Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जात पडताळणीवर मार्ग काढणार

$
0
0

धनंजय मुंडे यांचे राजपूत समाजाच्या उपोषणकर्त्यांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राजपूत समाजाच्या जात पडताळणी संदर्भात येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवरील मार्ग काढण्यासाठी राजपूत समाजातील राज्यभरातील नेते व मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. या आश्वासनानंतर देखील क्रांती दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे.

येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बागलाण तालुका अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतीदलाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी मुंडे यांनी भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. राजपूत समाज हा वि.जे.अ.(एन.टी) या प्रवर्गात मोडतो. पंरतु, त्यासाठी राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र या प्रवर्गतील आरक्षणसाठी गरजेचे ठरते. शासनस्तरावर राजपूत भामटा जात व वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी शासनाने १९६१ च्या आधाचे गुन्हेगारी पुरावे व अशा अनेक जाचक अटी लावल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य समाजबांधवाचे नुकसान होत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याने क्रांती दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. रविवारी उपोषणस्थळी विरोधीपक्षनेते मुंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समाज कल्याण विभागाचे पडताळणी समितीचे अधिकारी जाधव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.राजपूत समाजाच्या प्रश्नाबाबत संपूर्ण राज्यातील समाजातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले. याप्रंसगी माजी आमदार संजय चव्हाण, प्रांतधिकारी संजय बागडे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, पंचायत समिती उपसभापती वंसत भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय पवार, कृबाचे संचालक संजय वाघ, क्रांतीदलाचे अध्यक्ष संतोष पवार आदी उपस्स्थित होते.

उपोषणास राज्य कार्याध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, प्रभाकर पवार, राजेंद्र जगताप, लखन पवार, भाऊसिंग पवार, गोकूळ पवार, तात्याभाऊ सोंळूखे, नथुसिंग ठोके, संग्रामसिंग सोळंखे, महेंद्र गिरासे, दगा मोरकर यांच्यासह कार्यकर्ते बसले असून मुंडे यांच्या भेटीनंतरही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शाळा प्रवेशोत्सवा’ने प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ चैतन्य आणि उत्साहाने झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळेल, या विश्वासाने या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' हा उपक्रम राबविला जाणार आहे. शहरातही या उपक्रमाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून विविध शाळा विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस स्पेशल बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राज्यातील बऱ्याच शाळा १५ जूनपासून तर उर्वरित काही शाळा येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत केले जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचं ओझं न वाटता आनंदाने विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा व हसतखेळत शालेय शिक्षण पूर्ण करावे, यासाठी 'शाळा प्रवेशोत्सवाची' संकल्पना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे. शाळेविषयी कोणतीही बीती न बाळगता शाळेशी त्यांचे आपुलकीचे नाते तयार होण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेसाठी विविध उपक्रम राबविणे. शाळेत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, शाळा परिसरात पदयात्रा काढणे, शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित करणे अशा उपक्रमांचा समावेश असणार आहे. याचबरोबर शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरी काढणे, विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करणे, मोफत पुस्तक वितरण करणे आदी उपक्रमांचा समावेश या संकल्पनेत केला गेला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी माध्यान्न भोजनातही गोड पदार्थांचा समावेश विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिला दिवसाची आठवण संस्मरणात रहावी यासाठी आम्ही प्री-प्रायमरीच्या मुलांचे व त्यांच्या पालकांसमवेत फोटो काढून देणार आहोत. शाळेसाठी विद्यार्थी महत्त्वाचा आहे, याची जाणीव त्यांना देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. - सचिन जोशी, संचालक, इस्पॅलियर स्कूल

विद्यार्थ्यांची पटनोंदणी अनिवार्य

वय वर्षे ६ ते १४ मधील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यासाठी प्रत्येक पाल्याचे नाव पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. पटावर नोंदविलेले विद्यार्थी नियमित शाळेत यावेत यासाठी राज्यभर विविध पातळ्यांवर नवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम राबविला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेचा गुंडगिरीविरोधात संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर परिसरात गुंडगिरी तसेच असामाजिक तत्वांचा उपद्रव वाढत चालला आहे. त्याविरोधात जनजागृती करण्यासाठी झुलेलाल मंदिरात बैठक झाली. गुंडगिरीला हद्दपार करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.

माजी नगरसेवक विजय ओहोळ, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला शरद शिंपी, केशव दरियानी, प्रभाकर नागरे, रवींद्र पाटील, ललित ओहोळ आदींसह व्यापारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

उपनगरला काही दिवसांपूर्वी सात आठ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. भरचौकात मद्यपान, हाणामारीचे तसेच महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गुंडगिरीची बिमोड करण्याची मागणी नागरिकांनी केली. उपनगर येथे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी विजय ओहोळ यांनी केली. पोलिस निरीक्षक भगत म्हणाले, की गुंडगिरीविरोधात नागरिकांनी एकजुट करावी. पोलिसांना कळवल्यास तातडीने कारवाई केली जाईल. तक्रार करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंनिसची अंतराळ साक्षरता

$
0
0

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना देणार फिरते प्लॅनेटोरियम

जितेंद्र तरटे, नाशिक

राज्याच्या तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाची गोडी रुजावी यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने आता लवकरच माबाइल थ्रीडी डिजीटल प्लॅनेटोरियम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. जुलै महिन्यात या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून खगोलविज्ञानाच्या संकल्पना पोहचवू, असा विश्वास 'अंनिस'चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी 'मटा'शी बोलतांना व्यक्त केला.

अडीच दशकांपासून पुरोगामी विचारधारेच्या प्रचारासाठी 'अंनिस' प्रयत्नशील आहे. आता रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संघटनेच्या कार्यकक्षा आणखी विस्तारण्याच्या निर्णयाचे फलित नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीतून पदरात पडले आहे.

नव्या धोरणातून काही महत्त्वपूर्ण निर्णय 'अंनिस'च्या वतीने घेण्यात आले. यातूनच थ्रीडी प्लॅनेटोरियम बाबतचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेतील शैक्षणिक साधनांच्या अभावाने निर्माण होणारी दरी यासारख्या उपक्रमांमुळे कमी होऊ शकेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या रुपाने नवी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्याच वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी 'अंनिस' राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचाही निर्णय राज्यस्तरीय कार्यकारीणीच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी स्वयं अध्ययनाची प्रश्नावली राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने चर्चात्मक, संदर्भशोध, संवाद आदी माध्यमातून या प्रश्नावलीची उत्तरे शोधावित अन् वैज्ञानिक व विवेकवादी संकल्पना आपल्या आपणच पक्क्या कराव्यात असाही अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संघटनेच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

प्रबोधनावर भर

विद्यार्थ्यांशिवाय सरकारशी निगडीत घटकांपर्यंत 'अंनिस'चा प्रबोधन उपक्रम पोहचणार आहे. जादूटोणा विरोधी कायद्याबाबत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन अन् जातपंचायत मुठमाती अभियानाचे बळकटीकरण असे या उपक्रमांचे स्वरूप असणार आहे. ऑगस्टमध्ये 'अंनिस' रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा आज ऑनलाइन निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.८) जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १५ जूनपासून गुणपत्रकांचे वितरण करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. याशिवाय निकाल माहित करून घेण्यासाठी मोबाईलव्दारे एसएमएस सुविधेचा पर्यायी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतीक्षा होती. निकालाच्या अफवाही यापूर्वी पसरल्याने तारखेबाबत विद्यार्थी अन् पालकांमध्ये संभ्रमम होता. मात्र, शनिवारी मंडळाच्या वतीने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला.

दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी विद्यार्थी २९ जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी राज्याभरातून सुमारे १८ लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. 'एसएमएस'च्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होणार आहे. बीएसएनएल मोबाईल धारकांनी ५७७६६ या क्रमांकावर MHSSC < (स्पेस) परीक्षा क्रमांक > अशा पध्दतीने एसएमएस पाठवावा. तर रिलायन्स, एअरसेल, वोडाफोन, आयडिया, युनिनॉर या कंपन्यांच्या मोबाईलवरून MH10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५८८८१११ या क्रमांकावर पाठवावा. एअरटेल कार्डधारकांनी निकाल बघण्यासाठी MH10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५२७०११ या क्रमांकावर पाठवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई रिटायर होतेय’ने अंतर्मुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आई म्हणजे घराचा आत्मा असतो. जोपर्यंत ती कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी घेत आहे, तोपर्यंत सर्व काही सुरळित चालते. मात्र घरातील मुलं, सुना जेव्हा केवळ आपल्या स्वार्थाचा विचार करून वेगवेगळ्या कारणांनी आईशीच खोटे वागू-बोलू लागतात. तेव्हा आईच्या मनःस्थितीवर परिणाम होऊन ती कुटुंबाला शिक्षा म्हणून आईने आपल्या जबाबदाऱ्यांपासून रिटायर होण्याचा निर्णय घेतला तर घराची काय अवस्था होऊ शकते, याचं उत्तम चित्रण म्हणजे 'आई रिटायर होतेय' हे नाटक. महाराष्ट्र टाइम्स प्रस्तुत या नाटकाने सामाजिक व कौटुंबिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकला.

महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त या नाटकाचे विशेष आयोजन कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले होते. 'कलाकार' संस्थेच्या वतीने या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात एकत्र कुटुंबपद्धतीच चित्रण करण्यात आलं. आई, वडील, दोन भाऊ व दोन सुना. आईची भूमिका वीणा फडके या अभिनेत्रीने उत्तम वठवली. या कुटुंबात तीनही मुलांची लग्न झालेली आहेत. दोन्ही मुले आईजवळच एकत्र कुटुंबात राहत आहेत तर, धाकटी मुलगी बेबीने पळून जाऊन लग्न केले आहे. मुलं नोकरी आणि बिझनेसमध्ये स्थिर झाल्यावर त्यांच्या बायकांना विभक्त राहण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे एक भाऊ उच्चभ्रू इमारतीत फ्लॅट बुक करतो. तर, दुसरा बायकोच्या आग्रहाखातर आईने कष्टाने बांधलेल्या आश्रमाचीच जागा विकत घेऊन तिथे बंगला बांधण्याची तयारी करीत असतो.

जेव्हा या दोन्ही गोष्टी त्यांच्या आई (वीणा फडके)ला समजतात. तेव्हा ती मानसिकरित्या खचते. 'तुम्ही इतक्याशा गोष्टीचा त्रागा करत आहात', असे सुनावून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना रिटायर होण्याचा सल्ला दिला जातो. ती आईदेखील रिटायर होण्याचा

निश्चय करते. त्यानंतर त्या कुटुंबामध्ये काय बदल होतात, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव कशी होते, याचे उत्तम चित्रण या नाटकात करण्यात आले आहे.

रवी सांभारे यांचे दिग्दर्शन व अशोक पाटोळे यांच्या लेखनानी समृद्ध झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. उपेंद्र दाते, वीणा फडके यांच्यासह मंगेश दिवाणजी, रेणुका भिडे, मनोज डाळिंबकर, सुशील भोसले, रूपाली पाथरे, रुचा यांच्या भूमिका या नाटकात होत्या.

या नाटकाने खरोखरीच आईविषयी विचार करण्यास भाग पाडले. प्रत्येक स्त्रीने या नाटकातील आईच्या पात्राप्रमाणे विचार करायलाच हवा. - रसिका भानोसे

आईविषयी विचार करण्याची दिशा या नाटकामुळे मिळाली. आईची बाजू जाणून घेणे कसे महत्त्वाचे आहे, याचे छान चित्र या नाटकामुळे समोर उभे राहिले. 'मटा'मुळे ही उत्तम नाट्यकृती बघण्याची संधी मिळाली. - प्रथमेश गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्या कुलकर्णीची समिटसाठी भरारी

$
0
0

इंटरनॅशनल स्टुडंट एनर्जी समिटसाठी निवड

फणिंद्र मंडलिक

इंडोनिशिया बाली येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्टुडंट एनर्जी समिटमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकच्या आर्या मुकूंद कुलकर्णी हिची निवड झाली असून, ९ ते १३ जून या कालावधीत होणाऱ्या समिटमध्ये ती सहभागी होणार आहे. या समिटमध्ये संपूर्ण भारतातून फक्त दोन मुलींची निवड झाली आहे.

नैसर्गिक ऊर्जा स्त्रोताचा जास्तीत जास्त वापर व्हावा व त्यात जगभरातून संशोधन व्हावे यासाठी इंडोनिशिया सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एक समिट आयोजित करण्यात येत असते. ही समिट इंडोनिशिया सरकारच्या पेट्रोलियम विभागाकडून आयोजित करण्यात येते. या समिटचे यंदाचे सहावे वर्ष आहे. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांकडून शोध निबंध सादर केले जातात. यावर्षी जगभरातून ९०० च्यावर शोधनिबंध सादर झाले होते. ते शोधनिबंध अभ्यासून दोनशे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आर्या कुलकर्णी हिने हायड्रो इलेक्ट्रीक एनर्जी, सोलर एनर्जी व न्युक्लिअर पॉवर प्लॅँट याविषयी संशोधन करून शोधनिबंध सादर केला होता. आयोजकांनी आर्याने सादर केलेल्या शोधनिबंधाची दखल घेत या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ८९५ डॉलर्सची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याच प्रमाणे बाली येथे होणाऱ्या समिटसाठी तिला तेथील सरकारकडून आमंत्रित करण्यात आले आहे. या समिटमध्ये भारतातून अवघ्या दोन मुलींची निवड झाली आहे. त्यातील एक तामीळनाडूची असून, दुसरी आर्या कुलकर्णी नाशिकची आहे. इंडोनिशिया सरकारच्यावतीने आयोजित या समिटमध्ये एनर्जी विषयावर तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येते. या आधीही जकार्ता येथे आयोजित सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाडमध्ये तिने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी तिला सिल्वर मेडलने गौरविण्यात आले. आतापर्यंत आर्याने इंटरनॅशनल सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाड २०१४ जकार्ता, इंटरनॅशनल सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाड २०१४ जॉर्जिया, काठमांडू सिम्पोसिया ऑन अॅडव्हान्स मटेरियल, नेपाळ या ठिकाणी आपले शोधनिबंध सादर करून मेडल्स मिळवली आहेत. त्याचप्रमाणे नागपूर, पुणे, मुंबई पुणे येथे झालेल्या विविध प्रकारच्या सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतला आहे. आर्याचे शालेय शिक्षण रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियममध्ये झाले असून, ती सध्या जोगेश्वरी येथील एच. के. कॉलेज ऑफ फार्मसी येथे बी.फार्मच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माईवाड्याचा प्रश्न अधांतरीच!

$
0
0

अनिल पवार, नाशिक

तोंडावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी १५ जूनपर्यंत मुदतवाढ करून दिली आहे. मात्र, मुदतवाढ देऊनही प्रशासनाला कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर येथे काही आखाड्यांनाच सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप साधू, महंतांकडून होत आहे. सिंहस्थासाठी संन्याशी माता, साध्वी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनातर्फे त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

पूर्वी दशनामी महिला संन्यासी मातांचा आखाडा संयुक्तपणे होता. यामुळे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज भासत नव्हती. मात्र, काही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी साध्वींसाठी वेगळी व्यवस्था म्हणजे माईवाडा उभारण्यात आला. अलाहाबाद, हरिव्दार येथे स्वतंत्र माईवाडा बांधण्यात आले आहेत. यामुळे संन्यासी मातांची व्यवस्था झाली. मात्र, त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थासाठी येणाऱ्या या संन्यासी मातांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

संन्यासी माता या फक्त पंच दशनाम जुना आखाड्याच्याच असतात. यामुळे तेथेच त्यांची व्यवस्था केली जाते. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे जुन्या आखाड्यावर यावेळी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. जुना आखाडा माईवाड्यासाठी जागा द्यायला तयार आहे. याबाबत आखाड्यातर्फे शासनाला व आखाडा परिषदेला प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सुमारे पंधराशे ते दोन हजार संन्यासी माता सिंहस्थासाठी त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे गरजचे असल्याचे पंच दशनाम जुना आखाड्याचे हर‌िगिरी महाराज यांनी सांगितले. तसेच काही आखाड्यांनाच सुविधा पुरविल्या जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

देशभरातून येणाऱ्या साध्वी, संन्यासी मातांना येथील भाषा येत नाही. यामुळे त्यांची अधिक गैरसोय होणार आहे. माईवाड्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यांना जागाच मिळाली नाही तर ऐनवेळी सर्व साध्वी, संन्याशी माता जिल्हाधिकारी, नगरपालिका कार्यालयात ठाण मांडतील, असे हरीगिरी महाराज यांनी सांगितले.

साध्वी, संन्यासी मातांच्या माईवाडाबद्दल विचारले असता याबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. अल्पावधी शिल्लक असल्याने हे काम स्वतःच हाती घेतले आहे. - श्री महंत हरीगिरी महाराज, जुना आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाडावैभव कोंदणात जपण्याची नांदी

$
0
0

पालकमंत्र्यांच्या सूतोवाचानंतर धास्तावलेय 'वाडायुग'

प्रशांत भरवीरकर, नाशिक

वाडा संस्कृती हे नाशिकचे वैभव. आखीव रेखीव कोरलेले खांब, तुळया, आढे म्हणजे जणू एखादी अखंड कविताच. नाशिकला सोनवर्खी अशा वाड्यांचे वरदान लाभलेले आहे परंतु, कधी काळी अवघ्या शहरावर राज्य केलेले हे वाडे आता डागडूजीअभावी काळाच्या उदरात गडप होऊ पाहत आहे. गडप होतानाही मात्र ते आम्हाला नष्ट करू नका, आम्हाला कोंदणात जपून ठेवा, अशी सादच जणू घालत आहेत. प्रशासनानेही सरकारवाडा जसाच्या तसा जपण्याच्या प्रयत्नातून वाड्यांना हात देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे. तरीही पालकमंत्र्यांनी वाडे सक्तीने काढून टाकण्याबाबत केलेले सूतोवाच वाडायुगावर गंडांतर येत असल्याची सूचना करणारेच असल्याने नाशिकच्या सौंदर्य व इतिहासप्रेमींमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

राज्यात अशी अनेक शहरे आहेत ज्यांनी आपली जुनी संस्कृती जपत नव्या इमारती उभ्या केल्या. यामुळे जुन्या व नव्या वास्तुवैभवाचा ताळमेळ साधला गेला. ही संस्कृती नाशिकमध्येही आता रूजू पहातेय. जुने वाडे काढून टाकण्यासाठी अनेकांनी धोशा लावला असून, तो योग्य नसल्याचे जाणकारांचे मत आहे. काही काळापुरते सौंदर्य टिकवण्यासाठी किंवा शहराचे सौंदर्य दिसण्यासाठी वाडा संस्कृतीला गालबोट लागता कामा नये, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ व सौंदर्यप्रेमी करीत आहेत. नुकत्याच घेतलेल्या एका प्रशासकीय बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशकातील काही ढासळलेले वाडे सक्तीने काढावे लागतील, असे वक्तव्य केल्याने जुने नाशिक तसेच सराफ बाजार परिसरातील वाड्यांवर गंडांतर येते की काय अशी चिन्हे आहेत. मात्र, याच परिसरात असलेल्या व पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील अत्यंत जुन्या अशा सरकारवाड्याची पुनर्रचना करण्याचे काम अत्यंत जोरात सुरू आहे. त्यासाठी याठिकाणी रात्रंदिवस अनेक मजूर राबत असून, सरकारवाड्याचा दर्शनी तसेच आतील भाग जसाच्या तसा ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. त्यासाठी राजस्थानसारख्या बाहेरच्या राज्यातून दगड मागविण्यात आले असून, त्यांचा खडबडीत स्पर्श पायांसाठी जुनेपणाची संवेदना देणारा ठरत आहे. सरकारवाड्याच्या पुनर्रचेनासाठी काही कोटी रुपये केंद्राकडून मंजूर झालेले असल्याने अशाच प्रकारे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मोजक्या वाड्यांच्या पुनर्रचनेबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शहरातील काही वाडे अतिशय प्रेक्षणीय असून, त्यांच्या आतील भागात विविध प्रकारचा इतिहास जिवंत करणारे चित्र साकारण्यात आलेली आहेत. त्यामुळे वाडा आकर्षणाचे केंद्र बनत असताना हे वाडे काढून टाकण्यापेक्षा त्याची जशीच्या तशी पुनर्रचना केली तर पर्यटनासही त्याचा लाभ होऊन प्रशासनाच्या खजिन्यात भरच पडणार आहे.

नाशकातील काही वाडे नादुरुस्त झाले आहेत, अगदी पडायलाही आले आहेत. त्यांच्या बाबतीत ठोस भूमिका घेतल्यास हरकत नाही परंतु, जे हेरिटेज आहे त्याचे मात्र जतन झालेच पाहिजे. आपल्याकडे सरकारवाडाचे उदाहरण आहेच, त्याच्यासारख्या वाड्यांचे जतन होणे आवश्यकच आहे, यात शंका नाही. - गिरिश टकले, इतिहासतज्ज्ञ

वाडा संस्कृती हे नाशिकचं वैभव आहे. परंतु, आज या जुन्या वास्तू तथा वाडे पाडून आज त्याजागी ज्या नवीन इमारती उभ्या राहत आहेत. त्यात केवळ स्टील, सिंमेट व खडी यांचाच वापर होत आहे. यात वाडा संस्कृतीचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. तसे झाल्यास नाशकात कधी काळी वाडे 'होते' असे पुढील पिढीला सांगावे लागेल. - आनंद ढाकिफळे, शहर सौंदर्यशास्त्र अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महंतांच्या सुरक्षा दर्जाची प्रतीक्षा

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

कुंभमेळ्यासाठी शहरात दाखल होणाऱ्या महत्वाच्या महंतांना कोणती सुरक्षा कॅटेगरी असेल, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना मिळालेली नाही. विशेष सुरक्षा विभाग देखील याबाबत अनभिज्ञ असून, ऐनवेळेस या बंदोबस्तासाठी मोठा कर्मचारी वर्ग तैनात कसा करायचा असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

कुंभमेळ्यासाठी यंदा तीन लाखांपेक्षा अधिक साधू-मंहत हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसा आकडाच प्रशासनाने प्रत्यक्ष संशोधनानंतर नि​श्चित केला असून, मागील दोन कुंभमेळ्याच्या विचार करता साधू-मंहताच्या संख्येत तब्बल २ लाख ६० हजाराने वाढ झाल्याचे स्पष्ट होते. यात अनेक महत्वाच्या महंतांचा समावेश आहे. त्यातील काही महंतांना झेड, वाय किंवा एक्स अशा स्वरूपाची सुरक्षा पुरविली जाते. पर्वणीच्या काळातच राज्याचे मंत्रिमंडळ आणि केंद्रीय नेते नाशिकमध्ये अवतरणार आहे. यासर्व व्हीआयपींच्या बंदोबस्तसाठी किती मनुष्यबळ खर्ची पडेल, याचाच अंदाज पोलिसांना अद्यापपर्यंत लागलेला नाही. नाशिक विभागाच्या विशेष सुरक्षा विभागाकडे फारतर ४० ते ५० कर्मचारी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झेड किंवा वाय कॅटीगरीतील सुरक्षा पुरवावी लागली तर तारंबळ उडू शकते. साधारणतः ज्या व्यक्तिला अशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, तेथील विशेष सुरक्षा विभागाने राज्याच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधून सुरक्षा कॅटेगरीची माहिती देणे अपेक्षित आहे. ही माहिती मिळाल्यानतंर स्थानिक पोलिस सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. मात्र, आजवर अशी एकही माहिती मुंबई कार्यालयाकडून नाशिक पोलिसांना मिळालेली नाही.

दोन लाख ४० हजार साधू-महंतांची भर

कुंभमेळ्यात येणारे साधू, महंत हे कोणत्या ना कोणत्या अखाड्याच्या झेंड्याखाली दाखल होत असतात. तसेच, त्यांच्या आखाड्यांच्या रुढीनुसार शाहीस्नानात सहभागी होतात. त्यांच्या परंपरांबाबत प्रचंड आग्रही, अधिकारांबाबत सदैव दक्ष असणाऱ्या या आखाड्यांतील प्रमुखांना महंत संबोधले जाते. नाशिक-त्र्यंबकच्या कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या आखाड्यांची संख्या १३ असून, त्यातील तीन वैष्णव आखाडे नाशिकला तर १० शैव आखाडे त्र्यंबकला राहतात. सिंहस्थाचे चित्र १९९२-९३ पासून बदलत आहे. १९९२ तील कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीसाठी ४० हजार साधू-महंत हजर होते. दुसऱ्या पर्वणीला साधूंची संख्या वाढून ६० हजारापर्यंत पोहचली तर तिसऱ्या पर्वणीला तेच प्रमाण ५० हजार इतके होते. सन २००३ मध्ये पहिल्या पर्वणीसाठी १ लाख ३३ हजार साधू-महंत शाहीस्नानासाठी आले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीसाठी अनुक्रमे १ लाख ५० हजार आणि १ लाख २० हजार साधू हजर होते. यंदा ही संख्या तीन लाख १६ हजाराच्या आसपास पोहचणार आहे. साधू-महंतांच्या संख्येत भर पडल्यानेच जवळपास ३५० हेक्टर जमिनीवर साधुग्राम उभारले जात असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडच रामभरोसे!

$
0
0

गोदाघाटावर वास्तव्य करणाऱ्यांची मोजदादच नाही

प्रवीण बिडवे, नाशिक

तपस्वी साधू-महंतांना कुंभमेळ्यात शाहीस्नान घडविणाऱ्या रामकुंडावर सिंहस्थापूर्वीच संधीसाधूंचा मेळा भरू लागला आहे. तिर्थाटनाच्या निमित्ताने येणारे भटके येथेच वास्तव्यास थांबत असून, त्यांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे त्यांची मोजदाद करणारी यंत्रणाच निपचित पडल्याने शहराची सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका आणि पोलिस एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानत असून, रामकुंड आणि गोदाघाट रामभरोसेच असल्याचे वास्तव आहे.

रामकुंड आणि गंगाघाटाभोवती कुंभमेळ्यापूर्वीच संधीसाधूंचा मेळा भरू लागल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात आल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या कुंभातील पर्वण्यांपूर्वीच अनेक भटक्यांनी गोदाघाटावर चक्क जागा पटकावण्यास सुरुवात केली आहे. अशा शेकडो भटक्यांना येथे दोनवेळचे अन्न आणि निवाराही सहजगत्या उपलब्ध होतो. म्हणूनच की काय दिवसागणिक येथे अशा भटक्यांची संख्या वाढतच आहे.

रामकुंड तसेच गोदाघाट परिसरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक अन् उत्तरकार्यासाठी येणाऱ्या नागरिकांपुढे हात पसरून पैसे मिळविण्याचा त्याचा दिनक्रम ठरला आहे.

या परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पाकीट, पर्स, बॅगा इतकेच नव्हे पर्यटकांचे कपडेही चोरीला जाऊ लागले आहेत. अशा चोरट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी येथील व्यावसायिक तसेच पुरोहितांकडून होत असली तरी पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गोदाघाटावरील अशा भटक्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा फायदा दहशतवाद्यांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी दहशतवाद्यांनी नाशिकची रेकी केली असून, सिंहस्थापूर्वी किंवा सिंहस्थात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एटीएस पथक आणि पोलिसांनी येथे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

भटक्यांकडून गोदाघाटावर अस्वच्छता

रामकुंड, गोदाघाट आणि गोदापात्र स्वच्छतेसाठी प्रशासन, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. दुसरीकडे गोदाघाटावर वास्तव्य करणारे भटकेच तेथे घाण करीत आहेत. रात्री दारू, गांजासारखी व्यसने करून तेथेच घाण करण्यात हे लोक पुढे असल्याची परिसरातील व्यावसायिकांची निरीक्षणे आहेत. अधाशापोटी जमा केलेले अन्नपदार्थही पूर्ण सेवन न करता उघड्यावरच फेकून अस्वच्छतेत भर टाकली जात आहे. त्यामुळे अशा भटक्यांना गोदाघाटावरून हटवायला हवे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमोफिलियावर होमिओपॅथीचा उतारा!

$
0
0

नाशिकच्या डॉक्टरसह पथकाचे यशस्वी संशोधन

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

जखम झाल्यानंतर रक्तस्त्रावाला अटकाव होत राहणाऱ्या हिमोफिलिया या आजारावर होमिओपॅथीचा गुणकारी उतारा सापडला आहे. नाशिकचे डॉ. तपास कुंदू यांच्यासह एका पथकाने यशस्वी संशोधन करून होमिओपॅथीच्या औषधांद्वारे हिमोफिलियाच्या रुग्णांना दिलासा दिला आहे. भारतात आणि परदेशातही आजवर एकूण ८५० रुग्णांवर डॉ. कुंदू यांच्या पथकाने मोफत उपचार केले आहेत.

हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. याच आजारावर नाशिकचे डॉ. तापस कुंदू यांच्यासह भारतातील विविध त्यांचे साथीदार डॉ. के घोष, डॉ. अपरोज शेख, डॉ. प्रियंका सिंग, डॉ. हिराल शाह, डॉ. ओमकार कुमट, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. रंजना कुलकर्णी, डॉ. अपर्णा नलावडे, डॉ. आफिया शेख यांच्या पथकाने हिमोओपॅथीच्या औषधांद्वारे हिमोफिलियाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. या उपचारांमुळे हिमोफिलियाचे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, त्यांचे जीवनमान वाढण्यातही मदत झाली आहे.

गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला आता यश आले असून, यासंदर्भातील त्यांचे रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. कुंदू यांच्या संशोधनाचा विशेष गौरव करण्यात आला. आणखी एक रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होणार असल्याचे डॉ. कुंदू यांनी सांगितले. हिमोफिलिया हा आजार अनुवंशिक असल्याने त्या रुग्णांसह आम्ही त्यांच्या आई-वडिलांवरही मोफत उपचार करीत आहोत.

होमिओपॅथीमुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्टस होत नाहीत. या उपचार पद्धतीतून अधिकाधिक हिमोफिलियाच्या रुग्णांना दिलासा देण्याचा आमचा मानस असल्याचे डॉ. कुंदू यांचे म्हणणे आहे. या संशोधनाची माहिती सरकारी पातळीवरही पोहचली असून, येत्या काळात सरकारकडूनही या उपचार पद्धतीचा अवलंब होण्याची खात्री डॉ. कुंदू यांना आहे.

हिमोलिफियाच्या रुग्णांवर आम्ही मोफत उपचार करतो. आमच्या संशोधन आणि उपचारा-संबंधीची विस्तृत माहिती http://homoeo pathyinhaemophilia.com/ या वेबसाईटवर मिळू शकते. - डॉ. तापस कुंदू, होमिओपॅथी संशोधक

हिमोफिलियाच्या रुग्णांना पूर्णपणे बरे करणारे उपचार आजही नाहीत. मात्र, होमिओपॅथी उपचार रुग्णांना दिलासा मिळत असेल तर हे चांगले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरच मान्यताप्राप्त ठरायला हवे. - डॉ. प्रीतेश जुनागडे, रक्तविकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर साधणार ‘स्मार्ट’ संवाद

$
0
0

मोबाइल अॅपवरून थेट तक्रारीची संधी; करभरणाही शक्य

विनोद पाटील,नाशिक

दैनंदिन तक्रारी आणि समस्या सोडविण्यासह विविध प्रकारचा कर भरणा, महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी थेट महापालिकेच्या कार्यालयामध्ये खेटा मारण्याची नागरिकांची तसदी आता कमी होणार आहे. पालिकेचा कारभार ऑनलाइन आणि पेपरलेस करण्यासाठी विशेष अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपवरून नागरिकांना आपल्या समस्या फोटोसह कळविता येणार असून, तातडीने प्रतिसादासाठी विशेष हेल्पलाइनही महापालिका राबविणार आहे. अॅपच्या माध्यमातून महापालिकेशी थेट संवाद साधता येईल अशा स्वरूपाचा अॅप डेव्हलप करणारी नाशिक महापालिका एकमेव ठरणार आहे.

महापालिकेची पायरी चढायची म्हणजे ती अनेक दिवस सतत चढत रहायची असा अनुभव सर्वसामान्यांचा असतो. अनेकदा तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याचाही अनुभव नागरिक वेळोवेळी घेतात. हा त्रास कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेचा कारभार अधिक स्मार्ट करण्याच्या दिशेन महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महापालिकेने स्मार्ट नाशिक नावाचा अॅप डेव्हलप केला असून, तो लवकरच नाशिककरांच्या सेवत दाखल होणार आहे. यामुळे नागरिकांना तक्रारींसाठी महापालिकेच्या दारात यायची गरज पडणार नाही तर महापालिकाच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांच्या दारात जाणार आहे. या अॅपवरून नागरिकांनी केलेली तक्रार थेट संबंधित विभागाकडे वर्ग होणार असून, त्यावर तातडीने फिडबॅक देण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. तक्रारी करताना संबंधित समस्येचा फोटोही अपलोड करता येणार आहे. त्याचबरोबर जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर, पाणीपट्टी आदी करभरणा व संबंधित कामे थेट अॅपवरूनच करण्याची सोय अॅपवर उपलब्ध करण्यात आल्याने घर बसल्या महापालिकेशी संवाद साधता येणार आहे. सध्या या अॅपचे टेस्ट‌ींग सुरू असून, पुढील महिन्यात त्याचे लॉन्चींग होणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचा कारभार अधिकाधिक ऑनलाइन करण्याचा प्रयत्न होत आहे. टेक्नोलॉजीचा उपयोग कामाचा दर्जा व वेग वाढविण्यात कसा होईल. याचा प्रयत्न स्मार्ट नाशिक या अॅपमधून करण्यात आला आहे. या अॅपमुळे नाशिककरांचा महापालिकेशी अधिकाधिक संवाद वाढेल. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने साधुग्रामला ‘धुतले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याभरात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी शहरात पावसाचे प्रमाण रविवारी कमीच होते. मात्र वादळाची तीव्रता मोठी असलल्याने त्यांचा फटका साधुग्राममधील कामांना बसला आहे. यात दोन नंबरच्या सबसेक्टरचे मोठे नुकसान झाले असून, अनेक पत्रे उडून गेले. तर काही कामे कोलमडून पडली. या वाताहतीमुळे साधुग्रामचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

साधुग्राममध्ये वास्तव्यास येणाऱ्या लाखो साधु-महंतांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम महापालिका प्रशासनातर्फे सुरू आहे. सुमारे ३५० हेक्टर जमिनीवर पत्र्यांचे शेडस उभारले जात आहेत. साधुग्रामच्या नियोजनाच्या दृष्टीने दोन मुख्य आणि त्याचे १० उपविभाग पाडण्यात आले आहेत. पहिल्या सेक्टरमध्ये ४ तर दुसऱ्या सेक्टरमध्ये सहा उपविभागांचा समावेश आहे. आजच्या पावसाने दुसऱ्या सेक्टरमधील दोन नंबरच्या उपविभागातील कामाचे नुकसान झाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. हे काम दोन ते तीन दिवसापूर्वी सुरू करण्यात आले होते. पावसासोबत वाऱ्याचे प्रमाण मोठे असल्याने या उपविभागातील काही पत्रे उडून गेलेत तर काही खाली कोसळले. यामुळे कामांच्या दर्जाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आढावा बैठक घेऊन हे काम १५ जूनपर्यंत संपवण्याचे आदेश दिले होते. याउलट ३० जून शिवाय साधुग्राममधील कामे पूर्ण होणारच नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. आजच्या नुकसानीमुळे जुलैच्या सुरूवातीपर्यंत साधुग्राममधील कामे पूर्ण होण्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शहरात दिवसभरात १४. ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या ४८ तासांत नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी पडतील अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

व‌ीज पडून चार जखमी

जिल्ह्यात कळवण आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. कळवणमधील कुमसाडी येथे व‌ीज अंगावर पडून मिनाबाई विष्णू वाघमारे, अनिल विष्णू वाघमारे आणि वसंत विष्णू वाघमारे हे एकाच कुटुंबातील तिघेजण तर त्र्यंबकेश्वर येथेही एक महिला जखमी झाली. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वीज अंगावर पडून दोन गायींचा तर शेणई येथे एका बैलाचा मृत्यू झाला. याखेरीज दोन गायी जखमी झाल्या आहेत. ढकांबे टोल नाक्यावर रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्ह्यातही हजेरी

मान्सुनपूर्व पावसाने रविवारी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सिन्नर, कळवण, बागलाण, नांदगाव, चांदवड, इगतपूरी या तालुक्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. मनमाडसह नांदगांव आणि चांदवड परिसरातही पावसाने हजेरी लावली असून उन्हाच्या काहिलीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा सहा तास थरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

गरुडेश्वर शिवारातील काननवाडी हद्दीतील घरात घुसलेल्या बिबट्याला नागरिक व वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले. एक ते दीड वर्ष वय असलेला हा बिबट्या सुमारे सहा तास घरात दबा धरून बसला होता. बिबट्या घरात असल्याची वार्ता पसरताच बघ्यांनी गर्दी केली होती. वन विभागाने बिबट्याला पकडल्यानंतर त्याचे फोटो टिपण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागली होती.

मुंढेगाव (ता. इगतपुरी) परिसरातील गरुडेश्वर हद्दीतील काननवाडी रस्त्यालगत विहिरीजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केला. अविनाश पोटकुले यांनी हा प्रकार बघितल्यानंतर त्‍यांनी काही युवकांना बोलावून बिबट्याला पिटाळून लावले. बिबट्याने शिवारातील पांडूरंग कुंदे यांच्या नव्याने बांधकाम केलेल्या व दरवाजा नसलेल्या घरात शिरकाव केला. सुदैवाने घरात कुणी नव्हते. ग्रामस्थांना ही बाब समजताच त्यांनीही बिबट्याचा माग घेतला. दरम्यान, तब्बल सहा तास बिबट्या घरात होता. अखेर वनविभागाच्या रेस्‍क्यू पथकाने या बिबट्यास बेशुद्ध करून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराबाहेर काढले. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बिबट्याचा 'गृहप्रवेश'!

चार वर्षांपूर्वी कवडदरा गावात भर दिवसा बिबट्या घरात शिरला होता. तसेच, आठ दिवसापूर्वी वाडीवऱ्हे शिवारातही घरात बिबट्या शिरला होता. आजही तोच प्रसंग ग्रामस्थांनी पाहिला. यापूर्वी अनेक बिबटे विहिरीतही पडल्याचे पाहण्यात आले. बेलगाव तऱ्हाळे व मुकणे शिवारात बिबटे महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

युवकांचे धाडस

घराला दरवाजा नसल्याने अविनाश पोटकुले, रवींद्र कुंदे, पांडूरंग कुंदे व नागरिकांनी धाडस करून दरवाजा नसलेल्या ठिकाणी बाभळी व बोराटीच्या काटेरी फाट्या लावून तसेच पलंग आडवा लावून बिबट्याला घरात कोंडले. त्यानंतर उपसरपंच दत्तू पोटकुले यांनी वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी घराच्या भिंतीच्या विटा काढून बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देण्याचा दोनदा प्रयत्न केला. अर्धा ते पाऊण तासांनंतर बिबट्या बेशुद्ध झाला. त्यास पिंजऱ्यात पकडून नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्तमानपत्रांमुळे मराठीचे मातेरे होतेय!

$
0
0

ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या पत्रकारितेत मराठी भाषेवर विविध प्रकारचे प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी भाषेचे हिंदीकरण, इंग्रजीकरण तसेच स्पॅनिशीकरण करण्याचे काम सुरू आहे. व्हॉटसअपमध्ये मनोरंजनात्मक भाषा चालू शकते; परंतु वर्तमानपत्रांमध्ये तशी भाषा येत असल्याने मराठी भाषेचे मातेरे होतेय, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. काकासाहेब आकूत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की संत नामदेव हे माझ्या दृष्टीने आद्य पत्रकार आहेत. संत ज्ञानदेवांचा संजीवन समाधीचा सोहळा त्यांनी साडेआठशे अभंगातून वर्णन केला आहे. हे अभंग वाचून आपल्यासमोर सर्व काही येते. पत्रकारितेचे उदाहरण देताना गोखले म्हणाले, की टिळकांनी ज्ञानप्रकाशसाठी स्वत:वर टीका करणारा अग्रलेख लिहिला. ती खरी पत्रकारिता होती.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण तज्ज्ञ व पत्रकार अभिजीत घोरपडे यांना सार्वजनिक वाचनालयातर्फे बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले, की बदलत्या पत्रकारितेत स्पेशलायझेशनचे युग येत आहे. एका विषयावर सतत लिहून आपली ओळख तयार निर्माण करणे गरजेचे झाले आहे. पूर्वी उत्तम माहिती मिळवणे हे पत्रकाराचे काम होते; परंतु आता व्हॉटसअपमुळे बातमी आधीच सामान्यांपर्यंत पोहोचलेली असते. बातमीमध्ये कॉमेन्ट येणे ही आजची गरज होऊन बसली आहे. यावेळी व्यासपीठावर 'सावाना'चे उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे, नरेश महाजन, सांस्कृतिक सचिव रमेश जुन्नरे, बापुसाहेब आकूत, जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते. नरेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले व अभिजीत घोरपडे यांचा परिचय करून दिला. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनोद्यानावरून वादंग?

$
0
0

शहरातील गार्डन सुधारण्याचा शिवसेनेकडून सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत बॉटनिकल गार्डनच्या प्रस्तावासह, महिला रुग्णालयाला १०० खाटांच्या रुग्णालयाला जागा देण्याच्या विषयावर वांदग होण्याची शक्यता आहे. आधी शहरातील गार्डनची स्थिती सुधारा मग बॉटनिकल गार्डनचा विषय घ्या, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होत असून यात बॉटनिकल गार्डनच्या हस्तातंराचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आाला आहे. वनविभागाची २५ हेक्टर जागा ही वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित झाली असून आता महामंडळ आणि महापालिकेदरम्यान जागा विकासासाठी करार केला जाणार आहे. त्याला महासभेची मंजूरी आवश्यक असल्याने हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या विषयावरून शिवसेना आक्रमक झाली असून शहरातील गार्डन्सची अवस्था खराब असतांना नव्या गार्डनचा अट्टहास का? असा सवाल शिवसेनेन केला आहे. शहरातील गार्डनांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने नव्या गार्डनचा भार कशासाठी सोसायला? असा सवाल करत शिवसेना मनसेच्या वनोद्यानाला खो देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्याप तळ्यात मळ्यात आहे.

महिला रुग्णालय वडाळ्याला का?

वडाळातील ३७०० चौरस मीटर जागा शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाला देण्याचा विषय चर्चेला येणार आहे. अंबड भागात हे रुग्णालय मंजूर असतांना वडाळामध्ये का जागा द्यायची? असा सवाल नगरसेवकांनी केला आहे. महापालिकेने जागा देण्याऐवजी संपूर्ण रुग्णालयच बांधावे, असा नगरसेवकांचा सूर आहे. ते रुग्णालय अंबडमध्ये व्हावे, असा नगरसेवकांचा आग्रह आहे. त्यामुळे या विषयावरही वांदग होणार आहे. सिडकोतील सहाव्या योजनेच्या हस्तांतराचा विषयही चर्चेला असून भूयारी गटार योजनेसाठी वाढीव निधी देण्याचा प्रस्तावही महासभेत ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्र थोडी; गुन्हे फार

$
0
0

शहरात रात्री ८ ते ११ या वेळेत खुनाच्या पाच घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रात्री ८ ते ११ या कालावधीत मागील काही दिवसात खूनाच्या पाच घटना घडल्या आहेत. यात पंचवटी विभागातील हनुमानवाडी परिसरात शनिवारी रात्री झालेल्या २७ वर्षीय रिक्षाचालकाच्या खूनाचाही समावेश आहे. या काळात रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जाते आहे.

पेठरोडवरील अश्वमेधनगर येथे राहणाऱ्या संदीप कुमावत या रिक्षाचालकाची त्यांच्याच मित्रांनी किरकोळ वादानंतर हत्या केली. विशेष म्हणजे खून झाला त्या ठिकाणापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. कुमावत आणि त्याचे काही मित्र दुपारच्या सुमारास जेवणासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर सायंकाळी पाऊणेसहा वाजण्याच्या सुमारास कुमावत पुन्हा मित्रांना भेटला. तेथे किरकोळ कारणावरून त्याचा इतरांशी वाद झाला. हा वाद मिटवयाचा म्हणून साडेआठ वाजता सर्वजण हनुमानवाडी येथे जमले. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी चाकुने कुमावतच्या पाठीवर तसेच पोटावर वार केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कुमावतला सिव्हील हॉ​स्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच कुमावतचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा सिव्हील हॉस्पिटलच्या सुरक्षेसाठी तैनात केला होता. दरम्यान, कुमावतच्या खूनात त्याच्याच काही मित्रांचा सहभाग असून ​मखमलाबादरोड येथील शिंदेनगर परिसरात राहणाऱ्या राजेश खंदारेसह अन्य पाच जणांविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी सांगितले. खूनाची घटना झाली तेव्हा संशयितांनी मद्यप्राशन केले होते. अगदी किरकोळ वादातून कुमावतचा खून झाला, असे तपास अधिकारी पोलिस इन्सपेक्टर प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरात सातत्याने खूनाच्या घटना घडत आहेत. यातील बहुतांश खूनाच्या घटना रात्री ८ ते रात्री ११ या दरम्यान झाल्या आहेत. मद्यप्राशन हा ही मुद्दा महत्त्वाचा असून पोलिसांनी या काळात विशेष लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे.

रात्री घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. कोम्बिंग दरम्यान सराईत गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. मात्र, या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. रात्री वेळेत दुकाने बंद व्हावी या दृष्टीने प्रयत्न करून मद्यपी वाहनचालकांची तपासणी मोहीम तीव्र केली जाईल. - अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त

रात्री घडलेल्या अन्य घटना

> ३१ मे - रात्री साडेनऊ वाजता साठे चौकात तिघा आरोपींनी शैलेश सासे या तरुणाची जमावासमोर हत्या

> २१ मे - रात्री साडेआठ वाजता ठक्कर बाजार येथे सिडको परिसरातील तरुणाकडून ४७ वर्षीय व्यक्तीचा खून

> १५ मे - रात्री पाऊणे नऊ वाजता कार्बन नाका येथील वडापावच्या गाड्याजवळ दोघांकडून २८ वर्षीय तरुणाचा खून

> ११ मे - रात्री ११ वाजता २० वर्षीय युवकाची पाथर्डी फाटा परिसरात तिघांनी​ मिळून हत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांज्याने २५ बगळ्यांचा बळी

$
0
0

गाडगे महाराज धर्मशाळेजवळील प्रकार; नेचर क्लबने केला अंत्यविधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील संत गाडगे महाराज धर्मशाळेजवळील पिंपळाच्या झाडावर बसलेले तब्बल पंचवीस बगळे नायलॉन मांज्यामध्ये अडकून मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडावरील लटकलेले पाच जिवंत बगळे वाचविण्यात नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेला यश आले.

संत गाडगे महाराज धर्मशाळा परिसरात गाय बगळे, वटवाघळे यांची कॉलनी आहे येथे शेकडो पक्ष्यांनी घरटी केली आहे. येथील पिंपळाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांज्या अडकल्यामुळे हे पक्षी त्या मांज्यात अडकून मरण पावले आहे. नेचर क्लबच्या पक्षीसंवर्धन मोहिमेत ही बाबसमोर आल्यावर सदस्यांनी ताबडतोब त्या झाडावरील पंचवीस लटकत असलेले बगळे झाडावर चढून तसेच काठीच्या सहाय्याने काढले तर पाच जिवंत पक्ष्यांची या मांज्यातून सुटका केली. नायलॉन मांज्यावर बंदी असताना छुप्या पद्धतीने झालेल्या विक्रीमुळे हा प्रकार घडला. संस्थेतर्फे या सर्व पक्ष्यांना श्रद्धांजली वाहून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. एक खड्डा खोदून त्यामध्ये कापड टाकून या पक्ष्यांना ठेवण्यात आले. फुले, अगरबत्ती वाहून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मनपातर्फे शहरात नायलॉन मांजा हटाव मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे मत पक्षीमित्र व्यक्त करीत आहेत. पावसाळ्यात अनेक पक्ष्यांच्या विणीचा काळ असल्याने अशा घटना परत घडण्याची शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाही. जखमी पक्ष्यांच्या औषधउपचारांसाठी वन विभागाने रेस्क्यू सेंटर उभारणे आवश्यक असून, त्यासाठी नेहरू उद्यानाचे खाजगीकरण न करता त्या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी निवारा केंद्र उभारणे आवश्यक आहे. पक्षी वाचविण्यासाठी संत गाडगे महाराज धर्मशाळेने मोठी मदत करून साहित्य उपलब्ध करून दिले. पक्षी वाचविण्यासाठी नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, कुणाल देशमुख, उमेश नागरे, रुपाली जोशी, सागर बनकर, गणेश जाधव, आशिष बनकर, अमोल उबाळे, प्रियंका काठे, दर्शन घुगे, आकाश जाधव, माणिकराव कोरडे, आदींनी तब्बल तीन तास मेहनत घेवून मोहीम पूर्ण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभागाचा `दिव्याखाली अंधार`

$
0
0

चंदनाच्या झाडांची होतेय कत्तल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालिका माता मंदिर परिसरातील चंदनाचे वृक्ष तोडल्यानंतर हिंमत वाढलेल्या चोरट्यांनी आता थेट वन विभागाच्या कार्यालय परिसरातील चंदनाच्या वृक्षावर हात साफ केला. शहरातील एकापाठोपाठ एक चंदनाचे वृक्ष चोरीला जात असतानाच चोरट्यांनी आता पोलिसांसह वनविभागासमोरही आव्हान निर्माण केले आहे.

जुना मुंबई-आग्रा हायवेरील वन विभागाच्या जागेत अनेक प्रकाराची वृक्षे आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी नाशिक व मराठवाडा विभागातील ११ अभयारण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले अप्पर मुख्य वनसंरक्षक-वन्यजीव यांचे कार्यालय, ​वनविकास महामंडळ आणि ना​शिक प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय आहे. वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पेलणाऱ्या कार्यालयाच्या आवारातील वृक्षांचेच काही खरे नाही, असे या घटनेने सिध्द केले. चंदन चोरट्यांनी ७ जूनच्या मध्यरात्री साडेबारा ते तीन या वेळेत मुख्य वन संरक्षकांच्या बंगल्याजवळील ७ हजार रूपये किंमतीचे चंदनाचे झाड तोडून त्यातील गाभा चोरी केला. विशेष म्हणजे शहराचे ग्रामदैवत असलेल्या मुंबई नाका परिसरातील श्री कालिका माता मंदिराच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमाराला तोडून नेले होते.

सिंहस्थामुळे मागणी?

सिंहस्थादरम्यान चंदनाला मोठी असते. इतर ठिकाणाहून चंदनाची तस्करी केली जाते. भविष्यातील मागणीचा विचार करून चोरट्यांनी चंदनाच्या झाडांचा फडशा पाडण्यास सुरूवात केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. चंदनाचे झाड तोडल्यानंतर पोलिसांकडे गुन्हा दाखल होत असला तरी तपासातून काहीही निष्पन्न होत असल्याचे समोर येत नाही.

वन्यजीव विभागाच्या जुन्या कार्यालयासमोरील झाड तोडण्यात आले. हे कार्यालय बंद असून, या शेजारील पोलिस उपायुक्तांचे कार्यालय बंद अवस्थेत आहे. या परिस्थितीचा फायदा चोरट्यांना झाला. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. - अरविंद पाटील, मुख्य वनसंरक्षक

शहरातील झाडांबाबत प्रशासनकडे नोंद नाही. दोन-पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ वाढलेले झाड चोरटे सहजतेने चोरून नेतात. नागरिक देखील चंदनाचे झाड लावण्यासाठी इच्छूक नाहीत. हे चित्र बदलायला हवे. - धिरज बच्छाव, पर्यारवण प्रेमी

रात्रीच्या वेळी गस्त घातली जाते. पोलिस स्टेशन हद्दीत चंदनाचे वृक्ष किती आणि कोठे आहेत, याबाबतची माहिती घेऊन त्यादृष्टीने गस्तीमध्ये बदल करण्यात येईल. - मधुकर कड, सीनिअर पीआय, भद्रकाली पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images