Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पेस्ट कंट्रोलचे ‘उड्डाण’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पेस्ट कंट्रोलच्या विद्यमान वादग्रस्त ठेकेदाराला मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कानउघाडणी केल्यानंतर अखेर नव्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासाठी आरोग्य व वैद्यकीय विभागाने घाईघाईत नवीन निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, तीन वर्षे साडेसतरा कोटींत झालेल्या कामासाठी तब्बल ३७ कोटींचे 'उड्डाण' घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंधरा दिवसांत नवीन निविदेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे लेखापरीक्षण विभागाने ३७ कोटींच्या वाढीव किमतीबाबत घेतलेल्या आक्षेपावर विभागाने खुलासाही सादर केला आहे. पेस्ट कंट्रोलसाठी सदरची वाढीव रक्कम ही कर्मचाऱ्यांची वाढीव संख्या, वेतनात झालेली वाढ, तांत्रिक कामे वाढल्यानेच झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या गेल्या तीन वर्षांचा पेस्ट कंट्रोलचा ठेका वादात सापडला असतानाच नव्याने काढण्यात येत असलेला ३७ कोटींचा ठेकाही प्रसिद्धीपूर्वीच वादात सापडला आहे. सदरच्या ठेक्याची मुदत ९ ऑगस्टला संपत असतानाही महापौर रंजना भानसी यांनी नवीन ठेक्याचा ठराव देण्यास विलंब केला. त्याचा फायदा घेत विद्यमान ठेकेदारालाच मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली. दुसरीकडे सन २०१६-१७ मध्ये महापालिकेने तब्बल १७ कोटी ३५ लाख रुपये खर्चून तीन वर्षांकरिता धूरफवारणीचा ठेका दिला होता. परंतु, नवा ठेका तब्बल ३७ कोटींवर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत पेस्ट कंट्रोलचे काम १७ कोटी ३५ लाखांत झाले असताना नव्या तीन वर्षांसाठी अचानक ३७ कोटांची प्रस्ताव आल्याने विभागही आश्चर्यचकित झाला आहे.

जबाबदारी ढकलण्याची व्यवस्था!

नव्या प्रस्तावात तांत्रिक बाबी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अवघी १२५ ने वाढली असताना दुपटीपेक्षा अधिक रक्कम वाढलीच कशी, असा शेरा मारत सदरची फाइल लेखापरीक्षण विभागाने आरोग्य व वैद्यकीय विभागाकडे पाठविली होती. रक्कम वाढली कशी याचा खुलासा झाल्याशिवाय शेरा मारणार नसल्याचा पवित्रा लेखापरीक्षण विभागाने घेतल्यानतर आरोग्य व वैद्यकीय विभागाने खुलासा सादर करीत कर्मचाऱ्यांची वाढीव संख्या, वेतनात झालेली वाढ, तांत्रिक कामे वाढल्यानेच रक्कम वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे लेखापरीक्षण विभागाने आरोग्य व वैद्यकीय विभागाने कागदावर सदरच्या वाढीव रकमेचे समर्थन केल्यानंतर आपल्या मागणीनुसार मंजूर करीत असल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे सदरच्या ठेक्याची जबाबदारी आपल्यावर येऊ नये अशी व्यवस्था लेखापरीक्षण विभागाने केली आहे. लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर प्रशासनाने बुधवारी घाईघाईत पंधरा दिवसांची कमी कालावधीची निविदा काढली आहे. या ठेक्यासाठी भाग घेऊ इच्छिणाऱ्या ठेकेदारांसाठी १४ ऑगस्ट रोजी प्री-बीड बैठक बोलावली आहे.

---

मुदतवाढीचे स्वप्न भंगले

विद्यमान ठेकेदाराला पद्धतीतशीरपणे तीन ते सहा महिने मुदतवाढ मिळावी यासाठीची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, त्यातील गुपिताचा बोभाटा झाल्यानंतर आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर अखेर ठेकेदाराला महिनाभर मुदतवाढ मिळेल, असा दावा आता केला जात आहे. त्यासाठी कमी कालावधीच्या निविदा काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांची विद्यमान ठेकेदारावर केलेली मेहेरबानी फसली असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संसार थाटणार, भांडवल उभे राहणार

$
0
0

कुंभकर्ण कुटुंबासाठी समाजबांधवांचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिवृष्टीमुळे संसार ढिगाऱ्यात सापडला, तर महापुरात दुकान बुडाले या असह्य वेदना सोसणाऱ्या कुंभकर्ण कुटुंबीयांच्या मदतीला अखेर कासार समाजबांधवांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रशासनाच्या निवारा शेडमध्ये चार दिवसांपासून खडतर परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाच्या दाहतकेच्या कथेवर 'मटा'ने प्रकाशझोत टाकला. यानंतर कुंभकर्ण कुटुंबीयांचे पुनर्वसन करत समाजबांधवांनी घर भाडे तत्वाने घेऊन दिले असून भांडवल उभारणीसाठी मदत केली आहे. असे असले तरी, या कुटुंबाच्या पुनर्वसनाकडे प्रशासनाची पाठ कायम असल्याने समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जुने नाशिक भागातील म्हसरुळ टेक येथील किशोर कुंभकर्ण यांचा वाडा रविवारी (दि. ४) सकाळी कोसळला. किशोर कुंभकर्ण, आई शशिकला कुंभकर्ण आणि भाऊ भालचंद्र कुंभकर्ण हे तिघे त्या वाड्यात राहत होते. यानंतर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून रंगारवाडा शाळेत स्थलांतर केले. महापूरात भांडी बाजारातील त्यांचे लहान दुकानही बुडाले. यामुळे हे कुटुंबीय खचले. डोळ्यासमोर कोसळलेला वाडा अन् पुरात बुडालेले दुकान यातून सावरायचे कसे, या विवंचनेत ते जगत होते. पोटात अन्नाचा कण नव्हता, तर तीन दिवसांत पाणीही प्यायले नव्हते. या असह्य वेदनावर 'मटा'ने बुधवारी (दि. ७) प्रकाशझोत टाकला. या वृत्तामुळे या कुटुंबाची परिस्थिती कासार समाजबांधवांच्या लक्षात आली. यानंतर सायंकाळी समाजबांधवांची बैठक झाली. यात कुंभकर्ण कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी समाजबांधवांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबाला म्हसरुळ टेक परिसरात घर भाडे तत्वाने घेऊन देण्यात येणार आहे. हे भाडे समाजबांधव भरणार असून त्यांचे दुकान पुन्हा सुस्थितीत यावे म्हणूनही भांडवल उभे करून देण्यात येणार आहे. यासह या कुटुंबासाठी तीन ते चार महिने पुरेल इतका किराणा खरेदी करून दिला जाणार आहे. या कुटुंबाला बुधवारी रात्री उशिरा शाळेतून म्हसरुळ टेक परिसरातील घरात स्थलांतरीत करण्यात आले. यामुळे या कुटुंबाची विवंचना संपली असून समाजबांधवांच्या मदतीसाठी कुटुंबाने आभार मानले आहे. मात्र, उदरनिर्वाहाची चिंता असलेल्या या कुटुंबाकडे प्रशासनाने पाठ कायम ठेवल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे.

किशोर कुंभकर्ण यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बुध‌वारी सायंकाळी समाज बांधवांची बैठक घेतली. यात या कुटुंबाला भाडे तत्वाने घर घेऊन देण्यासह, तीन महिन्यांचा किराणा आणि दुकानाचे भांडवल उभारण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

- बाबूशेठ कुंभकर्ण,

अध्यक्ष, कासार समाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम विभागाची गाळ निर्मूलन मोहीम

$
0
0

बांधकाम विभागाची

गाळ निर्मूलन मोहीम

नाशिकरोड : सिन्नर फाटा ते कोटमगाव मार्गावर दारणा नदीला नुकत्याच आलेल्या पुरात पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आला. या गाळामुळेच कोटमगाव येथे दुचाकी घसरून पडल्याच्या घटना बुधवारी घडल्या. या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळली. त्यानंतर उप अभियंता चांगदेव सोनवणे, शाखा अभियंता सचिन शेळके, अभियांत्रिकी सहाय्यक संजय पगारे, मैल मजूर पंढरीनाथ मोंढे आदींनी कोटमगाव येथे धाव घेत साचलेला गाळ जेसीबी मशिन आणि पाण्याचा फवारा वापरून हटविला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच या समस्येची दखल घेत उपाययोजना केल्याने या रस्त्यावरून नागरिकांसह वाहनचालकांना ये-जा करणे शक्य झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभवार्तालाल पूररेषेत बांधकामास मंजुरी

$
0
0

नाशिक : गोदावरी व नंदिनी नदीला २००८ पाठोपाठ नुकत्याच आलेल्या महापुरामुळे पूररेषेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २००८ नंतर आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूररेषेमुळ नदीकाठच्या मिळकतींचा पुनर्विकास, नवनिर्मितीवर मर्यादा आल्या होत्या. परंतु, जलसंपदा विभागाने महापालिकेला लाल पूररेषेच्या अधीन राहून जोत्यापासून किमान ४५ सेंटिमीटरवर बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे नदीकाठी पुनर्विकास व नवीन बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य फुटसाल स्पर्धेतपुणे विजेते, मुंबई उपविजेते

$
0
0

महाराष्ट्राच्या संघाची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा फुटसाल असोसिएशन आणि महाराष्ट्र फुटसाल असोसिएशनतर्फे पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात १३ वर्षांखालील वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य आजिंक्यपद फुटसाल स्पर्धेत पुणे संघाने विजय मिळवला, तर मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला.

क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, महाराष्ट्र फुटसाल असोसिएशनचे सचिव सुनील पूर्णपात्रे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, क्रीडाधिकारी अविनाश टिळे, फुटसाल असोसिएशनचे सीईओ प्रवीण शिरगावकर आदींच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप झाला. निवड समितीत प्रकाश कारकेरा, निशांत मार्लीगकर आणि राहुल मोरे यांचा समावेश होता.

महाराष्ट्राचा संघ

आर्यन कारकेरा, प्रणय चिरानी, सिद्धान्त मलिक, अनिश वर्मा, अर्णव लुंकड, अझीज बागजी, भौमिक कुमार, अनुज पाटील, सत्यजित काळे, एड्रिन जॉर्ज, क्राईस्ट डिसुझा, राहुल शर्मा, रणवीर पाटील, केल्विन अँड्रीझ, अर्णव मलिक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारबाजी स्पर्धेला सुरुवात

सांगा कसे जगायचे?

$
0
0

रस्त्यावर राहण्याची पाटील कुटुंबावर वेळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापूर निमित्त ठरला अन् घरासह दुकान वाहून गेले. आजवर केलेल्या कार्याची पावती म्हणून हाती माती मात्र ठेवून गेले. प्रशासनाने पाठ फिरवलीच पण, आप्तेष्टही मदतीस नकारले. चुलीवर अन्न शिजविण्याची धान्याचे दाणेही घरात उरले नाही. अवघ्या काही रुपयांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होता पण, ते साधनच नाहीसे झाले. आता रस्त्यावर राहत पुढील जीवन कसे जगायचे या विवंचनेत ते दिवस काढत आहे. ही कथा आहे, अंत्यविधी सेवा देणाऱ्या पाटील कुटुंबाची.

पार्थिवांवर वेळीअवेळी विधीवत अंत्यसंस्कार करणाऱ्या कुटुंबावर रस्त्यावर जीवन जगण्याची वेळ आली आहे. पंचवटीतल्या गणेशवाडी अमरधाममध्ये सुनीता पाटील आणि त्यांचे कुटुंबीय अंत्यसंस्काराची सेवा करतात. यंदा आलेल्या महापुरात त्यांचे संपूर्ण घर वाहून गेले असून दुकानातील एकही वस्तू उरलेली नाही. अंत्यविधीचे साहित्य विकत उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. रविवारी आलेल्या महापुरात गोदाकाठचे यांचे घर वाहून गेले. गेल्या चार दिवसात इथे एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसून ३० व्यक्तींच्या या कुटुंबाला अमरधामच्या प्रवेशद्वारावर झोपण्याची वेळ आली आहे. घराच्या भिंती कोसळल्या, तर संसारपयोगी वस्तू पुरात वाहून गेल्या. अंत्यविधीचे साहित्य विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून घरखर्च भागायचा. पण, आता अंत्यसंस्कारच बंद असल्याने नेमके जगावे कसे, हे संकट आमच्यासमोर उभे ठाकल्याचे पाटील कुटुंबीय सांगतात. गेल्या चार दिवसात पोटात अन्नाचा कण गेलेला नाही. वीज पुरवठाही खंडित असल्याने समस्यांचे गाऱ्हाणे कोणासमोर मांडावे, हे समजत नाही. नागरिक आणि लोकप्रतिनिधी एखाद्या पार्थिवाच्या अंत्यसंस्कारावेळी हक्काने फोन करून मदत मागतात. मात्र, आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो, तेव्हा मात्र सर्वांची पाठ फिरते, हेच वास्तव कित्येक वर्षांपासून आम्ही झेलत आहोत. परिस्थितीशी दोन हात करण्याची हिंमत उराशी आहे. पण, जगण्याच्या समस्यांचे ओझे दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगताना पाटील कुटुंबियांच्या डोळ्यात अधू दाटून येतात.

महापूरात घर आणि दुकान वाहून गेले. चार दिवसात प्रशासनाने काहीच मदत केली नाही. आजवर अंत्यविधीची सेवा देण्यासाठी अनेकदा अनेकांनी मदत मागितली. पण, आम्ही मदतीचा हात मागितल्यावर कोणीही पुढे आले नाही.

- सुनीता पाटील, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ खड्ड्यात,रस्ता दुरुस्तीच्या नावाने बोंबाबोंब

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीकडे झेपावणारे नाशिक शहर पावसामुळे खड्डेमय झाले आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, नवीन केलेली कामेही उखडली आहेत. शहरात एकीकडे खड्ड्यांमध्ये रस्ते शोधण्याची वेळ आली असताना, महापालिकेने ३८ कोटींचे ठेके दिलेले १५ ठेकेदार मात्र या आपत्कालीन परिस्थितीत गायब झाले आहेत. डांबरीकरण आणि खडीकरणाच्या डागडुजीसाठी ३८ कोटींच्या या दोन ठेक्यांची मुदत ऑगस्ट अखेरपर्यंत संपत आहे. यामुळे ठेकेदार कामासाठी टाळाटाळ करीत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच आता शंका उपस्थित केली जात आहे. रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करणारे नागरिक आता डांबरीकरणातील मलई खातंय कोण असा सवाल करीत आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासह मनसेच्या सत्ताकाळात महापालिकेच्या वतीने शहरात जवळपास सातशे कोटींचे रस्ते नव्याने करण्यात आले होते. त्यात नव्या रस्त्यांवर डांबरीकरण, अस्तीकरणाची कामे करण्यात आली होती. नगरसेवकांच्या प्रेमापोटी प्रशासनाकडून दरवर्षी ५० ते १०० कोटींपर्यंतचे डांबर रस्त्यांवर ओतले जाते. त्यामुळे शहरातील रस्ते निदान पावसाळ्यात चकचकीत असणे अपेक्षित होते. याउलट स्थिती सध्या शहरात अनुभवास येत आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नवीन, तसेच जुन्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शहरात रस्त्यांपेक्षा खड्डेच अधिक दिसत असल्याने वाहनधारकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरावा लागत आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून तयार करण्यात येत असलेले नवीन रस्तेही उखडल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपयेही पाण्यात गेले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर पावसाने खड्डेमय झाले आहे. नगरसेवकांनी याबाबत आरडाओरड सुरू करताच काही ठिकाणी मातीने मलमपट्टी करून खड्डे बुजवण्याचा प्रताप पालिकेने केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

...

ठेकेदारांची मुदत महिनाअखेर संपणार

महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी दोन स्वतंत्र ठेके दिले आहेत. एका ठेक्यात डांबरीकरण, खडीकरण आणि मुरूम टाकण्याचे काम देण्यात आले आहे, तर दुसऱ्या ठेक्यात या कामासाठी मशिनरी पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. या १८ महिन्यांच्या ठेक्यासाठी ३८ कोटींची तरतूद केली आहे. या ठेक्याची मुदत आता ऑगस्टमध्ये संपत आहे. शहर एकीकडे खड्डेमय झाले असताना, सदरचे ठेकेदार मात्र या ठेक्यांची मुदत संपण्याची वाट पाहत आहेत. या ठेकेदारांना प्रशानाचा वरदहस्त तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

...

...अशी स्मार्ट सिटी नको

शहरातील त्र्यंबकरोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड, सारडा सर्कल, मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक, द्वारका, इंदिरानगर, सिडको, सातपूर ,नाशिकरोड, पंचवटी या भागांमध्ये खड्ड्याचेच साम्राज्य आहे. पावसामुळे शहरात पडलेल्या खड्ड्यांची संख्या कमी नसताना, काही टेलिकॉम कंपन्यांनी ऐन पावसाळ्यात भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या कामांमुळेही रस्त्यांची वाट लागली असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्यावरून वाट काढणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे अशी स्मार्ट सिटी नको, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवनमुळे प्रवाशांचे हाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईहून नांदेडला जाणारी तपोवन एक्स्प्रेस बुधवारी नाशिकरोडच्या नियोजित प्लॅटफार्म एकवर न येता प्लॅटफार्म दोनवर आल्याने महिला, वृद्ध प्रवाशांचे हाल झाले. जीव धोक्यात घालून काही प्रवाशांनी रूळ ओलांडून, दुभाजकावर चढून गाडी पकडली. असा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे प्लॅटफार्म एकवर येण्याची घोषणा करण्यात आली. प्रवासी वाट पहात होते. मात्र, ऐनवेळी ही गाडी प्लॅटफार्म दोनवर आली. गाडी चारच मिनिटे येथे थांबते. गाडीत जागाही नसते. तिकीट काढून प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. गाडी पकडण्यासाठी प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्या. काहींनी पादचारी पुलाच्या मोठ्या पायऱ्या धापा टाकत चढून गाडी पकडली. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. या आधीही याच गाडीबाबत असा प्रकार घडला घडला होता. रेल्वे पोलिसांनीही गर्दी आवरणे अवघड झाले होते. दुर्घटना झाली असती, तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या माऱ्यानंतर उद्योग पूर्वपदावर

$
0
0

एमआयडीसीतील ६० टक्के उद्योगांना फटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुसळधार पावसामुळे अंबड, सातपूर व सिन्नर येथील अनेक उद्योगांमध्ये पाणी गेल्यानंतर यातील बहुतांश कंपन्याचा कारभार पूर्वपदावर आला आहे. काही कंपन्या अजूनही बंद आहे. या कंपन्यांमधील एकत्रित आकडा समोर आला नसला तरी लाखो रुपयांचा फटका या उद्योगांना बसला आहे. विशेष म्हणजे अनेक कंपन्यांना आपले उत्पादन बंद ठेवल्याने त्यातूनही नुकसान झाले आहे.

सर्व उद्योगांना शनिवारी (दि. ३) सुट्टी होती, याच रात्री व नंतर रविवारी (दि. ४) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर अनेक कंपन्यामध्ये पाणी गेले. त्यामुळे काहींनी कामगारांना दोन दिवस सुट्टी दिली. त्यानंतर येथील पाण्याचा उपसा केल्यानंतर या कंपन्याचे काम मंगळवारी व बुधवारी पूर्वपदावर आले. काही कंपन्याची वीजेची वायरिंग ही अंडर ग्राऊंड असल्याने त्यांनी दक्षता म्हणूनही आपला उद्योग बंद ठेवला. सिन्नर एमआयडीसीत असलेल्या अनेक कंपन्यांचेही पावसामुळे नुकसान झाले. नाशिक येथे सातपूर व अंबड एमआयडीसीबरोबर असलेल्या उद्योगाबरोबरच नाईस या सहकारी औद्योगिक वसाहतीलाही या पावसाचा दणका बसला. या सर्वांची माहिती औद्योगिक संघटनेनेने सुद्दा घेतली. पावसामुळे ६० टक्के उद्योगांना त्याचा फटका बसला आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

औद्योगिक वसाहतीत असलेल्या रस्त्यांविषयी सर्वांच्या तक्रारी होत्या. त्यात पावसामुळे बहुतांश रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे. त्यामुळे या वसाहतीत जाणे सर्वांसाठी आता अवघड झाले आहे. रस्त्यांच्या बाजूने झालेले चिखल व ठिकठिकाणी पाणी साचल्याचेही प्रकार आहे.

पावसामुळे ६० टक्के उद्योगांना फटका बसला आहे. अनेक उद्योगांनी दोन दिवस सुट्टी दिली. या नुकसानीचा एकत्रित आकडा नाही. पण, याचा फटका अंबड, सातपूर व सिन्नर येथील उद्योगांना बसला. आता जवळपास उद्योग पूर्वपदावर आले आहे.

- वरुण तलवार,

अध्यक्ष, आयमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांची घरेही यात उद्ध्वस्त झाली आहे. अशा कुटुंबाना किलबिल शाळेतील विद्यार्थ्यांनी शंभर किलो तांदूळ, पन्नास किलो गहू, डाळी, गव्हाचे पीठ, साखर, टूथपेस्ट, साबण, बिस्किट पुडे, कपडे यासारख्या जीवनावश्यक वस्तू देत मदतीचा हात दिला.

शाळेच्या मुख्याध्यापिका फ्लोरा यांनी मुलांना मदतीचे आवाहन केले होते. यानुसार विद्यार्थ्यांनी वस्तू मदत स्वरुपात दिली. नैसर्गिक आपत्ती आणि त्यावेळी समाजासाठी आदर्श नागरिकांनी करावयाची कर्तव्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या वस्तू, धान्य शाळेच्या मुख्याध्यापिका फ्लोरा, गायत्री शास्त्री, योगिता कुलकर्णी, नूतन व्यास, विल्मा या शिक्षिका, पहिली ते नववीचे विद्यार्थी प्रतिनिधी यांनी बुधवारी अशोकस्तंभाजवळ मल्हार खाण या भागातील पूरग्रस्तांना सुपूर्द करून माणुसकीचे दर्शन घडवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमली पदार्थांसह अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव येथील अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पोलिस पथकाने बुधवारी पहाटे वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत नामपूर-मालेगाव रस्त्यावर कारवाई करीत अफू या अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७ कलो ९५२ ग्रॅम इतका (३९ हजार ७६० रुपये) अफू जप्त करण्यात आला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलले दोघे हे अफूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मालेगाव-नामपूर रस्त्यावर आरोपी सुभाष बाणा मोहनराम बिष्णोई (वय २७) व सोहनराम लुनाराम बिष्णोई (वय २२, दोन्ही रा. जालोडा, ता. लोहावत जि. जोधपूर, राजस्थान) यांना छापा टाकून अटक करण्यात आली. बुधवारी पहाटे साडे तीन वाजता महादेव मंदिर सावतावाडी येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी दोन्ही आरोपींना या पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अफूची बोंडे, दुचाकी, मोबाइल, वजन काटा असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिची अदा करी फिदा

$
0
0

तिची अदा करी फिदा

श्रावणक्वीनच्या ऑडिशन्समध्ये नृत्य आणि अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. हिंदी चित्रपटातील विविध प्रसिद्ध गाण्यांवर यावेळी तरुणींची पावले थिरकली. सोबतच नाटकातील काही स्वगत आणि चित्रपटांतील काही तुकड्यांतील अभिनय तसेच मीडियातील बातम्यांचीदेखील मिमिक्री यावेळी करण्यात आली. तरूणींनी श्रावणक्वीनसाठी खास वेगवेगळा पोषाख यावेळी परिधान केला होता. अनेकांनी कोल्हापूरी तर काहींनी मराठमोळ्या साड्या नेसत परीक्षकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील रस्त्यांवर आता ‘पिंक रिक्षा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह त्यांना प्रवासात सुरक्षेची हमी देणाऱ्या 'पिंक रिक्षा' नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यांवरही धावणार आहेत.

स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आले असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत. महापालिकेच्या बजेटमध्ये यासंदर्भातील तरतूद करण्यात आल्यानंतर महापालिकेने या योजनेचा प्रारंभ केला असून, गरजू महिलांकडून प्रशिक्षण व परवान्यासाठी अर्ज मागविले आहेत.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने महिला व विद्यार्थिनींकडून प्रवासासाठी खासगी रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु, या रिक्षांमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरात रिक्षामध्ये महिलांची छेडछाड होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पिंक रिक्षा या नावाची संकल्पना पुढे आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र अशी वाहतुकीची व्यवस्था व तीही महिलांनीच चालवलेली अशी ही संकल्पना नवी दिल्ली, मुंबई व पुण्यात राबविली जात आहे. त्यामुळे नाशिकमध्येही अशी योजना हिमगौरी आहेर-आडके यांनी स्थायी समिती सभापती असताना मांडली होती. सभापतिपदावर असतानाच त्यांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत महिलांना पिंक रिक्षा चालविण्याकरिता प्रशिक्षण व परवाने उपलब्ध करून देण्यासाठी आहेर-आडके यांनी सन २०१९-२० मध्ये भरघोस निधीची तरतूदही केली होती. प्रशासकीय पातळीवर या योजनेचा अभ्यास केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

अर्ज करण्याचे महिलांना आवाहन

महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांतर्गत पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविण्यासही सुरुवात केली आहे. ज्या महिलांना असे प्रशिक्षण हवे असेल, त्यांनी महापालिकेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात आले आहेत. त्यासाठी कोरे अर्ज महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर. तसेच महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रांसह या कार्यालयात ३० ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

ही कागदपत्रे गरजेची...

---

-प्रशिक्षणासाठी १८ वर्षे वयाची अट

-नाशिकमध्ये तीन वर्षे रहिवास असल्याचा दाखला

-शिक्षण किमान आठवी उत्तीर्ण असावे

-शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक

---

महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज मिळविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. महापालिकेकडून आवश्यक ती मदत यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षेची हमी तर मिळेलच, सोबत स्वयंरोजगारही उपलब्ध करता येणार आहे.

-हिमगौरी आहेर-आडके, माजी सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मॉरिशसमध्येही डॉ. आंबेडकर जयंती उत्सव

$
0
0

सांस्कृतिक मंत्री पृथ्वीराजसिंह रूपन यांची घोषणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या १४ एप्रिल २०२० पासून मॉरिशसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सुरू करणार असल्याची घोषणा मॉरिशस देशाचे कला व सांस्कृतिक मंत्री पृथ्वीराज रूपन यांनी केली. मॉरिशसमध्ये आयोजित फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्थाच्या आंतरराष्ट्रीय फुले-शाहू-आंबेडकर विचार संमेलनात रूपन यांनी ही घोषणा केली.

प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना रूपन म्हणाले, की समाजाला डॉ. आंबेडकरांचे कर्तृत्व दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यानुसारच आम्ही वाटचाल करत असून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर मॉरिशसमध्ये होणे हे या देशाच्या प्रगतीचे लक्षण आहे. संमेलनाचे उद्घघाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. मनोज जाधव, स्वागताध्यक्ष आबा थोरात, ज्येष्ठ कवी सुरेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्ठ कवी सुरेश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन पार पडले. डॉ. निशा भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. कवीसंमेलनात भारत व मॉरिशसमधील कवी सहभागी झाले. 'फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे वैश्विक अवकाश' या विषयावर डॉ. बिदन आबा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्याचे सूत्रसंचालन डॉ. विणा राऊत यांनी केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा फरक लक्षात आणून देऊन हा विचार प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, असे मत डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

मानवतावादी विचारांना मार्गदर्शक

कांबळे म्हणाले, की फुले-शाहू-आंबेडकर या तिन्ही महापुरुषांचे विचार जगातल्या प्रत्येक मानवतावादी विचारांना मार्गदर्शक ठरणार आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. मनोज जाधव यांनी जगात चाललेल्या सध्याच्या अविवेकवादी विचारांवर प्रकाश टाकून फुले-शाहू-आंबेडकरांचे विचारच समाजाला व राष्ट्राला तारक ठरणार आहेत, असे मत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष आबासाहेब थोरात म्हणाले, की फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची ऊर्जा ज्याला मिळाली तो या विचारांचा वसा व वारसा घेऊन निश्चितपणे जागतिक पातळीवर पोहचल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात मॉरिशसपासून होत असल्याचा आनंद होत आहे.

पहिली जागतिक जयंती

फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्थाच्या आंतरराष्ट्रीय फुले-शाहू-आंबेडकर विचार संमेलनात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जागतिक स्तरावरची पहिली जयंती साजरी करण्यात आली. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षापासून मॉरिशसमध्ये फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे धडे पुस्तके शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील, अशी घोषणा यावेळी मराठी भाषक संघाचे अध्यक्ष डॉ. बिदन आबा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुपेंनी निर्माण केला आदर्श

$
0
0

तुपेंनी निर्माण केला आदर्श

दिलीप साळवेकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनधी, नाशिक

नाशिक नगरी साहित्यिकांसाठी ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे चित्रकारांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. वा. गो. कुलकर्णी, शिवाजी तुपे यांच्यासारख्या चित्रकारांनी नाशिकचे नाव देशभरात पोहोचवले आहे. त्यात शिवाजी तुपे यांनी चित्रकलेची वेगळी वाट चोखाळून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन दिलीप साळवेकर यांनी केले.

ज्येष्ठ चित्रकार स्व. शिवाजी तुपे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्स असोसिएशन नाशिक शाखा व नाशिककर कला रसिकांच्या वतीने वैराज कलादालन येथे गुरुवारी रंगोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विक्रांत शितोळे यांनी जलरंगात लॅन्डस्केप चित्रांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. यावेळी साळवेकर म्हणाले की, नाशिककर असलेल्या ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे यांनी विविध माध्यमांमध्ये आपली चित्रकला सादर केली. गोदाघाट हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांची चित्रे आजही येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरताहेत. त्यांची चित्र जास्तीत जास्त कलाकारांनी पहावी, अभ्यास करताना याचा उपयोग व्हावा यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तुपे सरांमध्ये अफाट उर्जा होती. त्यांचे जीवन म्हणजे पाण्यासारखे पारदर्शक होते ते चित्रकला खऱ्या अर्थाने जगले. निसर्ग चित्रण हा त्यांच्या आवडीचा विषय होता.

पुष्पा चोपडे यांनी प्रस्तावना सादर केली. या अगोदर नाशिक कलाकारतर्फे नीलेश भारती, गणेश हिरे, नानासाहेब येवले, प्रशांत प्रभू, हरि धोंगडे, ज्ञानेश्वर डेबाल, विक्रम शितोळे यांनी आपली कला सादर केल्याचे सांगितले. यावेळी आर्कि दिपक देवरे, योगेश कासार, पंडित सोनवणे, आनंद सोनार, अनिल तुपे, श्रीकांत नागरे यांच्यासह कलाकार हजर होते.

…..

विविध स्पर्धांचे आयोजन

१७ ऑगस्ट रोजी नीलिशा फड व्यक्तीचित्रणाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय निसर्ग चित्रण स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. त्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय पारितोषिक ७ हजार, तृतीय पारितोषिक ३ हजार व उत्तेजनार्थ १ हजार रुपयांची दोन अशी पारितोषिके प्रदान केली जातात. यंदा स्केचेसची स्पर्धा होणार आहे त्यासाठी प्रथम पारितोषिक १ हजार, द्वितीय पारितोषक ७०० व तृतीय पारितोषिक ३०० व उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लावण्यखणींची लयबद्ध अदाकारी

$
0
0

'मटा श्रावणक्वीन'मध्ये अभिनय, नृत्याची जुगलबंदी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्लॅमरस दुनियेत येण्याची इच्छा असणाऱ्या युवतींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असलेली श्रावणक्वीन स्पर्धेची प्राथमिक फेरी अमाप उत्साहात पार पडली. आयटी, इंजिनीअरिंग, मेडिकल, मीडिया आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणींनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी नृत्य, गायन, अभिनय, चित्रकला, मिमिक्री असे कलागुण सादर करीत परीक्षकांबरोबरच उपस्थितांचीही मने जिंकली. श्रावणक्वीनचा मुकुट पटकावण्यासाठी स्पर्धक सज्ज झाल्या असून, या प्राथमिक फेरीतून १५ जणींची निवड करण्यात आली आहे.

कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये प्राथमिक फेरीत बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करीत १५ स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी आपले नाव निश्चित केले आहे. यात शंभरहून अधिक स्पर्धकांमधून पारखून स्पर्धकांनी या १५ मुलींची निवड केली. अभिनेत्री नयना मुके, अभिनेता किरण भालेराव, नवीन तोलानी, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील आणि डॉ. समीर फुटाणे यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. मॉडेलिंगच्या ग्लॅमरस क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या मराठी मुलींना व्यासपीठ देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळाला. बॉलिवूडच्या गाण्यावर भरतनाट्यम या नृत्यासह हिपहॉफ, बेली डान्स, लावणी असे नृत्यप्रकार सादर करीत अनेक तरुणींनी नृत्यावरची पकड दाखवली. अभिनय, मिमिक्री यातून अभिनेत्री होण्याची इच्छा अनेकांनी प्रदर्शित केली. अभिनयाच्या झळाळत्या क्षेत्रात येण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत, त्यासाठी आवश्यक तयारीबद्दलचे मार्गदर्शनही परीक्षकांनी केले. प्राथमिक फेरीचे सूत्रसंचालन नुपूर सावजी हिने केले.

या मुलींना आता अंतिम फेरीसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने ग्रुमिंग सेशन घेण्यात येईल. यामध्ये फॅशन कोरिओग्राफीसोबत स्किन केअर, स्पीच थेरपी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टॅलेंट, डाएट आणि व्यायाम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

...

प्रेक्षक अन् परीक्षकांची जिंकली मने

श्रावणक्वीनच्या या प्राथमिक फेरीत विविध गाण्यांवर थिरकत यावेळी सौंदर्यवतींनी प्रेक्षकांची मने जिंकत परीक्षकांनादेखील प्रशंसा करण्यास भाग पाडले. उगवली शुक्राची चांदणी, नैनो वाले ने, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, ज्वानिच्या आगीची मशाल हाती, वाजले की बारा, ओ साकी साकी रे, लेजा लेजा रे, घुमर, मोरणी बनके, इन्स्ट्रुमेंटल, फंटास्टिक म्हणतोय मला, रॅप साँग्स, दिलबर दिलबर, हिप हॉप, ढोलकीच्या तालासह इतर गाण्यांवर यावेळी लावण्यवती थिरकताना दिसल्या.

...

परफॉर्मन्सला वेस्टर्नचा तडका

स्पर्धकांनी यावेळी बेली डान्स, वेगवेगळ्या वेस्टर्न डान्सवर, तसेच बॉलिवूड आणि मराठी संस्कृती जपत लावणी तसेच मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. यावेळी इतर काही स्पर्धकांनी नाट्य प्रवेशदेखील सादर करून दाद मिळवली.

...

...यांचे झाले सिलेक्शन

साक्षी बागूल, जान्हवी संधान, चेतना सूर्यवंशी, सारिका काळे, श्रद्धा कोळपकर, अंकिता शिरसाट, केतकी अंधारे, क्षमा देशपांडे, अनुजा सुराणा, सिद्धी ठोंबरे, देवश्री मुसळे, अक्षदा पाटील, प्रणाली ससाणे, प्राची जोशी, श्रुती क्षीरसागर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉशचे उत्पादन बंद!

$
0
0

आठ दिवसांसाठी निर्णय; कामगारांमध्ये अस्वस्थता

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहन उद्योगात मंदी आल्यामुळे नाशिकच्या बॉश कंपनीने ऑगस्ट महिन्यात आठ दिवस उत्पादन न करण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर कंपनीने जुलैत व त्या अगोदरही उत्पादन करणे बंद केले होते. त्यात पुन्हा हा निर्णय घेतल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बॉश कंपनीने या उत्पादन बंद करण्याची माहिती स्टॉक एक्सजेंचला कळवली आहे.

बॉशअगोदर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीनेसुध्दा वाहन उत्पादन करणे कमी केले आहे. त्यामुळे या कंपनीवर अवलंबून असलेल्या ३५० कंपन्यांवरही त्याचा परिणाम झाला. या सर्व मंदीमुळे कामगारांसाठी ले ऑफ, इन-आऊट सुरू आहे. जून महिन्यात २५ टक्के वाहन विक्रीत घट झाली. जुलैमध्ये त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे एकूण वाहन उत्पादन कंपन्यांनी या परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन जीएसटी कमी करण्याची मागणी केली. आज २८ टक्के जीएसटी आहे, तो १८ टक्के करावा, अशी मागणी केली. त्यानंतर विशेष पॅकेजबाबतही चर्चा झाली.

...

नाशिकमधील कंपन्यांना फटका

वाहन मंदीमुळे सीएट, सिप्रा, सुमो ऑटो टेक, अल्प इंजिनीअरिंग, आर्ट रबर, झेटेक्स, असोसिएट, इटॉन, लेयर कॉर्पोरेशन, प्रीमियम टूल्स, लक्ष्मी इंडस्ट्रीज यासह एक हजारापेक्षा जास्त लघु व मध्यम उद्योगाला फटका बसला आहे. त्यामुळे कामगारांना असुरक्षित वाटू लागले आहे.

...

...ही आहेत कारणे

वाहन उद्योगात मंदी येण्याचे अनेक कारणे असली तरी त्यात जीएसटी, इंधनाचे दर ही कारणे असल्याचे बोलले जात आहे. त्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीच्या निर्णयामुळेही या कंपन्यांवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबरच एकूणच बाजारात मंदीचे कारणही सांगितले जाते.

...

साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या

वाहन उद्योगातील मंदीमुळे देशभरात एप्रिल ते जुलै या कालावधीत तब्बल साडेतीन लाख नोकऱ्या गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिकमधील कामगारांमध्ये भीती तयार झाली आहे. नोकरी गमावणाऱ्यांमध्ये डिलरकडे काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, उत्पादन कंपन्यांची संख्या अजून कमी असली तरी त्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीची चिंता मिटली

$
0
0

यंदा नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याची गरज नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६६ टक्के झाल्याने आता नाशिकच्या धरणातून आता पाणी सोडण्याची वेळ यावर्षी येणार नाही. समन्यायी पाणी वाटप नियमानुसार ६५ टक्के धरण भरले तर गोदावरी खोऱ्यातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या पाणीसाठ्यामुळे मराठवाडा व नाशिक व अहमदनगर मधील संघर्षही यंदा दिसणार नाही.

औरंगाबाद येथील जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा मुकणे व पालखेड धरण समुहातून पाणी सोडले जाते. तर अहमदनगर येथील मुळा, निळवंडे व भंडारा या धरणातून पाणी सोडले जाते. यावर्षी या सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावासाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. जुन, जुलैनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील या धरणातून ७२ टीएमसीहून अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे जायकवाडी धरण ६६ टक्के हून अधिक भरले. अजून दोन महिन्यात त्यात वाढ होणार आहे.

पाणीटंचाईत सोडले पाणी

यापूर्वी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून २०१२-१३ मध्ये ९ टीएमसी, २०१३-१४ मध्ये १.११ टीएमसी, २०१४-१५ मध्ये ७.८९ टीएमसी, २०१५-१६ मध्ये १२.८४ टीएमसी, २०१८-१९ मध्ये ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. या दोन्ही जिल्ह्यात अनेक तालुके दुष्काळी असतांना येथे पाण्याची गरज होती. पण, त्यानंतरही समन्यायी पाणी वापराच्या नियमाने पाणी सोडण्यात आल्याने त्याला मोठा विरोध झाला होता.

असा आहे विसर्ग

नांदुर मध्यमेश्वर धरणातून गुरुवारी ३६ हजार १४२ क्युसेसे पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सर्व धरणांचे पाणी हे नांदुर मध्यमेश्वर येथे येते त्यानंतर येथून हे पाणी जायकवाडीला जाते.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती

एकूण धरणे : २४

१०० टक्के भरलेली धरणे : सात

९० टक्के भरलेली धरणे : सहा

८० टक्के भरलेली धरणे : चार

७० टक्के भरलेले धरण : एक

६० टक्के भरलेली धरणे : तीन

५० टक्के भरलेले धरणे : एक

नांदगाव तालुक्यातील दोन धरणांचा पाणीसाठी शुन्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन विक्रीला नाशिकमध्ये ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागणीतील घट आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी यामुळे वाहन उद्योगाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातच मागील चार महिन्यांत कार, दुचाकी, ट्रॅक्टर अशा वाहनांच्या मागणीत तब्बल २४ टक्के घट झालेली दिसून येते आहे. यामुळे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात एप्रिल ते जुलै २०१९ या कालावधीत सर्व प्रकारच्या ३५ हजार वाहनांची विक्री झाल्याची नोंद नाशिक आणि मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. सन २०१८ मध्ये याच कालावधीत ४६ हजार वाहनांची विक्री झाली होती. दोन वर्षातील नोंदीचा विचार करता यंदा वाहन विक्रीत तब्बल २४ टक्के घट झाल्याचे दिसून येते. कार विक्रीत आतापर्यंत सात तर, दुचाकी विक्रीत तब्बल २७ टक्के घट झाली आहे. सन २०१८ मध्ये नाशिक उपप्रादेशिक कार्यालयात चार हजार ७००, तर मालेगाव कार्यालयात ५४० कारची विक्री झाल्याची नोंद आहे. या वर्षात एकूण पाच हजार २४० कार विकत घेण्यासाठी ग्राहक पुढे आले होते. सन २०१९ मध्ये कार खरेदीचे प्रमाण यावर्षी सात टक्क्यांनी घटल्याचे दिसून येते. नाशिकमध्ये चार हजार पाचशे, तर मालेगावमध्ये ४०० अशा एकूण चार हजार ९०० कार विकल्या गेल्या आहेत.

दुचाकी विक्री व्यवसायाची स्थिती यापेक्षा खराब झाली आहे. सन २०१८ मध्ये एकूण ३४ हजार दुचाकी विक्री करण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक कार्यालयात २५ हजार ५००, तर मालेगावमध्ये आठ हजार ५०० दुचाकींची नोंदणी झाली होती. या वर्षी दुचाकी विक्रीची आतापर्यंत २७ टक्के नोंद झाली आहे. नाशिकमध्ये २१ हजार, तर मालेगावमध्ये चार हजार १०० अशा २५ हजार १०० दुचाकींची विक्री झाली आहे.

....

ट्रॅक्टरकडे पाठ

सन २०१९ मध्ये ट्रॅक्टर विक्रीत ५१ टक्के इतकी मोठी घट झालेली दिसते. सन २०१८ मध्ये नाशिकमध्ये एक हजार ६००, तर मालेगाव कार्यालयात ८१० अशा एकूण दोन हजार ४२० ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा मात्र नाशिकमध्ये ८५०, तर मालेगाव कार्यालयात ३५० म्हणजे अवघ्या एक हजार २०० ट्रॅक्टर विक्रीची नोंद झाली आहे. स्कूलबस विक्रीतसुद्धा ५१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images