Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दर्जा मिळूनही प्रतीक्षाच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

रुग्णांची वाढती संख्या अन् कामाचा आवाका बघता राज्य शासनाने गेल्या वर्षी येवला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला. मात्र, हे उपजिल्हा रुग्णालय अद्याप कार्यान्वितच न झाल्याने सध्याच्या ग्रामीण रुग्णालयाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मंजूर झालेले हे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाल्यास विविध पदांच्या संख्येत वाढ होतानाच सिटीस्कॅन यंत्रणेसह अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने तातडीने हे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मनमाड - नगर राज्य महामार्गालगत येवला शहरातील हुडको वसाहतीजवळ १० फेब्रुवारी २००९ मध्ये हे रुग्णालय रुग्णसेवेत हजर झाले. यामुळे शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेचा मोठा आधार मिळाला. पूर्वीच्या तुलनेत दिलासादायक चित्र उभं राहिलं खरं मात्र, दिवसेंदिवस या ग्रामीण वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे परिचारिकांसह इतर पदांची रिक्त संख्या बघता गुणात्मक रुग्णसेवा देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः कमी संख्येमुळे रुग्णांना सेवा देताना परिचारिकांना रोषास सामोरे जावे लागत आहे.

येवला ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांची एकूण ७ पदे मंजूर असली तरी, त्यातील ४ पदे रिक्त आहेत. सध्या १ वैद्यकीय अधीक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून परिचर, वार्डबॉय, ऑफिस कर्मचारी, सफाई कामगार, लेखापाल, कनिष्ठ लिपिक आदी संवर्गातील बरीचशी पदे रिक्त असल्याने साहजिकच त्याचा परिणाम रुग्णालयातील कामकाज व सेवेवर पडत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित होताना सध्याच्या येवल्यातील ग्रामीण रुग्णालयातील ३० खाटांच्या संख्येत वाढ होताना ही संख्या १०० वर पोहचणार आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित होण्याची नितांत गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पांडवलेणी पायथ्याशी वृक्षांची कत्तल

$
0
0

महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा पर्यटकांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरात वृक्षतोडीवर बंदी असतांना पांडवलेणी पायथ्याच्या परिसरात सर्रासपणे वृक्षांची बेसुमार कत्तल होत आहे. परंतु, याकडे महापालिका प्रशासनासह वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. वृक्षांची कत्तल करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

नाशिक शहराला लागून असलेला पांडवलेणीचा डोंगर सुटीच्या दिवशी पर्यटकांचे ट्रेकींगसाठीचे आवडते ठिकाण आहे. तसेच या भागात अनेक जण प्रत्येक आठवड्याची शनिवारी, रविवारी सकाळी फिरण्यासाठी येतात. अशाच एका सुटीच्या दिवशी 'निपम'चे काही सदस्य ट्रेकींगसाठी पांडवलेण्याच्या पायथ्याशी गेले होते. तेथे त्यांना वनविभागाकडून लावण्यात आलेल्या वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्याचे लक्षात आले. याबाबत 'निमप'चे अध्यक्ष श्रीधर व्यवहारे यांना या सदस्यांनी माहिती दिली.

दरम्यान, पांडवलेण्याच्या पायथ्याशी बेसुमारपणे होत असलेल्या वृक्षांच्या होणाऱ्या कत्तलीकडे महापालिका व वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप 'निपम'चे व्यवहारे यांनी केला आहे. यासाठी सर्रासपणे वृक्ष तोडणाऱ्यांवर महापालिका व वनविभागाने पकडून कठोर कारवाईची करण्याची मागणी व्यवहारे यांनी केली आहे. तसेच वृक्ष संवर्धनासाठी पर्यटकांनी देखील कुणी वृक्ष तोडत असेल, तर त्यांना आवर घालण्याचेही व्यवहारे 'मटा'शी बोलतांना केले आहे.

नाशिक शहरात वृक्षतोडीवर बंदी असतांना पांडवलेण्याच्या पायथ्याशी बेसुमार वृक्षांची कत्तल होत आहे. याकडे महापालिका व वनविभागाने लक्ष घालण्याची गरज असून वृक्ष तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. जेणे करून दुसरे कुणी वृक्षतोड करणार नाहीत.

- श्रीधर व्यवहारे, विभागीय अध्यक्ष, निपम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नभेसळ आणि धोका!

$
0
0

>> पियुष सोमाणी

गेल्या दोन आठवड्यांपासून साधारणपणे १०-११ वर्षांपर्यंतची लहान मुले आजारी पडताहेत. घरोघरी आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भेसळयुक्त दूध. ह्या भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांचे आजाराचे प्रमाण वाढले आहे आणि ह्या प्रकाराला थांबविणे अक्षरशः कठीण झालेले आहे. असे खूपच कमी दूध विक्रेते असतील की जे स्वतः बाजारात विकले जाणारे दूधच आपल्या घरी सुद्धा वापरत असतील. शक्यतोवर अशी दूध विक्रेते मंडळी स्वतःच्या वापरासाठी दूध वेगळे काढून ठेवतात. अचानकपणे वातावरणात झालेला बदल आणि गेल्या काही दिवसांपासून आलेला तीव्र उन्हाळाही आरोग्यावर परिणाम करतो. उष्ण वातावरणात गाई-म्हशीचे दूध आटून जाते व दूधाचे उत्पादन घटते. दूध विक्रेत्यांच्या रोजच्या दूध वाटपावर त्याचा परिणाम होतो. अशा मुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान होते, हे नुकसान होवू नये म्हणून गायी-म्हशींना हार्मोन्सची (संप्रेरके) इंजेक्शन्स देण्यात येतात. ह्या इंजेक्शन्समुळे गायी-म्हशींच्या शरीरात अक्षरशः रक्त आटवून दूध बनण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा प्रकारचे दूध पिण्यात आल्यामुळे लहान मुलांचे पोट बिघडून मुले आजारी पडतात. असे दूध त्यांच्या शरीरात गेल्याने मुलांच्या हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होतात. सरासरी ५०% पेक्षा जास्त मुले अशा कारणांमुळे आजारी पडतात.

निसर्गाचे, प्राणिमात्राचे समतोल देखिल बिघडत चालले आहे. अशा हार्मोन्स इंजेक्शन्स दिलेल्या जनावरांचे मांस खावून गिधाडांची प्रजातीच नष्ट होणाच्या मार्गावर आहे. आपली मनुष्य प्रजाती सुद्धा अशा भेसळयुक्त अन्न सेवांमुळे नक्कीच प्रभावित होत असून, एक दिवस नष्ट होवून जाऊ शकते. दूध किंवा अन्य पदार्थांमधील भेसळ शोधून काढणे हे काही खूप कठीण काम नाही. आयटीचा योग्य वापर करून आपण चांगली सेन्सर्स, यंत्रे निर्माण करू शकतो. आयटी क्षेत्रामध्ये तेवढी क्षमता नक्कीच आहे की अशा सेन्सर्सद्वारे आपण घरीच दूध किंवा अन्य पदार्थांमधील भेसळ शोधून काढू शकतो. परदेशात अशी सेन्सर्स व यंत्रणा अगदी सहजपणे उपलब्ध होतात. मला खंत वाटते की, आपल्याकडे भेसळयुक्त अन्नपदार्थ शोधून काढण्यासाठी टेक्नॉलॉजीचा मुळीच वापर होत नाही. अन्नपुरवठा विभागाला सुद्धा ह्या विषयी अजिबात गांभीर्य नाही. आपल्याकडील द्राक्षे, केळी, आंबे, डाळिंबे आदी फळांची कमी किंवा बंद झालेली निर्यात हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी कीटकनाशकांची फवारणी. अशी फळे मनुष्यांसाठी खाण्या योग्यच राहत नाही, दूध तर खूप लांबची गोष्ट आहे. आपण सर्वांनी मिळून ही भेसळ रोखली पाहिजे आणि ह्याकामी टेक्नोलॉजीचा वापर करणे ही काळाची गरज आहे.

हवामानातील बदल, प्रदूषण, अन्नपदार्थांमधील भेसळ आदी बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे मनुष्यांची कमी होत जाणारी रोगप्रतिकारशक्ती, हा एक गहन चिंतेचा विषय आहे. भेसळयुक्त, दूषित अन्न व पेय पदार्थांमुळे विषबाधेच्या (फूड पाँईझन) सुद्धा घटना घडतात. आपण सर्वांनी वरील सर्व गोष्टींची तातडीने दखल घेवून भेसळयुक्त अन्न व पेयपदार्थ प्रकर्षाने टाळलीच पाहिजेत. आजारी पडून उपचार घेण्यापेक्षा आधीच काळजी घेणे केव्हाही चांगले. यासाठी आपण हस्तस्पर्शरहित फळे, अन्न व पेय पदार्थांच्या दिशेने वाटचाल करावयास हवी. आपण सुटे दूध जेव्हा स्थानिक लोकांकडून विकत घेतो तेव्हा त्यामध्ये भेसळीची शक्यता खूप अधिक असते. विशेषतः लहान मुलांसाठी आपण मानवी हस्तस्पर्शरहित शुध्द, निर्भेळ आणि प्रकृतीला पोषक (हायजीन) अशा दुधालाच प्राधान्य दिले पाहिजे. या व्यतिरिक्त आपण आपल्या व भावी पिढीच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्याकरिता सेंद्रिय फळे, भाज्या व धान्याच्या सुद्धा आग्रहाने वापर केला पाहिजे. येत्या काळामध्ये स्वयंचलित आणि मानवी हस्तस्पर्शरहित अन्न व पेय पदार्थांची बाजारपेठ नक्कीच भरभराटीस येणार आहे.

(लेखक आयटी उद्योजक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बी फार्मसी सीईटीबाबत आज मार्गदर्शन

$
0
0

विद्यार्थी, पालकांसाठी विशेष सत्राचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅचलर ऑफ फार्मसी (बी फार्म) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (१ एप्रिल) विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडीया पार्टनर आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या पंचवटी येथील फार्मसी कॉलेजमध्ये असलेल्या ऑडिटोरिअमध्ये हे सत्र होणार आहे.

तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) फार्मसी अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) गेल्या वर्षापासून घेण्यात येते. १२ वी सायन्समध्ये ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देता येते. बी. फार्म या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक डीटीईने जाहिर केले आहे. त्यानुसार २६ मार्चपासून अर्ज विक्रीला प्रारंभ झाला आहे. हे अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहेत. नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजच्या ठिकाणी हे अर्ज त्यासोबतचे कीट येत्या ५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. येत्या २५ आणि २६ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. मात्र, या सीईटीसाठी करावयाच्या अर्जाबाबत विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्यांच्या पालकांमध्ये जागरुकता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांच्यासह उपप्राचार्य डॉ. सुनील महाजन, प्रा. भूषण वाघ, प्रा. रवी पाठक, प्रा. वृषाली जाधव हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. १२ वीची परीक्षा दिलेल्या किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांना या मार्गदर्शन सत्रात सहभागी होता येणार आहे. कॉलेजच्या ऑडिटोरिअममध्ये दुपारी साडेबारा वाजता हे सत्र होणार आहे. सत्रात प्रारंभीच्या अर्ध्या तासात सीईटी अर्जाबाबत माहिती दिली जाणार असून, त्यानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.

याचे मिळणार मार्गदर्शन

बी फार्मसी सीईटीचे अर्ज कुठे मिळतील, अर्जासोबत असलेले कीट काय आहे, कीटचे महत्त्व काय आहे, जिल्ह्यात बी फार्मसीच्या किती जागा आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये आहेत, अर्ज कसा करायचा, प्रवेश फी किती असेल, स्कॉलरशीप मिळू शकेल का, त्याचे काय निकष आहेत, असे विविध प्रकारचे मार्गदर्शन या सत्रात केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११३७ कोटींच्या बिलांना मंजुरी

$
0
0

मार्च एण्डमुळे‌ तब्बल दीड पटींची वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारकडून प्राप्त निधी मार्च अखेरीनंतर परत जाऊ नये यासाठी सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये बिले मंजूर करवून घेण्याची लगबग पहावयास मिळाली. एकट्या मार्च महिन्यात जिल्हा कोषागारातून तब्बल १,१३७ कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारणत: साडेसातशे ते आठशे कोटींची बिले प्राप्त होतात. मात्र, मार्चमध्ये त्यामध्ये दीड पटींची वाढ झाल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी बी. जी. निर्मळ यांनी मंगळवारी दिली.

राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी जिल्हा कोषागाराकडे निधी दिला जातो. कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध देयके, सेवा निवृत्तीची देयकांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा निधी वितरित केला जातो. त्याच्या

खर्चाचा हिशोब सादर करण्यासाठी सर्वच विभागांची लगबग असल्याचे चित्र होते. त्यामुळे कोषागारात रात्री उशिरापर्यंत बिले स्वीकारण्याची आणि ती मंजूर करण्याची धावपळ सुरू होती. सरकारने यंदा बीडीएस प्रणाली लागू केल्याने टेलीफोन बील, वीज बील, कर्मचाऱ्यांचे मेडीकलचे बील यांसारखी बीले ऑनलाईन

प्रणालीत फिडींग करण्याचे काम सुरू होते. जिल्हा कोषागारात आलेली बीले त्वरित स्वीकारत निधी वितरित करण्यासाठी शनिवारी आणि रविवारीही कामकाज सुरू ठेवण्यात आले. २९ मार्चपर्यंत कोषागारामध्ये सुमारे ४३३ कोटींची ५ हजार ९३७ बिले सादर करण्यात आली होती. ही सर्व बिले आज मंजूर झाली. याचबरोबर मंगळवारी सायंकाळपर्यंत सादर झालेली बिलेही मंजूर करण्याचे काम सुरू होते. ३१ मार्चला सायंकाळपर्यंत तब्बल ११३७ कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आली. त्यामध्ये सोमवारपर्यंत शिल्लक असलेल्या १३०० बिलांचाही समावेश होता. तर मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे सहाशे बिले दाखल झाली असून ती मंजूर करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याची मा‌हिती निर्मळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी आंदोलकांचा मंडप उखडला

$
0
0

सरकारवाडा पोलिसात तक्रार दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मुख्य दरवाज्यावर गेल्या नऊ महिन्यापासून आंदोलनाला बसलेल्या घंटागाडी आंदोलकांचा तंबू अतिक्रमण विभागाने मंगळवारी काढून टाकला आहे. मंडप बेकायदेशीर असल्याचे सांगून सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत मंगळवारी पाडून टाकण्यात आला आहे. आयुक्तांनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप महादेव खुडे यांनी केला आहे. दरम्यान, महापालिकेत सोमवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडल्याप्रकरणी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सेवेत कायम करण्यासह विविध मागण्यासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी सोमवारी आक्रमक होत महापालिकेची तीनही गेट बंद केले होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी तीन तास अडकले होते. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढले होते. त्यामुळे आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या ११२ कर्मचाऱ्यांवर मंगळवारी सुरक्षाकडून गुन्हे दाखल करण्यात आलेत. यासोबतच महापालिकेन या कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी उभारलेला तंबू काढून टाकला आहे. सुरक्षेचे कारण देत अतिक्रमण विभागाने हा मंडप काढून टाकला आहे.

आयुक्तांनी सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई केली आहे. याविरोधात आम्ही कामगार उपायुक्तांकडे तक्रार करणार असून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.

- महादेव खुडे, आंदोलक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांची पाणीपट्टी ऑनलाईन

$
0
0

प्रायोगिक तत्वावर सिन्नर एमआयडीसीला लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाण्याचे बील भरण्यासाठी तास अन् तास रांगेत ताटकळणाऱ्या उद्योजकांसाठी आता ही सुविधा लवकरच ऑनलाईन होणार आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीसाठी हा प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

शहर आणि जिल्ह्यातील उद्योगांसाठी पाणीपट्टी भरण्याकरीता सातपूरच्या उद्योग भवनात सुविधा आहे. येथे पारंपरिक पध्दतीने पाणीपट्टी भरण्यात येते. सरकारची इतर कार्यालये ऑनलाईन असताना आणि ऑनलाईन बिलींगच्या सुविधांवर इ-प्रशासनाचा भर असतानाही एमआयडीसीचे प्रशासन मात्र या स्पर्धेत मागे पडते आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे पार पडलेल्या जिल्हा उद्योग मित्र तथा झूम च्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेला आला होता. यावेळी पाणी बील भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेच्या सातत्याच्या मागणीची आठवण सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना करून देण्यात आली.

शहराच्या हद्दीतील सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्येच सुमारे ३ हजारावर उद्योजक आहेत. याशिवाय सिन्नर एमआयडीसी आणि जिल्ह्यातील इतरही भागात उद्योगाचे जाळे आहे. या स्थितीत नाशिक आणि परिसरातील उद्योजकांना सातपूरच्या उद्योग भवन येथे पाणीबील भरण्यासाठी वारंवार खेट्या घालाव्या लागतात. येथे चेकच्या माध्यमातूनही बील पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध नाही. याशिवाय दिवसभरातील अत्यल्प कालावधीसाठी बील स्वीकारले जाते. परिणामी, वेळेत बील भरण्याची इच्छा असूनही या गैरसुविधांमुळे प्रक्रीया लांबत असल्याचा उद्योजकांचा अनुभव आहे.

सिन्नरलाही प्रायोगिक सुविधा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीनेही जिल्ह्यातील उद्योगांना ऑनलाईन पाणीबील सुविधेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत सिन्नर औद्योगिक परिसरासाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्ड हवेच !

$
0
0



रोजच्या जगण्याची लढाई लढताना सामान्य माणसाला व्यवस्थेला सामोरे जावे लागते. कधी केवळ प्राथमिक माहितीअभावी मोठी कामेही दीर्घकाळ रखडतात. या महत्वाच्या अन् नेमक्या माहितीवर 'हेल्प युअर सेल्फ' हे सदर प्रकाश टाकेल. आजच्या सदरात आधारकार्डची प्राथमिक माहिती आणि सध्या सुरू असलेल्या कार्ड नोंदणीवर टाकलेली एक नजर.

भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीस रहिवासाचा विशिष्ट ओळख क्रमांक असावा ही आधार कार्डमागील संकल्पना आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणाऱ्या ओळखपत्र व रहिवासी-पुराव्यांचे काम आधार क्रमांकच करेल.

आधार क्रमांक भारतामध्ये वैध राहणार आहे. एकदा 'आधार' क्रमांक मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला देशात वेगळ्या ओळखीचा पुरावा देणे गरजेचे नाही. या आधारकार्डच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्णत: मोफतच आहे. यासाठी कोणी शुल्क घेऊन 'आधार'नोंदणी करत असेल तर आपल्या जवळच्या प्रभाग (क्षेत्रिय) अधिकाऱ्यांशी किंवा तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येईल. आधारक्रमांक मिळविण्यासाठी नागरिकास शासकीय प्रमा‍णित ओळख पटविण्याच्या कागदपत्रांपैकी किमान एक कागदपत्र ओळख पटविण्यासाठी आधार केंद्रावर दाखवावे लागेल. यामध्ये पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग परवाना यापैकी एक पुरावा निवास व ओळखप्रमाणपत्र म्हणून सोबत घेऊन येणे गरजेचे आहे.

ज्या नागरिकांकडे ओळखीचा कुठलाही पुरावा नाही त्यांनी लेटरहेडवर खासदार किंवा श्रेणी अ चे राजपत्रित अधिकारी यांच्याकडून देण्यात येणारे निवास प्रमाणपत्रही मिळविता येऊ शकते. आधार क्रमांक नोंदणीसाठी वयाचे बंधन नाही. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रीक (बोटांचे व डोळयातील बुबुळाचे फोटो) घेतले जाणार नाही. त्यांचे फक्त फोटो घेण्यात येतील. ज्या व्यक्तीस बोटे किंवा हात नाहीत अशा व्यक्तींच्या डोळयांचे फोटो व त्या व्यक्‍तीचे छायाचित्र ओळख पटविण्यासाठी वापरण्यात येईल. अंध व्यक्तींसाठी त्यांचे छायाचित्र व बोटांचे ठसे वापरण्यात येतील. दुबार आधार नोंदणी हा गुन्हा आहे.

ज्या नागरिकांची 'आधार' नोंदणी होऊन किमान तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे आणि तरीही त्यांना आधारकार्ड मिळालेले नाही, अशा नागरिकांना शासनाच्या www.uidai.gov.in वेबसाईटवरून e-aadhaar या प्रणालीद्वारे आधारकार्ड डाउनलोड करून घेता येईल. याकरिता त्यांना त्यांच्या पोहोच पत्रावर नमूद केलेली सर्व माहिती विचारल्याप्रमाणे अचूकरित्या भरावी लागेल. त्यानंतर त्यांना त्यांचे आधारकार्ड डाऊनलोड करता येईल. 'आधार'नोंदणी झाल्यानंतर चार दिवसांच्या म्हणजेच ९६ तासांच्या आत माहितीमध्ये दुरुस्ती करता येईल. त्यानंतर मात्र दुरुस्ती करता येत नाही.

येथे सुरू आहे आधार नोंदणी :

१) दुर्गा नगर, नाशिक २) शॉप नं.४, भैरव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कातकाडे नगर समोर, जाधव संकुल, अशोक नगर, सातपूर ३) श्रीहरी निवार, घर क्रमांक २७८, इंडेक्स नं.१०४०२८६, कामगार नगर, सातपूर ४) शॉप नं.१, अरमान टॉवर 'ए' लाईफलाइन हॉस्पिटल, वडाळा रोड ५) शॉप नं.२६, फस्ट फ्लोअर, ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे, गिरणारे (नाशिक) ६) महा ई सेवा केंद्र, इंदिरानगर, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

$
0
0

संशयितांना ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूररोडवरील रामेश्वरनगर येथील विवाहितेचा खून केल्याप्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी मंगळवारी गुन्ह्यांची नोंद केली. या प्रकरणी सासरच्या चौघा संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना कोर्टाने ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गंगापूररोडला राहणाऱ्या निवृत्ती पाटील व शुभांगी पाटील यांचा मुलगा पीयूष पाटील याचा विवाह वर्षभरापूर्वी स्वाती उर्फ अनुजा (वय २४) हिच्याशी झाला. जळगाव जिल्ह्यात माहेर असलेल्या अनुजा आणि सासरच्यांचे लग्नाच्या काहीच दिवसानंतर खटके उडत गेले. त्यातच ३० मार्च रोजी रात्री साडेअकारा वाजेच्या सुमारास अनुजाने गळफास घेतल्याची माहिती पीयूष पाटीलच्या घरच्यांनी अनुजाचे वडील वसंत पाटील यांना कळवली. तसेच, मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेला. यानंतर पाटील कुंटुब फरार झाले. जळगावहून वसंत पाटील यांच्यासह इतर नातेवाईक अनुजाच्या सासरी पोहचले. रामेश्वरनगरला प्रत्युषा बंगल्यासमोर मंगळवारी सकाळी नातेवाईकांची एकच गर्दी झाली. त्यामुळे सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी तत्काळ अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. अनुजाचा दगा फटका करून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

नातेवाईकांकडून तोडफोड

मृत अनुजाचा पती व सासू हे दोघेही फरार झाले होते. प्रत्युषा बंगल्यात एकटेच असलेल्या निवृत्ती पाटील यांना पोलिसांनी संरक्षण देत बंगल्याच्या बाहेर काढले. यावेळी संप्तत नातेवाईकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, बंगल्यातील काही वस्तूंची व चारचाकी वाहनांची तोडफोडही केली.

नातेवाईकांच्या विनंतीनुसार अनुजाच्या शवाचे व्हिडीओ शुटींग करून पोस्टमार्टम करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी सासरा निवृत्ती पाटील, पती पीयूष पाटील, मुलाचे मामा तुषार साळुंके व मामी संगिता साळुंके यांना अटक केली.

बंगल्याच्या कामासाठी दहा लाख रुपयांची मागणी सासरच्यांकडून होत होती. त्यातील दोन लाख रुपये दिले. मात्र, त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी अनुजाचा खून करून आत्महत्येचा बनाव केला असून, आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. - वसंत पाटील, मृत अनुजाचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरांची मजा; सर्वसामान्यांना सजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

हजारो भाविकांची गर्दी होणाऱ्या पंचवटी परिसरात चोरट्यांची अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे. बुधवाराच्या बाजारात तर मोबाइल, मंगळसूत्र किंवा दुचाकी घेऊन जावे की नाही, असा प्रश्न नाशिककारांना पडत आहे. त्यातच पोलिसांची भूमिका चोरट्यांना सहाय्यक ठरत असल्याने मोबाइल 'चोरांची मजा आणि सर्वसामान्यांना सजा' असे चित्र दिसून येत आहे.

साधारणतः दीड महिन्यापूर्वी व्यावसायिक मनीष अग्रवाल यांचा १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल बुधवारच्या बाजारतून चोरी गेला. चोरी करणाऱ्या चोरट्यांस अग्रवाल यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या

स्वाधीन केले. मात्र, अग्रवाल यांनी चोरट्यास पकडण्यापूर्वीच मोबाइल त्याच्या साथीदाराकडे स्वाधीन झाला होता. पकडलेल्या चोरट्याचे नाव वांग्या आहे. अट्टल चोरटा असलेला वांग्या वज्रेश्वरी नगर झोपडपट्टी राहतो.

पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, मोबाइल साथीदाराकडे असल्याचे वांग्याने पोलिसांना सांगितले. हा घटनाक्रम संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. त्यामुळे उद्या सकाळी येऊन मोबाइल घेऊन जा, असे पोलिसांनी अग्रवाल यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी आणखी एका चोरट्यास अटक करण्यात आली असून, त्याने तुमचा मोबाइल भद्रकालीत राहणाऱ्या दीप्या नावाच्या चोरट्यास दिला असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे संशयित दिप्याचा फोटो सुध्दा पोलिसांनी अग्रवाल यांना दाखवला. मात्र, मोबाइल चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळटाळ केली. संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने ते लागलीच जामिनावर सुटतील. तसेच कोर्टातून मोबाइलही लवकर मिळणार नाही, अशी धास्ती पोलिसांनी अग्रवाल यांना दाखवली. आता या घटनेस दीड महिन्याचा कालावधी उलटला असून, पोलिसांनी ना तक्रार दाखल केली ना अग्रवाल यांना मोबाइल मिळाला.

अग्रवाल यांच्याप्रमाणे मोबाइल हरवलेले अनेक नागरिक पोलिस स्टेशनच्या खेटा घालत आहे. हरवलेल्या मोबाइलनंबरचा दहशतवादी किंवा समाजकंटकांनी उपयोग केला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न हवालदिल झालेल्या अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

बुधवारच्या बाजारावर दहशतीचे सावट

बुधवारच्या बाजारादरम्यान रामकुंड परिसरात अनेक चोऱ्या होतात. त्यातील बहुतांश चोऱ्यांची नोंदच होत नाही. झालीच तर फिर्यादीची बोळवण होते. अपरिहार्यकारणांमुळे बुधवारच्या दिवशी रामकुंड परिसरात जाणाऱ्या नागरिकांना मोबाइल, मंगळसूत्र, पाकिटे घरीच काढून ठेवावी लागतात. बाजारात बसणाऱ्या व्यवसायिकांना देखील चोरट्यांचे वर्णन, काम करण्याची पध्दत याची संपूर्ण माहिती आहे. मात्र, याविषयी काही बोलायचे झाल्यास लागलीच पोलिस दमबाजी करतात, असे एका वृध्द भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले. यामुळे बुधवारचा बाजार हा जणू चोरट्यांचा बाजार भासू लागला आहे. पोलिस कारवाई होईना यामुळे दाद मागावी तरी कुणाकडे, असा सवालही काही भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. याकडे ‌वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पोलिसांना चोर, त्यांची काम करण्याची पध्दत याविषयी सगळे माहित आहे. माझ्यासारख्या नोंद न झालेल्या अनेक तक्रारदारांची यादी तयार केली तर कोट्यवधी रुपयांचा माल हडप झाल्याचे लक्षात येईल. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.

- मनीष अग्रवाल, व्यावसायिक

पंचवटीच्या धार्मिक महत्त्वामुळे येथे पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र, पोलिस संरक्षण पुरवण्यात अपयशी ठरले आहेत. मोबाइल, दुचाकी चोरी तसेच पाकीटमारीचे प्रकार सर्रास घडतात. मात्र, पोलिसच चोरांच्या मदतीला असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे जायचे.

- जगदीश रामैय्या

बुधवाराच्या बाजारात सर्वसामान्यांच्या ​खिशावर डल्ला मारला जातो. भाविकांची तर सर्रास लूट होते. पोलिसांना याविषयी माहित असते. एखाद्या मोठ्या व्यक्तिचा परिचय असेल तर हरवलेली वस्तू अर्धा तासात परत केली जाते. मात्र, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते.

- देवांग जानी, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआरसाठी प्रस्तावात फेरफार

$
0
0

व्यापारी बँकेच्या संचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

मोफत हस्तांतरीत झालेल्या जमिनीच्या करारनाम्यात फेरफार करून टीडीआर लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेचे संचालक सुरेश वामन गायकवाड यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे मोठा टीडीआर घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंचक शिवारातील सिटी सर्व्हे नंबर ४४/१६/३अ/१ ३ब/१अ/१ व देवळाली शिवारातील सिटी सर्व्हेनंबर २५/अ/१/५/१ या जमिनी महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा करार संबंधित जमीन मालकांनी केला होता. या करारनाम्यात जमीन मालकास किंवा करार करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तिला टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यात येणार नाही, असा उल्लेख होता. मात्र, व्यापारी बँकेचे संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक सुरेश गायकवाड यांनी फेरफार केल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आली.

पंचक शिवारातील जमिनीचा तुकाराम बोराडे यांच्यासह अन्य सहा जणांशी संबंध आहे. मात्र, कराराचा प्रस्ताव गायकवाड यांनी सादर केला. १९ नोव्हेंबर २००३ मधील या कराराच्या काही ओळींमध्ये फेरफार करण्यात आली. देवळाली शिवारातील जमिनीशी गणपत त्र्यंबक गायकवाड यांच्यासह इतर पाच जणांचा समावेश आहे.

दि. १२ डिसेंबर २०१४ रोजी सादर झालेल्या प्रस्तावात गायकवाड यांच्यासह इतर पाचजणांनी फेरफार केली. दोन्ही जमिनीच्या प्रस्तावातून २ हजार १२८ आणि ७९२ चौरस मीटर इतका टीडीआर लाटण्याचा प्रयत्न संशयित आरोपींनी केला. सदर प्रस्ताव नगररचना विभागात आला असता नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय शेंडे यांना संशय निर्माण झाला. त्यांनी अधिक चौकशी करून हा प्रकार आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिला. घोटाळ्यातील गांर्भीय ओळखून या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

महापालिका कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात

हा प्रस्ताव सादर होत असताना नगररचना विभागातील कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या फेरफारीची बाब कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विनय शेंडे यांनी बारकाईने प्रस्ताव व करारनामा पाहिला नसता तर कदाचित या प्रस्तावास मंजुरी दिली असती. या प्रकारामुळे खालच्या स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावास मंजुरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हरसूल

हरसूल जवळच असलेल्या नाचलोंढी परिसरात सकाळी १०.३० सुमारास शालेय विद्यार्थ्यावर बिबट्याने जोरदार हल्हा चढवत त्याला जखमी केले. विद्यार्थ्याला उपचारासाठी हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविले.

नाचलोंढीच्या बारा पाड्यातील असलेल्या पायरपाडा ते कोळुष्टी रस्त्यावरील हटओहोळ जवळील रस्त्यावरून काही विद्यार्थी शाळेला जात होते. अचानकपणे येथे बिबट्याने हल्ला चढविला. यामुळे घाबरलेल्या काही विद्यार्थ्यांनी पयारपाडा गावाकडे पळ काढला. मात्र, या बिबट्याने रवींद्र उमाकांत बोरसे या विद्यार्थ्यावर जोरदार हल्हा चढवत जखमी केले. झटापटीत एकमेव रवींद्र बिबट्याला प्रतिकार करीत असताना आपल्या कोळुष्टी गावाकडे निघालेल्या धाडशी भाऊराम महाले याने बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. यामुळे बिबट्या घाबरून जंगलात पळून गेला. ही वार्ता वाऱ्यासारखी नाचलोंढी परिसरात पसरली. जखमी रवींद्रला तातडीने हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र गावित, डॉ. काळे व सहकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. तसेच पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. हे सर्व समजताच पेठ तालुक्याचे माजी सभापती अंबादास चौरे, हरसूलचे सरपंच जनार्धन पारधी, माजी सरपंच प्रकाश चौधरी, दिलीप चौधरी, नारायण आसम, वनपाल के. आर. वाघेरे, वनरक्षक एन. एन. गांगुर्डे यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी रवींद्रला नाशिक येथे हलाविण्यासाठी तातडीने पावले उचलली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रीपर्णी’तून आविष्कार काळाराम मंदिराचा

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

अखिल नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या काळाराम मंदिराचे सुबक मॉडेल अहमदाबाद येथील श्रीनाथ गणोरे यांनी निर्माण केले आहे. विशेष म्हणजे श्रीपर्णी (शिवण) या वृक्षाच्या लाकडापासून हे मंदिर साकारण्यात आले आहे. अशा प्रकारचे हे राज्यातील पहिलेच मॉडेल असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अस्थिंचे पाणी करणारे कुंड म्हणून गोदाघाटावरील रामकुंड, नारायण नागबलीसारखे काम्य विधी करण्याचे ठिकाण म्हणून त्र्यंबकेश्वर जसे प्रसिध्द आहे तसेच नाशिकची धार्मिक ओळख म्हणून काळाराम मंदिर भारतभरात प्रसिध्द आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता व सिंहस्थाची पार्श्वभूमी लक्षात घेता भाविकांनी नाशिकची आठवण जपावी यासाठी काळाराम मंदिराचे मॉडेल निर्माण केल्याचे गणोरे सांगतात. त्यांनी अनेक दिवस नाशिकला येऊन काळाराम मंदिराचा अभ्यास केला.

ज्यापासून हे मंदिराचे मॉडेल तयार केले आहे ते श्रीपर्णीचे लाकूड पवित्र आणि शुभ मानले जाते. या लाकडाच्या अस्तित्त्वाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असल्याचे वर्णन विश्वकर्मा व पद्म पुराणात आहे. या लाकडापासून श्री, ओम, स्वस्तिक, श्रीयंत्र, महामेरू श्रीयंत्र, गजान्त लक्ष्मी, गणेश मूर्ती, त्रिशक्ती, चौरंग, पाट, कॅश बॉक्स, देवघर इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. गणारे यांनी सिडको येथील सिध्दीविनायक गणेशाच्या मंदिराची कमान याच श्रीपर्णीतून तयार करून दिली असल्याची आठवणही सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंवर यांची अखेर उचलबांगडी

$
0
0

राजीव म्हसकर यांची प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका शिक्षण मंडळात वादग्रस्त ठरलेल्या प्रशासन अधिकार किरण कुंवर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत निरंतर शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी या पदावर त्यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर राजीव म्हसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांच्या अनियमित बदल्या, सुरेखा खांडेकर यांना झालेल्या मारहाणीसह विविध कारणांमुळे त्या शिक्षण मंडळात वादग्रस्त ठरल्या होत्या. गेल्या १९ मार्च रोजी त्यांना शासनाच्या मूळ सेवेत पाठविण्याचा महासभेत ठराव करण्यात आला होता.

शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या, पदाधिकाऱ्यांशी वाद, महासभेच्या परवानगीपूर्वीच सॉक्स खरेदी आणि महासभेत खोटी माहिती देण्यामुळे मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी कुंवर या चर्चेत आल्या. माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी त्याच्या विरोधात महासभेत लक्षवेधी आणली होती. त्यामुळे महासभेत वादळी चर्चेनंतर त्यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावानंतर निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर यांच्यात आणि कुंवर यांच्या वाद झाला होता. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले होते. त्यामुळे कुंवर या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या वादग्रस्त ठरावानंतर त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. मंगळवारी अचानक त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झालेत. कुंवर यांची जिल्हा परिषदेच्या निरतंर शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी बदली करण्यात आली. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील राजीव म्हसकर यांची कुंवर यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनाही तत्काळ आपला पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले असून म्हसकर बुधवारी (दि. १) आपल्या पदाचा पदभार घेणार आहेत.

पदाधिकाऱ्यांशी वाद नडला

कुंवर यांनी विभागात पाऊल ठेवताच वर्षभरातच शिक्षकांवर कारवाईचा धडाका सुरू केला होता. त्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज होते. पदाधिकाऱ्यांनी सूचविलेल्या बदल्या करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेत तर पदाधिकारी विरूद्ध कुंवर असा वाद रंगला होता. अखेरीस पदाधिऱ्यांचे पारडे जड होवून त्यांना मूळ सेवेत पाठविण्याचा ठराव करण्यात आला होता. आयुक्त या ठरावाची अमंलबजावणी करणार नाहीत, अशी त्यांना खात्री असतांनाच मंगळवारी अचानक त्यांचे बदलीचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी घेतलेला पंगा त्यांना महागात पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्री-प्रायमरीचे प्रवेश ऑनलाईनच

$
0
0

'मेस्टा'च्या बैठकीत सर्वसंमत निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्री-प्रायमरीत प्रवेश घेताना अनेकदा पालक रात्रभर शाळेत थांबतात. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करतानाच निश्चित प्रवेश संख्येपेक्षा अधिक अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जाणार नाहीत, अशी यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या (मेस्टा) बैठकीत घेण्यात आला.

विनाअनुदानित इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या विविध समस्यांबाबत मेस्टाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक हॉटेल रामा हेरिटज येथे मंगळवारी झाली. याप्रसंगी जिल्ह्यातील जवळपास ७० इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी यासारख्या प्री-प्रायमरी वर्गातील प्रवेशांसाठी पालकांची ठराविक शाळांमध्ये मोठी झुंबड उडते. अनेकवेळा अर्ज मिळण्यासाठी किंवा प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी पालक रात्रभर शाळेत थांबतात, बहुतांशवेळा ते पाल्यांनाही सोबत ठेवतात, मोठ्या रांगा, कायदा हातात घेण्याचे प्रकार यासह विविध अनावस्था प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे या प्रकाराबाबत मेस्टाच्या बैठकीत गांभिर्याने विचार करण्यात आला. यासंदर्भात काय करता येईल यावर चर्चा केल्यानंतर प्री-प्रायमरीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय त्यात घेण्यात आल्याची माहिती मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे-पाटील यांनी दिली. याप्रसंगी विस्डम हाय, दिल्ली पब्लिक स्कूल, सेंट लॉरेन्स, बॉईज टाऊन, के. के. वाघ, प्लाईंग कलर्स, नवजीवन, गोल्डन होरायझन, वंडर किडस अशा सुमारे ७० शाळा संस्थाचालकांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. नांदेड येथे मेस्टाच्या होणाऱ्या आगामी बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण हक्क कायदा आदेशाची होळी करण्यात येणार आहे, असे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितले.

अशी असेल प्रक्रिया

शाळेच्या वेबसाईटवर वर्षभर अर्ज उपलब्ध होतील. प्रवेश प्रक्रिया ज्यावेळी राबविली जाईल त्यावेळीच ते स्वीकारले जातील. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक ऑनलाईनच जाहीर केले जाईल. एखाद्या वर्गाची क्षमता ६० एवढी असेल तर साधारण ७० अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जातील. हे ७० अर्ज कुणी आणि कधी केले आहेत याची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे आमचा अर्ज स्वीकारा, असा आग्रह पालक करू शकणार नाहीत. तसेच, अर्ज घेण्यासाठी किंवा तो जमा करण्यासाठी पालकांना शाळेत येण्याची गरज राहणार नाही. शिवाय या प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता राहिल आणि पालकांची हेळसांडही थांबेल, असे तायडे-पाटील यांनी सांगितले.

निधीशिवाय प्रवेश नाही

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाची गेल्या तीन वर्षांची थकबाकी सरकारने अद्याप दिलेली नाही. हा निधी जोवर मिळत नाही तोवर २५ टक्क्याचे प्रवेश दिले जाणार नाहीत, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे इस्पेलिअर स्कूलचे संचालक सचिन जोशी यांनी सांगितले.

शिक्षकांना राज्यभर प्रशिक्षण

इंग्रजी शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यभरात सदस्य असलेल्या मेस्टाच्या जवळपास दहा हजार शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे प्रशिक्षण देण्यासाठी सचिन जोशी यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज आज नाशकात

$
0
0

महापालिकेच्या आढाव्यासह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार असून शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. महापालिकेत स्थायी समिती निवडणकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट झालेल्या आघाडीनंतरच प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

विधानसभा निवडणुकांनतर प्रत्येक आठवड्याला नाशिकला येणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. मात्र, महापालिकेतील सत्तेचा गाडा रुतलाच असल्याने ठाकरे अधून-मधूनच नाशिकच्या दौऱ्यावर येतात. गेल्या आठवड्यात राज ठाकरेंचे पुत्र अमित हे नाशिकला येवून गेले. तर स्थायी समितीत प्रथमच मनसे आणि राष्ट्रवादीची थेट आघाडी झाली. सत्तेसाठी मनसेला कराव्या लागणाऱ्या तडजोडी मुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही कोंडी सोडवण्यासाठी राज ठाकरे बुधवारपासून दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. बुधवारी एक वाजता त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार असून प्रथम महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गार्डनसिटीसाठी राज यांचे प्रयत्न सुरू असून शहरातील उद्यानांसदर्भातील निर्णयही त्यांच्या दौऱ्यात घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदगाव तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने रेल्वेरूळावर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

दीपक एकनाथ आहेर (२८, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. माजी आमदार अनिल आहेर यांनी तहसीलदार सुदाम महाजन यांना घटनेची माहिती दिली. दीपकच्या वडिलांच्या नावे ६ एकर जमीन आहे. हे शेतकरी कुटुंब असून, त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. दीपकच्या वडिलांनी सहा लाख ७७ हजार ७० रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे या विचाराने दीपक व्यथित होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने रेल्वे गाडीखाली केली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दीपक हा शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला देणार असल्याची माहिती तहसिलदार महाजन यांनी दिली. दीपकच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुल चुकीनेच बाहेर राहिले

$
0
0

पालकमंत्री महाजन यांचा खुलासा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जळगावच्या कार्यक्रमात आपल्याकडून चुकीने पिस्तुल बाहेर राहील्याचा खुलासा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. आपल्याला जबाबदारीची जाणीव असल्याचे सांगून माध्यमांच्या टीकेने आपण व्यथीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिंचन घोटाळ्यांच्या चौकशी मुळे आता राज्याच्या लाचलुचपत विभागाचे काम वाढल्याचा टोला महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

नाशिकमध्ये एका वाहिनीच्या वर्धापनदिनानिमीत्त महाजन यांनी जळगावातील पिस्तुल प्रकरणावर पुन्हा खुलासा केला आहे. आपण स्वसंरक्षणार्थ पिस्तुल वापरतो. परंतु, त्या दिवशी चुकीने पिस्तुल बाहेर राहून गेले. त्यामुळे एवढा गजहब झाला. आता आपल्याला जबाबदारीची जाणीव झाली आहे. माध्यमांनी दोन दिवस आपल्याला चांगली प्रसिद्धी दिल्याचे सांगून या टीकामुळे आपल्याला दुःख झाल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. 'राष्ट्रवादी'च्या नेत्यांच्या चौकश्या लावल्याने ते आपल्या विरोधात गदारोळ करत असल्याचे सांगत सिंचन घोटाळ्याच्या चौकश्यांमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ उपकेंद्राची इ-लायब्ररी धूळखात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिकच्या विभागीय केंद्रात मोठ्या दिमाखात सुरू केलेली इ-लायब्ररी धूळखात पडल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाअभावी नाविन्यपूर्ण अशी इ-लायब्ररीची संकल्पना फोल ठरल्याचेही यातून स्पष्ट होत आहे.

पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रामध्ये गेल्यावर्षी विद्यार्थ्यांसाठी इ-लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात आली. कुलगुरु वासुदेव गाडे, बीसीयूडीचे संचालक डॉ. बी व्ही गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते या लायब्ररीचे उदघाटन करण्यात आले. या लायब्ररीसाठी १८ लाख रुपयेही खर्च करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध सुविधांद्वारे संशोधनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्याकडे पाठ फरविल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे इ-लायब्ररी

तिबेटीयन मार्केट शेजारी असलेल्या महापालिकेच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विद्यापीठाचे विभागीय केंद्र आहे. याच केंद्राच्या ठिकाणी अत्याधुनिक अशी इ-लायब्ररी साकारण्यात आली आहे. ४० कम्प्युटर्स आणि इंटरनेट कनेक्शनद्वारे ही विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या जयकर लायब्ररीशी ती कनेक्ट करण्यात आली आहे. त्यासाठी इन्फ्लिबिनेट ही संकल्पना वापरण्यात आली आहे. देशातील विविध विद्यापीठांमध्ये एम. फिल. व पीएचडी पदवीसाठी केल्या जाणाऱ्या संशोधनाचे लघुप्रबंध व प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा प्रकल्पांतर्गत इन्फ्लिबनेटच्या संकेतस्थळावर अपलोड करणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी नोंदणी करताना संशोधन आराखडा कसा असावा, प्रबंध कसा लिहावा याची अनेक उदाहरणे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. या सुविधेमुळे संशोधनाचा तकलादू दर्जा सुधारण्यात, तसेच वाड्मयचौर्यावर नियंत्रण आणणे देखील आयोगाला शक्य झाले आहे. याच संकल्पनेचा आधार घेत जयकर लायब्ररीतील मौलिक ग्रंथसंपदा आणि शोधप्रबंध विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.

विद्यापीठाने अत्याधुनिक अशी इ-लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. ज्याद्वारे विद्यार्थी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासह संशोधनपूरक ज्ञान मिळवू शकतील. मात्र, लायब्ररीला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. रावसाहेब शिंदे, समन्वयक विभागीय केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटी न दिल्यास मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅचलर ऑफ फार्मसी (बी फार्म) या अभ्यासक्रमासाठीची सीईटी देणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून बी फार्मसीला प्रवेश घ्यावा लागेल. परिणामी गुणवत्ता असूनही प्रवेशासाठी लाखो रुपये खर्च करावा लागेल, असा सल्ला सीईटीच्या मार्गदर्शन सत्रात देण्यात आला.

बी फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या पंचवटी येथील फार्मसी कॉलेजच्या ऑडिटोरिअमध्ये घेण्यात आले. या उपक्रमाचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता. सत्राच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस मोरे, उपप्राचार्य डॉ. सुनील महाजन, प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांनी प्रास्ताविक केले. तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) फार्मसी अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) गेल्या वर्षापासून घेण्यात असून, १२ वी सायन्समध्ये ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देता येईल, असे त्यांनी सांगितले. या सीईटीविषयी मोठ्या प्रमाणात अनभिज्ञता असल्याने त्याची जागरुकता होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रा. भूषण वाघ आणि प्रा. रवी पाठक यांनी सादरीकरणाद्वारे प्रवेश अर्ज कसा भरायचा यासह विविध प्रकारची माहिती दिली. सीईटीचा प्रवेश अर्ज भरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. अर्ज भरल्याचे कन्फर्मेशन घेतले नाही तर अनेक अडचणींना सामना करावा लागतानाच प्रसंगी प्रवेशही मिळू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रा. वृषाली जाधव यांनी आभार मानले.

या स्टेप महत्त्वाच्या

- एआरसी सेंटरमधून अर्ज घ्या

अर्जासोबत घेतलेले कीट सेंटरमधूनच अॅक्टिव्हेट करुन घ्या

ऑनलाईन अर्ज भरा

कन्फर्मेशन घ्या

डीटीईच्या साईटला वेळोवेळी भेट द्या

हे लक्षात ठेवा

- भरलेल्या अर्जात काही त्रुटी असेल तर एआरसी सेंटरला भेट द्या

- अर्ज ऑनलाईन काळजीपूर्वक भरा

- शक्यतो एआरसी सेंटरमध्येच अर्ज भरा

- अर्जासोबत असलेली पुस्तिका काळजीपूर्वक वाचा

- येत्या २० एप्रिलला हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होईल

- एआरसी सेंटरमध्ये कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करा

- कॉलेजचे ऑप्शन फॉर्म काळजीपूर्क भरा

- चेक किंवा डीडीची गरज नाही. रोख पैसेही भरता येतील

वेळापत्रक असे

- अर्ज आणि कीट विक्री - २६ मार्च ते ५ एप्रिल - ऑनलाईन अर्ज - २६ मार्च ते ५ एप्रिल - अर्जातील त्रुटी बदलण्यासाठी- ६ एप्रिल - ऑनलाईन सीईटी परीक्षा -२५ आणि २६ एप्रिल - सीईटी परीक्षेचा निकाल - ६ मे

अर्ज मिळण्याचे ठिकाण

- मविप्र फार्मसी कॉलेज, गंगापूर रोड - एमजीव्ही फार्मसी कॉलेज, पंचवटी - ब्रह्मा व्हॅली, अंजनेरी - एमईटी फार्मसी कॉलेज, आडगाव - सपकाळ फार्मसी कॉलेज, अंजनेरी - संदीप फाऊंडेशन, अंजनेरी - मातोश्री फार्मसी कॉलेज, एकलहरे - जैन फार्मसी कॉलेज, चांदवड - एस एन डी कॉलेज, बाभुळगाव - एमजीव्ही फार्मसी कॉलेज, मालेगाव कॅम्प - रॉयल कॉलेज, सायने (मालेगाव) - जे डी पवार कॉलेज, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>