Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ग्यानदास बरसले अन् नरमलेही!

$
0
0

साधुग्रामच्या पडझडीबाबत तासाभरात बदलली भूमिका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहिल्याच पावसाने साधुग्रामच्या सेक्टर दोनमधील पत्र्यांचे शेड जमीनदोस्त झाल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष मंहत ग्यानदास महाराज यांनी महापौरांसह अधिकाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली. `आप पैसा और कमिशन खाते हो, कामो का दर्जा खराब है`, अशा शब्दांत महापौर बंगल्यावर सरबत्ती करणाऱ्या महाराजांनी पाहणी केल्यानंतर अचानक आपली भूमिका बदलली.

रविवारच्या पहिल्याच पावसात साधुग्रामची दुरवस्था झाल्याने साधूमहंतांमध्ये नाराजी पसरली आहे. कुंभमेळा पावसात असल्याने जास्त पाऊस झाल्यास,साधू-महंताचे हाल होतील. त्यामुळे महंत ग्यानदास महाराज संतप्त झाले होते. सकाळपासूनच त्यांनी कामकाजावर आगपाखड करायला सुरूवात केली. महापौरांना थेट पाचारण करण्यात आले. महापौरांसह पालिकेचे काही अधिकारी महाराजांकडे पोहचल्यावर महाराजांनी थेट आरोपांची सरबत्ती लावली. महापौर अशोक मुर्तडक यांनी आपल्या परीने बचाव करीत, ग्यानदास महारांजाचे आरोप खोडून काढत साधुग्रामची पाहणी करण्याची विनंती केली.

त्यानंतर महापौरांच्या उपस्थितीत ग्यानदास महाराजांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकसान झालेल्या साधुग्रामच्या भागाची पाहणी केली. वादळी वाऱ्याचा वेग प्रतितास १२० किलोमीटर असल्याने अपूर्ण कामांचे नुकसान झाल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले. पक्क्या कामांना कोणताही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही ग्यानदास महाराज यांना आश्वस्त केले. महाराजांनी यावेळी ठेकेदार दुबे यांच्याशी चर्चा करीत चांगल्या दर्जाची कामे करण्याच्या सूचना केल्या. प्रशासनाच्या सारवासारवी नंतर ग्यानदास महाराजांच्या आरोपांचा तोरा कमी होवून त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. माध्यमांशी बोलतांना आपण कामाबाबत संतुष्ट असल्याचे सांगितले. अपूर्णावस्थेतील कामेच पडल्याचा दावा करीत प्रशासनावर विश्वास व्यक्त केला. इतर कामे चांगली असल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला.

वस्रांतरगृहाचा वाद

रामकुंडावर वस्रांतर गृहाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. मंहत ग्यानदास यांनी वस्रातंरगृह पाडले नाही तर, तर आपण कुंभात स्नान करणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुरोहीत संघ आणि आखाड्यांमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि महापौरांसमोरच ग्यानदास महाराजांनी मागणी केल्यानंतरही गप्प राहणेच पसंत केले. ग्यानदास यांनी या मुद्द्याला हात लावल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरक्षेला कैद्यांचा हातभार!

$
0
0

नाशिकरोड कारागृहात ५६ बॅरिकेड्सची निर्मिती

फणिंद्र मंडलिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या महनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी खास ५६ अत्याधुनिक बॅरिकेड्स तयार करण्याचे काम नाशिकरोड कारागृहात होत असून, ४० कैदी यासाठी झटत आहेत. या माध्यमातून कारागृहाला ४ लाख ८७ हजार २०० रुपये मिळणार आहेत.

शहरात जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी प्रशासन व पोलिसांच्यावतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांमधील वाहतूक वळवण्यासाठी खासगी कंपन्यांकडून विविध प्रकारचे बॅरिकेड्स तयार करून घेण्यात आले आहेत. परंतु, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या महनीय व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी स्वीकारली आहे. पोलिस, प्रशासनाने तयार केलेल्या डिझाईनप्रमाणे ५६ बॅरिकेड्स तयार करण्याचे काम कारागृहात करण्यात येत आहे. कारागृहात तयार होणारे बॅरिकेड्स इतरांपेक्षा वेगळे असून, यासाठी वापरण्यात येणारे लोखंड जाड व उच्च प्रतीचे आहे. त्यामुळे यावर कुणी फायर केले, तर समोरच्या व्यक्तीला फारशी इजा यातून होणार नाही अशी त्यात सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या बॅरिकेड्सच्या उंचीपेक्षा एक फुटाने याची उंची जास्त असणार आहे. त्यामुळे या बॅरिकेड्सवरुन कुणी उडी मारू शकणार नाही. तसेच, बॅरिकेड्समध्ये बारिक जाळी लावण्यात येत असून, कुणाचा हात जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी दिलेल्या ऑर्डर प्रमाणे ५६ बॅरिकेड्स तयार होत असून, हे फक्त महनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी वापरले जाणार आहे. यातील काही बॅरिकेड्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे हत्यार घेऊन किंवा शस्त्र घेऊन जाणारी व्यक्ती आढळली तर ती दृष्टिक्षेपात येऊन व्यक्तीची ओळख पटणार आहे. एका बॅरिकेड्सची किंमत ८ हजार ७०० रुपये असून, ५६ बॅरिकेड्सचे ४ लाख ८७ हजार २०० रुपये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला मिळणार आहेत. मागील सिंहस्थात देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या डिझाईनप्रमाणे बॅरिकेड्स तयार करण्याचे काम कैद्यांनी केले होते. पोलिस चौक्याही कैद्यांनी तयार केल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या ऑर्डरनुसार बॅरिकेड्सचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण बॅरिकेड्स पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येतील. त्याचप्रमाणे बंकबेडदेखील तयार होत आहेत. - विलास साबळे, कारखाना व्यवस्थापक, सेंट्रल जेल

५२० बंक बेड्सची निर्मिती

सिंहस्थात सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी राज्यातील व परराज्यातील पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे. त्याच्या निवासाची सोय क़रण्यासाठी शहरातील मंगल कार्यालये भाड्याने घेतली आहे. मात्र तेथे झोपण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने ५२० बंकबेड्स तयार करण्याची ऑर्डर कारागृह प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यांचेही काम पूर्णत्वाकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीपचा ‘व्हॉटस् अॅप निकाल’

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलं आहे. मनोरंजनासाठी तसेच चॅटींगसाठी व्हॉट्सअॅप फेमस आहे. पण, व्हॉट्सअॅपच्या मदतीने नाशिकरोड येथील संदीप सोनवणे हा तरूण एक आगळावेगळा उपक्रम राबवतोय. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल घरबसल्या अन् तेही विनामूल्य उपलब्ध करून देण्याचं काम संदीप करतो.

संदीप आपल्या बहिणीचा दहावीचा निकाल मोबाइलवर पहात असताना आपणही दुसऱ्यांना निकाल मोबाइलवर उपलब्ध करून द्यावा हा विचार त्याच्या मनात आला. संदीपची समाजसेवी वृत्ती जागी झाली आणि दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाइलवर विनामूल्य निकाल उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. सुरुवात केल्यानंतर त्याला भरघोस प्रतिसाद मिळत गेला.

उपक्रमाचं प्रमोशन

निकालाच्या एक दिवस आधीच संदीप व्हॉट्स अॅपवरील ग्रुप्सवर तसेच फेसबुकवर आपल्या उपक्रमाची प्रसिद्धी करतो. प्रत्येकाच्या शंकेच तो योग्य मार्गदर्शन करतो. त्याला या उपक्रमाच्या प्रसिद्धीत अनेक जण मदही करतात.

कौतुकाचा वर्षाव

२०११ साली सुरू केलेल्या या उपक्रमाला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला. पण, तो आज वटवृक्षात रुपांतरीत होऊ पहातोय. गेल्या पाच वर्षात त्याने तब्बल ४५० ते ५०० विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपद्वारे घरबसल्या मोबाइलवर निकाल उपलब्ध करून दिला आहे. या वर्षीही त्याने बारावीच्या ४२ तर दहावीच्या तब्बल ९५-१०० विद्यार्थ्यांचे निकाल काढले आहेत. संदीपच्या या उपक्रमाच अनेकजण कौतुक करतात. निकाल काढण्यासाठी त्याला केवळ नाशिकच नव्हे तर कोल्हापूर, नागपूर, सातारा, सांगली, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे मेसेज येतात. संदीपला कौतुकाचे फोनही येतात.

व्यवसायाबरोबर उपक्रम

संदीप आपलं किराणा दुकान सांभाळून हा उपक्रम राबवतो. कालही तो किराणा दुकानही सांभाळत होता व एकीकडे विद्यार्थी व पालकांची मदतही करत होता. यात त्याला त्याच्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळते.

असा मिळतो निकाल

संदीप आवाहन करतो की, निकाल पाहण्यासाठी आईचे नाव व सीट नंबर माझ्या व्हॉट्स अॅप नंबरवर सेंड करा. संदीप लगेच निकालाची वेबसाईट ओपन करून आपल्याला निकालाचा मोबाइल स्क्रिनशॉट (प्रत) आपल्याला रिप्लाय करून पाठवतो. तसेच अभिनंदनरुपी मेसेजही पाठवतो.

व्हॉट्स अॅपद्वारे घरबसल्या ऑनलाइन निकाल या माझ्या उपक्रमाच लोक जेव्हा कौतुक करतात, तेव्हा अतिशय आनंद होतो. आपल्याकडून विद्यार्थी व पालकांना काहीतरी मदत होते याचच खूप समाधान वाटतं. येणाऱ्या काळातही मी हा उपक्रम अधिक ताकदीने व उत्साहाने राबवणार आहे. - संदीप सोनवणे, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची निकालात भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनेक शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले. या यशामध्ये शाळेत राबविले जात असलेले शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांची मेहनतीचा वाटा असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले.

न्यू इरा स्कूल

न्यू इरा इंग्लिश शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तरल पवार या विद्यार्थ्याने ९६.६० टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळवला. सिद्धी कुलकर्णी या विद्यार्थिनीने ९६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर, काजल असोदेकर या विद्यार्थिनीने ९५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. या शाळेतील ४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर १११ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवले.

मालतीबाई विद्यालय

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मालतीबाई कुलकर्णी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५ टक्के लागला. भाग्यश्री वैद्य या विद्यार्थिनीने ८५.२० टक्के मिळवून शाळेत पहिली आली. अजय करंगळे हा विद्यार्थी ८२.६० टक्के गुणांसह दुसरा आला. शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

होरायझन स्कूल

होरायझन स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. येथील एकूण ८४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ५६ विद्यार्थी डिस्टींक्शनमध्ये पास झाले आहेत. २६ विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये तर दोन विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये पास झाले आहेत. यापैकी कुंजल पगार या विद्यार्थ्याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी खैरनार या विद्यार्थिनीला ९४.६० टक्के, पीयूष गुळ्हाणे ९४.४० टक्के, सुश्मिता शिरुडे या विद्यार्थिनीला ९४.००, ऋतुजा माळी या विद्यार्थिनीलाही ९४ टक्के गुण मिळाले आहेत.

रासबिहारी स्कूल

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतील दहावी इयत्तेतील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापक शिल्पा आहिरे यांनी सांगितले आदित्य शेलार हा विद्यार्थी शाळेत ९५.२० टक्के गुण मिळवून पहिला आला. हर्ष तळोजिया हा विद्यार्थी ९३.२ टक्के गुणांनी आणि दीप्ती कासलीवाल हा विद्यार्थी ९३ टक्के गुणांनी शाळेत तिसरा आला आहे.

फ्रावशी हायस्कूल

फ्रावशीचा निकालही शंभर टक्के लागला असून, सुचेतसिंग वालिया हा विद्यार्थी ९६.८० टक्के गुणांनी पहिला आला आहे. कुमार आव्हाड हा विद्यार्थी ९४.८० टक्के गुणांना दुसरा तर नेहा गोरे ही विद्यार्थिनी ९४.४० टक्के गुणांनी तिसरी आली आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थी डिस्टींक्शनमध्ये तर १३ टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहेत.

सेंट फ्रान्सिस हायस्कूल

तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. २८८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २६ विद्यार्थी मेरीट क्लासमध्ये, १३१ विद्यार्थी डिस्टींक्शन, १०९ विद्यार्थी फर्स्ट क्लास व २२ विद्यार्थी सेकंड क्लास मिळवत पास झाले आहेत. त्यातील प्रियल पोकार ९५.६० टक्के गुणांनी शाळेत पहिली आली आहे. सोनाली मुंधे ९५.४० टक्के गुणांनी दुसरी तर मधुरा खैरे या विद्यार्थिनीने ९४.८० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.

शिवाजी विद्यालय

मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९२.८७ टक्के लागला. शाळेतून परीक्षेसाठी ४०७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात प्रथम येण्याचा मान प्रेरणा राजेंद्र उगले हिने मिळविला. तिला ९४.२० टक्के मिळाले. तसेच जयेश प्रल्हाद शिंदे (९३.४० टक्के), अपेक्षा अरुण मोरे (९२.६० टक्के), मयुरी संजय चव्हाण, (९१.४० टक्के) जागृती अशोक पाटील (९१.२० टक्के) यांनी पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान मिळवला.

व्ही. एन. नाईक

क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्थांच्या शाळांचे अनेक विद्यार्थी दहावीत विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत. राणेनगर, ढकांबे, माळेदुमाला, कासारी, चिंचोली येथील नाईक संस्था सर्व माध्यमिक विद्यामंदिर शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. तर दातली, सिन्नर, निफाड, नांदगाव, इगतपुरी, एकलहरे दिंडोरी येथील नाईक संस्थेच्या सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

सेंट पेट्रीक्स

शाळेचा निकाल ९९.१८ टक्के लागला. परीक्षेसाठी १२३ विद्यार्थी बसले होते. रिया मेरी ही ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, जगताप श्रीतेज हा ९३.२० टक्के गुण व्दितीय तर, बायस शिवानी ही ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय आली. नूतन विद्यामंदिर शाळेचा ९७.०६ टक्के, अमित पंड्या विद्यामंदिरचा ९७.०८ टक्के, कॅन्टोन्मेन्ट बोर्ड हायस्कूलचा ९२.१२ टक्के तर देवळाली हायस्कूलचा ९७.३३ टक्के निकाल लागला आहे.

डॉ. सुभाष हायस्कूल

देवळाली कॅम्प : शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. गुजर सुभाष हायस्कूलचा इंग्रजी माध्यमाचा निकाल ९८.३० तर, हिंदी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

इंग्रजी माध्यमाची भाग्यश्री धनराजानी हिने ८९.८० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. उदय मुसळे याने ८८ टक्के गुण मिळवून दुसरा तर, गुंजन आसवाणी हिने ८७.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. इंग्रजी- हिंदी माध्यमात ८०.८० टक्के गुण मिळवीत धनंजय प्रसाद प्रथम, पूनमकुमारी चौहाण (७८.८०) व्दितीय तर सलोनी पांडे (७८ टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

गुरू गोविंद सिंग

गुरू गोविंद शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, पीयूष कोठावदे हा विद्यार्थी ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. सोनल लोखंडे ९४.२० टक्के गुणांनी दुसरी व गौरव वाडिले हा विद्यार्थी ९३.६० टक्के गुणांनी शाळेत तिसरा आला आहे. तसेच पायल जगताप ही विद्यार्थिनी ९३ टक्के गुण मिळवून शाळेत चौथी व यश देडिया हा विद्यार्थी शाळेत पाचव्या क्रमांकाने यशस्वी झाले आहेत.

न्यू एज्युकेशन सोसायटी

या संस्थेच्या सर्व शाळांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल, सरस्वती विद्यालय, निफाड इंग्लिश स्कूल, सोनेवाडी माध्यमिक विद्यालय या सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहरातील बिटको बॉईज हायस्कूलचा निकाल ९८.२६ टक्के लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणाव वाटतोय; बोला आमच्याशी

$
0
0

एसएससी बोर्डाचा नाराज विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवनाची स्पर्धा अव्याहत सुरूच असते. त्यात उणे दुणे रहाणारच ना. आपल्यातल्या कमतरता भरून काढण्याची संधी जीवन प्रत्येकाला देते. मग आपण स्वत:ला कमी का लेखायचं...असे आधाराचे शब्द प्रसंगी लढण्याचे बळ देतात. हेच बळ देणारी मदतवाहीनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावीच्या निकालानंतर जे विद्यार्थी मानसिक तणावाचा सामना करीत आहेत त्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम ही मदतीवाहिनी करणार आहे.

दहावीला पडलेले मार्क, विद्यार्थी अन् पालकांचा झालेला अपेक्षाभंग, भवितव्याच्या विचाराने येणारे दडपण, अंदाज चुकल्याने बदलू पाहणाऱ्या करिअर वाटा यातील कुठल्याही मुद्द्याचे दडपण विद्यार्थ्यांना वाटत असेल तर पुढील आठवडाभरासाठी (०२५३-२५९२१४३) हा क्रमांक तुम्हाला मदत करेल. नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यालयात ही मदतवाहिनी कार्यान्वित

करण्यात आली आहे. ८ जूनपासून सुरू करण्यात आलेली ही मदतवाहीनी सकाळी ११ वाजेपासून नाराज विद्यार्थ्यांशी संवाद साधेल. या मदत वाहिनीशिवाय काही समुपदेशकांचीही नियुक्ती याच उपक्रमासाठी करण्यात आली आहे. विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये हे समुपदेशक आठवडाभरासाठी कार्यरत राहतील.

समुपदेशकांशी साधा संपर्क

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थीही समुपदेशकांशी थेट संपर्क साधू शकतील. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील क्रमांकावर समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा समुपदेशक : के.आर.बावा (९४२३१८४१४१), प्रशांत पाटील (९७६७३०३०९०), सुनील आहेर (९४२३२५५३००) या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात नाशिकची आघाडी

$
0
0

विभागासह नाशिकचा दहावीचा निकाल ९२ टक्के

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागासह जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के लागला आहे. गत चार वर्षांच्या तुलनेत नाशिकच्या निकालाची आकडेवारी उंचावली आहे. ९२.८३ टक्क्यांसह नाशिक जिल्हा विभागातूनही आघाडीवर राहिला आहे. गतवर्षी नाशिकचा निकाल ९०.६१ टक्के होता.

मार्च महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने सोमवारी ऑनलाइन पध्दतीने हा निकाल जाहीर केला असून, १५ जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

नाशिक विभागामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही विभागामध्ये ३८३ केंद्रांमधून १ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी १ लाख ७९ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विभागाची ही टक्केवारी ९२.१६ टक्के आहे.

नाशिक जिल्ह्यात १५८ केंद्रांमधून ८५ हजार ५१२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ७९ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. धुळे जिल्ह्यातून २७ हजार ७३१ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. धुळ्याचा निकाल ९१.३६ टक्के लागला. जळगावमधून ५९ हजार ८८५ पैकी ५४ हजार ९४९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. जळगावचा निकाल ९१.५३ टक्के निकाल लागला.

मुलीच हुश्शार!

उत्तीर्णतेच्या आकडेवारीत यंदाही मुलींनी आघाडी राखली आहे. नाशिक जिल्हातून ९१.५३ टक्के उत्तीर्ण झाले. तर ९४.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. धुळ्यातून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.६३ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.७० टक्के आहे. जळगावातून ९०.२५ टक्के मुले तर ९३.८३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. नंदुरबारमधून ९०.१५ टक्के मुले अन् ९३.२३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कॉपी प्रकरणांमध्ये घट

नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांमधून सुमारे १३२ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली. यात नाशिकचे ६२ तर धुळ्यातील २३, जळगावातील ४५ आणि नंदुरबारचे दोन विद्यार्थी समाविष्ट आहेत. गतवर्षी कॉपीची १४६ प्रकरणे होती.

रिव्हॅल्यूएशनसाठी मुदत

विद्यार्थ्यांच्या हाती १५ जून रोजी मार्कशीट पडणार आहे. यानंतर दहा दिवस म्हणजे २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना रिव्हॅल्यूएशनसाठी अर्ज करता येईल. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात येतील. साडेपाचशे शाळांचा १०० टक्के निकाल

नाशिक विभागातून एकूण ५४८ माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या आकडेवारीत सुमारे शंभरने वाढ झाली आहे. सन २०१४ मध्ये या शाळांची संख्या ४५१ होती तर मार्च २०१३ मध्ये ही संख्या २९५ होती. मार्च २०१२ मध्ये २३१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात रोहिण्या बरसल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात रोहिण्याच्या पावसाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून धडकण्यास चार दिवस विलंब झाला असला तरी रोहिणीच्या पावसामुळे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यात व शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दरवर्षी साधारणत: सात जूनला रोहिणीचा पाऊस राज्यात दाखल होतो. नाशिकमध्ये केवळ एक दिवस उशिराने मृग नक्षत्राच्या पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी १७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. कळवणमध्ये सर्वाधिक २५.२ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल सुरगाण्यात २० मिलीमीटर, इगतपूरीत १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाचा हलकासा शिडकावा झाला. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या. मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीव‌ितहानी झाली नसल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेस्ट कॅम्प रोडला विकासकामांना प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

लष्करी आस्थापनाच्या माध्यमातून चालू वर्षी १५ लाख रुपयांची नागरी विकासासाठी केली जाणार आहे. बोर्डाच्या इतिहासात लष्करी विभागाने केवळ वॉर्ड ६ साठीच आतापर्यंत ६० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याचे नगरसेविका कावेरी कासार यांनी सांगितले.

लष्कराचे बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर संजीव तिवारी, कर्नल कर्नेलसिंग व मेजर अमित शर्मा यांच्या सहकार्याने रेस्ट कॅम्प रोड परिसरात भूयारी गटार योजना, कॅथे कॉलनी अंतर्गत पेवर ब्लॉक, फुटपाथ व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका कावेरी कासार व रतन कासार यांच्या करण्यात आला. यावेळी विनोद पिल्ले, सतीश आडके, सन्नी खरालिया जेकब पिल्ले, राजू पगारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज अर्ज, आजच दाखला उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला आणि नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयांत राजस्व अभियानांतर्गत एकाच दिवसात जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेयर दाखला देण्याचा उपक्रम प्रांताधिकारी कार्यालयाकडून ११ व १२ जून रोजी सकाळी दहाला राबविण्यात येणार आहे. विविध प्रमाणपत्र प्राप्त करताना विद्यार्थी व पालकवर्गाची होणारी दमछाक थांबविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १ व २ जूनला नांदगाव व येवल्यात या उपक्रमामधून अनुक्रमे ३९० व येवल्यात १६५० दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर व जातीचा दाखला यांसह विविध प्रकारचे दाखले सहजगत्या मिळवून देण्यासाठी येवला व नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात ११ आणि १२ जून रोजी सकाळी दहा ते सांयकाळी सहा यावेळेत राजस्व अभियानांतर्गत विविध दाखले देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील कार्यालयात तलाठ्यांकडून दाखले दिले जातील. येवल्यात ११ व नांदगावात १२ जून रोजी राजस्व अभियानांतर्गत उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात आज गुणगौरव समारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १७ वा वर्धापनदिन बुधवारी (१० जून) संपन्न होत आहे. विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये दुपारी ४ वाजता एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध विद्यार्थी व शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अनेक गुणवंत विद्यार्थी आणि विविध विद्याशाखांमधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सन २०१२-१३ व सन २०१३-१४ करीता उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एकक पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार(पुरुष), उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार (महिला) तसेच सन २०१४-१५ करीता डॉ. शरदिनी डहाणूकर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विविध विद्याशाखेतील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विविध विद्याशाखेतील उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार व जीवनगौरव आदी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले.

या समारंभास विशेष अतिथी म्हणून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. विद्यासागर यांच्यासह खासदार हरीश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप उपस्थित राहणार आहेत.

डॉ. कमलाकर व्यवहारे, डॉ. अशोक रेगे, डॉ. सुदाम काटे, डॉ. वसंत देशपांडे, डॉ. श्रीकृष्ण फडके, डॉ. मधुकर परांजपे व डॉ. दिलीप पुराणिक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सांगितले आहे.

आरोग्य विद्याशाखेनिहाय विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या एकूण ४४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात

येणार आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेचे १३ विद्यार्थी, दंत विद्याशाखेचे ३ विद्यार्थी, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे ८ विद्यार्थी, होमिओपॅथी विद्याशाखेचे ५ विद्यार्थी आणि तत्सम विद्याशाखेच्या १५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक

डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले. या समारंभास मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकेवरील कोंडीला

$
0
0

'वनवे'चा पर्याय बागवानपुऱ्याचा रस्ता होणार एकेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारकेवर उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अमरधामकडे जाणारा (बागवानपुरा) रस्ता वन वे करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसात येणाऱ्या सूचना व हरकतींचा विचार करूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

द्वारका सर्कल येथे मुंबई, पुणे, ना​शिक, औरंगाबद तसेच चांदवडच्या दिशेकडून हजारो वाहने येत असतात. सर्वच रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीची समस्येला तोंड द्यावे लागते. तासानतास वाहने अडकून पडतात. सकाळ व संध्याकाळच्या सुमारास तर त्रासात भरच पडते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी गुंतून पडतात. उड्डाणपूल व रस्त्यांच्या रूंदीकरणानंतर वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागेल, अशी शक्यता मावळली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून यावर पर्याय सुचवले जात आहेत. या ठिकाणी चार ते पाच रस्ते एकत्र येतात. तसेच सिग्नल बसवण्याच्य दृष्टीने योग्य जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बागवानपुरा भागात जाणारा रस्ता वन वे करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा या भागातून येणाऱ्या वाहनांमुळे मुंबईकडून तसेच सारडा सर्कलकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. अपघाताची देखील भीती कायम राहते. दरम्यान, बागवानपुरा भागाकडून द्वारकेकडे येणाऱ्या वाहनांना चौकमंडई मार्गे सारडा सर्कलकडे जाता येईल. तसेच अमरधामरोडने द्वारकेकडे जाणारी सर्व वाहने ही शिवाजी चौकातून टाकळी चौफुलीमार्गे आग्रारोडकडे जातील, असा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे.

वन वे बाबत स्थानिक नागरिकांची काही सूचना व हरकती असतील तर त्या त्यांनी सात दिवसाच्या आत सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा, जुने पोलिस आयुक्त कार्यालय, शरणपूररोड, या ठिकाणी पाठवाव्यात. मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास हा रस्ता एकरे म्हणून घोषित करण्यात येणार आहे.





हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

भद्रकाली फुलेमार्केट-वाकडीबारव- चौकमंडई- शिरसाठ हॉटेल- महात्माफुले चौकमार्गे द्वारकासर्कलकडे जाणारी वाहतूक

काजीपुरा-चौक मंडई-शिरसाठ हॉटेल-महात्मा फुलेचौकमार्गे द्वारकेकडे जाणारी वाहतूक

आझाद चौक-शिरसाठ हॉटेल-महात्माफुले चौकाकडून द्वारकेकडे जाणारी वाहतूक

अमरधामरोडने शिवाजीचौक- कथडा मार्गे महात्माफुले चौककडून द्वारकेकडे जाणारी वाहतूक



द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. त्यातील ही एक उपाययोजना असून, याचा थेट फायदा वाहनचालकांना होऊ शकतो. - पंकज डहाणे,पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नगरसेवकांची पळवापळवी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिकनंतर त्र्यंबकेश्वरमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुगीचे दिवस संपले असून, नगरसेवक इतर पक्षांची वाट धरू लागले आहेत. कालपर्यंत भाजपच्या वाटेवर असलेले नगरसेवक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा झडू लागली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत डावपेच कोणाचे सरस ठरतात यावरच सर्व गणित ठरणार आहे.

नगराध्यक्षपदाची लवकरच निवडणूक होत असून, सहा महिन्यांपासून विरोधात असलेल्या मनसेने नगरसेविका अनघा फडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समवेत आठ नगरसेवक असल्याची चर्चा आहे. यामध्ये मनसे सहा, ‌शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवकांचा गट जानेवारी २०१५ पासून तयार झाला आहे. सत्तारूढ गटाच्या बाजूने भाजपच्या तृप्ती धारणे यांचा अर्ज दाखल झाला आहे. या गटात नऊ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजप एक, राष्ट्रवादी चार, काँग्रेस तीन आणि अपक्ष एक असे बलाबल आहे. हा गट सहा महिन्यांपूर्वी तयार झाला.

सद्यस्थितीला तृप्ती धारणे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र मनसेने आशा सोडलेली नाही. मनसे गट एक सदस्य मिळवून सत्ता हस्तगत करू शकतो. गतवेळेस तृप्ती धारणे विरोधी गटास मिळाल्याने त्यांच्यामुळे सत्ता गमावावी लागली हे शल्य मनसेला आहे. त्यामुळे त्यांच्या गटातील अपक्ष व शिवसेना नगरसेवकांच्या नगराध्यक्षपदाची संधी हुकली आहे. यावर उपाय म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करण्याचे घाटत होते. आता मनसे गटाने राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यास आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वादळ तयार केले आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दोन वर्ष सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादीस भाजपाच्या एका सदस्याने तारले व सत्तेत सहभाग दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदकामामुळे आश्रम अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

टेकडीवर भराव टाकणे, खोदकाम करणे, वृक्षतोड आणि तत्सम कारणांनी ठिसूळ झालेली टेकडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णा आश्रमास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये त्र्यंबकच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने उत्खनन आणि भराव तसेच दगड ढासळण्याची परिस्थती दृष्टिक्षेपात आली आहे. महसूल खात्याने पाहणी केली. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे. रस्ता तयार करतांना दगडी शिळा लावणे, भराव टाकणे आदी कारणांनी हा भाग ठिसूळ झाला असून, तो पावसात कोसळण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे टेकडीवरील आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे मालमत्तेची हानी होऊ शकते. त्यास संरक्षक जाळी बसविणे तसेच

योग्य त्या उपाययोजना करण्याची नोटीस दिली असून, तसे न केल्यास संभाव्य हानीस सर्वस्वी जबाबदार राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्नपूर्णा आश्रमाच्या टेकडीवरील भराव गतवर्षी ८ ऑगस्ट २०१५ रोजी तळाच्या जमिनीत वाहून आला होता. येथील शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उभे पीक माती खाली दाबले गेले होते. तसेच बांध फुटून भाताचे नुकसान झाले होते. वर्ष उलटले तरी देखील यावर्षी या आश्रमाने संरक्षणात्मक कोणतीही उपाययोजना केलेली नाही. माळीणसारखी घटना घडू नये

म्हणून प्रशासनाने आश्रमास नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘२४’ च्या शुटिंगला प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

ना‌शिक जिल्ह्यात चित्रपटांच्या शुटींगला वाढती पसंती मिळत आहे. सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिर परिसरात तामीळ '२४' या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्याने बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

तामीळ सुपरस्टार सूर्या या अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला '२४' या चित्रपटाचे सिन्नरला चित्रिकरण सुरू झाले आहे. सिन्नरचे यादवकालीन हेमाडपंती गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात हे चित्रिकरण सुरू असून, आठवडाभर चालणार आहे. शिव आराधनेनंतर पर्जन्यवृष्टी झाल्याचा प्रसंग या कालावधीत चित्रित केला जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात आकर्षक सेट उभारण्यात आला असून, गोंदेश्वर मंदिरासारखेच भव्य खांब उभारण्यात आले आहेत. भव्य आकाराचा नंदी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरावर फुलांच्या माळा सोडण्यात आल्या असून, परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. हे सर्व सेट थर्माकॉलपासून उभारण्यात आले असून, गोंदेश्वर मंदिराच्या दगडासारखे रंग काम केल्याने हुबेहूब मंदिरासारखा दिसणारा परिसर सेटच्या रूपाने उभा केला आहे.

या मंदिराच्या परिसरात शुटींगसाठी पुरातत्व विभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली असून, स्‍थानिक कामाचे नियोजन सोनांबे येथील दीपक पवार करीत आहे. पुरातत्व विभागाने घालून दिलेल्या अटीनुसार या मंदिर परिसरात शुटींग केली जाणार असल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात प्रीपेड रिक्षांची भाडेवाढ

$
0
0

बूथजवळ असणार दरपत्रकाची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची लूट थांबावी याकरिता गेल्या सोमवारी प्रीपेड रिक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. पेट्रोलचे वाढलेले भाव आणि प्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार रिक्षांचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा खिसा काही प्रमाणात हालका होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा आणि आर्थिक लूट थांबावी म्हणून ऑक्टोबर २०१३ मध्ये शहरात प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने आणि रिक्षाचालकांना देण्यात येणारे भाडे परवडत नसल्याने अनेकदा ही सेवा बंद पडली. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून ही सेवा खंडित झाली होती. कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत असतात.

शहराची पुरेशी माहिती नसल्याने आलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना बहुतांश रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून अवास्तव भाडे आकारले जाते. ही आर्थिक लूट थांबावी म्हणून पुन्हा एकदा प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयानुसार प्रीपेड रिक्षा व्यवस्थापनाने घेतला. शहरातल्या रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी, प्रवाशांची सुरक्षितता राहावी आणि या व्यवसायाला प्रतिष्ठा लाभावी, या उद्देशाने प्रीपेड रिक्षांचा हा बंगळुरू पॅटर्न नाशिकमध्ये राबविला जात आहे.

पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी ९.३० रुपये आकारले जात होते. मात्र, पेट्रोलचे दर वाढल्याने पहिल्या टप्प्यासाठी आता १३.७५ पैसे आकारण्यात येणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दोनशे प्रीपेड रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या रिक्षा नाशिकरोड रेल्वे स्टेशनबाहेर उभ्या असतात. स्थानकाबाहेरील प्रीपेड रिक्षाच्या कार्यालयात प्रवासी गेल्यानंतर प्रवाशाने आपले नाव, मोबाइल नंबर आणि जाण्याचे ठिकाण सांगायचे आहे. त्यानंतर प्रवाशाला दोन पावत्या मिळतील.

एक पावती प्रवाशाने त्याच्याकडे ठेवायची असून, इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर दुसऱ्या पावतीवर सही करून ती पावती रिक्षाचालकाकडे

परत करायची आहे. त्यामुळे रिक्षाचालकाने प्रवाशाला सुरक्षितपणे सोडले की नाही, हे कळू शकणार आहे. दरम्यान, नवीन दरपत्रक बुथजवळ लावण्यात येणार आहे. रिक्षाचालकांचे प्रश्न सुटल्याने प्रवाशांना चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रीपेड रिक्षा बूथचे संचालक गिरीश मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत खत येवल्यात जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील देवरगाव शिवारात सावरगाव-पाटोदा रोडलगत ५५ हजार २०० रुपये किमतीचे दुय्यम मिश्र खत ट्रकमधून अनधिकृतपणे विक्री करताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केले. खरीप हंगामाच्या तोंडावरच परराज्यातून आलेला हा खतांचा साठा पथकाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

ट्रकमधून दुय्यम मिश्र खताच्या ६९ गोण्या (३.४५ मेट्रिक टन) शेतकऱ्यांना विक्री करताना जयकिसान अॅग्रोटेकचे मालक संदीप रमेश पाटील व गौरिलाल एकनाथ पाटील (शिरपूर, जि. धुळे) यांना रंगेहाथ पकडले. सदरचे खत त्यांनी गुजरात राज्यातील जी. बी. अॅग्रो इंडस्ट्रिजमधून आणले आहे. सदर खत खरेदी व विक्रीचे कायदेशीर बिले त्यांच्याकडे नसल्याने भरारी पथकाने ते जप्त केले. ही कारवाई जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी. आर. बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी अधिकारी जमधडे, ए. एन. साठे, पी. एन. वास्ते यांनी केली आहे.

रासायनिक खतांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खते, बियाण्याची खरेदी करावी व सोबत खरेदी पावती घ्यावी, असे आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी येवला यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा स्वच्छतेत हवे सातत्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने नुकतेच राबविलेले 'गोदावरी स्वच्छता' अभियान हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामध्ये सातत्य ठेवा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. हे अभियान केवळ दिखाव्यापुरते न राहाता ती एक चळवळ बनावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शहरात राबविण्यात आलेल्या अभियानामुळे गोदातटाचे रूप पालटले, अशा शब्दांत पालकमंत्र्यानी प्रशासनाच्या या उपक्रमाचा गौरव केला. साधू-महंत, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, शासकीय यंत्रणा आणि जनतेचे असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तब्बल १९ हजार लोकांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एक आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे शहर स्वच्छ-सुंदर-हरित करण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, हे अभियान सातत्याने राबवून स्वच्छताप्रेमी नाशिकचे दर्शन जगाला घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. गोदावरी, नासर्डी, वाघाडी, कपिला नदीपात्राबरोबरच पंचशीलनगर, महामार्ग बसस्थानक, जुने सीबीएस, सरस्वतीनाला, काजीपुरा चौक, आकाश भाजी मार्केट, संतकबीरनगर, घारपुरे घाट, सिद्धेश्वर पूल या ठिकाणीही स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता केल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथील घाटांची तसेच रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. रेल्वेचे एक पथक लवकरच दिल्लीहून नाशिकमध्ये येणार असून ते देवळाली, भगूर व इतर स्टेशनांची पाहणी करणार आहेत. सिंहस्थात जादा गाड्या सोडाव्या, गाड्यांना अधिकच्या बोग्या लावाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शाही मार्गाचे सुशोभिकरणाचे काम करण्यात यावे, कुंभमेळ्यातील व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी, स्वयंसेवक, टूर्स अॅण्ड ट्रॅायव्हल्स यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठकींचे आयोजन करण्यात यावे. त्र्यंबकेश्वर येथील घाटाजवळील सपाटीकरण आणि पिचिंगचे काम लवकर पूर्ण करावे. धरणामधून पाणी सोडण्याचे प्रमाण आणि त्यावेळची नवनिर्मित घाटावरची पाणीपातळी याचा आभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

आठवडाभरात गुन्हेगारीला आळा

शहरात गुन्हेगारी वाढल्याचे दिसत असले तरी आठवडाभरात ती कमी झाल्याचे पहावयास मिळेल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांसह अनेक नवीन अधिकारी बदलून आले आहेत. कामाचा प्रभाव दाखविण्यास त्यांना वेळ द्यावा लागेल. गुन्हेगारी रोखण्याबाबतच्या सूचना पोलिसांना केल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी विद्यार्थी’चे

$
0
0

फी वाढीविरोधात आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर येथील इच्छामणी विद्यामंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने डोनेशन शुल्कात दुप्पट वाढ केल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन केले. मुख्याध्यापिका सीमा शिर्के व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे, केविन संचेती, भूषण गायकवाड, दर्शन जोहरी, मनीष पवार, विशाल एलिंजे आदी उपस्थित होते. शाळेत उपनगर परिसरातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. पूर्वसूचना न देता बालवाडीसह सर्व वर्गांसाठी डोनेशन शुल्क २१०० रुपयांवरून ५६०० रुपये इतके भरमसाठ वाढविण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क १० रुपयावरुन १०० रुपये करण्यात आले. वार्षिक शुल्क १३०० वरून २६०० करण्यात आले. शाळेत सुविधांची वानवा असताना शुल्कवाढीचा हट्टहास चुकीचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शोषण होत आहे. शुल्कवाढ त्वरित रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

अदिवासींचा आज मोर्चा

जुने नाशिक : आदिवासी विकास भवनातील जात वैधता तपासणी समितीचे सह आयुक्त इ. जी. भालेराव यांच्याकडून हिंदू महादेव कोळी समाजाने सर्व पुरावे सादर करूनही जात वैधता प्रमाणपत्र नाकारले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर निलंबनाची मागणी करण्यासाठी बुधवारी (दि. १०) मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू महादेव कोळी संघटनेने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मिशन अॅडमिशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीपाठोपाठ दहावीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांनाच आता कॉलेजांमध्ये अॅड‌मििशन घेण्याचे वेध लागले आहेत. सीनिअर कॉलेजांमध्ये तर अॅडमिशनची लगबग सुरू झाली आहे. मात्र, १५ जूननंतर मार्कशिटस हाती मिळाल्यानंतर ज्युनिअर कॉलेजमध्येही अॅडमिशन घेण्यासाठी गर्दी वाढणार आहे.

प्रथम वर्षाच्या प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांचे टॉप रँकींगमधील कॉलेजमध्ये वेटींग आहे. परिणामी, एकापेक्षा अधिक कॉलेजमध्ये अर्ज करण्याचा पर्याय विद्यार्थी अन् पालकांकडून निवडला आहे. अॅडमिशन मिशन पार पाडण्यासाठी विद्यार्थी कॅम्पसमध्येच तळ ठोकून आहेत. शहराच्या विविध उपगरांमधून येणारे विद्यार्थी अन् पालक मध्यवर्ती कॉलेजेसच्या कॅम्पसमधील रांगांमध्येच दिवस घालवित आहेत. अकरावीच्या अॅडमिशनला १६ जूनपासून सुरुवात होणार असल्याने दरम्यानच्या काळात ज्युनिअर कॉलेजही या प्रवेशांच्या व्यवस्थापनावर सद्यस्थितीत जोर दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासातील सातत्य हेच माझ्या यशाचं गमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभ्यासात सातत्य असलं की यश मिळतंच. याचं उदाहरण म्हणजे साक्षी ततार ही विद्यार्थिनी. सीडीओ मेरी शाळेत साक्षी ९५.८० टक्के गुणांनी दुसरी आली आहे. विषय समजून घेणे, अभ्यासातील सातत्य या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात सायन्स आणि मॅथ्स हे तिचे आवडते विषय होते. मॅथ्समध्ये १०० पैकी १०० तर सायन्समध्ये १०० पैकी ९३ गुण तिने मिळविले आहे. दिवसातून पाच ते सहा तास नियमित अभ्यास केल्याने हे यश मिळाले असल्याचे साक्षी सांगते. अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाचीही तिला आवड आहे. 'आयएएस' होण्याचं तिचं स्वप्न आहे. आपली गुणवत्ता देशाच्या कामासाठी उपयुक्त ठरावी, या उद्देशाने तिने हे ध्येय अंगी बाळगले आहे. त्यासाठी बारावीनंतर लगेचच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ती सुरू करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images