Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिम्युलेशन मॉडेल सादरीकरणात फेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यादरम्यान गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात मंगळवारी सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च यंत्रणेने ताकदीने सादरीकरण करण्याचे प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर या यंत्रणेची तारांबळ उडाली. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अपडेटेड सिम्युलेशन येत्या १५ दिवसांत सादर करावे, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

धरणातून पाणी सोडल्यानंतर कुंभमेळ्यासाठी बांधण्यात आलेल्या घाटांच्या स्थितीचे संभाव्य चित्रण सेंट्रल वॉटर अॅण्‍ड पॉवर रिसर्च यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडले. धरणातून पाणी सोडल्यानंतर घाटांवर निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य आव्हाने लक्षात घेता करण्यात येणाऱ्या नियोजनाचे चित्रही यावेळी मांडण्यात आले. मात्र, यापुढे जात या कालावधीत पावसाळा असल्याचे यंत्रणा कशी विसरली? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्थितीबाबत विचार केला असला तरीही गंगापूर धरण क्षेत्रात किंवा नाशिक शहर परिसरात पाऊस पडल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत संबंधित यंत्रणेने काय विचार केला आहे, या प्रश्नावर मात्र यंत्रणेची भंबेरी उडाली. यानुसार आता पावसाळ्याचा विचार करून संभाव्य आव्हानांच्या संदर्भाने १५ दिवसांच्या आत नव्याने सादरीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च यंत्रणेस दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांची यादी महापालिकेला डोईजड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सिंहस्थापूर्वी गोदापरिसरातील तब्बल ३६ कामांची यादी महापालिकेला सादर केली आहे. यात वस्रांतरगृह दुरुस्तीसह रामकुंडावरील पत्र्याचे शेड काढणे, सूर्यनारायण मंदिराची दुरुस्ती, रामकुंडातील आरसीसी बंधारा तोडण्याच्या कामांचा समावेश आहे. सिंहस्थ दोन महिन्यावर येवून ठेपला असताना या भल्या मोठ्या कामांच्या यादीने महापालिकेला घाम फुटला आहे.

पालकमंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी केली. यात रामकुंडाच्या परिसरासह गोदाघाटावरील पुरातन मंदिराचाही समावेश आहे. या पाहणी दौऱ्यात गोदाघाटावर रामकुंडासह विविध कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. सिंहस्थानिमित्त जगभरातून भाविक येणार आहेत. त्यामुळे हा परिसर सुशोभीत आणि आकर्षक असावा यासाठी रामघाटावरील अतिक्रमण काढणे आणि मंदिरांना रंगरगोटी करण्याच्या कामांचा त्यात समावेश आहे. वस्रांतरगृहाची दुरुस्ती, रामकुंडाची रंगरंगोटी, श्रीराम स्तंभालगत ओटा दुरुस्ती, सिंहस्थ ध्वज दुरुस्ती, दशक्रिया विधी शेड दुरुस्ती, रामकुंडातील आरसीसी बंधारा तोडणे, सर्व कुंडांची साफसफाई करणे, सूर्यनारायण मंदिर दुरुस्ती, निळकंठेश्वर पुलाची दुरुस्ती, गांधीतलाव दुरुस्ती, दुतोंड्या मारुतीजवळ फिल्टर प्लंबिंग करणे, पाताळेश्वर मंदिर दुरुस्ती, पुलांची डागडूजी करणे, रामकुंडातील घाट, पायऱ्या, काँक्रीट व रेलिंगची दुरुस्ती, गोमुख तीर्थालगत ग्रॅनाईट बसविणे, बाणेश्वर मंदर रंगरंगोटी, पिंडदान चौथरा दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.

सिंहस्थात रामकुंड आणि परिसरातील मंदिरांचा परिसर स्वच्छ व सुशोभीत करण्यासाठी या उपाययोजना पालकमंत्र्यांकडून सुचविण्यात आल्या आहेत. आता सिंहस्थाला केवळ दोन महिने उरले असताना महापालिकेला या कामांची यादी बघून घाम फुटला आहे. कमी वेळेत ही कामे कशी करायची असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. तरीही महापौरांनी ही कामे त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. सिंहस्थासाठी राज्य सरकारने निधी दिला असून, त्यातून ही कामे करण्याचे फर्मान पालकमंत्र्यांनी सोडले आहे. मात्र, आता या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याला वेळ राहिला नसल्याने ही कामे कशी करायची असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणी अगोदर रोखावे रेल्वेचे रिझर्व्हेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीदरम्यान उसळणारा यात्रेकरूंचा प्रवाह लक्षात घेता नियोजन शक्य व्हावे, यासाठी सिंहस्थ पर्वणीच्या तीन दिवस अगोदर रेल्वेचे रिझर्व्हेशन रोखण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या कालावधीत १२ पेक्षा अधिक रेल्वेचे नियोजन करण्याच्या क्षमतेअभावी पर्वणीदरम्यान नाशिकरोड स्थानकातून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे रिझर्व्हेशन रोखले जावे, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले की, पर्वणी दरम्यान नाशिक रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे ५९ रेल्वेंचे आरक्षण तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात यावे, अशी आम्ही मागणी करीत आहोत. जेणेकरून एसी डब्यातील आरक्षण रोखले गेल्यास त्याजागी जनरल डब्यांची व्यवस्था करून अधिकाधिक प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येणे व जिल्हा प्रशासनालाही गर्दीचे नियोजन करणे शक्य होईल. ट्रॅकच्या मर्यादीत क्षमतेमुळे रेल्वेंची संख्या वाढविणे शक्य नाही. तात्पुरत्या स्वरूपात रिझर्व्हेशन रोखण्याचा उपाय पर्याय ठरू शकतो, असेही मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले आहे. या प्रकारे रेल्वेचे रिझर्व्हेशन रोखून एसी डब्यांऐवजी जनरल डब्यांची व्यवस्था केली गेल्यास दूरच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सुविधा शक्य आहे.

पर्वणीमध्ये शाहीस्नान करून माघारी परतणाऱ्या यात्रेकरूंना याचा सर्वाधिक लाभ होईल आणि रेल्वे सेवेच्या मर्यादेवर तोडगा निघून यामार्गे सुमारे ४० अधित रेल्वेंची व्यवस्था शक्य आहे, असाही मुद्दा जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता रेल्वे बोर्डाच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातीचे ढिगारे उचलण्याची गरज

$
0
0

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कामांनी वेग घेतला आहे. खोदलेले रस्ते, घाटांसाठी केलेले खोदकाम यामुळे ठिकठिकाणी मातीचे ढिगारे पडले आहेत. अचानक पाऊस कोसळल्यास या ढिगाऱ्यांमुळे विकासकामांवर परिणाम होऊ शकतो. तसेच, वाहतुकीसही अडथळ ठरू शकतील. यामुळे मातीचे ‌ढिगारे लवकर उचलण्यात यावे, अशी मागणी होत आहे. आखाड्यांच्या कामांवर सध्या प्रशासन जोर देत आहे. प्रत्येक आखाड्यात जाण्यासाठी सिमेंट क्राँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यांवर मातीचे ढिगारेही पडले आहेत. पाऊस पडल्यास ढिगाऱ्यांच्या मातीमुळे रस्ते चिखलमय होऊन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तसेच उंच सखल भागामुळे रस्त्याची वाट लागू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाट, रस्ता कामांचा वेग वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या ३१ मे पर्यंत सिंहस्थाची सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यासाठी प्रशासन अथवा इतर संबंधित विभागांसोबत समन्वय साधून कामे करावीत. घाट आणि घाटांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा वेग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन्, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, सिंहस्थ उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक विभागाने केलेल्या सुक्ष्म नियोजनानुसार कृती आराखडा पुढील बैठकीत सादर करावा, असे सांगतानाच कंत्राटदारांनी वेळेवर कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

रेल्वेने जास्त क्षमतेने वाहतूक करण्यासाठीचे नियोजन सादर करावे. संबंधित विभागांनी साधनसामुग्रीचे जीआयएस मॅपिंग करावे. साधुग्राम परिसरात खाद्यपदार्थ तसेच, भाजीपाल्यासाठी स्टॉलची व्यवस्था करावी, अशा सूचना कुशवाह यांनी दिल्या. दि. २५ मे नंतर मॉकड्रीलचे आयोजन करण्यात येणार असल्याने सर्व विभागांनी तशी तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत खडकवासलाच्या सेन्ट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च सेंटरच्या अधिकाऱ्यांनी घाटावरील पाणी पातळीबाबत केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण केले. सिंहस्थाच्या कामांना गती द्यावी आणि या महिनाअखेर सर्व कामे पूर्ण व्हावीत, यादृष्टीने अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले.

गोदावरी स्वच्छता

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येत्या जून रोजी गोदावरी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. व्यापक पातळीवर हा उपक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमधील रस्ते झाले खड्डेमय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील सर्वच्या सर्व रस्त्यांवर खड्डे पडून पाण्याचे डबके साचत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच, ग्रामपंचायतीच्या निधीतून रस्ताचे कामे झाली असून, दर्जाहीन कामांमुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे जनतेत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

सर्वांगिन विकासाची भूमिका साकारणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या आडकाठी प्रशासनामुळे नागरिक हतबल झाले आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग आपल्या कार्यपद्धतीमुळे नावाजला आहे. शहरातील मेनरोड, नवीन व जुना ओतूर रोड, सुभाष पेठ, सावरकर चौक, फुलामाता चौक, शाहीरलेन, गावठाण, गांधीचौक, गणेश नगर या संपूर्ण भागात रस्ते गायब झाले असून, मोठेमोठे खड्डे, डबके, घाण याशिवाय काहीच दिसत नाही.

शहरातील मेनरोडला व नवीन व जुना ओतूर रोडला अक्षरशः दोन्ही बाजूला साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. खड्ड्यांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नवीन व जुना ओतूर रोडवर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. तसेच, आरकेएम विद्यालयाच्या संपूर्ण रस्त्याच्या कडेला जवळपास एक फुटाचा गाळ साचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा आवक टिकून; बाजारभावात वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गत सप्ताहात येवला बाजारसमिती व अंदरसूल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती व तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सप्ताहात एकूण कांदा आवक ३० हजार ६५२ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४००, कमाल १ हजार ६४१ तर सरासरी १ हजार २०० रुपयांपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक १५ हजार ६१० क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४००, कमाल १ हजार ५८६ तर सरासरी १ हजार २०० रुपयांपर्यंत होते.

कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब आदी राज्यात तसेच परदेशात चांगली मागणी होती. सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांर्तगत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ९९ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १ हजार ४०८, कमाल १ हजार ७१७ तर सरासरी १ हजार ५५२ रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांर्तगत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ५६ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १ हजार २५०, कमाल १ हजार ५०० तर सरासरी १ हजार २९१ रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले. हरभऱ्यास स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभाव तेजीत होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक १४८ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ३ हजार ६१२, कमाल ४ हजार ७२२ तर सरासरी ४ हजार ४७५ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात मक्याच्या आवकेत घट झाली असून, बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. मक्यास स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी कमी राहिल्याने बाजारभावात घसरण झाली. सप्ताहात मक्याची एकूण आवक ३१० क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १ हजार १८०, कमाल १ हजार २९४ तर सरासरी १ हजार २६० रुपयांपर्यंत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पीड’ ठरत‌ोय जीवघेणा!

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

वेगाने विस्तारणाऱ्या नाशिकमध्ये अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तसेच चालकांच्या सुर‌क्षेसाठी उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र, नाशिककरांवरील जीवाचे संकट कमी होऊ शकलेले नाही. शहराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या साडे चार महिन्यात १३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

वाळूच्या ट्रकला कूलकॅब धडकल्यामुळे सोमवारी रात्री महिला पत्रकारासह तीन जणांचा बळी गेला. वाहनांच्या बेशिस्तीमुळे सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित बनल्याचे हे उदाहरण दिसून आले आहे. अंबड परिरासतच झालेल्या विविध अपघातांमध्ये १६ जणांना गंभीर दुखापत झाली असून काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. महामार्गालगत पर्यायी वाहतूक सुरळीत होण्यासाठी सर्व्हिस रोड निर्माण करण्यात आले. मात्र, यामुळे नाशिककरांची जीवन सुरक्षित होऊ शकलेले नाही. सोमवारी रात्री झालेल्या अपघातात कूलकॅबचा अक्षश: चेंदामेंदा झाला. कूलकॅब ट्रकच्या खाली घुसून गेली होती. रस्त्यांवरून वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या गतीवर कुणाचेच नियंत्रण राहिले नाही का? वाहतूक पोलिसांचा कुणावरच वचक राहिला नाही का? नियम धाब्यावर बसवून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई कशी करणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ट्रकवर कारवाई करणार कोण?

सोमवारी रात्री अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकची आरटीओचे प्रादेशिक अधिकारी जीवन बनसोड यांनी अंबड पोलिस ठाण्यात येऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी ट्रक सुरू करूनही पाहिले. अपघातग्रस्त ट्रकबाबत अधिकारी बनसोड यांच्याशी माहिती घेण्यासाठी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. परंतु, अशा प्रकारे अवजड व क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करणार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

ट्रक पासिंग झाले कसे?

आरटीओकडून कुठल्याही अवजड वाहनाचे पासिंग करतांना अगदी बारीक बाबी तपासल्या जातात. परंतु, सोमवारच्या अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रकला रात्रीच्या वेळी लागणारी सुरक्षा साधने नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्रुटी असलेल्या या ट्रकचे पासिंग झालेच कसे, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ट्रकमधून कच उडत असल्याने कूलकॅब चालकाच्या ट्रकचा अंदाज आला नसल्याने अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परंतु, आरटोओकडून पासिंग करतांना सुरक्षा साधनांची नीट पहाणी केली असती तर कदाचित अपघात टळला असता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

रात्री महामार्गावरून वाहने चालवितांना ट्रकचालकांचा त्रास छोट्या वाहनांना सहन करावा लागतो. सुरक्षेबाबात ट्रकचालक काळजी घेत नसल्याने अंधारात ट्रकवर धडकण्याचे प्रमाण अधिक आहे.

- बबलू पवार, वाहनचालक

काही ट्रकचालक रात्रीच्या प्रवासात रिफ्लेक्टर किंवा रेडिअम यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर करतांना दिसत नाहीत. यामुळे अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करण्याची गरज आहे.

- किशोर सोनटक्के, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्त शिवार’ला द्या बळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामे वेळेत पूर्ण करताना ती पारदर्शक होण्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग घ्यावा. प्रत्येक कामाच्या प्रगतीची माहिती ग्रामसभेला द्यावी, अशा सूचना राज्याचे जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी मंगळवारी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह (नाशिक), अनिल कवडे (नगर), रुबल अग्रवाल (जळगाव), अण्णासाहेब मिसाळ (धुळे) पी. प्रदीप (नंदुरबार) तसेच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात पाणलोट विकासाची कामे प्राधान्याने सुरू करावीत. वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण, वनराई बंधारे, सलग खोल समतलचर, गॅबियन बंधारे आदी कामांचा समावेश करुन ही कामे जून अखेरीस पूर्ण करावीत. त्यासाठी गावांना पुरेसा निधी द्यावा. कामाची गुणवत्ता व दर्जा यात वाढ करतानाच जास्तीत जास्त पारदर्शकता यावी म्हणून ग्रामस्थांना सहभागी करुन ग्रामसभेत कामाची माहिती देत रहावी. पूर्वीचे पाझर तलाव व सिमेंट बंधाऱ्यांचे गाळ काढणे, रुंदीकरण व खोलीकरण करणे ही कामे करावीत. मातीची धूप थांबविण्यासाठी गॅबियन बंधारे करावेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, लोकांचा सहभाग घ्यावा.

सचिव प्रविण दराडे म्हणाले की, जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. नाशिक विभागात त्याचे चांगले काम सुरु आहे. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कामे करावीत. विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, जुन्या योजना दुरुस्त करणे, अपूर्ण विहीर पूर्ण करुन ती पंपांना शंभर टक्के जोड देणे ही कामे करावीत. आयुक्त डवले म्हणाले की, नाशिक विभागातील ५४ तालुक्यातील ९४१ गावांची निवड केलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा रेलरोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी नाशिकरोडला रेलरोको आंदोलन केले. केंद्र सरकारने प्रस्तावित भूसंपादन कायदा रद्द करावा आणि अन्यायकारकरित्या अधिग्रहित केलेल्या जमिनी परत मिळण्याव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना मागण्यांचे निवेदन दिले.

भूसंपादन कायदा करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही तसेच या कायद्यामुळे शोषण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भूसंपादन कायदा रद्द करावा, संरक्षण विभागाने नाशिक तालुक्यातील नांदुर बहुला आणि शिवारातील सुमारे २१९ एकर जमिन अधिग्रहित केली असून त्याचा मोबादला त्वरित मिळावा, निफाड तालुक्यातील एचएएल तसेच रेल्वेसाठी अधिग्रहित केलेल्या परंतु, प्रकल्प पूर्ण होऊनही वापरात न आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, इंडिया बुल्सच्या रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील पाचशे एकर जमिन अधिग्रहित करण्यात आली आहे. ट्रॅकसाठी सेझ कायद्याचा वापर न करता एमआयडीसी कायद्याचा वापर करून दिशाभूल केली जात असल्याने शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाव्यात. जिल्ह्यातील रेल्वे तसेच हायवेसाठी सुरू असलेले बेकायदेशीर डिर्माकेशन थांबवावे. बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, प्रवक्ते हंसराज वडघुले पाटील, किरण देशमुख, नितीन रोठे पाटील, शरद लभडे, निलेश कुसमोडे, विकी गायधनी, हिरामण वाघ, धीरज कापडणीस, निलेश देशमुख, बशीर शेख, सलिम शेख, दर्शन बोरस्ते, लकी बावीस्कर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

नाशिकरोड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबळ, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक बी. डी. इप्पर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पवार, एल. के. सिंह आदींच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी मनमाड, भुसावळ, नंदुरबार आणि चाळीसगाव येथून अतिरिक्त कुमक मागवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर वाड्याच्या संवर्धनासाठी ५६ लाख

$
0
0

नाशिकरोडः नाशिकचे भूषण असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भगूर येथील वाडा जतन करण्यासाठी राज्य सरकारने ५६ लाखाचा निधी मंजूर केला आहे. खासदार गोडसे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी भगूरच्या याच वाड्यात झाला होता. त्यांचे शालेय शिक्षणही भगूरलाच झाले. १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, मंत्री बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत सावरकर वाड्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम झाला होता. वाडा राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आहे. त्यावेळी २० लाख रुपये खर्च करुन वाड्याची दुरुस्ती करण्यात आली होती. २६ वर्षांपासून वाडा दुलर्क्षित होता. तो जतन करण्याची मागणी केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या टीडीआरचा मध्यमवर्गीयांना फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जाहीर झालेल्या नवीन टीडीआरच्या धोरणानुसार सहा, सात व नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांना टीडीआर लागू करण्यास मनाई केली आहे. मात्र, नगररचना विभागाच्या या नव्या धोरणाला उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी विरोध केला आहे. हा निर्णय मध्यवर्गीयांवर अन्याय करणारा असून यामुळे फ्लॅटचे दर वाढतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

राज्याच्या नगररचना विभागाने टीडीआरसंदर्भात जाहीर केलेल्या नवीन धोरणात नऊ मीटर रस्त्याखालील भूखंडावर टीडीआर वापराला बंदी घातली आहे. तर नऊ मीटरवरील रस्त्यावर बांधकाम करतांना टीडीआर वाढवून देण्यासंदर्भातील नवा अध्यादेश जारी केला आहे. नगररचनाच्या या नवीन धोरणाचा फायदा मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना होणार असून मध्यमवर्गीय प्लॉटधारक व लहान बांधकाम व्यावसायिकांना फटका बसणार आहे. नाशिकमध्ये अधिकाधिक बांधकामे नऊ मीटरच्या रस्त्याच्या आतीलच आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना जास्त फटका बसणार असल्याने उपमहापौर बग्गा यांनी या नव्या धोरणाला विरोध केला आहे. शहरात आजपर्यत बांधकाम व्यावसायिकांनी अनेक लहान मोठे लेआऊट केल्याने अनेक भागात महापालिकेने नऊ मीटरच्या आत रस्ते विकसित केले आहे. या रस्त्यालगत आजपर्यंत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम करीत याठिकाणी टीडीआरचा वापर केला आहे.

वेगवेगळा न्याय का?

नऊ मीटरच्या रस्त्यालगत निम्म्याहून अधिक मध्यमवर्गीय व लहान बांधकाम व्यावसायिकांचे प्लॉट आहेत. मात्र, या नव्या टीडीआरच्या धोरणानुसार या प्लॉटधारकांवर अन्याय होणार आहे. निम्म्या लोकांना एक न्याय आणि निम्म्यांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसूलला रात्रीत सात घरफोड्या

$
0
0

येवला : पोलिसांना न जुमानता शहर व तालुक्यात चोरांनी दशहत निर्माण केली आहे. अंगुलगाव, अंदरसूलपाठोपाठ चोरट्यांनी आता नगरसूलला लक्ष्य केल्याने एकाच रात्री सात ठिकाणी धाडसी चोर्‍या करून पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. येवल्यातही चार ते पाच ठिकाणी व नागडे येथे मंदिरात रात्री जबरी चोरी झाली आहे.

सोमवारी नगरसूल येथे रात्री ओम गुरूदेव अलंकार या दुकानातून तीन हजार रुपये किमतीची चांदी, ओम साई किराणा दुकानातून दोनशे रुपये, कपिल अलंकार यांचे चार हजार दोनशे रुपये किंमतीची चांदी असे सात ठिकाणी झालेल्या कुलूप तोडीत पंचवीस हजार रुपये ऐवजावर चोरांनी डल्ला मारला आहेत. किशोर खरोटे (वय ४८) यांनी फिर्याद दिली. आंध्र प्रदेशातील साई भक्तांना रेल्वेत लुटून नगरसूल स्थानकादरम्यान चोर पळून जातात, अशाही तक्रारी केल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ वादातून युवकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ वादामुळे चौघा जणांनी मिळून एका युवकाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरातील ओमकार किराणा दुकानाजवळ घडली.

आनंद संजय खणके (२०) असे मयत युवकाचे नाव आहे. खणके मुरलीधरनगर येथे राहात होता. याच परिसरात राहणाऱ्या योगेश राजाभाऊ जाधव याच्याशी त्याचे काही दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद सोमवारी रात्री उमटले. संशयित आरोपी जाधव याने राष्ट्रपाल विलास नरवडे व अन्य दोघा साथिदारासमवेत आंनदला गाठून पुन्हा वाद घातला. तसेच संशयित जाधवने आपल्याकडील चाकुने आंनदच्या छातीवर वार केला. घाव वर्मी बसल्याने आनंद जागीच कोसळला. घटनेची माहिती समजल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. खुनामागील हेतू आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी​ दिली.

बालकामगाराची सुटका

सातपूर एमआयडीसीतील सीएट कंपनीच्या परिसरातील दुकानात मिरची खुडण्याच्या कामास लावलेल्या १४ वर्षीय बालकामगारची सुटका करण्यात आली. बालकामगाराची नियुक्ती करून तिचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करून कमी वेतन दिल्याप्रकरणी दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे १० कोटींचे नुकसान

$
0
0

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीत दोन युनियन्सच्या आपसातील चढाओढीतून सुरू झालेला संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. दोन दिवसांच्या संपात कंपनीचे सुमारे दहा कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एकाच विचारधारेच्या दोन युनियन्समध्ये लागलेल्या चढाओढीमुळे कंपनीचे व्यवस्थापन अन् काही कामगार वेठीला धरले जात आहेत. सोमवारच्या दिवशी संपात समारे ९० टक्के कर्मचारी सहभागी होते. तर उर्वरित कामगार कामावर हजर झाले. मात्र, मंगळवारी कामावर हजर होऊ इच्छिणाऱ्यांना इतर कामगारांच्या वतीने मज्जाव करण्यात आला. व्यवस्थापनाने यावर शक्कल लढवित एसटी महामंडळाच्या बसेसमधून कर्मचाऱ्यांना कामावर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संपात सहभागी कामगारांनी तो प्रयत्न हाणून पाडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुकणे पाणी योजनेचा वाद मिटणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुकणे पाणीपुरवठा पाइपलाइन योजनेची किंमत लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीसोबत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निविदेच्या दराविषयीचा वाद आता जवळपास मिटला आहे. या योजनेची किंमत २६६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. एकूण मंजूर किमतीच्या दहा टक्के निविदेत वाढ असल्याने या वाढीव ३६ कोटींच्या निधीला मंजुरी मिळवण्यासाठी महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

नाशिक शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी मुकणे धरणातून थेट १८ किलोमीटरची पाइपलाइन टाकून पाणी उचलण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत २३० कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, २००७-०८ या वर्षाच्या सर्व्हेक्षणांतर्गत २३० कोटी मंजुरी देण्यात आली आहे. त्यात केंद्राचा वाटा ५० टक्के, राज्याचा २० टक्के, तर महापालिकेचा वाटा ३० टक्के असणार आहे. मात्र, या कामाची निविदा २९३ कोटींची काढण्यात आली होती. त्यावरून वाद विवाद सुरू झाले होते. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पुर्नमूल्यांकन करून घेतले. मजीप्रने या २६१ कोटींचे पुर्नमूल्यांकन केले होते. तर आयआयटी पवईकडून त्याचे पुर्नमूल्यांकन करण्यात आले. लार्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीची निविदा २६९ कोटींची होती. त्यामुळे महापालिकेने पुन्हा कंपनीशी वाटाघाटी करून साडेतीन कोटी कमी करीत, संपूर्ण कामाचा दर २६६ कोटी निश्चित करण्यात आला आहे. २००७ आणि आताच्या दरामंध्ये मोठी वाढ झाल्याने निविदेची किमंत वाढली आहे.

आता नव्या दरानुसार महापालिकेला ३६ कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे. संबंधित निविदेची वाढीव रक्कम ही १० टक्क्यांपेक्षा अतिरिक्त आहे. त्यामुळे या वाढीव दराला महासभेची मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी येत्या १९ तारखेला होणाऱ्या महासभेत या वाढीव किमतीला मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळील लिंगटांगवाडी शिवारात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एसटी बस व टेम्पो यांच्या जोरदार धडकेत तीनजण ठार तर आठजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एसटी बस चालकाचा समावेश असून, अपघातानंतर केम‌िकलची वाहतूक करणारा टेम्पो जळून खाक झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज-नाशिक ही निमआराम बस सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता मिरजहून निघाली होती. पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास सिन्नरजवळील लिंगटांगवाडी शिवारातून सिन्नरकडे येत असताना सिन्नरकडून संगमनेरकडे जात असलेला आयशर टेम्पोने एसटीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी डावीकडे झाडावर जाऊन आदळली. तर टेम्पो डाव्या बाजूकडे खड्ड्यात गेला. या धडकेत एसटी बसचालक दत्तात्रय मल्हारी मदने (वय ४०, रा. पुणे) व बसमधील प्रवासी प्रा. मानवेंद्र जाधव (वय ४५, रा. सातारा) व वैशाली वसंत पवार (वय ३२, रा. लेंगार, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे जागीच मृत्यूमुखी पडले. तर जखमीमध्ये टेम्पोतील ड्रायव्हर आखिल मोमीन शेख (वय ३५, रा. संगमनेर) व क्लिनर पंडित चंद्रभान गांगुर्डे (वय २१, रा. संगमनेर) यांचा समावेश आहे.

टेम्पोत दोनशे लिटरचे केमिकलचे ड्रम होते. अपघातानंतर केमिकल पेटल्याने काही वेळात टेम्पो जळून खाक झाला. या घटनेनंतर सिन्नर नगरपालिकेचे दोन्ही अग्निशामक दलाने शर्यतीने आग विझविली. एसटीतील वसंत पवार, सुशीला पवार, किसन कबाळे, आदित्य कबाळे, अशोक गुवाळ, रामदास कडभाने हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’ने घेतली तब्बल सहा तासांची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या अडीच तासांच्या परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांना तब्बल सहा तासांची परीक्षा मंगळवारी द्यावी लागली असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थी हैराण झाले आहेत. येत्या काही दिवसात होणाऱ्या पेपरचीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्याने विद्यापीठाला अखेर नवी प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन द्यावी लागला.

मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. मात्र, सोमवारी एमबीएच्या परीक्षेत अनोखा गोंधळ झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना नव्या पॅटर्ननुसार पेपर देण्यात आल्याचा तसेच जवळपास ४० टक्के प्रश्न हे अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याविरोधात पेपर न सोडविताच अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचा मार्ग मुंबई केंद्रातील अनेक विद्यार्थ्यांनी अवलंबला. ही बाब घडून एक दिवस उलटत नाही. तोच मंगळवारी आणखी एक प्रकार समोर आला. मंगळवारी दुपारी २.३० ते ५ या वेळेत पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचा पत्रकार कार्य आणि जबाबदारी (Jou102) या विषयाचा पेपर होता. मात्र, या विषयाऐवजी येत्या १४ मे रोजी होणाऱ्या संपादक कार्य व जबाबदारी (Jou104) या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडली. आगामी विषयाची प्रश्नपत्रिकाच फुटल्याने गोंधळ उडाला. झाला प्रकार अखेस विद्यापीठाच्या परीक्षा विभागास कळविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली.

अखेर विद्यापीठाकडून तासाभराने राज्यभरातील सर्व परीक्षा केंद्रांना नवीन प्रश्नपत्रिका मेल करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येएवढ्या प्रिंटस काढण्यात आल्या आणि दुपारी २.३० ला सुरु होणारा पेपर संध्याकाळी पाच वाजता सुरु झाला. या साऱ्या प्रकारामुळे विद्यार्थी तर वेठीस धरल्या गेलेच पण नियोजन नसल्याने विद्यापीठाचा कारभारही पुन्हा वादात सापडला.

या साऱ्या प्रकारामुळे दुपारी साडेचार ते संध्याकाळी साडेसात या वेळेत विद्यार्थ्यांना पेपर द्याला लागला. तसेच, संपादक कार्य व जबाबदारी (Jou104) या विषयाची प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांना नव्याने द्यावी लागणार आहे.

आजच्या पेपरसाठी आम्ही २ वाजेपासून परीक्षा केंद्रावर आलो होतो. मात्र, आजच्या विषयाऐवजी पुढच्या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. अखेर २.३० वाजता सुरु होणारा पेपर ४.३० ला सुरु झाला. या गोंधळामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल झाले. यामुळे विद्यापीठाने परीक्षेत नियोजन करणे गरजेचे होते.

- आनंद बागुल, विद्यार्थी

काही दिवसात होणाऱ्या पेपरचीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्याने गोंधळ झाला. पण हा प्रकार आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तातडीने नवीन प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन दिली. असे होऊ नये, म्हणून संबंधितांना दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

डॉ. अर्जुन घाटोळे, परीक्षा नियंत्रक, मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतीविना शिक्षण समिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत गठीत होऊन दोन आठवडे लोटलेल्या शिक्षण समितीला अद्याप सभापती व उपसभापती मिळालेले नाहीत. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे गेलेला समितीच्या सदस्य निवडीचा प्रस्ताव तक्रारींमुळे रखडलेला आहे. दुसरीकडे शिक्षण मंडळाच्याच माजी सदस्यांनी थेट न्यायालयात जाण्याची तयारी केल्याने शिक्षण समितीचा वाद आणखीन चिघळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

महापालिका शिक्षण समितीचा शिक्षण मंडळाप्रमाणेच पुन्हा खेळखंडोबा होणार आहे. राज्य सरकारने महापालिकांचे शिक्षण मंडळे बरखास्त करीत मंडळांची स्वायत्तता काढून घेतली तेव्हाच शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समिती गठीत करण्यासंदर्भातील निर्देश दिले होते. मात्र, ही समिती गठीत करण्याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करीत उपायुक्त व प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत महापालिका शाळांचा कारभार सुरू ठेवला. आता दीड वर्षाची मुदत शिल्लक असतांनाच, पुन्हा शिक्षण समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत सत्तेत वाटा न मिळालेल्या नगरसेवकांना समितीवर पाठविण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी विशेष महासभा घेवून पक्षीय बळानुसार शिक्षण समिती सदस्यांची निवड झाली. १६ सदस्यांच्या निवडीनंतर सभापती व उपसभापतीची निवड अपेक्षित होती.

गेल्या आठवड्यात महापालिकेकडून शिक्षण समितीच्या महासभेतील ठराव विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला. सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी तारखेची मागणी नगरसचिव विभागाकडून पाठविण्यात आला. मात्र, आठवडा लोटला तरी सभापतीपदाच्या निवडीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. शिक्षण मंडळाच्या माजी सदस्यांनी या समितीला आक्षेप घेत जुनेच मंडळ कायम असल्याचा दावा केला आहे. त्यांसदर्भातील शासकीय आदेशही या सदस्यांनी विभागीय आयुक्तांपुढे सादर केले असून रितसर तक्रार दाखल केली. आयुक्तांनी अद्याप सभापतीपदाची निवडणूक घेतली नसल्याने ती लांबल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सभापती आणि उपसभापतीपदासाठी इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे.

मंत्रालयातूनच दबाव

शिक्षण समिती सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया जाहिर करू नये यासाठी थेट मंत्रालयातूनच दबाव आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच ही प्रक्रिया थांबवून ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी या प्रकरणात आस्तेकदमची भूमिका घेतली आहे. या समितीसंदर्भातील कायदेशी अडचणी तपासण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया झाल्यानंतरच तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंत्रालयातून 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे समिती अस्तित्वात येण्यापूर्वीच वादात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारिका याच पेशंटच्या आधार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेशंटला वेळेवर औषधपोचार करून 'सिस्टर' या नावाला खऱ्या उतरणाऱ्या परिचारिका याच सपोर्ट सिस्टम म्हणून काम पाहतात, असे मत मेजर पी. एम. भगत यांनी व्यक्त केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. `सिस्टर` हा जनमानसात परिचारिकांसाठी ओळख म्हणून वापरला जाणारा शब्द आहे. तो कौटुंबिक, जिल्हाळा आणि बहिणीचे नाते दर्शवतो. तसेच २४ तास सावली बनून, तहान- भूक विसरून, डॉक्टरने दिलेली लाईन ऑफ ट्रिटमेंट पाळून पेशंटची सुश्रृषा करणारी परिचारिका खऱ्या अर्थाने पेशंटसाठी सपोर्ट सीस्टम ठरते. आधुनिक नर्सिंगचे जनक प्लोरेंस नाईटिंगेल आणि त्यांनी प्रोत्साहीत केलेल्या सर्व परिचारिकांबद्दल, त्या करत असलेल्या मानवतावादी दृष्टीकोनाबद्दल रेड क्रॉसतर्फे जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात येतो, अशी माहितीही रेड क्रॉसचे मानद सचिव भगत यांनी दिली. यावेळी उपस्थित परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. सर्व परिचारिकांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, व्यवसायासाठी घेतलेली पवित्र शपथ दैनंदिन कार्यात स्मरणात ठेवून, तंतोतत पाळावयास हवी, असा सल्ला रेड क्रॉसच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर यांनी नर्सिंग कॉलेजच्या परिचारिकांना दिला. कार्यक्रमासाठी शशिकांत वर्मा, चंद्रकांत गोसावी, सीस्टर मोहिनी मिरीकर, अलका दुबे, योगिनी जोशी, श्वेता वानखेडे, कमल चावरिया, मंगला कस्तुरे, जयश्री कुलथे यांनी परिश्रम घेतले. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध नर्सिंग कॉलेजेस तसेच सिव्हील हॉस्पिटलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images