Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हाभरात मतदान केंद्रांवर आजपासून विशेष मोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज, शनिवारी (दि. २०) आणि रविवारी (दि. २१) रोजी मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण राज्यात मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदारयाद्या दोषविरहित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेचाच भाग म्हणून मोहिमेंतर्गत शनिवारी आणि रविवारी जिल्हाभरातील सर्व मतदान केंद्रांसह मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करावे, असे आदेश उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले आहेत. या मोहिमेदरम्यान मतदान केंद्रांवर नवमतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे वगळणे, मतदारयादी व मतदार ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती करणे यांसारखी कामे केली जाणार आहेत. याकरिता आवश्यक फॉर्म क्रमांक सहा, सात, आठ आणि आठ-अ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

--

विभागीय आयुक्त करणार तपासणी

मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आनंदकर यांनी सर्व 'बीएलओं'ना दिले आहेत. विशेष म्हणजे ही मोहीम व्यवस्थित आणि गांभीर्याने राबविली जातेय का, याची तपासणी विभागीय आयुक्त आणि मतदारयादी निरीक्षक राजाराम माने करणार आहेत. त्यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना आनंदकर यांनी केल्या आहेत. या मोहिमेंतर्गत मृत, दुबार मतदारांची नावे वगळणे, तसेच १ जानेवारी २०१९ या दिनांकावर आधारित सर्व पात्र मतदारांची नोंद मतदारयादीमध्ये करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन हजार रुपयांचा कांद्याला द्या हमीभाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव मिळावा, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली. त्यांनी आपले भाषण मराठीत करून शेतीच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी अधिकाधिक प्रोसेसिंग युनिट मिळावेत, कोल्ड स्टोरेज मिळावेत, रेल्वेची वॅगन व कार्गो सेवेमध्ये वाढ करण्याची मागणी केली. खासदार डॉ. पवार यांनी नियोजित ड्रायपोर्टच्या गरजेचे महत्त्व सांगत निफाड येथे त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली. या सर्व कामांमुळे शेतकऱ्यांचा नक्कीच आर्थिक विकास होईल. भारत कृषिप्रधान देश आहे, शेतकरी कृषी व्यवस्थेचा आत्मा आहे. ग्रामीण भागाचा व कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांचा बेसिक डेटा गोळा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दिंडोरी मतदारसंघात प्रामुख्याने कांदा, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो किंवा मका अशी पिके घेतली जात त्यांची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदित्य संवादा’तून शक्तीप्रदर्शनाची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासह विधानसभेची मतपेरणी करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली जनआशीर्वाद यात्रा नाशिकमध्ये शनिवारी (दि. २०) येणार आहेत. या दरम्यान 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरे हे सकाळी त्र्यंबकेश्वरमध्ये येणार असून त्र्यंबक राजाच्या दर्शनानंतर ते नाशिककडे प्रयाण करणार आहेत. यावेळी नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सिडकोत खुटवडनगर येथे त्यांचा 'आदित्य संवाद' कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिकरोड येथील गिताई लॉन्स येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर सिन्नर येथेही आदित्य हे शिवसैनिकांशी संवाद साधतील. जिथे-जिथे पोहोचेल तेथील शिवसेना नेते, आमदार, पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी होतील. जन आशीर्वाद यात्रा सोमवारी (दि. २२) नगर जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे तयारी करत आहेत. यात्रा यशस्वी करण्यासाठी शक्तीप्रदर्शनाची तयारी शिवसेनेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन येमेन

$
0
0

his is a High Security Mission" असे मला या २०१६ च्या येमेन मिशनविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. या अगोदर भारतीय म्हणून मला येमेनविषयी भारताच्या सरकारने २०१५ मध्ये "ऑपरेशन राहत" या नावाने जनरल व्ही. के. सिंग यांनी विलक्षण यशस्वी मोहीम राबवल्याचे माहिती होते. येमेनमधील भयानक यादवी युद्धात अडकून बसलेल्या हजारो भारतीय आणि शेकडो परदेशी नागरिकांना सोडवून आणले होते. परंतु, अजूनही तिथे बंडखोरी होती आणि अगोदरचे सरकार यांच्यात सशस्त्र यादवी संघर्ष चालूच होता. त्यात राजधानी सानावर हौतींनी ताबा घेतला होता. पूर्वीच्या सरकारमधील नेते मोठे बंदर असलेल्या एडेनमध्ये व त्यानंतर सौदी अरेबियात आश्रयास गेले होते. सशक्त सरकार नसल्याने अल कायदा आणि ईसीससारखे ग्रुप सक्रीय झाले होते. या यादवी युद्धात अगोदरच गरीब असलेल्या देशात लाखो लोक, महिला, मुले अगदी हताश आणि अकल्पनीय अवस्थेत होते. त्यात सौदी अरेबियाने आणखी काही देशांना (सौदी-अलायन्स) बरोबर घेऊन येमेनवर अनेक हवाई हल्ले चालू केले. एमएसएफचे हॉस्पिटल कॉ-ऑर्डिनेटस् सौदीला देऊनसुद्धा त्यावरही एअर स्ट्राइक केल्याने काही ठिकाणी एमएसएफने हॉस्पिटल्स बंदही केले. अशा धगधगत्या परिस्थितीत अडकलेल्या आणि वैद्यकीय सेवांपासून पूर्णपणे वंचित असलेल्या नागरिकांसाठी एमएसएफची वैद्यकीय सेवा काही ठिकाणी चालू होती. स्फोटक जखमांसाठी तिथे अस्थिरोगतज्ज्ञांची खूप गरज निर्माण झाली होती. माझी जायची इच्छा व्यक्त केल्यावर माझी पत्नी आणि कुटुंबियांनी मोठ्या धीराने मला परवानगी दिल्यानेच मी असे मिशन करू शकतो. हातून चांगले घडते तेव्हा, मानवतेच्या मूल्यांवर माझ्यासारखाच ठाम विश्वास असणारे माझे कुटुंबीयही माझ्या कार्यात असे सहभागी असतातच. येमेनमध्ये कोणीही असे जाऊ/प्रवेश करू शकत नाही, सौदी अरेबियाच्या सततच्या बॉम्बिंगमुळे, कोणतीही व्यावसायिक विमान कंपनी, राजधानी सानाला जात नाही. माझ्या व्हिसाची व्यवस्था होती. बंडखोरांच्या सरकारकडून झाली. प्रथम मी एमएसएफच्या जिनिव्हामधील कार्यालयात ब्रिफिंगसाठी गेलो. तेथून मला जिबोटी या आफ्रिकेच्या अगदी उत्तरेच्या टोकाला असलेल्या देशात एमएसएफने नेले. तेथे एक एमएसएफचे ८ सिटर छोटे विमान होते. एमएसएफने सौदी अरेबियाकडून चार तासाचा विंडो पिरिएड परवानगी घेतली होती. त्याचवेळेत, विशिष्ट उंचीवरून विमान नेणे आणि मी व माझे सहकारी (इटलीतील अॅनेस्थेटिस्ट धरून आणि काही जण), यांना साना विमानतळावर सोडून, परत जिबोटीला येणे गरजेचे होते. त्या छोट्या विमानात प्रत्येकी १५ किलो सामान नेण्यास परवानगी होती आणि त्याच्यात प्रत्येक प्रवाशाचे पण वेगळे वजन करून विमानातील लोडाचे गणित केले होते. एमएसएफच्या त्या छोट्याशा विमानात दोन वैमानिक सर्व मदत करत होते. जिबोटीहून या विमानाने उड्डाण केले. एवढ्या छोट्या विमानाचा सारखा धडधड आवाज येत होता. एडनची सामुद्रधुनी आणि रेड-सी ओलांडून येमेनच्या एअर-फील्डमध्ये आल्यावर वैमानिक जास्त काळजीने सौदीशी संपर्क साधून होते. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर येमेनची राजधानी सानाच्या विमानतळावर उतरले. उतरताना विमानाच्या खिडकीमधून उध्वस्त झालेल्या विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अवशेष बाजूला दिसत होते. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे त्या दिवसाचे ते एकमेव विमान होते. अर्धवट उध्वस्त झालेल्या त्या विमानतळाच्या इमारतीत इमायग्रेशन झाल्यावर आम्हाला घ्यायला आलेला येमेनी सारखाचा लायेसन ऑफिसर भेटला. त्याच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात त्याच्या गरजू देशबांधवांना मदत करायला आलेल्या आमच्याविषयी विलक्षण कृतज्ञता दिसत होती. सानामधील त्याही रात्री तीन वेळा प्रचंड मोठे आवाज झाले. मिशनप्रमुखाला विचारले तर तो म्हणाला, सौदीचे असे एअर-स्ट्राइक रोज होतात, पण आपण डिप्लोमेटिक एरियामध्ये असल्याने या को-ऑर्डिनेट्सवर ते बॉम्ब टाकत नाही. या दिलाशावर, मी पुढच्या प्रवासासाठी सकाळची वाट बघू लागलो. धोकादायक परिस्थितीत चांगले काम करताना आम्ही एकमेकांना शुभेच्छा द्यायचो. "Take Care, Give Care". जगण्यासाठीचा काय छान मंत्र आहे हा! (क्रमश:) (लेखक डॉक्टर विदाऊट बॉर्डर्स संघटनेचे स्वयंसेवक सर्जन आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बत्ती गुलचा ‘शॉक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील प्रशासनाच्या नियंत्रणहीन कारभाराचा फटका महासभेत नगरसेवकांना शुक्रवारी बसला असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच वीजपुरवठा खंडित झाल्याने तब्बल दोन वेळा महासभा तहकुबीची नामुष्की महापौरांवर ओढावली.

महासभा सुरू होताच वीज गायब झाली असतानाच महापालिकेच्या पॅनलमध्ये, तसेच जनरेटरमध्येही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पंख्याअभावी सभागहातील नगरसेवक उकाड्याने हैराण झाले होते. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत सभागृहात विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक वनमाळींवर कारवाई करण्याची मागणी केली. वनमाळी यांनी सभागृहात हजर होत दिलगिरी व्यक्त केली, पाठोपाठ खंडित वीजपुरवठादेखील तब्बल दीड तासानंतर पूर्ववत झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा शुक्रवारी बोलावण्यात आली होती. विकासकामांसह सदस्यांच्या प्रस्तावांवर चर्चा होताच महावितरणाचा वीजपुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत महापालिकेच्या स्वयंचलित यंत्रणेद्वारे जनरेटर सुरू होऊन वीजपुरवठा पूर्ववत होतो. परंतु, जनरेटरही सुरू न झाल्याने पंखे बंद पडून सभागृहात उकाडा जाणवायला लागल्याने नगरसेवक त्रस्त झाले. वीजपुरवठा लगेच सुरू न झाल्यामुळे नगरसेवकांनी विषयपत्रिकांचा कृत्रिम पंखा तयार करून हवा घेण्यास सुरुवात केली.

महासभेचे कामकाज सुरू होऊन दहा मिनिटे उलटली, तरी सभागृहातील वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनास जाब विचारला. मात्र, विद्युत अभियंता वनमाळी हेच नसल्याने खंडित पुरवठ्याचे कारण समोर येत नसल्यामुळे नगरसेवक अधिकच संतप्त झाले. प्रशासनाची कार्यपद्धती नगरसेवक आणि सार्वभौम सभागृहाची अवमान करणारी असल्याने जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत महासभेचे कामकाज चालू न देण्याचा पवित्रा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मनसेचे सलीम शेख, अशोक मुर्तडक, मुशीर सय्यद, गुरुमित बग्गा आदी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी घेतला. सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनीही त्यास 'मम' म्हटल्याने महापौरांवर सुरुवातीला १५ मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.

महासभा दुसऱ्यांदा सुरू झाल्यानंतरही वीजपुरवठा मात्र खंडितच राहिल्याने महापौर भानसी यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे यांना खुलासा करण्यास सांगितले. जनरेटरमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही गैरसोय झाल्याचे स्पष्टीकरण नलावडे यांनी दिले. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच सभागृहाचा महत्त्वपूर्ण वेळा वाया जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला गेला. यावेळी विद्युत अभियंता वनमाळी धावतच सभागृहात दाखल झाले. झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी संपूर्ण सभागृहाची दिलगिरीही व्यक्त करीत दुरुस्तीसाठी आणखी अर्ध्या तासाची वेळ देण्याची विनंती केली. त्यामुळे महासभा आणखी तासभर तहकूब करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला. त्यानंतर मात्र वीजपुरवठा सुरळीत झाल्याने महासभेचे कामकाज पुढे सुरू होऊ शकले. मात्र, बत्ती गुलमुळे सभागृहात जवळपास दीड तास 'चला, हवा येऊ द्या'चा शो सुरू होता.

--

खासगी जनरेटर दिमतीला

महापालिकेच्या जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यासोबतच वीजपुरवठा करणाऱ्या पॅनलमध्येही बिघाड झाला. पॅनल दुरुस्त झाले, तरी जनरेटर सुरू होत नसल्याने अखेरीस नगरसेवकांचा संताप अधिक तीव्र होऊ नये यासाठी खासगी जनरेटरची व्यवस्था महापालिका प्रशासनाला करावी लागली. खासगी जनरेटर तैनात केल्यानंतर मात्र लगेचच वीजपुरवठा सुरू झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. परंतु, महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी महासभा सुरू होण्यापूर्वी जनरेटरची चाचणी घेतली असती, तर कदाचित ही फजिती टळू शकली असती. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

०००००००००००

फोटो ओळ...

'चला, हवा येऊ द्या'

--

महासभा सुरू होताच बत्ती गुल झाल्याने सभागृहात शुक्रवारी जवळपास दीड तास 'चला, हवा येऊ द्या'चा शो रंगला. नगरसेवक आणि पदाधिकारी विषयपत्रिका, फायलींचा पंखा बनवून हवा घेत असल्याचे चित्र दिसून आले. नगरसेवक संतप्त झाल्याने महापौरांना दोनदा महासभा तहकूब करावी लागली. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांची वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धावपळ उडाली होती. त्यांच्याकडून खासगी जनरेटर व्हॅनही पाचारण करण्यात आली होती.

पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीवरून प्रशासनाची कोंडी

$
0
0

- नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप

- नियोजन शून्य कारभाराचे काढले वाभाडे

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील जनतेला पाणीकपातीच्या माध्यमातून वेठीस धरले जात असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाची कोंडी केली. पाणीकपातीत भेदभाव केला जात असून, अधिकारी फिल्डवर जाऊन काम करीत नाहीत, असा हल्लाबोलही नगरसेवकांनी केला. मूठभर लोक पाण्याचा दुरूपयोग करीत असल्याने संपूर्ण शहरावर त्याचा परिणाम होतो असे सांगत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाण्याची नासाडी, तसेच पाणी चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन कायमस्वरुपी त्यांचे पाणी बंद करण्याचा इशारा दिला. तसेच, पाण्याची गळती थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेतही दिले.

महासभेत शहरातील पाणीकपातीवर दीर्घ चर्चा झाली. यावेळी गुरुमीत बग्गा यांनी शहरातील अन्यायी पाणीकपातीला वाचा फोडत प्रशासनाने पाच टक्के पाणी वाचवण्यासाठी शहराला वेठीस धरल्याचा आरोप केला. पाणीकपात करताना भेदभाव केला जात असल्याचे सांगत पाणीकपातीने किती पाणी वाचले, असा सवालही केला. केवळ ३० ते ४० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यासाठी शहराला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पाणीकपात केली नसताना, केवळ गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचे पाणी तोडल्याचा आरोप करीत हिशेबबाह्य पाणी वाचवण्यासाठी काय उपाययोजना केल्यात याचा जाब विचारला. अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे यांनी यावेळी पाणीगळती मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगत, उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला.

स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गुरुमीत बग्गा, शाहू खैरे, सुदाम डेमसे, श्‍याम बडोदे, डॉ. हेमलता पाटील आदींनी प्रशासनावर नियोजन फसल्याचा आरोप केला. सार्वजनिक विहिरी अधिग्रहीत कराव्या, नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ करावे, अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाऊन परिस्थिती बघावी, न्यूनतम पातळीच्या वर पाण्याचे आरक्षण मागावे अशा सूचना यावेळी नगरसेवकांनी केल्या. आयुक्त गमे यांनी पाणीपुरवठ्याबाबत स्पष्टीकरण देताना, शहर डेंजर झोनमध्ये असल्याचे दाखले दिले. ते म्हणाले, की केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर मृत पाणीसाठा जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी खडक फोडण्याचे काम हाती घेतले जाईल. इगतपुरी-त्र्यंबक भागात पावसाने ओढ दिल्याने गंगापूर धरण समूहात पाणी नाही. दररोज १५ सेंटीमीटरने पाण्याची पातळी खालावत आहे. गंगापूर धरणात १५ टक्के पाणी असले तरी, त्या पाण्यावर इतर आरक्षण अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आयुक्तांनी पाण्याचे गांभीर्य स्पष्ट केले.

...

पाणीपुरवठ्याचा आढावा घ्या : महापौर

पाणीकपातीवरून संतप्त झालेल्या नगसेवकांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर महापौर भानसी यांनी प्रशासनाला कठोर सूचना करीत आयुक्तांनीच पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा, असे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त नलावडे यांनी अभियंता आणि व्हॉल्व्हमन यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जात असला तरी, पूर्ण दाबाने करण्यात यावा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

...

नगरसेवक उवाच

- पाच टक्के पाणीकपातीसाठी शहराला वेठीस धरणे चुकीचे : गुरुमीत बग्गा

- पाण्याची नासाडी व चोरी कुठे होते, याचा आढावा घ्या : सुधाकर बडगुजर

- अधिकारी, कर्मचारी फोन बंद ठेवतात, एकवेळ पूर्ण दाबाने पाणी द्या : शाहू खैरे

- अधिकारी कार्यालयात बसून पाण्याचे नियोजन करतात : दिनकर आढाव

- पाणी गळती रोखण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या : अजय बोरस्ते

- नियोजन शून्यतेमुळे शहरात पाणी वाया जाते : सलिम शेख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयच्या गुणवंतांवर कौतुकाचा वर्षाव

$
0
0

धुळे संस्थेचा विशेष गौरव; निदेशकांचाही सत्कार

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नाशिक विभागीय स्तरावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सातपूर एमआयडीसीतील निमा हाऊस येथे शुक्रवारी झाला. याप्रसंगी महाराष्ट्रातून उत्कृष्ट काम करत तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या धुळे आयटीआयचा विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास 'एचएएल'चे अतिरक्त महाव्यवस्थापक एस. पी. सिंग, महाराष्ट्र चेंबरर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ऋषभ इंडस्ट्रीजचे संचालक नरेंद्र गोलीया, आयटीआयचे सहाय्यक सहसंचालक आर. एस. मानकर, सहसंचालक सतीश सूर्यवंशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून गुणगौरव समारंभास उपस्थित होते. धुळे आयटीआयचे प्राचार्य एम. के. पाटील यांनी युवा कौशल्य दिनी म्हणजे १५ जुलै रोजी मुंबईत झालेल्या मुख्य सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला होता.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल व हॉर्ड स्किल विकसित करावे. वेळेचे महत्त्व व नवीन टेक्नॉलॉजी याचा उपयोग करून आपला विकास साधावा, असे आवाहन प्रमुख पाहुणे ऋषभ इंडस्ट्रीजचे संचालक गोलिया यांनी यावेळी केले. आयटीआयमध्ये देखील नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्याने त्याचा विद्यार्थ्यांना योग्य फायदा होत असल्याचेही ते म्हणाले. सद्यास्थितीत 'एचएएल'मध्ये पाचशे आयटीआयचे विद्यार्थी शिकाऊ उमेदवार म्हणून उत्कृष्ट काम करीत असल्याची माहिती एचएएलचे महाव्यवस्थाक सिंग यांनी दिली. आदिवासी असलेल्या कळवण आयटीआयच्या विद्यार्थ्यांना एचएएलकडून विशेष ट्रेनिंग दिली जात असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र चेंबरर्सचे अध्यक्ष मंडलेच्या यांनी सांगितले, की मागील पाच वर्षांपासून आयटीआयमध्ये अनेक आधुनिक यंत्रणा आले असल्याने त्याचे स्वागत केले. इंडस्ट्रीला कुशल कामगार आयटीआयकडून मिळत आहे. प्रशिक्षणार्थींनी आपल्या कला गुणासोबतच वेळेचे महत्त्व व नियोजन यावर भर द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले. एस. एम. लाडसावंगीकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील, उदय आहिरराव व शीलरत्न बर्डे यांनी केले.

कौशल्याचा उपयोग स्वयंरोजगारासाठी

सहसंचालक सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करतांना कुशल भारत देश घडविण्यासाठी आजच्या युवा पिढीने तयार असावे. संधीचे सोने करावे, असे आवाहन केले. आजच्या जगात सर्वाधिक तरुण शिक्षित भारतात आहेत. देशाची तरुण शक्ती विदायक व कुशल बनविण्यासाठी निदेशक व आयटीआयची सर्व टीम सदैव तयार असते. विद्यार्थ्यांनी आपल्या स्किलचा योग्य उपयोग स्वयंरोजगारासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

या निदेशकांचा सन्मान

गुणगौरव समारंभात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हातील आयटीआयतील उत्कृष्ट कार्य करणारे प्रशिक्षणार्थी, संस्था, प्राचार्य, गटनिदेशक, निदेशक यांचा प्रशस्ती पत्रक व मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गटनिदेशक प्रशांत बडगुजर यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच राजेंद्र महाजन, शिवाजी हांडे, एस. बी. परदेशी, भाग्यश्री नानकर, जयराम ससाणे, कैलास चौधरी, किशोर शिरसाठ, प्रवीण ठाकरे, धनंजय वाघमारे आदींना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी दरमहा करभार

$
0
0

घरपट्टीत सरासरी ५०० ते हजार रुपयांची होणार वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरी भागामध्ये घनकचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रातील घरे व खासगी आस्थापनांमधून कचरा संकलन करण्यासाठी उपयोगकर्ता शुल्क (यूजर्स चार्जेस) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती कचऱ्यासाठी प्रतिमाह ६० तर, व्यावसायिक प्रतिष्ठांनासाठी प्रतिमाह १६० ते २ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरपट्टीत किमान पाचशे ते हजार रुपयांची सरासरी वाढ होणार आहे.

शासननिर्णयानुसार प्रत्येकी शंभर किलोग्रॅम घनकचरा संकलनाचे दर निश्‍चित झाल्याने नागरिकांना महापालिकेकडून प्राप्त होणाऱ्या घरपट्टीमध्ये वाढ होणार आहे. घंटागाडी ठेकेदारांवर १७६ कोटी रुपयांची उधळण करूनही त्यांच्या अनियमिततेच्या प्रश्नांत गुरफटलेल्या नाशिककरांकडून महापालिका केरकचरा संकलनासाठी यूजर्स चार्जेस अर्थात उपयोगकर्ता शुल्क आकारणार आहे. घरगुती कचऱ्यासाठी ६० रुपये तर व्यावसायिक आस्थापनांच्या कचऱ्यासाठी दोन हजार रुपयांपर्यंत प्रतिमाह शुल्क आकारले जाणार आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी व सूचनांसाठी प्रभागनिहाय केंद्र, गरजेनुसार कचरा पेट्या, सार्वजनिक शौचालये, स्वच्छता गृहे, तसेच कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रक्रिया केंद्र उपलब्ध करून देण्याचेही महापालिकांवर बंधन घालण्यात आले आहे.

कचरा संकलनासाठीही वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती कचरा संकलनाचे काम सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत केले जाणे अपेक्षित आहे तर व्यावसायिक आस्थापनांकडील कचरा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत उचलला जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन सेवा दिल्यापोटी नागरिक व व्यावसायिक आस्थापनांकडून उपयोगकर्ता शुल्क देखील वसुल करण्याचे अधिकार या उपविधीने महापालिकांना दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या महासभेवर सदर प्रस्ताव माहितीसाठी सादर करण्यात आला असून या प्रस्तावावर महासभा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

असा असणार कराचा भार

कचऱ्याचा प्रकार प्रतिमाह दर

घरगुती कचरा ६०

दुकाने दवाखाने आदी ९०

विविध वस्तू उपकरणांचे शोरूम १६०

गोदामे १६०

उपहारगृहे व हॉटेल्स १६०

धार्मिक संस्था १२०

शासकीय/निमशासकीय कार्यालये १२०

मंगल कार्यालये, एकपडदा चित्रपटगृहे २०००

मॉल्स, मल्टीप्लेक्स २०००

फेरीवाले १८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वनहक्कधारकांची माहिती आधार लिंक

$
0
0

वनहक्कधारकांची माहिती आधार लिंक

नाशिक : वनहक्कधारकांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर आधार लिंक केली जाणार आहे. त्यात आधार कार्ड, बँक खाते, पॅन कार्ड अशी सर्व माहिती टाकली जाणार आहे. राज्यात वनहक्क पट्ट्यांचे वाटप झालेल्या लाभार्थींची माहिती २० जुलैपर्यंत संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यातील तलाठ्यांना दावेदारांकडून माहिती प्राप्त करून घेऊन वनकायदा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सर्व तहसीलदार व तलाठी यांना लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. ही माहिती संकलित करताना त्यांचे मोबाइल, आधार, पॅनकार्ड, जमीन वाटपाच्या पत्राचा क्रमांक, अशी सगळी माहिती परस्परांशी लिंक करून ती सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर टाकली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये हातचलाखी करणारा ताब्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एटीएम सेंटरमध्ये मदतीच्या बहाण्याने हातचलाखी करीत एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या सराईत संशयितास क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. अदलाबदल करीत मिळविलेल्या कार्ड्सच्या मदतीने संशयित परस्पर काढून घेत होता. पोलिसांना त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

वरिंदर बिलबहादूर कौशल (रा. साईतीर्थ अपार्टमेंट, जेलरोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीने नांदूरनाका येथे नंदकुमार गंगाराम बोरसे यांची फसवणूक केली होती. एटीएम सेंटरमध्ये खाली पडलेले कार्ड उचलून देण्याच्या मदतीच्या बहाण्याने संशयिताने अत्यंत शिताफीने बोरसे यांचे कार्ड आपल्याकडे घेतले तर त्याच्याकडील बंद असलेले कार्ड बोरसे यांना दिले होते. तत्पूर्वी त्याने नजर चुकवून बोरसे यांचा पिन क्रमांक पाहिला होता. ८ जुलै रोजी हा प्रकार घडला होता. यानंतर संशयिताने बोरसे यांच्या खात्यातील १९ हजार ५०० रूपये काढून घेतले. आडगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा क्राईम ब्रँचमार्फत तपास सुरू असताना संशयित आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खार वेस्ट परिसरातील खारदांडा येथून स्कोडा कार (एमएच ४३, डब्लू ९०९१) घेऊन फिरणाऱ्या संशयितास पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नांदूरनाका येथील फसवणुकीसह भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत असे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष महासभेत ‘स्मार्ट’ची चिरफाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानानंतर शहरात सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांच्या कामांचा चिठ्ठी उघड करण्यासाठी विशेष महासभा घेतली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमधील अनेक कामांना भ्रष्टाचाराची ग्रहण लागल्याचा संशय व्यक्त करत यामागे कंपनीच्या आडून कारभार हाकणाऱ्या चार डोक्यांना जाब विचारण्याची भूमिका शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली.

'स्मार्ट सिटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील हे स्वतःला शहराचे मालक समजत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. महासभेतील सर्वच नगसवेकांनी एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांसदर्भात आरोप करत, स्मार्ट सिटीतल्या अधिकाऱ्यांना महासभेत बोलविण्याची मागणी केली. स्मार्ट सिटीतले अधिकारी मुजोर झाले असून महापालिकेचा पैसा खर्च करत असतांना, महापालिकेतील नगरसेवकांना मोजत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे त्यांना महासभेमध्ये पाचारण करून नगरसेवकांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागेल, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी मांडल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी लवकरच स्मार्ट सिटीतील विविध कामांविषयी चर्चा करण्यासाठी विशेष महासभा घेतली जाईल, असे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीगळती रोखण्यासाठी २०५ कोटी

$
0
0

नाशिक : शहरातील पाणीगळती रोखण्यासह पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत तीनशे कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. त्यातील २०५ कोटींच्या कामाला अमृत योजनेंतर्गत तत्वत: मंजुरी मि‌ळाल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. पाणीकपातीवरून नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आयुक्तांनी कपात का करावी लागली, त्याची वस्तुस्थिती मांडली. गंगापूर धरणात ५४ टक्के पाणी असले तरी, त्या पाण्यावर इतर आरक्षण अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्याशिवाय पर्याय नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. शासनाकडून २०५ कोटींचा निधी मंजूर झाल्यास त्यातून शहरातील जुन्या पाइपलाइन बदलणे, नवीन वसाहतींमध्ये पाइपलाइन टाकणे आदी कामे केली जातील. बांधकामविषयक कामे महापालिकेच्या निधीतून करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली. त्यानंतर नगरसेवकाचा राग काहीसा शांत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांडक व्याख्यानमालेचे आजपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'संस्कृती वैभव'च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आज, २० व उद्या २१ जुलै रोजी स्व. रामनाथशेठ चांडक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला संध्याकाळी ६.३० वाजता कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूर रोड, येथे होणार आहे.

आज, शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता 'जीवन संजीवनी' हा कार्यक्रम होणार आहे. भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुनीता संकलेचा आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. संघटनेतर्फे 'जीवन रक्षक व्हा' याअंतर्गत काही प्रशिक्षण, प्रात्याक्षिके आणि शंकासमाधान सुद्धा केले जाणार आहे. ७.३० वाजता हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा हे रोबोटिक अॅन्जिओप्लास्टी याबद्दल माहिती देतील. उद्या, रविवारी 'माधवबाग'चे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. गुरुदत्त अमिन हे 'आरोग्यम हृदयसंपदा' या कार्यक्रमाद्वारे हृदयरोगाकडून स्वास्थ्याकडे कसे जावे याविषयी प्रेक्षकांशी संवाद साधतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठाचे काही अभ्यासक्रम दूरस्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षामध्ये काही अभ्यासक्रम हे दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार सुरू करण्यात येणार आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन आणि अध्ययनाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून प्रथम वर्ष बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम. आणि एमबीए हे अभ्यासक्रम यंदा दूरस्थ पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. याद्वारे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन आणि अध्ययनाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याने त्यांच्या शिक्षणाचा दर्जाही सुधारणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, पूर्वीच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी पदवीसाठीचे द्वितीय-तृतीय वर्षांचे आणि पदव्युत्तरांसाठी द्वितीय वर्षाचे प्रवेश बहि:स्थ म्हणूनच देण्यात येतील.

दूरस्थ शिक्षणपद्धती अधिक कालसुसंगत आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. या पद्धतीमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाची गुणवत्ता सुधारणेबाबतची मार्गदर्शक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यात येणार आहेत. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे अतिरिक्त संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

दूरस्थ पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विविध केंद्रांवर त्या-त्या विषयाचे मार्गदर्शन व अध्ययनासाठीचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. विषयाचा सखोल अभ्यास होण्यासाठी असाइनमेंट करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा बहि:स्थ शिक्षणपद्धतीत उपलब्ध नव्हती.

दूरस्थ अभ्यासक्रमांची सुविधाही आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करून देत आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. दूरस्थ शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही भर टाकणारी आणि उपयुक्त आहे. यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यायला हवा.

- डॉ. प्रशांत टोपे, समन्वयक, पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस-विद्यार्थी एकसाथ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांचे काम, त्यांची योग्य ती प्रतिमा विद्यार्थी दशेतच मुलांना समजावी, त्याद्वारे कायद्याचे भान असलेले सजग नागरिक घडावेत यासाठी ग्रामीण पोलिस दलाने स्टुडंट पोलिस कॅडेट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले असून, यासाठी राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठीत केली आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये रूजवून जबाबदार नागरिक बनवणे हा आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील इयत्ता ८ वी ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात गुन्ह्यांचा प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांची सुरक्षितता, विकास, दृष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नीतिमूल्ये, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता अशा विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या प्रतिमा वेगवेगळ्या माध्यमांमधून विद्यार्थ्यांसमोर येत असतात. त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. प्रत्यक्षात पोलिसांचे काम मात्र त्या माध्यमांप्रमाणे चालत नाही. या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांपर्यंत हाच संदेश पोहचवला जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी स्पष्ट केले.

पाच शाळांची निवड

याबाबत पोलिस अधीक्षक आरती सिंह म्हणाल्या की, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमधून ७५ मुले तर ६५ मुलींनी सहभागी होण्यासाठी प्रतिसाद नोंदविला आहे. अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे (वालावलकर) या जिल्ह्यास्तरीय सुकाणू समितीच्या सदस्य सचिव म्हणून तर पोलिस उपनिरीक्षक अश्विनी टिळे या जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. महिला सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांकडे या कार्यक्रमाची जबाबदारी असून, शाळांचे मुख्याध्यापक आणि एक शिक्षक या कार्यक्रमाचा समन्वय पाहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाचे पुनरागमन मालेगावात पावसाचे पुनरागमन म.टा.वृत्तसेवा, मालेगाव- शह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने अखेर शुक्रवारी सायंकाळी हजेरी लावली. पाऊस गायब झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. अशात शुक्रवारी पावसाने शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे.

जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्यानंतर जुलैच्या प्रारंभापासून पाऊस गायब झाला होता. तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या होत्या. मात्र, गेल्या १८ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंतेत पडले होते. गेल्या आठवडाभरापासून तर तापमानातदेखील वाढ झाल्याने उकाडा वाढला होता.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर चांगला होता. नंतर तो कमी झाला असला तरी रिमझिम सुरू होती. तालुक्यातील निमगाव परिसर, येसगाव, चंदनपुरी, मुंगसे, सौंदाणे, सायने बुद्रुक, चाळीसगाव फाटा, द्याने, दाभाडी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

मनमाडला अर्धा तास बरसला

मनमाड : शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास मुसळधार पाऊस बरसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. सकाळपासूनच शहरात कमालीचा उकाडा जाणवत होता. पावसाने दडी मारल्याने शहर परिसरात चिंतेचे वातावरण असताना अचानक शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची धांदल उडाली. पावसाने रस्त्यातील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. काही भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांत नाराजी पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीच्या नव्या कॉलेजांना परवानगी बंद

$
0
0

नाशिक :

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार्मसिस्टची संख्या सद्यस्थितीत पुरेशी असल्याची पुष्टी जोडत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून नवीन फार्मसी कॉलेजांना परवानगी देणे बंद करीत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. परिणामी देशात ईशान्येकडील राज्य वगळता इतरत्र एकही नवीन फार्मसी कॉलेज उभारले जाणार नसल्याचे स्पष्ट आदेश कौन्सिलने दिले आहेत.
फार्मसिस्ट आणि लोकसंख्या यांच्या गुणोत्तरात केवळ ईशान्येची राज्य पिछाडीवर असल्याचे निरीक्षण फार्मसी कौन्सिलने नोंदविले आहे. त्यामुळे हे निर्बंध ईशान्येकडील राज्यांना लागू असणार नाहीत. कौन्सिलच्या या निर्णयामुळे आगामी पाच वर्षात डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म), बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म.), बॅचलर ऑफ फार्मसी (प्रॅक्टीस), डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म.डी.) आणि एम. फार्म (स्पेशलायझेशन) या पाच अभ्यासक्रमाच्या नव्या कॉलेजांना आता परवानगी मिळणार नाही.

ढासळती गुणवत्ताही कारण
सद्यस्थितीत देशभरात फार्मसी कॉलेजांचा सुकाळ झाल्याने आता शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रतिकूल परिणाम होऊ लागले आहेत, असा मुद्दा एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कौन्सिलच्या बैठकीत चर्चिला गेला होता. दिवसेंदिवस फार्मसी कॉलेजांच्या वाढत्या संख्येमुळे पात्र आणि प्रशिक्षित प्राध्यापकांची कमतरताही कौन्सिलला भासते आहे. याशिवाय फार्मसीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी क्षेत्रात नोकरीच्या म्हणाव्या तशा संधी मिळत नाहीत, अशी निरीक्षणे कौन्सिलच्या बैठकीत नोंदविली गेली. सद्यस्थितीत देशात डी. फार्मसीचे १९८५ आणि बी. फार्मसीचे १४३९ कॉलेजेस आहेत. यामध्ये २ लाख १९ हजार २७९ विद्याथी शिक्षण घेत आहेत. तसेच राज्यात डी. फार्मसी आणि बी. फार्मसी अभ्यासक्रम जवळपास पावणेसातशे संस्थांमध्ये चालविण्यात येतो.

उत्तर महाराष्ट्रात सध्या फार्मसीचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या सुमारे ५० संस्था आहेत. त्यापैकी अर्ध्या नाशिकमध्ये आहेत. राज्यात फार्मसी डिप्लोमा व डिग्रीच्या एकत्रित ४४ हजार जागा आहेत. त्यापैकी उत्तर महाराष्ट्रात सुमारे १५ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेतात.

फार्मसी कौन्सिलचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी, असे कठोर निर्णय आवश्यक आहेत. ज्या कॉलेजांकडे पात्रताधारक मनुष्यबळ किंवा पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत, त्यांच्यावरही कौन्सिलने भविष्यात बडगा उगारावा.
- प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर
अध्यक्ष , इंडियन फार्मसी असोसिएशन, नाशिक जिल्हा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीकविमा योजनेबाबत निरुत्साह चिंताजनक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान असली, तरी तिच्या लाभाबाबत एकूणच निरुत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील अधिकधिक शेतकरी या योजनेत सहभागी व्हावेत याकरिता जिल्हा प्रशासनासह कृषी विभाग, बँका आणि विमा कंपन्यांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी केले.

पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, बँक ऑफ महाराष्ट्रचे भरत बर्वे, मयुरी झोरे, दिलीप सोनार, प्रमोद राठोड आदी उपस्थित होते. खासदार गोडसे म्हणाले, की मराठवाडा, विदर्भात मोठ्या संख्येने शेतकरी पीकविमा योजनेमध्ये सहभागी होत आहेत. तुलनेने जिल्ह्यात शेतकरी या योजनेबाबत निरुत्साही असल्याचे जाणवते. जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख शेतकरी असून, विमा योजनेंतर्गत अवघ्या २९ हजार शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असून, आकडेवारी विचार करायला लावणारी आहे.

महिनाअखेरीस वाटपाची ग्वाही

गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेऊन अडीच कोटी रुपयांचा हप्ता भरला. त्यापैकी १७ हजार शेतकरी मोबदला मिळण्यास पात्र ठरले. त्यांना सुमारे १४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. फळपीकविमा योजनेत चार हजार ५९२ शेतकऱ्यांनी भाग घेऊन हप्त्यापोटी तीन कोटी रुपयांचा भरणा केला. दोन शेतकरी वगळता इतरांना एकूण २७ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. तडजोडीपोटी विमा कंपनीकडे बाकी असलेली तीन कोटी रुपयांची रक्कम महिनाअखेरपर्यंत वाटप करण्याची ग्वाही यावेळी विमा कंपन्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप’त नेतृत्वबदलाची हाक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांनी विश्वास टाकलेल्या आणि 'भाजप'ने पदांवर बसविलेल्या आमदार व पदाधिकाऱ्यांकडून शहराच्या विकासाबाबत अपेक्षाभंग झाल्यानंतर भाजपमधील निष्ठावंतांचा एक गट सक्रिय झाला असून, स्थानिक भाजपमध्ये नेतृत्वबदलासाठी या गटाने एल्गार पुकारला आहे.

उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमोद मुतालिक यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या भ्रमनिरासाबाबत आणि त्यांच्या एकूणच भरकटलेल्या कारभाराबाबत 'मटा'मध्ये लेख लिहून वाचा फोडल्यानंतर शनिवारी या नेतृत्वबदलासंदर्भातील दुसरा अध्याय पार पडला. विविध क्षेत्रांतील भाजपप्रेमींनी एकत्रित येत शहरातील नेतृत्वबदलासाठी थेट भाजपच्या निवड समितीलाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्व व आणि पदाधिकाऱ्यांना मात्र धडकी भरली आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडण‌वीसांसारखे व्हिजन आणि स्वच्छ चारित्र्य असलेले नेतृत्व असताना स्थानिक पातळीवर मात्र सर्व काही आलबेल सुरू आहे. मोदी, फडणवीस यांच्या नेतृत्वाची भुरळ पडल्याने स्थानिक भाजप आणि संघप्रेमी नेत्यांनी शहर आणि जिल्ह्यातील भाजपच्या उदयात मोठा वाटा उचलला. शहरात तीन आमदार आणि महापालिकेत सत्ता मिळाल्याने नाशिकमध्येही मोदी, फडणवीसांसारखेच नेतृत्व मिळेल. अशी भाजपप्रेमी आणि निष्ठावंतांची अपेक्षा होती. परंतु, गेल्या चार वर्षांतील भाजपच्या आमदारांची कामगिरी निराशाजनक आहे, तर महापालिकेतील भाजपच्या कारभाराबाबत न बोलले बरे, अशी प्रतिक्रिया भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. महापालिकेत नेमलेल्या नेतृत्वाने तर शहराची वाट लावल्याची प्रतिक्रिया संघ आणि समर्थकांमध्ये उमटत आहे. भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एकूणच कार्यशैली आणि त्यांच्यात विकासाचे व्हिजन नसल्याने संतप्त झालेल्या भाजपप्रेमींनी आता या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू केली आहे.

व्हिजनअभावी नुकसानाचा निष्कर्ष

भाजप निष्ठावंतांमधील या घुसमटीला उद्योजक प्रमोद मुतालिक यांनी 'मटा'त लेख लिहून वाचा फोडली आहे. त्यानंतर शनिवारी मुतालिक यांच्या उपस्थितीत निवडक भाजपप्रेमींनी एकत्रित बैठक घेत नाशिकचा विकास मागे पडल्याबद्दल खंत व्यक्त केली. नाशिकमध्ये व्हिजन नसलेले व स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व नसल्याने नाशिकचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. उद्योजक, वकील, डॉक्टर्स, खेळाडू, बँकर्स, चार्टर्ड अकौंटंट, समाजसेवक, कामगार आदी क्षेत्रांतील मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. नाशिकमधील सध्याचे नेतृत्व बदलून व्हिजन असलेले आणि विकासासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व असावे यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

विकासपूरक नेतृत्वाचा ठराव

नाशिकमधील भाजपचे नेतृत्व बदलण्यासाठी या भाजप्रेमींनी एक समितीची स्थापना केली आहे. भाजपचा शहराध्यक्ष, आगामी महापौर, उपमहापौर आणि विधानसभेसाठीचे उमेदवार या तीनही ठिकाणी नेतृत्व करणारे, व्हिजन असलेले, स्वच्छ चारित्र्याचे, गुन्हेगारांपासून लांब असणारे आणि विकासाबाबत सकारात्मक असलेले नेतृत्व भाजपने द्यावे, असा ठराव करण्यात आला. भाजपच्या निवड समितीने नवीन नेतृत्व देताना अशा गोष्टींचाच विचार करावा, असे सांगत,यासाठी भाजपच्या निवड समितीशीही संवाद साधला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यापूर्वीच होणाऱ्या महापौर, शहराध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रेमींच्या घेतलेल्या या पवित्र्यामुळे विद्यमान पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये मात्र धडकी भरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे मार्गावर टोलधाड कायम

$
0
0

'टोलमुक्ती' प्रश्नावरून एकनाथ शिंदेंचा संताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सात हजार कोटी रुपये खर्चून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर ते सिंहगढ दरम्यान १० किलोमीटरचा बोगदा तयार केला जाणार असल्याने मुंबई-पुण्यातील अंतर अर्धा तासाने कमी होणार आहे. त्यामुळे तुर्तास या महामार्गावरील टोल हटणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या आश्वासनावर बोलतांना शिंदे यांनी ५३ टोलनाके बंद करण्याची माहिती यावेळी दिली. परंतु, उर्वरित टोलनाके कधी बंद होणार असे विचारताच, या प्रश्नावर खासगीत उत्तर देतो असे सांगत, ते पत्रकारांवरच भडकले.

नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोलची मुदत संपल्याने तेथील टोल हटणार का, याबाबत विचारले असता शिंदे यांनी या मार्गावरील टोल कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. १० किलोमीटरच्या बोगद्यासाठी सात हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे टोल हटवता येणार नसल्याचे सांगत, या मार्गावरील टोलधाड कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्व राज्यात टोल नाक्यांवरून आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनात शिवसेना, मनसे आणि भाजपही सहभागी झाला होता. टोलनाक्‍यांच्या प्रश्‍नाची दाहकता लक्षात घेता, भाजप-शिवसेना सरकारने राज्य टोलमुक्त करण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर आश्‍वासनाची पूर्ती झाली खरी; परंतु कमी खर्चाचे नाके टोलमधून वगळण्यात आले. त्यामुळे राज्य टोलमुक्त करण्याच्या आश्‍वासनांबाबत विचारले असता, राज्य सरकारने ५३ टोल नाके बंद केल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला. परंतु, संपूर्ण राज्य टोलमुक्त कधी होणार, असा प्रश्नावर ते पत्रकारांवरच भडकले. या प्रश्नाचे उत्तर खासगीत देतो, असे सांगताना कॅमेरे बघताच शिंदेनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादमधील घटना दुर्दैवी असल्याचे सांगत, दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

संजय राऊतांना टोला

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री कोणाचा यावरून शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य करत, आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले होते. त्यानंतर नाशिकमध्ये भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनीही मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा दावा केला होता. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये पोस्टर्स वार रंगले होते. मात्र, याबाबत कोण काय बोलतो त्याला अर्थ नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे याबाबत निर्णय घेतील. या विषयावर कोणाला बोलण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांनाच अप्रत्यक्ष टोला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images