Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाल वाचनालयाची सातपूरला वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शाळेत शिक्षण घेताना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. त्यातच शाळेतील वाचनालयात मुलांना रोज एक तास हा वाचनासाठी दिला जातो. परंतु, लाखो विद्यार्थी असलेल्या सातपूर भागात बालवाचनालयाची वानवाच आहे. यामुळे मुले वाचनापासून वंचित आहेत. सातपूर भागात बालवाचनालय असावे, अशी मागणी होत आहे.

सद्या स्थितीत सर्वात जुने सुभाष मुंजवाडकर वाजनालय अशोकनगरच्या निलकंठेश्वरनगरात आहे. तर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी शिक्षणमहर्षी डॉ. वसंतराव पवार यांच्या नावाने वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. खुडवडनगर येथील सिटू भवनात कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांनी कामगारांना वाचणाची आवड निर्माण व्हावी याहेतून डॉ. सुधीर फडके सार्वजनिक वाचनालय उभारले आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या तीनही ठिकाणच्या वाचनालयात बालकांचे प्रमाण शुन्य आहे. यासाठी बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी बालवाचनालयाची निर्मिती करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालवाचनालय पडताहेत ओस

$
0
0

दिलीप अहिरे, पंचवटी

पंचवटी परिसरात वाचन संस्कृती टिकावी यासाठी विविध नगरात छोटी तसेच, मोठी सुसज्ज अशी वाचनालये आहेत. अनेक वाचनालयांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

वाचकाला आपली आवडीची पुस्तके आणि विविध ग्रंथ सहज वाचायला मिळावी याकरिता मोठी ग्रंथसंपदा खरेदी केली आहे. रोजच विविध दैनिके येतात. मुक्तद्वार आहे, बालकांसाठी स्वतंत्र दालन आहे. हजारो गोष्टींची व कथा आणि मनोरंजन करणारी विविध पुस्तके आहेत. परंतु, बालक वर्गाकडून मात्र कुठेही पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. मासिक व वार्षिक वर्गणीदार फारच कमी प्रमाणात झालेले दिसतात. विविध उपक्रम राबवूनही फारसा प्रतिसाद नाही. याचा अर्थ कुठेतरी वाचन संस्कृती वाढण्यापेक्षा कमी होत चालली आहे, असे दिसून येते. एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबाला संस्कार देणारी आजी-आजोबा मंडळी फारशी छोट्या कुटुंबात दिसत नाही. आजी- आजोबा आपल्या नातवांना गाणी, गोष्टी सांगायचे आणि स्वत: कायम विविध पुस्तके वाचायची व बालगोपाळाना वाचून दाखवायची त्यामुळे ही लहान मुले व मुली पुस्तकांचा खजिना कोठे असतो, याचा ते शोध घेऊन तिथपर्यंत पोहचायचे व पुस्तके वाचायची. परंतु, सध्याची विभक्त कुटुंब पद्धती आणि कामानिमित्त बाहेर पडणारी घरातील मंडळी यामुळे या सर्व बाबी मागे पडत चालल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा यांचा सहवास नाही व संस्कार देणाऱ्या पुस्तकांची माहितीही कोणी देत नाही. यामुळेच वाचनालयात 'बालभवन' व अमाप साहित्य असून त्या साहित्याचा अधिकाधिक फायदा घेताना दिसत नाही. पर्यायाने वाचनालये ओंस पडत चालली आहेत.

श्रीराम सार्वजनिक वाचनालय, गणेशवाडी

आमदार बाळासाहेब सानप यांनी अतिशय सुंदर वाचनालय या ठिकाणी उभारले आहे. बालभवन आहे, पण बालवाचकच नाहीत. जवळ-जवळ दोन हजार पुस्तके आहेत पण, बालवाचक सभासद नाहीत. मात्र याच वाचनालयाने 'संत ज्ञानेश्वर अभ्यासिका' सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाकी सर्व विभाग खूपच जोरात आहेत. अतिशय समृद्ध वाचनालय आहे. इमारत व फर्निचर खूपच चांगले आहे.

हनुमानवाडी वाचनालय, मखमलाबाद

रस्त्यावरील हनुमान वाडीत 'हनुमान तरूण मित्र मंडळ' यांनी हे वाचनालय सुरू केले आहे. यातही सर्व सुविधा आहेत. बालवाचकांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. जवळ-जवळ १०० ते १२५ बालवाचक सभासद आहेत. शाळा चालू असताना कायम गर्दी असते. परंतु सुटीत मात्र प्रतिसाद नसतो. तीन हजार पुस्तके आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. स्पर्धाही घेतल्या जातात. इतर सर्व प्रकारचे मुबलक साहित्य आहे.

नवरंग सार्वजनिक वाचनालय ,हिरावाडी

माजी नगरसेवक प्रा.राजेंद्र नवले यांनी वाचनालय उभारले आहे. वाचनालयात सर्व प्रकारचे साहित्य आहे. अभ्यासिका आहे. परिसरातील शेकडो महाविद्यालयीन मुले व मुली याचा लाभ घेतात. सर्व स्तरातील वाचक या ठिकाणी येतात. परंतु, या ठिकाणीही बाल वाचनालयाची इतर वाचनालयाप्रमाणे स्थिती आहे. अतिशय अल्पसा प्रतिसाद मिळत आहे याची खंत प्रा. नवले यांनी व्यक्त केली. ज्या वयात मुलांनी वाचले पाहिजे व उत्तम ज्ञान संपादन केले पाहिजे तेच नेमके होत नाही. टिव्हीमुळे हा परिणाम झाला आहे. मुले तासनतास कार्टून पाहतील पण वाचणार नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. मुलांसाठी खूप वेगवेगळे उपक्रम राबवले पण, उपयोग झाला नाही. पालकांनी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. स्वत: वाचन केले पाहिजे.





पंचवटी सार्वजनिक वाचनालय

स्व. आमदार उत्तमराव ढिकले यांनी पंचवटीकरांना ज्ञानामृत मिळावे यासाठी वाचनालय सुरू केले. पंचवटीतील सर्वात जुने सर्व विपूल माहितीचा खजिना असणारे, सर्व प्रकारचे साहित्य असणारे, वाचकांनी वाचनालयात यावे व वाचन करावे आणि स्वतःचा विकास करावा या हेतूने वर्षभर अनेक प्रकारचे उपक्रम राबवूनही अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र विभाग आहे. विभागात १०६० पुस्तके आहेत, बैठक व्यवस्थाही आहे. वाचनालयाने अभ्यासिका सुरू केली आहे, त्याला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना प्रवेश नाकारावा लागतो एवढा चांगला प्रतिसाद आहे.

बालवाचकांंचा अल्प प्रतिसाद आहे. सर्वांना वाचनासाठी पुस्तके दिली जातात. बालकांनी वाचनालयापर्यंत यावे याकरिता आम्ही 'साने गुरुजी' कथामाला २० वर्ष चालवली. पूर्वी खूप प्रतिसाद मिळत असे पण, आता मुले -मुली येत नाही.खूपच कमी सभासद आहेत. सभासद आहेत पण सुटी असल्यामुळे येत नाहीत. - नथुजी देवरे, प्रमुख कार्यवाह

सार्वजनिक वाचनालय, म्हसरूळ

म्हसरूळ सार्वजनिक वाचनालय १९८१ ला माजी नगरसेवक स्व. मुरलीधर उखाडे यांच्यासह परिसरातील अनेक अभ्यासू मंडळीच्या प्रयत्नातून सुरू झाले. हजारो वाचकांची सोय झाली. शहरातील वाचनालयात येऊन पुस्तके आणावी लागत होती. परंतु, आता मात्र त्याच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध असल्याने वाचक समाधान व्यक्त करीत आहेत. सर्व प्रकारची दैनिके, संदर्भ ग्रंथ मिळतात. या ठिकाणीही बालवाचकांची संख्या इतर वाचनालयापेक्षा अधिक आहे. जवळ जवळ १५० बाल वाचक सभासद आहेत. दररोज बालवाचक येतात आणि विविध पुस्तके वाचतात अशी माहिती प्रा. उखडे व ग्रंथपाल विनोद खैरनार यांनी दिली. इमारत छोटी पडू लागली आहे. भविष्यात मोठी इमारत उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.



बालवाचकांनी वाचनालयापर्यंत यावे आणि भरपूर वाचन करावे याकरिता विविध उपक्रम, स्पर्धा घेतल्या जातात. अनेक प्रकारचे साहित्य व सुविधा निर्माण केल्या आहेत. - राहुल गुंजाळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने नाशिकमध्ये वाचक मिळेना!

$
0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

जुने नाशिकच्या बुधवार पेठमधील एकमेव असलेले सुभाष सार्वजनिक वाचनालयात बाल वाचनालयाची सुविधा असून, आवश्यकतेनुसार विद्यार्थी या वाचनालयात अभ्यासाला येत असतात. तर, दुसरीकडे जुने नाशिकमधील नगरसेवकांच्या प्रयत्नांतून साकारलेले अभ्यासिकांचे हाल आहेत. काही अभ्यासिकांची दुरवस्था आहेत तर काही बंद अवस्थेत आहेत.

प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेविका रंजना पवार यांच्या प्रत्यानातून नागझिरी शाळेत सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली अभ्यासिकेचे मागणीअभावी ते सुरू न होताच सुमारे चार वर्षांपासून वापरविना बंद अवस्थेत पडून आहे. सुभाष सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती बाल वाचानलयातूनच झाली आहे. या वाचनालयाची मूळ स्थापणा १९४२ झाली. बंद पडलेल्या या वाचनालयाला यशवंतराव शिंदे गुरुजींनी साने गुरुजींच्या सांगण्यावरून १७ ऑक्टोबर १९५३ साली पुन्हा सुरुवात करून दिली. स्वराज्य प्राप्तीनंतर सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी ग्रंथालयाची गरज असल्याचे साने गुरुजींनी सांगितले होते. या त्यांच्या प्रेरणेच सुभाष वाचनालय सुरू झाले. आजपर्यंत ते सुरू आहे. सध्या दत्ता पगार ग्रंथपाल म्हणून सुभाष वाचनलयाची धुरा संभाळत आहेत. अलीकडे बाल गोपाळांना मोबाइलवरील गेम खेळणे, टिव्हीवरील सिरीयल यामुळे बाल गोपाळांत वाचनसंस्कृती कमी होत चालली असल्याने बालवाचनालयात अगदी कमी प्रमाणात ते वाचनालयाची पायरी चढतात.

या वाचनलयात बाल वाचनालय विभागात लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून, बाल गोपाळांसाठी सुमारे सहा हजार बाल वाडःमय पुस्तकांचा संग्रह आहे. या शिवाय स्वतंत्र उर्दू विभागही आहे. यात सुमारे तीन ते चार पुस्तके आहेत. एकूण सुभाष सार्वजनिक वाचनालयात सुमारे पन्नास हजार पुस्कांचा

अमूल्य ठेवा असून, जुने नाशिककरांसाठी हे वाचनालय अभ्यासू सुसंस्कृत पिढी घडविण्याचा एक साधन मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांचे हक्काचे न्या. रानडे वाचनालय

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

लहानमुले कॉम्प्युटरच्या आहारी गेली आहेत, त्यांचे वाचन कमी झाले अशी नेहमी ओरड केली जाते. मात्र रविवार पेठेतील न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय याला अपवाद आहे. या वाचनालयाच्या बालविभागात लहान मुलांची कायमच गर्दी असते. या ठिकाणी पुस्तकांचा खजिना असून बालगोपाळांची पुस्तके घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते.

नाशिकमध्ये वाचनालयाची खरी परंपरा न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या जन्मभूमीसाठी सामाजिक सुधारणांच्या विचार जागृतीस १८७८ मध्ये सुरुवात केली. नाशिकमध्ये त्यांनी गंगाधर नरसिंह केतकर यांच्या स्मरणार्थ रविवार पेठेत केतकर टाऊन हॉल सभागृह बांधण्यात पुढाकार घेतला. याच इमारतीमधील वाचनालय सुरू केले. त्याला रानडे मोफत वाचनालय हे नाव त्यांच्या स्मरणार्थ प्राप्त झाले. न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालयाचे उद्घाटन १ फेब्रुवारी १९०७ रोजी करण्यात आले. पूर्वी या लायब्ररीत कमी ग्रंथसंपदा होती. मात्र त्यात वाढ झाल्याने २८ ऑगस्ट १९९१ रोजी या वास्तुचे नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उदघाटन कविवर्य कुसूमाग्रज यांच्या हस्ते झाले.

नाशिकमध्ये १८४० मध्ये नेटिव्ह लायब्ररी' (सार्वजनिक वाचनालय) ब्रिटिशांनी सुरू केली. तथापि रानडे वाचनालय ही नाशिककरांची पहिली निर्मिती होय. जेव्हापासून ही लायब्ररी सुरू झाली तेव्हापासून या लायब्ररीने वाचनाच्या अनेक पिढ्या घडवल्या. या वाचनालयात समृध्द असा बालविभाग आहे. यात विविध प्रकारच्या साहसी कथा, युध्द कथा, विज्ञान विषयक पुस्तके, इतिहास कथा, जनरल नॉलेज अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा भरपूर खजिना आहे. हा खजिना बालवाचकांना अगदी मोफत वाचायला मिळतो. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रामध्ये वाचनालय सुरू असते. वाचनालयात लहान मुलांची गर्दी होत नाही असा एकही दिवस नसतो. रविवार आणि सुटीच्या दिवशी वाचनालयात बालगोपाळांची जास्त गर्दी असते. मे महिन्याच्या सुट्या लागल्यानंतर येथे जणू यात्रा भरते.

रविवार पेठेत हे एकमेव वाचनालय असल्याने वाचकांच्या अगदी सोयीचे आहे. लहानांबरोबरच मोठ्यासाठीही येथे ग्रंथसंपदा आहे. पूर्वी केतकर टाऊन हॉल ही वास्तू म्हणजे, काँग्रेसच्या गुप्तसभा, शिबिरांचे स्थळ होते. ब्रिटिशांनी वटहुकूम काढून या संस्थेवर बंदी आणली होती. मात्र, पुढे त्यावरील बंदी उठली. सध्या बालविभागात लहानमुलांची धूम असून, वाचनासाठी सकाळपासून गर्दी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालविभागात भरते चिमुरड्यांची जत्रा

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

उन्हाळ्याची सुटी म्हणजे बालगोपालांना वेध लागतात ते बालवाचनालयाचे. आपापल्या विभागातील बालवाचनालयांमध्ये जाऊन पुस्तकांचा, कॉमिक्सचा फडशा पाडण्यासाठी सर्व बच्चे कंपनी उत्सूक असते. याच पार्श्वभूमीवर मुख्य विभागांमध्ये वाचनालयांची अवस्था कशी आहे याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न 'टीम मटा'ने केला. बालवाचनालय असूनही काही वाचनालयांना सभासद मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मोबाइल, गेम्स, कार्टून यांचा वाचनालयांवर मोठा परिणाम झाला आहे. वाचनसंस्कृती‌ टिकविण्यासाठी वाचनालयांनी काही योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच बालवाचनालय तग धरू शकतील.

१७५ वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने खास बालकांसाठी बालविभाग निर्माण करण्यात आले आहे. या विभागामार्फत वर्षभरात अनेक बालोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. शहरातील सर्वच वाचनालयामध्ये सर्वाधिक उपक्रमशील असलेला हा बालविभाग म्हणजे बालकांसाठी उपक्रमांची पर्वणी घेऊन येणारे विद्यापीठच आहे. या बालविभागातील ग्रंथालय म्हणजे बालकांसाठी कहाण्यांचा खजिनाच.

बाल विभागाकडून ग्रंथालय चालवले जात असून, त्यात चिमुरड्यांसाठी तसेच किशोरवयींसाठी अनेक पुस्तके आहेत. सुटीमध्ये येथे चिमुरड्यांची जत्राच भरत आहे. सावानामध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची दखल घेऊन अनेक वर्गणीदारांनी खास बालविभागासाठी पुस्तके देऊ केली आहेत. बालविभागात पुस्तके वाचनासाठी येथे चिमुरड्यांची गर्दी होत असून, रोजच सभासदांची संख्या वाढत आहे. सभासदांना येथेच काहीतरी खाऊ मिळावा, अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता असून, जी मुले येथेच राहून पुस्तके वाचतात त्यांच्यासाठी हे उपयोगाचे ठरणार आहे. तसेच त्याचा प्रभाव संख्येवर पडून बालविभागाची संख्याही वाढणार आहे.

बालकांसाठी कथामाला

सार्वजनिक वाचनालयातर्फे बालकांसाठी बालभवन सानेगुरूजी कथामालादेखील चालविण्यात येते. या मालेमध्ये कथाकथन, कविता स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त काव्यवाचन स्पर्धा तसेच कवितालेखन स्पर्धा घेण्यात येते. विशेष म्हणजे त्यासाठी प्रचंड संख्येने विद्यार्थी सहभागी होतात. यंदा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये चिमुरड्यांनी स्वत: बनविलेल्या कविता वाचनाचा आस्वाद घेतला. त्यात कविता सादर करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. कथामालेतर्फे चालविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये शहरातील सर्वच शाळांना सहभागी करून घेण्यात येते. त्या निमित्ताने शाळांमध्ये जे उपक्रम चालतात त्यांचीही उजळणी होऊन जाते व कथामाला खऱ्या अर्थाने संपन्न होते.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक बालभवन सानेगुरुजी कथामाला हा विभाग गेल्या ४०-४५ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. सुरुवातीला कथामालेचे स्वरुप असलेल्या या विभागात बालभवनाच्या माध्यमातून स्पर्धात्मक कार्यक्रमांची जोड देऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच कलेल्या क्षेत्रातही विकास व्हावा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

शाळा सुरू झाल्यानंतर जुन किंवा जुलै महिन्याच्या रविवारी 'पावसाळी कविता गायन' स्पर्धेने कथामालेच्या कार्यक्रमांची सुरुवात होते.

पावसाळी कविता गायन स्पर्धा

शुध्दलेखन - हस्ताक्षर स्पर्धा

श्री गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा

श्री गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

याचबरोबर एखादा कार्यक्रम / उपयुक्त व्याख्यान व प्रथम सत्राचा पारितोषिक वितरण व त्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. दुसऱ्या सत्रामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, प्रशिक्षण कार्यशाळा (यंदा जानेवारी महिन्यात) नखचित्र, वारली चित्रकला, कातर कामातुन नक्षी तयार करणे, ओरिगामी अशा चार विषयांच ी एकत्रित कार्यशाळा जानेवारी महिन्यात घेण्यात आली. दरवर्षी नवीन विषयावरील कार्यशाळा घेण्यात येते. चित्रकला स्पर्धा (फेब्रुवारी महिन्यात) बालनाट्य स्पर्धा 'कै.रत्नाकर गुजराथी स्मृती' बालनाट्य स्पर्धा या नावाने जानेवारी महिन्यात या बालनाट्य स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धाही गेल्या ४०-४५ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहेत व अनेक कलावंत या स्पर्धेमध्ये शालेय जीवनात सहभागी झाले आहेत.

फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या सत्राचा पारितोषिक वितरण समारंभ होतो. यामध्ये बालभवनच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गायन / नृत्य असा कार्यक्रम व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन अशा स्वरुपाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बऱ्याच वेळा पारितोषिक वितरण समारंभाचे व्यासपीठावरील सर्व आयोजन विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्यामुळे तो ही अनुभव / आनंद विद्यार्थ्यांना घेता येतो.

सर्व स्पर्धा तीन गटात

१) इयत्ता तीसरी ते चौथी, २) पाचवी ते सहावी, ३) सातवी ते आठवी व विद्यार्थ्यांना बक्षिसे 'पुस्तकरूपाने' दिली जातात. (प्रमाणपत्र व पुस्तक) यामुळे वाचनाचीही आवड वाढते.

सावानाच्या बालविभागात २५ हजाराहून अधिक पुस्तके असून, अनेक बालवाचक सभासद आहेत. वाचनाची आवढ वाढावी म्हणून बालवाचकांना एका पुस्तकाबरोबर पाच पुस्तके वाचण्यास दिली जात आहेत. याचाही अनेक बालवाचक लाभ घेत असून, या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. बालभवनच्या दुसऱ्या सत्राच्या पारितोषिक वितरण समारंभात वर्षभर उत्कृष्ट वाचन करणाऱ्या बालवाचक सभासदांचा सत्कार केला जातो. यासाठी ललिता खाडीलकर यांनी दिलेल्या देणगीतून 'उत्कृष्ट बालवाचक' पुरस्कारही दिले जातात. २००६ साली सावाना बालभवनतर्फे ५ दिवसांचा 'धम्माल बालमहोत्सव' आयोजित केला होता. यामध्ये ५ दिवस ८०० ते ९०० विद्यार्थी रोज अत्यंत आनंदाने येत होते. या पाच दिवसात विद्यार्थ्यांसाठी पुढील कार्यक्रम घेतले जातात.

जादूचे प्रयोग

गाण्याचे कार्यक्रम

अंधश्रध्दा निर्मूलन

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बालनाट्य सादरीकरण

वक्तृत्त्व / कथाकथन / कार्यशाळा

रामदास पाद्ये यांचा 'बोलक्या बाहुल्या' हा कार्यक्रम असे अनेक आनंददायी उपक्रम या बालमहोत्सवात घेण्यात आले. यावर्षी वाचनालयास (शतकोत्तर अमृतमहोत्सव) १७५ वर्षे झाली असून, या अमृत महोत्सवी वर्षात नाशिककर विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा 'धम्माल बालमहोत्सवाचे' आयोजन करण्याचा मानस आहे.





एका पुस्तकावर पाच पुस्तके योजना

सार्वजनिक वाचनालयाच्या बालविभागात सभासद असणाऱ्या सर्व बालवाचकांना सुटीनिमित्त मराठी किंवा इंग्रजी पुस्तकावर पाच छोट्या मराठी पुस्तकांची मेजवानी ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास एका पुस्तकावर पाच मराठी छोटी परंतु, विविध विषयांची पुस्तके घरी वाचावयास मिळणार आहे. यात विज्ञान, कथा, कुतूहल, वैचारिक व खेळ, सुविचार, चरित्र आणि शैक्षणिक विषयांचा समावेश आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोणतीही वेगळी फी आकरली जात नसून, बालवाचकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन सावानेचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकपदांसाठी २७ मे रोजी मतदान

$
0
0

प्रचाराला चढला रंग; १९ जागांसाठी लढत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्टेट ट्रान्स्पोर्ट को ऑप बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या क्रांती पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारास सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरुवात करण्यात आली. बँकेसाठी येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे.

क्रांती पॅनलने राज्यभरातून १९ उमेदवार उतरविले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्त बोलतांना संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले, की कामगारांना स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्यासाठी आमचे प्राधान्य असेल. कर्मचाऱ्यांना १० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कर्जवाटप प्रकरणात पारदर्शकता आणली जाईल. मृत कर्मचाऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल, अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत. यावेळी छाजेड यांनी यापूर्वी बँकेचा कारभार असलेल्या संघटनेच्या कारभारावर टीका केली. एस. टी. बँकेत कर्मचाऱ्यांच्या ठेवी असलेल्या सुमारे ३५० कोटी रुपयांची निव्वळ ५ ते ९ टक्के व्याज देणाऱ्या राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, केरळ, कर्नाटक व हरियाणा या राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप छाजेड यांनी केला आहे. तसेच एस. टी. मधील मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी त्यांच्या २७ नातेवाईकांना बँकेमध्ये नोकरीवर रुजू करून घेतले. याशिवाय संगणक खरेदीमध्ये १०.३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले. परंतु, अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न छाजेड यांनी उपस्थित केला आहे.

स्टेट ट्रान्स्पोर्ट को ऑप बँकेमध्ये क्रांती पॅनलचे उमेदवार निवडून आल्यास पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला जाईल, असे आश्वासन छाजेड यांनी दिले. राज्यातील सर्व बसस्थानकांवर बँकेच्या एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. शैक्षणिक कर्जाची मर्यादा वाढविली जाईल. सभासदांच्या मुलांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना लागू केली जाईल, कमी दरात जास्त लाभ देणारी विमा योजना लागू केली जाईल, अशी आश्वासने छाजेड यांनी दिली आहेत.





९२ सभासदांचा इंटकमध्ये प्रवेश

सोलापूरच्या कार्यक्रमात तुळजापूरच्या मनसे संघटनेचे उपाध्यक्ष सतीश भांजी, बीड मधील बी. जी. पुरी, औरंगाबाद येथील निफ्टू संघटनेचे के. बी. तौरपाटील यांच्यासह ९२ सभासदांनी इंटकमध्ये प्रवेश केल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगणात ४१ उमेदवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. तर दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ११ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारपासून (दि. १२) निवडणूक प्रचाराला सुरुवात होत आहे. दरम्यान, बिनविरोध निवडीसाठी उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केला.

नाशिक जिल्हा बँकेच्या २१ सचांलकपदासाठी येत्या मंगळवारी (दि. १९) मतदान होत आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. निवडणूक रिंगणात ११५ उमेदवार होते. त्यापैकी सोमवारी ७४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ४१ उमेदवार उरले आहेत. यात २१ पैकी तालुकानिहाय अ गटातील १५ पैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये माजी अध्यक्ष अद्वय हिरे (मालेगाव), किशोर दराडे (येवला), सचिन सावंत (सटाणा), शिरीष कोतवाल (चांदवड), गणपत पाटील (दिंडोरी), केदा आहेर (देवळा), संदीप गुळवे (इगतपुरी), परवेझ कोकणी (त्र्यंबकेश्वर), नामदेव हलकंदर (पेठ), आमदार जे. पी. गावित (सुरगाणा) यांचा समावेश आहे. आता सिन्नर, नाशिक, कळवण, नांदगाव, निफाड या गटात मोठी चुरस असल्याने या ठिकाणच्या निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. तर राखीव सहा जागांवरही एकमत न झाल्याने आता निवडणूक अटळ आहे.

माघारी धावपळ अन् ...

अर्ज माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने बिनविरोधसाठी उमेदवारांनी सर्व मार्गाचा अवलंब केला. मनधरणीपासून प्रलोभनापर्यंत अवलंब झाल्याने अनेकांची चंगळ झाली. बँकेच्या बाहेरच माघारीसाठी काही उमेदवारांनी थेट बोल्याच लावल्या होत्या. तर अनेकांनी राजकीय दबावाचा वापर करून माघारी करून घेतल्या. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.





उर्वरित चुरशीच्या लढती

सिन्नर - माणिकराव कोकाटे विरुद्ध सागर जाधव

निफाड - दिलीप बनकर विरुद्ध भास्कर बनकर

नाशिक - देविदास पिंगळे विरूद्ध शिवाजी चुंभळे

कळवण - धनजंय पवार विरूद्ध उद्धव आहेर

नांदगाव - सुहास कांदे विरुद्ध अनिल आहेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार हजार अपंगांना मिळणार कृत्रिम आधार

$
0
0

विशेष कॅम्पमध्ये साहित्य-उपकरणांचे वाटप

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

अपंगत्वावर मात करणे अवघड असले तरी कृत्रिम साधनांच्या आधारे अपंगत्व तुलनेने सुसह्य करणे कठीण नाही. कानपुर येथील भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अॅलिम्को) संस्थेद्वारे जिल्ह्यातील ४४४६ गरजू अपंग बांधवांना विविध साहित्य, कृत्रिम अवयव आणि उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे रविवारी (दि. २४) कार्यक्रम होईल.

यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयेाजन करण्यात आले. अॅलिम्कोचे महाव्यवस्थापक पी. के. दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एकनाथ माले, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, महेश चौधरी, अॅलिम्कोचे अरुण मिश्रा, राजकुमार रायसेने, आर. एस. दास बैठकीला उपस्थित होते.

बैठकीमध्ये मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली. गरजू अपंग व्यक्तींसाठी ४० ते ५० ट्रक साहित्य अॅलिम्कोतर्फे आणण्यात येणार आहे. यात ट्राय सायकल्स, श्रवणयंत्र, चष्मा, व्हीलचेअर आदींसह विविध प्रकारच्या कृत्रिम अवयवांचा समोवश असणार आहे.

यापूर्वी नागपूर येथे झालेल्या शिबिरात ४,०४८ आणि रायसेना येथे झालेल्या शिबिरात ४,२४२ गरजू अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यादृष्टीने त्र्यंबकेश्वर येथे होणारा मेळावा संस्थेच्या ऐतिहासिक असेल, असा विश्वास दुबे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारचे अपंग कल्याण संचालनालय, राज्य सरकार, पंचायती आखाडा बडा उदासिन निर्वाणी यांच्या सहकार्याने आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने त्र्यंबकेश्वर येथे २४ व २५ मे रोजी विनामूल्य अपंग सेवा शिबिर होणार आहे. त्यामध्ये ७ हजाराहून अधिक अपंगांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करून ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या ४,४४६ गरजूंना कृत्रिम साहित्य, उपकरणे पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकाधिक अपंगांना शिबिरासाठी आणले जाणार आहे. त्यांच्या भोजनाची सोयही केली आहे. ४०० कर्मचारी या शिबिरासाठी राबत आहेत. साडेचार हजार अपंगांना साहित्य मोफत वाटले जाणार आहे.

- दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफडीसी कंपनीमध्ये ६२०० रुपयांची वेतनवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या एफ. डी. सी कंपनीतील कामगारांचा नुकताच वेतनवाढ करार झाला. यात कामयस्वरूपी असलेल्या कामगारांना सहा हजार २०० रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सहा महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात वेतनवाढीबाबत बोलणी सुरू होती. अखेर कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात वेतनवाढीबाबत समझोता झाल्याने कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर फटाके व गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. वेतनवाढीच्या करारावर कंपनीच्या वतीने कार्मिक व्यवस्थापक विजय दळवी, सहाय्यक व्यवस्थापक संजय हरळे तर युनियनच्या वतीने सिताराम ठोंबरे, एस. एस. मोरे यांसह कामगार प्रतिनिधींनी सह्या केल्या. कामयस्वरूपी कामगारास वेतनवाढीच्या करारामुळे प्रत्येकी २० हजार रुपये वेतन मिळणार असल्याचे सिटूचे ठोंबरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टनचे कर्मचारी संपावर

$
0
0

कामकाज रखडले; मान्यताप्राप्त संघटनेशी सीटूप्रणित संघटनेचा वाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन युनियनमधील वादाच्या ठिणगीनंतर सोमवारी क्रॉम्प्टन ग्रीव्हज या अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्रेसर कंपनीत बेमुदत संपाला सुरुवात झाली. आयटक प्रणित कामगार संघटनेसोबत कंपनीने वेतन करार न करता तो सीटू प्रणित कामगार संघटनेशी करावा, असा या युनियन्समधील वादाचा मुद्दा आहे. कुठल्याही चर्चा अगर बैठका न होता संपाचा सोमवारचा पहिला दिवस पार पडला.

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनीही काही मुद्यांवर बोट ठेवले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी वेतन करार करताना सर्वच कामगारांना विश्वासात न घेतल्याने संपाच्या भूमिकेवर उतरावे लागल्याचाही कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. तर, मान्यताप्राप्त संघटनेशी करार करण्याच्या कायदेशीर निर्देशांनुसारच कंपनी जात असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

कंपनी व्यवस्थापन आणि अल्पमतातील युनियनचे पदाधिकारी यांनी कामगारांना विश्वासात न घेता वेतनकरार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आहे. दबाव निर्माण करण्याच्या हेतूने आतापर्यंत विविध कारणांच्या निमित्ताने ७ कामगारांचे निलंबन व २७ कामगारांवर चौकशी लावून त्यांचा मानसिक छळ सुरू असल्याचाही संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे. वेतनवाढीच्या करारादरम्यान युनियनच्या प्रतिनिधींनी कामगारांशी चर्चा न केल्याने अन् त्यांची मंजूरीही न घेतल्याने या वेतन कराराच्या विरोधात संपकरी कर्मचारी आहेत. या करारा दरम्यान ज्या कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी बोलणी केली आहे त्यांचे आम्ही सभासद नसल्याने आमच्या वतीने त्यांनी बोलणी करू नये असे कंपनीला लेखी कळवूनही ग्रिव्हज कॉटन अॅण्ड अलाईड एम्प्लॉईज युनियनने या कराराबाबत केलेली बोलणीही मान्य नसल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.

पक्षपाती वेतनकराराला विरोध

१ जानेवारी २०१५ रोजी करण्यात आलेला वेज सेटलमेंट तथा वेतन करार हा कामगारांच्या बाबतीत पक्षपात करणारा असल्याने तो मान्य नाही, अशी भूमिका सोमवारी संपकरी कामगारांच्या वतीने घेण्यात आली आहे. कंपनीतील मान्यताप्राप्त कामगार संघटनेने प्रश्नी मार्गी लावला नाही. त्यामुळे कामगारांवरील अन्याय दूर व्हावा, त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी संपाचा आधार घ्यावा लागला अशी भूमिका संपात सहभागी कामगारांचे प्रतिनिधी चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, शरद पाटील, शिबू नायर, पुंडलिक चित्ते आदींनी मांडली. त्यामुळे या पुढील टप्प्यात कामगारांचे मन वळविण्याच्या दृष्टीने क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी व्यवस्थापनाकडून प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटधारकांना मिळणार नकाशे

$
0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

नगररचना विभागाकडून मंजुरी देण्यात येणारे बांधकाम नकाशे सार्वजनिक करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे. फ्लॅटधारकाला सात दिवसाच्या आत आपल्या इमारतीचे नकाशे पाहता येणार आहे. मात्र, आयुक्तांचा हा हेतू चांगला असला तरी त्याला माहिती अधिकार कायद्याच्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. माहिती अधिकार कायद्यातील कलम ८, ब ११ नुसार अशा प्रकारचे नकाशे सार्वजनिक करण्यास मनाई असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे.

महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशापैकी वेगळ्याच प्रकारची बांधकामे बिल्डरांकडून बांधण्यात येत असल्याचे महापालिकेच्या लक्षात आले आहे. प्लॅटधारकांना आपल्या इमारतीचा भोगवटा नकाशा कोणता याचीच माहिती नसते. तर महापालिकेत ही माहितीही मिळत नव्हती. नागरिकांना आपल्या इमारतीच आणि प्लॅट नेमका नकाशा काय मंजूर झाली याचीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पारदर्शक कारभारांतर्गत आयुक्त प्रवीण गेडाम आणि नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विजय शेंडे यांनी नागरिकांसाठी त्यांच्या इमारतींचे बांधकाम नकाशे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या बांधकाम नकाशाची एक प्रत थेट महापालिकेकडून नागरिकांना घेता येणार आहे. त्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली असून, मागणी केल्यानंतर सात दिवसांत हा नकाशा मिळणार आहे. मात्र अशा प्रकारचा नकाशा देण्यास बिल्डरांनी विरोध केला आहे. माहिती अधिकार कायदा कलम ८,ब ११ नुसार अशा प्रकारचे नकाशे देता येत नसल्याचा दावा बिल्डरांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या निर्णयाला कायद्याचा अडसर ठरण्याची शक्यता आहे. आयुक्तांचा हा निर्णय पारदर्शी असला तरी त्याला बिल्डरांकडून आता खो देण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. या पद्धतीमुळे बिल्डरांकडून होणा-या बेकायदेशीर बांधकामांना चाप बसण्यास मदत होणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक टळणार असल्याचे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`संमोहन ही मानसिक प्रक्रिया`

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संमोहन हे बाह्यमनाला स्थिर करणारे शास्त्र आहे. तर्कवितर्कामध्ये बाह्यमन गुरफटून जाते तेव्हा त्याला जडत्व देऊन अंतर्मनाला जागे करण्याचे काम संमोहन करते. ती एक मानसिक प्रक्रिया असली तरी भावभावनांचा निचरा करण्याचा तो राजमार्ग आहे, असे प्रतिपादन संमोहनतज्ज्ञ शैलेन्द्र गायकवाड यांनी केले.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या ९४ व्या वसंत व्याख्यानमालेत'तणावमुक्त जीवनासाठी संमोहन' या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान आण्णासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. गायकवाड पुढे म्हणाले की, मनाचे दोन प्रकार असतात. अंतर्मन ही फुलांची बाग असेल तर बाह्यमन म्हणजे या बागेचे रक्षण करणारा माळी असतो. अंतर्मनात काही कुविचार शिरू न देणे हे बाह्यमनाचे काम असते. निसर्गाने स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य दिले आहे परंतु ते विचार सकारात्मक असावे यासाठी आपणच प्रयत्न करावयाचे असतात. कळते पण वळत नाही यातील वळत नाही त्याला वळवण्याचे काम, मनाला ताब्यात घेण्याचे काम संमोहन करते असेही ते म्हणाले.

गायकवाड पुढे म्हणाले की, तुम्ही सतत करीत असलेला विचार अचानक अंतर्मनात निघून जातो. त्यामुळेच समस्या निर्माण होतात. परंतु या समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्यही याच विचारांमध्ये असल्याचेही ते म्हणाले. अंतर्मनात गेलेले विचार शारीरिक व मानसिक बदल घडवून आणतात. त्यामुळे सकारात्मक विचार करा असा सल्लाही गायकवाड यांनी दिला. व्याख्यानादरम्यान गायकवाड यांनी उपस्थित श्रोतृवृंदावर संमोहनाचे प्रात्यक्षिक करीत त्याची अंमलबजावणी कशी करतात हे दाखवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोहित संघ अन् मनसेत दिलजमाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पुरोहित संघ आणि आरोप करणारी मनसे यांच्यात सोमवारी दिलजमाई घडून आल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. आपसातले गैरसमज निघून गेल्यानंतर आता महापालिकेच्या वतीने रामकुंडाभोवतालच्या कामांवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे. यापुढील कालावधीतही पालिकेचे असेत सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही शुक्ल यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुंभमेळ्यात नाशिक भेटीचे आमंत्रण पुरोहित संघाच्या वतीने देण्यात आले होते. यावेळी सतीश शुक्ल यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व आदी पदाधिकारी होते. मात्र या भेटीवरून परतल्यानंतर मनसेच्या वतीने प्रवक्ते संदीप लेनकर यांनी महापौरांना प्रथम नागरिक म्हणून

या भेटीच्या निमंत्रणाचा मान द्यायला हवा होता, त्यांना पुरोहित संघाने डावलल्याचा आरोप केल्याचे पत्रकही प्रसिध्द केले होते. यानंतर महापौरांना पुरोहित संघाने न डावलता वेळोवेळी सोबत येण्याची विनंती केली असल्याचा खुलासाही शुक्ल यांनी केला होता. श्रेयवादावरून रंगत चाललेल्या या नाट्यावर अखेरीला पडदा पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिक्युरीटी गार्डचा मृत्यू

$
0
0

नाशिक : तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवरून घसरून सिक्युरीटीगार्डचा मृत्यू झाला. आज, सोमवारी दुपारी पाऊणेतीन वाजण्याच्या सुमारास कॉलेजरोड येथील निर्माण हाऊसच्या इमारतीत ही घटना घडली.

कैलास सखाराम ​शिंदे (वय ३५) असे मयत व्यक्तिचे नाव आहे. श्रमिकनगर येथील कोठवदे किराणा दुकानाजवळ राहणारे शिंदे निर्माण हाऊसमध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून काम पाहत होते. निर्माण हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरून जात असताना ते पायरीवरून घसरले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना मुंकुद रामहरी गायकवाड यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जनलक्ष्मी'वर वर्चस्व पाटलांचेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात चार दशकांपासून योगदान देणाऱ्या जनलक्ष्मी बँकेच्या निवडणुकीत समृध्दी पॅनलच्या सर्वच्या सर्व म्हणजे तेराही उमेदवारांनी दणदणित विजय मिळविला. मतमोजणी पूर्ण होताच समृध्दी पॅनलच्या उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. बँकेवर संस्थापक माधवराव पाटील यांच्या गटाचेच पूर्ण वर्चस्व राहिले.

बँकेच्या चार दशकांच्या इतिहासात केवळ दुसऱ्या वेळी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीने बँकेच्या संचालक मंडळात चार नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर, दोन जागांवर यापूर्वीच दोन उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामुळे १५ पैकी १३ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. समृध्दी पॅनलच्या तेराही उमेदवारांनी परिवर्तन पॅनलच्या पाचही उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. बँकेच्या सुमारे ३८ हजार मतदारांपैकी सुमारे ३२०० मतदारांनी हक्क बजावला होता.

उमेदवार व मते

रविंद्र अमृतकर (२७२०), संजय चव्हाण (२७६९), जयंत जानी (२६९०), उत्तम कांबळे (२६९७),रामरतन करवा (२६८५), संदीप नाटकर (२६८०), भालचंद्र पाटील (२७३४), माधवराव पाटील (२७९३), श्रीकांत रहाळकर (२६७७), सतिश सोनवणे (२५२९), शरद गांगुर्डे (२७२८), महिला राखीव गटातून अनुराधा केळकर (२७८१), स्वप्ना निंबाळकर (२५१०) यांनी समृध्दी पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित विजय मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपासाची जबाबदारी निश्चित

$
0
0

गुन्हा सिध्द होण्यासाठी आयुक्तांचे वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्हा दाखल करणे आणि तो कोर्टात सिध्द करणे यात मोठी तफावत आहे. कमकुवत पुराव्यांभावी गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण खूपच कमी असून, ते वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यापासून चार्टशिट दाखल होईपर्यंत भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याचबरोबर जबाबदारीही नि​श्चित करण्यात आली आहे.

शहरातील ११ पोलिस स्टेशन्समध्ये वर्षभरात सरासरी अडीच ते तीन हजार गुन्ह्यांची नोंद होते. यातील ५० ते ६० टक्के गुन्हे पोलिस उघड करतात. वर्षागणिक गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोर्टात गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण तुलनेत खूपच कमी पडले आहे. गुन्हा सिध्द होत नसल्याने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. आयुक्त एस. जगन्नाथन यांना विचारणा केली असता त्यांनी नवीन पध्दतीची माहिती दिली. गुन्ह्याचा तपास करताना सर्वांत महत्वाची जबाबदारी गुन्हे विभागाच्या पोलिस निरीक्षकाची असते. यापुढे तपासाचे टप्पे, यात समोर येणारे पुरावे याचे वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने आदेश देण्यात आले आहेत.

घटनेच्या पहिल्या १५ दिवसांतच सर्व पुरावे संकलित करून त्यातील कोर्टात तग धरतील अशा पुराव्यांवर काम करण्यासंदर्भांत सूचना करण्यात आल्याचे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. साधारणतः पहिल्या महिन्यातच हा अहवाल सहायक पोलिस आयुक्त किंवा पोलिस उपायुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर कोर्टात चार्टशिट दाखल होईल. निसंदेह पुराव्यांमुळे गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. अर्थात यासाठी तक्रारदाराने मांडलेली तक्रार देखील तेवढीच स्पष्ट व वस्तुस्थितीला धरून असावी, असे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी उचलेल्या या पावलांमुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासही मदत होणार आहे.

‍विशेष पथकाची निर्मिती

शहरात १ जानेवारी ते ६ मे या कालावधीत चेन स्नॅचिंगच्या ३९ घटना घडल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण अवघे १८ इतके होते. मोटार वाहनचोरीच्या वरील कालावधीत २०४ घटना घडल्या. तेच मागील वर्षी २४१ वाहनांवर चोरट्यांनी हात साफ केला होता. या दोन गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. गुन्ह्यांची संख्या कमी असली तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. चेन स्नॅचिंगच्या ३९ घटनांपैकी ८ गुन्ह्यांतील आरोपी सापडले असून, वाहनचोरीच्या २०४ घटनांपैकी अवघे २९ घटना उलगडण्यात पोलिसांना यश मिळाले. यापार्श्वभूमीवर क्राईम ब्रँचने एक पथक नियुक्त केले आहे. या पथकाद्वारे फक्त वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास केला जाणार असल्याचे जगन्नाथन यांनी दिली. आर्थिक गुन्हे, बँकांना सूचना देण्याची कामे आपल्यापातळीवर होत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांना रामकुंड ‘दूर’ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही मिरवणुकीचा कालावधी वगळता भाविकांना रामकुंडापासून दूर रोखण्याचा प्रश्नच नसल्याची स्पष्टोक्ती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आज, सोमवारी दिली. किंबहुना पोलिसांचा बंदोबस्त देखील याचप्रमाणे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान रामकुंडात केलेल्या स्थानाला महत्त्व असल्याने भाविकांचा ओढा याच ठिकाणी असतो. २००३ पर्यंत शहरात दाखल होणारे भाविक थेट रामकुंडापर्यंत पोहचत होते. अरूंद भागात एकच गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची शक्यता अधिक होती. २००३ च्या कुंभमेळ्यात झालेही तसेच. यानंतर प्रशासनाने गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याचे नियोजन आखले. त्यानुसार, रामकुंडाव्यतिरिक्त कन्नमवार पुलाजवळ, नांदूर घाट तसेच दसक येथे नवीन घाट तयार करण्यात आले. नाशिक-पुणे हायवेने शहरात दाखल झालेल्या किंवा रेल्वेने आलेल्या भाविकांना रामकुंडाऐवजी दसक घाटावर घेऊन जाण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. किमान शाही मिरवणूक संपेपर्यंत ना​शिकरोडप्रमाणे इतर भागातील भाविक रामकुंडावर पोहचणार नाहीत, याची खात्री प्रशासनाकडून केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींना बोलीभाषेतून शिक्षण

$
0
0

विकसनाची प्रक्र‌िया सुरू

जितेंद्र तरटे , नाशिक

बोलीभाषेच्या कुशीतून प्रमाण भाषेच्या आश्रयाला येताना जाणवणाऱ्या भाषिक अडसरापोटी बहुतांश आदिवासी विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवत आहेत. हे चित्र पालटावे अन् आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवास बोलीभाषेतील शिक्षणाकडून प्रमाण भाषेच्या मार्गावर सुकरपणे व्हावा, यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे आता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्याचे विकसन आदिवासी बोली भाषेतून करण्याच्या प्रक्र‌ियेला सुरूवात झाली आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी या शैक्षणिक साहित्याचे विकसन राज्यातील प्रमुख आदिवासी बोलीभाषांमध्ये करण्यात येणार आहे. केवळ बोलीभाषेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या विषय आकलन प्रक्र‌ियेत निर्माण होणारा अडसर दूर सारण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामागे आहे, असे विभागाकडून सांगण्यात येते.

राज्यभरात आदिवासी बहुल भागामध्ये या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्यात कोरकू, भिली, मावची, पावरी, गोंड, वारली, कातकरी, नहाली आदिवासी भाषांचा समावेश शालेय साहित्यात करणार आहे.



परिषदेला शोध आदिवासी भाषकांचा

शालेय शिक्षण विभागाने या साहित्य विकसनासाठीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविली आहे. इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांसाठीच्या शैक्षणिक साहित्यात शब्दकोष, चित्रकोष, संवाद पुस्तिका व कथामालिका अशा प्रकारच्या साहित्याचा समावेश असेल. यासाठी आदिवासी बोली भाषांचे जाणकार आणि या प्रकारच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभागी असणारे शिक्षक, चित्रकार, कलाशिक्षक, सेवाभावी संस्थांशी संलग्न कर्मचारी आदी व्यक्तींच्या शोधात पुण्यातील विद्यापरिषद आहे. परिणामी, या बोलीभाषेतील जाणकांरांच्या योग्य प्रतिसादानंतरच या प्रक्र‌ियेस गती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाव आघाडीचा; नेतृत्व भाजपकडे

$
0
0

जिल्हा बँक निवडणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून येणाऱ्यांमध्ये सहकारावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश असून, नेतृत्व मात्र भाजपकडे असल्याने आघाडीच्या नेत्यांची गोची झाली आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि मनसे अवस्था क्षीण झाली आहे. सहकार राज्यमंत्री शिवसेनेचे असतानाही, त्याचे दोनच उमेदवार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जिल्हा बँकेतील राजकारणाचे बरेचसे चित्र स्पष्ट झाले आहे. सहकारावर दबदबा असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बिनविरोध निवडीत आघाडी घेतली आहे. २१ पैकी तालुकानिहाय १५ जागांपैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या दहा पैकी काँग्रेसचे ३, राष्ट्रवादीचे ४, भाजपचे २ तर माकपचा एक उमेदवार निवडून आले आहेत. सद्यस्थितीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे वेगवेगळया तीन पॅनलचे असले तरी, यात आघाडीचा वरचष्मा आहे. तर दुसरीकडे दोन पॅनलचे नेतृत्व हे प्रथमच भाजपकडे आहे. भाजपचे अद्वय हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, सुरेश बाबा पाटील नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भाजपला अच्छेदिन आले आहेत. शिवसेनेचे चार आमदार असताना बँकेत मात्र प्रभाव पाडण्यात अपयश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६००० कुटुंबे भीतीच्या सावटाखाली

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

पावसाळ्याच्या तोंडावर नाशिक महापालिका गोदाकाठी असलेल्या धोकादायक वाड्यांना गेल्या पाच वर्षांपासून फक्त नोट‍ीस देत आहे. यामुळे शहरातील ८९० धोकादायक वाड्यांमध्ये राहणाऱ्या सहा हजार कुटुंबे भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. महापालिकेकडे या वाड्यांच्या पुनर्विकासाबाबत ठोस उपाय नसल्याने फक्त नोटिसा बजावून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. नेपाळमध्ये झालेल्या भुकंपात काठमांडूतील जुन्या इमारतींना सर्वाधिक फटका बसला होता. याचा विचार करून नाशिकमधील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मात्र काही राजकीय भाईंमुळे हा प्रश्न सुटत नसल्याचे दिसते.

नाशिक शहर पेशव्यांची राजधानी होते. पेशवाईत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाडे बांधले गेले. गोदाकाठ, मालवीय चौक, रविवार कांरजा, काळाराम मंद‌िर, दहीपुल, नेहरू चौक, पंचवटी या भागात जुन्या वाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. यातील ८९० वाडे धोकादायक झाले असून, महापालिका गेल्या पाच वर्षांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झालेल्या वाड्यांना नोटिसा बजावत आहे. या वाड्यांमध्ये सुमारे सहा हजार कुटुंब राहतात. नेपाळ दुर्घटनच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाड्याच्या विषय गांभीर्याने पाहिला गेला पाहिजे. मात्र नोटिसा देऊन हात सोडवून घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. अनेक वाड्यांचे पुनर्वसन न्यायालयीन वादामुळे रखडले आहे तर याबाबत ठोस उपाययोजना नसल्याने १५ वर्षांपासून हा प्रश्न सुटलेला नाही.

भाडेकरू घर सोडण्यास तयार नसल्याने घरमालकांना वाड्याची डागडुजीही करता येत नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत हे वाडे मोडकळीस आले आहेत. मात्र मालकी हक्क जाईल या भीतीने भाडेकरू घर सोडायला तयार नसून, जीव मुठीत धरून संसार करत आहे. गेल्या वर्षी शहरात गोदेकाठी असलेले तीन वाडे हे पावसाळ्यात जमीनदोस्त झाले होते. यंदाही ठोस उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.

जुन्या वाड्यांची संख्या

नाशिक पुर्व- ३४७

नाशिक पश्चिम- ११२

पंचवटी- २९२

नाशिकरोड- ७३

सिडको- ४८

सातपूर- १६



वाड्यांच्या अर्थकारणात राजकीय भाई!

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाचा फायदा शहरातील जुन्या वाड्यांवर नजर ठेवून असलेले राजकीय भाई घेत आहेत. शहरातील सर्वच पक्षातील या भाईंनी यातील निम्मे वाडे गिळकृंत केल्याने या वाड्यांमधील कुटुंबांचे पुनर्वसन कोणार की, नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिकाही मूग गिळून गप्प आहे.

वाड्यांमधील घरमालक आणि भाडेकरूंमधील वादाला फोडणी देवून त्याचा फायदा राजकीय भाई मंडळींकडून घेतला जात आहे. भाडेकरूला आपल्या दावणीला बांधून थेट वाडेमालकांनाच ब्लॅकमेल केले जात आहे. हे वाडे नोटरी करून कार्यकर्त्यांच्या नावावर करून घेतले जात आहेत. या वाड्यांच्या अर्थकारणात थेट राजकीय भाई असल्याने महापालिका प्रशासनही चार हात दूर आहे. कारवाई केली तरी, या भाईंकडून अधिकारीच टारगेट केले जात असल्याने या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकाही लक्ष देत नसल्याचे दिसते. दरवर्षी चार ते पाच धोकादायक वाडे जमीनदोस्त होतात. भाडेकरू हक्क जाईल या आशेने वाडे सोडत नसल्याने एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या ८९० वाड्यांपैकी १२८ वाडे हे अतिधोकेदायक आहेत. त्यामुळे हे वाडे कोणत्याही पावसात जमीदोस्त होण्याची शक्यता आहे. अशा वाड्यांमध्ये जवळपास दीड हजार कुटुंब राहत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून वेळीच उपाययोजना केली जाण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images