Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ग्रामीण पोलिस दोन हजार व्हॉट्सअॅप ग्रुपवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलातील तब्बल चारशे पोलिस कर्मचारी विविध प्रकारच्या दोन हजार व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दाखल झाले आहेत. हा आकडा हळूहळू वाढत जाणार असून, याद्वारे सोशल मीडियावर प्रसारित होणारे संदेश पोलिसांच्या नजरेखालून जात आहेत. सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवा आणि त्यातून होणाऱ्या सामूहिक हल्ल्यासारख्या घटनांना रोखता येणे शक्य होणार आहे.

देशभरात सध्या झुंडशाहीसारख्या घटना घडत असून, या घटनांचे मूळ बऱ्याचदा सोशल मीडियात सापडते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले, की काही महिन्यांपूर्वी आम्ही यासाठी पावले उचलली. नाशिक जिल्हा मोठा असून, तब्बल ४० पोलिस ठाण्यांचा यात समावेश होतो. त्यात छोट्या-मोठ्या खेड्यांची संख्या लक्षणीय असून, तिथे किमान दोन हजार व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यरत आहेत. हे व्हॉट्सअॅप ग्रुप त्या खेड्यापाड्यांतील मोठ्या लोकसंख्येशी जोडले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्या भागातील एका पोलिस कर्मचाऱ्याला अशा किमान तीन ते चार ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यामुळे त्या ग्रुपमध्ये येणारे मेसेज, त्यातून उमटणारी प्रतिक्रिया यावर बारकाईने लक्ष ठेवणे सोपे होते. विशेष म्हणजे ग्रुपमध्ये पोलिसाचा सहभाग असल्याचीही जाणीव करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण मान्सूनवर अवलंबून असते. पाऊस कमी झाला, की ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपासून दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थितीला जिल्हा सामोरा जात असून, अशा वेळी अफवांचे पीक पसरण्याचा मोठा धोका निर्माण होतो. अगदी छोट्या कारणांवरून अथवा न घडलेल्या घटनांचे अवास्तव चित्र निर्माण करून अफवांचे पीक पसरवले जाते. अशा वेळी व्हॉट्सअॅप ग्रुमध्ये पोलिसांचा सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो. अफवेबाबत योग्य ती माहिती देणे, घटनेतील तथ्य वेळीच समजावून सांगण्याचे काम या निमित्ताने होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्याचा विस्तार मोठा असून, मालेगावसह अन्य काही तालुके संवेदनशील मानले जातात. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून याकडे लक्ष पुरविण्याचे काम होत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेची बॅग रिक्षात विसरली होती. त्यात तिचा मोबाइलसुद्धा होता. रिक्षाचालकालाही त्याची खबर नव्हती. ही बाब महिलेने अन्य सदस्यांमार्फत व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली. त्याच व्हॉट्सअॅप ग्रुपवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची दखल घेऊन त्या रिक्षाचा शोध घेतला. काही वेळातच त्या महिलेला बॅग परत मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास चांगला हातभार मिळतो आहे. अफवांना रोखणे हे मोठे काम यामुळे शक्य होत असून, लवकरच अशा व्हॉट्सअॅप ग्रुपची संख्या वाढवण्यात येईल.

- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील बेकायदेशीरमद्यविक्री रडारवर

$
0
0

सहा गुन्ह्यांमध्ये सात संशयित ताब्यात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

--

मद्य विक्रीचा परवाना नसताना मद्य विक्री अथवा मद्यपानास परवानगी देणाऱ्या हॉटेल, ढाबे, चायनीज सेंटर, तसेच अंडाभुर्जी स्टॉलचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा कृत्य करणाऱ्या सात जणांवर कारवाई झाली असून, या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये सहा गुन्हे दाखल करण्यात आले.

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई पोलिस ठाणे पातळीवर करण्यात येत आहे. चायनीज स्टॉल, अंडाभुर्जी स्टॉल, काही मांसाहारी खाणावळी, ढाबे, तसेच हॉटेलांमध्ये विनापरवानगी मद्यविक्री केली जाते किंवा या ठिकाणी मद्यपी मद्य प्राशन करतात. यामुळे सरकारचा महसूल तर बुडतोच, पण या मद्यपींचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो. अनेकदा छोट्या-मोठ्या हाणामारीच्या घटनासुद्धा घडतात. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अशा आस्थापनांना पोलिसांनी रडारवर घेतले आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील पथकांनी केलेल्या तपासणीत सात संशयित हाती लागले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यात अंबड पोलिस ठाणे हद्दीतील मनोज बुढा (पाटीलनगर, सिडको), इंदिरानगर हद्दीतील सतीश भोजने (दाढेगाव, दत्त मंदिरामागे), उपनगर हद्दीतील नंदकिशोर भालेराव (शरयूनगर, पाथर्डी फाटा) आणि आकाश लहाडे (मोरवाडी, सिडको), नाशिकरोड हद्दीतील अनिल पिंपळे (सोमयानगर, पळसे), संजय शेलार (बांगरे मळा, शिंदे) तसेच देवळाली हद्दीतील भास्कर पवार (साई पॅलेस हॉटेलसमोर, भगूर) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट्टा शिक्षणाचा’तून उलगडले शिक्षकांचे कार्य

$
0
0

'कट्टा शिक्षणाचा'तून

उलगडले शिक्षकांचे कार्य

उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव कथन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या शिक्षणाआड भौतिक असुविधा, शाळा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक नियमांचा अडथळा येऊ नये, यासाठी शिक्षक किती धडपड करू शकतात, याचे उदाहरण 'कट्टा शिक्षणाचा' या उपक्रमातून समोर आले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात गुरुवारी दुपारी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील तीन उपक्रमशील शिक्षकांनी आपली भूमिका स्पष्ट करत अध्यापनातून समाजसेवेचा असलेला दृष्टीकोन स्पष्ट केला.

जिल्ह्यातील अनेक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची धडपड सुरू असते. त्यामुळेच संकल्पनांचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करत असतात. अशा आदर्श शिक्षकांचे कार्य समाजासमोर यावे, यासाठी नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 'कट्टा शिक्षणाचा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर महिन्याला या कट्ट्यावर तीन शिक्षकांना बोलावण्यात येणार असून त्यांचे कार्य समाजापुढे आणले जाणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतिन पगार, आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. गुरुवारी पार पडलेल्या या कट्ट्यावर त्र्यंबकेश्वरमधील हिवाळी तालुक्यातील केशव गावित, बोरस्ते वस्ती निफाड येथील प्रकाश चव्हाण तर शिलापूर गावातील नंदलाल अहिरे या तीन उपक्रमशील शिक्षकांची उपस्थिती होती. केशव गावित यांनी आपलं स्वत:चं घर पाडून शाळा उभारण्यासाठी जागा दिली. सहा पट असलेल्या शाळेचा पट ६६पर्यंत नेला. शाळेच्या आजबाजूला असलेल्या परिसरातील पालकांनाही गावित यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश या शाळेत करुन देण्याची इच्छा व्हावी, इतका बदल त्यांनी घडवून आणला. तर प्रकाश चव्हाण यांनीही बोरस्ते वस्ती, निफाड येथे असलेल्या जिल्हा परिषदेतील सहा पट असलेल्या शाळेचा पट ८५पर्यंत नेला. नंदलाल अहिरे यांनी शिलापूर गावातील जिल्हा परिषदेची दुर्लक्षित शाळा प्रेक्षणीय केली. सांडपाण्यामुळे खराब झालेल्या जागेचे त्यांनी नंदनवन केले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामागील दृष्टीकोन या तिनही शिक्षकांनी यावेळी उलगडला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी यावेळी शिक्षकांचे कौतुक करत आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी टिकविण्याची गरज व्यक्त करत, उपक्रमशील शिक्षकांचे काम इतर शिक्षकांसमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी केले. समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे असून उपक्रमशील शिक्षकांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील दराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा उलटून एक ठार

$
0
0

नाशिक : भरधाव ऑटो रिक्षा उलटल्याने सुरगाणा येथील ईश्वर नारायण जगताप (वय ४०) या प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना सुरगाणा येथील मोतीबाग परिसरात बुधवारी (ता. २४) रात्री घडली. अपघातात ईश्वर जगतार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कारच्या धडकेत वृद्ध ठार

नाशिक : भरधाव कारने धडक दिल्याने त्र्यंबकेश्वर येथील यशवंत बाळाजी भागवत (वय ६५, रा. कोथे गल्ली, निवृत्तिनाथ मार्ग) यांचा मृत्यू झाला. भागवत पैगलवाडी शिवारात बुधवारी (दि. २४) सायंकाळी रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव ओम्नी कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात भागवत गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अतिमद्यसेवनाने एकाचा मृत्यू

नाशिक : अतिमद्यसेवन केल्याने संजय सुमन गांगवे (रा. ५०, हनुमाननगर, एकलहरा) यांचा मृत्यू झाला. ते गुरुवारी (दि. २५) सकाळपासूनच नशेत होते. अतिमद्यसेवन केल्याने दुपारच्या सुमारास अचानक त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोनशे शिक्षक झाले विद्यार्थी

$
0
0

सव्वादोनशे शिक्षक झाले विद्यार्थी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या वनिता विकास मंडळ प्रशालेत अध्ययन निष्पत्ती कार्यशाळा उत्साहात झाली. ९० मुख्य़ाध्यापक आणि १३० विषय शिक्षक असे सव्वादोनशे शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थी होऊन कार्यशाळेत ज्ञानग्रहण केले.

वनिता विकास मंडळ प्रशाला व समूह साधन केंद्र क्रमांक १० आणि १८ यांच्यातर्फे झालेल्या या कार्यशाळेत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, महापालिकेचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, संस्थेच्या कार्यवाह सुनिती देशपांडे, अध्यक्षा मुग्धा कुलकर्णी, सहकार्यवाह कविता देशपांडे, मुख्याध्यापक अनिल नागरे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका गीता घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाषा विषयासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्या प्राधिकरण उदयकुमार कुऱ्हाडे तर गणितासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून वाल्मिक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. नाशिकरोड परिसरातील सर्व शाळेचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक आणि भाषा व गणित विषयाचे शिक्षक उपस्थित होते. उपशिक्षिका स्वाती झाडे यांनी शाळेत मुलांच्या दृष्टिकोनातून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रशालेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे छायाचित्रांचे कलाशिक्षक जगदिश मंडलिक यांनी संकलन केले आहे. त्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक अनिल नागरे यांनी प्रास्तविकात कार्यशाळेचा उद्देश सांगितला. सहकार्यवाह कविता देशपांडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसावळ-कटनी एक्स्प्रेस रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर स्टेशनवर नॉन इंटर लॉकिंग आणि रिमोल्डिंगचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

डाउन भुसावळ-कटनी पॅसेंजर २८ जुलै ते २६ ऑगस्ट या कालावधीत रद्द राहील. अप कटनी-भुसावळ पॅसेंजर २९ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधीत रद्द राहील. डाऊन एलटीटी मुंबई जयनगर अंत्योदय एक्स्प्रेस प्रारंभिक स्टेशनहून १, ८, १५ आणि २२ ऑगस्टला खंडवा, इटारसी, बिना, कटनीमार्गे जयनगरला जाईल.

अप अंत्योदय एक्स्प्रेस प्रारंभिक स्टेशनहून २९ जुलै, ५, १२, १९ आणि २६ ऑगस्टला कटनी, बिना, इटारसी, खंडवा मार्गे एलटीटीपर्यंत धावेल. डाऊन उधना जयनगर अंत्योदय एक्स्प्रेस प्रारंभिक स्टेशनहून ३, १०, १७ आणि २४ ऑगस्टला खंडवा, इटारसी, बिना, कटनीमार्गे जयनगरपर्यंत धावेल. अप उधना एक्स्प्रेस प्रारंभिक स्टेशनहून २, ९, १६ आणि २३ ऑगस्टला कटनी, बिना, इटारसी, खंडवामार्गे उधनाला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार ‘ग्रीन कॅपिटल ऑफ इंडिया’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात पर्यावरणपूरक बांधकामास प्रोत्साहन मिळावे व त्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी कार्यरत असणाऱ्या 'आयजीबीसी' म्हणजेच 'इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल' नाशिक येथे चॅप्टर सुरू करीत आहे. नाशिकला देशामध्ये 'ग्रीन कॅपिटल ऑफ इंडिया' ही ओळख या माध्यमातून मिळवून देण्याचा उद्देश आहे, अशी माहिती नाशिक चॅप्टरचे नूतन अध्यक्ष किरण चव्हाण, सहअध्यक्ष सुनील कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुसुमाग्रज स्मारक येथे गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडली.

अध्यक्ष किरण चव्हाण म्हणाले, की पर्यावरण रक्षण व संवर्धनाची आवश्यकता ओळखून सीआयआय या देशभरातील उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेकडून २००१ साली आयजीबीसीची स्थापना करण्यात आली. नाशिकमधले चॅप्टर हे देशातील पंचविसावे, तर महाराष्ट्रातील चौथे चॅप्टर असणार आहे. ग्रीन बिल्डिंग व्हाव्यात, अशी सर्वांचीच इच्छा असून पर्यावरणाचे संवर्धन, त्यास अनुरुप असे बांधकाम, रचना यानुसार बांधकाम केले जाण्याचा प्रयत्न या चॅप्टरअंतर्गत केला जाईल. भविष्यात संपूर्ण ग्रीन गाइडलाइन्स असलेले एकमेव शहर नाशिक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुनील कोतवाल म्हणाले, की नाशिक ही नव्या उपक्रमांची जन्मभूमी असून, नाशिककरांचा त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. पर्यावरणपूरक बांधकामे उभारल्यास नाशिकमधील निसर्ग जतन करण्यास मदत होणार आहे. शाळा, कॉलेजांमध्येही याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे, प्राचार्य प्राजक्ता बस्ते, आर्किटेक्ट कृणाल पाटील, धनंजय शिंदे, तेज टकले आदी उपस्थित होते.

आज पदग्रहण सोहळा

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल नाशिक चॅप्टरच्या कार्यकारिणी पदग्रहण सोहळा आज (२६ जुलै) त्र्यंबक रोडवरील बीएलव्हीडी हॉटेल येथे सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे. विविध पर्यावरण तज्ज्ञ, ग्रीन बिल्डिंगसाठी कार्यरत बिल्डर, आर्किटेक्ट, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या सामाजित संस्था यांच्या २५ प्रतिनिधींचा कार्यकारिणीत समावेश असणार आहे. कार्यक्रमाला मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आयजीबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. सुरेश, सीआयआयचे के. एस. व्यंकटगिरी, आयजीबीसीच्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष व श्रॉफ समूहाचे संचालक जे. पी. श्रॉफ, क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया हे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदाराच्या दारी वसुलीसाठी वाजणार ढोल

$
0
0

जिल्हा बँक प्रशासनाचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी पुन्हा मोहीम सुरू केली आहे. बँक प्रशासनाने आता जिल्ह्यातील थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवत कर्जवसुली होईपर्यंत ठाण मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिवन उपक्रमामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून काही प्रमाणात का होईना कर्जवसुलीला प्रतिसाद मिळेल, असा दावा बँक प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीची कर्जवसुली थांबविण्याचे आदेश दिल्यानंतरही बँक प्रशासन वसुलीवर ठाम असल्याने नवा वाद निर्माण होणार आहे.

कर्जमाफीच्या शासनाच्या धोरणामुळे जिल्हा बँकेची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. कर्जवसुली थकल्यामुळे दोन वर्षापासून जिल्हा बँके डबघाईला आली आहे. अनेक ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या असून त्या काढण्यासाठी ठेवीदारांना फेऱ्या माराव्या लागत आहे. बँकेत जाऊन येथे ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना रोजच सामोरे जावे लागत आहे. थकबाकीदारांकडून वसुलीसाठी बँकेने यादी जाहीर करून पाहिली, जप्तीच्या नोटीसा बजाविल्या, लिलाव करण्याची नोटीसा दिल्या असे असतानाही वसुली होत नसल्याचे चित्र आहे. यातच पंतसंस्थांनी ठेवी मिळविण्यासाठी बँकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली करू नये यासाठी आंदोलने होत असल्याने बँकेची कोंडी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारां विरोधात जिल्हा बँकेने पुन्हा एकदा धडक मोहीम सुरू केली आहे. यात थकबाकीदारांच्या दारात बँकेच्या अधिकाऱ्यांनी ढोल ताशा घेऊन जात असून ढोल वाजवून वसुली करत आहेत. विशेष म्हणजे वसुली होईपर्यंत अधिकारी तिथेच ठाण मांडणार आहेत. कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या दारात ढोल वाजवला जात असून थकबाकीदारांच्या दारात अधिकाऱ्यांनी ठाण मांडून आंदोलन केल्याने थोडेफार वसुली झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, या आंदोलनावरून पुन्हा जिल्हाप्रशासन आणि बँक प्रशासनात वाद होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेने बड्या व जुन्या थकबाकीदारांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावूनही त्यांनी कर्जभरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे थकीत कर्जवसुली मोहीम पुन्हा सुरू केली आहे. त्याासठी थेट थकबाकीदारांच्या दारातच आता ढोळ बडवले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेत जाणार ही निव्वळ अफवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ शिवनेनेत जाणार, या वृत्ताचा खुद्द भुजबळ यांनीच स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

आपण शिवबंधन बांधून घेणार नसून, आपल्या मनगटावर घड्याळच राहील, असे सांगत शिवसेनाप्रवेशाची चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष, माजी आमदार आणि माजी मंत्री सचिन अहिर गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करतील असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर छगन भुजबळ हेदेखील शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र, भुजबळ यांनीच असे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

गुजरातसह समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे जलपूजन नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवसाने येथे आपल्याच हस्ते होत असल्याने आपण या कार्यक्रमात गुंतलेलो असून, आपल्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चेच काहीएक तथ्य नाही, असे भुजबळ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सचिन अहिर गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार याबाबतचे वृत्तही आपण टीव्हीवरच पाहिले. माझे आणि सचिन अहिर यांचे बोलणे झालेले नाही. सचिन अहिर आणि माझा मूळचा मतदारसंघ एकच आहे. त्यामुळेच कदाचित सचिन अहिर यांच्याबरोबर माझे नाव घेतले जात असावे, असेही भुजबळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखाबंदी नावालाच!

$
0
0

छुप्या मार्गाने परराज्यातून नाशिकमध्ये विक्री

...

Fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

नाशिक : राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातली असली तरीही शहरात सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. बंदीची अंमलबाजवणी कडक होत नसल्यानेच अवैध विक्री फोफावली आहे. तर, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाईत अडचणी येत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे म्हणणे आहे. या साऱ्या प्रकारात गुटखा बंदीचा उद्देश सफल होत नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात एका वाहतूक पोलिसाने गुटखा पकडला होता. त्या अगोदरही पोलिसांनी छापा टाकून पेठरोडहून एका खासगी गाडीतून लाखो रुपयांचा गुख्याचा माल पकडला होता. आतापर्यंत बहुतांश वेळा झालेली कारवाई ही पोलिसांकडूनच जास्त वेळा झाली आहे. यात एफडीएकडून कारवाई फार कमी वेळा झाली आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरात सध्या अनेक पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. मात्र हा गुटखा ओळखीच्या ग्राहकांनाच पुरवला जातो. हा गुटखा कुणासमोर दिला जात नाही, तर गुटख्याच्या पाऊचला कागदाच्या पुडीत बांधून दिला जातो. शहरातील उपनगरांमध्येही शाळांबाहेर सर्रास गुटखा विक्री सुरू असून, अन्न आणि औषध प्रशासन व पोलिसांनी कानाडोळा केल्याने लहान मुले व्यसनांच्या विळख्यात सापडत आहेत. गुटखा अणि पानमसाल्यावर बंदी असल्याने तो दुप्पट किमतीला विकला जात आहे. गोवा विमल, माणिकचंद ही गुटख्याची पाकिटे अव्वाच्या सव्वा किमतीला विक्री होताना अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात मध्यंतरी धाडसत्र सुरू केले होते; परंतु त्यांची मोहीम थंडावल्याने शालेय मुलांच्या हाती गुटखा सहज लागत आहे.

...

मागणीप्रमाणे पुरवठा

पान दुकानदारांवर गुटखा, पानमसाला विक्री व साठवण करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र शहराच्या विविध भागातील दुकानात पानमसाला आणि गुटखा उपलब्ध आहे. मागणीप्रमाणे तो काही व्यापाऱ्यांकडून पुरविला जातो. एका दुकानदाराने सांगितले, की दर अर्ध्या तासाने तो थोडा थोडा माल आणला जातो व तो ताबडतोब संपतोही. शहर परिसरात तर गुटखा विक्रेत्यांमध्ये स्पर्धाच लागलेली असते. यामुळे बहुतांश महापालिकेच्या शाळांबाहेर गुटखा विक्री जोरात सुरू आहे. यामुळे शालेय मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत.

...

कलम ३२८ नुसार कारवाई

सुरुवातीला अन्न औषध प्रशासनाच्या वतीने कलम ३२८ नुसार कारवाई करण्यात येत होती, मात्र औरंगाबाद हायकोर्टाने हे कलम लावण्याला स्थगिती दिली. त्याविरुध्द अन्न औषध प्रशासनाने सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला या कलमाबाबत पुनर्विचार करावा असे आदेश दिले आहेत. त्यामळे ३२८ कलमानुसार होणारी कारवाई थंडावली होती. आता पुन्हा या कलमानुसार कारवाई होणार आहे.

…...

काय आहे ३२८ कलम?

गुटखा सापडल्यानंतर २७२, २७३, १८८ कलमानुार कारवाई सुरू होती. हे कलम जामीनपात्र असल्याने गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले नव्हते. मात्र आता ३२८ हे नव्याने लावण्यात येणारे कलम हे अजामीनपात्र असल्याने अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

...

येथे मिळतो गुटखा

- छोट्या किराणा दुकानात

- चहाच्या टपरीवर

- जागोजागी असलेल्या सिगारेट विक्रेत्यांकडे

- पानटपरीवर

.....

जिल्ह्यात गुटखा येतो कुठून

महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरीही नाशिक जिल्ह्यात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. आंध्र प्रदेशहून येणारा गुटखा हा रेल्वेमार्गे, तर मध्य प्रदेश व गुजरातमार्गे येणारा गुटखा हा रस्तामार्गे येतो. मध्यंतरी रेल्वे पोलिसांनी कारवाई करून आंध्र प्रदेशातून येणारा गुटखा पकडला होता. गेल्या आठवड्यात डिंगोरी रोडवर मोठी कारवाई झाली. त्यात सापडलेला गुटखा हा गुजरातमार्गे नाशिकला येत असल्याचे स्पष्ट झाले होते.

.....

किती रुपयांना मिळतो

मूळ किंमत विक्री किंमत

गोवा २.०० ५.००

हिरा २.०० ४.००

विमल २.०० ४.००

माणिकचंद ७.०० १०.००

(हे दर मागणी आणि पुरवठ्यानुसार बदलतात.)

.....

कारवाई न करण्यासाठी मिळतो मलिदा

विक्रेत्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत गुटखा विक्रीची साखळी आहे. जिल्ह्यात येत असलेला गुटखा कुठून येतो, ते शेवटच्या ग्राहकांपर्यंत कसा पोहचतो याची माहिती अधिकाऱ्यांना आहे. मात्र सर्व ठिकाणी योग्य तो वाटा पोहचत असल्याने कारवाई होत नाही. प्रभावीपणे कारवाई झाली असती, तर शहरात गुटखा दिसलाच नसता.

.....

कारवाई अशी

१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८

- तपासणी दुकाने : २२६

- माल जप्त केलेल्या दुकानांची संख्या : १६६

- जप्त साठा किंमत : ३ कोटी ८३ लाख ४० हजार ३०५ रुपये

- खटले दाखल : ४४

.....

१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९

- तपासणी दुकाने : २२९

- माल जप्त केलेल्या दुकानांची संख्या : १६७

- जप्त साठा किंमत : ७ कोटी १५ लाख ३८ हजार ३२२

- एफआयआर : ४४

- खटले दाखल : १२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे राजकारण नको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला कसे मिळू शकते याचे देवसाने-मांजरपाडा वळण योजना उत्तम उदाहरण असून, नार-पार प्रकल्पाद्वारे सर्व पाणी महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. पाण्याचे राजकारण करायचे नाही. सर्वपक्षीय नेते, मुख्यमंत्र्यांनी या योजनेकडे पाहून गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून द्यावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी केले.

बहुचर्चित देवसाने-मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. देवसाने-मांजरपाडा वळण योजना आघाडी सरकारने सुरू केली, तिचे श्रेय काँग्रेस आघाडी सरकारचे आहे, असेही भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तेही येथेच आज, शुक्रवारी (२६) जलपूजनाचा कार्यक्रम होणार असल्यासंबंधी भुजबळ म्हणाले, की पालकमंत्र्यांनी जलपूजनसाठी बोलावले असते, तर आजचा कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, धनराज महाले, दिलीप बनकर, जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार, दिलीप खैरे, अर्जुन टिळे ,निवृत्ती अरिंगळे, संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, वसंतराव पवार, अरुण थोरात, भास्करराव भगरे आदींसह येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार झिरवाळ, धनराज महाले, श्रीराम शेटे यांनी दुष्काळी चांदवड, येवला तालुक्यांसह मराठवाड्यात पाणी पोहोचविण्याचे श्रेय भुजबळांना दिले. दिंडोरी तालुक्याला शंभर दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी केली. या जलपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजविल्याचे बोलले जात आहे. आज पालकमंत्री जलपूजन करणार असून, ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--

रद्द योजना सुरू करा

भुजबळ म्हणाले, की तापी खोऱ्यातील उईके धरणात वाहून जाणारे १०१ टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळावे. देवसाने वळण योजनेचे पाणी प्रकल्पातील प्रस्तावित १६५ कोटींचा प्रस्ताव मार्गी लावत काम सुरू करावे, आम्ही पालकमंत्र्यांना हार घालू. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ६५० मीटरवर पाणी १३९ हॉर्सपॉवर पंपाने उचलण्याचा कार्यक्रम राबविला. त्यामुळे आपणही ३०० ते ३५० मीटर पाणी उचलू शकतो. मंजूर असलेल्या, परंतु सरकारने रद्द केलेल्या पाच वळण योजनांचे काम सुरू करावे, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेथे मनाची आसक्ती तेथे पापनिर्मिती

$
0
0

ज्येष्ठ निरुपणकार हरिभाऊ जोशी यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मन ही अशी संकल्पना आहे की त्याचा परिणाम होतो, प्रभावही पडतो; परंतु ते मन कोठेही दिसत नाही. शरीर पाप करत नाही; मन पाप करते. जेथे मनाची आसक्ती आहे तेथे पाप आहे हे निश्चित जाणावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरुपणकार हरिभाऊ जोशी यांनी केले.

भागवत सप्ताह समिती, नाशिक आणि कुर्तकोटी शंकराचार्य न्यास यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानमालेत जोशी बोलत होते. 'आद्य जगतगुरू श्री शंकराचार्य चरित्र' या विषयावर जोशी म्हणाले, की शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थावरून चर्चा करण्याचा प्रसंग आला. शंकराचार्यांना वैदिक धर्माचे पुनरुत्थान करावयाचे होते. त्यामुळे त्यांना कुणाच्याही मनात यत्किंचतही शंका राहता कामा नये, असे वाटत होते. त्यामुळे मंडनमिश्र यांची पत्नी उभयभारती यांना साक्षीला ठेवून त्यांनी संवादाला सुरुवात केली. उभयभारती या काही वेळ त्यांचा संवाद ऐकत थांबल्या; परंतु संन्याशाला भिक्षा आणि पतीला जेवण देण्यासाठी जावे लागणार म्हणून त्यांनी दोघांच्याही गळ्यात हार घातला व जो हार सुकेल तो हरेल असे सांगून त्या गेल्या. पुढे १७ दिवसपर्यंत हा संवाद सुरू होता व एका क्षणी मुंडनमिश्र यांच्या गळयातील हार सुकला. त्यांनी अटीप्रमाणे संन्यासधर्म स्वीकारला; परंतु पुढे उभयभारतींना वाटले, की शंकराचार्यांना हरवावे म्हणून त्या संवादाला बसल्या आणि त्यांनी शंकराचार्यांना काही प्रश्न विचारले. त्यांचाही संवाद १७ दिवस चालला. पुढे कामशास्त्रातील एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी शंकराचार्यांनी महिन्याचा कालावधी मागून घेतला आणि अमरूक राजाच्या देहात प्रवेश केला, असे आख्यान जोशी यांनी सांगितले. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात २९ जुलैपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे.

रात्री नमस्कार करू नये

नमस्कार ही अंतरंगाची प्रक्रिया असून एका हाताने कधीही नमस्कार करू नये. तसेच रात्री नमस्कार करू नये, कुणी रात्री नमस्कार केला तर त्याला आशीर्वाद देऊ नये, असे शास्त्र जोशी यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन अहिर शिवसेनेत

$
0
0

मुंबई : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या प्रवेशामुळे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

'मला मनाने जिंकलेली माणसे पाहिजेत, फोडलेली माणसे पक्षात नकोत. राजकारण करताना एक वृत्ती हवी असते. आम्हाला माणसे जोडणारी लोकं हवी आहेत,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेची आता ताकद वाढताना दिसत असली, तरी प्रत्यक्षात मराठी माणसांची आणि हिंदूंची ताकद वाढतेय. आपल्या या निर्णयाचा पश्चाताप होणार याची मला खात्री आहे. हिंदू आणि मराठी माणसांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. शिवसेनेत चांगली मंडळी येत असून, आम्ही आता घड्याळाला चावी देण्याचे काम करतोय. मी नीतिमत्ता गहाण सोडून वागणार नाही. मात्र, पक्ष वाढवण्यासाठी जे करावे लागेल, तेच करणार,' असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कोट

शहराचा विकास आणि तरुणांसोबत काम करण्याची संधी यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला. स्वर्गीय बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. मुंबई शहराच्या नागरीकरणासंदर्भात उद्धव ठाकरे याच्याकडे एक व्हिजन आहे. शिवसेनेने कामातून लोकांची मने जिंकली आहेत. आता मला राज्यात शिवसेना वाढवण्याचे काम करायचे आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारणार आहे.

सचिन अहिर

. . . . . .

आदित्यसाठी मार्ग मोकळा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा असून, त्यांच्यासाठी शिवसेना वरळी, शिवडी यासारख्ये पर्याय चाचपडून पाहत असल्याचे कळते. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवायची ठरल्यास या मतदारसंघातील प्रेमनगर, सिद्धार्थनगर, बीडीडी चाळ या ठिकाणी अहिर यांची मते आहेत. ही सर्व मते अहिर यांच्या प्रवेशाने पक्षाकडे खेचता येतील, असे शिवसेनेला वाटते.

............

भुजबळ म्हणतात... त्या अफवाच!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ स्वगृही परतणार असून, ते नजीकच्या काळात शिवसेनेत प्रवेश करतील, असे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. पण, त्या अफवा असल्याचे छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तथापि, आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकी शाबूत राखण्यासाठी 'राष्ट्रवादी'चे काही विद्यमान आमदार सोयीनुसार शिवसेना अथवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

…………............

वैभव पिचडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अकोले : अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे आमदार पिचड भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

सविस्तर वृत्त...…३

……….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

$
0
0

इगतपुरी :

रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळं आज देवगिरी एक्सप्रेसचा अपघात टळला आहे. कसारा घाटात इगतपुरी जवळ पहाटे ४.३०वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र चालकाच्या प्रसंगावधानतेमुळं अपघात टळला आहे.

नाशिकहून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस बोगद्याजवळ येताच रेल्वेरुळावर दरड कोसळत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यामुळं पुढचा धोका लक्षात घेऊन चालकानं रेल्वे गाडी थांबवल्यानं मोठा अपघात टळला. यानंतर दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. या सर्व प्रकारामुळं या मार्गावरील रेल्वेसेवा काही काळ ठप्प झाली होती. मात्र, आता दरड हटवल्यानंतर वाहतूक धीम्या गतीनं वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप हा पक्ष नसून बकासुर; थोरातांनी डागली तोफ

$
0
0

नाशिक:

'भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला बकासुर आहे. त्याची भूकच भागत नाही. पण या भुकेमुळं आणि फोडाफोडीमुळं त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे अनेक नेते दु:खी आहेत. हे दु:खी लवकरच आमच्याकडं येतील,' असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केला.

नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'भाजपला सत्तेची हाव आहे. त्यातून महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात त्यांच्याकडून फोडाफोडी सुरू आहे. भुजबळ शिवसेनेत जाणार या वावड्या आहेत. भाजपची प्रचारयंत्रणा अशा खोट्या बातम्या पेरतेय. ती त्यांची रणनीती आहे,' असा आरोप थोरात यांनी केला.

'आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. सर्व गटा-तटांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळं काही लोकांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळं सध्या भाजप-सेनेत प्रवेश होत आहेत. मात्र, त्यामुळं काँग्रेसमध्ये युवकांना संधी मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे. तसं पत्रही आम्ही त्यांना दिलं आहे,' असं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
70395408

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसला नवी पालवी फुटणार: थोरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसमधून लोक बाहेर पडताहेत ही वस्तुस्थिती मान्य आहे; परंतु त्यामुळेच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये संधी मिळते आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसलाही नवी पालवी फुटेल, असा विश्वास नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. पुढील अडीच महिने संघर्षाचे आहेत. या कालावधीत कोण काय करतो, याकडे माझे पूर्ण लक्ष असणार आहे. पक्षासाठी चांगले काम करणाऱ्यांचा भविष्यकाळ चांगला असेल, याची खात्री बाळगा, अशी ग्वाही थोरात यांनी या वेळी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तूपसाखरे लॉन्समध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी थोरात बोलत होते. उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी वामन चांद रेड्डी, कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री विनायक पाटील, डॉ. शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल थोरात यांचा नाशिक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताच दोन भागांत कामाची विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या अडीच महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आली असून, पहिल्या टप्प्यात निवडणुकांवरच अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. साधारणत: ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाली तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंत्रिपदाचे खातेवाटप होते, असा अनुभव आहे. आपल्या पक्षातील उमेदवारांना मंत्रिपदाची शपथ घ्यायला मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, यासाठी पक्षाने दिलेल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी झोकून देऊन काम करावे लागेल, असे ते म्हणाले. निवडणुकीनंतर माझ्या कामकाजाचा दुसरा टप्पा सुरू होईल. निवडणूक काळात पक्षासाठी कोण किती काम करतो आहे, याकडे माझे पूर्ण लक्ष असेल. दिवाळीनंतर पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पक्षहितासाठी योगदान देणाऱ्यांना भविष्यात चांगले दिवस येतील, याची खात्री बाळगा, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

पक्ष सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे; परंतु काँग्रेसने १९८० आणि १९९९ मध्ये अशी परिस्थिती पाहिली आहे. काँग्रेस पक्ष संपतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पुन्हा या पक्षाने भरारी घेत सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने मुसंडी मारली असली तरी विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढविली जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा या निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

बोफोर्समुळेच कारगिल विजय

कारगिलच्या युद्धात योगदान देणाऱ्या सैनिकांचे थोरात यांनी अभिनंदन केले, तसेच या युद्धात शहीद झालेल्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. विरोधी पक्षांनी काँग्रेसवर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप केला; परंतु याच बोफोर्स तोफांमुळे कारगिलचा विजय सुकर झाला. कारगिल युद्धाच्या यशात बोफोर्सचा मोठा वाटा असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

पाऊस पडल्यासारखे वाटले

शिवसेना आणि भाजपमध्ये खूप हुशार माणसे आहेत. त्यांना खोटेपण रेटून बोलण्याची सवय आहे. त्यांनी ते वारंवार दाखवून दिले आहे. महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना हे लोक खूप बोलले. इतके बोलले, की दुष्काळातही पाऊस पडतोय की काय, असे वाटू लागल्याचा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसच्या लेखी विखे अजूनही त्यांचेच

काँग्रेस पक्षाला अलविदा करून पक्षाचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले असले तरी काँग्रेसला अजूनही ते आपलेच वाटतात की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुबारसह नगर जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घोषणाबाज सरकारचे १०० दिवस ही पुस्तिका भेट देण्यात आली. या पुस्तिकेमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनोगत आहे. भाजपवासी झालेले विखे यांचे हे मनोगत बैठकस्थळी चर्चेचा मुद्दा ठरला.

निम्म्या जागांवर काँग्रेसचा दावा

आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आघाडीच्या माध्यमातून लढविण्याची शक्यता आहे. धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न एकीकडे सुरू असले तरी काँग्रेसने जिल्ह्यात किमान निम्म्या जागांवर निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी पाच जागा राखीव आहेत. निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार शोधण्याचे आवाहन पक्षापुढे असताना कार्यकर्त्यांकडून मात्र अधिक जागांची मागणी होऊ लागल्याने पदाधिकारीही विचारात पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्ते कमी, खुर्च्याच जास्त!

$
0
0

पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये जान फुंकण्यासाठी काँग्रेसने विभाग पातळीवर या बैठकीचे आयोजन केले असले तरी त्यास फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकस्थळी मोठ्या प्रमाणावर खुर्च्याही लावण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी बऱ्याच खुर्च्या रिकाम्याच असल्याचे चित्र होते. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, यासाठी पक्षातील वरिष्ठांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयाद्या थेट पक्ष कार्यालयात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आम्हाला मतदारयाद्याच प्राप्त झाल्या नाहीत, अशी ओरड निवडणुकीचा माहोल तापल्यानंतर राजकीय पक्षांकडून होत असते. त्यामुळे याद्या घेऊन जाणे ही त्यांची जबाबदारी असूनही जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पक्ष कार्यालयांपर्यंत याद्या पोहोचविण्यास प्राधान्य दिले आहे.

या याद्या पोहोच करण्यास शुक्रवारी सुरुवात झाली असून, प्रशासनाकडून मतदारयाद्याच प्राप्त झाल्या नाहीत, असे रडगाणे गाण्याची संधी प्रशासनाने राजकीय पक्षांकडून हिरावून घेतली आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुक होणार हे गृहित धरून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. एकीकडे मतदारांच्या जनजागृतीवर भर दिला जात असतानाच निवडणुकीसाठी आवश्यक सामग्री आतापासूनच उपलब्ध होईल याची खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून घेण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सात राष्ट्रीय आणि दोन राज्यस्तरीय राजकीय पक्षांना मतदारयादीची प्रत देणे ही निवडणूक शाखेची जबाबदारी आहे. मतदारयादी घेऊन जाण्याचे आवाहन निवडणूक शाखेकडून वारंवार केले जाते. परंतु, या आवाहनाला राजकीय पक्षांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याचा निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पूर्वानुभव आहे. राजकीय पक्षांना निवडणुकीच्या धामधुमीत असे रडगाणे गाण्याची संधीच मिळू नये याकरिता त्यांच्या कार्यलयापर्यंत याद्या पोहोच करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. भाजप, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह महत्त्वाच्या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांपर्यंत या याद्या पोहोच करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

--

मतदारयाद्या घेऊन जा, असे आवाहन आम्ही करतो. परंतु, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्यांच्या प्रती पक्ष कार्यालयांमध्ये पोहोच करण्यास सुरुवात केली आहे.

-अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीवापरावर नवे बंधन

$
0
0

- दरडोई १३५ लिटरच मिळणार पाणी

- जलसंपदासोबत मनपाचा आठवडाभरात पाणीकरार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला जलसंपदा विभाग आणि नाशिक महापालिकेतील पाणीवाटप करार अखेर मार्गी लागणार आहे. जलसंपदा विभागाने कराराचा अंतिम मसुदा पालिकेकडे पाठविला असून, त्याची तपासणी केली जात आहे. परंतु, या करारामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढावणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आखलेल्या नव्या धोरणांतील तरतुदींचा अंतर्भाव या करारात करण्यात आला असून, त्यानुसार नाशिककरांना दरडोई १३५ लिटर पाणी वापरासाठी मिळणार आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पाणीवापरावर नवे बंधन येणार आहे.

शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागात दरवर्षी करार केला जातो. परंतु, सिंचन क्षेत्राच्या पुनर्स्थापना खर्चाच्या वादातून गेली आठ वर्षे हा करार रखडला होता. यासाठी महापालिकेकडून जलसंपदा विभागाला रितसर पाणीपट्टीही अदा केली जाते. मात्र उभय यंत्रणांमध्ये आवश्यक पाणीवापर करार मात्र होऊ शकलेला नाही. सन २०११ मध्ये करारनामा करण्याबाबत एक कोटी रुपये भरून महापालिकेने पत्रव्यवहार केला. परंतु, जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. करारनामा झाला नसल्याचे कारण देत जलसंपदा विभागाने २०११ पासून पाणीपट्टीच्या मूळ रकमेवर दीड ते दोन पट दंड आकारत वसुलीचे देयक पाठवल्याने महापालिका आणि जलसंपदामध्ये वाद निर्माण झाला होता. जोपर्यंत पुनर्स्थापना खर्च, तसेच दंडात्मक वसुली महापालिकेकडून होत नाही तोपर्यंत करारनामा न करण्याची भूमिका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे करारनामाच रखडला होता. परंतु, सहा महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांनी या वादावर तोडगा काढत करार करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहा महिन्यांनंतर करारनाम्याचा मसुदा पाठवला आहे. पालिकेने कायदेतज्ज्ञांकडून हा मसुदा तपासण्याचे काम सुरू केले असून, लवकरच त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. परंतु, मुबलक पाणीवापर करणाऱ्या नाशिककरांवर या करारामुळे पाणीवापराचे बंधनही येणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आखलेल्या नव्या धोरणांतील तरतुदींचा अंतर्भाव या करारात करण्यात आल्याने नाशिककरांना दरडोई १३५ लिटर पाण्यापेक्षा एक थेंबही अधिक पाणी आता मिळू शकणार नाही. त्यामुळे नाशिककरांच्या पाणीआरक्षणातही कपात होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सिंचन पुनर्स्थापनेचाही वाद कायम राहिला असून, त्यातून ५३ कोटी जलसंपदाला हवे आहेत.

...

दुप्पट पाणीपट्टीचाही इशारा

या करारातील अटींनुसार महापालिकेने मंजूर पाणी आरक्षणाच्या ११५ टक्क्यांपर्यंत पाणी वापरल्यास नियमित दर आकारून पाणीपट्टी आकारली जाईल, असे म्हटले आहे. परंतु, ११५ ते १४० टक्क्यांपर्यंत पाणी वापरल्यास दीडपट दर, तर १४० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीवापर वाढल्यास दुप्पट पाणीपट्टी वसूल करण्याचा इशाराच जलसंपदाने दिला आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक भार वाढल्यास नागरिकांनाही त्याचा आर्थिक भार उचलावा लागू शकतो. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मकावर फिरवला नांगर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला तालुक्यातील शेतशिवारातील मका पिकावर झालेल्या लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. उंदीरवाडी येथील बाबाजी शंकर चाफेकर या शेतकऱ्याने शेतातील तब्बल दीड एकर क्षेत्रातील मक्याचे पीक रोटाव्हेटरच्या साह्याने नांगरून टाकले. गतवर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड आळीने येवला तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका दिल्यानंतर यंदाच्या खरीप हंगामात तालुक्‍यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसमोर लष्करी अळीने मोठे संकट उभे केले आहे. या अळीपासून सुटका मिळविण्यासाठी रासायनिक औषधे व कीटकनाशकांची फवरणी करून फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. परिणामी, उभ्या शेतातील मका पिकावर नांगर फिरवण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. उंदिरवाडी येथील बाबाजी चाफेकर यांनी यंदाच्या खरीप हंगामात दोन एकरात मका पिकाची पेरणी केली होती. जमिनीबाहेर डोकावलेल्या या पिकाला लष्करी आळीने ग्रासल्याने चाफेकर दीड एकरावर रोटाव्हेटर फिरवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images