Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांना अंगणवाडीचा आधार!

$
0
0



आधार नोंदणीसाठी मोहीम; शिक्षण विभागात पारदर्शकता आणण्यासाठी खास उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण विभागात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण घेत असलेल्या व शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक मुलाचे आधार कार्ड काढून ते शाळा प्रवेश क्रमांकाला जोडण्यासाठीचे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या ठिकाणी विशेष नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा अधिनियम २००९ अन्वये राज्यातील ६ ते २४ वयोगटातील प्रत्येक मूल शाळेच्या प्रवाहात आणणे, टिकवणे आणि त्याला दज्रेदार शिक्षण देणे बंधनकारक असल्याने आता शासन पातळीवर शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून शाळेत शिक्षण घेत असलेल्या व शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक मुलाचे आधारकार्ड काढून ते शाळा प्रवेश क्रमांकाला जोडण्यासाठी अभियान राबविण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रत्येक गावात आधार कार्ड देण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करून आधार कार्ड असलेल्या व नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निश्‍चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत गावस्तर विविध प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवी संस्था, प्राथमिक शिक्षकांच्या संघटना, ग्रामपंचायत, सेवानवृत्त शिक्षक व कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ आदिंचा सहभाग घेण्यात येणार आहे. गावनिहाय आधार कार्ड नोंदणीसाठी नियोजन करण्यात येणार असून, गावस्तरावर दवंडी देऊन प्रचार व प्रसार करण्याचे शासन निर्णयात आदेशित करण्यात आले आहे. प्रत्येक गावात आधार कार्ड नोंदणीसाठी प्रभात फेरी काढणे, ग्रामस्थ व पालकांना विविध बैठका, मेळावे यांच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्याचे नियोजित आहे.

सध्या शाळांना सुट्या लागल्या असल्या तरीही जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याने गावनिहाय आधारकार्ड नोंदणी करण्यात येणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याबरोबर विद्यार्थ्यांची माहिती एका क्लिकवर समजण्यासाठी मदत होणार आहे.

अशी येणार पारदर्शकता

शाळेत शिक्षण घेत असलेल्या ६ ते २४ वयोगटातील विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सवलती व शिष्यवृत्त्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थ्याला लाभ मिळावा यासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड त्याच्या प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार असून, यामुळे बोगस लाभ देणे, बोगस पटसंख्या वाढवून शासकीय अनुदान मिळवणे यासारख्या समस्यांवर कायमस्वरूपी पायबंद घालणे शक्य होणार आहे.

शिक्षण विभागाची आम्ही नुकतीच बैठक घेतली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्रावर विशेष मोहीम राबविली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आधार नोंदणीच्या एकूण ५५ मशिन्स आहेत. यातील १२ मशिन्स शहरात कार्यरत आहेत. - निलेश जाधव, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारयादीसाठी विशेष अभियान

$
0
0



नाशिक : मतदारयादीत पारदर्शकता आणण्यासाठीच मतदारयादीला आधारकार्डची जोड देण्यात येत आहे. त्यासाठीच निवडणूक विभागाकडून येत्या १७ मे रोजी विशेष मोहीम घेतली जाणार आहे. याद्वारे मतदारयादीतील दुबार नावांसह बोगस नावे समोर येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आधार क्रमांक मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसमध्ये भरण्यासाठी विविध कार्यपद्धतींचा उपयोग करता येणार आहे. त्यासाठीच येत्या १७ मे, २१ जून व १२ जुलै या तीन दिवशी विशेष मोहीम घेतली जाणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी ही कागदपत्रे मतदान केंद्रस्थळ, मतदार मदत केंद्रावर आणि विधानसभा मतदार केंद्रातील पदनिर्देशित ठिकाणी स्वीकारणार आहेत. यावेळी निरंतर प्रक्रियेतील फॉर्म ६, ७, ८ व ८ अ देखील स्वीकारले जाणार आहेत. ई-मेल, निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात येत असलेले मोबाईल अॅप आणि १९५० या क्रमांकावर कॉल करूनदेखील डेटाबेस भरता येणार आहे. ३ मार्च पासून सुरू झालेला हा कार्यक्रम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

दुबार नावे असलेल्या मतदारांनी स्वत:हून आपले दुबार नाव कमी करण्यासाठी नमुना ७ मध्ये अर्ज करावयाचा आहे. अशा अर्जांवर मतदार नोंदणी अधिकारी १५ दिवसांत निर्णय घेणार आहेत. मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी पुराव्यासह प्राप्त नमुना ८ मधील अर्जांवर १५ दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास मतदारांच्या छायाचित्रात विहीत पद्धतीने सुधारणा करण्यात येणार आहे. मतदारांना मतदानाचा दिवस, पुनरीक्षण कार्यक्रम, वगळणी किंवा दुरुस्ती संदर्भातील नोटीस आदी सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने मतदारांचे मोबईल क्रमांक, ई-मेलची माहिती मतदारांच्या डेटाबेसमध्ये भरण्यात येणार आहे. प्रपत्र 'अ' मध्ये माहिती भरून ती आधार क्रमांक आणि मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या फोटो कॉपीसह सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करता येणार आहे.

एसएमएसद्वारेही नोंदणी शक्य

मतदारांनी १६६ किंवा ५१९६९ या क्रमांकावर ECILINK स्पेस एपिक क्रमांक स्पेस आधार क्रमांक याप्रमाणे एसएमएस करता येईल.

ऑनलाईनही नोंदणी

निवडणूक आयोगाच्या http://eci.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर आधार क्रमांक व इतर माहिती भरता येणार आहे. त्यामुळे मतदारांना कुठेही न जाता केवळ ऑनलाईनरित्या मतदार यादीतील नावशी आधार क्रमांक जोडता येणार आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरोघरी जावून आधारक्रमांक संदर्भात कागदपत्रे गोळा करीत आहेत. मतदारांनी त्यांना सहकार्य करावे. - गितांजली बाविस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्डक अध्यासन केवळ शोभेपुरतेच

$
0
0




प्रशांत भरवीरकर, ना‌शिक

सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?

भांडवलदारांना असा खणखणीत सवाल विचारणारे व भारतीय लोकशाही संविधानाला अभिप्रेत असलेले सार्वभौमत्व, समता, स्वातंत्र्य, बंधूता, न्याय, एकता, धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक जाणीव जागृत करण्याचे काम व त्याचा प्रचार, प्रसार करण्याचे काम तहहयात करणाऱ्या लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुरू असलेले अध्यासन केवळ शोभेची बाहुली ठरले आहे. वर्षभरात या अध्यासनाद्वारे किरकोळ कार्यक्रम वगळता एकही भरीव कार्यक्रम झालेला नाही.

मुक्त विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले अध्यासन व कवी कुसुमाग्रज अध्यासन सुरू आहे. सोबतच गेल्या दोन वर्षांपासून वामनदादा कर्डक अध्यासन सुरू झाले मात्र लोकसाहित्याचा मोठा ठेवा नाशिककरांसाठी खुला होण्याची वाट पहात असतानाच या अध्यासनाचा एकही उपक्रम झालेला नसल्याने वामनदादांचे अनुयायी व रसिक यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.

अध्यासन सुरू झाल्यानंतर एकत्रित माहितीसाठी ते केंद्र बनते तसेच माहितीचा हा स्त्रोत विद्यापीठ पातळीवर सर्वांसाठी उपलब्ध होतो. वामनदादांचे साहित्य संकलित नसल्याने लोकसाहित्याच्या मोठ्या खजिन्यापासून अभ्यासक वंचित राहत असल्याची खंत भारतीय कलावंत महासंघ व वामनदादा कर्डक प्रतिष्ठानने मुक्त विद्यापीठाकडे व्यक्त केली होती. त्यावेळी विद्यापीठाने हे अध्यासन सुरू करण्याबाबत अनेक घोषणाही केल्या. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी अध्यासन सुरूही करण्यात आले; परंतु एकदा अध्यासन सुरू झाले की, त्याद्वारे पुढे काहीच कार्यक्रम होत नाही हा मुक्त विद्यापीठाबाबतचा अनुभव येथेही आला. वामनदादा कर्डक अध्यासनही त्याला अपवाद राहिले नसून, एक दोन किरकोळ कार्यक्रम वगळता वामनदादांविषयी किंवा दलित साहित्याविषयी कोणताही भरीव उपक्रम झालेला नाही.

मानव मुक्तीच्या लढ्याला आपल्या साहित्यातून तळागाळापर्यंत पोहोचविणारे शाहीर म्हणून वामनदादांचे नाव आदराने घेतले जाते. नाशिककर असलेल्या कर्डक यांनी जलशाच्या माध्यमातून करमणूक आणि प्रबोधन करणाऱ्यांमध्ये दादा नेहमीच नंबर वन राहिले. त्यांनी अनेक कवने रचली असून, अध्यासनाद्वारे काही न काही उपक्रम नियमित सुरू राहीले तर अभ्यासकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

अध्यासनातर्फे असावा राज्यस्तरीय पुरस्कार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कवी कुसुमाग्रज अध्यासन आहे. या अध्यासनातर्फे वर्षभरात अनेक कार्यक्रम होतात. काव्यवाचन तसेच काव्यलेखन कार्यशाळा नियमित होतात. या अध्यासनातर्फे साहित्यातला राष्ट्रीय स्तरावरचा एक मोठा पुरस्कार देण्यात येतो. परंतु वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे असा एकही पुरस्कार दिला जात नाही असे का? असा प्रश्न वामनदादांचे अनुयायी करीत आहेत. या अध्यासनातर्फे असा एखादा मोठा राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्याची मागणी होत आहे.

वामनदादा कर्डक अध्यासनासाठी २००५ पासून आम्ही पाठपुरावा करीत होतो, मुक्त विद्यापीठाकडून वेळोवेळी आश्वासनच मिळायचे. बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी अध्यासन सुरू केले; मात्र त्याद्वारे भरीव उपक्रम घेण्यात आला नाही. आम्ही अनेकदा कार्यक्रमांबाबत तयारीही दाखवली होती. परंतु विद्यापीठाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दादांच्या वस्तू आम्ही जमा केल्या आहेत. त्या वस्तुसंग्रहालयात असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. - समाधान पगारे, विश्वस्त, वामनदादा कर्डक प्रतिष्ठान

आम्ही पारंपरिक कार्यक्रम करण्यावर भर दिलेला नाही. वेगळे काय उपक्रम घेता येतील याचा विचार केला. त्यानुसार वेब रेडिओवर काही कार्यक्रम केले. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने २० दिवसांसाठी तमाशा अभ्यासक्रम घेतला. १३ एप्रिल रोजी भीमपहाट कार्यक्रम केला. परंतु मोठा एकही कार्यक्रम झालेला नाही. - प्रा. विजयकुमार पाईकराव, प्रमुख वामनदादा कर्डक अध्यासन, मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेच्या मध्यातच मान्सूनची चाहूल

$
0
0



नाशिक : बदललेल्या हवामानामुळे मे महिन्याच्या मध्यातच मान्सूनची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारीही ढग दाटून आले होते. त्र्यंबक तालुक्यात पावसाच्या जोरदार धारा बरसल्या.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी काळे ढग जमा होत आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास बागलाण तालुक्यात ६ मिलीमीटर, येवला तालुक्यात ३, कळवणमध्ये ६, दिंडोरी ६, निफाड तालुक्यात १६, देवळ्यात ६, चांदवडमध्ये ६, मालेगावात १० तर सिन्नरमध्ये ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने काही घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. वीज पडून जिल्ह्यात २ गायी आणि एक बैल ठार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगृहाच्या अनुदानासाठी शिवसेनेचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्यातील ८० हजार अनाथ बालकांच्या भोजन अनुदानासाठी सुरू असलेल्या बालगृह चालक व कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच शिवसेनेने आंदोलनात उडी घेतली आहे. महिला व बालविकास आयुक्तालयावर भव्य मोर्चा नेऊन बालगृहांप्रतीच्या उदासीनतेबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आयुक्तालय परिसर निषेधाच्या घोषणांनी दणाणून सोडला होता.

महिला व बालविकास आयुक्त राजेंद्र चव्हाण यांना त्यांच्याच दालनात घेराव घालून अनुदानाच्या दिरंगाईबद्दल जाब विचारण्यात आला. शिवसेनेची आक्रमकता पाहून आयुक्तांनी दोन दिवसात चालू वर्षासाठी एकूण मागणीपैकी बारा कोटीचे अनुदान देण्याचे व थकीत अनुदानाचा प्रस्ताव मंत्रालयातील बैठकीत सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बालगृहातील अनाथ बालकांच्या राज्यातील ९९० स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहामध्ये ८० हजार अनाथ, निराधार तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना भोजनाचे सव्वाशे कोटी रुपयांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून थकले आहे. त्यामुळे भोजन अनुदानासह कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या मागणीसाठी बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेने पुण्याच्या बालविकास आयुक्तालयासमोर दि. ५ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारून आत्मक्लेश आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडल रेल्वे प्रबंधकांची नाशिकरोडला पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशन परिसरातील कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी केली. ओढा, देवळाली कॅम्प येथील रेल्वेस्टेशनलाही भेट देऊन तेथील कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेतला. ही कामे वेळेत व त्वरित करावीत अशी सूचना त्यांनी ठेकेदारांना दिल्या.

यावेळी वरिष्ठ मंडल अभियंता पवन पाटील, नर्तकसिंग, फारुक सैय्यद, आर. आर. अत्रे, स्टेशनप्रमुख एम. बी. सक्सेना, सी. जी. चित्तम, चंद्रमोहन मिश्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक बी. डी. इप्पर आदी उपस्थित होते. कुंभमेळ्यात प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी चौथा प्लॅटफार्म उभारला जात आहे. नवीन पादचारी पुलाचे कामही वेगात सुरू आहे. सिन्नरफाटा प्रवेशद्वार, तिकीट आरक्षणगृह, मालधक्का आदी कामे सुरू आहेत. सुधीर गुप्ता यांनी या कामाची माहिती घेतली. कुंभमेळ्याच्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पर्वणी काळात रेल्वेस्टेशन आवारात खासगी पार्किंग तसेच रिक्षा, टॅक्सी यांना प्रतिबंध केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत हा दौरा सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एकलहरेतील नवीन वीजसंच चालू करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती करणाऱ्या एकलहरे औष्णिक वीज केंद्रांच्या नवीन प्रकल्पाचे काम त्वरित सुरू न केल्यास तीव्र संघर्ष करण्याचा इशारा प्रकल्प बजाव संघर्ष समिती, विविध कामगार संघटना आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या एकलहरेतील बैठकीत घेण्यात आला.
निवृत्ती चाफळकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सामनगावचे सरपंच विजय जगताप, प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, सूर्यकांत पवार, पंजाबराव खंदारे, विशाल संगमनेरे आदींची प्रमुख उपस्थिती होते. एकलहरेचा नवीन प्रकल्प होणे हे उद्योग-व्यवसायासाठी महत्त्वाचे असून हजारो संसार त्यावर अवलंबून आहेत. नवीन प्रकल्प झाला नाही तर बेरोजगारी वाढेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रकल्पाची धोरणे ठरविताना शेतकऱ्यांचा विचार करावा, त्यांनाही समितीत स्थान मिळावे, अशी मागणी रामदास डुकरे यांनी केली. एकलहरे युनिट तीनला फक्त ३५ वर्षे झाली आहेत. नूतनीकरणानंतर ते पंधरा वर्षे चालू शकतील, असे मत कामगारांनी व्यक्त केले. चाफळकर म्हणाले, की नवीन संच सुरू होण्यासाठी पाणी, रेल्वे व जागा उपलब्ध आहे. नाशिकच्या दोन्ही बाजूस गंगापूर, दारणा, मुकणे, भंडारदरा धरणे आहेत. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही. येत्या सोमवारी (दि. १८) ऊर्जा मंत्र्यांना टप्पा दोनमधील संच बंद न करण्याचे व नवीन प्रकल्पाचे काम त्वरित सुरु करण्याचे साकडे घालणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वजनमापे पडताळणी शुल्क आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यापारी कारणांसाठी वजनमापे वापरणाऱ्या व्यापारी वर्गाला वजनमाप पडताळणी, मुद्रांकन, परवाना, अपिल व अन्य कारणांसाठी शुल्क भरण्यासाठी आता चलन घेऊन बँकेच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. वैधमापन शास्त्र विभागाने आता ही सर्व प्रकारची शुल्क ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंगमार्फत स्वीकारण्यास सुरुवात केली असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहायक नियंत्रक (वैधमापन शास्त्र) राजेंद्र बांगर यांनी दिली आहे.

वजनमापे वापरणाऱ्यांना विविध प्रकारचे शुल्क सरकारकडे जमा करावे लागते. आतापर्यंत हे शुल्क पारंपरिक पद्धतीने बँकेत चलनाद्वारे जमा करण्यात येत होते यामुळे वेळेचा अपव्यय सुरू होता. हे टाळण्यासाठी आता वैधमापन शास्त्र विभागाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या शासकीय जमा लेखांकन पद्धती गव्हर्मेंट रिसिट अकांऊंटींग सिस्टीम (जीआरएएस) या प्रणालीचा वापर आता वैधमापन शास्त्र विभाग करू लागला आहे.

यामुळे वजनमापे उपयोगकर्ते आता आपले शुल्क कोठूनही ऑनलाइन पद्धतीने नेटबँकिंगद्वारे भरू शकतील. ज्यांच्याकडे नेटबँकिंगची सोय नाही, अशांसाठी चलन काढून रक्कम भरण्याची सुविधा आंध्र बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद व स्टेट बँक ऑफ इंडिया येथे करून दिलेली आहे. या प्रणालीद्वारे रक्कम जमा केल्यावर चलनाची प्रत जनरेट होईल. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. जनरेट झालेल्या चलनाची प्रत वैध मापनशास्त्र अधिकाऱ्याकडे जमा केली की ते अधिकारी ज्या कामासाठी शुल्क भरले आहे ते काम करून देतील. ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी http://gras.mahakosh.gov.in/echallan/ या लिंकवर पे विदाऊट रजिस्ट्रेशन येथे क्लिक करून माहिती भरावी व नेट बँकिंगने रक्कम जमा करावी. नंतर चलन घेऊन संबंधित कार्यालयात घेऊन जावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाधवांची ‘आमदारकी’ खंडपीठाच्या हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार जयवंत जाधव यांची निवड हायकोर्टाने रद्द ठरविल्याच्या निर्णयास सुप्रिम कोर्टने स्थगिती दिली होती. त्यानंतर १४ मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती चल्लमेश्वर व न्यायमूर्ती आदर्श गोयल यांनी पुढील न्यायालयीन प्रक्रिया त्रिसदस्यीय न्यायाधीश असलेल्या खंडपीठाकडे सोपविली आहे. त्यामुळे जाधवांच्या आमदारकी वाचणार की जाणार याचा निर्णय आता हे खंडपीठ घेणार आहे.

आमदार जाधव यांच्या निवडीबद्दल हायकोर्टाने १३ जानेवारी २०१५ रोजी शिवाजी सहाणे यांच्या बाजूने निकाल देऊन जाधव यांची आमदारकी रद्द ठरविली होती. या निर्णयाविरोधात जाधव यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या युक्तीवादात काही कायदेशीर मुद्यांच्या स्पष्टीकरणासाठी सदर याचिका त्रिसदस्यीय खंडपीठाकडे सोपविण्यात आली आहे. या याचिकेतील कायदेशिर मुद्यांच्या स्पष्टीकरणानंतरच पुढील निर्णय होणार आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती कायम राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी सरन्याधीशांकडून योग्य ते निर्देश घेवून त्रिसदस्यीय खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे.

खंडपीठाचा निर्णय आल्यानंतर पुढील नियमित सुनावणी पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे तूर्तास आमदार जाधव यांना दिलासा मिळाला आहे. सदर सुनावणीत आमदार जाधव यांच्या बाजूने अॅड. अमरेंद्र शरण, अॅड. मकरंद आडकर व अॅड. ब्रिज मिश्रा यांनी तर सहाणे यांच्या बाजूने अॅड. वेणूगोपाल व अॅड. श्रीशैल्य देशमुख यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंगचे सत्र सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडच्या भिमनगर परिसरातील लालवणी देशी दारू दुकानासमोरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन तोडून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सदर महिला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या पोत तोडून पोबारा केला.

तोतया पोलिसांकडून गंडा

शहरात एवढ्या चोऱ्या होतात. तुम्ही एवढे दागिने घालून कसे फिरतात. काढून ठेवा ते, असे सांगत तोतया पोलिसांनी खरे पोलिस असल्याचे भासवत वृध्दाकडील सोन्याची चेन, सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना ६ मे रोजी पंचवटी विभागातील शिवाजीनगर परिसरातील शनिमंदिराजवळ घडली. फिर्यादी जेष्ठ नागरिक आपल्या नातवासमवेत स्कुटीने जात असताना तोतया पोलिसांनी त्यांना थांबवले होते. तब्बल आठ दिवसांनतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या घटनेचा तपास केव्हा करणार आणि मुद्देमाल कसा परत मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विवाहितेवर बलात्कार

मनमाड : घरात घुसून मारहाण करून बलात्कार केल्याची तसेच, जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद येथील बावीस वर्षीय विवाहित महिलेने शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीनंतरच व्हावी तहसीलदारांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी जिल्ह्यातील सात तहसीलदारांच्या निलंबनाची घोषणा झाली असली तरी अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या मानगुटीवर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. चौकशीनंतरच योग्य कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केले आहे.

जानेवारीत उघडकीस आलेल्या सुरगाणा रेशन धान्य घोटाळ्यात जिल्ह्यातील सात तहसीलदारांवर निलंबनाची घोषणा करण्यात आली आहे. पुरवठा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी तहसीलदारांच्या निलंबनाची केवळ घोषणा झाल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढत आहे. केव्हा निलंबनाचा आदेश येऊन धडकेल या धास्तीने त्यांची झोप उडाली आहे. मात्र या निलंबनाच्या घोषणेपूर्वी चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा या तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. पूर्ण चौकशी झाल्याची खात्री झाल्यानंतरच किंवा चौकशी पूर्ण करूनच कारवाईबाबत निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच या प्रकरणी चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती संघटनेचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष मनोहर पोकळे आणि सरचिटणीस समीर भाटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य आदींना हे निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारींच्या भरोसे कारभार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नामांकित विभूतींच्या प्रचारा-प्रसार व्हावा यासाठी व इतरही साहित्यिक कार्यक्रमांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अस्तित्त्वात आलेल्या अध्यासनाची परिस्थिती आजमितीला डळमळीत झालेली आहे. महाराष्ट्राचे साहित्यिक दैवत असलेल्या कुसुमाग्रज अध्यासनाची परिस्थितीही वामनदादा कर्डक अध्यासनासारखीच झालेली असून, या अध्यासनाला सध्या प्रमुखच नाही. या अध्यासनाचा कारभार सध्या प्रभारी म्हणून एका प्राध्यापिकांकडे देण्यात आला आहे.

ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींच्या नावे अध्यासन स्थापन करून त्याद्वारे त्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय विद्यार्थी तसेच समाजाला करून द्यावा हे विद्यापीठाच्या अलिखित कार्यांपैकी एक कार्य असते. मात्र, मुक्त विद्यापीठात आंबेडकर, सावित्रीबाई फुले तसेच कुसुमाग्रज यांसारख्या प्रभृतींच्या नावे असणाऱ्या अध्यासनांमध्ये कार्यक्रमांची वाणवा आहे. यातील काही अध्यासनांना तर वालीच नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाला तज्ज्ञ मिळत नसल्याचा नाकर्तेपणाच उघडकीस आला आहे. इनमीन चारच असलेली अध्यासने व्यवस्थित सांभाळता येऊ नये, अशी नामुष्की मुक्त विद्यापीठावर ओढावली आहे. त्यातही कुसुमाग्रज अध्यासनातर्फे केवळ पुरस्कार दिले जातात. नाममात्र एखादा कार्यक्रम वर्षाकाठी औषधापुरता घेतला जातो. हे कितपत योग्य आहे याबाबत खरे तर संशोधनाची गरज आहे.

कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दर दोन वर्षांनी साहित्य जगतातला मान्यवर समजला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नुकताच देण्यात आला. याप्रसंगी देखील अध्यासनाला कुणीही प्रमुख नव्हता. हे काम प्रा. माधवी धामणकर यांना प्रभारी म्हणून देण्यात आले होते. कुसुमाग्रजांच्या नावे असणाऱ्या मोठ्या अध्यासनासाठी मुक्त विद्यापीठाला प्रमुख मिळू नये ही केवढी शोकांतिका आहे.

अध्यासनांच्या माध्यमातून भरीव कामगिरी व्हावी अशी अपेक्षा असते. ज्या व्यक्तींच्या नावे अध्यासन आहे, त्यांच्या साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणे, त्यांच्या नावे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे, शोधनिबंध सादर करणे या बाबी होणे गरजेचे असते. मुक्त विद्यापीठामध्ये चार अध्यासने स्थापन करून ठेवली, मात्र त्यांच्यासाठी तज्ज्ञ मिळविण्याची जबाबदारी मात्र झटकली आहे. प्रमुखच नाही तर कार्यक्रम घेणे ही तर फारच दूरची गोष्ट असून यानिमित्ताने मुक्त विद्यापीठाचा नाकर्तेपणाच उघडकीस आला आहे.

मानधनाचा प्रश्न ऐरणीवर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली असताना अध्यासनांच्या प्रमुखांना अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत असल्याच्या कारणावरून कुणीही प्रमुख लाभत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अभ्यासक्रम तसेच इतर बाबतीत फी चा आकडा मोठा असताना मुक्त विद्यापीठ मानधन देताना का कुचराई करते असा प्रश्न उपस्थित होत असून अध्यासनांना प्रमुख म्हणून अभ्यासक, संशोधक व्यक्ती हवा असेल तर त्यासाठी मानधन देण्याची तयारी ठेवावी असे विद्यार्थी तसेच इतरांचेही म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात रस्त्यांच्या विकासाला लागणार ब्रेक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान ग्रामसडक योजना ही महत्वकांक्षी आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावणारी योजना असली तरी निधीअभावी राज्यात या योजनेला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. या योजनेंतर्गत प्रस्तावित कामांसाठी राज्याला २ हजार २११ कोटी रुपयांची आवश्यकता असताना २०१५- २०१६ या आर्थिक वर्षासाठी केवळ ३०० कोटींचे दान केंद्राने राज्याच्या झोळीत टाकले आहे. त्यामुळे ३ हजार ८६४ किलोमीटरच्या प्रस्तावित रस्त्यांची कामे अडचणीत सापडली आहेत.

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत शुक्रवारी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी सुमारे तीनशे कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती दिली. मात्र, मुळात राज्यात आठ हजार ३०० कोटी ८५ लाखांच्या कामांना पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यांतर्गत २७ हजार ५६ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार होते. त्यापैकी २२ हजार ९६३ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, त्यावर पाच हजार ९०५ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, अजूनही राज्यात तीन हजार ८६४ किलोमीटरचे रस्ते होणे बाकी आहे. त्यासाठी २,२११ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने त्यासाठी केवळ ३०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. अपेक्षित निधीच्या तुलनेत केवळ दहा टक्केच निधी मंजूर करण्यात आल्याने रस्त्यांची कामे पूर्ण होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...तर कामे बंद करू!

पंतप्रधान ग्रामसडक योजनेकरीता काम करणाऱ्या राज्यभरातील ठेकेदारांचे सुमारे ५०० कोटींचे येणे सरकारकडून अद्याप देण्यात आले नसल्याचा दावा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मालेगाव सेंटरने केला आहे. गेल्या सात महिन्यांत या कामांसाठी निधीच न मिळाल्याने निम्म्याहून अधिक कामे बंद पडली आहेत. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी राज्याला निधी देण्याबाबत उदासिनता दर्शविल्याने सुरू असलेली उर्वरित कामेही बंद पडतील, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. निधीची वारंवार मागणी करूनही देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत ठेकेदारांची बोळवण केली जात आहे. ठेकेदारांनी रस्त्यांच्या कामांसाठी लागणारी मशिनरी कर्ज काढून खरेदी केलेली आहे. निधी मिळाला नाही तर हे कर्ज कसे फेडायचे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

देयके मिळत नसल्याने आम्ही ठेकेदार अडचणीत सापडलो आहोत. आमच्याकडील पैसे संपल्याने कामे बंद ठेवावी लागत आहेत. राज्य व केंद्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेऊन देयके लवकर अदा करावीत, अशी आमची मागणी आहे.

रमेश शिरसाठ, पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया

नाशकात ११८ कोटींची कामे प्रलंबित

एकट्या नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित कामांसाठी ११८ कोटींच्या निधीची गरज आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत २५५ कामे मंजूर आहेत. त्यापैकी १९४ कामे पूर्ण झाली असून, ६१ कामे प्रगतीपथावर होती. मात्र, त्यापैकी ३० हून अधिक कामे निधीअभावी बंद पडली आहेत. तर उर्वरित कामेही बंद पडण्याच्याच मार्गावर आहेत. जिल्ह्यात १,३३८ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार होते. त्यापैकी १,१३६ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी २८५ कोटी २७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांची पूर्वीचीच देयके प्राप्त न झाल्याने उर्वरित कामे रखडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड लिंकरोडला बालिकेचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर-अंबड लिंकरोडवरील इस्सार पेट्रोलपंपाजवळ राहणाऱ्या एका परप्रांतीय कुटुंबातील चार वर्षीय बालिकेचे आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले. ही मुलगी घराच्या अंगणात खेळत असताना हा प्रकार घडला. संध्याकाळी उशिरापर्यंत अपहरणाचा उद्देश समजू शकल्याने आरोपींना शोधून काढण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

लिंकरोडवरील बापुशेट नागरगोजे यांच्या मालकीच्या घरात महेंद्र शर्मा हे परप्रांतीय कुटुंब राहते. मुळचे बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील रहिवाशी असलेले शर्मा काही वर्षांपासून सातपूर परिसरात वास्तव्यास आहेत. कारपेंटरचा व्यवसाय करणाऱ्या शर्मा यांना पाच मुली व एक मुलगा आहे. सकाळी या भावंडापैकी अपहरण झालेली नंदिनी (४), तिची मोठी बहीण अंजली व भाऊ कृष्णा अंगणात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी एक सफेद रंगाची कार तिथे आली. त्यातील व्यक्तिने हिंदी भाषेतच तुझे वडील कुठे आहे? असे विचारले. त्यांना लगेच बाहेर बोलव, असे फर्मान सोडून अपहरणकर्ता अंगणात आला. हा निरोप घेऊन अंजली घरात जात असताना अपहरणकर्त्याने नंदिनीचे तोंड दाबले आणि तिला घेऊन कारमध्ये बसला. हा प्रकार पाहून घरात जाणाऱ्या अंजलीने आरडाओरड सुरू केली. झालेल्या गोंधळामुळे महेंद्र शर्मा घराबाहेर आले. तोपर्यंत नंदिनाला घेऊन अपहरणकर्त्याने धूम ठोकली होती. घाबरलेल्या शर्मा यांनी काही नागरिकांच्या मदतीने त्या सफेद कारचा पपया नर्सरीपर्यंत शोध घेतला. मात्र, नंदनीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी महेंद्र शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळच्या सुमारास अपहरणाची घटना घडली. त्यानंतर लागलीच नाकाबंदी करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनाही माहिती देण्यात आली. प्रत्यक्षदर्शी तसेच अपह्त मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपास सुरू आहे. अद्यापपर्यंत काही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसाला पेटविण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जामखेड

बाजारतळातील अतिक्रमणे हटविण्यासाठी गेलेल्या पथकावर हॉटेलचालकांनी शुक्रवारी हल्ला करून बंदोबस्तावरील महिला पोलिसाला पेटविण्याचा प्रयत्न केला. यात महिला पोलिस शबनम शेख या किरकोळ जखमी झाल्या असून, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

बारदाणाच्या सहायाने तयार करण्यात आलेले एक हॉटेल काढण्यात येत होते. त्यावर, 'ही जागा आमची आहे,' असे म्हणत लहू पवार व मोहन पवार यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. ग्रामविकास अधिकारी बबन बहीर यांना धक्काबुक्की करण्यात आली. तरीही पथक ऐकत नसल्याचे पाहून सूरज पवार व विजय जाधव यांनी स्वतःच रॉकेल टाकून हॉटेल पेटवून दिले. त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी लहू पवार याने रॉकेलची बाटली पोलिस कर्मचारी शबनम शेख यांच्या अंगावर ओतली आणि पेटविण्याचा प्रयत्न केला. शेख यांच्यासह अन्य पोलिसही जखमी झाले आहेत. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी आणि पोलिस यांनी दोन स्वतंत्र फिर्यादी जामखेड पोलिस ठाण्यात दिल्या. आरोपींविरूद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पील ओव्हर ५३५ कोटींपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सुरू असलेली कामे, प्रलंबित वर्क ऑर्डर तसेच महासभेने मंजूर केलेल्या कामांमुळे महापालिकेचा स्पील ओव्हर ५३५ कोटीं रुपयांपर्यंत पोहचला आहे. तब्बल ५० कोटी रुपयांची ​देयके थकली असून, प्रशासनाचे लक्ष आता सिंहस्थ निधीकडे लागले आहे.

महापालिकेचे बजेट सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या पुढे असले तरी उत्पन्न बाजूत तितकीशी भर पडताना दिसून येत नाही. त्यामुळे जमा कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती नेहमीच उद्भवते. त्यातच सिंहस्थ कामांमुळे महापालिकेसमोर एक प्रकारे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सध्या महापालिकेची ३०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. तर, ३७ कोटी रुपयांची कामे नगरसेवक निधीतून सुरू आहेत. ९० टक्के बिले निविदा प्रक्रियेत असून, यात सिंहस्थ कामांचा समावेश नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत आहे. प्रस्तावित, प्रलंबित तसेच चालू कामांच्या खर्चाचा आकडा ५३५ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यातच महापालिकेला सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भूसंपादनाच्या कामासाठी अजूनही कोट्यवधी रुपये खर्च करावा लागत आहे. वरील खर्चाबरोबर कामगारांचा पगार, विजबिले व इतर अत्यावश्यक असा बंधनात्मक खर्च महापालिकेला करावा लागत आहे. हाच स्पील ओव्हरच आकडा काही महिन्यांपूर्वी साडेसहाशे कोटी रुपयांपर्यंत पोहचला होता. मात्र, आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नवीन कामांना रोखून धरण्यासह नगरसेवकांच्या कामांना कात्री लावण्याचे धोरण सुरू केल्याने स्पील ओव्हर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. मात्र, तरीही हा आकडा मोठा असल्याने महापालिका प्रशासनाचे लक्ष सिंहस्थ निधीकडे लागले आहे. हा निधी लवकर प्राप्त झाला नाही तर अडचणी निर्माण होऊ शकतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला सिंहस्थ निधी दोन ते तीन दिवसात महापालिकेला मिळू शकतो. तसेच महापालिकेच्या प्रस्तावित कर्जाचे हप्ते देखील मिळण्याची शक्यता असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तसे झाले तर स्पील आेव्हर कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. अन्यथा महापालिकेपुढे अडचणी वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक उलटून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण-नांदुरी रस्त्यावरील आठंबे गावाजवळील घाटात आयशर ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळल्याने दोन जागीच ठार तर, सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये हरसूल येथील दोघांचा समावेश आहे.

नाशिक येथून बालभारतीच्या कार्यालयातून कळवण येथील पंचायत समितीत पाठ्यपुस्तके घेऊन येणारा आयशर ट्रक (एमएच १५ सीके ५९४०) हा नांदुरीपासून चार व आठंबेपासून एक किमी अंतरावरील घाटात कोसळला. घाटाच्या धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक २५ फूट वळणावरील खड्ड्यात कोसळला. ट्रकमधील आठही जण ट्रक व पुस्तकांखाली दाबले गेले. या घटनेची माहिती मिळताच नांदुरीचे वाहतूक पोलिस कुणाल मराठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांच्या मदतीने ट्रक सरळ करून दबलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर, उर्वरित जखमींना लगेच कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात सहाही जखमींवर उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.

जखमींमध्ये संतोष यशवंत कामडी (वय २०), राजाराम शंकर कामडी (वय १७), तुषार सुरेश कामडी (वय २०), भागिरथ गोपाळ गहवाळ (वय १७), गोकुळ विष्णू धोंडगे (वय २५), मनोहर गंगाराम कामडी (वय १८) सर्व गोलदरी (ता. हरसूल) येथील असून, रोहिदास चिमणा हिलीम (वय २०)व धाकलू सिताराम पानगे (वय २२) या दोघांचा मृत्यू झाला.

संरक्षक कठड्यांचा अभाव

कळवण-नांदुरी रस्त्यावरील घाटाचे रूंदीकरण झाले आहे. मात्र, या घाटात दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर आदी बसविलेले नाहीत. तसेच, साईडपट्ट्यांवर मुरूम माती असल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. हा अपघात घडला त्या वळणाच्या ठिकाणी संरक्षण भीत नसल्याने अपघाताची तीव्रता वाढली आहे. याच ठिकाणी नेहमी अपघात होत असूनही अजूनपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही टोल बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बसवंत पिंपळगाव

जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतरही टोल प्रशासन व सुरक्षा कामगार यांच्यात समेट झाला नाही. त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोलनाक्यावरील गुंता वाढला असून, गुरुवार (दि. १४) पासून टोलवसुली पूर्णपणे थांबली असून, वाहनधारकांना मात्र हायसे वाटत आहे.

दोन दिवसापासून टोल वसुली थांबल्याने टोल कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, कामगारांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करीत टोलनाक्यावरच ठिय्या मांडल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस सकाळीच दाखल झाल्याने टोलनाक्यावर पोलिसांचा वेढा पडल्याची परिस्थिती होती. मात्र, कामगारांनी अत्यंत शांततेत ठिय्या आंदोलन सुरू ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी पोलिस बंदोबस्त कमी करण्यात आला होता. पिंपळगाव शहर व परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी कामगारांना पा‌ठिंबा व्यक्त केला.

टॉप्स सिक्युरिटी कंपनीबरोबर केलेला दोन वर्षाचा करार संपल्यामुळे सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत न घेण्याच्‍या निर्णयावर टोल प्रशासन ठाम असल्याने गुंता सुटण्याऐवजी वाढत आहे. करार संपलेल्या सुरक्षारक्षकांना कमी करून त्यांच्या जागेवर गुजरात येथील सुरक्षा कामगार टोल परिसरात दाखल झाले आहेत. कोणत्याही क्षणी त्यांच्याकडे टोलचा ताबा देण्याच्या टोल प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. स्थानिक कामगारांच कायम करावे या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी तसेच सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, सुभाष होळकर, किरण लभडे, विजय भंडारे, अरुण मोरे, दीपक शिंदे आदी नेते दोन दिवसांपासून टोलनाक्यावर ठाण मांडून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी नव्हे; गहाळ होतात मोबाइल

$
0
0

- अरविंद जाधव, नाशिक

मोबाइल ही प्रत्येकासाठी जीवनावश्यक बाब बनली आहे. पण घरातून बाहेर पडल्यावर तो सुरक्षित राहिल की नाही याची खात्री देता येत नाही. कारण मोबाइल चोरांचा झालेला सुळसुळाट. 'स्मार्ट फोन' महाग असल्याने चोरांनी सोनसाखळीप्रमाणे मोबाइल चोरण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस मात्र, असे गुन्हे दाखल करून घेण्याऐवजी मोबाइल गहाळ झाला, अशी फिर्याद देण्यासाठी तक्रारदारावर दबाव आणतात. क्राइम रेट कमी करण्याची ही युक्ती चोरट्यांच्या पथ्यावर पडली असून वर्षागणिक लाखो रुपयांचे मोबाइल चोरी होत आहेत.

बहुतेक वेळा प्रवासात मोबाइल चोरीला जातो. शहरात दररोज सरासरी १५ पेक्षा जास्त मोबाईल चोरी जातात, असा दावा खुद्द पोलिसांकडूनच केला जातो. गुरुवारी एक खासगी फोटोग्राफर ऑर्डरच्या निमित्ताने तारावालानगर येथून जात होता. मोबाइलवर कॉल आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन फोटोग्राफर बोलण्यात व्यग्र असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मोबाइल हिसकावून पोबारा केला. या घटनेची माहिती देण्यासाठी तो फोटोग्राफर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गेला. मोबाइल चोरी होतच नाही, असा दावा करीत पोलिसांनी ही तक्रार गहाळ म्हणून घेतली जाईल, असे सांगितले. सिमकार्डसाठी गहाळची नोंदणी पुरेशी ठरते. त्यामुळे तक्रार दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अधिकाऱ्यांनीही पाठोपाठ स्पष्ट करून टाकले. यानंतर या चर्चेला पेव फुटले. हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोहचण्याची शक्यता गृहीत धरून पंचवटी पोलिसांनी अखेर चोरीचा गुन्हा दाखल केला. असे चित्र सर्वच पोलिस स्टेशनमध्ये दिसून येते.

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करायचा नसतो, त्यामुळे ते त्यांच्या समाधानासाठी केवळ गहाळपत्र देतात. त्याआधारे मोबाइल कंपनीतून त्याच क्रमांकाचे सीमकार्ड मिळते. तर पोलिसांही पुढील कागदी घोड्यांपासून वाचले जातात. रामकुंड परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. याचाचा फायदा चोरट्यांना आणि त्यापाठोपाठ पोलिसांना होतो आहे. चोरीस गेलेला मोबाइल शोधण्यासाठी ट्रॅकर उपलब्ध असले तरी त्याचा उपयोग केवळ मोठ्या गुन्हेगारी घटनांच्या शोधासाठीच केला जातो.

पोलिसांची याबाबत बचावात्मक भूमिक आहे. अनेकदा मोबाइल खाली पडलेला असतो. तो चोरला गेला की नाही ते माहित नसतं, मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा असा उलट सवाल एका अधिकाऱ्याने केला. काही वेळेला लोकांनाच कायदेशीर प्रक्रिया नको असते. त्यामुळे ते गुन्हा दाखल करण्यास नकार देतात असेही त्यांनी सांगितले. काहींचा मोबाइल जुना असल्याने ते गुन्हा दाखल करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. यातून पोलिस आपली जबाबदारी टाळत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते. मोबाइल चोरी हा रोजचाच प्रकार असल्याने प्रत्येकाच्या तक्रारी गुन्हा म्हणून नोंदवून घेऊन तपास करण्याची पोलिसांची तयारी नसते. अनेकदा गहाळपत्र मिळाल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असा लोकांचा समज होतो आणि ते समाधानाने घरी परतत असतात. पण प्रत्यक्ष पोलिस त्यानंतर काहीच करत नाहीत. कुठल्या पोलिस स्टेशनमध्ये मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल होत नसेल तर ती बाब गंभीर आहे. मोबाइल लंपास केला जातो तेव्हा ती चोरीच असते. हातचालाखीने मोबाइल खिशातून नकळत काढून घेतला जातो, तो चोरीचा प्रकार असतो. त्यामुळे या प्रत्येक घटनांचा गुन्हा नोंद व्हायलाच हवा. मोबाइलची तक्रार करताना घटनास्थळ नेमके सांगायला हवे. तुमच्याकडे मोबाइल विकत घेतल्याची पावती शक्यतो हवी. मोबाइलचा आयएमईआय क्रमांक पोलिासंना द्यावा. जेणे करून त्या आधारे मोबाइल शोधून देता येतो. एफआयआर घेण्यास एखाद्या कर्मचाऱ्याने नकार दिला तर वरिष्ठांशी संपर्क साधावा. एखादी समस्या वैयक्तिक वर्तुळ तोडून सार्वत्रिक होत नाही तोपर्यंत प्रशासन सर्वसामन्यांची मुस्कटदाबी करीतच असते. मोबाईलचोरीच्या घटनांबाबत वैयक्तिक वर्तुळ अजून कायम असल्याने सामाजिक दबाव पोलिसांवर नाही. हा दबाव वाढेल तेव्हा पोलिसांना दखल निश्चितच क्रमप्राप्त होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नांमुळे नांदूर नाका ‘जॅम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दाट लग्नतिथीचा परिणाम नांदूर नाका परिसरात झाला. शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे नांदूर नाका जॅम झाला. वऱ्हाडी मंडळी यात अडकून पडल्याने अनेक लग्नांचा मुहूर्त लांबला. लग्नतिथी असेल त्या दिवशी सकाळी व संध्याकाळच्या सुमारास याठिकाणी वाहतूक नियोजनासाठी पोलिस नियुक्त करण्याची मागणी केली जात आहे.

औरंगाबाद नाका-नांदूर नाका- हॉटेल जत्रापासून औरंगाबाद नाका या वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या त्रिकोणात गेल्या काही वर्षांत किमान ४० ते ४५ लॉन्स उभे राहिले आहेत. औरंगाबाद रोड हा राज्य तर मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग असून, या दोन्ही हायवेला जोडणाऱ्या रिंगरोडवरही लॉन्स असल्याने, दाट लग्नतिथींच्या दिवशी हायवेवरील वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने घडतात. नाशिक-औरंगाबाद हायवेचे चौपदरीकरण झाल्याने लग्नतिथीदरम्यान होणारी वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता फोल ठरू लागली आहे. विविध लॉन्ससमोरील वाहतूक कोंडी आता नांदूर नाक्याला होत असल्याने या परिसरातील नागरिकांना नांदूर नाका टाळून दुसऱ्या रस्त्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

शुक्रवारी लग्नतिथी खूप दाट होती. सकाळपासूनच वाहनांची वर्दळ या भागात होती. ११ वाजेनंतर वाहनांची कोंडी होण्यास सुरुवात झाली. नाशिकरोड, औरंगाबादरोड तसेच हॉटेल जत्राकडून येणाऱ्या वाहनांचे नियमनच होत नव्हते. त्यातच प्रत्येकाला लग्नाला पोहचण्याची घाई असल्याने वाहनचालक नियमांचा भंग करून वाहने हाकली गेली. दुपारी १२ वाजेनंतर याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. वाहतूक पोलिस तसेच पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी नांदूर नाक्यावर पोहचले. मात्र, तोपर्यंत बराच कालावधी उलटून गेला होता. दुपारपर्यंत हीच परिस्थिती कायम होती.

वऱ्हाडींना उशीर

वाहतूक कोंडीत बहुतांश वऱ्हाडीं मंडळीच्या वाहनांचा समावेश होता. ट्रक, टेम्पोमधून येणारी वऱ्हाडी मंडळी वाहतूक कोंडीत अडकल्याने बहुतांश लग्नांना उशीर झाला. प्रत्येक लग्न तिथीवेळी अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करावी किंवा लग्नतिथीच्या दिवशी वाहतूक पोलिस नियुक्त करण्याची मागणी परि​सरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images