Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तलाठीपदासाठी परीक्षा

0
0

नाशिक : गट क संवर्गातील तलाठीपदासाठी जिल्ह्यात २ ते २६ जुलै या कालावधीत परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी १० ते १२ आणि दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत महापरीक्षा पोर्टलद्वारे ही परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षामार्फत होत आहे. उमेदवाराच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणकविषयक पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा, महाविद्यालयाची निवड महा-आयटीकडून केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. १८०० ३००० ७७६६ व enquiry@mahapariksah.gov.in या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन खेडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचकच्या शाळेत आज वृक्षारोपण

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या जेलरोड पंचक येथील शाळा क्रमांक ४९ मध्ये शनिवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता वृक्षरोपणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक कचरु लभडे यांनी दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जेलरोड शाखेचा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त बँकेतर्फे वृक्षरोपणाचा कार्यक्रम होणार आहे. बँकेचे व्यवस्थापक, शाळेचे पर्यवेक्षक लक्ष्मीकांत संत, गोपाल बैरागी, प्रमिला सोनार, भूपेंद्र शुक्ल आदींची प्रमुख उपस्थिती राहील. सोनचाफा, कडूनिंब, कदंब, जांभूळ आदी झाडे लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसायकलिस्टवर काळाचा घाला

0
0

सिन्नरजवळील ट्रक अपघातात मृत्यू; पंढरपूर सायकलवारीला गालबोट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सर्वांत कमी वयात सायकलवारीच्या विक्रमाला गवसणी घालण्याची तयारी करणाऱ्या बाल सायकलिस्टचा ट्रकने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २८) सकाळी सिन्नरलगत नाशिक-पुणे महामार्गावर घडली. प्रेम सचिन निफाडे (वय ९ वर्षे) असे असून त्याच्या आकस्मिक मृत्युने सायकलवारीला गालबोट लागले.

नाशिक सायकलिस्टच्या नाशिक ते पंढरपूर या सायकलवारीत दरवर्षीप्रमाणे सचिन निफाडे आणि रत्ना निफाडे (रा. आशियाना अपार्टमेंट, नारायण बापू नगर, जेलरोड, नाशिकरोड) हे दांपत्य सहभागी झाले. त्यांनी मोठ्या हौसेने आपला लहान मुलगा प्रेम यालाही या वारीत सहभागी करून घेतले. सर्वांत कमी वयात नाशिक ते पंढरपूर अशी सायकलवारी करण्याचे रेकॉर्ड आपल्या मुलाने करावे, असे निफाडे दांपत्याचे स्वप्न होते. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी सचिन आणि रत्ना या आईवडीलांसह प्रेम सायकलवारीत सहभागी झाला. सायकलवरून पंढरपूरच्या दिशेने सकाळी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या काही तासातच प्रेमवर काळाने घाला घातला आणि निफाडे कुटुंबियांचे सायकल वारी पूर्ण करीत विठुरायाला भेटण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. प्रेमच्या पश्चात आदेश (वय १७) हा भाऊ आहे.

काळाने अभिमानच हिरावला…

सायकल वारीत प्रेम सहभागी झाल्याचा त्याच्या पालकांना मोठा अभिमान वाटत होता. शहरातील काही माध्यम प्रतिनिधींनाही प्रेमच्या वडीलांनी प्रेमच्या धाडसाबद्दल गुरुवारीच माहिती दिली होती. परंतु, ट्रक अपघातात प्रेमचा मृत्यु झाल्याने निफाडे दांपत्याचा अभिमानच काळाने हिरावून नेला. सायकल वारीतील सर्वच सदस्य शोकाकूल झाले. प्रेमच्या निधनाचे वृत्त समजताच निफाडे कुटुंबियांचे वास्तव्य असलेल्या आशियाना अपार्टमेंधील रहिवासी हादरून गेले. प्रेमचे कुटुंब मुळचे निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आहे. प्रेमच्या मृत्युमुळे नांदुर्डी गावावरही शोककळा पसरली आहे.

प्रेम शिस्तप्रीय होता हो…

प्रेम निफाडे हा डीजीपीनगरच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता. प्रेम खूप शिस्तप्रिय विद्यार्थी होता हो, …अशा शब्दांत त्याच्या शाळेतील शिक्षकांनी प्रेमची आठवण सांगितली. प्रेम हा स्केटिंगचा उत्कृष्ट खेळाडूही होता. वडिलांमुळे त्याला सायकल चालविण्याचाही छंद जडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोच्या सभापतिपदासाठी शिवसेनेतही रस्सीखेच

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

मार्चअखेर प्रभाग सभापतिपदाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही आचारसंहिता असल्याने सभापतिपदाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, या निवडणुका आता पुढील आठवड्यात होणार असून, सिडकोतून शिवसेनेचाच सभापती होणार असल्याने या पदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून सिडकोचे सभापतिपद हे शिवसेनेच्याच ताब्यात असून, आता ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिडको प्रभाग सभापतिपदी सध्या शिवसेनेच्या नगरसेविका हर्षा बडगुजर कामकाज पाहत आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या सभापतिपदासाठी सिडकोतून अनेकांनी तयारी दर्शविली असली तरी पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडकोत शिवसेनेचे बंटी तिदमे, श्याम साबळे, सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खाडे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुदाम डेमसे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, किरण गामणे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, संगीता जाधव आदी सदस्य आहेत. यापैकी यंदा सभापतिपदासाठी नगरसेवक सूर्यवंशी, साबळे, दातीर, राणे, मटाले, जाधव व गामणे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. प्रत्येक सदस्याला एक तरी पद मिळाले पाहिजे, या उद्देशाने शिवसेनेने प्रत्येक सदस्याची त्या पद्धतीने वर्णी लावण्याचे निश्चित केले आहे. असे असले तरी सिडकोतील सभापतिपदासाठी अनेकांनी तयारी दाखविल्याने आता हे पद नक्‍की कोणाला मिळणार, याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. सिडकोत २४ पैकी ९ सदस्य भाजपचे असून, एकच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे १४ सदस्य असलेल्या शिवसेनेचाच सभापती सिडकोला मिळणार हे मात्र निश्चित झाले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे या पदावर सर्वांचेच लक्ष लागले असल्याचे दिसत आहे. त्यातच भाजप व शिवसेना युती झालेली असल्याने सिडकोचे सभापतिपद भाजपला सुटणार तर नाही ना, याबाबतच्या चर्चेने जोर धरला असून, ऐनवेळीच सभापतिपदाचे नाव निश्चित केले जाईल, असे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्तात पुनदचा श्रीगणेशा

0
0

कळवणकरांचा निषेध; धरण परिसरात दिवसभर फौजफाटा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बहुचचिर्तत व बहुप्रतिक्षेत असलेल्या पुनद पाणीपुरवठा योजनेचा शुक्रवारी प्रचंड पोलिस बंदोबस्तात श्रीगणेशा झाला. पुनद येथील जलशुद्धिकरण केंद्र व पाइपलाइनच्या कामास शुभारंभ झाल्याने सटाणावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुनद पाणीपुरवठा योजनेस गुरुवारी उच्च न्यायालयाने शासनाचे कान टोचल्याने आज पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने सकाळी ११ वाजता पुनद धरणापासून योजनेच्या कामाला सुरुवात झाली. महिनाभरापूर्वी ज्या पाइपलाइनला कळवणवासीयांनी विरोध केला होता त्या पाइपने भरलेली वाहने शुक्रवारी सकाळी ७ वाजता सटाणा येथून पोलिसांच्या फौजफाट्यात पुनद धरणावर पोहोचल्या. मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल, रेशमी वालावलकर, कळवण प्रांतधिकारी पंकज आशिया, पोलिस उपअधीक्षक शशीकांत शिंदे, आदींसह फौजफाटा तैनात होता.

आज कळवण तालुका बंद

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सटाणा नळपाणीपुरवठा योजनेला कळवण तालुकावासीयांचा विरोध कायम आहे. तालुका कृती समितीने शुक्रवारी काळा दिवस घोषित करीत जयदर येथे पोलिसांसमोर निषेध आंदोलन केले. तसेच या योजनेला विरोध करण्यासाठी कृती समितीने बैठक घेवून येत्या आगामी साखळी आंदोलन करण्याचा निर्धार केला. तसेच शनिवारी कळवण तालुका बंद पुकारला आहे.

कळवण तालुका कृती समिती व सटाणा नगर परिषदेचे पदाधिकारी यांची ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर पाइपद्वारे पाणी योजनेला विरोध नोंदविला. हे पाणी सुळे डावा कालव्याद्वारे घेऊन जाऊन खामखेडा, ठेंगोडा या परिसरात लघु प्रकल्प बांधून त्यात टाकावे आणि पाइपलाइनने उचलावे असे सुचवले होते. शुक्रवारी खडकी फाटा, जयदर येथे धरणापासून सहा किलोमीटर लांब पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. त्या ठिकाणी कळवण तालुका कृतीसमितीने आंदोलन करून आपला विरोध दर्शविला. सर्व आंदोलकांना अटक करण्यात आली. त्यानंतर आंदोलक कृती समितीचे अध्यक्ष देवीदास पवार, जि. प. सदस्य नितीन पवार, अंबादास जाधव, राजेंद्र भामरे, आण्णा शेवाळे आदींना अभोणा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थानबद्ध ठेवून अखेर त्यांना सोडून देण्यात आले.

निषेध नोंदविणारच

शनिवारी कळवण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी १ जुलै रोजी कळवण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता विचार विनिमय करण्यासाठी बैठक ठेवण्यात आली आहे. त्यानंतर कळवणचे प्रांतअधिकारी, तहसीलदार, पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात येणार आहे. सोमवारी बाजार समितीतील सर्व व्यव्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या बैठका घेऊन आंदोलनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर धरण क्षेत्रांत जनआंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

सटाणा नगर परिषद पदाधिकारी व शासनाने आमची फसवणूक केली आहे. आम्हाला चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. आणि आता पोलिस बंदोस्तात पाइपलाइन करण्याचा आदेश आणला आहे.--देविदास पवार, अध्यक्ष, कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात पाणीबाणी कायम

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचे आगमन झालेले असले, तरी अजूनही टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झालेली नाही. जून महिना सरत आलेला असतानाही नाशिक विभागातील ५४ पैकी तब्बल ४२ तालुक्यांतील १२२२ गावे आणि ४४०४ वाड्यांवर ७१ शासकीय आणि १४९७ खासगी अशा एकूण १५६८ टँकरद्वारे २७ लाख ६६ हजार ५७५ नागरिकांना प्रशासनातर्फे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. पावसाने अद्याप सर्वदूर हजेरी न लावल्याने विभागातील पाणीबाणी कायम आहे.

नाशिक विभागात एकीकडे काही टापूंत धो-धो पाऊस कोसळला असला तरी दुसरीकडे बहुतांश दुष्काळग्रस्त तालुक्यांवर मात्र मान्सूनने अद्याप कृपा केलेली नसल्याचे चित्र आहे. परिणामी, नाशिक विभागात यंदा प्रथमच जून महिन्याच्या शेवटीदेखील टंचाईची स्थिती कायम असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. नाशिक विभागातील नाशिक, नगर आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या अजूनही कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ६१ हजार ७७२, नगर जिल्ह्यातील १४ लाख ५३ हजार ७९९, जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ४५५, धुळे जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ३४ तर नंदुरबार जिल्ह्यातील ५१२ नागरिकांना अजूनही पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. विभागात गावांसाठी ५५३, तर टँकरसाठी १८७ विहिरी यापूर्वीच प्रशासनाकडून अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर या पाच नगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईची समस्यादेखील अद्याप कायम आहे.

टंचाईग्रस्त तालुके

नाशिक : बागलाण, चांदवड, येवला, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा आणि सिन्नर

जळगाव : जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा

नगर : संगमनेर, अकोले, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा

धुळे : धुळे, साक्री, शिंदखेडा

विभागातील टंचाई स्थिती

जिल्हा---गावे---वाड्या---टँकर्स---लोकसंख्या

नाशिक---२८८---९८८---३९३---५६१७७२

धुळे---८८---३६---८५---२६४०३४

नंदुरबार---२---०---१---५१५

जळगाव---२४९---०---२२०---४८६४५५

नगर---५९५---३३८०---८६९---१४५३७९९

एकूण---१२२२---४४०४---१५६८---२७६६५७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांबाबत निवेदन

0
0

नाशिकरोड : महापालिकेचे नाशिकरोड विभागीय अधिकारी नितीन नेर यांचा मनसेतर्फे सत्कार करण्यात आला. नाशिकरोड भागातील नागरी समस्या, प्रभाग क्रमांक २० मधील उद्यान दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आले. मनसेचे विभागीय अध्यक्ष साहेबराव खर्जूल, नितीन पंडित, मनसेचे शहर संघटक भाऊसाहेब ठाकरे, विजय बोरसे, चंद्रभान ताजनपुरे, सुनील पाटोळे, गोपाल पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसावळ पॅसेंजरदोन दिवस रद्द

0
0

नाशिकरोड : मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. लोहमार्गांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली असल्यामुळे काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ५११५४ अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर गाडी शनिवारी (ता. २९) आणि रविवारी (ता. ३०) रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५११५३ डाउन मुंबई- भुसावळ पॅसेंजर रविवारी आणि सोमवारी (ता. १) रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ११०२५ अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस शनिवारी आणि रविवारी सुटणारी गाडी नाशिकरोडऐवजी मनमाड-दौंड मार्गाने पुणे स्टेशनला पोहोचेल. गाडी क्र. ११०२६ डाउन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस शनिवारी आणि रविवारी नाशिकरोडऐवजी दौंड-मनमाड मार्गाने भुसावळ स्टेशनला पोहोचेल. रेल्वेच्या भुसावळ विभागाने ही माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आजवर राज्यात झालेल्या आंदोलकांवरील दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीतील सदस्यांसह शिवजन्मोत्सव सोहळा समितीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे शुक्रवारी लेखी निवेदनाद्वारे केली. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या ४२ बांधवांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणीही या कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी गणेश कदम, सुनील आडके, नितीन खर्जूल, नितीन चिडे, विकास भागवत, किशोर जाचक, अतुल धोंगडे, राजेश कोकणे, साहेबराव शिंदे, बापू सापुते, विक्रम कोठुळे, शिवाजी हांडोरे, सचिन हांडगे, राहुल वाजे, अंकुश बोचरे, ज्ञानेश्वर खालकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट -

0
0

'तो' आरोपी स्वत:हून हजर

नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात मुंबई नाका पोलिस ठाणे पोलिसांच्या ताब्यातील संशयित आरोपी अशोक दता पारखे (वय २४) मंगळवारी (दि. २५) सायंकाळी ६ च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवत पळून गेला होता. पोलिस त्याच्या शोध घेत असताना हा संशयित शुक्रवारी स्वत:हून मुंबई नाका पोलिस ठाण्यात हजर झाला.

'अंत्योदयाची सुरुवात'

मंगळवारी व्याख्यान

नाशिक : प्रसाद सोशल ग्रुप व राष्ट्रीय विचार प्रबोधनी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने प्र. शं. तथा बंडोपंत जोशी यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त 'अंत्योदयाची सुरुवात' या व्याख्यानाचे मंगळवारी (दि. २ जुलै) आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखक, कवी, अभिनेता दीपक करंजीकर हे व्याख्यान देणार असून, घरकुल सामाजिक संस्थेस उत्कृष्ट सामाजिक संस्था हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात होईल. या सोहळ्यास नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गुंतवणुकीवर

आज व्याख्यान

नाशिक : बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंज-इनव्हेस्टर प्रोटेक्‍शन फंड (बीएसई-आयपीएफ) यांच्यातर्फे शनिवारी (दि. २९) गुंतवणूक विषयक जनजागृती व्याख्यान आयोजित केले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दुपारी १२ वाजता हे व्याख्यान होईल. व्याख्यानात गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती देण्यासह, सुरक्षित गुंतवणुकीसाठीची माहिती दिली जाणार आहे. प्रा. दीपाली चांडक या व्याख्यानात मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यनाला नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालक सभा संपन्न

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ओझर येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी पालक सभा घेण्यात आली. यात शालेय उपक्रमांसह नव्या धोरणांची माहिती देण्यात आली. शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक मंडळ अध्यक्ष एल. एस. जाधव, संस्थेचे सहकार्यवाह गंगाधर बदादे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने, सेलफोन घरफोडीत लंपास

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सामनगावरोड आणि चेहेडी शिव परिसरात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यात चोरट्यांनी ५१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह तीन मोबाइल असा १ लाख ६३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

अशोक मुरलीधर मोरे (४२, रा. पेखळे मळा, चेहेडी) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी शुक्रवारी (दि. २८) सकाळी तुटलेली आढळून आली. साहित्यही घराबाहेर अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. शोध घेतला असता त्यांना ४५ ग्रॅम आणि ६ ग्रॅमची अशा दोन पोत असे १ लाख ४२ हजार ८०० रुपयांचे दागिने आढळून आले नाही. याच रात्री गणेश प्रकाश सोनवणे (रा. सिद्धीविनायक कॉलनी, बोराडे मळा) यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून १४ हजार रुपयांचे दोन मोबाइल फोन चोरट्यांनी चोरून नेले. याच रात्री चेहेडी शिव, बांगर वस्तीवरील रमेश संभाजी घुगे यांच्या घराच्या खिडकीतून हात घालून चार्जिंगसाठी ठेवलेला ६ हजार ५०० रुपयांचा मोबाइल फोन चोरट्यांनी लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मारक उभारावे

0
0

मराठा क्रांती मोर्चा बैठकीत सूचना

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मराठा आरक्षणासाठी ज्या ४२ मराठा बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतीसाठी हुतात्मा मराठा स्मारक उभारावे. तेथे त्यांना दरवर्षी २७ जून रोजी मराठा बांधवाना आदरांजली अर्पण करण्यात यावी, अशा सूचना सकल मराठा समाज आयोजित बैठकीत मांडण्यात आली

पंचवटीतील वरदलक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या बैठकीस आमदार सीमा हिरे, सुनील बागूल, करण गायकर, गणेश कदम आदी उपस्थित होते. अण्णासाहेब महामंडळाकडून आवश्यक कर्ज पुरवठा होण्यास अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागत आहे. आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याचे बागूल यांनी सांगितले.

आरक्षणाचे फायदे मिळविण्यासाठी चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. नोकरभरती मार्गदर्शन केंद्राची स्थापना करायला हवी, असे मत करण गायकर यांनी मांडले. एकसंघ झालेला समाज विखुरला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे, असे उमेश शिंदे यांनी सांगितले. राजू देसले यांनी शेती व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. शेतकरी आमहत्या वाढल्या आहेत, त्या मराठा समाजाची संख्या मोठी आहे. समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत आरक्षण लाभ पोहचविण्याचा प्रयत्न करावाल अशी सूचना करण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना नाशिकला बोलावून त्यांचा सन्मान करण्याची सूचना संदीप लभडे यांनी मांडली. समाजातील हजारो नागरिकांवर खोट्या केसेस टाकल्या आहेत, त्या काढून घ्याव्यात, आरक्षण लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबातील एक जणाला सरकारी नोकरी मिळण्याची मागणी करावी, असे गणेश कदम यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

नाशिकच्या सकल मराठा समाजच्या वतीने मराठा आरक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सोमवारी, १ जुलै रोजी भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारची काच फोडून २१ लाखांची चोरी

0
0

चिंचबन परिसरातील धक्कादायक घटना

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कारचा दरवाजा खोलून दोन दिवसांपूर्वी पैशांची चोरी आणि कारची काच फोडून लॅपटॉप चोरी या चोऱ्यांच्या घटना ताज्या असताना, शुक्रवारी (दि. २८) पुन्हा चिंचबन येथे दुचाकीला कट लागल्याचे सांगत कारची काच फोडून व्यापाऱ्याचे २१ लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली.

रविवार कारंजा येथील गोळ्या-बिस्किटाचे होलसेल व्यापारी सुयोग सुभाष धूत (वय ३७, रा. गंगापूर रोड) हे सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारमध्ये (एमएच १५ जीएल ८८११) एका बॅगेत २१ लाख ६० हजार रुपये ठेवून घरी जाण्यासाठी निघाले होते. चिंचबनाच्या कॉर्नरवरच एका दुचाकीस्वाराने कारवर थाप मारून मागे बसलेल्या माणसाच्या पायाला लागल्याचे सांगत गाडी थांबविण्यास सांगितले. सुयोग यांनी चिंचबन परिसरात आपली गाडी थांबविली आणि बोलण्यासाठी कार लॉक करून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने कारच्या डाव्या बाजूची काच फोडून आतमध्ये ठेवलेली २१ लाख ६० हजार रुपयांची बॅग घेऊन पळून जाऊ लागताच बाजूला असलेल्या महिलांनी आरडाओरड केली. तोपर्यंत पायाला लागल्याचा दावा करणाऱ्या माणसानेही घटनास्थळावरून पळ काढल्याचे सुयोग धूत आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बॅग लुटीची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, सहायक आयुक्त गुन्हे आर आर पाटील, वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील, आनंद वाघ, सूरज बिजली, सदानंद इनामदार, सहायक निरीक्षक कैलास वाघ, महेश कुलकर्णी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाती कुठलेच धागेदोरे लागले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी युवकच्याकार्याध्यक्षांचा राजीनामा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आता फक्‍त पदाचा राजीनामा दिला असला तरी भविष्यात ते पक्षांतरही करतात की काय, याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वैभव देवरे यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांकडे या राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले, की युवक काँग्रेसमध्ये ३३ वर्षांपर्यंत काम करण्याची परवानगी असून, यापेक्षा जास्त वय झाल्याने हा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात यश आले आहे. यापुढेही पक्षाच्या माध्यमातून काम सुरूच ठेवणार असून, पक्षाकडून मिळणाऱ्या जबाबदारीचे काम पूर्णपणे पार पाडीन, असे स्पष्ट केले आहे. सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नसून, राष्ट्रवादीतच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटणेत आंदोलन

0
0

मालेगाव : तालुक्यातील पाटणे गावातील सन २०१७-१८ या वर्षात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या अंगणवाडी, जेष्ठ नागरिक भवन इमारतीच्या बांधकामात तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदाराने भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपसरपंच जितेंद्र खैरनार व अन्य ग्राप सदस्यांनी केला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी दोषी असलेल्यांवर करावाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटणे उपसरपंच जितेंद्र खैरनार, तुकाराम बागुल, विठोबा खैरनार, दौलत बागुल, कमलाबाई अहिरे, सुशीलाबाई ठाकरे, जिजाबाई निकम, सतीश शेवाळे, बंटी पवार, पंडित रौदळ, दादा ठाकरे, पपू त्रिभुवन आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवैध प्रवासी वाहतुकीला दणका

0
0

आरटीओकडून ६३ रिक्षांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व अन्य वाहनांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येते आहे. या अंतर्गत येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्या वायुवेग पथकाने आतापर्यंत ६३ अॅपे व अन्य रिक्षा चालकांवर कारवाई करून एक लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली.

कारवाई करण्यात आलेल्या वाहनांपैकी २९ वाहने मालेगाव आरटीओ कार्यक्षेत्रातील विविध पोलिस ठाणे व बसस्थानक आगारात उभी करण्यात आली आहेत. वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, चारूदत्त व्यवहारे, सहा. मोटार वाहन निरीक्षक हेमंत जयकर यांनी ही कारवाई केली. तसेच सर्व वाहनांची नोंदणी ३० दिवसांकरिता निलंबित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदुर्डीत अंत्यसंस्कार

0
0

नांदुर्डीत अंत्यसंस्कार

निफाड : सायकलवारीदरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या प्रेम याच्यावर त्याचे मूळ गाव नांदुर्डी (ता. निफाड) येथे शोकाकूल वातावरण सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेमचे वडील सचिन निफाडे हे नांदुर्डी येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे नांदुर्डी येथे मेडिकल आहे. वेफर्सची एजन्सी घेतल्यापासून ते पत्नी व दोन मुलांसह नाशिक येथे गेल्या पाच वर्षांपासून राहत होते. प्रेमच्या मृत्यूची वार्ता कळताच घरातील नातेवाईक व मित्र परिवार दुपारी १२ वाजेपासून नांदुर्डी येथे गोळा होण्यास सुरुवात झाली.

प्रेमचे नेत्रदान

नाशिक येथे नत्रदान केल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रेमचा मृतदेह नांदुर्डी येथे आणण्यात आले. यावेळी त्याची आजी, आजोबा, चुलते व नातेवाईक यांनी आक्रोश केला. उपस्थितांची मने यावेळी हेलावून गेली. अंत्यसंस्कारप्रसंगी मोठी गर्दी झाली. दादू या टोपण नावाने निफाडे कुटुंबात लाडक्या असलेल्या प्रेमच्या पश्चात आई, वडील, भाऊ आदेश, आजी-आजोबा, दोन चुलते असा परिवार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात महिलेवर बलात्कार

0
0

मनमाड : नांदगाव तालुक्यातील बिरोळे येथील ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शुक्रवारी दोघांवर व त्यांना गुन्ह्यात साथ देणाऱ्या त्यांच्या दोन साथीदारांवर नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. २७ जून रोजी रात्री गावातील शिवाजी वाघ याने पीडित महिलेला आपल्या घरात बोलावले. तिथे त्याने व भावडू मुकणे याने पीडितेवर बलात्कार केला. या गुन्ह्यात त्यांना बापू मुकणे, बिकेश पवार यांनी साथ दिली, अशी फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा उपाध्यक्षपदी कणसे

0
0

जिल्हा उपाध्यक्षपदी कणसे

देवळाली कॅम्प : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भगूर येथील नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक कणसे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक कणसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक वाडा कोसळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुने नाशिक गावठाण परिसरातील डिंगरआळी येथील संभाजी चौकातील धोकादायक झालेला काकडे वाडा शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकून तीन जण जखमी झाले. त्यात कल्पना कुंभकर्ण (वय ५५), सतीश कुंभकर्ण (६५) आणि अमोल कुंभकर्ण (२२) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहरात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी मध्यरात्री जुने नाशिक भागात पावसाची संततधार सुरु होती. शुक्रवारी सकाळी ६ वाजता डिंगरआळीतील काकडे वाड्याचा काही भाग कोसळला. त्याची माहिती ६ वाजून २० मिनिटांनी नितीन भांगरे यांनी अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात दिली. त्यानंतर दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जलद प्रतिसाद पथकासह रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या दुमजली वाड्याची भिंत आणि छत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली तीन जण अकडल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांच्या लक्षात आले. जवानांनी बचावकार्यास सुरुवात करीत एक ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर तिघांना ढिगाऱ्याबाहेर काढले. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांसह टीम लीडर श्याम राऊत, फायरमन ज्ञानेश्वर दराडे, तानाजी भास्कर, अनिल गांगुर्डे, उदय शिर्के, विजय शिंदे, वाहनचालक संजय राऊत आणि दीपक त्र्यंबके यांचा रेस्क्यू पथकात समावेश होता. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वाड्याच्या वरच्या मजल्यावर कालावती गिते (वय ८०) या अडकल्या होत्या. त्यांना हायड्रॉलिक शिडीद्वारे सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यात आले. वाडा कोसळल्याची माहिती परिसरात परसल्यानंतर मदतकार्यासाठी नागरिकांनीही धाव घेतली होती.

आयुक्त, महापौर घटनास्थळी

वाडा कोसळ्याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी यांसह महापालिका अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आयुक्तांनी शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिकेने अगोदरच नोटिसा बजावल्याचे सांगितले. जे रहिवासी वाडे दुरुस्त करणार नाहीत त्यांच्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येईल. वेळेप्रसंगी वाडा रिकामा करण्यास भाग पाडण्यात येईल, असा इशारा आयुक्त गमे यांनी दिला.

--

जीर्ण वाडे ऐरणीवर

जुने नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न डिंगरआळीतील घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१८ मध्ये भद्रकालीतील जुनी तांबट लेन येथील काळे वाडा कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, तर तरुणीसह तीन जण गंभीर जखमी झाले होते. धोकादायक वाड्यांकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत असल्याचे शुक्रवारच्या दुर्घटनेनवरून अधोरेखित झाले आहे.

--

अरुंद रस्त्यांचा अडथळा

सकाळच्या सुमारास सर्व कामात व्यस्त असताना मोठ्या आवाजाने डिंगरआळी हादरली. या अरुंद गल्लीबोळातून नागरिक घटनास्थळी पोहोचत होते. गल्ल्यांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली, तर दुसरीकडे अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यास अडसर निर्माण झाला. बराच वेळ वाहने दूरवर उभी करावी लागली. व्हॅन, शिडी, कटर आणि इतर आवश्यक साहित्य घटनास्थळी पोहोचविणे दलासाठी आव्हानात्मक ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images