Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दहा हजार वृक्षांचे रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकाच दिवशी, एकाच ठिकाणी दहा हजार लोकांच्या सहभागाने दहा हजार वृक्ष लावून वन तयार करण्याचा संकल्प शुक्रवारी नाशिककरांनी पूर्ण केला. वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील अबालवृध्दांनी या उपक्रमात सहभागी होऊन संपूर्ण नाशिक हिरवे करण्याचा संकल्प केला.

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून 'वन महोत्सवाला फाशीचा डोंगर येथे सुरुवात झाली. या उपक्रमासाठी महामंडळाकडून व खासगी व्यावसायिकांकडून वाहन व्यवस्था करण्यात आल्याने शहराच्या सर्व भागातून लोक येथे उपस्थित होते. या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने सातपूर येथील फाशीचा डोंगर या ठिकाणी वनकक्ष क्र. २२२ ही जागा निवडण्यात आली होती. शहरातील बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, वास्तुविशारद, उद्योजक सर्व क्षेत्रातील कामगार वर्ग, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, रिक्षाचालक, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा संघटना यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाईने पुढाकार घेतला. शिवाय प्रसिद्धी समितीने फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सअप या सारख्या सोशल मीडियाचा देखील वापर करून नागरिकांना उपक्रमाची माहिती दिली होती. त्या त्या विषयात पारंगत असलेल्या युवकांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात अर्थ, जनसंपर्क, समन्वय, आपत्कालीन, साईट, प्रसिद्धी आदींचा समावेश होता. जनसंपर्क समितीने शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने क्लासेस, वाचनालय, उद्याने, जॉगिंग ट्रक, अशा सार्वजनिक ठिकाणी भेटी देवून या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने दहा हजार खड्डे खोदण्यात आले होते.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांची एकीकडे कत्तल होत असताना दुसरीकडे मात्र विक्रमी वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम संपूर्ण राज्याला एक वेगळा विचार देणारा ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे होते. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाची सांगता सायंकाळी ५ वाजता झाली.

तरुणांचा प्रतिसाद

सर्व वयोगटातील नाशिककर यात सहभागी झाले होते. तरूण मंडळी या उपक्रमात सहभागी झालेली पहायला मिळाली. ही वाखाणण्याजोगी बाब म्हणायला हवी. तसेच, सेंट झेवियर्स व रेयान इंटरनॅशनल स्कूलसारख्या नाशिकमधील शाळांनी मुलांना येथे घेऊन येत मुलांकडून वृक्षारोपण करून घेतले.

वृक्षप्रेमी सेल्फीमय

वृक्षारोपणासाठी आलेल्या सर्वच स्तरातील लोकांमध्ये सेल्फीची क्रेझ दिसून आली. झाड लावल्यानंतर अनेकांनी मित्रांसोबतच नुकत्याच लावलेल्या झाडांबरोबरही सेल्फी काढले. या दरम्यान लोकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.

पोलिसही इको फ्रेंडली

एवढ्या मोठ्या उपक्रमादरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस सहज नजरेस पडत होते. यातील अनेकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच झाड लावून पर्यावरणाप्रती ही आपली ड्युटी निभावली.

६५ जातीची झाडे

पळस, मोह, वड, पिंपळ, आंबा, पुत्रंजिव, बेहडा, सीताफळ, काटेसावर, चेरी, भोकर यासारख्या ६५ हून अधिक प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात मुख्यत्वे आयुर्वेदीक, वनौषधी झाडांचा प्रामुख्याने समावेश होता.

नगरसेवक उपस्थित

इतर वेळी महापालिकेच्या सभागृहातील हजेरीवरून टिकेला सामोरे जाणाऱ्या नगरसेवकांचे एक अनोखे रूप यादरम्यान पहायला मिळाले. महापालिकेतील बहुतांशी सर्वच नगरसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केले. तसेच महपौरांनीसुध्दा या उपक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.

मी कुटुंबासमवेत वृक्षारोपणासाठी येथे आले आहे. यापूर्वी ही अनेकवेळा मी पर्यावरणपूरक कामे केली आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच काम करीत आहे आणि याचा एक वेगळाच आनंद आहे. - डॉ.नीलम परदेशी

आपलं पर्यावरण या संस्थेच्या वतीने आम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली. खूप प्रसन्न वाटतयं. यापुढे ही अशाच प्रकारे मी झाडं लावणार आहे. आज खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा केल्यासारखे वाटत आहे. - जान्हवी कविश्वर

मी पहिल्यांदाच झाड लावलं. अनुभव खूपच अविस्मरणीय होता. दर आठवड्याला मी झाडाची निगा राखायला फाशीच्या डोंगरावर जायचे ठरवले आहे. दरवर्षी किमान १० झाडं लावायचा संकल्प मी केला आहे. - प्रसाद पाठक

यांचे लाभले सहकार्य

वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पण, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी क्रेडाई, बिल्डर असोसिएशन, रमेश अय्यर, जयकुमार रिअल इस्टेट, रेडियो मिरची, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग अॅन्ड रेफ्रीजेरेटिंग अॅन्ड एअर कंडीशनिंग इंजिनिअर्स, विष्णू पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच धनंजय शेंडबाळे यांनी ८ हजार झाडे उपलब्ध करून देत महत्वाची भूमिका बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण प्रेमी, विविध मंडळे आणि शासकीय कार्यालयातील नागरिक आणि भाविकांनी शुक्रवारी सकाळपासून रामकुंडापासून अमरधामच्या पुलापर्यंत गोदावरी नदीपात्राची साफसफाई केली.

महापालिका व आरोग्य विभागाने झाडूसह सर्व साहित्य आणि मास्क भाविकांना पुरविले होते. नदीपात्रात उतरून काहींनी स्वच्छता केली तर काही भाविकांनी व काही नागरिकांनी आपल्या संस्थेचा आदेश व कर्तव्य म्हणून काम केले. नाशिक एज्युकेशन सोसायटी, उन्नती एज्युकेशन सोसायटी, आदर्श संस्था, व्ही. एन. नाईक आदी शिक्षणसंस्था, वेणुनाद, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक पंचायत समिती, सिन्नर व दिंडोरीसह अनेक पंचायत समित्यांमधील विविध विभागातील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

गोदामातेची कायम साफसफाई करण्याची प्रतिज्ञा नाएसोचे राजेंद्र निकम यांनी दिली. हेमंत धात्रक, तानाजी जायभावे, प्रभाकर धात्रक, साहेबराव कुटे, प्रकाश गामणे, रमेश अहिरे, राजेंद्र निकम, गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी, बांधकाम विभागाचे आर. एस. सोमवंशी उपस्थित होते.

पर्यावरण रक्षणाचा संदेश

जुने नाशिक : हातात झाडू घेऊन शिक्षक व स्वयंसेवी संस्थांनी पर्यावरणाचा संदेश देत जुने नाशिक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविली.जुने नाशिक परिसर चकाचक दिसत होता.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी जुने नाशिक परिसरातील साठफुटी रोडवरील दुभाजकात प्लास्टिक पिशव्यांचा व इतर साचलेला कचरामा करून स्वच्छता केली. इतर स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली. पर्यावरणाची शपथ घेत महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग, समाज कल्याण विभाग, डे केअर शाळा, कल्याणी महिला मंडळ, गुरू गोविंद काॅलेज आदींनी दादासाहेब गायकवाड सभागृह ते पखालरोड, नाशिक-पुणे रोडवरील नंदीनी (नार्सडी) आंबेडकरवाडी पर्यंतचा परिसर व नदीपात्राची स्वच्छता केली.

प्रभाग २९ मधील अमरधाम रोड व टाळकुटेश्वर परिसरातील कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढून स्वच्छ करण्यात आले. यावेळी नगरसेविका रंजना पवार, ज्ञानेश्वर पवार आदींसह सामाजिक कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मळ गोदेसाठी सरसावले हात

$
0
0

शहरभरात स्वच्छता मोहीम; हजारो ना‌शिककरांच्या प्रतिसादातून हटला ३७५ टन कचरा

टीम मटा

प्रदूषणामुळे नद्यांचा श्वास कोंडू लागला आहे. गोदावरीसह येथील उपनद्यांना प्रदूषणाच्या विषारी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी स्वच्छतेची हाक देण्यात आली अन् बघता बघता गोदावरीचे पात्र स्वच्छ होत गेले. १९ हजारांहून अधिक नाशिककर या सत्कार्यात सक्रिय सहभागी झाले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रशासनाने सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना अशा सर्वांनाच स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. गोदावरी, नासर्डी आणि वाघाडी नदीच्या १० किलोमीटर परिसरात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधींनी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता कार्य केले. एकूण २० जेसीबी, ८ डंपर, एक रोबोट, एक पोकलँड आणि सहा ट्रॅक्टरांची या अभियानासाठी मदत घेण्यात आली. गोदावरी पात्रामध्ये पाच जेसीबी, तीन डंपर आणि दहा घंटागाड्या ठेवण्यात आल्या होत्या. याठिकाणी सात हजार ६९८ स्वंयंसेवकांनी सहभाग घेऊन दुपारपर्यंत ३० गाड्या भरून कचरा एकत्रित केला. वाघाडी नदी परिसरात दोन हजार ६३४ स्वयंसेवकांनी १७ घंटागाड्या भरून कचरा हटविला. पाच जेसीबींची देखील स्वच्छतेसाठी मदत घेण्यात आली. नासर्डी परिसरात चार हजार ४९५ स्वयंसेवकांनी एक रोबोट, १० जेसीबी आणि पाच डंपरच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबविली. ५० घंटागाड्या भरून कचरा एकत्रित करण्यात आला. इतर ठिकाणी साधारण साडेचार हजार स्वच्छतादूतांनी अभियानात सहभाग घेतला. १९ घंटागाड्या भरतील एवढा कचरा याठिकाणी एकत्रित करण्यात आला. मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे, महापालिका उपायुक्त रोहिदास जोरकुळकर आदींनी अभियानाचे नियोजन केले. त्र्यंबकेश्वर परिसरातही सरकारी अधिकारी, आणि कर्मचारी, संदीप फाऊंडेशन, ब्रह्मा व्हॅली आदी संस्थांच्या कर्मचारी-विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

लोकप्रतिनिधी-प्रशासन

प्रशासनातर्फे दरवर्षी पर्यावरण दिन साजरा केला जातो. मात्र, यापासून नागरिकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो. यंदाचा पर्यावरण दिन त्यास अपवाद ठरला.

प्रशासनाने हरित कुंभ संकल्पनेतंर्गत स्वच्छता मोहीम हाती घेतली. यासाठी ७० पेक्षा जास्त ठिकाणे निवडण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी लोकप्रतिनिधी किंवा जेष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्यात आली. मोहिमेला सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. गोदावरी, नासर्डी आणि वाघाडी नदीच्या १० किलोमीटर परिसरात अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता केली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नासर्डी नदी परिसरात मोहिमेस सुरुवात केली. त्यांनी सपत्नीक स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हेदेखील सपत्नीक अभियानात सहभागी झाले. कुशवाह यांनी सोमेश्वर परिसरात स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला. गेडाम यांनी दोंदे पूल परिसरात, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी वाघाडी नदी परिसर तसेच टाळकुटेश्वर मंदिर परिसर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गाडगेमहाराज पुलाजवळील परिसरात स्वच्छतेचे कार्य केले.

खासदार हेमंत गोडसे यांनी कन्नमवार पुलाजवळील भागात सहभाग नोंदवला. आमदार सीमा हिरे यांनी सोमेश्वर परिसरात श्रमदान केले. महापौर अशोक मुर्तडक यांनी आयटीआय पूल तर उपमहापौर गुरुमीतसिंग बग्गा यांनी दोंदे पूल परिसरात सहभाग घेतला. भैय्यूजी महाराज आणि श्री ग्यानदास महाराज यांनी देखील गोदा स्वच्छतेसाठी काम केले. चिन्मय उद्गीरकर आणि धनश्री क्षीरसागर या कलाकारांनी सहभाग घेतल्याने सर्वांचा उत्साह वाढला. राजेश पंडित, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग आणि सेवाभावी संस्था अशा एकूण ११२ पथकांनी घेतलेला सहभाग हे वैशिष्ट्य ठरले.

ना‌शिककरांचा संकल्प

बघता बघता नाशिककर स्वच्छतेचा संकल्प करून रस्त्यावर उतरले. थोडेथिडके नाही तर ३८ हजार हात या मोहिमेसाठी सरसावले. १९ हजार २१२ आबालवृद्धांनी तब्बल ३७५ टन कचरा उचलला. सकाळी सातला सुरू झालेली ही मोहीम रात्रीपर्यंत सुरूच होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकल मायग्रेशन’ला रेड सिग्नल!

$
0
0

विद्यार्थी संख्येत स्थिरता आणण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

अश्विनी कावळे, नाशिक

कॉलेजमधील वातावरण, शिकविण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना रुचल्या नाही तर एक शैक्षणिक वर्ष संपले की पुढच्या वर्षासाठी विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेण्यास म्हणजेच 'लोकल मायग्रेशन' करण्यास पसंती देत होते. मात्र, यामुळे कॉलेजेसला अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आल्याने 'लोकल मायग्रेशन'वर महाराष्ट्र शिक्षण विभागाने बंदी घातली आहे.

अकरावी ते बारावी व ग्रॅज्युएशनचे पहिले ते शेवटचे वर्ष असे दोन विभाग यात केले गेलेले आहेत. दहावीत कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी अकरावीसाठी मिळेल त्या कॉलेजमध्ये अडमिशन घेण्यास पसंती देतात. अकरावीत चांगले मार्क्स मिळाले की पुढे बारावीसाठी दुसऱ्या कॉलेजकडे धाव घ्यायची याबाबत त्यांचे नियोजन सुरू झालेले असते. हेच ग्रॅज्युएशनला अॅडमिशन घेताना दिसून येते. बारावीला कमी मार्क्स मिळाल्यास मिळेल त्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन पुढच्या वर्षापासून हव्या त्या कॉलेजला अॅडमिशन घ्यायचे, हे ठरलेले असायचे. यामध्ये विद्यार्थ्यांची सोय होत असली तरी कॉलेज प्रशासनाला विद्यार्थी संख्या कमी होण्यामुळे घाम फुटत होता. नाशिक शहराचा विचार करता दरवर्षी ३० ते ३५ टक्के विद्यार्थी लोकल मायग्रेशन करीत होते. या प्रकारामुळे शहरातील सर्वच कॉलेजची विद्यार्थीसंख्या डळमळीत होत होती. याचा धक्का लहान कॉलेजेसला अधिक प्रमाणात बसत होता. यावर निर्बंध घालणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित ज्ञानशाखांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) मागितले असता त्यांना या नियमाची जाणीव कॉलेज प्रशासन करून देत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी वारंवार टीसीची मागणी केल्यास त्यावर 'लोकल मायग्रेशन इज नॉट अलाऊड' असे लिहून टीसी दिला जात आहे. केवळ एखादा विषय व अभ्यासक्रम कॉलेजमध्ये नसेल तरच त्यांना टीसी देऊन दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची मुभा यापुढे दिली जाणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात कॉलेज प्रशासनापुढे विद्यार्थी व पालकांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे.

लोकल मायग्रेशनचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थीसंख्या निश्चित करण्यास कॉलेजेसला अडचणी येत होत्या. या अडचणी दूर होऊन विद्यार्थीसंख्येत स्थैर्य येणार असल्याचे कॉलेज प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. विद्यार्थी नापास होणे, लोकल मायग्रेशन यामुळे दरवर्षी कॉलेजच्या संख्येत चढ-उतार होत होता. या निर्णयामुळे विद्यार्थीसंख्येमध्ये स्थैर्य येण्यास मदत होईल.

पारंपरिक विद्याशाखांमध्ये ही समस्या मोठी असल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत होते. त्यावर ठोस निर्णय घेणे आवश्यकच होते. लोकल मायग्रेशनला बंदी आणल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी संख्येबाबत स्थिरता येईल, असा विश्वास वाटतो. - प्रा. डॉ. सुचिता कोचरगावकर, प्राचार्य, भोसला मिलिटरी कॉलेज

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्या स्वातंत्र्यावर गदा येत असून या निर्णयात बदल घडवावा व हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी ते करत आहेत.

लॉ कॉलेजेस दूर

शहरात लॉ कॉलेजेस कमी असल्याने लोकल मायग्रेशनचा विचार विद्यार्थी करत नाहीत. कोणत्या कॉलेजमध्ये लॉचे शिक्षण घ्यायचे याचा परिपूर्ण विचार करुनच ते प्रवेश घेतात. त्यामुळे या अडचणीला लॉ कॉलेजेसला तरी सामोरे जावे लागत नाही, असे एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानसेवेचे बुकिंग २ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ते पुणे या विमानसेवेला येत्या १५ जूनपासून प्रारंभ होणार असून त्याचे बुकिंग येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. या विमानसेवेसाठी ५९९९ रुपये भाडे राहणार आहे. १ जुलैपासून मात्र हजार रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

नाशिककरांना प्रदीर्घ प्रतीक्षा असलेली विमानसेवा ओझर विमानतळावरून सुरू होत आहे. मेरीटाईम हेलि हेअर सर्व्हिसेस लि. (मेहेर) या कंपनीने नाशिक ते पुणे ही सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात नाशिकमधील विविध संस्था-संघटनांची बैठक त्यांनी तिडके कॉलनीतील हॉटेलमध्ये घेतली. याप्रसंगी मेहेरचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा, संचालक एस. के. मन, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक दिग्विजय कपाडिया व तानचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक ते पुणे ही विमान सेवा सोमवार ते शुक्रवार यादरम्यान राहणार आहे. तानच्या सदस्यांकडे तसेच http://www.mehair.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करता येईल, असे वर्मा यांनी सांगितले. तर, प्रतिसाद वाढल्यास भाडे नक्कीच कमी होईल, असे भालेराव म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात नाशिक ते मुंबई ही सेवा सुरू केली जाणार आहे. नाशिकचा विकास व्हावा, विमानसेवा त्वरित सुरू व्हावी असा गळा काढणाऱ्या नाशिकच्या विविध संस्था संघटनांच्या अध्यक्षांसह पदाधिकारी बैठकीला गैरहजर राहिले.

ओझरहून

सकाळी ९.४५, ११.५० दुपारी ४.३०, सायं ६.५०

पुण्याहून सकाळी १०.३५, ११.०० सायं. ५.२०, ६.००

नाशिक दर्शन २९९९ रुपये

शनिवार आणि रविवार हवाई नाशिक दर्शन (जॉय राईड) राहणार आहे. दहा मिनिटांच्या या उड्डाणासाठी २,९९९ रुपये आकारले जाणार आहे. मात्र, हे भाडे अधिक असल्याचे मंडलेचा यांनी सांगताच याबाबत विचार करण्याचे आश्वासन वर्मा यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा पारा अखेर उतरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शहर व जिल्ह्याच्या सरासरी तापमानात घट झाली आहे. पावसाचे वेध लागल्याने बळीराजाने खरिपाच्या तयारीवर जोर दिला असून, जमीन मशागतीच्या कामांनी वेग पकडला आहे. सुरुवातीला पाऊस चांगला झाला तर पेरण्यांची कामेही जोरात सुरू होण्याची शक्यता आहे.

शहर व जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने असह्य उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. मात्र, गुरूवारीही जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पारा दोन ते तीन अंशाने उतरला आहे. गुरूवारी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि देवळा तालुक्यात पाऊस बरसला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक १० मिलीमीटर, तर इगतपुरीत तालुक्यात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. देवळा तालुक्यातही तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेसाठी नाशिककर बनले भगीरथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी तब्बल १९ हजारांहून अधिक नाशिककरांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या हाती झाडू, फावडे घेत स्वच्छता केली. यानिमित्ताने गोदावरीसाठी नाशिककरांनी भगीरथी प्रयत्नांचा आरंभ केला असून, हरित नाशिकसाठी नाशिककरांनी शुक्रवारी तब्बाल दहा हजार रोपांची लागवडही केली आहे. यानिमित्ताने नाशिककरांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे.

वाढत्या पर्यावरणीय समस्यांप्रती केवळ गळा काढण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प नाशिककरांनी केला. त्यानुसार शुक्रवारी, जागतिक पर्यावरणदिनानिमित्त सकाळी सहा वाजेपासूनच नाशिककर घराच्या बाहेर पडत होते. नाशिक महापालिका, जिल्हा प्रशासन, विविध सरकारी विभाग आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या माध्यमातून गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नद्यांच्या स्वच्छतेसाठी

स्वतःला वाहून घेतले. आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापौरांपासून युवक आणि महिला या मोहिमेत मनापासून सहभागी झाले. यानिमित्ताने प्रदूषणाने काळवंडलेल्या नद्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे. या मोहिमेत ९ हजार २१२ आबालवृद्धांनी गोळा केलेला तब्बल ३७५ टन कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमधून नेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणासाठी 'सुला'ची मोहीम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसायाबरोबरच सामाज‌िक भान जपणाऱ्या सुला वाईन्सने पर्यावरण संवर्धनासाठीही पुढाकार घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गेल्यावर्षी लावलेली ९० टक्के झाडे जगविण्यात त्यांना यश आले आहे. तर यंदाही सुलाच्या कर्मचाऱ्यांनी विविध उपक्रमांतून पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुला वाईन्सतर्फे सावरगाव येथे मुलांसाठी चित्रकला फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. त्याच प्रमाणे हरितकुंभ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या गोदापात्र, रामकुंड स्वच्छता मोह‌िमेत सुलाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहाभाग घेऊन या उपक्रमालाही मोठ्या प्रमाणात हातभार लावला. सकाळी साडेसातवाजेपासून सुलाचे कर्मचारी यात सहभागी झाले असल्याची माहिती सुला विनियार्डचे उपाध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल यांनी दिली. गंगापूर व दिंडोरी येथे पाच कोटी लिटर क्षमतेची शेततळी, सोलर पॅनल, स्कायलाईट व आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून कंपनीतर्फे इको स्कूल सुरू करण्यात आले आहे.

कंपनीतर्फे सातत्याने सामाजिक कामे केली जातात. मुलांच्या शिक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कंपनीतर्फे परिसरात सातत्याने स्वच्छता मोह‌िमेचे आयोजन केले जात आहे. - डॉ. नीरज अग्रवाल, उपाध्यक्ष, सुला वाइन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मयूर मोरे राज्यात पहिला

$
0
0


नाशिक : काही दिवसांपूर्वी शिल्पकलेत महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक मिळविणारा नाशिकचा मयूर शांताराम मोरे या विद्यार्थ्याने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून जी. डी. आर्टसच्या पदवी अभ्यासक्रमात राज्यातून पहिला क्रमांक मिळविला आहे. सिडको परिसरातील गणेश मूर्तीकार शांताराम मोरे यांचा तो मुलगा आहे. मागील पिढ्यांकडून मिळालेला मूर्तीकलेचा वारसा जोपासत मयूर याने प्रयत्नपूर्वक सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळविला होता. या अभ्यासक्रमासाठी राज्यात नऊ विभागांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होती. जी. डी. आर्ट (स्कल्प्चर) या अभ्यासक्रमात 'ह्युमन बॉडी स्टडीज अँड अनाटॉमी' या विषयात मयूर याने यश मिळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसडकसाठी १२९ कोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करणाऱ्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या थकीत बिलांपोटी केंद्र सरकारने अखेर पहिल्या टप्प्यात १२९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मजूर आणि ठेकेदारांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी कामे बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठेकेदार ठाम आहेत.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे व्यापक स्वरुपात विणण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना उपयुक्त आहे. त्यांतर्गत ग्रामीण भागात रस्ते बनवून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. या योजनेंतर्गत राज्यभरात हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी तीन हजार चार कोटी रूपयांचा निधी पाच वर्षांसाठी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

पहिल्या टप्प्यात त्यापैकी एक हजार ४३१ कोटींचा तर दुसऱ्या टप्प्यात एक हजार ५७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र दुसऱ्या टप्प्याचा निधीच राज्याला वितरीत केला गेला नाही. गेल्यावर्षी राज्याला ३३६ कोटी रूपयांचा निधी तर यंदा मजूर आणि ठेकेदारांच्या बिलांपोटी केवळ २९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बिहार व तत्सम राज्यांना काही हजार कोटींमध्ये निधी मंजूर केला जात असताना केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची बाब 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'ग्रामसडकची वाट बिकट' या वृत्तमालिकेद्वारे पुढे आणली होती. या मालिकेनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्रालय खडबडून जागे झाले.

जानेवारीपासूनची बिले थकीत असतानाही ठेकेदारांनी स्वत:जवळील पैसे खर्च करून ही कामे सुरू ठेवली होती. परंतू केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी नाशिक भेटीत निधी देण्याबाबत हात आखडता घेतल्याने ठेकेदारही धास्तावले आहेत. या योजनेंतर्गत सुरू असलेली ९५ टक्क्यांहून अधिक कामे कामे बंद पडली असून, ग्रामीण जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सातशेहून अधिक ठेकेदार कर्जबाजारी झाले असून, हजारो मजुर रोजगाराला मुकल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याची वस्तुस्थिती या वृत्तमालिकेद्वारे राज्यसरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

याची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची दिल्लीतील अर्थमंत्रालयात १ जून रोजी भेट घेतली. ग्रामसडक योजनेसाठी राज्याला तीन हजार चार कोटी रूपयांचा निधी पाच वर्षांसाठी मंजूर असताना या योजनेंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदार आणि मजूरांची देणी देण्यासाठी केंद्रसरकारने तातडीने ‌निधी द्यावा अशी मागणी केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचीतील तरतुदीप्रमाणे केंद्र शासनाने एकूण मंजूर प्रकल्पाच्या ५० टक्के निधी अग्रीम स्वरुपात राज्यांना देणे आवश्यक असल्याने एक हजार पाचशे कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. मात्र केंद्रसरकारने १२९ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून नाशिकच्या वाट्याला आठ कोटी २५ लाख रुपयांचा निधी आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१,३९२ वाहनांवर शहरात कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ३० मे ते ५ जून या कालावधीत शहर पोलिसांनी ५ वेळा नाकाबंदी केली. तसेच, फुलेनगर व लेखानगर झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या दरम्यान पोलिसांनी १ हजार ३९२ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत १ लाख ४१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

ऐन सिंहस्थाच्या तोंडावर शहरातील गुन्हेगारी काही प्रमाणात वाढली. एकप्रकारे गुन्हेगार पोलिसांना थेट आव्हानच देऊ लागले. सिंहस्थापर्यंत ही परिस्थिती कायम राहिली तर पोलिसांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे अवघड बनले असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंग आणि प्रतिबंधक कारवाया सुरू केल्या आहेत. मागील पाच दिवसात पोलिसांनी ७४७ टवाळखोरांविरोधात मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. कोम्बिंगदरम्यान ७३ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. याच दरम्यान पोलिसांनी घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून २३० ग्रॅम सोने, १२० किलो तांबे, ९ दुचाकी आणि दोन एलसीडी जप्त केले. मागील काही महिन्यापासून पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईचे प्रमाण कमी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच द्या; लॉजिंगची सुविधा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'बेड आणि ब्रेकफास्ट' या योजनेच्या धर्तीवर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 'यात्री निवास योजना २०१५-१६' पुढे आणली आहे. अगदी कमीत-कमी कागदपत्रांच्या मदतीने शहरातील कोणताही घरमालक या योजनेत सहभागी होऊन घरातच भाविकांसाठी हॉटेलच्या सुविधा पुरवू शकतो.

कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविकांना राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आखण्यात आली. त्यामुळे या योजनेत सहभागी होणाऱ्या घरमालकास घरातच लॉजिंग सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. प्रत्येक पर्वणीसाठी किमान ६० ते ८० लाखापर्यंत भाविक शहरात येण्याची शक्यता व्यक्त आहे. आजमितीस शहरात फारतर १६८ हॉटेल्स तसेच लॉजेस कार्यरत आहेत. प्रशासनातर्फे भाविकग्राम साकारले जाणार आहे. शहरातील नागरिकांकडे येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही मोठी असेल. तरीही लाखो भाविकांच्या राहण्याचा प्रश्न प्रशासनापुढे आहे. ऐन पावसाळ्यात उघड्यावर भाविकांना राहावे लागले तर रोगराई वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे यात्री निवासी योजना महत्वाची ठरते. साधारणतः हॉटेल किंवा लॉज सुरू करण्याकरिता काही विशेष नियमांचे पालन केले जाते. त्यानुसार, घरातच लॉजिंगची सुविधा सुरू करणे शक्य नसते. या योजनेत मात्र, याच नियमाला बगल देण्यात आली आहे. एमटीडीसीने यापूर्वी बेड अॅण्ड ब्रेकफास्ट योजना राबवली. त्यास नाशिकसह परिसरातील घरमालकांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्या ८० घरांमध्ये बेड अॅण्ड ब्रेकफास्ट योजनेची अंमलबजावणी होते. यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या बेडच्या संख्येनुसार काम चालते. सिंहस्थासाठी आखण्यात आलेल्या निवास योजनेमध्ये बेडचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अगदी रिकाम्या हॉलचा वापर सुध्दा केला जाऊ शकतो. स्वच्छता व आदरातिथ्य या दोन सूत्रांवर स्थानिकांनी योजनेत सहभाग घेतला तर रोजगार कमविण्याची ही चांगली संधी असल्याचे एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी सांगितले.

या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या घरमालकांनी शासकीय विश्रामगृहाजवळील एमटीडीसीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. सातबारा, पोलिसांचे कॅरेक्टर सट्रीफिकेट, सातबारा, लाईट बिल अशी कागदपत्रे यासाठी आवश्यक असून, त्यांची पडताळणी केल्यानंतर घरमालकांच्या नावाची नोंद केली जाणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत असून, यानंतर एक वर्षभरासाठी घरमालकास लॉजिंगचा व्यवसाय करता येणार आहे.

......

बाहुली धरणाचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. या ठिकाणाची तुलना लोणवळा व खंडाळा या भागाशी होऊ शकते. सध्या लोणवळा व परिसरात सिमेंटचे जंगल तयार होते आहे. बॉलीवूडचे अनेक दिग्दर्शक यामुळे वैतागले आहेत. यापार्श्वभूमीवर बाहुली परिसर शुटींगसाठी चांगले डेस्टिनेशन होऊ शकते. सध्या या ठिकाणी १८ बंगल्यांमध्ये बेड अॅण्ड ब्रेकफास्ट योजना कार्यन्वित आहे. पर्यटनाच्या दृष्टीने इतरही कामे पूर्ण होत असल्याचे प्रज्ञा बढे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिराचे रंगकाम थांबवा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंड परिसरात सध्या मंदिरांच्या रंगरंगोटीची कामे सुरू असून या रंगकामामुळे काही हेरिटेज वास्तूंना धोका पोहचण्याची भीती आहे. त्यामुळेच हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टने पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रामकुंड परिसरात प्राचीन व अतिप्राचीन वास्तू आहेत. त्यात प्रामुख्याने मंदिरांचा समावेश आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने मंदिरांच्या साफसफाई, डागडूजी आणि रंगरंगोटीचे काम सध्या करण्यात येत आहे. मात्र, अशास्त्रीय पद्धतीने हे रंगरंगोटीचे काम सुरू असणे हे हेरिटेज मूल्य असलेल्या वास्तूंसाठी धोकादायक आहे. अयोग्य पद्धतीने रंगरंगोटी करण्यातून प्राचीन मंदिरांच्या वैभवाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. यातील काही रंग कायमस्वरुपी राहणारे आहेत. दगडी मंदिर आणि वास्तूंना रंग देणे योग्य नाही. नैसर्गिक आणि प्राचीन ठेव्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने लाखो भाविक, पर्यटक येणार आहेत. त्यांच्यासाठी आपण गालबोट लागलेली वास्तू किंवा मंदिर ठेवणार असून तर ही बाब नाशिकच्याही हितावह नाही. त्यामुळे याप्रकरणी पालकमंत्री म्हणून आपण जातीने लक्ष घालावे आणि रंगरंगोटीचे हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाचा मार्ग मोकळा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या आरोग्य विभागाने नाशिकमध्ये महिलांसाठी मंजूर केलेल्या महिलांच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने आता वडाळा शिवारातील महापालिकेच्या आरक्षित जागेपैकी ३७०० चौरस फूट जागेवर रुग्णालय उभे राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने जागेला मान्यता देण्यासाठी येत्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला असून, हा मंजूर झाल्यास महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिक महापालिका हद्दीत महिलांसाठी शंभर खांटाचे स्वतंत्र रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, जागेअभावी हे रुग्णालय दोन वर्षापासून रखडले आहे. सुरुवातीला संदर्भ सेवा रुग्णालयात जागा देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात जागा उपलब्ध नसल्याच्या कारणासह रुग्णालयात अत्यंत दुर्धर आजारांचे रुग्ण येत असल्यामुळे त्यांचा संसर्ग रुग्णालयात येणाऱ्या महिलांना होण्याची भीती आहे. त्यामुळे ही जागा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या जागेत रुग्णालय उभारण्यासाठी पत्र महापालिकेला दिले आहे. वडाळा भागातील स.न. २१/१ मधील दवाखानाचे आरक्षण असलेली मनपाच्या ताब्यातील जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

महापालिकेने या मागणीला हिरवा कंदील दिला असून, ही आरक्षणाची ३७०० चौरस फूट जागा संपादित करण्याचा प्रस्ताव आता महासभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. महापालिकेला या जागेच्या बदल्यात मोफत रुग्णसेवा मिळणार आहे. सोबतच शासनाबरोबर संयुक्त करारनामा करून येथे काही व्यावसायिक कामासाठी जागा उपलब्ध झाली, तर त्यातून महसूल मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. येथे काही गाळे बांधून ते मनपाकडे घेऊन त्यातून मनपाला महसूल मिळेल. येत्या मंगळवारच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या सभेत ही जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा होणार आहे. सोबतच शहरातील महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाने स्वीकारा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत जागतिक शैक्षणिक वर्तुळात दूरस्थ शिक्षण पध्दतीचा ट्रेण्ड सुरू आहे. वेगवान जगाशी जुळवून घेताना शिक्षण प्रवाहात टिकण्यासाठी आणि कौशल्यवर्धनासाठी दूरस्थ शिक्षण पध्दती उपकारक आहे. विद्यार्थ्यांनी या पध्दतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑडिओ व्हीज्युअल सेंटर आणि प्रिंट प्रॉडक्शन सेंटर या इमारतींचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वेब रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यपालांच्या सोबत पालकमंत्री गिरीष महाजन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू डॉ. अरुण जामकर, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, दृक श्राव्य केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारताकडे बघण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. युवकांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. सन २०२० पर्यंत भारतीयांचे सरासरी वय २९ वर्षे असणार आहे. हे वय अमेरिका आणि चीन या बलाढ्य राष्ट्रांच्या तुलनेत नऊ वर्षांनी कमी असेल. या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ होणे गरजेचे असेल. 'मेक इन महाराष्ट्र' या माध्यमातून राज्यात अनेक देशातून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगांसोबतच पूरक उद्योगांनाही वाव मिळत असल्याने त्यासोबत असलेली रोजगाराची संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्यमशील बना आणि नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी चांगली तयारी करा, असा संदेश त्यांनी दिला. स्वच्छतेच्या उपक्रमातही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनदेखील राज्यपाल राव यांनी केले. सुरुवातीला त्यांनी दृक श्राव्य केंद्रातील स्टुडिओला भेट दिली. पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशीही त्यांनी वेब कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यांनी विद्यापीठाच्या वित्त विभागामार्फत करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीची माहिती घेतली.

स्वच्छता मोहिमेचे कौतुक

राज्यपालांनी पालकमंत्री महाजन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. ते म्हणाले, कुंभमेळा काळात आणि त्यानंतरही या अभियानात सातत्य ठेवण्यात यावे. गोदावरी नदी उगमापासून बारमाही कशी करता येईल याबाबत विचार करण्यात यावा. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या आरोग्य आणि स्वच्छता सुविधेचीदेखील त्यांनी माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय धावपटू व विद्यापीठाची विद्यार्थीनी कविता राऊत आणि तिच्या जीवनावर बालभारतीच्या पुस्तकासाठी धडा लिहिणारे संतोष साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपाल वेटिंगवर

पूर्व नियोजित वेळेनुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मुक्त विद्यापीठात आगमन झाले. विद्यापीठाच्या ऑडिओ व्हीज्युअल्स इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी ते उद्घाटनस्थळी पोहचले. मात्र पालकमत्र्यांची वाट बघत त्यांनी उद्घाटनाची फीत कापणे काही मिनिटांसाठी लांबविले. काही मिनिटांनंतर पालकमंत्री नियोजित स्थळी पोहचले अन् खोळंबलेला कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. राज्यपालांच्या अगोदर पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नियोजित स्थळी उपस्थित राहणे अपेक्षित होते. या विषयाचीही चर्चा शनिवारी मुक्त विद्यापीठात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सासे हत्या, चौघांना कोठडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणातून साठे चौकातील किटकॅट वाईन शॉपसमोर ३१ मे रोजी झालेल्या खून प्रकरणात भद्रकाली पोलिसांनी चौघा जणांना अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मासे विक्री करणाऱ्या शैलेसे सासे (वय २६) याचा तिघा संशयितांनी ३१ मेच्या रात्री भरचौकात खून केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना संशयितांची ओळख पटली. मात्र, खून प्रकरणानंतर ते फरार झाले होते. संशयितांविरोधात यापूर्वी चेन स्नॅचिंग, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. संतोष कोतेवाड (काठे गल्ली), अक्षय युवराज पाटील (सातपूर) आणि फ्रान्सिस म्यनुअल (इगतपुरी) असे मुख्य संशयितांची नावे आहेत. २० ते २४ वयोगटातील तिघा आरोपींना मुंबई नाका येथून संध्याकाळच्या सुमारास अटक करण्यात आली. शैलेशचा खून झाल्यानंतर हे तिघे संशयित पुणे आणि नंतर नांदेड येथे गेले होते. गुरुवारी पोलिसांना सूत्रांनी माहिती दिली की, सासे खून प्रकरणातील आरोपी शहरात येणार आहेत. त्यानुसार क्राईम ब्रँचसह स्थानिक पोलिसांनी मुंबई नाका येथे सापळा रचून कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांना अटक केली.

सिनीअर इन्सपेक्टर मधुकर कड यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. जुनेद चौधरी असे त्यांचे नाव आहे. खून प्रकरणानंतर चारचाकी वाहन उपलब्ध करून संशयितांना पळून जाण्यात जुनेदने मदत केली. घटनास्थळावरून पळून जाताना वापरलेली मोटरसायकल आणि पुणे येथे जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. ३१ मे रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मयत शैलेश आणि कोतेवाड, पाटील आणि म्यनुअल या तिघांची किरकोळ कारणावरून झडप उडाली होती. यानंतर संशयितांनी भर चौकात सासेवर चाकू हल्ला करून पळ काढला होता. अटक करण्यात आलेल्या संशयितावर यापूर्वीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित कातडचा जामीन फेटाळला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पंडित रंगनाथ कातड यांचा जामीन अर्ज शनिवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे कातड यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान, अन्य दोन संशयितांचा अटकपूर्व जामीन मात्र कोर्टाने मंजूर केला आहे.

मातोरी शिवारात १८७ एकर जमीन खरेदीचे पैसे दिल्यानंतरही त्या जमिनीचे अधिक पैसे मिळावेत यासाठी मोर्चावर दबाव आणून एक कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पंडित रंगनाथ कातड, रामदास वाळू पिंगळे, मोतीराम ढेरिंगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अर्जून रामचंद्र खेतवानी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पंडित कातड यांनी स्वतंत्र तसेच ढेरिंगे आणि पिंगळे यांनी संयुक्तपणे असे दोन अर्ज केले होते. त्यापैकी ढेरिंगे आणि पिंगळे यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ब्रम्हे यांनी मंजूर केल्याची माहिती अॅड. हर्षल केंगे यांनी दिली. कातड पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तीवाद यावेळी करण्यात आला. कातड यांच्यावर यापूर्वी १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून ते राजकीय पार्श्वभूमीचा फायदा घेऊन फिर्यादीवर दबावतंत्राचा वापर करू शकतात, असा युक्तिवाद मूळ फिर्यादी खेतवानी यांचे वकील अॅड. केंगे यांनी केला. कोर्टाने तो ग्राह्य मानून कातड यांचा जामीन अर्ज फेटाळला. संशयितातर्फे अॅड. मंदार भानोसे यांनी तर सरकारपक्षातर्फे अॅड. राजेंद्र घुमरे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर पुत्र CBI तपासावर नाराज

$
0
0


म.टा.प्रतिनिधी, नाशिक

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची भूमिका नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. सातपूरच्या सीटू भवनमध्ये अंनिसच्या वतीने शनिवारी बैठक पार पडली. यानंतर सायंकाळी आयएमए हॉल येथे पर्यावरणप्रेमी व अंनिस कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला दीड वर्ष लोटूनही मारेकरी सापडलेले नाही. या पार्श्वभूमीवर हमीद दाभोलकर यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात घडणाऱ्या या घटना राज्याला उलट दिशेने नेणाऱ्या आहेत. स्वैर वृत्तीच्या समाजविघातक वृत्तींवर वचक बसविण्यासाठी डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडणे आणि त्यांना कायद्यानुसार शासन होणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. या दृष्टीने तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्याने हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र, त्यात अद्यापही प्रगती नाही. यामुळे मारेकरे आजही मोकाट आहेत. यामुळे समाज विघातक कृती वाढत चालल्या आहेत. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. या तपासाला गती मिळण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय अधिक गतीने तपासकार्य पूर्ण करू शकेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. दाभोलकरांच्या पश्चात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्याची वाटचालही त्यांनी यावेळी मांडली. ते म्हणाले, संकुचित वृत्ती बाळगणाऱ्या समाज विघातक शक्ती स्वैर झाल्या आहेत. विवेकवादाला वैचारीक पाठबळावर सामोरे जाण्याची त्यांची ताकद नाही. यामुळे पळपुट्या मार्गांचा आधार घेऊन या समाज विघातक वृत्ती हल्ले अन् हत्यांचे मार्ग जवळ करीत आहेत. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे ही व्यक्तिमत्व आपल्यात विचार रूपाने अस्तित्वात आहेत. त्यांच्याच विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या पश्चात अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीत बळ भरले आहे. जादूटोणा कायद्यांतर्गत अत्यल्प कालावधीत दाखल झालेले दीडशे गुन्हे हे ही कार्यकर्त्यांच्या कामाची दिशा दाखविणारे प्रतिबिंबच असल्याचे त्यांनी सांगितले. या चवळवळीत बळ भरण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीला हवे ५ कोटीचे डिझेल

$
0
0


अरविंद जाधव, नाशिक

बाह्य पार्किंग ते अंतर्गत पार्किंग या दरम्यान प्रवाशांची ने-आण करण्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या तीन हजार एसटी बसेससाठी तब्बल आठ लाख लिटर्स डिझेलची आवश्यकता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इंधनाची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पहिल्याच पर्वणी दरम्यान डिझेलपोटीच महामंडळाचे ४ कोटी ८० लाख रुपये खर्ची पडणार आहेत.

पर्वणीसाठी येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना खासगी वाहनांद्वारे बाह्य पार्किंगपर्यंत येता येणार आहे. ही बाह्य पार्किंगची ठिकाणे अंतर्गत पार्किंगपासून किमान ४ ते ८ किलोमीटरच्या अंतरावर आहेत. नाशिक-पुणेरोडवर चिचोंली फाटा परिसरात बाह्य पार्किंग असून, सिन्नर फाटा परिसरात अंतर्गत पार्किंगचे ठिकाण आहे. बाह्य ते अतंर्गत पार्किंग या दरम्यान इतर वाहनांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे बाह्य पार्किंग येथे उतरलेल्या प्रवाशांना अतंर्गत पार्किंगपर्यंत आणण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. पर्वणीसाठी किमान ८० लाख भाविक येणे अपेक्षित असून, त्यातील बहुतांश प्रवाशांचा भार एसटी महामंडळाला वाहावा लागू शकतो. याच दृष्टिकोनातून महामंडळाने तब्बल तीन हजार बसेस नियुक्त केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेस येणार असल्याने त्यांच्या इंधनाची देखील तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर, राहू हॉटेल ते शरदचंद्र मार्केट अशा रस्त्यांचा अपवाद वगळता इतर रस्त्यांवर पेट्रोलपंप आहेत. सध्या, ६१ रुपये २९ पैसे लिटर्स असा डिझेलचा भाव आहे. संबंधित पेट्रोलपंप मालक किती सूट देतात, यानुसार त्या ठिकाणी डिझेल भरावे की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका बसच्या इंधन टाकीमध्ये साधारणतः २४० लिटर्स डिझेल बसते. पर्वणीसाठी तैनात असलेल्या प्रत्येक बसच्या टाकीमध्ये एवढे डिझेल असावे, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजेच एसटी महामंडळाला किमान ७ लाख ७५ हजार लिटर्स डिझेलची आवश्यकता आहे. याशिवाय आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त इंधनाची व्यवस्था केली जाणार आहे. आजमितीस ८ लाख लिटर्स डिझेलची आवश्यकता असल्याचे यावरून स्पष्ट होते. डिझेलची टाकी पूर्ण भरल्यानंतर ती बस एक हजार ते १ हजार १०० किलोमीटर धावू शकते. तिन्ही पर्वणीच्या काळात एसटी महामंडळाला एवढ्याच मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता भासणार आहे. पर्वणीच्या तिसऱ्या दिवशी अमरावती व नागपूर विभागाच्या बसेस वगळता इतर माघारी जाणार असून, या दोन विभागाच्या बसेस नाशिकमध्येच मुक्काम करणार आहेत.

बसेससाठी पार्किंगची सुविधा - पेठ रोडवरील वर्कशॉप परिसरातील १२ ते १५ एकर जागा, महामार्ग बस स्टॉप अंतर्गत पार्किंगजवळील काही ठिकाणे

इंधन साठवणुकीची सोय - बसेससाठी आठ लाख लिटर्स डिझेलची मागणी, डेपो क्रमांक एक व दोन आणि तीन क्रमाकांच्या डेपोमध्ये इंधन साठवण्याची सोय करण्याचा प्रयत्न. या व्यतिरिक्त डिझेल मोबाइल व्हॅन

परजिल्ह्यातून येणाऱ्या बसेस - मुंबई, ठाणे, नाशिक विभागातील सर्व जिल्हे, अमरावती, नागपूर इत्यादी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांना प्रतीक्षा दुभाजकांची

$
0
0

बारदान फाटा, शिवाजीनगर, समृद्धनगर परिसरात वाढला अपघातांचा धोका नामदेव पवार

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरात रुंदीकरणानंतर रस्त्यांनी कात टाकली. मात्र, डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर दुभाजक नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. सातपूर परिसरातील बारदान फाटा, शिवाजीनगर ते समृद्धनगरचा रस्ता दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरून वाहनचालकांना अपघाताची भीती सतावू लागली आहे. याप्रश्नी महाप‌ालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील रस्त्यांची दोन वर्षांपूर्वी दयनीय अवस्था झाली होती. यामुळे सर्वच प्रसार माध्यमांनी सत्ताधारी मनसेवर रस्त्यांच्या खड्डेमय परिस्थितीमुळे धारेवर धरले होते. यात दोन वर्षांपूर्वी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन थाटात पार पडले. मात्र, आता उशिरा का होईना रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळाला. डांबरीकरणापूर्वी अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. काही ठिकाणी रुंदीकरणात जुन्या आणि मोठ्या वृक्षांचा अडथळाही निर्माण झाला. असे असतांनाही महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या आदेशानंतर रस्ते रुंदीकरण आणि डांबरीकरणाची कामे पूर्णत्वाला आली आहेत.

त्र्यंबक रस्त्यावरही दुभाजक नाही

बारदान फाटा, शिवाजीनगर ते समृद्धनगर त्र्यंबकेश्वररोड पर्यंतचा रस्ता तर संपूर्ण दुभाजकांविनाच आहे. तर त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या पपया नर्सरी जाधव संकुल कार्नर ते पिंपळगाव बहुला स्वागत कमानीपर्यंतच्या रस्त्यावरदेखील दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. अंबडलिंकरोड रस्त्यांच्या रुंदीकरणात संपूर्ण रस्त्यावर दुभाजक टाकले आहेत, केवळ नासार्डी नदीच्या पुलापासून तर इस्सार पेट्रोल पंपपर्यंतचा रस्ता दुभाजकांपासून वगळला आहे.

मार्गात झाडांचा अडथळा

बारा वर्षांनंतर होऊ घालतलेल्या ‌सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर सातपूर भागातील रिंगरोडची कामे करण्यात आली. मा, पाहिजे त्या प्रमाणात रस्त्यांची कामे न झाल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये गंगापूररोड रस्त्यावर दुभाजकांसाठी जागा सोडली खरी, परंतु वृक्षांच्या अडथळ्यांमुळे ठेकेदाराला दुभाजकच टाकता आलेले नाहीत. तसेच गंगापूररोडला जेहान सर्कल ते बेंडकुळे मळ्यापर्यंतच दुभाजक ठेवण्यात आले आहेत. पुढील गंगापूर गावापर्यंतचा रस्ता दुभाजक बसविण्यापासून वगळ्यात आला आहे.

डांबरीकरण झालेल्या मात्र, दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर भविष्यात अपघात होण्याची शक्यता होणार असल्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरून गाड्या चालविणेही कठीण झाले आहे. यासाठी महापालिका आयुक्तांनी रस्ते कामांची पहाणी करीत रस्ते रुंदीकरणात दुभाजक टाकण्याचे आदेश देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

महापालिकेने बहुतांश रस्त्यांचे कामे पूर्ण केली. मात्र, यात वाहनचालकांना सध्या वृक्षांचा मोठा अडथळा सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यांमध्ये दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. यामुळे वेगाने येणारी वाहने थेट अंगावर येतात. वेगावर नियंत्रण रहात नाही. वाहने चालवितांना अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. - किशोर गांगुर्डे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images