Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लोंढेंचा फैसला शनिवारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सातपूर विभागातील धम्मतीर्थ विहाराच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाची चौकशी महापालिका आयुक्तांनी पूर्ण केली असून, येत्या शनिवारी या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर मांडला जाणार आहे. या प्रकरणात नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे नगरसेवक पद जाणार की राहणार हे यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

सातपूर औद्योगिक वसाहतीत आयटीआय पुलाजवळ रस्त्यालगत उभारेल्या धम्मतीर्थ विहारच्या अनाधिकृत बांधकामाविरोधात रतन लथ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर महापालिका आणि पोलिस यंत्रेणेने हे अनधिकृत बांधकाम हटविले. नगरसेवक लोंढे यांनीच हे अनधिकृत बांधकाम उभारल्याचा दावा करीत, लथ यांनी लोंढे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी पुन्हा हायकोर्टात या​चिका दाखल केली होती. अनधिकृत बांधकामप्रकरणी सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला असल्यामुळे या प्रकरणाची दोन महिन्यांत चौकशी करून महासभेला अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने २१ जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान, याचिकाकर्ते लथ यांनी २० फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्तांना कोर्टाच्या आदेशाची प्रत सादर करून लोंढे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याकरीता पुरावे सादर सादर करण्यासाठी आठवड्याभराची मुदत मागितली. या मुदतीनंतर लथ यांनी काही पुरावे सादर केले. त्यानुसार एमआयडीसीने लोंढे यांना पाठविलेल्या पत्रात धम्मतीर्थ विहाराचे अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद आहे.

लोंढे यांच्या लेटरहेडवरही धम्मतीर्थ विहार या अनधिकृत बांधकामाचा पत्ता नमूद आहे. एमआयडीसीच्या सब इंजिनीअरनी लथ यांना माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात लोंढे यांचे संपर्क कार्यालय नासर्डी नदीलगत औद्योगिक क्षेत्राच्या हद्दीत येत असल्याच्या पुराव्याकडे लथ यांनी लक्ष वेधले आहे. लोंढे यांनी देखील २५ मे २०१३ रोजी एमआयडीसीचे एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त, अतिक्रमण उपायुक्त यांना दिलेल्या पत्रात हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची विनंती केली होती. तसेच बांधकाम पाडले जात असताना लोंढे यांच्या मुलाने पोलिस कॉन्स्टेबलवर दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५० कोटींची देयके रखडली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

सिंहस्थ कामांची तब्बल ५० कोटी रुपयांची देयके निधीअभावी रखडली असून ७५ टक्के सिंहस्थ निधी महापालिकेला देण्याच्या सरकारच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. अवघ्या चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावर यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

सिंहस्थ कामासाठी महापालिकेच्या १ हजार ५२ कोटींच्या आराखड्यास राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. यापैकी २०० कोटी रुपयांच्या भूसंपादनाचा खर्च महापालिकेला पेलावा लागला. उर्वरित ८५२ कोटींपैकी केवळ एकतृतीयांश निधीचीच जबाबदारी सुरुवातीला तत्कालीन आघाडी सरकारने घेतली. त्यापैकी २२२ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला वितरित केला. त्यानंतर ७५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ताह महापालिकेला प्राप्त झाला. पंरतु, सिंहस्थ ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसल्याने ९० टक्के निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे महापालिकेने केली. यानंतर, भाजपाचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७५ टक्के निधी देण्याची घोषणा शहरात आल्यानंतर केली. नव्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही झाली. मात्र, प्रत्यक्षात पैसे उपलब्ध झाले नाहीत. सिंहस्थातंर्गत महापालिकेने सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे हाती घेतली आहे. याशिवाय साधुग्राम विकास, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, वाहनतळ व्यवस्थापन आदी कामांसाठी ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या कामे जोमाने सुरू असली तरी ठेकेदाराची देयके रखडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यापूर्वी मिळालेला सर्व निधी खर्च झाला आहे.

रखडलेल्या देयकांमध्ये बांधकाम विभागाशी संबंधित सुमारे ३० कोटी रुपयांची बिले आहेत. तर उर्वरित सुमारे २० कोटींची देयके अन्य विभागाशी संबंधित आहेत. निधीअभावी बांधकाम विभागाची १५ कोटी रुपयांची देयके लेखा विभागाने परत पाठविली आहेत. मे २०१५ पर्यंत सिंहस्थ कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेला मुदत देण्यात आली असून बिलांचे पैसेच मिळाले नाही तर कामे पूर्णत्वास कशी न्यायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जातो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरीही तहसीलदार कामावर!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधीमंडळात कारवाईची घोषणा झालेल्या तहसीलदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. विधिमंडळापर्यंत चुकीची माहिती पोहोचविण्यात आल्याचा दावा तहसीलदारांनी केला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून द्यावा असे साकडे घालण्यात आले आहे. कारवाईची घोषणा झाली असली तरी तसा आदेश सोमवारी प्राप्त न झाल्याने तहसीलदारांनी काम सुरूच ठेवले आहे.

सुरगाणा येथील पाच कोटींहून अधिक किमतीच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी जिल्हापुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह तब्बल १६ जणांच्या निलंबनाची घोषणा गुरुवारी (दि. ९) विधीमंडळातून करण्यात आली. त्यामध्ये पुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील सात तहसीलदारांचाही समावेश आहे. या तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात पुरेसे धान्य प्राप्त होत नव्हते. त्याची माहिती दडवून ठेवीत घोटाळ्याला प्रोत्साहन दिल्याचा ठपका तहसीलदारांवर ठेवण्यात आला आहे. कारवाईची गुरुवारी घोषणा झाली. शुक्रवारी संबंधित तहसीलदार अन्न व पुरवठा मंत्र्यांसह, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी सरकारी सुटीमुळे ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटू शकले नाहीत. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ते सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई व्हावी. मात्र, या प्रकरणाशी संबंधच नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अन्यायकारक असल्याची कैफियत कुशवाह यांच्याकडे मांडण्यात आली.

सुरगाणा धान्य घोटाळ्याशी संबंधित अहवाल जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आले. या अहवालाव्यतिरिक्त चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्याचा तहसीलदारांचा दावा आहे. आम्ही सरकारदरबारी गाऱ्हाणे मांडले आहे. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करा असे साकडे जिल्हाधिकाऱ्यांना घालण्यात आले.

कारवाईची घोषणा झाली तेव्हापासून तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटले नव्हते. या सर्व प्रकरणाविषयीचे त्यांचे म्हणणे मांडण्यात आले. दोषींवर निश्चित कारवाई व्हावी; मात्र चोर सोडून सन्याशांना फाशी देऊ नये अशी आमची मागणी आहे. - बाळासाहेब वाघचौरे सचिव, राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना

पुरवठा अधिकाऱ्यासह पाच जण निलंबित

सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी सरकारने जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह पुरवठा विभागाच्या पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश अखेर दिले. आदेश सोमवारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी दिली. तहसीलदारांच्या निलंबनाची घोषणा झाली असली तरी आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे अभय मिळणार की कारवाई होणार अशी धाकधूक वाढली आहे. सुरगाणा येथे उघडकीस आलेले पाच कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचे प्रकरण विधीमंडळातही चांगलेच गाजले. या प्रकरणाची दखल घेऊन अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सात तहसीलदारांसह १६ जणांच्या निलंबनाची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे आदेश प्राप्त न झाले नव्हते. सोमवारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ, प्रभारी सहायक पुरवठा अधिकारी रवींद्र सायंकर यांच्यासह पाच जणांच्या निलंबनाचे आदेश काढले. त्यामध्ये अव्वल कारकून आर. एम. त्रिभूवन, अश्विनी खर्डे यांच्यासह लिपिक लता चामनार यांचा समावेश आहे. जवंजाळ यांना औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांच्या तर सायंकर यांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यात येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. तहसिलदारांच्या निलंबनाचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. मात्र, पुरवठा विभागाचे आदेश निघाल्यामुळे तहसीलदारांची धाकधूक वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले यांच्या पुतळ्यांची दुरवस्था

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात विविध ठिकाणी असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. या पुतळ्यांचे सुशोभिकरण करून तेथे वीज व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महात्मा फुले समाज विकास संस्थेने केली आहे.

जुन्या नाशिकमधील महालक्ष्मी चाळीमागे पोलिस चौकीजवळ असलेला महात्मा फुले यांचा पुतळा धुळीने माखला गेला आहे. भद्रकाली परिसरातील फुले मार्केटच्या दर्शनी भागीसुद्धा पुतळा आहे. मात्र, या पुतळ्यापर्यंत सहजतेने जाता येत नाही. त्यामुळे या पुतळ्याची स्वच्छता केली जाऊ शकत नाही. गणेशवाडीतील मारुती मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या फुले पुतळ्याभोवती सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांसाठी महात्मा फुले यांनी काम केले. मात्र, त्यांच्या पुतळ्यांची शहरातील दुरवस्था निंदनीय आहे. महापालिकेने या प्रश्नी त्वरित लक्ष घालून पुतळ्यांची दयनीय अवस्था दूर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

मुंबई नाका येथील सर्कलवर महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा महापालिकेने २००४ मध्ये ठराव केला होता. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही नाही. मुंबई नाका सर्कलवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात यावा. तसेच फुले दांपत्याच्या स्मारकासाठी महापालिकेने स्वतंत्र भूखंड द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाजीराव तिडके, राजेंद्र गाडेकर, रमेश शेवाळे, विनायक माळी आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारतात २०२० मध्ये सर्वाधिक हृदयरोगी’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

भारतीय उपखंडातील लोकांचे जीन्स हृदयरोगाला अनुकूल आहेत. यामुळे तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे भारतात २०२० साली जगातील सर्वात जास्त हृदयरोगी असतील. अन्य कोणत्याही रोगापेक्षा हृदयरोगाच्या बळींची संख्या जास्त आहे. योग्य आहार, विहार आणि जीवनशैली ठेवल्यास परिस्थिती बदलू शकेल, असे प्रतिपादन डॉ. सुनील डोर्ले यांनी आज केले.

पिंपळगाव येथील के. के. वाघ महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे सोमवारपासून व्याख्यानमाला सुरू झाली. खोपोलीतील माधवबाग कार्डियाक सेंटरचे डॉ. डेर्ले यांनी पहिले पुष्प गुंफले. उपप्राचार्य डी. डब्लू. शेळके, डॉ. मानव डांगे, डॉ. स्मिता देवरे व्यासपीठावर होते. प्रा. ज्ञानेश्वर ढगे यांनी स्वागत केले.

डॉ. डेर्ले म्हणाले, की रक्तात साखर वाढल्यास रक्ताची घनता आणि चिवटपणा वाढून हृदयावर ताण येतो. वजन वाढल्याने नवीन पेशी व वाहिन्या तयार होतात. त्यांना रक्त पुरवठ्याचा अतिरिक्त ताण हृदयावर येतो. यामुळे रक्ताच्या गुठळी तयार होऊन हृदयविकार होतो. योग्य आहार-विहार, नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा, सकारात्मक विचार, तणावावर नियंत्रण यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढून हृदयविकार टाळता येतो. प्रा. प्रमिला कुटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबई वॉर्डची दुर्दशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महापालिका हद्दीतील 'दुबई वॉर्ड' म्हणून प्रभाग २६ मधील खडकाळी परिसर ओळखला जातो. अवैध धंद्दाचे माहेरघर म्हणून नेहमीच चर्चेत असलेल्या या भागात मद्दपी, जुगारी व व्यसनधारी लोकांबरोबरच चोरट्यांचा मुक्त वावर असतो. विविध सुविधांचा अभाव असलेल्या आणि दुर्दशेच्या फेऱ्यात अडकलेल्या या परिसरातील नागरिकांना या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची समस्या भेडसावते आहे.

मुस्लिम बहुल प्रभागातून शिवसेनेच्या एका उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढवून उपमहापौरपदावरून थेट महापौरपदी विराजमान होण्याची किमया घडविली. शिवाय या प्रभागातून निवडून गेलेले तीन नगरसेवकांनी प्रभाग समितीचे सभापतीपदाची गवसणीही घातली आहे. विविध सत्तापदे मिळविणाऱ्या खडकाळी परिसराला मात्र विकासाचा स्पर्श होऊ शकलेला नाही.

खडकाळीच्या महापालिका सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयाचे ड्रेनेज वारंवार चोकअप होत असल्याने प्रत्येक आठवड्याला दुर्गंधीयुक्त मैला नागरिकांच्या घरात व भर मुख्य रस्त्यावर वाहून येत असल्याची नागरिकांची प्रमुख तक्रार आहे. या भागात मांसविक्रीची अनेक दुकाने आहेत. रस्त्यालगत असलेल्या या दुकानांमुळे वाहतुकीस रस्ता अरुंद पडतो. शिवाय चिकन विक्रेत्यांकडून निरुपयोगी व सडलेले मांस मोकळ्या जागेवर भर रस्त्यावर फेकून दिले जाते. उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या या मांसामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरते.

कॅमेरे बसविणार

महापालिकेकडून सार्वजनिक शौचालयाची नेहमी दुरुस्ती केली जाते. आता बीओटी तत्वावर देखभाल करण्याचे प्रस्ताव दिले आहे, असे नगरसेविका समिना शोएब मेमन यांनी सांगितले. दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्याचे नियोजन आहे. चिकन विक्रेते व हाटेल व्यवसायिकांना त्यांच्याकडील ड्रममध्ये कचरा जमा करून घंटागाडीत टाकण्याची सूचना देण्यात आली आहे. मोकळ्या जागेवर निरुपयोगी, सडलेले मांस फेकण्याची समस्या आहे. ती सोडविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून रस्त्यावर वाहून येणाऱ्या सांडपाण्याचा प्रचंड त्रास होतो. पाणीटंचाई आहे ती तातडीने दूर करण्याची गरज आहे. - युनूस इस्माईल पठाण, रहिवाशी

गैबनशाह नगरमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. तसेच येथेही मोठ्या प्रमाणावर कचरा फेकण्यात येतो. सांडपाणी व दुर्गंधीयुक्त कचरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. - जर्रार रहेमान खान, रहिवाशी

घुसखोरी

महात्मा फुले मार्केटमध्ये भाजी विक्रते न बसता मार्केटच्या बाहेर व्यवसाय करतात. त्यामुळे पूर्वीच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. शालिमार सिग्नलकडून रसूलबाग दफनभूमीशेजारील त्र्यंबक रस्त्यापर्यंत विविध व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या मुख्य रस्त्यावरून देखील मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे. खडकाळीतील काही भागाचा आता काही वर्षात मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यास सुरुवात झाली. मात्र, उंचावर घर असलेल्या गैबनशाह नगरमधील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे विजेच्या मोटारी लावूनही नळांना पाणीच येत नाही, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. घंटाघाडीची अनियमतेमुळे कचरा व अस्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. परिसरात नव्याने झालेले हॉटेल्ससमोरच ग्राहकांची गर्दी तसेच रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीची डोकेदुखी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, दिंडोरी

दिंडोरी पोलिस पाटील संघटनेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी विविध मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष चिंतामण पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नायब तहसीलदार मोहन कनोजे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तालुकाध्यक्ष चिंतामण पाटील म्हणाले की, पोलिस पाटील हा समाजाच्या हित रक्षणासाठी सदैव उपस्थित राहून काम करतो. त्याला त्याचा मोबदला दिला गेला पाहिजे. त्यासाठी शासनाने त्याच्या मानधनात वाढ केली पाहिजे. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देत पोलिस पाटील संघटनेच्या मागण्या शासनाने मान्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे सांगितले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सुरेश देशमुख, पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ मुळाणे, सुभास शिवले, परशराम डमाळे आदींसह तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.

पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करावी.

पोलिस पाटलांना प्रशिक्षण मिळावे.

सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी.

रिक्त पदे त्वरित भरावी.

मुलांना शैक्षणिक सवलती मिळाव्या.

वारसांना पोलिस पाटीलपदी नियुक्ती मिळावी.

सरकारकडून विमा काढण्यात यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यात सुरक्षेला प्राधान्य

$
0
0

कुंभमेळ्याचे नियोजन आणि गुन्हेगारांवर वचक असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दोन्ही कामे वेगळी असल्याचे स्पष्ट करीत नाशिककरांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कुंभमेळ्याची कामे, वाढती गुन्ह्यांची संख्या तसेच गुन्हेगारांवर वचक अशा प्रमुख मुद्द्यांबाबत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी केलेली बातचीत.

सीसीटीव्ही बसवण्याचा मुद्दा बराच गाजतो आहे? या कामाची सद्यस्थिती काय आहे?

- मागील दहा ते बारा दिवसात सीसीटीव्हीसह कुंभमेळ्याशी निगडीत सर्वच प्रकराच्या कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्याचे नियोजन ही खूप मोठी बाब आहे. शाही मार्ग, इनर पार्किंग, आऊटर पार्किंग, सर्व बस स्टॅण्ड, पादचारी मार्ग, बॅरकेडिंग अशा अनेक कामांचा त्यात समावेश आहे. सीसीटीव्ही बसवण्याचे काम हा त्यातील एक भाग आहे. आजवर झालेले काम खूपच चांगले असून, मी त्यावर समाधानी आहे. आता हे काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सीसीटीव्हीबाबत आजवर मिळालेल्या आदेशानुसार काम सुरू आहे. ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्याचे काम आज, सोमवारी संध्याकाळपर्यंत पार पडेल. तसेच संबंधित ठेकेदाराने प्राथमिक काम देखील सुरू केले आहे. लवकरच सीसीटीव्ही बसतील.

कुंभमेळ्याच्या मायक्रो प्लॅनिंगचे काम कुठपर्यंत आले आहे?

- कुंभमेळ्याशी संबंधित अनेक कामे इतर विभाग पूर्ण करीत आहेत. यात रस्ते, रस्ते रूंदीकरण, घाट, अतिक्रमण अशा अनेक कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर लागेच आमचे मायक्रो प्लॅनिंग सुरू होईल. यात बंदोबस्त, नाकाबंदी, पोलिसांच्या संख्येनुसार कामाच्या जबाबदारीचे वाटप अशा बाबींचा समावेश असतो. कुंभमेळ्याशी सध्या निगडीत तसेच यापूर्वी कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञ मंडळींशी संवाद साधतो आहे. चर्चेतून ज्या सकारात्मक बाबी समोर येतात, त्यांचा समावेश नियोजनात केला जातो आहे. साधारणतः ३० जून ही आम्ही आमची डेटलाईन मानतो. यानंतर आम्ही मायक्रो प्लॅनिंगचे काम थेट सुरू करू.

सीबीआयमध्ये आर्थिक गुन्हे तसेच बँक घोटाळ्यावर खूप काम केले. त्याचा शहराच्या दृष्टीने काय फायदा होऊ शकतो?

- आर्थिक गुन्ह्यांचा तपास, याविषयावर खूप वर्षे काम झाले. अर्थात सीबीआयकडे येणाऱ्या केसेस व शहरातील आर्थिक गुन्हे यांच्यात व्याप्तीच्या दृष्टीने फरक आहे. तरीही आर्थिक शाखा आणखी प्रबळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तपासाची पध्दत, कागदपत्रांची जुळवाजुळव, गुन्हा सिध्द होण्यासाठी लागणारे पुरावे याविषयी संबंधितांना सुचना केल्या आहेत. त्याचा निश्च‌ितच फायदा होऊ शकेल.

कुंभमेळ्याच्या कामामुळे क्राईम रेट वाढतो आहे काय?

- नाही. कुंभमेळा आणि गुन्हेगारी ही दोन वेगवेगळी कामे आहेत. क्राईम रेट वाढण्यामागे कुंभमेळ्याचे नियोजन कारणीभूत असल्याची टिका अनाठायी आहे. याबाबत मी सर्व अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. कुंभमेळा ही या शहराची ओळख आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे नियोजन करताना नाशिककरांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता पोलिस घेतील. कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन आणि गुन्हेगारावर वचक असे दुहेरी काम पोलिस निश्च‌ितच पार पाडत आहेत.

पण, गुन्हे तर वाढतच चालले आहे?

- गत वर्षाच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत किंच‌ित वाढ झाल्याचे दिसते. पण, त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. या महिन्यात खूनाच्या तीन घटना घडल्यात. त्यातील दोन प्रकरणातील संशयित ताब्यात घेण्यात आले असून, मोहिते खून प्रकरणातील आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ. गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या प्रतिबंधात्मक उपायोजना कमी पडत आहे काय?

- सध्या, खून व खुनाचे प्रयत्न या वर्गातील गुन्ह्यांची संख्या गत वर्षीच्या तुलनेत वाढलेल्या दिसतात. यामुळे कोम्बिंग, रात्रीची गस्त, मिशन ऑलआऊट, नाकाबंदी प्रभावीपणे राबवण्याचे नियोजन केले जाते आहे. छोट्या-छोट्या टोळ्यातील समाजकंटकांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील. मुंबई पोलिस अॅक्टनुसार टवाळखोरांवर कारवाई तर सराईत गुन्हेगारांविरूध्द तडीपारी, एमपीडीए कायद्यानुसार कारवाई अशा उपाययोजना राबवल्या जातील. रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढवली जाईल.

(शब्दांकन- अरविंद जाधव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नासाची रॅली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट असोसिएशनतर्फे १९ एप्रिलला दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेळ-वेग-अंतर पध्दतीच्या फॅमिली नेव्ह‌िगेशन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीला ड्रम स्टीक लगूनचे प्रायोजकत्व लाभले असून, स्पर्धेचे आयोजन भारत सरकारच्या मान्यताप्राप्त एफ एम. एस. सी. आय. (भारतीय मोटार वाहन क्रीडा संघ) च्या मान्यतेन व महासंघाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार होणार आहेत.

स्पर्धेच्या निमित्ताने नाशिक शहराच्या १०० कि.मी. अंतरात खेळाडूंची कसब पणाला लागणार असून, स्पर्धेचा शुभारंभ गंगापूर रोडच्या सौभाग्यनगरमधील सी. के. क्रिएशन येथून होणार आहे. स्पर्धेचा समारोप त्र्यंबक वाडीवऱ्हे रस्त्यावरील शेवगे डांग येथील ड्रम स्टीक लगून येथे होणार आहे. वेगाने साहसीपणे भररस्त्यवर गाड्या चालवण्याचे प्रकार सर्रास पहायला मिळतात; परंतु जबाबदारीने वाहन चालवण्याची वृत्ती रुजविणे नियमानुसार वाहन चालवण्याच प्रोत्साहन देणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका www.crazycoder.in/dlr ऑनलाइन पध्दतीने करता येईल.

वर्दळीच्या मार्गावर रॅली होणार असली तरी कुठल्याही टप्प्यात स्पर्धाकाचा सरासरी वेग ताशी ४५ किमी पेक्षा अधिक असणार नाही. स्पर्धकांना एक मिन‌िट आणि मिळालेल्या रोड बुकच्या आधारे वाहतुकीच्या व स्पर्धेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन नियोज‌ित वेळेच्या आत वेगवेगळे टप्पे पार करणे बंधनकारक असणार आहे. यात प्रेक्षकांना रॅलीचा खरा रोमांच अनुभवता येणार आहे. सहभागी स्पर्धाकांच्या वाहनांची व कागदपत्रांची तपासणी शनिवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रचना लॉन्स सावरकरनगर गंगापूर रोड येथे होणार असून, स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी संध्याकाळी शेवगे डांग येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिघडले नाशिककरांचे आरोग्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्षणार्धात ऊन तर क्षणार्धात ढगाळलेले वातावरण आणि अचानक सुरू होणारा पाऊस असा प्रकार गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलांमुळे नाशिककरांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खराब हवामानामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये पेशंटच्या संख्येत वाढ झाली आहे.

काही दिवस कडकडीत उन्हाळ्याचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या अठवड्याभरापासून मात्र नाशिककरांना संमिश्र वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. अचानक आकाशात जमा होणारे ढग, संध्याकाळी येणारा पाऊस अशा हवामानाच्या लहरीपणाने नाशिककरांच्या आरोग्य समस्यांना जणू खतपाणीच घातले आहे. पावसाळी वातावरण असले तरी उकाड्यात मात्र कोणताही फरक झालेला नाही. त्यामुळे या संमिश्र हवामानामुळे नाशिककरांना दवाखान्यांमध्ये धाव घ्यावी लागत आहे.

हवामान बदलामुळे कोरड्या सर्दीच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच, ताप आणि डोकेदुखीच्या तक्रारी नागरिक करत आहेत. उन्हाळ्याप्रमाणे आहार तसेच विहारामध्ये बदल केलेला असला तरी केवळ हवामान बदलामुळे या आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. या हवामानाचा परिणाम फळे तसेच भाजी पाल्यावरही होत असल्याने याबाबत योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत.

वातावरण बदल तर आपण टाळू शकत नाही. पण या कालावधीमध्ये जर आपल्याला आजार टाळायचे असतील तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. - डॉ. के. डी. बुवा, वैद्य

बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊनच आपल्याला आजार आटोक्यात आणता येतील. यासाठी ताजं आणि गरम अन्न सेवन करावं. उकळून गार केलेलं पाणी प्यायला हवं. उन्हाळा म्हणून आइस्क्रिम, कोल्डड्रिंक असे थंड पदार्थ सेवन न करता फलाहारावर भर द्यावा. तसेच दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवे. - डॉ. अनुप गवांदे, होमिओपॅथिक कन्सल्टंट

अशा वातावरणामध्ये बाहेरचे खाद्य पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला हवे. तसेच गाडीवरुन बाहेर फिरताना नाकावर रुमाल बांधणे गरजेचे आहे. आजारपणाची कोणतीही लक्षणे दिसली तर आजार अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. - डॉ. विनोद गुजराथी, आयुर्वेद तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेची समीकरणे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल तयार होत असतांनाच गेली चाळीस वर्षे या बँकेवर वर्चस्व ठेवणारे सहकारमहर्षी उत्तमराव ढिकले यांच्या आकस्मिक निधनाने सारीच समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. सुनील ढिकले यांनी आता या गटाचे नेतृत्व करावे असा सूर व्यक्त होत आहे. तसे झाल्यास जिल्हा बँकेत किमान तीन पॅनल रिंगणात उतरतील, असे दिसते. राज्यातील राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीनिशी या निवडणुकीत उतरण्याची शक्यता दिसते आहे.

नव्या नियमांच्या आधारे होत असलेल्या या निवडणुकीमुळे बँकेतील संचालकपदाच्या तब्बल आठ जागा कमी झाल्याने अनेक दिग्गजांची पंचाईत झाली आहे. बँकेची मतदार यादी नुकतीच जाहीर झाली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू असतांनाच अॅड. उत्तमराल ढिकले यांचे निधन झाल्याने त्यांच्या भरवशावर असणारे जिल्हाभरातील असंख्य कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आधीच आठ जागा कमी झाल्याने पूर्वापार त्या गटातून निवडून येणाऱ्यांना नवा गट शोधणे व त्यासाठी सर्व तयारी करणे जिकीरीचे ठरले होते. त्यातच नेत्याच्या निधनाने तर ही मंडळी हबकली आहे. त्यामुळेच ढिकलेंच्या घरी सांत्वनाला जातांनाच ही मंडळी त्यांचे पुत्र डॉ. सुनील ढिकले यांना नेतृत्व करण्याची गळ घालत आहेत. डॉ. ढिकले हे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेलावे असा आग्रह समर्थकांकडून धरला जात आहे. बँकेत २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी तालुका गटाच्या १५ जागा या पॅनलचा भाग नसतात. प्रत्येक जण आपापल्या वकूबाप्रमाणे लढतात व निवडून येतात. नंतर मात्र पदाधिकारी निवडतांना या संचालकांना महत्त्व येते. ही मंडळी कोणत्या ना कोणत्या नेत्याशी संलग्न असतातच, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत ते कोणत्याही पॅनलमध्ये नसले तरी जिल्हा नेत्यांचा त्यांना आशीर्वाद असतोच.

यंदाच्या निवडणुकीत बँकेत माणिकराव कोकाटे व राजेन्द्र भोसले यांचे एक पॅनल असणार आहे. याशिवाय प्रशांत हिरे व अद्वय हिरे यांचेही पॅनल राहू शकेल. यापार्श्वभूमीवर ढिकले गट काय करणार हा प्रश्न चर्चिला जात आहे. डॉ. सुनील ढिकले यांनी अद्याप याबाबत काहीही ठरविले नसले तरी कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचे समजते. ढिकलेंच्या आकस्मिक एक्झिटमुळे आता त्यांचे बँकेतील विरोधक काय पवित्रा घेतात याकडेही सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. राज्यातील स्थित्यंतरामुळेदेखील बँकेच्या राजकारणात बरेच बदल संभवत आहेत. माजी आमदार माणिकराव कोकाटे हे आता भाजपात गेले असल्याने त्यांनी भाजपाचीच मोट बांधण्याचे ठरविल्यास नवल नाही. त्यांच्याबरोबरच भाजपवासी झालेले मनसेचे माजी आमदार वसंत गिते, भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, राजेन्द्र डोखळे, नरेन्द्र दराडे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय तालुका गटातील काही भाजपची मंडळीही सोबत आल्यास बँकेवर भाजपचा झेंडा फडकावून शासनाकडून

काही पदरात पाडून घेता येईल, असाही कयास आहे. हिरे कंपनीही सध्या भाजपमध्येच आहे. मात्र त्यांचा सध्यातरी कोणत्याच गटाशी संबंध नाही व बँकेच्या राजकारणात ते कोकाटे गटाच्या विरोधात असल्याने नेमकी काय गणिते जमतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे साहजिकच शिवसेनाही या निवडणुकीत काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल कदम व माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड हे प्रमुख नेते बँकेच्या राजकारणात सक्रिय असले तरी गेल्या टर्ममध्ये ते एकमेकांच्या विरोधी गटात होते. आ. कदम हे यंदा सौभाग्यवतींऐवजी स्वतःच नशीब आजमावणार असून, ते ढिकले गट त्यागणार नाहीत अशी चर्चा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील ही बँक यंदा प्रथमच या दोन्ही पक्षांच्या चर्चेविना निवडणुकीला सामोरी जात आहे. या पक्षांना प्रथमच भाजप वा शिवसेना या पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल अशी चिन्हे आजतरी दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुकणे’चे मूल्यांकन २४५ कोटीच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

मुकणे योजनेतील तांत्रिक दोषांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधल्यानंतर अडचणीत आलेल्या मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेच्या २४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तांत्रिक मूल्यांकन प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्र) विभागाने अटींवर मंजुरी दिली आहे. खडक फोडण्यासाठी व भरावाकरीता महापालिकेने अतिरिक्त किंमत धरली असल्याचा ठपका ठेवत, विल्होळी येथील प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्राची जागा बदलण्याची सूचनाही मजीप्रच्या वतीने करण्यात आली आहे.

या प्रस्तावाकरिता महापलिकेने घेतलेल्या २९३ कोटी ९९ लाख रुपयांच्या तांत्रिक मंजुरीत आणि मजीप्रने अटींवर मंजूर केलेल्या प्रस्तावात तब्बल ४८ कोटी रुपयांची तफावत असल्याने महापालिकेचे काही अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शहरातील २०४१ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येकरिता वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अनियानांतर्गत २२० कोटी रूपये खर्चाच्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजेनेला केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. महापालिकेने यासाठी निविदाही मागविल्या असून, एल अॅण्ड टी कंपनीची २६९ कोटी रुपयांची सर्वात कमी दराची निविदा आहे. महापालिकेने निविदा मागविण्यापूर्वी केंद्र सरकारमार्फत मंजूर केलेल्या प्रकल्पात काही तांत्रिक बदल केले. तसेच, या कामाच्या २९३ कोटी ९९ लाख रूपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. या तांत्रिक बदलास व या कामाकरिता होणाऱ्या जादा खर्चास प्रशासनाने मंजुरी घेतलेली नाही.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप व आमदार देवयानी फरांदे यांनी या तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधत प्रकल्प किंमतीवर आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी या योजनेचा प्रस्ताव तांत्रिक मूल्यांकनाकरिता महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडे पाठवला होता. मजीप्रचे चीफ इंजिनीअर डॉ. हेमंत लांडगे यांनी प्रस्तावातील तांत्रिक दोषांकडे लक्ष वेधत २४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तांत्रिक मूल्यांकनाच्या प्रस्तावास अटींच्या आधिनराहून मंजुरी दिली आहे. या कामाच्या तांत्रिक बदलास व जादा खर्चास महापालिकेने नियमानुसार मंजूरी घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण सुचनाही लांडगे यांनी केली आहे. या कामासाठी ठेकेदाराने सविस्तर संकल्पना व आराखडे सादर करून संपूर्ण काम यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या अटीवर देकार सादर करणे अपेक्षित होते. मात्र, असा काही दस्तावेज सादर न करताच केवळ महापालिकेने सादर केलेल्या दस्तावेजाच्या आधारे आवश्यक त्या दुरुस्त्या करून तांत्रिक मूल्यांकन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांना सिंहस्थाचे निमंत्रण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहीत संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह विविध मंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांना ध्वजारोहणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण पुरोहीत संघाच्या शिष्टमंडळातर्फे मुंबईत विधीमंडळात जाऊन देण्यात आले.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आरंभनिमित्त मंगळवार १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी रामतीर्थ पंचवटी नाशिक येथे विविध आखाड्याचे प्रमुख महंत, साधू, बैरागी, पुरोहीत संघाचे पदाधिकारी व नेते मंडळींच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन सिंहस्थ कुंभास सुरुवात होणार आहे. ही माहीती मुख्यमंत्री व निमंत्रितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोवंश हत्या बंदी कायदा पारित केल्याबद्दल पुरोहीत संघातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच गोवंशांचे पालन करण्याची जबाबदारी पुरोहीत संघ घेईल, त्यासाठी शासनाने जागा व निधी उपलपब्ध करून द्यावा, अशी विनंती पुरोहीत संघातर्फे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सर्व पक्षीय आमदार यांना निमंत्रण देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिस होणार सक्षम

$
0
0


अरविंद जाधव, ना​शिक

मुंबई वाहतूक पोलिसांच्या धर्तीवर शहर वाहतूक पोलिस विभाग सक्षम व आधुनिक करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी ही माहिती दिली आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे दोन महत्वाचे टप्पे असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरात सर्वत्र रस्त्यांचे रूंदीकरण तसेच नवीन रस्त्याची निर्मिती होत असली तरी वाहतूक कोंडी व त्याअनुषगांने उद्भवणाऱ्या समस्यांना वाहनचालकांना नित्याने समोरे जावे लागते. त्यातच वाहतूक पोलिसांची कमी संख्या व वाहनचालकांचे नियमांकडे सर्रास होणारे दुर्लक्ष यामुळे वाहतूक शिस्तीचे तीन तेरा वाजत आहे. सध्या शहर पोलिसांकडे १८५ कर्मचारी आहेत. वाहतूक विभागासाठी २८४ मंजूर पदे असून किमान १०० कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा भार इतरांवर पडत आहे. त्यातच आजारपणाची रजा, विनंती रजा तसेच साप्ताहिक सुट्टीचा ताण वाढत आहे. उपब्लध कर्मचाऱ्यांकडून दोन शिफ्टमधून काम करून घेतले जाते. वाहतूक विभागासाठी ११ पोलिस निरीक्षकांचे पदे मंजूर असताना अवघे चार अधिकारी उपलब्ध आहेत. तर, सहायक पोलिस अधिकाऱ्यांच्या नऊ मंजूर पदांपैकी अवघे दोन अधिकारी कार्यरत आहेत. याबरोबर पोलिस उपनिरीक्षकांची संख्या देखील कमी आहे. उपनिरीक्षकांच्या ११ मंजूर पदांपैकी दोघे कर्मचारी उपब्लध असून, यामुळे कामाचा ताण प्रचंड असल्याचे वाहतूक पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले. चालू वर्षात ८ एप्रिलपर्यंत तब्बल २८ हजार ७२५ वाहनचालकांवर वि​विध कलमानुसार कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वात जास्त म्हणजे ६ हजार २९३ वाहनचालकांकडे वाहनांची कागदपत्रे आढळून आली नाहीत. तर ५ हजार २४० वाहनचालकांकडे परवाने नव्हते. वाहतूक सिग्नल तोडणे तसेच नो एंट्रीत घुसणे यामुळे ५ हजार २३० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई झाली. याबाबत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना विचारणा केली असता त्यांनी वाहतूक पोलिसांच्या कमी संख्येत वाढ करण्याचे संकेत दिले. वाहनांची संख्या महिन्यागणिक वाढत आहे. रस्त्यावर प्रमाणापेक्षा जास्त वाहने असतील तर, त्याअनुषंगाने त्यांचे नियमन होणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडले ‘हस्तांतरण’

$
0
0

खडसेंनी केली घाई तरी नोटिफिकेशनची दिरंगाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलगा, मुलगी, सून तसेच विधवा सून, नातू आणि नात यांच्या नावे, घर, फ्लॅट अथवा शेतजमीन अशी संपत्ती हस्तांतरण करण्यासाठी यापुढे मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) माफी देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केली असली तरी अद्याप त्यावर सरकारने नोटिफिकेशनच न काढल्याने अशा मालमत्तांचे हस्तांतरण रखडले आहे.

रक्ताच्या नात्यात संपत्ती हस्तांतरण करण्यासाठी याआधी रेडिरेकनरच्या दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागत असे; परंतु शेतजमीन, गावचे घर किंवा शहरातील फ्लॅट आदी संपत्तीचे हस्तांतरण करण्यासाठी आता मुद्रांक शुल्क माफी करण्यात आली आहे. त्याबाबतचे विधेयक महसूलमंत्री खडसे यांनी विधानसभेत मांडले. तसेच ते संमतही करण्यात आले. मुलगा, मुलगी, सून किंवा विधवा सून, नातू आणि नात यांच्या नावावर संपत्तीचे हस्तांतरण करण्यासाठी आता मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. तसेच संपत्तीच्या हस्तांतरणासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी दिली जाते. वडिलांचे भाऊ हे वारसा संपत्तीचे वारसदार असणार नाहीत. मुलगा, सून या व्याख्येत ​विधवा सून, नात आणि नातू यांचा वारस म्हणून समावेश करण्यात आला असून, मुलीलाही वारस समजले जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

अजुनही मुद्रांकाचा भार

मुद्रांक नोंदणी कार्यालयामध्ये अशी नातेवाईकांमध्ये हस्तांतरणाची अनेक प्रकरणे येत असतात. मात्र, सध्या या निर्णयाचे नोटिफिकेशन न निघाल्याने चालू रेडिरेकनरनुसारच मुद्रांक भरावे लागत आहेत. ज्यांना या निर्णयाची माहिती आहे, अशांनी आपले हस्तांतरण थांबवून ठेवले असून, या निर्णयाची अमलबजावणी होण्याची वाट पाहिली जात आहे.

जवळच्या नात्यात मालमत्ता हस्तांतरणासाठी यापुढे स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, असे महसूल मंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप याबाबत नोटिफिकेशन न आल्याने त्याची अंमलबजावणी रेंगाळली आहे.
- रमेश काळे, मुद्रांक जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू तस्करीला लगाम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई केल्यानंतर त्यांचा आदर्श प्रशासनातील सेनाही घेऊ लागली आहे. रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या २३ गाड्या पकडल्या असून, त्यांच्यावर कारवाई केली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केलेल्या 'वाळूचे वळू' या वृत्त मालिकेनंतर जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसात अनेक वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गत आठवड्यात स्वत: मुंबई आग्रा महामार्गावर उतरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई केली होती. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी बागलाण, चांदवड आणि निफाड येथील तहसीलदारांच्या हद्दीत जाऊन कारवाई करीत असल्याने तेथील प्रशासकीय यंत्रणा ओशाळली आहे. त्यामुळे तहसीलदार तसेच गौण खनिज विभागाची पथके रस्त्यावर उतरून कारवाई करू लागली आहेत. रविवारी सुटीचा दिवस असतानाही जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. अवैध वाळू वाहतूक करणारी २३ वाहने पकडण्यात या पथकांना यश आले आहे. वाळू वाहतुकीबाबतचा अधिकृत एसएमएस प्रशासनाकडून प्राप्त झाला नसतानाही पूर्णत: अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी चार वाहने पकडण्यात आली आहेत. याखेरीज क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सिन्नर तालुक्यातून होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी वाळू माफियांच्या चार आईवा ट्रक तहसीलदार मनोज खैरनार यांनी कारवाई करीत जप्त केल्या. या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रविवारी रात्री तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार पाटील तसेच सर्कल तलाठी यांनी ही कारवाई केली. यामध्ये चार आईवा ट्रक वाळूसह जप्त केल्या आहे. सिन्नर तालुक्यातून दररोज दोनशे ते अडीचशे ट्रकची अवैध वाळूची वाहतूक होत असताना गेल्या सहा महिन्यात प्रथमच कारवाई झाल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहा, पांचाळे, देवपूर मार्गावर ही कारवाई करून ट्रक क्र. एम एच १५ जे के ४४९६, एम एच १५ ए ए ४०४१, एम एच १५ जे के ९४९९, एम एच १५ ४५०९ या तीन ट्रक जप्त करण्यात आल्या आहेत. या ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरली असून, या ट्रकवरील नंबरही अस्पष्ट असल्याने ते दिसत नाही. तर एम एच १५ ४५०९, या ट्रकवर क्रमांकही नीटसा दिसत नाही. एका ट्रकवर पुढील बाजूवर गाडी क्रमांकही टाकलेला नसून मागील क्रमांक अस्पष्ट झालेला आहे. या चार ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत घमासान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचा अंतिम चरण आता सुरू झाला आहे. शहर व जिल्हाध्यक्ष या पदांवरून अंतर्गत चांगलेच घमासान सुरू झाल्याने सत्तेतून बाहेर पडूनही पक्षातील पदांसाठी चाललेली स्पर्धा पाहता नेतेमंडळी मात्र खुश आहेत. शहराध्यक्षपदासाठी पक्षाचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांचे नाव निश्चित झाल्याचे कळते. जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष रवींद्र पगार, दिलीप बनकर व नाना महाले यांच्या नावांवर खल चालू आहे.

गेल्या पंधरवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. महानगरातील सर्व ६१ प्रभाग अध्यक्षांची निवड बिनविरोध झाल्यानंतर विभागीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. तथापि, काही ठिकाणी वाद उत्पन्न झाल्याने ही प्रक्रिया सध्या स्थगित ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. नाशिकरोड विभागीय अध्यक्षपदी मनोहर कोरडे, तर पश्चिमसाठी किशोर शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाली असली तरी पूर्व तसेच सिडकोमध्ये वाद उदभवल्याने सर्वच ठिकाणच्या निवडी स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वमध्ये सलिम शेख यांच्या नावाला स्थानिक नगरसेवकाने विरोध केल्याने चांगलीच वादावादी झाली. सिडकोतही विद्यमान स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांचा आपण देऊ तोच अध्यक्ष करण्याचा हेका असल्याने हा तिढा आता भुजबळांच्या कोर्टात गेला आहे.

शहर अध्यक्षपदासाठी सध्य़ा हॉट फेव्हरीट म्हणून दिलीप खैरे यांचेच नाव पुढे आहे. या जागेसाठी विद्यमान अध्यक्ष अर्जुन टिळे, देवांग जानी, रंजन ठाकरे, संजय खैरनार व छबू नागरे एवढे जण इच्छुक होते. त्यापैकी संजय खैरनार यांची मध्य विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. छबू नागरे हे युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. साहजिकच या दोघांची नावे स्पर्धेतून बाद झाली. रंजन ठाकरे यांचे नाव घेतले गेले, मात्र त्यांनी फारशी उत्सुकता न दाखविल्याने आता खैरे, जानी व टिळे यांचीच नावे राहिली आहेत. खैरे सध्या पक्षाच्या प्रदेश समितीचे चिटणीस असून, पूर्वी पक्षाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. भुजबळांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याने त्यांचीच वर्णी लागणार असे वातावरण आहे. तथापि, आतापावेतो फारसे आग्रही नसलेल्या टिळे यांनाही पक्षातीलच काही लोकांनी बळ दिल्याने ते देखील आता पुढे सरसावले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी प्रारंभी फारशी स्पर्धी नसल्याचे दिसत होते. परंतु, आता माजी आमदार दिलीप बनकर तसेच कादवा साखर कारखान्याचे चेअरमन व माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांनीही दंड थोपटल्याचे कळते. आपल्या कारकिर्दीच्या बळावर आपल्यालाच हे पद मिळावे असा विद्यमान अध्यक्ष अॅड.रवीन्द्र पगार यांचा दावा आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक नाना महाले यांचेही नाव ऐनवेळी पुढे आल्याने या पदाच्या राजकारणालाही रंग चढला आहे. येत्या बुधवारी ही निवडणूक होत असून, त्यासाठी पक्षाचे निरीक्षकही नाशकात दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा घायकुतीला

$
0
0


टीम मटा

अवकाळी पावसाची साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार दिसत नाही. दर महिन्याला अवकाळी पाऊस व गारपीट सुरूच आहे. यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात वादळी वारा, मुसळधार पाऊस व गारपीट सुरू आहे. यामुळे कांदा, द्राक्ष व काही अंशी गव्हाचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे अनेक घरांची छप्परे उडाली असून, वीज कोसळून गाय, बैल, शेळ्या यांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने हैदोस घातला होता. त्याचाच प्रत्यय यावर्षीही येत आहे. गेल्या तीन महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे द्राक्ष, डाळिंब व कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. या महिन्यातही ऊन-पावसाचा खेळ सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

निफाडमध्ये रिपरिप

लासलगावसह निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला होता. लासलगाव, विंचूर, नैताळे, देवगाव, भरवस, कोटमगाव, उगाव, टाकळी, निमगाव, ब्राह्मणगाव, पाचोरे यांसह निफाडच्या गोदाकाठ परिसरातील अनेक गावात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. सध्या परिसरात कांदा काढणीला वेग आला असून, तयार झालेला कांदा शेतांमध्ये पोळ मारून उघड्यावर ठेवला असल्याने अवकाळी पावसामुळे कांद्याची प्रतवारी खराब होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. लाल कांद्याला सरासरी ९०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला किमान ५०० रुपये, कमाल १ हजार ३७५, तर सरासरी १ हजार १२५ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.

कळवणमध्ये गारपीट

कळवण शहर व तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व त्यासोबत गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह दुपारी बारा वाजेनंतर मुसळधार पावसास सुरुवात झाली. सुमारे पंधरा मिनिटे गारपीट सुरू होती. तसेच तीन वाजेपर्यंत ठराविक अंतराने मुसळधार व रिमझिम पाऊस सुरू होता.

तालुक्यात सध्या कांदा काढणी सुरू असून, शेतातून काढलेला कांदा हा खळ्यात उघड्यावर पडलेला असताना अचानक आलेला अवकाळी पावसाने का कांदा पूर्णता भिजला आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने कांदा सडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरमहा होणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटून शेतकरी कोलमडून पडला आहे.

इगतपुरीत नुकसान

इगतपुरी व घोटी शहरासह परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे घोटी मार्केट कमिटीत शेकडो वाहनातून आणलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो, काकडीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तसेच फ्लॉवर, कोबीची पिकेही जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याला अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. इगतपुरी, घोटी, दौंडत, काळुस्ते, वैतरणा, मुंढेगाव या शिवारात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा मारा झाला. अचानक झालेल्या अवकाळी पावसाला सुरुवात करताच सर्वांचीच तारांबळ उडाली. घोटी शहरात बाजारासाठी आलेल्या ग्राहक-विक्रेते-व्यापारी यांची धावपळ उडाली. घोटी बाजारसमिती आवारात भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. कवडीमोल भावाने भाजीपाला द्यावा लागला.

दिंडोरीत शेड कोसळले

दिंडोरी तालुक्यातील विविध भागात पुन्हा जोरदार वादळी बेमोसमी पाऊस झाला असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वणी येथे एका कांदा व्यापाऱ्याचे शेड कोसळून कांदा, चारचाकी गाड्या तसेच शेडचे लाखोंचे नुकसान झाले आहे.तालुक्याच्या पश्चिम भागाकडून वादळवारा मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. काही भागात तुरळक गाराही पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. कांदा भाजीपाला द्राक्ष, गहू आदी पिकांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ झाली.

सिन्नरमध्ये गारपीट

सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, सोमवारी शहर परिसरात दुपारी पाऊण ते एक तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नायगाव, जायगाव, देशवंडी या परिसरात गारपीट झाली. तसेच तालुक्याचा पूर्व भागात वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर पावसाने झोडपले. या अवकाळी पावसामुळे शेतात साठवलेला कांदा भिजला. शहरातील रस्ते जलमय झाले होते. गेल्या दोन दिवसापासून तालुक्याच्या विविध भागात गारांचा पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

नांदगावमध्ये हजेरी

नांदगाव तसेच चांदवड तालुक्याच्या मागे लागलेला अवकाळी पावसाचा ससेमिरा थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने परिसरातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. सोमवारी मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. मात्र वादळ आणि गारपीट नसल्याने बळीराजाने सुटकेचा निःश्वास सोडला. मनमाड नांदगावसह परिसरात अर्धा तास पाऊस झाला. त्याचा कांदा आणि डाळिंबाला फटका बसला.

चांदवडमध्ये रिमझिम

चांदवड परिसरातील वडनेर भैरव, वडाळी भोई भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रिमझिम पाऊस असल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस, गारपिटीचा मारा

$
0
0


टीम मटा

नाशिक जिल्ह्याला वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीने सोमवारी पुन्हा एकदा झोडपून काढले. या नव्या आपत्तीने उरलासुरला कांदा, द्राक्ष, गहू तसेच आंब्याचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील शिंगवेR येथे वीज कोसळून वीज भट्टीवर काम करणारा मजूर ठार झाला. शहर व परिसरातही दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

निफाड तालुक्यात लासलगावसह बहुतांश भागात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विंचूर, नैताळे, देवगाव, भरवस, कोटमगाव, उगाव, टाकळी, निमगाव, ब्राह्मणगाव, पाचोरे यांसह निफाडच्या गोदाकाठ परिसरातील गावांना फटका बसला. कळवण शहर व तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व त्यासोबत गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

इगतपुरी व घोटी शहरासह परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे घोटी मार्केट कमिटीत शेकडो वाहनातून आणलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो, काकडीच्या बागा उदध्वस्त झाल्या. फ्लॉवर, कोबीची पिकेही जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याला अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. इगतपुरी, घोटी, दौंडत, काळुस्ते, वैतरणा, मुंढेगाव या शिवारात अवकाळी पावसाचा मारा झाला.

वणी येथे एका कांदा व्यापाऱ्याचे शेड कोसळून कांदा, चारचाकी गाड्या तसेच शेडचे लाखोंचे नुकसान झाले. काही भागात तुरळक गाराही पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. दिंडोरी बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची धावपळ झाली. सिन्नर तालुक्यात पाऊण ते एक तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नायगाव, जायगाव, देशवंडी या परिसरात गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतात साठवलेला कांदा भिजला. नांदगाव तसेच चांदवड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

११ व १२ एप्रिलला पाच तालुक्यांत सर्वाधिक पाऊस

१,०५६ हेक्टर क्षेत्र बाधित

१,१२३ शेतकऱ्यांचे नुकसान

नांदगावात ७५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मालेगावात २०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

१५३ कोंबड्या मृत्यूमुखी, १७४ घरांचे नुकसान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबासाहेबांचा ठेवा अडगळीत

$
0
0

फणिंद्र मंडलिक

एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत प्रयत्न होत असताना, दुसरीकडे त्याच बाबासाहेबांचा नाशिकमधला ठेवा पैशांअभावी नामशेष होतो की काय अशी परिस्थिती आहे. नाशिकमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्रात बाबासाहेबांच्या काही वस्तू असून, पैशाअभावी त्यांचा सांभाळ करणे संस्थेला कठीण बनले आहे. संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठीच पैसा नाही, तर वस्तू कशा सांभाळायच्या संस्थाचालकांचा सवाल आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी समाजाला शिका आणि संघटीत व्हा असा संदेश दिला. त्याला अनुसरून त्यांच्यासोबत असलेले दादासाहेब गायकवाड व शांताबाई दाणी या अनुयायांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास प्रबोधिनीची स्थापना केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देणे सुरू केले. दादासाहेब गायकवाड व बाबासाहेबांचे निकटचे संबंध असल्याने बाबासाहेबांच्या काही वस्तू या शिक्षण संस्थेत जतन करण्यात आल्या. त्यात बाबासाहेबांचे दोन सूट, दोन हॅट, कोट, बूट, संविधानाची पहिली प्रत आदिंचा समावेश आहे. या वस्तुंचे जतन करण्यासाठी केमिकल प्रोसेस करावी लागणार आहे. संस्थेकडे निधी नसल्याने हे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.

सरकारने बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वीच बाबासाहेबांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तेथेही त्यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा नाशिकमधला हा अनमोल ठेवा किमान जतन केला जावा अशी अपेक्षा आहे.

संस्थेच्या माध्यमातून तक्षशिला माध्यमिक विद्यालय, गौतम छात्रालय, कुणाल विद्यालय, कन्या छात्रालय अशा शैक्षणिक संस्था चालवल्या जातात. विद्यार्थी संख्या व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसत नसल्याने संस्थाचालकांना देणगीदारांच्या भरवशावर संस्थेचा कारभार करावा लागत आहे. या संस्थेला पु. ल. देशपांडे तसेच कुसुमाग्रजांनी भरघोस मदत केली होती. त्यांच्यानंतर मात्र फारसे कुणी पुढे आले नाही. अनेक राजकीय लोकांनी भेटी दिल्या मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आले.

बाबासाहेबांचे कोट, सूट, शूज अशा काही वस्तू आमच्या संग्रहालयात आहेत. चांगल्या रित्याने त्यांचे जतन कसे होईल याकडे आमचे लक्ष असते. परंतु, हा ठेवा दीर्घकाळ टिकवायचा असेल तर त्यासाठी निधीची गरज आहे. - करूणासागर पगारे, पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images