Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवैध वाळू उपसा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याचे मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोसम खो-यातील मोसम नदीपात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आगामी काळात जलसाठा व भूजल पातळी घटून शेती सिंचनासह तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याचा प्रसंग मोसम खो-यातील शेतकरी व जनतेवर येण्याची भिती व्यक्त होत आहे.

मोसम नदी बागलाण तालुक्यातील मोसम खो-याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या स्त्रोतामुळे विहिरीला पाणी असते. परिणामी शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डाळिंब, ऊस, कांदा, लसूण, मका, द्राक्षे, आदी नगदी पिके घेतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. त्यास शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार विरोध करूनही पुन्हा वाळूचा उपसा अवैधरित्या चढ्या दराने राजरोसपणे होत आहे. हा प्रकार प्रशासनापासून लपलेला नाही. हे सर्व माहित असताना प्रशासकीय कर्मचारी या उपशाविरुद्ध कडक कारवाई करीत नसल्याने त्यांची मुकसंमती असल्याचे म्हटले जात आहे.

शासकीय विकासकामे करण्याच्या नावाखाली वाळूचा प्रचंड उपसा होत आहे. वास्तविक ठेकेदार निविदा भरताना शासकीय दराने वाळूचे दर निविदेत सादर करतो. तरीही अनधिकृतपणे नदीपात्रातील वाळू शासकीय कामासाठी वापरून शासनाची फसवणूक केली जाते. वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासन डोळेझाक करीत असल्याने अवैध वाळू उपसा करणा-यांची चांदी झाली आहे. यामुळे वैध वाहतूक करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.


‘प्रभाताईंचे गाणे ईश्वरी आशीर्वाद’

0
0

स्वरमार्तंड पं. जसराज यांच्या हस्ते स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे सन्मानित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरीया कल्याणमधील 'होवन लागी शाम' ही प्रभाताईंची रचना १९५५मध्ये पहिल्यांदाच ऐकत होतो. जणू सांजवेळ झाल्याचा आभास त्यांच्या त्या बंदीशीतून होत होता. प्रभाताईंनी गावे अन् तसेच व्हावे हा ईश्वराचा आशीर्वादच. त्यांची प्रशंसा मी काय करणार? वयाने मी मोठा असलो, तरी गाण्याने त्या मोठ्या आहेत. त्यांची उंची मोजता येणार नाही. स्वरमार्तंड पं. जसराज यांनी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्याबाबत हे गौरवोद्गार काढले आणि कालिदास कलामंदिर टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून गेले. हा सोहळा म्हणजे जणू दक्षिण गंगेने स्वरगंगेचा केलेला सन्मानच होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा नाशिककरांनी हृदयाच्या कुपीत कायमस्वरूपी जपून ठेवला.

किराणा घराण्याच्या गायकीला वेगळे आयाम देणाऱ्या चिंतनशील गानसाधिका प्रभा अत्रे यांना रविवारी पं. जसराज यांच्या हस्ते भारतरत्न पंडित भिमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पाच लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन डॉ. प्रभाताईंना सन्मानित केले. यावेळी प्रभाताईंबद्दलची कृतज्ञता रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली. त्यांचे प्रेम पाहून प्रभाताईंनाही गहिवर आला. व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. 'या पुरस्कारामुळे घरच्या माणसांनी पाठीवर कौतुकाने हात फिरविल्यासारखे वाटते,' अशी भावना डॉ. अत्रे यांनी व्यक्त केली.

माझ्याकडची खाती गॅससारखी

माझ्याकडची खाती नॅचरल गॅससारखी आहेत. ती उघड्यावर आली की पटकन जळतात. नीट नियोजनबध्द आले तर त्याची ऊर्जा होते. नाहीतर आपलाच हात जळायचा. म्हणूनच कुठलेही वाक्य बोलताना भीती वाटते असे तावडे म्हणताच कलामंद‌रिात हशा पिकला. सांस्कृतिक संचालनालयाकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याचे नियोजन महाविद्यालयीन तरूणांनी करावे, असा निर्णय आपण घेतल्याचे तावडे म्हणाले.

शिखरेवाडी मैदानाला झळाळी

0
0

बारीक मुरुम, रोलिंगमुळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शिक्रेवाडी येथील मैदानावर बारीक मुरुमाचा थर पसरविण्यात आला आहे. पाणी मारुन रोलिंग केल्याने मैदान खेळण्यायोग्य झाले आहे.

या मैदानावर जागिंग ट्रॅक, बॅडमिन्टन हाल, स्केटिंग ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे नुकतीच राज्यस्तरीय फुटबाल स्पर्धा झाली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये कार्यक्रम झाला. त्यासाठी मैदानावर जाड मुरुम पसरविण्यात आला होता. त्यामुळे खेळाडू जखमी होऊ लागल्याने खेळाडू व नागरिकांनी वर्गणी गोळा करुन मैदानाची दुरुस्ती केली होती. या काळात कौटुंबिक कारणामुळे मैदानाकडे लक्ष पुरवता आले नाही, मैदानाची योग्य निगा राखण्यात येत आहे, प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी सांगितले. मैदानावरील जाड मुरुम बाजूला गोळा करण्यात आला असून पावसाळ्यात तो पसरवून मैदानाचा दर्जा आणखी उंचावणार आहे. खेळाडूंना काही सूचना करायच्या असल्यास त्यांचे स्वागत आहे, असेही ते म्हणाले.

अनोळखी तरुणाचा अपघातात मृत्यू

0
0

दिंडोरी : नाशिक-आग्रा महामार्गावर दहावा मैल परिसरात एका अनोळखी पादचारी युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. शरीराने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा उभट, उंची १६५ सेमी, अंगात लाल रंगाचा काळसर रेषा असलेला शर्ट असे त्याचे वर्णन आहे. या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन दिंडोरी पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा वाघेरे यांनी केले आहे.

पानसरेंवरील हल्ल्याचा संघाने नोंदवला निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ कामगार आणि कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, या हल्ल्याचा संघ तीव्र शब्दात निषेध करीत असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉ. अशोकराव कुकडे यांनी मांडली.

डॉ. कुकडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की 'राज्यातील थोर विचारवंत, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि तळागाळातील सामान्य जनतेसाठी आयुष्यभर अॅड. पानसरे यांनी संघर्ष केला आहे. त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर झालेला हा हल्ला भ्याडपणाचे लक्षण आहे. या प्रकारच्या हल्ल्याचे समर्थन संघ कधीही करीत नाही.' वैचारिक मतभेदांबद्दल बोलताना कुकडे म्हणाले, की 'पानसरेंसोबत वैचारिक मतभेद असले तरीही विचारांचा प्रतिवाद केवळ विचारांनीच करावा, अशी संघाची पूर्वीपासून भूमिका आहे व पुढेही राहील. समाजातील सज्जन शक्तीवर झालेला हा आघात आहे. तपास यंत्रणा आणि शासनाने या हल्ल्याचा तातडीने छडा लावावा व हल्लेखोरांना कठोर शासन करावे, असेही डॉ. अशोक कुकडे यांनी म्हटले आहे.

‘शिक्षण हक्क’ प्रवेशाला ऑनलाईन सुरुवात

0
0

५२ जणांनी केले अर्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव असलेल्या जागांची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी ५२ पालकांनी अर्ज केले आहेत. तर, १५५ पालकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले.

शिक्षण हक्क कायद्यानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाल्यांसाठी मोफत देण्यात येतात. यंदा ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिकसह राज्यातील ८ शहरांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/ या वेबसाईटवर पालकांना त्यांच्या पाल्याच्या केजी व पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करायचे आहेत. पहिल्याच दिवशी १५५ पालकांनी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले आहे. तर ५५ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज जमा केले आहेत. अर्जासोबत जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

शहरात ११ हेल्प सेंटर

ऑनलाईन प्रवेशाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेने शहरात ११ ठिकाणी हेल्प सेंटर सुरु केले आहेत. त्यात हॉलिफ्लॉवर स्कूल जेलरोड, गुरुगोविंदसिंग विद्यालय इंदिरानगर, स्वामी नारायण इंग्लिश स्कूल आडगाव नाका, स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी, महापालिका शाळा क्रमांक ११० जेतवननगर, ए. पी. पटेल विद्यालय पंचवटी, डे केअर सेंटर इंदिरानगर, ग्लोबल व्हिजन अकॅडमी अंबड रोड, होरायझन अकॅडमी गंगापूर रोड, रंगुबाई जुन्नरे विद्यालय काठे गल्ली, महापालिका शाळा क्रमांक १६ गंगापूर रोड यांचा समावेश आहे.

सिडको, सातपूरला सेंटर नाही

शहरातील सिडको आणि सातपूर या दोन्ही भागाची लोकसंख्या मोठी आहे. त्यातच या दोन्ही भागात औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे महापालिकेने या दोन्ही भागांमध्ये एकही हेल्प सेंटर न सुरू करता गंगापूर रोडसारख्या भागात अनेक सेंटर का सुरू केले, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.


जनजागृती करणार

ऑनलाईन प्रवेशाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी महापालिकातर्फे हँडबिल्सचे वाटप आणि शहराच्या दोन भागात होर्डिंग्ज लावण्यात येणार असल्याचे प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले आहे.

शिवजयंतीनिमित्त आज जेलरोडला प्रदर्शन, पोवाडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

दसक-पंचक परिसर सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने गुरुवारी (दि. १९) जेलरोड येथील शिवाजीनगर समाज मंदिराच्या आवारात गड किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत २१ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

दुर्गमित्र शाम विसपुते यांनी ही छायाचित्रे काढली आहेत. मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुनील बोराडे, उपाध्यक्ष प्रभावती महानुभाव यांनी ही माहिती दिली. चंद्रकांत चव्हाणके, वसंतराव रकिबे, सोन्याबापू हांडोरे, वसंतराव बोराडे आदी संयोजन करत आहेत.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जीवनावर पोवाडा कार्यक्रम होणार आहे. शिवशाहीर राजेंद्र कांबळे सायंकाळी सहाला भीमनगर येथे पोवाडा सादर करणार असल्याची माहिती शशी उन्हवणे यांनी दिली.

प्रेस कामगारांतर्फे अभिवादन

डॉ. बी. आर. आंबेडकर फाऊंडेशनतर्फे भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारासमोर शिवप्रतिमेचे पूजन प्रेस कामगारांनी केले. मुद्रणालयाचे उपहाप्रबंधक के. के. मुजुमदार, एम्पलाईज सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष माधवराव लहाणगे, मजदूर संघाचे सरचिटणीस रामभाऊ जगताप, वर्क्स कमिटीचे उपाध्यक्ष उल्हास भालेराव, मागासवर्गीय असोसिएशनचे सचिव प्रकाश पगारे, अनिल थोरात, विजय जाधव, फाऊंडेशनेचे सुधीर गायकवाड, कार्याध्यक्ष विजय चंद्रमोरे, मुकुंद पवार, रवी लोहारकर, प्रवीण निर्मल, असिफ पठाण, जयेंद्र खराटे, विकास बर्वे, सुरेश निकम, राजू जगताप आदी उपस्थित होते.

वेतन अनुदाना अभावी रखडले पगार

0
0

ना‌शिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या 985 शिक्षकांचे वेतन हे शिक्षण उपसंचालका कडून अनुदान वेतन न मिळाल्याने रखडल्याचा दावा महापालिकेन केला आहे.फेब्रुवारी महीना अर्धा लोटला तरी,शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील शिक्षकांचे वेतन झालेले नाही.त्यांसदर्भात आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी लक्ष घालत,वेतनासंदर्भातील प्रक्रिया तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिलेत.त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांच्याकडून या शिक्षकांचे वेतन अनुदान प्राप्त झाले नसल्याने वेतन रखडल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.या शिक्षकांचे वेतन अनुदान हे पन्नास टक्के शासन तर पन्नास टक्के शिक्षण मंडळाकडून दिले जाते.


सॉक्स खरेदीही वादात

0
0

प्रशासकीय मान्यता न घेता २६ लाखाची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण मंडळामार्फत करण्यात आलेली गणवेश खरेदी वादात सापडली असतांनाच आता २६ लाख रुपयांची सॉक्स खरेदीही प्रशासकीय मान्यता न घेता करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. आयुक्तांनी अपक्ष गटनेता संजय चव्हाण यांना दिलेल्या उत्तरात महासभेची मान्यता न घेताच ही खरेदी करण्यात आल्याचे मान्य केले असून या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती दिली आहे.

गणवेश खरेदी, शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या, बेकायदेशीर निलबंन यासह अनेक मुद्यांमुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ वादग्रस्त बनले आहे. प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांच्यावर नगरेसवकांसह अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह अपक्ष गटनेता संजय चव्हाण यांनी आयुक्तांकडे शिक्षण मंडळासदर्भात काही प्रश्न विचारले होते. त्याला आता आयुक्तांनी उत्तर दिले असून शिक्षण मंडळाकडून झालेल्या बेकायदेशीर कामांची कबुलीच दिली आहे. महासभेन शिक्षण मंडळाला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शुज खरेदीसाठी ८५ लाख पाच हजारांच्या रकमेला मान्यता दिली होती. मात्र, शिक्षण मंडळाकडून सॉक्स खरेदीचा परस्पर प्रस्ताव तयार करून एक कोटी ११ लाखाची निविदा स्थायीची मान्यता घेवून काढण्यात आली. प्रत्यक्षात सॉक्स खरेदीला महासभेची मान्यता नसतांनाही २६ लाखाची अतिरिक्त खरेदी करण्यात आल्याचे आयुक्तांनी कबूल केले आहे. वाढीव रकमेला मान्यता न घेतल्याबद्दल संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. संबंधिताकडून खुलासा आल्यानंतर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता गणवेशापाठोपाठ सॉक्स खरेदीही वादात सापडली असून शिक्षण मडंळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

प्रशासन अधिकाऱ्यांकडून सभागृहाची दिशाभूल

गेल्या महासभेत प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी ९१२० विद्यार्थ्यांना गणवेश दिल्याची माहीती सभागृहात दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश दिला नसल्याचा खुलासा आयुक्तांनी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना दिलेल्या उत्तरात केला आहे. गोंधळात त्याना स्पष्टीकरण देता आले नसल्याचे सांगून दुसरीकडे त्यांचा बचावही करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. यामुळे कुंवर यांनी सभागृहाला दिशाभूल करणारी माहिती दिली असून आयुक्तांची माहिती खरी की कुंवर यांची याचा सोक्षमोक्ष आता सभागृहातच करण्यात येईल. अशी माहिती बडगुजर यांनी दिली आहे.

१८१ जणांचे रक्तदान

0
0

निर्मिती ग्रुपच्या शिबिरात रक्तदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनकल्याण रक्तपेढी आणि निर्मिती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात १८१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते शिबिरात उद‌्घाटन झाले. कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सातपूर येथील निर्मीती ग्रुपच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाही शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह हितचिंतकांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली उदघाटन प्रसंगी महापौर मुर्तडक म्हणाले, की औद्योगिक अस्थापनांनी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब आहे. शहरातील औद्योगिक वसाहतीतीतल सर्वच कंपन्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास रक्तांचे संकलन करण्यात रक्तपेढ्यांची ओढाताण होणार नाही. कंपनीचे संचालक विवेक कुलकर्णी व स्वाती कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रितीश गोडांबे, अविनाश मराठे, राजीव मालपाठक, राजेंद्र काळे, विलास करंडे, बाळ पाटील, विजय अॅनिकिव्ही, प्रभाकर बोडके आदी उपस्थित होते.

‘एकत्र कुटुंब पद्धतीचे श्रेय महिलांना’

0
0

कळवण कॉलेज - हजारो वर्षापासून सुरू असलेली विवाहसंस्था, कुटुंबसंस्था धोक्यात आली आहे. कुठलाही राजकीय पक्ष नव्हे तर एकत्र कुटुंबपद्धती ही भारताची खरी ताकद आहे. ही पद्धत टिकविण्याचे ९९ टक्के श्रेय महिलांना जाते, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. कळवण कॉलेजमध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

नायगावकर म्हणाले, की सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील ग्लोबल होण्याची गरज असून तरुणांनी विध्वंसतेमागे न धावता रचनात्मक कार्य करून स्वतःची प्रतिमा समाजात निष्कलंक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काँक्रीटच्या जंगलात गुदमरल्यासारखे होत असल्याने निसर्गाच्या जास्तीत जास्त सानिध्यात जाण्याची गरज आहे. माणसाच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार व्हायला हवेत, असा सल्लाही नायगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. कवी नायगावकर यांनी यावेळी वृद्धाश्रम, टीव्हीवरील जाहिराती अशा विविध विषयांवर आपल्या खास शैलीत मिश्किली सादर केली. स्वेच्छानिवृत्तीवर भाष्य करणाऱ्या 'निवृत्त नोकरांचे बघा काय हाल झाले, काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले' या नायगावकरांच्या मिश्कीलीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

कला, क्रीडा क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला. उत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कार अनिता देवरे, आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुणाल रौंदळ, उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धेक पुरस्कार गायत्री सोनवणे, रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार पूनम बच्छाव यांना देण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, सरचिटणीस बेबिलाल संचेती, पुणे विद्यापीठाचे नाशिक विभाग समन्वयक डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्या डॉ. उषा शिंदे, विश्वस्त सुमन देवरे, राफियोद्दिन शेख, व्ही. के. व्यवहारे उपस्थित होते. अनिता देवरे हिने सूत्रसंचालन केले. प्रा.कच्छवा यांनी वार्षिक अहवाल वाचन तर कुणाल रौंदळ याने जिमखाना अहवाल वाचन केले.

र्यंबकेश्वरमध्ये गर्दीच्या मायक्रोप्लॅनिंगवर भर

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ पर्वकालातील संभाव्य गर्दी लक्षात घेवून भाविकांच्या रहदारीचे मायक्रोप्लॅनिंग सुरू झाले आहे. प्रातांधिकारी बाळासाहेब वाकचौरे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते तसेच मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम आणि सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील यांनी पाहणी सुरू केली आहे.

सापगाव फाटा, पेगलवाडी फाटा आदि परिसरातील वाहनतळांची पाहणी करण्यात आली आहे. तसेच बिल्वतीर्थ रिंगरोड आणि इतर रस्त्यांच्या कामांची पाहणी करून महत्त्वपूर्ण सूचना केल्या करण्यात आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांची भेट घेवून माहिती घेण्यात आली. कुशावर्त तीर्थ हे लाखो भाविकांच्या स्नानासाठी पुरेसे ठरणारे नाही. तशात शहरात गर्दी नियंत्रित करणे अवघड ठरणारे आहे. यासाठी सरकारने अहिल्या आणि गोदावरी नदीवर सुमारे बाराशे मीटर लांबीचे घाट बांधकाम हाती घेतले आहे. या घाटावर भाविकांनी स्नान केल्यास गर्दी होवून आपत्तीजनक परिस्थितीचा संभाव्य धोका टाळता येणार आहे. तीन ठिकाणी बांधकाम होत असलेल्या घाटावर स्नानासाठी भाविकांना वाहनतळापासून थेट प्रवेश मिळेल आणि तेथून बाहेर पडून आपल्या परतीच्या प्रवासासाठी इच्छित ठिकाणी पोहचता येणार आहे. शहरात प्रवेश करण्याच्या

मार्गापेक्षा बाहेर पडण्याचा मार्ग अधिक सोपा व सुटसुटीत कसा राहील याकरीता सूक्ष्म नियोजन सुरू झाले आहे. यासर्व नियाजनात शहराच्या दोन्ही बाजूंनी असलेले रिंगरोड अत्यंत महत्वाचे ठरणारे आहेत. रस्त्यांचे काम अधिक जलद आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.यासाठी अनुभवी नागरिकांसमवेत चर्चा होणे गरजेचे आहे.

मागील कुंभमेळ्यात नाशिक येथे पर्वणीदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती तशी घटना घडणार नाही यासाठी काळजी घेत असल्याचे प्रशासकीय पातळीवरून सांगितले जात आहे. शाही मार्ग तसेच भाविकांचे तीर्थाकडे व तेथून मंदिराकडे तसेच वाहनतळाकडे परतीच्या मार्ग कसा असावा याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यावर बहुतांश मार्ग हे एकेरी असावेत असाच सुरू झालेल्या चर्चेदरम्यान आढळून आला आहे.

दृश्याची कलात्मक मांडणी हेच यश

0
0

दिग्दर्शक सुधीर कुलकर्णी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अनुभवातून प्रसंगाचे बीज रोवले जाते व त्याचे कथेत रुपांतर होते. कल्पनाशक्तीच्या आधारे दृश्यमाध्यमाची निर्मिती होऊन त्यानंतर सिनेमाची भाषा तयार होते. ती भाषा रसिकाला आपलीशी वाटते. चित्रपट ही लोकाभिमुख कला असून चित्र, शिल्प, संगीत, नाट्य यांचे प्रतिबिंब चित्रपट कलेत प्रकर्षाने उमटलेले असते', असे प्रतिपादन दिग्दर्शक सुधीर कुलकर्णी यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन उपक्रमातंर्गत सृजन बालचित्रपट महोत्सवात सिनेमाची भाषा या विषयावर सिडको येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीतर्फे बुधवारी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. 'अवलोकन, निरीक्षण, अनुभव मांडण्याची कलात्मक शैली हे दिग्दर्शकाचे यश असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात चित्रमाध्यमात अनेक बदल झाले असून मनातील घटना पडद्यावर जसेच्या मांडता येतात' असेही कुलकर्णी म्हणाले. कथा, पटकथा, सिन्स, शुटिंग याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन त्यांनी केले. कॅमेरामन ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी 'कॅमरा व छायाचित्रण' याविषयी माहिती दिली.

आज 'बकूड बंब बो'

गुरुवारी (१९ फेब्रुवारी) रोजी अरुण खोपकर दिग्दर्शित 'हाथी का अंडा' हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रोजी श्रीधर रंगायन दिग्दर्शित 'ये है यकूड बकूड बंब बो' हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार असून दुपारी ३ ते ५ या दरम्यान एकलव्य आदिवासी स्कूल पेठ रोड येथे दिग्दर्शक व कॅमेरामन प्रवीण पगारे व चित्रपट सम‌ीक्षक रघुनाथ फडणवीस यांची सिनेमाचे तंत्र व छायाचित्रण या विषयावर कार्यशाळा होणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी जयश्री कनाल दिग्दर्शित 'कट्ट कट्ट कड कट्ट' हा चित्रपट दाखविला जाणार असून अशोक नगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे 'सिनेमा कसा तयार होतो' या विषयावर प्रवीण पगारे यांची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.

संपर्कप्रमुखपदी आमदार चौधरी

0
0

शिवसेनेच्या नाशिक मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेच्या बाळ नांदगावकर यांना पराभूत करून 'जायंट किलर' ठरलेल्या आमदार अजय चौधरी यांची नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून शिवसेनेने नियुक्ती केली आहे. याबरोबर, दिंडोरी मतदारसंघासाठी बेस्ट कामगारसेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेने संपर्कप्रमुखाच्या पदांमध्ये राज्यपातळीवर बदल केला. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या रव‌िंद्र मिर्लेकर यांच्याकडील नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार अजय चौधरी यांच्याकडे देण्यात आली. शिवडी मतदार संघात मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव करून चौधरी विधानसभेत दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी विभागप्रमुख काम पाहिले आहे. आगामी महापालिका निवडणूक पक्षासाठी मोठी कसोटी ठरणार असून त्यादृष्टीने चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पातळीवर विविध पदांवर केलेले काम, कार्यकर्त्यांशी थेट संबंध ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. नाशिक लोकसभा मतदारसंघात देवळाली, पूर्व, मध्य, प​श्च‌िम या शहरी विधानसभा मतदारसंघासह सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. दिंडोरी मतदार संघासाठी सेनेने सुहास सावंत यांना पसंती दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ वगळून उर्वरीत जिल्ह्याची जबाबदारी सावंत यांच्याकडे आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष यासह अहमदनगर, हिंगोली, वसमत आदी जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून सावंत यांनी काम पाहिले आहे. मुख्य फळीतील नेत्यांकडील संपर्कप्रमुख पदे काढून दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे आणण्याचे काम या बदलातून सेनेने साधले आहे. तसेच लोकसभा निहाय संपर्कप्रमुख पदे देताना सेनेने मायक्रो प्लॅनिंगचा वापर केल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येतो आहे. यापूर्वी संपर्क प्रमुख म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी पार पडणाऱ्या रव‌िंद्र मिर्लेकर यांच्याकडे नंदूरबार व धुळे जिल्ह्याचे काम सोपवण्यात आले आहे. तसेच जळगाव जिल्ह्यासाठी खासदार प्रताप सोनवणे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.

शैक्षणिक कर्मचाऱ्यांची स्थिती असंघटित कामगारांसारखी

0
0

शिक्षण तज्ज्ञ किशोर दरक

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

केंद्र सरकारनेच शिक्षणक्षेत्राला उद्योग म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे हमखास नफा मिळवून देणारे क्षेत्र म्हणून अनेक भांडवलदार या उद्योगाकडे वळले आहेत. बेसुमार शाळा वाढल्यामुळे त्यामधील कर्मचाऱ्यांची स्थिती असं‌घटित कामगारांप्रमाणे झाली आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञ किशोर दरक यांनी व्यक्त केले आहे.

इंडिपेंडन्ट सेकंडरी अॅण्ड हायर सेंकडरी टिचर्स युनियनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रोटरी सभागृहात गुरुवारी शिक्षण हक्क व आरक्षण बचाव परिषद झाली. यात 'शिक्षणाचा संवैधानिक अधिकार : वस्तुस्थिती व विपर्यास' या विषयावर दरक बोलत होते. उद्योगांमध्ये रुपांतर झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण झाल्या आहे‌त. हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अर्धवेळ, अर्धपगारी, तुटपुंजे मानधन अथवा भविष्यात नोकरीत कायम केले जाईल या आशेवर विनावेतन काम करीत आहेत. राष्ट्राचे भवितव्य धडविणारे हे शिल्पकार प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडले आहेत, अशी व्यथा दरक यांनी मांडली. ८६ व्या घटना दुरुस्तीने ६ ते १४ वयाच्या मुलांना मोफत शिक्षण घ्यावे, अशी शिफारस करतानाच खासगी शाळांना फी आकारण्याची मुभा दिली गेली. याचा गंभीर परीणाम खासगी व सरकारी दोन्ही शाळांच्या पटसंख्येवर झाला. यामुळे आजही शिक्षण हक्क कायदा संदर्भात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. यामुळे भविष्यात शिक्षण हक्क कायदा व अमलबजावणीत मोठे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे, असेही निरीक्षण दरक यांनी नोंदविले.

इंडिपेंडन्ट लेबर युनियनचे राज्य अध्यक्ष विजय निरभवणे यांनी 'आरक्षणाचे सूत्र : अपेक्षा आणि वास्तव' या विषयावर बोलतांना सांगितले, की नुकताच आलेला 'मॅट'चा निर्णय मागासवर्गीयांच्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरणार आहे. देशभर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मॅटच्या निर्णयाविषयी संभ्रमाची स्थिती आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी सरकारच्या विविध योजना व शिक्षकांचे अधिकार व कर्तव्य आणि शिक्षक संघटनेची आवश्यकता यावर मनोगत व्यक्त केले. युनियनचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. परिषदेस जे. एस. पाटील. प्रशासनाधिकारी किरण कुंवर, सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी अशोक बागुल, अशोक केदारे, च्रद्रकांत गायकवाड, विना नवले, किशोर शिंदे, दिनेश अहिरे, रवींद्र बगाव, वैशाली बर्वे, काशिनाथ जाफळे, संजय साळवे, सुधीर भालेराव, प्रा. सुशिलकुमार इंदवे, प्रा. किशोर शार्दुल, राजरत्न पानपाटील, रवींद्र पगारे आदी उपस्थित होते.


नांदगावच्या उत्कर्षची जपान दौऱ्यासाठी निवड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कुशाग्र बुद्धीच्या आणि कल्पकतेच्या जोरावर नॅशनल इन्सपायर अॅवार्डपर्यंत धडक मारीत देशातील ४० बाल वैज्ञानिकात मानाचे स्थान पटकाविणा-या नांदगावच्या उत्कर्ष विलास काकळीज या विद्यार्थ्याची जपान दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील उत्कर्ष आता जपान रिसर्च सेंटरमध्ये जाऊन आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवणार आहे. नांदगावच्या व्ही. जे. हायस्कूलमधील दहावीतील उत्कर्षची ही उत्तुंग भरारी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या विशेष मेजवानीत हा नांदगावचा बाल वैज्ञानिक खास पाहुणा म्हणून उपस्थित होता ही बाब नांदगाव तालुक्याबरोबरच नाशिक जिल्ह्यालाही

भूषणावह ठरावी अशीच आहे.

नांदगावचे विज्ञान शिक्षक विलास काकळीज यांचा उत्कर्ष हा मुलगा... जात्याच हुशारी आणि कल्पकता यामुळे त्याने बुद्धीमत्तेस आव्हान असलेल्या इनस्पायर अवॉर्ड स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या अफलातून वैज्ञानिक शोधाने त्याने तालुका, जिल्हा, राज्य स्तरासह थेट राष्ट्रीय स्तरावर आपल्या यशाची पताका फडकावली. राज्यात प्रथम आलेल्या उत्कर्षने संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक पटकावून इनस्पायर अवॉर्डवर आपल्या नावाची मोहोर उमटविली. उत्कर्षच्या अपलाएन्स कंट्रोल सिस्टीम या प्रयोगाने मान्यवरांची दाद मिळवली असून आता तर अवघे पंधरा वर्षे वयोमान पण गुणवत्तेवर जपान देशात जाण्याचा मान हा सन्मान उत्कर्ष ने मिळवला आहे. विशेष म्हणजे भारतीय तंत्रज्ञान विभागाने उत्कर्षला जपान दौ-यासाठी निवडले आहे.

चंदनाच्या झाडाची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपनगर परिसरातील नेहरू हॉस्पिटल येथील चंदनाचे झाड ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चंदनाचे झाड तोडून पोबारा केला होता. यापूर्वी शहरातील विविध भागातून चंदनासह इतर झाडे तोडण्याचे प्रकार समोर आले आहेत. उपनगर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४२७ तसेच वृक्षतोड अधिनियमातील ३ व ४ या तरतुदीप्रमाणे चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिनाभरात तीन मुलांचे अपहरण

घराजवळ खेळणारा १२ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना अंबड येथे घडली आहे. अंबड परिसरात महिन्याभरात तीन मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. ओंकार सुनील जैलमल असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ओंकार घराजवळ खेळाताना दिसला होता. यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा मिळाला नाही. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर पोलिसाकडे धाव घेतली.

मद्य गोडावूनमधून चोरी

नाशिकरोड परिसरातील एका मद्य गोडावूनमधील १ लाख २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. १६ ते १८ फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी एका चार चाकी वाहनाच्या मदतीने गोडावूनमधील अॅन्ट‌िक्युटी तसेच डिप्लोमॅट या मद्य बॉटल्सचे २०३ बॉक्स लंपास केले. ही घटना समोर आल्यानंतर संबंधित मालकाने नाशिकरोड पोलिसांकडे तक्रार दिली.

बोरसे हत्याप्रकरणी दोघांना कोठडी

0
0

इतर संशयितांचा तपास सुरूच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदीप फांऊडेशनच्या आवारात हत्या करण्यात आलेल्या रवींद्र बोरसे हत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघा संशयितांना हत्येच्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अद्यापही इतर आरोपी पोलिसांना गुंगार देण्यात यशस्वी ठरले असून त्यामुळे हत्येच्या मुख्य कारणांवर पडला आहे.

खुटवडनगर परिसरात राहणाऱ्या रवींद्र बोरसेची १६ फेब्रुवारी रोजी काही आरोपींनी हत्या केली. हत्या झाली त्यापूर्वी कॉलेज कँम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या हाणामारीनंतरच बोरसेचा खून झाला, अशा निष्कर्षापर्यंत पोलिसांचा तपास पोहचला आहे. कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी याच दिवशी दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. भुषण थोरात आणि आकाश निगळ अशी या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना कोर्टासमोर हजर केले. इतर साथिदारांना पकडणे, हत्यारे शोधणे, पुरावा संकलीत करणे अशा कामांसाठी चौकशी करणे गरजेचे असून संशयितांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. त्यानुसार कोर्टाने दोघा संशयितांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हत्येच्या घटनेनंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही ही हत्या किरण जाधव आणि दिवेश आवारे या मुलांनी केल्याचे सांगितले होते. त्या आधारे पोलिस या दोघांसह इतर काही संशयितांच्या मागावर आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

नवख्या कलाकृतींचे अप्रूप वाटते

0
0

ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजवर अनेक पुस्तक प्रकाशन सोहळ्यांना जाण्याचा बहुमान मिळाला. यातील तरुण व नवख्या कवींनी निर्मिती केलेल्या कलाकृती पाहून अप्रूप वाटते. जन्मदात्यांचे विस्मरण ज्यांना होत नाही त्यांनाच मी कवी मानतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांनी केले.

कवी दिलीप पाटील लिखित 'दुरुन कुठून तरी' या कवितासंग्रहाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यावेळी शिंदे बोलत होते. प्रत्येक माणूस हा कवी आहे. आम्ही पानावर लिहितो तुम्ही मनात लिहितात. कुठल्याही पुस्तकाची किती विक्री होते किंवा तुम्ही किती ग्रंथ प्रकाशित करतात हा प्रश्न नाही. तर लेखक किंवा कवीचं आयुष्य वाचकांच्या अंतःकरणाला भिडत का? हा खरा प्रश्न आहे. वाचकांच्या अंतःकरणाला भिडेल असे कवी दिलीप पाटील यांचे आजवरचे काव्यसंग्रह आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

जगात अनेक समस्या असून त्या शब्दातून उमटवण्याचा प्रयत्न मी या कविता लिहिताना करण्याचा प्रयत्न केला आहे. या भावना काळजातून उमटत गेल्या त्यांना शब्दरुप देण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहातून केला असल्याचे प्रतिपादन कवी दिलीप पाटील यांनी यावेळी केले.

कुठलीही कविता ही फक्त दुःखाची नसते तर सुखाची पेरणी अनेक कवितांमधून केली जात असते. सुख आणि दुःख हे दोन्ही घटक माणसाच्या आयुष्यात येत असतात. माझी कविता दुःखाचा हुंकार नाही तर सुखाचा उद्गार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रमुख पाहुणे उत्तम कोळगावकर, प्रकाश होळकर, मनपा शहर अभियंता बी. के. पाटील, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे व पुणे येथील प्रतिमा पब्लिकेशनचे दीपक चांदणे यावेळी उपस्थित होते. प्रा. शंकरराव बोराडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

आरोग्य विभागालाच ‘फ्ल्यू’

0
0

सिव्ह‌िल हॉस्प‌िटल, महापालिका, जिल्हा परिषदेत समन्वयाचा अभाव

लशीबाबत हात झटकले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्ल्यू नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेऊन महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व सिव्हिल सर्जन यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. मात्र, गुरूवार सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या स्थिती व उपाययोजनांबाबत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सिव्ह‌िलशिवाय इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तर नसल्याचे समोर आले. यामुळे आरोग्य विभागाला समन्वयाचा फ्ल्यू झाला आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला.

स्वाइन फ्ल्यूमुळे आठ जणांचे बळी गेल्यानंतरही जिल्हा प्रशासन स्वाइन फ्ल्यू नियंत्रणाबाबत ढिम्म असल्याचे समोर आले. नगरपालिका व महापालिका हद्दीतील खासगी हॉस्प‌िटलमध्येही कक्ष सुरू करण्याची माहिती सिव्ह‌िल सर्जन डॉ. एकनाथ माले यांनी दिली. मात्र या हॉस्प‌िटलची संख्या व त्यांची नावे महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी बैठकीला आले नसल्याने त्यांना सांगता आली नाहीत. अशीच गत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी आले नसल्यानेही झाली. यामुळे डॉ. माले यांनी स्वाइन फ्ल्यूच्या नियंत्रणासाठी तयार केलल्या विकेंद्रीकरण पद्धतीची अंमलबजावणी कशी करणार याची माहिती यावेळी दिली. मात्र स्वाइन फ्ल्यूची रुग्ण संख्या, औषधांचा साठा आणि प्रभावी अंमलबजावणीची नेमकी जबाबदारी कोणाची असाही प्रश्न निर्माण झाला. तर महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेचा आरोग्य विभागातील डॉ. गरूड माहिती देण्यासाठी सिव्ह‌िलमध्ये आले होते. मात्र गर्दीमुळे त्यांना कक्षात जाता आले नसल्याचे सांगितले.

टॅमी फ्ल्यूचा पुरेसा साठा

गावातील रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुकास्तरावरच उपचार मिळावेत असे प्रयत्न आणि नियोजन आम्ही केले आहेत. जानेवारीपासून आम्ही पाच हजार संशयित रूग्णांची तपासणी केली आहे. त्यातील २० रुग्ण स्वाइनने ग्रस्त असल्याचे अहवालातून समोर आले आहे. औषधांचा साठा पुरेसा असून टॅमी फ्ल्यूच्या २० हजार गोळ्या उपलब्ध आहेत. तर मुलांसाठी सिरमच्या ५० बॉटल आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, रूमाल वापरावा, चांगले डायट ठेवावे, धुम्रपान टाळावे, अशी माह‌िती सिव्हिल सर्जन डॉ. माले यांनी दिली.



स्वाइन फ्ल्यू होऊ नये म्हणून बाजारात उपलब्ध असलेली लस फक्त डॉक्टर व धोक्याच्या स्थितीत अथवा डॉक्टरांनी सल्ला दिलेल्यांनीच घ्यायच्या आहेत. शहरात लस उपलब्ध आहे की नाही यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. लशींचा साठा पुरेसा ठेवण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे. खासगी डॉक्टर सरसकट नागरिकांना ही लस घेण्याचा सल्ला का देत आहेत यावर आम्हाला बोलायचे नाही. आमच्याकडे फक्त स्वाइन फ्ल्यू झाल्यानंतर उपचाराची जबाबदारी आहे. स्वाइन फ्ल्यू होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये त्याबाबत आजाराबाबत पुरेशी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, अशी डॉ. एकनाथ माले व आरएमओ डॉ. राजेंद्र दुसाने पत्रकार परिषदेत मांडली.

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images