Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झिरवाळांसाठी युतीची ‘व्यूह’रचना

0
0

लोगो : वेध मतदारसंघाचा-दिंडोरी

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ, अशी ओळख बनलेल्या दिंडोरीत येत्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी राष्ट्रवादीला झगडावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादीने आघाडी कायम ठेवली असली तरी विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना शह देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. दिंडोरीतील लढत राष्ट्रवादीविरुद्ध युती अशी सरळ होते की तिरंगी होते, यावर बरचे काही अवलंबून राहणार आहे. आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या 'वन्समोअर' लढतीत तिसरा उमेदवार कोण असणार यावरच गणित ठरणार आहे. माजी आमदार धनराज महाले यांनी आयत्यावेळी काही नवीन समीकरण जुळविल्यास लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दिंडोरीत आजवर सर्वाधिक काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले असून, जनता दलाचे हरिभाऊ महाले व त्यांचे पुत्र धनराज महाले २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आमदारही झाले होते. रामदास चारोस्कर हे एकदा काँग्रेस व एकदा राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले आहेत. २००४ साली राष्ट्रवादीने नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिल्याने चारोस्कर अपक्ष लढले, तर गत निवडणुकीत ते काँग्रेसकडून लढले होते. मात्र, दोन्ही वेळी नरहरी झिरवाळ यांनी बाजी मारली होती. २००९ च्या निवडणुकीत चारोस्कर यांनी थांबत शिवसेनेला सहकार्य केल्याने शिवसेनेचे धनराज महाले आमदार झाले. गेल्या निवडणुकीत या तिघांदरम्यान लढत होऊन झिरवाळ यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली होती. सध्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे धनराज महाले यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादीकडून लोकसभा लढली. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्यावर त्यांनी पुन्हा पुढील लोकसभेची तयारी सुरू करण्याचे सूतोवाच करीत विधानसभेबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, ऐनवेळी काही समीकरण जुळण्याची चर्चाही रंगत आहे. शिवसेनेतही एक गट त्यांच्याबाबत सोशल मीडियातून वारंवार सहानुभूती दाखवत आहे. एकंदरीतच महाले यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

दिंडोरीचा जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे तर युतीत शिवसेनेकडे आहे. काँग्रेस-आघाडीकडून नरहरी झिरवाळ यांची प्रबळ दावेदारी आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आघाडी मिळाल्याने हा पक्ष ही हक्काची जागा समजत आहे, तर माजी आमदार रामदास चारोस्कर हे मागील जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेनेशी जवळीक साधून होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून त्यांची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या सलगीतून चारोस्कर यांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, त्यांनी अद्याप कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यांची युतीशी असलेली जवळीक बघता ते शिवसेनेत जातील, अशी चर्चा होत असताना शिवसेनेने मात्र आपल्या इच्छुकांना कामाला लावले आहे. शिवसेनेचे पेठचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांचे मतदारसंघात दौरे सुरू झाले असून, त्यांना पक्षाने कामाला लावल्याची चर्चा रंगत आहे. शिवसेनेकडून भास्कर गावित यांच्यासोबतच झिरवाळ व महाले यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले सदाशिव गावित हेही इच्छूक असून, तेही तयारी करीत आहेत.

गेल्या काही दिवसांत भाजपची मतदारसंघात वाढलेली ताकत पाहता भाजपही ही जागा युतीत आपल्याकडे घेण्यास इच्छूक असून, तसे झाल्यास रामदास चारोस्कर यांना उमेदवारी देण्याची अटकळ बांधली जात आहे. गेल्यावेळी भाजपला उमेदवारांची वानवा होती. मात्र, यंदा भारती जोंधळे, भास्कर कराटे आदी उमेदवार इच्छूक आहेत. लोकसभा निवडणुकीत माकपची मते वाढल्याने त्यांच्याही आशा पल्लवित असून, दत्तू पाडवी व देवराम गायकवाड यांची तयारी सुरू आहे. भारिप बहुजन आघाडीतर्फे अरुण गायकवाड यांची तयारी सुरू असून, मित्रमेळा संघटनेचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. मनसेकडून पुन्हा पेठचे तालुकाप्रमुख सुधाकर राऊत उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांचा दोन्ही तालुक्यात संपर्क असून, प्रत्येक गावात काही ना काही विकासकामे करून त्यांनी आपले प्रयत्न कायम ठेवले आहेत. लोकसभा निवडणुकीत इतर मतदारसंघांत राष्ट्रवादीला हजारो मतांची पिछाडी मिळाली असताना, दिंडोरीत मात्र २७ हजार मतांची आघाडी मिळाल्याने झिरवाळ यांनी आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत धनराज महाले त्यांच्यासोबत राहिल्यास त्यांची ती जमेची बाजू राहणार आहे, तर माजी आमदार रामदास चारोस्कर यांची जिल्हा परिषदेतील सत्ता व पालकमंत्री यांच्या माध्यमातून विकासकामे, जनसंपर्क या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांचे आव्हान पेलण्यासाठी प्रमुख विरोधक युतीतर्फे सरळ लढत देण्याचा प्रयत्न होणार असला तरी रामदास चारोस्कर, भास्कर गावित, सदाशिव गावित हे आपापल्या परीने व्यूहरचना आखत दोन्ही तालुक्यातील मतांचे ध्रुवीकरण कसे आपल्या पथ्यावर पडेल, अशी तयारी करत आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढत जवळपास निश्चित आहे.

शिवसेनेकडे जागा कायम राहिल्यास

राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना शह देण्यासाठी विरोधकांकडून युतीतर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न राहणार असून, शिवसेनेकडे येथील जागा कायम राहिल्यास शिवसेनेला गावित बंधू किंवा चारोस्कर यांच्यापैकी एकास उमेदवारी द्यावी लागेल. तसे घडल्यास इतरांना अन्य पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून पर्याय निवडावा लागणार आहे.

संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस - नरहरी झिरवाळ, धनराज महाले

शिवसेना - भास्कर गावित, सदाशिव गावित

भाजप - रामदास चारोस्कर, भारती जोंधळे, भास्कर कराटे, अरुण गायकवाड

माकप - दत्तू पाडवी, देवराम गायकवाड

मनसे - सुधाकर राऊत

२०१४ विधानसभा निवडणुकीतील मते

नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)- ६८२८४

धनराज महाले (शिवसेना)- ५५६५१

रामदास चारोस्कर (काँग्रेस)- ४३,४१५

दत्तू पाडवी (माकप)- १३,९२४

सुधाकर राऊत(मनसे)- ८,४०६

अशोक बुरुंगे (भाजप)- ६,९९६

चंद्रशेखर कांबळे (बसपा)- १,९६६

२०१९ लोकसभेतील वाटा

भाजप - ७४,३९६

राष्ट्रवादी काँग्रेस - १,०१,८१४

माकप - ३४,४१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य बॅडमिंटन स्पर्धेत सई नांदूरकरला विजेतेपद

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नांदूरकर आणि सिद्धी जाधवच्या जोडीने अंतिम लढतीत रमशा फारुकी आणि सनश्री ढमढेरे यांचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सई ही शिवसत्य क्रीडा मंडळात सराव करीत असल्यामुळे तिच्या यशामुळे शिवसत्य क्रीडा मंडळाच्या लौकीकात पुन्हा एक यशाचा तुरा खोवला गेला आहे.

सई आणि सिद्धी या जोडीने उप-उपांत्यपूर्व लढतीत इशा सोनसळे आणि मधुरा पटवर्धन यांचा २१-१६, २१-१६ अशा सरळ दोन सेटमध्ये, तर उपांत्यपूर्व फेरीत भार्गवी रंभाड आणि चैताली नायसे यांचा २१-१० आणि २१-१६ असा पराभव करून उपांत्य अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत या जोडीने ऋचा सावंत आणि रिया हब्बू यांचा २१-१०, २१-१७ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सई आणि सिद्धी यांची अंतिम लढत रमशा फारुकी आणि सनश्री ढमढेरे यांच्याशी झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत सई आणि सिद्धी यांनी चांगली सुरुवात करून पहिला सेट २१-१४ असा जिंकून आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी २१-१७ अशी आगेकूच करीत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत एकेरीमध्ये खेळतानाही सई नांदूरकरने चांगले प्रदर्शन केले. परंतु उपांत्यपूर्व फेरीत तिला तनिष्का देशपांडेंकडून पराभव पत्करावा लागला. सई नांदूरकरने या आधीही मिनी, सब ज्युनियर आणि ज्युनियर स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले आहे.

सई गेल्या १० वर्षांपासून शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचा नियमित सराव करीत आहे. सई नांदूरकरने याआधी एकेरीत चांगली कामगिरी करून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविली आहेत. तर दुहेरीमध्ये तिने प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. सईचा प्रगतीचा आलेख बघता तिच्याकडून नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे मत सईचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केले. सईच्या या यशाबद्दल शिवसत्य क्रीडा मंडळाच्या हिमगौरी आहेर, अनंत जोशी, राधेश्याम मुंदडा, योगेश एकबोटे, नरेंद्र छाजेड, आनंद खरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी व युतीमुळे इतर पक्षांनाही संधी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्यामुळे अपक्ष व इतर राजकीय पक्षांना संधी मिळाली नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या ४७ विधानसभा मतदार संघात एकच अपक्ष उमेदवार निवडून आला. तर माकपच्या एका उमेदवाराला संधी मिळाली. उर्वरीत ४५ जागेत भाजपला १९, शिवसेनेला ८, राष्ट्रवादीला ८, काँग्रेसला १० अशा जागा मिळाल्या. पण, यावेळेस इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांना आता अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व शिवसेनेचे एकत्र निवडणूक लढवण्याचे अगोदरच ठरलं आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी निश्चित आहे. त्यामुळे या चार पक्षांतील इच्छुकांना एका मतदार संघात दोनच जागेवरच समाधान करावे लागणार आहे. त्यात अनेक इच्छुंकाचा हिरमोड होणार आहे. गेल्या वेळेस स्वतंत्र निवडणुका झाल्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार बहुतांश ठिकाणी होते. जे निवडणून आले त्यांनी पाच वर्षात पुन्हा निवडून येण्याची तयारी केली तर ज्यांचा पराभव झाला त्यांनी पाच वर्षे सतत पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम केले. त्यामुळे या चारही पक्षात अनेकांची कोंडी होणार आहे. त्यामुळे या इच्छुकांना एक तर अपक्ष उभे राहणे किंवा इतर पक्षाचा आसरा घेणे हेच हातात राहणार आहे.

राज्यात या चार पक्षानंतर वंचित बहुजन आघाडी हा नवा पक्ष आहे. त्यात मनसेची भूमिका अद्याप निश्चित नाही तर डाव्यांचा सर्व भागात वर्चस्व नाही. त्यामुळे कोणाच्याही कुबड्या न घेता प्रबळ असणारे उमेदवार या निवडणुकीत अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकास एक असलेल्या या निवडणुकीत त्यामुळे तिसऱ्या उमेदवारीमुळे रंगत येईल, असे आता दिसू लागले आहे.

चार पक्ष असल्यामुळे संधी

गेल्या विधानसभा निवडणुकीत चार प्रमुख पक्ष रिंगणात असल्यामुळे अनेकांना संधी मिळाली. या चार पक्षाकडे तगडे उमेदवार असल्यामुळे अपक्षांची डाळ येथे शिजली नाही. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघातून फक्त अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी आमदार झाले. तर नाशिक जिल्ह्यातून कळवण विधानसभा मतदार संघात मार्क्सवादी पक्षाचे जीवा पांडू गावित यांना संधी मिळाली.

बंडोबाची संख्या वाढणार

ज्या पक्षात आतापर्यंत काम केले त्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही किंवा मित्र पक्षाला जागा गेली म्हणून बंडोबाची संख्या वाढणार आहे. त्यामुळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता जास्त आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीमुळे पक्षातील नाराजांचा फायदा होणार आहे. तर मित्रपक्षाला जागा गेल्यास स्वपक्षातील समर्थकांची मदत होणार आहे. लोकसभेत राष्ट्रीय प्रश्न व मतदार संघ मोठा असल्यामुळे बंडखोरीचे प्रमाण कमी होते. पण, विधानसभेत मतदार संघात तुलनेत छोटा व स्थानिक मुद्दे जास्त असल्यामुळे याची शक्यता जास्त आहे.

२०१४ च्या निवडणुकीत असे झाले आमदार

जिल्हा - एकुण जागा - भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस - इतर

नाशिक - १५ - ४ - ४ - ४ - २ - १ (माकप)

जळगाव - ११ - ६ - ३ - १ - ० - १(अपक्ष)

धुळे - ५ - २ - ० - ० - ३ - ०

नंदुरबार - ४ - २ - ० - ० - २ - ०

अहमदनगर - १२ - ५ - १ - ३ - ३ - ०

एकूण - ४७ - १९ - ८ - ८ - १० - २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपस्वी पुरस्कार जाहीर

0
0

तपस्वी पुरस्कार जाहीर

२८ जुलैला होणार वितरण

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने देण्यात येणारे शिक्षण तपस्वी पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी ही घोषणा केली असून त्यात २४ जिल्हास्तरीय, १० विभागस्तरीय शिक्षकांसह ४ शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

या पुरस्कारांचे वितरण रविवार (२८ जुलै) दुपारी ३ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. शिक्षण प्रसाराच्या कार्यात शंभर वर्ष योगदान देणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक शिक्षण प्रसारक संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्यासह पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय हिंगणवेढे या शाळेला विशेष शिक्षण तपस्वी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबार पेरणीचे संकट टळले!

0
0

पावसाचे पुनरागमन; मालेगावात सखल भागात साचले पाणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी व शनिवारी जोरदार हजेरी लावली. दमदार पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी असलेले नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने केलेल्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक सुखावले आहेत. पावसाच्या पुनरागम झाल्याने दिलासा मिळाला असाल तरी काही ठिकाणी नुकसान देखील झाले आहे.

शहरातील सोयगाव नववसाहत परिसरातील अनेक कॉलनीमध्ये पाणी साचले असून काही घरांमध्ये देखील पाणी शिरले. दाभाडी गावात देखील नदी लगत असलेल्या शेतात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. तर ७ जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. शहरासह तालुक्यात शनिवारी सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पावसला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने काहीवेळ विश्रांती घेतली. सायंकाळी ५ नंतर मात्र शहरात पावसाचे जोरदार आगमन झाले. रात्री पुन्हा उशिरापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरू होता. शुक्रवारी व शनिवारी शहरात १०० मिमी हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासियांनी पावसाचे स्वागत केले.

शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गटारींचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यांवर आल्याने रस्ते जलमय झाले आहेत. अनेकठिकाणी मोकळ्या भूखंडावर पाणी साचल्याने रोगराईला आमंत्रण मिळाले आहे. विशेषतः शहरातील सोयगाव नववसाहत परिसरात हर्षवर्धन कॉलनी भागात गल्ल्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांना घरातून पाणी बाहेर काढण्यात रात्र घालवावी लागली. तर सकाळी देखील साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. शहरातील डीके उद्यानाला देखील या पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी उद्यानात पाणी साचले आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने, गटारी न तयार केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान

शनिवारी दमदार पावसाने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी काही ठिकाणी नुकसान देखील झाले आहे. दाभाडी परिसरात अवघ्या काही तासात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. परिसरातील दुधोड्या नदीजवळील प्रशांत निकम यांच्या साडेतीन एकरात नदीचे पाणी शिरल्याने डाळिंबासह, बाजरी, मक्याचे पिक वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. यासह वादळी पाऊस व वीज पडून कोठारे बु. येथील जिभाऊ सोनवणे, चिंचवे (गा) येथील पंडित महादू चव्हाण यांची प्रत्येकी एक म्हैस दगावली. बेळगावपाडा व कंधाणे गावात एकूण ५ जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या आठवड्यात राज्यस्तरीय समितीकडून घेतल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात या मुलाखती होणार आहेत. राज्यभरात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी राज्यस्तरीय समिती नेमली आहे. नाशिकच्या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड व छगन भुजबळ असतील.

जिल्ह्यातील मालेगाव मध्य सोडल्यास १५ पैकी १४ विधानसभा मतदारसंघांसाठी चाळीसहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात नाशिकच्या चार विधानसभा मतदारसंघांत २५ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित अकरा मतदारसंघांत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. विशेष म्हणजे चारही आमदारांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे, तर इतर ठिकाणी जुनेच चेहरे आहेत.

राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी निश्चित असली तरी या दोन्ही पक्षांचे जागावाटप अद्याप झालेले नाही. त्यात मित्रपक्ष कोण असेल व त्यांना कोणत्या जागा दिल्या जाणार हे निश्चित नाही. त्यामुळे या मुलाखतीमध्ये काँग्रेसचा दावा असणाऱ्या मतदार संघातील इच्छुकांनाही संधी मिळणार आहे. छगन भुजबळ तुरुंगात असताना नाशिकचे प्रभारी पद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर हे पद जयंत पाटील यांना देण्यात आले. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. त्याचप्रमाणे मधुकरराव पिचड हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ठाऊक आहे. भुजबळ जिल्ह्यातून उमेदवारी करणार असणार असले तरी ते राज्यस्तरीय नेते आहे.

माणिकराव शिंदे यांची अडचण

येवला विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन मागणी करणारे अॅड. माणिकराव शिंदे यांनी रितसर अर्ज दाखल करुन उमेदवारी मागितली आहे. पण, राज्यस्तरीय समितीत भुजबळच असल्यामुळे त्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे मुलाखती घेताना शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

पवार यांच्या अर्जाची चर्चा

निफाड विधानसभा मतदार संघातून माजी खासदार कै. वसंत पवार यांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी उमेदवारीसाठी ऑनलाइन अर्ज भरला असल्याची चर्चा होती. पण, ही केवळ चर्चाच ठरली. असा कोणताही अर्ज आलेला नसल्याचे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. पवार यांनीसुद्धा आपण अर्ज भरला नाही. पण, पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवेन असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत चैतन्य, भाजपला धडकी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, मित्रपक्ष भाजपला धडकी भरली आहे. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ठाकरे यांनी थेट संवाद साधून केलेल्या या दौऱ्यामुळे मतदारांमध्ये समाधान, तर नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. त्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यानंतर भाजपने शिवसेनेला बरोबर घेत सत्तेत स्थान दिले. पण, हे दुय्यम स्थान शिवसेनेला कधीच पचनी पडले नाही. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधी पक्षाचीच भूमिका बजावली. लोकसभेत हे पक्ष एकत्र आले असले तरी अजून या दोन्ही पक्षांत विधानसभेसाठीचे जागावाटप न झाल्यामुळे कुरबुरी सुरू आहेत. त्यात हा दौरा कळीचा ठरला आहे.

नाशिकचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे सांगत शिवसेनेने त्यावर दावा केला. या जागेवर भाजपच्या आमदार सीमा हिरे या निवडून गेल्या आहेत. या मागणीवरुन भाजपला धडकी भरली आहे. नांदगाव विधानसभेसाठी भाजप सरसावली असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असेल असे सांगत त्यावरही आपला हक्क या दौऱ्यानिमित्त पुन्हा सांगण्यात आला आहे. हा दौरा मतदारांचे आभार व जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी असला तरी त्यात अनेक मतदारसंघांवर दावे करण्यात आल्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गोटातही चिंता वाढली आहे.

बऱ्याच कालावधी नंतर संवाद

शिवसेनेमध्ये बऱ्याच कालवधीनंतर थेट संवाद साधला जात आहे. शिवसेनेत असताना राज ठाकरे निवडणुकीच्या अगोदर असे वातावरण निर्मितीचे काम करीत असत. पण, आता ही जबाबदारी आदित्य यांनी घेतली असून, त्यामुळे शिवसैनिक 'चार्ज' झाले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. थेट संवाद साधल्यामुळे मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. हा दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळत असून, तो यशस्वी ठरला आहे.

- महेश बडवे, महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसाळ्यात पाणीटंचाईशी लढाई!

0
0

५४ पैकी ३३ तालुक्यांत पाणीबाणी जैसे थे

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी धो-धो पाऊस कोसळला असला तरी विभागातील ५४ पैकी ३३ तालुक्यांत पावसाळ्यातही पाणीटंचाई कायम आहे. अद्यापही ९०० गावे आणि ३,४३३ वाड्यांवरील २१ लाख ५० हजार ९२६ नागरिकांना ११५९ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनाला करावा लागत आहे. विभागातील टंचाईग्रस्त गावांसाठी ६५ शासकीय आणि १०९४ खासगी टँकर आजमितीस धावत आहेत.

विभागात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, एरंडोल, मुक्ताईनगर, कोपरगाव, राहुरी या ८ तालुक्यांत पुरेसा पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या फेऱ्यातून त्यांची सुटका झाली आहे. या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांची संख्या शून्यावर आली आहे. मात्र, दुष्काळग्रस्त तालुक्यांपैकी अद्यापही ३३ तालुक्यांतील ९०० गावांसह ३ हजार ४३३ वाडीवस्त्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. काही तालुक्यांत मुसळधार पाऊस, तर काही तालुक्यात पाणीटंचाई असे विषम चित्र नाशिक विभागात सध्या दिसून येत आहे. जुलै महिन्याचा निम्मा कालावधी उलटला असूनही विभागातील मोजक्या तालुक्यांचा अपवाद वगळता बहुतांश तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी लाखो नागरिकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत असल्याने या तालुक्यांतील नागरिक हवालदिल झाले आहेत. पाऊस दररोज हुलकावणी देत असल्याने खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईची तीव्रता नगर आणि त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात जास्त आहे. एकट्या नगर जिल्ह्यात ११ लाख २९ हजार ९३५ नागरिकांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत आणि शेवगाव या तीन नगरपालिका मात्र टँकरमुक्त झाल्या आहेत.

तीव्र पाणीटंचाईचे तालुके व गावे

नाशिक जिल्हा

बागलाण ४६

चांदवड १२

देवळा १५

मालेगाव ३२

नांदगाव २४

सिन्नर २३

येवला ५६

--------

धुळे जिल्हा

धुळे ३१

साक्री १८

शिंदखेडा २४

----

जळगाव जिल्हा

जळगाव ७

जामनेर १२

पाचोरा ११

भुसावळ ६

धरणगाव ४

बोदवड २

चाळीसगाव २७

अंमळनेर ५१

भडगाव १०

पारोळा १७

----

नगर जिल्हा

संगमनेर ३६

नेवासा ५०

नगर ४२

पारनेर ७७

पाथर्डी ५५

शेवगाव ४०

कर्जत ७०

जामखेड ५०

श्रीगोंदा ४५

राहता २

अकोले २

विभागातील पाणीटंचाई स्थिती

जिल्हा---गावे---वाड्या---टँकर

नाशिक---२०९---६६६---२७०

धुळे---७३---३०---७२

जळगाव---१४७---०----१२३

नगर---४७१---२७३७---६९४

एकूण---९००---३४३३---११५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ

0
0

नाशिक:

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मोबाइल आणि त्यांच्या खिशातील रोकड चोरट्यांनी लांबवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आदित्य ठाकरे हे सध्या जनआशीर्वाद दौऱ्यावर असून, ही यात्रा एकूण सहा टप्प्यांत असेल. १८ जुलैला यात्रेचा पहिला टप्पा सुरू झाला. जळगावनंतर धुळे, मालेगाव, नाशिक शहर, ग्रामीण आणि त्यानंतर नगरला यात्रा निघाली. आदित्य ठाकरे यांनी शेतकरी, मतदार, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यात्रेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या गर्दीमुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे महागडे मोबाइल आणि त्यांच्या खिशातील रोकड लंपास केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. चोरांनी नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्याही खिशात 'हात' घातला होता. मात्र, हे वेळीच त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले आणि अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार समोर आल्यानंतर इतर चार ते पाच जणांचेही मोबाइल आणि त्यांच्याकडील रोकड लांबवल्याचे लक्षात आले. त्यातील एका पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेत चोरी करणाऱ्या दोघांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात्रेत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोर हातोहात मोबाइल आणि रोकड लांबवत असल्यानं त्याचा जनतेबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. मोबाइल आणि पैसे चोरीला जात असून, प्रत्येकानंच खबरदारी घ्यायला हवी, असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना सांगत होते. गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरट्यांची एखादी टोळी सक्रिय झाली असावी असा संशय पोलिसांना असून, त्या दिशेने तपास सुरू केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. भिडे यांच्यासह जयंत जायभावे विजयी

0
0

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे निकाल जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या कार्यकारणीसाठी गत वर्षी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. २५ सदस्य असलेल्या या कार्यकारणीत नाशिक जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले अॅड. जयंत जायभावे तसेच माजी सदस्य असलेल्या अॅड. अविनाश भिडे यांनी विजय संपादन केला.

बार कौन्सिलच्या सदस्यनिवडीसाठी २८ मार्च २०१८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तब्बल ८ वर्षांच्या खंडानंतर पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३११ जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर, या निवडणुकीसाठी १६३ वकील उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश होता. बार कौन्सिल सदस्यपदाच्या या निवडणुकीत कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अॅड. जायभावे, माजी सदस्य अॅड. भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. दिलीप वनारसे, ऑल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अॅड. इंद्रायणी पटणी, अॅड. बाळासाहेब आडके, अॅड. विवेकानंद जगदाळे, अॅड. एस. यू. सय्यद, अॅड. लीलाधर जाधव, अॅड. शालिग्राम रिंगणात होते. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातील एक लाख १२ हजार वकील मतदार असलेल्या या निवडणुकीत मतदानावेळी चांगलीच चुरस निर्माण झाली होती.

मतमोजणी ठरली किचकट

प्रत्येक वकील मतदारास कमीत कमी ५ तर जास्तीत जास्त २५ मते देण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया किचकट ठरली. दुसरीकडे काही हरकती नोंदविण्यात आल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या विभागास सुप्रीम कोर्टाने चार वेळा मुदतवाढ दिली. ही मुदत २३ जुलैपर्यंत होती. या पार्श्वभूमीवर सर्व हरकती निकाली काढत न्यायाधिकरणाने अंतिम २५ जणांची यादी जाहीर केली. त्यात अॅड. जायभावे आणि अॅड. भिडे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. विजयी झालेल्या २५ सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा

0
0

राज्य प्राथमिक शिक्षक समितीची वर्धापनदिनी मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ५८वा वर्धापन दिन पेन्शन हक्क दिन म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यामार्फत देशभरातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व डीसीपीएस/ एनपीएस योजना बंद करावी, याबाबत निवेदन देण्यात आले

संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार, डीसीपीएस, एनपीएस योजना शास्वत नसून कर्मचारी, शिक्षकांना त्यांच्या वृद्धावस्थेत कोणताही आधार देण्यास सक्षम ठरणाऱ्या योजना नाहीत. तसेच या दोन्हीही योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन नसल्याने कर्मचारी, शिक्षकांच्या मृत्यूनंतर अवलंबियांना निराधार करणाऱ्या व त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे सदर योजना बंद करून सर्व कर्मचारी-शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी राज्य संघटक नंदू आव्हाड, राज्य पदाधिकारी शिवाजी भामरे, जिल्हा नेते प्रकाश अहिरे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बुधेसिंग ठोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसला हात, की धनुष्याला साथ?

0
0

पुन्हा रंगणार पारंपरिक लढत; माकपची भूमिका निर्णायक

म. टा. वृत्तसेवा, घोटी/त्र्यंबकेश्वर

कधी का‌ळी शिवसेनेचा आणि मागील दहा वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदारसंघातील लढत यंदा अधिक रंगतदार होणार आहे. विद्यमान आमदार निर्मला गावित या हॅट्रिक करीत काँग्रेसचे वर्चस्व राखणार, की शिवसेना मुसंडी मारत भगवा फडकविणार, याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष आहे. मागील खेपेस भाजपच्या लाटेतही इथे काँग्रेसचा गड शाबूत राहिला. मात्र, यावेळी माकप आणि बहुजन वंचित विकास आघाडीमुळे येथील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हरसूल ठाणापाडा भागात पूर्वापार कम्युनिस्टांचा प्रभाव आहे. इगतपुरी तालुक्यातून त्र्यंबक तालुक्यात आलेल्या देवगाव भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपची तर इगतपुरी नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्र्यंबक पंचायत समितीत भाजप वगळता सर्व पक्षांचे सदस्य आहेत. परंतु, सत्ता माकपची आहे. इगतपुरी पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. अर्थात, दहा वर्षांपासून लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये त्र्यंबक तालुक्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी साथ दिली आहे. लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला त्र्यंबकने जवळपास ११ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य दिले. तर इगतपुरी तालुक्यातून सुमारे १७ हजारांच्या आसपास मताधिक्य शिवसेनेच्या खिशात गेले. काही वर्षांचा अपवाद वगळता सातत्याने इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकी देणारा हा मतदारसंघ आहे.

सलग दोनवेळा निवडून आलेल्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांचे तिसऱ्यांदा आमदार होण्याचे मनसुबे उधळण्यासाठी विरोधकांचे डावपेच सुरू आहेत. मतविभाजन टाळून त्या जोरावर गावित यांचा पराभव करण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. अर्थात, इच्छुक उमेदवारांची संख्या वाढते आहे. साहजिकच बंडखोरी वाढून अपक्षांचे पिक आल्यास त्याचा फायदा आमदार गावित यांनाच होण्याची शक्यता आहे.

सरकारविरोधी मतदारसंघ म्हणून गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून इगतपुरी-त्र्यंबक परिचित होता. गत निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातून शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार माजी आमदार शिवराम झोले यांना आघाडी होती. मात्र, त्र्यंबक भागातून निर्मला गावित यांना मदतीचा 'हात' मिळाला आणि त्या विजयी ठरल्या. आगामी निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवार म्हणून गावित यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे. त्यांच्याबाबत पक्षांतराच्या चर्चा असल्या तरी गावित यांनी भूमिका स्पष्ट केल्याने त्या काँग्रेसच्याच उमेदवार असतील. तर, शिवसेना-भाजपनेही हा मतदारसंघ पुन्हा मिळविण्याचा चंग बांधल्याने उमेदवारीसाठीही चुरस आहे. शिवसेनेकडून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी भाजपही तयारीत आहे. युती झाली तरी हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वतंत्र लढले तरी या मतदारसंघात पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी माजी आमदार शिवराम झोले आणि विनायक माळेकर यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या माळेकर यांनी चांगली तयारी चालवली आहे. याबरोबरच वंचित आघाडी, माकप, शेकाप यांच्याकडूनही उमेदवार दिले जाऊ शकतात. माकपने ४५ हजार सभासद असल्याचा दावा केल्याने या पक्षाची मते निर्णायक ठरू शकतात. या मतदारसंघातून वंचित आघाडीचा उमेदवार कोण असेल, याबाबतही उत्सुकता आहे.

इगतपुरी तालुक्यातील मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद गट, इगतपुरी पंचायत समिती आणि नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले रामदास घारे, भाजपत आलेले भाऊसाहेब डगळे, आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांच्यासह अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत.

त्र्यंबकला हवा आपला आमदार

एकेकाळी जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील व जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा मतदारसंघ म्हणून इगतपुरी मतदारसंघाचा दबदबा होता. परंतु, मतदारसंघ पुनर्रचनेत इगतपुरीचा हक्काचा टाकेद गट सिन्नर मतदारसंघाला जोडला गेला. पेठ-सुरगाणा मतदारसंघाचा ठाणापाडा गट इगतपुरी-त्र्यंबकला जोडला गेल्याने विधानसभेच राजकारणच बदलले गेले. पेठ तालुक्यातील ५८ गावांचा समावेश त्र्यंबकेश्वर तालुक्यात झाला, त्याचवेळी इगतपुरी तालुक्यातील टाकेद गट कमी करण्यात आला. तेव्हापासून त्र्यंबक तालुक्यातील ग्रामस्थांना आपल्या भागातील आमदार होईल, अशी अपेक्षा आहे.

शिवसेनेची बलस्थाने

इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट ताब्यात, इगतपुरी पंचायत समिती, इगतपुरी नगरपालिकेत एकहाती सत्ता, इगतपुरी पंचायत समितीत १० पैकी ७ जागा, तर त्र्यंबक पंचायत समितीमध्येही शिवसेनेचे प्राबल्य, गत विधानसभा निवडणुकीत मताधिक्यात झालेली वाढ, लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात व तालुक्यातून शिवसेनेला सर्वाधिक मताधिक्य.

काँग्रेसची बलस्थाने

निर्मला गावित यांची सकारात्मक भूमिका

जिल्हा परिषद उपाध्यक्षपद काँग्रेसकडे

काँग्रेसमध्येही दबदबा

गत निवडणुकीत मोदी लाटेतही मिळवलेला विजय

भाजपची बलस्थाने

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत एकहाती सत्ता

विनायक माळेकर यांचा प्रभाव व दांडगा लोकसंपर्क

हरसूल गट भाजपच्या ताब्यात

इगतपुरी तालुक्यातही घोटी गणातून मिळालेला विजय

मोदी लाटेचा शहरी भागात प्रभाव कायम

पक्षनिहाय इच्छुक

काँग्रेस : निर्मला गावित

शिवसेना : काशीनाथ मेंगाळ, चंद्रकांत खाडे, कावजी ठाकरे, भगवान मधे

भाजप : शिवराम झोले, विनायक माळेकर

२०१९ लोकसभेतील वाटा

शिवसेना : ६८ हजार ९७०

राष्ट्रवादी काँग्रेस : ६३ हजार ५१८

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ

२०१४ च्या निवडणुकीतील मते

निर्मला गावित (काँग्रेस) : ४९,१२८

शिवराम झोले (शिवसेना) : ३८,७५१

हिरामण खोसकर (राष्ट्रवादी काँग्रेस) : २१,७४६

काशीनाथ मेंगाळ (अपक्ष) : १७,१६७

चंद्रकांत खाडे (भाजपा) : ११,२५०

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेचे छप्पर कोसळले

0
0

सुदैवाने टळला अनर्थ, चांदवड तालुक्यातील घटना

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तालुक्यातील रेडगाव खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याचे सोमवार सकाळी निदर्शनास आले. सुदैवाने वर्गात कोणी नसताना हा प्रकार घडल्याची माहिती मुख्याधापक सयाजी ठाकरे यांनी दिली. घडल्या प्रकाराचा पालकांनी निषेध नोंदवला असून, घाबरलेल्या विद्यार्थांना वर्ग खोलीत बसण्यास नकार दिल्याने सोमवारी शाळेच्या आवारातील झाडाखाली वर्ग भरला.

रेडगाव खुर्द जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग दोन खोल्यांमध्ये भरतात. दोन खोल्यांमध्ये ६६ विद्यार्थी शिक्षण घेतात. सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे शाळा उघडली असता छताचे प्लास्ट कोसळलेले दिसले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली. प्लास्टरचे मोठ-मोठे तुकडे पाहून पालकांनी संताप व्यक्त केला. पालकांनी आपल्या विद्यार्थांना शाळेत न बसविण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र शेवटी उघड्या मैदानावर झाडाखाली वर्ग भरला. घटनास्थळी गटशिक्षणाधिकारी श्रीधर देवरे यांनी पाहणी केली.

दोषींवर कारवाई व्हावी

सर्व शिक्षा अभियानातून सन २०११-१२ ला ५ लाख ७० हजार खर्च करून शाळेच्या वर्गखोल्यांची उभारणी करण्यात आली. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब त्यावेळी काही ग्रामस्थ, पालकांनी निदर्शनास आणून दिली होती. मात्र पहिल्याच पावसाळ्यात शाळेचे छत गळायला लागले. त्यानंतर दोनच वर्षांत २०१३-१४ ला जिल्हा परिषदेच्या सेस मधून दुरुस्तीसाठी १ लाख २५ हजार खर्च दाखवून निधी फस्त करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी ग्रामस्थ तसेच पालकांकडून होत आहे.

शाळेच्या छताचे संपूर्ण प्लास्टर काढून घेण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी व ग्रामसेवकांना दिले आहेत. इंजिनिअरच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेऊ.

-महेश पाटील, गट विकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक मत... किती अनमोल!

0
0

व्ही. एन. नाईक निवडणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेली मतमोजणी उमेदवारांसह पाठीराख्यांच्या काळजाचे ठोके वाढविणारी ठरली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत एकेका मतावरून प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळाली. एका मताचे मोल काय असते, याची प्रचीतीही या निवडणुकीतून पाहायला मिळाली. केवळ एका मताच्या फरकामुळे काठावरचे विजय-पराजयही या निवडणुकीत उमेदवारांनी अनुभवले. रविवारी रात्री तीनपर्यंत ही मतमोजणी सुरू होती.

चुरशीच्या लढतीत सहचिटणीसपदी तानाजी जायभावे यांनी बाजी मारत 'प्रगती'चे खाते उघडले, तर सरचिटणीसपदासाठी झालेल्या मतमोजणीत धात्रक व दिघोळे यांना समान मते पडल्यामुळे दोन वेळा दोघांची मते मोजण्यात आली. मात्र, एकाही मताचा फरक न झाल्याने 'चॅलेंजिंग' मतदान ग्राह्य धरत निवडणूक मंडळाने दोन्ही उमेदवारांच्या समोर एकूण तीन मते तपासली. यात पहिले मतदान दिघोळेंना मिळाले, तर उर्वरित दोन मते धात्रक यांना मिळाल्याने अवघ्या एका मताने ते विजयी झाले. या दोघांची मतमोजणी रात्री दीडपर्यंत सुरू होती.

या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलला पराभवाची धूळ चारत क्रांतिवीर पॅनलने एकहाती विजय मिळवला. अध्यक्षपदाच्या लढतीत कोंडाजी आव्हाड यांचा पराभव करून क्रांतिवीर पॅनलचे पंढरीनाथ थोरे यांनी आव्हाड यांची २५ वर्षांची कारकीर्द संपुष्टात आणली, तर उपाध्यक्षपदावरही क्रांतिवीरचे अ‍ॅड. पी. आर. गिते यांनी विजयी मोहोर उमटवली. सरचिटणीसपदासाठी रात्री दीडपर्यंत चाललेल्या मतमोजणीत विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी अवघ्या एका मताने अभिजित दिघोळे यांचा पराभव केला. त्यामुळे 'प्रगती'च्या दोन्ही 'आप्पां'ना संस्थेत काम करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे.

नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चोपडा लॉन्समध्ये मतमोजणी झाली. सकाळी सातला सुरू झालेली मतमोजणी रात्री तीनपर्यंत सुरू होती. प्रथम संचालक मंडळाची निवड झाल्यानंतर संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या चार पदांसाठी मतमोजणी सुरू झाली.

एकीकडे ही प्रक्रिया सुरू असताना महिलांच्या गटात अंजनाबाई काकड व अरुणा कराड यांच्यात एकाच मताचा फरक पडल्याने त्यांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, तसेच नाशिक तालुक्यातील संचालक मंडळाची मतमोजणीला सर्वाधिक उशीर झाल्याने निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर 'क्रांतिवीर'चे सर्वच उमेदवार निवडून आल्यामुळे प्रगतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या लढतीमुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी विजयी उमेदवारांना रात्री तीनला प्रमाणपत्र दिले.

विजयी उमेदवार (कंसात मते) :

प्रगती पॅनल

सरचिटणीस : हेमंत धात्रक (३३८९)

सहचिटणीस : तानाजी जायभावे (३५१९)

क्रांतिवीर पॅनल

अध्यक्ष : पंढरीनाथ थोरे (३८९२)

उपाध्यक्ष : अ‍ॅड. पी. आर. गिते (३८५५)

विश्वस्त

भास्कर सोनवणे (३३३६), दामोदर मानकर (३७९०), दिगंबर गिते (३८०४), बाळासाहेब वाघ (३१९७), सुभाष कराड (३५८६), अ‍ॅड. अशोक आव्हाड (३३२३)

नाशिक प्रतिनिधी : मंगेश नागरे (३२६३), विलास आव्हाड (३४५५), सुरेश घुगे (३२७३), विष्णू नागरे (३३७३)

निफाड प्रतिनिधी : अशोक नागरे (३५७८), अ‍ॅड. सुधाकर कराड (३५८७), विठोबा फडे (३६१३)

दिंडोरी प्रतिनिधी : दौलत बोडके (३६७४), श्यामराव बोडके (३६०९), भगवंत चकोर (३३५०)

येवला प्रतिनिधी : तुळशीराम विंचू (३४९८), विजय सानप (३४९७)

नांदगाव प्रतिनिधी : अ‍ॅड. जयंत सानप (३६७३), विजय बुरकूल (३५१८)

सिन्नर प्रतिनिधी : रामनाथ बोडके (३४१७), उत्तम बोडके (३३३५), अशोक भाबड (३४५१)

महिला प्रतिनिधी : अंजनाबाई काकड (३२४८), शोभा बोडके (३६१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कौन्सिलच्या होकाराची प्रतीक्षा

0
0

एमबीबीएस अभ्यासक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमडी- एमएस या पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रमाच्या कॉलेजची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. एमबीबीएस मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चार सदस्यीय समितीने आपला अभ्यास पूर्ण केला असून, या अहवालास राज्य सरकारपाठोपाठ इंडियन मेडिकल कौन्सिलची मान्यता मिळणे आवश्यक आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपर्यंत ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यास एमडी- एमएससह एमबीबीएसची प्रवेशप्रक्रिया राबविली जाऊ शकते.

शहर आणि जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेले गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज (एमबीबीएस) सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यीय तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. समितीत डॉ. दीपक जोशी (ग्रँट मेडिकल कॉलेज), डॉ. विजय शेगोकर (विशेष कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय), डॉ. गिरीश बक्षी (सहाय्यक प्राध्यापक, ग्रँट मेडिकल कॉलेज), परशुराम दोरवे (मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय) यांचा समावेश होता. या कमिटीने सिव्हिल आणि संदर्भ हॉस्पिटलची सर्वंकष माहिती घेतली. मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण होतात काय, याचा या कमिटीने अहवाल तयार केला आहे. धुळे जिल्ह्यासाठी यापूर्वीच मेडिकल कॉलेज सुरू झाले आहे. धुळे शहर आणि जिल्ह्याचा विचार करता, नाशिक तुलनेत मोठे असून, येथे मेडिकल कॉलेजची नितांत आवश्यकता असल्याचा मुद्दा या कमिटीने उचलला आहे. सिव्हिल, तसेच संदर्भचे काम मोठे असून, सर्व निकषांची पूर्तता होत असल्याचा अहवाल कमिटीने मांडला आहे. हा अहवाल राज्य सरकार आणि नंतर इंडियन मेडिकल कौन्सिलला सादर होणार आहे. एमबीबीएससाठी मेडिकल कॉलेज सुरू करण्यापूर्वी कौन्सिलची एक कमिटी पुन्हा सर्व बाबींची तपासणी करेल. एमडी- एमएस कॉलेजसाठी मान्यता मिळाली असून, हे कॉलेज पुढील वर्षापासून सुरू होईल. त्यामुळे एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल सर्व निकष पूर्ण करेल, असा दावा आरोग्य विभागाकडून केला जातो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमडी एमएस अभ्यासक्रम कोट

0
0

पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री, तसेच विद्यापीठाचे कुलपती गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाकाच्या एकूणच विद्यार्थिसंख्येत यामुळे वाढ होणार आहे. आरोग्य विद्यापीठाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेणे यामुळे सुलभ होणार आहे.

- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डम्परच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
0

करंजगव्हाण गावात तणाव

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील करंजगव्हाण गावानजीक दहीदी रस्त्यालगत एका डम्परने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. प्रवीण दादाजी जाधव (वय ३३ रा. करंजगव्हाण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर करंजगव्हाण-दहीदी रस्त्यावर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण झाले होते. तणाव वाढत गेल्याने रात्री उशिरापर्यंत करंजगव्हाण गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मालेगाव-कुसुंबा रस्त्याचे चौपदरीकरणचे काम सध्या सुरू आहे. याच रस्त्यावर करंजगव्हाण दहीदी गावादरम्यान ही घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास मृत प्रवीण व अन्य दोघे रस्त्याच्या कडेला उभे होते. तेव्हाच रस्त्याच्या कामावर असलेला डम्पर करंजगव्हाणकडून दहीदीच्या दिशेने येत होता. चालकाचा ताबा सुटल्याने डम्पर थेट रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या प्रवीणच्या अंगावर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसपाटील नीलेश ह्याळीज यांनी वडनेर खाकुर्डीचे पोलिस निरीक्षक मोताळे यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस देखील दाखल झाले. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाइक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

संतप्त जमावाकडून दगडफेक सुरू झाल्याने पोलिसपाटील ह्याळीज तसेच एक पोलिस कर्मचारी जखमी झाले. जमावाने रस्त्याच्या कामावर असलेल्या वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव अधिकच वाढत गेला. अखेर पोलिस उपअधीक्षक शशिकांत शिंदेसह मोठा फौजफाटा करंजगव्हाण गावात दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा मृत प्रवीणचा मृतदेह येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला होता. सोमवारी दुपारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीणच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी डम्परचालक प्रवीण उत्तम पवार (वय ३५, रा. सातमाने) यास अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता महिन्यातून एकदाच वीज खंडित

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देखभाल- दुरुस्तीच्या कामांसाठी महिन्यातून केवळ एकदाच वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण प्रशासनाने दिल्याने वीज ग्राहकांची खंडित विजेच्या कटकटीतून कायमची सुटका झाली आहे. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सोमवारी (ता. २२) ही माहिती दिली.

देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणतर्फे वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. परिणामी, वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत असते. मात्र, आता महावितरणच्या सर्व सेवा अधिक ग्राहकाभिमुख व्हाव्यात, यासाठी महावितरण प्रशासनाने कंबर कसली असून, वीज ग्राहकांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती देताना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर बोलत होते. देखभाल- दुरुस्तीची कामे करण्यासाठी आता महिन्यातून केवळ एकदाच वीजपुरवठा खंडित करता येणार आहे. एका महिन्यात एकाच फीडरवर दुसऱ्यांदा देखभाल- दुरुस्ती करण्याची गरज पडल्यास त्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची पूर्वपरवानगी महावितरण प्रशासनाकडून घ्यावी लागणार आहे. तसे आदेशच महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व परिमंडळ मुख्य अभियंत्यांना नुकतेच दिले आहेत. महावितरण प्रशासनाच्या या नवीन आदेशामुळे आता वीज ग्राहकांची दर आठवड्याला वीजपुरवठा खंडित होण्याच्या गैरसोयीतून सुटका होणार आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, मनीष ठाकरे, संजय खंडारे, अनिल थोरात, धनंजय दीक्षित आदी उपस्थित होते.

विविध योजना कार्यान्वित

वीज ग्राहकांना वीजबिलाचा भरणा अधिक सुलभपणे करता यावा, यासाठी महावितरण वॉलेट योजना सुरू केली आहे. मोबाइल अॅपद्वारे वीज ग्राहकांना तक्रार, नवीन वीज जोडणी, वीजबिल भरणे, वीज मीटर रीडिंग भरणे आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. कृषी ग्राहकांना सौर कृषी योजनेअंतर्गत वीजपंप दिले जात आहेत. लवकरच १६६ गावांत ग्रामविद्युत सेवक भरले जाणार आहेत. बेरोजगार अभियंत्यांना महावितरणची कामे मिळवून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरची कामे यासाठीच्या निविदा काढून निवडलेल्या ठेकेदाराला सलग तीन वर्षे काम दिले जाणार आहे. त्यामुळे ठेकेदाराअभावी कामे रखडण्याच्या घटना कमी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद मासिकचा उद्या वर्धापनदिन

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आयुर्वेद सेवा संघ या सार्वजनिक विश्वस्त न्यासातर्फे प्रकाशित होणाऱ्या आयुर्वेद पत्रिका या मासिकाचा ७२ वा वर्धापनदिन समारंभ बुधवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता आयुर्वेद सेवा संघाचे आयुर्वेद महाविद्यालय, गणेशवाडी येथे होणार आहे.

डोंबिवली येथील ज्येष्ठ वैद्य नरहर भोळे प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते आयुर्वेद पत्रिकेच्या 'स्त्री वंध्यत्व चिकित्सा' या विशेषांकाचे प्रकाशन आणि आयुर्वेद पत्रिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच 'स्त्री वंधत्व आयुर्वेदिय चिकित्सा' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

आयुर्वेद पत्रिकेतर्फे २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार उत्तम लेखक पुरस्कार (विभागून) वैद्य श्रीप्रसाद बावडेकर (पुणे) व वैद्य पुष्कर वाघ (डोंबिवली), विचार प्रवर्तक लेख पुरस्कार डॉ. मुकुंद सबनीस (औरंगाबाद), उत्तम रुग्णानुभव लेखन पुरस्कार वैद्य सोनाली देशमुख (नाशिक), उत्तम वाचक पुरस्कार डॉ. सुभाष साले (नांदेड), उत्तम शोध प्रबंध पुरस्कार वैद्य अनुराधा गोयल (टिटवाळा), संशोधनपर लेख पुरस्कार डॉ. ज्योती वरठी (नागपूर), उत्तम ग्रंथ पुरस्कार वैद्य लीना बावडेकर (पुणे) यांना जाहीर झाले आहे. व्याख्यान, पुरस्कार वितरण आणि विशेषांक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयुर्वेद सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री महाजन, सावतांच्या राजीनाम्याची मागणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तिवरे धरण दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची भेट घेऊन युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना सोमवारी निवेदन दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनेमध्ये निष्पापांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमुळे धरण सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. धरण सुरक्षेविषयी अभ्यास करणाऱ्या संस्थांनी दिलेला अहवाल धक्कादायक आहे. अनेक अहवालांमधून यापूर्वीच कोकणांमधील धरणांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तिवरे धरण दुर्घटना घडल्याने महाजन आणि सावंत यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव कल्याणी रांगोळे, भास्कर गुंजाळ, दिनेश चौथवे, रा. का. पाटील, त्रिरश्मी तिगोटे, मनोज पाईकराव, अ‍ॅड. अभिमन्यू गोवर्धने, दर्शन पाटील आदींनी हे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images