Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वायू' चक्रीवादळामुळे थांबलेली मान्सूनची वाटचाल अखेर पुन्हा सुरू झाली आहे. मान्सूनने गुरुवारी पश्चिम किनारपट्टीवर प्रगती करून गोवा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरपर्यंतचा भाग व्यापला. मान्सूनच्या आगमनासोबत तळ कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही वाटचाल करून ईशान्येकडील सर्व राज्ये आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले.

ईशान्य बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर २२ आणि २३ ला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज 'आयएमडी'ने वर्तवला आहे.

सविस्तर वृत्त...८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेहरेमध्ये चार घरफोड्या

$
0
0

तब्बल आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील टेहरेत बुधवारी (दि. १९) रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरे व एका मेडिकलमध्ये धाडसी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरट्यांनी तब्बल ८ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एका रात्रीत झालेल्या या प्रकाराने गाव परिसरात घबराट पसरली आहे. या प्रकरणी टेहरे गावातील शेतकरी विश्वास नानाजी शेवाळे यांनी फिर्याद दिली.

छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास शेवाळे व त्यांचे कुटुंबीय रात्री घराला कुलूप लावून गच्चीवर झोपलेले असताना हा प्रकार घडला. सकाळी त्यांच्या पत्नी खाली आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसले, कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेवाळे यांच्याच गल्लीतील डॉ. राजेंद्र शेवाळे यांच्या दवाखान्याचे कुलूप तोडल्याचे दिसले. तसेच शेजारील अनिल मोतीराम शेवाळे यांच्या मेडिकलचेही दरवाजे तोडून रोकड लंपास केल्याचे समोर आले. त्यांनतर चोरट्यांनी गावातील अन्य दोघांच्या घरातून देखील दागिने व रोकड लंपास केल्याचे उघड झाले. एका रात्रीत चोरट्यांनी एवढा मोठ्या घरफोडी केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. एका महिलेने चोरट्यांना पाहिल्याचे देखील पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्यांवर छर्ररा फ्री!

$
0
0

'एमपी'तील अवैध हत्यार विक्री उत्तर महाराष्ट्राच्या मूळावर

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील अवैध हत्यार निर्मिती आणि तस्करी उत्तर महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरते आहे. अवैध हत्यारांच्या निर्मितीमधील स्पर्धा सध्या जोरात असून, देशी कट्ट्यांबरोबर चक्क छर्ररा (काडतूस) मोफत देण्याची योजना सध्या सुरू आहे. पोलिसांनी पकडलेल्या एका मध्यस्थाच्या माहितीनंतर हा प्रकार समोर आला आहे. आता अवैध हत्यार निर्मितीचे अड्डे उद्धवस्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

शहरात मुथूट फायनान्स कंपनी आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात विजया बँकेवर दरोड्याची टाकण्यात आला. यात आरोपींनी विरोध करणाऱ्यांवर थेट गोळीबार केला. या घटनांमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा हकनाक जीव गेला. अद्याप या घटनेतील आरोपींना अटक होऊ शकलेली नाही. आरोपींकडे असलेल्या बंदुका कशा प्रकारच्या होत्या, हे आरोपी अटक झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले, की महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमावर्ती भागातून आणि तस्करांच्या माध्यमातून गुन्हेगारांपर्यंत देशी कट्टे पोहचतात. दाट जंगल आणि दरी-खोऱ्यांच्या परिसरात स्थानिक आणि परजिल्ह्यांमधील पोलिसांना पोहचणेच हे आव्हानच ठरते.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की सध्या या सीमावर्ती भागात अवैध हत्यार निर्मितीचा उद्योग विस्तारला आहे. व्यवसायातील स्पर्धा मोठी असून, आता तर एका कट्ट्यावर छर्ररा मोफत देण्याची योजना निर्मात्यांकडून राबविण्यात येते आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. घनदाट आणि दुर्गम भागात अगदी सहजतेने देशी कट्ट्यांची निर्मिती केली जाते. यासाठी सायकलचा एक रॉड देखील पुरेशा ठरतो. निर्माता आणि ग्राहक यांचा थेट संबंध येत नाही. यासाठी तस्करच काम करतात. या तस्करांची मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सीमावर्ती भागात सतत वर्दळ असते. पण हे काम अत्यंत खुबीने होते.

रावेर तालुक्यात दरोडा पडला ते गाव मध्य प्रदेशपासून अगदी १२ ते १५ किलोमीटरवर आहे. शहर पोलिसांसह नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अवैध शस्त्र निर्मितीच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे. काही तस्करांची धरपकड देखील होते. मात्र, निर्मात्यापर्यंत पोलिसांना पोहचणे शक्य होत नाही. त्यातच निर्मात्यांकडून आता मोफत छर्ररा पुरविण्याचे काम करण्यात येत असल्याने पोलिस सजग झाले आहेत. या छर्रराची किंमत बाजारभावात २०० रुपये असली तरी त्याची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरतो. अवैध शस्त्र निर्मात्यांनी हीच बाब हेरून ते मोफत देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पुन्हा पुन्हा सीमावर्ती भागातील तस्करांशी संपर्क ठेवण्याची गरज भासत नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

एकाच मोहिमेत १५० हत्यारे जप्त

शहरासह उत्तर महाराष्ट्रात अवैध हत्यारांचे पीक जोरात सुरू असताना नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार परिक्षेत्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यात सुमारे १५० अवैध शस्त्रे पोलिसांच्या हाती लागली होती. यात मध्य प्रदेश निर्मित देशी कट्ट्यांची संख्या लक्षणीय होती. याच दरम्यान पोलिसांनी एका तस्कारास तांत्रिक मदतीने अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, शहरात पाणीकपात अटळ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा लांबल्याने महापालिकेने आता उर्वरीत पाणीसाठ्याचे फेरनियोजन सुरू केले असून, आठवडाभरात दमदार पाऊस आला नाही तर, शहरात दोन ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गंगापूर धरणात पाणी येण्यास सुरूवात झाली नाही तर, आठवडाभरातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून तयार केला जात असून, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच कपातीबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

शहरासाठी गंगापूर आणि मुकणे धरणात जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा पुरेसा असला तरी, पावसाळा लांबल्याने महापालिका प्रशासनाचे टेंशन वाढले आहे. पाऊस लांबल्याने २०१२ व २०१६ नंतर प्रथमच पाणीबाणी निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहराला ८० टक्के पाणीपुरवठा हा गंगापूर धरणातून केला जातो. परंतु, गंगापूर धरणातील इन्टेक वेलची न्यूनतम पातळी पाण्याने गाठल्याने पालिकेसमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच मृतसाठा वापरण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने पावसाळा लांबल्याचे फेरनियोजन सुरू केले आहे.

सद्यस्थितीत गंगापूर धरणात ८९९ दशलक्ष घनफूट पाणी असले तरी यात महापालिकेसह एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र व औद्योगिक वसाहतीचे आरक्षित पाण्याचा समावेश आहे. अद्यापपर्यंत पावसाची चिन्हे दिसतं नसल्याने नाशिककरांवर पाण्याचे संकट गडद झाले आहे. त्यामुळे धरणात चर खोदणे, पाटबंधारे विभागाला धरणातून पाणी न सोडण्यासाठी विनंती करण्याबरोबरच पुढील आठवड्यापासून एक वेळ पाणी कपातीचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. चालू आठवड्यात दमदार पाऊस पडला नाही तर, दोनवेळे ऐवजी एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस आला नाही तर, आठवड्यातून दोन दिवस शटडाऊन घेतले जाणार आहे. यासाठी पालिकेतील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाणार आहे. लोकप्रतिनिधींच्या समंतीनंतरच या कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनस्थान आयकॉन’ने दिग्गजांचा सन्मान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'जनस्थान' या साहित्यिक-सांस्कृतिक व्हॉट्स ऍप ग्रुपच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे जनस्थान आयकॉन पुरस्कार यंदा कवी आणि स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी, गायक मकरंद हिंगणे आणि कलावंतांचे पाठीराखे विश्वास ठाकूर यांना देण्यात आला. ख्यातनाम लेखक व अभिनेते अशोक समेळ यांच्याहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सी. एल. कुलकर्णी हे मूळचे इंजिनीअर असून, गेली बरीच वर्षे ते स्मृतिचिन्ह हा अत्यंत कलात्मक व्यवसाय करतात. त्याचबरोबर कवी, लेखक, शिल्पकार, चित्रकार, गायक, निवेदक, अभिनेता आणि जादुगार अशा आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने त्यांनी प्रत्येक कलेवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. मकरंद हिंगणे यांनी आपल्या गायकीद्वारा नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले असून, गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचा वारसा ते दमदारपणे पुढे नेत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. नाशकातील सर्वच कलावंतांना ज्यांचा आधार वाटतो, त्या विश्वास ठाकूर यांनी बँकिंग क्षेत्रात अत्यंत देदीप्यमान कामगिरी करून कला आणि कलावंत यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. या तीन दिग्गजांना जनस्थान आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सी. एल. कुलकर्णी म्हणाले, की मनुष्य हा निसर्गात उगवलेला प्राणी आहे. मला काहीतरी सांगायचेय पण ऐकणारा भेटत नसल्याने मी मलाच सांगत आहे. माझ्यातल्या अज्ञातवासाचा शोध घेण्याचा प्रयास म्हणजे माझी कविता आहे. पंडित मकरंद हिंगणे म्हणाले, की मी शांततेचा शोध घेत आहे, संतांनी अनुभवलेला सहजपणा आणि शांतता यामागे काय आहे, याचा शोध मी संगीतातून घेत आहे. या प्रसंगी देवबाभळी व जनस्थानमधील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रातील दिवंगत श्याम कुलकर्णी यांच्या जनस्थान व नाट्य परिषद यांच्या वतीने कुटुंबियांना ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ सुप्रसिद्ध गायक आनंद अत्रे यांनी संगीतबद्ध केलेल्या नांदीने झाला. ही नांदी सी. एल. कुलकर्णी यांनी लिहिली होती. दीपप्रज्ज्वलन अशोक समेळ, नवीन तांबट, विवेक गरूड, डॉ. अविराज तायडे, अभय ओझरकर यांच्या हस्ते करण्यात आले. जनस्थानची ध्वनीचित्रफित यावेळी दाखवण्यात आली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातन पायऱ्यांचे दर्शन

$
0
0

काळाराम मंदिरासमोर खोदकाम सुरू

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यासमोर विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी खोदाई सुरू असताना गुरुवारी (दि. २०) येथील काळाराम मंदिर निर्माण करतानाच्या मूळ पायऱ्या आढळल्या आहेत. सध्याच्या सपाटीपासून साधारणतः चार ते पाच फूट खोल चार पायऱ्या खोदण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवसांत या पायऱ्या व त्याचा ओटा विस्तृत खोदकाम करून मोकळे करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्त मंदार जानोरकर यांनी दिली.

काळाराम मंदिराच्या मुख्य मंदिर प्रवेशद्वारासमोर खोलगट भाग करण्यात येणार आहे. जेणेकरून भाविकांना बाहेरून मंदिर गाभाऱ्यातील श्री काळरामाचे दर्शन घेता येईल. यासह मंदिरासमोरील उद्यान नव्याने विकसित केले जात असून, मंदिरावर 'लेझर शो' करण्याचे प्रस्तावित आहे. सद्यपरिस्थितीत प्रवेशद्वारासमोरील खोदाईचे काम सुरू आहे. गुरुवारी (दि. २०) खोदकाम सुरू असताना येथील पुरातन पायऱ्या आढळल्या. तसेच प्रवेशद्वाराजवळ घोड्याची पुरातन नालदेखील सापडली. मंदिराचे मूळ बांधकाम करण्यात आले तेव्हा या पायऱ्यांतून मंदिर प्रवेश होत असल्याचा अंदाज आहे. पायऱ्या अजून किती खोलवर आहेत, याचाही शोध घेतला जाणार आहे. त्या संरक्षित करण्यात येणार आहेत.

..

लवकरच बैठकीचे नियोजन

पायऱ्यांच्या आजूबाजूची सविस्तर खोदाई करून याच पायऱ्यांतून भविष्यात भाविकांना मंदिर प्रवेश देण्याबाबत विचार करण्यासाठी विश्वस्त, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका अधिकारी आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे जानोरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोरवड घाटात मर्सिडीज पेटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

वडार समाजाचे नेते गुंडाप्पा देवकर (वय ४६) यांच्या मालकीची मर्सिडीज बेंन्स जीएल ३५० या मॉडेलच्या (एमएच ०४ इझेड ०९९९) गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घोरवड घाटात पेट घेतला. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.

गुंडाप्पा देवकर हे देवळाली कॅम्प चारणवाडी येथील रहिवासी आहेत. कुटुंबासह घरी परतत असताना सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास गाडीतून जात असताना पाठमागील बाजूस वायरिंग शोर्ट सर्किट झाल्याचा आवाज झाला. देवकर यांनी ड्रायव्हर सुनील यांस गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तोपर्यंत गाडीमध्ये बसलेले आई जनाबाई, पत्नी सरिता व चार मुले खाली उतरले. मागील बाजूचा दरवाजा उघडला. त्यावेळी शिटखालून धूर निघत असल्याचे दिसले. त्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याने याबाबत सिन्नर पोलिस स्थानक येथे या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने अग्निशामक वाहन दाखल झाली. त्यांनी आग विझविली. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धिवरे यांना पीएच.डी.

$
0
0

नाशिक : नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे सटाणा महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा दर्याव धिवरे यांना ७ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या विद्यापीठाने भौतिकशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान केली. धिवरे यांनी 'सॉइल अॅनॅलिसिस ऑफ नाशिक रिजन अॅट व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी युजींग डिफरंट टेक्नीक्स' या विषयावर संशोधन केले. त्यांच्या पीएच.डी. दरम्यान शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सादर केले. यासाठी त्यांना डॉ. सुशांत देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. धिवरे यांच्या यशाबद्दल मविप्र च्या सरचिटणीस नीलिमा पवार, शिक्षणाधिकारी काजळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धोंडगे यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'निर्भया'चे कौतुक

$
0
0

'निर्भया'चे कौतुक नाशिक : समाजामध्ये महिलांची सुरक्षा हा गंभीर आणि कळीचा मुद्दा ठरतो. यासाठी एका विशेष दृष्टिकोनाची गरज असते. नाशिक शहर पोलिसांनी निर्भया पथक सुरू करीत दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी दिली. एका खासगी दौऱ्यावर असलेल्या बर्वे यांनी गुरुवारी (दि.२०) सकाळी पोलिस आयुक्तालय गाठून पोलिसांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्भया पथकाची माहिती घेऊन ही संकल्पना समजावून घेतली. त्यांनी महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वरिष्ठ पोलिसांशी संवाद साधला. पोलिस प्रशासनाने त्यांना निर्भया पथकाची व त्याच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो नव्हे, जोडबसच!

$
0
0

प्रवासी क्षमतेची अट पूर्ण होईना; १८०० कोटींचा प्रकल्प

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेट्रोसेवेसाठी आवश्यक प्रतितास २० हजार प्रवासी क्षमतेची अट पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने नाशिककरांच्या मेट्रो सेवेवर फुली मारण्यात आली आहे. शहरात आता गतिमान सार्वजनिक वाहतुकीसाठी बॅटरीवर धावणाऱ्या आर्टिक्युलेटेड बसेस अर्थात टायरबेस्ड जोडबस चालविल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ३१.४० किलोमीटर लांबीचे दोन इलेव्हेटेड मार्ग उभारले जाणार असून, त्यासाठी १८०० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकूण प्रकल्प खर्चाच्या १० टक्के वाटा उचलावा लागणार असल्याने महापालिकेला आर्थिक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महामेट्रोने नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासंदर्भातील व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे. महामेट्रोने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्राथमिक अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला आहे. मेट्रोसाठी प्रतितास २० हजार प्रावसी क्षमता या रस्त्यांवर असणे आवश्क असते. परंतु,या अहवालानुसार नाशिकमध्ये मुख्य रस्त्यावर प्रतितास जेमतेम सहा हजार प्रवासी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मेट्रो ऐवजी आर्टिक्युलेटेड बससेवा (जोडबस) सुरू करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. महामेट्रोने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राईट्स या कंपनीला दिले असले तरी महामेट्रोने पहिल्या टप्प्यात ३१.४० किलोमीटर जोडबस सेवा चालविण्याची शिफारस केली आहे. तसेच, आर्टिक्युलेटेड बसेसचा प्रकल्प येण्यापूर्वीच या प्रकल्पाच्या खासगीकरणाचा पर्यायही सुचविण्यात आला आहे. या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती खासगीकरणातून करण्यात येणार असून, बस स्टेशनची उभारणी, बस भाडेवसुली, लिफ्ट, सरकते जीने खासगीकरणातून करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे.

--

या मार्गावर धावणार टायरच्या जोडबस

सातपूर, श्रमिकनगर ते अमृत गार्डन, (त्र्यंबक रस्ता), ते मोडक चौक ते खडकाळी, सारडा चौक ते द्वारका चौक ते पुणे महामार्गाने नाशिकरोड रेल्वे स्टेशनपर्यंत १९ किमी व मुबंई नाका ते अशोकस्तंभ ते गंगापूर रस्त्याने गंगापूर गाव १० किमी, श्रमिकनगर ते बारदान फाटा जोडून रिंग तयार करणे २.४० किमी, असे एकूण ३१.४० किमी अंतराचे दोन सार्वजनिक मार्ग तयार करून त्यावर अद्ययावत बॅटरीवर अथवा विद्युत पुरवठ्यावर धावणाऱ्या जोड बसेस धावणे प्रस्तावित आहे.

पालिकेवर १० टक्के भार

टायरबेस्ड जोडबस सेवेचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार उचलणार असले तरी या प्रकल्पात महापालिकेला १० टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील ३१.४० किमीच्या दोन इलेव्हेटेड मार्गासाठी १९७७.१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात बस टर्मिनल, बस डेपोसाठी भूसंपादनाचा खर्च समाविष्ट नाही. प्रधान सचिव व महापालिका आयुक्त यांच्यात झालेल्या चर्चेनुसार एकूण प्रकल्प खर्चाचा पाच किंवा दहा टक्के सहभाग महापालिकेने उचलावा असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक बोझा येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालत १३ जुलै रोजी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्हा न्यायालयात १३ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रलंबित प्रकरणे दाखल करून तडजोडीतून न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

जिल्हा न्यायलय तसेच जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये १३ जुलै रोजी सकाळी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, कौटुंबिक वाद, नुकसान भरपाई, भू-संपादन, बँका, वित्तीय संस्था तसेच सरकारी अस्थापनांची थकीत वसुली अशी दाखलपूर्व प्रकरणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. कायमस्वरूपी वाद संपवण्यासाठी या लोकअदालतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी केले आहे. लोक अदालतीत सहभागी झाल्यास वादाला पूर्णविराम मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज युवक-युवतींमध्ये सिडकोमध्ये धुमश्चक्री

$
0
0

पोलिस येताच ठोकली धूम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नव्या कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागला असताना दुसरीकडे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवक अन् युवतींच्या गटात थेट हाणामारीचा प्रकार घडल्याने नागरिकांच्या भुवया ताणल्या गेल्या. सिडको परिसरातील एका कॉलेजबाहेर ही घडना घडली. वर्दळीच्या रस्त्यावर घडणारा हा प्रकार काही लोकांना कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर दिवसभर सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा होती. या प्रकाराबद्दल नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.

सध्या कॉलेजमध्ये प्रवेशाचे दिवस आहेत. त्यामुळे सर्वच कॉलेजेस गर्दीने खच्चून भरले आहेत. टवाळखोरांचे अड्डे बनणाऱ्या कॉलेजांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढीला लागल्याचेही चित्र गेल्या काही वर्षातील कॅम्पसमधील घडामोडींवरून दिसून येते. सिडको परिसरात गुरुवारी घडलेल्या एका प्रकाराने यात भर पडली. सिडकोतील एका कॉलेजच्या गेटजवळ गुरुवारी दुपारी युवक आणि युवतींच्या गटात अचानक झालेल्या वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. या धुमश्चक्रीत दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण करत शिवीगाळ केल्याने या परिसरात दुपारी काहीवेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही गटांनी धूम ठोकली. मात्र, हा विषय दिवसभर शहरात चर्चेचा राहिला.

यापूर्वी, कॉलेजरोड परिसरात असे प्रकार घडले आहेत. युवकांच्या दोन गटात किंवा युवतींच्या दोन गटातील धुमश्चक्री शहरातील कॅम्पसला नवे नाहीत. पण युवक आणि युवतींची धुमश्चक्री नागरिकांनी पहिल्यांदाच बघितल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले गेले.

या निमित्ताने शहरातील कॉलेज कॅम्पसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कॉलेज कॅम्पसमधील घडणाऱ्या अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी काही काळ कॅम्पसमध्ये पेट्रोलिंगही सुरू केले होते. मध्यवर्ती भागासह शहरातील सर्व उपनगरांमध्ये पुन्हा अशा पद्धतीने पेट्रोलिंग सुरू करावे व वाहनांचीही योग्य तपासणी करावी, अशी मागणी या घटनेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहितीच्या अभावाने नियोजनात अडचण

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालयाने काढली नोटीस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाची दाहकत वाढल्याने जिल्हा प्रशासनाने ३९१ टँकर सुरू केले. पण, याचा दैनंदिन अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने अधीक्षक अभियंता यांना नोटीस पाठवली असून त्यामुळे होणाऱ्या अडचणीची माहिती दिली आहे.

जिल्ह्यात आठ तालुके व १७ महसूल मंडळ सरकारने दुष्काळग्रस्त घोषित केले. पण, पाण्याची टंचाई जेथे भासेल व मागणी जेथे असेल तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. आतापर्यंत ३७१ टँकरने २८६ गावे ९७९ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहेत. पण, पावसाळा सुरू झाल्यानंतर आता टँकरची संख्या हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे दैनंदिन अहवाल मिळावा ही जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे. पण, हा अहवाल मिळत नसल्याने प्रशासनाची अडचण होत आहे. अधिवेशनाच्या काळात तर ही माहिती अपडेट असणे अजून गरजेचे आहे. पण, टँकरवर नियंत्रण ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मात्र ही दैनंदिन माहिती रोज पाठवत नसल्याने जिल्हा प्रशासनांनी नोटीस पाठवली आहे. या नोटिसनंतर तरी आता दैनंदिन माहिती उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेड काढताच तरुणीची रिक्षातून उडी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

विनयभंग करणाऱ्याचा प्रतिकार करीत तरुणीने रिक्षातूनच उडी घेत स्वत:ची सुटका केल्याचा प्रकार गुरुवारी अंबड येथे घडला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रिक्षा रोखून चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तमनगर येथील महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून एक तरुणी रिक्षाने (एमएच १५/एके ६६८५) घराकडे जात होती. मात्र, रिक्षाचालक रवी शंकर गोफन (वय २२, गौतमनगर) याने या तरुणीशी रिक्षा चालविताना अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी रिक्षात बसली असता रिक्षाचालकाने तिचा हात पकडून 'तू मुझे अच्छी लगती है' असं म्हणत तिची छेड काढली. त्याचवेळी तरुणीने रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, रिक्षा न थांबवल्यामुळे तरुणीने घाबरून रिक्षातूनच उडी घेतली. यामुळे तरुणीच्या हाताला व चेहऱ्याला दुखापत झाली. चालू रिक्षातून तरुणीने उडी घेतल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी रिक्षाचालकास रोखून यथेच्छ चोप देत इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ मोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या पत्नीला अनोखी श्रद्धांजली

$
0
0

नाशिक :

सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचा दशक्रिया विधी न करता इतरांवर अशी वेळ येऊ नये म्हणून सर्पदंशावर आधारित प्रबोधन कार्यक्रम आयोजित करून पत्नीला श्रद्धांजली वाहिली. जळगाव बुद्रुक येथील काळू बुरकुल असे त्यांचे नाव आहे.

काळू बुरकुल यांच्या पत्नीला अकरा दिवसांपूर्वी विषारी सर्पाने दंश केला होता. उपचारास विलंब झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही गोष्ट मनाला वेदनादायक असल्याने काळू बुरकुल यांनी ग्रामीण भागात किंबहुना आपल्या पंचक्रोशीत जनजागृती व्हावी या हेतूने दशक्रिया विधी न करता समाजप्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. यात येवला व नांदगाव येथील अनिसचे कार्यकर्ते व अनेक सर्पमित्रांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित सर्पमित्र गणेश सोमासे, संजय लावरे, एकनाथ पवार, मंगेश आहेर यांनी सापांची माहिती देवून त्याविषयीचे समज-गैरसमज दूर केले. अंनिसचे एम. बी. जगधने यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक: पोलिसाने केली सावत्र मुलांची हत्या

$
0
0

नाशिक:

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भोये यांनी स्वतःच्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. यात एक मुलगा जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी होता. मात्र नंतर उपचारांदरम्यान दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. ही घटना नाशिक येथील अश्वमेध नगरात सकाळी सातच्या सुमारास राजमंदिर इमारतीत घडली.

भोये यांनी दोन्ही मुलांना बाथरूममध्ये घेऊन जात केला गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान, भोये यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतीत सेवा न दिल्यास कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा सेतू समितीकडे उपलब्ध निधीचा उपयोग सरधोपट खरेदी करण्यापेक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी करा असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हा सेतू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झाली. या बैठकीला मांढरे, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ' सरकारी कार्यालयात दाखल केलेल्या कामाचे पुढे नेमके काय झाले हे कळण्याची कोणतीही केंद्रीय व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक अनेकदा स्वतः कार्यालयात येऊन त्याबाबतची माहिती घेताना दिसतात. यामध्ये नागरिकांचा वेळ व श्रम वाया जातात. या नागरिकांना माहिती देण्यात कर्मचाऱ्यांचाही वेळ वाया जातो.

हा वेळ अधिक कृतिशील कामांमध्ये जावा या दृष्टीने तंत्रज्ञानाची मदत घेऊन सेतू निधीमधून एक विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मांढरे यांनी घेतला आहे. त्यास एक व्हाट्सअॅप क्रमांक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाने तहसील प्रांत अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला व त्यावर विहित मुदतीत कार्यवाही झाली नाही तर अशा अर्जाची सद्यस्थिती समजून घेण्याकरीता या व्हॉटस क्रमांकाचा उपयोग होणार आहे. कार्यालयात केलेल्या अर्जाची छायाप्रत व्हाट्सअॅपद्वारे संबंधितांना पाठविता येईल. सोबत स्वतःचा जुजबी तपशील पाठवावा लागेल. त्या आधारे व्हॉट‌सअॅपद्वारे सदर अर्ज संबंधित शाखेकडे फॉरवर्ड करण्यात येईल. त्या शाखाप्रमुखांनी अशा अर्जावर तीन दिवसांच्या आत त्या क्रमांकावर उत्तर देणे बंधनकारक असणार आहे. उत्तर न मिळाल्यास संबंधित बाब अर्जदाराने पुनश्च व्हॉट्सअॅपद्वारे निदर्शनास आणल्यास संबंधित शाखा प्रमुखाला विलंबासाठी जबाबदार ठरविण्यात येणार आहे. आपल्या अर्जावर काय कार्यवाही झाली अथवा त्या अर्जाची सद्य:स्थिती काय, हे समजून घेण्यासाठी नागरिकांना या व्हॉटसअॅप क्रमांकांची मदत होणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या वाऱ्या करण्याची आवश्यकता राहणार नाही. आठवडाभरात हा व्हाट्सअॅप क्रमांक कार्यरत करण्याच्या सूचना मांढरे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार दाखले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी दरवर्षी जून-जुलैमध्ये होणारी गर्दी टाळता यावी या उद्देशाने आश्वासक पाऊले टाकण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आगामी जुलै महिन्यापासूनच वेगवेगळे दाखले नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रदान करण्याचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील प्रवेशाच्या वेळी होणारी गर्दी टाळणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे शैक्षणिक प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडू लागली आहे. या प्रवेशाकरीता उत्पन्नाच्या दाखल्यापासून जातीच्या दाखल्यापर्यंत विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. हे दाखले मिळविण्यासाठी सध्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचीही दमछाक होत असल्याचे पहावयास मिळते आहे. सर्व्हर डाऊनसारख्या तांत्रिक अडचणींमुळे मुदतीत दाखले मिळण्यात अडचणी उद्भवत आहेत. साधारणत: १५ ते २० हजार दाखले प्रलंबीत राहात असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागतो आहे. काहीवेळा सर्व्हर बंद असतो तर काहीवेळा तो खूपच संथगतीने काम करतो. त्यामुळे दाखले बनविण्याच्या आणि ते वितरीत करण्याच्या प्रक्रियेलाही विलंब होतो. दरवर्षीच जून आणि जुलैमध्ये हा प्रश्न भेडसावत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. काही दाखले निकाल लागण्यापूर्वीही काढता येतात. नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निकाल लागण्यापूर्वीच हे दाखले कसे उपलब्ध करून देता येतील, यावर जिल्हा प्रशासनाने विचार सुरू केला असून आगामी वर्षात हा प्रयोग राबविण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी प्रशासन झाले ‘पास’

$
0
0

विद्यार्थी अन् ज्येष्ठांसाठी बसस्थानकात स्वतंत्र दोन कक्ष

म. टा. वृत्तसेवा, येवला

सवलतीच्या पाससाठी विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एकाच रांगेत उभे करून येवला परिवहन महामंडळाने अनेक नियमांना बाय'पास' करीत सुरू केलेला गोंधळ अखेरिस मिटला आहे. महाराष्ट्र टाइम्सने सणसणीत वृत्त प्रकाशित करताच एसटी महामंडळाने विद्यार्थी आणि ज्येष्ठांसाठी दोन स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत. एकाच कक्षातून विद्यार्थी व ज्येष्ठांसाठी पास व स्मार्ट कार्ड नोंदणी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गर्दीमुळे कक्षाबाहेर तासन् तास करावी लागते असे वृत्त 'मटा' प्रकाशित करीत ज्येष्ठांच्या व्यथा अन् वेदनांचा आवाज बुलंद केला होता.

एसटीचा मासिक सवलतीचा पास प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची येवला बसस्थानकातील पास मिळणाऱ्या खिडकीसमोर गर्दी वाढत आहे. याच कक्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाइन स्मार्ट कार्ड नोंदणीही सुरू होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. मात्र आता येवला आगाराने बसस्थानकात विद्यार्थ्यांचे पास आणि ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या कक्ष सुरू केले आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास मिळणाऱ्या कक्षात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र दोन खिडक्या उघडल्या आहेत. या कक्षात दोन एसटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तर, ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी समोरील बाजूस एक नवे दालन उघडले आहे. त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराहसाठी राज्य समितीचा पुढाकार

$
0
0

हज समितीचे अध्यक्ष सिद्दीकी यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुस्लिम बांधवांना येत्या काळात उमराह यात्रेसाठी जाण्याची संधी मिळणार आहे. राज्य हज समितीने तसा प्रस्ताव मंजूर केला असून याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. यामुळे येत्या काळात हजसह उमराह यात्रेसाठी राज्य समितीच्या माध्यमातून बांधवांना पाठविले जाईल, अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली.

मुस्लिम धर्मात विशेष महत्त्व असलेल्या हज यात्रेला यंदा जिल्ह्यातून जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी जिल्हा हज समितीच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळा झाली. यात हज यात्रा प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी, यात्रेत करावयाचे पठण याबाबतची माहिती राज्य समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती देण्यात आली. उमराह यात्रेसाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सौदी अरेबियात जाण्याची सुविधा आहे. मात्र, अनेकदा खासगी ट्रॅव्हल्समुळे बांधवांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे राज्य समितीने पुढाकार घेत येत्या काळात अल्प दरात वर्षातून तीन वेळा उमराह यात्रेसाठी बांधवांना पाठविले जाईल. एका वेळी १ हजार जणांना सहभागाची संधी मिळेल. राज्य समितीतर्फे बांधवांना उमराह यात्रेसाठी पाठविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे सिद्दीकी यांनी सांगितले. या कार्यशाळेत हज यात्रेचे नियोजन, साहित्याची काळजी, अडचण आल्यास संपर्कासाठी ठिकाणे आदींबद्दल मार्गदर्शन करण्यात आल्याचे जिल्हा प्रशिक्षक जहीर शेख यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील एक हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते.

जिल्ह्यात होणार कार्यालय

हज यात्रेकरुंना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी समिती विविध उपाययोजना राबवित आहे. यंदा सर्व सुविधा यात्रेकरुंना मिळतील, या हेतूने नियोजन करण्यात आले आहे. सध्या समितीचे कार्यालय मुंबईमध्ये आहे. अनेकदा इतर जिल्ह्यातील बांधवांना मुंबईत येणे दूर पडते. यामुळे यात्रेसाठीची नोंदणी व इतर कार्यवाही सोपी व्हावी. तसेच बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, या हेतूने नाशिकसह इतर जिल्ह्यात हज समितीचे कार्यालय सुरू करण्याचे योजिले आहे, असेही अध्यक्ष सिद्दीकी यांनी सांगितले.

अशी असते उमराह यात्रा

उमराह ही मुस्लिम बांधवांची मक्का येथील यात्रा असते. त्यासाठी जगभरातील मुस्लिम बांधव सौदीत जातात. मक्का शहरातील काबा या पवित्र ठिकाणी यात्रेकरु प्रदक्षिणा घालतात. हज यात्रेव्यतिरिक्त मक्कामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रेला उमराह यात्रा म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images