Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पुन्हा नोकरीचे ‘फेक लेटर्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना गंडविण्याचा प्रयत्न शहरात पुन्हा घडतो आहे. शहरातील अनेक उमेदवारांना रेल्वे खात्याच्या भरतीसाठी निवड झाल्याचे कॉल लेटर्स मिळाले आहेत. पुढील प्रक्र‌ियेवर अंत‌िम शिक्कामोर्तब करण्यासाठी उमेदवारांकडून हजारो रूपये बँकेच्या अकाऊंट नंबरवर भरण्याच गळ घातली जाते आहे. परिणामी, असे कॉल लेटर्स हाती पडलेले उमेदवार संभ्रमात आहेत.

सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी नाशिकमधील काही उमेदवारांनी केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याकडे नोकरीसाठी अर्ज केले होते. या प्रक्र‌ियेत सहभागी होत या उमेदवारांनी परीक्षाही दिली होती. मात्र या प्रक्र‌ियेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या व्यक्तींनी आता या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना तुमचीच निवड झाल्याचे सांगून पैशांचीही मागणी केली आहे. या निवड प्रक्र‌ियेत उमेदवाराच्या परीक्षेच्या तपशीलाचा अथवा कुठल्याही मुलाखतीचा काहीही संबंध नाही. उमेदवारांच्या मोबाइल नंबरवर येणाऱ्या एका मेसेजच्या माध्यमातून थेट नोकरीसाठी निवड झाल्याचे कळविण्यात येते. या पाठोपाठ दुसऱ्याच मोबाइल नंबरहून येणाऱ्या कॉलच्या माध्यमातून या उमेदवारांना अभिनंदनाचा फोन येतो. पुढील प्रक्र‌ियेसाठी सिक्युरिटी बाँड म्हणून १३ हजार ५०० रूपयांची मागणी करण्यात येते आहे.

दोन दिवसांपूर्वी रेल्वेचे कॉल लेटर हाती पडल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीत उमेदवारांना वेगवेगळ्या नंबरहून सुमारे आठ ते दहा कॉल पैशांच्या मागणीसाठी आले आहेत. उमेदवाराची कुठलीही मुलाखत न घेता थेट त्याच्या हाती कॉल लेटर पोहचवून पैसे उकळण्याची ही प्रक्र‌िया संशयास्पद आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या लेटरहेडची कॉपी यामध्ये करण्यात आली आहे. या लेटरमधील भाषा, नियमांचे आणि भरती कायद्याचे दिलेले संदर्भ तपशीलवार दिसत असले तरीही ग्रेड पे ची मांडणीसह विविध मुद्द्यांबाबत प्रथमदर्शनीच संशय निर्माण होतो आहे. यातील बहुतांश उमेदवारांनी नोकरीच्या संधी देणाऱ्या विविध वेबसाइट्सवर माहिती नोंदली आहे. या किंवा इतर माध्यमातून चोरीला गेलेल्या माहितीच्या आधारे गरजू उमेदवारांपर्यंत या जाळ्याच्या माध्यमातून संपर्क साधला जातो आहे.

मात्र तक्रार नाही...

केंद्राच्या विविध खात्यांमध्ये विविध पदांवर निवड झाल्याचे पत्र पाठवून त्यापोटी उमेदवारांकडून लाखोंची लूट झाल्याचे प्रकार यापूर्वीही नाशिकमध्ये घडले आहेत. झालेल्या फसवणूकीमुळे बदनामी होऊ नये यासाठी फसलेले उमेदवारही तक्रारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी नाशिकमधील उमेदवारांना माहिती व प्रसार मंत्रालय, महिला व बालकल्याण विकास मंत्रालय, वनविभाग आदी विभागांकडून या प्रकारचे लेटर्स आले आहेत. यातून अनेक उमेदवार गंडविले गेल्याचीही उदाहरणे कमी नाहीत.

नाशिकमधील काही उमेदवारांना आता रेल्वे खात्याकडून कॉल लेटर्स पाठविल्याचा फार्स भामट्यांच्या माध्यमातून उभारला जातो आहे. रेल्वे खात्याकडून या बाबत मिळणारी माहिती, कॉल लेटर्समधील काही संशयास्पद चुका आणि उमेदवारांकडे मुलाखतीशिवाय पैशांची होणारी मागणी या गोष्टी उमेदवारांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. - अजिंक्य गिते, भारतीय जनता युवा मोर्चा, कार्यकर्ता



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेच्या गाळ्यांचा लिलाव!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या व्यापारी संकुलात असलेली एक हजार २८७ गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्याच्या तयारीत आहे. आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने ही शक्कल लढवली असून त्यामुळे सद्यस्थितीत व्यवसाय करत असलेल्या गाळेधारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाळ कोसळण्याची शक्यता आहे. गाळेधारकांनी या लिलावाला विरोध केला असून नियमाप्रमाणे दर आकारा, पण लिलाव करू नका, असे आर्जव केले आहे.

स्थायी समितीची बैठक शनिवारी अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यात विविध प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यात मुदत संपलेल्या आणि संभाव्य मुदत संपत असलेल्या १ हजार २८७ गाळ्यांचा जाहीर लिलाव करून १५ वर्षाच्या दर कराराने देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलात असलेले हे गाळे बेरोजगार, महिला बचत गट आणि व्यावसायिकांना रोजगारासाठी महापालिकेने तीन वर्षाच्या करारावर दिले आहेत. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांचा जाहीर लिलाव करून महापालिकेचे उत्पन्न वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे या गाळ्यांमंध्ये सध्या व्यवसाय करत असलेले बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे महापालिकेन रेडीरेकनर दरानुसार आमच्या कडून भाडे घ्यावे; मात्र गाळ्यांचा लिलाव करू नका, अशी मागणी सभागृह नेते सलिम शेख यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे केली आहे. यामुळे भूमीपुत्र बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे असा निर्णय घेवू नका, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी प्रकरणी तिघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातोरी शिवारात १८७ एकर जमीन खरेदीचे पैसे दिल्यानंतरही त्या जमिनीचे अधिक पैसे मिळावेत यासाठी मोर्चावर दबाव आणून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अर्जून रामचंद्र खेतवानी यांनी फिर्याद दिली आहे. पंडित रंगनाथ कातड, रामदास वाळू पिंगळे, मोतीराम ढेरिंगे अशी आरोपींची नावे आहेत. ३० ऑगस्ट २०१३ ते ३० एप्रिल २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. पंडित रंगनाथ कातड, रामदास वाळू पिंगळे व मोतीराम ढेरिंगे यांनी व्यावसायिक भागीदार अशांनी मातोरी शिवारातील एकूण १८७ एकर जमीन खरेदी केली. त्या जमिनीचे खरेदीचे पैसेही देण्यात आले. मात्र त्यानंतरही अधिक पैसे मिळावेत यासाठी जमिनीवर लेटीगेशन करून माझ्या कडून १२ लाख रुपये व माझे भागीदार मित्र रामदास विष्णू पिंगळे यांच्याकडून चार लाख रुपये रोख व धनादेश स्वरुपात स्वीकारून पुन्हा २३ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्याद्वारे आपल्यावर दबाव टाकण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. भागीदार अमित भास्कर बोरस्ते यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती दिली नाही तर तुम्हाला जमीन मिळू देणार नाही व तुम्ही अडचणीत येणार असे धमकावले. ३० एप्रिल २०१५ रोजी ठरल्याप्रमाणे पैसे का पाठविले नाहीत, लवकर पैसे पाठवा, मी घ्यायला आलो तर महागात पडेल असेही धमकावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने लूटप्रकरणी आणखी एकास अटक

$
0
0

इगतपुरीः वाडीवऱ्हे जवळील ५८ किलो सोने लूट प्रकरणात आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतपर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही ११ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अद्यापही मुख्य संशयित फरारच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे जवळ १६ कोटींच्या ५८ किलो सोन्याची तोतया पोलिस बनून लूट करण्यात आली होती. त्या प्रकरणातील तीन संशयितांना पकडण्यात यश मिळविले आहे. काल या प्रकरणात टिप देण्याची भूमिका बजावणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. हा संशयित या गुन्ह्यातील मास्टर माइंड असलेल्या मुख्य संशयिताचा सहकारी असल्याची कुणकुण लागली असून, त्यांना हा टिप देत असल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतिमंद मुलीवर कर्नलचा बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील संसरी लेन परिसरातील मतिमंद युवतीवर त्याच भागात राहणाऱ्या लष्करातील कर्नलने बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कर्नलला ताब्यात घेतले आहे. हा अधिकारी तीन महिन्यांनी निवृत्त होणार असल्याचे समजते.

कर्नल विनोद सहानी यांनी गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास परिसरातील २३ वर्षीय मतिमंद मुलीला घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार शुक्रवारी लक्षात आला. त्यानंतर मुलीच्या बहिणीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. हा प्रकार गंभीर असल्याने सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे व पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली. पीडित युवती आणि आरोपी कर्नल सहानी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नसल्याने तसेच अन्य काही बाबींवर प्रकाश न पडल्यामुळे कर्नल सहानी यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेसाठी तिरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांनी बदनाम झालेल्या जिल्हा बँकेचे पुन्हा शुध्दीकरण अन् पारदर्शक व्यवस्थापनाचे आश्वासन अजेंड्यावर ठेवत शनिवारी आणखी दोन पॅनलची घोषणा करण्यात आली. यामुळे आता हिरे, ढिकले आणि कोकाटे या नेत्यांचे पॅनल जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहे. परिणामी यंदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र अटळ आहे.

रणरणत्या उन्हासोबतच जिल्हा बँक निवडणुकीचे रण आता तापू लागले आहे. प्रतिस्पर्ध्यांना शह देण्यासाठी उमेदवारांकडून डावपेच आखण्यावर भर दिला जात आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून शनिवारी माजी आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांनी शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली. या पॅनलच्या वतीने एससी, एसटी गटातून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, ओबीसी गटातून माजी आमदार वसंत गिते, एनटी गटातून नरेंद्र दराडे, क वर्ग बिगरशेती संस्थांच्या गटातून राजेंद्र भोसले, महिला गटातून आमदार सीमा हिरे व लासलगावच्या प्रतिभा होळकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. कर्जपुरवठ्याच्या मुद्द्याला प्राथमिकता असली तरीही बँकेची बिघडलेली प्रतिमा सुधारण्‍याचे प्रयत्न आणि पारदर्शी कारभार हाच प्रमुख मुद्दा अजेंड्यावर असल्याचे यावेळी माजी आमदार कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पैशांच्या ताकदीवर मस्ती दाखविणाऱ्या उमेदवारांना मतदारांनीच धडा शिकवावा, असेही आवाहन त्यांनी केले.

सुनील ढिकले यांनीही पत्रकार परिषदेत सहकार महर्षी उत्तमराव ढिकले पॅनलची घोषणा केली. या पॅनलच्या वतीने डॉ. सुनील ढिकले यांच्यासह मागासवर्गीय गटातून नानासाहेब सोनवणे, ओबीसी गटातून अनिल कदम, एनटी गटातून कोंडाजीमामा आव्हाड, महिला गटातून लिना आहेर व पुष्पा दळवी असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. कुठल्याही सहानुभूतीच्या आधाराशिवाय केवळ पारदर्शकतेचा मुद्दा अजेंड्यावर ठेवू, अशी भूमिकाही डॉ. सुनील ढिकले यांनी मांडली.

यापूर्वीच अपूर्व हिरे यांनीही कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पॅनलची घोषणा केली होती. यामध्ये अपूर्व हिरे यांच्यासह मागासवर्गीय गटातून रविकांत भालेराव, ओबीसी गटातून राजेंद्र डोखळे, एनटी गटातून पंढरीनाथ थोरे तर महिला गटातून शोभा बच्छाव आणि संगीता देवरे असे सहा उमेदवार या अगोदरच घोषित करण्यात आले आहेत. यात ढिकले यांच्या पॅनलमधून लढणाऱ्या कोंडाजीमामा आव्हाड यांच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली होती. यानुसार त्यांचा अर्ज वैध ठरविला गेला नसला तरीही आव्हाड यांनी या निर्णयाविरोधात अपील केल्याने अद्याप त्यांचे आव्हान 'जैसे थे' आहे. दि. ११ मे पर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. सद्यस्थितीत तरी तिनही पॅनलच्या घोषणांमुळे तिरंगी लढत अटळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईचे प्रवेश पहिलीपासूनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिलीपासूनच प्रवेश देण्याचा नवा अध्यादेश सरकारने काढल्याने मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी या पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी शाळांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होण्याची चिन्हे आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) विनाअनुदानित

शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतात. या प्रवेशामध्ये अनेक बाबी अडचणीच्या असल्याची तक्रार शाळांनी केली. यंदा केवळ २६ टक्केच आरटीईचे प्रवेश झाल्याने त्याची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा संचालकांची बैठक घेतली. त्यानुसार आता नवीन अध्यादेश सरकारने काढला आहे. त्यानुसार आरटीईचे प्रवेश शाळांनी पहिलीपासूनच द्यावेत. पूर्व प्राथमिकचे प्रवेश देणे शाळांना बंधनकारक असणार नाही. त्यामुळे पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी शाळांकडून पालकांकडे शैक्षणिक शुल्काची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या अध्यादेशामुळे पालकांचा असंतोष वाढण्याची चिन्हे आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार असली तरी त्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया

सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार, दरवर्षी २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया १५ डिसेंबरला सुरू करावी. १० मार्च अखेर पर्यंत त्याच्या तीन फेऱ्या पूर्ण कराव्यात. तिसरी फेरी झाल्यानंतर ८ दिवसात २५ टक्के आरक्षणांतर्गत एकही प्रवेश शिल्लक राहिला नाही याची संबंधित शिक्षणाधिकारी यांनी खात्री करावी. त्यानंतर त्या संस्थेला २५ टक्के प्रवेशातील उर्वरित शिल्लक प्रवेश सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून भरण्यास परवानगी द्यावी, असे अध्यादेशात म्हटले आहे.

या प्रश्नांचे उत्तर काय?

मराठी शाळेत पूर्व प्राथमिक केलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात पहिलीच्या वर्गात आरटीईद्वारे प्रवेश मिळेल का?

पूर्व प्राथमिकला प्रवेश असताना ते सर्व विद्यार्थी पहिलीला येतील मग २५ टक्के प्रवेश दिले जातील की नाही?

पूर्व प्राथमिकमध्ये २५ टक्के प्रवेशासाठी शैक्षणिक शुल्क घेतला जाणार की नाही?

आर्थिक दुर्बल असलेल्या कुटुंबांना त्या शाळांचे शैक्षणिक शुल्क देणे परवडेल का?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघे बुडाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ सासवड

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शुक्रवारी शहरातील चार तरुण बुडाले. नाशिकचे दोघे जण जेजुरी येथे मल्हारसागर जलाशयात बुडाले, तर सिडकोतील दोघा तरुणांचा विल्होळीतील तलावात बुडून मृत्यू झाला. पंडित नगरमधील दोन तरुणांचा विल्होळीतील तलावात बुडून मृत्यू झाला. राजेंद्र चव्हाण (१७) व अक्षय विलास पवार (२०) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, जेजुरी येथे कुलाचार आणि कुलधर्मासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नाझरे धरणातील मल्हारसागर जलाशयातील गाळात बुडून मृत्यू झाला. हे दोघेही भाऊ दिंडोरी रोड (जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. नीलेश सदाशिव जाधव (वय ३७) आणि महेश सदाशिव जाधव (वय २८) अशी या भावांची नावे आहेत. महेशचे ११ जून रोजी लग्न ठरले असल्याने विधी आणि कुलाचार करण्यासाठी ते जेजुरी येथे गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराचीच होतेय कोंडी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दाट लग्नतिथीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. लग्नतिथी आणि त्याबरोबरच लागून आलेल्या सुट्यांमुळे शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेसोबतच शहरालगतच्या मोठ्या मार्गांवरही वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहतूक नव्हे तर शहराचीच कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उन्हाच्या वाढत्या झळा आणि ट्रॅफिकचे कोलमडलेले नियोजन यामुळे दुपारच्या दरम्यान प्रवाशांच्या जीवाची काहीली होत आहे. काही दिवसांपासून लग्नसोहळ्यांची धामधूम सुरू झाली आहे. परिणामी, बाजारपेठेतील गर्दीलाही सध्या भरती आली आहे. यातच लग्नतिथीच्या दिवशी शहराच्या चुहूबाजूकडील सर्व रस्त्यांवर वाहतूकीची समस्या डोकेवर काढते आहे.

शनिवारी शहरात द्वारका परिसर, औरंगाबाद रोड, पेठ रोड, नाशिकरोड, त्र्यंबकेश्वर रोड या भागांमधील लॉन्सवर लग्नाच्या वऱ्हांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या लग्नांसाठी शहराच्या चारही दिशेने येणाऱ्या दुचाकी आणि मोठ्या वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली. औरंगाबाद रोडवर जागोजागी निघालेल्या लग्नाच्या ‌मिरवणुका, वाद्यांचा आवाज आणि जीवाची काहीली करणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे प्रवाशांमध्ये लगबग दिसून येत होती.

यंदा सिंहस्थामुळे लग्नाच्या तिथी याच महिन्यात जास्त संख्येने आहेत. यामुळे एकाच व्यक्तिस एका दिवशी पाचे ते सात लग्नांना उपस्थिती लावण्याची वेळ अनेकांवर आली आहे. ही कसरत करताना येणारा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या वापरावर दिला जाणारा भर याच्या परिणामी वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतो आहे. औरंगाबाद रोड, व्दारका परिसर या ठिकाणी हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. ट्रॅफीक शाखेच्या वतीने कर्मचारी नियोजन करीत असले तरीही क्षमतेच्या बाहेर वाढणारी वाहनांची संख्या आणि उन्हाचा वाढता प्रभाव या स्थितीत या कर्मचाऱ्यांचीही तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र नजरेला पडते आहे.

पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

शहरात विविध लॉन्समध्ये पार पडणाऱ्या लग्नसोहळ्यांमुळे पार्किंगच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे. लॉन्सच्या परिसरात रस्त्यावरच पार्क केली जाणारी छोटी-मोठी वाहने अन् याचा इतरांना होणारा त्रास या बाबीही लग्नतिथीच्या दिवशी प्रकर्षाने जाणवत आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅफिक हवालदार उपस्थित नसल्याचेही दिसून येत आहे.

सायंकाळच्या परिसरात द्वारका ते आडगाव नाका या भागातून प्रवास करणे म्हणजे डोकेदुखी ठरते. आता हेच चित्र शहरातील इतर रस्त्यांवरही दिसू लागले आहे. एकाच दिवशी एवढी वाहने रस्त्यावर उतरल्याने सर्व यंत्रणा फोल ठरून शहराची कोंडी होत आहे.

रामदास शिंदे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारीच्या आमिषापोटी पाच कोटींची फसवणूक

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळवून देण्याच्या आमिषापोटी नाशिकमधील रहिवासी मयूर अलई यांची पाच कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी अहमदाबादच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून व्रज माळी (६४) या संशयितास ताब्यातही घेतले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नाशिकचे रहिवासी मयूर अलई उमेदवारीसाठी इच्छुक होते. यावेळी त्यांचा संपर्क माळी यांच्याशी आला. माळी यांनी भाजपाच्या वरिष्ठांशी घनिष्ठ संबंध असल्याचे अलई यांना भासवित वेळोवेळी पैशांची मागणी करीत ५ कोटी ११ लाख रुपये उकळल्याचा आरोप अलई यांनी 'मटा'शी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलईडी’चा प्रकाश पडणार तरी कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेने नाशिक शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. परंतु, यात रस्ते रुंदीकरणात मुख्य रस्त्यांवर एलईडीचा प्रकाश पडणार कधी, असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यांवरून वाहन चालवितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी महापालिकेने मुख्य रस्त्यांवर विद्युत खांब बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मनसेने नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच शहरातील मुख्य रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहेत. परंतु, रस्ते रुंदीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असतांना रस्तांवर एलईडीचा प्रकाश पडणार कधी असा, सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. त्यातच सातपूर भागातील गंगापूररोड, बारदान गफाटा, अशोकनगर, श्रमिकनगर ते समृद्धनगर व पपया नर्सरी ते एक्स्लो पॉईंटच्या रस्त्यांवरून वाहनचालकांना वाहने चालवितांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात एलईडीचे पथदीप बसणार कधी असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. अनेक महिन्यांपासून सातपूर विभागातील विद्युत कार्यालयात एलईडीचे पथदीप दाखल झाले आहेत. याबाबत विद्युत विभागातील अधिकारी यांना विचारले असता त्यांनी टेंडर मंजूर झाल्यावर काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. परंतु, रस्त्यांवरून वाहनचालकांना होणारा अंधाराच्या त्रासाला जबाबदार कोन असा सवाल देखील वाहनचालक उपस्थित करत आहेत. यासाठी महापाल‌िकेने लवकरात लवकर रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर एलईडी पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामात पथदीप गायब आहेत. यामुळे वाहन चालवितांना चालकांना अंधाराचा सामना करावा लागतो. त्यातच महापालिकेकडे एलईडी पथदीप येऊन देखील रस्त्यांवर लावण्यात आलेले नाहीत. महापालिकेने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

- रवींद्र पाटील, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेपाळच्या पुनरुत्थानात ‘सायकलिस्ट’चा वाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे शहरातून मदतफेरी काढण्यात आली. यावेळी विविध संस्था, दुकानदार, वाहनचालक यांनी भरघोस मदतीचा हात पुढे केला.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या या मदत फेरीला भोसला मिलीटरी स्कूलच्या चौकातून सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीचे पदाधिकारी हरिष बैजल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. रॅली मॉडेल कॉलनी, बी. वाय. के. कॉलेज, बिग बाजार, कॅनडा कॉर्नर, सी. बी. एस. शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर चौक, अशोकस्तंभ, गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल मार्गे जेहान सर्कल येथे विर्सजित करण्यात आली. या रॅलीत सहभागी तरुण तरुणींनी दुकांनामध्ये जाऊन लोकांना इच्छाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले.

सायकलिस्टच्या आवाहनाला लोकांनीही प्रतिसाद देत मदत केली. जमा झालेला निधी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या रॅलीत अध्यक्ष विशाल उगले, शेखर गवळी, दिपक भोसले, देविदास आहेर, प्रतिभा आहेर, प्रिया आहेर, जसपाल सिंग, वैभव शेटे, पार्थ जैन यांच्यासह सायकलिस्ट उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धानाच्या कोंड्यापासून विटा

$
0
0

मह‌ावीर पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कमी खर्चातील अभिनव संशोधन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या शहरीकरणाच्या परिणामी काँक्रिटीकरण अटळ असले तरीही याला पर्यावरण पूरक हातभार लावण्याचा प्रयत्न इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक संशोधनातून केला आहे. भाताच्या (धान) कोंड्याची राख व औष्णिक वीज प्रकल्पातील राख यांच्या मिश्रणातून भक्कम आणि पर्यावरण पूरक विटांची निर्मिती शक्य असल्याचा दावा श्री महावीर पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

सद्यस्थितीत बनविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक विटांचा अभ्यास करून श्री महावीर पॉलिटेक्निकचे विद्यार्थी घनश्याम पवार, चंद्रकांत बागुल, स्वप्निल बोराळे, सुमित भडांगे, कृष्णानंद शिंदे या विद्यार्थ्यांनी धानच्या कोंड्याच्या राखेपासून विटा बनवल्या आहे. धानच्या कोंड्याची राख आणि चुन्याचा अंश मिश्रित विटा तयार करण्याचे प्रयोग यापूर्वी विदेशात झाले आहेत. मात्र, धानच्या कोंड्याची राख आणि औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बॉटम अॅशपासून आजवर विटा तयार करून परिक्षणे झाले नसल्याचाही विद्यार्थ्यांचा दावा आहे.

देशात वर्षाकाठी अंदाजे १२५ दशलक्ष टन भात पिकाची निर्मिती केली जाते. सुमारे २४ दशलक्ष टन धानच्या कोंड्याची निर्मिती होते. तर २२ दशलक्ष टन तांदळाच्या कोंड्याची राख निर्मिती होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील भात पिकातून हाती येणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग केला गेल्यास पर्यावरणपूरक विटांच्या निर्मितीस फायदाच होईल, असा विश्वास विभागप्रमुख मेघा अनंतवार, मार्गदर्शक प्रा. सागर शिंदे यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक स्ट्रेन्थ

सुपिक मातीपासून बनवलेल्या विटांची स्ट्रेन्थ या विद्यार्थ्यांनी मोजली. ती सुमारे ४.१५ न्यूटन प्रतिमीटर आढळून आली. फ्लाय अॅशपासून बनवलेल्या विटांची स्ट्रेन्थ ३.१५ ते ४ न्यूटन प्र‌तिमीटर आढळून आली. तर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विटांची स्ट्रेन्थ ४.५ ते ५.२ न्यूटन प्र‌तिमीटर आढळली. यावरून इतर विटांच्या तुलनेत या विटा अधिक मजबूत असल्याचा निष्कर्ष विद्यार्थ्यांनी काढला. या विटांचे वजन १.९ ते २.५ किलो आहे. तर इतर विटांचे वजन ३ ते ३.५ किलो असते. तांदळाच्या कोंड्याच्या राखेपासून बनविलेल्या एक विटेची किंमत २.७५ रुपये असून मातीच्या विटेची किंमत ४.५० रुपये आहे. तर फ्लाय अॅशपासून बनवलेल्या विटांची किंमत ३.५० रुपये इतकी आहे.

किंमत कमी; मजबुती अधिक

ग्रुप लीडर घनश्याम पवार याने सांगितले, की तांदळाच्या कोंड्याच्या राखेपासून आणि औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बॉटम अॅशपासून बनविलेल्या विटांना भाजण्याची आवश्यकता नाही. पाण्यात भिजवण्याची म्हणजेच 'क्युरिंग' प्रक्रियेची गरज असते. इतर विटांच्या तुलनेत या विटा वजनाला कमी असून अधिक मजबूत आहेत. किमतीच्या दृष्टीनेही सुमारे दोन रुपयांनी तांदळाच्या कोंड्याची विट अधिक स्वस्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती झाली हायटेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकऱ्यांना विविध सेवा, सुविधा देणाऱ्या बाजार समित्या व त्यांचे कारभार शेतकऱ्याला घरबसल्या पाहता याव्यात यासाठी आता मालेगाव बाजार समितीने हायटेक होण्याचे पाऊल उचलले आहे. मालेगाव बाजार समितीने www.apmcmalegaon.com या संकेतस्थळची निर्मिती केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या वेबसाइट व कृषिविषयक माहिती केंद्राचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी अॅण्ड्रॉइड मोबाइल, व्हॉट्स अँप व फेसबुक या सोशल मीडियासह इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीतील दैनंदिन बाजारभाव, शासनाच्या कृषिविषयक योजना व अन्य सर्व पूरक माहिती त्यांना तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी बाजार समितीने ही वेबसाइट सुरू केली आहे. त्याचबरोबर मालेगाव मुख्य बाजार आवारात शेतकरी बांधवांसाठी कृषीविषयक माहिती केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

यावेळी प्रसाद हिरे म्हणाले की, शासकीय मंडळाच्या आठ महिन्यांच्या अल्पकालावधीत मालेगाव मुख्य बाजार आवारात सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले. गांडूळ खत प्रकल्पाची निर्मिती केली. चाळीसगाव फाटा येथे फेडरेशनमार्फत कापूस खरेदी केंद्र, मनमाड चौफुलीवर फळफळावळ व भाजीपाला मार्केट, झोडगे उपबाजार केंद्रात मका खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे. मुंगसे उपबाजाराला बंगळुरू येथील होपकॉम्पसचे तज्ज्ञ संचालकांनी भेट देऊन पाहणी केली.

त्यांच्या अनुकूलतेमुळे तालुक्यातील शेतमाल बंगळुरूसारख्या ठिकाणी पाठविता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बाजारातील लिलावाचे कामकाज नियमित सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त सुट्ट्या कमी करण्यात आल्याचेही सांगितले. या संकेतस्थळामुळे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेतमालाचे दैनंदिन भाव, विविध योजना यांची माहिती घरबसल्या घेता येणार असल्याने त्याचा निश्चितच लाभ होईल. तसेच बाजार समितीचा कारभारही शेतकऱ्यांना समजण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचाही प्रत्यक्ष सहभाग घेता येणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी धनंजय वाघ यांनी कृषिविषयक माहिती केंद्राची, तर तुषार शर्मा यांनी बेवसाइटविषयी माहिती दिली. अशोक देसले यांनी प्रास्ताविक केले. संचालक विनोद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. भरत आखाडे यांनी आभार मानले. यावेळी काशिनाथ पवार, शांताराम लाठर, दशरथ निकम, केवळ हिरे, नितीन बच्छाव आदींसह बाजार समिती संचालक, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाववर पाणीटंचाईचे सावट

$
0
0

तालुक्यात अनेक योजना कागदावरच; जलस्त्राेतांच्या नियोजनाची गरज

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या, हद्दवाढीतील गावांचा समावेश आणि त्यात अपुरे पडणारे जलस्त्रोत आणि आहे त्या स्रोतांचे शास्त्रीय नियोजन नसणे, अनेक पाणीपुरवठा योजना कागदावरच राहिल्या आहेत. समन्वय नसल्याने मालेगाव शहर आणि तालुक्यावर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट आहे. एप्रिल महिना कसा बसा निघाला तरी मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते. जूनच्या प्रारंभीच जर वरूणराजा मेहरबान झाला नाही तर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागू शकते असे सध्याचे चित्र आहे.

सध्याच्या पाणी उपलब्धतेनुसार महापालिका व तालुक्यासाठी पंचायत समितीच्या वतीने पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण, तरीही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागू शकतात. मोसम व गिरणा नद्यांना दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पूर आले. दुतर्फा भरून वाहणाऱ्या या नद्यांचे पाणी आडवण्यची मात्र कुठलीही योजना नसल्याने डिसेंबर अखेर या दोनही नद्यांचे पात्र कोरडे झाले. चणकापूर, तळवाडे तलाव भरल्यावर गिरणा नदीला व हरणबारी भरल्यावर मोसम नदीमध्ये पाणी सोडण्यात येते. त्या वेळेस पूर येतो. या नद्यांवर काही ठिकाणीच लहान मोठे बंधारे, केटीवेअर बांध आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर काही महिनेच पाणी राहते व नंतर पाणी संपुष्टात येते. सध्या तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.

मालेगाव शहराला दररोज ३६ दशलक्ष लिटर एवढी पाण्याची गरज असते. दोन्ही प्रमुख धरणांतून शहरातील व हद्दवाढ गावांमधील विविध १९ लहान-मोठ्या जलकुंभांतून नळाद्वारे घराघरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यासाठी मनपाचे दोन दिवसात १५२ झोननुसार पाण्याचे वितरण होते. शहर, संगमेश्‍वर, कॅम्प व मनपा हद्दवाढीतील समाविष्ट गावे, असे सर्वांसाठी नियोजन केले आहे. मात्र, सध्या शहरातील वेगवेगळ्या भागातून पाणीपुरवठा अनियमित झाल्याच्या तसेच अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी येत आहेत. ग्रामीण भागात देखील कमी दाबाने आणि दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मालेगाव शहर व तालुक्यात उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे जळसाठे, विहिरी, हातपंप यांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

दूषित पाणीपुरवठा

मालेगाव शहरात अनेक परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. हद्दवाढीतील रमजानपुरासह हजारखोली परिसर, फरान हॉस्पिटल जवळील गुलाब पार्क, अख्तराबाद, जोहराबाद तर कलेक्टरपट्टा भागात काही वसाहतीमध्ये या दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक दिवसांपासून येथील रहिवाशांची याबाबत तक्रार आहे. त्यांना तांत्रिक बाब व सदोष जलवाहिनीमुळे ही अडचण होत असल्याचे सांगत नागरिकांची बोळवण होत आहे. मात्र, दूषित पाणीपुरवठा झाल्याने गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ झाली आहे. तसेच, तालुक्यात झोडगेसह आठ गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याचे पत्र दिले आहे.

भिस्त योजनांवरच

पूर्वीपासून माळमाथा, झोडगे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. येथील मुख्य स्त्रोत असलेल्या अनेक गावांमधील हातपंप पाण्याअभावी बंद पडले, तर काही नादुरुस्त झाले आहेत. विहिरींच्या पातळीने ५०, ६० फुटावरून १२० ते १३० फूट खोल तळ गाठला आहे. त्यामुळे जनतेची पाण्याबाबतची चिंता वाढत आहे. मे महिन्यातील पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे येथे शासकीय पाणीपुरवठा योजनांवर भिस्त राहणार आहे. तालुक्यात २५ गावे, २६ गावे, ४२ गावे, ५६ गावे, दाभाडीसह १४ गाव पाणीपुरवठा योजनांमधून गावांना पाणी मिळत असले तरी परिस्थिती बिकट झाल्यास पाणीपुरवठ्यात काही मोठा बदल होऊ शकतो. या योजनांद्वारे नियोजनानुसार तीन दिवसाआड, दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, येथे कमी दाबाने पाणी येणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा नाही, अनेक दूषित पाणीपुरवठा, पाणी वाटप, नियोजनात सुसूत्रता नसल्याची तक्रार आहे. पंचायत समितीमार्फत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा नियोजन कृती आराखडा २०१४-२०१५ करण्यात आला आहे. यासाठी तीन टप्पे करून पाणी उपलब्धतेनुसार पुरवठा करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून २0१५ मधील आराखड्यात समाविष्ट गावांसाठी उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये २६ गाव व १५ वाडे टंचाईग्रस्त होऊ शकतात, असे गृहीत धरून वरील पूरक उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे.

धरणांची सध्यस्थिती

मालेगाव शहरासाठी १०, द्याने-२, भायगाव- २, म्हाळदे-२, सोयगाव-३ असे एकूण १९ जलकुंभ. तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आधारित आकडेवारीनुसार १६ नवीन जलकुंभ मंजूर झाले आहे. त्यातील १४ जलकुंभांची कामे सुरू आहे व दोन जलकुंभांची कामे प्रगतीपथावर आहेत.

पाणीगळतीमुळे अपव्यय

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणाधरण मालेगाव जलवाहिनीतून अनेक ठिकाणी पाणीगळती होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आला नसल्याने हजारो लिटर पाणी रोजचे वाया जात आहे. गिरणा धरण ते मालेगावपर्यंत जलवाहिनीवर एकूण २४ वॉल्व्ह आहेत. त्यातून अनेकवेळा गळती होऊन पाण्याची नासाडी होते. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून या जलवाहिनीवर गस्तीपथकाकडून नियंत्रण ठेवून दुरुस्ती केली जाते. शहरास जीवनदायी ठरणाऱ्या या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. सध्या तालुक्यातील गावामध्ये पाण्यासाठी टॅँकर सुरू झालेले नाही. केवळ दुंधे ग्रामपंचायतीचा पंचायत समितीकडे टॅँकरसाठी प्रस्ताव आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याच्या शोधासाठी ग्रामस्थांचा शेताला वेढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील अनेक गावांत नरभक्षक बिबट्याचा थरार सुरूच आहे. रविवारी भुसे चापडगाव गावात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळसह तीन मेढ्यांवर जीवघेणा हल्ला चढविला. मेंढपाळाने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकत ऊसाच्या शेताचा आसरा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी दिवसभर ग्रामस्थांनी ऊसाच्या शेताभोवती गराडा घातला होता. तसेच पिंजराही लावण्यात आला आहे.

रविवारी सकाळी चापडगाव येथील शेतकरी प्रकाश दराडे यांच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने खंडू बाबुराव सोनवणे यांच्यासह तीन मेंढ्यांवर हल्ला केला. यावेळी सोनवणे यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने रुपा सोनवणे, शरद चौधरी, महेश फड, सचिन सोनवणे, सुभाष सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच सर्व जण घटनास्थळी पोहोचल्याने मेंढपाळसह त्याच्या मेंढ्या बचावल्या. बिबट्या जवळच्याच एक एकर ऊसात जाऊन लपला. यामुळे ग्रामस्‍थांनी चोहोबाजूंनी ऊसाच्या शेताला घेऊन वनविभागाला माहिती दिली. पक्षीमित्र गंगाधर आघाव व प्रमोद दराडे यांनी वनविभागाचे आरएफओ बिन्नर यांच्याशी संपर्क साधून पिंजरा लावण्यीची मागणी केली. वनविभागाने घटनास्थळी दाखल होत पिंजरा लावला आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी ऊसाच्या शेताला वेढा दिलेला होता. मादीसह दोन पिलं बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होते.

गेल्या महिन्यात येथे गणेश पोटे या चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेले होते. यानंतरही बिबट्याची दहशत सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंजरा लावूनही बिबट्या सापडत नसल्याने एकटे फिरणे मुश्किल झाले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण : सिंहावलोकन अन् आव्हाने!

$
0
0

>> रतन लथ

प्राचीन काळातील गुरूकुल पध्दतीपासून सुरू झालेल्या शिक्षणाच्या प्रवासाने आजवर अनेक स्थित्यंतरे दाखविली आहेत. काळाच्या विविध टप्प्यावर निर्माण झालेल्या शिक्षणाच्या पध्दतींनी एकूणच शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविले. भूतकाळातले चांगले स्वीकारून भविष्याच्या निर्मितीसाठी वर्तमानाच्या कर्मावर भर देणे इतकेच आपल्या हाती आहे. यादृष्टीने भविष्यातील आव्हाने शिक्षणाच्या सहाय्याने पेलण्यास आपण तयार व्हायला हवे.

प्राचीन काळी आपल्याकडे शिक्षणासाठी गुरूकुल पध्दती अस्तित्वात होती. विद्यार्थी गुरूगृही राहून त्या घरची कामे करीत शिक्षण घेत. स्वावलंबन हा महत्वाचा गुण नकळतपणे विद्यार्थी तेथे शिकत असत. गुरू आपली मुले व इतर शिष्य यांच्यात कधीही भेदभाव करीत नसे. उभयतांचे रहाणेही अतिशय साधे असे. तेव्हा गुरू लक्ष्मीपेक्षा सरस्वतीचे उपासक होते. पालकांचाही गुरूंवर प्रचंड विश्वास होता. म्हणूनच देवाखालोखाल गुरूंना पुजले जायचे. ब्रिटीशपूर्व काळात शिक्षण ही सरकारची जबाबदारी नव्हती. पाठशाळा खाजगी असत. ज्यात संस्कृत व्याकरण, ज्योतिष, वेदांत, धर्मशास्त्र यांचे शिक्षण दिले जाई. शिक्षण ही ब्राह्मणांची मक्तेदारी होती.

पुढे इंग्रजांच्या हाती सत्ता गेल्यावर राज्य कारभारासाठी त्यांना इंग्रजीचे ज्ञान असणा-या लोकांची गरज भासू लागली. त्याकाळात औपचारिक शिक्षणाचे प्रमाणही खूपच कमी होते. स्त्री शिक्षण तर जवळपास नव्हतेच. इंग्रजी भाषेच्या शिक्षणाने माणूस अपवित्र होतो अशी भ्रामक कल्पना लोकांमध्ये होती. शिक्षण हे सर्व सुधारणेचे मूळ आहे हा विश्वास असलेल्या ज्योतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाईच्या मदतीने स्त्री शिक्षणाला वाहून घेतले, तर अस्पृश्यांच्या बहिष्कृतांच्या शिक्षणाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष लक्ष दिले.

इंग्रजी शिक्षण देणाच्या दृष्टीने ख्रिश्चन मिशनरीजच्या चर्चशी संलग्न कॉन्व्हेंट शाळांचा उदय याच सुमारास झाला. शिक्षणाबरोबर धर्मप्रचार व प्रसाराला त्यांचे कायमच प्राधान्य राहिले. १९४७ साली भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला व १९५० साली देशाची घटना अस्तित्वात आली. देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी भाषावार प्रांतरचना झाली व प्रत्येक राज्यात त्यांची शिक्षण मंडळे अस्तित्वात आली. ज्यात राज्यभाषेला महत्वाचा दर्जा मिळाला.

१९५२ साली तेव्हाचे केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक परिषद भरली, ज्यात केंब्रिज स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या परदेशी अभ्यासक्रमाला पर्यायी केंद्रीय भारतीय परीक्षा पध्दतीची निकड भासली. १९५२ साली सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अस्तित्वात आले, तर १९५८ साली इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन सुरू झाले. हे दोन्ही अभ्यासक्रम प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास या मोठ्या शहरांपुरते मर्यादित होते. तर इतर ठिकाणी राज्य शिक्षण मंडळे होती. सीबीएसईचा बोलबाला प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये जास्त होता, तर आयसीएसईचा दक्षिणेकडील राज्यांमध्ये. स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे दोन्ही अभ्यासक्रम महत्वाचे होते. कारण घोकंपट्टीऐवजी ज्ञानाच्या व्यावहारीक उपयुक्ततेवर त्यांचा भर होता. राज्य शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्रे या मुख्य विषयांपुरतेच मर्यादित होते. घटनेने जरी शिक्षणाचा मुलभूत हक्क सर्व देशवासियांना दिला तरी त्याचा गांभिर्याने विचार होतांना दिसत नव्हता. गुणांच्या टक्केवारीवर विज्ञान, वाणिज्य, कला अशा क्रमानेच विद्याशाखा निवडल्या जायच्या व विज्ञान शाखेतही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखांनाच महत्व होते. पण तेव्हाही शिक्षक हा पेशा होता धंदा नव्हता आणि विद्येची पूजा व्हायची.

विद्येनेच मनुष्या आले, श्रेष्ठत्व या जगामाजी याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे १९६२ साली भारताचे राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. सतत वाचन, चिंतन अध्ययन व अध्यापन ग्रंथलेखन, तत्वचिंतन, विचार मंथन यांनी संपन्न असलेले परिपूर्ण जीवन असे त्यांचे सार्थ वर्णन करता येईल. विद्याव्यासंगी व हाडाचे शिक्षक असलेले राधाकृष्णन विज्ञानयुगातील प्रज्ञावंत म्हणूनही ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस भारतात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

(लेखक फ्रवशी इंटरनॅशल स्कूलचे अध्यक्ष आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुशावर्त होतेय चकाचक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ तयारीस वेग आला असून, कुशावर्त तिर्थावरील बॅरेकेटिंगला रंगरंगोटी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण तीर्थकुंड उपसण्यात येऊन वेल्डिंगसारखी कामे पूर्ण केली होती. आता रंगरंगोटी करून स्वागतास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. अर्थात कुशावर्त परिसर विकसन काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, दिनांक २४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव येथे येणार असल्याचे समजते. महंत शंकरानंद आणि आणखी काही साधुंनी त्यास दुजोरा दिला आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या अंपग सेवा शिबिराच्या साहित्य वाटपासाठी मुख्यमंत्री येत असल्याचे समजते. यामुळे त्र्यंबक येथे सिंहस्थ कामांना वेग आला आहे. शहरात अर्धेधिक रस्ते अद्याप खोदलेल्या अवस्थेत आहेत. रहदारीची समस्या बिकट असताना मुख्यमंत्री आणि राज्यपाल येथे येणार असल्याने साधू-महंतांच्या आग्रहाखातर मंदिरात दशनार्थ आणि कुशावर्तावर अवलोकनार्थ भेट देणार आहेत. तसे झाल्यास अवघ्या २० दिवसात त्र्यंबकच्या विकासकामांची परिस्थिती रूळावर आणावी लागणार आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने त्र्यंबक पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

शहराची आजची अवस्था पाहता अवघ्या दोन ते तीन आठवड्यात त्यास रंगरूप प्राप्त करून देण्यासाठी जादूची कांडी देखील अपुरी पडेल, अशी येथे उघड चर्चा होत आहे. कामांचा विलंब आता दीर्घ चर्चेचा विषय झाला आहे. कामांमुळे जागोजागी दगड मातीचे तसेच जुन्या रस्त्यांचे काँक्रीटचे ढिगारे पडले आहेत. ढिगाऱ्यांनी आणि खोदलेल्या रस्त्यांच्या वर आलेल्या लोखंडी खांबांनी नागरिक-भाविक अडखळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खोदलेल्या गटारींमुळे दुर्गंधी अस्वस्थ करीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे किमान विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा त्र्यंबकवासीय करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादूच्या दुनियेत रमली बच्चेमंडळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तलवारीने माणसांचे दोन तुकडे....भूतांचा नाच... डान्सिंग रुमाल... तरंगता मुलगा... या आणि अशा अनेक हातचलाखीच्या बाबींनी चिमुकले जादूच्या दुनियेत गेले. जादूगार संजय रघुवीर आणि रघुराज यांच्या सादरीकरणाने बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण आले होते. मटा क्लचर क्लबच्या सभासदांसाठी रविवारी कालिदास कलामंदिरात जादूगार संजय रघुवीर आणि रघुराज यांचे जादूचे प्रयोग झाले.

महाराष्ट्र टाइम्स आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. याचाच एक भाग म्हणून उन्हाळी सुट्यांनिमित्त जादूच्या प्रयोगांचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दहा हजारांहून अधिक मुला-मुलींना जादूचे प्रयोग शिकविणाऱ्या जादूगार संजय रघुवीर यांनी सादर केलेल्या प्रयोगांनी प्रेक्षकांना चकीत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील दहा सेकंदात दहा जादूचे प्रयोग सादर करण्यात आले. यात कागदाच्या बोळ्यातून फुलांची निर्मिती, पेपरच्या कोनातून पाणी नाहीसे होणे, तीन स्टिलच्या रिंगा एकमेकावर आदळून दोन रिंगा गायब करणे, ब्लॅक पेटीत पाणी टाकले असता ते नाहिसे होऊन त्याचा लाकडी ठोकळा तयार होणे. अशा एकापेक्षा एक जादू बच्चे मंडळींनी अनुभवल्या. या प्रयोगात जादूगार संजय रघुवीर यांच्या सोबत जादूगार रघुराज यांनीही जादूचे प्रयोग सादर केले. जादूगार संजय रघुवीर यांनी तलवारीने माणसांचे दोन तुकडे करून उपस्थित प्रेक्षकांना आश्चर्यचकीत केले. त्याचप्रमाणे भूतांचा नाच अंगावर रोमांच उभा करणारा होता. अनेक भूते आपल्याकडे येत असल्याचा भास यावेळी झाल्याने बच्चेमंडळींनी मोठा आरडाओरडा केला. त्याच प्रमाणे डान्सिंग रुमाल हा प्रयोग देखील बच्चेमंडळींना आकर्षित करणारा होता. मानेतून आरपार काढलेली तलवार प्रेक्षकांना अंगावर रोमांच उभी करणारी होती. मुलाला हवेत तरंगते ठेवून उपस्थितांना चकीत केले. शेवटच्या जादूने तर लहान थोरांना आचंबित केले. जादूगार संजय रघुवीर यांचे सहकारी जादूगार रघुराज यांना एका पेटीत बंद करण्यात आले. चारही बाजूंनी ती पेटी कुलूप बंद करण्यात आली. सर्व बाजूंनी पेटी बंद होऊनही पंटीत बंद असलेले जादूगार रघुराज प्रेक्षकातून अवतरले. यावेळी ज्यांनी स्टेजवर रघुराज यांनी पेटीत बंदीस्त केले ते प्रेक्षक जादूगार रघुराज यांना प्रेक्षागृहात पहातच आवक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३८ विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेजच्या १३८ विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध स्कॉलरशीप योजनांचा लाभ झाला आहे.

कॉलेजच्या पदवी व पदव्युत्तर विभागातील क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत १८ विद्यार्थीनींना नव्वद हजार रुपये, आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत १७ विद्यार्थ्यांना ६९ हजार रुपये, राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशीप योजनेअंतर्गत ८६ विद्यार्थ्यांना १२ लाख १८ हजार रुपये, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशीप योजनेअंतर्गत १७ विद्यार्थ्यांना दोन लाख ६४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारे विविध स्कॉलरशीप योजनेअंतर्गत कॉलेजच्या एकूण १३८ विद्यार्थ्यांना एकूण १६ लाख ४१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहेत.

पुणे विद्यापीठाद्वारे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशीप योजनेची प्रक्रिया कॉलेजात यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी एक समिती गठित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images