Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ऑस्ट्रेलियासाठी नरके यांची निवड

$
0
0

सरिता नरके यांची

ऑस्ट्रेलियासाठी निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकातर्फे नोंदणी उपमहानिरीक्षक सरिता नरके यांची मास्टर ऑफ सायन्स इन पब्लिक पॉलिसी मॅनेजमेंट (स्पेशलायझेशन इन डिजिटल ट्रान्सफॉरमेशन अॅण्ड डाटा अॅनॅलिस्टिक) हा अभ्यासक्रम करण्यासाठी निवड केलेली आहे.

ऑस्ट्रेलिया येथील कार्नेगी मेलन विद्यापीठ, एडिलेड येथे हा अभ्यासक्रम शिकवला जातो. सदर अभ्यासक्रम करण्यासाठीच्या सर्व प्रवेश परीक्षा नरके उत्तीर्ण झाल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे. भारत सरकारकडून यासाठी सर्व खर्च करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सुमारे १२ महिन्यांचा आहे. या अभ्यासक्रमासाठी त्या येत्या ३१ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. देशभरातून चार अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यात नरके यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दंडवसुलीला ऑनलाइनचे बळ

$
0
0

ई चलानद्वारे एक कोटी रुपये जमा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ई-चलान पद्धतीने दंड वसूल करणाऱ्या शहर वाहतूक शाखेने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये तब्बल एक कोटी रुपयांचा दंड जमा केला. वाहतूक शाखेने दंड पावती पुस्तक इतिहास जमा केले असून, या नवीन पद्धतीमुळे पळून जाणाऱ्या चालकाच्या वाहनावरील दंड मात्र कायम ठेवणे शक्य झाले आहे. एक राज्य एक चलान या पद्धतीमुळे नाशिकच नव्हे तर राज्यातील कोणत्याही वाहतूक पोलिसाला हा दंड वसूल करता येणे शक्य होते.

आर्थिक घोळ आणि वाहतुकीला शिस्त लावण्याची परिणामकारकता यामुळे वाहतूक विभागात दंड वसुल करण्यासाठी वापरण्यात येणारे पावती पुस्तक बंद करण्यात आले आहे. अगदीच निकडीच्या वेळी या पुस्तकांचा वापर होतो. एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियमभंग केला की त्या वाहनाचा क्रमांक विशिष्ट सॉफ्टवेअर असलेल्या मशिन्समध्ये टाकला जातो. तिथे वाहतूक पोलिस कर्मचारी दंडाची रक्कम नमूद करतात. वाहनचालकाने लागलीच डिजिटल अथवा रोख पद्धतीने दंडाची रकम अदा केली तरच त्या वाहनक्रमाकांवरील दंडाची रकम कमी होते. अन्यथा ती रकम तशीच राहते.

याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की ई-चलान पद्धत पोलिस आणि वाहनचालकांच्या दृष्टीने फारच पारदर्शक आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचा मोबाइल क्रमांक प्रादेशिक परिवहन विभागाशी संलग्न असल्यास अशा वाहनचालकास नियमभंगाचे कलम, दंडाची रकम, ती भरल्यानंतर ई रिसीट असे सर्व मोबाइलवरच उपलब्ध होते. मोबाइल क्रमांक सलंग्न नसेल तर वाहतूक शाखा त्या वाहन क्रमाकांच्या आधारे नोटीस काढते. नियमभंग केल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित वाहनचालकाला दंड भरणे बंधनकारक असते. दंडाची रकम भरण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित वाहनचालकाला कोर्टाकडून समन्स काढता येऊ शकतो. तसेच त्या वाहनचालकाला राज्यात कोठेही वाहतूक पोलिसांने पकडले तर दंडाची थकबाकी वसुल करता येते. अशा वेळी त्यास सूट दिली जात नाही. नाशिकमध्ये मुंबईतील एका इनोव्हा चालकाकडून १२ हजार रुपये वसूल करण्यात आले होते, असेही नखाते यांनी स्पष्ट केले.

पळ काढणाऱ्यांच्या दंडात वाढ

एप्रिल ते जुलै २०१९ या काळात शहर वाहतूक शाखेने ई-चलानमार्फत ४८ हजार ९४८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. याद्वारे एक कोटी नऊ लाख ५९ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुसरीकडे याच कालावधीत १० हजार ५२० वाहनचालकांवर कारवाई झाली. मात्र, त्यांनी दंड भरला नाही. यातील बहुतांशवेळी वाहनचालक पळून जाण्याचा प्रयत्न किंवा पळून जातात. वाहतूक पोलिसांना दमबाजी सुद्धा केली जाते. अशा चालकांच्या दंडरकमेत वाढ होते. सर्व नियमांचा येथे विचार केला जातो. वाहन क्रमांकावर जमा दंड हा कायमस्वरूपी असून, तो भरल्याशिवाय गंत्यतर नसते, असेही नखाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन गाडी ‘पेटली’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अगोदरच तीन उच्च दर्जाची वाहने असतानाही सभापतींनी नवीन वाहनाची खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी खर्च करण्याऐवजी सभापती मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी करीत असल्याची तक्रार संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

नवीन वाहन खरेदी करण्याअगोदर जुन्या वाहनांची विक्री करायला हवी होती. जुन्या वाहनांच्या विक्रीचा ठराव सभेमध्ये केलेला असला, तरी त्यांची विक्री करण्यात आलेली नाही. बाजार समितीवर कर्ज असेपर्यंत अशा प्रकारचा खर्च करणे योग्य नाही. कर्ज फिटल्यानंतर नवीन वाहनांची खरेदी करायला हरकत नाही, असेही संचालकांचे म्हणणे आहे. बाजार समितीत होणारी पैशाची उधळपट्टी थांबवावी, समितीच्या हिताची कामे करण्यात यावीत, समितीत होणारा पैशाचा दुरुपयोग थांबविण्यात यावा अन्यथा होणाऱ्या गैरव्यवहाराला व भ्रष्टाचाराला आम्ही संचालक मंडळ जबाबदार राहणार नाही. बाजार समितीच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, असे संचालक तुकाराम पेखळे, विश्वास नागरे आदींनी म्हटले आहे.

--

सभापतिपदावर दोन वर्षांपासून असताना बाजार समितीच्या वाहनाला स्पर्शही केला नाही, स्वतःचे वाहन वापरले. उपसभापतींना वाहन होते. नियमनमुक्ती व खासगीकरण झालेले असताना बाजार समितीला चांगल्या स्थितीत आणले आहे. नवीन वाहनाची खरेदी ही स्वतःसाठी केलेली नसून, बाजार समितीसाठी केलेली आहे. ते वाहन बाजार समिती वापरणार आहे.

-शिवाजी चुंभळे, सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे सिद्धता ५५ टक्क्यांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सेशन आणि जेएमएफसी कोर्टात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात १५ टक्के वाढ झाली आहे. स्पेशल कोर्टाबाबतसुद्धा समाधानकारक स्थिती असून, गुन्हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रयत्नांमुळे हा बदल होत असल्याचा दावा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केला आहे.

ग्रामीण भागाचा विस्तार मोठा असून, हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, लूटमार असे गुन्हे होण्याचे प्रमाण जास्त असते. कोणत्याही गुन्ह्याचा तपास होत असला, तरी तो गुन्हा कोर्टात सिद्ध होणे महत्त्वाचे असते. जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत सेशन (ज्यात ७ वर्षांहून अधिक शिक्षा असते) आणि जेएमएफसी (७ वर्षांपर्यंत शिक्षा) गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ३५ टक्के होते. विशेष कोर्टात सुनावणी झालेल्या खटल्यांमध्ये २२ टक्के शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. यंदा याच कालावधीत सेशन आणि जेएमएफसी कोर्टात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, तर विशेष कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये हे प्रमाण ५० टक्के राहिले आहे. अवैध धंदे कमी करण्यात यश मिळाले असून, त्याचा हा परिणाम असल्याचे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.

दरमहा बैठकीत आढावा

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी सांगितले, की कोर्टातील पैरवी अधिकाऱ्यांची दर महिन्याला बैठक आयोजित करण्यात येते. त्यात प्रत्येक खटल्याचा आढावा घेतला जातो. जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबाबत बोलताना डॉ. सिंग म्हणाल्या, की जानेवारी ते जून या पहिल्या सहा महिन्यांची २०१८ आणि २०१९ अशी तुलना करता यंदा ३३ गुन्हे जास्त दाखल असल्याचे दिसते. २०१८ मध्ये एकूण गुन्ह्याची संख्या तीन हजार सहा होती, तर यंदा गुन्ह्यांचे प्रमाण तीन हजार ३९ इतके आहे. मात्र, हत्येच्या घटना वीसने कमी, खुनाचा प्रयत्न नऊने, दरोडा १२, जबरी चोरी २०, दंगा ५७, ठकबाजी २९, सरकारी नोकरांवर हल्ला पंधराने या प्रमाणे गुन्हे कमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल लिक होऊन एकाचा मृत्यू

$
0
0

नाशिक : दुचाकीतील पेट्रोल लिक असल्याने सायलेन्सरवर पेट्रोल पडून ते पेटल्याने एकाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. निरंजन घनशाम सरोदे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १९) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीचे पेट्रोल लिक होत असल्याची बाब निरंजन यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी दुचाकीचे इंजिन बंद करीत असतानाच सायलेंसरवर पेट्रोल पडून भडका उडाला. त्यातच निरंजन हे ४० ते ४५ टक्के भाजले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, शनिवारी (दि. २०) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

..

वृद्धाची आत्महत्या

नाशिक : फुलेनगर परिसरात ७० वर्षीय वृद्धाने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. प्रल्हाद संपत लोखंडे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. प्रल्हाद यांनी शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

...

जखमीचा मृत्यू

नाशिक : बापलेकाच्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या विक्रमगड (जि. पालघर) येथील

मधुकर रघू निमण (रा. धाणीडोलारी, पो. धादडे) या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मधुकर विमल यास गावातील भटू मास्तर व त्याचा मुलगा सदानंद यांनी पंधरा दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. गुरुवारी (दि. १८) त्यांची प्रकृती खालावल्याने मुलगा उमेश निमण यांनी त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, शनिवारी (दि. २०) दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार जनतेच्या समस्यांसाठी वेळ प्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

केलेल्या कामांमुळे जनतेने पाच वर्षे सत्ता दिली. मात्र, सत्तेत असतानाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली. यापुढेही जनतेच्या प्रश्नासाठीच लढा देत राहणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

जनआशीर्वाद यात्रेच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम करीत आशीर्वाद दिला. ज्यांनी मतदान केले, त्यांचे आभार मानणार. ज्यांनी केले नाही त्यांचे मन जिंकणार. तुमच्या ताकदीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्र भगवा होणार आहे. आता थांबायचे नाहीच. आतापासून निवडणूक सुरू झाली असे समजून शिवसैनिकांनी कामाला लागावे. महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होतो. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लोकसभा व विधानसभा तसेच रस्त्यावरही उतरून लढलो. यानंतरही रोजगार, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी जबाबदारीने लढायचे आहे. भगवा फडकवायला तयार आहात का, असा प्रश्न करीत त्यांनी युवकांमध्ये उत्साह भरला. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठीच सरकार स्थापन करायचे आहे. यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे ठाकरे म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनीही यावेळी संवाद साधला. नाशिक लोकसभेच्या यशात पश्चिम मतदार संघाचा मोठा वाटा आहे. या मतदार संघातून शिवसेनेचा खासदार निवडून आला. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला आहे. तरुण वर्ग, आबालवृद्ध मोठ्या आशेने आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत आहेत. नवीन पिढी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरली आहे.

यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, खासदर हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, मंदा दातीर, श्याम शाबळे, डी. जी. सूर्यवंशी, विलास शिंदे, दीपक दातीर, बंटी तिदमे, दिलीप दातीर, विनायक पांडे, हर्षा बडगुजर, किरण दराडे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, कल्पना पांडे, हर्षदा गायकर यांसह सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्या दोघांच्या हाती बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

तलवार हातात घेऊन खंडणी मागणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कार्बन नाका आणि त्र्यंबक रोडवरील गुरुकृपा हॉटेल परिसरात या दोन्ही कारवाया करण्यात आल्या.

विशाल पोपट सांगळे (रा. सातपूर) आणि लंकेश रामचंद्र सोनवणे (रा. श्रमिकनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील विशाल हा तडीपार असून तो कार्बन नाका परिसरात हातात तलवार घेत खंडणी मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी तलवार जप्त केली. दुसऱ्या घटनेत त्र्यंबक रोडवरील गुरूकृपा हॉटेल येथे लंकेश सोनवणे याने तलवारीचा धाक दाखवित गल्ल्यातील ७ हजार तीनशे रुपये काढून घेतले. तसेच महिन्याला ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे धमकाविले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करीत लंकेशला ताब्यात घेतले. हॉटेलचालक प्रितीश शेट्टी यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

घरफोडी करणारे जेरबंद

सातपूर : गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून दुचाकीवरून पळ काढणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना सातपूर गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांनी सोमेश्वर कॉलनी येथे ताब्यात घेतले. भटू प्रकाश दंडगव्हाळ आणि राहुल दशरथ नरवाळ अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेले चार लॅपटॉप, दोन दुचाकी, रोख १२ हजार ८०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले. दोघा संशयितांवर चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हवालदार मनोहर सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७९ टक्के मतदान

$
0
0

आज रात्रीपर्यंत निकाल जाहीर होणार; सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी

....

- एकूण सभासद : ८ हजार ६९२

- हक्क बजावणारे मतदार : ६ हजार ८४६

- २९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात

- ३९ बूथची व्यवस्था

- ४२९ कर्मचाऱ्यांनी राबवली मतदान प्रक्रिया

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिनाभरापासून पंचवार्षिक निवडणुकीमुळे चर्चेचे केंद्रस्थान बनलेले व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे वर्तुळ मतदानाच्या माहोलमुळे शनिवारी ढवळून निघाले. शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर अशा एकूण २९ जागांसाठी ७९ टक्के मतदान झाले. मतमोजणी होऊन उमेदवारांचे भवितव्य आज (दि. २१) रात्रीपर्यंत स्पष्ट होणार आहे. किरकोळ कुरबुरी वगळता मतदान शांततेत पार पडले.

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाला शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह चांगला होता. यानंतर काही वेळ मतदात्यांची तुरळक उपस्थिती होती. मात्र दुपारी १२ वाजेनंतर हजारोंच्या संख्येने मतदात्यांचा ओघ सुरू झाल्याने मतदान केंद्र गजबजून गेले. सरळ दोन पॅनलमध्ये लढत होत असल्याने मतदात्यांमध्येही उत्साह दिसून आला. संस्थेच्या आवारात अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या इमारतीत आठ तालुक्यांतील सभासदांसाठी ३९ बूथची व्यवस्था केली होती. संस्थेच्या एकूण ८ हजार ६९२ सभासदांपैकी ६ हजार ८४६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. हे प्रमाण ७९ टक्के इतके नोंदविले गेले. मतदानास सभासदांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही निवडणूक सहजासहजी एकबाजूस झुकणारी नसल्याचा कयास मतदानानंतर दोन्ही पॅनल्सच्या समर्थकांकडून व्यक्त केला गेला.

एकूण ४२९ कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबविली. २९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात आहेत. यात सत्ताधाऱ्यांच्या वतीने कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल, तर पंढरीनाथ थोरे, तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर पॅनलमध्ये लढत होत आहे. दरम्यान, आज (दि. २१) सकाळी ८ वाजता गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

..

\Bकॉलेजरोड-गंगापूर रोडवर वाहतूक कोंडी \B

मतदानासाठी नाशिकसह सिन्नर, निफाड, चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव आणि दिंडोरी या तालुक्यांतून पावणेसात हजार सभासद आणि दोन्हीही पॅनल्सच्या सभासदांनी खासगी वाहनांद्वारे डोंगरे वसतिगृह मैदानात हजेरी लावली. नाशिकबाहेरून येणाऱ्या सभासद व समर्थकांची संख्या दुपारी १२ वाजेनंतर वाढत गेली. परिणामी शहरात द्वारका परिसर आणि जुना गंगापूर नाका-कॉलेजरोड परिसर येथे वाहतूक कोंडी झाली.

...

मतदानात घट

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ८२.८५ टक्के मतदान झाले होते. एकूण ७२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेल्या वेळी निवडणूक रिंगणात तीन पॅनल होते. यंदा दोन पॅनल असूनही मतदानात तीन टक्क्यांनी घट झाली आहे.

..

\Bपावसाने मतदारांच्या उत्साहावर पाणी \B

शहरात दुपारी सुरू झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम नाशिक शहर व तालुक्यातील मतदारांवर झालेला बघायला मिळाला. नाशिक तालुक्यातून २५३८ मतदान होते. पैकी १८३१ मतदारांनी मतदान केले. मतदार असलेल्या आठही तालुक्यांमध्ये नाशिक तालुक्यात सर्वाधिक मतदान होते. पण पावसाने स्थानिक मतदात्यांच्या उत्साहावर पाणी फेरले. या तुलनेतर इतर तालुक्यांची मतदानाची सरासरी चांगली आहे.

...

\Bअ. क्र.............तालुका.......................................एकूण मतदार...................झालेले मतदान \B

१)...............सिन्नर........................................१८४५..................................१४९७

२)..............निफाड/चांदवड.............................२०४४..................................१६७२

३)..............नांदगांव.......................................९०८......................................७१८

४)..............येवला.........................................५९९......................................४९५

५).............मालेगांव.......................................१७१......................................१०२

६).............दिंडोरी.........................................५८७......................................५३१

७)............नाशिक.........................................२५३८...................................१८३१

\Bएकूण.........................................................८६९२.................................६८४६ (७९ टक्के)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीची चिल्लर चोरट्यांकडून लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वायगाव (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात चोरट्यांनी डल्ला मारत महत्त्वाची कागदपत्रे व पाचशे रुपयांची चिल्लर लंपास केल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीत चोरी झाल्याचे लक्षात येताच संपूर्ण गावकऱ्यांनी आवारात गर्दी केली. घटनास्थळी पोलिस अधिकारी भेट देत पाहणी केली.

ग्रामपंचायतीचे शिपाई किरण खैरनार हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे जलकुंभात टीसीएल पावडर टाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेले. त्यांना ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडलेले आढळून आले. खैरनार यांनी सरपंच कल्पना आहिरे यांना याबाबत तातडीने माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते भरत आहिरे यांनी जायखेडा पोलिसांना कळविले. ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप करवतीने कापून ग्रामपंचायतीत चोरट्यांनी प्रवेश केला होता. तसेच ग्रामसेवकांचे कार्यालयाचेही कुलूप तोडलेले आढळून आले. कार्यालयातील दोन पत्र्याचे कपाट तोडून आतील काही कागदपत्रे अफेकलेली होती. तसेच धनादेश पुस्तकही खाली फेकलेले आढळून आले. कपाटातली पाचशे रुपयांची चिल्लर व काही महत्त्वाचे कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केल्याचा संशय ग्रामसेवक पी. टी. बोरसे, सरपंच कल्पना आहिरे व उपसरपंच मोहन आहिरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी जायखेडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मालेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, जायखेडा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश गुरव आदींनी भेट देऊन चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना शहरात २००३ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार लाभ दिला जात असल्याने हजारोंच्या संख्येने लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी दिले आहेत.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिरात लाभार्थींशी बोलताना मांढरे यांनी हे आदेश दिले. आमदार फरांदे यांच्या प्रयत्नांतून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ करून देण्यासाठी रोटरी क्लब हॉल, गंजमाळ येथे समाधान शिबिर सुरू असून, जिल्हाधिकारी मांढरे यांनी या शिबिराला भेट दिली. यावेळी फरांदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींबाबत फरांदे यांनी अद्याप २००३ च्या दारिद्र्यरेषेप्रमाणे लाभार्थींना लाभ दिले जात असल्याचे मांढरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर मांढरे यांनी याबाबत शहरातील सर्व लाभार्थींना २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे लाभ दिला जाईल, असे सांगताना आजच याबाबतचे आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भातील यादीही त्यांनी तातडीने मागवून कामाच्या सूचना दिल्या. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शहरातील हजारो लाभार्थींना त्याचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोच्या उद्घाटनाची घाई

$
0
0

पुण्याच्या धर्तीवर आधी उद्घाटन; मग कामाची प्रक्रिया

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाशिक शहरात देशातील पहिली हायस्पीड टायरबेस मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे. पुण्याच्या धर्तीवर या मेट्रोसेवेचे नारळ निवडणुकीपूर्वी फोडण्यात येणार असून, त्यासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. उद्या (दि. २२) महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, या बैठकीत नाशिकच्या मेट्रो-निओचे सादरीकरण केले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मेट्रोची तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उद्घाटनाचाही बार उडवला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी ५ ऑक्टोबर २०१८ रोजी विभागीय आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत नाशिकमध्ये मेट्रो चालविण्याची घोषणा केली होती. महामेट्रोच्या वतीने टायरबेस मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम राईट्स कंपनीला दिले आहे. महामेट्रोच्या या प्रकल्पाला अंतिम स्वरुप मिळण्यापूर्वी तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. जवळपास ३१ किलोमीटर लांबीचे तीन मार्ग असणार आहेत. या मार्गावर २५ मीटर लांबीची २५० प्रवाशी क्षमता असलेली बस धावणार आहे. पहिला मार्ग हा २२ किलोमीटरचा गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिकरोड असा असणार आहे. दहा किलोमीटरचा गंगापूर, जलालपूर, नवश्या गणपती, थत्तेनगर, मुंबई नाका असा दुसरा मार्ग असणार आहे. तिसरा मार्ग मुंबई नाका ते सातपूर कॉलनी व्हाया गरवारे असा राहील. सीबीएस हे सामाईक स्टेशन असून, या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्टेशन असतील. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच या मेट्रोचे मेट्रो निओ असे नामकरण केले आहे.

राईट्स कंपनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या प्रकल्पाच्या तांत्रिक मान्यतेची तयारी आता सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुका असल्याने निविदा प्रक्रियेला फाटा देऊन पुण्याच्या धर्तीवर प्रथम उद्घाटन आणि नंतर निविदा प्रक्रिया काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी येत्या सोमवारी महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी या मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण मे. महामेट्रो रेल कार्पोरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. शहरातील विविक्ष क्षेत्रातील मान्यवर आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वप्रथम हॉटेल ताजमध्ये दुपारी एक वाजता या मेट्रोसेवेचे सादरीकरण केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता पालिकेतील पदाधिकाऱ्यांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे.

....

ऑगस्टमध्ये उद्घाटन?

मेट्रो प्रकल्पाचा लाभ विधानसभा निवडणुकीत उचलण्यासाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांत नाशिकच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार पालिकेतील सत्ता दिली असली, तरी सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांवर पश्चातापाची वेळ आणली आहे. त्यामुळे नाशिककरांचा राग कमी करण्यासाठी मेट्रोची प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी सुरू झाली आहे. दत्तक नाशिकला निवडणुकीपूर्वी भेट देऊन विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होईल यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साठेंच्या साहित्यात सर्वसामान्यांना स्थान’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अण्णा भाऊ साठे हे साहित्य सम्राट होते. शिक्षकांनी रागावल्याने त्यांनी शाळा सोडली; मात्र शाळेचा नाद सोडला नाही. समज आल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि महान साहित्यिक जन्माला आला. १९६२-६३ साली आलेला फकिरा हा सिनेमा सामान्यावर होऊ शकतो आणि आपल्या आयुष्यावर सिनेमा होऊ शकतो, याचे मला कौतुक वाटते. सिनेमाची कादंबरी अण्णा भाऊ यांची होती, असे प्रतिपादन करुणासागर पगारे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या (सावाना) वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पगारे व कवी काशिनाथ वेलदोडे यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी विविध वक्त्यांनी अण्णा भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. माजी जिल्हाधिकारी बी. जी .वाघ यांनी सांगितले, की अण्णा भाऊ यांचे साहित्य जागतिक दर्जाचे आहे. त्यांनी रंगवलेली पात्र कधीही दीन वा दुबळी नव्हती, स्त्री पात्रही बलदंड होते. अॅड. अशोक बनसोडे यांनी सांगितले, की त्यांनी मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांनी पोवाडा, लावणी, अक्कड अशा सर्व प्रकारच्या साहित्याचे लिखाण केले.

सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी सांगितले, की माझी आणि अण्णांची ओळख त्यांच्या झोपडीत झाली. त्यांचे शाहिरांवर अतोनात प्रेम होते. वाटेगाव ते मुंबई असा प्रवास त्यांनी पायी केला. 'सावना'ने हा कार्यक्रम आयोजित केल्याने खऱ्या अर्थाने अण्णांची पुण्यतिथी साजरी झाली. सावानाने स्थानिक कलाकारांना घेऊन अण्णा भाऊंच्या स्मृती प्रित्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रम करावा, असे आवाहन विश्वास भोसले यांनी केले. 'सावाना'चे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अण्णा भाऊंची 'जग बदल घालूनी घाव'ही कविता काशिनाथ वेलदोडे यांनी सादर केली.

सहाय्यक सचिव अॅड. अभिजित बगदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सावानाचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे हस्ते पगारे यांचा सत्कार झाला. देवदत्त जोशी यांनी इतर मान्यवरांचे सत्कार केले. याप्रसंगी बाळासाहेब भवर, अण्णासाहेब भोसले, कवी नवनाथ काळे, के. के. मोरे, ए. टी. जगताप, प्रकाश शिरसाट, अॅड. अशोक बनसोडे, शंकरराव बर्वे, संजय करंजकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची सर्वदूर हजेरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आठवडाभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने शुक्रवारी (दि. १९) सायंकाळनंतर सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने बॅटिंग केली. बागलाण तालुक्यात काही तासांत १०० मिलीमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला.

जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढविणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसारख्या तालुक्यांमध्येही पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे पाऊस गायब झाला की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली. परंतु, शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. रात्रभर अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम आणि जोरदार सरी बरसल्या. जिल्हाभरात ४३६.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एकट्या बागलाण तालुक्यात १०० मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आतापर्यंत बऱ्यापैकी कमी पाऊस झालेल्या देवळा तालुक्यातदेखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत. तालुक्यात एका दिवसात ४६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिन्नरमध्येही ५७ मिलीमीटर पाऊस पडला असून, चांदवडमध्ये ४१ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात २४ तासांत झालेल्या एकूण पावसाचा विचार करता प्रत्येक तालुक्यात सरासरी २९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

..

नाशिकमध्ये ३३ मिलीमीटर पाऊस

नाशिक शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे सकाळी साडेआठपर्यंत ३३.२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. शनिवारी दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या.

-

शनिवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

नाशिक ३३.२

इगतपुरी २१.०

दिंडोरी १४.०

पेठ ५.५

त्र्यंबकेश्वर १८.०

मालेगाव २८.०

नांदगाव ४.०

चांदवड ४१.०

कळवण २२.०

बागलाण १००

सुरगाणा १०.२

देवळा ४६.२

निफाड ३६.४

सिन्नर ५७.०

येवला ०.२

एकूण ४३६.७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोंसला’च्या राठोडलानेमबाजी स्पर्धेत रौप्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोंसला मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी धनवीर हिरेन राठोड या विद्यार्थ्याने शूटिंग खेळात राज्यस्तरावर रौप्यपदक मिळविले आहे. ही स्पर्धा अहमदाबाद रायफल क्लबमध्ये (गुजरात) नुकतीच झाली. यामध्ये त्याने २९६ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले. पुढील (वेस्ट झोन) प्री नॅशनलसाठी तो पात्र ठरला असून, ही स्पर्धा मध्य प्रदेशातील इंदूर येथे १७ ते २८ ऑगस्टदरम्यान होणार आहे. विद्यालयाचे अध्यक्ष अनिरुद्ध तेलंग, कमांडंट विंग कमांडर (नि.) जयेश पै, प्राचार्य एम. एन. लोहकरे यांनी धनवीरचा गौरव केला. सुभेदार सुभाष महाकाळ व प्रवीण दलोड या प्रशिक्षकांचे धनवीरला मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदा स्पिरीट साठा जप्त

$
0
0

भरारी पथकाची धुळ्याजवळ कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे. शिरपूर (धुळे) तालुक्यातील अमोदे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल तीन लाखाचे स्पिरीट जप्त करण्यात आले. विभागीय भरारी पथकाने ही कार्यवाही केली.

शिरपूर तालुक्यातील अमोदे शिवारात बनावट मद्यनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात स्पिरीटचा बेकायदा साठा करून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाला मिळाली. त्यानुसार, आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा, संचालक उषा वर्मा आणि विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे विभागीय भरारी पथकाने शुक्रवारी (दि.१९) शिरपूर नाक्याजवळील अमोदे शिवारातील संगिता रेसिडन्सी पार्क मागे छापा टाकला. तेथे २०० लिटर क्षमतेचे २८ प्लास्टिक बॅरल स्पिरीटने भरलेले तसेच ४२ बॅरल रिकामे आढळून आला. पथकाने दोन लाख ७३ हजार रुपये किमतीचा बनावट मद्यनिर्मितीच्या उद्देशाने ठेवलेला साठा जप्त केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, ए. व्ही. सुत्रावे, एम. पी. पवार, जवान दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, एस. एल. गायकवाड, एम. यू. अहिरे, शांतीलाल देवरे, वाहनचालक जी. डी. शिंदे आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानासाठी धावणार नाशिककर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक अवयवदानाचे महत्त्व समाजात वाढू लागले असून, या मोहिमेची अधिक जनजागृती व्हावी. या हेतूने स्वराज फाउंडेशनतर्फे आज (२१ जुलै) 'रन फॉर ऑर्गन' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून अवयव दान करण्याचा जागर केला जाणार आहे. सकाळी ६.३० वाजता लवाटेनगर येथील ठक्कर डोमपासून 'रन फॉर ऑर्गन'ला प्रारंभ होणार आहे. तीन किलोमीटरच्या या रनमध्ये अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आंचल मुदृगल, मॅरेथॉन रनर मोनिका

आथरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शहरात अवयव दानाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असून, या कार्यात सर्वांनी सहभाग घेणे गरजेचे असल्याचा हेतू या रनच्या आयोजनामागे आहे, असे यावेळी उपक्रमाच्या संयोजिका योगिता खांडेकर आणि फाउंडेशनचे संस्थापक अॅड. आकाश छाजेड यांनी सांगितले. या रनमध्ये सहभागी होत नाशिककरांनी अवयवदानाच्या मोहिमेचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांनी

केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बसेसवर पोलिसांची कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक दृष्टिकोनातून नियमांचे पालन होते की नाही, याबाबतची तपासणी मोहीम ग्रामीण पोलिस दलाने राबविली. त्यात दोषी आढळलेल्या ४९ वाहनांवर कारवाई केली. याचवेळी पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने स्कूल बस चालकांचे नियम, सुरक्षितता, चारित्र्य पडताळणी याबाबत प्रबोधन देखील केले.

पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने गंगापूर, चांदशी, गिरणारे, त्र्यंबकेश्वर रोड, ओझर चांदवड मार्गावर स्कूल बसची पाहणी केली. पोलिसांनी १७ ते २० जुलै या काळात केलेल्या पाहणीत १५१ बसची तपासणी केली. त्यापैकी १० स्कूल बसचालकांनी वाहतूक नियमांचा भंग केल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर संयुक्त पथकाने ४९ वाहनांवर कारवाई केली. त्यातील काही चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावून दंड भरावा लागणार आहे. तसेच वाहनचालकांकडून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यावेळी पोलिसांनी स्कूल बसमध्ये चालकासह परिचारक आहे की नाही याची तपासणी केली. चालक आणि परिचारकाची चारित्र्य पडताळणी करून घेण्याचेही आवाहन पोलिसांनी केले. वाहतूक नियम, विद्यार्थी सुरक्षीतता याबाबत प्रबोधन करण्यात आले. आगामी दिवसांतही वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन पथकामार्फत स्कूल बसेसची नियमीत तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनाही विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणात भारतीय मूल्यांची निकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारताची समाजव्यवस्था, परंपरा आणि संस्कृती यावर भर देण्यात आलेला आहे. कारण, शिक्षण प्रवाहात भारतीय मूल्ये असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अमरकंटक येथील इंदिरा गांधी जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू तथा राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा समितीचे सदस्य डॉ. टी. व्ही. कट्टीमनी यांनी केले. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर ते बोलत होते.

भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे या जनसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, प्रांताचे अध्यक्ष महेश दाबक, प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. अश्विनकुमार भारद्वाज व्यासपीठावर होते. यावेळी कुलगुरू तथा राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा समितीचे सदस्य डॉ. कट्टीमनी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची माहिती उपस्थितांना दिली. शालेय, तसेच उच्च शिक्षणात अनेक बदल या राष्ट्रीय धोरणात प्रस्तावित आहेत. या मसुद्याबद्दल विस्तृत चर्चा या कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

सर्व भाषांत शिक्षणाची तरदूत

डॉ. कट्टीमनी म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीयता, भारतीय जीवन, भारतीय संस्कृती यावर आधारित शिक्षणप्रणाली राहणार आहे. भारतीय परंपरेतील बाबी पाठ्यपुस्तकांत आल्या नसल्याने भारतीय परंपरेचे ज्ञान विद्यार्थ्यांना झालेले नाही. शिवाय विद्यार्थिकेंद्रित शिक्षणपद्धतीची अंमलबजावणीही झालेली नाही. त्यामुळे भारतीय मूल्यांवर भर देण्यात आलेला आहे. सर्व भाषांत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, अशी तरतूद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. विद्यार्थिकेंद्रित शिक्षणपद्धतीवर भर देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी धोरण मसुदा समितीमध्ये प्रत्येक प्रातांचे, समुदायाचे आणि देशातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधीत्व घेण्यात आले, जेणेकरून या धोरणासंदर्भात प्रत्येकाची मतमतांतरे जाणून घेता येतील.

--

नामकरण व्हावे गुरूकुल पद्धतीने

देशात शहरासह ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पाश्चिमात्य स्वरुपाचे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जात नाही. इंटरनॅशनल किंवा पाश्चात्य विद्यापीठांच्या नावाप्रमाणे शाळा-महाविद्यालयांची नावे ठेवण्यापेक्षा गुरूकुल पद्धतीला साजेसे नामकरण केव्हाही योग्य ठरते. मात्र, शिक्षणाला पाश्चिमात्य स्वरूप का आले, यावर विचारमंथन होणे गरजेचे असून, याचे उत्तरही तुमच्याकडेच आहे, असही डॉ. कट्टीमनी म्हणाले.

--

नीती आयोगाने 'स्ट्रॅटेजी फॉर न्यू मीडिया ७५' असा शिक्षणाचा मसुदा तयार केला आहे. यामध्ये शिक्षणव्यवस्थेचे पाच टप्पे करण्यात आले आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण, असे हे टप्पे आहेत. या सर्व शिक्षणात अंतर्गत संलग्नता, जागतिकीकरण, माहिती तंत्र, शाश्वत विकास आणि जाणिव, जागतिक दर्जा, व्यापार, जागतिक दर्जा, सर्व्हिस टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग, मॅथ्स यांचा समावेश केला आहे.

-डॉ. हरीश आडके, माजी प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांना दिलासा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना शहरात २००३ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार लाभ दिला जात असल्याने हजारोंच्या संख्येने लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिरात लाभार्थींशी बोलताना मांढरे यांनी हे आदेश दिले. आमदार फरांदे यांच्या प्रयत्नांतून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ करून देण्यासाठी रोटरी क्लब हॉल, गंजमाळ येथे समाधान शिबिर सुरू असून, जिल्हाधिकारी मांढरे यांनी या शिबिराला भेट दिली. यावेळी फरांदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींबाबत फरांदे यांनी अद्याप २००३ च्या दारिद्र्यरेषेप्रमाणे लाभार्थींना लाभ दिले जात असल्याचे मांढरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर मांढरे यांनी याबाबत शहरातील सर्व लाभार्थींना २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे लाभ दिला जाईल, असे सांगताना आजच याबाबतचे आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भातील यादीही त्यांनी तातडीने मागवून कामाच्या सूचना दिल्या. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शहरातील हजारो लाभार्थींना त्याचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images