचे वेबपेज प्रसिद्ध करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता त्र्यंबकेश्‍वर येथील स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था (आश्रम) येथे लोर्कापण करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता आणि पिठाधीश्वर महंत डॉ. बिंदूजी महाराज, श्रीनिरंजनी पंचायती आखाड्याचे सचिव श्रीमहंत आशिषगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे सचिव श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, स्वामी सागरानंद गुरुकुल सेवासंस्थेचे अध्यक्ष श्रीमहंत गणेशानंद महाराज, श्रीनिरंजनी पंचायती आखाड्याचे ठाणापती दिगंबर राजकुमार गिरी, सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता सुनील घनवट उपस्थित होते. या वेळी महंत डॉ. बिंदूजी महाराज म्हणाले, धर्मो रक्षिति रक्षित:, या वचनाप्रमाणे हिंदू जनजागृती समिती कार्यरत आहे. या पृष्ठामुळे कुंभमेळ्याचे धार्मिक, वैज्ञानिक, सामाजिक अंगांची माहिती हिंदूंपर्यंत पाहोचेल. सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव म्हणाले, साधू-संत-हिंदु धर्म यांचे महत्त्व लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचेल.

काय आहे माहिती?

हे पृष्ठ http://www.hindujagruti.org/hinduism/kumbh-mela या लिंकवर उपलब्ध आहे. या विशेष पृष्ठावर कुंभमेळा म्हणजे काय? त्याचे महत्त्व, त्या संदर्भातील विशेष छायाचित्रे, शाहीस्नान म्हणजे काय? या कालावधीत करण्यात येणाऱ्या अर्पणाचे महत्त्व, देशात विविध ठिकाणी होणारे कुंभमेळे आणि त्यांचे महत्त्व, गंगा-क्षिप्रा-गोदावरी नद्यांचे महत्त्व, गतकुंभमेळ्यात समितीने राबवलेले उपक्रमांसंदर्भातील चलचित्रपट, कुंभमेळ्याची माहिती देणारी ग्रंथसंपदा, ती कुठे मिळू शकेल याची माहिती देण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’चे यशस्वी मॅनेजमेंट

0
0

'एमबीए'च्या १४०० जागांसाठी पाच हजारावर इच्छूक; २६ जुलैला होणार एन्टरन्स

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमबीए अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी खेचण्यासाठी खासगी कॉलेजेसमध्ये टोकाची स्पर्धा सुरू असताना मुक्त विद्यापीठाच्या एमबीए विभागाकडे यंदा पाच हजारांवर विद्यार्थ्यांनी इनक्वायरी केली आहे. या अभ्यासक्रमासाठी मुक्त विद्यापीठात १४० विभागीय केंद्रांमधून राज्यभरात १४०० जागा उपलब्ध आहेत. येत्या २६ जुलै रोजी एन्टरन्स परीक्षाही होणार आहे.

व्यवस्थापन शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काही वर्षांपासून फारसे उत्साही वातावरण राहिल्याचे चित्र नाही. परिणामी ठिकठिकाणच्या मॅनेजमेंट कॉलेजसना प्रवेक्षक्षमतेचा कोटा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची मनधरणी करावे लागत असल्याचे चित्रही शहरातील काही संस्थांमध्ये आहे. या तुलनेत डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एमबीए करण्यावर बहुतांश व्यावसायिक आणि नोकरदार उमेदवारांकडून भर दिला जातो आहे.

या अभ्यासक्रमासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यभरात सुमारे १४० अभ्यास केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासाठी आयआयटी प्रोफेसर्सच्या माध्यमातून विशेष पुस्तकेही तयार करण्यात आली आहेत. मुबलक ई-बुक्सचाही अक्सेस यासाठी देण्यात आला आहे.

एमबीए अभ्यासक्रमातून संस्थेमध्ये काम करताना विकसित होणारी कौशल्य महत्वाची आहेत. या कौशल्यांना बाजारपेठेतून असणारी मागणी वाढतेच आहे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमाचा फायदा बहुतांशी व्यावसायिक किंवा नोकरदारांना होतो आहे.

- प्रा. प्रकाश देशमुख, एमबीए विभागप्रमुख, मुक्त विद्यापीठ

'एमबीए'ची क्रेझ घटली

काही वर्षांपूर्वी एमबीएच्या अभ्यासक्रमाची क्रेझ होती. अलिकडील कालावधीत या विषयास समांतर अभ्यासक्रम आणि एमबीए डिग्री होल्डर्सची वाढणाऱ्या संख्येमुळे ही क्रेझ तीन ते चार वर्षांमध्ये ओसरल्याचे चित्र आहे. याशिवाय बाजारपेठेतील मंदीचा परिणामही उपलब्ध होणाऱ्या संधींवर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा नव्या चौक्यांसाठी जागेचा शोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रशासनाने साधुग्रामची जागा अखिल भारतीय आखाडा परिषदेकडे सोपवल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी पोलिस चौक्यांच्या जागेसाठी पाहणी सुरू केली. या ठिकाणी पोलिस दलातर्फे १० चौकी सुरू करण्यात येणार आहेत.

साधुग्राममध्ये साधू-महंताची संख्या वाढली असून, लवकरच हा परिसर गजबजून जाईल. सध्या येथे आडगाव तसेच पंचवटी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमार्फत गस्त घातली जाते. तसेच, विशेष पथके सातत्याने तपासणी करीत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी चौकींसाठी जागांचा शोध घेतला. जागा निश्चित झाल्यानंतर चौकींचा सेटअप उभारला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरात कायमस्वरूपी तत्त्वावर ३० तर तात्पुरत्या स्वरूपात ४१, अंतर्गत वाहनतळावर ५, बाह्य वाहनतळावर ८ पोलिस चौक्या सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय १५ जिप्सी हंट देखील कार्यरत ठेवण्यात येणार आहे. दहा पोलिस चौक्यांमागे एक एसीपी दर्जाचा अधिकारी असतो. साधुग्राममध्ये असेच धोरण ठेवले असून, साधू-महंतासह भाविकांना मदत करण्यासाठी पोलिस चौकींचा वापर होणार असल्याचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर गाठणे कसरतीचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंतर्गत व बाह्य पार्किंगच्या ठिकाणांमधील अंतर, बसची उपलब्धता यामुळे त्र्यंबकेश्वर गाठताना भाविकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेषतः पर्वणीच्या काळात ही समस्या तीव्र बनू शकते. तसेच, यामुळे शहरावर अतिरिक्त ताण पडू शकतो.

शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरशी जोडणारा एकमेव मोठा मार्ग म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याकडे पाहिले जाते. शहराला बायपास करून घोटी आणि गिरणारे तसेच नाशिकरोड विहीतगाव पाथर्डी फाटा असे काही मार्ग त्र्यंबकेश्वरकडे जातात. यात, शहराकडे जाणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गावर बाह्य वाहनतळे तयार करण्याचे काम सुरू आहे. पर्वणीच्या एक दिवस आगोदर या वाहनतळाच्या पुढे एकही​ खासगी वाहन येऊ शकणार नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या भाविकांना शहरात दाखल होऊन पायी सातपूर गाठावे लागणार आहे. सातपूर येथून एसटी महामंडळ बसेस उपलब्ध करून देणार आहे. नाशिकरोड स्टेशनपासून विहीतगावमार्गे ब्रह्मा व्हॅली कॉलेजच्या इनर पार्किंगपर्यंत बससेवा उपलब्ध आहे. याबरोबर ओझर विमानतळ ते निलगिरी बाग या मार्गावर बसेस धावतील. निलगिरी बाग येथून गिरणारे मार्गे त्र्यंबकेश्वरजवळील अंबोली किंवा तळवडे पार्किंगपर्यंत भाविक पोहचतील. नाशिकरोड बाह्य वाहनतळापासून त्र्यंबककडे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरला ५० टक्के भाविक जाणार असून, यात १५ लाख भाविक असू शकतात, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

बसची सुविधा

पर्वणीच्या एक दिवस आगोदरपर्यंत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकरोडसह मेळा बस स्थानक येथून बसेस उपलब्ध होतील. मात्र, पर्वणीच्या दिवशी सातपूर आणि नाशिकरोड हाच पर्याय उपलब्ध असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटचा संपला वनवास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चार महिन्यांपासून स्थायी समितीत अडकून पडलेल्या महापालिकेच्‍या सन १०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या २ हजार १८६ कोटींच्या अंदाजपत्रकाचा वनवास संपला असून, दुरुस्तीसह प्रशासनाकडे सादर झाले आहे. तत्कालीन सभापती अॅड. राहुल ढिकले यांनी या अंदाजपत्रकात दुरुस्त्या केल्या असून, त्यात नवीन योजनांचा समावेश केला आहे. आता सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्षांकडून महापौरांना सादर केले जाईल. त्यानंतर विशेष अंदाजपत्रकीय सभेत मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील विकासकामांना मुहूर्त लागेल.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी फेब्रुवारीत स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांना २,१८६ कोटी २३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आठवडाभरातच सभापती राहुल ढिकलेंसह आठ सदस्य निवृत्त झाले. ढिकले यांनीच या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन त्यात दुरुस्त्या आणि नवीन कामे सुचवून ते विद्यमान सभापतीच्या संमतीने महासभेला सादर करणे आवश्यक होते. मात्र, स्थायी सभापतीपदी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे आरूढ होऊन चार महिने लोटले तरीही अंदाजपत्रकावर चर्चा झाली नाही. प्रशासनाकडूनही केवळ सिंहस्थाच्या कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याने नगरसेवकांचीही निधी उपलब्ध होत नसल्याची ओरड होती. निधीवरून नगरसेवक व अधिकाऱ्यांमध्येच अनेकवेळा संघर्ष झाला. अंदाजपत्रक स्थायीकडून महासभेकडे येण्यास आणि महासभेत मंजूर होण्याची प्रक्रिया लांबल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम झाला. ढिकले आणि विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे यांना वेळ मिळत नसल्यानेच हे बजेट रखडले होते. या संदर्भातले वृत्त मटाने गेल्या २१ जून रोजी प्रसिद्ध केले होते.

बजेट रखडल्याची टीका होताच राहुल ढिकलेंसह, शिवाजी चुंभळे यांनी बजेटवर हात फिरवला. त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या असून, नवीन योजनांचाही समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पदाधकाऱ्यांनी दुरुस्ती केल्यानंतर अंदाजपत्रक पुन्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. प्रशासनाकडून लेखाविभागाकडे पाठविण्यात आले असून, अंदाजपत्रकावर अखेरचा हात फिरवला जात आहे.पु ढील सर्वसाधारण सभेत शिवाजी चुंभळे यांच्याकडून ते महापौर अशोक मुर्तडक यांना सादर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांना जागांचे वाटप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामची जागा अखिल भारतीय आखाडा परिषदेकडे सोमवारी हस्तांतरीत होताच मंगळवारी सकाळी विविध आखाडे आणि खालशांना जागा वाटपाचे काम सुरू करण्यात आले.

सोमवारपर्यंत साधुग्राममध्ये कामांची लगबग होती. मंगळवारी मात्र सर्व चित्र पालटले. अनी आखाडा, दिगंबर अनी, निर्मोही अनी आणि निर्वाणी अनी यासह विविध १८ आखाड्यांचे प्रमुख तसेच खालशांचे प्रमुख मंगळवारी साधुग्राममध्ये अवतरले. हे १८ आखाडे अनी आखाड्याचे उपआखाडे असल्याची माहिती उपस्थित महंतांनी दिली. मंगळवारी सकाळी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी वरील तिन्ही अनी आखाड्यांसाठी जागांचे वाटप केले. पायाभूत सुविधा निर्माण करताना झाडे, टॉयलेट आणि बाथरूमच्या जागांचा विचार झाला नाही. परिणामी, छोटे प्लॉट तयार झाल्याचा दावा साधू-महंताकडून करण्यात येत होता. मात्र, वेळेची उपलब्धता महत्त्वाची असून, जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. तिन्ही आखाड्यांचा संबंध एकाच कुंटुंबाप्रमाणे असून, जागा वाटपात कोणताही तिढा नसल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत साधू-महंत साधुग्राममध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढत होते. तसेच जागा वाटपाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्लॉटमध्ये उभे असलेले वृक्ष आणि रोड फ्रंट नसणे या दोन बाबी डोकेदुखी ठरत असल्याची भावना साधूंनी व्यक्त केली.

आखाड्यांशी संलग्न असलेल्या आणि भाविकांची मोठी संख्या असलेल्या रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज, स्वामी, हंसदेवाचार्य महाराज, वल्लभाचार्य महाराज, श्रीजी महाराज, नारायण विकलांग सेवा संस्थान, उदयपूर आणि इतर संस्थांना आखाडा परिषदेमार्फत जागेचे वाटप करण्यात येणार आहे. एकदा जागेचे वाटप झाले की रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरा, विद्युत, एलपीजी ग्रॅस पुरवणे असे काम प्रशासनाला सुरू करता येईल. गेल्या वर्षापेक्षा साधुग्रामचा आकार वाढवण्यात आला आहे. तसेच, साधुग्राममध्ये सुविधा पुरवण्यात आल्या असून, प्लॉटचा आकार मात्र जुन्याच पध्दतीचे असल्याचे मत दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरदास महाराज यांनी सांगितले.

प्राधान्यानुसार वाटप

मुख्य अनी आखाड्यासाठी तपोवनातील मुख्य रस्त्यालगत जागा राखीव ठेवण्यात आली आहे. उपआखाड्यांना त्यानुसार प्राधान्य देण्यात येणार असून खालशांमध्ये किती साधू आहेत, त्यानुसार त्यांना जागांचे वाटप करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी बावीस विशेष रेल्वे गाड्या

0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याकरीता २२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान दिली. याबरोबर रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डब्बे जोडण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. पोलिस महासंचालक संज‌ीव दयाल यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीसाठी रेल्वेचे जनरल मॅनेजर एस. के. सुध, विभागीय व्यवस्थापक एस. के. गुप्ता, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images