Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मनवीकासे’चे १ मार्चला राज्यस्तरीय अधिवेशन

$
0
0

नाशिक : वीज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ मार्च रोजी होणार आहे. जेलरोड येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी उद्घाटन सत्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, उत्तमराव ढिकले, मंगेश सांगळे जयप्रकाश भोसले, आ. शरद सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत. वीज कर्मचारी व अधिकारी यांच्या पाल्यांना वीज कर्मचारी भरतीत आरक्षण देण्यात यावे, वीज कंपन्यांमधील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, मराठी भूमीपुत्रांना भरतीमध्ये ८० टक्के आरक्षण द्यावे, खासगीकरण थांबविण्यात यावे, अनुकंपा नोकरी प्रक्रियेतील जाचक अटी रद्द कराव्यात, मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा, अन्यायकारक बदली धोरण थांबवावे, पेन्शन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला द्यावा आदी मागण्या या अधिवेशनांत मांडण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस राकेश जाधव, सुमंत तारी, दिलीप राजे, भाऊसाहेब गांगुर्डे आदी उपस्थित होते.


वक्फ बोर्ड सीईओ हटविण्यासाठी हालचाली

$
0
0

भूखंड माफियांचा कट; वक्फ विश्वस्तांचा बदलीस विरोध कायम

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डचा कारभार हाती घेतल्यानंतर भूखंड माफियांना न जुमानता धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सय्यद एजाज हुसेन यांना हटविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आपली बदली करण्यात यावी, यासाठी आता खुद्द सय्यद यांनीच अर्ज केला आहे. मात्र, त्यांना सोडण्यास वक्फ बोर्डाचे विश्वस्त राजी नाहीत. या विश्वस्तांनी सय्यद यांची बदली करण्यात येऊ नये, असे राज्य सरकारला साकडे घातले आहे.

पदभार स्वीकारल्यापासून वक्फ बोर्डाच्या हिताचे अनेक निर्णय सय्यद यांनी घेतले. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या कोट्यवधींच्या जमिनी व मिळकतींवर डोळा असलेले अनेक दुखावले गेले. यामुळे सय्यद यांचा इतरांसह बोर्डाच्याच काही सदस्यांकडून छळ सुरु झाला. शेवटी या सर्व प्रकाराला वैतागून सय्यद यांनी आपली अन्यत्र बदली करण्यात यावी, असा विनंती अर्ज राज्य सरकारला दिला असून यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक वक्फ विश्वस्तांनी वक्फ बोर्डाच्या मिळकती व जमिनीं हिताचे रक्षण करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करू नये असे निवेदन राज्य सरकारला केले आहे. त्यामुळे सरकारने सीईओ सय्यद यांची औरंगाबाद न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आल्यानंतरही त्यांना वक्फ बोर्डातून सोडलेले नाही.

वक्फ बोर्डाच्या अधीन राज्यभरातील वक्फ जमिनी व मिळकतींवर देखरेख नियंत्रण असून वक्फच्या मिळकती अनेक ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. वक्फ बोर्डाच्या या जमिनी व मिळकती बळकावण्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. या जमिनी व मिळकतींसाठी वक्फ बोर्डाच्या सीईओ आपल्या मर्जीतील असला म्हणजे काम सोपे होईल, असा कयास भूखंडमाफियांनी बांधला होता. मात्र, सीईओ सय्यद यांनी आपल्या कार्यपध्दतीमुळे त्यांच्या मनसुब्यांमध्ये अडथळे आले.

त्यामुळेच सय्यद यांच्या बदलीसाठी राजकीय पातळीवर षडयंत्र रचण्याचे मानले जात आहे. तसेच त्यांना बोर्डाच्याच काही सदस्यांकडून त्रास देण्यास सुरुवात झशली. या सर्व प्रकारांना कंटाळून सीईओ सय्यद यांनी स्वत:हून बदलीसाठी राज्य सरकारकडे अर्ज दिला. मात्र, त्यांची बदली होऊ नये यासाठी बोर्डाचे विश्वस्त सरसावले आहेत. राज्य सरकारचे अत्यंत सावधगिरीने हे प्रकरण हाताळत आहे.

बदली कोठेही करावी असा विनंती अर्ज मी राज्य सरकारला दिलेला आहे. त्यानुसार औरंगाबाद न्यायालयात माझी न्यायाधीश म्हणून बदलीचे आदेश जारी झाले आहेत. परंतु, मला वक्फ बोर्डातून सोडण्यात आलेले नाही.

- सय्यद एजाज हुसैन,

सीईओ, राज्य वक्फ बोर्ड, औरंगाबाद

गार्डनसिटीला प्रतीक्षा राजाश्रयाची

$
0
0

जेलरोडला उभारणार 'ऑल इन वन गार्डन'; शिखर प्रतिष्ठानचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या शिखर प्रतिष्ठानतर्फे जेलरोड येथे ६० लाख रुपये खर्चून १६०० चौरस मीटरच्या भूखंडात 'ऑल इन वन गार्डन' उभारले जाणार आहे. महापालिकेला कोणताही खर्च नसताना दोन महिन्यांपासून आयुक्तांच्या सहीसाठी दोन महिने फाईल थांबली आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी परदेशातील आधुनिक गार्डनचा अभ्यास करून या गार्डनचे स्केचेस तयार केले आहेत. डिसेंबरमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असता ते दाखवले. राज यांनीही या प्रकल्पाचे कौतुक करताना नाशिकला गार्डन सिटी करण्यासाठी हे पहिले पाऊल असल्याचे प्रशस्तीपत्र दिले होते. त्यांनी १२ डिसेंबरपर्यंत भूखंड हस्तांतरित करण्याची सूचनाही महापौर अशोक मुर्तडक यांना केली होती.

आयुक्त सही कधी करणार?

राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ १६०० चौरसमीटरच्या भूखंडावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. वर्षाला दीड लाख देखभाल खर्च असून तो प्रतिष्ठान करणार आहे. सात वर्षांनंतर गार्डन महापालिकेला हस्तांतरीत केले जाईल. गार्डनमध्ये प्रवेश विनामूल्य राहील, व्यवसायासाठी त्याचा वापर केला जाणार नाही, अशी लेखी हमी प्रतिष्ठाने दिली आहे. उद्यान विभाग, नगररचना विभागाने प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला आहे. नगरसेवकांचा, महासभेचा ठरावही आहे. मात्र, दोन महिन्यांपासून आयुक्तांची फाईलवर सही झालेली नाही.

असा आहे प्रकल्प

गार्डनसिटीमध्ये ध्यान केंद्र व जॉ‌गिंगची सोय आहे. मुलांची आधुनिक खेळणी, कॉलेजची आठवण जागवणारा महिला कट्टा तर ज्येष्ठांसाठी सुख-दुःखाच्या गप्पांसाठी पार. वैशिष्ठ्यपूर्ण प्रवेशव्दाराशेजारी पाण्याचे तळे. पार्किंगसाठी स्वतंत्र सोय. मशरुमचे छत असलेली बैठक व्यवस्था. वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे व लॉन्स देखील असेल.

बोरसे खून: संशयितांच्या कोठडीत वाढ

$
0
0

नाशिक : संदीप फांऊडेशनच्या आवारात झालेल्या रवींद्र बोरसे खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिघा संशयितांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने बुधवार, २५ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.

रवींद्रची महिरावणी येथील संदीप फांऊडेशन कॉलेजच्या आवारात १६ फेबुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. खुटवडनगर येथीर रहिवाशी असलेला रवींद्र इलेक्ट्रीक डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला होता. कॉलेजच्या आवारात डेज साजरा केला जात असताना काही विद्यार्थी व कॉलेजबाहेरील मुलांनी दोन गटातील वैमनस्यातून रवींद्रवर प्राणघातक हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने रवींद्र मृत्युमुखी पडला. हत्या झाली त्याच दिवशी भूषण थोरात आणि आकाश निगळ या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. नंतर दिवेश आवारे याला अटक केली. या तिघांना कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. अन्य संशयित आरोपी किरण जाधवाचा अजून शोध सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार, संशयितांच्या अंगावरील कपडे आदी महत्त्वपूर्ण पुरावे संकलित करणे बाकी आहे. पुढील चौकशीसाठी आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी वाढवली.

रेल्वेकडून सिंहस्थ कामांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशन परिसरातील कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी नवनियुक्त भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधक सुधीर गुप्ता यांनी केली. मावळते प्रबंधक महेशकुमार गुप्ता, नाशिकरोडचे स्टेशनप्रमुख एम. बी. सक्सेना आदी उपस्थित होते. दोन वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वीच महेशकुमार यांची बदली झाली आहे.

कुंभमेळ्यात प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी चौथा प्लॅटफार्म उभारला जात आहे. नवीन पादचारी पुलाचे कामही वेगात सुरू आहे. सिन्नरफाटा प्रवेशव्दार, तिकीट आरक्षणगृह, मालधक्का प्रवेशव्दार आदी कामांची माहिती सुधीर गुप्ता यांनी घेतली. वरिष्ठ अधिकारी अनिल बागले, आत्रे, रेल्वे सुरक्षा दलाचे मुख्य निरीक्षक बी. डी. इप्पर आदी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या कामांबाबत सुधीरकुमार यांनी समाधान व्यक्त केले. पर्वणी काळात रेल्वेस्टेशन आवारात खासगी पार्किंग तसेच रिक्षा, टॅक्सी यांना प्रतिबंध केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय महसूल कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठक झाली. सुधीर गुप्ता आणि महेशकुमार गुप्ता यांनी रेल्वेच्या कामाचा अहवाल सादर केला.

रेल्वे जवानांकडून वाहनांची नासधूस

सुधीरकुमार गुप्ता पाहणीसाठी येणार असल्याने रेल्वे स्टेशनबाहेर पार्किंगला प्रतिबंध होता. त्यामुळे आंबेडकर पुतळ्यापासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर काहींनी दुचाकी उभ्या केल्या होत्या. मात्र, साहेबांच्या गाड्यांना अडथळ नको म्हणून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सात-आठ दुचाकी बाजूला ढकलून दिल्या.

प्रेस महापालिकेची थकबाकीदार

$
0
0

तब्बल पावणेसहा कोटी रुपयांची घरपट्टी बाकी

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालयाकडे एकूण पावणे सहा कोटीची घरपट्टी थकलेली आहे. थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे विभागीय अधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. दरम्यान, घरपट्टी थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्याची व सातबाऱ्यावर नोंद करण्याची कारवाई सुरू झाल्याने थकेबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

महापालिका विभागीय कार्यालयाने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूलीची मोहीम सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात घरपट्टीसाठी २२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. पैकी नऊ कोटी ८८ लाखाचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीपेक्षा तो ३९ लाख ६५ हजार रुपयांनी जास्त आहे. ४६३ मोठ्या मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट देखील बजावण्यात आले आहे. बारा हजार जणांना नोटीस बजवाण्यात आली असून ९८७ जणांनी पूर्ण तर ९०१ जणांनी निम्मी घरपट्टी भरली आहे.

या वर्षात पाणीपट्टीपोटीचे १४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी सव्वा सहा कोटींचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीपेक्षा तो एक कोटी नऊ लाखांनी जास्त आहे. पाणीपट्टी न भरल्यास नळकनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही महापालिकेचे कार्यालय वसूलीसाठी उघडे ठेवण्यात आले आहे.

केंद्राशी पत्रव्यवहार

प्रेसकडे पावणे सहा कोटींची थकबाकी आहे. प्रेस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने घरपट्टी लागू होत नाही, असा दावा व्यवस्थापन करत आहे. तर प्रेसचे रुपांतर आता महामंडळात झाल्याने त्यांनी घरपट्टी भरावी म्हणून महापालिका आग्रही आहे. वसुलीसाठी केंद्राशीही पत्रव्यवहार केला जात आहे. उपायुक्त बहिरम यांच्याकडे सुनावणी सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

'स्थायी'साठी शुक्रवारी विशेष सभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या येत्या २९ फेब्रवारी रोजी रिक्त होणाऱ्या आठ जागांवर नव्याने सदस्य निवडीसाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २७) घेण्यात येणार आहे. निवृत्त सदस्यांच्या रिक्त जागी वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत मनसेचे विद्यमान सभापती राहुल ढिकले यांच्यासह शीतल भामरे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा आवारे, राजेंद्र महाले, रुपाली गांवड निवृत्त होत आहेत. निवृत्त सदस्यांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे.

त्यामुळे नव्याने नियुक्तीसाठी या दोन पक्षातील सदस्यामंध्येच सर्वाधिक चढाओढ असून, वरिष्ठांमार्फत फिल्डींग लावण्याचे काम सदस्यांनी सुरू केले आहे. मनसे, राष्ट्रवादी सोबतच सेना आणि भाजपही उर्वरित सदस्यांना संधी देण्यासाठी आपला सदस्यांचा कार्यकाल कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षातील इच्छुकांनाही धुमारे फुटले आहेत. या सदस्यांची निवड शनिवारी (दि. २८) आत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील शुक्रवारी या आठ सदस्यांची निवड करण्याकरीता विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत या सदस्यांची निवड केली जाईल.

जेतवनगर वसतिगृहाला जाच समाजकंटक अन् श्वापदांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील जेतवनगरमधील निवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना समाजकंटकांसह जंगली श्वापदांनाही तोंड द्यावे लागत आहे. वसत‌िगृह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.

अनाथ व गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, ते मुख्य प्रवाहात यावेत या उद्देशाने महापालिका आणि सर्व शिक्षा अभियान यांच्यातर्फे २०१३ मध्ये जयभवानी रोडवरील जेतवननगरमध्ये हे वसत‌िगृह स्थापन करण्यात आल‌ी. शिक्षणाबरोबरच दोन वेळचे जेवण आणि निवासाचीही सोय येथे आहे. सध्या सुमारे ५० विद्यार्थी आहेत. चांगल्या सुविधा दिल्यास आणखी विद्यार्थी प्रवेश घेतील असे सूत्रांनी सांगितले.

भय बिबट्याचे

लष्कराच्या हद्दीजवळ हे वसत‌िगृह आहे. विंचू, साप यांचे दर्शन विद्यार्थ्यांना नित्यनियमाने घडत असते. परंतु, काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याचेही दर्शन झाले. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने उपनगर पोलिस ठाण्याजवळ नेहरुनगरच्या प्रवेशद्वाराजवळच पिंजराही लावला होता. बिबट्या व जंगली श्वापदांच्या भयाने मुलांना रात्री बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

समाजकंटकांचा त्रास नित्याचा

गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा त्रास विद्यार्थ्यांबरोबरच व्यवस्थापनालाही होत असतो. रात्री अपरात्री वसतिगृहाशेजारीच मद्यपान सुरू असते. परिसरात नेहमीच शिवीगाळ, भांडणे-तंटे सुरू असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा बाराही महिने त्रास होत असतो. त्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि मानसिकतेवर परिणाम होत आहे. मद्यपींना हटकले म्हणून वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

स्थलांतर हाच उपाय

वसतिगृहापासून थोड्याच अंतरावर गांधीनगर विमानतळ असल्याने हेलिकाप्टर्स दिवसभर उड्डाण भरत असतात. त्यांच्या आवाजामुळेही विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. समाजकंटक, जंगली जनावरे अशा विविध जाचांवर उपाय म्हणून हे वसतीगृह स्थलांतरीत करावे, अशी पालक व नागरिकांची मागणी आहे.


बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे पितामह, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मेनरोड, भद्रकालीसह शहरातील बहुतांश उद्यानांमध्ये व्यवहार सुरळीत सुरू होते. शालिमार, एमजीरोडसह काही उद्यानांमध्ये व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेऊन बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला.

पानसरेंसह त्यांच्या पत्नी ऊमा यांच्यावर कोल्हापूरात भ्याड हल्ला करण्यात आला होता. गोळीबारात गंबीर जखमी झालेल्या पानसरेंची ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षसह सर्व डाव्या संघटनांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बारावीच्या परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये, म्हणून बंदसाठी सुटीचा दिवस निवडल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव भालचंद्र कांगो यांनी स्पष्ट केले होते. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादीसह रिपाइंनेही पाठिंबा दर्शविला होता. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात दोन दिवस तीव्र आंदोलनचे दडण्यात आले होते. शनिवारी पोलिस आयुक्तालयाबाहेर मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात बंदला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी चिन्हे होती; मात्र शालिमार, एमजीरोडवर दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. अन्य बाजारपेठांमध्ये चारनंतर दुकाने खुली होऊ लागली. मेनरोड, भद्रकाली, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, रविवार कारंजा परिसरात सकाळी दहापर्यंत बंदची चिन्हे होती. हळूहळू या परिसरांतील व्यावसायिकांनी दुकाने खुली करण्यास सुरुवात केली. मेनरोड, भद्रकाली, सातपूर, नाशिकरोड परिसरातील बाजारपेठा दहानंतर खुली झाली. सिडकोत बंदचे वातावरणही दिसले नाही. सकाळपासूनच तेथील बाजारपेठांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू होते. दुपारी चारनंतर शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होऊन व्यवहार सुरळीत सुरू झाले. शहरात संमिश्र वातावरण दिसून आले. अनुचित प्रकार घडू नये, कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तणावाची परिस्थिती निर्माण करू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त तैनात केला होता.

२२ जण पोलिसांच्या ताब्यात

व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शालिमार चौकात पोहोचले. गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी शालिमार चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत अशी जबरदस्ती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्यासह २२ जणांना ताब्यात घेतले. त्यांना नंतर सोडून देण्यात आले.

कामांमध्ये गुणवत्ता राखा

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांची अभियंत्यांना तंबी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामांची गुणवत्ता राखली जाईल आणि ही कामे वेळेत पूर्ण होतील याची जबाबदारी प्रशासनातील अभियंत्यांची आहे. त्यामुळे कामांच्या ठिकाणी थांबून त्यावर लक्ष ठेवा, असे आदेश जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी सर्व अभियंत्यांना दिले आहेत. कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर, अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कामांची कुशवाह यांनी पाहणी केली होती. त्यावेळी कामाच्या ठिकाणी अभियंता पूर्णवेळ थांबत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अभियंत्यांचे कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने कुशवाह यांनी नोंद घेतली आहे. कामे वेळेत पूर्ण करण्याचे आणि ही कामे गुणवत्तापूर्ण होतील याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. अशा परिस्थितीत अभियंत्यांनी कामाच्या ठिकाणी हजर असायलाच हवे अशी सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती कुशवाह यांनी दिली.

कामांची गुणवत्ता राखली जात नसल्याचा आक्षेप विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. त्याची दखल घेऊन महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्रयस्थांमार्फत या कामांची तपासणी करणार आहे. या दोन्ही विभागांमध्येच बरीचशी कामे अंर्तभूत होतात. त्यांची तपासणी होईलच. त्या व्यतिरिक्त काही कामांच्या गुणवत्तेबाबत कुणाचा आक्षेप असला तर अशा कामांच्या दर्जाचीही त्रयस्थांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही कुशवाह यांनी दिली. कामांचा दर्जा चांगला नसेल तर, अधिकाऱ्यांच्याच अडचणी वाढतील. त्यामुळे कामांच्‍या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही. वेळप्रसंगी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कुशवाह यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप देणार दिलासा!

सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकमध्ये ८० लाख ते एक कोटी भाविक येणार आहेत. त्यांना मार्गदर्शन मिळावे, नाशिकमध्ये वावरताना कुठलीही अडचण भासू नये यासाठी मोबाइल अॅप विकसित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरशी संबंधित बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यामध्ये असणार आहे. येथील रस्ते, पर्यटन स्थळे, पोलिस, बसेस, रेल्वेशी संबंधित माहिती, प्रशासनाने शाही मार्ग, साधुग्राम, रामकुंड येथे केलेली व्यवस्था, वाहनतळे आदींची माहिती त्यामध्ये अंर्तभूत करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठी मदत होऊ शकणार आहे.

अतिक्रमण निर्मूलन धडाक्यात

$
0
0

इंदिरानगरसह देवळाली कॅम्प परिसरात फिरला बुलडोझर

म. टा. प्रतिनिधी, सिडको/ देवळाली कॅम्प

महिनाभराच्या विश्रांतीनंतर महापालिकेने अतिक्रमण निमूर्लन मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. इंदिरानगर येथील बापू बंगला ते वडाळा नाका या रस्त्यालगतची बुधवारी शंभरपेक्षा अधिक अतिक्रमणे उध्वस्त करण्यात आली. तसेच देवळाली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनानेही अतिक्रमणधारकांना दणका दिला.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त बहिराम, सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाडेकर, अभियंता समीर रकटे, विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ, संजय पगार, जी. जी. गवळी यांनी ७० कर्मचारी आणि ३० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविला. इंदिरानगर परिसरात सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या बापू बंगला ते वडाळा नाका या मुख्य रस्त्यावरील शंभरपेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली. यासाठी ७ ट्रक आणि १ जेसीबीची मदत घेण्यात आली. साईनाथनगर, वंदना पार्क परिसर, श्रीजयनगर, भारतनगर, विनयनगर या परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. विनापरवाना वाढीव बांधकाम, टपऱ्या, दुकानापुढचे शेड्स या मोहिमेत हटविण्यात आले. अतिक्रमण निर्मूलनाचा खर्च संबंधित अतिक्रमणधारककडून वसूल करण्यात येणार आहे.

देवळालीत ७ अतिक्रमणे हटविली

देवळाली कॅन्टोन्मेन्ट बोर्डने मिठाई स्ट्रीट, हुसेन रोड, मस्जीद स्ट्रीट आदी भागातील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या काढण्यास प्रारंभ केला. अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने शहर व परिसरात सरकारी जागेसह खासगी जागेवरही विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकाम करणाऱ्या व्यापारी व नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, अतिक्रमणे स्वत:हून न काढण्यात आल्यामुळे बुधवारी कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाने दणका दिला. यावेळी कॅन्टोन्मेन्टचे अधिकारी आर. सी. यादव, व्ही. आर. पाटील, सतीश भातखळे, राजेंद्र ठाकूर, युवराज मगर आदींसह ५० कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांच्यासह पोलिसांचा ताफा उपस्थित होता.

कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

$
0
0

आत्मदहनाचा इशारा; अप्पर आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी आश्रमशाळांमध्ये बारा-पंधरा वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणारे शिक्षक आणि रोजदांरीवर कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सेवेत नियमित करण्यासाठी पुन्हा आदिवासी आयुक्तालयावर धडक दिली आहे. तसेच मागण्या तत्काळ मान्य झाल्या नाहीतर सामूहिक आत्महदनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, अप्पर आयुक्तांनी आंदोलकांसोबत घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे मागण्यांसाठी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

आदिवासी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत वांरवार चर्चा व बैठका करूनही विभागाकडून मागण्या मंजूर होत नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडत आमरण उपोषण सुरू केले आहे. आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळामंध्ये तासिका तत्वार शिक्षकांची, तर रोजदांरी तत्वावर कर्मचारी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात ५५२ आश्रमशाळामंध्ये तीन हजार २९२ शिक्षक व कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. शिक्षकांची संख्या १,४७७ तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या १,८१५ एवढी आहे.

या सर्वांनी शासकीय सेवेत समावून घेण्याची मागणी आहे. मात्र, या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने दरवर्षी विधीमंडळ अधिवेशनावेळी आंदोलन करण्यात येते. डिसेंबरमध्ये या शिक्षकांनी

पायी बिऱ्हाड मोर्चा काढून अनोखे आंदोलन केले होते. आठ दिवस आंदोलन केल्यानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी मुबंईत त्यांच्यासोबतच चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, गेल्या दोन महिन्यात कोणतीच कारवाई झाली नसल्याने बुधवारी पुन्हा या शिक्षक व शिक्षकेत्तर रोजदांरी कर्मचाऱ्यांनी पुन्हा विभागासमोरच ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. जवळपास ६० ते ७० शिक्षकांनी ठिय्या माडंला असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

बैठक निष्फळ

आमरण उपोषण सुरू होताच हादरलेल्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी पोलिसांच्या मदतनीने चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अप्पर आयुक्त लोखंडे आणि संघटनेत चर्चा सुरू झाली. मात्र आंदोलक लेखी मागणीवर अडल्याने बैठक निष्फळ ठरली. आता आरपार आंदोलन असून, प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा सचिव एस. पी. गावित यांनी दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली आहे.

शिवसेनेचे जिल्ह्यात अभियान

$
0
0

नाशिक:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनचे 'शिव संपर्क अभियान' सुरू आहे. शिवसेना शिव संपर्क अभियानांतर्गत २६ व २७ फेब्रुवारी रोजी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना उपनेते अनंत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकत्यांसह पदाधिकाऱ्यांची होणाऱ्या बैठकीत संघटनात्मक रचनेचा आढावा घेतला जाणार आहे.

गुरुवारी (दि. २६) कळवण, येवला, नांदगाव, मालेगाव, मालेगाव बाह्य, चांदवड, सटाणा (बागलाण) या विधानसभा मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेनेच्या संघटनात्मक रचना व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतील. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख, गण व गट प्रमुख उपस्थित राहतील. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतील. ही माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

‘लॉ’चे एकाच दिवशी दोन पेपर

$
0
0



पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले असले तरी लॉ शाखेचे दोन पेपर एकाच दिवशी ठेवण्याची करामत विद्यापीठाने केली आहे. त्यामुळे लॉ चे विद्यार्थी चिंतेत असून, हे वेळापत्रक बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनही दिले आहे.

पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार नेहमीच चर्चेत राहतो. यंदाही विद्यापीठाने लॉचे दोन पेपर एकाच दिवशी ठेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर आगामी परीक्षांचे वेळापत्रक जाहिर झाले असून, त्यात ही बाब उघड झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे, अमोल सरोदे, दीपक भुसाळ आदींच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या उपकेंद्राचे समन्वयक रावसाहेब शिंदे याची भेट घेतली. तसेच, यासंबंधीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विद्यापीठाने लॉच्या १२ वी नंतरच्या ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे आणि पदवीनंतर ३ वर्षांच्या अभ्यासक्रमांचे एप्रिल-मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचा गेल्या सेमिस्टरचा राहिलेला पेपर आणि यंदाच्या सेमिस्टरचा पेपर हे दोन्ही एकाच दिवशी नियोजित करण्यात आले आहे. बीसीएल-४ या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचे २८ एप्रिल रोजी ११ ते २ या वेळेत मागील सत्राचा फॅमिली-२ या विषयाचा ३ ते ६ या वेळेत न्यायतत्वशास्त्र असे दोन पेपर एकाच दिवशी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोघांपैकी एका विषयाचाच अभ्यास करता येणार आहे. तसेच, या दोन्ही विषयांपैकी एका विषयात तो विद्यार्थी अनुत्तीर्ण राहण्याची शक्यता आहे.

विद्यार्थींचे हे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पेपर एकाच दिवशी न ठेवता वेगवेगळ्या दिवशी ठेवावेत, अशी मागणी राविकाँने निवेदनात केली आहे. तसेच, याप्रकरणी विद्यापीठाचे

परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांच्याशी शिष्टमंडळाने दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच, त्यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली. याची दखल घेऊन हे पेपर वेगवेगळ्या दिवशी नियोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

प्रतीक्षा अतिरिक्त जलद‍ रेल्वेची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अनेक वर्षांनंतर सुरेश प्रभू यांच्या रुपाने महाराष्ट्रातील रेल्वे मंत्री लाभले आहेत. त्यामुळे आगामी रेल्वे बजेटमध्ये उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना नवीन रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा लागून आहे. यामध्ये खान्देशातील जळगाव-भुसावळकडे जाण्यासाठी सकाळी जलद रेल्वे गाडीची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सर्वांत मोठे जंक्शन म्हणून भुसावळ रेल्वे स्टेशन ओळखले जाते. परंतु, असे असतांनाही उत्तर महाराष्ट्रात किंबहुना भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर काही मोजक्याच रेल्वेगाड्या थांबतात. मुंबईकडे जातांना किंवा मुंबईहून नाशिक-जळगावकडे येतांना बहुतांशवेळा प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. जलद धावणाऱ्या मोजक्या गाड्या सोडल्या तर प्रवाशांना रेल्वेच उपलब्ध नाही. मनमाड स्टेशनवरच जलद धावणाऱ्या गाड्या थांबतात. परंतु, पुढील नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव या महत्त्वाच्या स्टेशनवर बहुतांश जलद रेल्वे गाड्यांना थांबाच देण्यात आलेला नाही. तेथे जाणारे किंवा तेथून जळगाव, भुसावळ किंवा मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एखाद-दोन गाड्यांवरच अवलंबून राहवे लागते. यामध्ये पहाटे पाचला रेल्वे प्रशासनाने भुसावळ पॅसेंजरची व्यवस्था केली आहे. परंतु, या गाडीचीही वेळ जळगाव परिसरातील प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. अनेकदा ही पॅसेंजर निघून गेल्यावर प्रवासी नाशिकरोड स्टेशनवर पोहचते. त्यामुळेच जळगावकडे ये-जा करण्यासाठी मुंबई ते भुसावळदरम्यान स्वतंत्र जलद रेल्वे गाडीची मागणी तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु, आतापर्यंतच्या रेल्वेमंत्र्यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांच्या अपेक्षांची पूर्तता केलीच नाही. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी नवीन जलद एक्सप्रेस मिळण्याची आशा बाळगून आहेत.

रेल्वेचा प्रवास जीव टांगूनच

सद्यस्थितीत नाशिकहून मुंबईकडे असो वा भुसावळकडे रेल्वेने जातांना प्रवाशांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. यात एक्सप्रेस गाड्यांमध्ये तर बसण्यासाठीच नव्हे तर व्यवस्थित उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यात सुटीच्या दिवसांमध्ये तर एक्सप्रेसने प्रवास करणे म्हणजे नरक यातनाच सहन करण्यासारखे आहे. अनेकदा रेल्वेत बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संघर्ष होतात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी विशेषत: नाशिकसाठी किमान एक तरी स्वतंत्र रेल्वे मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.








शहराची सुरक्षा ऐरणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेसारख्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात सुयोजित हाईटस इमारतीच्या आवारात पेट्रोल बॉम्ब सापडल्याने नाशिकच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बॉम्ब नाशक पथकाने वेळीच दक्षता घेऊन तो निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला असली तरी येत्या काळात पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

पोलिसांकडून सध्या ठिकठिकाणी मॉकड्रील सुरू आहे. गेल्या आठवड्यात त्र्यंबकरोडवरील एका शाळेत अतिरेकी घुसल्याचा बनाव रचत मॉकड्रील करण्यात आले होते. त्यावेळी तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. शहरातील अन्य भागांतही यापूर्वी अशा प्रकारचे मॉकड्रील घेण्यात आले आहे. त्यामुळे आताही मॉकड्रीलच सुरू असल्याचे बहुतांश नागरिकांना वाटत होते.

पोलिस बॉम्ब निकामी करीत असताना तसेच परिसरातून दूर जाण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांकडून केले जात असतानाही बऱ्याच नागरिकांचा तेथे सहज वावर होता.

वाहतुकीचा फज्जा

ऐन वर्दळीच्या वेळी हा प्रकार घडल्याने राजीव गांधी भवन चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला. सीबीएसपासून ते कॅनडा कॉर्नरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चौकात धाव घेतली. नागरिकांच्या आणि वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा फज्जा उडाला.

वकीलवाडीत बेवारस बॅग

सुयो‌जित ट्रेड संकुलमधील बॉम्ब निकामी करतो न करतो तोच सायंकाळी एमजीरोड लगतच्या वकीलवाडी परिसरातही बेवारस बॅग आढळल्याची मा‌हिती बॉम्बशोधक पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कार्यवाही केली. मात्र, त्यामध्ये संशयादस्पद काहीच आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पेट्रोल सारख्या ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करण्यात आल्याने एक्सप्लोजिव्ह अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करीत आहोत. हा बॉक्स कोणी पाठविला असेल, त्यामागील कारणे काय आहेत, याचा शोध घेत आहोत.

- हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

आजपासून राष्ट्रीय प्रो उत्सव

$
0
0

के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रो उत्सव या राष्ट्रीय स्पर्धेला गुरुवारपासून (२६ फेब्रुवारी) प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यांमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर होणार आहेत. या स्पर्धेचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.

इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागाच्यावतीने प्रो उत्सवचे आयोजन केले जाते. विभागाच्या वैविध्यपूर्ण कामामुळेच दोन प्रकल्पांना आजवर २ पेटंटही मिळालेली आहेत. गेल्या १० वर्षांपासून प्रो उत्सवचे आयोजन केले जात असून, त्यात राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रकल्प सादर होत असल्याचे विभागप्रमुख डॉ. बी. व्ही. गवळी यांनी सांगितले आहे. आजवर प्रो उत्सवमध्ये ११०० प्रकल्प, ४५०० विद्यार्थी आणि ८००० अभ्यागतांनी हजेरी लावली आहे. यंदाही ओडिशा, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड अशा विविध राज्यातील कॉलेजेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर होणार आहेत. एकूण ८० प्रकल्प प्रो उत्सवसाठी निवडण्यात आले असून, त्याचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती या प्रकल्पांचे परीक्षण करणार आहेत. विजेत्या प्रकल्पांना ५० हजारांहून अधिक किंमतीची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. गुरुवारी सकाली १० वाजता प्रो उत्सवचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राचार्य प्रकाश कडवे, उपप्राचार्य बी. व्ही. गवळी आदी उपस्थित राहणार आहेत.

हे असेल आकर्षण

यंदाच्या प्रो उत्सवमध्ये माइंड कंट्रोल व्हीलचेअर, व्हॉईस ऑपरेटेड कार आणि त्रिमीतीय प्रिंटर हे प्रकल्प आकर्षण राहणार आहेत. अत्यंत कल्पकतेने हे प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले असून त्याची माहिती दिली जाणार आहे.

सिंहस्थात आपत्कालीन फ्युजन सेंटर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान आपत्काल‌ीन परिस्थितीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह वि‌विध विभागांच्या खाते प्रमुखामध्ये समन्वय रहावा यासाठी कमाडन्ट कंट्रोल सेंटर म्हणजेच फ्युजन सेंटर स्थापनच्या सुचना राज्यसरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गत कुंभमेळ्यातील चेगंराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूम‌ीवर दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ वाढविण्यासाठी या सेंटरचा उपयोग होईल, असे म्हटले जात आहे.

फ्युजन सेंटरमध्ये जिल्हाधिकारी, पोल‌सि आयुक्त, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. निर्णायक स्थितीत हे सेंटर उपयुक्त ठरल्यास शाही मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडणार नाहीत व घडल्यास तातडीने मदत काय करता येईल यासाठी संवादवाहिनी गरजेची होती. त्यातच यंदाच्या सिंहस्थावर घातपात, दहशतवाद व पुराचाही धोका आहे. त्यामुळे राज्यसरकार सुरक्षेच्या बाबतीत गंभीर असून आपत्काल‌ीन परिस्थिती हातळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. आपत्काल‌ीन कक्षासोबत आता सिंहस्थाशी संबंध‌ति जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी व खाते प्रमुखामंध्ये समन्वय राहण्यासाठी परदेशातील फ्युजन सेंटरची कल्पना नाशिक सिंहस्थात वापरली जाणार आहे.

प्रांताला लाच घेताना अटक

$
0
0

महसूल विभागातील लिपिकही ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव येथील झोडगे शिवारातील ८० गुंठे जागेला बिनशेतीची परवानगी देण्यासाठी पावणे तीन लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी सव्वा दोन लाख रुपये स्वीकारताना बुधवारी मालेगावचे उप‌विभागीय अधिकाऱ्यासह एका लिपिकाला अटक करण्यात आली आहे. मालेगाव उप‌विभागीय कार्यालयात बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

संदीप गुलाबराव पाटील असे त्या अधिकाऱ्याचे तर ज्ञानेश्वर शांताराम बागडे असे लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे झोडगे शिवार येथे दोन हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ८० गुंठे जमीन त्यांना बिनशेती करायची होती. त्यासाठी त्यांनी १० फेब्रुवारी २०१३ रोजी अर्ज केला होता. बिनशेतीची परवानगी मिळावी यासाठी त्यांचा पाटील आणि बागडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र पाटील यांनी दोन लाखांची तर बागडे यांनी त्यासाठी ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे शक्य नाही त्यामध्ये काही सवलत द्यावी अशी विनंती तक्रारदाराने दोघांना केली होती. त्यानुसार पाटील यांनी दीड लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी सापळा रचण्यात आला. पाटील यांच्यासाठी दीड लाख रुपये आणि स्वत:साठी ७५ हजार रुपये अशी सव्वा दोन लाखांची रोकड स्वीकारताना बागडे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

विद्यार्थिनींना सुरक्षेचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विद्यार्थिनींना शाळेत जातांना किंवा घरी परततांना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी सातपूर येथील जनता विद्यालयात सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी विद्यार्थिनींना सुरक्षेची काळजी घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रस्त्यावर कुण्या व्यक्ती किंवा रोडरोमिओचा त्रास झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुलींनी शाळेत येता-जातांना संशयास्पद कुणी आढळल्यास त्याची माहिती शाळेत दिली पाहिजे. तसेच रोजच्या शाळेच्या वेळात रोड रोमिओंकडून होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळविली पाहिजे. कुणाच्या धाकापोटी मुलीने तिच्यावर होणारा अन्याय लपविल्यास त्रास देणार जास्तच प्रबळ होत असतो. यासाठी कुठेही वाईट प्रकार निर्दशनास आल्यास त्याबाबत शाळेला किंवा पोलिसांकडे माहिती कळविली पाहिजे. याबाबत गुप्तता पोलिसांकडून ठेवली जाणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

मुलींनी देखील स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. तसेच चुकीचा व्यक्तीची माहिती पोलिसांकडे तत्काळ देता येईल याबाबत मुलींनी सर्तकता बाळगली पाहिजे, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक हेमंत सावंत, माधवी वाघ, एस. यू. कोकणी, आर. सी. भोसले, मुख्याध्यापक बाळासाहेब पवार यांसह विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images