Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘डॉ. हेमंत देखमुखांना वाचविण्याचा प्रयत्न’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

जिल्ह्यातील दोंडाईचा घरकूल प्रकरणानंतर जिल्हा बँकेतून बनावट कर्ज कर्जमाफी योजनेत माफ करून घेतल्याच्या आरोपात गुन्हा दाखल माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना या प्रकरणात वाचविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजनेचे तक्रारदार विक्रम हिरामण तायडे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

सन १९८८-८९ मध्ये जे कर्ज डॉ. हेमंत देशमुखांनी जिल्हा बँकेकडून घेतले. त्यासाठी एकही शेतकऱ्यांची संमती घेतली नाही. सोसायटीचे ठरावदेखील बोगस केले. या कर्जातून विखरण, कुरुकवाडे, जोगशेलू याठिकाणी कोणतेही काम केलेले नाही. तरीही ठेकेदाराला पैसे देऊन टाकले. कर्ज थकल्याने जिल्हा बँकेने वसुलीचा लवाद दावा डॉ. हेमंत देशमुख व अन्य संचालक यांच्याविरोधात सहकार न्यायालयात दाखल केला. कर्ज शेतकऱ्यांनी घेतले असते तर तो दावा शेतकऱ्यांवर केला असता. हा दावा दाखल करताना १९९३ मध्ये १ कोटी ७३ लाख एवढी रक्कम दाखविली, त्यावर १९ टक्के व्याजदेखील आकारण्यात येईल, असे स्पष्ट नमूद आहे. हे कर्ज २ कोटी ६८ लाख एवढे २००६ पर्यंत जिल्हा बँकेच्या रेकॉर्डवर आहे. त्यावर बँकिंग सिस्टीमनुसार व्याज व मुद्दल करून मोठी रक्कम होते. याशिवाय कर्ज घेताना सभासद संख्या ३८० असताना ती कर्जमाफी करताना ५६० कशी झाली, असे प्रश्न तायडे यांनी पत्रकातून उपस्थित केले आहेत. तपासाधिकारी नीलेश सोनवणे यांच्याबाबतही तायडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, खटल्याचा तपासाधिकारी बदलण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सोनवणे यांच्याऐवजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी शिरीष जाधव करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पांझरा नदीकाठी पूरहाल कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीला गेल्या दोन दिवसांपासून महापूर आल्याने नदीकिनारी असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने पांझरा नदीकाठावरील धुळेकरांसाठी रविवारची रात्र काळरात्र ठरली होती. मंगळवारी (दि. ६) पाऊस-पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांच्या हाल आणि वेदना कायम आहेत. अतिवृष्टीचा इशारा असल्याने धोक्याची टांगती तलवार मानगुटीवर कायम आहे. दरम्यान, महापालिका आणि जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदत व स्वच्छतेसाठी सरसावले असून, अनेक मदतगार संस्था पूरग्रस्तांसाठी धावून येताना दिसत आहेत. अमळनेर तालुक्यात शेकडो कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ज्या कुटूंबांचे सर्वस्व पूरात वाहून गेले आहे अशा विस्थापितांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन तर आपले कर्तव्य पार पाडत असून, मंगळवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी विस्थापित कुटुंबांना अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यांची व्यवस्था करून दिली. पांझरेला आलेला महापूर ओसरल्याने गाळ व कचरा वाहून आला तो स्वच्छ करण्यासाठी दोन जेसीबी, वीस ट्रॅक्टरची मदत घेण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा आज बंद
तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे माती वाहून आल्याने जलशुद्धीकरणासाठी मोठा अवधी लागत आहे. याकरिता धुळे शहरात आज (दि. ७) पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे. पांझरा नदीच्या पुरामुळे शहर आणि नदीकाठावरील गावांचे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी पंचनामा करण्यासाठी महसूल आणि महापालिका व मंडळधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन स्वतंत्र पथके नियुक्ती केली आहेत. हे पथके पांझराकिनारी आणि महिंदळे, नकाणे, मोराणे या गावात पंचनामे करीत आहेत.

अमळनेर तालुक्यात शेकडो कुटुंबे सुरक्षितस्थळी
अमळनेर : धुळे शहरातून जाणाऱ्या पांझरा नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून १७ दरवाज्यांतून सोमवारी दुपारी पाणी सोडण्यात आले होते. त्याचा फटका धुळ्यातील नदीकाठच्या लोकांनाही सहन करावा लागला होता. आता हेच पाणी पुढे अमळनेर तालुक्यात आल्याने येथील गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये मांडळ, मुडी, बोदरडे, कळंम, बाह्मणे, भिलाली, शहापूर, निम (कपिलेश्वर) या गावांत पुराच्या पाण्याचा धोका आहे. प्रशासनाकडून प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ हे शोध बचाव साहित्यासह तैनात आहेत. तसेच वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक सतीश कांबळे, स्कायलेब डिसुजा, शीतल शिरसाळे, अग्निशमन दलाचे अश्वजित घरडे, प्रकाश चौहान, तेजस जोशी हेदेखील ग्रामस्थांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाजनादेश यात्रा’ आज जिल्ह्यात

$
0
0

जामनेर, जळगावात जाहीर सभा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा आज (दि. ७) जळगाव जिल्ह्यात येत आहे. बोदवड तालुक्यातील घाणखेडा या गावातून यात्रा जळगाव जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

मु्ख्यमंत्री फडणवीस यांनी दि. १ ऑगस्टपासून विदर्भातून ही यात्रा सुरू केली असून, ती आज (दि. ७) जळगाव जिल्ह्यात येणार आहे. ही यात्रा बोदवड, जामनेर, भुसावळ, जळगाव, धरणगाव व अमळनेरमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहे. यात्रेचा पहिल्या टप्प्याचा समारोप ९ ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेत सुरुवातीला बोदवड तालुक्यातील घाणखेडा या गावातून प्रारंभ होईल. पुढे ती यात्रा सायंकाळी जामनेर येथे पोहचेल. जामनेर शहरात रात्री जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री यांच्या यात्रेचे स्वागत करण्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. तसेच जामनेर व जळगाव येथील जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जामेनर येथील कार्यक्रमाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीएम फाउंडेशनतर्फे राज्यातील १ कोटी गरजूंचे डोळे तपासणी करून १ कोटी चष्मे वाटप अभियानाचा शुभारंभदेखील केला जाणार आहे. याचवेळी २०० दिव्यांग बांधवांना जीएम फाउंडेशनकडून चारचाकी मोटारसायकलदेखील वाटप करण्यात येणार आहेत.

नंदुरबारला पहिल्या टप्प्याचा समारोप
उद्या (दि. ८) सकाळी महाजनादेश यात्रा भुसावळकडे रवाना होईल. या वेळी भुसावळ शहरात मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत. यानंतर त्यांची जाहीर सभा होईल. भुसावळनंतर दुपारीच यात्रा जळगावात पोहचून जळगावातील सागरपार्क येथे जाहीर सभा आयाजित करण्यात आलेली आहे. यानंतर ही यात्रा धरणगाव व अमळनेरमार्गे धुळे जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. धुळ्यातून शुक्रवारी (दि. ९) यात्रा नंदुरबार येथे पोहचून तेथे होणाऱ्या जाहीसभेनंतर यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समोरोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये खान्देशातूनही 'मेगाभरती'?

$
0
0

काँग्रेस-राष्ट्रवादीत अस्वस्थता

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा आज (दि. ७) जळगाव जिल्ह्यात येत आहे. भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश याच यात्रेत होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार बहुमताने सत्तेत आले. त्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थादेखील काबीज केल्या. मोदी लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांना फटका बसला असून, ही लाट कायम राहिल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले असून, त्यानुसार ‘महाजनादेश यात्रा’ काढून वातावरणनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रवेश कोणाकोणाचे?
यासाठीच भाजपकडून मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. प्रमुख विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजप प्रथमदर्शनी यशस्वीदेखील झाल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू झालेल्या मेगाभरतीचा क्रम पुढे विदर्भ, मराठवाडा असा राहिला आहे. आता उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन, काँग्रेसचे रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, अमळनेरचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आदींचे भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा मिळू शकलेला नसला तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते शक्य असल्याचा राजकीय जाणकारांचा दावा आहे.

जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी याठिकाणी शिवसेनेचीही ताकद चांगली आहे. युती झाली नाही तर भाजपला शिवसेनेचेच प्रमुख आव्हान असेल, हे भाजप जाणून आहे. युती फिस्कटली तर भविष्यातील राजकीय डावपेच काय असतील, हे लक्षात घेऊनच भाजप चाल करणार आहे. महाजनादेश यात्रेवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपमध्ये घेऊन त्यांचा शिवसेनेविरोधात उभे करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. त्यामुळे कदाचित प्रमुख नेत्यांवरच भाजपची नजर आहे.

...तर भाजपप्रवेश निश्चित
भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, मनीष जैन, शिरीष चौधरी यांची नावे आघाडीवर आहेत. युती झाली नाही तर ही इच्छुक मंडळी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून असेल, या नजरेतून पाहिले जात आहे. विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा सेनेच्या वाट्याला आहे. येथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजप गुलाबराव देवकरांना उतरवू शकते. समजा युती झालीच तर देवकरांना चाळीसगाव मतदारसंघातून भाजप रिंगणात आणू शकते. त्यामुळे देवकरांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे.

चित्र लवकरच स्पष्ट होणार
पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. ५) जळगावात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना महाजन यांनी, राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आपणास दोनदा भेटल्याचे सांगितले. त्यांच्या प्रवेशाबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले. तसेच धुळे येथील आमदार कुणाल पाटील भाजप प्रवेशासाठी संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यामुळे येत्या दोन दिवसांत काय ते स्पष्ट होईलच असे सांगत महाजन यांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता निर्माण केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आताएक दिवसाआड पाणी

$
0
0

सटाणा : सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे चणकापूर धरण निम्मे तर केळझर धरण शंभरटक्के भरून वाहू लागले आहे. तर ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने सटाणावासियांचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. तब्बल दहा महिन्यांपासून पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या शहरवासीयांना आता एका दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पालिकेने हा निर्णय घेत नागरिकांना सुखद धक्का दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावरकोसळली दरड

$
0
0

कळवण : कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे नांदुरी-सप्तशृंग गड घाट रस्त्यात दरड कासळत आहे. मंगळवारी सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान घाटातील गणेश टप्प्याजवळ मोठा दगड कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती. रोपवेचे कर्मचारी गणेश शेलार हे दुचाकीवरून गडावर कामावर जात असताना हा दगड कोसळला. रोपवेच्या सुरुक्षा रक्षकांनी हा दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भात, नागलीला पावसाचा फटका

$
0
0

त्र्यंबकेश्वर तालुक्याती शेतकरी संकटात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाऊस काहीसा विश्रांती घेत आहे. तालुक्याती जनजीवन हळूहळू नुकसानीचा अंदाज येत आहे. रविवारी २४ तासांत ३९६ मिमी असा व्रिकमी पाऊस पडल्याने सर्व जलाशय ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात पहिला पाऊस झाला तेव्हा शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर आवणी योग्य आलेल्या रोपांचे पावसाअभावी नुकसान झाले होते. त्यामुळे आवणीचे कामेही खोळंबली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला आणि आवण्या वेगात आल्या. शिवारात मजूर आणि मशागतीसाठी ट्रक्टर देखील मिळत नव्हते. आवणीसाठी यावर्षी ३०० रुपये मजुरीचा दर आहे. घाईघाईने आवण्या उरकल्या मात्र शनिवार रविवारी झालेल्या विक्रमी पावसाने होते नव्हते ते धुऊन गेले आहे. भात नागली आणि वरईची आवणी झालेले शेत अक्षरश: धुतले गेले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र धुऊन निघाल्याने यावर्षी उत्पन्नात घट येणार आहे. याबाबत शासन यंत्रणांनी वेळीच पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. शेतीच्या नुकसानी बरोबरच पशुपालन व्यवसाय देखील धोक्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझर मर्चंटला रिझर्व्ह बँकेचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेने चार लाखांचा दंड ठोठावत दणका दिला आहे. संचालकांना दिलेला अॅडव्हान्स व डिव्हीडंडच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली आहे. या दंडामुळे सहकार विभागात आरबीआयच्या कारवाईची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेने सहकार विभागावर लक्ष केंद्रीत करून कारवाईचा बडगा उचलणे सुरू केले असून, त्यात राज्यातील अनेक सहकारी बँकांना विविध कारणांनी दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने या दंडाबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. यानुसार बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, ४७(ए) १(सी) मधील सेक्शन ४६(४) याप्रमाणे ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. हे रेग्युलेशन सहकारी बँकांना लागू असल्याचे त्यात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांनी ही माहिती दिली आहे. सहकारी बँकांवर गेल्या वर्षात अनेक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे सहकारी बँकांच्या कारभारात सुधारणा झाली असली तरी काही चुकांमुळे त्यांना भुर्दंड भरावा लागणार आहे. ओझर मर्चंट बँकेवर कारवाई करताना अगोदर रिझर्व्ह बँकेने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. पण, त्यातील उत्तर योग्य न वाटल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. या दंडाबद्दल बँकेच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अद्याप आमच्याकडे रिझर्व्ह बँकेचा आदेश आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छावा क्रांतिवीरचे अधिवेशन रविवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छावा क्रांतिवीर सेनेचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी (ता. ११) शिर्डी येथे शिर्डी- राहता रोडवरील सिद्धसंकल्प लॉन्समध्ये होणार आहे. या अधिवेशनासाठी नाशिकहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांनी औरंगाबाद रोड येथील वरदलक्ष्मी लॉन्सजवळ जमावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केले आहे. या अधिवेशनाबाबत कोअर कमिटीची बैठक औरंगाबाद रोड येथील यश लॉन्स येथे नुकतीच झाली. सायखेडा, भेंडाळी मार्गे वावी येथे वाहनांचा ताफा पोहोचेल. सिन्नर व अन्य भागातून आलेल्या वाहनांसह हा ताफा शिर्डी चौफुलीकडे मार्गस्थ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांचा आजचा संप स्थगित

$
0
0

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाविरुद्ध 'आयएमए'चा निषेध

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने मांडलेले आणि संसदेने संमत केलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास इंडियन मेडिकल असोसिएशनचा ठाम विरोध असून, त्या निमित्ताने आज (७ ऑगस्ट) संपाची घोषणा करण्यात आली होती. मात्र देशातील पूरपरिस्थिती पाहता हा संप पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयएमए नाशिक शाखेने पत्रकार परिषदेत दिली.

शालिमार येथील आयएमए सभागृहात बुधवारी ही पत्रकार परिषद झाली. नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार असून, नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. तसेच, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फक्त पन्नास टक्के जागांचे शुल्क नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण ही फक्त धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. तसेच वैद्यकीय महाविद्यालय काढण्यासाठी संलग्न रुग्णालय असण्याची गरज नाही. कुठल्याही पूर्वपरवानगीविना वैद्यकीय महाविद्यालय काढणे, पदवी आणि पदव्युत्तरच्या जागा वाढवणे, हे या प्रस्तावित कायद्याने शक्य होईल. तसेच काही त्रुटी असल्यास पाच ते शंभर कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. म्हणजेच भ्रष्टाचाराला भरपूर वाव आहे. मान्यता रद्द करण्याची तरतूदच नाही. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशी माहिती प्रशांत देवर यांनी दिली.

हे विधेयक दुरुस्त करणे गरजेचे आहे. हे आंदोलन समाजाच्या दीर्घकालीन आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाचा उच्च दर्जा कायम राखण्यासाठी गरजेचे आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव डॉ. विशाल गुंजाळ यांनी दिली. यावेळी खजिनदार डॉ. किरण शिंदे, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. गीतांजली गोंदकर, डॉ. सारिका देवरे, डॉ. मीनल रणदिवे, डॉ. कपिल पाळेकर, डॉ. पंकज भदाने, डॉ. सागर भालेराव, डॉ. नितीन चिताळकर, डॉ. नितीन वाकचौरे, डॉ. सुलभा पवार, डॉ. माधवी मुठाळ आदी उपस्थित होते.

....

आरोग्यव्यवस्थेला मारक

विधेयकाच्या तरतुदींमध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओ अशा इतर उपचार पद्धतीच्या पदवीधारकांना, आरोग्यव्यवस्था संबंधित कोणासही म्हणजे नर्सेस, टेक्निशियन किंवा सहाय्यक यांना जुजबी प्रशिक्षण देऊन आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्याची मुभा देणे हे अशास्त्रीय आहे. सामाजिक आरोग्यसेवक अशा गोंडस नावाखाली बोगस डॉक्टरांना कायदेशीर मान्यता देण्याचा हा प्रयत्न असल्याचे उपाध्यक्ष हेमंत सोननीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रे बाळगणारे दोघे अटकेत

$
0
0

स्थानिक गुन्हे शाखेची मालेगावी कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातील मोहनबाबा नगर परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचे कब्जातून ०३ देशी बनावटीचे पिस्टल व १४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपींकडून मोहंमद अमीन समसदोहा अन्सारी (वय ३५, रा. गुलशन नगर, यासिन मोहन बाबा नगर, मालेगाव) व जगदीश सजन कासवे ( वय ३०, रा. मोची कॉर्नर, आयटीआय समोर, मालेगाव) या दोघांना अटक करण्यात आली. सदर आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगताना पोलिसांना सापडले. निरीक्षक के. के.पाटील, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, राकेश उबाळे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी कल्याणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान उपयुक्त

$
0
0

मानवी कल्याणासाठी

विज्ञान, तंत्रज्ञान उपयुक्त

विस्तार अधिकारी लहामगे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विज्ञान व तंत्रज्ञान मानवाच्या कल्याणासाठी आज अनेक दृष्टीने उपयुक्त ठरत असून व विद्यार्थ्यांनी जिज्ञासा अंगी बाणून विज्ञानाचे विविध प्रयोग स्वत: करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन विस्तार अधिकारी राजीव लहामगे यांनी केले. प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, राज्य विज्ञान गणित शिक्षण संस्था आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा भिकुसा हायस्कूल सिन्नर येथे पंचायत समिती शिक्षण विभाग व सिन्नर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने विज्ञान मेळावा पार पडला. मेळावा उद्घाटनप्रसंगी लहामगे बोलत होते.

यावेळी गणित विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष कल्पेश चव्हाण यांनी विज्ञान मेळाव्याची कार्यवाही या संबधी माहिती दिली. या मेळाव्यासाठी तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातील एक विद्यार्थी सहभागी होऊन विविध विषयांवर आपले मत मांडले. यातून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची विद्यार्थ्यांनी दिव्या गायकवाड प्रथम, ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडी बुद्रुक या विद्यालयाची विद्यार्थ्यांनी अर्पिता इघे द्वितीय व पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा सत्यम रेवगडे तृतीय यशस्वी झाले. यासाठी विज्ञान शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्रथम व व्दितीय क्रमांकाची निवड जिल्हा स्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी झाली.

भिकुसा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्वातून आपण विज्ञानाचे महत्त्व सहज सोप्या शब्दात मांडण्याचे कौशल्य सांगितले. गणित विज्ञान अध्यापक संघ कार्यवाह आर. टी. गिरी यांनी मानले. या मेळाव्यासाठी परीक्षक प्रा.के. डी. कुलकर्णी, प्रा. एस. एस. काळे, गणित विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी हिताविषयी ‘रुंग्टा’मध्ये चर्चा

$
0
0

विद्यार्थी हिताविषयी 'रुंग्टा'मध्ये चर्चा

पालक-शिक्षक संघ कार्यकारिणीची निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उज्ज्वला सुर्यवंशी यांची तर सहसचिवपदी हेमंत शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शाळेच्या सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालक शिक्षक संघाच्या सचिव नीलिमा कांगणे यांनी सभेपुढे मागील वर्षाचा इतिवृत्तांत वाचून दाखवला व वर्षभरात झालेल्या उपक्रमांची माहिती सभेला दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दयाराम आहिरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे उपाध्यक्ष मिलिंद कचोळे हे उपस्थित होते. सभेस पालकांची उपस्थिती होती. संघाचे खजिनदार अश्विनीकुमार येवला यांनी मागील वर्षाचा खर्च सादर केला त्यास सभेने एकमताने मंजुरी दिली. त्याचप्रमाणे पुढील वर्षाचे अंदाजपत्रकही त्यांनी सादर केले. या सभेत विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक विषय मांडण्यात आले.

सभेत पालक शिक्षक संघाच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दयाराम आहिरे, उपाध्यक्षा उज्ज्वला सुर्यवंशी, सचिव नीलिमा कांगणे, सहसचिव हेमंत शेळके, कोषाध्यक्ष अश्विनीकुमार येवला, अंतर्गत हिशेब तपासणीस, श्रावण सुर्यवंशी, सदस्य वैभवी लेले, अरुणा पाडळे, आशा पाटील, योगेश आदमाने, मनोजकुमार शिंपी, अपर्णा बहाळकर, नर्मदा व्यवहारे, मंगला तुरे, प्राजक्ता टिळे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबरतर्फे जीएसटी प्रमाणपत्र कोर्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबरतर्फे व्यापारी व उद्योजकांसाठी १७ ऑगस्टपासून चार दिवसांचा गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वस्तू व सेवा (जीएसटी) कर तज्ज्ञ प्रदीप कोरडे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा उपस्थित राहणार आहेत.

या कोर्सबद्दल माहिती देताना चेंबरतर्फे सांगण्यात आले की, विविध करविषयक बाबींमध्ये जीएसटी नियम समजून घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी या कोर्समधील अभ्यासक्रमाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हा कोर्स आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे व्यापारी-उद्योजकांना जीएसटी कायद्याचे ज्ञान मिळणे त्यांचे कायद्याबाबतचे ज्ञान वाढवून व्यावहारिक पद्धतीने विकसित करणे व जीएसटी करविषयक समस्या सोडविण्यासाठी विश्लेषणात्मक कौशल्यांचे ज्ञान वर्धन करणे आहे. तसेच कलम १४० पर्यंत संपूर्ण कायदा आणि नियम आणि प्रक्रियात्मक पैलू व त्या विभागासंबंधी खटला, अपील आणि नियम याची माहिती देणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराज पावले, टँकर घटले...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने जलाशयांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. स्थानिक पातळीवरच पिण्याच्या आणि वापरावयाच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे टँकरची मागणीदेखील कमी होत असून, गेल्या पाच दिवसांत टँकरची संख्या १६५ वरून ७४ वर आली आहे.

दुष्काळी भागात पावसाचा जोर वाढला, तर आठवडाभरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे. यंदा जिल्ह्याने दुष्काळाच्या तीव्र झळा अनुभवल्या. त्यामुळेच कधी नव्हे ती खेडोपाड्यांत पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या ४०० पर्यंत गेली. ३०३ गावे आणि ९८५ वाड्या अशा तब्बल १२८८ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत राहिल्या. परंतु, जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पाण्याची उपलब्धता होऊ लागली आहे. त्यामुळे टँकरची मागणीदेखील कमी होऊ लागली आहे. ३० जुलैला जिल्ह्यात १६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. पावसामुळे झालेल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे ही संख्या घटत गेली. आजमितीस जिल्ह्यात ६७ गावे आणि १४९ वाड्याना ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे.

---

तालुकानिहाय पाणीपुरवठा करणारे टँकर

--

तालुका टँकर संख्या

--

बागलाण ७

चांदवड १

देवळा २

मालेगाव ६

नांदगाव २३

सिन्नर ६

येवला २७

एकूण ७४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुद्धिबळ कार्यशाळा

$
0
0

नाशिक : नाशिकमधील खेळाडू व प्रशिक्षकांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी शनिवारी, सकाळी ११ वाजता बॉटविनिक चेस स्कूल, तिडके कॉलनी येथे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांची कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा विनामूल्य आहे. प्रत्येक शाळेतील दोन गुणवत्ताधारक खेळाडू या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. त्यांना शनिवारी दिवसभर ठिपसे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ७०३८८९३६२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेने वृद्ध महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या लोखंडेमळा-उपनगर मार्गावर डोक्यावरून बसचे चाक गेल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. पती व मुलाच्या निधनानंतर टोप्या तयार करून ती महिला आजारी मुलगी, सून व नातवंडांचा सांभाळ करीत होती. वृद्धेचा मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदुबाई शंकरराव सोहनीस (वय ७२, महारुद्र कालनी, लोखंडे मळा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या बहिणीचा मुलगा योगेश गाडेकर (वय ३५, अपूर्वा कॉलनी, शिवरामनगर, टाकळी) यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली. इंदुबाई या लोखंडे मळा परिसरात अनेक वर्षांपासून मोलमजूरी करून राहत होत्या. त्या मंगळवारी (दि. ६) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लोखंडे मळा रोडने जात होत्या. त्याचवेळी एका खासगी शाळेची बस (एमएच १५, एके १३११) मागून वेगाने आली. गाडीने जोरदार धडक दिल्याने इंदुबाई खाली पडल्या. बसचे मागील डाव्या बाजूचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसचालक कैलास शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिने झेलला दुःखाचा डोंगर

योगेश गाडेकर यांनी सांगितले, की अत्यंत कष्टाळू असलेल्या इंदुबाई यांची संकटे झेलत वाटचाल सुरू होती. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन नातू व सुनबाई असा परिवार आहे. इंदुबाईंच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. कालांतराने मुलगा आणि मुलगी यांचेही निधन झाले. त्यांची दुसरी मुलगी तसेच सूनही आजारी असते. आजारी मुलगी व सुनबाई यांच्यासह दोन नातवंडाना सांभाळण्याची जबाबदारी इंदुबाईंवरच होती. गांधी टोप्या तयार करून त्या विकत असत. त्यावरच या सर्वांचा संसार चालत असे. आता मुख्य आधार असलेल्या इंदूबाईच गेल्याने संसार उघड्यावर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडकरांना आता बारा दिवसाआड पाणी

$
0
0

पालखेडच्या पाण्यामुळे वागदर्डी निम्मे भरले

म. टा. वृत्तसेवा. मनमाड

पाच सहा दिवसांत झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे पालखेड धरण ओव्हर फ्लो झाल्याने पाटोदाद्वारे होणाऱ्या विसर्गाचा फायदा पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या मनमाडकरांना झाला आहे. वागदर्डी धरणातील पाणीसाठा वाढल्याने मनमाड शहराला १७ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता १२ दिवसांवर येण्याची शक्यता आहे.

नाशिकसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने धरणे ओवरफ्लो होऊन सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पालखेड डावा कालवा देखील ओव्हर फ्लो झाल्याने या पाण्याचा विसर्ग येवला नजीक पाटोदा धरणात होत असल्याने मनमाडच्या पाटोदा साठवणूक तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी येऊन हा साठवणूक तलाव भरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या तलावातून तब्बल चार पंप सुरू असून त्याद्वारे मनमाडच्या वागदर्डी धरणात पाणी खेचले जात आहे. सध्या धरणात असलेल्या पाणी साठ्यात या विसर्गाच्या पाण्याने १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. पाणी वाढल्याने १७ दिवसाआड होणारा मनमाडचा पाणीपुरवठा १२ दिवसाआड होऊ शकतो, असे पालिका प्रशासनाने म्हणणे आहे.

सध्या वागदर्डी धरणात २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. पालखेड पाण्याच्या विसर्गातून पाटोदामार्फत चार पंपांद्वारे मनमाडच्या धरणात पाणी येत आहे. पाण्याचा प्रवाह असाच सुरू राहिल्यास हे धरण लवकरच निम्मे भरेल. त्यामुळे पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांना दिलासा मिळेल. या विसर्गामुळे धरणात पाच ते दहा एम सेफ्टीक पाणी वाढले आहे. सध्या असलेल्या पाण्याच्या साठ्यातून १२ दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो.

पालखेडचे पाणी पाटोदामार्फत मनमाडच्या वागदर्डी धरणात मोठ्या प्रमाणावर येत आहे. आवर्तन नसताना पाणी मिळत असल्याने ही दिलासादायक बाब आहे. सद्यस्थितीत वाढलेल्या या साठ्यातून १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

-डॉ दिलीप मेनकर, मुख्याधिकारी मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना उरले सरपण, ना उरली चिता!

$
0
0

गोवऱ्यांचे झाले शेण; पंचवटीतील अंत्यसंस्कार ठप्प

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदामाईच्या महापुराने अनेकांचे संसार होत्याचे नव्हते झाले, हे वास्तव एकिकडे असताना अंत्यविधीसाठी पार्थिवांना सरपण आणि चिताही उरली नसल्याचे भीषण वास्तव पंचवटीत आहे. पंचवटी अमरधामच्या चिता महापुरामुळे तुटल्या असून सरपण वाहून गेले, तर गोवऱ्यांचे शेण झाले आहे. यामुळे पार्थिवांवर अंत्यसंस्कारासाठी दूरवरच्या स्मशानभूमींचा वाट चालण्याची वेळ आली आहे.

मनुष्य देहाचा अंत झाली की अंत्यसंस्कार करावे लागतात. पण, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पार्थिवावर होणारे अंत्यसंस्कार बंद असल्याने मरणोत्तर वेदना सोसण्याची वेळ पार्थिवांवर आली आहे. पंचवटी भागातील गणेशवाडी अमरधाम येथील अंत्यविधी सेवा शनिवारपासून बंद आहे. शहरात अतिवृष्टीला सुरुवात झाल्यापासून ही सेवा बंद असून रविवारी आलेल्या महापुरामुळे येथील सर्व साहित्याचे नुकसान झाले आहे. येथील चिता तुटल्या असून बरेचसे सरपण वाहून गेले आहे. येथील रॉकेलमध्ये पाणी मिसळले असून गोवऱ्यांचे शेण झाले आहे. तसेच अमरधामचे कथडे देखील वाहून गेले आहेत. ज्या ठिकाणी मानवी देहाचा शेवट होतो, त्या ठिकाणी इतकी दयनीय परिस्थिती असूनही प्रशासन मात्र अद्यापही सुस्त आहे.

गणेशवाडी येथील अमरधाममध्ये नवे सरपण आल्याशिवाय तसेच येथील परिस्थितीत सुधारणा झाल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे. या संदर्भात प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतेही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून पार्थिवांवर अंत्यसंस्कार करावेत तरी कुठे, असा गंभीर प्रश्न सतावत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पार्थिवांना मरणानंतरही यातना सोसण्याची वेळ आली असून प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.

२१ लाखांचे नुकसान

पंचवटी गणेशवाडी येथील अमरधाममधले ६०० ते ८०० टन सरपणाचे नुकसान झाले असून गोवऱ्या, मडके, रॉकेल आणि मिठाचेही नुकसान झाले आहे. येथील १५ ते १६ लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. तसेच टाळकुटेश्वर अमरधाममध्ये १५० ते २०० टन सरपणाचे नुकसान झाले असून ४ ते ५ लाख रुपयांचा भूर्दंड बसला आहे. यामुळे दोन्ही स्मशानभूमीत सुमारे २१ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा तेथील ठेकेदारांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकसोबत जिव्हाळ्याचे नाते

$
0
0

मराठमोळ्या जेवणाचा घेतला होता आस्वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नाशिकसोबत जिव्हाळ्याचे नाते होते. २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार डॉ. डी. एस. आहेर यांच्या निवडणूक प्रचारासाठी त्या शहरात आल्या होत्या. त्यावेळी स्वराज यांनी आमदार सीमा हिरे यांच्या निवासस्थानी भेट देत मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला होता.

स्वराज यांनी हिरेंच्या निवासस्थानी एक तास थांबत, त्यांनी मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असे मराठमोळे जेवण घेतले. या जेवणाने स्वराज तृप्त झाल्या होत्या, अशी माहिती आ. हिरेंनी दिली आहे. 'सीमा बेटा यह भोजन तुमने परोसा है, भोजन बहोत अच्छा बना है' अशी स्तुती स्वराज यांनी त्यावेळी केली. तासभराच्या भेटीदरम्यान साक्षात देवीस्वरुप भासत होत्या, अशी प्रतिक्रिया आमदार हिरे यांनी व्यक्त केली आहे. भारतीय राजकारणातील 'मदरलेडी' म्हणजेच सुषमाजी यांच्या निधनाने आम्हा सर्वांना मातृछत्र हरपल्यासारखे झाले आहे. सुषमाजी म्हणजे साक्षात मॉ दुर्गा- मॉ सरस्वती व लक्ष्मी माता स्वरुप होत्या सुषमाजींच्या जाण्याने परिवारातील मातृतूल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया हिरे यांनी व्यक्त केली आहे.

भाजप कार्यालयात आज शोकसभा

नाशिक : सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिक महानगर भाजपतर्फे गुरुवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता वसंतस्मृती कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महानगराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले आहे.

नाशिकमध्ये भाजप महिला आघाडीचे राज्यस्तरीय अधिवेशन १९९६ मध्ये झाले होते. त्याच्या उद्घाटनास स्वराज या केंद्रीय मंत्री असतांनाही आल्या होत्या. महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी त्यावेळी केली. वेळात वेळ काढून त्या घरीही आल्या. त्यांच्या अंगी अतिशय नम्रपणा होता. त्यांचा हाच गुण सर्वांना भावत असे. आमची खूप चांगली मैत्री होती. आज मी मैत्रीण गमावली आहे.

- निशिगंधा मोगल, माजी आमदार

भाजपचे २००१ मध्ये आग्रा येथे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यावेळी नाशिकच्या युवतींना घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या अधिवेशनात एकाच रंगाची साडी परिधान केलेल्या आमच्या ग्रुपकडे सगळ्यांचे लक्ष गेले. सुषमा स्वराजही आमच्याजवळ आल्या. त्यांनी आस्थेने चौकशी केली. आमचे कौतुक केले तसेच आमच्यासोबत फोटोही काढला. इतक्या मोठ्या नेत्या असतानाही तसा आविर्भाव त्यांच्याकडे नव्हता. यामुळे आम्ही भारावून गेलो होतो.

- भारती बागूल,

पदाधिकारी, भाजप महिला आघाडी

भाजपचे लोकसभेचे तत्कालीन उमेदवार डॉ. दौलतराव आहेर यांच्या प्रचारासाठी ८ ऑक्टोबर २००४ रोजी सुषमा स्वराज यांची कालिदास कलामंदिरात सभा झाली होती. त्यांचे स्वागत करण्यासाठी बडोपंत जोशी, सतीश कुलकर्णी, दशरथ पाटील, सत्यभामा गाडेकर, योगेश भगत आदी आम्ही गोल्फ क्लब मैदानाच्या ठिकाणी गेलो. साधी राहणी पण उच्च विचारसरणी त्यांची होती. त्यांचा मनमिळावू स्वभाव अजूनही स्मरणात आहे. अशा नेत्या होणे नाही.

- सुजाता करजगीकर,

पदाधिकारी, भाजप महिला आघाडी

जनसेवा व सर्वसामान्यांचे जीवन सुखकर व्हावे या उदात्त ध्येयाने सुषमा स्वराज यांनी आपले आयुष्य वेचले. सामान्यांशी संवाद आणि प्रश्न सोडवण्याचे विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे होते. समूहाशी आपल्या ओघवत्या वक्तृत्त्वाने त्यांनी अनोखे नाते जोडले होते. सर्व राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये त्यांचे आदरयुक्त स्थान होते. निष्कलंक आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेले त्यांचे संस्कारी व्यक्तिमत्व होते. देश कणखर नेतृत्त्वाला मुकला आहे.

- विश्वास ठाकूर, कार्याध्यक्ष,

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images