Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भावभक्तीने फुललीनाशिकनगरी

$
0
0

टीम मटा

नाशिकनगरी गेल्या दोन दिवसांपासून भावभक्तीने फुलल्याचे पाहायला मिळाले. हिंदू धर्मीयांबरोबर मुस्लिम धर्मीयांच्याही धार्मिक कार्यक्रमांनी शहर गजबजलेले होते. आत्मा मालिक ध्यानयोग मिशन, संत निरंकारी मंडळातर्फे सत्संग, ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचा सेल्फ गव्हर्नन्स विथ गुड गव्हर्नन्स, तसेच सुन्नी दावत-ए-इस्लामी संस्थेतर्फे राज्यस्तरीय सुन्नी इज्तेमाने शहर भक्तिभावाने भारलेले होते.

एकाच वेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी कुंभमेळ्यानंतर प्रथमच नाशिककरांनी अनुभवली. आत्मा मालिक ध्यान योग मिशन आणि ध्यानपीठातर्फे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सामुदायिक आत्मचिंतन सोहळा झाला. या सोहळ्यात विदेशी भक्तांनी लक्ष वेधले होते. सुन्नी इज्तेमामध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ धर्मगुरू मुफक्किरे इस्लाम हजरत मौलाना कमरुज्जमा आजमी, सुन्नी दावत-ए-इस्लामीचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी आदींनी हजेरी लावली. संत निरंकारी मंडळातर्फे झालेल्या सत्संग सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती होती.

संबंधित वृत्त...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रब्बी पिकांसाठी दोन आवर्तने

$
0
0

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत, तसेच पिण्यासाठी अनुक्रमे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते.

सविस्तर वृत्त..२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षात नाशिक बरेच मागे गेले: भुजबळ यांची भाजपवर टीका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: पाच वर्षांत काय झाले यावर बोलून आता काही फायदा नाही. परंतु पाच वर्षांत आपला जिल्हा बराच मागे गेल्याची खंत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने भाजपचे काही नेते उपोषणाला बसले आहेत. परंतु बाकीच्या बाबतीत ते लोकशाही ठेवतात का हे माहीत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पाच वर्षांत ते काही कामे करू शकले नाहीत. काही वेळा कामे होत नाहीत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात घेतली.

मराठवाड्यातील जनतेच्या पाणी प्रश्नासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषणाला बसल्या होत्या याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधण्यात आले. ते म्हणाले, उपोषण करणे हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. बाकीच्या बाबतीत मात्र ते लोकशाही ठेवतात का हा भाग माहीत नसल्याचा खोचक टोलाही भुजबळ यांनी लगावला. पाच वर्ष ते कामे करू शकले नाहीत. काही कामे होतात. काही होत नाहीत. परंतु काहीतरी अडचण आल्याशिवाय ते सत्याग्रहाला बसले नसावेत असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्या आंदोलनांकडे आम्ही लोकशाहीच्या आणि सकारात्मक दृष्टीकोनातूनच पहातो. काही मदत करता आली तर पाहू अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी बराच कालावधी गेला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे ठरल्यानंतर दिल्लीतही चार दिवस बैठका झाल्या. लोकशाही मार्गाने सरकार चालले पाहीजे अशा सूचना सोनिया गांधी यांनी केल्या होत्या. राज्य घटनेनुसारच सरकार चालेल हे शिवसेनेने मान्य केले असून त्यामुळे सरकार टिकण्यात काही अडचण येईल असे वाटत नसल्याचे सूतोवाच भूजबळ यांनी केले.

'१० ₹च्या थाळीसोबत २०₹ची बिस्लरी पिणारा गरीब माणूस'

पुरवठा मंत्री हे प्रमोशनच

राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यासारखी महत्वाची पदे भुषविली असताना आता अन्न आणि पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी देऊन सरकारने आपली पदावनती केली असे वाटत नाही का असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. अन्न आणि पुरवठा विभागाची जबाबदारी मोठी आहे. लोकांना अन्न पुरविण्याचे काम मिळणे हे प्रमोशनच आहे. आम्ही शिव भोजन थाळी सुरू केली आहे. अन्न पुरविणे हे चांगले आणि पुण्याचे काम असल्याचे सांगत भुजबळ यांनी आहे त्यात समाधानी असल्याचे म्हटले आहे.

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नकाः राज ठाकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बौद्धिक संपदा’ विषयावर ‘निमा’त आज कार्यक्रम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील निमा हाऊस येथे निमा आयएफसीतर्फे २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे हे प्रमुख अतिथी असतील. तर प्रमुख वक्ते म्हणून सहस्ररश्मी पुंड व पराग खेडकर हे वक्ते लाभले आहेत.

या कार्यक्रमात 'बौद्धिक संपदा अधिकारांचे उद्योग व्यवसायातील फायदे' या विषयावर पराग खेडकर हे मार्गदर्शन करतील तर 'बौद्धिक संपदा अधिकार-पैलू व आंतरराष्ट्रीय नियमावली' या विषयावर सहस्ररश्मी पुंड हे मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धेच्या बाजारपेठेत सरस ठरण्यासाठी व संशोधन व नवनिर्मितीस चालना देत व्यावसायिक वृद्धी साधण्यासाठी बौद्धिक संपदा अधिकार या विषयाची जाण असणे आवश्यक ठरते. त्यासंदर्भात उद्योजक व व्यावसायिकांमध्ये वरील कार्यक्रमाद्वारे जनजागृती निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. तरी अधिकाधिक उद्योजक व्यावसायिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व नितीन वागस्कर, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा आयएफसी चे समन्वयक विजय लगड यांनी केले आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कांदा निर्यातबंदी असल्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत कांदा दर अचानक घसरले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे. सोमवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रती क्विंटल सरासरी बाजारभाव २२०० ते २३०० रुपये इतकाच मिळाल्याने शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी करण्यात आली.

सिन्नर येथे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केलेली असल्यानेच स्थानिक कृषी बाजार समित्यांत कांद्याचे दर अचानक गडगडले. केंद्राने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करून कांदा निर्यात सुरू करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संघटनेचे नवनाथ बर्के, दत्ता डोमाडे, प्रकाश काकड, किरण बर्के, भाऊसाहेब कांगणे आदींनी सिन्नर तहसीलदार यांची भेट घेतली. निर्यात बंदी उठविली नाही तर संघटनेतर्फे आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही संघटनेतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या प्रवाशांकडूनदोन लाखांची वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भुसावळ रेल्वे विभागाने मनमाड येथे फुकट्या व अनियमित प्रवाशांच्या विरोधात विशेष तपासणी मोहीम राबवून ११ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० दरम्यान १ लाख ७१ हजार रुपयांची दंड वसुली केली आहे. सोमवारी भुसावळ रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली. ११ जानेवारीपासून २० जानेवारीपर्यंत वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली फुकट्या रेल्वे प्रवाशांना दणका देण्यासाठी मनमाड येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३८ रेल्वे तपासनीस व ११ रेल्वे सुरक्षा बल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

अशी होती मोहीम

१५ जानेवारी---३१ केसेस---२७ हजार २९०

१६ जानेवारी---३८ केसेस---२५ हजार ७८०

१८ जानेवारी---१८ केसेस---२२ हजार ९९०

एकूण २६९ केसेस---१ लाख ७१ हजार ५१० रुपये वसूल

दंड न भरल्याने चार जणांवर पोलिस कारवाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील बिजोरसे येथील शीतल काशिनाथ पानसरे (वय २०) या महिलेने घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान शीतलची आत्महत्या आहे की घातपात याविषयी पोलिस चौकशी करीत आहेत. जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी २६ जानेवारी रोजी पहाटे शीतल यांनी घरा शेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शीतल पानसरे या महिलेच्या पश्‍चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पती-पत्नीतील भांडणातून आत्महत्या केल्याची चर्चा असली तरीही पेालिस या घटनेची सखोल चौकशी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मा तळवलकर यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विदुषी पंडित पद्मा तळवलकर यांच्या सुश्राव्य गायनाची मेजवाणी नाशिककर रसिककर श्रोत्यांना मिळाली. निमित्त होते, माघी गणेश जन्मोत्सवाचे. तळवलकर यांच्या शास्त्रीय गायनाचा हा बहारदार कार्यक्रम शंकराचार्य न्यास येथे सोमवारी सायंकाळी रंगला.

मेनरोडवरील गणेश भक्तमंडळी यांच्यातर्फे माघी गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा तिसरा दिवस पं. तळवलकर यांच्या गायनाने रंगला. राग यमनमध्ये विलंबित एकतालातील 'जिया मानत नाही' या बंदिशीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर विविध सुश्राव्य रचना त्यांनी सादर केल्या. कार्यक्रमाला साथसंगत सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋग्वेद देशपांडे (तबला), अंकिता देवळे-दामले, श्रुती आठवले (तानपुरा) यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, परिचय डॉ. अविराज तायडे यांनी केला. श्री गणेश जन्माचे कीर्तन मंगळवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता होणार असून, दुपारी १२ वाजता श्री जन्म कार्यक्रम होणार आहे. तसेच चिन्मयी आठले यांचे बुधवारी (दि. २९) रात्री ९.३० वाजता शास्त्रीय गायन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट रोडची तपासणी

$
0
0

काम पूर्ण होण्यास आणखी महिनाभराचा अवधी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान पूर्णत्वास आलेल्या स्मार्ट रोडच्या कामात अनेक तांत्रिक त्रुटी असून, या रस्त्याची निर्मिती नियमानुसार झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्मार्ट रोडच्या रायडिंग क्वालिटीची आता आयआयटी पवईकडून तपासणी केली जाणार आहे. या स्मार्ट रोडवरची आणखी चार कामे प्रलंबित असून, त्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागेल, असा दावा कंपनीने केला आहे.

नाशिककरांसाठी डोकेदु:खी ठरलेला अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या १.१ किलोमीटर लांबीच्या रस्ता पावणेदोन वर्ष उलटूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नाशिकच्या वाहतुकीची कोंडी अधिकच वाढली आहे. रस्त्याबाबत नाशिककरांनी ओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर कंपनीच्या वतीने घाईघाईत २६ जानेवारीपासून अपूर्णच रस्ता खुला करण्यात आला आहे. या रस्त्याच्या रायडिंग क्वालिटीबाबत तक्रारी आहेत. रस्त्यावर वाहने चालविताना मोठ्या प्रमाणावर जम्पिंग होत असल्याने त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष सीताराम कुंटेच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना कुंटेंनी सदरच्या रस्त्याबाबत असलेल्या तक्रारींबाबत सांगितले, की या रस्त्याच्या तांत्रिकतेबाबत तक्रारी आल्या असून, त्याबाबत तपासणी केली जाणार आहे. स्मार्ट रोड हा उंच-सखल असून, या रस्त्याची अनुभूती स्वत: घेतली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रायडिंग क्वालिटीची आयआयटी पवईकडून तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, रस्ता वाहतुकीस खुला केल्याची माहितीही यावेळी कुंटे यांना देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराला किती दंड झाला याचीही आकडेवारी उपलब्ध नव्हती.

...

विविध कामे अपूर्णच

स्मार्ट रोडचे काम अद्यापही अपूर्णच असून, या कामाला जवळपास महिनाभराचा कालावधी लागेल, असा दावा कंपनीने केला आहे. या रस्त्यावर हायमास्ट बसवणे, ई-टॉयलेट लावणे, बस थांबे, महावितरणच्या भूमिगत वीज जोडणीचे काम अपूर्ण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केपीएमजी’ची चौकशी

$
0
0

- स्मार्ट प्रकल्प रखडल्याने निर्णय, कंपनीला बजावली नोटीस

- आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती करणार मूल्यमापन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात स्मार्ट सिटी कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रोजेक्टचा आराखडा तयार करणाऱ्या तसेच, कंपनीला सल्ला देणाऱ्या 'केपीएमजी' या सल्लागार कंपनीला दुय्यम मनुष्यबळ पुरवणे चांगलेच भोवले आहे. प्रकल्पांमधील दिरंगाईमुळे आता 'केपीएमजी'ची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील स्मार्ट संचालक तथा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे व स्वायत्त संचालक भास्कर मुंढे यांच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत कंपनीच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाणार आहे. कंपनीच्या आराखड्यात आणि सल्ल्यात त्रुटी आढळल्यास कंपनीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती स्मार्ट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिली. दरम्यान, विविध प्रकल्पांच्या दिरंगाईचे खापर महापालिकेवर फोडण्याचा प्रकारही समोर आला आहे.

स्मार्ट सिटीच्या जवळपास ५१ प्रकल्पांच्या सल्ल्यासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाल्याने प्रकल्प खर्च वाढून त्याचा भुर्दंड महापालिकेला बसल्याचे समोर आले आहे. त्यातच केपीएमजीने अधिकचा मोबदला मागितल्याने वस्तुस्थितीचे भान आलेल्या स्मार्ट अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २७) स्मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव सादर करीत केपीएमजीचे काम असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवला. सल्लागाराचे नियंत्रण नसल्यामुळे स्मार्ट रोडचे काम रखडल्याचा तसेच प्रोजेक्ट गोदा, गावठाणातील रस्ते विकास आदी प्रकल्पांची अंमलबजावणी लांबल्याचा ठपका या प्रस्तावाद्वारे ठेवण्यात आला आहे. याशिवाय कामात अनियमितता, तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध न करून देणे, प्रकल्पांच्या खर्चातील वाढ, प्रकल्पांच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर न करणे आदी दोषारोपही केपीएमजीवर ठेवण्यात आले आहेत. यावरून स्मार्ट संचालक तथा स्थायी सभापती निमसे यांनी स्मार्ट अधिकाऱ्यांना धारेवर धरले. केपीएमजीचे काम असमाधानकारक होते, तर स्मार्ट अधिकाऱ्यांनी कोटीच्या कोटी रुपये केपीएमजीला अदा का केले, कोट्यवधींची देयके अदा करताना स्मार्ट प्रकल्पांच्या कामांचा प्रगती अहवाल कंपनीकडून स्मार्ट अधिकाऱ्यांनी का घेतला नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी निमसे यांच्यासह संचालकांनी केली. त्यामुळे एकूणच प्रकल्पांच्या विलंबाबाबतचा ठपका ठेवत केपीएमजीच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पत्रकार परिषदेत कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांनी याविषयी माहिती दिली. स्मार्ट प्रकल्पांसाठी केपीएमजीला ३१ कोटी रुपये फी देण्याचे यापूर्वी निश्चित केले असले तरी जी कामे असमाधानकारक आहेत, त्याविषयीचे मूल्यमापन झाल्यानंतरच देयके देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. कंपनीने दुय्यम दर्जाचे मनुष्यबळ उपलब्ध केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही कुंटे यांनी स्पष्ट केले.

...

महापालिकेवर खापर फोडण्याचा प्रयत्न

स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या दिरंगाईचे खापर अध्यक्ष कुंटे यांनी महापालिकेवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. केपीएमजी ही नामांकित सल्लागार कंपनी असल्याचे नमूद करीत कंपनीने दिलेल्या सल्ल्यानंतर स्मार्ट कामांची तांत्रिक मंजुरी ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे कंपनीवरच संपूर्ण जबाबदारी टाकता येणार नाही, असे नमूद करीत स्मार्ट कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांनी दर्जाहीन स्मार्ट प्रकल्पांचे खापरही मनपावर फोडण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्मार्ट कंपनीकडे तांत्रिक मंजुरीसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे मनपा अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागली होती, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे केपीएमजीसह स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत तारांसाठी स्मार्ट सिटीतून निधी द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भूमिगत वीजतारा आणि गावठाणातील रस्ते विकासकामांचा समावेश स्मार्ट सिटीच्या कामांत नाही. ही कामे मार्गी लागावीत यासाठी ती स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट केली जावीत, अशी मागणी भाजपच्या काही आमदारांनी सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचाच स्मार्ट सिटी हा प्रकल्प असून, त्यामधील त्रुटी पक्षातील आमदारच निदर्शनास आणून देत असल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात सोमवारी चर्चिला गेला.

भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या वेळी लोकप्रतिनिधींकडून विकासकामांसाठी निधीची मागणी करण्यात आली. नाशिक मध्यमधील भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि नाशिक पश्चिममधील आमदार सीमा हिरे यांनी रस्ते आणि भूमिगत वीजतारांचा मुद्दा उपस्थित केला. जुने नाशिक, तसेच सिडको परिसरातील उघड्यावरील भूमिगत तारांचा प्रश्न जीवघेणा ठरतो आहे. यातून छोट्या-मोठ्या दुर्घटना घडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्मार्ट सिटीच्या कामात यासाठी तरतूद नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या कामांसाठीही निधीची तरतूद केली जावी, अशी मागणी त्यांनी भुजबळ यांच्याकडे केली. आमदारांच्या मागणीचा विचार करून स्मार्ट सिटी कामांत समावेश करता आला तर बघा, अशा सूचना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांना केल्या. स्मार्ट सिटीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मांढरे यांनी दिले.

निधी देण्यास आमदारांचा विरोध

तीर्थक्षेत्र विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी फरांदे आणि हिरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध दर्शविला. शहर विकासासाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध होऊ शकतो, याकडे लक्ष वेधताना जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती असून, शहरातील आमदारांनी निधी पळवला तर इतर मतदारसंघांचा विकास कसा होईल, असा सवाल उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रस्त्यालगत हेरिटेज प्रवेशद्वार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग आता अधिकच प्रशस्त होणार असून, या उपक्रमासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखण्या आणि हेरिटेज वास्तूला शोभेल असे प्रवेशद्वार साकारता यावे, या प्रस्तावाला स्मार्ट सिटीची मान्यता मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी दिली. त्यामुळे स्मार्ट रस्त्यावर स्मार्ट प्रवेशद्वार उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागावेत, याकरिता जिल्हा नियोजन आराखड्यात ३४ कोटी रुपये जादा निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गंगापूर धरण येथील बोट क्लबसह अन्य काही प्रकल्पांना गती मिळू शकणार आहे. या निधीचा विनियोग कलाग्राम, शिवाजी स्टेडियम नूतनीकरण, जिल्हा निर्मिती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्सव व अंजनेरी येथे साहसी प्रशिक्षण केंद्र निर्मिती या प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.

..

आगामी नियोजन आराखडा ९१८ कोटींच्या घरात

जिल्हा नियोजन समितीच्या १८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत बराचसा निधी अखर्चित राहिल्याने पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. केवळ २३ टक्के निधी खर्च झाल्याचे या बैठकीत पुढे आले. सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ७९१ कोटी २४ लाखांचा आराखडा होता. त्यापैकी १६६ कोटी रुपये खर्च होऊ शकले. २३ टक्केच निधी खर्च झाल्याने निधी खर्चात जिल्ह्याचा राज्यात ३० वा क्रमांक होता. परंतु, प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणेने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे एकूण ३१५ कोटींच्या वर्क ऑर्डर निघाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. चाळीस टक्क्यांपर्यंतचा निधी खर्च झाल्याने जिल्हा निधी खर्चात १५ व्या क्रमांकावर आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. सन २०२०-२१ या वर्षासाठी आराखड्यात घट होऊन तो ७३३ कोटींचा करण्यात आला आहे. परंतु, तो ७९१ कोटींचाच ठेवला जावा आणि १८५ कोटी २४ लाख रुपये जादा निधीची मागणी सरकारकडे केली जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २०२०-२०२१ या वर्षाचा आराखडा ९१८ कोटींपर्यंत जाणार आहे.

..

ड्रीम प्रोजेक्टसाठी निधी

प्रकल्प निधी

बोट क्लब १ कोटी

कलाग्राम ७ कोटी

शिवाजी स्टेडियम २० कोटी

जिल्ह्यास १५० वर्षे ५ कोटी

साहसी प्रशिक्षण केंद्र १ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिकतर्फे जिल्हास्तरावर भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडू व व्यक्तींना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारात गुणवंत क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, गुणवंत खेळाडू पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारात प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख दहा हजार असा समावेश आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक व संघटक यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात आले. त्याप्रसंगी विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे, अविनाश खैरनार, मंदार देशमुख, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते विनीत मालपुरे आदी उपस्थित होते.

…..

यांचा झाला सन्मान

डॉ. मिनाक्षी हरिभाऊ गवळी (गुणवंत क्रीडा संघटक), राजेश छबीलाल क्षत्रिय (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार बास्केटबॉल), अदिती संजय सोनावणे (गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला तलवारबाजी), सुलतान नुरखाँ देशमुख (गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष कॅनोईंग व कयाकिंग), सागर वसंत बोडके (गुणवंत खेळाडू पुरस्कार-दिव्यांग खेळाडू, पॅरा ॲथलेटीक्स), मिताली श्रीकांत गायकवाड (थेट पुरस्कार-दिव्यांग खेळाडू, पॅरा आर्चरी), प्रचिती सुजित चंद्रात्रेय (रौप्य पदक आंतरराष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा, अर्मेनिया), दिलीप रतन खांडवी (वीर अभिमन्यू पुरस्कार ३९ वी राष्ट्रीय कनिष्ठ खोखो स्पर्धा, सुरत, गुजरात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीष पालवे यांना पितृशोक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारीतय जनता पक्षाचे नाशिक महानगराचे अध्यक्ष गिरीश पालवे यांचे वडील रामचंद्र सखाराम पालवे (वय ९३) यांचे निधन झाले. सोमवारी पालवे यांच्या मूळ गावी राहुरी, भगूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामचंद्र पालवे हे एक प्रगतशिल शेतकरी असून राहुरी विविध कार्यकारी सोसायटीचे अनेक वर्षे त्यांनी चेअरमनपद भूषविले होते. सामाजिक कार्याची आवड मृदू व प्रेमळ स्वभावामुळे ते पंचक्रोशीत लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात सहा मुलगे व दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लिल फोटो काढून युवतीवर बलात्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अश्लिल फोटो काढून ते आई व भावाला दाखविण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी कुमारी माता झाल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रज्ज्वल श्रीकृष्ण मेश्रामज्वय २१, रा. अकोट, जि. अकोला) असे संशयिताचे नाव आहे. पंचवटीतील अल्पवयीन मुलीचे घर गाठून संशयिताने हे कृत्य केले. घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. यावेळी त्याने अश्लिल अवस्थेतील फोटो मोबाइलमध्ये काढून ते फोटो तिच्या आई व भावाला दाखविण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून तिने अर्भकास जन्मास घातल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात कलम ३७६ (२) (आय) (एन) सह बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) अधिनियम २०१२च्या कलम ४,६,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंचावरून पडल्याने दोन जणांचा मृत्यू

शहरातील पंचवटी भागात वेगवेगळ्या ठिकाणी उंचावरून पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा नदीपात्रावरील पुलावरून तर वृद्धाचा घराच्या टेरेसवरून पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पंचवटीतील वाघाडी नदीच्या पूलावरून शनिवारी (दि. २५) सकाळी ५० वर्षांचा अनोळखी व्यक्ती पडला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना टकलेनगर भागात घडली. अरुण विरचंद चव्हाण (वय ६४, रा. वैतरणा सोसा.) हे दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या टेरेसमध्ये उभे असतांना अचानक जमिनीवर कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तीन दुचाकींची शहरामध्ये चोरी

शहर परिसरातील गंगापूर व अंबड या पोलिस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. दानिश फकीर महम्मद पठाण (रा. गरीबनवाज कॉलनी, वडाळा गाव) यांची मोपेड (एमएच १५ एफएस ५१८१) शनिवारी (दि. २५) चोरट्याने गंगापूर हद्दीतून चोरून नेली. तर दिलीप जगन्नाथ मांजरेकर (रा. अनुनय अपार्ट. महात्मानगर) यांची मोपेड (एमएच १५ डीवाय ०३२५) सोमवारी (दि. २०) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटना प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कार्तिक अरविंद जाधव (रा. कामटवाडे रोड, खुटवडनगर) यांची यामाहा दुचाकी (एमएच १५ जीयू ८४०१) त्यांच्या घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलांच्या पर्स लक्ष्य

$
0
0

शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गर्दीची संधी साधत वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या पर्समधील पाकिटे चोरट्यांनी हातोहात लांबविले. त्यातील एक महिला मेनरोड भागात कपडे खरेदी करीत होती. तर दुसरी रामकुंड भागात धार्मिक विधीसाठी आली होती. दोन्ही महिलांच्या पर्स मध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिने होते. या प्रकरणी पंचवटी आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काठे गल्लीत राहणाऱ्या रंजना नानासाहेब उगले (रा. द्वारका हॉटेल मागे) या शनिवारी (दि. २५) सायंकाळी आपल्या बहिणीसह कपडे खरेदीसाठी मेनरोड भागात गेल्या होत्या. दोन्ही बहिणी खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत उगले यांच्या पर्समधील पाकीट लांबविले. त्यात मोबाइल व रोकड असा सुमारे २६ हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसरी घटना गोदाघाटावरील रामकुंड परिसरात घडली. इंदिरा संजय रुंग्ठा (वय ५३, रा. गोरेगाव, मुंबई) या शनिवारी (दि. २५) धार्मिक विधीसाठी शहरात आल्या होत्या. गोरगरिबांना वस्त्रदान करून त्या रामकुंड येथे हात पाय धुऊन पुजा करून निघाल्या असता अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत बॅगेतील पर्स चोरून नेली. पर्समध्ये पाच हजार रुपये रोख, कोटक महिंद्रा क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, गोरेगाव स्पोर्ट क्लब महिंद्रा क्लबचे कार्ड, फोटो, पती संजय कमलकिशोर रुंग्ठा यांचे आधारकार्ड असा मुद्देमाल होता.

काठे गल्लीमध्ये

भरदिवसा घरफोडी

काठेगल्ली भागातील माणेकशॉ नगर येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी एक लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल सतीश शर्मा (रा. साई किरण अपार्ट. माणेकशॉ नगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शर्मा कुटुंबीय शनिवारी (दि. २५) कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात घुसलेल्या चोरट्यांनी कपाटातील सात हजाराच्या रोकडसह सुमारे ९७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वातून ‘नजर’ सुरक्षा

$
0
0

शहरात ३२०० सीसीटीव्हीची सज्जता; १६० कोटी रुपयांची तरतूद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात स्मार्ट सिटी कंपनी १६० कोटी रुपये खर्चून ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असून मे २०२० अखेरपर्यंत शहर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली येणार आहे. शहराच्या सुरक्षेसाठी ३२०० कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून त्यासाठी येणारा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे आमदार, खासदार, नगरसेवकांचा निधी, सामाजिक दायित्वातून उर्वरित २४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती 'स्मार्ट सिटी'चे अध्यक्ष सिताराम कुंटे यांनी सोमवारी दिली. स्मार्ट सिटीतील कंमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरदेखील मे २०२० पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीची १५ वी बैठक अध्यक्ष कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. त्यास आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील उपस्थित होते. या संचालक मंडळाच्या बैठकीत महाआयटीला ४५ कोटी ४३ लाखांचा निधी एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात माहिती देतांना कुंटे यांनी, शहर सीसीटीव्हीने सज्ज केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शहरात सरकारच्या महाआयटीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून त्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्‍चर कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या सेंटरचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या मंजूर असलेल्या १६० कोटींमधून कमांड कंट्रोल सेंटरसह ८०० सीसीटीव्ही कॅमेरे जोडले जाणार आहे. परंतु, पोलिसांच्या अहवालानुसार शहरात प्रमुख ठिकाणी चार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. एवढे कॅमेरे बसविण्याचा आर्थिक भार पेलावणारा नाही. त्यामुळे आता सामाजिक दायित्वातून उर्वरित कॅमेरे बसविले जाणार आहे. नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या निधीतून देखील कॅमेरे बसविता येणार आहे. त्याव्यतिरिक्त विविध कंपन्यांना सामाजिक दायित्व निधीतून कॅमेरे बसविले जातील.

तांत्रिक मान्यतेची गरज

सामाजिक दायित्वातून कॅमेरे बसविण्यासंदर्भात आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या निकषानुसार तसेच कमांड अॅण्ड कंट्रोलच्या तांत्रिकतेनुसारच ठराविक व्हिजनचे कॅमेरे बसविले जाणार आहे. कॅमेऱ्यांसाठी बिझनेस टेक्‍निकल मॉडेलनुसार तांत्रिक सहकार्य स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्हाध्यक्षपदी केदा आहेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने शहरात गिरीश पालवे यांना शहराध्यक्षपदी कायम ठेवले असतानाच, नाशिक ग्रामीणमध्ये भाकरी फिरवली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जुना व नवा वाद उफाळलेला असताना आणि इच्छुकांची भाऊगर्दी असताना पक्षाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत वाणी यांनी आहेर यांच्या निवडीची घोषणा केली.

शहराध्यक्षपदानंतर नाशिक ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा सोमवारी संपली. जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांची निवडप्रक्रिया गेल्या आठवड्यात झाली. ही प्रक्रिया झाल्यानंतर, जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष व कार्यकर्ता यांची एकत्रित बैठक जिल्हाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (दि. २७) चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे झाली. उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत वाणी, सह निवडणूक अधिकारी नंदकुमार खैरनार, खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, बापू पाटील, सतीश मोरे, विलास ढोमसे, कैलास सोनवणे, चंद्रकांत राजे, केदा आहेर यांच्यासह तब्बल १८ इच्छुकांनी तयारी दाखविली. या पदासाठी मोठी रस्सीखेच दिसून आली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी माघारीचे आवाहन केले असता, सर्वांची माघार झाली. या माघारी नाट्यानंतर संघटनमंत्री काळकर, जिल्हा निवडणूक अधिकारी वाणी यांनी आहेर यांची बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. आहेर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आहेर यांची निवड होताच, कार्यकर्त्यांनी करत आंनदोत्सव साजरा केला. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मनीषा पवार, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम आदी उपस्थित होते.

१८ जण होते इच्छुक

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी तब्बल १८ जण इच्छुक होते. त्यामुळे एवढ्या इच्छुकांची माघारी करताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे बैठक तीन तास उशिराने सुरू करावी लागली. यानंतर इच्छुक अडून बसल्याने दीड तास त्यांची समजूत काढण्यात गेली. त्यानंतर ही निवड बिनविरोध झाली.

भाजपने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी नगरपंचायती, नगरपालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला सत्तेत आणण्यासाठी काम करणार आहे. तरुण, महिला वर्ग पक्षाशी जोडून एक उत्तम प्रकारचे पक्षसंघटन करून जिल्ह्याचा लौकिक होईल, असे काम काम करण्याचा संकल्प आहे.

- केदा आहेर, जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात दोन महिन्यांत ६५ टक्के निधी खर्चाचे आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २,५६५ कोटी ७८ लाखांच्या प्रस्तावित निधीपैकी अवघे ९६० कोटी ५६ लाख म्हणजेच ३५ टक्केच निधी खर्च झाला आहे. त्यामुळे दोन महिन्यांत १,६०५ कोटी २२ लाखांचा निधी खर्च करण्याचे आव्हान पाचही जिल्ह्यांच्या प्रशासनांना पेलावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. ३१) २०१९-२० या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये ही बैठक होणार असून, या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अलीकडेच नाशिकसह अन्य जिल्ह्यांमध्येही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी झाल्या. आता अर्थमंत्री पवार विभागनिहाय आढावा घेत असून, खर्चाची टक्केवारी व पुढील वर्षाच्या नियोजनासाठी निधीची मागणी याचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे व नंदुरबार अशा पाचही जिल्ह्यांसाठी २०१९-२० या वर्षासाठी २,५६५ कोटी ७८ लाखांचा प्रस्ताव होता. मात्र, एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत अवघे ९६० कोटी ५६ लाख रुपयेच खर्च होऊ शकले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे, प्रगतिपथावर असणारी कामे, पूर्ण झालेली कामे आणि अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. याशिवाय आगामी आर्थिक वर्षासाठी किती निधीची आवश्यकता आहे, याचा अंदाजही या बैठकीत घेण्यात येणार आहे.

जिल्हा -मंजूर निधी (कोटीत)-खर्च निधी (कोटीत)

नाशिक -७९१.२४ कोटी-३१४.७४ कोटी

धुळे - २९८.७१ कोटी-१००.२४ कोटी

जळगाव -४५१.१२ कोटी-१३५.७४ कोटी

अ.नगर -५७०.७२ कोटी -२३८.५७ कोटी

नंदुरबार -४५२.९९ कोटी-१७१.२७ कोटी

एकूण -१६०५.२२ कोटी-९६०.५६ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवथाळी जीवजाळी!

$
0
0

दृष्टिक्षेपात...

- दहा रुपयांत जेवणासाठी वेळेआधीच झुंबड

- अर्ध्या तासात संपल्या थाळी

- लाभार्थीचे नाव, छायाचित्राची मोबाइल अॅपवर नोंद

- जेवणाची वेळ १२ ते २

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वडापावसाठीही हल्ली १२ ते १५ रुपये मोजावे लागत असताना, अवघ्या दहा रुपयांत शिवथाळी जेवण मिळू लागल्याने नागरिकांच्या त्यावर अक्षरश: उड्या पडत आहेत. स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घेता यावा, याकरिता जिल्ह्यातील शिवथाळी केंद्रांवर सोमवारी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या तासाभरातच ६०० थाळ्यांचा कोटा फुल्ल झाल्याने जेवणाशिवायच परतावे लागल्याने जिल्ह्यात सुमारे ४०० नागरिकांची निराशा झाली. येत्या काही दिवसांत योजनेचा जसजसा प्रसार होईल, तशी जेवणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने थाळ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवथाळी या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. पहिल्या दिवसापासूनच या योजनेला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही १० रुपयांत जेवण मिळावे याकरिता जिल्ह्यातील चारही केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या. दुपारी १२ ते २ या कालावधीतच हे जेवण मिळणार असले तरी त्याकरिता प्रत्येक केंद्राला १५० थाळींची मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. शिवशाही केंद्रांना ठरवून दिलेली मर्यादा आणि लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांची प्रचंड संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याने येथे गर्दी वाढू लागली आहे. सकाळी साडेअकरापासूनच नागरिकांनी केंद्रांवर रांगा लावल्या. शिवथाळीचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्यांचे छायाचित्र आणि नाव विशिष्ट अॅपवर नोंदविल्यानंतरच त्यांना जेवणासाठी प्रवेश देण्यात येत होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महसूल कर्मचारी संघटनेची कॅन्टीन असून, तेथेही जेवणासाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे दुपारी साडेबारापर्यंत १५० नागरिकांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. तेवढ्याच नागरिकांना जेवण देण्यात आले. त्यानंतरही दुपारी दोनपर्यंत नागरिक येथे येतच होते. परंतु, थाळी संपल्याचे त्यांना सांगितले जात होते. त्यामुळे या एकाच केंद्रावरून सुमारे १०० नागरिकांना जेवण न करताच परत जावे लागले.

...

कर्मचारी संघटनेकडून अन्नदान

आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते महसूल कर्मचारी संघटनेच्या कॅन्टीनमध्ये शिवथाळी उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी दुपारी दीड-दोनपर्यंत १५० नागरिकांना जेवण देण्यात आले. त्यानंतरही नागरिकांचा ओघ सुरूच होता. महसूल कर्मचारी संघटना ही कॅन्टीन चालवित असून, त्यांनी त्यांच्या खर्चाने अतिरिक्त ३५ नागरिकांना जेवण दिले. त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या काही दिंडीकऱ्यांना संघटनेने स्वखर्चातून जेऊ घातल्याची माहिती अध्यक्ष दिनेश वाघ यांनी दिली.

.

मालेगावात उरल्या थाळी

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० रुपयांत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, रविवारी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच पहिल्या दिवशी येथे १११ थाळ्यांचा लाभ देण्यात आला. ३९ थाळी उरल्या. दुसऱ्या दिवशी मात्र येथील १५० थाळी संपल्या. पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाशिकरोड परिसरातील दीपक हॉटेल येथेही तासाभरातच दीडशे थाळींसाठी रजिस्ट्रेशन झाले.

...

दहा रुपयांत थाळी, द्या टाळी!

केव‌ळ दहा रुपयांत थाळीच्या उत्सुकतेपोटी काही जण या योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत. ही उत्सुकता आणि तृप्तीचा ढेकरे या मंडळींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. काही जणांनी तर दहा रुपयांत थाळी, मग द्या टाळी, अशी प्रतिक्रियाच व्यक्त केली. परंतु, ज्यांना थाळीचा लाभ घेता आला नाही, त्यांची नाराजीही स्पष्टपण जाणवत होती. अधिकाधिक गरजूंच्या पोटात हे अन्न जावे अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणा करीत आहे.

...

राज्यभरात शिवथाळीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. नाशिक जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी ६०० नागरिकांनी या थाळीचा आस्वाद घेतला. थाळींच्या कोट्यापेक्षा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना थाळीचा लाभ देता आला नाही. थाळींची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच होऊ शकेल.

- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images