Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फास्ट न्यूज

$
0
0

कामगाराचा मृत्यू

नाशिक : काम करीत असताना स्टूलवरून पडल्याने कारखाना कामगाराचा मृत्यू झाला. अंबड औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली. किशन दुर्गाप्रसाद प्रजापती (वय २७, रा. दत्तनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते कंपनीत लोखंडी स्टूलवर उभे राहून काम करीत होते. पाय घसरल्याने ते स्टूलवरून पडले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

..

शॉक लागून मृत्यू

नाशिक : मंदिर परिसरात इलेक्ट्रीकचे काम करताना शॉक लागून २१ वर्षीय परप्रांतीय सेवेकऱ्याचा मृत्यू झाला. गोवर्धन येथे ही घटना घडली. नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अतुल मनोजकुमार (मूळ रा. मध्य प्रदेश हल्ली श्रीक्षेत्र दत्तधाम रानमळा) असे इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोवर्धन परिसरातील रानमळा भागात दत्ताचे भव्य मंदिर आहे. पावसामुळे शुक्रवारी (दि.५) मंदिर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो दुरुस्ती करीत असताना ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक, पालक, पाल्य त्रिकोण साधणे गरजेचे

$
0
0

शिक्षक, पालक, पाल्य

त्रिकोण साधणे गरजेचे

समुपदेशक डॉ. विजय भोकरे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच पालकांचा शिक्षकासोबत योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. शिक्षक पालक आणि पाल्य हा त्रिकोण साधल्यास विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडविण्यात फार मोठी मदत होते, असे मत प्रख्यात समुपदेशक डॉ. विजय भोकरे यांनी मांडले.

अशोकस्तंभावरील जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या वतीने पालक पाल्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भोकरे बोलत होते. पुढे ते म्हणाले, आपल्या पाल्याबरोबर कोणते मित्र राहतात, तो काय करतो याची माहिती पालकांनी ठेवायला हवी. या माहितीतून आपण आपल्या पाल्याला वाईट संगतीपासून वाचवू शकतो. त्याचप्रमाणे आपला पाल्य कमीत कमी मोबाइलचा उपयोग करेल याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या मुले वाचन व स्वयंअध्ययन विसरले आहे. ही त्यांच्यासाठी घटक बाब आहे. कोणत्याही धड्याची प्रशोत्तरे लिहितांना तो धडा पूर्ण समजून वाचणे अपेक्षित आहे. वाचन व पाठांतर झाल्यावर त्याने लिखाणही करून पाहिले पाहिजे. गणित विषयाचा नियमित सराव केल्यास त्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळण्यास सोपे जाईल. नवीन अभ्यासक्रम हा कृतियुक्त अभ्यासक्रम असल्याने केवळ दहावीचा अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. नवीन गुणदान पद्धतीमुळे जो टक्केवारीचा फुगवटा आता कमी होणार असून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता तपासली जाणार आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात असे सांगितले की कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना प्रथम ते प्रकरण नीट वाचावे. त्यानंतर त्यावरील प्रश्नाचा अभ्यास करावा. अध्यक्षीय भाषणात मिलिंद कचोळे यांनी शालेय जीवनातच चांगले संस्कार घडत असतात या विद्यार्थी अवस्थेत लागलेले संस्कार हे आयुष्यभर राहतात असेही ते म्हणाले.

यावेळी मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक अरुण पैठणकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पैठणकर यांनी केले. सूत्रसंचालन नीलिमा कांगणे यांनी केले तर आभार राजेंद्र गायवन यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

व्हिडीओ व्हायरल करण्याची महिलेस धमकी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ४० वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या वासाळी येथील एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयित पीडित महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. अखेर पीडितेने सातपूर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आहे.

गौतम बाबुराव भालेराव (रा. वासाळी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परिसरात राहणाऱ्या विवाहित पीडितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारदार आणि संशयित एकमेकांचे परिचित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तो पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. तिचा पाठलाग करीत शरीरसुखाची मागणी करीत होता. संबंधित महिला गुरुवारी (दि. ४) सकाळी सातपूर भाजी मंडईत आली होती. त्यावेळी संशयिताने तिला गाठले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिला धमकावू लागला.

मंगळसूत्र हिसकावून पोबारा

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेजवळ थांबत तिला बोलण्यात गुंतवून दुचाकीस्वारांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे महामार्गावरील वैष्णवी हायटेक नर्सरी जवळून शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी महिला पायी चालली होती. आप्पाचा ढाबा परिसरात मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी या महिलेला बोलण्यात गुंतविले. तुम्हाला कुठे जायचे आहे, असे विचारपूस करण्याच्या बहाण्याने एकाने तिच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पोती हिसकावून नेल्या.

दोन तरुणांची

शहरात आत्महत्या

शहरात दोन तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड व म्हसरूळ पोलिसांनी मृत्युची नोंद केली आहे.

राहुल केशव रकिबे (वय २३, रा. वजन काट्यासमोर, अंबड) व अतुल सुनील गरड (वय २७, रा. चैतन्य अपार्टमेंट, रामकृष्णनगर) अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. राहुल रकिबे याने सायंकाळी घरातील छताच्या हुकाला नॉयलॉन दोरी बांधून गळफास घेतला. दुसरी घटना रामकृष्णनगरमध्ये उघडकीस आली. अतुल गरड या तरुणाने दुपारी घरातील बेडरूममध्ये गळफास घेतला.

..

कारची काच फोडून रोकड चोरीस

कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. औरंगाबादरोडवरील नांदूरनाका परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. धनंजय बाळासाहेब सोनवणे (रा. रघूनंदन बंगला, हिरावाडी) यांनी तक्रार दिली आहे. ते मंगळवारी (दि. २) रात्री नांदूरनाका परिसरात गेले होते. गावकरी हॉटेल समोर त्यांनी कार (एमएच १५ सीएम ३२८१) पार्क केली. चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूची काच फोडून आतील लेदर बॅग चोरून नेली. या बॅगेत ६० हजार रुपये होते, असे सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखसरींची संततधार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कधी भुरभुर तर कधी संततधार सरी घेऊन येणाऱ्या पावसाने शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुक्काम ठोकला आहे. शनिवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांत शहरात सुमारे २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. तो रात्रीही कायम होता.

जिल्हाभरातील धरणांची तहान भागावी आणि जिल्हावासीयांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी सारेच वरुणराजाला साकडे घालत आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने दमदार पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात भुरभुर तसेच पावसाच्या संततधार सरींनी मुक्काम ठोकला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला होता. मुसळधार नाही पण संततधार पावसाने जिल्हावासीयांनी दिलासा दिला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. शनिवारी दिवसभर हलकीशी विश्रांती घेत पावसाच्या सरी बरसत होत्या.

गंगापूर पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर धरण क्षेत्रात शनिवारी दिवसभरात ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गौतमी धरण क्षेत्रात ३३ मिलीमीटर तर काश्यपी धरण क्षेत्रात १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अंबोलीत तब्बल ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाचा जोर शनिवारी सकाळी कायम राहिला. दिवसभरात आणखी २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शहरवासीयांचे हाल

शहरात पावसाने मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. ढगाळ वातावरणामुळे सूर्य किरणांचे दर्शनही होऊ शकले नाही. पावसामुळे बाजारपेठांवरही विपरित परिणाम झाला आहे. विद्यार्थी, पालक, व्यावसायिक सर्वांचीच पावसामुळे तारांबळ उडाली.

..

वरुणराजाची कृपा (मिलीमीटरमध्ये)

नाशिक : २०

सुरगाणा : २२.३

पेठ : २३

दिंडोरी : ४३

इगतपुरी : ९१

जिल्हा : २४४.७

* आकडेवारी शुक्रवारी (दि. ५) सकाळी साडेआठ ते शनिवारी (दि. ६) सकाळी साडेआठ या २४ तासांतील आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सदस्य नोंदणीचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जयंतीदिनानिमित्त शनिवारपासून भाजपच्या नवीन सदस्य नोंदणीला संपूर्ण देशभरात सुरुवात झाली. नाशिक शहरातही सहा मंडलांत सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.

पंचवटीत शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, नाशिक पश्चिमध्ये आमदार सीमा हिरे आणि नाशिक मध्य मतदारसंघात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या सदस्यता नोंदणीकडे पाठ फिरविल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र काहीसा मावळला होता.

भाजपच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ जुलैपासून सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरात नव्याने दोन लाख सदस्य करण्याचा निर्धार वसंतस्मृती कार्यालयात आयोजित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक पश्चिम मंडलात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, पालकमंत्री महाजन यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे तीनही आमदारांच्या उपस्थितीत वेग‌वेगळ्या ठिकाणी सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. पंचवटी मंडलातील नोदणीप्रसंगी शहर सरचिटणीस उत्तमराव उगले, सुनील केदार, अनिल वाघ, महापालिकेतील गटनेते जगदीश पाटील, पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे, पुंडलिक खोडे, पूनम धनगर, सरिता सोनवणे, प्रियंका कानडे, सागर परदेशी, माणिकराव देशमुख, महेश महंकाळे, सतनाम राजपूत, नीलेश पवार, गणेश सानप, धनंजय पुजारी, सोमनाथ बोडके, गोविंद अग्रवाल, सुनील फरताळे, विशाल जेजुरकर, ज्ञानेश्वर पिंगळे, संजय गामणे, शिवाजी कारवाल, ज्योती आव्हाड, भारती माळी, विपूल सुराणा, श्यामल सांगळे, हर्षद वाघ, प्रवीण आहेर, संजय गालफाडे आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

पंचवटीतून ५० हजारांचे लक्ष्य

भाजप पंचवटी मंडलाच्या वतीने पंचवटी कारंजा येथे मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ऑनलाइन सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, पंचवटी मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमित घुगे यांनी विचार व्यक्त केले. आगामी काळातील सर्व कार्यक्रम यशस्वी करीत पंचवटीतून ५० हजार नवीन सदस्य करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी ठेवावे, असे आवाहन आमदार सानप यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट कार्ड’साठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत आता १ जानेवारी २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिवहनमंत्री, तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी त्यास संमती दिल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

एसटीने हे स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य केल्यामुळे ते घेण्यासाठी गर्दी होत होती. त्यामुळे बऱ्याच सवलतधारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाही. त्यामुळे सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्या असून, या मुदतवाढीमुळे आता विद्यार्थ्यांची अडचण टळणार आहे.

जुन्या पद्धतीने सवलत

हे स्मार्ट कार्ड सवलतधारकांना देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत विद्यार्थी, तसेच इतर सवलतधारकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे, तर इतर सवलतधारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत मिळणार आहे. ज्यांनी स्मार्ट काढले आहे त्यांना त्याद्वारे सवलत मिळणार आहे.

पुढील वर्षापासून अनिवार्य

एसटीने सध्या मुदतवाढ दिली असली, तरी १ जानेवारी २०२० पासून मात्र सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. सर्व सवलतधारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपापले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

यांना मिळते सवलत

राज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरिक विविध सवलतींचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य सरकारचे पुरस्कारविजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळामार्फत सवलत देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीची बैठक वादळी होण्याची चिन्हे

$
0
0

१७ जुलैला बैठक; संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत पाणीपुरवठा योजनेशी संबंधित २८२ कोटींच्या स्काडा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील फेरबदल, स्मार्ट रोडची वाढलेली किंमत आणि स्थगित झालेली स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १७ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे या बैठकीत स्काडासह सीईओंनी राबवलेली नोकरभरती प्रक्रिया आणि स्मार्ट पार्किंगमधील गोंधळावरून संचालक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठकही वादळी होण्याची शक्यता आहे.

नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची १७ वी बैठक गेल्या महिन्यात ७ जून रोजी बोलविण्यात आली होती. परंतु, २८० कोटींच्या स्काडा प्रणालीच्या निविदा प्रक्रियेत झालेला कथित फेरबदल, स्मार्ट रोडचे ३.८९ कोटींनी वाढलेले प्राकलन, स्मार्ट रोडच्या कामातील दिरंगाई, महात्मा फुले कलादालनाचे काम पूर्ण होऊनही ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या अधिकच्या मोबदल्यावरून संचालकांनी आक्रमक होत कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटेंची बैठकीअगोदरच भेट घेत सीईओ प्रकाश थविल यांच्या वादग्रस्त कारभाराचा पाढा वाचला होता. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, कंपनीच्या संचालक तथा महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेस गटनेते शाहू खैरे व माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी कुंटे यांची भेट घेत स्मार्ट कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत थविल आणि तांत्रिक अधिकारी प्रमोद गुर्जर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. थविल यांची बदली करण्याबरोबरच गुर्जर यांना कार्यमुक्त करीत नाही तोपर्यंत बैठकीत सहभाग न घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे वाद नको म्हणून कुंटेंनी सदरची बैठक रद्द केली होती. थविल यांची बदली करण्याचे आश्वासनही संचालकांना दिले होते. परंतु, या बैठकीनंतर कुंटेच पाच आठवड्यांच्या सुटीवर गेले होते. कुंटे आता १२ तारखेला सुटीवरून परतणार आहेत. त्यामुळे गेल्या वेळेस रद्द झालेली स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक येत्या १७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही बैठकही वादळी ठरण्याची शक्यता आहे. सीईओ थविल यांची न झालेली बदली, त्यांनी सुरू केलेली नोकरभरती आणि स्मार्ट पार्किंगमध्ये ठेकेदारांच्या घोळामुळे ही बैठक पुन्हा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

...

संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष

थविल यांची बदली झाली नसून, गुर्जरही कामावरच आहेत. उलट स्काडानंतर स्मार्ट पार्किंग योजनेतही गोंधळ समोर आला आहे. त्यामुळे संचालकांची आक्रमकता वाढेल असे वाटत होते. परंतु, अनेक संचालकांनी याबाबत आता मौन बाळगल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या बैठकीत आक्रमकता कायम राहते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील १५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला आहे. शहरात कार्यरत १५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही काळापासून नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणाऱ्या निरीक्षकांना पोलिस स्टेशन्सचे कारभारी करण्यात आल्याने या अधिकाऱ्यांसाठी ही बक्षिसी मानली जात आहे.

नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत हेमंत सोमवंशी यांच्याकडे इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर साजन सोनवणे यांच्याकडे मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. भद्रकाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांची सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. बर्डेकर यांच्या जागी मुंबई नाका पोलिस स्टेशनचे विद्यमान निरीक्षक विजय ढमाळ यांची नियुक्ती झाली आहे.

सरकारवाडाचे पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांच्याकडे म्हसरुळ पोलिसची तर म्हसरुळचे निरीक्षक सुनील रोहोकले यांच्याकडे 'सरकारवाडा'ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सायबरचे पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, गंगापूरचे पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांची शहर वाहतूक शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे फुलदास भोये यांची गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या वाचकपदी बदली झाली आहे. प्रभाकर घाडगे यांची अभियोग कक्ष, दत्तात्रय पवार यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. सरकारवाड्याचे निरीक्षक देवराज बोरसे यांना सायबरचा पदभार सोपविण्यात आला आहे. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्याकडे मध्यवर्ती गुन्हे शाखेचा पदभार सोपविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक - ‘रेरा’ कायद्यावर गुरुवारी चर्चासत्र

$
0
0

'रेरा' कायद्यावर

गुरुवारी चर्चासत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ग्राहक पंचायत व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने रेरा कायदा व्यावहारिक दृष्टिकोन, अडचणी आणि अंमलबजावणी या विषयावर गुरुवारी ४.३० वाजता सारडा संकुल येथील बाबुभाई राठी सभागृह येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतचे विभागीय अध्यक्ष मार्तंड जोशी उपस्थित राहणार आहेत. या सेमिनारमध्ये मार्गदर्शन विद्यासागर नाशिककर हे रेरा कायदा व्यावहारिक अडचणी, क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे हे रेराच्या अंमलबजावणीबाबत विकसकाचा दृष्टिकोन आणि विचार, ग्राहक पंचायतचे विभागीय आयोजक अरुण भार्गवे हे ग्राहकांच्या अडचणी आणि उपाय याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर उपस्थितांचे प्रश्नोत्तरे होतील. तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येने सेमिनारला उपस्थित रहावे, असे आवाहन चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढ व एचआर व सीएसआर उपसमितीचे चेअरमन श्रीधर व्यवहारे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठराविक वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांकडून वारंवार नाकाबंदी केली जाऊनही अनेकदा चोरीची वाहने व चोरटे सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी खुलेपणाने स्वीकारली. वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरातच नव्हे तर महामार्गावरील टोलनाक्यांजवळ विशिष्ट वाहनांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

शहरात वाहनचोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. यापैकी काही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यशही येते. वाहनचोरीच्या गुन्ह्यांमधील संशयितांना गजाआड करतानाच नागरिकांना त्यांची वाहने मिळवून देण्याची जबाबदारी पोलिसांकडून पार पाडली जाते. परंतु, हे प्रमाण वाहनचोरीच्या गुन्ह्यांपेक्षा खूपच कमी आहे. वाहनचोरीचे गुन्हे रोखता यावेत तसेच शहरातून चोरी होणारी वाहने ग्रामीण भागापर्यंत न पोहोचता नाकाबंदीतच हाती लागावी, यासाठी काय करता येईल, याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. नाकाबंदीमध्ये अनेकदा अडविलेल्या वाहनांच्या सर्वच कागदपत्रांची बारकाईने तपासणी करणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे विशिष्ट दिवस ठरवून या दिवशी विशिष्ट वाहनांचीच तपासणी करण्याचा प्रयोग पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे. साधारणत: दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये पल्सर, स्प्लेंडर, बुलेट यासारखी वाहने चोरीस जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी केवळ पल्सरचीच तपासणी करावी, अन्य दिवशी केवळ बुलेटचीच तपासणी करून वाहनचोरीच्या घटनांना प्रतिबंध करता येईल का, याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे.

संयुक्त पथकाद्वारे कारवाई

शहरातून वाहने चोरली की ती ग्रामीण भागात विक्री केली जातात. अगदी जिल्ह्याबाहेरही या वाहनांची विक्री होते. ही वाहने आणि चोरटे सहजासहजी मिळून येत नाही. त्यामुळे शहर, ग्रामीण आणि महामार्ग पोलिस यांचे संयुक्त पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या माध्यमातून टोल नाक्यांजवळ वाहनांची तपासणी करण्याचा प्रयोग पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश येऊ शकते, असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी कंपनीच्या बचतगटांपासून राहा सावध

$
0
0

महापालिका प्रशासनाचे महिलांना आवाहन

..

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गरीब व दारिद्र्य रेषेखालील महिला स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने बचतगटाच्या माध्यमातून प्रोत्साहीत केले जाते. या महिला बचतगटांना शासनाकडून काही लाभ व अनुदानदेखील दिले जाते. मात्र, शहरात काही खासगी कंपन्यांकडून पालिकेच्या नावाने महिला बचतगट सुरू केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा खासगी कंपनीपासून स्थापन केल्या जाणाऱ्या बचतगटांपासून सावध राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून एक पत्रक काढण्यात आले आहे. त्यात महिला बचतगट हे मालेगाव मनपांतर्गत कार्यरत समुदाय संघटक व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सहयोगिनी यांच्यामार्फत स्थापन केले जातात. स्थापन झालेल्या गटांना तीन महिने पूर्ण झाल्यानंतर १० हजार रुपये रक्कम फिरता निधी अंतर्गत कर्ज व्यवहार करण्यासाठी दिले जातात. तसेच त्यांना व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वार्षिक चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. अशा प्रकारचा लाभ फक्त समुदाय संघटक व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सहयोगिनी यांच्यामार्फत दिला जातो. इतर कोणत्याही व्यक्ती, महिला यांच्यामार्फत दिला जात नाही.

मात्र, महापालिका प्रशासनाकडे शहरात मोठ्या प्रमाणात अनेक खासगी मायक्रो फायनान्स कंपनी या मालेगाव मनपाचे कर्मचारी सांगून पालिकेच्या नावाखाली बचतगट तयार करीत असल्याची बाब निदर्शनास आली असून, तशा तक्रारीदेखील प्राप्त झाल्या आहेत. मात्र, अशा बचतगटांची कोणत्याही प्रकारची नोंदणी नाही. तसेच नोंदणीकृत नसलेल्या या बचतगटांना कोणतीही शासकीय लाभ अथवा अनुदान दिले जात नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील महिला व नागरिकांनी महापालिकेच्या नावाने अशा खासगी कंपनीकडून स्थापन करण्यात येणाऱ्या बचतगटांपासून सावध राहावे, असे आवाहन कर उपायुक्त व शहर प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मंडळ कॉलम

$
0
0

आम्ही साऱ्या जणी लोगो - फोटो आहे

आनंदी सखी मंडळ

२००८ साली आनंदी सखी मंडळाची स्थापना झाली. गंगापूर रोडवरील पाईपलाइन रोडवर हे मंडळ कार्यरत आहे. चैत्रगौरीच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्त अंजली बिवलकर यांनी हे मंडळ स्थापन केले. तर सुमन भदाणे यांनी मंडळाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कॉलनीतील सर्वांचा एकमेकांशी परिचय व्हावी, अडचणी दूर होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न व्हावेत यासाठी हे मंडळ स्थापण्यात आले. मंडळ नोंदणीकृत असून आमदार सीमा हिरे यांनी हॉल बांधून दिला आहे. मंडळाचे कार्यक्रम या हॉलमध्ये आयोजित केले जातात. मंडळात सध्या १८० सभासद आहेत. सर्व वयोगटातील महिलांचा सक्रिय सहभाग हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात महिन्यात सभासद नोंदणी केली जाते.

- -

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यावर भर दिला जातो. यामध्ये भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मंडळाकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हळदी कुंकू, नवरात्र, होळी, रंगपंचमी, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांचा यात समावेश असतो. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व ओळखत पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते.

- -

व्याख्यानांतून मार्गदर्शन

महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी दर महिन्याला आरोग्यविषयक व्याख्याने ठेवली जातात. आरोग्याच्या विविध समस्यांवर या व्याख्यानांमध्ये मार्गदर्शन केले जाते. योगाचे वर्ग घेतले जातात. तसेच महिलांच्या आनंदासाठी धार्मिक व भौगोलिक ठिकाणी सहली नेल्या जातात.

- -

सामाजिक बांधिलकीची जोपासना

प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची गरज आहे, असा विचार मंडळाकडून व्यक्त करण्यात येतो. हा विचार प्रत्यक्षात आणत आदिवासी पाड्यावर जाऊन कपडे, इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. तसेच विविध सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी देणग्याही दिल्या जातात.

- -

मंडळाची कार्यकारिणी

अध्यक्ष : अंजली बिवलकर

उपाध्यक्ष : सीमा पछाडे

सचिव : सुमन भदाणे

सहसचिव : साधना गिललकर

खजिनदार : विजया बागडे

सह खजिनदार : साधना गायकवाड

कार्यकारिणी सदस्य : उज्ज्वला वारुंगसे, रंजन देवरे, स्मिता शिलेदार, पूजा कुयटे, शिल्पा म्हस्के, नीता देशकर, उज्ज्वला कुशारे.

- -

(शब्दांकन - अश्विनी कावळे)

- -

पाठवा तुमच्या मंडळाची माहिती

प्रिय सखी,

आपलंही महिला मंडळ आहे? तुम्हीही विविध प्रकारचे उपक्रम राबवतात? तर मग, आजच आम्हाला त्याविषयी कळवा. आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'आम्ही साऱ्या जणी' या कॉलमसाठी 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे व फोटोदेखील यामध्ये अपेक्षित आहे. मंडळाची माहिती ashwini.kawale@timesgroup.com या ई मेल आयडीवर किंवा महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी अश्विनी कावळे यांच्याशी ०२५३ - ६६३७९३८ या क्रमांकावर दुपारी १२ वाजेनंतर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकथा

$
0
0

आदर्श राजा

वैभव गिलाणकर, नाशिक

एक मोठा कावळा काही दिवसांपूर्वीच दुरून उडून जंगलात आला होता. त्याचं रूप कावळ्याच्या मानाने डौलदार होतं आणि त्याचाच त्याला अहंकार होता, तो उडायचादेखील वेगाने, त्यामुळे त्याने सर्व पक्ष्यांवर रुबाब दाखवायला सुरुवात केली होती. चिमण्या, पोपट, खंड्या, सुगरण, सुतारपक्षी, कबुतरं, आदी सर्व पक्ष्यांना तो आपल्या शक्तीचा धाक दाखवायचा. त्यांना त्याने धमकावलं की त्यालाच राजा मानायचं, उत्तमोत्तम फळे त्यालाच आणून द्यायची आणि जे घरटं त्याला आवडेल ते त्याचं होईल. हे ज्या पक्ष्यांना मान्य नसेल त्यांची घरटी, अंडी तो उद्ध्वस्त करायचा. त्यामुळे नाईलाजाने पक्षी त्याचं ऐकत होते. पण ते त्याला राजा मानत नव्हते. कारण त्यांना एक राजा होता, तो म्हणजे गरुड. काही दिवसांसाठी मात्र गरुड राजा बाहेर गावी गेला होता.

गरुडराज जेव्हा परत आला तेव्हा सर्व पक्षी त्याच्याकडे गेले. त्यांनी त्याला विनवलं, 'हे गरुडराज, आम्हाला वाचवा! या कावळ्याने मनमानी सुरू केली आहे. तो स्वतःला पक्ष्यांचा राजा म्हणवून घेत आहे, तो ताकदवान, वेगवान असल्याने आम्ही त्याला विरोधही करू शकत नाही.' गरुडही खूप ताकदवान होता पण तो हुशारही होता, त्याला कळलं की, ही समस्या युक्तीनेच सोडवावी लागेल. त्याने पक्ष्यांना आश्वासन दिलं आणि तो दुसऱ्या दिवशी त्या कावळ्याला भेटून म्हणाला, 'नमस्कार, तुम्हाला पक्ष्यांचे राजे बनायचे आहे असे कळले तेव्हा राजेपदासाठी माझ्याशी एक सामना करा.'

कावळ्याने गुर्मीतच त्याला हसून उत्तरं दिलं, 'असं? मग बोल कसला सामना करायचा?'

'सध्या आकाशात इंद्रधनुष्य दिसत नाही. तेव्हा, गरुडाने खाली बोट दाखवलं, 'तो जमिनीवर पडलेला इंद्रधनुष्य सर्वप्रथम आणून जो आकाशात लावेल तोच राजा होईल.' कावळ्याने खाली पाहिलं तर खरोखरंच एक धनुष्याकृती सप्तरंगी पट्टा पडला होता. तो गर्वाने म्हणाला, 'एवढंच? हे बघ मी सूर मारून आता तो इंद्रधनुष्य आणतो!' कावळा वेगाने पट्ट्याच्या दिशेला जाऊ लागला आणि तेवढ्यात गरुडाने आकाशातून एक चित्कार केला, कावळ्याला त्याक्षणी त्या पट्ट्यात हालचाल जाणवली आणि जेव्हा त्याला सत्य कळलं तेव्हा उशीर झाला होता. तो पट्टा नव्हता तर पहुडलेला एक अजस्त्र अजगर होता ज्याचे खवले सूर्यप्रकाशात सप्तरंगी चमकत होते. गरुडाच्या ओरडण्याने तो सावध झाला आणि त्याने वेगाने त्याच्या दिशेला येणाऱ्या कावळ्यावर गरुड समजून झडप घातली. कावळ्याला सावरण्याचीही संधी मिळाली नाही, अजगर त्याला विळख्यात पकडून घेऊन गेला. त्याबरोबर सर्व पक्ष्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला, त्यांनी गरुडाच्या नावाचा जयजयकार केला! गरुडाने गर्विष्ठ आणि जुलमी कावळ्याला धडा शिकवला आणि हे सिद्ध केलं की जो प्रजेला युक्तीसामर्थ्याने संकटमुक्त करतो तोच आदर्शराजा असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकविता

$
0
0

झिप झॅप झूम - बालकविता

आजी म्हणते

राजेंद्र उगले, नाशिक

आजी म्हणते सकाळी

लवकर लवकर उठायचं

सुट्टी असली म्हणून काय

दिवसभर झोपायचं?

बघ म्हणते सूर्याला

सुटी कधी घेतो का

किती चढतो डोंगर तरी

तो कधी थकतो का?

तो कधी खात नाही

तुमच्यासारखी मॅगी

म्हणूनच त्याची बुद्धी

रोज असते जागी...

खूप खूप खेळायचं

मैदानात पळायचं

गरम भाजी भाकरीचं

पोट भरून जेवायचं...

अभ्यास नका करू पण

थोडं काही वाचत जा

पेपरमधल्या बातम्यांना

नजरेखाली घालत जा...

आजी माझी म्हातारी

तिला सगळे कळते

मला काही समजेना

कोणत्या शाळेत शिकते?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचर्सशी वृद्धेचा संघर्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी कुठे जायचे असे विचारण्याचा बहाणा करीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वृद्धेचा गळा दाबून गळ्यातील ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन पोत ओरबाडून नेल्याची घटना चिंचोली फाटा येथे घडली. या घटनेतील वृद्धेने धाडस दाखवत लुटारूंना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र स्त्री धन वाचविण्यात वृद्धेला अपयश आले. विठाबाई झाडे (वय ७५) या महिलेचे धाडस सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.

चिंचोली फाटा येथे घराकडे जाण्यासाठी विठाबाई विठ्ठल झाडे (रा. चिंचोली, ता. सिन्नर) ही वृद्ध महिला शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वाहनाच्या प्रतीक्षेत उभी होती. याचवेळी दोघांनी या वृद्ध महिलेजवळ येऊन कुठे जायचे अशी विचारपूस केली. यावेळी एकाने वृद्धेच्या गळ्यातील एक आठ ग्रॅमची २४ हजार रुपयांची सोन्याची पोत आणि दुसरी १२ ग्रॅमची ३६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडली. मात्र विठाबाईंनी या दोघा लुटारूंनी खेचलेल्या दोन्हीही पोती धरून ठेवल्याने त्या लुटारुंच्या गाडीसोबत काही अंतर फरफटत गेल्या. परंतु, दोघे सोन्याच्या पोती खेचून घेत पळून जाण्यास यशस्वी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काझी गढीसाठी खालसा धोरण

$
0
0

पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर सुरू

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जोरदार पावसामुळे जुने नाशिक भागातील काझी गढीचा काही भाग घसरू लागल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी गढीवरील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आदेश महापालिकेने दिले. मात्र, 'आम्हाला तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरुपी स्थलांतर द्या, अन्यथा आम्ही इथेच राहू', अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रहिवाशांनी स्थलांतरास सुरुवात केली.

शहरात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे काझी गढीचा काही भाग कोसळल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत महापालिकेने रहिवाशांच्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था केली. शनिवारी (६ जुलै) सकाळी ११ वाजता दुपारी ३ वाजेपर्यंत घरे खाली करण्याचे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गढीवरील रहिवाशांना केले. पोलिसांनी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण, 'फक्त पावसाळ्यात आमच्या पुनर्वसनाचा मुद्दा येतो. आम्ही तात्पुरते जाणार नाही. आम्हाला कायमस्वरुपी पक्की घरे द्या', अशी भूमिका घेत स्थलांतरास विरोध केला. प्रशासनाने दुपारी तीननंतर पोलिसबळाचा वापर करून घरे खाली करू, असा इशारा देऊनही रहिवाशी स्थलांतरास तयार नव्हते. अखेरीस सायंकाळी ४ वाजता पोलिसांनी काझी गढी परिसरातील बंदोबस्त अधिक वाढवला. सायंकाळी ५ वाजता भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी रहिवाशांना स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले. पोलिसांनी अखेरची सूचना देऊनही रहिवाशी त्यांच्या मागणीवर ठाम होते. पोलिसांनी संभाव्य आपत्तीची पूर्ण कल्पना देऊन, तात्पुरते स्थलांतर तुमच्या हिताचे आहे, हे पटवून दिल्यानंतर सायंकाळी ७ वाजता रहिवाशांनी स्थलांतरास सुरुवात केली. स्थलांतरीत रहिवाशांची बी. डी. भालेकर शाळा, गाडगे महाराज धर्मशाळा, चव्हाट्यामधील रंगारवाडा मनपा शाळा येथे वास्तव्याची सोय केली आहे. रात्री उशिराने स्थलांतर थांबविण्यात आले असून, आज (दि. ७) सकाळी ९ नंतर पुन्हा स्थलांतरास सुरुवात होणार आहे.

..

विविध विभागांची पथके तैनात

महापालिका विभागीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण पथक, अग्निशमन दल यांसह पोलिस व जलद प्रतिसाद पथकाचे जवान काझी गढी परिसरात तैनात केले आहेत. सकाळी रहिवाशांना नोटिसा देताना महापालिका उपायुक्त महेश डोईफोडे, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, पश्चिम विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे, प्रभारी शहर अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दिवसभर पूर्ण यंत्रणा तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

..

आमची विनंती ऐका...!

आम्ही तुमचे म्हणणे ऐकू, तुम्ही आमची विनंती ऐका. कारण, फक्त पावसाळ्यातच आमच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत येतो. इतर दिवसात प्रशासन आमच्याकडे पहातदेखील नाही. आम्हाला पक्की घरे बांधून मिळावीत. याबाबत ठोस निर्णय मिळाल्यास आम्ही स्थलांतरीत होऊ, असे मत रहिवाशांनी मांडले.

...

आम्ही पाणीपट्टी व घरपट्टी भरतो. त्यानुसार आम्हाला सुविधा मिळत नाहीत. फक्त पावसाळ्यापुरताच आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, कायमस्वरुपी स्थलांतर किंवा पक्की घरे मिळवून देण्यासाठी प्रशासन भूमिका घेत नाही. म्हणून, तात्पुरत्या स्थलांतराला आमचा विरोध आहे.

- प्रदीप बडगे, रहिवाशी

..

शासकीय योजनेतून घर मिळवून देण्यासाठी कागदपत्रे मागितले जातात. मात्र, पक्के घर देण्यासाठी कार्यवाही होत नाही. दरवर्षी पावसाळ्यात स्थलांतरीत होण्यास सांगितले जाते. सोय केलेल्या ठिकाणाहून पावसाचा जोर कमी झाल्यावर काढून दिले जाते. यामुळे तात्पुरती व्यवस्थाही नकोशी वाटते.

- मीराबाई गुरव, रहिवाशी

...

काझी गढी येथील रहिवाशांचे स्थलांतर सुरू आहे. यासाठीच्या नोटिसा या अगोदरच बजाविण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या मदतीने सर्व कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी तैनात आहेत. जुने नाशिक परिसरात तीन ठिकाणी रहिवाशांची पर्यायी व्यवस्था केली आहे.

- जयश्री सोनवणे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

..

पॉइंटर्स

- सकाळी ११ वाजता रहिवाशांना नोटिसा

- दुपारी १२.३० वाजता पोलिसांकडून तपासणी

- दुपारी ३ पर्यंत घरे खाली करण्याचे आदेश

- दुपारी ३.३० वाजता महापालिकेची यंत्रणा दाखल

- सायंकाळी ५ वाजता पोलिसांचा फौजफाटा तैनात

- सायंकाळी ६ वाजता जलद प्रतिसाद पथक पोहोचले

- सायंकाळी ६.३० वाजता रहिवाशांना पुन्हा आवाहन

- सायंकाळी ७ वाजता स्थलांतरास सुरुवात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहारातून विषबाधा

$
0
0

नगरसूलचे २२ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील नगरसूलजवळील दाद मळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी शाळेत दूध, खिचडी याचे सेवन केले होते. त्यानंतर जवळपास दोन तासांनी विद्यार्थी घराकडे परतले. त्यांना अचानक चक्कर, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे.

दाद मळा येथील जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंतचे चार वर्ग असून तेथील एकूण पटसंख्या २७ इतकी आहे. शाळेत शनिवारी (दि. ६) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांनी दूध व नंतर खिचडीचा अल्पोपहार घेतला. पुढे सकाळी साडेअकरा वाजता सुटी झाल्यावर विद्यार्थी घराकडे परतले. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना चक्कर, मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. पालकांसह सर्वांचीच धावपळ उडाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयात दुपारी बारा वाता सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांना दाखल करण्यास सुरुवात झाली. ही संख्या सायंकाळी चार वाजेपर्यंत २२ पर्यंत वाढली. सर्व विद्यार्थी आठ ते दहा वर्षे या वयोगटातील आहेत.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश सूर्यवंशी व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. घटनेची माहिती मिळताच सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे, आरोग्यसेवक एन. डी. तिरसे यांच्यासह आरोग्य सहाय्यक सोनकुसरे आदींनी नगरसूलकडे धाव घेतली. सरपंच प्रसाद पाटील यांच्यासह इतरांनी पालकांना मदत केली.

आहार नमुने ताब्यात

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत दाखल झालेल्या एका पथकाने शाळेतील घटनास्थळी जाऊन तातडीने पंचनामा केला तसेच विद्यार्थ्यांना दिलेल्या शालेय पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या अन्नाचे नमुने अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

जिल्ह्यातील मालेगाव मध्य सोडल्यास १५ पैकी १४ विधानसभा मतदारसंघांसाठी ४० हून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. इच्छुकांमध्ये जिल्ह्यातील चारही आमदारांनी उमेदवारी मागितली आहे. इतर मतदारसंघांत जुनेच चेहरे जास्त आहेत. काँग्रेसला सोडण्यात येणाऱ्या मतदारसंघांतूनही अनेक इच्छुक समोर आले आहेत.

नाशिकच्या चार विधानसभा मतदारसंघांत २५ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित अकरा मतदारसंघांत उमेदवारी मागण्याची संख्या तुलनेत कमी आहे. काही मतदारसंघांत एक, तर काही मतदारसंघांत फक्त दोनच इच्छुक आहेत. राष्ट्रवादीने अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तो आकडा अजून समोर आलेला नाही. हे अर्ज १ जुलैपर्यंत दाखल करण्यात सांगण्यात आले होते.

महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत घेतलेल्या जिल्हानिहाय बैठकीत अनेकांनी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छा व्यक्त केली. पण, या बैठकीस केवळ पदाधिकारी व नेतेच उपस्थित होते. त्यामुळे पक्षाने सामान्य कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिली. काँग्रेस व इतर मित्रपक्षांना किती व कोणत्या जागा सोडणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तूर्त तरी सर्व जागांवर अर्ज भरले आहेत. या अर्जांसोबत सर्वसाधारण वर्गातील इच्छुक उमेदवारांनी ५००० रुपये, तर महिला, अनुसूचित जाती व जमाती या वर्गातील इच्छुक उमेदवारांनी २५०० रुपये पक्षनिधीही दिला आहे.

--

..असे आहेत मतदारसंघनिहाय इच्छुक

--

नाशिक पूर्व- निवृत्ती अरिंगळे, गौरव गोवर्धने, विजय आव्हाड

नाशिक पश्चिम- अपूर्व हिरे, नाना महाले, बाळासाहेब जाधव

नाशिक मध्य- देवीदास पिंगळे, गजानन शेलार, विश्वास ठाकूर, अर्जुन टिळे, अनिता भामरे, सूफियान जीन

देवळाली- दीपक वाघ, लक्ष्मण मंडाले, रविकिरण घोलप, सुनील कोथमिरे, यशवंत शिरसाठ, नितीन मोहिते, गौतम दोंदे

इगतपुरी- भास्कर बदादे

सिन्नर- बाळासाहेब वाघ

येवला- छगन भुजबळ, माणिकराव शिंदे

नांदगाव- पंकज भुजबळ

चांदवड- बाळासाहेब माळी, नूतन आहेर, सुनील आहेर

निफाड- दिलीप बनकर

कळवण- जनार्दन भोये

बागलाण- दीपिका चव्हाण

दिंडोरी- नरहरी झिरवाळ, धनराज महाले

मालेगाव बाह्य- विजय पवार, जयंत पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राजक्त देशमुख यांचे मंगळवारी व्याख्यान

$
0
0

प्राजक्त देशमुख यांचे

मंगळवारी व्याख्यान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावाना पुस्तक मित्र मंडळातर्फे प्राजक्त देशमुख यांचे 'संगीत देव बाभळी' या नाटकाच्या पुस्तकावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी (९ जुलै) सायंकाळी ६ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह सावाना आवार, टिळक पथ, नाशिक येथे हे व्याख्यान होणार आहे. या नाटकाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला असून सध्या रंगभूमीवरही गाजत आहे. या व्याख्यानाला नागरिक व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावाना मित्र मंड‌ळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

वडनेर खाकुर्डी पोलिसांनी शनिवारी वडेल शिवारातील अवैध गावठी दारू बनविण्याच्या अड्ड्यावर कारवाई करीत तो उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३५ हजार ९८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.

येथील अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीतील वडेल शिवार सिंधबन गाव पाणीपुरवठा धरणाच्या किनारी गावठी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त केले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images