Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

७२ तासात पुन्हा गारप‌िटीचा अंदाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस आणि गारप‌िटीचा वारंवार सामना करावा लागत असताना येत्या ७२ तासात पुन्हा गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी संध्याकाळीच पावसाच्या सरींनी हजेरी लावली. अवकाळी पाऊस आणि गारप‌िटीने गेल्या काही महिन्यांपासून शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. आता पुन्हा हवामानात बदल झाल्यामुळे येत्या ७२ तासात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला असल्याने पुन्हा शेतकरी कळवळला आहे. यामुळे आता काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्यथा अधिकाऱ्यांना जिवंत जाळू !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमआयडीसी आयुक्तांकडे व्यथा मांडण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा संयम ढासळला अन् थेट त्यांच्या मुखी धमकीचीच भाषा अवतरली. ' रेल्वे लाईनसाठी सक्तीने भूसंपादन करण्यास कोणी अधिकारी फिरकल्यास मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्यासारखी 'त्या' अधिकाऱ्याची गत करू. प्रसंगी अधिकाऱ्यास जिवंत जाळू', अशा शब्दात स्वाभ‌िमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी इशारा दिल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एकलहरा ते गुळवंच या मार्गावर इंडिया बुल्ससह एमआयडीसीच्या जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून सुरू असलेले रेल्वे लाईनचे काम त्वरीत थांबवावे, अशी मागणी करीत स्वाभिमानीतर्फे एमआयडीसी आयुक्तांच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील भूसंपादन रोखण्यासाठी प्रसंगी कायदा हाती घेऊ असा कडवट इशाराही या संघटनेतर्फे एमआयडीसी आयुक्तांना देण्यात आला.

सिन्नर परिसरातील शेतकरी खासगी कंपनीच्या रेल्वेलाईनसाठी जमिनी देण्यास तयार नाहीत. तरीही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जमिनी हिसकण्याचा धाक दाखविला जात आहे. परिणामी, शेतकरी घाबरला आहे, असा मुद्दा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मांडला.

गुळवंच येथे सेझ कायद्यानुसार जमिनी संपादीत करण्यात आल्या; मात्र खासगी रेल्वे लाईनसाठी एमआयडीसी कायदा का लावण्यात आला? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील या रेल्वेलाईनच्या मार्गावरून सोनांबे, कोनांबे, खापराळे, हरसुले, पारले, शिवके या शिवारातील भूसंपादन रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादनाचा विचारही प्रशासनाने मनात आणू नये. अन्यथा परिणाम वाईट होतील, अशा शब्दात स्वाभिमानी संघटनेने इशारा दिला. यावेळी आंदोलनात स्वाभिमानीचे प्रवक्ते हंसरात वडघुले, दीपक पगार, किरण देशमुख, गोविंद पगार, उध्दव सांगळे, रतन मटाले आदींनी सहभाग घेतला.

रेल्वेलाईनसाठी भूसंपादनाची प्रक्र‌िया जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरू आहे. या विषयासंदर्भाने शेतकरी संघटनेच्या मिळालेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवू. त्यांच्या भावनाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येतील.

रामदास खेडकर, आयुक्त, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांचे ‘NCP’त प्रमोशन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून यात महाराष्ट्रातून ९२ पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. नाशिकधून माजी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, माजी आमदार ए. टी. पवार, तुकाराम दिघोळे, देविदास पिंगळे यांचा समावेश आहे.

'राष्ट्रवादी'च्या राष्ट्रीय कार्यकारीचा विस्तार करण्यात आला. या जम्बो कार्यकारिणीत नाशिकमधील सहा जणांचा समावेश आहे. माजी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, माजी आमदार ए. टी. पवार, तुकाराम दिघोळे, माजी खासदार दविदास पंगळे यांचा समावेश आहे. नाशिकला प्रथमच एवढ्या प्रमाणात राष्ट्रीय कार्यकारिणीवर प्रतिनिधित्व मिळाले आहे. यासोबतच खान्देशलाही संधी मिळाली आहे. धुळ्यातून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि जळगावमधून राज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन आणि अमळनेर मतदारसंघाचे माजी आमदार साहेबराव पाटील यांचा समावेश आहे.

जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना मुहूर्त कधी?

'राष्ट्रवादी'ने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली असली तरी राज्यातील ५५ जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. प्रदेशाध्यक्षांची निवड, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विस्ताराचाही पक्षाला मुहूर्त मिळाला. मात्र, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीला अद्याप मुहुर्त मिळालेला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुका आटोपल्यानंतरही या नियुक्त्यांना मुहूर्त मिळालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रयागतीर्थ’ विकासापासून वंचित

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कावनई, टाकेद, अशा अनेक पौराणिक महत्त्व असलेल्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचा विकास झपाट्याने होत आहे; मात्र सिन्नर तालुक्यातील घोटी महामार्गावर असलेले घोरवड येथील पुरातन व रामाकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेल्या प्रयागतीर्थला अद्याप विकासाचा स्पर्श झालेला नाही.

ब्रह्मलीन योगी बुधनाथाजी महाराज यांनी प्रयागतीर्थाचा जीर्णोद्धार १९७६ साली केला. परंतु त्यानंतर कोणीही लक्ष दिले नाही. अनेक स्थळांनां पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधी मिळून त्यांचा विकास झाला आहे मात्र प्रयागतीर्थ अद्याप दुर्लाक्षितच आहे.

पौराणिक महत्त्व

डोंगराच्या कुशीत वसलेलं घोरवड हे प्राचीन काळी वडाचे घोर जंगल असलेलं गाव. वनवासात असतांना सीतेचे रावणाने अपहरण केले. त्यावेळी दक्षिण दिशेला प्रवास करतांना जटायू पक्षाने रावणाला अडविण्याचा प्रयत्न केला. रावणाने पंख कापल्यामुळे जटायू धारातीर्थी होऊन पडला ते हेच घोरवड. जटायू सरपटत श्री क्षेत्र टाकेद येथे गेला. प्रभू रामाने जटायूला मोक्षप्राप्तीसाठी बाण मारून सर्व तीर्थांना बोलावले पण त्यावेळी प्रयाग तीर्थाला सूक्ष्म अभिमान झाला. ते या ठिकाणी एका रात्र मुक्कामी थांबून टाकेद येथे गेले. टाकेद येथे जाईपर्यंत जटायूला मुक्ती मिळणार नाही त्यामुळे ते प्रयागतीर्थ सर्व तीर्थांपासून वेगळे ठेवण्यात आले, असा पुराणात उल्लेख आहे.

निसर्गरम्य परिसर

प्रयागतीर्थावर पुरातन शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा भरते. तसेच राम मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर व प्रयागतीर्थ आहेत. आजही सुमारे ५ एकर परिसरात पसरलेल्या वडांच्या झाडांमुळे हा परिसर निसर्गरम्य आहे. शिर्डीकडे जाणारे अनेक साईभक्त आवर्जून या ठिकाणी मुक्कामी थांबतात. दत्तोपंत जोशी यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ प्रवेशद्वारावर कमान आणि अन्य काही कामे केली आहेत.

ट्रस्ट नसल्याने विकासात अडथळा

प्रयागतीर्थाच्या विकासासाठी ट्रस्ट निर्माण होण्याची गरज आहे. परंतु यासाठी गावातील काही लोकांचा यास विरोध असल्याचे समजते. ट्रस्टची निर्मिती झाल्यास प्रयागतीर्थाबरोबर गावाचा देखील विकास होईल, असे काही जागरुक नागरिकांचे म्हणणे आहे. विकास करायचा झाल्यास दानशूर मदत करायला तयार आहेत; मात्र ट्रस्ट नसल्याने अडचणी येत आहेत. पर्यटकांसह शालेय सहलीतील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे शौचालय तसेच स्नानगृह नाही. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

पौराणिक महत्त्व असलेल्या प्रयागतीर्थ परिसरात‌ील वडाची झाडांचे संगोपन होणे गरजेचे आहे. खासदार, आमदार यांनी या स्थळाच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- सोमनाथ हगवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकश्वर येथे बुधवारी दिवसभर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जुना जकात नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच निवृत्तीनाथ मंदिर रस्त्यावरील संगणक केंद्र व त्यालगत असलेले व्यवसायिक गाळे अशी शहरातील सुमारे ५० अतिक्रमणे हटविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येत्या २४ मे रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कामांना वेग दिला जात आहे.

कुंभमेळ्याच्या नियोजनात शाही मार्गावरील तसेच प्रमुख चौकातील आणि रस्त्यावरील व्यवसायिकांनी केलेली अतिक्रमणे काढणे गरजचे ठरल्याने याबाबत शासकीय यंत्रणेने मोहीम हाती घेतली होती. अतिक्रमणावरून दोन दिवस खल झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तुंगार यांच्या शासकीय दवाखान्याजवळ असलेल्या दुकानावर जेसीबी चालविण्यात आला. लगत असलेल्या सर्व व्यवसायिकांनी टपरीवजा दुकाने खाली केली. हे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

सुंदराबाई मठ धर्मशाळेच्या पायऱ्या काढण्यात आल्या. तसेच चंद्रकांत पाठक यांच्या घरास लगत असलेल्या पडव्या काढण्यात आल्या. इंद्रतीर्थ परिसरात असलेले अनधिकृत पत्र्याचे शेड पाडण्यात आले. गत दोन दिवसांपासून शहरात अतिक्रमण काढण्याचे ठरत होते. यामध्ये चंद्रकांत पाठक यांनी माहिती अधिकारात शहरातील सर्व अतिक्रमणांची माहिती घेवून त्यानुसार मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिचा निकाल अद्याप लागलेला नाही. तथापि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

अतिक्रमण काढतांना निवृत्तीनाथ रस्त्यावरील माजी सैनिक रामराव लोंढे यांच्या प्रशांत कॉम्प्युटर्स व त्या लगत असलेले आठ व्यावसायिक गाळे जेसीबीच्या मदतीने जमिनदोस्त करण्यात आले. येथे गाळ्यांमधील संगणक मोबाईल झेरॉक्स मशीन तसेच असतांना जेसीबी चालविल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या ठिकाणी वादावादी देखील झाली व हुज्जत घालणाऱ्या एका युवकास पोलिसांनी ताब्यत घेतले. दरम्यान या सर्व मोहिमेत प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर आदींसह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार यांनी दिवसभर सर्व पथकाबरोबर राहून सहकार्य केले.

कुणाचेही लाड करू नका!

जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी सायंकाळी त्र्यंबकला येथे भेट दिली. गोदावरी घाटांचे काम पाहून प्रगती नसल्याने नापसंती व्यक्त केली. तसेच अतिक्रमण काढण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली तेव्हा प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांना 'तुम्ही उगीचच कोणाचे लाड करू नका; अन्यथा तुम्हाला कारवाईस सामोरे जावे लागेल' असा स्पष्ट इशारा दिला. दरम्यान मेनरोड शाही मार्गाची पाहणी केली. येथे रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु आहे. या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देखील केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर लुटमार करणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर जवळील मोहदरी घाटात वाहन चालकांना मारहाण करून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघांना सिन्नर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील दरोड्यांचा व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सिन्नर पोलिसांनी सोमनाथ शंकर काळे व अर्जुन मोहन चव्हाण, रा. सामनगाव रोड वरील झोपडपट्टी, नाशिकरोड या सराईत गुन्हेगारांना माळेगाव औद्योगिक वसाहतीतून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर चोरट्यांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी खोटी माहिती व खोटे नावे व पत्ते देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून माहिती काढली असता, त्यांनी इतर तीन संशयित चोरट्यांच्या मदतीने मोहदरी घाटातील दरोडे टाकल्याचे त्यांनी कबुली दिली. दोन दिवसापूर्वी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पाडळी येथील माध्यमिक शिक्षक असलेले सुखदेव मोतीराम कोटकर हे आपली पत्नी संगीतासह नाशिक येथून लग्नसमारंभ आटोपून येत असतांना मोहदरी घाटाच्या चढावर दुचाकीचे स्पीड कमी झाल्याचा फायदा घेत त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्याकडील मोबाईल व पत्नीच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र असे सुमारे ८० हजार रुपयांच्या मुद्देमाल घेवून चोरटे फरार झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पावसाचा पुन्हा दणका

$
0
0

टीम मटा

नाशिक शहराचा काही भाग तसेच जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. बागलाण, चांदवड, त्र्यंबकेश्वर व निफाड तालुक्याबरोबरच कळवण व मनमाड शहरात दुपारी तसेच सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. शेतक-यांनी साठवलेला कांदा तसेच मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह बुधवारी दुपारी व सांयकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या या पावसाने शहरवासियांची त्रेधा त्रिरपीट उडाली. विजांचा कडकडाट व जोरदार वा-यामुळे अनेक ठिकाणी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडले.

येथील महाराष्ट्र बँकेसह शासकीय विश्रामगृहाजवळ झाडे उन्मळून पडली. तर महाराष्ट्र बँकेजवळ झाड पडल्याने वाहनांचा दोन मोटारसायकलींचा चक्काचूर झाला असून, महाराष्ट्र बँकेचे एटीएम देखील बंद पडले आहे. तालुक्यातील जायखेडा, ताहाराबाद, नवी शेमळी, ब्राम्हणगांव, ठेगोंडा, लोहणेर व परिसरात दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सटाणा बाजार समितीच्या आवारात शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा, मका तसेच धान्य मोठ्या प्रमाणात भिजले. अचानक आलेल्या या पावसाने मोठ्या प्रमाणात त्रेधा उडविल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा सरी कोसळत होत्या.

गोदाकाठच्या गावांना तडाखा

लासलगावसह विंचूर, नैताळे, शिवरे, टाकळी व निफाडच्या गोदाकाठातील गावांना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पावसाचा तडाखा बसला आहे. भुसे, मांजरगाव, चापडगाव, तारुखेडले, सायखेडा, चांदोरी ते पुढे थेट चितगाव फाटा परिसरात बुधवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. हवामान खात्याने येत्या ७२ तासात पाऊस व गारपिटीचा इशारा दिला होता. या इशाऱ्याला २४ तास उलटायच्या आताच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने पाऊस होण्याच्या आताच लासलगाव बाजार समितीतील शेतमालाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेला माल झाकण्यासाठी मात्र व्यापाऱ्यांची एकाच तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेची सर्रास उधळपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

ठिकाण : छावणी परिषद कार्यालय, वेळ - दुपारी २ वाजेची. जेवणाची सुट्टी अन् ऑफिसमध्ये वेगवेगळ्या विभागात सर्रासपणे सुरू असलेले पंखे अन ट्यूब लाईट. वीज बचतीचा संदेश देणाऱ्या सरकारी ऑफिसमध्येच विजेची उधळपट्टी दिसून येत आहे. यावर कुणाचे नियंत्रण नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दुपारी जेवणाची सुट्टी १ तास असते. या काळात कारण नसतांना विजेचा होणारा अपव्यय थांबविण्यासाठी कोणाचेही हात सरसावत नसल्याचे दिसून आले. देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेन्ट बोर्डच्या ऑफिसमध्ये दुपारी दररोज दिसणारे हे चित्र कधी थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या वतीने दूरदर्शन व विविध वृत्तपत्रांमधून वेळोवेळी जाहिराती देऊन वीज वाचविण्यासाठी आग्रहाने सांगितले जाते. मात्र, देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेन्ट बोर्हच्या कर्मचाऱ्यांना याचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. कधीही ऑफिसमध्ये अशीच परिस्थिती असते. लेखा विभाग, जलपूर्ती विभाग, इंजिनीयरिंग विभाग तसेच इतर काही विभागात दुपारच्या जेवणाच्या वेळी अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांना लाईट बंद करण्याचे आदेश देऊन जेवणाला निघून जातात; मात्र त्यांच्यामागे हेच कर्मचारी आदेशाची अंबलबजावणी करत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जबाबदारी कुणाची?

याबाबत कोणाशीही चर्चा केल्यास जबाबदारी एकमेकांच्या अंगावर टाकत आपला मार्ग मोकळा अशी परिस्थिती सध्या कॅन्टोन्मेन्ट बोर्ड ऑफिसमध्ये आहे. घरातून बाहेर पडतांना सर्व वीज उपकरणे बंद आहेत की नाही याची काळजी घेणारे कर्मचारी व अधिकारी ऑफिसच्या बाबतीत बेजबाबदार कसे होतात? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


`रामशेज` गजबजणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने आज, १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती रामशेज किल्ल्यावर साजरी केली जाणार आहे. या जयंतीच्या निमित्ताने शंभूराजांच्या मावळ्यांनी रामशेज किल्ल्यावर दिलेल्या विजयी लढ्याला उजाळा दिला जाणार आहे. रामशेज किल्ल्याचे महत्त्व लोकांपर्यंत जावे, या उद्देशाने शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने व्याख्याने, पोवाडे, सामाजिक गाणी, परिसंवाद, किल्ले संवर्धन या विषयांवर विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, छत्रपती शिवराय आणि शंभूराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, त्या स्वराज्याची प्रतीके असलेल्या गडकिल्ल्यांची महती युवकांना करून दिली जाणार आहे. त्यासाठी रामशेज किल्ल्यावर बालशाहीर करण मुसळे याचे शंभूराजांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर 'असा लढला रामशेज' या विषयावर मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ, तर योगेश कापसे आणि प्रभाकर वायचळे हे देशभक्ती गाणी आणि पोवाडे सादर करतील. कलावंत संकेत नेवकर 'जेव्हा गड बोलू लागला' हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहे. या वेळी किल्ल्यावर नाशिकच्या गडकिल्ल्यांचे ४१ पोस्टरचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. या मोहिमेत इतिहासप्रेमी शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवकार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी केले आहे.

तुम्हालाही यायचंय का?

सकाळी ६ वाजता नाशिकच्या पेठे विद्यालयासमोर (रविवार पेठ) जमावे, सोबत जेवणाचा डबा, पिण्यासाठी पाणी, डोक्यात टोपी, पायात ट्रेक शूज असावा, अधिक माहितीसाठी शिवकार्य गडकोट मोहिमेचे संयोजक योगेश कापसे यांच्याशी ९८५०४९०७९० या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन अधिग्रहणास किसान सभेचाही विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सन् २०१३ च्या सुधारित कायद्यानुसार जमिन मालकांना मिळालेली सुरक्षा हिसकावून घेत उद्योजकांचे लांगूलचालन करण्याचाच केंद्राचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. राज्यात व देशातील इतरही ठिकाणी सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सत्तेत नसताना भूमीअधिग्रहण कायद्याचे भाजपने स्वागत केले होते. मात्र, सत्तेत येताच याच भाजपने यामध्ये उद्योजकांना अनुकूल अशा सुधारणा घडविण्यास सुरुवात केल्याचा आरोप सभेच्या वतीने करण्यात आला. सन् २०१३ च्या कायद्याने जमिनींच्या अधिग्रहणापूर्वी सामाजिक आर्थिक परिणामांचा अभ्यासही करायला हवा. केंद्रात नव्याने आलेल्या भाजप सरकारने या संदर्भातील कायद्यांमध्ये सोयिस्कर बदल करून आदिवासींच्या जमिनी बळकाविण्याचा डाव नव्या अध्यादेशांव्दारे खेळला आहे.

सरकारच्या या मनमानी भूमिकेमुळे ग्रामीण भागात खेडी नष्ट होतील, उद्योजकांना प्रोत्साहन देताना शेतीव्यवस्था धोक्यात येईल अन् कोट्यवधी लोकांच्या उपजिवीकेचे साधनही धोक्यातच येईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू देसले, एकनाथ दौंड, शिवाजी शिंदे, निवृत्ती कसबे, प्रमोद अपसुंदे, शिवाजी शिंदे, रमेश ठाकूर बी. डी. जमदाडे आदी उपस्थित होते.

'त्या' जमिनींचे काय झाले ?

औद्योगिकीकरणाच्या नावाखाली केंद्र आणि राज्य शासनाने अगोदरच जमिनी अधिग्रहित केल्या आहेत. यातील बहुतांश जमिनी पडीक आहेत. वापरात नसलेल्या या जमिनींबाबत अगोदर अंतिम निकाल लावावा अन् नंतरच इतर जमिनींच्या अधिग्रहणाचा विचार करावा. याबाबत शासनाने भूमी अधिग्रहण कायदा २०१५ रद्द करावा, अशीही मागणी यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘पीएफ’ आपल्या दारी

$
0
0

नाशिक: पीएफ आणि त्याच्याशी संबंधित बाबींची माहिती घेण्याची प्रक्रिया अधिकाधिक सुकर करण्यासाठी आता भविष्य निधी कार्यालयाच्या वतीने 'पीएफ' आपल्या दारी ही योजना आणली आहे. शहरातील एमआयडीसी परिसरात शुक्रवारपासून (दि. १५) ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत उपक्षेत्रीय भविष्य निधी कार्यालय, नाशिकच्या वतीने युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (युएएन) शिबिरे भरविण्यात येणार आहेत. सातपूर येथे नाईस, आयटीआय सिग्नलच्या जवळ येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. तर यानंतर १८ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीमधील नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत शिबिर होईल. शिबिरामध्ये विविध आस्थापनांचे प्रतिनिधी, ट्रेड युनियनचे प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गाने या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. शिबिरामध्ये युनिव्हर्सल अकाऊंट नंबर मिळविण्याची प्रक्रिया, यूएएन कार्ड बघणे, डाऊनलोड करण्याची प्रक्रिया, आदी मुद्यांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच गावांसाठी ५० लाखाचा निधी

$
0
0

नाशिकरोड : दलितवस्ती सुधार योजनेतंर्गत देवळाली मतदार संघातील पाच गावांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे ही योजना पूर्वीच्या दलित वस्ती सुधार योजनेचे सुधारित रुप आहे. या योजनेतून रस्ता काँक्रिटीकरणाची कामे प्रामुख्याने केली जातात. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा, हे घटक विकासापासून वंचित राहू नयेत यासाठी ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या मतदारसंघातील पाच गावांमधील वस्तींसाठी प्रत्येकी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. बेलगाव ढगा येथील राजवाडा वस्ती, गिरणारे गावातील आंबेडकर वस्ती क्रमांक दोन, संत रोहिदास वस्ती, पंचशिलनगर क्रमांक दोन, सिद्धार्थनगर, राजवाडावस्ती, जाखोरीगाव, सामानगावातील दलित वस्ती यांचा यात समावेश आहे.

आमदार घोलप म्हणाले, की नवी दहा कामे मंजूर झाली आहेत. उर्वरित मतदारसंघातील दलित वस्तीतही अशी काम केली जाणार आहेत. ज्या गावातून विकास कामांची मागणी होईल, तेथे निश्चित ही कामे केली जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशतवाद्यांच्या माहितीसाठी १० लाख रुपयांचे बक्षिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फरासखाना-पुणे बॉम्ब ब्लास्टमधील फरार आरोपींबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस राज्य दहशतवाद पथकाकडून १० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून देशभरात आरोपींचा शोध घेतला जातो आहे.

या गुन्ह्यात परराज्यातील तिघा संशयितांबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ ही माहिती ०२२-२३७९१६१९ तसेच ०९६१९१२२२२२ किंवा ०८६५२०१२३४५ या नंबरवर द्यावी. wanted.ats@mahapolice.gov.in किंवा atswantedaccused@gmail.com या इमेल आयडीवर नागरिक माहिती देऊ शकतात. शहर आयुक्तालयाकडील फोन नंबर ०२५३- २३०५२३३/३४ या क्रमांकावर सुध्दा माहिती देता येईल. मेहबूब ऊर्फ गुड्डू इसमाईल खान, वय ३२ (अंदाजे) उंची ५ फुट ६ इंच (अंदाजे) सुदृढ बांधा, गोरा वर्ण, राहणार खांडवा मध्य प्रदेश असे संशयिताचे वर्णन आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव अमजद रमजान खान (३०) हे असून उंची ५ फुट ६ इंच इतकी आहे. सुदृढ बांधा, गोरा वर्णाचा हा आरोपी मध्य प्रदेशातील खांडवा येथील रहिवाशी आहे. तिसरा आरोपी देखील खांडावा येथीलच रहिवाशी आहे. जाकीर हुसेन बदारुल सादिक उर्फ विकी डॉन उर्फ विनय कुमार (३२)असे या संशयिताचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंबर प्लेटचा ‘नादच खुळा’!

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

आवडीचे वाहन आणि त्यावर मनाप्रमाणे क्रमांक यासाठी वाहनचालक कितीही पैसा खर्च करू शकतात. इभ्रत, अंकशास्त्र, जन्म तारीख, जुन्या वाहनाचा लकी नंबर अशा एक ना अनेक कारणांमुळे वाहनांवर मनाप्रमाणे नंबर प्लेट बसवण्यासाठी चालकांची झुंबड उडते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आयटीओ) तिजोरीत यामुळे काही दिवसातच तब्बल ९ लाख रुपयांची भर पडली आहे.

आरटीओने नुकतेच एमएच १५ इएक्स या नवीन सिरीजचे मनपंसत क्रमांक वाहनधारकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. पहिल्या सहा-सात दिवसातच वाहनचालकांनी ६९ चॉइस नंबर आरटीओकडून घेतले. या माध्यमातून आरटीओला ८ लाख ९१ हजार रुपयांचा महसूल मिळाला. याबाबत माहिती देताना आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन सिरीज सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या प्रतिसादात निश्चितच वाढ होईल. नऊ महिन्यांपूर्वी एमएच १५ ईपी ही सिरीज कारसाठी उपलब्ध होती. त्यावेळी चॉईस नंबरच्या विक्रीतून १ कोटी ४१ हजार रुपयांचा महसूल आरटीओ विभागाला मिळाला होता. यावेळेस यात वाढ होण्याचे संकेत पहिल्या काही दिवसातच मिळाले असल्याचे, संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

१११ आणि ११११ हे दोन क्रमांक सर्वांत म्हणजे महाग म्हणजे ७० हजार रुपयांपर्यंत घेतले जातात. तेच १००० आणि ९००९ हे क्रमांक ५० हजार रुपयापर्यंत वाहनचालकाला मिळू शकतात. या व्यतिरिक्त आणखी काही क्रमांकांना वाहनचालकांकडून विशेष पसंती दिली जाते. यात १००८, ९९९७ तसेच ७००० या क्रमांकाचा समावेश होतो. नवीन सिरीजमध्ये 'युनिक' म्हणून गणले जाणारे अनेक क्रमांक उपलब्ध असून रितसर शुल्क भरून वाहनचालक हे क्रमांक घेऊ शकतात. ५ हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यंत हे क्रमांक उपलब्ध आहेत. मात्र, जेव्हा एकाच नंबरसाठी एका पेक्षा जास्त अर्जदार समोर येतात, तेव्हा या क्रमाकांचा लिलाव केला जातो. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत वाहन विक्रीत फक्त १.९३ टक्के वाढ झाली. याउलट, चॉईस नंबरच्या विक्रीद्वारे ३ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल आरटीओ विभागाला मिळाला. पसंती क्रमांक घेणाऱ्यांच्या प्रमाणात तब्बल १७ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तेच २०१३-१४ या आर्थिक वर्षात चॉइस नंबरद्वारे ३ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओच्या हातात पडले होते.

फेव्हरेट नंबरसाठी रेस

लकी नंबर, अंकशास्त्र, इभ्रतीचा प्रश्न, जन्मतारीख, जुन्या वाहनांचा क्रमांक पुन्हा मिळावा म्हणून किंवा इतरांपेक्षा वेगळेपणा अशा कारणांमुळे पसंती क्रमांकांना वाढती मागणी आहे. अलिशान चारचाकी वाहनधारकांसह दुचाकी मालक देखील पसंती क्रमांकाकडे लक्ष ठेऊन असतात. चॉईस नंबरसाठी वाहनचालकांमध्ये चालणारी रेस आरटीओच्या महसूल वाढीला वर्षागणिक हातभार लावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी अवघी ५ रुपये, तरीही वाचक फिरकेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

अवघी पाच रुपये फी असली तरी नाशिकरोड येथील वाचनलयाला बालवाचक भेटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेफर्स, कुरकुरेसाठी पाच रुपये सहज खर्च होत असताना वाचनालयाची पाच रुपये फी भरणेही शक्य होत नाही का, असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

महापालिकेचे नाशिकरोड येथील वाचनालय १९६२ साली विजयादशमीला स्थापन झाले. या वाचनालयात चौथ्या मजल्यावर युवकांसाठी अभ्यासिका आहे. ती १९७७ साली स्थापन करण्यात आली. स्पर्धा परिक्षेसाठी मुले तिचा वापर करतात. पंधरा हजार पुस्तके ग्रंथालयात आहेत. मोठ्यांसाठी ललित साहित्य, ग्रंथ, मासिके असे सर्व काही आहे ते केवळ मासिक दहा रुपये फीमध्ये. तरीही नाशिकरोडच्या लोकसंख्येच्या तुलनेत साडेतीनशे सभासद कमीच आहेत. बालवाचकांसाठी स्वतंत्र विभाग आहे. तेथे गोष्टीची आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची पुस्तके आहेत. मुलांसाठी फक्त पाच रुपये फी आणि २५ रुपये डिपॉजिट आहे. मुले दहा रूपयांचे कुरकुरे, वेफर्स घेऊन पालकांसमेवत येतात पण बालविभागाकडे फिरकत नाहीत. बालवाचकांची संख्या वाढावी, बाललेखक तयार व्हावेत असे महापालिकेचे प्रयत्न आहेत परंतु, पालक आणि मुलांकडून आशादायक प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. महापालिकेचे जेलरोडला नारायणबापू चौकातही वाचनालय आहे.

केवळ दोन कर्मचारी

ग्रंथपाल व शिपाई असे दोनच कर्मचारी असल्याने वाचनालय ३६५ दिवस सुरू ठेवायचे कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे वाचनालयातील ग्रंथसंपदा व्यवस्थित ठेवणे शक्य होत नाही. बालवाचनालय विभाग आकर्षक केला, टेबल-खुर्ची ठेवली आणि ऑडियो, व्हिडीओची सुविधा दिली तर मुलांचा प्रतिसाद वाढू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉपीराईट अॅक्टचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉपीराईट हक्क सरंक्षण अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकाविरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्तीधाम समोरील म्युझिक बॉक्स शॉपमध्ये अनधिकृतपणे हिंदी गाणे डाऊनलोड करून मेमरीकार्डमध्ये भरून देत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानतंर पोलिसांनी ही कारवाई केली. या दरम्यान दुकानातील १९ हजार रूपये किंमतीचा कम्प्युटर, सीपीयू, आय बॉल कंपनीचा कि बोर्ड व एक हार्ड डिस्क असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. संबंधित व्यवसायिकावर पोलिसांनी कॉपीराईट अॅक्टच्या कलम ५१/६३ व ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे अनाधिकृतपणे व्हीडीओ तसेच गाणे डाऊनलोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुलीकडून विषारी औषध सेवन

उंदीर मारण्याची पावडर पाण्यात मिसळून ते प्राशन केलेल्या १५ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. वैष्णवी रंगनाथ मते, असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ती आडगाव परिसरातील मते वस्तीवर राहत होती. वैष्णवीने १० मे रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे उलट्यांचा त्रास होऊ लागला. कुटुंबियांनी तिला पंचवटीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मंगळवारी सकाळी मृत्यु झाला.

मंदिरातील घंटेची चोरी

पाथर्डी फाट्याजवळील मुरलीधरनगर येथील मारूती व साईबाबा मंदिरातील ७ किलो वजनाची पितळी घंटा व तिला अडकवण्यासाठी असलेली लोखंडी सळई चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून परिसरातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

युवकाची आत्महत्या

सिडको परिसरातील पवननगर येथे राहणाऱ्या सचिन आत्माराम बाविस्कर (३५) याने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. औषधोपचारासाठी त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शहरात चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरातील विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी गृह विभागाने दिल्याच्या वृत्तानंतर पोलिस वर्तुळाच जोरदार चर्चा होती. या बदल्यांमध्ये नाशिकमधील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नाशिक शहरात सध्या डीसीपी म्हणून कार्यरत असलेले निसार तांबोळी यांची औरंगाबाद सीआरपीएफमध्ये तर डीसीपी म्हणून कार्यरत असणारे संदीप द‌िवाण यांची चंद्रपूरला एसपी या पदावर बदली झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात होती. एमपीएचे अधिकारी सुनील फुलारी यांची सांगली येथे एसपी म्हणून, मालेगावचे अॅडिशनल एसपी यांची चंद्रपूरला त्याच पदावर तर अँटी करप्शन विभागाचे एसपी प्रविण पवार यांची मुंबईत डिसीपी म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर हिंगोली येथील एसपी एन. अंबिका हे नाशिकमध्ये डीसीपी म्हणून, अकोल्याचे असिस्टंट एसपी प्रविण मुंढे यांची पेठ येथे एसडीपीओ म्हणून तर मुंबई शहरातील डीसीपी व्ही. बी. देशमुख यांची नाशिक शहरात डीसीपी पदावर बदली करण्यात आल्याचे वृत्त शहरात बुधवारी रात्री पसरले. या बदल्यांबाबत मंत्रालयातून कुठल्याही फॅक्स उशीरापर्यंत आला नव्हता. मात्र या विषयासंदर्भातील मेसेज मंत्रालयातून आल्याची खात्रीशीर माहिती पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण फेरबदल प्रस्ताव मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका विकास नियंत्रण नियमावली संदर्भात गौण फेरबदल प्रस्ताव मार्गी लागला आहे. यासंदर्भात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली असून, त्यात सकारात्मक निर्णय झाला आहे. परिणामी, येत्या काही दिवसातच या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणार असल्याचे समजते.

नाशिक महापालिका विकास नियंत्रण नियमावली संदर्भात गौण फेरबदल प्रस्ताव मार्गी लावावा यासाठी बैठक घेण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरविकासचे मुख्य सचिव नितीन करीर, महापालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, नगरविकासचे सहसंचालक प्रकाश भुक्ते, नगरविकासचे एडीटीपी विनय शेंडे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, योगेश गोलप, डॉ. राहूल आहेर, क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर, अनंत राजेगावकर, सुजॉय गुप्ता, सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, नरेश कारडा, हितेश पोतदार, आर्किटेक्ट विवेक जायखेडकर, विनय साखला हे उपस्थित होते.

नाशिक महापालिका विकास नियंत्रण नियमावली संदर्भात गौण फेरबदल प्रस्ताव एम. आर. टी. पी. अॅक्ट कलम ३७ (२) अन्वये नाशिक महापालिकेने शासनाच्या मंजुरीसाठी सादर केलेला आहे. मात्र, सदर प्रकल्प प्रदीर्घ कालावधीपासून मंजुरीसाठी प्रलंबित आहे. यासाठी आमदार जयंत जाधव यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या २०१५ च्या पहिल्या अधिवेशनात नियम ९३ अन्वये सूचना मांडली होती. त्यानुसार या प्रकरणासंदर्भात नगरविकास विभाग, नगररचना विभाग व नाशिक महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकारी याच्या समवेत आणि क्रेडाई नाशिकचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले होते.

या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पेड एफएसआय देणे आणि २४ मीटरपर्यंत एक जीना असणे या दोन्ही बाबी मान्य होणे शक्य नसल्याचे करीर यांनी सांगितले. याबाबत उपस्थितांनी होकार दर्शविल्याने हा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित राहणे नाशिकसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहराला परवडणारे नाही. आजच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होण्याची चिन्हे आहेत.

- जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणात पाणी, तरी शहर तहानलेलं!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणात जुलै महिन्याअखेर पुरेल इतका पाणीसाठा आहे. कोणतीही पाणीकपात नसल्याचे प्रशासन छातीठोक सांगत असले तरी प्रत्यक्षात कृत्र‌िम पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यात पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागतो आहे. सातपूर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा गाव, पंचवटीतील म्हसरूळ, आडगाव, नाशिकरोड परिसर, जेलरोड यासह इतर भागात गेल्या काही दिवसांपासून अनियमीत पाणीपुरवठा तोही कमी दाबाने होतो आहे. अनेक ठिकाणी महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणी कमी दाबाने येणार किंवा येणारच नाही, याविषयी अनेकदा नगरसेवक अनभिज्ञ असतात. त्यातच काही घरांमध्ये विद्युत मोटारी असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडते आहे. नवीन नाशिक परिसरातील मोरवाडी भागात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतो आहे. इंदिरानगर तसेच पाथर्डी परिसरात मध्यरात्री आणि अल्पवेळ पाणी येत असल्यामुळे रात्र-रात्र जागून काढण्याची वेळ सर्वांवर येते आहे. यामुळे संपूर्ण शहरातच कृत्र‌िम पाणी टंचाईच्या झळा बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यासंदर्भांत, पाणीपुरवठा विभागाचे सुप्रीटेंडण्ट इंजिनीअर आर. के. पवार यांना विचारले असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक शहरातला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या २ हजार ७६७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३९ टक्के पाणी साठा असून, तो जुलै अखेरपर्यंत शहराची तहान भागवू शकतो. त्यामुळे हे आरोप निराधार असल्याचे पवार यांनी महापौर अशोक मुर्तडक आणि उपमहापौर गुरमीत बग्गा यांच्या समक्ष सांगितले. प्रशासनाने कानावर हात ठेवल्याने ही कृत्र‌िम पाणी टंचाई किती दिवस सहन करायची, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवामान खात्याने पुढील ७२ तासांमध्ये वर्तविलेल्या पावसाच्या शक्यतेला अवघे चोवीस तासही उलटले नाहीत, तोच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावासाने विजेच्या कडकडाटांसह हजेरी लावली.

जिल्ह्यात बागलाण, निफाड, कळवण, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांसह मनमाड, लासलगाव, विंचूर, या भागांनाही पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसाने हजेरी लावली. आता १५ मे च्या नंतर पुढील ७२ तास पुन्हा गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरीही नाशिक शहरात मात्र सोसाट्याचा वारा अन् ढगाळ हवामानाचे चित्र दिसून आले.

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी शहरातील तपमानात घट झाली होती. मंगळवारच्या सुमाराला ३८ अंशांच्या वर पोहचलेले तपमान बुधवारी ३७.१ अंशापर्यंत खाली आले होते. बुधवारी सायंकाळी अचानक अंधारून आले व जाोरदार वाराही सुटला. हवामान अचानक ढगाळ झाल्याने नागरिकांची धावपळ झालेली दिसून आली. हॉकर्स, बसस्थानक परिसरातील प्रवासी आणि मध्यवर्ती भागातून उपनगरातील घरे गाठण्यासाठी सुरू झालेली लगबग असे चित्र बुधवारी सायंकाळी दिसून आले. १५ मे च्या नंतरही पुढील ७२ तास गारपीटीची शक्यता मुंबईच्या हवामान विभागाने पुन्हा वर्तविली आहे. जिल्ह्याच्या काही भागांमध्येही पावसाने हजेरी लावल्याने आता गारपिटीच्या भीतीने पुन्हा शेतकरी वर्गाचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images