Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तलाठ्याला अटक

$
0
0

येवला : जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येवला तालुक्यातील भारम येथील तलाठी प्रतिभा नागलवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

येवला तालुक्यातील भारम सजा अंतर्गत असलेल्या रहाडी गावामध्ये वैजापूर येथील एका इसमाने जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी तलाठी यांच्याकडून चार हजार रुपयांची मागणी केल्याने संबंधित इसमाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधतांना तक्रार नोंदवली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादळ, पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून सुुरू असलेल्या संततधार पावसाने बुधवारी रौद्रावतार घेत वादळी वाऱ्यासह झोडपल्याने शहरातील अनेक भागात झाडे कोसळली. तर अनेक भागात विजेच्या खांबांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने व‌िजपुरवठा खंडित झाला होतो. भाभानगर येथे एका टपरीवर झाड पडून महिला जखमी झाली तर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून बुधवारी दुपारपर्यंत ६४० एमएम पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यासह शहरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर नाशिककरांनी याचा अनुभव घेतला. मध्यरात्रीपासून शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. शालिमार येथे कालिदास कलामंदिराजवळ झाडे उन्मळून पडली. भाभानगर येथेही एका टपरीवर झाड पडल्याने महिला जखमी झाली. तर सिडको, सातपूर परिसरातीही झाडे कोसळली. रस्त्यावर झाडे आडवी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरही आयटीआय सिग्नलजवळ झाड पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक खोळबंली. दिंडोरी रोड, पेठरोड परिसरात पावसामुळे अंतर्गत रस्त्यांचे नुकसान झाले आहे. दिवसभरात जिल्ह्यात ६४०.३ एमएम पावसाची नोंद झाली आहे. एकट्या इगतपूरी तालुक्यात २०९ मिमी पाऊस पडला. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर तालुक्यात ९६ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

विजेचा खेळखंडोबा

पहिल्यावहिल्या पावसापासून विजेचा खेळखंडोबा नागरिकांना सहन करावा लागत आहे. बुधवारच्या पावसामुळेही शहरातील अनेक भागात विजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. मंगळवारी रात्रीपासूनच सिडकोसह, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, मेरी, म्हसरूळ, इंदिरानगर, पाथर्डी फाटा परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थांचे होणार स्पॉट ऑडिट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षात राज्यातील पतसंस्थांचे प्रत्यक्ष ऑड‌िट झाले नसल्याने पतसंस्थांमधील भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे राज्यातील दोन लाख ३० हजार पतसंस्थांचे येत्या एक जुलैपासून पुढील तीन मह‌िन्यांत ऑड‌िट केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील दिली आहे.

नाशिकमधील सिंहस्थ कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी गेल्या दोन वर्षात सहकार विभागात झालेल्या कामकाजावर टीका केली. पतसंस्थांचे आपल्याला अत्यंत वाईट अनुभव येत आहेत. दोन वर्षात एवढे साचले आहे की, कारवाई करायला वेळच मिळत नाही. पतसंस्था आणि बँकाच्या नियम ८३ आणि ८८ च्या चौकश्या दोन महिन्यात संपवण्याचे आदेश दिले आहेत. चारशे चौकशांचे मॉनेटरिंग सुरू आहे. चौकशांसंदर्भात नवीन नियम लागू केले असून, तत्काळ सर्व निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. बोगस पतसंस्थांमुळे सर्वसामान्य ठेवीदार नाडला जातो. गेल्या दोन वर्षात या पतसंस्थांचे प्रत्यक्ष ऑडिट झाले नाही. त्यामुळे येत्या १ जुलै ते ३० सप्टेबंर दरम्यान या सर्व २ लाख ३० हजार पतसंस्थांचे जागेवर जावून प्रत्यक्ष ऑडीट केले जाणार आहे. सोबतच हे ऑडीट तपासून घेण्याचीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

ठेवीदारांसाठी नवीन पॅकेज

बुड‌ीत पतसंस्थामधील ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दोनशे कोटीचे पॅकेज दिले. मात्र त्या पॅकजेबाबतचा अनुभव अंत्यत वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ठेवीदारांना वाऱ्यावर सोडणार नसून पन्नास हजार आणि एक लाखांपर्यत ठेवी असलेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करीत आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनी लॉन्ड्रींगप्रकरणी सहकारी व मल्ट‌िस्टेट बँकांवर कारवाईचे अधिकार केंद्राला असल्याने अशा बँकावर सहकार विभाग कारवाई करू शकत नाही. अर्थात या बँकाना परवाने देण्याचा अधिकार राज्यांना असला तरी, कारवाईचे अधिकार राज्यांना नाहीत. जवळपास ११ हजार कोटीचे मनीलॉन्ड्रींग सहकारी बँकामार्फत झाले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई येत नाही. - चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीचा व्हर्च्युअल अनुभव

$
0
0

'फेसबुक दिंडी अॅप'मुळे वारी ग्लोबल

तुषार देसले

भेटी लागी जिवा... लागलिसी आस, पाहे रात्रंदिस... वाट तुझी.

दरवर्षी लाखो वारकरी तहान, भूक विसरून ऊन पावसाची पर्वा न करता संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या दिंडीत पायी सहभागी होतात. पण काही कारणास्तव अनेकांना इच्छा असूनही हा अनुपम सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांचा वंशज असलेल्या स्वप्नील मोरे याने 'फेसबुक दिंडी' हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यामुळे आता स्मार्टफोनच्या एका टचवर वारीचा व्हर्च्युअल अनुभव घेता येणार आहे.

यंदाची वारी ९ ते २७ जुलैदरम्यान होत अाहे. या पायी वारीमध्ये काही अपरिहार्य कारणास्तव सहभागी होऊ न शकणाऱ्या वयोवृध तसेच नोकरी, व्यवसायात, शिक्षणात व्यग्र असणाऱ्या पण मनोमन सहभागी होण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेकांसाठी फेसबुक दिंडी टीमने हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या सहकार्याने पालखी रथाला जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार असून पुणेस्थित 'इंटेलीनेट डाटासिस' कंपनीने संपूर्ण जीपीएस यंत्रणा मोफत उपलब्ध करून दिली आहे.

स्वप्नील मोरे याने मंगेश मोरे, अक्षय जोशी, अमित कुलकर्णी, सुरज दीघे या मित्रांच्या सोबत फेसबुकवर 'फेसबुक दिंडी' हे पेज सुरू केले. या फेसबुक दिंडीचे हे सलग पाचवे वर्ष आहे. यानिमित्ताने फेसबुक दिंडीच्या टीमने ही वारी अधिकच जवळ आणली आहे. प्रत्येक वर्षी या दिंडीला प्रतिसाद वाढत असून आतापर्यंत ८० लाख नेटकरी या दिंडीत हजेरी लावून गेले आहेत.

फेसबुक दिंडी अॅप

या अॅप्लिकेशनमध्ये पालखी प्रत्यक्षात कुठे आहे हे गूगल मॅपवर दिसणार असून पालखी मार्गातील विसावे, मुक्काम, गोल व उभी रिंगणे तसेच नीरा स्नान, धावा, मेंढ्यांचे रिंगण, शुभ्र वस्त्राच्या पायघड्या यासारख्या परंपरांची विस्तृत माहिती, लोकेशन, थेट वारीतले फोटो, व्हिडीओ आणि पालखीपासून त्या ठिकाणचे अंतर दिसू शकणार आहे. दोन्ही पालखी सोहळे हे तीन आठवडे वेगवेगळ्या मार्गाने पंढरीच्या दिशेने चालत असले तरी या व्हर्च्युअल दिंडीमध्ये मात्र दोन्ही पालखी सोहळ्याचे अपडेट क्षणाक्षणाला एकत्रितपणे घेता येणार आहेत. याचा फायदा वाहतूक पोलिस, प्रशाकीय सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा आणि सोहळा प्रमुखांना होऊ शकेल. शेकडो वर्षांपूर्वी वैश्विक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या माऊली व तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे यामळे खऱ्या अर्थाने ग्लोबल झाले आहेत.

असे करा डाऊनलोड

अँड्रॉईड प्ले स्टोअरवर दिंडी फॉर फेसबुक या नावाने आणि अॅपल, विंडोज फोन्सच्या ब्राउझरमध्ये हे अॅप्लीकेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे. app.facebookdindi.com या लिंकवर हे अॅपलीकेशन डाऊनलोड करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ आढाव्यासाठी मुख्यमंत्री शनिवारी नाशकात

$
0
0

प्रशासकीय पातळीवर कामे पूर्ण करण्याची लगबग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शनिवारी शहरात येणार आहेत. त्र्यंबकेश्वरसह शहरातील कुंभमेळ्याच्या विविध कामांची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत.

कुंभमेळ्याच्या ध्वजरोहणासाठी १९ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, कामे पूर्ण करण्यासाठी विविध विभागांची लगबग सुरू आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी प्रशासनाला कामे संपवण्यासाठी ३० जूनची डेडलाइन दिली आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारी, २७ जून रोजी शहरात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज, गुरूवारी जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी त्र्यंबकेश्वरमधील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दुपारी तीन वाजेनंतर कुशवाह यांनी त्र्यंबकेश्वरमधील विविध कामांची पाहणी केली.

कार्यशाळेला हजेरी

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये 'स्वच्छ महाराष्ट्र अभियाना'ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून नाशिक विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त आणि नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा व 'नाशिक

विभागाचा, संकल्प स्वच्छतेचा' या कार्यक्रमाचे आयोजन २७ जून रोजी सकाळी साडेनऊ ते साडेचार वाजे दरम्यान डॉ. मुंजे इन्स्टिट्युट, भोसला मिलिटरी स्कूल येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कार्यशाळेला उपस्थित महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना फडणवीस स्वच्छतेचा संकल्प देणार आहेत. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीष महाजन, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, नगरविकास विभागाच्या सचिव व अभियानाच्या नोडल सचिव मनिषा म्हैसकर, संचालक तथा आयुक्त नगरपालिका प्रशासन मीता राजीव लोचन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मान्यवर घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०० हरित बसेसचा ताफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रशासनाने मांडलेल्या 'हरितकुंभ' संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'हरितकुंभ' जागृतीसाठी राज्य परिवहन मार्ग महामंडळही पुढे सरसावले असून, कुंभमेळा काळात नाशिक शहरात हिरव्या रंगाच्या, नवीन २०० बसेस लवकरच महामंडळाच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत.

काही दिवसांवर येऊन ठेपलेला नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा यावेळी देशात एक नवा पायंडा पाडू पाहत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि हा कुंभमेळा अधिक पर्यावरणस्नेही करण्यासाठी प्रशासनाने 'हरितकुंभ' संकल्पना मांडली आहे. स्वच्छतेबरोबरच जनतेत पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

हरितकुंभ संकल्पनेतील विशेष उपक्रमांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने २०० नवीन हिरव्या रंगाच्या एसटी बसेसच्या ताफ्यात लवकरच सहभागी होत आहेत. या नव्या, विशेष बसेसच्या माध्यमातून हरितकुंभाविषयी सांकेतिक संदेश देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. पुण्याच्या दापोडी एसटी कार्यशाळेत या बसेसची रंगरंगोटी सुरू असून, लवकरच या बसेस नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवर धावतांना दिसणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिघडले घाटाचे इंजिनीअरींग

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

नदीकिनारी घाट तयार करताना नैसर्गिक उतारामुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. डेडलाइन गाठताना उताराच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून घाट तयार करण्यात आले. मात्र, यामुळे ५०० क्युसेस पाणी नदीपात्रात आल्यानंतर काही घाटांच्या तीन पायऱ्या पाण्यात तर काही घाटांच्या पायऱ्यांपर्यंत पाणीच पोहचू शकलेले नाही. बिघडलेल्या या इंजिनीअरींगमध्ये काय सुधारणा करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी परि​स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पावसाचे प्रमाण यावर कुंभमेळ्याच्या आयोजनाची सर्व मदार अवलंबून असणार आहे. भाविकांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रशासनाने टाळकुटेश्वर मंदिराच्या पुढे नवीन घाटाची उभारणी केली आहे. तपोवन, दसक आणि टाकळी या ठिकाणी देखील भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी नदीचा नैसर्गिक उतार वेगवेगळा होता. याचा थेट परिणाम घाटांची निर्मिती करताना झाला. तरीही, पाटबंधारे विभागाने 'देखणे' घाट तयार केले. काही दिवसांपूर्वी गंगापूर धरणातून ५०० क्युसेस इतक्या वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे रोटेशन सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची वेगवेगळी परिस्थिती निर्माण झाली. तपोवनातील घाटाजवळ नदीवरच बांध तयार करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी पाण्याचा फुगवटा तयार झाला. रामकुंड भागात सुध्दा योग्य प्रमाणात पाणी पोहचले. तर, कन्नमवार पुलानजीक पाण्याचे तितकेसे प्रमाण नसल्याचे दिसते. खोल भागापासून भाविकांना दूर रोखण्यासाठी प्रशासनाने रेलिंग लावल्या असून, सध्याच्या पाण्यामुळे त्याही पाण्यात गेल्या आहेत. मात्र, त्यानंतर अवघा गुडघाभरच पाणी घाटांच्या पायऱ्यांवर आले.

यात किती भाविक स्नान करणार असा प्रश्न यातून निर्माण होतो. ५०० क्युसेसपेक्षा जास्त पाण्याचा प्रवाह वाढवल्यास रामकुंडासह टाळकुटेश्वर मंदिराच्या घाटाचा बराचसा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने एकाच क्षमतेच्या पाण्यात सर्वच घाटांना पुरेसे पाणी उपलब्ध ठेवण्याची कसरत प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन असे वरिष्ठ अ​धिकारी याकडे लक्ष ठेऊन आहेत.

तात्पुरते अडथळे उभारणार

नदीपात्रात योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध राहावे यासाठी पर्वणीदरम्यान तात्पुरत्या स्वरूपात अडथळे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे ५०० क्युसेस पाण्यातच टाकळी, दसक घाटांपासून रामकुंडापर्यंत सर्वच ठिकाणी पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध राहील असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोटक्लबला घरघर!

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

माजी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून बोटक्लबच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. हा बोट क्लब म्हणजे नाशिककरांचे एक स्वप्न होते. नाशिकमध्ये आलेल्या पाहुण्यांना काय दाखवायचे असा प्रश्न या बोट क्लबमुळे दूर होण्यास मदत होणार होती. परंतु, कामाची मुदत संपूनही या बोट कल्बचे काम रेंगाळले असून, तो सुरू होण्यास आणखी काही महिने लागतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या अगोदर कामं अर्धवट असताना मोठा गाजावाजा करीत या बोटक्लबचे घाईघाईने उद्‍घाटन उरकण्यात आले. यावेळी अभिनेता सलमान खान, सुनिल शेट्टी या सारख्या दिग्गज कलाकारांना बोलवून नाशिककरांपुढे मोठा बागुलबुवा उभा करण्यात आला, मात्र निवडणुका संपताच या बोटक्लबच्या अर्धवट राहीलेल्या कामालाही घरघर लागली.

हस्तांतर प्रकिया रखडली

हे काम सध्या जलसंपदा विभागाकडे आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची असणार आहे. या प्रक्रियेस आणखी काही महिने लागण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर एमटीडीसी या ठिकाणचा कार्यभार बघणार आहे.

'बोट क्लब'चा एरिया

> बोट क्लब एरिया ६,४०८ स्क्वे. मी. > बोट क्लबसाठी पॅव्हिलियन बिल्डिंग १०८७.४८ स्क्वे. मी. > बोट क्लब प्रशासकीय बिल्डिंग २३८.६५ स्क्वे.मी. > बोट क्लब दुरुस्ती इमारत १६४.५५ स्क्वे.मी > संपूर्ण इमारत बांधकाम एरिया १४९०.६८ स्क्वे.मी.

रिक्रिएशन क्लब

> रिक्रिएशन पार्क प्लॉट २०३७० स्क्वे.मी. > रेस्टॉरंट आणि रिक्रिएशन पार्क ४२९.२८ स्क्वे.मी. > रिक्रिएशन पार्क कॉटेज ४००.२५ स्क्वे.मी. > रिक्रिएशन पार्क पॅव्हेलियन बिल्डिंग १६८.४२ स्क्वे.मी. > संपूर्ण बांधकाम क्षेत्र ९९७.९५ स्क्वे.मी.

रिक्रिएशन सेंटरचे उडाले पत्र

गंगापूर धरणावर साकारल्या जात असलेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या प्रकल्पाला पूरक अशा 'रिक्रिएशन क्लब' चीही किनार लाभणार आहे. गंगापूर धरणालगत असलेल्या सरकारी विश्रामगृहाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या ६ एकर जागेवर हा क्लब उभारला जाणार आहे. जिल्हा नियोजन व विकास विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यातर्फे उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पात तिकीट काउंटर, अॅम्फी थिएटर, रेस्टॉरंट, संगीत कारंजा, पॅव्हेलियन विथ सीटआऊट, प्ले ग्राऊण्ड, लॅण्डस्केप गार्डन, पार्किंगसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वरच्या भागातून धरणाचा नजारा बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या सेंटरचे काम पूर्ण झाले असते. मात्र, छतावर लावलेले पत्रे उडून गेल्याने पुन्हा याची दुरुस्ती करावी लागत आहे.

बोटी पडल्या धूळखात

या ठिकाणी ४७ बोटी गेल्या अनेक दिवसांपासून येऊन पडल्या असून, त्या वापरात नसल्याने त्यांची अवस्था खराब झाली आहे. या बोटी वाहून नेण्यासाठी असलेल्या ट्रॉली पंक्चर झाल्या आहेत. त्याचप्रमाणे बोटी अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्या सुरू करण्यासाठी तज्ञ मंडळींची मदत घ्यावी लागणार आहे.

असा झाला खर्च

> बोट क्लब बांधण्यासाठी १४ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये > बोटिंगची सुविधा पुरविण्यासाठी ८ कोटी २७ लाख ५० हजार रुपये > एकूण २३ कोटी ७ लाख ८६ हजार रुपये

या होणार सुविधा

बोट क्लबसाठी सुसज्ज व भव्य इमारत, छोटे अॅम्फी थिएटर, बगीचा व लॅन्डस्केपिंग, जेटी ब्रीज, प्रशासकीय इमारत व स्वच्छतागृह, दुरुस्ती शेड, विद्युत गृह, सुरक्षा चौकी, वाहनतळ, बोटक्लब भोवती सुरक्षा भिंत. बोटी विदेशी मेकच्या असल्याने परदेशातून आयात करण्यात आल्या आहेत. बोटींची किंमत ८ कोटी २७ लाख ५० हजार.

आम्ही बोटक्लबचे काम केले आहे. हे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर उद्‍घाटन समारंभही पार पडला आहे. आम्ही हा प्रकल्प जलसंपदा विभागाकडे सुपूर्द केला आहे. - विलास बिरारी, संचालक, हर्ष कन्स्ट्रक्शन

नाशिकमध्ये हा बोट क्लब सुरू झाल्यास पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे उद्योग घंदे वाढीस लागणार असून, नाशिककरांसाठी नवे दालन खुले होणार आहे. मात्र, सध्याची त्याची अवस्था बघता हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरणे कठीण बनले आहे. - योगेश पाटील

फाळके स्मारकनंतर नाशिककरांना फिरण्यासाठी दुसरे ठिकाण नव्हते. हे केंद्र त्याला पर्याय ठरू पहात होते. मात्र, वर्षे उलटले तरी हा प्रकल्प सुरू झालेला नाही. त्याची कोणतीही चिन्हेही दिसत नाहीत. - सुहास बेदडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थनगरीत मिळेना पिण्याचे पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थनगरी असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरात पाच दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही, तर तासोनतास वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाचा कहर आणि तशात वादळी वारे यांच्याशी मुकाबला करीत असतांना नागरी सुविधा दुरापस्त झाल्या आहेत. कोट्यवधी भाविकांच्या सुविधांचे नियाजन करीत असतांना नगरपालिका, वीजवितरण आणि संबंधित यंत्रणा अवघ्या दहा हजार नागरिकांना मुलभुत सुविधा देण्यास कमी पडत असेल तर सिंहस्थ पर्वकालात गर्दीच्या वेळेस काय हाहाकार होऊ शकतो, याची कल्पनाच केलेली बरी असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.

त्र्यंबक शहरात ब्रम्हगिरीच्या कुशीत असलेले अहिल्या धरण ओव्हर फ्लो झाले आहे. गोदावरी आणि अहिल्या नदीपात्र दुथडी बरून वाहत आहे आणि शहरात नळाला पाणी नाही ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरते आहे. उन्हाळ्यात अंबोली धरणात पाणी नाही म्हणून आठवड्यातून अवघे दोन दिवस पाणीपुरवठा तर आता वीज नाही म्हणून आठवडाभर नळाला पाणी येणार नसेल तर नागरिकांना याचे गा-हाणे कोणाकडे मांडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्र्यंबक पालिकेने पाण्यासाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. अंबोली योजनेसाठी १९९० आणि २००३ असे दोन वेळेस कोट्यवधी रूपये खर्ची घातले. त्यानंतर खास विद्युत वाहीनी टाकली तरी देखील पाणीटंचाईचे संकट टळले नाही. धरणात पाणी नाही हे नेहमीचे झाले तर हिवाळ्यात अन् पावसाळयात मोटारपंप जळाला अथवा नादुरूस्त झाला आणि वीजपुरवठा उपलबध्द नाही अशी कारणे पुढे करीत शहरात टंचाई कायम राहिली आहे. दरम्यान, येथील अहिल्या धरणासाठी स्वतंत्र जलकुंभ आणि जलशुध्दीकरणा करीता सुमारे पाऊण कोटी रूपये खर्ची केला मात्र हे पाणी आजही पावसाळ्यात वाहून जात आहे. धरणाची उंची आणि खोली वाढण्यासाठी खर्च करण्यापेक्षा नसलेल्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याचा प्रकार नागरिकांच्या पचनी पडलेला नाही. सिंहस्थ २०१५ करीता गौतमी बेझे प्रकल्प सुमारे ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये शहरातील पाइपलाईन झाली व प्रचंड क्षमतेचे जलकुंभ झाले. आज वीज नाही म्हणून त्र्यंबकला पाणी मिळणार नसेल तर याचा उपयोग काय असा सवाल आता नागरिक या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी अहमहिकेने पुढे येणा-या नगरसेवकांना विचारत आहेत.

आडात नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?

वीजवितरण यंत्रणा कुंभमेळ्यात तरी सुरळीत राहील काय, अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. सुमारे पाच कोटींचे भूमिगत वायरींग केलेल्या शहरात २४ तास वीज नसेल किंवा दर अर्ध्यातासला पुरवठा खंडीत होणार असेल तर नागरिकांची ही शंका रास्त आहे.

शहरात लाखो साधू आणि काही लाख भाविक शाहीपर्वणीच्या पूर्वसंधेपासून ते पर्वणीच्या दिवशी स्नान दर्शन आटोपत नाही तोपर्यंत राहणार आहे. रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा असा खंडीत झाला तर काय प्रसंग ओढावेल याची कल्पना देखील करता येणार नाही. असाच प्रकार संपर्कमाध्यमांचा होत आहे. कुंभमेळा पूर्वीच नेटवर्क जाम होत असून सर्वात खात्रीचे आणि अधिक वापराचे बीएसएनएल त्यात आघाडीवर आहे. एकुणच परिस्थिती अशी अत्यंत चिंताजनक असतांना सिंहस्थ कामे पूर्ण झाली असे म्हणणे अधिक धारिष्ट्याचे ठरले आहे. सुविधांची वाणवा आपत्तीजनक असून येथील मोकळ्या चौकात आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेवून समाधान व्यक्त करणाऱ्या शासनाने याची गंभीर दखल घेण्याची जाणकार नागरिकांची मागणी आहे.

वीजपुरवठ्याचे तीनतेरा

त्र्यंबकेश्वर शहर आणि तालुका सह्याद्रीच्या रांगामध्ये वसले आहे. किंबहुना सह्याद्री पर्वतरांग येथूनच प्रारंभ होतो. पश्चिम घाटात वसलेल्या या तालुक्यात आणि शहरात पाऊस आणि वारा सोसाट्याचा असतो याची कल्पना शासनास आहे. या सर्वांचा विचार नियोजनात झालेला असावा. तथापि पहिल्याच वारा आणि पावसात वीजवितरणाचे शंभरच्या आसपास खांब कोसळले. नीलपर्वत जुना आखाडा आणि इतर साधुमहात्म्यांच्या आश्रमाकडे वीजपुरवठा करणारे खांबांचाही यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील ग्रामिण भागात अधिक भयावह परिस्थतीती निर्माण झाली आहे. परिणामी आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी अंधारात कंठावा लगातो आहे. बारा वर्षांनी सिंहस्थ आला. त्याची पूर्वतयारी झाली. मात्र नागरिकांच्या समस्या सुटल्या नसून त्यात वाढच झालेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या लपंडावाने नाशिककर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संततधार पावसामुळे गुरूवारी शहरातील पंचवटी, रविवार पेठ, भद्रकाली, द्वारका, जुने नाशिक, पुणे रोड, नाशिकरोड, सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर, देवळाली गाव भागात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते. महावितरण तक्रार घेत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न नागरिकांना पडला होता. पावसासाठी महावितरण सज्ज नव्हते का? असा प्रश्नही नागरिकांनी केला.

गेल्या आठवड्यापासून नागरिकांनी महावितरणच्या कॉल सेंटरला अनेकदा कॉल करून तक्रार नोंदवली मात्र 'काम सुरू आहे' यापलिकडे उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायालाही फटका बसत असल्याची तक्रार व्यापारी वर्ग करीत आहे. बुधवारी रात्री पावसामुळे नाशिकरोड, पंचवटी तसेच द्वारका भागांतील काही ठिकाणचा व‌ीज पुरवठा खंडित झाल्याने परिसर सायंकाळी सात वाजेपासून अंधारात होता. निमाणी, महालक्ष्मी चित्रपटगृह परिसर, नवीन आडगाव नाका, हिरावाडी, अमृतधाम अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, टाकळी, टाकळीरोड, काठेमळा, द्वारका, शंकरनगर, उपनगर, गांधीनगर या भागातील वीज पुरवठा काहीकाळ खंडित झाला. वीज पुरवठ्याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता पावसामुळे भूमीगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंड‌ति होत असून, काही ठिकाणी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रान्सफार्मर जळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

सिंहस्थाची कामे सुरु असल्याने आठवड्यातून एक वेळा दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंड‌ति होत असल्याचे कारण महावितरणने दिले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शनिवार व रविवार अशा दोन्ही दिवशी वीज पुरवठा अनेकदा खंड‌ति झाल्याने नागरिकांमध्ये महावितरणबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निरामय आरोग्या’त‌ून दिशा

$
0
0

बीपी, हार्ट अॅटॅक, डायबिटीसबाबत डॉ. ओस्तवाल यांचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीपी, हार्ट अॅटॅक व डायबिटीस हे तिनही आजार आरोग्याचा घात करू शकतात. हे आजार होऊच नये यासाठी तारुण्यापासूनच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या आजारांना सामोरे जावे लागलेच तरी ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणे गरजेचे आहे, असे सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी सांगितले.

'महाराष्ट्र टाइम्स' व 'सुयश हॉस्पिटल' यांच्यातर्फे 'निरामय आरोग्य' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आजारांपासून स्वतःला कसं वाचवायचं याबद्दल प्रामुख्याने त्यांनी चर्चा केली.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांची माहिती देत डॉ. ओस्तवाल यांनी हृदयाची कार्यप्रणाली समजावून सांगितली. तसेच हार्ट अॅटॅक कशाप्रकारे येतो याची उपस्थितांना जाणीव करुन दिली. महिलांच्या आजारपणाबद्दल त्यांनी सांगितले, की महिलांची घरातील भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या जबाबदार्यांचे प्रमाणही पुरुषांपेक्षा जास्त असते. घरातील महिलेने आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. म्हणूनच ती आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी पडतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यावर महिलांनी भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. ओस्तवाल यांनी दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर करीत रक्तातील साखर, हिमोग्लोबिनचे प्रमाण, ब्लड प्रेशर मॉनिटरींग आदींविषयीची उपयुक्त माहिती दिली. नाशिककरांच्या आरोग्यासाठी 'मटा'ने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर चित्पावन मंगल कार्यालय (मॅनेज बाय एस. आर. केटरर्स) होते.

अतिशय उपयुक्त व माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम होता. आरोग्यासाठी शरीराला कोणत्या सवयी असणं गरजेचं आहे, व्यायामाचे महत्त्व याची उत्तम माहिती मिळाली. - अजय संगमनेरकर

आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो याची जाणीव 'मटा'च्या या कार्यक्रमामुळे झाली. दैनंदिन जीवनात काय करावे, काय करू नये, याची उपयुक्त माहिती डॉ. ओस्तवाल यांच्याकडून मिळाल्याने आरोग्याबाबत योग्य दिशा मिळाली. - सुषमा शिंदे

नियमित व्यायाम करावा.

> तेलकट पदार्थांचे सेवन आहारात कमी असावे. > स्थुलपणाचा धोका असल्याने वजनाचे प्रमाण उंचीनुसारच असावे. > ताण-तणावापासून दूर रहावे. > आजारांसंबंधित वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्याव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचे ‘जीवन’ धोक्यात!

$
0
0

शहरात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाण्याच्या त्याच्या मूलभूत गुणधर्मामुळे जीवनाचे महत्त्व प्राप्त आहे. पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. मात्र, याच पाण्याचा दुषित पुरवठा होऊ लागला तर मनुष्याचे जीवन धोक्यात येऊ शकते. सध्या दोन दिवसांपासून नाशिककरांना महापालिकेकडून दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शुध्द पाणी पुरविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहे. या गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात शहरासह परिसरात झालेल्या पावसामुळे नागरिक सुखावले असले, तरी गाळयुक्त पाणीपुरवठ्यामुळे नाशिककरांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. नळाद्वारे गाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यात अतिशय गढूळ पाणी प्यायला मिळत असल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कुटुंबाचे आरोग्य कसे सांभाळावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. पावसाळ्यात रोगराई बळावते. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीत दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका संभवतो. या बाबीचे गांभीर्य मात्र महापालिकेला नसल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात सर्वत्र गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे लहान मुलांना तर तत्काळ त्रास होत आहे. शहरातील दवाखाने रुग्णांच्या गर्दीमुळे फुल्ल झाल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या काही हजार नळजोडणीधारकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गंगापूर धरणातून होणारा हा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ढवळून निघाला आहे. पावसाळ्याआधी काही काही दिवसांपूर्वी शहरात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होत होता. मात्र, तीन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाचा जलस्तर वाढला आहे. पुराचे गढूळ पाणी धरणात शिरल्याने शहरवासियांना गढूळ पाणी मिळत आहे. एरवी महापालिकेकडून पाण्याची योग्य तपासणी केली जाते. मात्र, गढूळ पाण्यात अत्यंत सूक्ष्म जीवंजतू आढळत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. बुधवार, गुरूवारीदेखील सकाळी शहरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला गेला.

सध्या परिसरामध्ये अत्यंत गढूळ पाणी येत आहे. आरोग्याचे अनेक अडचणी पाण्यानेच सुरू होतात. त्यामुळे हे पाणी पिताना काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी पाणी गाळून भरावे तसेच नंतर ते पाणी उकळून गार करून मगच प्यावे. गढूळ पाणी प्यायल्याने अनेक आजार बळावतात. आजारी पडण्यापेक्षा प्राथमिक काळजी घेतलेली कधीही चांगली. - डॉ. सुदर्शन चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थानिक उद्योग संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या आश्चर्यकारक धोरणांचा प्रतिकूल परिणाम स्थानिक उद्योग वर्तुळावर होत असल्याचा मुद्दा सीमलेस ट्युब मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने उपस्थित केला आहे. देशांतर्गत उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारकडूनच विरोधाभासी धोरणे राबविण्यात येत असल्याने स्थानिक उद्योगांची नडीच मंद झाली असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सीमलेस ट्यूब निर्मितीच्या उद्योगांमध्ये देशामध्ये शहरातील जिंदाल सॉ लि., महाराष्ट्र सीमलेस लि., आयएसएमटी, ऑईल कंट्री ट्यूबुलार आदी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. सुमारे ५ हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या या उद्योगातून सुमारे २२ हजार रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातील नाशिक, पुणे आणि नागोठाणे येथील युनिट्सचा एकूण उत्पादन निर्मितीत सुमारे ७५ टक्के वाटा आहे. स्थानिक उद्योग संकटात येत असल्याचे सीमलेस ट्युब मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश सिन्हा यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे जे. एस. डब्ल्यू. राव, नरेश मंत्री, निमाचे अध्यक्ष रवी वर्मा, निमाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, संजीव नारंग, रसिक कुमार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे खचला पंचवटीतील रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीसमोरील मुख्य रस्ता खचला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्ज्याचे झाले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार संततधार पावसामुळे हा रस्ता खचला. त्यामुळे काही पादचारी आणि मोटारसायकलस्वार अचानक पडले. त्यांच्यापैकी काहींना दुखापत देखील झाली. याच रस्त्यावर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. या कामानंतर वरचेवर माती आणि दगड टाकण्यात आले होते. काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे रस्ता खचल्याचे मानले जात आहे. या प्रश्नी महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांची दमछाक

$
0
0

प्लॅटफॉर्म एक सिंहस्थ गाड्यांसाठी राखीव; नियमित गाड्यांना फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्यातील पर्वणी काळात नाशिकरोडचा पहिल्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म विशेष गाड्यांसाठीच राखीव राहणार आहे. त्या नियोजनानुसार एकवरून नियमित धावणाऱ्या नऊ गाड्या गुरुवारपासून फ्लॅटफार्म क्रमांक दोनवरून ये-जा करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, यामुळे नाशिककरांची दमछाक वाढल्याने त्यांनी नाशिकच्या गाड्या प्लॅटफॉर्म एकवरूनच सोडण्याची आग्रही मागणी केली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, भुसावळ मंडलचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड रेल्वे स्टेशनची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्तांशी रेल्वेच्या नियोजनाबाबत चर्चा केली होती. त्यावेळी कुंभमेळ्याच्या प्रवाशांसाठी बारा विशेष आणि आठ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याचा मान्य करण्यात आले होते. या गाड्या कुंभमेळा संपेपर्यंत प्लॅटफॉर्म एकवरून सोडण्यात येतील. मात्र, कुंभमेळ्याला तीन महिन्यांचा अवधी असताना नाशिककरांना आतापासूनच द्रविडी प्राणायम कशाला करायला लावता? असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.

नियमित प्रवाशांना त्रास

मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पुणे-भुसावळ, देवळाली-भुसावळ पॅसेंजर, दादर-औरंगाबाद, लोकमान्य टिळक टर्मिनन्स-मनमाड, इगतपुरी-मनमाड, मुंबई-नागपूर या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ये-जा करण्यास सुरवात झाली आहे. या गाड्यातून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे नाशिकचे असतात. त्यांना आता पुलावरून जाऊन गाडी पकडण्याची कसरत करावी लागणार आहे. महिला, लहान मुले, वृध्द, अपंग, अंध, दम्याचे आणि गुडघ्याचे रुग्ण यांना याचा जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक प्रवासी रुळ ओलांड़ून प्लॅटफार्म दोनवर जात असल्याने रेल्वेने रुळाच्या मधल्या जागेत संरक्षक जाळ्या बसविल्याने तो मार्गही आता बंद झाला आहे.

सरकते जिने नाहीत

संपूर्ण भुसावळ रेल्वे डिव्हीजनमध्ये नाशिकरोड हे ग्रेड वन असलेले स्टेशन आहे. येथे देवी चौकातील एक आणि मुख्य स्टेशनवर एक असे दोनच पूल आहेत. आता नवीन पुलाची भर पडली आहे. जुने पुल अरुंद असल्याने व प्रवाशांना अडचण सहन करावी लागते. येथे सरकते जिने बसविण्याची जुनीच मागणी असून कुंभमेळ्यात ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली असती तर नाशिककरांची दमछाक झाली नसती.

निवेदन देणार

रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे यांनी सांगितले, की गोदावरी, पंचवटी, राज्यराणी, सेवाग्राम, नाशिक-पुणे या गाड्यांतून नाशिकचेच प्रवासी ये-जा करतात. त्यांची प्रचंड दमछाक होत असल्याने या गाड्या फ्लॅटफार्म क्रमांक एकवरूनच सोडाव्यात आणि सरकते जिने त्वरित बसवावेत, अशी आग्रही मागणी डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर सुधीरकुमार गुप्ता यांच्याकडे आम्ही करणार आहोत.

गोदावरी, नंदीग्राम, तपोवन, जनशताब्दी, सेवाग्राम, नंदीग्राम, या गाड्यात बहुतांश नाशिकचेच प्रवासी असतात. ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना पुलाच्या उंच पायऱ्या चढताना मोठा त्रास होतो. - बिपीन गांधी, अध्यक्ष, रेल परिषद

स्थानिक प्रवाशांच्या रेग्युलर गाड्या प्लॅटफॉर्म एकवरूनच सोडाव्यात. इतक्या लवकर प्लॅटफार्म बदलण्याची अजिबात गरज नव्हती. अपंग, अंध, वृद्ध, रुग्ण यांचे मोठे हाल होणार आहेत. - बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष, पंचवटी रेल्वे प्रवाशी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगालयात एकल नाट्य महोत्सव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रायोगिक रंगभूमीवरील वेगळेपण सिध्द केलेल्या, विशेष उल्लेखनीय नाट्यकृतींचा आस्वाद घेण्यासाठी हक्काची जागा निर्माण करण्याचे मोलाचे काम कुसुमाग्रज प्रतिष्ठान करीत आहे. या रंगालय उपक्रमाला नाशिककर रसिकांची मोलाची साथ लाभत असून रंगालयमध्ये २७ व २८ जून रोजी एकल नाट्य महोत्सव रंगणार आहे.

या नाट्य महोत्सवात प्रसिद्ध हिंदी व्यंगलेखक शरद जोशी, यांच्या साहित्यावर आधारित 'राजनिती और विवाह' हा नाट्य प्रयोग सादर होईल. सुप्रसिध्द अभिनेता, लेखक व कवी किशोर कदम हे सलग १०० मिनिटे होणाऱ्या या हिंदी भाषेतील सादरीकरणात चांगलीच रंगत आणतात व हसवता हसवता आपणास अंतर्मुख करतात. हिंदीमध्ये हास्य, व्यंग अथवा व्यंगात्मक साहित्य प्रकाराला रुजविण्यात स्व. शरद जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या वैविध्यपूर्ण साहित्यातून शरद जोशी यांनी उपहासात्मक आणि विडंबनाच्या माध्यमातून सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक विसंगतीचा वेध घेतला आहे. या नाट्य प्रयोगातून व्यक्ती, समाजातील दोषावर, त्यांच्यामधील कमतरतेवर सरळ सरळ भाष्य न करता तिरकसपणे त्याचा समाचार घेण्यात आला आहे. हा नाट्यप्रयोग शनिवारी, साडे सहा वाजता कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा रंगमंचावर सादर होईल. पुण्याच्या थेट्रॉन संस्थेचे 'ओ फ्रिडा' आणि त्यानंतर 'कर्वे बाय द वे' हे दोन नाट्यप्रयोग रविवार (दि. २८) सायंकाळी साडे सहा वाजता सादर होतील.

कर्वेंवर आधारित नाट्य कलाकृतीही

अभिषेक देशमुख लिखित दिग्दर्शित या नाट्यप्रयोगात कृतिका देव यांनी क्रांतिकारी मेक्सीकन चित्रकार फ्रिडा काहलो आपल्यासमोर उभी केली आहे. तिच्या आयुष्यातील चढउतार आणि प्रवास आपणास अंतर्मुख करून जातो. सलग ६० मिनिटे सादर होणाऱ्या या नाटकानंतर र. धो. कर्वे यांच्या जीवनावर आधारित नाट्य कलाकृती अभिषके देशमुख सादर करतील. लेखन, दिग्दर्शनही त्यांनीच केलेले आहे. एकल नाट्याच्या प्रवेशिका एक तास आधी स्मारकामध्ये उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी रसिकांनी ०२५३-२५७६१२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थानबाबत तक्रार एसपींकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या नवीन विश्वस्तांकडे अधिकारांचे हस्तांतर करण्यात मावळते अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या टाळाटाळीच्या वादाला नवीन वळण लागले आहे. गुन्हा दाखल करण्यास त्र्यंबकेश्वर पोलिसांनी नकार दिल्याने हा वाद आता पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यापर्यंत पोहचला आहे. मंदिराच्या आगामी कार्यक्रमापर्यंत वादावर तोडगा काढण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणून २५ वर्षे मुरलीधर पाटील कारभार पाहत होते. मागील महिन्यात धर्मदाय आयुक्तांनी देवस्थानच्या नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली. मात्र, अधिकार हस्तांतरणाचा मुद्दा भिजत पडला. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या संत निवृत्तीनाथ समाधी सोहळ्यात मुरलीधर पाटील यांनी मंदिरात जुन्याच विश्वस्त मंडळाचा फलक लावला. तसेच, मंदिराबाहेर अध्यक्ष म्हणून स्वागताचे फलक लावल्याने नवीन ट्रस्टी व अध्यक्ष यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. त्याच सोहळ्यात दानपेट्या उघडण्यावरूनही जुन्या व नव्या विश्वस्तांमध्ये वाद झाला. शेवटी, बंडातात्या कऱ्हाडकर यांनी मध्यस्थी करून वाद तात्पुरता मिटविला. देवस्थानच्या घटनेनुसार मावळते अध्यक्ष अधिकार सुपूर्द करीत नाही तोपर्यंत तेच अध्यक्ष राहतील. नवीन विश्वस्त मंडळाने त्यांचे पदाधिकारी निवडीचे धर्मदाय उपायुक्तांचे पत्र माझ्याकडे द्यावे, त्यानंतर मी अधिकार सुपूर्द करण्यास तयार आहे अशी भूमिका मुरलीधर पाटील यांनी घेतली आहे. यानंतर, नवीन विश्वस्तांनी धर्मदाय उपायुक्तांकडे फेरफार पत्र सादर करून तशा पत्राची मागणी केली. परंतु, धर्मदाय उपायुक्तांनी तुम्हाला दिलेले नियुक्तीचे पत्र हेच कारभार पाहण्याचे पत्र आहे. त्यामुळे वेगळे पत्र देण्याची गरज नसल्याचे सांगितले, असे नवीन विश्वस्तांचे म्हणणे आहे. दोनवेळा मुरलीधर पाटील यांच्याकडे समक्ष पत्र देऊन, तसेच पोस्टाने पत्र देऊन अधिकार सुपूर्द करण्याची विनंती केली आहे. परंतु, ते दाद देत नाहीत. नवीन विश्वस्त मंडळाने पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्र्यंबकराव गायकवाड यांनी दिली.

मंदिराच्या खात्यात झालेल्या व्यवहाराबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण संजय मोहिते यांच्यापर्यंत नेणार आहे. त्यांनी वेळ नसल्याचे सांगितले असून यावर लवकर तोडगा निघणे अपेक्षित आहे. - त्र्यंबकराव गायकवाड, नवनियुक्त अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना मिळणार गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यापीठ स्तरावर अधिकारीपदापासून ते कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या भटक्या आणि विमुक्त वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानमंडळाच्या विमुक्त भटक्या जमाती कल्याण समितीने बुधवारी विद्यापीठाला भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी अन् कर्मचाऱ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.

विद्यापीठात विविध स्तरावर भटक्या व विमुक्त वर्गातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध समस्या आहेत. नोकरीतील शासकीय निकष लागू होण्यापासून तर बढतीसारख्या मुद्यांपर्यंतचा यात समावेश आहे. या बैठकीत समिती सदस्यांनी विद्यापीठात व संलग्नित कॉलेजांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही आढावा घेतला. या वर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष, विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, अभ्यासक्रम तसेच विद्यापीठाशी संबंधित शासनाच्या विविध योजनांचीही माहिती यावेळी समितीने घेतली.

ही समिती या दौऱ्यानंतरचा अहवाल विधीमंडळाला सादर करणार असून त्यात काही निर्देशांचाही समावेश असेल. या अहवालावर विचार करण्यात येऊन या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुविधा सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे.

या समितीच्या मंडळात समिती प्रमुख तथा आमदार बाळासाहेब सानप, सदस्य आ. सुधाकर कोहळे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. किशोर पाटील, आ. सुरेश धानोरकर, आ. कुणाल पाटील, आ. डॉ. संतोष टारफे, आ. भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर, आ. महादेव जानकर, आ. रामराव वडकुते, आ. हरिसिंग राठोड यांचा समावेश आहे. त्यांनी घेतलेल्या बैठकीत विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक कामकाज आणि मनुष्यबळाच्या आवश्यकतेबद्दल माहिती समिती सदस्यांना दिली. तसेच समिती सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. यावेळी सदस्यांनी विद्यापीठाच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले.

जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव राजेश तारवी, समाज कल्याण, नाशिक विभागाच्या सहाय्यक आयुक्त वंदना कोचुरे, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण, प्रा. वित्त लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, डॉ. उदयसिंह रावराणे, विद्या ठाकरे, महेंद्र कोठावदे, डॉ. आर. टी. आहेर, संजय नेरकर, एम.एम. जॉन्सन आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅट’मुळे मुख्यमंत्र्यासमोर पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा तालुक्यातील पाच कोटी रुपयांच्या रेशन घोटाळ्याप्रकरणी जिल्ह्यातील निलंबित केलेल्या सात तहसीलदारांवरील कारवाईला मंगळवारी 'महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा'ने (मॅट) स्थगिती दिली. या सात जणांविरुद्ध कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळत नसल्याचे मत 'मॅट'ने नोंदवले आहे. यामुळे त्यांची पुन्हा नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही फाईल सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात येऊन पडली आहे.

धान्य अपहार प्रकरणात सकृतदर्शनी हे तहसीलदार दोषी दिसत असल्याचा ठपका ठेवून सात तहसीलदारांना राज्य सरकारने निलंबित केले होते. यात, नाशिकचे गणेश राठोड, सिन्नरचे मनोज खैरनार, इगतपुरीचे महेंद्र पवार, पेठचे कैलास कडलग, दिंडोरीचे मंदार कुलकर्णी, निफाडचे सं‌दीप आहेर आणि त्र्यंबकेश्वरचे नरेशकुमार बहिरम यांचा समावेश आहे. या सात तहसीलदारांनी मॅटमध्ये धाव घेतली. त्याची 'मॅट'चे सदस्य आर. बी. मलिक यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यात या सात जणांविरुद्ध कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळत नसल्याचे स्पष्ट मत नोंदवत 'मॅट'ने निलंबनाला स्थगिती दिली आणि सुनावणी ३ जुलैपर्यंत तहकूब केली. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान द्यायचे की तहसीलदारांना पुन्हा नियुक्त करायचे असा प्रश्न सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. दोन दिवसांपासून ही फाईल मुख्यमंत्र्यासमोर असून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी (दि. २७) जिल्हा दौऱ्यावर येणार असून तोपर्यंत काय निर्णय होणार याकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, निलंबित तहसीलदार मुंबईत तळ ठोकून असल्याचे सूत्रांनी सांगितले. मॅटच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान द्यावेच लागेल, असे अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी यापूर्वीच जाहीर केल्याने मुख्यमंत्री पेचात सापडले आहेत. पाच कोटींच्या तीन हजार मेट्रिक टन रेशन धान्याच्या अपहाराने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मंत्री बापट यांनी पुरवठा अधिकारी, कर्मचारी, नऊ तहसीलदारांसह १६ जणांच्या निलंबनाची घोषणा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

LBT च्या फेऱ्याने व्यापारी हैराण

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

राज्य सरकारने जीएसटी सुरू होईपर्यंत एलबीटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सळो की पळो करून सोडले आहे. हा त्रास व्यापाऱ्यांना जीवघेणा ठरत असून महापालिकेने कागदपत्रांची यादी एकदाच मागवून घ्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

व्यापाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करीत असताना राज्य सरकार मात्र व्यापाऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याचे चित्र आहे. अधिकाधिक कागदपत्रे गोळा करून त्याला हैराण करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. नाशिक परिसरातील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना एलबीटी (लोकल बोर्ड टॅक्स) संबंधी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महापालिकेच्या मुख्यालयात राजीव गांधी भवन येथे चकरा माराव्या लागतात. यासाठी एलबीटीचे सर्व व्यवहार विभागीय पातळीवर करण्यात यावे व व्यापाऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने जकात कर हटवीत एलबीटी सुरू केल्यापासून व्यापाऱ्यांना शुल्लक कारणासाठी राजीव गांधी भवनला खेटा माराव्या लागतात. जकात सुरू असताना विभागीय कार्यालयात किंवा जकात नाक्यांवरील अधीक्षकांमार्फत अडचणींचे निराकरण होत असे. परंतु, एलबीटी सुरू झाल्यापासून प्रत्येक अडचणींच्या निराकरणासाठी राजीव गांधी भवनला जावे लागते. यासाठी प्रत्येक विभागात सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. उपनगरांमधील अनेक व्यापारी आठवड्यातून एकदा किंवा ज्यावेळी काम असेल तेव्हा राजीव गांधी भवन येथे खास टेम्पो करून कागदपत्रे घेऊन जातात ही कागदपत्रे नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या कागदपत्रात एखादा कागद राहिल्यास पुन्हा येवून कागद घेऊन जाताना नाकीनऊ येतात. त्यासाठी विभागीय कार्यालयात एलबीटीच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

अडचणींचे निराकरण तर करा!

एलबीटी कामकाज व अडचणी सोडविण्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी असावा असा सरकारी आदेश असल्याने विभागीय पातळीवर अधिकाऱ्यांची नेमणूक केली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर उपाय म्हणून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आठवड्यातून, १५ दिवसातून किंवा महिन्यातून एक वेळेस उपनगरातील विभागीय कार्यालयात यावा, तेथे व्यापाऱ्यांना भेट देऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

एलबीटीचे ग्रहण काही सुटत नाही. अडचणी सोडवण्यासाठी नाशिकरोडहून नाशिकला चकरा माराव्या लागतात. त्यासाठी नाशिकरोड येथेच अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास व्यापाऱ्यांची गैरसोय टळू शकेल. - राहुल कटारिया, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images