Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘वसाका’ ची सूत्रे प्रशासक मंडळाकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कसमादे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक मंडळाची वर्णी लागली आहे. गेल्या १८ महिन्यापासून बंद असलेल्या कारखान्याची चाके भविष्यात पुन्हा रूळावर येतील, असा विश्वास ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रशासक मंडळावर जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे व शिखर बँकेचे व्ही. के. पकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर द्विस्तरीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वसाकाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तत्कालीन चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या गुरुदत्त पॅनलची एकहाती सत्ता असताना वसाका कामगारांनी आपल्या थकीत १९ महिन्यांच्या पगारांची मागणी केली होती.

यांनतर दि. २ फेब्रुवारी २०१२ रोजी वसाकाचे चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांनी आपल्या समर्थक संचालकासह राजीनामे सादर केले होते. तेव्हापासून कारखाना बंद स्थितीत आहे. यानंतर वसाका चालविण्यास देण्यासाठी विद्यमान संचालक डॉ. दौलतराव आहेर यांच्यासह माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर यांनी कमालीचे प्रयत्न केले. खासगी कंपनीमार्फत वसाका चालविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे अपयश आले. या दरम्यान संचालक शांताराम आहेर यांनी आपल्या समर्थक संचालकासह राजीनामा दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आल्याने वसाकावर प्रशासकांची नियुक्ती होण्याचा मार्ग सुकर झाला होता. वसाका कामगारांचे कारखान्याकडे सुमारे ३० कोटी रुपये घेणे असून, राज्य शिखर बँकेसह अन्य बँका व व्यापाऱ्यांचे सुमारे २३० कोटी रूपयांची घेणी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे व शिखर बँकेचे व्ही. के. पकाळ यांची नियुक्ती झाल्याने ते पुढील कामकाजाची दिशा कशी ठरवितात, यावर पुढील घडामोडी निश्चित होणार आहेत. यामुळे कधी चाके फिरतात याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वरूणराजाची अवकृपा, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर व केळझर धरणात पाण्याचा ठणठणाट या पार्श्वभूमीवर सटाणा शहरात गत आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. दोन दिवसाआड होणारा नळपाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवसाआड झाल्याने शहरात कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यापेक्षा ही भयावह स्थिती जुलै महिन्यात निर्माण झाल्याने पालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. पुनद धरणातून तातडीने आवर्तन मिळावे, यासाठी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती जुलै महिन्यात सटाणा शहरात उद्भवली आहे. शहरात पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात पाण्याचे टँकर धावू लागले असून खासगी टँकर, पाणी वाटप करणाऱ्या पाणीदार व्यक्तींना आपसूकच महत्त्व प्राप्त झाले आहे.

सटाणा शहराला चणकापूर व केळझर धरणातून पिण्याच्या पाण्याचे वितरण होते. मात्र जून महिना पुरता कोरडा गेल्याने या दोघा धरणातील पाण्याची पातळी जैसे थे आहे. परिणामी ठेंगोडा येथील नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. शहरातील उद्भव विहिरींचा जलस्त्रोत बंद झालेला आहे. यामुळे शहरात पाण्याची चणचण भासू लागली आहे. पालिकेने दोन दिवसाआड होणारा पिण्याच्या पाण्याचा नळपुरवठा चार ते पाच दिवसांवर नेल्याने जनतेची अधिकच कोंडी निर्माण झाली आहे.

शहरात चार जलकुंभ असले तरीही उद्भव विहिरीं देखील आटल्याने पाण्याचे स्त्रोत संपले आहेत. जोरदार पाऊस झाल्याशिवाय शहरवासीयांनीच तहान भागणार नाही. हे निश्चित आहे. मात्र, तुर्तास पुनद धरणातील जलसाठा जेमतेम असला तरीही सटाणा शहरासाठी एक आवर्तन उपलब्ध होऊ शकत असल्याने आवर्तन देवून शहरवासीयांना तृप्त करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची दडी

$
0
0

खरीप पिके धोक्यात; तापमानात वाढ

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे. त्यातच हवामान खात्याने जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा पाऊस चांगला राहील या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीस प्रारंभ केला होता. गेल्या एका महिन्यात मालेगाव तालुक्यात जवळपास ८० टक्क्यांहून अधिक पेरणीची कामे देखील पूर्ण झाली आहेत. साधारणतः पंचवीस जूननंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात तर संपूर्ण तालुक्यात पावसाचे वातावरण निवळून कडक उन्हाचे चटके बसू लागल्याने पेरणी झालेली पिके आता कुठे वर येत असतांना कडक उन्हमुळे ती करपण्याची भीती वाढली आहे.

पावसाने दडी मारल्याने कमाल तापमान ३४ अंशापर्यंत वाढले आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे. पेरणीनंतर साधारणतः १५ दिवसात पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची हजेरी अपेक्षित असते. गेल्या संपूर्ण महिन्याभरात मालेगाव तालुक्यात फक्त १०५.४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, पंधरवड्यात पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे.

६४ हजार २०० हेक्टरवर पेरणी

तालुक्यातील खरिपाच्या ८० हजार ९७५ हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार २०० हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक लागवड मका पिकाची झालेली आहे. मात्र, आगामी महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने हुलकावणी दिल्यास शेतकरी दुबार पेरणी संकटात सापडू शकतो.

पावसाची हजेरी

१ ते १५ जून कलावधीतील पाऊस - ४९.७८ मिमी

१५ ते २४ जून कलावधीतील पाऊस - ५४.८६ मिमी

२५ जून नंतर १ मिमी देखील पाऊस झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकंटकांच्या बंदोबस्तासाठी रहिवाशांचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

टाकळीच्या समतानगरमधील रहिवासी दोन महिन्यांपासून दहशतीच्या छायेत जगत आहेत. महिलांना सायंकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी धरणे आंदोलन करून उपनगर पोलिसांना निवेदनही दिले आहे.

दोन महिन्यापूर्वी टाकळीतील समतानगरमध्ये किरकोळ वादातून युवकाचा खून झाला. तेव्हापासून तणावाचे वातावरण आहे. १३ एप्रिल रोजी पंचशीलनगरमध्ये लाईटींगची तोडफोड केल्यानंतर टोळक्याने २५ एप्रिल रोजी सतीश नायर यांच्या मोटारसायकलची तोडफोड केली. ३० मे रोजी होर्डिंग्जवर दगडफेक केली. १६ जूनला आंबेडकर सामाजिक विकास केंद्राच्या काचा फोडल्या. २९ जूनला दहा ते पंधरा मोटारसायकलवर येऊन गुंडांनी सोनवणेबाबा चौकात तलवारी व चाकूच्या सहाय्याने नागरिकांवर हल्ला केला. दगडफेक व शिवीगाळही केली. नागरिकांना धमकावले तसेच घरांवर दगडफेक करून मारहाण करत दहशत निर्माण केली. तलवारीचे वार करून काही मुलांना जखमीही केले.

धरणे आंदोलन

भीमशक्ती महिला मंडळाने धरणे आंदोलन करून गुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली. नगरसेवक राहुल दिवे, माजी महापौर अशोक दिवे, नानाजी पवार, माया पवार, लक्ष्मण सोनवणे, पांडुरंग वाघमारे, भास्कर दाणी, शोभा केदारे, स्वाती बागूल, निर्मला जाधव आदींनी उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भगत यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली. पोलिस उपायुक्त धिवरे, भगत यांनी समतानगरमध्ये जाऊन पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. सध्या येथे दोन पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. तरीही गुंडांचा जाच सुरूच आहे.

टाकळीत हातभट्ट्या सुरू

गावठी दारुमुळे बळी जात असतानाही टाकळीत हातभट्ट्या राजरोसपणे सुरू आहेत. दारुभट्ट्या बंद करून दाखवाच, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. गुंडांनी चौकात गाड्यांवर बसून फिल्मी स्टाईलने दारू पिणे सुरू केले आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शाळेत मद्यपान

गुंडांपैकी काहीजण येऊन पाहणी करतात. दहशत पसरविल्यानंतर गुंडांचे टोळके विजय ममता समोरील जनता विद्यालयात रात्री लपतात. तेथे मद्यपान करून फरार होतात. शालेय कमर्चाऱ्यांना सकाळी दारुच्या बाटल्या उचलाव्या लागतात. कधी कधी रिलायन्स फ्रेशजवळील इमारतीच्या तळघरातही दारु पार्टी चालते, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

गुंडगिरीमुळे समतानगरच्या रहिवाशांना दिवसादेखील फिरणे अवघड झाले आहे. महिला, मुलींना घराबाहेर पडता येत नाही. पोलिसांनी तातडीने गुंडगिरीचा बंदोबस्त करून दहशतीच्या छायेतून रहिवाशांची सुटका करावी. अन्यथा रहिवाशी तीव्र आंदोलन छेडतील. - अॅड. नाना पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्त घडविते जीवन!

$
0
0

>> रतन लथ

कुठल्याही संस्थेत आपल्या पाल्याला प्रवेश घेतांना संस्थेचे नियम आपल्याला मान्य असल्याचे पालक सांगतात. कारण ती सर्वस्वी त्यांची निवड असते. पण कालांतराने तेच नियम, अटी त्यांना जाचक वाटू लागतात.

विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, त्यांच्या जीवनात मूल्यांचे संस्कार व्हावेत, ज्यावर भावी आयुष्याचा डोलारा उभा राहणार असतो तो विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा या उद्देशाने नियम केले जातात. विद्यार्थ्यांना शिक्षा व्हावी, पालकांना त्रास व्हावा हा उद्देश नियम करण्यामागे कधीच नसतो. पण पालक हे समजून न घेता त्यावरून प्रचंड अस्वस्थ होतात. कारण मुलांआधी हे नियम त्यांना अनुसरावे लागतात ना! वक्तशिरपणा, शिस्त, वेळापत्रकानुसार गणवेश व पुस्तके, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय विद्यार्थ्यांना शालेय जीवनात लावणे खूप गरजेचे असते आणि पालकांनी नियम पाळण्यात पुढाकार घ्यावा हे अपेक्षित असते. कारण भविष्यात त्यांच्या मुलांनाच याचा फायदा होणार असतो.

संस्था माझी आहे, ही संस्थेशी निगडीत प्रत्येकाची भावना असली पाहिजे आणि एकदा का ही मालकी हक्काची भावना निर्माण झाली की गुणदोषांसहित आपण त्याचा स्वीकार करतो व समोपचाराने परिस्थिती हाताळतो. सर्वगुणसंपन्न कोणीच नसते आणि चूक होणे हा मनुष्यस्वभाव धर्म आहे पण झालेली चूक पुन्हा पुन्हा होवू नये, म्हणून प्रयत्न करणे तेवढेच महत्वाचे आहे. हल्ली मात्र प्रसार माध्यमांना हाताशी धरून राईचा पर्वत केला जातो. अनेकदा प्रसिध्दीपोटी माध्यमेही गोष्टींची शहानिशा न करता नको त्या गोष्टींना अकारण महत्त्व देतात. अर्थात नेहमीच असे होते असे मी म्हणत नाही. कारण सत्याचा पाठपुरावा करणारेही अनेक जण या माध्यमात आहेत.

आजकाल दिखाव्याला महत्त्व आले आहे. स्वतःची कामे स्वतः करण्यात लोकांना कमीपणा वाटू लागला आहे. आपल्याकडे नोकरचाकर असले म्हणजे आपण प्रतिष्ठीत हा गैरसमज वाढत आहे. मुलांना पोहचविण्या-आणण्यासाठी ड्रायव्हर, लहान मुलांना सांभाळण्यासाठी आया, घरची कामे करण्यासाठी नोकर हे प्रतिष्ठेचे लक्षण बनत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ही गरज आहे, हे मी समजू शकतो. पण आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या अनेक गृहिणी याकडे वळतांना आपल्या नजरेस पडतात. अर्थात संख्येने कमी असल्या तरी नोकरी व घर हा डोलारा समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलाही आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच की!

मुलांना अगदी बालवाडीपासून शिकवणी लावली जाते. मोठे झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक जीवनात काही प्रश्न उद्भवले तर लगेच समुपदेशकाची गरज पडते. असे का बरं व्हावं? हे करण्यासाठी पालक सक्षम नसतात का? की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो? हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात वेळ सोडून इतर सर्व गोष्टी पालक आपल्या मुलांना सहजपणे देतात. पण मुलांना मात्र आपल्याला समजून घेवून मार्गदर्शन करणाऱ्या पालकांची जास्त गरज असते. हे पालकांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. किती पालक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीविषयी जागरुक असतात? नियमित वर्तमानपत्रांचे वाचन करतात? जागतिक घडामोडींबद्दल माहिती ठेवतात? इंटरनेट व मोबाईल यांचा योग्य उपयोग करण्याबद्दल आपल्या मुलांना मार्गदर्शन करतात? हे प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाहीत.

प्रवेश नसलेल्या ठिकाणी गाडी नेणे, चौफुलीवर रहदारीचे नियम न पाळणे हे नित्याचेच झाले आहे. आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो याचा विचारच कोणी करत नाही. घाई प्रत्येकालाच असते पण आपल्या जीवापेक्षा महत्त्वाचे काही नाही हे लोकांना समजवणार कोण?

मजबूत झाडाच्या फांद्या कायम झुकलेल्याच असतात. निसर्गाच्या या नियमांचे भान आपण का बरं ठेवत नाही? आपण झुकलो, दोन पावलं मागे आलो तर नुकसान काहीच नसतं, झाला तर फायदाच असतो. पण आपला अहंभाव ज्यात त्यात आड येतो. यावर आपण वेळीच ताबा मिळवला तर खूप साऱ्या गोष्टी सुलभ होतील. लक्ष्मी चंचल असते पण सरस्वतीच्या माध्यमातून ती टिकू शकते. पैसा, वशिला याने देश घडत नाही तर शिक्षित समाजाने देश घडतो आणि चांगले शिक्षण असेल तर वशिल्याची गरज भासणार नाही.

(लेखक आर. एस. एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरे झाले व्याख्यान

$
0
0

>> अशांत किरकिरकर

अमेरिकेत एके ठिकाणी व्याख्यान सुरू असते. वक्ता वयोवृध्द असतो. बोलताबोलता तो विषयापासून भरकटतो तेव्हा श्रोत्यांपैकी एक तरुण उभा राहतो व 'आपण आमचा वेळ घेत आहात, कृपया खाली बसा' असे सांगतो. तो वक्ताही त्याचे म्हणणे मान्य करतो व खाली बसतो. पण ती अमेरिका असते, तेथे असं घडू शकतं. आपल्या शहरात असं कधी घडेल काय? कदाचित कधीच नाही. आपल्याकडे व्याख्याता तोंडाला येईल ते बोलत असतो व श्रोतृगण दिलखुलासपणे सारं ऐकत असतो. कारण ऐकणारे दर्दी कमी असतात, तेथे येऊन झोपणारेच अधिक असतात.

नाशिक शहरात व्याख्यानांची कमी नाही. एक संपलं की दुसरं सुरूच असतं. अगदी नको-नको त्या विषयांपासून हव्या हव्याशा विषयापर्यंत या व्याख्यानमाला चालतात. जून-जुलै महिन्यात तर त्यांचे पिकच येते. मग परकाया प्रवेशापासून तर लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत कोणताही विषय आयोजकांना चालतो. ‍व्याख्यान ऐकायला कोण येणार आहे याचा विचार न करता त्या वक्त्याला कोणत्या विषयावर बोलायला आवडेल हे पाहिलं जातं. व्याख्यानाच्या बाबतीत नेहमीच वक्त्याचा अधिक विचार होतो. गावागावात अनेक ठिकाणी व्याख्याने देत जो विषय कसाबसा तगवलेला आहे तोच आणखी ताणण्याचे काम या व्याख्यानमालांमध्ये होते. मुळात या व्याख्यानांमध्ये श्रोत्याचा विचार होणे अधिक गरजेचे असते. श्रोत्यांना कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल त्या विषयावर व्याख्यान देणे अधिक क्रमप्राप्त व्हायला हवे.

परशुराम सायखेडकर नाट्यगृह किंवा महाकवी कालिदास कलामंदिर तर आराम करण्याचं ठिकाणच होऊन बसलंय. अशी अनेक व्याख्याने केवळ 'आरामदायीच' असतात असं मत नुकतंच एका फर्ड्या वक्त्याने व्यक्त केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार या व्याख्यानांना येणारे प्रथम भिंतीची बाजू शोधतात, ती नाही मिळाली तर खांबांचा आधार घेतला जातो, तेथेही जागा मिळाली नाही तर नाकं मुरडली जातात. हे कशासाठी तर झोपा काढण्यासाठी. प्रवचनांना तर लोक चक्क झोपतात म्हणे. व्याख्यात्याने त्याचा विषय मांडण्याचे कसब असते. ते कसब ज्याला जमले तो व्याख्याता श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करतो नाहीतर त्याच्या व्याख्यानाला बसल्यावर जांभया देणे सुरू होऊन काही मिनिटातच ज्येष्ठ श्रोतृवर्गाची ब्रह्मानंदी टाळी लागते. मग ही व्याख्याने खरोखरच फलदायी असतात का असा विषय निर्माण होतो. बरं व्याख्यानांमध्ये ऐकण्यासारखं काय असतं. पहिला एखादा तास तर मनोगत, परिचय, सूत्रसंचालकाची शाब्दिक कसरत, आयोजकांची तारांबळ यातच जातो त्यानंतर वक्ता व्यासपीठावर येतो व कोहंमऽऽऽ चा टाहो फोडून त्यात अर्धा तास घालवतो. त्यानंतर पाच एक मि‌निटे दिलेल्या विषयावर तो बोलतो. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात एवढ्या मोठ्या निवडणूक निर्णय अधिकारी 'महिलांची प्रशासकीय कामगिरी' या विषयावरून 'मी व माझा संसार' याकडे कधी वळल्या हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. तर विषय असा डायव्हर्ट होतो. अमेरिकेत भाषण पसंत पडलं नाही तर उभे राहून श्रोता तसे सांगतो. मग वक्त्याला विषयाचं टोनिंग बदलावं लागतं. 'तुम्ही आमचा वेळ घेताहेत' हे सांगण्याची तेथे धमक आहे, आपल्याकडे मात्र वेळ कसा जाईल याकडे लक्ष अधिक असल्याने कुणी भाषण थांबविण्याच्या फंद्यात पडत नाही.

आपल्याकडे असे का होते? वक्त्याला कुणी थांबवण्याच्या भानगडीत का पडत नाही तर त्याचे कारण सोपे आहे. आपल्याकडे मुळात श्रोतेच अभ्यासू नसतात. आपण कोणत्या विषयावरील व्याख्यानाला जात आहोत याची माहिती कधी घेतलेली नसते. त्यामुळे विषय एकदम अंगावर येतो. मग तो पचवला जात नाही आणि डुलकी लागण्यासाठी कारणच मिळते. पाश्चात्य देशांमध्ये वक्त्यांइतकेच श्रोतेही सजग असतात. ज्या विषयाचे व्याख्यान ऐकावयास जायचे आहे तेथे अभ्यास करूनच पाऊल ठेवले जाते. म्हणजे ऐकण्यामध्ये रस निर्माण होतो. विशेष म्हणजे पाश्चात्यांमध्ये एक आणखी पायंडा आहे की व्याख्यान झाल्यानंतर काही मिनिटे प्रश्न विचारण्यासाठी दिलेली असतात. व्याख्यानातून श्रोत्यांना काय आकलन झाले यासाठी ती काही मिनिटे असून त्यात प्रश्नोत्तरे विचारली जातात. वक्त्यालही सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे द्यावी लागतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराविरोधात लढणारा सैनिक

$
0
0

>> फणिंद्र मंडलिक

स्वातंत्र्य पूर्व काळात देशसेवेचे बाळकडू मिळाल्याने पंडित येलमामेंच्या नसानसात आजही देशसेवा भिनली आहे. त्यामुळेच आजही कुठे अन्याय झाल्यास वयाच्या ८३ व्या वर्षीही ते लढण्यास तयार असतात. सत्यासाठी लढतांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची हीच वृत्ती त्यांची ओळख बनली आहे.

पंडित येलमामे यांचे वडील कट्टर देशभक्त होते. कच्चा मसाला विकण्याचा व्यवसाय असल्याने ते गावोगावी जाऊन विक्री करीत असत. तेही स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय असल्याने सत्याग्रह व आंदोलनात सहभागी घेत होते. पुढे ब्रिटीशांनी त्यांच्याविरोधात वॉरंट काढल्याने ते भूमिगत झाले आणि चार मुलांची जबाबदारी आईवर आल्याने त्या धुळ्याला भावाकडे गेल्या. तेथे काही दिवस राहिल्यानंतर येलमामे आईसोबत नाशिकला आपल्या मावशीकडे आले आणि येथे स्थायिक झाले.

रविवार पेठेतील उमा महेश्वर लेनमध्ये वास्तव्यास असताना स्वातंत्र्यासाठी प्रभात फेऱ्या निघत. यात सहभागी होणे, कार्यकर्त्यांना मदत करणे, पत्रके वाटणे अशी काम ते लहानपणापासून करीत होते. पुढे विड्यांच्या कारखान्यात काम करीत असताना कामगारांची पिळवणूक सुरू होती. त्याविरुध्द त्यांनी नाशिकमध्ये संप पुकारला. संप यशस्वी झाल्याने त्यांचा विश्वास दृढ झाला. पुढे विड्या वळणाऱ्या कामगारांचे ते नेते बनले. वसंतराव नाईक, गोविंदराव देशपांडे वामनराव यार्दी, वि. त्रि. पवार याच्या सोबत ते स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले. सन १९४३ चे आंदोलनात त्यांनी मोठी भूमिका बजावली. सन १९५५ मध्ये गोव्याला जाणाऱ्या तुकडीचे नेतृत्व नानासाहेब टिळक करणार होते. त्याही आंदोलनात त्यांनी चार सहकाऱ्यासह सहभाग घेतला. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज होता आणि 'भारत माता की जय'चा नारा देत होता अशा अवस्थेत 'दिव दमण, गोवा लेकर ही रहेंगे' अशी घोषणा बाजी सुरू होती. पोलिस दमणमध्ये जाऊ देत नव्हते. या मार्गावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. रस्त्यात काटे टाकण्यात आले होते. खंदक खोदण्यात आले. यामध्ये काचा टाकण्यात आल्या. अशा अवस्थेत येलमामे व सहकाऱ्यांनी प्रवेश केला व एका घरावर तिरंगा फडकवला. पुढे नानासाहेब टिळक यांच्याबरोबर नाशिकला आल्यानंतर ठिकठिकाणी सत्कार झाले.

नंतरच्या काळात येलमामे यांना एसटीत नोकरी मिळाली. अन्यायाविरुध्द लढणे हा स्थायीभाव असल्याने कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी कामगार चळवळीला वाहून घेतले. तेथे अनेक समस्यांबाबत संप करून कामगारांना न्याय मिळवून दिला. कामागारांचे जीवनमान उचवावे यासाठी पतसंस्थेची निर्मिती करून तिचे रुपांतर पुढे बॅँकेत केले. अनेकांना अडीअडचणीला मदत केली. लहानपणापासून घरतची परिस्थिती बिकट असल्याने कुणाच्याही मदतीला धावून जाणे ही त्यांची ओळख बनली. सध्याच्या पिढी विषयी येलमामे म्हणतात, की नव्या पिढीवर स्वातंत्र्यांचे संस्कार नाहीत. त्यामुळे त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना राहिलेली नाही. सर्वत्र भ्रष्टचार बोकाळला आहे. ज्यांनी देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांचे स्मरण करण्यासाठी आजच्या पिढीला वेळ नाही. फोटो पुरत्या जयंत्या पुण्यातिथ्या साजऱ्या केल्या जातात. येलमामे हे सध्या नाशिक जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत असतात. अधिकाधिक लोकांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करावा यासाठी ते आजही विविध ठिकाणी व्याख्याने देत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘न हि वैरेन वैरानि’ ला प्रथम पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे ​नाट्यनिर्मितीचे प्रथम पारितोषिक जातेय लोकहितवादी मंडळ, नाशिकच्या 'न हि वैरेन वैरानि' नाटकाला...असे म्हणताच महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटाने न्हाऊन निघाले. संबळवर वाजणारा उत्सवाचा स्वर आणि टाळ्यांचा कडकडाट काही क्षण सुरूच होता, इतका की ते वातावरण पुरते भारावून गेले.

निमित्त होते सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संस्कृत व संगीत नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरी, तसेच बाराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचे. नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा पाच विभागीय केंद्रांतून विजेत्या ठरलेल्या नाटकांची अंतिम फेरी पनवेल येथे एप्रिल महिन्यात झाली होती. त्यातील विजेत्या नाटकांचे पारितोषिक वितरण रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडले.

नाट्यनिर्मितीच्या प्रथम पारितोषिकांमध्ये आलेल्या नाशिकच्या 'न हि वैरेन वैरानि' नाटकाने तीन लाखांचे पहिले पारितोषिक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी, अरुण गिते, विजय रावळ, भगवान हिरे, किरण समेळ यांनी स्वीकारले. हिंदी स्पर्धेतील नाट्यनिर्मितीचे पहिले पारितोषिक चंद्रपूरच्या नवोदिता संस्थेच्या 'चिंधीबाजार' नाटकाने मिळवले. संगीत स्पर्धामधील नाट्यनिर्मितीचे पहिले पारितोषिक रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंच संस्थेच्या संगीत स्वयंवर नाटकाला तर संस्कृत स्पर्धेत प्रथम पारितोषिक पुणे येथील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राच्या 'कोऽऽयं राहुल शर्मा' या नाटकाने पटकावले. बालनाट्य स्पर्धेत नाट्यनिर्मितीचे प्रथम पारितोषिक विद्या प्रबोधिनी प्रशाला, नाशिकच्या 'म्या बी शंकर हाय' या नाटकाने पटकावले. यासह नाशिकच्या अन्य कलावंतांनी वैयक्तिक पारितोषिके पटकावलीत. हौशी मराठी नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक 'न हि वैरेन वैरानि' नाटकासाठी मुकुंद कुलकर्णी यांना तर 'म्या बी शंकर हाय' या नाटकासाठी बालनाट्य स्पर्धेचे दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक सागर रत्नपारखी यांना मिळाले. उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक लोकहितवादी मंडळाच्या हेमंत देशपांडे, निखिल भोर, पूजा वेदविख्यात, संस्कृत नाट्य स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनयासाठी अंशु सिंह यांना गौरविण्यात आले. हिंदी नाट्यलेखनसाठी भगवान हिरे, बालनाट्य लेखनसाठी सुजित जोशी, हौशी मराठी नाट्यस्पर्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रथम निषाद हलकर्णी व प्रसाद भालेराव तर संगीत नाट्यस्पर्धा संगीत दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग नाशिकच्या 'तुक्याची आवली' या नाटकासाठी प्रा.आनंद अत्रे यांनी पटकावले. वेशभुषा जयेश जोशी, प्रकाशयोजना विजय रावळ, प्रफुल्ल दीक्षित, नेपथ्य किरण समेळ, रंगभूषा माणिक कानडे, बालकलाकार म्हणून ओंकार पंडित, मधुरा कट्टी यांना गौरविण्यात आले.

यावेळी एकनाथ सातपूरकर, सुरेश गायधनी, रवि रहाणे, बाळ नगरकर, आमदार हेमंत टकले, किशोर पाठक, सुरेखा बेंद्रे, आमदार सीमा हिरे, नवीन तांबट, अविराज तायडे आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. श्रीपाद कोतवाल व पद्मजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

रंगला 'लोककलारंग'

पारितोषिक वितरणादरम्यान 'लोक-कला-रंग' हा लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. त्यात रणांगण, महानिर्वाण, विच्छा माझी पुरी करा, अजब न्याय वर्तुळाचा, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान व झुलवा या नाटकांतील निवडक प्रवेशांचा गीत-नृत्याविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन नवीद इनामदार यांचे होते. नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार, तर संगीत संयोजन सुभाष खरोटे यांचे होते. नंदेश उमप व गणेश चंदनशिवे यांच्यासह अन्य कलावंतांनी कार्यक्रमात सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेशद्वारांचा निर्णय आखाड्यांचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधू-महंतांच्या आखाड्यांचे प्रवेशद्वार रस्त्याच्या दिशेने हवेत, अशी आखाड्यांची आग्रही मागणी असली तरी उपलब्ध जागेत काही आखाड्यांना मागच्या बाजूला जावेच लागणार आहे. त्यामुळे कोणत्या आखाड्याचे प्रवेशद्वार रस्त्याकडे आणि कुणाचे आत ठेवावे याचा निर्णय आखाड्यांनीच घ्यावा, असे सुचवून जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाचा चेंडू आखाड्यांच्या कोर्टात ढकलला आहे.

आखाड्यांना जागा वाटप करण्यासाठी आज, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. आखाड्यांना जागा मिळाल्या की साधुग्राम गजबजण्यास सुरुवात होईल. जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेल्या काही साधू-महंतांनी रविवारी साधुग्रामची पाहणी केली. महंत ग्यानदास यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मेळा अधिकारी महेश पाटील यावेळी उपस्थित होते. रस्त्याच्या दिशेने आखाड्यांचे प्रवेशद्वार असावे, असा मुद्दा साधू महंतांनी उपस्थित केला. मात्र, उपलब्ध जागेपैकी थोडीच जागा रस्त्याला लागून आहे. बरीचशी जागा आतल्या बाजूस आहे. त्यामुळे महंतांच्या मागण्यांबाबत प्रशासनही सकारात्मक असले तरी सर्वांना रस्त्याच्या दिशेने जागा मिळणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी साधू-महंतांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे रस्त्याच्या दिशेने कोणाला जागा द्यावी कुणाला आतल्या बाजूस जागा द्यावी याचा निर्णय साधू-महंतांनीच घ्यावा, असे सुचवित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारांच्या दिशेबाबतचा चेंडू आखाड्यांच्या कोर्टात ढकलला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुरे कर्मचारी अन् तक्रारी भरमसाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुने-नवीन सिडको, अश्विननगर, पाथर्डी व अंबड गाव परिसरातील पथदीप नादुरुस्तीच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आठ दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीवरही कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने निराशेचे वातावरण आहे. विद्युत विभागात कमी कर्मचारी असल्याने ही अडचण येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

परिसरात असलेल्या विद्युत पोलची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी एक उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, दोन इलेक्ट्रीशियन, दहा वायरमन, पाच मदतनीस असे एकूण उपअभियंत्यांसह अठरा ते वीस कर्मचारी आहेत. तसे पाहता सरकारी नियमानुसार सातशे पथदीपांमागे दोन कर्मचारी दिल्यास या विभागात चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना निम्म्याच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण सिडको विभागाचा कारभार चालू असल्याने कामकाज पूर्ण होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

नागरिकांच्‍या पथदीपांच्या तक्रारीबाबत लोकप्रतिनिधी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे करतात. परंतु, प्रत्यक्षात मात्र कामकाज करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याच कमी असल्याने समस्यांबाबत नागरिकांची ओरड कायम रहात आहे. यासाठी मनपाने सिडकोच्या विद्युत विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पथदीप नादुरुस्त होणे, विद्युत पोल खराब होणे, त्यावरील वायर खराब होणे यांसह विद्युत विभागासंदर्भात विविध समस्या आहेत. परंतु, कर्मचारी संख्या कमी असल्याने संपूर्ण तक्रारी सुटत नाही.

वृक्षांचा अडसर

इलेक्ट्रिकच्या तारा ज्या भागातून जातात तेथे अनेक ठिकाणी अनेक वृक्ष असून, या वृक्षांमधून अनेक तारा गेलेल्या दिसतात. अशा तारा पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. कारण विजेचा धोका कोणत्याही वृक्षाला असतोच. त्यामुळे सिडको परिसरातील तारा झाकोळणारी वृक्षे काढण्यात यावीत. तसेच फांद्याही छाटण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागीरकांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदार अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूकदार संघटनांच्या आवाहनाला न जुमानता गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना अन्य वाहतूकदारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. संघटनांकडून दबावतंत्राचा अवलंब होऊ लागल्याने रविवारी गौण खनिजांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. साधुग्राममध्ये मुरूम व तत्सम सामग्री पोहोचत नसल्याने सिंहस्थाची कामे घेणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. डेडलाइन पाळताना आधीच नाकीनऊ आले असताना या बंदमुळे कामे लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे.

एकीकडे सिंहस्थाची कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. पावसाळ्यात कामे करणे मुश्किल होत असल्याने ही सर्व कामे पावसाळ्याच्या म्हणजेच जूनच्या पूर्वीच पूर्ण करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार केले जात होते. मात्र, तरीही ही कामे पूर्ण होण्यास विलंब झाला. पावसाने दिलेली उघडीप सरकारी बाबूंच्या पथ्यावर पडल्याने कामे पूर्ण करण्यास अवधी मिळाला आहे. मात्र, वाहतूकदारांनी बंदच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाविरोधात दंड थोपटल्याने वाळू, विटा, खडी, मुरूमासारखी गौण खनिजे साधुग्राम, तसेच नियोजित वाहनतळांपर्यंत पोहोच‌विण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. काल सायंकाळपर्यंत काही वाहतूकदारांना बंदबाबत माहित नव्हते. त्यांच्याकडून गौण खनिजांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. समज दिल्यानंतर त्यांनीही वाहतूक पूर्णपणे थांबविल्याची मा‌हिती वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शहरात आज एक हजार वाळूच्या तर पाचशे मुरुमाच्या गाड्या जागेवर थांबून होत्या.

मंगळवारी निघणार मोर्चा

वाहतूक बंद करून दोन दिवस झाले तरीही जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार संघटनांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. जिल्हा प्रशासन आडमुठे धोरण सोडत नसल्याने संघटनांचे प्रतिनिधी सोमवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चा व तत्सम आंदोलनांचा मार्ग अनुसरला जाईल असा इशारा श्रमिक बिल्डिंग मटेरियल ट्रक चालक मालक संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केदारने साधली तबल्यावर सुरेल ‘गती’

$
0
0

अश्विनी कावळे, नाशिक

जन्मल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्याच्या डोळ्यात मोतिबिंदू असल्याचं आढळून आलं. त्यातचं पुढे अंधत्त्व येऊन त्याची बौद्धिक वाढही मंद झाली. हा व्यवस्थित चालू-बोलू शकेल का? याची काळजी त्याच्या पालकांना होती. पण पुढे त्याची बोटे तबल्यावर लिलया फिरू लागली अन सर्वांनाच त्याच्यातील कलागुणांची ओळख पटली.

लहाणपणी संवादिनीचा आवाज ऐकूनच कावरा बावरा होणारा इंदिरानगर येथील केदार रविकांत कुलकर्णी तबल्यावर सुरेल आघात करतो. हे बघून त्याच्या कुटुंबीयांनाही अत्यानंद होतो. त्याच्या बालपणी भविष्याचे चित्र रेखाटण्याची संधी कुटुंब‌ीयांसाठी अधांतरीच असली तरी त्याने मात्र तबल्याच्या स्वरांनी त्याच्या कुटुंब‌ीयांच्या आयुष्यात सुरांचे चित्र रंगवले आहे. अंधत्त्व आणि गतिमंदत्त्वावर मात करत केदारने तबला वादनाला आपल्या आयुष्याला विशेष स्थान दिले आहे. तबला वादनाच्या वेळी त्याचे एक वेगळे विश्व असते. त्या विश्वात केवळ तो अन् त्याचा तबला या दोनच गोष्टी असतात असे त्याची आई अनुराधा सांगते. दिवसातून किमान दोन ते तीन

तास तो तबला वादनाचा रियाज करतो.

या काळात त्याच्या घरात गुंजतो केवळ तबल्याचाच नाद. त्याच्या वडिलांचे मित्र विलास पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण मिळत आहे. तबल्याच्या तीन परीक्षा त्याने सहाय्यकाच्या (रायटर) सहाय्याने देऊन त्यात यश मिळवले आहे. मात्र, पुढील परीक्षा देण्याचे आव्हान आता त्याच्यासमोर आहे.

रोज नवं शिकण्याचा ध्यास

शारीरिकरित्या तो असक्षम असला तरी कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करण्यात त्याला गती लाभली आहे. इतर मुलांना तबला वादनातील बारकावे आत्मसात करण्यासाठी जिथे आठ-पंधरा दिवस लागतात, तिथे केदार हे सर्व तबल्याचे उपजतच ज्ञान असल्याप्रमाणे केवळ दोन दिवसातच आत्मसात करतो. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शकांनादेखील त्याला रोज नवे काय शिकवावे, असा प्रश्न पडतो. तबला वादनातील त्याची प्रगती उल्लेखनीय आहे. कोणत्याही गाण्याला तबल्याची उत्तम साथ तो क्षणात देऊ शकतो. सध्या 'नॅब' या अंध मुलांच्या शाळेत तो शिकत आहे. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो. शरीराच्या कमतरतांवर मात करत केदार त्याच्या कलेच्या जोरावर भरारी घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी शाळांची माहिती मिळणार ‘सरल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात खासगी व्यवस्थापनामार्फत चालवल्या जातात. या शाळाची व संस्थांची कोणतीही माहिती एकत्रित संकलित स्वरुपात उपलब्ध होत नाही. त्यामुळे या संस्थांविषयी माहिती मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने 'सरल' (सिस्टीम्स अडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट्स) ही कॉम्प्युटर सिस्टीम तयार करण्यात आली आहे. या संस्थाविषयी सर्व माहिती मिळण्यासाठी ही सिस्टिम उपयुक्त ठरणार आहे.

प्रत्येक शाळेच्या शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या माध्यमातून 'सरल' ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे सतत माहितीची शोधाशोध करणे, स्टेशनरी, पैसा व वेळेची बचत होणार आहे. केंद्र सरकारच्या यूडायस प्रणालीनुसार ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व शाळांकडून माहिती संकलित केली जाते. यामधील माहिती मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असे. ही अडचण दूर होणार आहे. शाळा प्रकार, व्यवस्थापन, मान्यता, पत्ता, संपर्क व्यक्तीचे नाव, मोबाइल नंबर, पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा, तपासणी, मिळालेले अनुदान, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, मोफत साहित्याचा पुरवठा, दुर्बल घटक व वंचित गटातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश, माध्यान्ह भोजन, शाळांमधील भौतिक सुविधा व खेळ साहित्याची उपलब्धता, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब आदींविषयक माहिती उपलब्ध होणार आहे.

शाळांची सद्यस्थितीवर लक्ष

शाळांचे उपक्रम, इमारतींची अवस्था, विद्यार्थीसंख्या, शिक्षकसंख्या आदींची माहिती मिळणार असल्याने शाळांच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यास ही वेबसाईट उपयुक्त ठरणार आहे. तसेच पालकांनाही शिक्षकांकडे असलेले विषय, विद्यार्थ्यांची माहिती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लेसमेंटसाठी कॉलेजेसची हात‌मिळ‌वणी

$
0
0

विद्यार्थी हितासाठी सकारात्मक पाऊल

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये चांगली संधी मिळावी यासाठी शहरातील १७ कॉलेजेसनी हातात हात घातले आहेत. नाशिक इंजिनीअरिंग कॉलेजेस कॉन्सिर्टम अर्थात 'एनईसीसी'च्या झेंड्याखाली शहरातील कॉलेजेस पूल कॅम्पसचा प्रयोग राबवित आहेत. त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतांना दिसून येत आहे.

दिवसेंदिवस बेरोजगारीची वाढती समस्या हाताळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनीअरिंग विद्याशाखेचे डीन गजानन खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील एकूण १७ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर एकत्र आले आहेत. याद्वारेच 'एनईसीसी' या संकल्पनेचा जन्म झाला आहे. मुलांचे हित जोपासणे आणि नोकरीच्या संदर्भातील त्यांचे प्रश्न एकत्रितपणे सोडवता यावे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक कॉलेजमधील खऱ्या अर्थाने गुणवंत विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट ड्राइव्हसाठी पात्र होता यावे यासाठी या संस्थेमार्फत तीन वर्षात विविध कॉलेजमध्ये पूल कॅम्पसचे आयोजन केले जात आहे. पूल कॅम्पसच्या आयोजनासोबत ट्रेनिंग प्रोग्राम, सॉफ्ट स्किल प्रोग्राम यासारखे कार्यक्रमही होत आहेत.

कंपन्यांचे जाळे विस्तारतेय

'एनईसीसी'मार्फत दरवर्षी ४ ते ५ नवीन कंपन्यांशी संवाद साधला जातो. त्यांना नाशिकमध्ये येत पूल कॅम्पस घेण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. आतापर्यंत अशा पूल ड्राइव्हच्या माध्यमातून टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यासारख्या नामांकित कंपन्या कॅम्पससाठी येऊन गेल्या आहेत.

प्रत्येक उमेदवाराला एक संधी

अनेकवेळा हुशारी आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर उमेदवारांना विविध कंपन्यांकडून आवतण दिले जाते. सगळीकडे इंटरव्ह्यू देण्याच्या उद्देशाने सर्व कंपन्यांना विद्यार्थी सामोरे जातात. त्यातील एकच नोकरी तो स्वीकारतो. यामुळे इतर ठिकाणी अन्य होतकरू विद्यार्थ्यांची जागा अडवून ठेवली जाते. यातून हक्काची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन 'एनईसीसी'मार्फत होत असलेल्या इंटरव्ह्यूमध्ये एका विद्यार्थ्याला एकच इंटरव्ह्यू देण्यास परवानगी आहे. मात्र, त्यात तो निवडला गेला नाही तरच तो दुसऱ्या कंपनीच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होता येते.

'एनईसीसी'चे फायदे

- कॅम्पससाठी येणाऱ्या कंपनीला प्रत्येक कॉलेजला संपर्क करण्याची गरज पडत नाही. - 'एनईसीसी'मार्फत नाशिकमधील सर्व इंजिनीअरिंग कॉलेजशी कंपनी संपर्कात राहू शकते. - सर्व कॉलेजमधील मुलांना समान संधी मिळते. - 'एनईसीसी'मध्ये सांमजस्य वाढून एकमेकांचे सहकार्य मिळते. - कॅम्पससाठी अधिकाधिक कंपन्यांनी नाशिकमध्ये याव्यात यासाठी प्रयत्न केले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससीमध्ये नाशिकचा इंद्रधनू

$
0
0

नाशिककर तरुणांमध्येही वाढतेय स्पर्धा परीक्षांबाबत जागृती

मार्गदर्शक पाठबळाचीही मिळतेय साथ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या लौकीकात 'यूपीएससी'मधील यशाने अधिकच भर पडली आहे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अंतिम निकालात नाशिक शहरासह जिल्ह्यातून एकूण सात उमेदवारांनी यशाची मोहोर उमटविली. या परीक्षेचा इतिहास बघता नाशिकच्या विद्यार्थ्यांची यंदाची कामगिरी आशावाद निर्माण करणारीच आहे.

गत काही वर्षांच्या तुलनेत यूपीएससीसह नेट, गेट आणि जेईई सारख्या राष्ट्रस्तरीय परीक्षांना नाशिककर विद्यार्थी अधिक सकारात्मक होऊन सामोरे जात आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गत तीन वर्षांमध्ये वाढली आहे. शनिवारी लागलेल्या यूपीएससीच्या अंतीम निकालाने हीच बाब अधोरेखीत करून नाशिकच्या स्वप्नांमध्ये बळ भरले आहे.

यंदा शहरासह जिल्ह्यातून या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातवर गेली. विशेष म्हणजे यात केवळ शहरी आणि सुशिक्षित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश नाही. पेठसारख्या दुर्गम भागातील अतिसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांपासून तर सटाणा, मालेगाव सारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवारांचाही समावेश आहे. याशिवाय नाशिकमधील विद्यार्थीही मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबांमधून मेहनत घेत यशस्वी झाल्याचे साधर्म्यही या सर्वच उमेदवारांमध्ये आहे. या उमेदवारांच्या 'सक्सेस पाथ'मुळे आता या मार्गावरील नव्या विद्यार्थ्यांनाही हुरूप आला आहे.

रँकिंग मात्र घसरले

काही वर्षांपूर्वी यूपीएससी सारख्या परीक्षांच्या वाट्याला न जाण्याचा ट्रेण्ड नाशिकमध्ये होता. यंदाच्या बॅचने मात्र हा ट्रेण्ड मोडीत काढून पुण्यासारख्या शहरांनाही सकारात्मक संदेश दिला आहे. असे असले तरीही यूपीएससीमध्ये यश मिळविलेल्या सातही विद्यार्थ्यांचे रँकिंग सातशेपेक्षाही अधिक आहे. परिणामी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. मात्र, या यशाने आलेली संधी स्वीकारून स्वप्नातील सेवेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची तयारी या सक्सेस लिस्टमधील काही उमेदवारांनी बोलून दाखविली.

यशस्वी उमेदवार आणि त्यांचे रँकिंग

उमेश खांडबहाले (७०४), कल्याणी मालपुरे (७४२), स्वप्नील शरद कोठावदे (७५५), मयूर रमेश मानकर (९०८), विक्रम वानेरे (९७०), धीरज सोनजे (१००१) , डॉ. योगेश भरसट (१११७)

सामान्य शेतकरी कुटुंबातील संस्कारातूनही हे उत्तम यश मिळाले. कधी अपयशाचीही चव चाखावी लागली. मात्र, इच्छाशक्ती आणि मेहनतीने या अडसरांवर मात करता आली. सध्या दिल्लीमध्ये या परीक्षेसाठी पूर्णवेळ तयारी करीत होतो. - उमेश खांडबहाले

मोठी स्वप्न बघताना मेहनतीस पर्याय नाही. सातत्यपूर्ण अभ्यास करताना वेळेचे व्यवस्थापन, इच्छाशक्ती आणि जिद्द यांचीही सांगड घालावी लागली. सध्या स्टेट बँकेच्या नाशिक शाखेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नोकरी जॉईन केली होती. - कल्याणी मालपुरे

स्पर्धा परीक्षेतून यापूर्वी नौदलात निवड झाली होती. मात्र, प्रशासनात जाण्याची ओढ होती. सध्या आरबीआयमध्ये नोकरी करताना नेमकेपणाने केलेला अभ्यास यश देऊन गेला. - स्वप्नील कोठावदे

सहाव्या प्रयत्नात यश मिळाले. सीआयएसएफमध्ये निवड झाल्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी २००९ पासून प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी सीआयएसएफ जॉईन केले नाही. कठोर मेहनतीसोबत यश मिळविण्यासाठी थोडी वाट बघण्याचीही तयारी हवी. - मयूर मानकर

इंजिनीअरिंगमधील पदवीनंतर खासगी कंपनीत नोकरी जॉईन केली. परीक्षेच्या दृष्टीने माहितीच्या सर्व स्त्रोतांचे व्यवस्थापन आणि अपडेट राहण्यासोबत वेळेचे योग्य व्यवस्थापन केले. - विक्रम वानेरे

यशासाठी स्वत:ला झोकून द्यायला हवे. आश्रमशाळेतून प्राथमिक टप्प्यातील शिक्षण, पेठसारख्या परिसरातील रहिवासी, शेतकरी कौटुंबीक पार्श्वभूमी असतानाही जिद्दीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेच आज दुसऱ्यांदा यशस्वी होता आले.- डॉ. योगेश भरसट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीबीएसई’च्या प्री-पर्सेंटाईलमध्ये घोळ

$
0
0

जितेंद्र तरटे , नाशिक

चुकीच्या प्री-पर्सेंटाईल मेथडमुळे जेईई मेन देणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरची सम‌िकरणेच बदलण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी वापरलेली ही पध्दती कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल दर्शविते तर जास्त मार्क्सच्या विद्यार्थ्यांना तुलनेने कमी पर्सेंटाईल दर्शविते. परिणामी इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळविणाऱ्यांच्या रँकिंगची घसरगुंडी होण्याची दाट शक्यता आहे.

अखिल भारतीय स्तरावर इंजिनीअरिंगच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्सच्या परीक्षेतील प्री-पर्सेंटाईल मेथड चुकल्याचा आरोप पालकांनी केला असून, काही पालकांनी सीबीएसईसह केंद्राच्या मनुष्यबळ नियंत्रण विभागाकडे व पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रार केली आहे. जेईई मेनच्या नुकत्याच लागलेल्या निकालानंतर उद्यापासूनच (७ जुलै) पुढील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होत आहे. चुकीच्या मूल्यमापन पध्दतीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी सीबीएसईने तातडीने दुरूस्तीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पालक करीत आहेत. विशेष म्हणजे एकाच बोर्डातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेर्संटाईलमध्ये ही तफावत निदर्शनास आली आहे.

देशभरातील रँकिंगच्या इंज‌िनीअरिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेस विशेष महत्त्व आहे. चालू शैक्षणिक वर्षात जेईई मेनसाठी सीबीएससीने दर्शविलेल्या नियमावलीनुसार बारावी बोर्डाच्या निकालातील विशिष्ट पाच विषयांमधील मार्कांची एकूण बेरजेवर प्री पर्सेंटाईल सीबीएसई बोर्ड जाहीर करते. या पायरीनंतर जेईई मेन परीक्षेचे पर्सेंटाईल पुन्हा स्वतंत्र पध्दतीने दुसऱ्या टप्प्यात काढल्या जातात. या प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे बोर्डाच्या विशिष्ट पाच विषयांचे मार्क एकत्रित करून त्यांची पर्सेंटाईल चुकीची निघत असल्याचा पालकांचा आरोप आहे. एक विद्यार्थ्याच्या एकूण मार्कांची बेरीज ५०० पैकी ४४७ होते त्यानुसार बोर्डाने त्याला ९९.१४ पर्सेंटाईल दर्शवले आहेत. त्यामुळे त्याचा बी स्कोअर १६३ दाखविण्यात आला. तर दुसऱ्या उदाहरणात एका विद्यार्थ्यांला ५०० पैकी ४४१ एकूण मार्कस् मिळाले आहेत. त्याची पर्सेंटाईल ९९.२६ दर्शविल्याने त्याचा बी स्कोअर १६९.५ होतो. जास्त ‌मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल कमी आणि कमी मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल जास्त दाखविल्याने अंतिम रँकिंग आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत जास्त गुण असूनही फटका बसणार आहे.

जेईई मेनच्या परीक्षा प्रक्रियेत मुल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्याच्या बारावी बोर्डाचे एकूण गुण गृहीत धरून त्यावरून पर्सेंटाईल पध्दतीत जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल कमी दर्शविले जात आहेत. - प्रसन्ना भोरे, स‌िव्ह‌िल इंजीनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पल्लवीच्या धाडसाने चोरटा जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

घरात चोरी होत असल्याचे लक्षात येताच पल्लवीने आरडाओरड सुरू केली. यामुळे चोरट्याने हाती आलेल्या ऐवजासह पळ काढला. मात्र, पल्लवीने त्याचा पाठलाग करीत मदतीसाठी आवाहन केले. काही तरुणांनी पल्लवीच्या हाकेला साद देत चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पल्लवीच्या धाडसामुळे एक अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती लागल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुली संकटाला समर्थपणे तोंड देवू शकतात आणि आपल्या हिमतीने एखाद्या गुन्हेगारालाही जेरबंद करू शकतात हा वस्तुपाठ दिलाय मनमाडच्या सोळा वर्षीय बारावीत शिकणाऱ्या पल्लवी जनार्दन देवरे या मुलीने. आपल्या घरात घरफोडी करीत असलेल्या अट्टल गुन्हेगारास आपल्या समयसुचकतेने थेट पोलिस ठाण्यात पोहोचवून अनेक मुलींना धाडसाचे धडे देऊन मुलींनी वागावे कसे? याचा प्रत्ययच पल्लवी ने आणून दिलाय. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मालेगावचा घरफोड्या पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे सांगितले जात आहे. आई-वडिल बाहेर गेल्याने पल्लवीच्या घराला कुलूप होते. दुपारी क्लासवरून घरी आली तेव्हा बंगल्याच्या बाहेर कुलूप कोयंडा पडलेला पल्लवीला दिसला. बंगल्याच्या मुख्य दार आतून बंद असल्याचे तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. घरात चोर धुमाकूळ घालत असल्याच्या कल्पनेने पल्लवी क्षणभर थबकली. मात्र, तिने प्रसंगावधान राखून बंगल्याच्या मागे जात मोठ्याने आरडाओरड केली. शेजाऱ्यांना आवाज दिला. बाहेर आरडाओरड ऐकून घरात असलेल्या चोराने घरातील सोन्याची अंगठी, दोन मोबाइल, रोख रकमेसह मुख्य दार उघडून बाहेर धूम ठोकली.

विशेष म्हणजे पल्लवीसुद्धा धाडसाने त्याच्या मागे जीवाच्या आकांताने धावली. त्यावेळी आयुडीपी परिसरातील प्रशांत पाटील, अतुल साबळे, सुनील वाणी आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल नलावडे हे सुद्धा पल्लवीच्या हाकेला साद देत चोरट्या मागे धावले. त्यांनी त्याला मुद्देमालासह पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. अन्वर खान नासिर खान असे त्याचे नाव असून, तो घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले. पल्लवीच्या धाडसाने घरातील सर्व ऐवज वाचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानसेवेचे आज टेक ऑफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक ते पुणे ही सेवा अखेर सोमवारपासून (६ जुलै) सुरु होत आहे. मेहेर कंपनीचे ९ आसनी सीप्लेन ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून सोमवारी सकाळी ९.४५ वाजता पुण्याकडे टेक ऑफ घेणार आहे.

नाशिक ते पुणे ही विमानसेवा सुरु करण्याचे मेरीटाईम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस लि. (मेहेर) या कंपनीने घोषित केले. ६ जुलैपासून ही सेवा ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून पुणे येथील लोहगाव विमानतळाच्या ठिकाणी दिली जाणार आहे. प्रारंभीच्या काळात म्हणजेच ६ ते ३१ जुलैच्या काळात नाशिक ते पुणे सेवेसाठी सहा हजार रुपये तिकीट आकारले जात आहे. मात्र, सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात रिटर्न तिकीटासाठी ७४९९ रुपये घेण्यात येणार आहेत. तर, रिटर्न तिकीटासाठी ८९९९ रुपये आकारण्यात येतील, असे मेहेरचे संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी स्पष्ट केले आहे. १ ऑगस्टपासून रिटर्न तिकीटासाठी प्रवाशांना ९४९९ रुपये अदा करावे लागणार आहेत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तिन्ही दिवस प्रत्येकी दोन सेवा दिल्या जाणार आहेत. या सेवेला प्रतिसाद मिळाला तर आठवड्यातून पाच दिवस ही सेवा करण्यात येईल. सोमवारच्या सेवेची सर्व तिकीटे बुक झाली असून, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, 'तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव, मेहेरचे संचालक वर्मा, एस. के. मन यांच्यासह इतर मान्यवर सोमवारी सकाळी ओझर विमानतळाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

पुणे सेवेचे वेळापत्रक

ओझरहून निघेल : सकाळी ९.४५ वाजता आणि संध्याकाळी ५.३० वाजता

लोहगाव (पुणे) पोहचेल : सकाळी १०.३५ वाजता आणि संध्याकाळी ६.२० वाजता

लोहगावहून (पुणे) निघेल : सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ६.५० वाजता

ओझरला पोहचेल : सकाळी ११.५० वाजता आणि संध्याकाळी ७.४० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस तासात पाणी शुध्द

$
0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ताचे पाणी शुध्द करण्यासाठी फिल्ट्रेशन प्लांट सुरू करण्यात आला आहे. हा प्लांट चोवीस तास सुरू राहत असून, कुशावर्ताचे पूर्ण पाणी शुध्द करण्यासाठी चोवीस तास लागतात. मात्र, बॅकवॉश वॉटर पुन्हा गटारीव्दारे गोदापात्रात मिसळत आहे. दिवसाला सुमारे पन्नास हजार लिटर बॅकवॉश वॉटर तयार होते.

फेब्रवारी महिन्यापासून गंगासागर तलावाजवळ फिल्ट्रेशन प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्लांटची क्षमता २.४ एमएलडी इतकी आहे. पर्वणी काळात कुशावर्तात मोठ्या प्रमाणात नारळ, कपडे, दिव्यांच्या वाट्या, तेल, तूप अर्पण केले जाते. यामुळे कुशावर्ताचे पाणी प्रदूषित

होते. मात्र, या प्लांटमुळे कुशावर्तातील सर्व पाणी चोवीस तास स्वच्छ केले जाईल. कुशावर्तात एकूण नऊ लाख लिटर्स पाणी असते. सिंहस्थ काळात हे सर्व पाणी वाहते ठेवले जाईल. ही प्रक्रिया सुरू आहे की नाही याची भाविकांना कल्पनाही येणार नाही. मात्र, पाणी स्वच्छतेची प्रक्रिया सुरूच राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाची कागदपत्रे सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव नगरपालिकेच्या विमानतळ विकास योजनेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती कागदप‌त्रांसह महापालिका प्रशासनाने त्यांच्याकडे सादर केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पोलिसांनी २४ महत्वाच्या मुद्द्यांवर ही माहिती मागवली होती. ती तब्बल एक वर्षांनंतर त्यांना देण्यात आली असल्याचे समजते. नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून विमानतळ विकास योजनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडून ८ एप्रिल २०१४ रोजी माहिती मागितली होती. त्यासाठी २४ मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने नुकतीच ही माहिती पोसिलांना दिली. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असल्याचे म्हटले जात आहे.

हे आहेत २४ मुद्दे

- विमानतळ जळगावच्या हद्दीत येते का?

- विमानतळ विकसित करणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे का?

- विमानतळासाठी लागणाऱ्या साहित्याची रक्कम दर्शविणारा तक्ता

- ११ जानेवारी १९९४ च्या मुख्याधिकाऱ्यांचे नाव

- सहाय्यक अभियंता, नगरपालिका यांची ९ फेब्रुवारी १९९९ ची टिपणी

- सन १९९६ ते २००१ चे कालावधीतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांची नावे व पत्ते

- सन १९९५ ते १९९८ कालावधीत महसुलाची जमा झालेली रक्कम व खर्च

- राईट्स कंपनीने तयार केलेले अंदाजपत्रक

- राईट्स कंपनीला किती रक्कम दिली?

- राईट्स कंपनीच्या ‌नियुक्तीची माहिती

- राईट्स कंपनीला दिलेल्या रकमेचा तपशील

- तांत्रिक मान्यता होती का?

- यश एव्हिएशनला अंदाजपत्रकासाठी किती रक्कम दिली?

- अटलांटाला १० लाख इसारा रक्कम कधी परत केली?

- अटलांटाची किती रक्कम कपात केली?

- अनामत रक्कम परत करण्याचे नियम

- रक्कम परत केल्याच्या बिलांचा तपशील

- मोबिलायझेशन व मटेरियल अॅडव्हॅन्सचा तपशील

- निविदेची कागदप‌त्रे

- करारनाम्याची प्रत

- अटलांटा कंपनीने दिलेली धावते देयके

- देयकातील काम मोजमापाप्रमाणे आहे का?

- विलंबाबाबत दंड केला का?

- लवादाबाबतची मूळ कागदप‌त्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images