Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरात पाऊस पुन्हा सक्रिय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात बुधवारी पुन्हा पाऊस सक्रिय झाला. शहरात दिवसभरात १०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.

शहरात बुधवारी दुपारनंतर संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कधी संततधार, कधी भुरभुर तर कधी उघडीप असा अनुभव शहरवासीयांनी घेतला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांमध्ये १०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकमध्ये सर्वाधिक ८७ मिलीमीटर पाऊस पडला. इगतपुरीत ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक, पेठ, सुरगाणा, चांदवड, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये जेमतेम पाऊस पडला. तर सिन्नर, देवळा, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाने दांडी मारली.

गंगापूर धरण ४१ टक्के भरले

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर आणि रात्रीही चांगला पाऊस झाल्याने हे धरण ४१ टक्के भरले आहे. गौतमी २६ टक्के, काश्यपी २९ टक्के तर आळंदी धरण २० टक्के भरले आहे. इगतपुरी तालुक्यातही चांगला पाऊस झाल्याने दारणा आणि भावली धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे. दारणा धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ५२ टक्के तर भावली धरण ५५ टक्के भरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडी कामगारांची भरपावसात निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट, गमबूट, अत्यावश्यक साधने उपलब्ध व्हावीत, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटागाडी कामगारांनी बुधवारी (दि. १०) श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर भरपावसात निदर्शने केली.

घंटागाडी कामगारांचे वेतन दरमहा १० तारखेच्या आत व्हावे. कामगारांचा पीएफ, ईएसआय नियमित भरावा. एकवीस दिवसांच्या भरपगारी रजेचे २०११ पासूनचे थकीत वेतन मिळावे, पंचवटी विभागातील कामगारांना २०१६ मधील दिवाळी बोनस, तसेच नवीन नाशिक विभागातील कामगारांचे गतवर्षाची बोनसची थकीत रक्कम मिळावी, घंटागाडी वाहनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे नियमित व्हावीत, आदी मागण्यांचे निवेदन श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांच्या नेतृत्वाखालील घंटागाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केले. या आंदोलनात शिवनाथ जाधव, रफीक सय्यद, कैलास मोरे, सुभाष गवारे, नंदू सकट, नितीन शिराळ आदी कामगार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे लष्करात जवान भरती

$
0
0

- नाव व जन्मतारखेत केले फेरबदल

- पडताळणीवेळी प्रकार उघडकीस

- उपनगरला गुन्हा दाखल

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जन्मतारीख व नाव बदलून बनावट कागदपत्रांद्वारे लष्करात सोल्जर पदावर भरती होऊन सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात एकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

लायन्स नायक नवनाथ आव्हाड यांनी तक्रारी दिली आहे. नायक हे नवीन भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देतात. गेल्या चार महिन्यांपासून नवीन भरती झालेला जवान यदलापल्ली दुर्गाप्रसाद (वय १९, रा. पुरुषोथापल्ली, निदादवले, जि. वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश) हा नाशिकरोडच्या आर्टिलेरी सेंटरमध्ये जवानाचे प्रशिक्षण घेत होता. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे २४ सप्टेंबर २०१८ रोजी लष्कर भरती घेण्यात आली. त्यात शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा झाली. उत्तीर्ण झालेल्या व या पदासाठी लागणाऱ्या मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात आली. भरतीत उत्तीर्ण झालेले उमेदवार हे प्रशिक्षणासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड येथे आले. या उमदेवारांची शैक्षणिक व इतर मूळ कागदपत्रे सत्यता पडताळणीसाठी आर्टिलरी सेंटरने उमेदवारांच्या घराशी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवली. यदलापल्ली याच्या शैक्षणिक कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी २४ नोव्हेंबर २०१८ ला त्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली होती. या कार्यालयाचा अहवाल आर्टिलरी सेंटरला मिळाला. अहवालात यदलापल्लीने भरती होताना मूळ कागदपत्रे पॅनकार्ड, आधारकार्ड, जन्माचा दाखला, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट सादर केली होती. त्यात यदलापल्लीचे नाव यदलापल्ली दुर्गाप्रसाद एवजी यदलापल्ली दुर्गारामप्रसाद असे आणि जन्मतारीख १५ मे १९९५ ऐवजी १५ मे १९९९ अशी आढळली. त्याने मूळ जन्मतारीख व नाव बदलून बनावट कागदपत्रे तयार करून लष्करात सोल्जर पदावर भरती होऊन सरकारची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. लेफ्ट. कर्नल राजेश मिश्रा यांनी नायक यांना पोलिस ठाण्यात तक्रारीचे आदेश दिले. त्यावरून फिर्याद दाखल करण्यात आली व उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची चौकशी

$
0
0

नाशिक

राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी सुरू केली आहे. नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे वेतन, दिवाळी बोनस, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पिंगळे यांची चौकशी करण्यात येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेल्या देविदास पिंगळे यांनी १२८ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि बोनसच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. या अपहारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि बोनसमधील ५७ लाखांच्या रकमेचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच ५७ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड एका वाहनात आढळून आली होती. कर्मचाऱ्याकडे इतकी मोठी रक्कम आढळून आल्याने पिंगळे यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. देविदास पिंगळे यांच्या घराची, फार्म हाऊसची आणि बँकेच्या लॉकर्सची झडती घेतली गेली होती
.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना येत्या १५ ऑगस्टपर्यंत एक, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरा शालेय गणवेश मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थिनींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत गणवेश पुरवठा करतानाच महापालिकेच्या निधीतून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनादेखील एकाच वेळी गणवेश पुरवठ्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. सोबतच महापालिकेतील सर्व शाळांमधील 'सीसीटीव्हीं'च्या सध्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

प्लस... १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतविजेते बाहेर

$
0
0

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार जगज्जेतेपदासाठी सामना

बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरित इंग्लंडच्या संघाने आधी गोलंदाजीतून आणि नंतर फलंदाजीतून गतविजेच्या ऑस्ट्रेलियाला उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाने दिलेला २२४ धावांचा टप्पा गाठताना इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करीत आगेकूच केली. सलामीला आलेली जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी कांगारूंच्या गोलंदाजांना चौफेर फटके मारले. रॉय आणि बेअरस्ट्रो यांनी पहिल्या जोडीसाठी १२४ धावांची सलामी दिली. त्यानंतर बेअरस्ट्रो ३४ धावांवर पायचीत झाला. बेअरस्ट्रो गेल्यानंतर जेसन रॉयने ५ षटकार आणि ९ चौकार लगावत ६५ चेंडूत ८५ धावा केल्या. त्याला कमिन्सने कॅरिकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मॉर्गेन आणि रूट याने डावाला विजयाकडे नेले.

याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, कर्णधार अॅरन फिंचचा हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरविला. ख्रिस वोक्स, जोर्फा आर्चर यांनी अॅरन फिंच, डेव्हिड वॉर्नर, पीटर हँड्सकोम्ब यांनी झटपट माघारी पाठविले. यामुळे ऑस्ट्रेलियाची ३ बाद १४ अशी अवस्था झाली होती. यानंतर अॅलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या जोडीने १०३ धावांची भागीदारी केली. डावाच्या २८व्या षटकात कॅरीचा संयम संपला. आदिल रशीदला फटकावण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर व्हिन्सकडे झेल देऊन बाद झाला. कॅरीने ७० चेंडूंत ४६ धावा केल्या. याच षटकात रशीदने स्टॉइनिसला पायचीत टिपले. ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र, त्याला स्मिथला अधिक वेळ साथ देता आली नाही. पॅट कमिन्सही लगेचच बाद झाला. त्यामुळे ३ बाद ११७ वरून ऑस्ट्रेलियाची ७ बाद १६६ अशी अवस्था झाली होती. स्मिथने स्टार्कला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी रचली. ४८व्या षटकात स्मिथ धावबाद झाला. या वेळी सर्वांना भारताच्या महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली. धोनीही उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध असाच धावबाद झाला होता. स्मिथने ११९ चेंडूंत ६ चौकारांसह ८५ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर स्टार्कही बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकांत २२३ धावांत आटोपला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यू, स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक

$
0
0

एकाचा मृत्यू; आरोग्य संचालकांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये बैठक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा सुरू होताच नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाइन फ्लू परतला असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात एका स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झाला. डेंग्यूचेही चार रुग्ण आढळल्याने वैद्यकीय विभागाची झोप उडाली आहे. राज्यात स्वाइन फ्लूचे जानेवारीपासून सर्वाधिक १५० रुग्ण नाशकात आढळले असून, आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याने या उद्रेकाची राज्य शासनानेही गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या आरोग्य सेवा संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी यासंदर्भात आज (दि. १२) नाशिकमध्ये बैठक बोलावली आहे.

स्वाइन फ्लू आणि डेंग्यू नाशिकची पाठ सोडत नसल्याचे चित्र असून, एप्रिल आणि मे महिन्यात गायब झालेले दोन्ही आजार पावसाळा सुरू होताच परतले आहेत. गेल्या वर्षी नाशिकमध्ये स्वाइन फ्लूने ३८ जणांचा बळी घेतला होता. परंतु, यंदा मात्र स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढल्याचे चित्र आहे. जानेवारीत ७, फेब्रुवारीत ४२, मार्चमध्ये ५०, एप्रिलमध्ये ३७, मे महिन्यात ११ तर जून महिन्यात स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात स्वाइन फ्लूचा आणखी एक रुग्ण आढळला. या रुग्णाचा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे यावर्षी महापालिका क्षेत्रातील स्वाइन फ्लू बळींची संख्या दहावर पोहोचली.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे १५० रुग्ण आढळले असून, दहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे स्वाइन फ्लूचा उद्रेक आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य शासनानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या आरोग्य सेवा संचालिका डॉ. अर्चना पाटील आज (दि. १२) नाशकात येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक बोलविण्यात आली आहे. राज्याचे साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे, आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. भोई हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, आजार बरा करण्यासाठी वापरावयाची उपचारपध्दती, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची जबाबदारी याविषयी या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.

...

डेंग्यूचे चार रुग्ण

जुलैच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण जास्त असल्याने डेंग्यूचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू पाठोपाठ डेंग्यूचा प्रकोप टाळण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

...

३८२ जणांना नोटिसा

डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत नागरिक, तसेच व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३८२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये डासांच्या अळ्या आढळलेली ९७ घरे, ७ बेसमेंटधारक, १६६ भंगार व्यावसायिक, टायर पंक्चर दुकानदार, ६ ड्रेनेज, ४७ नवीन बांधकामे, १४ शाळा, पक्ष्यांसाठी प्याऊ उभारणारे ३५ पक्षीप्रेमींचा समावेश आहे. आता आरोग्य विभागामार्फत पुन्हा एकदा फेरतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून, डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळल्यास ३०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात रद्द; १९ ला निर्णय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीकपात रद्द करण्यासंदर्भात येत्या १९ तारखेला बोलविलेल्या महासभेत निर्णय घेतला जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महासभेवर दाखल करण्यात आला असून, कपातीबाबतचे फेरनियोजन करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहेत. त्यामुळे अजून आठवडाभर तरी नागरिकांना पाणीकपात सहन करावी लागणार आहे.

धरणसाठ्याने तळ गाठल्याने गेल्या ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली. त्या अंतर्गत संपूर्ण शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्यासह गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूरचा धरणासाठा ४१ टक्के झाला आहे. त्यामुळे कपात रद्द करण्यावरून गेल्या महासभेत गोंधळ झाला होता. त्यामुळे १९ जुलैच्या महासभेत पाणी फेरनियोजनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मध्यरात्रीस खेळ चाले ‘व्हॉट्सअॅप’चा

$
0
0

महिला पोलिसास त्रास देणारा जळगावमधून ताब्यात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्यरात्रीनंतर महिलेच्या व्हॉट्सअॅपवर नको ते मॅसेज करून त्रास देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील एकास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हा गुन्हा कोठे दाखल करण्यात आला किंवा इतर तपशील देण्याबाबत पोलिसांनी हात वर केले आहेत.

ललित रमेश वेलीस (३१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. एका नामांकित केशकर्तनालयात काम करणाऱ्या संशयितास बुधवारी मध्यरात्री ऑनलाईन असतानाच जळगाव पोलिसांसह शहर पोलिसांच्या पथकाने पकडले. या प्रकाराबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाइलवर संशयित काही दिवसांपासून सातत्याने अश्लिल मॅसेज करीत होता. यामुळे महिला अधिकाऱ्याने जळगावचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. जळगाव पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या मदतीने संशयिताला घरातून ताब्यात घेतले. यावेळी तेथे असलेल्या शहर पोलिसांच्या स्वाधीन संशयितास करण्यात आले. संशयित काम करीत असलेल्या केशकर्तनालयाच्या संचालकाची सुद्धा शहर पोलिसांच्या पथकाने चौकशी केल्याचे समजते. गणपतीनगर येथील केशकर्तनालयात कामास असलेला संशयित मूळचा चाळीसगाव येथील रहिवाशी आहे.

'तो' अनेक महिलांच्या संपर्कात

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयिताच्या फोनची तपासणी करण्यात आली. यावेळी तो अनेक महिलांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. संशयिताच्या कृत्याला या महिलांकडून सहमती मिळते की त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात शहर पोलिसांनी गुरुवारी कानावर हात ठेवले. या प्रकरणाची माहितीच नसल्याची भूमिका शहर पोलिसांनी घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी शिक्षकाकडून शिक्षिकेचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/म. टा. वृत्तसेवा देवळाली कॅम्प

सहकारी महिला शिक्षिकेच्या बॅगमध्ये काजू बदामासह हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रेमपत्र ठेवणाऱ्या शिक्षकाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवळाली कॅम्प परिसरातील एका विद्यालयातील ही घटना आहे.

विकास पवार, असे महिलेच्या फिर्यादीत नमूद संशयित वरिष्ठ शिक्षकाचे नाव आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, ३ जुलै रोजी हा प्रकार घडला. या दिवशी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शाळेची मधली सुटी झाली. पीडित शिक्षिका स्टाफरूममध्ये पोहचली. या ठिकाणी महिलेने आपली बॅग ठेवलेली होती. बॅगमध्ये ठेवलेला मोबाइल काढत असताना त्यांच्या हाताला काजू बदामाच्या पुड्यांसह काही चिठ्ठ्या लागल्या. त्यात महिलेचा विनयभंग होईल, असा मजकूर होता. हे हस्ताक्षर संशयित आरोपी आणि वरिष्ठ शिक्षक विकास पवार यांचेच असल्याचा कयास महिलेने बांधला. या प्रकरणी तक्रार करण्यासाठी त्या विद्यालयाच्या प्राचार्यांकडे पोहचल्या. तिथे त्यांना याबाबत लेखी तक्रार करण्यास सांगण्यात आले. महिलेने लेखी तक्रारसुद्धा केली. मात्र, यानंतर प्रशासनाने काहीही कार्यवाही केली नाही. या दरम्यान संशयित पवारने महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. महिला कोठे जाते, काय करते हे तो पहात होता. या पार्श्वभूमीवर महिलेने देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद दिली. महिलेच्या तक्रारीनुसार यापूर्वी संशयित आरोपीने अशा चिठ्ठ्या दिल्या आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संशयित पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत लोंढे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता क्रमांक सुधारण्यासाठी धडपड

$
0
0

अभिप्राय, सूचना पाठविण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदा महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात टॉपचा क्रमांक मिळविण्यासाठी आतापासूनच सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात आपण कुठे कमी पडतो याचा शोध घेण्यासाठी इंदूर पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर घनकचरा विभागाने तेथील पॅटर्नची अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांच्या प्रतिसादात महापालिका मागे पडत असल्याने यंदा सर्वेक्षणात सहभागी होण्यापूर्वी स्वच्छता, कचरा संकलन आणि सार्वजनिक शौचालयांबाबत नागरिकांनी सूचना आणि अभिप्राय पाठवावे, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी सहभागी होण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. नाशिक शहर स्वच्छ व सुंदर आणि हिरवेगार असतानाही कामगिरी सतत घसरत आहे. यंदाचे हे चौथे वर्षे होते. पहिल्या वर्षी देशभरातील ७३ शहरांत घेतलेल्या स्पर्धेत नाशिकचा ३१ वा क्रमांक आला होता. दुसऱ्या वर्षी ४७४ शहरांमध्ये नाशिकची क्रमवारी १५१व्या क्रमांकावर घसरली. तिसऱ्या वर्षी नाशिकला ४१४१ शहरांशी स्पर्धा करावी लागली.

केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत निवड केलेल्या ५०० शहरांच्या स्वतंत्र वर्गवारीत नाशिकचा क्रमांक हा ६३ वर आला होता. परंतु, चार हजार शहरांमध्ये मात्र तो तळाला गेला होता. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दहामध्ये नाशिकचा क्रमांक यावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतरही नाशिकची क्रमवारी गेल्या वर्षी घसरली होती. त्यामुळे यंदा हा क्रमांक वधारण्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली होती. परंतु, तरीही महापालिकेची ६७ व्या स्थानावर घसरण झाली. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत क्रमांक सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या वेळेस सर्वेक्षणासाठी घेण्यात आलेल्या पाच हजार गुणांच्या स्पर्धेत प्रत्येकी १२५० गुणांच्या चार गटांत प्रत्यक्ष पाहणी पालिकेला ११०१ गुण मिळाले. नागरिकांच्या प्रतिसादामध्ये ९५०, हागणदारीमुक्ती शहरात केवळ ५५०, तर प्रत्यक्ष सेवास्तरात ४९२ गुण मिळाले होते. त्यामुळे महापालिकेने हागणदारी मुक्त आणि नागरिकांचा प्रतिसाद सुधारण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आता थेट नागरिकांकडून सूचना आणि अभिप्राय मागविले जाणार आहेत. शहराच्या स्वच्छतेत काय सुधारणा करावी, कचरा संकलन आणि सार्वजनिक शौचालयांबाबत अधिक काय करण्याची गरज आहे, याबाबत नागरिकांनी पालिकेला अभिप्राय आणि सूचना पाठविण्याचे आवाहन घनकचरा विभागाने केले आहे. त्यामुळे आता नागरिक या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागून आहे.

..

थ्री स्टार रेटिंग

नाशिकची क्रमवारी सुधारण्यासाठी समन्वयक नियुक्तीची मागणी महापालिकेने शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने स्वच्छता अभियानाचे समन्वयक म्हणून नाशिक महापालिकेत कल्पेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसेच केंद्र सरकारने सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी महापालिकांना स्वत:चे रेटिंग ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने सन २०१७ मध्येच शहर हागणदारीमुक्त केल्याचे एकतर्फी जाहीर करीत स्वत:ला थ्री स्टार रेटिंग दिले. केंद्र सरकारच्या १ ते ७ पर्यंतच्या रेटिंगची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, त्या अंतर्गत या स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी होण्यासाठी महासभेची परवानगी घेतली जाणार आहे. महापालिकेच्या परवानगीनंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांच्या वेळा पुन्हा बदलणार

$
0
0

- मुंढे यांचा निर्णय शिक्षण समितीने ठरवला रद्दबातल

...

- आयुक्तांशी चर्चा करून होणार अंतिम निर्णय

- महापालिकेच्या ९० शाळांच्या वेळा होणार पूर्ववत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेले निर्णय फिरवण्याचा सपाटा सध्या महापालिकेत सुरू असून, मुंढे यांचा शाळेच्या वेळा बदलण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे. शिक्षण समितीने गुरुवारी घेतलेल्या बैठकीत शाळांचे वेळापत्रक बदलण्याचा मुंढेंचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच १२ ते ५.३० या वेळेत शाळा भरविण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी देवीदास महाजन याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमेंशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.

शिक्षण समितीची मासिक सभा सभापती सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात मुंढेंनी शाळेंच्या वेळा बदलाबाबत घेतलेल्या निर्णयावरही चर्चा झाली. महापालिकेच्या सर्व शाळा पूर्वी सकाळी ७.३० ते दुपारी १२ व दुपारी १२ ते ५ अशा दोन सत्रात भरत होत्या. परंतु, मुंढे यांनी शाळांचे विलीनीकरण करण्याबरोबरच शाळेच्या वेळेत बदल करून त्यांची वेळ ८ ते २ अशी केली होती. सकाळच्या सत्रामध्ये मुलं शाळेत जात असल्यामुळे कामावर जाणाऱ्या पालकांची सायंकाळपर्यंत त्यांच्याशी भेट होत नाही. चुकीच्या पध्दतीने शाळेची वेळ बदलण्यात आल्याने 'नन्ही कली'सारख्या उपक्रमापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याची तक्रार समिती सदस्य राहुल दिवे, वर्षा भालेराव, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, दिनकर आढाव, स्वाती भामरे, संतोष गायकवाड यांनी या सभेत मांडली. त्यामुळे महापालिकेच्या ९० शाळांचे मुंढे यांनी बदलले वेळापत्रक रद्द करून पूर्ववत शाळांच्या वेळा करण्याचे आदेश सभापती सोनवणे यांनी दिले.

...

प्रस्ताव सादर करणार

ज्या ठिकाणी पूर्वी दोन सत्रात शाळा भरत होत्या तिथे मात्र पहिली ते चौथीतील सकाळ सत्रात, तर पाचवी व त्यापुढील इयत्तेच्या शाळा दुपारच्या सत्रात भरण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. यासंदर्भात विद्यमान आयुक्त गमे यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीचे शनिवारी आयोजन

$
0
0

लोकअदालतीचे

शनिवारी आयोजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये शनिवारी (दि.१३) राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने बारा हजाराहून अधिक दाखल तर ९३ हजार ४२८ दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतीत ठेवली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश रवींद्र जोशी यांनी केले आहे.

लोकअदालतीमध्ये झटपट निकाल मिळत असल्याने लाखो प्रकरणे ठेवण्यात येतात. यापूर्वी १७ मार्च रोजी झालेल्या लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली दोन २२५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तर दाखलपूर्व २० हजार ६६६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणाऱ्या लोकअदालतीत एक हजार ३४४ दिवाणी, पाच हजार १७५ तडजोडपात्र फौजदारी, ३११ मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, ६३३ कौटुंबिक वाद, १० भूसंपादन तर ४ हजार ६७१ बँक आणि वित्तीय संस्थांनी दाखल केलेले कलम १३८ व १७४ ची प्रकरणे अशी १२ हजार ३१८ न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच बँका, वित्तीय संस्था आणि शासकीय आस्थापनांच्या थकीत रक्कम वसुलीची ९३ हजार ४२८ दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीत ठेवण्यात आली आहेत.

वकिल पक्षकारांसह न्यायालयीन प्रलंबित वित्तीय संस्था, शासकीय अस्थापना, सहकारी संस्था व इतर विविध संस्थानी आपली प्रकरणे दाखल करून तडजोडी अंती झटपट न्याय मिळवावा असे आवाहन न्यायाधीश जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकोष मंडळासोबत आरोग्य विद्यापीठाचा करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार झाला आहे.

सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करतेप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव शामकांत देवरे, अध्यक्षांचे स्वीय सहाय्य उमाकांत खामकर, समन्वयक डॉ.सरोज उपासणी, विधी अधिकारी संदीप कुलकणी, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, विद्याव्यासंगी सहाय्यक संतोष गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. म्हैसेकर म्हणाले, की महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. विविध विद्यापीठासोबत सामंजस्य करार करून मराठी विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरीता मराठी विश्वकोश मंडळातर्फे विविध विद्यापीठासमवेत ज्ञानमंडळाची स्थापना केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करण्यासाठी हा करार केल्याचे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. चव्हाण म्हणाले, की विज्ञान आणि तंत्रज्ञानात नवनवीन संशोधनामुळे भर पडली आहे. नवनीवन विद्याशाखा निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने विश्वकोशातील नोंदी, लेखांचे लेखन, समीक्षण, संपादन त्या-त्या विषयातील तज्ज्ञांकडून करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळ स्थापन करणेसाठी हा करार झाला आहे. आरोग्य शिक्षणातील परिचर्या विषयातील ज्ञानमंडळासंदर्भात लवकरच विद्यापीठातर्फे बैठका व कार्यशाळा होणार आहेत. या कार्यशाळेद्वारे संबंधित विषयातील लेखकांना मार्गदर्शन केले जाईल. आरोग्य विद्यापीठातर्फे परिचर्या विषयाच्या ज्ञानमंडळासाठी डॉ. सरोज उपासनी समन्वयक म्हणून तर विद्यापीठ व मराठी विश्वकोश मंडळ या दरम्यान विविध उपक्रमांसाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. तोरणे हे संयोजन करीत आहेत.

राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत देवरे यांनी सांगितले, की आजपर्यंत राज्यातील ४६ विद्यापीठ, संस्थांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत परिचर्या विषयासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करण्यासाठीचा हा पहिलाच करार आहे. विद्यापीठ आणि विविध संस्था यांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणातील विविध महत्त्वाच्या विषयांची ज्ञानमंडळ स्थापन होऊन अद्ययावत ज्ञान सर्वासमोर येणे आवश्यक आहे तसेच माहितीचे अद्यावतीकरणाची प्रक्रिया निरंतर घडावी, यासाठी विद्यापीठाला विषय तज्ज्ञांनी सहकार्य करावे. कराराच्या माध्यमातून मूर्तरुप विश्वकोश खंड अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त राहील, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळसेच्या गायधनींची इस्रोत निवड

$
0
0

पळसेच्या गायधनींची इस्रोत निवड

देवळाली कॅम्प : पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी प्रशांत श्रीकांत गायधनी याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) तंत्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. देशव्यापी परीक्षेत त्याने पाचवे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्यासह इयत्ता दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने शनिवारी (१३ जुलै) सकाळी १० वाजता सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांसह शिक्षकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दु:खसमयी धावतो तो एक विठ्ठल

$
0
0

मनमाडमधील मदतगार; मयताच्या नातलगांना देतोय दिलासा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सर्वत्र माणूसपण हरवल्याच्या घटना घडत असताना, स्वार्थी जगात परोपकार दूरावत असताना मनमाड येथील विठ्ठल नलावडे हे अनेकांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणाच्या परिवारातील सदस्याच्या निधनानंतर तिरडी बांधण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत तसेच मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यापर्यंत सर्व कामे उत्स्फूर्तपणे विठ्ठल करतात. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून कठीण समयी धावत येत धीर देणाऱ्या या 'प्रेमळ विठ्ठला'चे आगळे रूप मनमाडकर पाहत आहेत.

कोणाच्याही घरी निधन झाले की त्या व्यक्तीच्या अंत्यविधी आणि उत्तरकार्याची तयारी सुरू असते. ही तयारी करणे व त्यासाठी कोणी जाणकार उपस्थित असणे गरजेचे असते. अशा प्रसंगी विठ्ठल नलावडे त्या ठिकाणी स्वतः निरोपाशिवाय पोहोचतो. तिरडीचे सामान आणण्यासाठी लगोलग धावतो. चार लोकांना मदतीला घेऊन तिरडी बांधण्याचे काम करतो. मृत व्यक्तीचे प्रेत घरातून बाहेर आणणे, त्याला आंघोळ घालणे, घरातील सदस्यांना दिलासा देणे, वेळप्रसंगी रडणाऱ्या महिलांचे मोठ्या भावाप्रमाणे सांत्वन करणे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहे. एवढेच नाही तर अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यावर सरण रचण्यात तो पुढे असतो. त्यानंतर चितेला मुखाग्नी देईपर्यंत तो मृताच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा असतो. जात पात, धर्म, गरीब-श्रीमंत हे सारे भेद बाजूला ठेऊन विठ्ठल शहरातील अंत्ययात्रेला हजर असतो. विठ्ठलचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. त्या व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह आहे. असे असले तरी दुकान बंद ठेऊन तो हे काम विनामूल्य करीत आहे. विठ्ठलचे हे काम रक्ताच्या नात्याच्या पलीकडचे आहे. अनेक कुटुंबात दुःखद घटना घडली की विठ्ठल मदतीला धावून जातो. तो आला की 'विठ्ठल आला आला' अशीच सर्वांची भावना होते.

मी हे काम माणुसकीच्या भावनेने करतो. मला पैसे नको. पण कोणाला मदत केली तर त्यात ईश्वर सापडतो. माझी पत्नी खूप आजारी होती. पण सर्वांच्या सदिच्छेने ती बरी झाली.-- विठ्ठल नलावडे, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरचोंडीजवळ रस्ता खचला; संपर्क तुटला

$
0
0

नाशिक-जव्हार रस्त्यावरील घटना; सुदैवाने जीवित हानी नाही

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावरील मोरचोंडी (ता. मोखाडा, जि. पालघर) येथील नाशिक-जव्हार रस्त्यावरील पुलालगतचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा एकही वाहन या ठिकाणी नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

नाशिकडून गुजरातला जोडणारा आणि पालघर, डहाणू येथून नाशिककडे येणाऱ्या या रस्त्यावर मोरचोंडी गावालगत परस नदीवर हा पूल आहे. नदीपात्र विशाल आहे व पुलाची उंची देखील बऱ्यापैकी आहे. तथापि पुलाजवळ नदीपात्र नैसर्गिकरित्या काहीसे संकुचीत आहे. त्यामुळे अधिक पाऊस झाल्यास काही वेळा पुलावर पाणी येते. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने पुलावर पाणी आले. पुलाच्या बाजूस जिओ कंपनीने केबल टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. या कंपनीने खोदकाम करतांना दहा ते पंधरा फूट खोदले आहे. त्यामुळे येथे जमीन पोकळ झाली होती. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाचा कथडा तुटला आणि लगतचा रस्ताही वाहून गेला.

मोखाडा तालुक्याचे तहसीलदार विजय शेटे यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, त्यांनी तातडीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान विजय शेटे यांनी देखील हा प्रकार जिओ कंपनीच्या खोद कामामुळे झाला असल्याचे म्हंटले आहे. संबंधित कंपनीला आपण याबाबत पत्र पाठविणार असल्याचे सांगितले. हा रस्ता दुरुस्त करण्यास किमान पंधरा दिवस लागणार असल्याने वाहतूक मोखाडा-➡मोरहांडा फाटा-➡गोंदे बुद्रुक-शेरीचा पाडा-➡रांजन पाडा मार्गे त्र्यंबकेश्वर अशी वळविण्यात आली आहे.

तोरंगण घाटही जाम

गुरुवारी पहाटेपासून पाऊस कोसळत असल्याने तोरंगण घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबलेली होती. मोरचोंडीपर्यंत गेलेल्या बस त्याचप्रमाणे रस्ता खचण्याच्या आगोदर आलेली वाहने पुन्हा फिरून त्र्यंबककडे येत नव्हते. दरम्यान जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच जेसीबी पाठवून रस्ता मोकळा केल्यामुळे दुपारी दोन वाजेनंतर वाहतूक सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा इच्छेविरुद्ध विवाह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंजमाळ येथील अल्पवयीन मुलीचा इच्छेविरुद्ध विवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरात सातत्याने असे प्रकार घडत असून, पोलिसांनी या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी पुढे येते आहे.

पीडित युवती १५ ते १७ वर्षांची असून ती गंजमाळ परिसरात राहते. शहरातील चंद्रकांत कुलकर्णी व इतर तिघा महिलांशी तिचा परिचय झाला. संशयितांनी वेगवेगळे अमिष दाखवत इच्छेविरुद्ध राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील मोडीमोरी येथील सुगट जाट याच्याशी काही दिवसांपूर्वी विवाह लावून दिला. या प्रकरणाची कुणकुण औरंगाबादमधील औरंगपुरा येथील मनोज देवीसिंग परदेशी यांना लागली. याबाबत भद्रकाली पोलिसांत त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. गिरी करीत आहेत.

शहरात यापूर्वी अनेकदा असे गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. वडाळा गावातील एका नवविवाहित महिलेचा इच्छेविरुद्ध विवाह लावून तिची विक्री झाली होती. या घटना वेळोवेळी घडत असून, मुली व महिलांना वेगवेगळ्या आमिषांना बळी पाडून त्यांचा परराज्यात विवाह करून देण्यासाठी मोठे रॅकेट शहरात कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषत: शहरातील झोपडपट्टी भागात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विवाहाचे प्रकार राजस्थानमध्येच घडल्याचे दिसून येते. पोलिसांनी या घटनांमधील गांभीर्य ओळखून आरोपींना शोधून गजाआड करण्याची मागणी करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांची अंतरे

$
0
0

ये तो होनाही था!

विश्वचषक स्पर्धेत अत्यंत चमकदार कामगिरी करून सुद्धा सेमीफायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. सामन्यात एक वेळ अशी परिथिती होती की ६०- ७० धावांत सर्व गडी बाद होता की काय? परंतु, धोनी आणि जडेजाने लाज राखली असे म्हणावे लागेल. या पराभवाला सर्वस्वी निवड समिती जवाबदार आहे. तीन यष्टीरक्षक असणारी ही जगातील एकमेव टीम असावी. खरेतर धोनी जर दुर्दैवाने जखमी झाला असता तर के. एल. राहुलचा पर्याय होताच ना? मग आणखी दोन यष्टीरक्षक घेण्याचे प्रयोजन काय होते? विजय शंकरची निवड तर बुचकळ्यात टाकणारी होती व त्यानंतर आंबटी रायुडूला वगळून सलामीच्या मयांक अग्रवालची सुद्धा! योग्य जागेकरिता योग्य खेळाडूची निवड व्हायला हवी होती. ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कारण प्रत्येक वेळी तो अत्यंत बेजबाबदार फटके मारून बाद झाला. अगदी ४८ धावा काढल्या होत्या त्यावेळेला सुद्धा! तो अपरिपक्व तर आहेच; पण धोनीसारखा चप‌ळ सुद्धा नाही. त्यामुळे भारताला नवीन यष्टिरक्षकाचा शोध घेणे अपरिहार्य आहे. या घोळाबद्दल निवड समितीच्या सर्व सदस्यांनी खुर्च्या खाली कराव्यात.

नंदू दामले, नाशिक

... हेच तर भारतीयत्व

चुरशीच्या सामन्यात भारत हरला आणि संपूर्ण भारतीय सुन्न झाले. एखादा खेळ, त्यातील खेळाडू यांच्यात संपूर्ण भारतीयांचा किती जीव अडकलाय हेच यातून दिसते. हा पराभव आपल्याला दाखवतो, की आपण भारतीय किती भावनिक आणि राष्ट्रप्रेमी आहोत. संघातील प्रत्येक खेळाडूवर भारतीय समाज किती प्रेम करतो! त्यांच्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा विचार सुद्धा कधी आपल्या डोक्यात येत नाही. हेच खरं आपलं भारतीयत्व आहे आणि हाच खरा आपला भारतीय समाज जो वेळोवेळी आपली राष्ट्रीय एकता दाखवत असतो. स्वार्थापोटी काही संधीसाधूंना कितीही भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू देत. पण आपला भारतीय समाज हा नेहमीच सहिष्णू राहिलेला आहे आणि तो शेवटपर्यंत राहील.

-सर्वेश सोनवणे, येवला

अखेर संधी गमावली

२०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ एक नंबरचा दावेदार मानला जात होता. मात्र, उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी भारताला पराभव पत्करावा लागला. मुळातच भारतीय संघाची कधी नव्हे, ती छान गोलंदाजांची फळी निर्माण झाली होती. मात्र फलंदाजीचा मधल्या फळीच्या समस्या वारंवार उघड्या पडत असताना आपण जिंकतो म्हणून विराट कोहलीने दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळे हा पराभव पत्करावा लागला. जेव्हा जेव्हा भारतीय संघाची सलामी चांगली झाली नाही. तेव्हा तेव्हा मोठी धावसंख्या उभारण्यात आपण अपयशी झालो. हे दुबळ्या अफगाणिस्तान व वेस्ट इंडिजविरोधात सिद्ध झाले होते. मुळातच भारतीय संघात चार विकेटकिपर का घेतले हा प्रश्नच आहेच. शिखर धवन दुर्दैवाने जखमी झाला. मात्र, संघात राखीव सलामीचा फलंदाज घेतला नव्हता. त्यामुळे के. राहुलवर ती जबाबदारी देण्यात आली. तसेच, विजय शंकरला काहीही अनुभव नव्हता तरी त्यांची निवड झाली. अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, पृथ्वी शॉसारख्या चांगल्या फलंदाजांना का वगळण्यात आले? कोणतेही प्रयोग हे विश्वकरंडकांच्या आधी करावे लागतात. विराट कोहलीने विश्वकरंडक स्पर्धेत सातत्याने प्रयोग केले. उपांत्य फेरीत सौरव गांगुलींचा सल्ला मानून दिनेश कार्तिक व भुवनेश्वरच्या जागेवर केदार जाधव व शमीला संधी दिली असती तर सामन्याचे चित्र निश्चितच बदलले असते. धोनीची पूर्वीसारखी फलंदाजी राहिली नाही हे वारंवार समजूनही विराटने त्यांच्यावर अतिविश्वास दाखवला.

- प्रशांत कुलकर्णी, मनमाड

शास्त्रींना हटवा!

उपांत्य फेरीत देव न्यूझीलंडच्या 'ड्रेसिंग रूम'मध्ये बसला असल्याने भारतीय संघाला त्यांच्या विरुध्द पराभव पत्कारावा लागला. आता देवाने रवी शास्त्रींना दूर केले तर खूप बरे होईल.

-शरद अंकोलेकर,नाशिक

व्यासंगी व्यक्तिमत्त्व

संगीत समीक्षक राजा पुराणिक यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावून गेले. अत्यंत हसतमुख आणि मनमि‌ळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शंकराचार्य न्यासच्या माध्यमातून त्यांनी नाशिककरांसाठी विविध मान्यवर संगीत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले होते. कलाकारांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या होत्या. संगीत समीक्षेच्या लेखांतून त्यांचा व्यासंग दिसून येतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नंदकिशोर गौड, नाशिक

पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा

मागील चार-पाच दिवसांत दिलासादायक पाऊस पडून धरणातील पाणीपातळीत वाढ झाल्याने मनपाने पाणीकपात मागे घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा. बाहेर पाऊस, नदीला पूर, परंतु, घरात नळाला पाणी नाही, असे विरोधाभासाचे चित्र बरे नव्हे. नगर, औरंगाबाद जिल्ह्यावासीयांच्या भले करण्याच्या प्रयत्नात नाशिक शहरवासीयांचे हाल होऊ नये ही दक्षता भाजप व पाटबंधारे खाते घेतील ही आशा. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये, पाणीकपात करून कमी दाबाने पाणीपुरवठा करणे योग्य आहे का, हे नाशिकच्या महापौरांना विचारावेसे वाटते.

विजय भदाणे, नाशिक

खबरदारी आवश्यकच

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीनंतर कोकणातील धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वास्तविक कोकणातील माती व जांभा दगड धरण बांधणीस

उपयुक्त नसल्याने व गाभ्यासाठी काळ्या मातीच्या अभावामुळे कोकणासारख्या अतिवृष्टीच्या प्रदेशात छोटी धरणे टिकत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात टाटांनी वीजनिर्मितीसाठी बांधलेली भीरा, खोपोली व इतर सहा छोटी दगडी व काँक्रिटमधे बांधकाम केलेली धरणे अजूनही टिकून आहेत. त्यानंतर कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत कोळकेवाडी व खेड तालुक्यात नातुवाडी व सिंधुदुर्गात तिल्लारी येथे मोठी धरणे बांधण्यात आली व ती उत्तमपणे कार्यरत आहेत. परंतु, लहान धरणांचा सिलसिला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या कार्यकाळात सुरू झाला. ८० च्या दशकात अनेक मातीची छोटी धरणे, खात्यातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या विरोधाला डावलून बांधली गेली. जवळपास सर्व धरणांतून गळतीची समस्या दिसून आली. खात्यांतर्गत धरणसुरक्षा संघटनेनेही ही बाब वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. पण जुजबी दुरुस्त्यांखेरीज फारशी दखल घेण्यात आली नाही. परिणामी तिवरे सारखी धरण फुटी घडून अनेक जण प्राणास मुकले. शासनाने आता ठोस निर्णय घेऊन कोकणासारख्या अति पावसाच्या प्रदेशात मातीची धरणे बांधायचा पुनर्विचार करावा व तिवरे सारखी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, ५० वर्षे जुन्या धरणांची तज्ज्ञांकरवी पहाणी करून गंगापूर धरणासह सर्व मोठ्या धरणांचा, संभाव्य धरण फुटीचा अभ्यास व आपत्कालीन कृती योजना तयार करावी ही विनंती.

हरीश भंडारी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सानपांभोवती स्वकीयांचाच चक्रव्यूह!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात युतीच्या हेमंत गोडसे यांना तब्बल पाऊणलाखाचे मताधिक्य मिळाल्याने भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमोर शिवसेनेतील इच्छुकांसह त्यांच्याच शिष्यांनी आव्हान उभे केले आहे.

आमदार सानप आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे संबंध बिघडल्याच्या कथित पार्श्वभूमीवर शिवसेनेसह भाजपमधील इच्छुकांना दिवसाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. खासदार गोडसे यांचे चुलत बंधू आणि कामगार नेते जगदीश गोडसे यांनीही शड्डू ठोकल्याने चुरस वाढली आहे. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाआघाडीकडून मनसेचे राहुल ढिकले गेल्या वर्षापासून तयारीत असल्याने पूर्वमधील लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.

शहरातील तीन मतदारसंघांपैकी सर्वाधिक विस्तार असलेला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिकनगरीसह अर्धशहरी आणि ग्रामीण अशी ओळख असलेला हा मतदारसंघ आहे. शेतकरी आणि कामगारांची संख्याही मोठी आहे. पंचवटी, तपोवन, नाशिकरोड या तीन विभागांमध्ये या मतदारसंघाची रचना असून, या मतदारसंघाचा कौलही नेहमीच भाजप-शिवसेना आणि मनसेकडे म्हणजेच सर्वसाधारण हिंदुत्ववादी पक्षांकडे राहिला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत तर या मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेचेच निवडून आले आहेत. त्यामुळे साहजिकच युतीचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना तब्बल ७६ हजार २६८ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. परिणामी या मतदारसंघातील भाजपसह शिवसेनेच्या इच्छुकांचीही उमेदवारी मिळविण्यासाठी लढाई सुरू झाली आहे. गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले तेव्हा आमदार सानप यांनी ४४ हजार मतांनी विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीत गोडसेंचे मताधिक्य वाढल्याने सर्वाधिक इच्छुकांची संख्या ही भाजपमध्येच अधिक आहे. त्यातच आमदार सानप आणि पालकमंत्री महाजन यांच्यात फारसे सख्य राहिले नसल्याच्या बातम्यांमुळे अनेक नगरसेवकांनी थेट उमेदवारीवरच दावा ठोकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदार सानप यांना गणेश गिते, उद्धव निमसे, संभाजी मोरुस्कर, सुनील आडके, अरुण पवार या आपल्याच शिष्यांशी उमेदवारीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे. मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकत्रित उमेदवार अशी सध्या तरी स्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टरही विधानसभा निवडणुकीत जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी आणि रंगतदार ठरणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वेळेस काँग्रेसकडून निवडणूक लढवून चांगली मते घेतलेले उद्धव निमसे व राष्ट्रवादीचे बंडखोर दिनकर आढाव, मनसेचे रमेश धोंगडे हे भाजप आणि शिवसेनेत असल्याने या मतदारसंघात युतीचा टक्का वाढला आहे.

--

महाआघाडीचा पर्याय

या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या संभाव्य महाआघाडीच्या वतीने माजी खासदार अॅड. उत्तमरा‌व ढिकले यांचे पुत्र अॅड. राहुल ढिकलेंनी आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत वंचितने तब्बल २४ हजार मते मिळविल्याने महाआघाडीसमोरही मोठे आव्हान असणार आहे. वंचितने महाआघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यास महाआघाडीचे बळ वाढून या मतदारसंघात युतीच्या उमेदवारासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

--

आखणी एक 'गोडसे'

दरम्यान, इंडिया सिक्युरिटी प्रेस अँड करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस आणि खासदार हेमंत गोडसे यांचे चुलत बंधू जगदीश गोडसे यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कामगारांची संख्या, नातीगोती आणि लोकसभा निवडणुकीत खासदार गोडसेंच्या प्रचारावेळी झालेल्या जनसंपर्काचा लाभ विधानसभा निवडणुकीत कामी येण्याचीही शक्यता त्यांना वाटत आहे. त्यामुळे गोडसे शिवसेनेसह भाजपच्या संपर्कात आहेत. शिवसेनेचे संपर्क नेते संजय राऊत आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने गोडसे ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढू शकतात. भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांना शांत करण्यासाठी युतीकडून आणखी एकदा 'गोडसे' ब्रँडचा वापर केला जाऊ शकतो. कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाला मुरलीधर मानेंनंतर संधी मिळालेली नाही. त्यामुळे गोडसे हा एक पल्ला गाठू शकतील, असा एक मतप्रवाह आहे.

--

...असे आहेत पक्षनिहाय इच्छुक

--

भाजप : आमदार बाळासाहेब सानप, उद्धव निमसे, गणेश गिते, सुनील बागूल, हेमंत धात्रक, सुनील आडके, अरुण पवार, संभाजी मोरुस्कर

शिवसेना : चंद्रकात लवटे, दत्ता गायकवाड

राष्ट्रवादी काँग्रेस : निवृत्ती अरिंगळे, गौरव गोवर्धने, विजय आव्हाड

काँग्रेस : राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, राहुल दिवे

मनसे : अॅड. राहुल ढिकले

वंचित आघाडी : पवन पवार

--

२०१४ मध्ये विधानसभेसाठी झालेले मतदान

--

बाळासाहेब सानप (भाजप)- ७८,५५४

चंद्रकांत लवटे (शिवसेना)- ३२,४४८

उद्धव निमसे (काँग्रेस)- १९,४४२

देवीदास पिंगळे (राष्ट्रवादी काँग्रेस)- १२,९००

रमेश धोंगडे (मनसे)- १२,४३७

--

२०१९ मध्ये लोकसभेसाठी झालेले मतदान

--

हेमंत गोडसे (शिवसेना)- १,१७,१२७

समीर भुजबळ (राष्ट्रवादी)- ४०,८५९

माणिकराव कोकाटे (अपक्ष)- ६,६६६

पवन पवार (वंचित आघाडी)- २४,७६४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images