Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शाही मार्गावर पोलिसांचे लक्ष

0
0

अरविंद जाधव, नाशिक

कुंभमेळ्यात सर्वांच्या आकर्षणचा केंद्रबिंदू असते ती शाही मिरवणूक. साधू महंतांच्या दृष्टीने शाही स्नानाला आगळेच महत्व असते. शाही मिरवणुकीत तब्बल ३ लाखापेक्षा जास्त साधू महंत सहभागी होणार आहेत. शाही मिरवणूक शांततेत होणे प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

प्रशासनाने नियोजनाच्या दृष्टीकोनातून सात प्रमुख विभाग (यात सर्व रस्त्यांचा समावेश), शहर वाहतूक विभाग, स्पेशल ब्रँच, क्राईम ब्रँच, पोलिस कंट्रोल रूम, बॉम्ब शोधक व नाशक स्कॉड, शीघ्र कृती दल (क्युआरटी) अशा पध्दतीने तब्बल १० हजारापेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. यात पोलिस विभागाचे सर्वात जास्त लक्ष शाही मार्गावर असल्याचे दिसते. याठिकाणी तीन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, ३३ पोलिस निरीक्षक, २९९ एपीआय/पीएसआय, २३९ एएसआय, १ हजार ८६७ पोलिस कॉन्स्टेबल, ४५३ महिला महिला पोलिस कर्मचारी, १ हजार ७७ होमगार्डस आणि २५० महिला होमगार्डस तैनात असणार आहेत. बंदोबस्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. प्रशासनाने धुळे रोड, औरंगाबाद-पुणे रोड, मुंबईरोड, त्र्यंबकरोड, पेठ-गंगापूररोड, दिंडोरी रोड, शाही मार्ग असे विभागांचे वर्गीकरण केले आहे. या सर्व विभागासाठी शाही मार्ग वगळता प्रत्येकी एका पोलिस उपायुक्ताची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच साधारणतः तीन ते चार सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. तसेच २० ते ३० या संख्येनुसार पोलिस निरीक्षक, १५० ते २०० एपीआय, तसेच १ हजार ते १५०० पर्यंत पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. पोलिसांच्या मदतीला होमगार्डस देखील असतील.

बीडीडीएस आणि क्युआरटी टीम्स

कुंभमेळ्या दरम्यान घातपाताच्या घटना रोखण्यासाठी तब्बल १३ बॉम्ब शोधक व नाशक पथके (बीडीडीएस) आणि ६ शीघ्र कृती दलाच्या (क्युआरटी) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बीडीडीएसच्या १३ पैकी सात पथके प्रत्येक विभागासाठी, तर उर्वरित रामकुंड, साधूग्राम आणि व्हीआयपी व इतर ठिकाणी तैनात ठेवण्यात येतील. क्युआरटीचे पथके रामकुंड, साधूग्राम, नाशिकरोड, दिंडोरीरोड, मुंबई व त्र्यंबकरोड, तसेच कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात येतील. याबरोबर अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात येणार आहे. सध्या, बंदोबस्त निश्चित करण्याचे काम पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सुरू असून कर्मचाऱ्यांच्या आकड्यात वाढ किंवा घट होऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

वाहतूक शाखेसाठी वेगळा बंदोबस्त

कुंभमेळ्या दरम्यान लाखो वाहने येणार असल्याने पोलिसांनी शहर वाहतूक शाखेसाठी सुमारे ३०० पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात, एक पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, २२ एपीआय किंवा पीएसआय, १५७ एएसआय आणि १७९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. स्पेशल ब्रँच, क्राईम ब्रँच, पोलिस कंट्रोल रूमसाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन हजार द्या, दाखला घ्या!

0
0

विद्यार्थ्यांची पिळवणूक; एजंटांचा सुळसुळाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा आणि तहसीलदार निलंबनास विरोध या प्रक्रियेत गुंतलेल्या जिल्हा प्रशासनातील गोंधळाचा फायदा घेत सेतू केंद्रांना एजंटांनी विळखा घातला आहे. त्यामुळे 'दोन हजार रुपये द्या, एका दिवसात दाखला मिळवा' अशी जाहिरातच एजंटांनी खुलेआम सुरु केली आहे. ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या काळात जिल्हा प्रशासनाने सेतुच्या कारभाराकडे दुर्लक्ष केल्याने या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे.

इयत्ता बारावीचे निकाल लागल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारच्या सरकारी शैक्षणिक दाखल्यांची जमवाजमव विद्यार्थ्यांनी सुरु केली आहे. त्यासाठीच नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, नाशिक रोड, श्री छत्रपती शिवाजी स्टेडिअम, अश्विन नगर, सिडको, महापालिका विभागीय कार्यालय, सातपूर, आणि मेरी क्वार्टर, तारवाला नगर, दिंडोरी रोड, पंचवटी या पाच ठिकाणच्या सेतू केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, सिंहस्थासह विविध कामांमध्ये गुंतलेल्या आणि तहसीलदारांच्या निलंबनामुळे कामाच्या ताणाखाली आलेल्या महसूल प्रशासनाकडून मात्र शैक्षणिक दाखल्यांच्या वितरणाकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एजांटांचा सेतू केंद्रांच्या ठिकाणी सुळसुळाट झाला आहे. 'दोन हजार रुपये द्या, एका दिवसात दाखला मिळवून देतो', असे आमीषच एजंटांकडून दाखविले जात आहे. या प्रलोभनाला विद्यार्थी आणि पालक सर्रास बळी पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे.

सिंहस्थाची कामे

दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सिंहस्थाची कामे मार्चमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र, ती अद्याप पूर्ण न झाल्याने त्याकडेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. परिणामी, सिंहस्थ कामांकडे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अधिक कल आहे.

व्हीआयपींचे दौरे

सिंहस्थ तोंडावर आल्याने मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचे सिंहस्थ कामे पाहणीचे तसेच आढावा घेण्यासाठीचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यामध्ये या व्हीआयपींची व्यवस्था ठेवण्यासह सिंहस्थाची विविध प्रकारची जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.

नॉन क्रिमिलेअर काढण्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. चौकशी केली असता ते १५ दिवासांनी मिळेल असे सांगण्यात आले. येथे मला एका व्यक्तीने एक दिवसात दाखला दिला. त्यासाठी मी त्याला २ हजार रुपये दिले. - मनोज पवार, विद्यार्थी

विद्यार्थी व पालकांनी एजंटांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. थेट सेतूमध्येच अर्ज दाखल करावा. एंजंटसंबंधी आमच्याकडे तक्रार केल्यास आम्ही तातडीने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करु.

- नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी (प्रशासन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

B. Ed.च्या जागा वाढवा

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शिक्षकांना शिक्षणशास्त्र पदविका अर्थात बी.एडची पदविका प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, उपलब्ध जागा पाहता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आणखीन जागा वाढवाव्यात, अशी मागणी पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे.

जिल्हा परिषदेने आरटीई २००९ अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी सुमारे एक हजार पस्तीस प्राथमिक शिक्षकांमधून पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आलेल्या शिक्षकांना मुदतीत शिक्षणशास्त्र पदविका अर्थात बी.एड ची पदविका प्राप्त करणे अनिवार्य असल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.एड अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्याच पदवीधर शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र त्यासाठी त्यांना विहित मुदतीत शिक्षणशास्त्र पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य असल्याने बी.एडची पदवी मिळवणे आवश्यक झाले आहे. यासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बी.एड पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी जागांची संख्या मर्यादित असल्याने पदवीधर प्राथमिक शिक्षकांना बी.एड अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

या आधी मुक्त विद्यापीठाच्या बी.एड प्रवेशासाठी ५० : ३० : २० असे प्रमाण होते. त्यात प्राथमिक शिक्षकांसाठी ५० टक्के, माध्यमिक शिक्षकांसाठी ३० टक्के आणि इतर २० टक्के जागा प्रवेश दिला जात होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात सेवाज्येष्ठता, सध्या घेत असलेली वेतनश्रेणी, प्राप्त शैक्षणिक अहर्ता या बाबी विचारात घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. मात्र असे असले तरीही जागांची संख्या खूपच मर्यादित असल्याने विहित मुदतीत बी.एड पदविका प्राप्त होणार का हा प्रश्न पदवीधर शिक्षकांना पडला आहे.

सद्यस्थितीत पदवीधर शिक्षकांची नेमणूक सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेली असून, जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षकांना बी.एड अभ्यासक्रमात जागा वाढवून देण्याची मागणीही शिक्षकांकडून होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांना मुदतीत बी.एड पदविका प्राप्त करणे अनिवार्य असल्याने मुक्त विद्यापीठात जागा वाढवून देण्याची आणि पदवीधर प्राथमिक शिक्षकांना प्राधान्य देण्याची मागणी आम्ही केली असून यासंदर्भात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. - महारु निकम, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना

स्वतंत्र बॅच

पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा स्तरावर स्वतंत्र बॅचेस तयार करून बी.एड प्रवेशासाठी अधिक जागा मिळाव्यात यासाठी दिल्ली येथील एनसीटीई ची परवानगी आवश्यक असल्याने त्यासाठी आता संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महारु निकम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी होणार प्रदूषणमुक्त

0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरातील गोदावरीनंतर दुसरी महत्वाची मानली जात असलेल्या नंदिनी नदीच्या प्रदूषण मुक्ततेसाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. बाराही महिने पाणी असलेल्या या नदीचा प्रदूषणामुळे श्वास कोंडला गेला होता.

प्रदूषणामुळे नंदिनी नदीला नासर्डी असेही म्हटले जाते. मात्र, या नदीच्या प्रदूषणमुक्ततेसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. नंदिनी नदीची पहाणी कृती समितीने नुकतीच केली. यात येत्या शुक्रवारी (दि. ५) होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनी या नदीची ठिकठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी खास स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील नदींची स्वच्छता करण्याची मोहीम महापालिका व महसूल विभागाने हाती घेतले आहे. यासाठी नाशिक शहरातून जाणारी नंदिनी नदीची पहाणी कृती समितीने केली. यात ठिकठिकाणी नंदिनी नदीत असलेल्या घाण कचरा व साजलेले सांडपाणी काढण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केल्या. तसेच समितीत असलेले राजेश पंडित, गोपाळ पाटील, अंजली पाटील यांनी देखील सूचना मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हस्तांतरण प्रस्ताव पुन्हा महासभेवर

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आठ ते दहा वर्षांपासून प्रलंबित असलेली सिडकोच्या सहाव्या गृहनिर्माण योजनेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महासभेवर चर्चा होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. ९) महासभेचे आयोजन करण्यात आले असून हस्तांतरणाच्या मुद्यावर पडदा पडणार तरी केव्हा असा प्रश्न या निमित्ताने सिडकोवासियांकडून उपस्थित केला जातो आहे.

सिडकोने साधारणत‍ः ८ वर्षांपूर्वी सहाव्या गृहनिर्माण योजनेत साडेचारशे सदनिका बांधल्या. या सदनिका सिडकोच्याच ताब्यात असल्यामुळे महापालिकेला सुविधा देताना अडचण निर्माण होते. त्यात यापूर्वी पाच गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या आहेत; पण ही योजना हस्तांतर करताना सुरवातीपासूनच अडचणी निर्माण झाल्या. येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून योजना हस्तांतर करताना सिडको प्रशासनाने काही रक्कम महापालिकेला द्यावी, अशी मागणी होती. सुरवातीला ही मागणी मोठी होती; पण नंतर नऊ कोटी रुपये प्रशासनाने महापालिकेला द्यावेत, असे ठरले. मात्र, त्यावरही प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी या योजनेच्या बदल्यात प्रशासनाने येथील चार भूखंड महापालिकेला द्यावेत, असे ठरले मात्र पुढे सिडको व महापालिका प्रशासनाचे बिनसतच गेले. अनेकदा हस्तांतराचा अंतिम निर्णय लांबल्यामुळे या महासभेच्या चर्चे दरम्यान काय होते, याकडे सहाव्या योजनेतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सिडकोची सहावी योजना हस्तातंरीत करण्याबाबत सिडकोच्या उपाध्यक्षांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, यासाठी महासभेचा ठराव आवश्यक आहे.

महासभेचा मंजूर ठराव व्यवस्थापकीय संचालक यांच्या मंजुरीने सिडकोच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल. यानंतर, प्रशासन मंजुरीसह पुढील कार्यवाही पार पडेल. यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या महासभेच्या ठरावात आणि सद्य स्थितीत सिडकोच्या प्रशासकीय धोरणात बदल झाल्याने येत्या महासभेत यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटपौर्णिमा साजरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

दिर्घायुषी म्हणून नावलौकिक असलेल्या वडाच्या झाडाकडे वटसावित्री पौर्णिमेच्या ‌निमित्ताने सौभाग्याचं अखंड दान मागितले. नाशिक व देवळाली परिसरातील विवा‌हितांनी सावित्रीप्रमाणेच आपल्याही पतीला चे आयुष्य वाढावे म्हणून वडाला सूत गुंडाळत पूजा अर्चना केली.

देवळाली कॅम्प परिसरात वडाची अनेक झाडे आहेत. त्यामुळे नाशिकरोड तसेच देवळाली कॅम्प परिसरातील अनेक महिलांनी या वडांभोवती गर्दी करीत या प‌वित्र मानल्या जाणाऱ्या झाडाची मनोभावे पूजा केली. देवळालीत प्राचीन काळापासून असणाऱ्या असंख्य वडाच्या झाडाला विवाहित महिलांनी आपल्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली. लामरोड, रेस्ट कॅम्प रोड, हिल रेंज परिसरात असणाऱ्या अनेक वडांच्या झाडासमोर महिलांनी गर्दी केल्याचे दिसून आले. सुहासिनी एकमेकांना हळद, कुंकू देत फळे देत एकमेकींची ओटी भरली. नववधूंनीही आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

पंचवटी परिसरात वटसावित्री पौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. परिसरातील विडीकामगार वसाहत, दिगंबर सोसायटी, अमृतधाम, सरस्वतीनगर, औदुंबरनगर, गणेशनगर, हिरावाडी, मेरी कॉलनी, तारवलानगर, लामखेडे मळा, स्नेहनगर, म्हसरूळ, पोकर कॉलनी आदी सर्व भागातील सुवासिनींनी सकाळपासून वडाच्या पूजेसाठी गर्दी केली. सुंदर साड्या परिधान केलेल्या विवाहित महिला पुजेच्या ठिकाणी एकमेकींना वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा देतांना दिसून आल्या. तसेच काही नवविवाहित तरुणींनी मोबाईल आणि व्हॉटअपवरूनही शुभेच्छांचे मेसेज केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाक्यावर आनंदोत्सव!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारने काही टोल नाक्यांवर कार, पिकअप आदी छोटी चारचाकी वाहने तसेच एसटी बसला टोलमाफी देण्याच्या केलेल्या घोषणेनुसार सोमवार १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मालेगांव- मनमाड- येवला-कोपरगाव राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाका तसेच गवंडगाव नजीकचा टोलनाका ठिकाणी त्याचा वाहनचालकांना दिलासा मिळाला. युती सरकारने दिलेला दिलासा बघता येवला तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या उत्साही पदाधिकाऱ्यांनी सकाळी पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाका गाठत मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या छोट्या वाहनचालकांसह एसटी बस चालकांचे स्वागत केले. त्यात कुणी गुलाबपुष्प दिले तर, कुणी मिठाई देत वाहनचालकांचे तोंड गोड केले. सुरुवातीला येवल्यातील भाजपा पदाधिकारी याबाबत अग्रेसर दिसत असतानाच त्यांच्या कार्यक्रमानंतर अवघ्या काही मिनिटांतच येवल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील या टोल नाक्यावर आपला मोर्चा वळवीत पक्षाचे झेंडे फडकावीत फटाके फोडले. जणू काही मनसेच्या आंदोलनामुळेच टोलमाफी मिळाली अशा अविर्भावात मनसे पदाधिकाऱ्यांचा जोश दिसत होता.

मनमाड-नगर राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावर सोमवारी कोपरगावचे बिपीन कोल्हे यांनी आपल्या समर्थकांसह मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या छोट्या वाहनचालकांसह एसटी बस चालकांचे स्वागत केले. यावेळी वाहनचालकांना मिठाई वाटप करण्यात आली. त्यात भाजपचे मनोज दिवटे यांच्या हस्ते मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज दिवटे, सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, युवा शहराध्यक्ष राम बडोदे, विशाल काथवटे, नगरसेवक बंडू क्षीरसागर, सुनील काबरा, राजेंद्र नागपूरे, पंकज पहिलवान, सुनील बाबर, कांचन पहिलवान, नाना मोरे, जेष्ठ नेते रमेशमामा भावसार, संजय बाबर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झाले होते. त्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष गोरख साताळकर, जेष्ठ नेते श्रीकांत गायकवाड, पप्पु सस्कर, तालुका सरचिटणीस आनंद शिंदे, नगरसेवक बंडू पैलवान क्षिरसागर आदींनी टोलनाका गाठत वेगळ्या कार्यक्रमात वाहनचालकांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

चढाओढ

भाजपाचे येवल्यातील पदाधिकारी टोल नाक्यावरून माघारी फिरतात न फिरतात तोच येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावर येवल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर आपला मोर्चा वळवीत पक्षाचे झेंडे फडकावले. कोपरगाव-मनमाड मार्गावरील येवला टोल नाका काही वाहनांसाठी बंद झाल्याने टोल धाड थांबली असे म्हणत येवल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जावून वाहन चालकांना पेढे वाटून जल्लोष केला. जणू काही मनसेच्या आंदोलनामुळेच टोलमाफी मिळाली अशा अविर्भावात मनसे पदाधिकाऱ्यांचा जोश यावेळी दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलणार टपऱ्यांचा ‘लूक’

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंडासह शहरातील बहुतांश भागातील टपऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर काढून टाकण्यात आल्या आहेत. यातील काही टपऱ्यांचे सिंहस्थानंतर पुनर्वसन केले जाईल. हे पुनर्वसन करताना टपरीधारकांना एकाच आकाराच्या व रंगाच्या टपऱ्या महापालिकेने पुरवाव्या आणि त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन सुरू करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले. रामकुंड परिसरातील अनेक टपऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या असून त्यातून अस्ताव्यस्तपणा दिसून येतो. महापौरांनी उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. रामकुंड परिसरातील टपऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत. त्याऐवजी एकाच आकार व रंगाच्या तयार करण्याची सूचना महापौरांनी केली. महापालिकेने पुरवलेल्या टपऱ्यांच्या आकारात बदल करण्याचा प्रयत्न केला गेल्यास किंवा अटी शर्थीचे भंग करणाऱ्या व्यावसायिकाच्या टपऱ्या जमा करण्याच्या तरतुदीचा या प्रस्तावात समावेश करावा. तसेच उंच वाढणारे सरू, निलगिरी किंवा अशोक यासारखे झाडे व्यावसायिकांना देण्यात येतील. या झाडांना वाढविण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर असेल. जवाहर योजनेतंर्गत महापालिकेनेच दिलेल्या जागेवरील मांडणीधारकांना (छोटी टपरी) हटवण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्यादृष्टीने गरजेचे असेल म्हणून कारवाई झाली. आता, महापालिकेने किलबिल स्कूलमार्गावरील रुंद रस्त्याच्याकडेला पुर्नवसन करून देण्याची मागणी १५ ते २० मांडणीधारकांनी महापौरांकडे केली आहे. आमदार ​​सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ​मांडणीधारकांच्या शिष्टमंडळाने महापौराची भेट घेतली.

'रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा'

त्र्यंबकेश्वर येथील घाटाजवळील जमिनीचे सपाटीकरण करण्यात येऊन रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी दिले. तसेच, सिमेंट रस्त्यांच्या साइडपट्टयांची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असेही त्यांनी बजावले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कामांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पोलिस उपअधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यू. एन. निर्मल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदी उपस्थित होते. कुशवाह यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घाटाजवळ रेलींग करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. ते म्हणाले, शहरातील मोकळ्या जागांची स्वच्छता करण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात यावे. गोरक्षनाथ घाटाजवळील नदीपात्राची स्वच्छता करण्यात यावी. सार्वजानिक स्वच्छतागृहांना त्वरित रंगरंगोटी करण्यात यावी आणि आखाड्यात उभारण्यात आलेल्या शेडमध्ये विद्युत कनेक्शनचे काम तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

शाहीमार्गावर तीन 'थांबे'

भाविकांची अतिरिक्त गर्दी रोखण्याकरीता शाही मार्गावर तीन ठिकाणी 'होल्ड अॅण्ड रिलीज पॉईंट' तयार करण्यात येणार आहे. यामुळे घाटावरील गर्दी नियंत्रणात आणताना प्रशासनाला मदत होऊ शकते. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीसाठी तब्बल तीन लाख साधू महंत हजर राहणार असून भाविकांच्या संख्येची यात भर पडणार आहे. नवीन शाही मार्गानुसार शाही मिरवणूक लक्ष्मी नारायण मंदिर-तपोवन रस्त्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, देवी चौक-गणेशवाडी रस्त्याने आयुर्वेद महाविद्यालय- गाडगे महाराज पुलालगतच्या रस्त्याने नदी पात्रापर्यंत, संत गाडगे महाराज पुलाखालून, सरदार चौक-कपालेश्वर मंदिर चौक-रामकुंड अशी प्रवास करेल. या पूर्वीच्या शाहीमार्गावरील सरदार चौक येथील उताराचा भाग नवीन शाही मार्गातून वगळण्यात आला आहे. गत कुंभमेळ्यावेळी सरदार चौकातच चेंगराचेंगरीची घटना घडून २९ भाविकांना जीव गमवावा लागला होता. तीव्र उतारामुळे ही घटना घडल्याचे आक्षेप तत्कालीन चौकशी समितीने नोंदवले होते. त्यानुसार या मार्गात बदल करण्यात आले. याशिवाय, काट्या मारुती चौक, गणेशवाडी देवी मंदिर, आयुर्वेदीक कॉलेज अशा तीन ठिकाणी होल्ड अॅण्ड रिलीज पॉईंट तयार करण्यात येणार आहे. एका तासात रामकुंडासह शहर परिसरातील इतर सर्व घाटांवरून किती भाविक स्नान आटोपून बाहेर पडतील, याचे अंदाजाचे गणित पोलिसांनी आखले आहे. आणि त्यादृष्टीने या होल्ड पॉईंटचा वापर केला जाणार आहे. लक्ष्मी नारायण मंदिर ते रामकुंड या तीन किलोमीटरच्या एखाद्या टप्प्यात किती गर्दी झाली हे पाहूनच भाविकांना सोडण्याचे नियोजन आखले जाईल. यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे शक्य होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गर्दीचे नियंत्रण

शाही मार्गावर पाच पोलिस चौकी, ११६ लाऊडस्पीकर, १ हजार ४४४ मीटर बॅरकेडींग, ११ वॉच टॉवर उभारून गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. स्नान करून भाविक रामकुंड-कपालेश्वर मंदिर चौक-खांदवे सभागृह रस्त्याच्या मार्गाने मालवीय चौक-पुढे पाथरवट लेनने गजानन चौक, पुढे गुरुद्वारा रस्त्याने काट्या मारुती चौक-एसटी डेपो लगतच्या मुख्य रस्त्याने नवीन आडगाव नाका चौक, राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद नाका-औरंगाबाद रोडने जनार्दन स्वामी आश्रम चौक-पुढे तपोवन रस्त्याने लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत असा प्रवास करतील. रामकुंडाकडे येण्याचा आणि जाण्याचा मार्ग पूर्णतः वेगळा असल्याचा फायदा होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांना सिंहस्थाची पर्वणी

0
0

गायत्री काळकर, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी भारतभरातील पर्यटक सज्ज झाले आहेत. परंतु, यंदा मात्र हा कालावधी परदेशी पर्यटकांसाठीही अनोखी पर्वणीच ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याबरोरच वाइन टुरिझमची सफरही या कालावधीत अनेक परदेशी पर्यटकांना करता येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध देशातील पर्यटकांनी नाशिकमध्ये आपले बुकिंग केले आहे.

देशभरातील भाविकांची व पर्यटकांची कुंभमेळ्यादरम्यान होणारी नाशिकवारी नाशिककरांना काही नवीन नाही. परंतु, यंदाच्या कुंभमेळ्यात मात्र परदेशी पर्यटकांनीही नाशिक दौरा आयोजित केला आहे. ध्वजारोहणापासून शाही स्नानाच्या विविध तारखांना अनेक परदेशी पर्यटक ना‌शिकमध्ये दाखल होणार आहेत. १४ जुलै, १४ ऑगस्ट, २६ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर, १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर अशा महत्त्वाच्या तारखांना परदेशी पर्यटक नाशिकमध्ये असणार आहेत. जर्मनी, जपान, हाँगकाँग, अमेरिकन नागरिकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. तसेच ११ ते २५ सप्टेंबरदरम्यान दोन अमेरिकन तरुणी खास कुंभमेळ्याच्या अभ्यासासाठी नाशिकमध्ये असणार आहेत.

कुंभमेळ्याबरोबरच या परदेशी पर्यटकांसाठी वाइन टूरचे आयोजनही करण्यात आले आहे. कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर नाशिक परिसरातील वायनरीजना हे पर्यटक भेट देणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या आध्यात्मिक महतीबरोबर शहर विकासाचा आलेखही या परदेशी पर्यटकांना जाणून घेता येणार आहे. कुंभमेळा ही नाशिकची पारंपरिक आणि धार्मिक ओळख असली तरी परदेशी पर्यटकांना त्याकडे आक‌र्षित करण्याचे काम मात्र वाइन कॅपिटल या नाशिकच्या तयार होत असलेल्या नवीन ओळखीने साध्य केले आहे.

यापूर्वी बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान नाशिक केवळ एक धार्मिक स्थळ म्हणूनच प्रामुख्याने ओळखले जात होते. त्यानंतर इथे झालेल्या औद्योगिक‌ विकासाने आणि वाइन इंडस्ट्रीच्या उदयाने नाशिकची वेगळी ओळख निर्माण झाली. इंटरनेट व सोशल मीडियाच्या विस्तारामुळे ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचण्यास वेळ लागला नाही. त्यामुळेच परदेशी पर्यटकांच्यादृष्टीने वाइन कॅपिटलमध्ये होत असलेल्या या आध्यात्मिक पर्वणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वाइन टुरिझमपेक्षाही कुंभमेळा काय असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता विदेशी नागरिकांमध्ये अधिक असल्याची माहिती वाइन एस्कॉर्ट मनोज जगताप यांनी दिली. परदेशी पर्यटकांसाठी अध्यात्म आणि विकासाचा एक अनोखा संगम अनुभवण्याची ही एक पर्वणीच असणार आहे.

नाशिकला कुंभमेळ्यादरम्यान भेट देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ४४ परदेशी पर्यटकांचे दोन महिन्यांमध्ये बुकिंग झाले आहे. कुंभमेळ्यासोबतच नाशिकच्या वाइन टुरिझमच्यादृष्टीनेही ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. - मनोज जगताप, वाइन टूर एस्कॉर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाडा कायम

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्यात पाऱ्याच्या उच्चांकानंतर शहरात आता दोन दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आहे. तापमान घटण्याची आशा नागरिकांना असली तरी उकाड्याचे प्रमाण कायम आहे. सोमवारी हवामान खात्याने कमाल तापमान २४ अंश आणि किमान ३८ अंश नोंदविले.

सोमवारी अवकाश निरभ्र होते. पुढील आणखी दोन दिवस अवकाश निरभ्रच राहील. ६ जून रोजी अवकाशत ढग दाटून येण्यास सुरुवात होईल. तर ७ जून रोजी हलक्या सरींसह यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या पावसची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आता जून महिन्यास सुरुवात झाल्याने पावसाच्या पहिल्या सरींचे वेध नागरिकांना लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा ७ जून रोजी पावसाने पहिली हजेरी लावणे अपेक्षित आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा चढता राहिला. यात दिवसेंदिवस भर पडून मे महिन्याच्या मध्यावर ४५ अंशांपर्यंत शहराच्या तापमानाने मजल गाठली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडफेकीआड लूट

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैलेश सासे या तरूणाच्या खूनाच्या घटनेनंतर साठे चौकातील किटकॅट वाईन शॉप दुकानाजवळ दगडफेक करण्यात आली. रविवारी रात्री घडलेल्या या दंगलीचा फायदा घेत वाईन शॉपमधील साडेसात लाख रूपये लुटले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

याप्रकरणी भद्रकाली पोलिस दिलेल्या माहितीनुसार, भोई गल्ली येथे राहणाऱ्या शैलेश सासे या तरूणाचा रविवारी रात्री तीन अज्ञात तरूणांनी चाकू हल्ला करून खून केला. मासे विक्रीचा व्यवसाय करणारा शैलेश भोई गल्ली येथे राहत होता. शैलेशवरील हल्ल्याची माहिती समजताच भोई गल्लीतील जमावाने सुरूवातीस साठे चौक व नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. दरम्यान, साठे चौक येथे दगडफेक व तोडफोडीचा प्रकार सुरू असताना भोई गल्ली येथे राहणाऱ्या सनी जालिंदर सासे व राहूल देवा ठाकरे या दोघांनी किटकॅट वाईन शॉपमध्ये घुसून गल्ल्यात ठेवलेले साडेसात लाख रूपये चोरी केले. दगडफेकीच्या घटनेने घाबरलेले वाईन शॉपचे मॅनेजर व नोकर आतल्या बाजूस लपले असताना चोरीचा प्रकार घडला. सुदैवाने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सनी व राहुलचा सहभाग असल्याचे निष्पण झाल्याने पोलिसांनी त्यांना मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रूपये जप्त करण्यात आले असून, त्यांना संध्याकाळी कोर्टासमोर हजर करण्यात आले. चोरी केलेली इतर रक्कम जप्त करण्याचे काम सुरू असल्याने सरकारी वकीलांनी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजुचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

खुनातील आरोपी फरार

दरम्यान, शैलेश सासे खून प्रकरणातील तिघा संशयिताची ओळख पटली असून, यातील एकावर पूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खुनाच्या घटनेनंतर संशयितांनी फरार झाले असून, पोलिसांचे दोन ते तीन पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. संशयितांची ओळख पटली असल्याने ते जास्त काळ चकमा देऊ शकणार नाही, असे तपासी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लूट 'अंधारातच'

पंड‌ित कॉलनी परिसरातील ठक्करनगर येथे झालेल्या १७ लाख ७६ हजार रूपयांच्या लूट प्रकरणात पोलिसांना मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे सापडलेले नाहीत. खंडू शिरसाठ या वाहनचालकाला मारहाण करीत दोन बाईकवर आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळीने रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पैसे लंपास केले होते. लुटीचे पैसे एका मद्य व्यवसायिकाचे असून, त्यांचे शहर व जिल्ह्यात मिळून तब्बल १५ वाईन शॉप्स आहेत. यातील काही वाईन शॉप्समधील पैसे घेऊन शिरसाठ मद्य व्यावसायिकाच्या घरी चालले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रॉम्प्टन’ प्रश्नी आज चर्चा

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन आठवड्यांपेक्षाही अधिक कालावध‌ीपासून क्रॉम्प्टन ग्रीव्हज या आघाडीच्या कंपनीत धगधगत असलेल्या संपाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी मध्यस्थी करणार आहेत. सीटूने केलेल्या आवाहनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच मंचावर कंपनी व्यवस्थापन आणि संपकर्ते कामगार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आज (दि.३) दुपारच्या बैठकीत करणार आहेत.

वेतनावाढीच्या कराराहून क्रॉम्प्टनमध्ये सुरू झालेला संप चिघळत चालला आहे. संपकर्त्यांचा संपच बेकायदेशीर असल्याचा दावा करीत कंपनीने नाशिकच्या औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. तर, बहुसंख्य सदस्यांचा दावा करीत सीटू प्रणित युनियनने त्यांच्याशीच पगाराच्या कराराविषयी बोलण्याचा मुद्दा अग्रणी ठेवला आहे. विशेष म्हणजे सीटू प्रणीत आणि आयटक प्रणीत या दोन्हीही समान विचारधारेच्या युनियन्समधील मतभेदांमुळे तोडगा निघणे मुश्कील झाले आहे. या संदर्भात कायद्याच्या चौकटी न ओलांडण्याची कंपनी व्यवस्थापनाची भूमिका आहे.

संप छेडल्यानंतर कंपनीकडून काही कामगारांवर हेतूपुरस्सर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा सीटू प्रणीत युनियनचा आरोप आहे. या कामगारांवरील कारवाई रद्द करावी, सीटू प्रणीत युनियनशीच पगार कराराची बोलणी करावी यासह विविध मागण्या संपकर्त्यांनी लावून धरल्या आहेत. या संपामध्ये कामगार उपायुक्तांसह स्थानिक खासदार आणि आमदारांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यास यश आलेले नाही. अंबड पोलिसांनीही कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत चर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या चर्चेसही व्यवस्थापनाच्या वतीने प्रतिनिधी उपस्थित राह‌िले नाहीत. यामुळे ही चर्चा बारगळली आहे.

चर्चेचे फलित काय ?

शहराच्या औद्योगिक वर्तुळातील आघाडीच्या कंपनीत सुरू झालेला संप मिटावा, ही अपेक्षा उद्योग वर्तुळाकडून करण्यात येत आहे. यासाठी औद्योगिक संघटनांसह लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनानेही प्रयत्न केले. मात्र या तीन आठवड्यांच्या कालावधीत चर्चा घडून आलेली नाही. संपकर्त्यांच्या भूमिकेवर कायदेशीर मुद्द्यांच्या आधाराने बोट ठेवत कंपनीने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच याबाबत सुनावणीही होणार आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने या विषयावरील चर्चेत सहभागी व्हावे का, असा सवालही कंपनी व्यवस्थापना समोर असणार असल्याची चर्चा आहे. याच भूमिकेतून यापूर्वीच्या चर्चेत कंपनी व्यवस्थापन सहभागी झालेले नाही. यामुळे आज जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बोलाविलेल्या बैठकीत व्यवस्थापनाच्या वतीने कुणी उपस्थित राहणार का? असाही सवाल कामगारांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक निवडणूक

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत चुरशीच्या बनलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर बुधवारी (दि. ३) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी इच्छुकांची तयारी केली असून जिल्हाभरातील बँकेच्या सभासद आणि खातेदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

निवडणुकीसाठी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येईल. सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत अर्जांची छाननी, ११.४५ ते १२ वाजेदरम्यान अर्जमाघारी झाल्यानंतर दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत मतदान होणार आहे. यानंतरच्या टप्प्यात मतमोजणी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली.

अध्यक्ष व उपाध्यक्षपद वर्षभराचे ठेवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांसह माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या निवडणुकीत रस घेतल्याने निवडीबाबत चुरस वाढली आहे. सद्यस्थितीत अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्या दोन्हीही पॅनल्सकडे नसलेले बहुमत आणि अध्यक्षपदावरील दावेदार नावांना काही तटस्थ संचालकांचा असणारा विरोध यामुळे आजच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचे चित्र अनिश्चितच आहे. ऐनवळी सत्तेच्या सारीपाटावरील बदलणारे मोहरे आडाख्यांची दिशाही बदलून टाकण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल : सकाळी ११ ते ११.३०

अर्ज छाननी : सकाळी ११ ते ११.४५

अर्ज माघारी : सकाळी ११.४५ ते १२

मतदान : दुपारी १२ ते १२.४५

मतमोजणी : दुपारी १२.४५ पासून पुढे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत होणार फेरबदल?

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतानांच जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले. येत्या काळात पक्ष विस्तार करण्यासोबतच शेतकऱ्यांचा प्रश्नांवर तीव्र आंदोलन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

अॅड. पगार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत जिल्हाभर 'राष्ट्रवादी'चे संघटन उभारले असून त्यामुळेच गेल्या पंचवार्षिकमधील तीन आमदारांची संख्या मोदी लाट असतांनादेखील चारवर नेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक क्रमांकाची मते 'राष्ट्रवादी'ला मिळाली आहेत. राज्यात व केंद्रात सतांत्तर झाल्याने जिल्हाध्यक्षपदाची दुसरी इनिंग सुरू करतांना आगामी काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी भाजपा सरकारला जागे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही पगार यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी उदासीन असल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे पगार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मॅगीविरोधी मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मॅगी' या नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टवरून देशभरात उठलेल्या वादळावरून शहरातही याविरुद्ध मोहीम सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे नाशिकमध्ये या पार्श्वभूमीवर सर्व्हे करण्यात येत असून विविध ठिकाणांहून याचे नमुने गोळा केले जात आहेत. येत्या काही दिवसात हे सर्व नमुने अभ्यासून पुढे कारवाई केली जाणार आहे.

शहरातील विविध ठिकाणांहून हे नमुने गोळा करण्यात येणार आहे. या सर्व्हेमध्ये सर्व नमुन्यांची तपासणी होणार आहे. 'मॅगी'मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्यानंतर उत्तर प्रदेशातील एफएसडीए या अन्नपदार्थ नियंत्रक यंत्रणेने बाराबंकी येथील स्थानिक कोर्टात नेस्ले कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या कारवाईनंतर मॅगीने भारतातील मॅगीची सर्व पॅकेट्स परत मागवली होती. फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड‍्स ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फेही याबाबत सर्व्हे सुरू झाला आहे. तर, 'मॅगी'ची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीटी झिंटा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठीच राज्यभरात मॅगीचे नमुने अभ्यासले जाऊन त्यात आढळणाऱ्या पदार्थांवरून पुढील कारवाई केली जाणार आहे. यामध्ये मॅगीमधील एमसीजी आणि शिसे याव्यतिरिक्त इतर नमुन्यांचीही तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. केरळमध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.

तपासणी सुरूच!

महाराष्ट्र एफडीएनेही पंधरवड्यापूर्वी मुंबई, पुणे व नागपूर येथून मॅगीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची मुंबई व पुणे येथील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू आहे. तपासणीचे निष्कर्ष अद्याप हाती आलेले नाहीत, असे एफडीएचे सहआयुक्त वंजारी यांनी सांगितले. नमुने तपासणीत नैसर्गिक घटक व रासायनिक स्रोत यांच्यासाठी वेगवेगळी प्रक्रिया करावी लागत असल्याने विलंब होत असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मॅगीचे नाशिक शहरातील नमुने जमा करून त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. या मॅगीच्या नमुन्यांमधील निकष निघाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. - चंद्रकांत पवार, जॉईंट कमिशनर, अन्न व औषध प्रशासन

दिल्लीत मॅगीचे नमुने 'असुरक्षित'

मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने देशभरात 'मॅगी'च्या नमुन्यांची तपासणी सुरू असतानाच, दिल्लीतील 'मॅगी'चे नमुने असुरक्षित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे 'मॅगी'ची निर्माती कंपनी नेस्ले इंडियाच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी दिल्ली सरकारने चालवली आहे. दिल्ली सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याचवेळी केरळ सरकारने 'मॅगी'वर बंदी घालत राज्यभरातील दुकानांमधून 'मॅगी'ची पाकिटे जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. एकीकडे दिल्ली व केरळ सरकारने 'मॅगी' विरोधात कठोर कारवाई सुरू केली असतानाच, हरयाणा सरकारने राज्याच्या विविध भागांतून 'मॅगी'चे नमुने जमा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगाल सरकारनेही या प्रकरणी आज, बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दिल्लीतील 'मॅगी'चे नमुने असुरक्षित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे 'मॅगी'ची निर्माती कंपनी 'नेस्ले इंडिया'च्या विरोधात कारवाई करण्याची तयारी दिल्ली सरकारने चालविली आहे. दिल्ली सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदावरी स्वच्छता मोहीम

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध स्तरावर लोक एकत्र येऊन शहरात स्वच्छता करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येत आहेत. नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संस्थांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून, यामध्ये नाशिककरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नद्यांची स्वच्छता करण्याबरोबरच संवर्धनासाठी वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवले जाणार आहेत. नाशिकच्या जनतेसाठी गोदावरी जीवनवाहिनी असून, गोदावरी स्वच्छता मोहिमेसाठी नागरिकांनी ५ जून रोजी एकत्र यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. नाशिककर गोदावरीचे पाणी वापरतात, मात्र नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यात फारसा सहभाग नोंदविला जात नाही. नदीचे पाणी निर्मळ रहावे म्हणून नदी किनारी जाऊन स्वच्छतेसाठी योगदान देण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांना ५ जून रोजी सकाळी पावणेसात वाजता हजर राहून नदीची सेवा करण्याची चांगली संधी आहे. शहरातील अनेक नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रमुख अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून नदी स्वच्छता अभियान राबविणार आहेत. नागरिकांनी झाडू, कचरा भरण्यासाठी गोणी, हातमोजे, आदी साहित्यासह उपस्थित राहून सेवावृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एका व्यक्तीने दहा किलो कचरा काढल्यास पंधरा हजार मनुष्यबळ एका दिवसात १५० टन कचरा स्वच्छ करू शकेल, त्यासाठी सर्व नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था किंवा मंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्षात २३१९९१५ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचा सहभाग

हरित कुंभअंतर्गत नाशिकमधील सेवाभावी संस्था तसेच प्रशासनाचा सहभाग असणार आहे. यामध्ये नासर्डी आणि वाघाडी या गोदावरी नदीला मिळणाऱ्या नद्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यामध्ये या दोन्ही नद्यांच्या उगमस्थानापासून ते गोदावरीतील संगमापर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेमध्ये विविध टप्प्यांवर कामाचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणदिनानिमित्त नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संस्थांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये वनविभाग आणि संस्था एकत्र येऊन वनमहोत्सव साजरा करणार आहे. सातपूर-गंगापूर भागातील डोंगरावर लोकसहभागातून दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला भाविकांचे काय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रशासनाने योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. महिला संन्यास्तांसोबत भाविक महिलांना गोदावरी स्नानाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने काही नियोजन करणे आवश्यक आहे', असे मत श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद् गुरु श्री वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत त्यांनी संवाद साधला.

संन्यास घेतल्यानंतर स्त्री पुरुष असा भेद नसतो हे वेणाभारती यांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु समाजाच्यादृष्टीने मात्र हा भेद इथेही लागू केला जातो. त्यामुळे पुरुषांपेक्षा संख्येने कमी असल्या तरी आज महिला संन्यास्तांची संख्याही नोंद घेण्यासारखी आहे. विविध आखाड्यांमध्ये शाही स्नानादरम्यान त्यांची उपस्थिती असल्याचे त्या म्हणाल्या. महिला संन्यास्तांसाठी कुंभमेळ्यादरम्यान वेगळी व्यवस्था आजवर करण्यात आलेली नाही. त्याची तशी फारशी गरज नसली तरी महिला भाविकांसाठी मात्र अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुरुष साधुसंतांच्या स्नानाच्या वेळेनंतर काही वेळाने महिला संन्यस्तांना राखीव वेळ दिल्यास त्यांच्यासोबत महिला भाविकांनाही हा लाभ घेणे शक्य होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रशासनाच्या पातळीवर रंगरंगोटी, रस्ते, वाहतुकीच्या सेवा अशी कुंभमेळ्याची विविध कामे सुरू आहेत. परंतु कुंभमेळ्याचे अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्या दृष्टीने कोणतीच तयारी सुरू नसल्याचे मत वेणाभारती यांनी व्यक्त केले. गोदावरी नदी ही कुंभमेळ्याचे केंद्रस्थान असूनही तिच्या स्वच्छतेकडे व प्रदूषणमुक्तीकडे कानाडोळा केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आध्यात्मिक पातळीवर कुंभमेळ्याचे महत्त्व जाणून घेऊन त्यादृष्टीने तयारी होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतभरातून येणारे साधुसंत नाशिकचा भौतिक विकास पाहण्यासाठी नव्हे तर गोदीवरीमध्ये स्नान करण्यासाठी येणार असल्यामुळे गोदावरी स्वच्छता आणि कुंभमेळ्याचा मूळ हेतू प्रशासनासह नाशिककरांनीही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. शहराचा विकास गरजेचाच आहे, परंतु तो साधण्याच्या नादात कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व कमी करणे योग्य नाही असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ कोटींची अफरातफर

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदीकडे लेखा विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाभरात सुमारे १३ पतसंस्थांमध्ये सुमारे १५ कोटींच्या रकमेची अफरातफर झाल्याची आकडेवारी सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी ४३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती लेखा विभागाच्या सुत्रांनी दिली.

जिल्हास्तरीय शासकीय कृती समितीची प्रत्येक महिन्यात बैठक होते. यंदा मात्र या बैठकीला तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर मुहूर्त लागला. अप्पर जिल्हाधिकारी पालवे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील अडचणीतील नागरी बँका आणि पतसंस्था यांच्यावरील कायदेशीर कारवाईबाबत चर्चाही या बैठकीत करण्यात आली.

शासकीय लेखा परीक्षण विभागाने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रलंबित दाव्यांचे निकाल लवकर लावण्यात यावेत यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असा सूरही या बैठकीत निघाला. श्रीराम बँकेमध्ये ससुमारे ७० कोटी ६३ लाखांच्या अफरातफरीचा गुन्हा प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. झुलेलाल पतसंस्थेच्या १७ कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विनायक सहकारी पतसंस्थेवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तर कपालेश्वर पतसंस्थेच्या जप्त मालमत्ता विक्री संदर्भात पाठपुरावा करण्याचाही निश्चय यावेळी करण्यात आला. श्रीराम बँकेची कलम ८८ ची चौकशी सेवानिवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकांनीच करावी, क्रेड‌िट कॅपीटल पतसंस्थेच्या अवसायक मंडळाने चार्ज घेऊन कामकाज त्वरीत सुरू करण्यात यावे, साही निर्णय यावेळी घेण्यात आला. अग्रसेन पतसंस्थेच्या कलम ८८ ची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीसाठी अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, समितीचे प्रभारी सचिव गोपाळराव मावळे, नाशिक प्रांत रमेश मिसाळ, शासकीय लेखा परीक्षक टी. जी. वरखेडे, विशाल ठाकूर, भूषण जाधव यांसह अधिकारी व प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

सहकार विभागाच्या विकासास मारक ठरणाऱ्या अपप्रवृत्तींवर कायदेशीर कारवाईची नितांत गरज आहे. कारवाईच्या भूमिकेतून या अपप्रवृत्तींवर वचक बसवा, या दृष्टीने दीर्घ कालावधीनंतर पार पडलेली जिल्हास्तरीय शासकीय कृती समितीची बैठक महत्वाची आहे. - पां.भा.करंजकर, अशासकीय सदस्य, जिल्हास्तरीय शासकीय कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरातून चंदनचोरी

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराचे ग्रामदैवत असलेल्या मुंबई नाका परिसरातील श्री कालिका माता मंदिराच्या आवारात मंगळवारी पहाटेच्या सुमाराला चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे जगदंबेच्या काकड आरतीसाठी जमत असलेल्या भाविकांना न जुमानता चंदनाचे झाड तोडून त्यांनी खोड पळवून नेले.

मंदिराच्या आवारातील चंदनाचे आठ फूट उंचीचे झाड मात्र चोरट्यांच्या नजरेत आले. पहाटे पाच वाजेच्या सुमाराला या मंदिरात काकड आरती होते. मंगळवारीही पहाटेच्या सुमाराला आरतीची लगबग सुरू असताना मंदिराच्या गेटमधून प्रवेश करीत चंदन चोरट्यांनी कुऱ्हाडीच्या सहाय्याने चंदनाच्या वृक्षावर जोराचे प्रहार केले. या चार चोरट्यांच्या प्रहाराने आठ फुटी वृक्ष काही मिनिटांतच कोसळला. हा प्रकार लक्षात येऊन भाविक व पुजाऱ्यांनी प्रतिकार करेपर्यंत चंदन वृक्षाचे खोड घेऊन या चोरट्यांनी पोबारा केला. चोरटे मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. याबाबत श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कुठे आहेत?

श्री कालिका देवी मंदिर परिसर हा शहराचा मध्यवर्ती परिसर आहे. येथून जवळच असलेले महामार्ग आणि ठक्कर बझार ही दोन्हीही बसस्थानके, मुंबई आग्रा महामार्गाकडे जाणारे मार्ग आणि शहरातील उपनगरांना जोडणारे मध्यवर्ती रस्ते यामुळे या परिसरात रात्रंदिवस प्रवासी व नागरिकांची वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकांसह मुंबई नाका परिसरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्ह्याला बळी पडणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक प्रवासी असल्याने प्रत्येक वेळी ते पोलिस ठाणे गाठत नाहीत, याचाही फायदा येथील टोळक्यांना होतो आहे. या परिसरातील चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अन् येथे गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांनी 'मटा' शी बोलताना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे विमानसेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल सहा आणि सात तास करावा लागणारा नाशिक ते पुणे प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत होणार आहे. येत्या १५ जूनपासून नाशिक ते पुणे या मार्गावरील सीप्लेनची विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे विमानसेवेबाबत असलेली नाशिककरांची तीव्र प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. शिवाय सिंहस्थ काळात नाशिककरांना सी प्लेनमधून नाशिक दर्शनचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल सज्ज आहे तर गंगापूर धरणाच्या ठिकाणी सीप्लेन सेवेची चाचणी झाली आहे. अशी स्थिती असतानाही नाशिककरांना विमानसेवेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अखेर ओझर (नाशिक) ते लोहगाव (पुणे) ही विमानसेवा येत्या १५ जूनपासून सुरू करण्याची घोषणा मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिस प्रा. लि. (मेहेर)चे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा आणि संचालक एस. के. मन यांनी मंगळवारी नाशकात केली आहे. या दोघांनीही ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक (तान)च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विमानसेवेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, कार्याध्यक्ष सागर वाकचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, माजी अध्यक्ष जयेश तळेगावकर उपस्थित होते. नाशिकहून कुठली विमानसेवा सुरु करणे योग्य राहिल, नाशिक-मुंबई सेवेला प्रतिसाद मिळेल का, नाशिक-पुणे सेवा प्रभावी आहे का, अशा विविध बाबींवर त्यांनी चर्चा केली. त्यानुसार नाशिक ते पुणे ही सेवा सुरू करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

विमानसेवेला प्रतिसाद मिळावा यासाठी नाशिकमधील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी (५ मे) ला बैठक घेण्यात येणार आहे. त्यात येणाऱ्या विविध सूचना आणि प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. नाशिक ते औरंगाबाद तसेच इतर शहरांचीही सेवा त्यामुळे सुरु होऊ शकणार आहे. नाशिकप्रमाणे पुणे आणि मुंबई येथेही बैठका घेण्यात येणार असून त्याद्वारे तेथील प्रतिसादही विमानसेवेला मिळू शकणार आहे.

सात हजार रुपये भाडे

मेहेरकडे असलेल्या ९ आसनी विमानाद्वारे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता ओझरहून विमान निघेल ते सकाळी ९ वाजता लोहगाव येथे पोहचेल. तेथून पुन्हा ९.१५ ला निघून १०.१५ ला ते ओझर येथे येईल. अशाच प्रकारे संध्याकाळी सेवा देता येईल, अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे दिवसातून दोनदा पुण्यासाठीची विमानसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. साधारणपणे सात हजाराच्या आसपास नाशिक-पुणे सेवेचे भाडे राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात हे भाडे कमी ठेवून त्यानंतर ते वाढविले जाणार आहे.

विमानसेवेसाठी आवश्यक त्या परवानग्या आम्ही घेतल्या आहेत. येत्या १५ जूनपासून ९ आसनी सी प्लेनची सेवा नाशिक ते पुणे देण्याचे आम्ही निश्चित केले आहे. त्यास भरघोस प्रतिसाद लाभेल, अशी आम्हाला खात्री आहे. - सिध्दार्थ वर्मा, सहसंस्थापक मेहेर

येत्या कुंभमेळ्यात नाशिककरांना आणि पर्यटकांना हवाई दर्शन करता यावे यासाठीही मेहेर कंपनीने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे नाशिक दर्शनची अनोखी संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. - दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images