Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रिमांड होम वाऱ्यावर

$
0
0

राज्यभरातील ४१ पैकी ३६ ठिकाणी अधीक्षकच नाहीत

Fanindra.Mandlik@timesgroup.com

@FanindraMT

नाशिक : पोलिसांनी काही कारणास्तव ताब्यात घेतलेले तसेच अनाख असलेल्या बालकांसाठीच्या रिमांड होमची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. राज्यात निरीक्षण गृह आणि बालगृह यांची संख्या ४१ असून यापैकी तब्बल ३६ संस्थांमध्ये अधीक्षक नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

आई किंवा वडील नाहीत तसेच काही कारणास्तव पोलिसांनी निरीक्षण आणि बालगृहात ठेवलेल्या बालकांची देखरेख करण्यासाठी या संस्थांमध्ये राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने अधीक्षकांची नेमणूक केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याने ३६ ठिकाणची बालकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या ठिकाणी नियुक्त करण्यात येणारे अधीक्षक हे पद निवासी स्वरुपाचे आहे. त्यांना निरीक्षण गृहात व बालगृहात निवासी असणे कायद्याने बंधनकारक आहे. या ठिकाणी मुलांना किंवा मुलींना रात्री काही त्रास झाल्यास त्याची जबाबदारी घेण्यास सध्या कुणीही तयार नाही. मध्यंतरी काही मुलामुलींना वैद्यकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. सायंकाळी ६ वाजेनंतर येथे प्रवेश करण्यास सर्वांना मनाई आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही या आवारात प्रवेश करता येत नाही. अशा परिस्थितीत काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या ३६ ठिकाणी प्रभारी अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना वेळ मिळाल्यास तो अधिकारी या निरीक्षण व बालगृहांना भेटी देतो. सध्या या मुलासाठी सध्या फक्त एक केअर टेकर आहे. निरीक्षणगृह व बालगृह यांच्या पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र स्टेट प्रोबेशन अॅण्ड आफ्टर केअर असोसिएशन नावाची संस्था आहे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगण्यासाठी महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांनी विविध अडचणींचा पाढा वाचला; परंतु मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगत ही पदे भरण्यास नकार देण्यात आला.

नाशिकमध्ये बालके पोरकी

नाशिकमध्ये महिलांच्या निरीक्षण गृहाच्या महिला अधीक्षकांची जागा मे २०१८ पासून रिक्त आहे. तसेच मुलांच्या निरीक्षणगृहाची जागा ११ महिन्यांपासून रिक्त आहे. या निरीक्षण आणि बाल गृहात काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली बालके आह. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नशिकच्या मुलांच्या निरीक्षणगृहात ३२ पैकी ११ मुले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली आहेत. कोणत्याही निरीक्षण गृहात अधीक्षक नसणे ही बाब गंभीर आहे.

पदे रिक्त आहेत ही बाब खरी आहे. अतिरिक्त भरतीची बाब विचाराधीन आहे. बिंदू नामावलीत वेळोवेळी बदल होत असल्याने ही पदे भरता येत नाही. ही यादी प्रमाणित झाल्यानंतर लवकरच प्रक्रिया राबविली जाणार आहे.

- बी. एल. मुंडे, उपायुक्त प्रशासन,

महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे

राज्यातील ४१ पैकी ३६ ठिकाणी अधीक्षक नाहीत. ही बाब आमच्या संघटनेने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. याबरोबरच अनेक प्रलंबित मागण्या आहेत. अधीक्षक नसल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा.

- चंदुलाल शहा,

मानद सचिव, निरीक्षण गृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्त विद्यापीठात मिळणार नृत्ययोगसूत्राचे धडे

$
0
0

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात होत चाललेली प्रगती शरीराच्या टेक्नॉलॉजीला विसरू शकत नाही. कारण ती सुदृढ ठेवतच बाकीच्या उंची गाठणे शक्य आहे. म्हणूनच खरे स्वास्थ म्हणजे जेथे बाह्यांगासोबत अंतरंगही स्वस्थ असते. याचसाठी सहज सोपे आणि आनंदी माध्यम म्हणजे नृत्य. नृत्याच्या थेरापिटीक (उपचारपद्धती) अंगाने साध्य करता येतील अशा ७८ नवीन हालचालींची निर्मिती डॉ. संगीता पेठकर यांनी केली असून त्याचा समावेश असलेल्या नृत्ययोगसूत्राचे धडे आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गिरवले जाणार आहेत.

२०१४ पासून प्रकाश झोतात आलेली आणि देशात व परदेशातही प्रचलित होऊ पहात असलेले नृत्ययोगसूत्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या माध्यमातून सर्वांसाठी खुले झाले आहे. २०१९ पासून नृत्ययोगसूत्राचा एक वर्षाचा डिप्लोमा विद्यापीठाने सुरू केला आहे. नृत्ययोगसूत्रचा प्रचार, प्रसार होऊन नवीन माध्यम स्वास्थ प्राप्तीसाठी खुले व्हावे, हा त्यामागील उद्देश आहे. मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेतर्फे हा कोर्स घेतला जाणार असून बारावी पास किंवा दहावीनंतर दोन किंवा अधिक वर्ष शिक्षण घेतलेले कुठल्याही शाखेचे विद्यार्थी यासाठी पात्र असतील. या कोर्ससाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया खुली राहणार असून मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक स्वरूपाची आहे. एकूण ६ विषय ६०० मार्कांसाठी दिले गेले आहेत. त्या-त्या विषयांचे तज्ज्ञांद्वारे हे विषय शिकवले जातील. दूरस्थ शिक्षणपद्धतीद्वारे हे प्रशिक्षण घेतले जाऊ शकणार आहे त्यामुळे नाशिक शहराबाहेरील इच्छुकांना ही हा कोर्स सहज करता येणार आहे.

असे असेल नृत्ययोगसूत्र...!

या नवीन ७८ नृत्यातील हालचालींमध्ये समावेश आसन, मुद्रा, ऍक्युप्रेशर, चक्र आणि मेडिटेशनचा समावेश आहे. अत्यंत सोप्या आणि सहज तसेच योग तत्वाशी संलग्नित अशा या हालचाली कुणाही सर्वसामान्य स्त्री व पुरुषांना करता येतील अशा आहेत. कर्णमधूर आणि मेडिटेटिव्ह संगीताची जोड या साधनेला दिली जाते. संपूर्ण अभ्यासात्मक आणि अनेक तज्ज्ञांच्या मदतीने नृत्ययोगसूत्रची निर्मिती झाली आहे.

आपल्याच देशातल्या प्राचीन योगसाधना, नृत्यसाधना किती उपयुक्त आणि शास्त्रोक्त आहेत हे आपल्यापेक्षा बाहेरील जगाने चांगले ओळखले. म्हणूनच ते आत्मसात करणे व आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये आणणे त्यांना गरजेचे वाटले. नृत्ययोगसूत्रांतून अशाच काही टेक्निक शिकवण्यात येणार आहेत.

- डॉ. संगीता पेठकर, मार्गदर्शिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन समितीची रविवारी बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीमुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. १४) होणार आहे. ही बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यासाठी ७९१.३ कोटींचा आराखडा तयार केला आहे. यंदा सर्वसाधारण योजनांसाठी वाढीव १२ कोटींची तरतूद केली आहे. शिष्यवृत्ती थेट संबंधित विभागाकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने आदिवासी उपयोजनांमध्ये यंदा हा निधी समाविष्ट केला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनुसूचित जाती उपाययोजनांत ९७.५५ कोटींची तरतूद कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंजूर निधी खर्च करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या हॉलचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट ऑफ’ घसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थी व पालकांची अकरावी प्रवेशाची उत्कंठा वाढविणारी विज्ञानाची पहिली गुणवत्ता यादी यंदा चार टक्क्यांनी तर कॉमर्सची यादी तब्बल ६ टक्क्यांनी घसरली आहे. यंदा दहावीचा निकालही चांगलाच घसरल्याचा परिणाम पहिल्या गुणवत्ता यादीतील आकडेवारीवर दिसून आला. काही वर्षांपासून ९५ टक्क्यांना स्पर्श करणारी ही पहिली यादी विज्ञान शाखेत अग्रगण्य महाविद्यालयात खुल्या गटासाठी ९१ टक्क्यांवर तर, कॉमर्सची यादी ८७.९० टक्क्यांवर बंद झाली.

यंदा विविध अडसरांमुळे लांबलेली अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी प्रवेशेच्छुकांसाठी गतवर्षीच्या तुलनेत काहीसा सुखद धक्का घेऊन आली. यंदा प्रवेशाचा विज्ञान शाखेचा कट ऑफ ४ टक्क्यांनी, तर कॉमर्सचा ६ टक्क्यांनी घसरल्याने पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळविण्याचे अनेकांचे स्वप्न आवाक्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी अकरावी प्रवेशाचा 'कट ऑफ' जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची आकडेमोड सुरू झाली आहे. यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत उपलब्ध असणाऱ्या २३ हजार ८६० जागांसाठी २५ हजार ६९० अर्ज आले होते. पैकी २१ हजार ०२८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या यादीमध्ये १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे, तर पसंतीक्रमानुसार ६ हजार १६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. कला शाखेच्या २५६३ विद्यार्थ्यांना, वाणिज्यच्या ५६२९ विद्यार्थ्यांना, विज्ञानाच्या ६३९६ विद्यार्थ्यांना तर एमसीव्हीसी शाखेच्या २५७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे त्यांना दि. १३, दि. १५ आणि दि. १६ जुलै रोजी प्रवेश घेता येणार आहे. १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता पहिल्या गुणवत्ता यादीचे 'कट ऑफ' आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठीच्या उपलब्ध जागांची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

कृतिपत्रिकेचा परिणाम?

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कृतीपत्रिका मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. पारंपरिक अभ्यासपद्धतीच्या तुलनेत नवीन मूल्यमापनात विद्यार्थ्याला विषयाचे झालेले आकलन आणि अभिव्यक्ती यांसारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. ही पद्धती नवीन असल्याने त्याचा फटका काहीअंशी बसल्याचा शिक्षण विषयातील अभ्यासकांचा होरा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे कोटींसाठी साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेमुळे जिल्ह्यातील पतसंस्थांच्या २५० कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठेवी परत मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

जिल्हा बँक या ठेवी देत नसल्यामुळे पतसंस्थांना त्यांच्या कर्जदारांना कर्जवाटप करणे आणि दररोजचे व्यवहार करणे कठीण झाले असून, या पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास ठेवी परत मिळविण्याच्या मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले. केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यापासून या पतसंस्था अडचणी आलेल्या असताना आता बँकेच्या ठेवींच्या प्रकरणाने त्यात भर घातली आहे. बँकेने नोटाबंदी लागू झाल्यानंतर हात आखडते घेतले. त्यानंतर कर्जवसुली होत नसल्यामुळे बँकेने पतसंस्थांकडे दुर्लक्ष केले. या सर्व अडचणींमुळे पतसंस्थांच्या ठेवींचे पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या पतसंस्थांचा व्यवहारही ठप्प झाला आहे.

अडचणी केल्या नमूद

जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे, संचालक डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष के. के. चव्हाण, कार्याध्यक्ष नारायण वाजे आणि संचालक रमाकांत क्षीरसागर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेतली. यावेळी बँकेला ठेवींचे पैसे देण्याचे आदेश काढण्याची विनंती करून पतसंस्थांच्या अडचणीही नमूद केल्या. खेडकर यांनी त्यांना सकारत्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत वणवण

$
0
0

सिडको : पाणीकपात करण्याच्या उद्देशाने महापालिकेने गुरुवारी पाणीकपात सुरू केली असली तरी सिडकोत शुक्रवारीसुद्धा पाणीपुरवठा न झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवी ही वेळ आली. सिडकोतील नगरसेवकांनी याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या परिस्थितीची जाणीव करून देताच दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र तो ही कमी दाबाने झाला. शुक्रवारी पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांनी नगरसेवकांकडे धाव घेतली. यावेळी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, गुरुवारच्या बंद असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे लाइनमध्ये अडचण झाल्याचे सांगण्यात आले. याचवेळी सिडकोत पाणीपुरवठा करणाऱ्या एका व्हॉलला चक्‍क कुलूप लावल्याचे आढळून आल्याचे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

..

महापालिकेचे अधिकारी धारणकर यांनी सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉलला कुलूप लावून किल्ल्या स्वतःकडे ठेवल्याने पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. या संदर्भात आयुक्‍तांकडे कारवाईची मागणी करणार आहोत.

- दीपक दातीर, सभापती, सिडको विभाग

..

गुरुवारी पाणी पुरवठा बंद असताना शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहिल्याने महिलांचे खूप हाल झाले. येत्या महासभेत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

- किरण गामणे, नगरसेविका

.....

गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने पाइपलाइन कोरडी झाली होती. यामुळे शुक्रवारी पाणी वाहण्यास उशीर झाला. व्हॉलला कुलूप लावल्यामुळे कोणतीही अडचण झालेली नाही.

- गोकुळ पगारे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

........................

गोदाकाठावरील रहिवासी हैराण

पंचवटी : गोदाकाठच्या शनिचौक, सरदार चौक, मुठे गल्ली, सुकेणकर लेन या भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने रहिवासी हैराण झाले आहेत. गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला असला तरी पंचवटीतील गोदाकाठाच्या परिसरात पाणीपुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. यामुळे रहिवाशांना खासगी टॅँकरच्या साह्याने पाणी आणण्याची वेळ येत आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक पाचच्या परिसरातील काही भागात पाणीपुरवठाच होत नाही. येथील नागरिकांना प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. रामकुंड परिसरातही गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या जाणवत आहे.

...................................

सातपूरला रहिवाशी त्रस्त

सातपूर : गुरुवारी बंद ठेवण्यात आल्याने शुक्रवारी विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याने रहिवाशी त्रस्त झाले. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, मोकळ्या झालेल्या पाइपलाइन भरण्यास वेळ लागला असल्याचे सांगण्यात आले. उशिराने पाणी मिळाल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक नगरसेवकांना विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही भागात वेळेवर पिण्याचे पाणी, तर काही भागात उशिराने असे का याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

........

नाशिकरोडला पाणीबाणी

नाशिकरोड : शुक्रवारी चेहेडी पंपिंग, खर्जुल मळा, मनपा शाळा १२५ परिसर, विहितगाव, पिंपळगाव खांब, विजयनगर, मराठा कॉलनी, सिन्नर फाटा, एकलहरे रोड, सामनगाव रोड, चेहेडी, आर्टिलरी सेंटर रोड या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. गुरुवारी दोन्ही वेळचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने पाइपलाइन रिकामी होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ही पाइपलाइन भरण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. पाइपलाइनमध्ये एअर प्रॉब्लेम आल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अविनाश भोये यांनी दिली.

..

विहितगाव, पिंपळगाव खांब या परिसरात काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येते. गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्याने पाइपलाइन रिकाम्या होत असल्याने दुसऱ्या दिवशी या पाइपलाइनला एअर प्रॉब्लेम येतो.

- सरोज आहिरे, नगरसेविका

...

शुक्रवारी संपूर्ण प्रभागात सकाळी पाणीपुरवठाच झाला नाही. एक दिवस पाणीपुरवठा बंदच्या निर्णयाने ही समस्या निर्माण झाली आहे. हा निर्णय रद्द करावा आणि पाण्याची समस्या दोन दिवसांत न सोडविल्यास हंडा मोर्चा काढण्यात येईल.

- जयश्री खर्जुल, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय वाघ यांना उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) सानेगुरुजी कथामाला बालभवनतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार संजय वाघ यांना जाहीर झाला आहे.

'सावाना'तर्फे घेण्यात आलेल्या 'आनंदाने वाचू' या बालसाहित्यिक उपक्रमात तीन लेखकांची पुस्तके मुलांना वाचावयास देण्यात आली. त्यात विशाल तायडे यांचे 'प्राण्यांचे व्हॅाट्सअॅप व इतर गोष्टी', संजय वाघ यांचे 'जोकर बनला किंगमेकर' आणि संगीता बर्वे यांचे 'पियुची वही' या पुस्तकांचा समावेश होता. या तीनही पुस्तकांचे वाचन करून गुप्त पद्धतीने मतदान घेऊन उत्कृष्ट बालसाहित्यिक निवडला गेला. यात वाघ यांची निवड झाली.

बालसाहित्यिक पुरस्काराचे वितरण मंगळवारी (दि. १६) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. कार्यक्रमाला 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्री मिताली साळगावकर, लेखक व शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती असेल. यात नाशिक महापालिकेच्या ३२ शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. या शाळांमधक्षल विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर, सहाय्यक सचिव अभिजित बगदे, बालभवन प्रमुख संजय करंजकर, बालभवन समिती आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवड गुरुवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभापतिपदासह अन्य चार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक होणार आहे.

लोकसभा आणि त्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीमुळे स्थायी समिताच्या सभापतिपदाची निवडणूक रखडली होती. परंतु, मंगळवारी स्थायीच्या एक रिक्त सदस्याच्या निवडीसह शहर सुधारणा, विधी,

महिला व बालकल्याण, वैद्यकीय आणि आरोग्य समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली. त्यानंतर सभापती निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी स्थायी समिती सभापतीसह अन्य चार समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १८ जुलै रोजी या पाच समित्यांच्या सभापतींची निवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम :

स्थायी समिती सभापती : १८ जुलै दु. २ वा.

विधी सभापती, उपसभापती : १८ जुलै दु. ३.३०

शहर सुधारणा सभापती, उपसभापती : १८ जुलै : ४.३०

वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती, उपसभापती : १८ जुलै : ५.३०

महिला व बालकल्याण सभापती, उपसभापती : १८ जुलै : ६.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रो, उड्डाणपूल संयुक्तपणे होणार

$
0
0

महापालिका बैठकीतील निर्णय; तांत्रिक अडचणी दूर करणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सारडा सर्कल ते नाशिकरोड, दत्त मंदिरापर्यंत उड्डाणपूल टाकला जाणार असल्याने देशातील पहिल्या टायरबेस्ड मेट्रोनिओ पुढे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मेट्रोनिओच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महामेट्रो आणि न्हाईच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एकत्रित बैठक घेत, यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता सयुंक्त उड्डाणपूल तयार करण्यासह भूयारी मार्गाचीही चाचपणी केली जात आहे. त्यामुळे मेट्रोनिओचे न्हाई आणि महाापलिकेतर्फे संयुक्त नियोजन केले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महामेट्रोच्या वतीने आराखडा तयार झाल्यानंतर त्यांनी रेल्वेमेट्रोऐवजी टायरबेस्ड मेट्रो सुरू करण्याचा पर्याय सुचवला. त्यानुसार राईटस कंपनीमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. 'महामेट्रो'ला अंतिम स्वरुप मिळण्यापूर्वी ३१.४० किलोमीटरवरील रस्त्याची तांत्रिक बाबी तपासल्या जात आहे. सारडा सर्कल ते नाशिकरोड दरम्यानचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यामुळे या रस्त्यावर अगोदरच महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल करण्याचे नियोजन केले आहे. तर दुसरीकडे याच मार्गावर महामेट्रो एलिव्हेटेड स्वरुपाचा मार्ग साकारणार आहे. द्वारका सर्कल येथे यापूर्वीच मुंबई-आग्रा महामार्गावरून उड्डाणपूल तयार केला आहे. त्यावरून एलिव्हेटेड व पुढे महामार्ग प्राधिकरणाचा दत्तमंदिरपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. द्वारका जंक्‍शनला क्रॉसिंग तर पुढे दोन उड्डाणपूल झाल्यास अडचण निर्माण होईल आणि जागेची उपलब्धता लक्षात घेता ते शक्‍य नसल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आले. तसे महामेट्रो व महामार्ग प्राधिकरणाला कळविण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर महामेट्रोचे संचालक निर्मलकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी शहरात या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या मार्गाचे आता संयुक्त नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार उड्डाणपूल सोबतच भूयारी मार्गाचाही अवलंब करण्याचाबाबत विचार सुरू झाला आहे. त्यामुळे सारडा सर्कल बिटको चौकांपर्यतच्या मार्गाची रचना एकत्रितपणे केली जाणार आहे.

महापालिकेवर १० टक्के भार

प्रकल्पाची किंमत जवळपास १९८० कोटींपर्यंत वाढणार आहे. यासाठीचा काही खर्च हा केंद्र आणि राज्य सरकार करणार आहेत. तर महापालिकेला १० टक्के भार उचलावा लागणार आहे. त्यामुळे बससेवेसोबत मेट्रो सेवेचेही आर्थिक खर्चाचे ओझे महापालिकेच्या अंगावर येणार आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेला एवढा खर्च उचलावा लागणार असल्याचे आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटवर सट्टा; दोन संशयित गजाआड

$
0
0

नाशिक : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्याच्यावेळी सट्टा खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सात मोबाइल, टॅब, लॅपटॉप असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निशिकांत प्रभाकर पगार (रा. समर्थनगर, भद्रकाली), महेंद्र अशोक वैष्णव (रा. शामपूजा अपार्टमेंट, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. इंदिरानगर परिसरातील सदिच्छानगरमधील रुंग्टा सफायर इमारतीतील एका सदनिकेमध्ये ते इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या संघांमधील सामन्यावर सट्टा खेळणाऱ्यांना सट्ट्याबाबत माहिती पुरवित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांनी सोडले शिंदेंबाबतचे मौन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जाहिरातबाजी करून उमेदवारी मागण्याची पद्धत कुठल्याच राजकीय पक्षात नाही, असे सांगत मी कुठे उमेदवारी करावी याबाबत पक्षाच निर्णय घेईल. येत्या विधानसभा निवडणुकीत येवल्यातून मी उमेदवारी करणार नसेल, तर येवल्यात अनेक योग्य उमेदवार आहेत. या सर्वांचा आढावा घेऊन पक्ष अंतिम निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी येवल्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

आषाढी एकादशीचे साधून शुक्रवारी सकाळी आमदार भुजबळ यांनी येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलाचे कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. यंदा राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, अशी विठ्ठलचरणी प्रार्थनाही त्यांनी केली. दर्शनानंतर मंदिराबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, की मी कुठे उभे राहावे याची मागणी नागरिकांनी करणे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचा मी सन्मान करतो. आपला पक्ष ठरवेल त्या ठिकाणी मी आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. याबाबत सर्व निर्णय पक्षच घेईल. येवल्यात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी अंबादास बनकर यांच्यासह अनेक योग्य उमेदवार आहेत. याबाबत पक्ष निर्णय घेऊन उमेदवारी देईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी वसंत पवार, साहेबराव मढवई, महेंद्र काले, संजय बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, प्रकाश वाघ, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, सचिन कळमकर, सोनाली कोटमे, राजश्री पहिलवान, दीपक लोणारी आदी उपस्थित होते.

---

वैजापूरमधून उमेदवारीचे साकडे

दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबातील कोणीही वैजापूरमधून उमेदवारी करावी, असे साकडे सर्वपक्षीयांनी घातले. वैजापूर विकास नागरिक कृती समितीतर्फे शुक्रवारी वैजापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने शेकडो कार्यकर्त्यांसह येवल्यातील संपर्क कार्यालयात भुजबळांची भेट घेऊन उमेदवारीसाठी गळ घातली. ज्ञानेश्वर घोडके, सुनील गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, नीलेश चाफेकर, अशोक देवकर, एल. एम. पवार, काशीनाथ गायकवाड, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते. भुजबळांनी सर्वांचे मनोगत जाणून घेत पक्षावर निर्णय सोपवला. यावेळी येवल्यातील समर्थकांनी भुजबळांना येवल्यातून जाऊ देणार नाही, अशी घोषणाबाजी करीत ठिय्या दिला. त्यांचीही भुजबळांनी समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरहून १०० बसद्वारे भाविक माघारी

$
0
0

आषाढी एकादशी यात्रेला वाढता प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा बसला पंढरपूर येथूनही मोठा प्रतिसाद मिळाला. दर्शन घेतल्यानंतर भाविकांसाठी १०० हून अधिक बस नाशिकमार्गे शुक्रवारी निघाल्या. जिल्ह्यातील विविध भागातील भाविक पंढरपूरला गेले होते. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी या बस सोडण्यात आल्या.

नाशिकहून १९ जुलैपर्यंत बस पंढरपूरसाठी नाशिक, मालेगाव, सटाणा, मनमाड, सिन्नर, लासलगाव, नांदगाव, इगतपुरी, येवला, कळवण, पेठ व पिंपळगाव बसस्थानकांवरून सोडण्यात येत आहेत. या बस परतीच्या प्रवासाठी सुद्धा असल्याने त्याचा लाभही भाविकांनी घेतला. बरेच भाविक दिंडी घेऊन गेले आहे. त्यांनी सकाळी दर्शन घेतल्यानंतर दुपारपासून परतीच्या प्रवासाठी सुरुवात केली. सायंकाळी ७ पर्यंतच १०० बसेस सोडण्यात आल्या. पंढरपूर पासून ७ किलोमीटरवर नाशिक, अहमदनगर जवळ असलेल्या जिल्ह्याचे बस स्थानक तात्पुरते तयार केले आहे. येथून प्रत्येक जिल्हयाच्या बस येथून परतीचा प्रवास करतात.

राज्यभरातून एसटीने ३ हजार ७२४ बस सोडण्याचे नियोजन केल्याने या बसेसला परतीच्या प्रवाशाठी अशीच गर्दी होती. गेले काही दिवस पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांनी एसटीच्या सेवेला प्रतिसाद दिला. आषाढी एकादशीनंतर १६ जुलै रोजी गुरुपौर्णिमा असल्याने त्या दिवशीही भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे त्यासाठी एसटी प्रशासनाने नियोजन केले आहे. येथेही जिल्ह्यातील १२ आगारांतून बसेस पंढरपूरला जाणार आहे.

दर्शन घेतल्यानंतर पंढरपूर येथून भाविकांना घेऊन १०० हून अधिक बसेस रवाना झाल्या आहे. जिल्ह्यातील विविध भागातील भाविक यात आहे. पंढरपूर यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात्रा १९ पर्यंत आहे, तोपर्यंत या बसेस धावणार आहे.

- नितीन मैंद,

विभाग नियंत्रक, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील धरणांच्या पाहणीचे निर्देश

$
0
0

अहवाल सादर करण्याच्या यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणे, बंधारे व लघुसिंचनाचे प्रकल्प सुरक्षित आहेत की नाही याबाबतची खातरजमा करून आठ दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला दिले.

राज्यात काही भागात पावसाचा जोर अधिक असून यामुळे धरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी गुरुवारी (दि. ११) व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून धरण सुरक्षेच्या मुद्दयाबाबत चर्चा केली. धरण सुरक्षा मंडळानेही धरणांच्या सुरक्षेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

यांच्याकडे जबाबदारी

जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराचे मिळून २४ धरणे आहेत. या धरणांची स्थिती नेमकी कशी आहे याची पाहणी करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोरे यांना देण्यात आले आहेत. जलसंधारणचे स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता प्रवीण खेडकर यांच्याकडे जिल्हाभरातील बंधाऱ्यांची काय स्थिती आहे, याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर लघुसिंचनच्या अधिकारी उज्वला बावके कोळसे यांच्यावर जिल्हा परिषदेच्या अख्त्यारीतील लहान मोठ्या जलाशयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध यंत्रणेमार्फत पाहणी करावी असे आदेशात म्हटले आहे.

धरणे अथवा अन्य जलाशयांलगत राहणाऱ्या रहिवाशांच्या जिवीताला बाधा निर्माण होऊ नये याकरीता धरणे, बंधारे व अन्य जलाशयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या जलाशयांमधून पाणी गळती होत असल्यास ती तात्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य व्हावे याकरीता ही पाहणी महत्वाची ठरेल.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती महिलेची पंचवटीत आत्महत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील मधुबन कॉलनी परिसरात राहणाऱ्या गर्भवती महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. गीता अनिल पंडित (वय १९) असे तिचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता आणि अनिल यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. तिने शुक्रवारी दुपारी घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाला होता. पंचवटी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोलपांचे आव्हान कोण पेलणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देवळाली मतदारसंघातील शिवसेनेचे वर्चस्व लोकसभा निवडणुकीतही टिकवून ठेवण्यात घोलप पिता-पुत्रांना यश आले आहे. गेल्या विधानसभेपेक्षा लोकसभेतील मताधिक्य वाढले असले, तरी यंदा आमदार योगेश घोलप यांना भाजप आणि राष्ट्रवादीतल्या मातब्बर उमेदवारांशीही संघर्ष करावा लागणार आहे.

वंचित आघाडीनेही लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवल्याने त्यांचे आव्हानही घोलपांसह आघाडीच्या उमेदवाराला पेलावे लागणार आहे. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असली, तरी आमदार घोलप यांनी गेल्या साडेचार वर्षांत विकासासोबतच जनसंपर्कही वाढवला असल्याने घोलप पिता-पुत्र बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचीच अधिक शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील देवळाली मतदारसंघ हा अर्धशहरी आणि ग्रामीण आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांचा एकछत्री अंमल आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात घोलपांना शिक्षा झाली. त्यामुळे सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर त्यांच्यावर बंदी आली. ऐनवेळी घोलप यांनी पुत्र योगेश यांना उमेदवारी मिळवून देत विजयश्रीही खेचून आणली होती. गेल्या वेळेस घोलप यांच्याविरोधात भाजपच्या रामदास सदाफुले आणि राष्ट्रवादीच्या नितीन मोहितेंनी दंड थोपटले होते. त्या परिस्थितीतही २८ हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेची आघाडी मात्र वाढली आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना येथून ४१ हजार १३३ मतांची आघाडी मिळाल्याने घोलपांना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चितच आहे. सध्या तरी घोलप यांना शिवसेनेत पर्याय नसला, तरी भाजपमधून मात्र त्यांना आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच घोलपांच्या विरोधात निवडणूक लढलेले रामदास सदाफुले आणि नगरसेविका सरोज अहिरे यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वेळेस मनसेकडून निवडूक लढविलेले प्रताप मेहरोलियाही भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे युती झाली, तर ही मंडळी काय करणार, यावरही बरेच काही अवलंबून आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या लक्ष्मण मंडाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मंडाले या मतदारसंघात प्रचार करीत आहेत. त्यामुळे मंडालेंचेही आव्हान आमदार घोलप यांना पेलावे लागणार आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. नाशिकच्या तहसीलदारपदी कार्यरत असताना अहिरराव यांनी रेशन कार्डांच्या माध्यमातून जनसंपर्क प्रस्थापित केला आहे. त्यामुळे अहिरराव भाजपकडून लढतात, की राष्ट्रवादीकडून याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. पक्षाबाबत तूर्त तरी त्यांनी 'वेट अँड वॉच'चे धोरण स्वीकारले आहे. युती तुटल्यास त्या भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता अधिक आहे.

-

'वंचित आघाडी'चा फॅक्टर

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवार यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. पवन पवार यांना २४ हजार ४५९ मते मिळाल्याने या मतदारसंघावर वंचितही दावा असणार आहे. या मतदारसंघात पवन पवार किंवा गेल्या वेळेस बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविलेले प्रा. संजय जाधव यावेळी वंचितकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचितचा फॅक्टरही या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार असून, हा फॅक्टर घोलपांप्रमाणेच राष्ट्रवादीसाठीही डोकेदुखी ठरणार आहे.

--

'मराठा कार्ड'चा प्रभाव

हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असला, तरी या मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. मराठापाठोपाठ ओबीसी मतदारांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी ज्याच्या पाठीशी त्याचा विजय निश्चित असतो. आतापर्यंत हे दोन्ही समाज घोलपांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. या मतदारसंघातील ७० टक्के भाग ग्रामीण आहे. तेथील मतदारांच्या कलावरच उमेदवाराचा विजय अवलंबून असतो. बबनराव घोलप यांनी ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असले, तरी आमदार योगेश घोलप यांनी मात्र ती उणीव भरून काढली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना पक्षातूनही आव्हान मिळण्याची शक्यता कमीच आहे.

--

...असे आहेत पक्षनिहाय इच्छुक

--

भाजप : रामदास सदाफुले, सरोज आहेर, प्रताप मेहरोलिया, शरद मोरे, प्रीतम आढाव

शिवसेना : आमदार योगेश घोलप

राष्ट्रवादी काँग्रेस : लक्ष्मण मंडाले, रविकिरण घोलप, सुनील कोथमिरे, यशवंत शिरसाठ, नितीन मोहिते, गौतम दोंदे

वंचित आघाडी : पवन पवार, प्रा. संजय जाधव

--

विधानसभेसाठी २०१४ मध्ये झालेले मतदान

--

योगेश घोलप- शिवसेना- ४९,७५१

रामदास सदाफुले- भाजप- २१,५८०

नितीन मोहिते- राष्ट्रवादी काँग्रेस- १८,४०२

प्रताप मेहरोलिया- मनसे- १५,००१

गणेश उन्हवणे- काँग्रेस- ९,११५

-----

लोकसभेसाठी २०१९ मध्ये झालेले मतदान

--

हेमंत गोडसे- शिवसेना- ८०,६८८

समीर भुजबळ- राष्ट्रवादी- ३८,७५५

पवन पवार- वंचित आघाडी- २४,४५९

माणिकराव कोकाटे- अपक्ष- १०,०९६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधक आहेत का, याचा शोध सुरू: संजय राऊत

$
0
0

नाशिक

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधत असल्याचा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळत नसून त्यांनी अध्यक्षपदासाठी जाहिरात दिली असल्याचा खोचक टोला राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला लगावला आहे.

नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. राज्यात मागील चार वर्षे विरोधकांची भूमिका शिवसेनेने बजावली. त्यावेळी विरोधक झोपले होते का, असा सवालही त्यांनी केला. थोडेफार राहिलेले राजकीय पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये विलीन होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेत असलेल्या त्रुटी दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका शिवसेनेची असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी स्वत: आंदोलन करावे अथवा त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
काँग्रेस पक्षातील आमदार का फुटयाय, कर्नाटक मधील सरकार का अस्थिर आहे, याच आत्मचिंतन राहुल गांधी यांनी करायला हवं. मात्र, स्वतः राहुल गांधी यांनी नेतृत्वाच्या जवाबदारीपासून पलायन केले आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे राऊत यांनी म्हटले. काँग्रेसने अनेक सरकार पाडली असून राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

कर्नाटकमधील आमदार मुंबईत आले असतील तर ते मुंबईत असून पाकिस्तानमध्ये नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजून घेता येईल.
आमचा महाराष्ट्राच्या बेळगावचा सीमा प्रश्न आहे, अनेक देवळात जाताय, देव त्यांना सद्बुद्धी देईल आणि सीमा भागातील जो सातत्याने अत्याचार सुरू आहे त्यासंदर्भात एक चांगला निर्णय घेतील अशी आम्ही प्रार्थना करत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसाठी आला ११ कोटींचा निधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

टँकरने पाणीपुरवठा व विहीर अधिग्रहण करण्यासाठी जिल्हा परिषदेला ११ कोटी ९५ लाख ८२ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्ती, निकड व पाणीपुरवठ्याच्या योजनांवर झालेल्या खर्चासाठी हा निधी दिला जाणार आहे. यापूर्वी अनुदान उपलब्ध नसल्याने जिल्हा देखभाल दुरुस्तीच्या निधीतून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी तालुका स्तरावर वितरित करण्यात आला होता. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी १५ तालुक्यांसाठी १० कोटी ९१ लाख ८२ हजारांच्या निधी वितरणास मंजुरी दिली आहे.

हा निधी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी व विहीर अधिग्रहणासाठीच्या बाबींवरच खर्च करावयाचा असून, त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी सांगितले. टँकरसाठीचे देयक अदा करताना पाणीपुरवठा करणाऱ्या जीपीएस प्रणाली टँकरने पाणीपुरवठा करून जीपीएस प्रणालीवर नोंद झालेल्या टँकरचे देयक अदा करावयाचे आहे. टँकरवर ही प्रणाली नसेल किंवा असूनही बंद असेल तर वाहतूकधारकाने टँकरच्या फेऱ्या केल्याचा दावा केला असल्यास अशा फेऱ्या बनावट ठरतील. त्यावर त्यांना अनुदान वितरीत न करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी निधी खर्च झाल्यावर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार डॉ. गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच पुढील निधीचे नियोजन करण्यात येणार आहे.

१३ योजनांसाठी कार्यारंभ आदेश

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १३ नळपाणी पुरवठा योजनांच्या कार्यारंभ आदेशांना शनिवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली. यामध्ये पेठ तालुक्यातील पाटे, चोळमुख, उम्रद, नाशिक तालुक्यातील शिवणगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, जातेगाव, कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द, पुणेगाव निफाड तालुकयातील मुखेड, बागलाण तालुक्यातील कऱ्हे, सिन्नर तालुक्यातील सोनगिरी व पास्ते व मालेगाव तालुक्यातील मोरदर या योजनांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत झीरो पेंडन्सीची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेला शनिवारी सार्वजनिक सुटी असतानाही अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित राहिले व दिवसभर काम केले. झिरो पेंडन्सी राहावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटीचा दिवस कामकाजात घालवला. रविवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे. त्यातही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटी कामकाजातच जाणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये नेहमी फाइल पेंडन्सीचा विषय नेहमीच कळीचा ठरतो, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे कामही रेंगाळते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यावर सदस्यही नेहमी हा विषय चर्चेत घेतात. त्यामुळे कोणतेही कामकाज प्रलंबित राहू नये, यासाठी सुटीच्या दिवसातही कामकाज करण्यात आले. या कामकाजामागे विधानसभा निवडणुकीचे कारण आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता असल्यामुळे त्यात बराच वेळ कामकाज ठप्प झाले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुका जवळ असल्यामुळे त्यात आचरसंहिता आड येणार आहे. त्यामुळे यातील काही कामे ही प्रलंबित पडू नये, याची काळजी घेण्यात आली आहे.

सर्वच विभागांत कामकाज

जिल्हा परिषदेचे वेगवेगळे विभाग आहेत. या सर्व विभागात हे कामकाज सुरू होते. त्यात अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. सुटी असल्यामुळे येथे पदाधिकारी व सर्वसामान्यांचे येण्या-जाण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे कामकाज करण्यासही सर्वांना वेळ मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी समस्यांवर थेट ‘वॉच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नाशिक इ-कनेक्ट अॅपद्वारे नागरिकांनी नोंदविलेल्या समस्यांवर व तक्रारींवर माझा थेट 'वॉच' असल्याने महापालिकेचे अधिकारीदेखील तक्रारी निवारण्यासाठी कटिबद्ध आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. 'मटा सिटिझन रिपोर्टर्स'शी त्यांनी महापालिका मुख्यालयात संवाद साधला.

या अॅपवर नोंदविलेल्या समस्यांचे अतिशय पारदर्शक पद्धतीने ट्रॅकिंग होत असून, या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशिष्ट वेळेची व दिवसांची मर्यादा आहे. विलंब होणाऱ्या तक्रारींचे अहवाल थेट माझ्याकडे येतात, असेही आयुक्तांनी नमूद केले. शहराच्या विविध भागातील नागरी समस्या 'मटा सिटिझन रिपोर्टर्स' पाठवित असतात. या समस्या दररोज 'मटा'मध्ये प्रसिद्ध होतात. शहराचे पालकत्व महापालिकेकडे असल्याने नागरी समस्यांचे निराकरण आणि महापालिकेची कार्यपद्धती जाणून घेता यावी यासाठी महापालिका आयुक्तांशी थेट संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजीव गांधी भवन या महापालिका मुख्यालयात आयुक्त गमे यांनी संवाद साधला.

स्मार्ट सिटी, तसेच महापालिकेच्या कारभारावर हा संवाद झाला. 'मटा सिटिझन रिपोर्टर अॅप'च्या माध्यमातून प्रशासनाच्या सकारात्मक व नकारात्मक बाबी समोर येत असून, अनेकदा कार्यवाही करताना याचा फायदा होत असल्याचे आयुक्त गमे म्हणाले. नागरिक, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचा ग्रुप तयार करत नागरी समस्या सोडविण्यावर भर देणार आहोत. जेव्हा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वयाची भूमिका असते, तेव्हा सर्व समस्यांवर तोडगा निघतो. यासाठी प्रशासनाच्या अयोग्य बाजूंसह योग्य बाजू प्रकाशझोतात आणण्याची जबाबदारी नागरिकांची असून, या माध्यमातून विकासकामांचा आलेख कायम उंचावतो, असे आयुक्तांनी सांगितले. 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी आयुक्तांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. चीफ रिपोर्टर भावेश ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

--

सफाई कर्मचाऱ्यांचेही जिओ फेन्सिंग

नागरिकांकडून महापालिकेकडे येणाऱ्या ऑनलाइन तक्रारींसंदर्भात बोलताना गमे म्हणाले, की प्रत्येक ऑनलाइन तक्रारीचे मॅपिंग होत असून, त्याला विशिष्ट अवधी देण्यात आला आहे. त्या अवधीत कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर त्याचे रिपोर्ट माझ्यापर्यंत लगेच येतात. त्यामुळे प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात असून, रि-ओपन होणाऱ्या तक्रारीदेखील तपासल्या जात आहेत. शिवाय घंटागाडीप्रमाणे लवकरच सफाई कर्मचाऱ्यांचेही जिओ फेन्सिंग होणार असून, स्वच्छतेसंदर्भात प्रत्येक अपडेट ठेवले जाणार आहेत.

--

नाशिकची 'ओळख'

नाशिक स्मार्ट सिटी होत असून, शहराची माहिती प्रत्येकाला व्हावी. या हेतूने शहराच्या प्रवेशद्वारावर मिग विमानाच्या प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) सहकार्य लाभले आहे. या संकल्पनेमुळे नाशिकची वेगळी ओळख पर्यटकांसमोर उभी राहत आहे. त्याचप्रमाणे महिंद्रा कंपनी आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्याने शहराच्या प्रवेशद्वारांवर नाशिकची संस्कृती कलेच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. जेणेकरून स्मार्ट सिटीसह नाशिकशी संबंधित विविध क्षेत्रांची माहिती शहरात येणाऱ्या प्रत्येकाला होईल, असे आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले.

--

चर्चेचे क्षण कॅमेराबद्ध

या संवादात मटा सिटिझन रिपोर्टर्सनी स्वच्छता, रस्ते, नालेसफाई, शाळा, कॉलेजेस, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, रस्त्यातील झाडे यांसह इतर समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. नागरिकांनीही आपल्या जबाबदाऱ्या ओळखून ज्या गोष्टी खरंच अयोग्य आहेत, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायला हव्यात, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले. संवादाच्या अखेरीस सिटिझन रिपोर्टर्सनी आयुक्तांसोबत सेल्फी घेत या चर्चेचे क्षण कॅमेराबद्ध केले.

--

सिटिझन रिपोर्टर्सनी मांडलेल्या समस्या...

--

-ऑनलाइन तक्रारी फक्त बंद करण्याचा प्रयत्न होतो

-तक्रारीनंतर अधिकारी येतात. पण, त्यानंतर पुन्हा स्थिती जैसे थे होते

-टागोरनगर परिसरात सफाई कामगार नियमित येत नाहीत

-जेलरोड परिसरात पथदीपांना पडलाय झाडांच्या फांद्यांचा विळखा

-नारायणबापूनगर परिसरात शाळा सुटताना वाहतूक कोंडी नित्याची

-महापालिकेच्या शाळांची झालीय दयनीय अवस्था

-महापालिकेच्या शाळांना रंग नाही, तसेच छत गळणारे आहे

-शहरात येणाऱ्या मजुरांसाठी निवारा शेड असावे

-तारावालानगर परिसरात स्पीड ब्रेकर्स असावेत

-पेठरोडवरील कॅनॉलची वेळोवेळी स्वच्छता व्हावी

-तारावालानगर जवळील रिंगरोडला दुभाजक असावेत

-राणेनगर परिसरात कचरा साचला असून, डास वाढले आहेत

-मखमलाबाद परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे

-पिंपळगाव खांब येथील रस्ता खचला आहे

-स्मार्ट सिटीत महापालिका हद्दीतील खेड्यांकडे दुर्लक्ष नको

-महापालिकेतही नोकरभरती करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसार भारतीमध्ये भरती

$
0
0

प्रसार भारतीमध्ये भरती

एमबीए उत्तीर्णांना संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव या पदासाठी भरती जाहीर झाली असून, एमबीए पदवीधर उमेदवार याकरिता पात्र आहेत. यासाठी ६ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. देशातील १९ शहरात ही भरती होणार असून, अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांना भरती संदर्भात पुढील माहिती इ-मेलद्वारे कळविण्यात येईल, असे प्रसार भारतीतर्फे सांगण्यात आले आहे.

मार्केटिंग एक्झिक्युटिव आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव 'अ' श्रेणी या दोन पदांच्या एकूण ६० जागांकरिता प्रसार भारती अंतर्गत भरती होत आहे. यामध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव पदाच्या ४२, तर 'अ' श्रेणी पदाच्या १८ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एमबीए मार्केटिंग या विषयात पदवी उत्तीर्ण आणि अनुभवी उमेदवार पात्र असल्याचे प्रसार भारतीतर्फे सांगण्यात आले आहे. http://prasarbharati.gov.in/ या वेबसाइटवर भरती संदर्भात अधिक माहिती अपलोड करण्यात आली असून, इच्छुकांनी ६ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images