Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दर्शनबारी आराखड्यास मंजुरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजा दर्शनबारी आराखड्यास राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचा हिरवा कंदील मिळाला असून, येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

विश्वस्त मंडळाने पुरातत्व विभागाच्या नियमावलीस अनुसरून आराखडा मंजूर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा केला. दि. १८ मार्च २०१५ रोजी काही अटी शर्तीवर मंजुरी मिळवली आहे. दरम्यान, दर्शनबारी मार्ग पक्क्या बांधकामात करावयाचा नसून, गरज पडल्यास काढता येईल असा कारावयचा आहे. त्याकरिता वापरावयाचे बांधकाम साहित्य नमूना प्राधिकरणास सादर करावयाचे आहे. तसेच, हे दर्शनबारी आराखडा हा मंदिराच्या लगत असल्याने त्यापासून नियमित केलेल्या अंतरावर पाण्याची टाकी तसेच स्वच्छतागृह हे बांधकाम होणार आहे. अर्थात पूर्वदरवाजास असलेला भराव काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने येथे बांधकाम तसेच खोदकाम करण्यास परवानगी नाही. या कारणांनी दर्शनबारी आराखडा अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यास कैलास घुले आणि सचिन पाचोरकर यांनी पुरातत्व खात्याच्या सूचनांप्रमाणे बदल करीत अनुमती मिळवली आहे. त्याकरिता वारंवार राजधानी दिल्लीस्थित कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला आहे.

या कामांचा समावेश

पूर्वदरवाजा दर्शनबारी आराखड्यात दर्शनबारी मार्ग, स्वच्छतागृह, औषधे व अल्पोपहार सुविधा, चहापान, बगीचा विकसन, कंपाऊंड, भूमिगत पाण्याची टाकी व स्वच्छतागृहाची दुरुस्ती व आणखी स्वच्छतागृह आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टमन, मेलगार्डची २९ला परीक्षा

$
0
0


मालेगाव : महाराष्ट्र डाक परिमंडळच्या वतीने पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ या पदाच्या रिक्त जागा सरल सेवा भरतीद्वारे भरण्याबाबतची जाहीर सूचना अधिसूचित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोस्टमन, मेलगार्ड पदांच्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र www.dopmah.in या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

दि. २९ मार्च २०१५ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. संबंधित उमेवारांनी आपले प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावे. प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्यास मदतीसाठी ९२२३३२००८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एल. व्ही. सूर्यवंशी मालेगाव विभाग अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. ‌परीक्षार्थींनी केद्रांवर वेळेवर पाहोचावे, असे आवाहनही केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर मनसेत फूट?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मनसेच्या आढावा बैठकीस सातपैकी पाच नगरसेवक गैरहजर राहिल्याने या चर्चेस पुष्टी मिळाली आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत मनसेचे सहा लोकनियुक्त सदस्य व एक स्वीकृत असे सात सदस्य आहेत. सन २०१२ सार्वत्रिक निवडणुकीनंतर मनसेने सलग दोन वर्ष सत्ता उपभोगली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता असून, काही महिन्यांपासून मनसे विरोधी बाकावर आहे. दरम्यानच्या काळात माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपात प्रवेश केल्‍यापासून येथील मनसे नगरसेवक त्यांच्या पाठोपाठ भाजपात प्रवेश करतील असे तर्कवितर्क काढले जात आहेत. सर्व नगरसेवक वसंत गिते यांच्या संपर्कात असल्याचे वारंवार स्पष्टही झाले आहे. हा सर्व गट वसंत गिते यांचे नेतृत्व मानणारा असून, नगरपालिकेत निवडून येऊन सत्ता मिळवितांना गिते यांच्याच नेतृत्वाखाली सर्व घडामोडी घडल्या होत्या. विशेष म्हणजे त्र्यंबक नगरपालिकेतील एक अपक्ष नगरसेवक आणि मनसेचे सात नगरसेवक असे सर्व पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या दरबारी हजेरी लाऊन आल्याची चर्चा आहे.

सन २०१२ मध्ये बालेकिल्ला असलेल्या त्र्यंबक नगरपालिकेत भाजपास पराभूत करून मनसेने विजय मिळवला होता. त्र्यंबकेश्वर नगरीत नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतून नेहमीच अनपेक्षित घडामोडी होत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे प्रभागाध्यक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान झाल्यानंतर शहरातील ६१ प्रभाग अध्यक्षांची निवडणूक नुकतीच झाली. पक्षाचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी नूतन प्रभागाध्यक्षांना संबोधित करताना पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

येत्या दोन वर्षात नाशिक महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे प्रभागाध्यक्षांनी आतापासूनच जनतेचे प्रश्न आपल्या प्रभागात सोडवावेत, आरोग्यविषयक व पाणी, रस्ते तसेच कचऱ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे. प्रभाग अध्यक्षांनी दर आठवड्यात स्वतःच्या प्रभागात पक्षाची बैठक घेऊन जनतेचे प्रश्न समजून घ्यावे, जे प्रश्न सोडविणे शक्य नसेल ते पक्षाच्या माध्यमातून प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनातून सोडवावेत, असेही टिळे यांनी सांगितले.

नूतन प्रभागाध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे : संतू पाटील मुळक (प्रभाग क्र. १), संतोष जगताप (२), विक्रांत पवार (३), निलेश कर्डक (४), भरत नागपुरे (५), प्रभाकर पिंगळे (६), गणेश खेडकर (७), दिपक जाधव (८), मुकेश गांगुर्डे (९), राजेंद्र वखारे (१०), सुभाष काठे (११), भारत मोहिते (१२), विशाल आहेर (१३), वाजित सैय्यद (१४), माणिक मोरे (१५), प्रवीण चव्हाण (१६), अशोक पाटील (१७), अरुण भोसले (१८), प्रवीण मुंडे (१९), कोलप्पा धोत्रे (२०), संदीप हंडगे (२१), मोहित तयाने (२२), अमोल नाडे (२३), आनंद पाटील (२४), राहुल मोरे (२५), खान सलीम (२६), मनोज चव्हाण (२७), फारुख शेख (२८), पंकज राहणे (२९), मोबीन शेख (३०), प्रकाश पाटील (३१), दीपक बोराडे (३२), संतोष डेर्ले (३३), सचिन आहेर (३४), रमेश ताजनपुरे (३५), नितीन चंद्रमोरे (३६), नंदकिशोर पगारे (३७), एकनाथ कांगणे (३८), काशिफ सैय्यद (३९), रोहित मोटकरी (४०), नंदा मथुरे (४१), जयराम गवळी (४२), गणेश जाधव (४३), राजेंद्र तायडे (४४), शरद मोरे (४५), सोमनाथ गायकवाड (४६), कैलास ह्याळीज (४७), विशाल मटाले (४८), विजय साळवे (४९), छगन भंदुरे (५०), बंडोपंत दातीर (५१), भाऊसाहेब बोराडे (५२), सोहिल पठाण (५३), रवींद्र राठोड (५४), प्रवीण बैसाणे (५५), मधुकर पाटील (५६), स्वप्नील घोडके (५७), गौरव विसपुते (५८), सूर्यभान घाडगे (५९), वासिम शेख (६०), विक्रम कोठुळे (६१).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिनाम महोत्सव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

वारकरी संप्रदायाचा वारसा व उदात्त शिकवण गेल्या १०० वर्षापासून सांभाळणाऱ्या लामरोड भागातील भैरवनाथ मंदिरात चैत्र शुद्ध ६ अर्थात बुधवारपासून (दि. २५) मार्च शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. हा सोहळा चैत्र शुद्ध १२ (द्वादशी) म्हणजेच १ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

सप्ताहात दररोज पहाटे ५ ते ७ काकडा भजन, सकाळी ८ ते ११ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ संत तुकाराम महाराज रचित गाथा पारायण, दुपारी २ ते ५ पंचक्रोशीतील महिला मंडळांचा भजन, सायंकाळी ५ ते ७ भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढीतील सदस्यांचा हरिपाठ, सांयकाळी ६ ते ७ प्रवचन, रात्री ९ ते ११ दरम्यान कीर्तन अशी कार्यक्रमांची रूपरेषा असून चैत्र शुद्ध नवमीस रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

बुधवारी (दि. २५) सांयकाळी ६ ते ७ हभप गजेंद्र महाराज रजपुत यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ हभप उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन, गुरुवारी (दि. २६) शांताराम महाराज बोडके यांचे प्रवचन तर हभप संजय महाराज धोंगडे यांचे कीर्तन, शुक्रवारी (दि. २७) हभप किशोर महाराज खरात यांचे प्रवचन तर हभप महंत डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे कीर्तन, शनिवारी (दि. २८) हभप जयंत महाराज गोसावी यांचे प्रवचन तर हभप एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन, रविवारी (दि. २९) हभप शिवलिंग स्वामी लातुरकर यांचे प्रवचन तर हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे कीर्तन, सोमवारी (दि. ३०) हभप माधव महाराज राठी यांचे प्रवचन तर हभप पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन, मंगळवारी (दि. ३१) हभप एकनाथ महाराज गोळेसर यांचे प्रवचन तर हभप संदीपन महाराज शिंदे यांची कीर्तन होईल. बुधवारी, १ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ दिंडी सोहळा, ९ ते ११ हभप एकनाथ महाराज गोळेसर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर लामरोड भागात माहेरवाशीणींची ओटी भरण कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधारामुळे अपघातांचा धोका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडवर अपघाताची मालिका सुरू असतानाही पथदीप बंद असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेलरोडच्या करन्सी प्रेसपासून शिवाजीनगर पर्यंत पथदीप बंद आहेत. रात्री नेहरुनगर, गोरेवाडी, कॅनलरोडहून अचानक वाहन आल्यास अपघात होऊ शकतो. या मार्गावर २४ तास अवजड वाहतूक सुरू असते. नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरूनच जावे लागते.

महिनाभरापूर्वी इंगळेनगरच्या चौकात रात्री रस्ता ओलांडताना ट्रकखाली महिला चिरडून ठार झाली होती. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे व वाहनांवर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला होता. या चौकात हायमास्टची गरज असताना पोलच्या मध्यभागी दोन छोट्या ट्यूबलाईट बसविण्यात आल्या. आठवडाभर चालल्यानंतर त्या बंद पडल्या आहेत. सध्या करन्सी प्रेसपासून शिवाजीनगरपर्यंत पथदीप बंद आहेत. जेथे अपघात झाला त्या इंगळेनगर चौकात अंधाराचे साम्राज्य आहे. पुन्हा अपघात होऊन बळी गेल्यास जमावाला रोखणे अवघड होईल, अशी परिस्थिती आहे.

पोलिस चौकी बंद

इंगळेनगर चौकातील पोलिस चौकी बहुतांश वेळा बंदच असती. अपघात अथवा गुंडगिरीची घटना घडल्यास नागरिकांना तक्रार देण्यासाठी नाशिकरोड किंवा उपनगर पोलिस ठाण्यात जावे लागते. ही पोलिस चौकी २४ तास कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांची गस्त नसल्यामुळे किमान पोलिस चौकी तरी सुरू ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

जेलरोडच्या कॉलनी आणि मुख्य रस्त्यावरील पथदीप बंद असल्यामुळे अपघात होत आहेत. चेन स्नचिंग, महिलांची छेडछाड असे प्रकार वाढले आहेत. जेलरोडचे बंद पथदीप त्वरित सुरू केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याशिवाय जनतेकडे पर्याय राहणार नाही. - गणेश गडाख

पुलावर पथदीपच नाहीत

जेलरोडच्या जर्नादन स्वामी पुलावर पथदीपच नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात रात्री समोरून आलेल्या ट्रकखाली सापडून एकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही जमाव प्रक्षुब्ध बनला होता. पुलाच्या वळणापासून नांदूर गावापर्यंत पथदीपच नाहीत. नगरसेवक आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही ते लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक हजाराची नोट’ `नीफ`मध्ये सर्वोत्कृष्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अप्रतिम विद्युत रोषणाई, नयनरम्य वातावरण आणि मराठी सिनेअभिनेते व अभिनेत्री यांच्या उपस्थितीत, प्रेक्षकांच्या जल्लोषात सुला विनयार्ड येथे नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (नीफ) चा समारोप झाला. 'एक हजाराची नोट' ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. नागेश भोसले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर उर्मिला कानेटकर हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी फ्रान्सचे मारिया कार्गो, फेड्रिक विनंग, तर गिरीश वानखेडे, जगदीश होळकर, माजी आमदार बबन घोलप आणि `नीफ`चे संचालक मुकेश कणेरी उपस्थित होते. नृत्यामध्ये रेवा डांस अकादमीच्या विद्यार्थ्यांनी 'डोला रे डोला' गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. विशेष आकर्षण १०० दिवसांत १०० लघुपटांची निर्मिती करणारे बेंगळूरूचे चंद्र दत्त यांचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर करसवलत मिळेल

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक शहरवासियांना महापालिका आयुक्तांनी वेळेआधी कर भरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर मुदतीआधी कर भरणा-यांना पाच टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. यातून महापालिकेचे उत्पन्न वाढेल, असा दावा आयुक्तांनी केला आहे.

महापालिकेने ठरवून दिलेले मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. चालू वर्षी ठरवून दिलेले उद्दिष्टे पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे आता महापालिकेने वेळेआधी कर भरण्याची सुविधा एप्रिलपासून उपलब्ध करून दिली आहे. सर्वसाधारण कर, अग्निशामक कर, स्वच्छता कर यांसह मालमत्ताकरासाठी ही योजना लागू असेल.

मालमत्ता कर एप्रिलमध्येच भरला तर, एकूण कराच्या पाच टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. तर मे महिन्यात मालमत्ता कर भरल्यास तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. तर जूनमध्ये कर भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. नागरिकांनी मनपाच्या वेबसाईट जावून आपल्या कराची माहिती घेवून आयसीसीआय बँकेत ऑनलाईन कर भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आयुक्तांकडून साधुग्रामची पाहणी

मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोमवारी साधुग्रामला भेट घेवून तिथल्या सोयी-सुविधा आणि उपाययोजनांची पाहणी केली आहे. आयुक्तांनी तब्बल तीन तास सुविधांची पाहणी करून आवश्यक बदल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. साधुग्राममध्ये दहा सेक्टर्समध्ये फलक लावण्यासह संबधीत अधिकाऱ्यांची नावे, नंबर टोल फ्री नंबर लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोबतच साधुंच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. वणी सेक्टर जवळ असलेली एसटी महामंडळाची चार एकर जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमित ठाकरेंचा राजकारणात प्रवेश

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पाठापोठ ठाकरे घराण्याच्या युवा पिढीतील आणखी एक ठाकरे राजकारणात उडी घेत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे नाशिकमधून राजकारणाचा श्रीगणेशा करणार आहेत. मंगळवारी (दि. २४) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक होत असून, त्यांच्याशी अमित ठाकरे सवांद साधणार आहेत.

नाशिकमध्ये मनसेची सत्ता असूनही पक्ष फारशी समाधानकारक कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे ठाकरेंकडून आता ज्युनिअर ठाकरेंना मैदानात उतरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत अमित ठाकरे हे राज ठाकरेंसोबत नाशिकच्या दौऱ्यात हजेरी लावून राजकारणाचा अभ्यास करीत होते. आता मनविसेची कमान हातात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरेंचे आवडते नाशिकचेच मैदान निवडण्यात आले आहे. मगंळवारी नाशिकमध्ये मनविसेची राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष राजन शिरोडकर यांच्या उपस्थितीत होत आहे. अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

सेनेला शह देण्याचा प्रयत्न

शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या रूपाने तरूणांना आकर्षित करणारा एक चेहरा आहे. मनसेत मात्र अशा चेहऱ्याची कमतरता असून, अमित ठाकरेंना त्यासाठी मैदानात उतरविले जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडे आकर्षित होणारा युवा वर्ग मनसेकडे येईल अशी मनसेला अपेक्षा आहे. त्यासाठीच अमित ठाकरेंना मैदानात उतरविले जात असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षनेतेपदाचा वाद

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद काढून घेण्याच्या निर्णयाला शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी मुबंई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, त्यावर आज, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कविता कर्डक यांनी पदभार स्वीकारण्याचे सोमवारी टाळले.

गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत महापौर अशोक मुर्तडक यांनी बडगुजर यांचे विरोधी पक्षनेते पद काढून घेत, राष्ट्रवादीच्या कविता कर्डक यांची त्या पदावर नियुक्ती केली आहे. विरोधी पक्षनेते पदाचा वाद न्यायालयात प्रलंबित असतांनाच महापौर मुर्तडक यांनी बडगुजर यांचे पद काढून घेतले होते. त्यास बडगुजर यांनी सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. ओक यांच्या पिठाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. बडगुजर यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने कविता कर्डक यांनी पदभार स्वीकारण्याचे सोमवारी टाळले.

पाटी पुन्हा अवतरली

बडगुजर यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेतल्यानंतर प्रशासनाने बडगुजर यांच्या दालनाची नावाची पाटी शुक्रवारी काढून घेतली होती. त्यामुळे बडगुजर यांनी सबंधीत अधिका-यांना धारेवर धरीत, न्यायप्रवीष्ट बाब असतांना केलेल्या घाईबद्दल आक्षेप घेतला. त्यातच सोमवारी उच्च न्यायालयात निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्याने प्रशासनाने त्यांच्या दालनासमोर पुन्हा नावाची पाटी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक मनपाच्या स्थायीसाठी संघर्ष

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची मंगळवारी निवडणूक होत आहे. प्रत्यक्षात सक्षम विरोधक नसल्याने सभापती निवडीची औपचारिकता तेवढी बाकी असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी चुंभळे यांची निवड जवळपास निश्चित असून, काँग्रेसला राजी करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपानेही आरपीआयच्या ललिता भालेराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ही लढत खरोखरोरच दुहेरी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सभापतीपदासाठी चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. त्यात 'राष्ट्रवादी'चे शिवाजी चुंभळे, काँग्रेसतर्फे राहुल दिवे, भाजपचे प्रा. कुणाल वाघ, शिवसेना-आरपीआय युतीकडून ललिता भालेराव यांचा समावेश आहे. महापालिकेतील सत्ताधारी मनसेने या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्षांचे गणित जुळल्याने चुंभळे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपने निवडणूक बिनविरोध न होवू देण्यासाठी कंबर कसली असून, आरपीआयच्या ललिता भालेराव यांनासयुंक्त उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार राहुल दिवे यांचीही नाराजी दूर झाल्याची चर्चा असून, दिवे आणि कुणाल वाघ आपली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीत मनसे ५, राष्ट्रवादी ३, शिवसेना आरपीआय ३, भाजप २,काँग्रेस २ आणि अपक्ष एक असे १६ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यात राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांचे गणित जुळले असून, त्यांना काँग्रेसच्या दोन सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे जवळपास ११ सदस्यांचे संख्या बळ आहे तर, शिवसेना-भाजपचे संख्याबळ हे ५ जणांचे आहे. त्यामुळे ११ विरूद्ध ५ असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे प्रथमच सत्ताधारी मनसेचा उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार नाहीत.

कडेकोट बंदोबस्त!

स्थायी समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणूक होईल. विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून अप्पर विभागीय आयुक्त सोनाली पोंक्षे या निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत. गोंधळ होवू नये यासाठी महापालिकेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस सज्ज राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांडेकर प्रकरणाची चौकशी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी पूर्ण केली आहे. याबाबतचा अहवाल त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे सोमवारी सोपवला. या अहवालाच्या छाननीनंतर वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली आहे.

मनपा शिक्षण मंडळाच्या निलंबित प्रशासन अधिकारी किरण कुंवर आणि निलंबित मुख्याध्यापिका खांडेकर यांच्यात गुरूवारी वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. खांडेकर यांनी कुंवर यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यामुळे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दोरकुळकरांना चौकशी आदेश दिले. त्यांनी शुक्रवारी आणि शिक्षण मंडळात जावून काही जणांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. सोबतच शिक्षक संघटनांचीही बाजू ऐकली. त्यानंतर सोमवारी आपला सविस्तर अहवाल सोमवारी चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अहवालाची छाननी केली जाणार असून, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. छाननीनंतर आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्रचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपमानास्पद शब्द वापरण्याबरोबरच शिक्षण संस्थेच्या कार्यालयात येवून संस्थेविषयी अपशब्द काढणारे आणि अरेरावी करणारे उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांच्याविरोधात शिक्षण संस्था चालकांनी एल्गार पुकारला आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेने सूर्यवंशी यांची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली असून, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषदेद्वारे सूर्यवंशी यांच्या अरेरावीची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यामुळे नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

उपसंचालक सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभाराच्या अनेक गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. ७५ ते १०० वर्ष झालेल्या शिक्षण संस्थांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी अपमानास्पदजनक शब्द वापरत असल्याची तक्रार संस्थाचालकांनी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत सूर्यवंशी यांची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मविप्र संस्थेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले आहे. तसेच, या प्रकरणी शिक्षक आमदार रामनाथ मोते, आमदार देवयानी फरांदे, सुधीर तांबे यांच्याकडेही तक्रार केल्याचे मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले आहे.

मविप्र संस्थेची बदनामी

काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेची पाहणी करण्यासाठी सूर्यवंशी केटीएचएम कॉलेजमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना सुरक्षा रक्षकाने हटकले. त्याचा राग येऊन सूर्यवंशी यांनी चिफ कंट्रोलर यास शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर ते मविप्रच्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संस्थेविषयी अपमानजनक शब्द वापरल्याचे मविप्रच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

'आमची संस्था, आम्हीच चोर?'

काही दिवसांपुर्वी सूर्यवंशी हे सीबीएससमोरील बिटको हायस्कूलमध्ये आले. तेथील तळमजल्यावर दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. आर्थिक वर्ष अखेर असल्याने विविध बाबींवर निर्णय त्यात घेतले जात होते. त्याचवेळी सूर्यवंशी यांनी काही अधिकाऱ्यांना बैठकीच्या ठिकाणी पाठवून तातडीने बाहेर पडण्यास सांगितले. संस्थेच्याच इमारतीत असतानाही असा प्रकार घडत असतानाही सर्व पदाधिकारी बाहेर पडले. त्याचवेळी सूर्यवंशी यांनी अर्वाच्च भाषेत पदाधिकाऱ्यांना खडसावले. १२वीची परीक्षा सुरू असताना तुम्ही येथे आलात तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन, अशा दमही दिल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी सांगितले आहे. आमच्याच संस्थेत आम्हाला सूर्यवंशी यांनी चोर ठरविल्याची खंतही वैशंपायन यांनी बोलून दाखविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाचे वाङमयीन पुरस्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेतर्फे सोमवारी विविध वाङमयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या १७५ वा वार्षिकोत्सवात शनिवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहा वाजता वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

ललितेतर ग्रंथासाठी देण्यात येणारा डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार सुकन्या आगाशे यांच्या 'मागोवा मिथकांचा'ला जाहीर झाला आहे. उमेदीने कथा लिहिणाऱ्या गटातील डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार डॉ. वृन्दा भार्गवे यांना, ग. वि. अकोलकर पुरस्कार डॉ. दाऊद दळवी ठाणे यांच्या भारतातील मुस्लिम स्थापत्यकथा या ग्रंथास जाहीर झाला आहे. सामाजिक, वैचारिक विभागात देण्यात येणारा मु. ब. यंदे पुरस्कार यंदा राजीव साने यांना जाहीर झाला आहे. लघुकथासंग्रहासाठी देण्यात येणारा पु. ना. पंडित पुरस्कार 'ळ' या कथासंग्रहाचे लेखक संजीव लाटकर यांना, कादंबरी लेखनासाठी देण्यात येणारा कै. धनंजय कुलकर्णी पुरस्कार डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या मुळारंभ कादंबरीस, कै. अशोक टिळक पुरस्कार अभिराम भडकमकर यांच्या 'बालगंधर्व'स देण्यात येणार आहे.

या वार्षिकोत्सवादरम्यान २९ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प.सा. नाट्यगृहात अभय माणके आणि सहकारी (इंदोर) यांचा गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांसाठी नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांनी माफी मागावी!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी काढलेले वादग्रस्त वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. ना. पाटील यांनी भुजबळ यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे.

भुजबळ कुटुंबीयांना भेटण्यासाठी यापुढे जेलमध्ये जावे लागेल, असे खळबळजनक वक्तव्य ना. पाटील यांनी केले आहे. त्याचा राष्ट्रवादीने तीव्र निषेध केला आहे. भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी न्यायप्रविष्ट असल्याने पाटील यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून त्यांच्या पदाची व शासनाची अप्रतिष्ठा करू नये, असेही अॅड. पगार यांनी म्हटले आहे. घटनेने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असला तरीही कोणावरही बिनबुडाचे व बदनामी होईल, असे वक्तव्य करणे योग्य नाही. भुजबळ यांच्यावर केलेले आरोप हे निरर्थक असून, राजकीय स्वार्थापोटी केल्या गेलेल्या बदनामीचा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत, असे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंटेलने घेतली कुंभथॉनची दखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग अन् शिक्षण या क्षेत्रांच्या समन्वयातून उभारलेल्या 'कुंभथॉन' व्यासपीठाची दखल 'इंटेल' या जगातील सर्वात गतिमान मायक्रो प्रोसेसर व सेमीकंडक्टर बनविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतली आहे. या कंपनीने तांत्रिक सहकार्याचा हात पुढे करीत कुंभथॉन टीमला उच्चप्रतीचे अत्याधुनिक संगणक दिले आहे.

दूरध्वनी टॉवर डाटाच्या माध्यमातून रहदारीचा ओघ समजून घेत गर्दी-नियंत्रण, भाविकांना लागणाऱ्या मदतीवर आधारित 'कुंभ-सहाय्यक', शहराचे विविध मार्ग दाखवणारे नकाशे, कुंभमेळा दरम्यान घटनाक्रम तसेच माहिती सांगणारे 'कुंभलाईव्ह' मोबाइल अॅप, रुग्णास तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे 'मेडिट्रॅकर', शहरातील सर्व दुकाने ऑनलाइन करणारी ऑल शॉपस् ऑनलाइन सेवा, इंटरनेटचा वापर करीत अन्नदाते व गरजू यांची सांगड घालणारी 'अन्नदान' ही अन्न-पुरवठा यंत्रणा तसेच चित्रस्वरूपातील नकाशे अर्थात 'इलेव्हेटेड थ्रीडी मॅप्स' इत्यादी प्रकल्पांना गरजेनुसार उच्चप्रतीचे अत्याधुनिक संगणक देऊन गौरवण्यात आले.

नुकत्याच झालेल्या कुंभथॉन - ४ मध्ये इंटेलचे एसिया स्पेसिफिक जपान, डीव्हलपर आणि पार्टनर प्रमुख सचिन केळकर यांनी प्रत्यक्ष भेट देत मार्गदर्शन केले. त्यावेळी सादर केलेल्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करून इंटेल मार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी मान्य केले. परतीच्या करारावर गरजू गटांना संगणक पुरवठा करीत त्याची लगेच सुरुवात केली. कुंभथॉनच्या साप्ताहिक बैठकीत संगणक वाटपाचा हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक मंडळ, महात्मानगर सभागृहात पार पडला. यावेळी सुधा बाम, जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मनोहर देशपांडे, सिएसायचे डॉ. सुधीर साने, संदीप कारखानीस, कुंभथॉनचे सुनील खांडबहाले, संदीप शिंदे, गिरीश पगारे, सुभाष पाटील, क्रेडीलाचे महेश गुजराती व कुंभथॉनचे सर्व संशोधक गट उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार पो.निरीक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले असून, त्यामध्ये उपनगरचे तत्कालीन निरीक्षक हेमंत सावंत आणि विद्यमान निरीक्षक नम्रता देसाई यांचाही समावेश आहे. दरम्यान, सोमवारी एसीपी प्रशांत वाघुडे हे देखील पोलिस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. एसीपी झेंडे आणि गोरे यांच्यानंतर पदभार स्वीकारणारे ते तिसरे एसीपी आहेत.

उपनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक न्रमता देसाई यांची पुन्हा पोलिस आयुक्तालयात विशेष शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गुन्हे शाखेचे अशोक भगत रूजू झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात देसाई यांच्याकडे उपनगर पोलिस स्टेशनचा कार्यभार सोपविण्यात आला होता. शहरातील एखाद्या पोलिस स्टेशनचा कार्यभार सोपविण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या. उपनगर पोलिस ठाण्यावर दोन महिन्यांपूर्वी लष्कराच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. त्या प्रसंगाला देसाई यांनी धैर्याने तोंड दिले होते. त्यांच्या जागी बदलून आलेल्या भगत यांनी नाशिकरोड येथे सहाय्यक निरीक्षक, वाहतूक शाखा तसेच गुन्हे अन्वेषण विभाग दोनमध्ये निरीक्षक म्हणून काम केले आहे. देसाई यांच्यापूर्वी उपनगरमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या हेमंत सावंत यांना दरोडाप्रकरणी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. सोमवारी ते इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रूजू झाले. तेथील वरिष्ठ निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. देसाई यांना पुन्हा विशेष शाखेला बोलावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेस अॅक्रॉस अमेरिका

$
0
0

'रेस अॅक्रॉस अमेरिका'साठी महाजन बंधू सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगातील अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या 'रेस अॅक्रॉस अमेरिका' या स्पर्धेसाठी नाशिकच्या हितेंद्र महाजन व महेंद्र महाजन बंधूंची निवड झाली आहे. ही रेस जून २०१५ मध्ये होणार आहे. संपूर्ण जगात मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाजन बंधूंनी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी फार मोठ्या निधीची आवश्यकता असून, शहरातील जास्तीत जास्त संस्थांनी पुढे येऊन या समाजकार्याला हातभार लावावा, असे आवाहन सायकलप्रेमींनी केले आहे.

या रेससाठी मिळालेल्या मदतीतून हे दोघे जण गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणार आहेत. यात मिळालेला निधी हा जास्तीत जास्त गरजू लोकांच्या आरोग्यावर खर्च होणार आहे. 'टूर द फ्रान्स' पेक्षा अवघड असलेल्या या रेसमध्ये नऊ दिवसात ४ हजार ८०० किलोमिटर अंतर पार करायचे आहे. अत्यंत कठोर परिश्रमातून महाजन बंधुंच्या 'टिम ऑफ टू'ची निवड झाली आहे. २० जूनला सुरू होणाऱ्या स्पर्धासाठी महाजन १४ जून रोजी अमेरिकेला रवाना होणार आहेत. या रेसमध्ये अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास करावा लागणार असून, नऊ दिवसाच्या प्रवासात उष्ण वाळवंट, बर्फाळ प्रदेश, सह्याद्री सारख्या पर्वतरांगा, ५० डिग्रीपर्यंत उष्णता, तसेच उणे तपमानचाही सामना करावा लागणार आहे. स्पर्धेत वेगवेगळ्या वातावरणाशी सामना करीत समुद्र सपाटीपासून दहा हजार फूट उंचीवर जावे लागणार असून, १ लाख ७० हजार फूट प्रवास करावा लागणार आहे. या रेसमध्ये सहभागी व्हावे, असे जगातील सर्व सायकलिस्टचे स्वप्न असते. 'टफेस्ट रेस ऑफ द वर्ल्ड' असेही या रेसला संबोधण्यात येते. या रेसमध्ये 'टूर द फ्रान्स' सारख्या स्टेजेस नसतात. टूर द फ्रान्सचा प्रवास ३५ दिवसाचा असतो मात्र 'रेस अक्रोस अमेरिका' या स्पर्धेत ४ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ९ दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. रेसला १०० किलोमीटरसाठी १ लाख रुपये असा खर्च अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूच्या ‘वळूं’ना वेसण

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'वाळू'चे वळू या सीरिजमधून समोर आणला आणि जागे झालेल्या जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने सोमवारी मनमाड-नांदगाव मार्गावरील धोटाने शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर मुद्देमालासह पकडला. ट्रॅक्टरचालक व मालकाला अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातून दररोज हजारो ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सर्रास सुरू आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत वाळूमाफियांचे कारनामे आणि पोलिस, महसूल तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांना मिळणाऱ्या पाठबळाचा पर्दाफाश करीत घरभेदींच्या मुसक्या कोण आवळणार असा सवालही करण्यात आला होता. या वृत्तानंतर तहसीलदार सुदाम महाजन यांना या भागात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित हालचाली करून संशयिताना वाळूच्या ट्रॅक्टरसह पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर नांदगाव तालुक्यातही वाळूमाफिया सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसीलदार सुदाम महाजन हे मंडल अधिकाऱ्यांसह मनमाड-नांदगाव मार्गावरून जात असता त्यांना धोटाने शिवारालगत इंडियन ऑईल बॉटनिंग प्लॉन्टजवळ चोरीची वाळू घेऊन विक्रीच्या उद्देशाने जात असलेला ट्रॅक्टर आढळून आले. त्यांनी हा ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेऊन रीतसर फिर्याद दाखल केली. कैलास मधुकर बागुल यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरमालक शब्बीर हुसेन शेख मनमाड व चालक नाना बारकू सोनावणे बुरकुलवाडी यांच्यावर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार सुदाम महाजन यांच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रक घालून जीवे मारण्याची घटना ताजी असताना नांदगाव तालुक्यातही वाळू माफिया सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अव्वाच्या सव्वा भाव मग कसा होईल लिलाव ?

चार सहा वर्षांपूर्वी काही लाखांमध्ये जाणाऱ्या वाळू ठिय्यांचे (स्थळांचे) लिलाव जिल्हा प्रशासनाने कोटींच्या घरात नेऊन ठेवले आहेत. ठेक्यांच्या अव्वाच्या सव्वा किंमती, जाचक अटी, वाळू साठ्याबाबतची अनिश्चितता आणि नियमांत राहूनही चिरीमिरीसाठी सरकारी बाबूंकडून होणारी असह्य अडवणूक अशा अनेक कारणांमुळे वाळू लिलाव म्हणजे ठेकेदारांना 'घर घालू' धंदा वाटू लागला आहे. विशेष म्हणजे ठेका घेणे परवडत नाही अशी ठेकेदारांनी ओरड सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील १७ पैकी दोनच ठिय्यांचा लिलाव झाला आहे.

ठेकेदारांनी नाशिकमधील ठिय्यांना बाय बाय करीत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगरमधील वाळू ठिय्यांना पसंती दर्शविली आहे. विशेष म्हणजे ठेका घेणे परवडत नाही अशी ठेकेदारांची ओरड असून, सामान्य ग्राहकांना मात्र पाच ते सहा हजार रुपये ब्रासनेच वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे या सर्व आर्थिक व्यवहारांमधून निघणारी मलई कोणाच्या घशात जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील १५ वाळू ठिय्यांचे ठेके लिलावधारकांच्या गळी उतरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असून, त्यासाठी गौन खनिज विभागाने तीनवेळा लिलाव प्रक्रिया राबवली. मात्र १७ पैकी पळसे आणि जाखोरी या दोनच ठिय्यांचा लिलाव होऊ शकला. नाशिक तालुक्यातील कालवी, उभाडे, उंबरकोन आणि भगूर, त्र्यंबेकश्वर तालुक्यातील कास, निफाडमधील तामसवाडी, देवळ्यातील लोहणेर, कळवण तालुक्यातील कळवण आणि देसगाव, बागलाण तालुक्यातील धांद्री तर मालेगाव तालुक्यातील आघार, सावतावाडी, वडनेर, चिंचावड, वळवाडे, सवंदगाव या ठिय्यांना अजूनही वाळू ठेकेदारांची प्रतीक्षा आहे.

बहुतांश ठिय्यांवरील वाळूचे प्रमाण घटूनही तेथील लिलावांचे दर प्रशासनाने कोटींच्या घरात ठेवले आहेत. नदीपात्रात वाळूचा अल्पसाठा आणि त्यासाठी निर्धारीत अवाजवी किंमती हा आतबट्ट्याचा व्यवहार असून, आम्ही तो कसा करणार असे लिलावधारकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अटी आणि शर्थींमध्ये अंदाजित वाळूसाठा असे नमूद करून प्रशासनाने आपले अंगही काढून घेतले आहे. कोट्यवधींची गुंतवणूक करूनही तेवढी वाळूच निघाली नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. म्हणूनच ही लिलाव प्रक्रिया ठेकेदारांना घाट्याचा सौदा वाटू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने अपसेट प्राइज २५ टक्क्यांनी कमी करूनही त्या दरात लिलाव घेणे परवडत नसल्याचे म्हणणे ठेकेदारांनी महाराष्ट्र टाइम्सकडे मांडले.

वाळू ठेक्याचे गणित

६ टायरच्या ट्रककरिता वाळूची रॉयल्टी तीन ब्रास देण्यात येते. त्यासाठी ठेकेदार साडेतीन ते चार हजार रुपये घेतो. गाडीला अंदाजे सात हजार रुपयांचे डिझेल लागते. १ हजार ५०० रुपयांचा टोल भरावा लागतो. चालकाचा खर्च ५०० रुपये, गाडीचा घसारा ५०० रुपये, गाडी खाली करण्याचे ५०० रुपये द्यावे लागतात. असा एकूण खर्च १० हजार रुपये होतो. गाडीमध्ये अंदाजे साडे तीन ब्रासपर्यंत वाळू असते. आज मार्केटचा भाव साधारणत: साडेचार ते पाच हजार रुपये आहे. एकूण गाडीचे पैसे येतात १४ ते १५ हजार रुपये. खर्च वजा जाता गाडी मालकास चार ते पाच हजार रुपये शिल्लक राहतात. त्यामध्ये गाडीची देखभाल दुरुस्ती, ड्रायव्हरचा पगार, ठेका घेण्यासाठी उचललेल्या कर्जाचे हप्ते असा सर्व खर्च बसविला जातो. त्या त्या ठिकाणच्या वाळूनुसारही प्रति ब्रास दर बदलतात.

चोर सोडून संन्याशांनाच फाशी

दोनशे रुपये ब्रास दराने वाळू लिलाव घेण्याची सवय असलेल्या ठेकेदारांना आता त्याच ठिय्यांवरील ठेक्यासाठी प्रतिब्रास आठशे ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. ब्रासच्या दरात दरवर्षी १५ टक्के वाढीचे सरकारचे धोरण ठेकेदारांना मान्य असले तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी ठेक्यांच्या किंमती वाढल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व अटी शर्थींची पूर्तता करूनही पोलिस, आरटीओ अधिकारी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन ठेकेदारांना जेरीस आणत आहेत. नियमात असो अथवा नसो ठेकेदारांना तहसीलदारांपासून प्रांतांपर्यंत सर्वांनाच पैसे वाटावे लागतात. चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे धोरण राहिले, तर त्यांच्यावर हल्ले का होणार नाहीत असा प्रश्न अनेक वाळू ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बर्गरमध्ये रबराचे तुकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांनी तेथील हॉटेलमधून घेतलेल्या बर्गरमध्ये रबराचा तुकडा आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असल्याचे 'एफडीए'ने स्पष्ट केले आहे.

नीलेश कासार आणि पवन चितमलकर हे दोघे सिनेमॅक्स येथे चित्रपट बघण्यासाठी शनिवारी गेले होते. इंटरव्हल झाल्यानंतर त्यांनी तेथील हॉटेलमधून बर्गर खरेदी केले. चित्रपट बघतांना त्यांना या बर्गरमध्ये तीन सेंटीमीटरचा रबराचा तुकडा लागला. याबाबत त्यांनी संबंधित हॉटल चालकांकडे तक्रार केली. तसेच सिनेमॅक्स व्यवस्थापनाकडे इमेलद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली. याबाबत सिनेमॅक्सच्या स्थानिक व्यवस्थापनाने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच बर्गरमधील टिक्कीत रबर असून ते आम्ही अन्य कंपनीकडून घेत असल्याचेही स्पष्टीकरण दिल्याचे चितमलकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत ‌मेलवरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कासार आणि चितमलकर यांनी 'एफडीए'कडे लेखी तक्रार केली. तसेच बर्गरचे फोटो आणि अन्य माहिती दिली. याविषयी 'एफडीए'कडे विचारणा केली असता त्यांनी अशी तक्रार मिळाल्याचे सांगत या‌प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images