Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मानसिक बळासाठी नाती आवश्यक

0
0

सुजाता हिंगे, नाशिक

'मामाचा गाव मोठा

सोन्या चांदीच्या पेठा

शोभा पाहून घेऊया

मामाच्या गावाला जाऊया...'

सध्या मामाचा गाव शोभा पाहण्यासाठी नव्हे तर शोभेइतकाच उरला आहे. मुलांच्या भावविश्वातला सर्वात सुखद असणारा हा ठेवा काळाच्या ओघात त्यांच्यापासून दूर गेला आहे. त्यामुळे नाती आणि नात्यातील प्रेम यापासून आजची पिढी दुरावत चालली आहे. मुलांच्या मानसिक बळासाठी मात्र ही नाती अत्यावश्यक आहेत.

पूर्वी दीर्घकालीन उन्हाळ्याची सुटी ही जणू काही नात्यांचे बंध अधिक रुढ करण्यासाठीच योजलेली असायची. उन्हाळ्यात मामा-मावशी-काका-आत्या या सर्व हक्कांच्या नातेवाईकांकडे जाऊन मुले ही सुटी मनसोक्त उपभोगायचे. एकाच ठिकाणी सर्वजण (आते-मामे-मावस-चुलंत भावंड) एकत्र जमून सुटीचा आनंद लुटायचे. सुटी दीर्घकालीन असल्याने प्रत्येकाकडे थोडे-थोडे दिवस जाऊन राहण्याची इच्छा पूर्ण व्हायची. त्यातच सुट्यांमध्ये आवर्जून कौटुंबिक सोहळे (लग्न-मुंज-वास्तू-पूजा) यांचे आयोजन केले जायचे. त्यामुळे ज्याच्याकडे कार्य असायचे त्याच्याकडे आधी अन् नंतरही पाहुण्या रावळ्यांचा राबता असायचा.

सुट्यांमध्ये मुलांच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र जमून धमाल करायचे. नात्यांची ओळख मुलांना आपसूकच व्हायची. प्रत्येक सुटीत मुलांच्या-नातेवाईकांच्या गाठी भेटी होत असल्याने नात्यांमध्ये प्रचंड आपुलकी असायची. एकमेकांप्रती ओढ आणि जिव्हाळा प्रत्येकाच्या मनात असायचा. नातेवाईक राहत असलेल्या प्रत्येक गावी जाणे-येणे होत असल्याने त्या गावाची संस्कृती-चालीरीती-रूढी-परंपरा, एखादे वैशिष्ट्य हे मुलांना आवर्जून माहित असायचे. शिवाय ते गाव मामा-मावशीचे-आत्याचे असल्याने एक वेगळीच ओढ त्याबद्दल मनात असायची. त्या काळी कुठल्याही नातेवाईकाकडे गेले तरी औपचारिकतेला थारा नसायचा. खूप दिवसांनी एकत्र येत असल्याने प्रत्येकाकडे सांगण्यासारखे खूप असायचे. किस्से-अनुभव-गमती-फजिती असा खजिना प्रत्येकाच्या पेटाऱ्यातून बाहेर पडायचा.

आजच्या व्हर्च्युअल जगात मात्र 'मी'पणाची व्याप्ती वाढल्याने नात्यांचा संकोच झाला आहे. 'मी', 'माझे', 'मला' एवढ्याच पुरते जग सीमित झाल्याने इतरांना त्यात सामावून घेण्याची वृत्ती लोप पावली आहे. त्यामुळे आप्तस्वकीय-नातेवाईक यांच्याशी असलेला जिव्हाळा कमी होऊ लागला आहे. कधीही नातेवाईकांकडे हक्काने जाऊन धडकणारे पाहुणे आता वेळेची सोयीची चौकशी करून क्वचित प्रसंगी जाऊ लागले. यामुळेच सर्व-सामान्य माणूस सुटीत पर्यटनासाठी बाहेर पडून वरवरच्या सुखाला भाळून चकचकीत हॉटेलमध्ये एन्जॉय करू लागला. मुलांना नकळत्या वयात या भौतिक सुखाच्या सवयी लावून त्या भौतिक सुखाच्या कक्षा रुंदावण्यात हातभार लावू लागला. नात्या-नात्यातली नाळ स्वतःच्या हाताने ठेचून बाजूला करण्याचा अट्टहास मुलांच्या मनावर विपरित परिणाम करू शकतो हे भान तो विसरला. त्यामुळे हॉटेलच्या तथाकथित सुखासोयीलाच जीवनशैली मानण्याची चुकीची मानसिकता मुलांच्या मनात रुढ झाली. नात्यांचा आदर आणि जिव्हाळा या बाबी मुलांपासून कोसो दूर गेल्या आहेत.

सुखी दिसत असले तरी मानसिक संतुलन बिघडवणारी पोकळी प्रत्येकाच्या मनात आहे. मानसिक आधाराची तीव्र गरज भागवण्यासाठी माणसाला माणसाची गरज निर्माण झाली आहे. मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा नात्यांमध्येच मिळू शकते. म्हणून नात्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्याची गरज भासू लागली आहे. आपल्या पाल्यांना नात्यांमुळे मिळणाऱ्या मानसिक बळाचे सुरक्षित कोंदण मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी मुलांची सुटी कारणी लावून नात्यांचे घट्ट बंध परत एकदा तयार करायला हवेत. त्यायोगे मुलांना मानसिक बळ मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काझीगढीबाबत ठोस उपाययोजना करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात काझीगढी परिसरात भाविकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे तेथे गढी ढासळून आपत्तीजनक घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करा, असे आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेला काझीगढीवासियांच्या सुरक्षेचा प्रश्न सिंहस्थापूर्वी मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.

सिंहस्थ कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उदय किसवे आदी उपस्थित होते. डवले यांनी रस्ता रुंदीकरण, घाट बांधणी, त्र्यंबकेश्वर येथील पाणी पुरवठा योजना, वाहनतळ आदी कामांचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाकडून कामांना होत असलेल्या ‌दिरंगाईबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. पावसाळा जवळ येऊनही त्र्यंबकेश्वर येथील घाटांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठीची मुदत संपून गेली आहे. कामे का पूर्ण झाली नाहीत? अशी विचारणा डवले यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केली. ठेकेदारांकडून विलंब होत असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने डवले भडकले. ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असून अशी कारणे हास्यास्पद असल्याचे यावेळी सूनावण्यात आले.

पंधरा दिवसात काम कसे करणार?

त्र्यंबकेश्वर येथे फिल्टरेशन प्लान्टचे काम अपूर्णावस्थेत आहे. हे काम २५ मेपर्यंत मार्गी लावू असे अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र १० महिन्यात न होऊ शकलेले काम पुढील १५ दिवसांत कसे करणार? शहरातील घाटांवर ही विद्युतीकरणाची कामे का पूर्ण झाले नाही अशी विचारणा महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र, येथील सपाटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने विद्युतीकरणास मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुणवत्तेकडेही लक्ष द्या

अधिकाऱ्यांनी विकासकामांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे, स्वत: कामाच्या ठिकाणी नियमित पाहणी करावी, त्र्यंबकेश्वर येथील घाटांच्या कामांना गती द्यावी, तसेच घाटाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले. मुख्य पर्वणीशिवाय इतर दिवसांसाठी तयार करण्यात येणाऱ्या वाहनतळाजवळ पाणी, दिवे आणि टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या आणि धोकादायक इमारतींची पाहणी करून खबरदारीच्या उपाय करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉटनिकल गार्डनला अखेर हिरवा कंदील

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या विकासाला अखेरीस वनमंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक घेवून २५ हेक्टर जागा महापालिककडे हस्तांतरीत केली जाणार आहे. मे अखेरीस या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.

वनमंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या बॉटनिकल गार्डनचा पर्यटनाच्या दृष्ट्रीने विकास करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. टाटा फाऊंडेशनच्या वतीने ९६ पैकी २५ हेक्टरवरवर बोटॅनिकल गार्डन विकसित केले जाणार आहे. संबंधित जागा ही वनविभागाची असल्याने महापालिकेला त्याचा विकास करणे अशक्य होते. या जागेसाठी ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना साकडे घातले. यासंदर्भात यापूर्वी दोन बैठकाही झाल्या. सह्याद्री अतिथीगृहावर वनमंत्र्यासोबत ठाकरे यांनी महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यात टाटा फाऊंडेशनच्या वतीने गार्डनच्या विकासाचा आराखडा सादर करण्यात आला. कोणतेही क्रॉक्रिटीकरण न करता हे गार्डन पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केले जाणार आहे. संबंधित जागा ही वन विभागाकडून वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. १२ मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर १२ ते १८ मे दरम्यान महापालिका व महामंडळात जागेच्या विकासासंदर्भात करार होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्यांचेही वाढते दर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी होत असून, किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. सातत्याने होत असलेल्या भाववाढीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, भाज्यांऐवजी कडधान्यांना प्राधान्य दिले जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी भाजीपाल्यापासून कडधान्यापर्यंत सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यांपेक्षा या आठवड्यात बाजार वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने कृषी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला होता. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे भाव कडाडले आहेत. नाशिकच्या आसपास खेड्यांमधून येणाऱ्या मालाची आवक कमी झाल्याने मुंबईला जाणाऱ्या भाज्यांमध्येही घट झाली आहे.

सध्या बाजारात कोथिंबीरीचा दर जुडी मागे ५ ते १० रुपयांवर पोहोचला असून, गावठी कोथिंबीर २० ते २५ रुपये आहे. गवारीच्या शेंगांचा भाव प्रतिकिलो २० ते ४० रुपयांदरम्यान आहे. याशिवाय भेंडी २० ते २५ रुपये किलो, कोबी व फ्लॉवर १० रुपये, टोमॅटो १५ ते २० रुपये प्रतिकिलो, शेवगा ४० रुपये किलो, काकडी २५ ते ३० रुपये किलो, कांदापात २५ रुपये किलो, गाजर २० रुपये किलो, मिरचीसाठीही ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. मेथीच्या जुडीसाठी २० ते ३० रुपये, शेपू २० रुपये, वांगे १५ ते २० रुपये, ढोबळी मिरची २० ते २५ रुपये, भोपळा १० रुपये किलोने मिळत आहे. एकूणच भाज्यांच्या किंमती कमी होण्यासाठी नाशिककरांना पावसाळा येईपर्यंत तरी वाट पहावी लागणार आहे.

किलोभर भाजीच्या किंमतीत पाव किलो भाजी घेऊन परतावे लागत असल्याने गृहिणी नाराजी व्यक्त करीत आहेत. रोज त्याच भाज्या खरेदी कराव्या लागत असल्याने कोणती भाजी खरेदी करावी या विवंचनेत गृहीणी आहेत.

दुष्काळामुळे भाज्यांची आवक कमी व मागणी जास्त असल्याने भावात वाढ झाली आहे. हे दर उन्हाळा संपेपर्यंत असेच राहतील असा अंदाज आहे.

- योगेश आमले, भाजी व्यावसायिक

भाव वाढले तरी भाजी ही घ्यावीच लागते. त्याला काही पर्याय नाही. यामुळे कडधान्याला पसंती द्यावी लागत आहे.

- ज्ञानदा सोनार, गृहिणी

एकाच भाजीचे तीन दर

शहरात एकाच भाजीचे तीन दर पहायला मिळत आहेत. मार्केट यार्डात गवारच्या शेंगा या १५ ते २० रुपये किलोने मिळतात. हीच भाजी गंगा पटांगणावर खरेदी केल्यास २५ ते ३० रुपये किलोने मिळते. कॉलेजरोडवर खरेदी केल्यास ३० ते ४० रुपये किलोने नागरिकांना खरेदी करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना महापालिकेकडून हवी सूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एलबीटीचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिकेतर्फे दंड आणि कारवाईच्या नोटिसा बजाविल्या जात आहेत. ही कारवाई थांबवून काही दिलासा मिळू शकतो का, या अनुषंगाने सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत मंगळवारी मंत्रालयात नगरविकास खात्यात पार पडलेल्या एका बैठकीत मंथन झाले. मात्र, याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नसून, ही कारवाई कधी थांबविणार, याबाबतही अद्याप निश्चिती नाही. मात्र, या संदर्भाने घेण्यात येणाऱ्या कुठल्याही निर्णयाने महापालिकेचे नुकसान होऊ नये, यासाठीही व्यापारी वर्गाच्या वतीने आग्रही सूचना मांडण्यात आल्या.

एलबीटीचे विवरणपत्र अद्यापपर्यंत भरलेले नाही त्यांच्यावर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, नव्या सरकारने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली असली तरीही ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? याबाबत मात्र व्यापारी वर्गात साशंकताच आहे.

या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचेही मत मंगळवारी मंत्रालयात नगरविकास विभागात आयोजित एका बैठकीत जाणून घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटीबाबत सध्या दंड आणि व्याज वसुलीच्या नोटिसा बजाविल्या जात आहेत. या दंड आणि व्याजातून सूट मिळून एलबीटी भरण्याची प्रक्रिया सुलभ होण्याकरिता 'अॅम्नेस्टी' स्कीम लागू करता येईल का, या दृष्टीने नगरविकास खात्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत व्यापरी वर्गाने एलबीटी बाबतच्या नोटिसा रद्द कराव्यात, त्या संदर्भातील दंड आणि व्याज रद्द करावे, शहरात येणाऱ्या अन् प्रक्रिया न केल्या जाणाऱ्या मालावर ९० टक्के रक्कम आकारून ती परत केली जाते. ही रक्कम १० टक्क्यांवर आणली जावी, नोंदणीकृत व्यापाऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात यावा अशा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल मॅनेजमेंट सीईटी शेवटच्या आठवड्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा (सीईटी) येत्या २४ मे रोजी घेतली जाणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम राबविला जातो. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी डीटीईकडून दरवर्षी सीईटी घेतली जाते. यंदाच्या सीईटीची प्रक्रिया डीटीईने जाहीर केली आहे. बारावीत ४५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देता येणार असून, त्यासाठीचे ऑनलाइन अर्ज येत्या ८ मे पर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार आहेत. www.dtemaharashtra.gov.in/hmct2015 या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. डीटीईने राज्यभरात एकूण १५ कॉलेजांची एआरसी सेंटर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात नाशिकमधील प्रशांत हिरे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा समावेश आहे. येत्या २४ मेला ही सीईटी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. शंभर गुणांच्या या सीईटीसाठी ९० मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

हिरे कॉलेजमध्ये सुविधा

पंचवटीतील प्रशांत हिरे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजची एआरसी सेंटर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे एकमेव सेंटर आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येऊन तेथेच अर्ज दाखल करता येईल, असे प्राचार्य नितीन जाधव यांनी सांगितले.

अर्ज विक्री प्रारंभ - १ मे

अर्ज स्विकृती अंतिम दिवस - ८ मे

हॉल तिकीट उपलब्ध - २० मे

सीईटी - २४ मे

निकाल - ३० मे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारीपूर्वीच प्रचाराला सुरुवात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तीनही पॅनलची घोषणा होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तिंरगी लढत होत असल्याने उमेदवारांना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सुरुवातीलाच संपर्क अभियान जोमाने सुरू केले आहे. हिरे, ढिकले आणि कोकाटे या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापले आहे.

जिल्हा बँकेसाठी तिरंगी लढत होत असून, तीनही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांनी शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली. या पॅनलच्या वतीने एससी, एसटी गटातून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, ओबीसी गटातून माजी आमदार वसंत गिते, एनटी गटातून नरेंद्र दराडे, क वर्ग बिगरशेती संस्थांच्या गटातून राजेंद्र भोसले, महिला गटातून आमदार सीमा हिरे व लासलगावच्या प्रतिभा होळकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. सुनील ढिकले यांनीही सहकार महर्षी उत्तमराव ढिकले पॅनलची घोषणा केली. या पॅनलच्या मध्ये डॉ. सुनील ढिकले यांच्यासह मागासवर्गीय गटातून नानासाहेब सोनवणे, ओबीसी गटातून अनिल कदम, एनटी गटातून कोंडाजीमामा आव्हाड, महिला गटातून लिना आहेर व पुष्पा दळवी असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनीही कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पॅनलची घोषणा केली होती. यामध्ये अपूर्व हिरे यांच्यासह मागासवर्गीय गटातून रविकांत भालेराव, ओबीसी गटातून राजेंद्र डोखळे, एनटी गटातून पंढरीनाथ थोरे तर महिला गटातून शोभा बच्छाव आणि संगीता देवरे असे सहा उमेदवार या अगोदरच घोषित करण्यात आले आहेत.

जिल्हा बँकेच्या एकवीस जागांपैकी सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे पंधरा जागांवरील निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, शंभरच्यावर उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीची तारीख आकरा मे असून, अर्ज माघारीसाठी अजून, सहा दिवस शिल्लक आहेत. मात्र, त्यापूर्वीच तीनही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. वैयक्तिक संपर्काला या उमेदवारांनी सुरुवात केली आहे. ढिकले, कोकाटे आणि हिरे या तिघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेवर कब्जा करण्यासाठी तीनही पॅनलचे दिग्गज सरसावले असून, संपर्क अभियानाला पॅनल्सच्या वतीने जोमाने सुरुवात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’ची शाखा असूनही सापडेना!

0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

सांस्कृतिक भूमी असलेल्या नाशिकच्या आश्रयाला गेली वीस पंचवीस वर्षे राहिलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) शाखा एका बड्या हस्तीच्या केवळ एका फोनमुळे हस्तांतरीत झाली असून, सांस्कृतिक क्षेत्रातील या वाढत्या 'दादा'गिरीला कसा लगाम घालावा असा यक्षप्रश्न साहित्यिकांपुढे पडला आहे.

सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेकांचे आक्रमण गेल्या काही दिवसांपासून वाढले असून, शहराच्या सांस्कृतिक सौंदर्यावर हा एक प्रकारे वारच आहे. या आक्रमणाचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाचनालयाच्या अखत्यारित असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा वाचनालयाकडून हिरावून घेण्यात आली आहे. आधीच अनेक कामांचे ओझे असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडे ही शाखा हस्तांतरीत झाली असून, वाचनालयात असलेला शाखेचा जुना बोर्डही काढून टाकण्यात आला आहे. मात्र, प्रतिष्ठानमध्ये अद्याप कोठेही 'मसाप'च्या कार्यालयाला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे मसापची शाखा गेली कुठे असे विचारण्याची वेळ आली आहे.

नाशिकरोडला नवी शाखा

वीस-पंचवीस वर्षांपासून नाशिकला असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेकडून ठराविक कार्यक्रम सोडले तर, कोणतीही सांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली नाही. नाशिकला तसेही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात परंतु, त्याबाबतीत नाशिकरोड मात्र पारखेच राहते. नाशिकरोडलाही संस्कृती व साहित्याचा वारसा असून तेथेही नाटक, नृत्य, संग‌ीताच्या मैफली व्हाव्यात अशी येथील रसिकांची इच्छा असल्याने साहित्यातील जाण असलेल्या काहीजणांनी पुढाकार घेऊन नाशिकरोडला मसापची एक शाखा नुकतीच स्थापन केली. नुसतीच शाखा स्थापन केली नाही तर घुमान साहित्य संमेलनाविषयी एक जंगी कार्यक्रम घेऊन आपल्या सांस्कृतिक भावनांचा निचराही केला. नाशिक शाखा अनेक वर्षे असूनही निर्जिवावस्थेत पडून होती परंतु, नाशिकरोड शाखेने पदापर्णातच चुणूक दाखवली असल्याने येथील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सार्वजनिक वाचनालयात होते. परंतु, विनायकदादा पाटील यांचा फोन आला होता. कार्यालय शिफ्ट करायचे आहे. त्यांनी तसे पत्रही वाचनालयाला दिले आहे. परंतु, मसापची शाखा हस्तांतरणाबाबत कोणताही ठराव झालेला नाही.

- प्रा. विलास औरंगाबादकर, सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष

तिकडे मसापला निद्रितावस्था आली होती. इकडे जागतं रहातं म्हणून इकडे आणलं. पुढे मसापच्या या शाखेतर्फे जंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

- विनायकदादा पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिक विभाग

सार्वजनिक वाचनालयाची मसाप शाखा म्हणजे एक गूढ होते. ती वाचनालयाच्या इमारतीतच होती. पण कोठे होती, त्यातील पदाधिकारी काय करीत होते, ते कुणाला त्याबद्दल काहीच

माहिती देत नव्हते. हे सर्व एक गूढच राहिले. आत्ता पुनर्रचना झाली तेव्हा कळले की ती शाखा हस्तांतरीत करण्यात आली आहे. - एक ज्येष्ठ साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाच्या झळा अन् पावसाचा शिडकावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुपारी उन्हाच्या तप्त झळा आणि संध्याकाळी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने नाशिककरांनी मंगळवारी संमिश्र वातावरण अनुभवले. सकाळपासूनच वातावरणात उकाडा वाढला होता. हवामान खात्याच्या तपशीलानुसार दुपारी शहराचा पारा ३९ अंशांवर गेला होता. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला होता.

तापमानाचा पारा वाढतच चालल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरात दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्याचेही नागरिक टाळत आहे. परिणामी, रिक्षा, सिटी बसेस या सार्वजनिक वाहनांमध्येही गर्दी दिसून येत नाही. उकाड्याचा मारा सहन करण्यासाठी शीतपेयांची दुकाने, रसवंतीच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यातच लग्नसराईचा हा कालावधी असल्याने दागिने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी या दुकानांभोवतीही भर दुकानात गर्दी दिसते आहे.

संध्याकाळीही जोराचा थंड वारा सुटून काळेभोर ढग दाटून आले होते. शहरात काही भागांमध्ये पावसाच्या थेंबांचाही शिडकावा झाला. या संमिश्र वातावरणामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरीही पुन्हा बेमोसमी पावसाची भीतीही व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाच्या आजपासून परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा बुधवारपासून (६ मे) राज्यभरात सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ७३१ परीक्षा केंद्रांवर बी. ए., बी. कॉम शिक्षणक्रमांच्या अंतिम लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. जवळपास ६ लाख ६४ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

विद्यापीठाच्यावतीने राबविण्यात येणारे बी. ए., बी.कॉम. (मराठी/इंग्रजी /उर्दू/हिंदी माध्यम), बी. ए. पोलिस प्रशासन, बी. ए. परिवहन, बी.ए. ग्राहक सेवा, एम. कॉम., बी. एस्सी. एम. एल. टी., बी. एस्सी. ऑप्टोमेटरी, बी. लिब., एम. ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉटेल अॅन्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी अॅन्ड टुरिझम स्टडीज, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग ऑपरेशन, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अॅन्ड केटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र, रुग्णसहायक, डोटा, योगा शिक्षक, बालविकास सेविका, गांधी विचार दर्शन, बी. एस्सी. (इंडस्ट्रियल ड्रग्ज सायन्स), बी. एस्सी. (इंडस्ट्रियल सायन्स) तसेच बी. एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय /बँकिंग / सहकारी / कृषी व्यवसाय), (एम. कॉम., एम. एस्सी.) विषय संप्रेषण, बी. एड., एम. एड., बी. ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आदी पदवी/पदविका व प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. बी. ए., बी. कॉम. या शिक्षणक्रमांच्या परीक्षा २४ मे पर्यंत सुरू राहणार आहेत. वरील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर उपलब्ध आहेत. याशिवाय http://ycmou.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या वेहसाईटवरून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेता येईल.

विद्यार्थांना काही अडचण असल्यास विद्यापीठाच्या ०२५३-२२३००९५ आणि २२३०१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यांच्याकडे परीक्षा प्रवेश पत्र नसेल अशा विद्यार्थांनी आपल्या परीक्षा अर्जाची छायांकित प्रत, परीक्षा शुल्क भरल्याचे चलन आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर दाखवून हमीपत्र भरून परीक्षेस बसता येईल.

- डॉ. अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाने नाशिककर हैराण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

असह्य उकाडा, जीवाची होणारी घालमेल, खंडित वीजपुरवठा असा प्रसंग नागरिकांना मंगळवारी पुन्हा अनुभवयाला मिळाला. गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने शहरात अघोषीत भारनियमन सुरू केल्याने नाशिककर हवालदिल झाले आहेत.

घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केली जाईल असे युती सरकारने सत्तेवर येताच घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा अवघ्या काही दिवसातच फोल ठरली आहे. नाशिक शहरात कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने वीज जाण्याचे प्रकार होत असून, नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यातच सध्या उन्हाळा असल्याने प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.

मंगळवारी सकाळी इंदिरानगर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी ९.३० वाजता गेलेली वीज पूर्ववत होण्यास दीड तास लागला. ११ वाजता या भागात वीज आली. त्याचप्रमाणे त्र्यंबकरोड येथील पत्रकार कॉलनी परिसरात दुपारी ११ वाजता वीजप्रवाह खंडित झाला. तो दुपारी १२ वाजता सुरळीत झाला. तसेच, खुटवड नगर परिसरात सकाळी १० वाजता गेलेली वीज दुपारी १२ वाजता आली.

शहरातील मुख्य भाग असलेल्या कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ भागात दुपारी वीजपुरवठा खंडित झाला. नाशिकरोडच्या जेलरोड, शिखरेवाडी, देवळालीगांव, सुभाषरोड, मुक्तीधाम परिसरात वीज गेल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प येथेही वीज पुरवठा खंडित झाला होता. परंतु, तो काही वेळात पूर्ववत झाला. मात्र, भगूर येथे दुपारी गेलेली वीज उशिरापर्यंत आली नव्हती. बाभळेश्वर येथील ४०० केव्ही लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. १२०० मेगावॅट वीज वितरणावर परिणाम झाला असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४०० कोटींचे कर्ज मिळणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या रखडलेल्या कामांसह घरकुल योजनेला निधी मिळण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने १७ मालमत्ता कर्जाच्या बदल्यात बँकेत गहाण ठेवण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी ३१०, तर घरकुल योजनेसाठी ९० असेतब्बल ४०० कोटींचे कर्ज महापालिकेला उचलता येणार आहे. लवकरच महाराष्ट्र बँकेकडून कर्जाचा पहिला हप्ताही उचलला जाणार आहे.

आर्थिक स्थिती खराब असतानाच, सिंहस्थाचा ११२९ कोटींचा बोजा महापालिकेवर आला आहे. निधीची चणचण असल्याने पालिकेने शासनाकडे कर्ज मिळण्याची मागणी केली होती. सिंहस्थ कामांसाठी एक चतुर्थांश आणि भूसंपादनासाठी २०० कोटींचा निधी महापालिकेला उभारणे शक्य नाही. त्यामुळे कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सरकारने सुरूवातीला सिंहस्थांसाठी २६० तर घरकुल योजनेसाठी हुडकोकडून ९० कोटींचे कर्ज काढण्यास परवानगी दिली होती. मात्र, बँकानी केवळ शासनाच्या मंजुरीवर कर्ज देण्यास नकार दिला होता. कर्जासाठी महापालिकेच्या मालमत्ता गहाण ठेवण्याची अट घालण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या क्षणाला प्रश्न बदलला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, एमबीएच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी त्याचा अनुभव आला. परीक्षेचा कालावधी संपत असताना शेवटच्या क्षणी एक प्रश्न बदलण्याचा प्रकार झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम झाला आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबीएच्या द्वितीय सत्राच्या ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट या विषयाचा मंगळवारी पेपर होता. सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत असलेल्या या पेपरच्या प्रश्नपत्रिकेत पाच (अ) क्रमांकावर दोन प्रश्न देण्यात आले होते. स्पष्ट करा TOM किंवा स्पष्ट करा PERT and CPM. मात्र, अचानक साडेबारा ते एक च्या सुमारास हा प्रश्न बदलण्यात येत असल्याचे पर्यवेक्षकांकडून सांगण्यात आले. या दोन्ही पर्यायांऐवजी सोर्सिंग आणि प्रायसिंग हा प्रश्न देण्यात येत असल्याचे सांगितले जात असल्याने विद्यार्थी गोंधळले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉल सोडला होता तर काहींना हा प्रश्न लिहिण्यास पुरेसा अवधी नव्हता. विद्यापीठाने वेळ वाढवून दिलेला नसल्याने आणि परीक्षा संपण्याच्या तोंडावर प्रश्नातील बदल सांगितल्याने आता काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. विद्यापीठाच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

'त्यांना' गुण मिळणार

या संदर्भात पुणे विद्यापीठाच्या एमबीए विभागाचे डीन एकनाथ खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, प्रश्नपत्रिकेतील दोन्ही प्रश्न बरोबर होते. मात्र, हे प्रश्न विद्यार्थ्यांना अवघड असल्याचे वाटल्याने आणखी एक पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. मलाही एका परीक्षा केंद्रावरून परीक्षा संपण्याच्या सुमारास फोन आला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. ज्या विद्यार्थ्यांनी पाचव्या क्रमांकाचा प्रश्न सोडविला आहे त्यांना पाच गुण देण्यात येतील, अशी ग्वाही खेडकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवी सुटी अन् सन्मान

0
0

नाशकातील पोलिसांतही ताणतणावामुळे अस्वस्थता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडल्यानंतर सहायक निरीक्षकानेही स्वत:ची जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे नाशिक पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून जाणते-अजाणतेपणी होत असलेल्या मानसिक छळामुळेच असे प्रकार घडत आहेत. कामाचा ताण कमी व्हावा, हक्काच्या सुट्यांचा उपभोग घेता यावा आणि अपमानास्पद वागणूक मिळू नये, अशा माफक अपेक्षा पोलिस व्यक्त करीत आहेत.

मुंबईत एपीआय दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जोशी यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. राज्यात चर्चेला आलेल्या या घटनेमुळे नाशिकच्या पोलिस दलातही हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. तणावामुळे पोलिस आत्महत्या करीत असल्याच्या घटना यापूवी शहरात घडल्या आहेत. १४ मार्च २०१३ रोजी नाशिकमधील दसक पोलिस चौकीत जगन्नाथ खंडू सोनवणे (वय ५७) यांनी रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना पोलिसांच्या अजूनही स्मरणात आहे. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या बदलीचे अलीकडेच आदेश आले. या बदलीमुळे आनंदलेल्या एका पोलिस निरीक्षकाने पोलिस स्टेशनबाहेरच फटाके फोडून वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दलचा राग व्यक्त केला होता. शहरातील पोलिसांमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस त्यावेळी चव्हाट्यावर आली होती.

शहरातील काही पोलिस स्टेशन्समध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून बसविण्यात आले आहे. तर, काही अधिकाऱ्यांचा अनुभव अधिक असूनही त्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागत आहे. याची खदखद पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत. पोलिस स्टेशन उत्तमरित्या सांभाळण्याचा अनुभव असूनही, काही अधिकाऱ्यांना साईड ट्रॅक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडूनही नाराजीचे सूर आळवले जाऊ लागले आहेत.

पोलिसांमधील ही अस्वस्थता नवनियुक्त पोलिस आयुक्त जगन्नाथन यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांनी फेररचनेचे संकेत दिले आहेत. मात्र, अजून त्याबाबतच्या हालचाली होत नसल्याने आपल्याला आहे, त्या परिस्थितीतच समाधान मानावे लागणार का अशी खंत या अधिकाऱ्यांना लागून राहिली आहे. पोलिस दलामध्ये मिळणारी सापत्न वागणूक, अंतर्गत हेवेदावे, कामाच्या वाटपामध्ये केला जाणारा भेदभाव, वेळी अवेळी कर्तव्यावर बोलावले जात असल्याने येणारा मानसिक ताण, सुट्या नामंजूर करणे, साप्ताहीक सुट्या रद्द होणे आणि वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक मिळणे यासारख्या प्रकारांरामुळे पोलिस शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच अंतर्गत धुसफूस वाढली आहे.

तापट, मद्यपी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून शस्त्र परवाना नाकारला जातो. मात्र, पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या हातात शस्त्र सुपूर्द केले जाते. पोलिस दलात कामाचा ताण प्रचंड वाढत आहे. ते छंद जोपासत नाहीत. कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तणाव दूर होण्याची शक्यताही धूसर होत आहे. या ताण तणावावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर अशा घटना बळावण्याची शक्यता अधिक आहे.

- भीष्मराज बाम,

माजी पोलिस महासंचालक व क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेच्या निर्मलतेसाठी एकजूट

0
0

प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन; सुधारणा कामांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या पवित्र गोदावरी नदीचे दररोज होणारे प्रदूषण थांबावे. गोदावरी निर्मल झाली पाहिजे. कुंभमेळा लक्षात घेता नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अजूनही सरकार व महापालिका प्रशासनाने रामकुंड परिसराची दुरुस्ती व अन्य सुधारणा करण्यास प्रारंभ केलेला नाही. सरकारने व महापालिकेने त्वरित रामकुंड व परिसरातील कामे करावीत, असे मागणी गोदाप्रेमींनी केली आहे.

शहरातील गंगा गोदावरी पुरोहित संघ, सनातन वैदिक धर्म सभा, शुक्ल यजुर्वेदी संस्था, निर्मल गोदा अभियान आणि हास्य क्लब आदी संस्थाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सुमारे अडीच तास जनजागृती अभियान राबवले. त्यास निमा, आयमा, बार असोशीएशन, आयु. स्नघात्ना, आयएमए आदी संघटनांनी सहभाग घेत जाहीर पाठिंबा दिला. दररोज नाशिकसह विविध भागातून हजारो लोक रामकुंडावर धार्मिक विधीसाठी येतात. परंतु, नदीकाठची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करतात. कुंभमेळ्यातही कोट्यवधी भाविक गोदावरीचे जल प्राशन करतात. त्यामुळे गोदावरीचे जल निर्मल झाले पाहिजे. यासाठी सरकार व महापालिका यांनी ठोस पावले लवकर उचलावित अशी मागणी केली आहे.

'गोदावरी मे गटर नही साहेंगे', हमे गटर नही गोदावरी चाहिये', 'गटार थांबवा गोदावरी वाचवा', 'निर्मल गोड मंगळ नाशिक' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महंत भक्तीचरणदास, श्रीकृष्ण बुवा सिन्नरकर, माधवराव भणगे, सतीश शुक्ल, भानुदास शौचे, डॉ. हेमलता पाटील, नितीन ठाकरे, डॉ. मनोज चोपडा, चंद्रशेखर शिरसगर, दिलीप शुक्ल, नितीन शुक्ल, डॉ. सुश्मा दुगड आदी उपस्थित होते.

गोदावरी पवित्र नदी आहे. सर्व भाविकांची आई आहे. गोदेचे तीर्थ प्राशन करण्यासाठी जगभरातून भाविक येथे येतात. गोदेचे पावित्र्य जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

- महंत भक्तीचरणदास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेचे ५० लाख लुटले

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवल्याहून अंदरसुलकडे निघालेल्या बँक कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून बँकेची ५० लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली. येवला-वैजापूर रस्त्यावरील काळामाथा परिसरात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी कंपनीचे सोने लुटण्याच्या घटनेचा अद्याप छडा लागलेला नाही, त्यातच ही लूट घडल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांत सिन्नर तालुक्यातही बँक लुटीच्या घटना घडल्या आहेत.

येवला शहरातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील मुख्य शाखेमध्ये अंदरसुल शाखेचे शाखाधिकारी रामदास महाले व शिपाई लहानु भारती यांनी मंगळवारी दुपारी अंदरसुल शाखेसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. मुख्य शाखेने एवढी रक्कम शिल्लक नसल्याचे सांगून फक्त ५० लाख रुपये मिळतील असे कळविले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी ५० लाख रुपये साखर बारदानाच्या गोणीत भरले. ही रक्कम घेऊन कर्मचारी नेहमीच्याच प्रवासी रिक्षातून अंदरसुल येथे चालले होते. काळामाथा परिसरात बजाज पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी रिक्षा अडवली. त्यानंतर चोरट्यांनी रिक्षा चालकाच्या डोळ्यात मिरचीच पूड फेकली. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. हातात लाकडी दंडुके असलेल्या चोरट्यांनी रिक्षातील ५० लाख रुपयांची रोकड असलेली गोणी बँक कर्मचाऱ्यांकडून हिसकावून घेतली आणि वैजापूरच्या दिशेने मोटारसायकलवरुन पळ काढला. येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडियन मिलिटरी कॉलेजची जूनमध्ये परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेहराडून येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा येत्या १ व २ जून रोजी पुणे येथे घेतली जाणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच असून, नाशिकमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.

राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेजने प्रवेश पात्रता परीक्षेसाठी गेल्या ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविले होते. या परीक्षेचे प्रवेशपत्र हे २० मे पर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. ते प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांनी ०२०-२६१२३०६६ किंवा ६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेशपत्रे www.mscepune.in या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाटवरही डाऊनलोड करता येणार आहेत.

परीक्षेसाठी इंग्रजी, गणित, आणि सामान्यज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर होणार आहेत. प्रवेश परीक्षा येत्या १ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत इंग्रजी विषयाचा, दुपारी २ ते ३.३० या वेळेत गणित विषयाचा तर २ जून रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत सामान्यज्ञानाचा पेपर होणार आहे. इंग्रजीचा पेपर हा १२५, गणिताचा २०० तर सामान्य ज्ञानाचा पेपर ७५ गुणांचा असणार आहे. गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये लिहिता येणार आहे. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी या भाषेत उपलब्ध होणार आहेत. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती ६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज एमएच सीईटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षणासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा (एमएच सीईटी) गुरुवारी (७ मे) होत असून, त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील २३ केंद्रांवर जिल्ह्यातील एकूण साडेनऊ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

बारावीची परीक्षा दिलेल्या किंवा बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रवेश घेण्यासाठी एमएच सीईटी घेतली जाते. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील ९५०० विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, त्यासाठीची सर्व तयारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. नाशिक शहरातील एकूण २३ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ५० ते ६० पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार असून, एकूण ५०० कर्मचारी परीक्षेसाठी कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर तर अर्धातास आधी परीक्षा हॉलमध्ये हजर राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश

एमएच सीईटीसाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्‍या कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी व कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, मोबाइल, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहणार आहे.

निगेटिव्ह मार्किंग नाही

एमएच सीईटीसाठी यंदा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू करण्यात येणार नाही, असे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसल्याने विद्यार्थी अधिकाधिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहेत.

अभ्यासक्रम 'नीट'चा

एमएच सीईटीसाठीचा अभ्यासक्रम नीटचा ठेवण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये काहीशी धास्ती आहे. २०११-१२ मध्ये संपूर्ण देशातील अकरावी-बारावीचा अभ्यासक्रम समान पातळीवर आणला गेला. पण, हा अभ्यासक्रम ९० टक्केच समान आहे. कारण, प्रत्येक राज्याला दहा टक्के पॅटर्न वेगळा ठेवण्याची मुभा केंद्राने दिली होती. त्याचाच फटका सध्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. जेव्हा आपण एमएच-सीईटी अभ्यासक्रम स्वीकारतो तेव्हा उरलेल्या दहा टक्के अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सीबीएसईचा पॅटर्न अभ्यासावा लागतो. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये व ग्रामीण भागात तर एनसीईआरटीची पुस्तकेही उपलब्ध नाहीत. राज्य बोर्डाचा अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम हा अतिशय सरस आणि दर्जेदार आहे, असे असताना सध्या इतर बोर्डांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना कमी गुण मिळण्यात होत आहे. त्यामुळे या परीक्षेचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा राज्य बोर्डाच्या पुस्तकावर आधारितच करावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी यापूर्वीच केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीवरील समांतर पुलाच्या कामास प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूर गिरणारेकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील समांतर पुलाचे काम चार वर्षांपासून रखडलेले होते. याबाबत मटाने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसात पुलाचे उर्वरित काम पूर्ण होणार असून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय वानखेडे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले.

तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवर असलेल्या जुन्या पुलाला समांतर पुलाचे भूमिपूजन डिसेंबर २०१० मध्ये झाले होते. नाशिककडून गिरणारे व आदिवासी भागात जाण्यासाठी नवीन पुलाची गरज असल्याने तो मंजूर करण्यात आला होता. परंतु, चार वर्ष उलटून देखील किरकोळ कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले होते. वाहनचालकांसाठी पर्यायी असलेला समांतर पुल अपूर्णावस्थेत असल्यामुळे वाहनचालकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. याबाबत 'मटा'ने 'समांतर पुलाचे काम कासवगतीने' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ उर्वरित काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. बांधकामाचे साहित्य आणण्यात आले आहे. या पुलाचे पुलाच्या कामाबाबत अभियंता वानखेडे यांना विचारले असता, ठेकेदाराच्या काही अडजणींमुळे दिरंगाई झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, येत्या काही दिवसात पुलाचे काम लवकर मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल वा उड्डाणपुलाचा हवा पर्याय

0
0

>> प्रवीण बिडवे

वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण आणू शकेल अशी कोणतीही व्यवस्था नसणे हे शहरातील मायको सर्कल चौकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळेच हा चौक अत्यंत धोकादायक ठरते आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न झाले नाहीत असे नाही. मात्र, त्याचे फलित केव्हा पहायला मिळणार हाच खरा प्रश्न आहे.

देशविदेशातून नाशिकमध्ये आलेला प्रत्येक भाविक त्र्यंबकेश्वरला जाताना मायको सर्कल या चौकातूनच जातोच. या चौकाची रचनाच अशी विचित्र आहे, दिवसभरात दोन चार अपघातांना आपसूकच निमंत्रण मिळते. शरणपूर सिग्नल, त्र्यंबकनाका, होलाराम कॉलनी, तिडके कॉलनी असे कोठूनही येणारे प्रत्येक वाहन भरधाव असते. मोठ्या व्यासाचे सर्कल आणि वाहनधारकाच्या वेगावर नियंत्रण येईल अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने येथे अपघात घडावा अशी परिस्थिती आपसूकच निर्माण होते. सायंकाळी तर या चौकातून वाट काढणे वाहनचालकांसाठी दिव्य ठरत असून अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडण्याचा अनुभव वाहनचालकांना येतो.

त्र्यंबक रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. सातपूर, पवननगरकडे जाणारी वाहने मायको सर्कलमार्गेच जातात. विशेषत: त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या आणि येणारी वाहने मायको सर्कल चौकातूनच येतात. मात्र, हे सर्कल ओलांडून पुढे जाण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागते. या चौकात तिन्ही बाजुची वाहने आमने सामने येत असल्याने अपघात व वाहतूककोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. केवळ चौकाची रचना विचित्र आहे असे नाही तर रस्तेही ओबड धोबड आहेत. शरणपूर चौकातील सिग्नल सुटल्यानंतर वाहने भरधाव सुटतात. त्यांच्या वेगावर कुणाचेही नियंत्रण नसते. वाहतूक पोलिसांची नेमणूक केली असली तरी ते पूर्णवेळ या चौकात नसतात. त्यामुळे कोणीही यावे आणि कसेही वाहन दामटवावे, असा प्रकार येथे सर्रास पहावयास मिळतो. सिडकोकडून येणाऱ्या वाहनांना अर्ध्या सर्कलला वळसा घालावा लागतो. तसेच शरणपूर चौकीकडून येणाऱ्या वाहनांचीही सर्कलजवळच गर्दी होते. त्यामुळे वाहनचालकाला पुढे जाताना तिडके कॉलनीचा उतारावरून भरधाव येणारी वाहने आणि अन्य मार्गांनी येणाऱ्या वाहनांच्या वेगाचा अंदाज घेऊन पुढे जावे लागते. त्यामुळे येथे वाहनचालकांचा हमखास गोंधळ उडून अपघाताचे प्रकार घडतात.

होलाराम कॉलनीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी या चौकाचा वापर न करता पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा यासाठी या कॉलनीच्या कॉर्नरला पाईप टाकून प्रवेश बंद करण्यात आला आहे. परंतु, तरीही वाहनचालक मायको चौकात येतात. अशा बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याच रस्त्यालगत उभ्या राहणारे टँकर जागा अडवितात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते. सायंकाळी साडेपाच ते आठच्या दरम्यान या चौकातून कमी वेळात सुरक्षित बाहेर पडणे मोठे आव्हान ठरते. त्यातच सीबीएसकडून त्र्यंबकेश्वरकडे जाताना शरणपूर येथील सिग्नल सुटावा यासाठी वाहनचालकांना १०३ सेकंद प्रतीक्षा करावी लागते. परिणामी मायको सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मायको सर्कल येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ही वाहतूक संभाजी चौक, शरणपूर सिग्नल मार्गे वळविण्यात आली होती. मात्र, त्यामुळे त्र्यंबक रोडवरील पत्रकार कॉलनी जवळील वर्दळ वाढल्याचा आक्षेप तेथील रहिवाशांनी घेतला. पत्रकार कॉलनीजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा जीव गेला. यांनतर पुन्हा हनुमान मंदिरासमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

येथेही पर्याय शोधण्याची गरज

जुना गंगापूर नाक्यावरील सर्कल काढून तेथे सिग्नल यंत्रणा बसविल्याने वाहतूकीला शिस्त लागण्यास मोठी मदत झाली आहे. त्र्यंबकरोडवरीही मायको सर्कलचा व्यास खूप अधिक आहे. या सर्कलला वळसा घालताना चालक वाहनाचा वेग कमी करतील असे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे सर्कल असण्याचा उद्देशच सफल होत नाही. म्हणूनच जुना गंगापूर नाक्याप्रमाणेच मायको सर्कलचा आकार कमी करीत सिग्नल बसविल्यास वाहतूक कोंडीवर मात करता येईल. किंवा फक्त त्र्यंबकरोडकडे जाण्यासाठी उड्डाणपूलाची उभारणी करावी आणि उंटवाडी, सिडकोकडे जाण्यासाठी त्या पुलाखालून व्यवस्था करावी.

'ट्रॅफिक इश्यू'मधून वाहतुकीसारख्या गंभीर विषयावर विचारमंथन सुरू केल्याबद्दल 'मटा'चे अभिनंदन. काही सूचना

१) वाहतूक पोलिसाविरोधात तक्रार करता येईल असा क्रमांक पोलिस आयुक्तांनी जाहीर करावा.

२) तक्रार करणाऱ्याला वाहतूक विभागाकडून त्रास होणार नाही याची शाश्वती वरिष्ठांनी द्यावी.

३) झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करावी.

४) शहरातील रस्त्यांवर वाहतूक विभागाने वेगमर्यादेचे फलक अवश्य लावावेत.

५) वेगमर्यादेचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जावी.

- वसुधा पाटील

नाशिककरांनो, लिहिते व्हा!

शहरातील वाहतूक समस्येवर सडेतोड मतं व्यक्त करण्यासाठी 'ट्रॅफिक इश्यू' या वाहतूक विषयक सदराच्या माध्यमातून महाराष्ट्र टाइम्स वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. येथे केवळ वाहतुकीच्या समस्यांचे रडगाणे अपेक्षित नाही. मात्र, या समस्यांवर अभ्यासपूर्ण विश्लेषणाचे स्वागतच आहे. तुमच्या भागातील वाहतुकीची समस्या सामूहिक प्रयत्नातून सुटावी हा आमचा प्रयत्न आहे. वाहतुकीची स्थिती, त्याची कारणे, वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठीच्या उपाययोजना आणि सूचना तुमच्याकडे असतील तर उचला लेखणी आणि कळवा आम्हाला. आपल्या अभ्यासपूर्ण सूचना आम्ही पोहोचवू प्रशासनापर्यंत आणि घडवून आणू सकारात्मक बदल तुम्हा आम्हा सर्वांना हवा असणारा.

समन्वयक : प्रवीण बिडवे ९८८११२०१३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images