Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जयंत जाधवांना तात्पुरता दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेचे आमदार जयंत जाधव यांच्या हायकोर्टाने रद्द ठरविलेल्या आमदारकीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने १३ जानेवारी २०१५ रोजी शिवाजी सहाणे यांच्या बाजूने निकाल देत जाधव यांची आमदारकी रद्द ठरविली होती. आमदार जाधव यांच्या बाजूने अॅड. गोपाल सुब्रमण्यम व अॅड. नागेश्वर राव, तर शिवाजी सहाणे यांच्याकडून अॅड. वेणुगोपाल व अॅड. महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली.


बोरसे हत्याप्रकरणी आवारेला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवींद्र बोरसे हत्याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी दिवेश आवारेला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, मुख्य संशयितासह अन्य काही आरोपी फरारच आहेत.

संदीप फाऊंडेशनच्या आवारात किरकोळ वादातून रवींद्र बोरसेची १६ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी भूषण थोरात आणि आकाश निगळ या दोघा संशयितांना अटक केली. दोघांनाही कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्या झाली त्या दिवशी दिवेश आवारे आणि किरण जाधव यांच्याकडे हत्यार होते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली होती. तेव्हापासून फरार झालेल्या दिवेश आणि किरणचा पोलिस शोध घेत होते. यातील दिवेश आवारेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली. मात्र, अधिक तपशील समजू शकला नाही.

आबांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

$
0
0

सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी शुक्रवारी रावसाहेब थोरात सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत साध्या पध्दतीने कुणाचेही भाषण न होता ही शोकसभा पार पडली.

कुणांचे लांबलचक भाषण नाही, कुणाची आत्मप्रौढी नाही, मी किती त्यांच्या जवळचा होतो हे सांगण्याची संधी नाही सर्व चालीरीती रुढी परंपरांना फाटा देऊन या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीला माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी उपस्थितांना कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. कुणाचेही भाषण होणार नाही असे सांगून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गायिका सई आपटे हिने रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम हे भजन गायले. त्यानंतर 'टाळ चिपळ्या सोडून गेला पावली सुखाने, काळ इथे सोडून गेला खेळ अभंगाचा'. हा निर्वाणीचा अभंग सई आपटे हिने सादर केला. त्यानंतर 'पांडूरंग हरी जय जय पांडूरंग हरी'चा गजर करण्यात आला. उपस्थितही या हरी नामाच्या जयघोषात सामील झाले होते.

या अभंगानंतर सभेची सांगता होऊन अस्थिकलश रामकुंडावर नेण्यात आला. तेथे आमदार पंकज भुजबळ यांनी सतीश शुक्ल यांच्या पौराहित्याखाली अस्थिकलशाचे पूजन करून अस्थिंचे विसर्जन केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विनायकदादा पाटील. ए. टी पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, राहुल आहेर आदी उपस्थित होते.

मंत्री सावरा यांची अधिकाऱ्यांना तंबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासींसाठी असलेला निधी वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, अशी तंबी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. आदिवासी आयुक्तालयाच्या वतीने आदिवासी उपयोजनांवरील खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर न मिळाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था पाहणाऱ्या ठेकेदाराला वेळेवर पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्याने विद्यार्थ्यांना भोजन देणे बंद केले. अशा समस्या निर्माण होऊ नये यासाठी निधीची तरतूद वेळेवर करीत जा अशी सूचना ना. सावरा यांनी केली. पुढील ४० दिवसांमध्ये जास्तीत जास्त निधी खर्च व्हायला हवा. त्यासाठी जलदगतीने कार्यवाही व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आश्रमशाळा, वसतिगृहांपर्यंत वेळेवर तरतुदी पोहोचवा, असे आदेश त्यांनी प्रकल्पाधिकाऱ्यांना दिले.एकीकडे अनेक विभागांनी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी केली असताना नंदुरबारमध्ये लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित योजनांसाठी केवळ ४ कोटींची मागणी नोंदवली.

आदिवासी विकास विभागात कमीत कमी १० कोटी रुपये तरतूद करण्यास तयार असताना तुम्ही चार कोटींचीच मागणी कशी करू शकता, अशी विचारणा देवराज यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. कामे करण्याची इच्छा नाही का, अशी विचारणा करतानाच त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी तेथे सोलर पंप व तत्सम उपाययोजना करता येऊ शकतात, असे देवराज यांनी सुचविले. जळगावातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही केंद्र आणि राज्याकडून आलेल्या निधीपैकी केंद्राच्या निधीतच कामे पूर्ण झाल्याची मा‌हिती दिली.



१,१९८ कोटींचा आराखडा

नाशिक विभागांतर्गत २०१५-१६ मध्ये आदिवासी विकासासाठी १,१९८ कोटी ४४ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. नाशिकसाठी ४६५ कोटी ८७ लाख, धुळ्यात १५६ कोटी ६२ लाख, जळगावसाठी ६९ कोटी ५७ लाख, अहमदनगरसाठी ७४ कोटी ६४ लाख, तर नंदुरबारसाठी ४३१ कोटी ७८ लाख असा एकूण १,१९८ कोटी ४४ लाखांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

रॅडीकल हेमॅटेक्टोमी शस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0

जगातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्युरी मानवता कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी रुग्णावर ड्रयुबीन जॉन्सन सिंड्रोम असताना लिव्हरची कॅन्सरची गाठ काढण्यासाठी रॅडीकल हेमॅटेक्टोमी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही जगातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉ. नगरकर यांनी केला असून, ही शस्त्रक्रिया इतरांना संदर्भ म्हणून उपयोगी पडावी यासाठी इंडेक्स जनरलमध्ये नोंदवली जाणार आहे.

डॉ. नगरकर म्हणाले, की ६४ वर्षीय रुग्णाला जन्मापासूनच कावीळ असल्याने ड्रयुबीन जॉन्सन सिंड्रोम प्रकाराने ते ग्रस्त होते. एक वर्षांपूर्वी तपासणी दरम्यान त्यांच्या लिव्हरला कॅन्सरची गाठ असल्याचे समोर आले. मात्र त्यांना कावीळ असल्याने त्यांच्यावर कोणीही शस्त्रक्रिया करून कॅन्सरची गाठ काढायला तयार नव्हते. वैद्यकीय क्षेत्रात कावीळ असेल तर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे आणि अशा शस्त्रक्रिया यशस्वी होत नाहीत असे मानले जाते. मात्र कॅन्सरची गाठ वाढू देणे हेही जोखमीचेच होते. कावीळ असेल तर भूल दिली जात नाही. मात्र ही शस्त्रक्रिया करताना सर्व सर्जिकल व टेक्नीकलबाबींचा विचार करून भूलतज्ज्ञ डॉ. नयना कुलकर्णी व डॉ. सिरशिंदू रॉय यांनी शस्त्रक्रियेत मोलाची साथ दिली. या शस्त्रक्रियेमुळे कावीळ असताना अनेक आजारांवर उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाऊ शकतात याबाबत विश्वास निर्माण करणे शक्य होणार आहे. कावीळ असताना शस्त्रक्रिये करणे जोखमीचे असते. मात्र ते अशक्य नाही हेही यातून सिद्ध होऊ शकेल. यामुळे रॅडीकल हेमॅटेक्टोमीच्या जगभरातून रुग्णांना याचा उपयोग होणार आहे, असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.

हॉल तिकिटाचे नो टेन्शन!

$
0
0

विद्यार्थ्यांना ऑनलाइनही मिळणार हॉल तिकीट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ होत असला तरी काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट सापडत नसल्याने मोठे टेन्शन आले आहे. मात्र, हॉल तिकीटाचे कुठलेही टेन्शन घेण्याचे कारण नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे.

बारावीची परीक्षा ही आयुष्यात टर्निंग पॉईंट असल्याचे ग्राह्य धरून विद्यार्थी परीक्षेचा आणि अभ्यासाच्या तणावाखाली असतात. ऐनवेळी परीक्षेच्या घाईगडबडीत हॉलतिकीट कुठेतरी ठेवले जाते किंवा हरवते. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडतात. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. कारण विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉलतिकीट देण्याच सुविधा मंडळाने केली आहे. परीक्षेच्या काळात हॉलतिकीट हरवल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत होते. त्यातच ऐन परीक्षेच्या काळात पुन्हा हॉलतिकीट मिळवताना धावपळ करावी लागत होती.

हॉलतिकीट हरवल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेचे मोठं दडपण येत असल्यानेच मंडळाने ऑनलाइन हॉल तिकीटाचा उपक्रम पहिल्यांदाच सुरू केला आहे. मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर कॉलेजला ऑनलाइन हॉलतिकीट लॉगीन करण्याची सोय आहे. त्यासाठी प्रत्येक प्रत्येक कॉलेजला युजरनेम आणि पासवर्ड देण्यात आला आहे.



हे लक्षात ठेवा

विद्यार्थ्यांचा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश - सकाळी १०.३०

उत्तरपत्रिकांचे वाटप - सकाळी १०.४०

प्रश्नपत्रिकेचे वाटप - सकाळी १०.५०

परीक्षेला प्रारंभ - सकाळी ११.००

ज्या विद्यार्थ्याचे हॉलतिकीट हरवले आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधून हॉलतिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर हॉलतिकिटावर प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. परीक्षा काळात हॉलतिकीट हरवल्यास काळजी करू नये. हॉलतिकीट कॉलेजमधून परत काढता येईल. तसेच, मंडळाच्या कार्यालयातूनही ते मिळवता येईल.

- दत्तात्रय जगताप, विभागीय अध्यक्ष

आजपासून बारावीची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शनिवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. नाशिक विभागातील दीड लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

इयत्ता बारावीच्या परीक्षेअंतर्गत भाषा विषयाचा पेपर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ आणि उर्दू, फ्रेंच, पाली या विषयांचा पेपर दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील २१० केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. परीक्षेबाबत कुठलीही शंका असल्यास पालक, शिक्षक किंवा शाळा यांनी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.

सहकारी संस्थांच्या मागण्या सोडवू

$
0
0

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था संघर्ष समितीच्या मागण्यांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करीत आहे. सहकार, अर्थ विभागाशी चर्चा करून लवकरच या मागण्यांवर तोडगा काढू, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी शुक्रवारी दिली.

राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांचे पीककर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जमाफ करावीत, अशा संस्थांमधील सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडे वर्ग करावेत आणि संस्था सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत तत्काळ कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली. सावरा यांच्या परतीच्या मार्गावरच हे आंदोलन करण्यात आल्याने सावरा यांनी थांबून आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे. मात्र त्यांच्या मागण्या केवळ आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील नाहीत. अर्थ आणि सहकार विभागाशी संबंधित हा विषय आहे. त्यांच्याशी विचारविनिमय करून सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही नामदार सावरा यांनी संघर्ष समितीला दिली.


आरटीओ एजंट ‘वेटिंग’वर

$
0
0

हायकोर्टातील याचिकेवरील युक्तीवाद पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एजंटांना येण्यास घातलेल्या बंदी विरोधात हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. आरटीओ विभागाने आपले म्हणणे कोर्टात मांडले. दोन्ही बाजुंचा विचार करून २ मार्च रोजी कोर्ट निकाल देणार आहे.
आरटीओ कार्यालयाच्या आवारातील एजंटांना हटवा, त्यांचा कोणत्याही कामात हस्तक्षेप करून घेऊ नका, असा आदेश परिवहन आयुक्तांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दरम्यान दिला. तर नाशिक प्रादे​शिक विभागाने १६ जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी एजंटांना कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखले. यामुळे एजंटांनी प्रशासनाविरोधात शड्डू ठोकला. तसेच हायकोर्टात धाव घेतली. याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. एजंटांना रोखण्यामागे प्रशासनाची नेमकी भूमिका काय हे यावेळी सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

निकाल २ मार्च रोजी

यापूर्वी, १९९९ मध्ये अशाच प्रकारे एजंटांना आरटीओ कार्यालयात प्रवेश नाकरण्यात आला होता. एजंटांच्या संघटनांनी हायकोर्टातून या निर्णयाविरोधात स्टे ऑर्डर मिळवली होती. आता, पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली असून एजंटांसह आरटीओ विभागाचे लक्ष २ मार्चच्या निकालाकडे लागले आहे.

अंबडमधील कंपनीला भीषण आग

$
0
0

लाखो रुपयांच्या प्लॅस्टिकच्या वस्तू जळून खाक

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीतील सतीश इन्जोक्टो प्लास्ट कंपनीला शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. यात प्लॅस्टिकच्या लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण करू शकले नाही. या घटनेमुळे एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंबड एमआयडीसीत कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन केंद्राचे बंब तब्बल ४० मिनिटे उशिरा घटनास्थळी दाखल झाले. यामुळे अंबड एमआयडीसीत कायमस्वरूपी अग्निशमन केंद्र उभारावे, या उद्योजकांच्या जुन्या मागणीकडे एमआयडीसीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप 'आयमा'ने केला आहे. अंबड एमआयडीसीतील जी-५३ या सतीश इन्जोक्टो प्लास्ट कंपनीला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन केंद्राच्या गाड्या उशिरा आल्याने २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप कंपनीमालक सतीश नावंदर यांनी केला.

आग लागल्यानंतर सुमारे दोन किलोमीटरवरून काळा धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या सात बंबानी आगीवर नियंत्रण आणले. यात अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील दोन, सिडकोतील एक, पंचवटील एक, नाशिकरोडवरील एक व सातपूरच्या दोन अग्निशमनच्या गाड्यांनी आग विझविली. घटनेची माहिती मिळताच सिडकोचे प्रभाग सभापती व उद्योजक उत्तम दोंदे, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, सुरेश माळी, प्रदीप पेशकार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दिवेश आवारेला आजपर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवींद्र बोरसे हत्याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी अटक केलेल्या दिवेश आवारेला कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी संशयित आवारेला शहर परिसरातूनच अटक केली होती. बोरसे हत्याप्रकरणात यापूर्वी दोघा संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांनाही २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

हत्येच्या घटनेनंतर पसार झालेला दिवेश शिर्डी येथे लपला होता. पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यास गेले असता तेथून गुंगारा देऊन आवारे पुन्हा शहरात दाखल झाला. मात्र, पोलिसांनी तपास सुरूच ठेऊन त्याला अटक केली. कोर्टासमोर हजर केल्यानंतर आवारेला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी भुषण थोरात आणि आकाश निगळ या दोघांना अटक केली होती. त्यांनाही कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

चला, पुन्हा पेटवा मशाली !

$
0
0

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील हुतात्मा स्मारक येथून आम आदमी पार्टी, माकप व इतर पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केले. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

'मिळून सारे होऊ आपण दाभोलकर आणि पानसरे' अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मेनरोड, धुमाळ पाँईट, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ मार्गे हा मोर्चा पोल‌िस आयुक्तालयाजवळ येऊन धडकला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोल‌िस आयुक्तालयात प्रवेश केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. या मोर्चात सहभागी झालेले 'आप'चे समन्वयक जितेंद्र भावे, महेंद्र जातरंगे, कृष्णा चांदगुडे, माकपचे अॅड. तानाजी जायभावे, अॅड. मनिष बस्ते, प्रा. लक्ष्मीकांत कावळे, शांताराम चव्हाण, कवी कैलास पगारे यांना अटक करून पंचवटी पोल‌िस स्टेशन येथे आणण्यात आले. याठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या मागणीवरून पोल‌िस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी त्यांची भेट घेतली.

डॉ. दाभोलकरांसह कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडा व या दोन्ही खुनातील सुत्रधारांचाही तपास लावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी पोल‌िस आयुक्तांकडे केल्या. आंदोलनकर्त्यांचा हा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील पोल‌िस आयुक्तांना यावेळी करण्यात आले असून 'आप'च्या दहा स्वयंसेवकांचे शिष्टमंडळ या हल्ल्याविरोधात आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आपचे समन्वयक जितेंद्र भावे यांनी दिली.

कॉ. पानसरे यांच्या निधनामुळे शहरातील आपसह, कम्युनिस्ट, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संताप व शोक व्यक्त केला. या आंदोलनात जवळपास ४०० आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीकरीता माकपने आंदोलन केले. माकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरदेखील निदर्शनं केली. या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यामुळे पोल‌िस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली.

समाजमनावर भ्याड हल्ले होत असतील तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हणायचे? हा हल्ला या महान व्यक्तींवर नसून त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर हल्ला आहे. या हल्ल्याच्या निषेध करावा तेवढा कमीच आहे.

- महेश दातरंगे, अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष

‘व्हीआयपी’ पगारवाढीचा तिढा सुटता सुटेना

$
0
0

तीन मार्चला पुन्हा कामगार उपायुक्तांच्या दालनात बैठक

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. यामुळे शुक्रवारी कामगार उपायु्क्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत तीन मार्च पुन्हा तारीख देण्यात आली असल्याचे कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी सांगितले. परंतु तब्बल २७ महिन्यांपासून पगारवाढीचा प्रश्न प्रलंबित असल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाच्या नियमांनुसार निवृत्तीचे वय ६० वर्ष असताना व्हीआयपी कंपनीतील कामगारांना निवृत्तीचे वय ५६ वर्ष करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्तीचे वय ५६ चे ६० करावे या मागणीसाठी कामगार झटत आहेत. असे असताना दुसरीकडे तब्बल २७ महिन्यांपासून कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांच्या पगारवाढीचा तिढा सुटता सुटलेला नाही. शुक्रवारी कामगार उपायुक्त जाधव यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांची एकत्रित बैठक झाली. बैठकीत कामगारांच्या बाजूने आमदार देवयानी फरांदे व कामगार उपायुक्तांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात मध्यस्थी करीत तोडगा काढण्याची मागणी केली. कंपनी व्यवस्थापनाने पगारवाढीच्या मुद्यावर व्हीआरएस व कामगारांची पगारवाढ यावर योग्य विचार करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. कामगार उपायुक्तांनी पगारवाडीबाबत कंपनी व्यवस्थापनाने तीन मार्चपर्यंत निर्णय घ्यावा, असे सांगितले.

तसेच, तीन मार्चला कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक होणार असून त्यादिवशी तरी पगारवाढीचा तिढा सुटेल अशी आशा कामगार बाळगून आहेत. कामगार उपायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस कंपनी व्यवस्थापनाचे त्रेयश त्रिवेदी, गोडसे, तळोले व कामगार युनियनच्या वतीने अध्यक्ष अरूण ठाकरे, लहू माळी, उत्तम वाळके, आधार पगार यांसह कामगार उपस्थित होते.

उड्डाणपुलाला एक्झिट पॉईंट

$
0
0

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्प्लेंडर हॉलजवळ होणार पॉईंट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उड्डाणपुलावरील वाहनांना इंदिरानगर येथील अंडरपास आणि द्वारका वगळता इतर ठिकाणी उतरण्यास जागा नाही. यामुळे या दोन्ही ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने (न्हाई) स्प्लेंडर हॉलजवळ आणखी एक एक्झिट पॉईंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चांदवडच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनचालकांना द्वारका टाळून सिडको भागात सहज प्रवेश मिळू शकतो.

शहरातील उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना पहिला एक्झिट पॉईंट इंदिरानगर येथील अंडरपासजवळ आहे. तर, दुसरा एक्झिट पॉईंट द्वारका येथे तयार करण्यात आला आहे. तसेच, चांदवडकडून येणाऱ्या वाहनांसाठी फक्त द्वारका येथील रॅम्पच्या मदतीने शहरात प्रवेश करता येतो. चांदवडच्या दिशेकडून येणाऱ्या आणि सिडको किंवा इंदिरानगर भागात जाणाऱ्या वाहनचालकांना देखील द्वारका येथेच उतरावे लागते.

द्वारका येथे शहराच्या चहुबाजूंनी वाहने येतात. त्यामुळे हा चौक नेहमीच वाहतूककोंडीच्या गर्तेत अडकलेला असतो. तेच इंदिरानगर अंडरपासबाबत होत आहे. मुंबईकडून येणारी वाहने याच ठिकाणाहून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे उड्डाणपुलाच्या एन्ट्री व एक्झिट पॉईंटमध्ये योग्य ते बदल करण्याची वारंवार मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर न्हाईच्या तंत्रज्ञांनी काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यात राजीवनगर परिसरातील स्प्लेंडर हॉल समोरील जागेचा एक्झिट पॉईंट म्हणून उपयोग होऊ शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला. सध्या, त्या दृष्टीने विचारविमर्ष सुरू असून, लवकरच या निर्णयाची​ अंमलबजावणी होऊ शकते. चांदवडच्या दिशेकडून येणाऱ्या आणि राजीवनगरसह सिडको, इंदिरानगर या भागात जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे द्वारकेला उतरावे लागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, वाढती मागणी लक्षात घेऊन क. का. वाघ कॉलेज व रासबिहारी स्कूलजवळ अंडरपास करण्यात येणार आहेत. यामुळे तेथीलही वाहतूक कोंडी नियंत्रणात येणार आहे. मात्र, अमृतधाम व जत्रा हॉटेल चौफुलीचा प्रश्न जैसे थे चा राहणार आहे.

नाशिकला इंड‌ियाज् मोस्ट प्रॉमिसिंग सिटीचा किताब

$
0
0

फस्ट स्मार्ट स‌िटीज कौन्सिलतर्फे गौरव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक स्तरावरील फस्ट स्मार्ट स‌िटीज कौन्सिलतर्फे नाशिक शहराला इंड‌ियाज मोस्ट प्रॉमिसिंग सिटीचा किताब शनिवारी दिल्लीत बहाल करण्यात आला. उपमहापौर गुरूमीत बग्गा आणि स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नाशिक शहराचा विस्तार आणि विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे गेल्याच वर्षी जगातील वेगवान वाढणाऱ्या सोळा शहरात नाशिकचा समावेश करण्यात आला होता. नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा, धार्मिक वातावरण, उद्योगांमधील गुंतवणूक, गुन्हेगारीचे कमी प्रमाण यामुळे नाशिक जागतिक स्तरावर उदयास आले आहे. त्यामुळे राज्यात मुंबई-पुण्यानंतर नाशिकचा विकास आता झपाट्याने होत आहे. जागतिक स्तरावरील फस्ट स्मार्ट सीटीज कौन्सिलतर्फे नुकताच भारतातील शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारतातील २० शहरांची इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग सिटीज म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात राज्यातील चार शहरांचा समावेश असून, नाशिक त्यात अव्वल आहे. शनिवारी उपमहापौर गुरूमीत बग्गा आणि स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


कुंभमेळ्यात स्वच्छतेची जनचळवळ उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने स्वच्छतेची चळवळ उभारावी. राज्यातील स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून या चळवळीला जनचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा प्रशासन, महापालिका तसचे पोलिसांसह विविध प्रशासनांनी केलेल्या नियोजनाबाबत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. कुंभमेळा तयारीस कमी कालावधी लक्षात घेऊन विभाग आणि जिल्हा पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नियोजनाविषयी माहिती दिली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुशवाह,मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी विकासकामांविषयी तर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी नियोजनाची माहिती दिली.

आराखडा बनवणारे आम्हीच

मठ, आश्रम, आखाड्यांमध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी आराखड्यात तरतूद करा, अशी सूचना महंतांनी केली. तुम्हाला सुविधा पुरविण्यासाठी कटिबध्द आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रामकुंडाचा परिसराचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा संपादन करण्याची प्रक्रिया दोन वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

‘सिंहस्थाला निधी कमी पडू देणार नाही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ यशस्वीतेसाठी सर्व प्रयत्न करू. निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. तसेच, त्र्यंबकेश्वरला धार्मिक तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांना दिले.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी त्र्यंबकेश्वरला भेट देवून साधू-महंताशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज, नरेंद्रगिरी महाराज, महंत सागरानंद, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी कुशवाह यांच्यासह अधिकारी आणि साधू-मंहत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत साधू महतांनी गोदावरी स्वच्छतेसह त्र्यंबकच्या तीन किलोमीटर परिसरात मांस आणि अंड्यांना बंदी घालण्याची मागणी केली. तसेच, नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्र घोषित करावे आणि सिंहस्थासाठी अधिकचा निधी द्यावा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थ कामांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. आमचे सरकार नवीन आहे. त्यामुळे साभांळून घ्या, असेही सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत. कमी वेळ मिळाल्याने गोदावरी स्वच्छतेच काम पूर्ण होवू शकले नाही, असे सांगत पालकमंत्र्यांवरही निशाना साधला.

सुरक्षेचा फटका महतांसह राज्यमंत्र्यांनाही

सुरक्षेचा पोलिसांकडून अतिरेक झाला. पोलिसांनी शंकरानंद सरस्वती यांची गाडी अडवून ठेवली. चुक लक्षात येताच पोलिसांनी त्यांना विनवणी केली. एका पोलिस उपअधीक्षकांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचा उल्लेख थेट आमदारसाहेब असा करीत कार्यकर्ते मध्ये घेऊन जाऊ नका, अशी विनंती केली. भुसे हे मंत्री असल्याचे भानही या अधिका-याला राहिले नाही.

शाहीमार्गावरून साधू, महंतांचा आखाडा

$
0
0

मुख्यमंत्र्यांसमोरच प्रशासन खिंडीत; विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थासाठी नवीन शाहीमार्गाचा घाट घातला जात असला तरी तो साधू, महंतांसाठी आहे की, प्रशासनासाठी असा आम्हाला प्रश्न पडला आहे. विश्वासात न घेता नियोजित केलेला शाहीमार्ग आम्हाला कदापि मान्य नाही. त्यामुळे पारंपरिक शाहीमार्गानेच जाणार असल्याचा पवित्रा साधू, महंतांनी मुख्यमंत्र्यांसमोरच घेतल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. तसेच, आगामी काळात हा प्रश्न अधिक कळीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक नाशिकरोड येथील विभागीय महसूल कार्यालयात शनिवारी पार पडली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी, महसूल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महंत भक्तीचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नवीन शाहीमार्गाबाबात साधू, महंत समाधानी नसल्याचे या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आम्हाला विश्वासात न घेताच नवीन शाहीमार्ग निश्चित केल्याचा आरोप दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोरदास महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच केला. गतवेळी घडलेल्या दुर्घटनेआड लपून शाहीमार्ग बदलता येणार नाही. तसेच साधूंना जुन्या शाही मार्गावरून येण्याची मुभा असावी, नवीन शाहीमार्ग साधुंसाठी बंधनकारक करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याचे नियोजन सादर केल्यानंतर महंतांना बोलण्याची संधी देण्यात आली. प्रशासनाने तयारी उत्तम केली अशी पाठ थोपटतानाच महंत रामकिशोरदास यांनी दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी आखाड्यांच्या प्रमुख सहा महंतांशी चर्चा न करताच प्रशासनाने परस्पर नवीन शाहीमार्ग निश्चित केल्याचा आरोप करीत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या नावाखाली तपोवनात घेतलेल्या अनेक जमिनींवर उद्यान, शाळा विकसित करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी कायमस्वरुपी जागेची व्यवस्था करा, नाहीतर नाशिकच्या कुंभमेळ्याचे भवितव्य धोक्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर शरसंधान साधले. कुंभमेळ्यासाठी साधू आले तरी ते लगेचच साधुग्राममध्ये निवासाला जाणार नाहीत. सुरुवातीला ते स्थानिक आखाड्यांमध्येच थांबतील. आखाड्यांची अवस्था दयनीय झाली असून, तेथे दोनशे लोकही व्यवस्थित बसू शकत नाहीत. साधू नाराज होऊ नयेत तसेच राज्याचे नाक कापले जाऊ नये यासाठी नाशिकमधील मठांचे, आश्रमांचे, आखाड्यांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमच्या आखाड्यांचे ७०० खालसे असून, साधूंची संख्या लाखांमध्ये आहे. शाही मिरवणुकीसाठी पारंपरिक मार्गाचे महत्त्व अबाधित रहावे, अशी विनंती करतानाच नवीन शाहीमार्ग मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महंत भक्तचरणदास महाराजांच्या मागण्या

- अलाहाबाद, प्रयाग आणि उज्जैनप्रमाणेच नाशिकमध्येही राज्य सरकारने कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी.

- नाशिकला कुंभमेळा होतोय, हे देशाला समजावे यासाठी ब्रॅण्डिंग करावे.

- कुंभमेळ्यासाठी पाच लाख साधू येतील. त्यांच्यासाठी धान्य, रॉकेल, लाकूड व तत्सम सामग्रीची व्यवस्था करावी.

पुरोहित संघांच्या मागण्या

- गोदावरीच्या पाण्यात किडे पडले आहेत. ती वाहती ठेवा.

- गांधी तलावावर घाट बांधावेत. तेथे भाविकांना स्नानाची परवानगी असावी.

- रात्री बारानंतरही भाविकांना स्नान करू द्यावे.

- प्रशासनाने यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था करावी.

तपासाबाबत CM चे अजब विधान

$
0
0



कायदा सुव्यवस्था, सीसीटीव्ही, इमारतीच्या बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांची चुप्पी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, अशी ग्वाही देतानाच, पोलिसांनी ताकद लावली, तर आरोपी पकडण्यात निश्चित यश मिळेल, असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे केले. गृह खाते आपल्याकडेच असल्याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला की काय, अशी शंका यामुळे उपस्थितांना आली. पोलिस दलातही तशीच चर्चा होत होती.

आयुक्तालयाचे 'मौनातच' उद्‌घाटन

मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखेर श‌निवारी नुतन पोलिस आयुक्तालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. कायदा सुव्यवस्था, सीसीटीव्ही, इमारतीचे बांधकाम अशा अनेक प्रश्नांना बगल देत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.

नवीन पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाल्यापासून उद्‌घाटनच्या प्रतीक्षा श‌निवारी संपली. याच महिन्याच्या सुरूवातीला उद्‌घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे रद्द करण्यात आला होता. रद्द झालेला हा कार्यक्रम आज पार पडला. मात्र, उद्‌घाटन कार्यक्रमावर क्रॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री फडणवीस नेहमीपेक्षा वेगळ्याच 'टेन्शन'मध्ये आयुक्तालयात दाखल झाले. काही बोलण्यापूर्वीच त्यांनी उद्‌घाटनाचा कार्यक्रम आटोपला. यानंतर त्यांनी सर्व इमारतीची पाहणी केली. तसेच काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कार्यक्रमासाठी काढता पाय घेतला. शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवणे, कायदा व सुव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण प्रश्नावर चर्चा करण्याचे त्यांनी टाळले. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरूप पटनायक, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक नवल बजाज, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, ना​शिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण सांळुके यांच्यासह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. गंगापूररोडवरील नुतन इमारतीमध्ये ऑक्टोबर २०१४ पासून कामकाज सुरू झाले आहे. तेव्हांपासून ही उद्‌घाटनच्या प्रतीक्षेत होती. पोलिस आयुक्तालयाच्या नुतन वास्तुसाठी २० नोव्हेंबर २०१२ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यावर गृहमंत्रीपदाचा ताण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे गृहमंत्रीपद देखील आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच पानसरे यांचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची ट‌ीका होत असल्याने पोलिस आयुक्तालयात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी 'ब्र' ही काढला नाही. सीसीटीव्ही किंवा शहराच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या प्रश्नांना टाळणेच फडणवीस यांनी पसंद केले.

अंनिस, डाव्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पोल‌िस आयुक्त कार्यालयाच्या उदघाटनवेळी निदर्शने करणाऱ्या अंनिस आणि डाव्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सायकांळी भेटण्याची वेळ देवून त्यांचे निवेदन स्विकारले. रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमांनंतर नगरसेवक तानाजी जायभावे, अंनिसचे महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, आरपीआयचे शशिकात उन्हवणे, कैलास नागरे, शांताराम चव्हाण यांनी राज्यातील सर्वसामान्य माणूस सुरक्ष‌ित नसल्याची खंत व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटना असून तात्काळ आरोपी पकडा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर पानसरे यांच्या हल्ल्याच्या तपासासाठी पोल‌िसांच्या २० टीम्स तयार केल्या असून आंतरराष्ट्रीय तपास संस्थाचीही मदत घेत आहेत. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यानी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याची नैतीक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. लोकशाहीने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार कोणीही असे खुनी हल्ले करुन रोखू शकत नाही. - अॅड. तानाजी जायभावे

कॉ. गोविंद पानसरे यांच्या जाण्याने चळवळीला धक्का बसला आहे. हत्या घडवून चळवळ दडपली जाईल असे समजणे चुक ठरेल. दाभोलकर व पानसरे यांच्याकडून प्रेरणा घेत हजारो तरुण चळवळीची ज्योत तेवत ठेवतील. यापुढेही चळवळ विवेकी मार्गाने सुरु राहिल. - जितेंद्र भावे, आप समन्वयक

मुख्यमंत्री येण्याअगोदर धरपकड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक


क्रॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. आरोपींना अटक करण्याची मागणी करून आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री गंगापूररोडवरील नुतन पोलिस आयुक्तालयाच्या उद् घाटनासाठी पोहचणार होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तासभर उशिर झाला. याच दरम्यान माकपा, आप आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्च्याचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री पोहचण्यापूर्वी अवघ्या काही मिन‌िटांआगोदर आंदोलनकर्ते आयुक्तालयाजवळ पोहचले. अचानक आलेल्या आंदोलनकर्त्यांमुळे पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. उद् घाटनाच्या तयारीत असलेले अधिकारी रस्त्यावर उतारले. आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको केल्याने अशोकस्तंभापासून वाहनांची रीग लागली. मुख्यमंत्री येण्याआगोदर १५ मिन‌िटांपूर्वी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून रस्ता मोकळा केला. इमारतीच्या उद् घाटनानंतर आंदोलनकर्त्याच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हत्येचा निषेध व्यक्त केला. अटक केलेल्या सुमारे ३० ते ४० आंदोलनकर्त्यांना पंचवटी पोलिस स्टेशनला आणून सोडण्यात आले.

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images