Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकची ‘रेंज’ त्र्यंबकपर्यंत

$
0
0

सिंहस्थ कुंभमेळ्यात समन्वयासाठी अधिकाऱ्यांना मिळणार विशेष फोन

अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शाहीस्नानासाठी तब्बल ७० ते ८० लाख भाविक येण्याची शक्यता असून, याचा ताण मोबाइल नेटवर्कवर पडणार आहे. यामुळे मोबाइल यंत्रणा कोसळली तर प्रशासनाच्या नियोजनाचे तीन तेरा वाजू शकतात. या पार्श्वभूमीवर भारत संचार निगम लिमिटेडतर्फे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या मदतीने सुरू राहणारे विशेष फोन उपब्लध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी एकमेकांशी संवाद साधू शकतील.

सिंहस्थादरम्यान मोबाइल टॉवर कंपन्यांवर ग्राहकांचा अतिरिक्त भार पडणार आहे. बीएसएनएल वगळता इतर खासगी मोबाइल ऑपरेटर्संनी फक्त सिंहस्थ म्हणून सेवा विस्तार करण्यास अनुकूलता दर्शवलेली नाही. एका टॉवरसाठी ४० ते ४५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जागेचाही प्रश्न आहे. बीएसएनएलने मात्र आहे त्यापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आपल्या क्षमतेमध्ये वाढ केली आहे. टॉवरची संख्या लक्षणीयरित्या वाढविण्यात आली असून, आपत्तकालीन परिस्थितीत अडचण नको म्हणून मुंबईच्या दिशेने कल्याण-वाडामार्गे पर्यायी केबल टाकण्यात आली आहे. यामुळे किमान पर्वणी दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये नेटवर्कचा प्रश्न उद्भवणार नाही.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी गुंतलेल्या प्रशासनातील सर्व विभागांना सातत्याने एकमेकांशी संवाद साधावा लागणार आहे. संवादात खंड पडू न देता हे काम होणे अपेक्षित आहे. साधारणतः प्रत्येक टॉवरची कॉल घेण्याची व पाठवण्याची क्षमता निर्धारीत असते. त्यात अचानक खूप वाढ झाल्यास सर्व यंत्रणाच बंद पडू शकते. या पार्श्वभूमीवर बीएसएनएलतर्फे सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना विशेष मोबाइल पुरवण्यात येणार आहे. या मोबाइलची संख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. विशेष म्हणजे एखाद्या टॉवरची रेंज फारतर दोन किलोमीटरपर्यंत असू शकते. याउलट या फोनची रेंज किमान २५ किलोमीटरपर्यंत असते. म्हणजेच नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी बीएसएनएलच्या 'त्या' फोनच्या मदतीने संवाद साधू शकतील. यासाठी टॉवरकडून मिळणाऱ्या रेंजची आवश्यकता असणार नाही. सदर फोन उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीएसएनएलची अनेक कामे पूर्णत्वास पोहचली आहे. सिंहस्थ काळात संवादात खंड पडणार नाही, या दृष्टीने सर्व नियोजन आखले असून, किमान एक हजार फोनचे वाटप केले जाणार आहे. नारायण पोटोळे, - जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना अपेक्षित असलेली विमानसेवा विविध कारणांनी हूल देत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी नाशिक-पुणे ही सेवा सुरु होणार अपेक्षित असताना हवामानामुळे या सी-प्लेनमध्ये अचानक बिघाड झाल्याने सोमवारचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र, येत्या काही दिवसातच ही सेवा सुरु होईल, असे मेहेर कंपनीने सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना विमानसेवेची मोठी आस लागली आहे. ओझर विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकार झाले. मात्र, त्यास दीड वर्षे उलटूनही तेथून सेवा सुरु झालेली नाही. मेरिटाईम एनर्जी हेलिएअर सर्व्हिसेस लिमिटेड (मेहेर) या सीप्लेन सेवा देणाऱ्या कंपनीने नाशिक ते पुणे ही विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ जूनपासून ही सेवा सुरु होणार होती. त्यासाठीचे बु‌किंगही करण्यात आले. मात्र, 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' या म्हणीप्रमाणेच नाशिकची विमानसेवा विविध कारणांनी सुरु होण्यास विलंब होत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे सी-प्लेनच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात धुके जमले आहे. हे काढणे अत्यावश्यक आहे. सी-प्लेन हे मुंबईहून नाशिकला येऊ शकते. मात्र, नाशिकहून पुण्याला सेवा देणे घातक ठरु शकते. त्यामुळे पूर्वनियोजित सेवा रद्द करीत असल्याचे मेहेरने सांगितले आहे. विमानातील धुके दूर काढून येत्या एक ते दोन दिवसात ही सेवा सुरु केली जाईल, असेही मेहेरने स्पष्ट केले आहे. यामुळे मात्र, नाशिककरांनी मोठी निराशा झाली आहे.

नाशिकहून विमानसेवा सुरु होणार असल्याने मी सर्वप्रथम तिकीट बूक केले. सेवा जेव्हाही सुरु होईन त्यावेळी मी पुण्याला जाईन. मात्र, आगामी चार महिने पावसाचे असल्याने पुन्हा विमानात बिघाड व्हायला नको. तसेच विमान हवेत असताना वातावरणात बदल झाल्यास काय, याचा विचार कंपनीने करायला हवा. - अविनाश आव्हाड, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात बनावट डेंटल मेकॅनिक्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरामध्ये दिवसेंदिवस बनावट डेंटल मेकॅनिक्सचे प्रमाण वाढत असून, बहुतांश डेंटल रोगतज्ज्ञ बनावट मेकॅनिक्स मार्फत रुग्णांसाठी कृत्रिम दात बनवून घेत असल्याचा आरोप राज्याच्या डेंटल मेकॅनिक्स संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. याबाबत अनेकदा भारतीय डेंटल परिषदेकडे लेखी तक्रारी करूनही त्याकडे परिषदेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

शहरामध्ये मान्यता नसलेले बनावट डेंटल मेकॅनिक्स काही डेंटल चिकित्सकांच्या मदतीने सर्रासपणे कृत्रिम दात बनविण्याचा व्यवसाय करत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप नाईक, संदीप शाह, राजू भोई, प्रशांत गिरीपुंजे, सचिन बाड आदिंनी केली आहे. रुग्णाला गरज भासल्यास दातांच्या डॉक्टरांकडून सिरॅमिक किंवा मेटलचे दात, कवळी आदींचा सल्ला दिला जातो.

हे कृत्रिम दात बनविण्याचे विशेष प्रशिक्षण डेंटल परिषदेकडून डेंटल तज्ज्ञांना दिले जाते. अशा प्रशिक्षित डेंटल मेकॅनिक्सकडूनच कृत्रिम दात तयार करून घेणे परिषदेने बंधनकारक केले आहे. कारण त्यामुळे रुग्णाची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही व त्याच्या मुखाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत नाही; मात्र शहरात मागील काही वर्षांपासून प्रशिक्षण न घेतलेल्या बनावट डेंटल कारागिरांचा व्यवसाय तेजीत असल्याने डेंटल रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. याबाबत परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडेही तक्रार केली आहे. मात्र अद्याप एकही बनावट डेंटल तज्ज्ञावर कारवाई करण्यात प्रशासनाला यश आले नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. ज्या रुग्णांना डॉक्टरांनी कृत्रिम दात तयार करून दिले त्या रुग्णांनी त्या दातांबाबत चौकशी करण्याच्या अधिकाराचा वापर करावा. जेणेकरून बनावट व्यवसायाला आळा बसण्यास मदत होईल, असे आवाहन संघटनेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलचे स्थगिती आदेश उठवणार

$
0
0

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ६००हून अधिक मेडिकल दुकानांवरील स्थगिती आदेश येत्या दहा दिवसात निकाली काढणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील औषध व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक दौऱ्यावर सोमवारी आलेल्या अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री ठाकूर यांची नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी, अभय शिरोडे, अतुल दिवटे, नितीन औटी, सतीश राठी राजेन्द्र धामणे आदी उपस्थित होते. औषध व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे औषध दुकानांचे परवाने कायम होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीसाठी सेना-भाजप एकत्र

$
0
0

बाजार समितीत तिरंगी लढत होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचेच दोन पॅनल आमने सामने उभे राहणार असताना, आता शिवसेना भाजपही मैदानात उतरली आहे. शिवसेना भाजपने एकत्रीतपणे बाजार समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, तिसरे पॅनल उभे करण्याची तयारी केली आहे. सोमवारी शासकीय विश्रामगृहावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रीत बैठक घेऊन निवडणूक एकत्रीतपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता बाजार समितीसाठी तिंरगी लढत होणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या पॅनलसह राष्ट्रवादीचेच स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांचे पॅनल आमने सामने आहे. त्यात आता शिवसेना भाजपानेही उडी घेतली आहे. सहकारात प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रीपणे बैठक घेऊन पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. सदर बैठकीस खासदार हरिशचंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजप शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार बाळासाहेब सानप, सुहास फरांदे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भ्रष्टाचारामुळे आणि बाजार समितीतील सदस्यांच्या तसेच लोकांच्या आग्रहास्त नवीन पर्याय म्हणून शिवसेना व भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन युतीच्या पॅनलखाली निवडणूक लढणार असल्याची ग्वाही खासदार ह‌रिशचंद्र चव्हाण दिली. बाजार समितीच्या उज्ज्वल भविष्यासाठी खंबीर निर्णय घेणारी सत्ता असणे आवश्यक असल्याने यंदाची निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी सोबत उतरणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

घोलपांची कोंडी

दोन दिवसापूर्वींच शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार बबनराव घोलप यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे यांच्या पॅनलला त्यांनी पा‌ठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सेना भाजपचेच पॅनल असल्याने घोलपांची कोंडी झाली असून, कुणासोबत रहावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सोमवारच्या बैठकीतही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. मात्र पॅनलचा निर्णय उशारा झाल्याने त्यांनी पाठींबा दिला असावा अशा सारवासारव शिवसेना नेत्यानी केली आहे. त्यामुळे आता घोलपांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काझीगढी रहिवाशांना नोट‌िसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठावरील काझीगढी येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूस्खलनचा धोका असल्याच्या कारणावरून महापालिकेन या ठिकाणी राहणाऱ्या दोनशे कुटुबांना पुन्हा नोटिसा बजावल्या असून, तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका आणि गढीतील रहिवाशी पुन्हा आमने सामने येणार आहेत. पुनर्वसन झाल्याशिवाय हटणार नसल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

नदीकाठावरील उंच कड्यावर असलेल्या पांरपरीक काझी गढी परिसरात दोनशे कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र हा भाग दरवर्षी पावसाळ्यात कोसळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने महापालिका दरवर्षी गढी खाली करण्याच्या नोट‌िसा बजावते. मात्र गेल्या वर्षी माळीण दुर्घटनेनंतर गढीतल्या नागरिकांच्या सुरक्षा गंभीरतेन घेत पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली होती. तर महापालिकेनही या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र त्याची अद्याप अमंलबजावणी झालेली नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात काझी गढीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर केले होते. मात्र रहिवाशांनी कायम स्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली होती.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने काझी गढी खाली करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पालिकेने या ठिकाणच्या २०० कुटुंबियांना नोट‌िसा बजावून घरे खाली करण्याचे फर्मान सोडले आहे. ही जागा धोकादायक असून, भिंत कोसळण्याची शक्यता असल्याने नोट‌िसा दिल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उताराबाबत प्रशासन निरुत्तर

$
0
0

कन्नमवार पुलाजवळील घाटाच्या धोकादायक स्थितीकडे सर्वांचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कन्नमवार पुलाजवळ भाविकांसाठी घाट बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. आता या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू झाले असून, धोकादायक मानल्या जाणाऱ्या रस्त्याच्या उताराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.

सरदार चौक परिसरातील जुन्या शाहीमार्गावरील तीव्र उतारामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. साधारणतः ८ मीटर रूंद रस्त्याला सातत्याने एका मीटरचा उतार मिळत जाणे धोकादायक मानले जाते. रस्ता जास्त खोल तितके पायी जाणाऱ्यांचा तोल जाण्याची शक्यता वाढते. २००३ च्या कुंभमेळ्यात हीच परिस्थिती ओढावली होती. पुढे असलेल्या गर्दीवर पाठीमागून येणाऱ्या गर्दीचा अतिरिक्त ताण पडून चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तीव्र उतार असलेल्या रस्त्यांना भर घालावी, अथवा पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे रमणी आयोगाने स्पष्ट केले आहे. याच मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाने अनेकदा आक्षेप नोंदवले आहेत. दुर्दैवाने कन्नमवार पुलानजीक रस्ता बांधताना प्रशासनाने धोकादायक उताराकडे दुर्लक्ष केल्याचे सध्यातरी दिसते.

२०० ते ४०० मीटर अंतरासाठी तीव्र उतार असून, प्रशासनाने बाजुच्या ठिकाणी दगडांची भर टाकली आहे. कन्नमवार पुलानजीकच्या घाटावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भाविकांना नेण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. घाटांची संलग्नाता मोठी असली तरी गर्दीचा आकडा वाढण्याचा शक्यता आहे. त्यातच या ठिकाणी वॉच टॉवर, पोलिस चौक्या, बॅरेकेडस असणार आहेत. अशा परिस्थितीत या रस्त्याचा उतार कमी करणे गरजेचे आहे.

सध्या याठिकाणी खडीकरण करण्यात आले असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरणे केले जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा उतार कमी होणार की भाविकांची परीक्षा प्रशासन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यामुळे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण याबाबतही विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चूक पोस्टाची, भुर्दंड ज्येष्ठांना!

$
0
0

सॉफ्टवेअरच्या तांत्रिक त्रुटींमुळे व्याज मिळते कमी

फणिंद्र मंडलिक, नाशिक

आम आदमीशी नाळ जुळलेल्या पण, आजच्या आधुनिक काळात मागे पडलेल्या पोस्ट विभागाच्या कामकाजाचा ग्राहकांना मोठा त्रास होत आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिकांना त्याची मोठी झळ बसत आहे. पोस्टाच्या या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारी ही मटा सिरीज आजपासून...

अफलातून कारभारामुळे चर्चेत राहणारे पोस्ट खाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेच्या युगात आधुनिकीकरणाची कास धरणाऱ्या या खात्याकडून काही तांत्रिक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर कमी व्याज मिळत आहे. पैसे कमी का दिले जातात याचे नेमके कारण पोस्टकार्यालयांकडून दिले जात नसल्याने ज्येष्ठांची परवड होते आहे.

बुरड गल्लीत राहणाऱ्या त्र्यंबक सोनवणे यांनी पोस्टात १० लाख रुपये गुंतवले. त्यापोटी सोनवणे यांना दर तीन महिन्याला २३ हजार २५० रुपये व्याज मिळत होते. दर तीन महिन्याला २३ हजार २५० रुपये या प्रमाणे वर्षाला १२ महिने ३६५ दिवसांचे ९३ हजार रुपये त्यांना मिळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या पोस्टात कम्प्युटरायझेशन झाल्याने वर्षाला ९३ हजारांऐवजी ९२ हजार ५९२ रूपये मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येक खातेदाराला वर्षाला ४०८ रूपयांचा फटका बसतो आहे. पैसे कुठेही जाणार नाहीत, या भरवशावर नागरिकांनी पोस्टात पैसे गुंतवले आहेत. पण, एका योजनेत ग्राहकांच्या पाचशे रूपयांवर डल्ला मारला जात असेल तर पोस्टाच्या योजनांमधून ग्राहकांची किती लूट होत असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात लेखी तक्रार केल्यानंतर ग्राहकाला पोस्टाने उत्तर देण्याचेच टाळले आहे. मटाच्या प्रतिनिधींनी थेट वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधल्यानंतर सॉफ्टवेअरच्या अपग्रेडेशन प्रणालीत त्रुटी राहिल्याने हा प्रकार घडल्याची कबुली दिली.

मला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी पैसे मिळत होते. याबाबत मी पोस्टात देखील तक्रार केली होती. पण मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. - त्र्यंबक सोनवणे, ग्राहक

सॉफ्टवेअरचे अपग्रेडेशन सुरू आहे. पुर्वीच्या सॉफ्टेवअरमधे महिने मोजले जात होते. सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये दिवस मोजले जातात. महिन्याचे दिवस कमी जास्त होत असल्याने ही तफावत येत आहे. झालेली चूक आम्ही वरिष्ठांना कळवली आहे. ती दुरुस्ती करण्यात येईल. ज्या नागरिकांना कमी पैसे मिळाले असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, त्यांना आम्ही पैसे मिळवून देऊ. - एस. आर. फडके वरिष्ठ पोस्टमास्तर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकल कॉलेजेसवर थेट वॉच

$
0
0

बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्याच्या विद्यापीठाच्या सूचना

जितेंद्र तरटे, नाशिक

स्टाफ नेमणुकीच्याबाबतीत विद्यापीठाची दिशाभूल करणाऱ्या राज्यातील मेडिकल कॉलेजेसवर आता आरोग्य विद्यापीठाचा थेट वॉच राहणार आहे. विद्यापीठ आणि मेडिकल कौन्सिलचे नियम सर्रास ओलांडत मुजोरी करणाऱ्या कॉलेजेसची संख्या वाढल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनाला आले आहे. या मुजोरीला आळा घालण्यासाठी आता कॉलेज स्टाफच्या उपस्थितीचे मूल्यमापन इंटरनेट बायोमेट्रिक पध्दतीने करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

मेडिकल कौन्सिलच्या निर्देशांनुसार मेडिकल कॉलेजेससाठी क्षमतेच्या ९० टक्के स्टाफची भरती करणे अनिवार्य आहे. तर पैकी ७५ स्टाफचे अप्रूव्हल घेणेही बंधनकारच आहे. मात्र, विद्यापीठाच्या तपासणी पथकांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या अचानक पाहणीमध्ये बहुतांश मेडिकल कॉलेजेकडे अवघा ५० टक्के स्टाफ उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर संबंधित कॉलेजेसना ठरावीक मुदतीच्या कालावधीत सुधारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र हा प्रश्न दरवर्षी सतावत असल्याने अन् दिवसेंदिवस वाढतच असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. यानुसार आता प्रत्येक मेडिकल कॉलेजने इंटरनेट बायोमेट्रीक सिस्टीम बसविण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी 'मटा' शी बोलताना दिली.

सर्व्हर मुख्यालयात

या इंटरनेट बायोमेट्रिक सिस्टीमचा मुख्य सर्व्हर विद्यापीठाच्या मुख्यालयात असणार आहे. यामुळे विद्यापीठाशी संलग्नित कुठल्याही कॉलेजचे डेली स्टेटस विद्यापीठ मुख्यालयातील यंत्रणा चेक करू शकणार आहे. परिणामी, स्थानिक स्तरावर 'शाळा' करून विद्यापीठाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या कॉलेजेसवर काही प्रमाणात चाप बसण्याची अपेक्षा विद्यापीठाकडून व्यक्त होते आहे.

वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी हे निर्णय उपयुक्त ठरतील. विद्यापीठ स्तरावरील काही तपासणी मोहिमेनंतर यासारख्या पध्दती राबविण्याचे निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहे. - प्रा. डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

प्राध्यापकांचे कडक असेसमेंट

मेडिकल कॉलेजेसमध्ये सेवा देणाऱ्या प्राध्यापकांचे असेसमेंट आणखी कडक करण्याचाही निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासाठी डिपार्टमेंटनुसार प्राध्यापकांच्या एकूण तासिका, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेले योगदान यांसह त्यांच्याकडून अपेक्षित एकूण कार्याच्या काटेकोर मूल्यमापनावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कॉलेजेसकडून लेखी स्वरूपात विद्यापीठाने सुमारे पाचशे पानांचे अहवालही मागविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोहित संघ ‘बेघर’

$
0
0

रामकुंड परिसरातील अतिक्रमणे हटविली

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

महंत ग्यानदास यांनी प्रशासनाच्या नथीतून सोडलेला बाण सोमवारी पुरोहित संघाच्या कार्यालयात घुसला. वस्त्रांतरगृह वगळता प्रशासनाने पुरोहित संघाच्या कार्यालयालाच टार्गेट केल्याने नव्या वादाला तोंड फुटू शकते.

रामकुंड परिसरात पुरोहित संघाने उभारलेल्या शेडपासूनच अतिक्रमण मोहीम सुरू झाली. हे शेड काढून टाकण्याचे काम सुरू केले असून, ते हटविण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका पुरोहित संघाने घेतली. मात्र, प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत सर्व लोखंडी पाईप तोडून टाकले. यानंतर प्रशासनाने पुरोहित संघाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. कार्यालयाची जागा संघाच्या खासगी मालकीची असल्याचा दावा पुरोहित संघाने केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. पुरोहितांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मदतीने प्रशासनाने तो मोडून काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पुरोहित संघाने सांगितले. काही हॉटेलचेही शेड अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढले.

पोलिसांचा फौजफाटा

प्रशासनाने बोटावर मोजता येतील इतकी अतिक्रमणे हटवली. मात्र, यासाठी पंचवटी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमणधारकांना इशारा देण्यासाठी ही कारवाई राबविण्यात आल्याची चर्चा सुरू होती. पुरोहित संघाचे कार्यालय पाडण्यावेळी वाद उदवल्यानंतर पोलिसांनी काही जणांची धरपकडही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधूंना धान्य वितरणासाठी सात रेशन दुकाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात येणाऱ्या साधू महंतांना गहू, तांदूळ व तत्सम शिधा पुरविण्यासाठी गत सिंहस्थाच्या तुलनेत यंदा रेशन दुकानांची संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा तसेच अन्न आणि औषधी प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्हा पूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

रविवारी ठाकूर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी सायंकाळी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह अन्न व औषधी द्रव्य तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रेशन धान्य वितरणाच्या सद्यस्थितीची माहिती ठाकूर यांनी घेतली. तसेच कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू महंतांसाठी धान्य वितरणाची व्यवस्था कशी करणार अशी विचारणा करण्यात आली. २१०० मेट्रीक टन गहू आणि १४०० मेट्रीक टन तांदूळ असे ३५०० मेट्रीक टन धान्य वाटप करण्यात येणार आहे. २००३ मध्ये झालेल्या सिंहस्थात नाशिकच्या साधुग्राममध्ये दोन तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक रेशन दुकान देण्यात आले होते. यंदा मात्र साधुग्राममधील सेक्टर्सची संख्या वाढल्याने नाशिकमध्ये पाच तर त्र्यंबकेश्वरमध्ये दोन रेशन दुकाने देण्यात येणार असल्याची माहिती ठाकूर यांना देण्यात आली. जूलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रेशन धान्य वितरणाची यंत्रणा सज्ज होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण मोहिमेचा संघटनाकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

पुरोहित संघाचे कार्यालय पाडणाऱ्या प्रशासनाला गोदाघाटावरील इतर अतिक्रमणे कशी दिसली नाही. षडयंत्र आखून एक प्रकारे सुड उगावण्याचे काम प्रशासनाने केले असून, त्याचा धिक्कार करीत असल्याची भावना पुरोहित संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गोदाघाटावरील शुक्ल यजुर्वेद मध्यानी ब्राम्हण सेवा संघाच्या कार्यालयात सोमवारी रात्री साडेआठ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस हिंदू एकता आंदोलन, धर्म सभा, पुरो​हित संघ तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. १४ जुलै रोजी ध्वजरोहनाचा कार्यक्रम होणार असून, सकाळी ६ वाजून १६ मिन‌टिांनी सिंह राशीत गुरूचा प्रवेश होणार आहे. याच वेळी ध्वजरोहणाचा सोहळा पार पडणार आहे. १४ जुलै रोजी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. तसेच दिवसभर याठिकाणी कार्यक्रम पार पडतील.

दरम्यान, सोमवारी महापालिकेने पुरोहित संघाचे कार्यालय अतिक्रमण ठरवून पाडल्याचे पडसाद या बैठकीत उमटले. ब्रिटीशांना लाजवेल अशा पध्दतीने प्रशासनाने काम केले असून, याविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी​ दिला. या कारवाईमागे काम करणाऱ्यांना चेहऱ्यांना समाजासमोर आणणे आवश्यक असल्याचे मत इतर मान्यवरांनी व्यक्त केले. माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील कारवाईबाबत शंका उपस्थित करीत टीका केली. दरम्यान, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतरांनी उपस्थित राहण्याबाबतचे पत्र दिल्याची माहिती सतीश शुक्ल यांनी दिली.

आज पुन्हा तक्रार

अतिक्रमण मोहीम राबवताना धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसे पुरावे उपलब्ध आहेत. अतिक्रमण मोहीम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबतचे निवेदन आज पुन्हा उप​जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह पंचवटी पोलिस स्टेशनला सादर करण्यात आल्याचे शुक्ल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाघाटावरील बाजाराची शेडस् हटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदाघाटावरील प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या भाजी बाजारातील विक्रेत्यांनी आपआपले शेडस् हटवण्यास सुरूवात केली आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळा येऊ नये म्हणून विक्रेत्यांनी स्वतः शेडस् हटवले असल्याचा दावा केला. दरम्यान, भाजी बाजार स्थलांतराचा मुद्दा जिल्हा कोर्टात सुनावणीला असून १९ जून रोजी या दाव्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

गोदाघाटावरील गौरी पटांगणावर भरणारा भाजी बाजार हटवण्यासंदर्भांत प्रशासन आग्रही असून, गत कुंभमेळ्यापासून हा वाद सुरू आहे. सध्या हा दावा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यावर १९ जून रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गंगामाई भाजी बाजार संघटनेने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विक्रेत्यांनी शेडस् काढून टाकण्याच्या कामास सुरूवात केली आहे. याबाबत माहिती देताना गंगामाई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच गंगामाई भाजी बाजार मित्र मंडळ पंचवटीचे उपाध्यक्ष शांताराम क्षीरसागर यांनी सांगितले की, कुंभमेळा आयोजना दरम्यान कोणतीही आडकाठी आणण्याची आमची इच्छा नाही.

पर्वणीचे दिवस आटोपल्यानंतर भाजी बाजार पुन्हा याच ठिकाणी आणला जाईल. प्रशासनाने यात कोणतीही आडकाठी आणू नये, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. १८८३ पासून याच ठिकाणी भाजी बाजार भरतो. अनेक पिढ्यांनी येथे व्यवसाय केला. मग, कुंभमेळ्याच्या नावाखाली बाजार हटवण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही, असा आरोप गंगामाई क्षीरसागर यांनी केला.

२००३-०४ मध्ये देखील भाजी बाजार स्थलांतराचा मुद्दा उपस्थित झाला होता. आधी सुसज्ज भाजी मंडई बांधा तरच स्थलांतरित होऊ, अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी येथील नियोजित भाजी मंडईच्या जागेवरील झोपडपट्टी हटविली आणि येथे पाच ते सात कोटी रुपये खर्च करून सुसज्ज मंडई बांधून दिली. मात्र, यानंतर विक्रेते आणि महापालिकेचे बिनसत गेले. हा वाद कोर्टात गेल्याने १२ वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे आहे.

भाजी बाजाराचा प्रश्न सध्या कोर्टात आहे. ही जागा पंजाब सरकारची असून, १८८३ च्या पूर्वीपासून या ठिकाणी बाजार भरतो. इंग्रज काळातील कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख आहे. पर्वणीनंतर भाजी बाजारामुळे नेमकी काय अडचण होऊ शकते, हे लक्षात येत नाही. - शांताराम क्षीरसागर, अध्यक्ष, गंगामाई व्यापारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलचा ‘अवतार’ बदलणार

$
0
0

टॉवर्सच्या उभारणीनंतर क्षमतेमध्ये वाढ

अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने बीएसएनएलच्या क्षमतेमध्ये तब्बल ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली असून, यामुळे भविष्यात कॉल ड्रॉप्ससह इतर असुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता, अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येते आहे.

'टूजी' स्पेक्ट्रम घोटाळ्यानंतर भारत संचार निगम लिमीटेड कंपनीचा आर्थिक डौलारा कोलमोडला. हजारो कोटी रूपयांचा चुराडा झाल्यामुळे बीएसएनएल प्रशासन मेटाकुटीस आले. स्वस्तात सेवा देण्याचे धोरण असल्याने खासगी मोबाइल ऑपरेटर्सबरोबर बीएसएनएलला स्पर्धा करता येईना. ग्रामीण भागात खासगी ऑपरेटर्स पोहचत नाहीत. त्या ठिकाणी बीएसएनएलला सेवा द्यावी लागते. एकीकडे आर्थिक तोटा होत असताना दुसरीकडे स्पेक्ट्रम घोटाळ्यांनी बीएसएनएलची गंगाजळी आटली. परिणामी, बीएसएनएलला एखाद्या लाख रूपयांच्या केबल घेताना नाकीनऊ येऊ लागलेत.

या पार्श्वभूमीवर, सिंहस्थ कुंभमेळ्याचे आव्हान बीएसएनएलसमोर उभे राहिले. सध्य स्थितीत, बीएसएनएलकडून ११८ टॉवर्सच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते. त्यात आणखी ८१ पेक्षा जास्त टॉवर्सची भर पडणार आहे. तर जुन्या टॉवर्सच्या क्षमतेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. मंजुरी मिळालेल्या ८१ टॉवर्सपैकी ६० टॉवर्सचे काम सुरू असून यातील १८ टॉवर्स प्रत्यक्षात कार्य​न्वित करण्यात आले आहेत. किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेमध्ये वाढ झाल्याने सेवा पुरविताना अडचण निर्माण होणार नसल्याचा दावा बीएसएनएलकडून करण्यात येतो आहे.

खासगी ऑपरेटर्सपेक्षा सर्वांत जास्त स्वस्त सेवा बीएएनएलमार्फत पुरविली जाते. त्यातच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहित्यात वाढ झाल्याने थोडेफार दोष असतील तर ते निघून जातील, असा दावा बीएसएनएलचे महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती यांनी केला. सिंहस्थासाठी होणारे काम स्थायी स्वरूपाचे असून, त्याचा फायदा भविष्यात ग्राहकांना होईल, असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांच्या खोदाईने बीएसएनएल त्रस्त

कुंभमेळ्याच्या निमित्ताने तसेच इतर वेळीही वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते खोदण्याचे काम होत असते. यात सर्वांत जास्त फटका बीएसएनएलला बसतो. नाशिक त्र्यंबक रस्त्याचे काम करताना बीएसएनएलची कोट्यवधी रूपयांची केबल तोडली गेली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसान भरपाई म्हणून तीन कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी बीएसएनएलने केली. मात्र, अशा कामासाठी पैसे देण्याची तरतूदच नसल्याचे सांगत बांधकाम खात्याने हात झटकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीमार्गावर डीपीचा अडथळा

$
0
0

वीज तारा भूमीगत करताना नव्याने झालेल्या कामांवरही पडणार हातोडा

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

शाहीमार्गावरील गाडगे महाराज पुलाखालील वीज डीपीचा अडथळा अजून कायम आहे. विशेष म्हणजे आजुबाजूच्या परिसरात काँक्रेटीकरण करण्यात आले असून, वीज तारा भूमीगत करताना पुन्हा केलेले काम फोडावे लागणार आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे अतिरिक्त पैसे खर्ची पडणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

कुंभमेळ्याचा कालावधी जवळ आला असताना अजूनही प्रशासनाला शाहीमार्गावरील अडथळे दूर करण्यात यश मिळालेले नाही. विजेच्या लोंबत्या तारा, उघड्या डीपी यांच्यापासून सर्वांत जास्त धोका निर्माण होऊ शकतो. काही महिन्यापूर्वी नवीन शाही मार्गावर महंत ग्यानदास यांनी मोहोर उठवल्याबरोबरच पोलिस प्रशासनाने या मार्गावरील सर्व अडथळ्यांची जाणीव प्रशासनाला करून दिली होती. यास आता अनेक महिन्यांचा कालावधी उलटला आहे. ध्वजरोहणाचा कार्यक्रम तोंडावर आला असून, पावसाळ्यात वीज तारा भूमीगत करताना अडथळा येऊ शकतो. वस्त्रातंर गृहानजीक वी​जमंडळातर्फे भूमीगत तारांसाठी काम सुरू असले तरी गणेशवाडी येथील प्रस्तावीत भाजी मार्केटपर्यंत पोहचण्यास किती कालावधी खर्ची पडेल, हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

‍रस्त्यालगत लोंबत्या तारा व उघडी डीपी दिसून येते. विशेष म्हणजे प्रशासनाने याठिकाणी सिमेंट काँक्रेटीकरण केले असून, ते फोडूनच भुमीगत तारांचे काम पूर्ण होणार आहे. एकाच कामासाठी दोन वेळा पैसा खर्ची पडणार असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते आहे. शाही मार्गावरील अतिक्रमण सुध्दा प्रशासनाची डोकेदुखी ठरले आहे.

शाही मिरवणुकीचा मार्ग

लक्ष्मी नारायण मंदिर- तपोवन रस्त्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, देवी चौक-गणेशवाडी रस्त्याने आयुर्वेद महाविद्यालय- गाडगे महाराज पुलालगतच्या रस्त्याने नदी पात्रापर्यंत, संत गाडगे महाराज पुलाखालून, सरदार चौक-कपालेश्वर मंदिर चौक-रामकुंड.

परतीचा मार्ग

रामकुंड-कपालेश्वर मंदिर चौक-खांदवे सभागृह रस्त्याच्या मार्गाने मालवीय चौक-पुढे पाथरवट लेनने गजानन चौक, पुढे गुरुद्वारा रस्त्याने काट्या मारुती चौक-एसटी डेपो लगतच्या मुख्य रस्त्याने नवीन आडगाव नाका चौक, राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद नाका- औरंगाबाद रोडने जनार्दन स्वामी आश्रम चौक- पुढे तपोवन रस्त्याने लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोणचे झाले आणखी आंबट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

ग्रामीण भागात कैरीचे लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली असून, पहिला पाऊस पडल्यानंतर हमखास वर्षभर टिकेल अशा पद्धतीने लोणचे तयार केले जात आहे. त्यामुळे घरोघरी लोणच्याचा खाराचा घमघमाट दरवळू लागला आहे. मात्र, यंदा बेमोसमी पाऊस व वादळाच्या तडाख्यामुळे झाडांवरील कैरी गळून पडल्याने लोणच्यासाठी लागणारी कैरीची आवक कमी झाली आहे. यावर्षी चवदार असे लोणचे महाग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.

मार्च एप्रिल व मे ह्या उन्हाळ्याचा दिवसात काळे तिखट, लालतिखट, नागली, उडीद, बाजरीच्या पापडाची. कुरड्या, शेवया व विविध वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणीची लगबग सुरू असते. वर्षभर लागणारे विविध खाद्यपदार्थ या दिवसात बनवून ठेवले जातात. त्यानुसारच पहिला पाऊस पडल्यावर वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनवले जाते.

मराठमोळ्या ताटात अंबट-गोड-तिखट असे चवदार लोणचे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही व जेवणाचे ताटही लोणच्याशिवाय अपूर्ण दिसते. जेवणाच्या ताटात तोंडी लावायला लोणचे नसेल तर त्या जेवणाची रंगत ती काय? फेब्रुवारी-मार्च मे महिन्यात पडलेल्या बेमोसमी पाऊसमुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यात मान्सून पूर्व पाऊस व वादळी वा-यांमुळे कैरी गळून पडली. याकारणास्तव लोणच्याची कैरी दुरापस्त होऊन आवक घटली आहे. तसेच कैरीचा भावही वधारला आहे. त्यामुळे ज्या घरात कुटुंबकर्ता वर्षभर पुरेल एवढे शंभर कैरीचे लोणचे घातले जाते, तिथे आता पन्नास किरीचे लोणचे घातले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवर मारुती कार जळून खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावरील येवला तालुक्यातील देशमाने ते मुखेडफाटा परिसरानजीक मंगळवारी (ता. १६) रोजी सकाळी साडेदहाच्यादरम्यान धावणाऱ्या एका मारुती ८०० या कारला (एम. एच. ०४. ए.एस. ९४४८) अचानक आग लागली. चालकाने वेळीच गाडी थांबवली. त्यामुळे त्याला सुखरूपणे गाडीतून बाहेर पडता आले.

आगीचे लोट पाहून हायवेवरून धावणाऱ्या इतर वाहनांच्या चालकांची देखील पाचावर धारण बसली. आगीचे लोट बघता कार स्फोट घेते की काय या भीतीने अनेकांनी आपली वाहने दुतर्फा थांबुन घेतली. कारने पेट घेतल्याचे

पाहताच चालक कार घटनास्थळी सोडून फरार झाला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळताच पोलिस यंत्रणेच्या वतीने येवला नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे फायरमन नितीन लोणारी व तुषार लोणारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरचा नगराध्यक्ष आज ठरणार

$
0
0

तृप्ती धारणे-अनघा फडके यांच्यात चुरस

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

धोंड्याच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबक नगराध्यक्षपदाचे वाण कोणत्या लेकीस आणि जावयास मिळते याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. नगराध्यक्षपदाची आज निवड होत असून, भाजपच्या तृप्ती धारणे आणि मनसेच्या अनघा फडके या दोघीही त्र्यंबकच्या लेकी आणि सुना आहेत. यापैकी कोणास वाण मिळते आणि कोणाला धोंडा मिळतो याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.

धारणे या निखाडेंच्या, तर फडके या पाटणकरांच्या सुकन्या आहेत. धारणेंचे माहेर आणि सासर मेनरोडचे, तर फडके यांचे माहेर आणि सासर पाचआळीतील आहे. निखाडेंचे जावई पंकज धारणे आणि पाटणकरांचे जावई नारायण फडके दोहोंनी जोरदार फिल्डींग लावली आहे. आता आज, बुधवारी दुपारी बारा वाजता नगरपालिका सभगृहात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या तृप्ती धारणे मावळत्या सत्तारूढ गटातील आहे. त्यांच्या गटात ९ सदस्य आहेत, तर मनसेच्या अनघा फडके विरोधी गटातील असून, त्यांच्याकडे ८ सदस्य आहेत. अर्थात एक सदस्य मिळविण्याची खात्री त्यांच्या गटाला आहे. एकूणच एका मताच्या खेळीत कोणास विजय मिळतो याचीच चर्चा काही दिवसांपासून शहरात सुरू आहे. सार्वत्रिक निवडणूक २०१२ नंतर प्रारंभीपासून सत्तेत असलेल्या आणि सहा महिन्यांपूर्वी सत्तेपासून दूर राहावे लागलेला मनसे गट इर्षेला पेटला आहे. तशात संपलेले आरक्षण मागासांचा प्रवर्ग असे होते. त्यामध्ये दोन नगरसेवकांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी होती ती हिरावली गेली आहे. तृप्ती धारणे यांनी राष्ट्रवादीस मत दिल्याने गतवेळेस नगराध्यक्षपदाची हुलकावणी मिळाली. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी मनसेने आणि त्यांच्या सहका-यांनी प्रारंभी भाजपानंतर राष्ट्रवादी बरोबर साटेलोटे करण्याचे प्रयत्न झाले. तशात धारणे गटातील अपक्ष सदस्या विजया लढ्ढा यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या घडीला नगराध्यक्षपद देवू केले. परंतु, त्यात यश आले नाही. आता शिवसेनेच्या मदतीने त्यांना सत्तारूढ गटाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होत होती. मात्र, भाजप आणि सेना परस्परांना शह देणार नाही, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिखरेवाडीत कुत्र्यांची दहशत

$
0
0

महापालिकेची कारवाई शून्य; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना मोकाट कुत्री पकडण्याबाबत अद्याप जाग येत नसल्याने परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसापूर्वी शहरात मोकाट कुत्र्यांच्या हैदोसामुळे दहा लहान मुले जखमी झाली होती. या घटनेतून धडा घेत नाशिकरोडच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे होते. परंतु, महापालिका कर्मचाऱ्यांना याचे सोयरेसूतक नसल्याचे दिसते. नाशिकरोड परिसरात कुत्रे पकडण्याच्या मोहीम अनेक दिवसांपासून ठप्प आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून परिसरात फिरणे देखील मुष्कील झाले आहे. तसेच हा परिसर कामगार वस्तीचा असल्याने कामासाठी रोज नागरिक ये-जा करीत असतात. त्यातील काही कामगारांना नाईट शिफ्ट असते. अशा वेळी ही कुत्री नागरीकांच्या अंगावर धावतात. तसेच रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत माणसांऐवजी कुत्रेच करतात. या कुत्र्यांचा मोठ्या माणसाबरोबरच लहान मुलांनाही त्रास होत आहे.

शिखरेवाडीतील उद्यानातही कुत्र्यांचा संचार वाढल्याने मुलांनी खेळावे कुठे? असा प्रश्न नागरिकांना सतावतोय. कुत्र्यांना सहज मांसाहारी अन्न मिळत आहे. याच वातावरणामुळे त्याच्यातील हिंस्त्रपणा वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे. कपडे ओढून नेण्याचे प्रकार नागरिकांनी घराबाहेर वाळत टाकलेले कपडे देखील कुत्रे ओढून नेत आहेत. त्यामुळे परिसरात कपडे कुठे वाळत घालावे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कारवाई का नाही?

अंबड, महालक्ष्मीनगर, डीजीपीनगर भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास गेली वर्षभर होतो आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेने अथवा विभागीय कार्यालयाने मोकाट कुत्र्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकदा कुत्र्यांमुळे अपघात व चाव्याचे प्रकार होऊनही महापालिका कारवाई करणार नसेल तर नागरिकांनी कोणाकडे तक्रार करायची असा संतप्त सवालही केला जात आहे. नगरसेवकही दखल घेईना अन् महापालिका विचारेना अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. कुत्र्यांमुळे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच महापालिका दखल घेणार आहे का? नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरच आता कारवाई करा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करायला हवी, असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे. आठवडाभरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास विभागीय अधिकाऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

लहान मुले टार्गेट

रस्त्याने शाळा, क्लासला लहान मुले जात असतांना त्यांच्यावर कुत्र्यांचे होणारे हल्ले वाढले आहेत. भुंकणाऱ्या आणि थेट अंगावर धावून येणाऱ्या या कुत्र्यांमध्ये मुलांप्रमाणेच त्यांचे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. अशा उपद्रवी कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिखरेवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेने कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्या‌ची अधिक गरज आहे. - राहुल अहिरराव, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटेंची जिल्हा दूध संघात ‘एंट्री’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उडी घेत शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली. सोमवारी कोकाटे यांनी आपल्या पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेपाठोपाठ कोकाटेंनी आता दूध संघातही पाय रोवायला सुरूवात केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचेही पॅनल या निवडणुकीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकाटे आणि थोरे यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे.

जिल्हा बँकेपाठोपाठ आता नाशिक जिल्हा सहकारी दूध संघाचीही निवडणूक प्रक्रिया सुरू असून, येत्या २६ जूनला निवडणूक आहे. यासाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा दूध संघात १७७ सहकारी दूध संस्था असून, त्यांना मतदानाचा अधिकार आहे.

या दूध संघाच्या निवडणुकीत प्रथमच दिग्गज राजकीय नेत्यांनी आता एन्ट्री करायला सुरूवात केली आहे. जिल्हा बँकेत एकहाती सत्ता न मिळालेल्या माणिकाराव कोकाटेंनी आता दूध संघात प्रवेश केला आहे. सोमवारी त्यांनी जिल्हा दूध संघासाठी शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली आहे. संचालक कोकाटेंसह किशोर दराडे, संभाजीराव पाटील, राजेंद्र भोसले हे या पॅनलचे नेतृत्व करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images