Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रस्ता रुंदीकरणास मुदतवाढ

0
0

- महासभेकडून आयुक्तांना अधिकार प्रदान

- अनधिकृत बांधकामे, कपाटकोंडी फुटणार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शहरातील कपाटकोंडी फोडण्यासाठी ६ व ७.५ मीटर रुंदीच्या सर्वच रस्त्यांना नऊ मीटर रुंदीचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिकार आयुक्तांना बहाल केल्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कालमर्यादेला आता अमर्यादित काळासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर असलेल्या भूखंडांचा विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, छोट्या रस्त्यांवर असलेल्या भूखंडधारकांना लाभ होण्यासह कपाटकोंडीही फुटणार आहे.

शासनाने सन २०१७ मध्ये जाहीर केलेल्या शहर विकास आराखड्यात ६ आणि ७.५ मीटर रस्त्यावर टीडीआर देण्यास बंदी घातली होती. शहरात नऊ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरच टीडीआर अनुज्ञेय करण्यात आला होता. त्यामुळे ६ व ७.५ मीटर रस्त्यावर भूखंड घेतलेल्या भूखंडधारकांसह या रस्त्यांवर इमारती उभ्या केलेल्या बिल्डरांना मोठा झटका बसला होता. त्यामुळे अनेक इमारती या कपाटकोंडीत अडकल्या होत्या. शहरात ६ व ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर सर्वाधिक प्लॉट असल्याने अनेकांचे नुकसान होत होते. त्याचबरोबर कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर अनुज्ञेय नसल्याने बांधकामांमधील कपाटांचा प्रश्‍न अधिक चिघळला होता. त्यामुळे शासनाने यासाठी कलम २१० अंतर्गत रस्ते रुंदीकरणाचे धोरण आखले होते. सहा व ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यासन्मुख अनुक्रमे १.७५ व ०.७५. असे पट्टीवजा क्षेत्र महापालिकेकडे वर्ग करून सात-बारा उताऱ्यावर महापालिकेने नाव लावल्यास त्या प्लॉटला नऊ मीटरचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जानेवारीत मंजूर करण्यात आला होता. यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ही ३० जून रोजी संपुष्टात आली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अमर्याद काळासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. महासभेने अमर्याद काळासाठी रस्त्यासन्मुख पट्टीवजा क्षेत्र महापालिकेकडे वर्ग करण्यास आयुक्तांना अधिकार प्रदान केले. त्यामुळे या योजनेला आता आणखी मुदत मिळाली असून, त्यातून अनधिकृत बांधकामे नियमित होण्यासह कपाटप्रश्नही सुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाकाठावरील मंदिरे बंद

0
0

नाशिक : खंडग्रास चंद्रगहण असल्याने मंगळवारी दुपारपासूनच मंदिरे बंद करण्यात आली होती. मंगळवारी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी चंद्रगहण सुरू झाले, परंतु त्याचे वेध नऊ तास आधीपासूनच सुरू होणार असल्याने मंदिरे बंद ठेवण्यात आली. स्नानासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. कपालेश्वराला दर्भाच्या काड्यांनी झाकण्यात आले होते. रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक मंदिरात श्रीगणेशाला शालीमध्ये लपेटण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उघड्या घरात चोरीची संधी मिळाल्यास हात साफ करणाऱ्या एका विधी संघर्षित बालकास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून, चोरी दरम्यान मिळालेले दागिने सराफ बाजारात कोठे विकले हेही दाखवले.

भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील काठेगल्ली परिसरातील धवलगिरी गार्डनसमोरील जे. रेसीडन्सी येथे ५ जुलै रोजी चोरीची घटना घडली होती. या ठिकाणी राहणाऱ्या सुनीता माळी या आपल्या आईला घेण्यासाठी फ्लॅटच्या सेफ्टी डोअरची कडी लावून बाहेर पडल्या होत्या. ही संधी साधत अल्पवयीन मुलाने घरात प्रवेश करीत तब्बल एक लाख ५६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना १२ जुलै रोजी काठेगल्ली परिसरातील ओमकार कॉलनीत राहणाऱ्या अभिजित निवृत्ती कोल्हे यांच्या घरी अशाच प्रकारची चोरी झाली. कोल्हे यांच्या उघड्या घरात प्रवेश करीत चोरट्याने १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल गायब केला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यानुसार संबंधित बालकास ताब्यात घेण्यात आले.

संबंधित बालकाने चोरीचे दागिने सराफ बाजारातील सोनारास विकले होते. पोलिसांनी त्या सराफाची चौकशी करीत त्याच्याकडून एक लाख सहा हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पीएसआय विशाल मुळे, हवालदार सोमनाथ सातपुते, शेरखान पठाण, पोलिस नाईक उत्तम पाटील, कॉन्स्टेबल साहिज सैय्यद, संतोष सानप, मुजाहिद सैय्यद आणि गणेश निंबाळकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जम्बो कार्गोची ओझरला हाताळणी

0
0

प्रथमच एअरबस ३०३ विमानातून कार्गो वाहतूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळावर इजिप्त एअरच्या एअरबस ३३० या विमानाची यशस्वीपणे हाताळणी झाली आहे. तब्बल ४५ टन मालवाहतूक क्षमता असलेल्या या जम्बो कार्गोच्या हाताळणीने या विमानतळावर यापुढील काळात अन्य आंतरराष्ट्रीय आणि जम्बो कार्गो विमाने येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानाद्वारे नाशिकहून दुबईला शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करण्यात आली आहे.

ओझर विमानतळावर सोमवारी (दि. १५) आणखी एका इतिहासाची नोंद झाली. इजिप्तची सरकारी कंपनी असलेल्या इजिप्त एअरचे एअरबस ३३० हे कार्गो विमान सोमवारी दुपारी एक वाजता ओझर विमानतळावर आले. अमिगो लॉजिस्टिक्स आणि पाटील अॅग्रो यांच्या माध्यमातून हे विमान नाशिकला आले. तब्बल ४५ टन माल वाहतूक करण्याची या विमानाची क्षमता आहे. हे विमान रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुबईकडे झेपावले. या विमानाद्वारे जवळपास अडीच ते तीन हजार शेळ्या-मेंढ्यांची दुबई येथे यशस्वी निर्यात करण्यात आली आहे. हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), कस्टम, इमिग्रेशन, कार्गो सेवा देणारी हॅलकॉन, ग्राऊंड हँडलिंग पाहणारी बॅटस या संस्थांच्या सहकार्यामुळेच हा इतिहास घडला आहे. या विमानासोबत एकूण सहा जणांची टीम होती. त्यांनी विमानतळावरील सुविधांबाबत अतिशय समाधान व्यक्त केले आहे. दिवसा आगमन आणि रात्री प्रस्थान यशस्वी झाल्याने ओझर विमानतळ हे सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांची मोठ्या संख्येने निर्यात होऊ शकली आहे. परिणामी, येत्या काळात मोठ्या कार्गो विमानांची हाताळणी ओझर विमानतळावरून होण्याची चिन्हे आहेत.

सक्षम पर्याय

मुंबई विमानतळावर कार्गो विमानांसाठी असलेल्या मर्यादा लक्षात घेता त्यास ओझर हा सक्षम पर्याय असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. त्यामुळे यापुढील काळात काही आंतरराष्ट्रीय कार्गो कंपन्या मुंबईला पर्याय म्हणून ओझरचा विचार करण्याची शक्यता आहे. 'आता आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रात ओझरचे नाव चर्चिले जाईल. परिणामी, येथील कार्गो व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे सिद्ध झाले, असे अमिगो एव्हिएशन्सचे सीईओ साजीद सय्यद यांनी सांगितले आहे.

एअरबस ३०३ विमानाची विमानतळावरील हाताळणी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. यामुळे येथून वाहतूक शक्य असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला आहे. नजिकच्या काळात अन्य प्रकारची विमानेही येथे येण्याची चिन्हे आहेत.

- सुधाकर सेन, सीईओ, हॅलकॉन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितांपर्यंत पोहचणार धान्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील अनेक कुटुंबे स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र, ते वंचित आहेत. अशा कुटुंबांना येत्या काळात धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ९२४ व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबांमध्ये गॅस सिलेंडर नाहीत, अशा कुटुंबानादेखील या योजनेच्या माध्यामातून गॅस सिंलेंडर देण्यात येणार आहेत.

१५ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. रेशन दुकानदारांमार्फत वंचित लाभार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात एकही व्यक्ती धान्यापासून वंचित राहणार नाही याबाबतचे हमीपत्रही रेशन दुकानदारांकडून भरून घेण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती धान्य घेण्यास पात्र आहे परंतु तिचे नाव धान्य मिळण्याच्या यादीत नाही अशा व्यक्तींची नावे धान्य दुकानदारांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांना कळवायची आहेत. त्यातून ही योजना सुरू केली जाणार आहे. नाशिक शहरात पहिल्या टप्प्यात ७ हजार ९९२ कार्ड धारकांना याचा लाभ होणार असून, या ३५ किलो धान्य देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थींचे उत्पन्न ४४ हजार रुपयांपेक्षा कमी व शहरातील व्यक्तींचे उत्पन्न हे ६५ हजार रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. नाशिक शहरातील कार्डधारकांची संख्या १३ लाख आहे. त्यापैकी ६ लाख ४७ हजार लोकांना धान्य वितरण करण्यात येत आहे. या योजनेसाठी ज्या लोकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही, अशा कार्ड धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून फॉर्म घेऊन भरुन द्यायचे आहे. हे फॉर्म वितरीत करण्याचे काम सुरू झाले असून, यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

समाजातील अनेक घटक धान्य मिळण्यापासून वंचित राहिले होते. अशा कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.

- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसजवळ तरुणावर हल्ला

0
0

सीबीएसजवळ

तरुणावर हल्ला

नाशिक : किरकोळ कारणातून अक्षय सुनील महात्मे (वय २१, रा. अशोकनगर,सातपूर) या तरुणावर ब्लेडने वार करण्यात आले. परिसरातील काही तरुणांबरोबर रिक्षातून तो सीबीएस येथे सोमवारी (दि.१५) मध्यरात्री आला होता. यावेळी चेष्टामस्करीत अन्य तरुणांनी बाबू काळसेकर याच्यासोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून अक्षयला मारहाण केली. यावेळी एकाने त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. जखमी अक्षयवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा तालुक्यातील रेशन दुकानावर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य वितरणात सुसूत्रता यावी यासाठी लाभार्थ्यांना महिन्याकाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत. तरीही काही दुकानदारांकडून या आदेशाला केराची टोपली दाखविणाचा प्रकार सुरू आहे. ऑनलाइन धान्य वितरण न केल्याने देवळा तालुक्यातील फुलेनगर (खाडीपाडा) येथील सयाजी केदा शिरसाट यांच्या रेशन दुकानावर जिल्हा पुरवठा विभागाने कारवाई करून त्याचा परवाना रद्द केला आहे.

स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्याच्या पुरवठा विभागाने पीओेएस (पॉइंट ऑफ सेल्स) मशिनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू केले आहे. रेशन दुकानदारांना महिन्याला किमान ५० टक्के धान्य बायोमेट्रिकद्वारे देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत फुलेनगर येथील सयाजी केदा शिरसाट यांनी पीओएसद्वारे ५० टक्यांहून कमी धान्य वितरित केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील रेशन दुकानांची नियमित तपासणी केली जात आहे. जून महिन्यात केलेल्या तपासणीत पीओएसद्वारे ५० टक्क्यांहून कमी धान्य वितरित करणाऱ्या सहा दुकानांचे परवाने पुरवठा विभागाने रद्द केले होते. यामध्ये नाशिक शहरासह येवल्यातील दुकानांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार मंत्र्यांकडून कामगारांची घोर निराशा

0
0

'सीटू' राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कराड यांची नाराजी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामगार मंत्र्यांनी राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतनाची घोषणा केली असून त्यांनी केलेल्या घोषणेनुसार राष्ट्रीय स्तरावर किमान वेतन रुपये १७८ प्रतिदिन म्हणजे ४ हजार ६२८ रुपये दरमहा निश्चित करण्यात आले आहे. ही वाढ अन्यायकारक असून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, अशी मागणी 'सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकान्वये केली आहे.

कामगार मंत्र्यांनी ही घोषणा दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली. २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतन हे १७६ रुपये प्रतिदिन होते. त्यामध्ये कामगार मंत्र्यांनी दोन रुपयाची वाढ केली करून ते १७८ रुपये प्रति दिन केले आहे. गेल्या २ वर्षांमध्ये जी महागाई वाढली त्याचा विचार या वेतन वाढीत केलेला नाही. सातव्या वेतन आयोगाने जे किमान वेतन निश्चित केले आहे त्याच्या २५ टक्के सुद्धा कामगार मंत्र्यांनी किमान वेतन जाहीर केलेले नाही. पंधराव्या भारतीय श्रम परिषदेने, तसेच रेप टॅकॉस व ब्रेट केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींचा विचार करता हे किमान वेतन ६९२ रुपये प्रति दिन किंवा १८ हजार रुपये दरमहा असायला हवे होते. परंतु, कामगार मंत्र्यांनी श्रम परिषद व सर्वोच्च न्यायालयाची शिफारस याचाही विचार केलेला नाही, असे मत डॉ. कराड यांनी मांडले आहे.

अनेक राज्यांमध्ये कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेल्या किमान वेतन दरापेक्षा जास्त वेतन दिले जात आहे. त्यामुळे कामगार मंत्र्यांनी असे किमान वेतन दर जाहीर करून काय संदेश दिला, असा प्रश्न आहे. आपल्या देशातल्या भांडवलदारांना व अनेक कार्पोरेटना मोदी सरकार हे झुकते माप देत आहे हा संदेश कामगार मंत्र्यांनी या किमान वेतनाचे दर जाहीर करून दिलेला आहे. तसेच कामगार संघटनांनी एकत्र येऊन किमान वेतन १८ हजार रुपये दरमहा करण्याची केलेली मागणी हे सरकार विचारात घ्यायला तयार नाही, असाही संदेश कामगार मंत्र्यांनी दिलेला आहे. भांडवलदार आणि कार्पोरेट कंपन्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची ही मेहरबानी कशासाठी आहे, असाही प्रश्न आहे. निवडणुकांमध्ये देशातील कार्पोरेटनी मोदी सरकारच्या आणि भाजपच्या पाठीशी सातत्याने उभे राहिले त्याची परतफेड म्हणून कामगार वर्गाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार अशा पद्धतीचे भिकार किमान वेतन जाहीर करीत आहे, असाच निष्कर्ष काढावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप

0
0

\Bविद्यार्थिनींना वह्यांचे वाटप

\B

नाशिक : रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात, एलआयसीतर्फे विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ विभागीय अधिकारी तुलसीदास गडपायले, मार्केटिंग मॅनेजर एन पी गिरकर, पी. जी. जोशी, साहित्यिक डॉ. गोपाळ गवारी, करुणासागर पगारे, विष्णू दातार, हेमंत वाघ, काशिनाथ वेलदोडे, अशोक केदारे, सरिता जोशी, पर्यवेक्षक संजय शिंदे, व शिक्षकवृंद हजर होते. लता शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची पोलखोल

0
0

जिल्हाधिकाऱ्यांची त्र्यंबकला भेट; स्थानिकांच्या शंकानिरसनाचे प्रयत्न

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अचानक उद्भवलेली पूरपरिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता शहराला भेट दिली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल केली. त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला.

महाराष्ट्र टाइम्समध्ये रविवारी (दि. १४) 'तुंबके'श्वर असा लेख प्रसिद्ध झाला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्याची दखल घेत नियाजन आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकला मंगळवारी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, त्र्यंबक नगरपालिकेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि नगरसेवकांसह त्यांनी आहिल्या-गोदावरी संगमघाट, त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच दक्षिण बाजूस असलेले गायत्री मंदिर, कुशावर्त तीर्थ, तेलीगल्ली, मेनरोड गंगास्लॅब आदी सर्व भागांची पाहणी केली. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेतली. त्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक व माजी नगरसेवक गोविंदराव मुळे, आरपीआय तालुका अध्यक्ष शांताराम बागूल, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, नगरसेवक अॅड. श्रीकांत गायधनी, संजय कदम, नगरसेवक विष्णू दोबाडे, अमर सोनवणे, गटनेते समीर पाटणकर, दिनेश पाटील आदींसह काही नागरिकांनी आपले म्हणणे मांडत सूचना केल्या. राजेश पंडित आणि ललिता शिंदे यांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळविण्यास विरोध दर्शविला तसेच आपत्ती निर्माण होणाऱ्या कामांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला.

दावा ठरला फोल

गंगाद्वार पायथ्याच्या अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यांनी नाल्याचा प्रवाह अडविल्याने पाणी रस्त्यावर येते. ते काम करू देत नाही, असा दावाही नगरसेवकांनी केला. याबाबत शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी ताफा घेऊन संत निवृत्तिनाथ मंदिराच्या पाठीमागी पोहचले. तेथे मात्र वस्तुस्थिती वेगळीच दिसली. तेथे नाल्याचा प्रवाह मोकळा केलेला दिसला; परंतु या प्रवाहास पुढे अडथळा होईल, असे बांधकाम शेजाराच्या जमिनीतील कब्जेदारांनी केलेले आढळले. तसेच शहरात येणारा प्रवाह शेजारच्या गटातून वाहत असल्याचे स्पष्ट झाले.

मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी

आजारपणाच्या कारणाने रजेवर असलेल्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांच्याबाबत सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या. त्या १५ दिवसातून एकदा येतात. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याचे कारण सांगतात, असा मुद्दा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही बैठक नसते असे सांगितल्याने उपस्थितीत आवाक झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बदलीची मागणी झाली. तक्रारीबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांकडून खुलासा मागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तर पूर्ण बाथरूमच तोडणार का?

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत ताबडतोब काय करता येईल त्याचे मार्गदर्शन केले. मेनरोड स्लॅबच्या बाजूस पाणी जाण्यासाठीचे इनलेट होल कचरा व मातीने बुजले आहेत, ते मोकळे करणे आवश्यक आहे. तसेच अंतर्गत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. उगाच मोठे प्लॅन करण्याची गरज नाही. उपाययोजना म्हणून केलेले काम नंतर चुकीचे ठरायला नको. रस्त्यांचे सिमेंट काम काढणे शक्य आहे. सर्वांचा हातभार यासाठी लागला पाहिजे. पण मोरी तुंबली म्हणून संपूर्ण बाथरूमचे नुतनीकरण करायचे नसते, तर तुंबलेले पाणी निचरा होईल, अशी उपाययोजना करावी लागेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी कितीही पाऊस झाला तरी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. सिंहस्थ कामांच्या दरम्यान पूर्वीचे रस्ते न खोदता नव्याने सिमेंट थर टाकण्यात आले. यात रस्त्यांची उंची वाढली. पाणी वाहून जाण्यासाठी गटारीवर ढापे ठेवले नाहीत. पेव्हर ब्लॉक टाकल्याने कुशावर्त आणि मंदिरात पाणी शिरते.

- गोविंदराव मुळे,

ज्येष्ठ नागरिक व माजी नगरसेवक

ओहळांच्या पाण्यासाठी स्वतंत्र बॉक्स चॅनेल करून तो शहराबाहेर नेण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे पूर येत नाही तर केवळ रस्त्यावर पाणी येते.

- स्वप्नील शेलार,

माजी उपनगराध्यक्ष

आजूबाजूच्या डोंगरांवर जंगल राहिले नाही त्यामुळे माती वाहून येते. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करणाऱ्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांनी इतस्त कचरा टाकू नये.

- पुरुषोत्तम लोहगावकर,

नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगाराने संपवली पोलिसांची घालमेल

0
0

पगार जमा

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही महिन्यांपासून अगदी पंधरवडा उलटूनही पगार होत नसल्याने शहर व ग्रामीण पोलिसांच्या जीवाची घालमेल होत होती. पोलिसांची ही कैफियत 'मटा'ने प्रकाशित करताच दोन दिवसांत पोलिसांचे पगार बँकेत जमा झाले. यामुळे पोलिसांची घालमेल संपली असली, तर पुढील महिन्यातही पंधरवडा उलटायच्या आत पगार व्हावेत, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पोलिसांचे वेतन बँकेत जमा होण्यास ग्रहण लागले होते. गेल्या सहा महिन्यांपासून महिन्यातील २० तारीख उजाडूनही पोलिसांचे पगार होत नव्हते. जुलै महिन्यात पाल्यांच्या शाळा-कॉलेजचे प्रवेश, कर्जाचा हप्ता, आरोग्याचा खर्च यासह खर्चाच्या अनेक बाबी डोके वर काढत होत्या. पण, १३ दिवस उलटूनही पगार न झाल्याने पोलिस दलात नाराजीचा सूर होता. या संदर्भात रविवारी (दि. १४) 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला. यानंतर पोलिसांचे पगार तातडीने करण्यासाठी हालचाल सुरू झाली. मंगळवारी (दि. १६) सायंकाळपर्यंत नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार बँकेत जमा झाले. यानंतर तात्पुरती घालमेल संपली असून, पगार महिन्याच्या प्रारंभातील आठ दिवसांतच जमा होण्यात सातत्य राहणे अपेक्षित असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सेवार्थ पोर्टलवरून पोलिसांसह महसूल व अन्य विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहेत. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवार्थ पोर्टलचा आयडेंटिफिकेशन क्रमांक आणि पासवर्ड दिला आहे. मात्र, सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार वर्षांतील वेतन फरक देण्यासाठी सेवार्थ प्रणालीवर डेटा अपडेटिंग सुरू होते. या कामात तांत्रिक अडचणी येत असल्याने पोलिसांचे वेतन जमा होण्यास गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विलंब होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती पदाचा सस्पेन्स कायम

0
0

गिते, बोडके, निमसे यांच्यात रस्सीखेच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी गणेश गिते यांच्या नावाला तीव्र विरोध झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढल्याने सभापतीपदाबाबतची उत्सुक्ता वाढली आहे. सभापतीपदासाठी इच्छुक सहा सदस्यांनी मंगळवारी मुंबईत धाव घेत, आपण पदासाठी कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातच मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष बदलल्याने सभापतीपदासाठी तयारीत असलेल्या दोन इच्छुकांच्या आनंदावर विरजन पडले. सद्यस्थितीत गिते यांचे पारडे जड असले तरी, वाद टाळण्यासाठी बुधवारी (दि. १७) सकाळीच सभापती पदाचे नाव जाहीर करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि. १८) निवडणूक होत आहे. बहुमत असले तरी भाजपमध्ये मात्र सभापतीपद कोणाला द्यायचे यावरून आमदारांमध्येच संघर्ष सुरू आहे. महापालिकेतील पदे वाटप करतांना भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या नाशिक पूर्व मतदारसंघाला झुकते माप दिल्यावरून नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. त्यात पुन्हा स्थायीच्या सभापती पदासाठी नाशिक पू्र्वचेच गणेश गितेंची वर्णी लागणार असल्याच्या बातम्यांनी पक्षातील नाराजीत भर पडली. गितेंच्या नावाला विरोध झाल्यानंतर कमलेश बोडके यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली. तर उद्धव निमसे यांनीही सभापतीपदावर दावा ठोकला. प्रा. शरद मोरे यांनीही सभापतीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आ. देवयानी फरांदे यांच्या समर्थक असलेल्या स्वाती भामरे यांनीही सभापतीपदासाठी फिल्डींग लावली. तर पश्चिमध्ये सभापतीपद यावे यासाठी आ. हिरे यांनी आपल्या समर्थकांचे नाव पुढे केले. त्यामुळे भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गिते यांच्या नावाला भाजपात विरोधाची धार अधिक तीव्र होऊ लागल्याने पक्षात बंडाळी उफाळून येऊ नये म्हणून आता सभापतीपदाची उमेदवारी जाहीर करण्याबाबत भाजपात गोपनियता बाळगली जात आहे.

आव्हाडांनी घेतला अर्ज

भाजपमध्ये सभापती पदावरून रस्सीखेच सुरू असतांना भाजपच्या पुष्पा आव्हाड यांनीही सभापतीपदासाठी अर्ज विकत घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आव्हाड या पश्चिम मतदारसंघातील सदस्या असल्या तरी त्या आमदार सानप यांच्या नातेवाईक आहेत. नाशिक पूर्व किंवा मध्य मतदारसंघात रस्सीखेच वाढल्यास ऐनवेळी तिसऱ्या सदस्याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पक्षातर्फे सदस्यांना आतापर्यंत मिळालेल्या पदांची माहिती पक्षाकडे सादर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजसाठी पहिले पाऊल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक त्या अटी आणि शर्तींची पूर्तता होते काय, हे पाहण्यासाठी सरकारने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीतील सदस्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन जागेच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली.

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने नाशिकला मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी सरकारने चार तज्ज्ञ सदस्यांची समिती नियुक्त केली असून, सध्या ही समिती नाशिकमध्ये माहिती संकलित करीत आहे. समितीत डॉ. दीपक जोशी (ग्रँट मेडिकल कॉलेज), डॉ. विजय शेगोकर (विशेष कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय), डॉ. गिरीश बक्षी (सहायक प्राध्यापक, ग्रँट मेडिकल कॉलेज), परशुराम दोरवे (मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय) यांचा समावेश आहे. मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी किमान २५ एकर जागेची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत भूसंपादनासह नूतन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे मेडीकल कॉलेज स्थलांतरीत करण्यात येईल. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडीकल कॉलेज सुरू करताना भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांचा विचार होणे गरजेचे आहे. ही तज्ज्ञ समिती याच बाबींचा आढावा घेणार आहे.

या बाबींचा आढावा

सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांची ओपीडीसह आयपीडीतील संख्या, बेड्स, रूग्णालय कोणत्या विभागातंर्गत येते, मनुष्यबळ किती उपलब्ध आहे, बांधकामाचे क्षेत्रफळ किती याचा आढावा घेण्यात येत आहे. मेडिकल कॉलेजसाठी किमान २५ एकर जागेची आवश्यकता असून, त्याबाबत कमिटी सदस्यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशीसुद्धा चर्चा केली आहे. ही कमिटी अगदी बारीक सारीक बाबींची नोंद करून आपला अहवाल १५ दिवसांत राज्य सरकारला सादर करणार आहेत. या समितीच्या अहवालानंनतर १०० ते दीडशे प्रवेश क्षमतेचे मेडिकल कॉलेज सुरू होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेची संशयास्पद हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रोडवरील साई पॅराडाइज या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका १४ महिन्याच्या बालिकेची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. स्वरा मुकेश पवार असे या बालिकेचे नाव आहे. तिच्या गळ्याभोवती धारदार शस्त्राच्या जखमा आहेत.

एका चोरट्याने ही हत्या केल्याचे बालिकेची आई योगिता पवार यांनी सांगितले. योगिता यादेखील जखमी झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या फ्लॅटमधून काहीही चोरीला गेलेले नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्यानुसार हा सर्व प्रकार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या मुकेश पवार यांच्या फ्लॅट नं. ८ मध्ये ही घटना घडली.

या घटनेचे माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यांना हातापायी झालेली नसल्याचे दिसले. तसेच फ्लॅटमध्ये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने देखील तसेच असल्याने पोलिसांना हा प्रकार संशयास्पद असल्याचे जाणवत आहे.

आईने सांगितलेला घटनाक्रम...

या घटनेविषयी जखमी झालेल्या योगिता मुकेश पवार (२६) यांनी पोलिसांना सांगितले की, दुपारी दोनच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी बाहेर गेले असता एक अज्ञात चोरटा हातात चाकू घेऊन माझ्या मागे आला. त्याने मला फ्लॅटमध्ये लोटून दरवाजा बंद केला. त्याने बेडरुमध्ये झोपलेल्या १४ महिन्यांच्या स्वराच्या गळ्यावर वार केले. त्याला प्रतिकार केला असता त्याने आपणावरही वार केले. या झटापटीत आपण अर्धा तास बेशुद्ध होतो. त्यानंतर शुद्धीत येताच शेजारच्यांच्या मदतीने स्वराला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी ती मृत असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणाची भूस्तर तपासणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्लूपीआरएस) पथकाने मंगळवारी गंगापूर धरणाची पाहणी केली असून, महापालिकेच्या इंटेकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या खडकात 'अंडर वॉटर ब्लास्ट' करण्यापूर्वी त्या खडकाची भूस्तर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धरणातील खडक कोणत्या प्रकारचा आहे, तसेच ब्लास्ट केल्यास त्याची तीव्रता किती असेल, याची आधी चाचपणी केली जाणार आहे. मंगळवारच्या पाहणीनंतर सदरचे केंद्रीय पथक आज, बुधवारी (दि. १७) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह महापालिकेतील अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती सादर करणार आहे. पाऊस लांबल्यामुळे यंदा गंगापूर धरणातील पाणीपातळीने तळ गाठल्याने पाणीकपात लागू करण्यात आली होती. मृतसाठा वापरण्यासाठी आणि इंटेकवेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्यासह भविष्याची गरज लक्षात घेत प्रशासनाने मुंबई डॉक यार्डच्या कामासाठी वापरात आणलेले 'अंडर वॉटर कंट्रोल ब्लास्ट' करून खडक फोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जलंसपदा विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडेदेखील विचारणा करण्यात आली होती. त्याची प्रक्रिया सुरू असतानाच तिवरे धरण फुटल्याने प्रशासनाने आस्तेकदम घेत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता.

जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार महापालिकेने पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राशी संपर्क साधत धरणातील स्फोटाबाबत विचारणा केली. यासंदर्भात केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक ए. के. घोष यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथक मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. या पथकाने दुपारी गंगापूर धरणावर जाऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे उपस्थित होते. धरणातील फोटोग्राफ्स घेत येथील खडकाचीही पाहणी केली. पाण्याखालील खडकाचा अभ्यास करण्यासाठी जिओलॉजिकल सर्वेक्षण करण्याचा निर्णय यावेळी पथकाने घेतला. त्यासाठी स्वतंत्र पथक येईल, असे घोष यांनी सांगितले. माती, तसेच खडकाचा अभ्यास केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा, महापालिका आणि केंद्राचे पथक संयुक्त अभ्यासही करणार आहे.

---

आज सादरीकरण

दरम्यान, केंद्रीय पथकाने मंगळवारी गंगापूर धरणाची पाहणी केली असून, त्यासंदर्भातील अहवाल तयार केला आहे. या अहवालासह ब्लास्ट करण्याची प्रक्रिया, त्याची तीव्रता, संभावित परिणामाचे या पथकाकडून आज आयुक्तासंह महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले जाणार आहे. खडक फोडण्यासाठी धरणात पाण्याखाली स्फोट केल्यास धरणाला धोका उद्भवू शकतो का, स्फोटातून किती प्रमाणात कंप निर्माण होतील, त्याचा कितपत फटका बसू शकेल, याचे सादरीकरण या पथकाकडून केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणी मागणाऱ्या दोन संशयितांना अटक

0
0

चार दिवसांची पोलिस कोठडी

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. १५) बंदुकीचा धाक दाखवून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागीतल्याची घटना घडली होती. खंडणी मागणाऱ्या दोन संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. त्यांना मंगळवारी (दि.१६) न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बाजार समितीच्या आवारात भाजीपाला खरेदी करणारे व्यापारी राजेंद्र भागवत काटकर (वय ३५, राहणार दत्तनगर, पेठरोड) यांना सोमवारी (दि. १५) सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे यांनी बंदुकीचा धाक दाखवित डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत पन्नास हजार दे नाही तर सायंकाळपर्यंत मारून टाकू, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित सागर जाधव (रा. नवनाथनगर, पेठ रोड) हा सिटी सेंटर मॉल येथे, तर संशयित सागर भडांगे हा तुळजाभवानी नगर परिसरात असल्याचे समजले. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी पोलिस हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवडे, महेश साळुंखे, मयूर हजारी, योगेश ससकर यांनी सापळा रचून प्रथम सागर भडांगे, सागर जाधव यास ताब्यात घेतले. या दोन संशयितांना मंगळवारी (दि. १६) न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अद्याप तिसरा संशयित कुणाल थोरात फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या करण्याआधीच पोलिस पोहचले तेथे! पो

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

'पुलिस हमेशा सबकुछ खत्म होने के बादही आती है', असा डायलॉग अनेक हिंदी सिनेमांमध्ये हमखास असतो. मात्र, हा डायलॉग खोटा ठरवत पोलिसांनी होणारी घटना घडायच्या आधीच पोहचत आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका युवकाचा जीव वाचवला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी दुपारी पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका तरुणाचा फोन आला. आपण चुंचाळे येथे राहात असून आत्महत्या करीत असल्याचे त्याने सांगितले. हा फोन आल्यानंतर कंट्रोल विभागाने तातडीने अंबड पोलिस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह पोलिस हवालदार शांताराम शेळके, नितीन राऊत, योगेश रेवगडे, सुखदेव गिरे आदी कर्मचारी अजिबात वेळ न दवडता तातडीने संबंधित घराजवळ पोहचले. पोलिसांनी या बंद घराजवळ उभे राहून 'आम्ही पोलिस आहोत, दार उघडा' असे सांगितले. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला काहीसा उशीर झाला की काय, असे काही क्षण वाटले होते. मात्र, पोलिसांनी दरवाजा वाजवल्यानंतर काही वेळानंतर प्रत्यक्ष फोन करणाऱ्या युवकानेच दार उघडले. पोलिसांनी तत्काळ घरात धाव घेतली असता या युवकाने आत्महत्या करण्यासाठी घराच्या छताला नायलॉन दोरी बांधल्याचे दिसले. पोलिसांनी तत्काळ त्याला पोलिस ठाण्यात आणले व चौकशी केली. तेव्हा भाऊ आपणास घर देत नाही म्हणून आत्महत्या करणार होतो, असे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याला धीर देत कुटुंबीयांसह एकत्रित बैठक घेतली आणि त्या युवकाच्या घराचा प्रश्नही मार्गी लावला आणि खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले.

दरवेळी घटना घडल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना मिळते. मात्र, या युवकाने फोन केल्याने आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. घरगुती घराच्या वादाचा विषय असल्याने हा युवक आत्महत्या करीत होता. मात्र, त्याचा जीव आम्ही वाचवू शकलो, याचे समाधान आहे.

-श्रीपाद परोपकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती, सासू विरोधात चांदवडमध्ये गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती अजित गांगुर्डे आणि सावत्र सासू कमलबाई गांगुर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गितांजली अजित गांगुर्डे (वय २३) या विवाहितेने शनिवारी (दि. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास बंगल्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचे वडील हरी ठाकरे (रा. ब्राह्मणगाव, ता. सटाणा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गितांजली हिचा १० सप्टेंबर २०१८ रोजी अजित गांगुर्डे याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर सावत्र सासू कमलबाई भीमराव गांगुर्डे व पती अजित यांनी लग्नात हुंडा न दिल्याने गीतांजलीस कार दुरुस्तीसाठी माहेरून ६० हजार रुपये आणण्यास सांगितले. यातील ५७ हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर बंगल्यास रंग देण्यासाठी पुन्हा माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून पती व सावत्र सासू यांनी छळ करीत गितांजलीला आत्महत्येस प्रवृत्त केले. पोलिसांनी अजित व कमलबाई यांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमसेंवर शिक्कामोर्तब

0
0

स्थायी समिती सभापतिपदी निवड निश्चित

...

- गणेश गिते, स्वाती भामरे यांचे प्रयत्न असफल

- निवडीची आज औपचारिक घोषणा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या रस्सीखेचमध्ये माजी सभापती उद्धव निमसे यांनी गणेश गिते आणि स्वाती भामरे यांच्यावर मात करीत अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळवली. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा कौल निमसे यांच्या बाजूने असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज (दि. १८) सभापतिपदासाठी निवडणूक होणार असून, भाजपकडे बहुमत असल्याने त्यांच्या सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची आज (दि. १८) निवडणूक होत आहे. सभापतिपदासाठी भाजपमधील नऊपैकी सात सदस्य इच्छुक असल्याने चुरस वाढली होती. विशेष म्हणजे सर्वाधिक चार इच्छुक हे भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील होते. माजी सभापती उद्धव निमसे, गणेश गिते, कमलेश बोडके, प्रा. शरद मोरे हे नाशिक पूर्वमधून, तर नाशिक मध्यमधून स्वाती भामरे इच्छुक होत्या. शेवटच्या क्षणी नाशिक पश्चिममधील पुष्पा आव्हाड यांनीही सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली होती.

नाशिक पूर्व मतदारसंघाला झुकते माप देण्यावरून भाजपमध्ये मोठी नाराजी होती. दोन दिवसांपूर्वी पक्षातील सर्व इच्छुकांची नावे मागे पडून पालकमंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक असलेल्या गणेश गितेंचे नाव सभापतिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आले होते. परंतु, गितेंच्या नावाला भाजपमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला होता. उद्धव निमसे यांनी सन २०१२ मध्ये मनसेची सत्ता असताना सभापतिपद मिळवले होते. त्यामुळे सभापतिपदाच्या शर्यतीत त्यांनी पुन्हा एंट्री केली. गितेंना वाढता विरोध लक्षात आल्यानंतर पक्षाकडून स्वाती भामरे, उद्धव निमसेंना स्पर्धेत आणण्यात आले. भाजपने अंतिम क्षणी सभापतिपदासाठी उमेदवार जाहीर केला. त्यानुसार गिते आणि भामरेंना मागे टाकत निमसे यांना सभापतिपदाची माळ आपल्या गळ्यात टाकण्यात यश आले आहे. पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाच मिनिटे आधी निमसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निमसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतिपदी निवड निश्चित मानली जात आहे. आज, गुरुवारी सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे.

...

शिवसेनेकडून चुरस

शिवसेनेच्या वतीने कल्पना पांडे यांनीही सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे चार सदस्य आहेत, तर भाजपचे नऊ सदस्य आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे या तीनही सदस्यांनी शिवसेनेला मदत केली तरी भाजपचाच सभापती होणार निश्चित आहे. परंतु, भाजपमधील अंतर्गत नाराजीचा लाभ उठवण्यासाठी तसेच निवडणुकीत चुरस निर्माण होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पांडेंनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने युती धर्म पाळून शिवसेनेला सभापती पद द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

...

...अन् गितेंचा पत्ता कट

भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून अनेक पदे मिळ‌वणाऱ्या गणेश गितेंना सभापतिपद मिळविण्यात अपयश आले. गितेंसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही आपली शक्ती खर्ची घातली. विशेष म्हणजे उमेदवारी मिळवण्यासाठी गितेंनी मुंबईत तीन दिवस तळ ठोकत शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अनुभवाच्या जोरावर निमसे यांनी उमेदवारी मिळवली आहे.

...

तिघांचे अर्ज अन् उत्कंठा

नाराजीनाट्य उदभवू नये म्हणून पक्षाने उमेदवारी देताना शेवटपर्यंत व्यूहरचना आखली होती. सभापतिपदासाठी दिग्गज उमेदवार इच्छुक असल्याने भाजपने शेवटच्या टप्प्यात इच्छुक असलेल्या गिते, भामरे, निमसे या तिघांनाही अर्ज भरण्यास सांगितले. भाजपच्या दिग्गजांनाही उमेदवार कोण हे सांगता येईना. उमेदवारी भरण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना सर्व सदस्यांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी निमसेंच्या हातात त्यांच्या उमेदवारीचा अर्ज देण्यात येऊन तो दाखल करण्यास लावले. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण याची चाहूल पक्षाने लागू दिली नाही.

...

सभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती. पक्षाने सर्व सदस्यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांनी एकत्रित विचार करून उद्धव निमसेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

- जगदीश पाटील, गटनेता, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेल्पलाइन’ची विद्यार्थिनी धनश्री होणार डॉक्टर

0
0

'मटा'च्या माध्यमातून मिळाले आर्थिक पाठबळ

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिशय बिकट आर्थिक स्थिती, समोर अडचणींचा मोठा डोंगर. पण, ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर जीवनातले अडथळे पार करीत शिक्षणात मिळवलेले प्राविण्य आणि 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मिळालेले पाठबळ यामुळे धनश्री राजोळे या विद्यार्थिनीने डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. उच्च शिक्षणाच्या आड कोणाचीही परिस्थिती येऊ नये, यासाठी 'मटा हेल्पलाइन' उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन धनश्रीने नाशिककरांना केले आहे.

धनश्री राजोळे हिने २०१७ मध्ये दहावीत ९४.४० टक्के मिळविले. मात्र, वडिलांच्या सायकल रिपेअरिंगच्या दुकानातून येणाऱ्या उत्पन्नातून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का, ही चिंता तिच्यासह पालकांसमोर होती. विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या या विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नाला पाठबळ मिळणार हे नक्कीच होते. दरम्यान 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा हेल्पलाइन' या उपक्रमाकरिता धनश्रीची निवड झाली. या माध्यमातून नाशिकच्या दातृत्वांनी तिच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावला. यामुळे ध्येय गाठण्याची तिची जिद्द अधिक कणखर झाली. नुकतेच बारावीमध्ये तिने ७३.६४ टक्के मिळवले असून, नीट परीक्षेत ९५.८२ पर्सेंटाइल, तर सीईटीमध्ये ९८.६२ टक्के मिळवले आहेत. नीट परीक्षेत तिला ५८ हजार ३८३ रँक मिळाला असून, सरकारी कोटातून बॅचरल ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या पदवीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षणात तिने दाखवलेली चमक आता तिला डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यापर्यंत घेऊन जात आहे. 'मटा हेल्पलाइन' च्या माध्यमातून मिळालेले आर्थिक पाठबळ जबाबदारी वाढविणारे आणि ध्येयसिध्दीसाठी अतिशय पुरक ठरल्याचे धनश्री सांगते. तसेच आपल्यासारख्या आणखी काही विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची संधी 'मटा'च्या वाचकांच्या हातात आहे. ज्यांना देणे शक्य आहे, त्यांनी जरूर या उपक्रमात सहभागी व्हावे आणि गरजू व मेहनती विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत करावी, त्यांच्या कष्टाला आर्थिक बळ द्यावे, असे आवाहनही तिने केले आहे.

...

मटा हेल्पलाइनच्या माध्यमातून नाशिककरांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. यामुळे माझे उच्च शिक्षणाचे स्वप्न खरे होत आहे. दातृत्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवणार आहे. डॉक्टर झाल्यानंतर माझ्याप्रमाणेच खडतर परिस्थितीशी सामना करीत शिक्षण घेणाऱ्या गुणवंतांना मदत करणे, हे माझे ध्येय असेल.

- धनश्री राजोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images