Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंगणवाड्यांचे कोसळले प्लास्टर

$
0
0

येवल्यातील कातरणी येथील घटना

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील कातरणी गावातील दोन अंगणवाड्यांच्या खोल्यांच्या छतांची प्लास्टर कोसळल्याच्या घटना मंगळवारी व बुधवारी घडल्या. सदर घटनेत सुदैवाने अंगणवाडीतील बालके बचावली असली तरी त्यात एक अंगणवाडी मदतनीस मात्र जखमी झाली आहे. गतवर्षीच तालुक्यातील बल्हेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका वर्ग खोलीचे छत कोसळले होते. अशातच पुन्हा तालुक्यातील एकाच गावात सलग दोन दिवस वेगवेगळ्या इमारतीचे छत कोसळण्याच्या घटनेमुळे शालेय वर्गखोल्यांच्या केल्या जाणाऱ्या बांधकामाचा निकृष्ठ दर्जा पुन्हा एकदा पुढे आला असून, पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कातरणी येथील क्रमांक एकच्या अंगणवाडी इमारतीच्या छताचा भाग मंगळवारी कोसळून अवघा एक दिवस उलटतो न उलटतो तोच याच कातरणी गावातील अंगणवाडी क्रमांक दोनच्या वर्गखोलीचे छत बुधवारी कोसळण्याची घटना घडल्याने सर्वांचेच धाबे दणाणले. मंगळवारी अंगणवाडी क्रमांक एक मधील घटलेल्या दुर्घटनेची माहिती बघता अंगणवाडी क्रमांक दोन मधील निम्मी मुले बुधवारी अंगणवाडीत आलीच नव्हती. तर जी मुले आली ती देखील भीतीमुळे वर्गाच्या बाहेरच्या पडवीत असल्याने या ठिकाणी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

अंगणवाडी कार्यकर्ती लता सोनवणे व मदतनीस संजीवनी मोरे याही या घटनेतून बचावल्या. कातरणी येथील दोनही अंगणवाडी इमारतींच्या शौचालयाची कामे ही अपूर्णावस्थेत असल्याने या वर्ग खोल्या ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेतलेल्या नाहीत अशी माहिती मिळाली.

घटनेबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार आहे. छत कोसळल्याने मुले भयभीत झालेली असून, गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात अंगणवाडीची शाळा भरविण्यात येणार आहे.

- जयश्री गवळी, अंगणवाडी मुख्यसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

मान्सूनचे अगदी वेळेवर आणि दमदार आगमन झाल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून चाळीसगाव परिसरात पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना तो वरुणराजाकडे करीत आहे.

वेळेवर पावसाचे आगमन होताच सुखावलेल्या शेतकऱ्याने सुरुवातीलाच मोठ्या आनंदात मका, बाजरी व कपाशीची लागवड मोठ्य़ा प्रमाणावर केली. मात्र, लागवड केल्यानंतर काही ठिकाणी कमी प्रमाणात तर काही ठिकाणी पाऊस पडलाच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. गेल्या हंगामात अवकाळी पाऊस गारपीट अशा लहरी निसर्गाशी दोन हात करत खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याने बियाणे व खतांसाठी उसनवारी करून, तर काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून तयारी सुरू केली होती. जून महिन्यात अगदी वेळेवर व सलग तीन-चार दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. आता त्या पावसावर पेरलेल्या पिकांना कोंब फुटले आहेत. पंरतु, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न

पाऊस पडला की शेतमजुरांच्या हाताला लागलीच काम मिळते. परंतु पावसाने दडी मारल्याने शेतमजुरांना कामे मिळणे मुश्किल झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तेही आता आकाशाकडे डोळे लावून बसले असून, पाऊस पडावा यासाठी देवाला साकडे घातले जात आहे.

कृषी केंद्रचालकही चिंतेत

जूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने शहरातील बऱ्याच कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना उधारीवर रासायनिक खते व बियाणे दिली आहेत. वेळेत जर पाऊस झाला नाही, तर त्यांच्यावरही संकट ओढावणार असून, तेही चिंतेत सापडले आहेत.

वन्यजीवही शेतांकडे

पाऊस नसल्यामुळे जंगलातील पाणीसाठे व गवत सुकले असून, त्यामुळे वन्यजीव खाण्यापिण्यासाठी सैरभैर झाले आहेत. त्यांनी जंगले सोडून शेताकडची वाट धरली असून काही परिसरांमध्ये हरिणी शेतांमध्ये दिसू लागल्या आहेत.

पाच लाख हेक्टरवर पेरणी

जिल्ह्याचे सात लाख ५६ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून, जूनमधील समाधानकारक पावसाने आतापर्यंत पाच लाख हेक्टरमध्ये पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कापूस, ज्वारी, मका, सोयाबीनची पेरणी झालेली आहे. पाऊस सुरू राह‌िला असता, तर आतापर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या असत्या, असे जिल्हा कृषी अधीक्षक के. एस. मुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातमूल्यप्रश्नी शिवसेनाही आक्रमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

केंद्र शासनाने कांदा निर्यातमूल्य वाढीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. वाढवलेले कांदा निर्यातमूल्य शेतकरी हितासाठी तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी येवल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना व गारपिटीसह बेमोसमी पावसाच्या तडाख्यातून कांद्याचे उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटणारा कांदा निर्यातमूल्य वाढीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. येवला शहर व तालुक्यातील शिवसेना-पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत प्रांताधिकारी वासंती माळी यांना निवेदन सादर केले. केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रति मेट्रीक टन ४२५

डॉलर करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. अत्यल्प पर्जन्यमानात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकीकडे मोठ्या प्रमाणावर खर्च करून कांद्याचे उत्पन्न घेतलेले असतांना दुसरीकडे समाधानकारक भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यातच निर्यात मूल्य वाढल्याने कांद्याचे भाव सुमारे ३०० रुपये प्रति क्विंटंल घसरले आहेत. यामुळे सरकारविषयी नाराजीचा सूर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटण्याची शक्यता आहे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, रवी काळे, सर्जेराव सांवत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी कॅप सेकंडचाच थांबा!

$
0
0

मायनॉरिटीजचे नवे न‌किष; इंजिनीअरिंग प्रवेशांना नवे वळण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मायनॉरिटीज या गटात मोडणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजेसचे नव्या निर्णयामुळे धाबे दणाणले आहे. या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा नव्याने तयार करण्यात आलेली कॅप एमआय ही कॅटेगिरी त्यांच्या करिअरमधील अडसर बनू पाहते आहे. याबाबत नव्याने आलेल्या नियमाबाबत विद्यार्थ्यांना पूर्वकल्पनाच नसल्याच्या मुद्याहून या संस्थांमध्ये अन्यायाची भावना आहे. नव्या निकषांमुळे मायनॉरिटीजच्या निकषांखाली प्रवेश घेणारे विद्यार्थी कॅप फस्टऐवजी थेट कॅप सेकंड राऊंडला फेकले जाणार आहेत.

भाषिक आणि धार्मिक निकषांवर मायनॉरिटीज या वर्गात मोडणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या राज्यात ७० च्या घरात आहे. या सर्व संस्थांमध्ये डिग्री इंजिनीअरिंगचे सुमारे २० हजार सीट्सही उपलब्ध आहेत. गतवर्षापर्यंत कॅप राऊंडच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत मायनॉरिटीज कॉलेजेस क्षमतेप्रमाणे सीट्स कॅपच्या कोट्यासाठी खुले करून देत होते. एकूण प्रवेश क्षमतेच्या सुमारे ५० टक्के सीट्स हे या प्रक्रियेशी जोडले जात असल्याने दर्जेदार विद्यार्थ्यांचा लाभ या कॉलेजेसला होत होता. या कॉलेजेसच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदाही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत होता. यंदा मात्र प्रवेशाच्या तोंडावर शिक्षण विभागाने इंजिनीअरिंगच्या मायनॉरिटीज कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅप एमआय नावाची नवी कॅटेगिरी केली आहे. या कॅटेगिरीबाबत विद्यार्थ्यांना थेट कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. संबंधित माहितीपत्रकात याबाबत कुठलाही तपशील देण्यात आलेला नाही. या कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना मात्र थेट कॅपच्या दुसऱ्या फेरीत समाविष्ट करण्यात येत आहे. केवळ नव्या कॅटेगिरीमुळे कॅपच्या पहिल्या फेरीतील रँकींगच्या कॉलेजेसना हजारो विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे महामार्ग ‘एलईडी’मुळे झळाळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने विजेची बचत व्हावी या हेतूने नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका ते उपनगरपर्यंत पथदीपांवर एलईडीचे लाईट बसविले जात आहे. सध्या महापालिकेच्या विद्युत विभागाने या कामाने वेग घेतला आहे.

नाशिक पुणे महामार्गावरील द्वारका ते उपनगर पर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असणारे जुने पथदीप काढले जात आहे. त्याऐवजी पथदीपांवर नवीन ११० व्होल्ट क्षमतेचे नवे कोरे एलईडी बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच साधुग्राम परिसरातही याच प्रकारचे ७० व्होल्ट क्षमतेचे १२०० एलईडी तर ११० व्होल्ट क्षमतेचे २ हायमास्ट फिटिंग करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मध्य प्रदेशातील इटारसी येथील सिग्नल केब‌निचे काम दोन आठवड्यांपासून सुरू असल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम होत आहे. गुरुवारी (दि. २) नाशिक मार्गावरील विक्रमी ३० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेगाड्या लेट होणे, रद्द होणे हा सिलसिला आणखी महिनाभर जारीच राहण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वेवर तीव्र नाराज आहेत.

नाशिकमध्ये उद्योग व्यवसाय, रोजगारानिमित्त स्थायिक झालेल्या उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आदी राज्यांतील नागरिकांना मायभूमीत रेल्वेने जाण्याचा मार्गच सध्या बंद झाला आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अप आणि डाऊनच्या गाड्या काही दिवसांपासून रद्द होत असल्याने त्यांना नियोजन रद्द करावे लागत आहे. पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी खाजगी ट्रॅव्हलचा आधार घेतला आहे. रिझर्व्हेशन खिडकीवरही कमी गर्दी होत आहे.

या गाड्या नियमित रद्द

'अप'ला धावणाऱ्या दरभंगा पुणे एक्सप्रेस, झेलम, लखनऊ-मुंबई, गोरखपूर-मुंबई काशी, नागपूर-भुसावळ, कलका-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, इटारसी-भुसावळ, कामाख्या या गाड्या रद्द होत आहेत. तर डाऊनच्या हबीबगंज एक्सप्रेस, गोरखपूर, मुंबई-छपरा गोदान, पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेस, महानगरी, पंजाब मेल, पुणे-पटना, अमरावती जबलपूर, वाराणसी एक्सप्रेस, राजेंद्रनगर, गरीब रथ या गाड्या रद्द होत आहेत.

कर्मचाऱ्यांचा संयम पणाला

रेल्वेचे तिकीट तपासणीस, चौकशी कक्षातील कर्मचारी, अधिकारी प्रवाशांना तोंड देतादेता वैतागले आहेत. प्रवाशी एकच प्रश्न विविध ठिकाणी जाऊन विचारत आहेत. त्यांचा संयम पणाला लागला आहे. कुली, व्हेन्डार, सफाई कर्मचारीही प्रवाशांचे शंकासमाधान करत आहेत.

नाशिककरांचा जीव मुठीत

मुंबई आणि जळगाव दरम्यान प्रवास करणारे नाशिककरही जीव मुठीत धरूनच प्रवास करत आहेत. या टप्प्यातील गाड्या कधी रद्द होईल ते सांगता येत नाही. इटारसीमधील पॅनल केबिनच्या कामाला महिना लागणार असल्याने त्यामुळे नाशिकहून दररोज प्रवास करणाऱ्यांचा जीव मुठीत आहे.

अहमदाबादमधील माझ्या नातेवाईकांना नाशिकमध्ये धार्मिक पर्यटनासाठी यायचे आहे. रेल्वेगाड्यांचे टाईमटेबल विस्कळीत झाल्याने त्यांनी जाण्याचे नियोजन तात्पुरते रद्द केले आहे.

- कुसुमबेन शहा

मी सातपूर एमआयडीसीत कंपनीत कामाला आहे. मुलांची शाळा सुरू झाल्याने त्यांना पाटणा येथे भेटण्यासाठी जायचे आहे. परंतु, १५ दिवसांपासून रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने मलाही नियोजन पुढे ढकलावे लागले आहे. - अलोक पांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी वाढीविरोधात छात्रभारतीचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शिक्षण संस्थांकडून विविध कॉलम्सखाली नियमबाह्य पध्दतीने वसूल करण्यात येणाऱ्या फी वाढीविरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने एल्गार पुकारला आहे. व्ही. एन. नाईक कॉलेज आवारात गेल्या आठवड्यात ठिय्या देणाऱ्या या संघटनेने सातपूरच्या जनता कॉलेजमध्येही दोन दिवसांपूर्वी आंदोलन छेडत फी वाढ कमी करण्याची मागणी केली. यानुसार पदवी अभ्यासक्रमच्या तीनही वर्षातील विद्यार्थ्यांची फी कॉलेजने कमी केली आहे.

शहरातील सर्व कॉलेजेसमध्ये सध्या प्रवेशाचे सत्र सुरू आहे. बहुतांश संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून मनमानी पध्दतीने फी वसूल केली जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. सातपूर येथील मविप्रच्या जनता कॉलेजने यंदा गत वर्षाच्या तुलनेत तब्बल ६ पटींनी फी वाढविली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. याबाबत विद्यार्थ्यांना दाद न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी छात्रभारतीने आंदोलनही छेडले होते. ही फी वाढ करताना पालक अन् विद्यार्थ्यांना विचारात घेण्यात आलेले नाही, प्लेसमेंट्स, उपक्रम, जीम सुविधा आदी सुविधांची फी वसूल करूनही कुठल्याच सुविधा प्रत्यक्षात पुरविल्या जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता. यातही विकास निधीच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या पावत्या या देणग्याच असल्याने फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, असाही सवाल यावेळी छात्रभारतीने उपस्थित केला होता.

या आंदोलदानंतर मविप्रच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीमध्ये प्राचार्य गायकवाड यांसह शिक्षणाधिकारी काजळे, छात्रभारतीच्या वतीने अॅड. शरद कोकाटे, जिल्हाध्यक्ष सागर निकम, शहराध्यक्ष राकेश पवार, निखील गुंजाळ, प्रदीप सोनवणे, दत्ता गडकर आदी उपस्थित होते.

विद्यार्थी व संघटनेची बाजू ऐकून घेत कॉलेजने फी स्ट्रक्चरमध्ये अपेक्षित बदल केल्याची माहिती छात्रभारतीच्या वतीने देण्यात आली आहे. ज्या सुविधा कॉलेजकडून देण्यात येत नाही त्याबाबतची फी रद्द करण्यात आल्याचे संघटनेने सांगतले. तर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया होईपर्यंत संघटनेच्या वतीने या मुद्याचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका संघटनेचे शहराध्यक्ष राकेश पवार यांनी मांडली. मनमानी पध्दतीने फी वसुली करणाऱ्या इतर कॉलेजेसनेही विद्यार्थ्यांची पिळवणूक करू नये, अशी मागणीही संघटनेने केली आहे. अन्यथा त्या कॉलेजेसच्या विरोधातही आंदोलन छेडण्याचा इशारा छात्रभारतीने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठ नियंत्रणाचे सामर्थ्य महिलांकडे

$
0
0

>> मेजर पी. एम. भगत

बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या वस्तूंसाठी सर्वात मोठे ग्राहक महिलाच आहेत. घरातील बहुतेक सर्व आर्थिक व्यवहार महिलाच सांभाळतात. अगदी अन्न-धान्य-भाजीपाल्याच्या खरेदीपासून ते सणासुदीला किंवा लग्न समारंभासाठी लागणाऱ्या साड्या, कपडे किंवा सोनेखरेदी सुद्धा महिलांच्या उपस्थितीत आणि संमतीने होत असते. त्यामुळे बाजारपेठ नियंत्रित करण्याचे सामर्थ्य महिलांमध्येच आहे.

महिलांना दुकानदार अतिशय सन्मानपूर्वक वागणूक देतात. वस्तूंची निवड करतांना आवश्यक ती चिकित्सा, वस्तू माहितीची उत्सुकता, वस्तूच्या किमतीबद्दल व्यापाऱ्याला आपल्या टर्म्सवर आणण्याचे कौशल्य, हे सर्व गुण महिलांना खरेदी-विक्री व्यवहारात उपयोगी पडतात. तरीही कधीकधी व्यापाऱ्यांच्या अनुचित व्यापारपध्दती, लोभ किंवा ग्राहक संरक्षणाच्या अज्ञानापोटी महिलांची फसवणूक होते. पैसे ५ वर्षात दाम दुप्पट करणे, सोने जादूने दुप्पट होणे, धमाका सेल, एकावर एक फ्री, अशा काही प्रकारांना महिला बळी पडतात. आता तर ऑनलाइन खरेदी हा प्रकार बळावत आहे. यातही फसवणुकीचे प्रकार घडतांना दिसतात. या प्रकारातून उद्भवणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात 'ग्राहक संरक्षण'. तक्रार कशी आणि नेमकी कुठे करावी, या तक्रारींच्या बाबतीत ग्राहक संरक्षण कायदा काय म्हणतो किंवा एकंदरीतच 'ग्राहक संरक्षण' कसे करवून घ्यावे, हे महिलांना माहीत नसते. पण ग्राहक पंचायतीचे 'ग्राहक मार्गदर्शन केंद्र' आपल्या मदतीसाठी हजर आहे, याची आठवण त्यांनी ठेवायला हवी.

आजच्या धकाधकीच्या वातावरणात, अन्याय सहन करण्याची मनोवृत्ती आणि 'मला काय त्याचे' ही मानसिकता प्रबळ होत असल्याचे दिसून येत आहे. पण हे योग्य नाही. अन्याय सहन न करता योग्य ठिकाणी, वेळीच आणि योग्य पद्धतीने तक्रार मांडल्यास न्याय निश्चित मिळतो. पण त्यासाठी चिकाटी, धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयता आवश्यक असते. ती महिलांजवळ नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असते आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे महिलांसाठी आवश्यक आहे. ग्राहक मार्गदर्शन केंद्रात बऱ्याच महिला सल्ला घेण्यासाठी येत असतात. मार्गदर्शनानुसार काम केल्याने त्यांना न्यायही मिळालेला आहे.

महिलांनी ग्राहक संरक्षणाच्या काही गोष्टी समजून घ्याव्यात. मूलभूत गरजांच्या वस्तूंचा अनिर्बंधित पुरवठा, वस्तूबद्दलची पूर्ण माहिती मिळण्याचा, वस्तूच्या निवडीबाबत त्यांना कायद्याने असलेल्या हक्काचा, स्वत:चे मत मांडण्याचा, पैसे देवून खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवांपासून सुरक्षिततेचा, ग्राहक प्रशिक्षणाचा आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा हट्टच महिलांनी धरला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी वस्तू व सेवा यांच्या योग्य किमतीचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी यशस्वी वाटाघाटी (बार्गेनिंग) करण्याची क्षमता आपल्याजवळ आहे. कुठल्याही वस्तूची एमआरपी ही शेवटची किंमत नाही, ती सुध्दा कमी करता येवू शकते हे लक्षात असू द्यावे. अन्यायाविरुध्द्ध तक्रार, तक्रार निवारणाचा प्रयत्न, भ्रष्टाचाराला विरोध करणे आवश्यक आहे. हे सर्व करत असतांना महिलांनी स्वाभिमान, सचोटी, नैतिक मूल्ये, श्रमप्रतिष्ठा, स्वदेशी निष्ठा, आणि विश्वस्त भावनाही सांभाळली पाहिजे.

आजच्या आधुनिक आणि जागतिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीत ग्राहकाचे विशेषत: महिला ग्राहकांचे स्थान महत्त्वाचे आहे. ग्राहक राजा आहे. ग्राहकाच्या मर्जीनुसार बाजारपेठ चालावयास हवी. म्हणून ग्राहकाने जागरुक असणे, अत्यंत आवश्यक आहे. आजच्या युगातील महिला ग्राहकांनी वर सांगितल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच 'ग्राहक प्रशिक्षण' या विषयात रस घेवून स्वत:ला प्रशिक्षित करून घेणे ही काळाची गरज आहे. अशा प्रशिक्षित महिलांनी त्यांच्या आप्तइष्ट आणि मैत्रिणींना ही माहिती प्रसारित करून त्यांनाही प्रशिक्षित केल्यास ग्राहक चळवळीस महिलांची संघटित शक्ती प्राप्त होईल आणि त्यांना ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याचे सामर्थ्य मिळेल. समस्त महिलांनी यावर विचार करावा.

(लेखक ग्राहक संरक्षण कार्यकर्ता आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलिझाबेथ एकादशी’ही आता इन्स्टॉलमेंटवर

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

बँक इन्स्टॉलमेंटच्या साचेबध्द आयुष्यात घरे, वाहने अन् सुखवस्तूही हप्त्यांवर मिळू लागल्या. मात्र याला केवळ सायकल अपवाद राह‌िली होती. पर्यावरणास हातभार लावणाऱ्या सायकलरूपी दुव्याचा वापर वाढावा, यासाठी सायकल विक्रेत्यांनी पुढाकार घेतला आहे. सातत्याने नवा ट्रेंड घेऊन येणाऱ्या या सायकल्सही आता सुलभ हप्त्यांवर उपलब्ध होत आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने शहराचे आणखी एक पाऊल पडल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिक, पुणे या महानगरांत एकेकाळी रस्त्यांवर केवळ सायकल्स धावत. त्यासाठी स्वतंत्र रस्ते होते. काळानुरूप सायकलींची जागा वाहनांनी घेतली. मात्र त्यामुळे शरीराला सायकलींगसारखा व्यायाम मिळत नसल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. आरोग्याची जपणूक आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरवासियांमध्ये सायकल्सची क्रेझ वाढू लागली आहे. टूर दी फ्रान्सपेक्षाही अवघड मानली जाणारी रेस ॲक्रॉस अमेरिका म्हणजेच रॅम या सायकल स्पर्धेत नाशिकच्या डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन या बंधूंनी विजेतेपद पटकावून इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय ठरल्याने नाशिक‌च्या शिरपेचातही मानाता तुरा खोवला गेला आहे. महाजन बंधूंच्या यशामुळे सायकल चालविण्याची क्रेझ वाढिला लागणार आहे.

इंधन दर वाढीमूळे खिशाला बसणारी झळ, प्रदुषणामूळे होणारी पर्यावरणाची हानी आणि व्यायामाच्या अभावामुळे बिघडणारे आरोग्य अशा सर्व समस्यांवर सायकल गुणकारी उपाय ठरू लागली आहे. म्हणूनच शहरात सायकलिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सायकल्सच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने इच्छा असूनही लोक सायकल खरेदी करू शकत नाहीत. म्हणूनच सुलभ हप्त्यांद्वारे सायकल सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आणण्याचे काम शहरातील अनेक विक्रेत्यांनी हाती घेतले आहे. शून्य टक्के व्याजदराने सायकल्स मिळू लागल्याने प्रतिसाद वाढतो आहे.

हिरो, अॅटलस, हरक्युलस या भारतीय कंपन्यांबरोबरच जायंट, कॅनेन्डल, स्कॉट, बियांची, फूजी, मोन्ट्रा अशा परदेशी कंपन्यांच्या सायकल्सची नाशकात क्रेझ आहे. तीन हजारांपासून दहा लाखांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत. २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या सायकल्सला नाशकात मागणी वाढतेय. शून्य टक्के व्याजदराने सायकल्सची विक्री केली जाते. नाशिक सायकलिस्ट असोसिएशद्वारे आम्हाला सायकल्सची चळवळ व्यापक करावयाची आहे. - किशोर काळे, सायकल विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल सिटी

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

'रेस अॅक्रॉस अमेरिका' ही स्पर्धा नाशिकच्या हितेंद्र व महेंद्र महाजन बंधूंनी ८ दिवस १४ तास ५५ मिन‌िटात पूर्ण करण्याचा विक्रम केल्याने नाशिककरांमध्ये सायकल चालविण्याची क्रेझ वाढत आहे. साधारण अडीच लाख नाशिककर सायकल चालवितात. शहराच्या अल्हाददायक वातावरणाला सायकल पोषक असल्याने यानिमित्ताने सायकल चळवळीला बळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. शहरातील सायकल चळवळीवर टाकलेला फोकस...

शहरी भागात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे. नाशिक शहरात सध्या प्रदूषण नियंत्रीत असले तरी काही वर्षांत ती पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. देशातल्या सर्वच शहरांची हीच अवस्था आहे. नाशिकमध्ये स्वयंसेवी संस्था जागरुक असल्याने थोड्या फार प्रमाणात याला आळा बसला आहे. सध्या असलेला सायकलचा वापर वाढल्यास पर्यवरणाचे संतुलन राखणारे शहर म्हणून नाशिक प्रसिध्दीला येईल, यात शंका नाही. पण यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे.

सायकलकडे ओढा

महाराष्ट्रातील मोठ्या शहरांचा विचार केला तर सायकल चालवणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असे आहे. मध्यंतरीच्या काळात शहरात सायकल वापराला घरघर लागली होती; परंतु शरीराला सायकलचे महत्त्व समजल्यानंतर अनेक नागरिकांनी पुन्हा आपला मोर्चा सायकलकडे वळवला. सर्वात कमी खर्चिक वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते. आजही शालेय विद्यार्थी, शेतकरी, दूध विक्रेते यांची सायकललाच पसंती आहे. बाजारात विविध कंपन्यांचे वेगवेगळ्या रचनेचे, सोयी-सुविधा असलेल्या 'बाइक्‍स' येत आहेत. मात्र, नाशिकरांची सायकललाच मोठी पसंती असल्याचे दिसून येते. नाशिक शहराबरोबरच सिन्नर, निफाड, लासलगाव, इगतपुरी, मनमाड या शहरांतून मोठी मागणी आहे. गेल्या चार-पाच वर्षांचा विचार केला तर एक सायकल खरेदीसाठी दोन हजार रुपये मोजावे लागायचे. मात्र, आता नाशिककरांकडे लाखो रुपये किंमतीच्या सायकली आहेत. सायकल एवढी महाग होऊनही नाशिककरांचा सायकल खरेदीकडे ओढा वाढतो आहे.

पहिले सायकल सर्कल

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या पुढाकाराने व ग्रीन स्पेस रिएलटर्सचे तेजस चव्हाण यांच्या अर्थिक सहायोगाने नाशिकच्या कृषीनगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात भारतातील पहिले सायकल सर्कल साकारले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त सायकल वापरणारे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिकच्या सायकल प्रेमींनी पहिले सायकल सर्कल तयार करण्याचा विडा उचलला होता. आर्किटेक्ट किशोर शिंदे यांच्या संकल्पनेतून हे सर्कल साकारले असून, यावर ब्राझ धातुची सायकल प्रतिकृती बसविण्यात आली.

नाशिककर देशात प्रथम

नाशिक हे लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील सर्वात जास्त सायकल वापरणारे शहर म्हणून ओळखले जात असल्याचा अहवाल नाशिक सायकल‌िस्ट असोसिएशनने केलेल्या पहाणीत आढळून आला आहे. साधारणपणे नाशिकमध्ये अडीच लाख नाशिककर सायकल चालवितात. गेल्या २० वर्षांपासून सायकलचा वापर वाढावा यासाठी नाशिक सायकल‌िस्ट असोसिएशऩ प्रयत्न करीत आहे. त्याच प्रमाणे छाया बैजल, मनिषा रौदळ, प्रतिभा आहेर यांच्या सारख्या महिलांनी सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी चळवळ उभी केली आहे.

स्वतंत्र ट्रॅक हवा

नाशिक शहरात सायकल वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, अनेक नाशिककर स्वयंस्फूर्तीने सायकलचा वापर करु लागले आहेत. रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी गंगापूररोड सारख्या भागामध्ये नागरिक आपल्या परिवारासह सायकलिंगचा आनंद लुटतांना दिसत असून, पालक संस्था म्हणून नाशिक महापालिका यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करीत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकराने भरतातील सर्व महापालिकांना 'नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट'ला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील मुंबई व पुणे महापालिकांनी यासाठी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केले. पुणे महापालिकांनी रस्त्यांच्या बांधणी बरोबरच सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार केला. त्याप्रमाणे नाशिकमधील प्रमुख रस्त्यावरही सायकलसाठी मार्ग तयार करण्याची गरज आहे.

नाशिकमध्ये सायकलिंग बद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ही पहाणी करण्यात आली. त्या पहाणीत लोकसंख्येच्या तुलनेत नाशिक सर्वात जास्त सायकल वापरणारे शहर ठरले आहे. हा रेशो कायम राहील असा विश्वास आहे.

- किरण चव्हाण, नाशिक सायकलिस्ट असो.

मुंबई-पुण्याच्या तुलनेत सायकल चळवळ अशीच वाढत राहिली तर नाशिकचे वातावरण निसर्ग चांगले राहण्यास मदत होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी अजून सायकल वापरावी.

विशाल उगले, नाशिक सायकलिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपन्यांना शोध असली ‘रँचो’चा

$
0
0

कॅम्पस सिलेक्शनसाठी निकषांमध्येही बदल

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

पूर्वी घरातला मुलगा इंजिनीयर होऊन कमावता झाला की पालकांना आकाश ठेंगणे वाटत असे. आजही इंजिनीअरची क्रेझ काही कमी झालेली नाही. मात्र, नाशिकमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होतकरू आणि मेहनती उमेदवारांचा शोध घेतला जात आहे आणि याचसाठी शहरातील विविध कॉलेजांमध्ये जॉब फेअरदेखील भरविले जात आहेत.

एकेकाळी इंजिनीअर होणे समाजात अतिशय प्रतिष्ठेचे मानले जात होते. राज्यभरात ठिकठिकाणी इंजिनीअरिंग कॉलेज सुरू असले तरी आताही इंजिनीअरिंगची क्रेझ काही कमी झालेली नाही. कॉलेज अधिक आणि विद्यार्थी कमी असे चित्र दिसून येते. इंजिनीअर झाले की मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यताही धुसर होत असल्याचा अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव; मात्र त्यावर नाशिकमध्ये अनेक कॉलेजांनी उतारा शोधला आहे.

जीवघेण्या स्पर्धेत नोकरी मिळवण्यासाठी गुणांवर आधारित कठोर आणि कंपन्यांचे अन्य जाचक निकष यामुळे अनेक उमेदवारांना टॅलेंट असूनही नोकरीची संधी मिळत नाही. या क्षेत्रातील जाणकारही मग मार्कांच्या भाऊगर्दीत हरवलेल्या या उमेदवारांमधील टॅलेंटबद्दल आणि त्यांना न मिळणाऱ्या संधीविषयी चिंता व्यक्त करू लागले आणि यातून एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला.

बहुतांशी विद्यार्थी फक्त मार्क कमी पडले किंवा इयर ड्रॉपमुळे नोकरी मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून सध्या नुकत्याच ग्रेज्युएट झालेल्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतले जात आहेत. या उमेदवारांमधील टॅलेंट शोधत त्यांचा आपल्या कंपनीला कसा फायदा होईल असा विचार करत अनेक मोठमोठ्या कंपन्या नाशिकमधील विविध कॉलेज कॅम्पसमध्ये जॉब फेयर आयोजित करीत आहेत. विशेष म्हणजे यासाठी मार्कांचा कोणताही निकष लावण्यात आलेला नाही. विना निकष कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून उमेदवारांना आपलं प्रात्यक्षिक व रोजच्या जीवनात खरोखरच उपयोगी पडेल असं टॅलेंट दाखवायची संधी मिळत असल्याने सर्वच इंजिनीयरिंगच्या कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या चैतन्याच वातावरण आहे. विशेष म्हणजे कॅम्पस सिलेक्शनसाठी चारही वर्षांची शैक्षणिक प्रगती चांगली असली पाहिजे, अन्य बाबींची माहिती असलीच पाहिजे, असे दडपण विद्यार्थ्यांना जाणवत नाही. त्यामुळे तेही आता आत्मविश्वासाने इधाडस क‌रीत आहेत.

इन, ऑफ आणि पुल कॅम्पस इंटरव्ह्यू

अनेक कंपन्या मार्कांचे निकष ठेऊन चालू शैक्षणिक वर्षात कॉलेजमध्ये येत शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलांना नोकरी देऊन जातात याला इन कॅम्पस प्लेसमेंट म्हणतात. यात फक्त ठराविक त्याच कॉलेजमधील मुलांना संधी मिळते. याउलट पुल कॅम्पसमध्ये मार्कांचे निकष सारखे असले तरी इतर कॉलेजमधील मुलं ही यात सहभागी होऊ शकतात हे विशेष..! तसेच ऑफलाईन कॅम्पस इंटरव्ह्यू हे १वर्ष जुन्या पासआऊट मुलांसाठी आयोजित केले जातात. कोणतेही निकष न ठेवता यात फक्त गुणवत्ता आणि प्रात्यक्षिक अनुभवाच्या जोरावर उमेदवारांना नोकरी दिली जाते. आत्तापर्यंत विविध कॉलेजेसमध्ये अशा ऑफलाईन पद्धतीने एकूण ४ ते ५ कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यूचं आयोजन केलं होतं.

कंपन्यांनी 'कॅम्पस इंटरव्ह्यू'मध्ये निकषांच्या बंधनात अडकून न पडता टॅलेंटचा शोध घेणे स्वागतार्ह आहे. अनुभव व खऱ्या टॅलेंटच्या जोरावर नोकरी मिळवणाऱ्यांना यातून उत्तम संधी मिळत आहे.

- शैलेंद्र विधाते, मेट

प्लेसमेंटसाठी कॅम्पसमध्ये येत असलेल्या कंपन्या विना निकष पद्धत अवलंबित उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. यात अनेक छोट्या कंपनींनीही सहभाग घेतला आहे.

- प्रमोद शहाबादकर, के. के. वाघ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारगृहातील श्रावण बारावी परीक्षेत यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

किशोर सुधारगृहालयातील श्रावण भिसे याने बारावीच्या परीक्षेत उल्लेखीय यश मिळवले. त्याला समाजातील अन्याय दूर करण्यासाठी पत्रकार व्हायचे आहे.

भूतकाळात केलेल्या चुकीबद्दल अनेक किशोरांना सुधारगृहालयाची वाट धरावी लागते. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, व्यक्तिमत्व घडावे यासाठी सुधारगृहालयात अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वर्गशाळा, योगा, आरोग्य शिबिरे, आर्ट ऑफ लिव्हींग, अध्यात्म वर्ग आदींचा समावेश आहे. श्रावणला ठक्कर बाजारासमोरील किशोर सुधारगृहालयात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याने नुकतीच बारावीची परिक्षा दिली. नेमून दिलेली काम वेळेत पूर्ण करुन त्याने पहाटे उठून अभ्यास केला. सायंकाळचा वेळही अभ्यासासाठी दिला. त्यामुळे त्याला बारावीत ५० टक्के गुण मिळाले.

आपल्यावर ओढावलेले कठीण प्रसंग इतरांवर येऊ नये तसेच समाजातील वंचितांना न्याय मिळावा, अशी श्रावणची आंतरिक तळमळ आहे. त्यामुळेेच पत्रकार होण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी सुधारगृहालयाचे प्राचार्य सुनील कुंवर यांनी मुक्त विद्यापीठाशी संपर्क साधला असता विद्यापीठाने त्याचे शुल्क माफ केले. एस. सी. गीते, एम. एस. कोरेकर, व्ही. व्ही. कोरडे, एस. सी. थूल आदींचे मार्गदर्शन श्रावण भिसे याला लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय नाटकांचा आजपासून महोत्सव

$
0
0

आज 'न ही वैरेन वैरानि'; उद्या 'चिंधी बाजार'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आजपासून तीन दिवस पाच राज्यस्तरीय विजेत्या नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, गुरूवार २ ते रविवार ५ जुलै या दरम्यान महाकवी कालिदास कलामंदिरात हा महोत्सव होईल.

हौशी मराठी नाट्य स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या 'न हि वैरेन वैराणि' या भगवान हिरे लिखित व मुकुंद कुलकर्णी दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग आज, २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. उद्या, ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता चंद्रपूरच्या नवोदिता संस्थेचे हेमंत मानकर लिखित व डॉ. जयश्री कापसे-गावंडे दिग्दर्शित 'चिंधी बाजार' हे नाटक होईल. शनिवारी, ४ जुलै रोजी दुपारी ११ वाजता नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेचे सुजित जोशी लिखित सागर रत्नपारखी दिर्ग्शित 'म्या बी शंकर हाय' हे बालनाट्य स्पर्धेतील विजेते नाटक सादर होईल. त्याच दिवशी दुपारी १२.३0 वाजता संस्कृत स्पर्धेतील विजेते 'कोऽहं राहुल शर्मा' हे पुण्याच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे नाटक होईल. तर सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचाच्या 'संगीत स्वयंवर' नाटकाचा प्रयोग होईल. कृष्णाजी प्र. खाडिलकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन संजय गणपुले यांचे, तर संगीत विलास हर्षे यांचे आहे. या महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश राहणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संस्कृत व संगीत नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीचे, तसेच बाराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण रविवार, ५ जुलै रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी सात वाजता होणार आहे. नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा पाच विभागीय केंद्रांतून विजेत्या ठरलेल्या नाटकांची अंतिम फेरी पनवेल येथे एप्रिल महिन्यात झाली होती. त्यातील विजेत्या नाटकांचे पारितोषिक वितरण ५ जुलै होणार आहे. सुमारे ३५ ते ४० पारितोषिके यावेळी प्रदान केली जाणार आहेत.

रंगणार लोककलारंग कार्यक्रम

नाट्यमहोत्सवानंतर 'लोक-कला-रंग' हा लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. त्यात रणांगण, महानिर्वाण, विच्छा माझी पुरी करा, अजब न्याय वर्तुळाचा, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान व झुलवा या नाटकांतील निवडक प्रवेशांचा गीत-नृत्याविष्कार सादर केला जाईल. कार्यक्रमाची संकल्पना नवीन इनामदार यांची असून, दिग्दर्शनही तेच करणार आहेत. नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार, तर संगीत संयोजन सुभाष खरोटे यांचे आहे. नंदेश उमप व गणेश चंदनशिवे यांच्यासह अन्य कलावंत कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. राजेंद्र सिंह यांच्या जलयात्रेला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगविख्यात जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनी बुधवारी नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानावर वृक्षारोपण करुन विश्वशांती जलयात्रेला सुरुवात केली. जलतज्ञांनी सय्यद पिंपरी, बेळगाव ढगा तसेच बेळगाव ढगा येथील बांगडी डोंगर येथे वृक्षारोपण केले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्लोबल वार्मिंग म्हणजे धरतीस आलेला ताप आहे, आजच्या वृक्षारोपणांने तो कमी होण्यास मदत होइल. पर्यावरणांचे संरक्षण करून जलसंवर्धनासाठी नाशिककरांनी एकत्र येऊन मानवी कल्याण करावे, असे त्यांनी आवाहन केले.

कुंभमेळयाची परिभाषा सांगताना ते म्हणाले की, कुंभ केवळ स्नान नसून खोल विचारांचे मंथन आहे. यात संत, शासन, समाज यांनी एकत्र बसून चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवणे आवश्यक आहे. सर्व विश्वात सध्या पाण्यामूळे अशांतता पसरलेली आहे म्हणूनच नाशिक येथून विश्वशांती हेतू जलयात्रेस प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते जर्मनीस जाणार असल्याचे सांगितले. या यात्रेच्या प्रारंभी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंवर्धन सचिव प्रभाकर देशमुख, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, अप्पर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस कमिशनर जगन्नाथन, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह पर्यावरण प्रेमी राजेश पंडित, धीरज बच्छाव, सुनील मेंढेकर, प्रतिक सोनवणे यादी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीच्या सभापतीसाठी चुरस

$
0
0

महाआघाडीत अपक्षांसोबतच काँग्रेसचाही दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी निवडणूक होत असून, त्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. मंगळवारी सभापती आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. सत्ताधारी महाआघाडीत अपक्षांचा दावा असला तरी, काँग्रेसनही उडी घेतल्याने त‌िढा वाढला आहे. तर दुसरीकडे शिवसेना भाजपनेही चमत्काराची भाषा सुरू केल्याने सभापती पदासाठीची लढत अधिक रंगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेसह राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत.

सभापती पदासाठी सत्ताधारी गटातर्फे अपक्षांनी दावा केला आहे. त्यासाठी संजय चव्हाण यांचे नाव आघाडी असून, उपसभापती पदासाठी मनसेचे गणेश चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. असे असले तरी, महाआघाडीत काँग्रेसच्या दोन सदस्यांनी अर्ज खरेदी केले आहेत. त्यामुळे महाघाडीत फूट असल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे आणि योगिता आहेर यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. सत्ताधारी गटातर्फे अपक्ष संजय चव्हाण यांनी अर्ज खरेदी केला आहे. मंगळवारी ११ ते १ या वेळेत अर्ज दाखल होणार आहेत. त्यावेळी चित्र स्पष्ट होणार आहे. सोमवारी रामायणवर यासंदर्भात खलबते करण्यात आली असून, काँग्रेस संदर्भात काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाली. तर अपक्षांनाच जास्त पदे का असा सवाल मनसेच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे महाआघाडीत धूसफूस वाढली आहे. तर दुसरीकडे शिवसेना भाजपने चमत्कारीची तयारी सुरू केली आहे. नाशिक पश्चिम प्रभागात भाजपा नेते वसंत गीते यांच्या मदतीने भाजपने चमत्कार केला होता. त्यामुळे शिक्षण समितीतही चमत्काराची तयारी युतीने सुरू केली आहे.

उपेक्षित काँग्रेस आक्रमक

महापालिकेत सत्ता स्थापनेत मनसेसोबत असलेल्या काँग्रेसला आतापर्यंत काहीच पद मिळाले नाही. त्यामुळे शिक्षण समिती तरी मिळावी यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे आणि योगिता आहेर यांनी अर्ज खरेदी करत, मनसेवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे काँग्रेसला न्याय द्यायचा की, अपक्षांना न्याय असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलबीटी’चे १८९ कोटी मनपाच्या तिजोरीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अन्य महापालिकांना एलबीटीचा आर्थिक फटका बसत असला तरी, नाशिक महापालिकेला एलबीटीचा चांगला फायदा होताना दिसत आहे. महापालिकेच्या तिजोरीत गेल्या तीन महिन्यात घसघशीत अशी तब्बल १८९ कोटी ३५ लाख रुपये एलबीटी पोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम २८ कोटींनी अधिक आहे. एलबीटी विभागातील अधिकाऱ्यांमुळे प्रयत्नांमुळे जकातीचा तोटा भरून निघाल्याने दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी पह‌िल्या तिमाहीत पालिकेला एलबीटी पोटी १६१ कोटी ४७ कोटी रुपये मिळाले होते. चालू वर्षी पहिल्या तिमाहीत तब्बल १८९ कोटी ३५ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यात एप्र‌िल महिन्यात ६६.९१ कोटी, मे महिन्यात ६०.५९ कोटी, जून महिन्यात ६१.९५ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २७.८८ कोटी रुपये अधिकचे मिळाले आहेत. सरासरी १८ टक्के वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत झाली आहे. अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत, वसुलीचा तगादा लावल्याने एलबीटीत वाढ झाली आहे. एलबीटी वाढल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाह‌िरात एजन्सींची नाशिकमध्ये परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग अॅन्ट्रापॅन्युअर (फेम) या राज्यस्तरीय मान्यताप्राप्त जाहिरात एजन्सी व्यायसायिकांच्या शिखर संघटनेची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ४ व ५ जुलै रोजी होणार असून, यात राज्यातील नामांकित जाहिरात एजन्सीज् सहभागी होणार असल्याची माहिती नावा संघेटनेचे अध्यक्ष रवी पवार यांनी दिली.

शहरातील हॉटेल एक्सप्रेस इन येथे होत असलेल्या या बैठकीत जाहिरात व्यवसायात दैनंदिन येणाऱ्या अडचणींवर चर्चा तसेच या व्यवसायातील बदलांसंदर्भात जाहिरातदारांना माहिती व्हावी म्हणून संघटनेची ही बैठक नाशिक येथे आयोजित केली आहे. नाशिक अॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन (नावा) हे या बैठकिचे यजमान आहेत. तसेच या बैठकीत नाशिकसह जळगाव, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सातारा, सोलापूर आदि ठिकाणचे नामांकित जाहिरात व्यावसायिक यात सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संजय अरोरा, राजेश खामकर, राहुल शिलेदार आदि नामांकित जाहिरात व्यावसायिकांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहेत.

यावेळी फेमची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून फेम अस या वार्तापत्रिकेचे प्रकाशन तसेच वेबसाईटचे उद् घाटन होणार असल्याची माहिती फेमचे अध्यक्ष अमरदिप पाटील यांनी दिली. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी नावातर्फे जोरदार तयारी सुरू असून त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, उपाध्यक्ष मंगेश खरवंडीकर व मिलींद कोल्हे-पाटील, खजिनदार अमोल कुलकर्णी, कार्याध्यक्ष राजेश शेळके, जनसंपर्क संचालक दिलीप निकम, संघटक प्रविण चांडक आदी सभासद प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी केंद्रबिंदू; पण...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी हा केंद्र आणि राज्य सरकारचा केंद्रबिंदू असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. सोबतच शासनाच्या आर्थिक मर्यादा असून, शासन किती मदत करणार असा सवाल करत, शासनाच्या भरवशावर जास्त राहू नका.' असा सल्लाही महाजन यांनी दिला. शेतकऱ्यांना शेडनेटसाठी अनुदान देण्याचा निर्णयही लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे.

कृषी दिनाच्या निम‌ित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. शंकरराव ढोकरे, सदाशिव शेळके, सुरेश कदम, उल्हास जाधव, दत्तू ढगे, दिलीप सूर्यवंशी या शेतकऱ्याचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महाजन यांनी शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीवर अधिक भर द्यावा, असे आवाहन केले.

'प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र शासनाच्या मदतीसाठी आर्थिक मर्यादा आहेत. त्यामुळे शासनाच्या भरवशावर जास्त राहू नका' असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला. शेतकऱ्यांना शेडनेटसाठी अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, इस्रायलच्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकारने आमंत्रीत केले आहे. सोबतच फिनोलेक्स आणि जैन इरिगेशनही शेडनेट तयार करायला संमत‌ी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच अनुदानात शेडनेट मिळेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीकाळात तिकिटाला सुट्टी

$
0
0

प्रवासासाठी भाविकांना घ्यावे लागणार ५० आणि १०० रूपयांचे पास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणी काळात भाविकांना बस तिकीटांऐवजी पास देण्याच्या निर्णयापर्यंत एसटी महामंडळ आले आहे. तिकीटे फाडणे, सुट्या पैशांचा हिशोब करण्यात वेळ घालविण्यापेक्षा प्रवाशांना ५० आणि १०० रुपये दराचे एक दिवसाचे पासेस द्या असे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी नाशिकमध्ये दिले. या काळात आवडेल तेथे प्रवास योजनेसाठी देखील प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील असे संकेतही देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आयोजित परिवहन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, वाहतुक विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी, मुख्‍य स्थापत्य अभियंता जे. बी. इनामदार, अपर जिल्हाधिकारी भानूदास पालवे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड, विभाग नियंत्रक यामिनी जोशी आदी उपस्थित होते.

रावते म्हणाले, कुंभमेळा कालावधीत रस्त्यावर केवळ एसटी धावणार आहे. पर्वणीच्या दिवशी बसच्या ७० हजार फेऱ्यांद्वारे ५० लाख प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे. महामंडळाने भाविकांसाठी निर्माण केलेल्या सुविधांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच आकाशवाणीद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा.

बसेस तसेच बसस्थानके स्वच्छ राहतील याची पुरेपुर काळजी घ्या. पर्वणी काळात बसेसमध्ये गर्दी करणाऱ्या प्रवाशांना तिकीटे देणे त्रासदायक ठरेल. सुट्या पैशांचाही प्रश्न निर्माण होईल. त्यापेक्षा प्रवाशांना एक दिवसांचा पास द्या. शहरात फिरणाऱ्यांसाठी ५० रुपयांचा तर त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणाऱ्यांसाठी १०० रुपयांचा पास द्या अशी सूचना रावते यांनी केली. याखेरीज वणी, शिर्डी, शनि शिंगणापूर व अन्य ठिकाणी जाऊ इच्छिणारे भाविक आवडेल तेथे प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मात्र या योजनेचे आवडेल तेथे प्रवास पासेसचे दर वाढविण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले. कसारा येथे बसेस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'हरितकुंभ' उपक्रमाअंतर्गत परिवहन महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या 'ग्रीन बस'चे महामार्ग बसस्थानक येथे रावते यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिज्ञापत्रासाठी एंजंटकडून लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लायब्ररी आणि प्रयोगशाळेच्या डिपॉझिट मिळविण्यासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आलेले विद्यार्थी एजंटांचे शिकार बनत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठी लूट होत असून या त्रासापासून वाचण्यासाठी विद्यार्थी डिपॉझिट न घेण्याचाच मार्ग पत्करत आहेत. परिणामी, कॉलेजची गंगाजळी दिवसेंदिवस वाढतच आहे.

लायब्ररी आणि प्रयोगशाळेच्या डिपॉझिटची रक्कम परत घेण्यासाठी मार्च आणि नोव्हेंबरमध्येच विचारपूस करण्यात यावी असे कॉलेज प्रशासन म्हणत असते. सोबतच डिपॉझिट रिटर्न फॉर्मसाठी म्हणून अकरावी-बारावी तसेच एफवाय ते टीवायच्या सर्वच ओरिजनल रिसीट दाखवाव्या लागततात. रिसीट नसेल तर प्रतिज्ञापत्राचा पर्याय आहे. कॉलेजमध्ये असलेले शैक्षणिक वर्ष, रोल नंबर्स, तसेच मार्क्सशिटद्वारे प्रतिज्ञापत्र तयार केले जाते. प्रतिज्ञापत्र आणल्यानंतरच लायब्ररी किंवा प्रयोगशाळा डिपॉझिटचा फॉर्म दिला जात आहे. हे प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रतिज्ञापत्रासाठी विद्यार्थ्यांची सर्वप्रथम एंजंटांशी गाठ पडते. १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर आणि प्रतिज्ञापत्र करण्यासाठी १०० ते १५० रुपये असे एकूण ३०० ते ३५० रुपये खर्च येत असल्याचे एजंटांकडून सांगितले जाते. २०० ते ५०० रुपयांच्या डिपॉझिटसाठी ३०० ते ३५० रुपये खर्च करणे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिपॉझिट न घेणेच पसंत करीत आहेत. परिणामी, कॉलेजसाठी ही बाब फायदेशीर ठरत आहे.

लायब्ररी डिपॉझिटसाठी फस्ट इयरची रिसीट आवश्यक असल्याचे सांगितले. ती सापडत नसल्यामुळे प्रतिज्ञापत्र बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे माझ्या काही फ्रेंडसनी डिपॉझिट घेतलेच नाही.

- ऋतुजा लोटलीकर, विद्यार्थी

माझ्या एका मित्राचे लायब्ररी व प्रयोगशाळा डिपॉझिट घेण्यासाठी मी त्याच्यासोबत गेलो. त्याला प्रतिज्ञापत्र आणण्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही प्रतिज्ञापत्र करण्यासाठी गेलो असता तेथे आम्हाला एजंट भेटला. आम्ही त्याला पैसे दिले त्याने प्रतिज्ञापत्र आणून दिले.

- प्रशांत नाईक, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images