Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

केटीएचएममध्ये पत्रकारिता कोर्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदवी एम. ए. पत्रकारिता व जनसंज्ञापन अभ्यास प्रवेश प्रक्रियेस केटीएचएम महाविद्यालयात सुरुवात झाली आहे.

दोन वर्षे पूर्ण वेळ असणाऱ्या या अभ्यासक्रमात प्रॅक्टिकलवर भर देण्यात आलेला आहे. यात सोशल मीडिया, कम्युनिकेशन, फिल्म स्टडीज, रेडिओ ब्रॉडकास्टिंग, अॅडव्हरटायझिंग, पब्लिक रिलेशन्स, क्राइम जर्नालिझम, सायन्स, इनव्हार्यमेंट जर्नालिझम, ऑडिओ व्हिज्युअल्स प्रोडक्शन, मॅगेजिन प्रोडक्शन आदी विषयांचा प्रॅक्टिकलसह अभ्यास करता येणार आहे. यासह अभ्यास दौऱ्यात विविध मीडिया हाऊसेसला भेटी, नवी दिल्लीतील संसद भवन, मुंबईला विधानसभा, विधान परिषद भेट तसेच फिल्म शुटिंग सेट, सायंटिफिक व रिसर्च संस्था यांचा समावेश असेल. तसेच विविध माध्यमांमध्ये इंटर्नशीप देखील करता येईल. या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण पात्रता असेल, अशी माहिती प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेलंगणाला शक्य, महाराष्ट्राला का नाही?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्यापेक्षा २५ टक्के बजेट असणारे तेलंगणासारखे राज्य कालेश्वरमसारखा मोठा प्रकल्प तीन वर्षांत राबवू शकते. याद्वारे १८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणू शकते, तेही एकूण ६१८ मीटर पाणी उपसा करून. राजकीय इच्छाशक्तीचे हे मोठे उदाहरण म्हणावे लागेल. जे तेलंगणाला शक्य झाले, ते महाराष्ट्राला का नाही असा सवाल राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातही दमणगंगा-नारपारचे पाणी फक्त ३०० ते ४५० मीटर उपसा केल्यास उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या पिण्यासह उद्योग व शेतीसिंचनाचा प्रश्न सुटू शकतो. विशेष म्हणजे त्यासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या हक्काचा थेंब न् थेंब वापरात येऊ शकतो. त्यामुळे गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्तीची, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी करार करून गुजरातला देण्यात येऊ नये, तर ते राज्याच्याच दुष्काळी भागाला वापरावे असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

५० किमी बोगद्याची आवश्यकता

तेलंगणाच्या कालेश्वरम प्रकल्पात उपसा उंची ३१८ मीटर आणि बोगद्याची लांबी २०३ किमी आहे. महाराष्ट्रात फक्त ५० किमी बोगद्याची आवश्यकता आहे. मात्र, आज आपले साधे प्रकल्प अहवालसुद्धा बनवण्यात येत नाही, त्यामुळे प्रकल्प राबवणे ही दूरची गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात जलसंपदा विभागातील अधिकारी निष्क्रिय असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील अतिक्रमण हटवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथील बलसागर सोसायटी, पंचकृष्ण लॉन्सजवळील दोन अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. तसेच दालवाला आर्केड, मालवीय चौक, येथील अनधिकृत मोबाइल टॉवर सील करण्यात आले.

विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी अतिक्रमण विभागाचे दोन पथके व पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटवली. शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच, पार्किंगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमित बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ज्या नागरिक, व्यावसायिक व विक्रेत्यांनी अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे काढून घेतलेली नाहीत, त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करंजवणसाठी एकजुटीची हाक

$
0
0

निधी जमा करण्यासाठी थकबाकी भरण्याचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर करंजवण योजनेला मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी मंजुरी दिली. परंतु २९७.७७ कोटी रुपयांची ही योजना लोकवर्गणीच्या आर्थिक तरतुदीअभावी मागे पडू नये यासाठी सारेच सरवावले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी ही योजना मार्गी लागावी म्हणून नागरिकांनी नगरपालिकेकडे पाणीपट्टी, घरपट्टी व गाळेपट्टी त्वरित भरावी अशी विनंती मनमाड बचाव कृती समितीने केली आहे. यासाठी त्यांनी शहरातून रॅली काढून आवाहन केले.

बचाव समितीने मनमाड शहराची ५० वर्षांच्या भीषण पाणी टंचाईतून सुटका व्हावी व कायमस्वरूपी शाश्वत पाणी योजना मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ७ वर्षात सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून करंजवण जलयोजना उच्च न्यायालयाद्वारे शेवटास आणली. त्याला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. २९७ कोटी ७७ लाखांच्या या योजनेची लोकवर्गणी ४५ कोटी आणि तांत्रिक मंजुरीचे ३ कोटी एवढी मोठी रक्कम नगरपालिकेकडे भरायची आहे. ३ महिन्यावर विधानसभा निवडणूक आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे. त्याआधीच सदर योजना मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. परंतु एवढी मोठी रक्कम तातडीने भरणे पालिकेसाठी अवघड आहे. म्हणून नागरिकांनी पाणीपट्टी, घरपट्टी व गाळेपट्टी तातडीने भरावी, दानशूरांनी आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन रॅलीद्वारे मनमाड बचाव समितीतर्फे करण्यात आले.

महात्मा फुले पुतळ्यापासून आवाहन करीत दत्त मंदिर रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एकात्मता चौक, महात्मा गांधी पुतळा व आझाद रोड मार्गे आवाहन रॅली काढण्यात आली. बचाव समितीचे अध्यक्ष युनूस पठाण, सुषमा तिवारी, शमशाद सय्यद, पुंडलिक कचरे, रमेश खरे, दत्तू व्यवहारे, रामदास पगारे, श्रीकांत साळसकर, रतन निकम, सुवर्ण आहिरे आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अचानक करा तपासणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने या केंद्रांची अचानक तपासणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यंत्रणेला दिले आहेत. या केंद्रांकडून व्यवस्थित सेवा मिळत नसल्यास अथवा कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा केंद्र चालकांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

करार संपुष्टात आल्यानंतरही शहरात गुजरात इन्फोटेक कंपनीकडून सेतू केंद्र चालविले जात असल्याचा प्रकार अलीकडेच पुढे आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीची बँक गँरंटी जप्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांना विविध सेवा एकाच केंद्रावर मिळाव्यात यासाठी शहरासह जिल्हाभरात आपली सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु, काही केंद्रांकडून चांगली सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपले सरकार केंद्रांच्या मनमानीला चाप बसावा आणि नागरिकांची हेळसांड टाळता यावी यासाठी केंद्रांची अचानक तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंत्रणेला दिले आहेत. ही केंद्रे व्यवस्थित सेवा देतात अथवा नाही, तसेच निश्चित केलेल्या ठिकाणाहूनच ते सेवा देतात की अन्य ठिकाणी त्यांनी सेवा केंद्र सुरू केले आहे, यासारख्या बाबी तपासाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. ही तपासणी कोणतीही पूर्वसूचना न देता करावयाची आहे.

मनमानीला चाप

प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे या केंद्रांच्या अनियमित कारभाराला चाप लागून नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ हजार १६८ आपली सरकार केंद्र आहेत. या केंद्रांना इंटरनेट कनेक्टिविटी आहे किंवा नाही. असल्यास ती तेवढ्या क्षमतेने काम करतेय किंवा नाही याची तपासणी करण्याच्या सूचना टेलिकॉम कंपन्यांना करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात आणखी २१४ केंद्र सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी गाळ्यांना मुहूर्त कधी?

$
0
0

आम्ही मालेगावकरांचे मालेगावी उपोषण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कॅम्प भागातील सोमवार बाजार व्यापारी संकुलातील गाळे व बाजार ओटे महापालिकेने ताब्यात घेऊन व्यवसायासाठी खुले करावे या मागणीसाठी शुक्रवारी येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पालिका प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात देण्यात आले मात्र पालिकेच्या लेखी उत्तरावर समितीचे समाधान न झाल्याने १५ जुलैपासून या बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

येथील महानगर पालिकेच्या वतीने कॅम्प सोमवार बाजार येथे एकात्मिक विकास योजनेअंतर्गत निधीतून व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. हे संकुल उभारून दहा वर्षे झाली. परंतु महानगर पालिकेच्या वेळकाढू धोरणामुळे आज हे व्यापारी संकुल दारू पिण्याचा व अस्वच्छतेचा अड्डा बनले आहे. आम्ही मालेगावकर संघर्ष समितीच्या वतीने यासंदर्भात आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन २८ मे रोजी निवेदनाद्वारे सदर व्यापारी गाळे खुले करावेत अशी मागणी केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर समितीने शुक्रवारी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करीत पुन्हा मागणीकडे लक्ष वेधून घेतले. उपोषणात अतुल लोढा, निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रा. के. एन. आहिरे, विवेक वारुळे, शेखर पगार आदींसह समिती सदस्य, स्थानिक व्यापारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचप्राण’मधून कृतज्ञतेला अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे नाव साता समुद्रापार नेणाऱ्या चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, संगीत क्षेत्रातील विष्णू दिगंबर पलुस्कर, कवी कुलगुरू कुसुमाग्रज, अष्टपैलू नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या कृतज्ञतेला अभिवादन करण्यासाठी जनस्थान व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने 'पंचप्राण' हा विशेष कार्यक्रम शुक्रवारी झाला.

प. सा. नाट्यगृहात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जनस्थान फेस्टिव्हलमध्ये झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या भजनाने झाली. प्रा. डॉ. अविराज तायडे यांनी पंडित पलुस्कर यांच्या संगीत कारर्किदीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर ठुमक चलत रामचंद्र हे भजन आशिष रानडे यांनी सादर केले. 'रघुवर तुमको मेरी करम' हे भजन डॉ. अविराज तायडे यांनी तर 'चलो गंगा जमूना पार तीर' हे भजन प्रा. मकरंद हिंगणे यांनी सादर केले. त्यांना तबल्यावर नितीन वारे, नितीन पवार यांनी, पखवाजवर दिगंबर सोनावणे, व्हायोलिन अनिल दैठणकर, तालवाद्यावर सुजीत काळे यांनी साथ केली. त्यानंतरच्या सत्रात दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफीत सचिन शिंदे आणि लक्ष्मण कोकणे यांनी सादर केली. फाळके यांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतचा प्रवास या चित्रफितीतून उलगडण्यात आला. पुढच्या सत्रात कवी कुसुमाग्रांजांच्या कवीता यावेळी गायन, नृत्याद्वारे सादर करण्यात आल्या. पळस ही कविता सुमुखी अथनी आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केली. त्यानंतर किशोर पाठक आणि सदानंद जोशी यांनी कुसुमाग्रजांच्या काही कविता सादर केल्या. 'संवाद', 'तुम्ही तेव्हा माझ्या कवितेशी बोलता', 'गाभारा, तृणाचे पाते, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा', त्याच प्रमाणे यमक सादर करण्यात आली.

'सर्वात्मका सर्वेश्वरा' हे गीत मकरंद हिंगणे यांनी, 'रंग' ही कविता मिलिंद धटिंगण यांनी तर प्राजली नेवासकर हिने 'जोगीण' ही कविता सादर केली. वसंत कानेटकर यांच्या 'अखेरचा सवाल' या नाटकातील काही भाग नुपूर सावजी आणि लक्ष्मी पिंपळे यांनी, तर 'बेईमान' नाटकातील काही भाग श्रीपाद देशपांडे आणि प्राजक्त देशमुख यांनी सादर केला.

सावरकरांचा उलगडला जीवनपट

अखेरच्या भागात स्वातंत्र्यवीर सावरकार यांना अभिवादन करण्यात आले. स्वानंद बेदरकर यांच्या ओघवत्या निरुपणाने सावरकारांचा जीवनपट उलगडण्यात आला. सावरकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' या गीतावर कीर्ती भवाळकर व तिच्या शिष्यांनी पदन्यास सादर केला. त्यानंतर स्वातंत्र्य देवतेची आरती सादर करण्यात आली. कार्यक्रमाची ध्वनीव्यवस्था पराग जोशी, प्रकाशयोजना विनोद राठोड, नेपथ्य ईश्वर जगताप, निमिर्ती प्रमुख नंदन दीक्षित यांनी काम पाहिले. अभय ओझरकर यांची निर्मिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीवर आज निर्णय?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा लांबल्याने प्रशासनाने शहरात पाणीकपातीचा विचार सुरू केल्यानंतर आज, शनिवारी महापौर, विरोधी पक्षनेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ गंगापूर धरणातील शिल्लक पाण्याची पाहणी करणार आहेत. गंगापूर आणि मुकणे धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर किती पाणीकपात करायची याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

यंदा पावसाळा लांबल्यामुळे महापालिका प्रशासनाला पाणीकपात करावी लागणार आहे. दारणा धरणातून पाणी उचल बंद झाली असून, गंगापूर आणि मुकणे धरणावर नाशिकची तहान भागत आहे. गंगापूर धरणातील इंटेकवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे महापालिकेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनअखेर पाऊस पडला नाही, तर जुलैत दोन दिवस शटडाऊन करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या कपातीच्या निर्णयासाठी लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या भूमिकेकडे लक्ष होते.

महापौर रंजना भानसी, सभागृहनेता दिनकर पाटील यांनी धरणातील पाण्याची वस्तुस्थिती तपासण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते आज, शनिवारी सकाळी गंगापूर धरणातील पाण्याची पाहणी करणार आहे. याच ठिकाणी गंगापूर, दरणासह मुकणेतील पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर किती पाणीकपात करायची याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरक्षित प्रवासासाठी 'पीडब्लूडी' सज्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यांवरून प्रवास करतांना त्रास होऊ नये, त्यांना रस्त्यांवरील अडचणींची माहिती असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वसूचना म्हणून माहिती तयार केली आहे. त्यात पाण्याखाली जाणारे रस्ते व पूल, दरड कोसळणारी ठिकाणे यांची माहिती आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूर आल्यानंतर वाहतूक कोंडी होते. तर काही ठिकाणी रस्तेच बंद होतात. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी, पर्यायी रस्ते कोणते याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची पुस्तिकाच तयार करून ती जिल्हााधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. आपत्तकालीन वेळेत ती उपयोगी ठरण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात पाण्याखाली जाणारे ३० रस्ते आहेत. ते कोठे असून त्यांचा दर्जा, त्या रस्त्यांची एकूण लांबी व नावे या पुस्तिकेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतीतून कोट्यवधींचा गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विक्रीकर खात्याने कारवाई केलेल्या अंबड औद्योगि वसाहतीतील मिळकतींबाबत एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. संशयित दिनेश शर्मा आणि सुभाष शर्मा यांच्या मालकीची मिळकतींवर ६ ऑक्टोबर २०१५ रोजी उपायुक्त विक्रीकर विभाग यांनी कारवाई करून सील लावलेले होते. असे असताना संशयितांनी हे सील काढून त्या मिळकतींवर कोणताही बोजा नाही, असे भासवून ती मिळकत विक्री करण्याचे मुख्यत्यारपत्र संशयित राजू पवार यास करून दिले. यानंतर ही मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात सदर महिलेकडून एक कोटी ६० लाख रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून घेतले. ही रक्कम बनावट खात्यात वळती केली. ही मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात शर्मा यांनी डिसेंबर २०१७ ते आतापर्यंत वेळोवेळी आरटीजीएसच्या माध्यमातून एक कोटी ६० लाख रूपये घेतले. यानंतरही संबंधित मिळकतीची ना हरकत पत्र न देता त्यासाठी जादा एक कोटी रूपयांची मागणी केली. तर दुसरे संशयित राज राठोड व संदीप कुटे यांनी संबंधित भूखंड खाली करण्यासाठी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅटचे बनावट बक्षीस पत्र

मालमत्तेच्या फसवणुकीबाबत दुसरी फिर्याद भरत गंगाधर राऊत (रा. शुभम सोसा. महात्मानगर) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, संशयित हेमंत सदाशिव काळे, सदाशिव शिवाजी काळे व एक महिला आदींनी राऊत यांच्या फ्लॅटचे बनावट बक्षीस पत्र केले. तसेच सदरची मिळकत संशयित हेमंत व सदर महिलेच्या नावावर करून घेतली. हा प्रकार १७ जानेवारी ते ९ जून २०१५ दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. मूळ घरमालक भरत राऊत यांची संमती नसताना बनावट दस्तऐवज तयार करून तिघांनी फ्लॅट बळकवल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतनगरमधून दोघांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी शिताफीने अटक केली. भारतनगर येथील संशयितांनी एका घरफोडीची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचा सुमारे ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांच्या अटकेने अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.

वसीम अब्दूल शेख व बाबू उर्फ पप्पू अन्सारी (रा. दोघे नंदीनी नगर, भारतनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयिताच्या राहणीमानात बदल झाल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई नाका पोलिसांनी वसीम शेख यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, त्याने पप्पू अन्सारी या साथीदाराच्या मदतीने साईनाथ चौफुली भागात बुधवारी (दि.१९) मध्यरात्री केलेल्या घरफोडीची कबुली दिली.जफर बागवान (रा.अलीशान अपा.) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून सोन्याचांदीच्या दागिण्यांसह घड्याळ असा सुमारे ५१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांच्या अटकेने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दभांची संख्या घटतीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवजड कामांसाठी उपयोगी असलेल्या गाढवांची संख्या जिल्ह्यात घटली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त आहे. २०१२मध्ये झालेल्या पशूगणनेत ही संख्या ९०६ होती, आता त्यात अजून घट झाली आहे. याचा आकडा अधिकृतपणे अद्याप आला नाही. पण, महिनाभरापासून सुरू असलेल्या पशूगणनेत ही संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे.

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी गाढवांची तस्करी व घटत्या संख्येबाबत महिनाभरापूर्वीच चिंता व्यक्त करून त्यांचे संरक्षण करण्याचे आदेश दिल्यामुळे गाढवांच्या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. यांत्रिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी झाल्याचे बोलले जात होते. पण, जानकर यांनी गाढवांची तस्करी होत असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला आहे. गाढवांचे अवयव, रक्त याचा वापर अवैधरित्या होतो. चीनमध्ये तर गाढवांच्या कातडीचा वापर अवैधरित्या कर्करोग व इतर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे गाढवांची संख्या घटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी गाढवांचे संरक्षण करण्याचे आदेशही दिले.

चार तालुक्यांत गाढवेच नाहीत

जिल्ह्यात २०१२ साली झालेल्या पशूगणनेत गाढवांची संख्या ग्रामीण भागात ५३० तर शहरी भागात अवघी ३७६ होती. त्यात १५ पैकी चार तालुक्यांत एकही गाढव आढळून आले नाही. त्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ तालुक्याचा समावेश आहे. २०१२च्या पशूगणनेत सर्वाधिक गाढवे बागलाण तालुक्यात आढळून आली. त्यांची संख्या ३३० होती. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात १५६, निफाडमध्ये ८६, कळवण तालुक्यात ६१, सिन्नरमध्ये ६०, चांदवडला ५७, दिंडोरीत ५४, नांदगावमध्ये ४२, नाशिकमध्ये ३०, येवल्यात २२, तर देवळा येथे अवघी आठ गाढवे होती.

अशी झाली पशूगणना

२०१९ च्या पशूगणनेची आकडेावारी काही महिन्यांनी समोर येणार आहे. महिनाभरापासून ही पशूगणना सुरू होती. त्यासाठी ४३४ प्रगणक टॅबद्वारे सर्वच पशूंची गणना करीत होते. त्यांच्याकडील माहिती थेट पुणे येथील सांख्यिकी विभागाकडे जात असल्यामुळे ती एकत्रितरित्या आली नाही. देशभरातील राज्यातील पशूगणनेची माहिती केंद्र सरकारकडे गेल्यानंतर ती नंतर अधिकृतरित्या प्रसिद्ध केली जाणार आहे. तेव्हा ही संख्या नेमकी किती, हे समोर येणार आहे. पण, प्रगणकांच्या प्राथमिक चर्चेतून ही संख्या २०१२ पेक्षा घटली असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणेवर नवीन बंधारा

$
0
0

महापालिकेची चाचपणी; शहरात १५ दिवसात पाणीकपात अटळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चेहडी बंधाऱ्यांवरील पंपिग स्टेशनमध्ये वालदेवी नदीतील अळ्यायुक्त पाणी आल्याने दारणेतील पाण्याची उचल करणे महापालिकेने २२ मेपासून बंद केले आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे गणित बिघडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी संगमाच्या वरील बाजूस दारणेवर नवीन बंधारा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. सोबतच दारणेचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाटबंधारे विभागाला नवीन आवर्तन सोडण्याची विनंती केल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. दरम्यान पावसाळा लांबल्यास पाणीकपातीचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळा लांबल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. यात मुकणे धरणाचा नवीन पर्यायही महापालिकेला यंदा उपलब्ध झाला आहे. शहरासाठी गंगापूर धरणातून ४२००, मुकणे ३०० तर दारणेतून ४०० दशलक्ष घनफूट पाणी नाशिकसाठी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी गंगापूरमधून उचल सुरू असतांना, दारणातील पाणी उचल मात्र थांबली आहे. वालदेवी नदीतून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे चेहेडी पंपिंग स्टेशनमधून पाणी उचलणे अवघड झाले. चेहडी येथील बंधाऱ्याच्या वरच्या भागात दारणा व वालदेवी नदीचा संगम होतो. तेच पाणी पुढे बंधाऱ्यात येते. दारणेतील पाणी स्वच्छ असले तरी वालदेवीचे पाणी दूषित आहे. भगूर नगरपालिका, आर्टिलरी सेंटर तसेच कॅन्टोमेंन्ट बोर्डाचे पाणी वालदेवीत सोडले जात असल्याने दूषित पाणी साचते. त्यामुळे तेथे लाल अळ्या तयार होऊन त्यांच्यावर जंतुनाशकाचाही परिणाम होतो. त्यामुळे येथील पाणी उचल २२ मेपासून थांबविल्याने महापालिकेला १४८ दशलक्ष घनफूट पाण्यावरील हक्क सोडावा लागला आहे. वालदेवीमुळे होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याचा त्रास सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली. दारणेतून आवर्तन सोडण्यापूर्वी वालदेवीतून पाणी सोडल्यास दूषित पाणी वाहून जाईल. तसेच दारणा-वालदेवी संगमावरील भागात दारणेवर नवीन बंधारा बांधून त्यातून पाणी उचलल्यास वालदेवीच्या दूषित पाण्याचा प्रश्न राहणार नाही. त्यासाठी सरकारच्या योजनेद्वारे निधी उपलब्ध होऊ शकेल काय, याविषयी प्रशासनाकडून चाचपणी केली जात असल्याचे आयुक्त गमे यांनी सांगितले आहे.

... तर कपातीचा कटू निर्णय

शहराला पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागू नये. यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री तयार ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. या ठिकाणी चर खोदल्यास मृतसाठाही महापालिकेला उचलणे शक्य होणार आहे. परंतु, पाऊस लांबला तर पाणीकपातीचा कटू निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी अजून आठ ते पंधरा दिवसांचा अवधी लागणार असल्याचेही आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरटे पुन्हा सुसाट

$
0
0

पाच दुचाकींवर डल्ला; वाहनधारकांमध्ये भीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अंबड, रविवार कारंजा आणि देवळाली कॅम्प परिसरातून चोरट्यांनी पाच मोटारसायकल चोरून नेल्या. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नवीन नाशिकच्या उत्तम नगर येथील महात्मा फुले चौकातील जगनसिंह झाला यांची काळ्या रंगाची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १९ बीआर ५८०२) अज्ञात चोरट्यांनी लांबविली. पुढील तपास हवलदार खांडेकर करीत आहेत. सातपूर-अंबड लिंकरोडवरील संजीवनगर, जाणता राजा चौक येथील आकाश प्रभाकर गिलबिले यांची घरासमोरील पार्क केलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकी (एम १५ डीटी ०६८६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत. दरम्यान, सातपूर-अंबड लिंक रोडवरील जयेश पार्क येथील राहुल दोंदे यांच्या घरासमोरील ओट्यावर उभी असलेली ही काळ्याची रंगाची दुचाकी (एमएच १५ इक्यू ७८१०) अज्ञात चोरट्याने चोरी केली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत. या तीन गुन्ह्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला. दरम्यान, देवळाली कँम्प येथील साऊथ रोडवरील ब्रान्स स्कूल येथून ज्ञानेश्वर बाबुराव पाळदे (वय ३०) यांची दुचाकी (एमएच १५ इआर २९७४) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक एसएम पानसरे तपास करीत आहेत. तर, रविवार पेठेत राहणारे शेखर वसंत नाळेगावकर (रा. गोदावरी संकुल तेली गल्ली) यांची दुचाकी (एमएच १५ बीएल ८४९६) मंगळवारी (दि.१७) रात्री घरासमोर पार्क केलेली असताना चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाने केली सावत्र मुलांची हत्या

$
0
0

पंचवटी : उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने २२ व २२ वर्षे वयोगटातील दोन सावत्र मुलांवर गोळीबार करीत त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या हत्याकांडाला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संशयित स्वतःहून पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. संजय अंबादास भोये (वय ४४, रा. राजमंदिर को ऑप. सोसायटी, ६ नं. फ्लॅट, अश्वमेधनगर, कँसर हॉस्पिटल जवळ, पेठरोड) असे संशयिताचे नाव आहे.

सविस्तर वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संयम अन् बुलेट्सही सुटल्या…!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या संशयित संजय भोये यांची कारकिर्द फारशी कधीच वादात राहिली नाही. पोलिस दलात मिळेल ते काम करणारा कर्मचारी अशी भोये यांची ओळख होती. मात्र, कौटुंबिक वादात संयम सुटला आणि पाठोपाठ चार बुलेट्सदेखील. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या भोयेंना एका मिनिटांच्या रागाने गजाआड केले.

उपनगर पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर असलेल्या संशयित संजय भोये यांच्याकडे सध्या बीट मार्शल म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. गुरुवारी (दि. २०) भोये यांची साप्ताहीक सुटी होती. शुक्रवारी (दि. २१) ते रात्रपाळीकरिता जाणार होते. मात्र, नियतीने चिखलीकर मुलांच्या वर्तमानाबाबत आणि भोये यांच्या भविष्याबाबत काहीतरी विचित्रच लिहून ठेवले होते. मुलांमध्ये आणि सावत्र पित्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद सुरू होते. हे वाद प्रॉपर्टीशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दुपारच्या सुमारास पिता-पुत्रांच्या वादाला सुरुवात झाली आणि त्यातच सर्व परिस्थितीची जाणीव ठेवण्याची क्षमता असलेल्या भोये यांच्या संतापाचा बांध फुटला. बिट मार्शल असल्याने त्यांच्याजवळ कायम सर्व्हिस रिव्हॉल्वर असायची. याच बंदुकीतून त्यांनी आपल्या सावत्र मुलांवर चार बुलेट्स फायर केल्या. संतापाने दोन मुलांचा जीव गेला तर कुटुंबाचा प्रमुख पोलिस कोठडीपर्यंत! पोलिस दलात कार्यरत असलेल्या भोये यांच्या मानसिक स्थितीबाबत तसेच, कामाच्या पद्धतीबाबत आतापर्यंत कोणतीही तक्रार समोर आलेली नसल्याचे वरिष्ठ पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हंडाभर चांदण्या’ बीएच्या अभ्यासक्रमात

$
0
0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले दत्ता पाटील लिखित 'हंडाभर चांदण्या' या प्रायोगिक नाटकाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. ए. मराठी प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. दुसऱ्या सत्रातील 'मराठी साहित्य : एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास' या घटकांतर्गत 'पु. ल. देशपांडे लिखित 'विठ्ल तो आला आला' आणि दत्ता पाटील लिखित 'हंडाभर चांदण्या' हे दोन एकांक अभ्यासक्रमाला लावण्यात आले आहेत.

'हंडाभर चांदण्या' या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीला एक नवे वळण दिले, असे म्हटले जाते. सध्याचा पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न या नाटकातून अतीशय वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगिताच्या प्रभावी माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रमोद गायकवाड हे निर्माते असून, प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राहूल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. दिल्लीतील एनएसडीच्या भारंगमसह अनेक महोत्सव या नाटकाने गाजवले असून, नाट्यनिर्माता संघ, झी गौरव, मटा सन्मान, यासारखे अनेक सन्मान या नाटकाच्या वाट्याला आले आहेत.

'सॅम्युअल बेकेट महाराष्ट्राचा असता आणि त्याने वेटिंग फॉर गोदो लिहायला घेतले असते तर त्याने हंडाभर चांदण्या लिहिले असते', अशा शब्दात या नाटकाचा समीक्षकांनी गौरव केला आहे. 'हंडाभर चांदण्या'तलं वाट पाहाणं हे 'वेटिंग फॉर गोदो'च्या जातकुळीतलं नाही. 'गोदो'तलं वाट पाहाणं रूपकात्मक आहे, वैराण झालेल्या जगण्याच्या विराटपणावरचं भाष्य आहे. 'हंडाभर चांदण्या'त जगण्याचं विराणपण रूपकातून नव्हे तर प्रत्यक्षच समोर येतं. पण या वाट पाहण्यातली तीव्रता गोदोतल्या व्लादिमिर आणि एस्ट्रॅगॉनच्या वाट पाहण्याइतकीच जीवघेणी आहे. ज्या गावात वर्षानुवर्षे दुष्काळ ठाण मांडून बसला आहे, जिथे सरकारी पाण्याचा टँकर अनेक अर्जविनंत्यांनंतरही कधीही आलेला नाही आणि हंडाभर पाण्यासाठी बायाबापड्यांना दहा-दहा मैल वणवण करावी लागते, तिथे पाण्याच्या एका थेंबासाठी होणारी तगमग ही जीवनमरणाच्या सीमेवर येते. त्यामुळेच मावळवाडीच्या संभाने निर्वाणीचा उपाय म्हणून तहसिलदारबाईलाच ओलिस ठेवलं आहे. तिने जिल्ह्याच्या कार्यालयात फोन करून गावासाठी टँकर मागवावा, तो आल्यावर पहिला हंडा भरला जाईल आणि मगच तिची सन्मानाने सुटका होईल. दत्ता पाटीलने हा वंचितांचा अवकाश वाट पाहण्यातल्या निरर्थकतेने, त्याच्या जोडीला पेरलेलल्या चांदण्या, सूर्य, सरणाचा उजेड, रिकामे हंडे या प्रतिमांतून, शब्दांच्या-वाक्यांच्या पुनरुक्तीतून भरत नेला आहे. प्रयोगमूल्यासोबतच साहित्यमूल्यही ठासून भरलेल्या या समकालिन नाटकाची संहिता एफवायबीएच्या अभ्यासक्रमासाठी निवडली गेल्याने नाट्यवर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडांगण निधी पळवापळवीचा रंगला खेळ

$
0
0

प्रभाग १७ मधील नगरसेवकांचा आमदार फरांदेवर आरोप

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांमध्ये आता मंजूर कामे प‌ळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रभाग क्र. १७ मध्ये मंजूर क्रीडांगणाचा निधी 'मध्य'च्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रभाग क्र. २३ मधील दीपालीनगरमध्ये पळविल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या निषेधार्थ शुक्रवारी प्रभागातील नगरसेवक आणि नागरिकांनी एकत्र येत आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन आमदाराच्या कृतीविरोधात आक्रोश केला. त्यामुळे निधी पळविण्यावरून नवे राजकारण सुरू झाले आहे.

नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १७ मधील आगर टाकळी शिवारातील उपनगरच्या सर्वे क्रमांक '२९ पै.' येथील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत क्रीडांगणाचे आरक्षण आहे. त्यामुळे स्थानिकांनी तसेच नगरसेवकांनी खासदारांमार्फत पाठपुरावा करीत, या ठिकाणी क्रीडांगण मंजूर करून घेतले. महाापलिकेने हे क्रीडांगण विकसित करण्याचा निर्णयही घेतला. महापालिकेच्या मूलभूत सोयीसुविधांतर्गत काम मंजूर होऊन ११ फेब्रुवारी २०१९ ला संबंधित ठेकेदाराला क्रीडांगण विकसित करण्याचा कार्यारंभ आदेश दिला. परंतु, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेने ७ मार्च रोजी काम बंद केले होते. या दरम्यानच्या काळात आमदार प्रा. देवयांनी फरांदे यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करीत सदरच्या कामात बदल करून घेतला. नागरिकांची मागणी असल्याचे सांगत प्रभाग क्र.१७ मधील मंजूर क्रीडांगणाचा निधी प्रभाग क्र. २३ मधील दीपालीनगरमध्ये मंजूर असलेल्या क्रीडांगणासाठी हस्तांतरीत करून घेतला.

आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू होत नसल्यान स्थानिकांनी चौकशी केली. त्यावेळेस या क्रीडांगणाचा निधी इतरत्र हस्तांतरित केल्याचे समोर आले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शुक्रवारी स्थानिक नागरिकांनी माजी आमदार जयवंत जाधव, शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे, काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे, मनसेचे माजी नगरसेवक विजय ओहोळ यांच्यासह महापालिकेत धाव घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेत तक्रार केली. आमदारांच्या या कृतीचा निषेध केला. सुमारे शंभर नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत प्रभाग क्र. १७ मध्येच क्रीडांगण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या क्रीडांगणाच्या निधीवरून राजकीय वाद सुरू झाला आहे.

...

प्रभाग १७ मध्ये काम मंजूर असतानाही स्थानिकांना विश्वासात न घेताच आमदार देवयानी फरांदे यांनी हे काम दुसरीकडे पळवले आहे. त्यांचा मतदारसंघ नसल्याने त्यांनी स्थानिकांवर अन्याय केला आहे. दोन्ही आमदार भाजपचे असतानाही एकमेकांचे कामे पळवत आहेत. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे.

- प्रशांत दिवे, शिवसेना नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावत्र मुलांची हत्या

$
0
0

कौटुंबिक वादातून पोलिस कर्मचाऱ्याचे कृत्य

....

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने दोघा सावत्र मुलांवर गोळीबार करीत त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या हत्याकांडाला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संशयित स्वतःहून पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय अंबादास भोये (वय ४४, रा. राजमंदिर को ऑप. सोसायटी, ६ नं. फ्लॅट, अश्वमेधनगर, कँसर हॉस्पिटल जवळ, पेठरोड) असे संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी, दुपारच्या सुमारास भोये यांची पत्नी मनीषा, सावत्र मुले सोनू उर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (वय २५) व शुभम नंदकिशोर चिखलकर (वय २२) व मुलगी घरात होते. अभिषेक व शुभम ही दोनही मुले मनीषा यांना पहिल्या पतीपासून झालेली आहेत. संशयित संजय भोये यांच्यापासून एक मुलगा व मुलगी आहे.

भोये आणि सावत्र मुले यांच्यात कौटुंबिक कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शुक्रवारी संजय याचे अभिषेक आणि शुभम यांच्याशी बेडरूममध्ये वाद झाले. त्यावेळी त्याची पत्नी आणि मुलगी हॉलमध्ये होत्या. भांडण इतके विकोपाला गेले, की संशयित वडिलांनी सावत्र मुलांवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून चार गोळ्या झाडल्या. यामध्ये अभिषेक जागीच ठार झाला, तर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत असताना शुभमचा मृत्यू झाला.

...

स्वत: पोलिस ठाण्यात हजर

हत्याकांडाच्या घटनेनंतर संशयित संजय भोये स्वतःहून पंचवटी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांच्यासह न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी झाली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुहेरी हत्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

..

महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

या घटनेत मृत्यू झालेला सोनू उर्फ अभिषेक हा मर्चंड नेव्हीत कामास होता. तो शुक्रवारी आपल्या कामावर जाण्यासाठी तयारी करीत होता. शुभम हा खासगी कंपनीत नोकरीला होता. एक महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते.

...

फ्लॅट नावावर करून द्या, असा तगादा दोनही मुलांनी सुरू केला होता. याच कौटुंबिक करणातून संशयित पोलिस कर्मचारी भोये यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून चार राउंड फायर केले. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

- विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित प्रवासासाठी ‘पीडब्लूडी’ सज्ज

$
0
0

पावसाळ्यात येणाऱ्या अडचणीसाठी माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यांवरून प्रवास करतांना त्रास होऊ नये, त्यांना रस्त्यांवरील अडचणींची माहिती असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वसूचना म्हणून माहिती तयार केली आहे. त्यात पाण्याखाली जाणारे रस्ते व पूल, वारंवार दरड कोसळणारी ठिकाणे यांची माहिती आहे.

जिल्ह्यात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूर आल्यानंतर वाहतूक कोंडी होते. तर काही ठिकाणी रस्तेच बंद होतात. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी, पर्यायी रस्ते कोणते याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची पुस्तिकाच तयार करून ती जिल्हााधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. आपत्तकालीन वेळेत ती उपयोगी ठरण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात पाण्याखाली जाणारे ३० रस्ते आहेत. ते कोठे असून त्यांचा दर्जा, त्या रस्त्यांची एकूण लांबी व नावे या पुस्तिकेत आहेत. दरड कोसळण्याच्या ३० ठिकाणांचीही यात माहिती दिली आहे. याशिवाय पाण्याखाली जाणाऱ्या पुलांविषयीचा डेटाही यात आहे.

आपत्ती व्यवस्थापनाला दिशा

प्रवास करतांना पाण्याखाली पूल आला किंवा दरड कोसळली तर अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. मात्र, याची पूर्वमाहिती असेल तर वाहनचालकांची गैरसोय होऊ शकणार नाही. यासाठी ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. प्रशासकीय कामांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार असून त्यावर आपत्ती व्यवस्थापनाला नियोजन करणे सोपे जाऊ शकेल.

दरड कोसळणे धोकादायक

पावसाळ्यात दरड कोसळणे धोकादायक असते. काही ठिकाणी तर वारंवार दरड कोसळतात. त्यातून वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण, अशी दरड कोसळल्यानंतर आपत्तकालीन विभागाला फोन केल्यानंतर संबंधितांना त्याबाबत कळविले जाते आणि तातडीने रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करता येऊ शकते.

जिल्ह्यातील पाण्याखाली येणारे पूल, रस्ते व दरड कोसळण्याची ठिकाणे याची सर्व माहिती तयार करण्यात आली आहे. आपत्तकालीन परिस्थितीत येथे उपायोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

- रणजित हांडे,

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images